बैलगाडा शर्यती

पुर्वी पासून ग्रामीण भागाला बैलगाडा शर्यतीची परंपरा लाभली आहे. पश्चिम भागात वाडा, डेहणे, गोरेगाव, साकुर्डी, वाशेरे, वाळद, आव्हाट, खरोशी, एकलहरे व शेंदुर्ली या गावामध्ये प्रामुख्याने यात्रेच्या निमित्ताने बैलगाड्यांच्या शर्यती आयोजीत केल्या जात.

या साठी यात्रा कमीटी एक महिना आधीपासुनच तयारीला लागत. वर्गण्या व देणग्या गोळा केल्या जात.काही उत्साही लोक बैलगागाडा शर्यतींसाठी वस्तूरूपाने देणग्या देत.त्यामध्ये कपाट, टिव्ही, पंखा, घड्याळ यांचा सामावेश असे.

बैलगाडयांच्या शर्यतीसाठी एक ते पाच क्रमांक काढले जात. बक्षीसांची संख्या जर जास्त असेल तर एक ते पाच क्रमांकासाठी वस्तुंची विभागणी केली जायची. परत फळीफोड गाड्यासाठी वेगळे इनाम असायचे.

सतत तीन वर्ष प्रथम येणा-या गाड्यांसाठी वेगळे इनाम असायचे.हे इनाम वैयक्तिक स्वरुपात असायचे.बैलगाडा घाट दुरूस्ती साठी आठ दिवस आधीच गाडाशौकिन ग्रामस्थ तेथे जाऊन दुरूस्ती करत. त्यांना भेळ व जिलेबी दिली जाई.

पुर्वी यात्रेच्या आदल्या दिवशीच गाडा मालक सायंकाळी यात्रा असलेल्या गावी दाखल होत.दुस-या दिवशी सकाळी टोकन देण्याचे काम सुरू होई.त्यासाठी गाडामालकाची रांग लाऊन टोकन दिले जात.

नंतर पुढे ही पद्धत बदलली गेली यात्रेच्या दिवशी सकाळी नऊ ते बारा या काळात सर्व गाडामलकांच्या नावाच्या चिठ्ठया काढून सोडत पद्धतीने टोकन काढले जाऊ लागले. 

पुर्वीचा घाट व नंतर बनवलेला घाट यात अधूनिकपणा आला. घाटातील बैलगाड्यांची अचुक माहीती आँखो देखा हाल पहाण्यासाठी घाटाच्या शेजारी उंच मचान तयार करून चार बाजुला लाऊडस्पीकरची कर्णे बांधन्यात येत. मचाणावर पाच-पंचवीस गावचे कार्यकर्ते गर्दी करून बसत. त्यापैकी एकाकडे सेकंद पहाण्याचे घड्याळ असे. तर दोन जण अलाउंसींग करायला असत. शेजारीच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली असे. कार्यकर्त्यांसाठी भेळ,शेवरेवडीची व्यवस्था असे.मलाही लहानपणी त्या मचाणावर जाऊन गाडे पाहण्याची मजा घ्यावी असे वाटायचे. परंतु ही इच्छा कधीही पुर्ण झाली नाही.

काही जण झाडावर बसुन गाडे पाहाण्याचा आनंद लुटायचे. .झाडावर आधीच बरेचजण बसलेले असायचे.तेथेही आमचा नंबर लागला नाही. 

दुपारी बाराच्या नंतर घाट चालू व्हायचा. घाटाच्या खाली मैदानात सगळीकडे खिल्लारी पंढरेशुभ्र बैलच बैल दिसायचे. प्रचंड भंडार उधळला जायचा. काही अवखळ बैलांना सांभाळताना लोकांची त्रेधातिरपट व्हायची. घाटाच्या दुतर्फा व जिकडे तिकडे लोकांचा प्रचंड कोलाहाल दिसायचा. धोतर, पैरण, टोपी, पायजमा, खमीस, पँन्टव शर्ट घालून लोक यात्रेला येत. 

लांबुन सगळीकडे पांढरेच पांढरे दिसे. जागोजागी सुस्पष्ट आवाज यावा म्हणून लाऊडस्पिकरची कर्णे लावली जात. काही कर्णे झाडांवर देखील बांधली जात. जागोजागी लोकांना थंडगार करण्यासाठी सायकलीवर बर्फाच्या गारीगारी, कुल्फ्या, आईसक्रिम,फालुदा इत्यादी पदार्थ विकले जात. जोडीला लेमनगोळ्या, कलिंगडाच्या खापा लहानमुले विकत असत.बैलगाडयांच्या घाटाजवळ गेल्यावर...एक वेगळेच वातावरण असायचे.सगळीकडे नुसती गर्दी व गोंगाट यांचा कोलाहाल असायचा.

हे पहा सर्व गाडामालकांना नम्र सुचना.कृपया टोकन नंबर प्रमाणे आपापले गाडे जुंपावेत..ग्रामस्थ मंडळी पुढील गाडा जुंपायला मदत करा...घाटात जास्त गर्दी करू नका ...एकदा जुंपलेला गाडा पुन्हा जुंपल्यास स्पर्धेतुन बाद करण्यात येईल...अशा स्पिकरवर सारख्या सुचना चालू असतात......टोकन नंबर बारा..श्री.सोमाजी गोमाजी कापसे यांचा सुटत आहे गाडा...खेड तालुक्याचे प्रगतशिल शेतकरी...डेहणे गावचे सरपंच/पाटील/चेअरमन इत्यादी इत्यादी श्री सोमाजी गोमाजी कापसेssss  फार नामांकित बारी आहे बरं का मंडळी ! पहाल तर हसाल नाही तर फसाल. निशान.पडताच भिर्ररररस्स्स्स्स्स

आराराराराssssssझाssssलीsssssssनुसतं.भुंगाटन.सेकंद.. बाsssssराsssss,असे पुकारताच घाटातुन लोक गाड्याच्या पठीमागे पळायचे. काही उत्साही लोक क्षणार्धात बैलांना पकडुन आणायचे. काही बैलगाडे घाट संपल्यावर सुद्धा कितीतरी वेळ पळतच राह्यचे.त्याच्या मागे गाडामालका बरोबर आलेले कार्यकर्ते बैलांना पकडण्यासाठी धावाधाव करायचे.काही बैलगाडे निशान पडताच किंवा घाट संपताच थांबायचे.

कमी सेकंद मध्ये आलेल्या बैलांची सनई.डफडे व ताशाच्या गजरात..भंडार उधळत मिरवणूक वाजत गाजत निघायची. म्हातारे, कोतारे, अबाल, वृध्द देहभान विसरून नाचायचे...काय आनंद होता तो?.असा आनंद आता होणे नाही.

आज एखाद्या वयोवृद्ध माणसाला जरी लाख रुपये मिळाले. तरी तो इतका कधी नाचू शकत नाही.अनेक बैलगाडा मालकांकडे घोड्या होत्या.या घोड्या बैलगाड्याच्या पुढे थोड्या अंतरावर उभी केलेली असे. त्यावर  घोडेस्वार बसलेला असे. निशान पडताच ही घोडी वायूवेगाने  घाटातून पळत असे. त्यामागे बैलगाडाआसे. हे दृश्य अतिशय जबरदस्त असे.श्वास रोखुन लोक स्पर्था पहात. घोडेस्वरांचे अतिशय कौतुक वाटायचे. 

सुत्रसंचालन करणारा,बैलगाडा शर्यती पहायला आलेल्या मान्यवरांचे स्वागत करायला असायचा.श्री.अमुक तमुक यांचे घाटात अगमन झालेले आहे.त्यांचे यात्रा कमिटीच्या वतीने हर्दिक स्वागत...यात्रा कमिटीने आपले स्वागत केल्याचे ऐकल्यावर एखाद्या साधारण माणसाचा उर इंचभर वाढे...तो घरी गेल्यावर पाच पंचवीस लोकांना माझा यात्रा कमेटीने स्वागत केले असे गावभर सांगत सुटे, 

बारा वाजे पासून ते संध्याकाळी सुर्य मावळेपर्यंत बैलगाडयांच्या शर्यती चालू असायच्या. संध्याकाळी इनाम वाटप केले जाई. पश्चिम भागात अनेक नामांकित गाडे होते. त्यापैकी कै.नानासाहेब भिकाजी कशाळे माजी जि.प,सदस्य गाव डेहणे कै.सखाराम सावंत, 

गणपत गिरजू कशाळे, कै.चिमण श्रीपत कोरडे श्री सितारामशेठ कोरडे  (मा.सरपच) गाव डेहणे, पांडू बांगर,भागू  बांगर ,मारूती भोपळे,आंबेकर,किसन रंगाजी भालेराव गाव एकलहरे,श्री.धोंडीभाऊ म्हतारबा दरेकर श्री.रामभाऊ सिताराम खामकर कै.दगडू उमाजी खामकर,दगडू भिवाजी वाघमारे- गाव शेंदुर्ली. धोंडू लक्ष्मण शिंदे,विठ्ठल सोळशे गाव वाजळे श्री.जीजाबा आप्पा पौखरकर,किसन धोंडिबा पोखरकर ,राघू हरि पोखरकर सखाराम भिकाजी गाडेकर- गाव वाळद कै.बाजीराव मोरे श्री.ज्ञानदेव काशिनाथ सुरकुले.श्री पुनाजी भागुजी सुपे श्री.शिवराम धोंडिबा पावडे,नथू गणा हुंडारे दत्तात्रय वाडेकर,भिकाजी हुंडारे ,पारूशेठ हुंडारे ,बाबुराव माळी,काशिनाथ माळी ,प्रकाश नागू साबळे ,राम नाईकडे,नानाभाऊ माळी बबुशा पावडे ,विठोबा रामा लांडगे गाव वाडा,गजाबा गिलबीले ,कोयाळी गंगाराम कडलक गाव तिफनवाडी संभाजी रोकडे,कै.सहादू भागू वर्ये,कमा भिमा कोकणे चौधरी गाव साकुर्डी राघू बाळा  चिमटे गाव वाशेरे..श्री.धारू कृष्णा गवारी (गुरूजी)गोरेगाव..नामदेव धोंडू मडके,नारायण दुलाजी भवारी गाव धामणगाव बु!! नथू बुरसे - बुरसेवाडी इत्यादी बा-या नामांकित होत्या.

जसे गावागावातून बैलगाडा मालक होते तसेच बैलगागाडा शर्यतींचे अलांउसर (सुत्रसंचालन) करणारे सुद्धा फार प्रसिद्ध होते.श्री.मनोहर दत्तू कोरडे (पोष्टमन) डेहणे श्री दामू लांडगे गाव वाळद कै.कोळेकर (कोये,कुरकुंडी) यांच्या नावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.कोळेकर यांचा आवाज व बैलगाड्यांच्या चकारींचा आवाज एकमेकाशी एकरूप होत असे.व एक वेगळाच नाद असमंत दणानुन सोडे. हा आवाज ऐकताना मन थरारून जाई.अजुनही हा आवाज कित्येकांच्या कानात जसाच्या तसा असेल. विशेषतः विठोबा रामा पावडे यांचा गाडा घाटातुन पळताना लोक झालीssss विठू रामाची बारी असे सगळे ओरडायचे. 

तसेच कै.सभाजी रावजी पावडे यांना घाटातील गाडे जुंपन्याचा भलताच शौक होता.व घाटातच त्यांच्या अंगावरून गाडा गेल्याने त्यांना  १९७१ साली प्राण गमवावा लागला. त्यांचे स्मारक जुन्या वाड्यात बांधले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा बबुशा संभाजी पावडे यांनीसुद्धा बैलगाडा सुरू ठेवला.

लोकांना जसे बैलगाड्या विषयी आकर्षण होते तसेच बैलगाडयांच्या पुढे पळणा-या घोड्यांबद्दलही होते.कै. बाजीराव मोरे यांच्याकडे एक पांढरी शुभ्र घोडी होती. त्या घोडीवर शक्यतो कोण बसत नसत. ही घोडी बैलगाड्या पुढे पळत असे. बैलातील व घोडीतील अंतर वाढल्यावर ती घोडीआपला वेग कमी करून मागे पाहून पुढे पळत असे.

अनेकांकडे घोड्या होत्या.शेतक-यांनी त्यांच्या बैलावर प्रचंड प्रेम केले,जीव लावला.कित्येकांनी बैलांच्या दशक्रिया केल्या. बैलांचे पोटच्या मुलासारखे लाड केले.हे कुनीही नाकारू शकणार नाही. या बैलगाडा शर्यती हा ग्रामीण भागाच्या यात्रेमधील करमणुकीचा एक अविभाज्य घटक होता. विरंगुळ्याचे महत्त्वाचे साधन होते.या बैलगाडा शर्यतीवर खेडेगावची अर्थव्यवस्था अवलंबून होती.अनेकांचे संसार त्यावर अवलंबून होते. बैलगाड्याशिवाय यात्रा म्हणजे बीनमिठाचा स्वयंपाक असेच म्हणावे लागेल.





गावाकडच्या यात्रा व पैलवान

गावाकडच्या यात्रा व पैलवान 

ग्रामीण भागात फार पुर्वीपासून बलोपासना केली जाते.पुर्वी नोकरीच्या संधी उपलब्ध नसायच्या.त्यामुळे गावातील सर्व तरूण पोरे शाळा शिकता शिकता शेतीची व गायीगुरे सांभाळण्याचे काम करायचे.काहीजण अर्ध्यावरच शाळा सोडून शेतीची कामे पुर्णवेळ करायचे.

पुर्वी प्रत्येकाकडे दोन बैल,पाच दहा गावठी गाया असायच्या. एक दोन म्हशी असायच्या. काहीजणांकडे दहा पाच शेळ्या  व कोंबड्या असायच्या.गावातील तरूण शेतीची कामे करता करता बलोपासना करायचे.सकाळी लवकर उठून धारा काढायच्या.तेथेच तांब्याभर दुध प्यायचे.व बाकीचे दुध डेअरीवर घालायचे.

तिकडुन आल्यावर गुरांना वैरण कापुन आणायची.व तडक आंघोळीसाठी टाँवेल,साबण,घासणी घेऊन ओढा,नदी किंवा विहीर गाठायची.तेथे आधीच बरीच पोरे आलेली असत. काहीजण व्यायाम तर काहीजण कुस्ती खेळत.

एकमेकांना  डाव प्रतिडाव शिकवत.कुस्यांचा खेळ झाल्यावर हातपाय घासुन अंघोळ केली जाई.प्रत्येकाकडे स्वतःची घासणी असे.ही घासणी नळ्यांच्या कौलाची किंवा दगडाच्या चिपेची असे.बराच वेळ पोहून घरी जायचे.दुध भाकरी कालवण भात असा मेणू असायचा.अशाप्रकारे गावातील तरूणांचा नित्यक्रम असायचा.

अनेक गावांमध्ये पुर्वी यात्रा भरायच्या.आजही भरतात.पण पुर्वीसारख्या नाही.आता यात्रा करायच्या म्हणुन करतात.पण पुर्वी यात्रांना अनन्यसाधारण महत्त्व होते. एक महिना आधीपासुन तयारी चालायची.

ग्रामस्थांच्या पारावर बैठका व्हायच्या.विवीध नामांकित भजनी भारुडांना सुपारी दिली जायची. नविन कपडे -चोपडे घेतली जायची.घराच्या भिंती शेणामातीने सारवल्या जायच्या.त्यावर राखेने सारवले जायाचे.काही उत्साही व प्रतिष्ठित लोक घरांना मातीचा निळा व पिवळा रंग द्यायचे.कुणी घरात लांब काचेची नळी असलेली ट्युबलाईट घरात लावायचे .तर काही नवीन गाण्याच्या कँसेट आणायचे.

विशेष म्हणजे यात्रा ठरल्यावर आठ दिवस आधी यात्रेचे आमंत्रण देण्यासाठी नातेवाईकांच्या घरी जावे लागायचे.व रितसर आमंत्रण दिले जायचे.

नोकरी निमित्त बाहेर शहरात असलेले गावातील लोक बायका मुले  नातेवाईक दोन दिवस आधीच येत असत.पुर्वी मुंबईवरून येणा-या लोकांना काळात फार मोठी कसरत करावी लागायची. पुर्वी मुंबई लोणावळामार्गे जुन्या मार्गाने वाहतुक केली जायची.घाटात वाहतुक कोंडीमुळे एक दोन दिवस गाडीतच मुक्काम करावा लागायचा.प्रचंड त्रास व्हायचा.परंतू त्याही पेक्षा  गावच्या यात्रेला जाणे हा आनंद फार मोठा असायचा.

पुर्वी मुंबईवाले गावाला येताना खाऊ आणायचे.हा खाऊ म्हणजे हलवा असायचा.हा हलवा पिवळसर पांढरा असायचा. पापुद्र्यावर पापुद्रे चढवलेले असायचे.अतिशय अप्रतिम पदार्थ असायचा.हा हालवा अनेक घारामध्ये वाटला जायचा.मला हा हालवा खुप आवडायाचा.आपल्या घरातील कुणीच मुंबईला नाही याचे खुप वाईट वाटायचे.

यात्रेच्या आदल्या दिवशी गाव लोकांनी फुलून जायचा. यात्रेच्या दिवशी पहाटेपासून गाव जागे व्हायचा.गावातील एकमेव हापशावर पाणी भरण्यासाठी स्रीयाची तोबा गर्दी व्हायची, आणि आपोआप जाग यायची.अंघोळी झाल्यावर नवीन कपडे घालून नटून थटून गावातून एकमेकाकडे मित्रांना भेटायला जायचं. 

सकाळी ग्रामदेवताकडे मांडव, डहाळे यांचा कार्यक्रम असायचा. हा कार्यक्रम संपल्यावर हार-तुरे आणण्यासाठी सारा गाव एकत्र जमायचा. आणि सर्व लोक जमा झाल्यावर हार-तुऱ्यासाठी आम्ही शिरगाव येथे जुन्या एसटी स्टँड वर भेंडीच्या झाडाखाली पारावर जमायचो. त्यावेळी अनेक लोक आलेले असत. एकमेकांची ख्यालीखुशाली विचारली जायची. 

त्यावेळी गावचे हारतुरे हे मुंबईवरून आणले जात असत. त्यावेळी गावातील अनेक लोक नोकरी निमित्ताने भिवंडी ला सुद्धा होते. त्यांनीसुद्धा यात्रेनिमित्ताने ग्रामदेवता साठी दानपेटी, साहित्य ठेवण्यासाठी कपाट, प्रचंड मोठे आरसे व सतरंज्या इत्यादी साहित्य वर्गणी काढून दिलेले आहे, 

मुंबईकरांना हारतुरे आणण्याचा मान होता.अजूनही तो आहे.सर्व हारातु-यांची पूजा  झाल्यावर फटाक्याची माळ पेटवली जाई.त्यानंतर सनई चौघडाच्या गजरात हार-तुरे यांची मिरवणूक निघत असे.वाजत गाजत नाचत डुलत ही मिरवणूक निघत असे. 

गावातील सुवासिनी यथोचित पूजा करून ही मिरवणुक मंदिराकडे जात असे.आजूनही ही परंपरा चालू आहे.

मनोरंजन व खेळ तमाशा

त्या नंतर देवास दंडवते,व नवस फेडण्याचा कार्यक्रम असतो. रात्री पालखी व त्यानंतर करमणुकीचा कार्यक्रम असतो.हे वेळापत्रक सर्व गावांना लागू पडते. 
पुर्वी भारूड किंवा करमणुकिचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक विशेषत:स्रिया व मुले आधीच जागा पकडुन ठेवायचे. खाली अंथरण्यासाठी पोती, घोंगड्या व गोधड्या याचा उपयोग केला जायचा.रात्री पालखीचा कार्यक्रम व त्यामध्ये केली जाणारी फटाक्याची आतशबाजी प्रेक्षणीय असे. पहाटेपर्यंत करमणुकीचा कार्यक्रम असे. त्यानंतर लोक आपापल्या घरी जात. 

गावातील लोक थोडावेळ झोपून पुन्हा उठून अंघोळ चहा नाष्टा करून पुन्हा हजेरीचा कार्यक्रम पहायला जायचे.बायामाणसे सकाळचा चहा नाष्टा व धुनी भांडी करून यात्रेला आलेल्या पाहुण्या स्रियांना बांगड्या भरायच्या.थोडावेळ हजेरीचा कार्यक्रम पहायच्या. रेवड्या घेऊन द्यायच्या.लहान मुलांना ओलीभेळ,कलिंगडाच्या खापा,द्राक्षे गारीगार घेऊन द्यायच्या.

माझ्या लहानपणी त्यावेळी गारीगार फार प्रसिद्ध असायची. गारीगारवाला हा सायकलवर गारीगार घेऊन यायचा.त्याच्या कँरेजला एक लाकडी किंवा पत्र्याचा पेटारा असायचा.या पेटा-यात लालभडक ,पिवळ्या,हिरव्या व गुलाबी बर्फाच्या गोड वड्या असत.यालाच गारीगार म्हणत.

ही गारीगार निव्वळ बर्फाची असुनही मला प्रचंड आवडायची.अजुनही ती आवड कायम आहे.परंतू या गारीगारची जागा विवीध प्रकारच्या कुल्फी,आईसक्रिम,चोकोबार यांनी घेतली व बर्फाची गारीगार हद्दपार झाली.

काळाचा महिमा दुसरे काय? पुर्वी यात्रांना खेळणीही  साधी सुधी असत.पिपाणी,पोपट व त्याला असणारी दोन चाके,प्लास्टिकच्या अतिशय छोट्या गाड्या त्यांची न फिरणारी चाके ,भोवरा,टिकटाँक, काचेच्या तबकडीत असणारे चार स्टिलचे छोटे मणी. ती तबकडी इकडून तिकडुन फिरवून सर्व मणी त्या घरात घालायचे व ते केल्यावर होणारा आनंद अवर्णनीय असायचा.

यात्रेत अजुन एक खेळणे असायचे.दोन रंगीत का गदाच्या मध्यभागी चौकोनी काचेचा तुकडा कागदाला चिकटवलेला असायचा. प्रत्येक कागदावर प्रत्येकी चार चित्रे असत, ही चित्रे काचेवर ठेवून घडी घालून उलट्या बाजूने पहायचे, ही चित्रे बहुदा रेल्वे ,जहाज, विमान व पाण्याचा टँकर अशी असत. दुसऱ्या बाजूला घोडा, वाघ, सिंह व कुत्रा  इत्यादी प्राणी असत.

हजेरीचा कार्यक्रम झाल्यावर थोड्यावेळाने गावाच्या वतीने पाहुण्या रावळ्यांना जेवणाची सोय केलेली असे. यालाच आखाड्याचे जेवण असे म्हणत. यासाठी गावकरी सकाळपासूनच जेवण बनवायच्या तयारीला लागत. भात, विविध कडधान्याची आमटी व शाकभाजी असा ठरलेला मेनू असे.
दुपारी ऐन रणरणत्या उन्हात लोक रिकाम्या शेतामधून भात खाचरांमध्ये ढेकळा मधून पंगती करून जेवायला बसत. काही ठिकाणी झाडाच्या पानाच्या पत्रावळी असत. तर काही ठिकाणे नुसतीच झाडाची पाने असत. ही पाने काहींना लावता येत नसत. त्यामुळे त्यांची पाने लावताना खूपच तारांबळ उडत असे. हे पाहून काही लोक त्यांना पाने लावायला मदत करत. रणरणत्या उन्हाचे चटके व खालून तप्त जमिनीचे चटके बसूनही लोक आखाड्याचे जेवण करत हे जेवण करण्याची मजा काही औरच असे. 

जेवण केल्यावर काही लोक झाडाच्या सावलीला आडवे पडून वामकुक्षी घेत असत. तर काही गप्पा मारत वेळ काढत. काहीजण पैशावर सूटासुट किंवा तीन पत्ते (फलस) खेळत. तर काहीजण गलीवर नाण्यांचा खेळ खेळत. 
कुस्त्यांची दंगल

हे सर्व करत असताना अचानक सनई चौघडा ढोल ताशे यांचा आवाज कानावर येई. गावकरी गुलाल उधळीत आखाडयासाठी आणलेल्या वस्तू नाचवीत कुस्त्यांच्या आखाड्याच्या ठिकाणी येत, थोड्याच वेळात कुस्त्यांचा जंगी आखाडा सुरू होई. 
यासाठी लोक वर्तुळकार बसत. मध्यभागी आखाडा सुरू होई. प्रथमता लहान मुलांच्या कुस्त्या सुरू होत. या छोट्या पैलवानांना रेवड्या दिल्या जात. त्यानंतर एक रुपयापासून कुस्ती सुरू होई. 

खूप पूर्वी विजयी पैलवानांना पागोटे (फेटा) बांधून त्यांचा सन्मान केला जात असे. त्याकाळात पैलवानांना खूपच आपुलकीची व प्रेमाची वागणूक दिली जात असे. त्यांचा यथोचित आदर सत्कार केला जाई. त्यांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान होते. 

आखाड्यात पुढील काळात पैसे रूपाने इनाम दिले जाऊ लागले. नंतर स्टील ग्लास, तांब्या, जग, बादली, हंडा इत्यादी भांडी ईनाम म्हणून देण्यात येऊ लागल्या. त्या जोडीला देवांचे फोटो, चांदीच्या ढाली,( पदके) चांदीच्या अंगठ्या, रेडिओ, टेपरेकॉर्डर इत्यादी वस्तू दिल्या जाऊ लागल्या, तसेच कोंबडा, बोकड, म्हैस इत्यादी प्राणी व पक्षी कुस्ती जिंकलेल्या पैलवानाला इनाम म्हणून दिले जाऊ लागले. 

या कुस्त्या खेळताना खूप मजा यायची. प्रसंगी वादविवाद व्हायचे. परंतु कुस्त्यांचे कार्यक्रम अतिशय छान व्हायचे. घरी जाताना लोक कुस्त्याबद्दल चर्चा करायचे. या चर्चा दोन दोन दिवस चालायच्या. 

पूर्वी पश्चिम भागात अनेक पैलवान होऊन गेले त्यापैकी कै.हरिभाऊ आंभवणे,श्री सहादू जढर, भिकाजी व चिमाची बांगर, श्री विठ्ठल सोळशे (पोखरी)कै.लुमाजी ठोकळ श्री.विष्णू गोमा व विष्णू पांडु तळपे, खेमा तळपे इत्यादी नावे घेता येतील. त्यानंतर श्री जयराम आंबेकर (गुरूजी) श्री कुशाबा आंबेकर श्री शिंगाडे बंधू (पोलीस) मच्छिंद्र गादेकर श्री किसन गोडे श्री होनाजी मोसे असे अनेक पैलवान भागामध्ये लोकप्रिय होते.

ही परंपरा पुढे श्री.शंकर वनघरे श्री.हरिभाऊ हुरसाळे श्री अशोक सुतार, श्री वसंत काठे, श्री भरत मोरमारे ,श्री शिवाजी केंगले श्री शिवाजी मु-हे श्री दुंदा वनघरे श्री दत्ता आंभवणे श्री.अंकूश हुरसाळे श्री अंबर सावंत, श्री. दत्तात्रय तळपे, श्री नामदेव दळवी श्री.चिंतामण कोळप श्री.अशोक सुपे श्री.काशिनाथ जढर,श्री महादू मोहन अशा अनेक पैलवांनानी चालू ठेवली.

यात श्री बबन गोपाळे यांचा विशेष उल्लेख यासाठी करावा लागेल की त्यांची राज्य पातळीवर कुस्तीसाठी निवड झाली व त्यांनी ही कुस्ती जिंकली व संधीचे सोने केले. त्यांनी भागाचे नाव राज्य पातळीवर नेऊन ठेवले. .यामध्ये श्री,शंकर वनघरे यांचा पट श्री अशोक सुतार यांची लांग (टांग) अनेकांच्या स्मरणात असेल.

आखाडा संपल्यानंतर पाहुणे रावळे दोन तीन दिवस राहून मगच आपल्या घराकडे मार्गस्थ होत.मुंबईकर सुद्धा पंधरा वीस दिवस राहून मगच जात. 

परंतू आता काळ बदलला.रस्ते झाले.लोकांकडे वाहने आली.मोबाईल आले.लोक मोबाईलवरून यात्रेचे आमंत्रण देतात.पाहूणे स्वतःच्या वाहनाने येतात.जेवण करून लगेच जातात.काहीकाही इतर कामे असल्याचे सांगुन जायचे टाळतात. 

काही महाभाग तर स्वतःच्या गावच्या यात्रेला सुद्धा जाणे टाळतात.ही अत्यंत विषण्ण करणारी गोष्ट आहे.काळ जरी बदलला तरी परंपरा ह्या जपल्या गेल्याच पाहीजेत. हे ध्यानात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.


        शरद जठार आपला माणूस, कामाचा माणूस 







गावोगावी येणारे फिरस्ते लोक

सुगी संपल्यावर लक्ष्मीच्या रुपाने ग्रामीण भागातील शेतक-यांच्या घरातील कणगी धान्याने भरून जात. सगळीकडे आनंदी आनंद असे.घरात दुधदुभते असे.


गावोगावी येणारे फिरस्ते लोक






वासुदेव

नुकताच हिवाळा सुरू झाल्याने सकाळी खुप थंडी असे.अशा थंडीत अंथुरणातुन उठूशी वाटत नसे.आणि अशातच भल्या पहाटे वासुदेवाची स्वारी दारात येई.पांढरे शुभ्र धोतर,पैरण डोक्यात मोरपिसांचा टोप  हातात चिपळ्या असत. गळ्यात धान्य जमा करण्यासाठी झोळी असे.दारात आल्यावर त्याच्या गाण्याने व तालबद्द चिपळ्यांच्या आवाजाने जाग येई.वासुदेव प्रत्येकाच्या दारात जाऊन गाणे म्हणायचा.घरातील स्रीया त्याला सुपातुन पसाभर तांदुळ द्यायच्या.

नंदीबैल वाला 

वासुदेवा प्रमाणेच नंदीबैल वाले सुद्धा सकाळी सकाळीच गावात येत.भला मोठा पांढरा शुभ्र नंदीबैल व त्यावर रंगीत झुल घातलेली असे.नंदीबैल अनेक प्रश्नांची उत्तरे मान हालवून द्यायचा.नंदीबैलाला व नंदी वाल्याचा खेडेगावातील स्रिया हळदी कुंकू लावून सुपातील तांदूळ त्याला द्यायच्या. सोबत चार-आठ आणे किंवा रुपयाचा ठोकळा त्याला दिला जाई. नंदीबैलवाला गावातील लोकांना अनेक प्रकारच्याअडचणीवर उपास-तपास व इतर तोडगे सांगत असे. नंदीवाला गेला की आम्ही आमच्या घरातील बैलांना प्रश्न विचारायचो. परंतु ते नंदीबैला सारखी मान हलवत नसत .व उत्त्तरे देत नसत. आम्ही तेव्हा खुप नाराज व्हायचो. नंदीबैलासारखे आपल्या बैलाने ही मान हलवून प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत असे आम्हाला वाटायचे. 

नंदीबैला प्रमाणेच पिंगळा, शिंग वाजवणारे,भविष्य सांगणारे, जादूगार इत्यादी अनेक लोक प्रत्येक गावागावातून येऊन आपली कला सादर करत.आपापल्या लायकीप्रमाणे त्यांना गावातील लोक तांदूळ किंवा धान्य देत असत.

बहुरूपी 

पुर्वी गावात बहुरूपी यांना विशेष मान असे.तेसुद्धा आपली कला सादर करत. बहुरूपी गावातील धान्य गोळा करत. गावातील एखाद्या माणसाच्या घरात ते धान्य ठेवून यथावकाश ते घेऊन जात असत. बहुरूपी हे शक्यतो पोलीस किंवा हवालदाराच्या गणवेशात येत असत.लहान मुले व म्हातारी माणसे त्याला खूप घाबरत असत. 

गावात साधारण डिसेंबरच्या  शेवटच्या आठवड्यात  किंवा  जानेवारीच्या  पहिल्या आठवड्यात हमखास प्रत्येक गावात  मरीआईचा देव्हारा यायचा. नऊवारी लुगडे नेसलेल्या त्याच्या बायकोच्या डोक्यावर देव्हारा असायचा.व कमरेला एखादे लहान बाळ असायचे.त्या पुढे मरिआईवाला स्वत:लाच चाबकाचे फटके मारत.नाचत नाचत गावात प्रवेश करी.गावात चावडी समोर एखादी घोंगडी अंथरली जाई.त्यावर मरीआईचा देव्हारा उतरला जायचा.त्यानंतर देव्हा-याचे दार हळूहळू उघडले जायचे.देव्हा-याचे प्रत्येक दार हातात घेऊन मरीआईवाला थरथरत नाचायचा.मरीआईवाल्याच्या कमरेला.वेगवेगळ्या रंगीत कापडांचा झगा असे.हा झगा गुडग्यांच्या खालीपर्यंत असे.पायात चाळ असत.

मरीआईचा देव्हारा 

सारा गाव मरीआईच्या देव्हा-यासमोर जमा व्हायचा. मरीआईच्या देव्हा-यात देवीची लाकडी रंगीत मुर्ती असायची. देवीची जीभ बाहेर आलेली व डोळे मोठे मोठे असायचे.देव्हारा रंगीत असायचा.देव्हा-या पुढे नाचत नाचत स्वत:लाच उघड्या अंगावर चाबकाचे विशिष्ट प्रकारचे फटके मारायचा,व तोंडाने शssssss असा विशिष्ट आवाज काढायचा.गावातील सर्व बाया सुपात तांदुळ ,एखादे अंडे ,एखादा रूपाया,हळदी व कुंकू घेऊन यायच्या.मरीआईवाला प्रत्येक सुप देव्हा-यासमोर नाचत नाचत सूप गरागर फिरवायचा हवेच्या दाबाने तांदूळ किंवा सुपातील वस्तू खाली पडायच्या नाहीत परंतु लोकांना हा देवीचा चमत्कार आहे म्हणूनच सुपातील वस्तू खाली पडत नसाव्यात असे वाटायचे.सुपातील रूपाया तो देवीच्या लाकडी हातावर ठेऊन कौल मागायचा.

गावातील चार दहा लोकांना तुम्हाला मुलगा होईल.किंवा असेच काहीबाही सांगुन पुढच्या वेळेला ५१रूपये देईल असे देवीला नवस करायला सांगायचा.बायाही देवीला नवस करायच्या.पुढील वर्षात ज्यांचे मनाप्रमाणे झाले असेल असे लोक व बाया विनासायास नवस फेडण्यासाठी मरीआईच्या देव्हा-याची वाट पहायच्या.व तो आल्यवर नवस फेडायच्या. ज्यांचे मनाप्रमाणे घडले नसेल तर त्यांना नियमांचे पालन केले नसल्यामुळे देवीचा कोप झाला अहे.असे म्हणून परत नवस करायला लावायचा.त्यावेळी हा मरीआईवाला इतरांना चाबकाचे फटके न मारता स्वत:ला का मारून घेतो.व एवढे मारूनही त्याच्या अंगावर वळ का उठत नाहीत हा प्रश्न पडे.मोठ्या माणसांना विचारले तर अरे त्याच्यावर मरीआई प्रसन्न आहे.त्यामुळे त्याला लागत नाही असे उत्तर देत.त्याचप्रमाणे तो त्याला दिलेली एवढया अंड्यांचे काय करतो ? कारण तो जर मरीआईचा भक्त आहे तर तो अंडी खाणार नाही.कारण अंडी ही नाँनव्हेज असतात.असा बाळबोध प्रश्न पडत असे.

पुर्वी शिरगाव येथे वास्तव्यास असलेले कै.दगडु भराडी हेही प्रत्येक वारी खंडोबाची व देवीची गाणी गावागावात जाऊन प्रत्येक घराघरात म्हणत असत,व त्या बदल्यात पसाभर तांदुळ घराघरातून गोळा करत असत.

भराडी बुवा प्रमाणेच टोकावडे येथील प्रसिद्ध ताशावादक कासम तांबोळी यांच्या पत्नी प्रत्येक सणावाराला नागीलीची पाने प्रत्येक घरात वाटत व त्या बदल्यात त्यांना तांदुळ दिले जात. 

वैदिनी सुया घे.. दाभण घे.. 

वैदू समाजाच्या स्त्रिया येत असत.त्यांना वैदीनी असे म्हणत. त्यांच्याकडे धान्य ठेवण्यासाठी गोधडी पासून बनवलेली विशिष्ट अशी खोळ असे.ही खोळ डोक्यावर ठेवलेली असे. त्यावर गावातील स्त्रियांना विकण्याचे साहित्य असे. त्यामध्ये गोधड्या शिवण्यासाठी दोरा, सुया, दाभण, लहान मुलांसाठी फुगे, स्त्रियांच्या गळ्यातील काळे मणी, झुबे, फुल्या, लहान मुलांच्या मनगटात घालण्यासाठी काळ्यापांढर्‍या बांगड्या, मनगट्या,माठल्या इत्यादी साहित्य असे.उजव्या हातात एक काचेची पेटी असे. त्या पेटीत नाकातील चमकी, फुल्या. बांगड्या, केसातील काटे. चाप ,रबर बँड,आरसा,काळीपोत कंगवे व फण्या असत.खास करून डोक्यातील लिखा काढण्यासाठी विशिष्ट फण्या व लाकडाच्या लिखवा असत. गळ्यातील माळा रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, केसांसाठी गंगावन,कवड्या,बिबवे इत्यादी अनेक प्रकारचे साहित्य असे. त्यांच्याकडील असलेले फुगे हे केसावर दिले जायचे.पूर्वी स्रिया केस विंचरल्यावर तुटून पडलेले केस गोळा करून गुंडा करून दरवाजाच्या चौकटीच्या फटीत ठेवत.हेच केस पुढे वैदीनीला देऊन तिच्याकडून लहान मुलांसाठी फुगे घेतले जायचे.

त्याकाळात या सर्व वस्तू धान्यावर दिल्या जायच्या. त्याचप्रमाणे वैदू लोकही गावात येत. डबे करा,डबे करा असे विशेष हेल काढून आरोळी देत असत. जुने तुटलेले डबे,धान्य मोजण्याची साधने, आधुली, आठवा निठवा, मापटे ,पायली इत्यादी वस्तू रिपेयर किंवा नविन करून दिल्या जात.अनेक लोकांकडे  पूर्वी तांब्या-पितळेचे ,हांडे व तपेली, पातेली, डेंगी,टोप असत. ही भांडी जुनी झाल्यावर काही ठिकाणी  गळत असत. या गळक्या भांड्यांचा भाग  कापून दुसऱ्या निकामी भांड्यांचा काही भाग कापून जोड दिला जात असे. हा जोड अतिशय भक्कम असे,हे वैदू लोक धान्य ठेवण्यासाठीची रिकामी पोती विकत. 

त्याच प्रमाणे गावातील ज्या लोकांना पोटाचे आजार असत, त्यांना तुंबडी लावत. तुंबडी हा प्रकार अतिशय अघोरी असा होता. पोटातील दुख-या भागात विशिष्ट हत्यार खुपसून त्यातून पोटातील काळे रक्त बाहेर काढत असत. त्यांच्या या उपचारामुळे अनेक आजारी लोक बरे झाल्याची उदाहरणे ऐकिवात आहेत. हेच लोक दमा, मुळव्याध ,पोट दुखी, अशा अनेक आजारावर झाडपाल्याचे व आयुर्वेदीक औषध देऊन त्याबदल्यात धान्य स्वरूपात मोबदला घेत असत.

वैदू लोकांप्रमाणेच गावात कल्हईवाला येत असे.त्याच्याबरोबर त्याची बायको व छोटी छोटी मुले असत. कल्हईवाला हा गावातील मोकळ्या जागेवर बस्तान  बसवीत असे. मोकळ्या जागेवर थोडेसे खणून त्यावर त्याच्याकडील छोटा लोखंडी हाताने फिरवायचा भाता असे तो त्याच्यावर बसवून जमीन एक सारखे करे. 

त्यावर शेण पाणी ओतून व्यवस्थित एकसारखे करायचा. त्याच्याकडील असलेले कोळसे टाकून पेटवायचा व लोखंडी भाता हाताने गरा गरा फिरवायचा. पुढे  धूर निघायचा हे करत असताना त्याची बायको गावात फिरून घरातील भांड्यांना कल्हई करायची आहे काय? असे विचारायची.आणि एकेक करून त्याच्याकडे गावातील अनेक भांडी जमा व्हायची. त्याकाळात अनेकांकडे तांब्या-पितळेच्या ताट, ग्लास, तांबे ,पितळया, परात व इतर अनेक भांडी असत.

 कल्हई वाला 

कल्हईवाला प्रत्येक भांडे विस्तवावर व भाता फिरवून गरम करत असे.भांडे गरम झाल्यावर त्याच्याकडील असलेले  नवसागर भांड्यात टाकून भांडे स्वच्छ केले जाई, त्यानंतर परत एकदा भांडे गरम करून त्यावर त्याच्याकडील असलेला विशिष्ट चकचकीत धातूचा तुकडा भांड्यावर घासून पकडीमध्ये भांडे धरून कापडाने ते भांडे पुन्हा पुसुन तो धातू सर्व भाड्याला लावायचा. 

या प्रकारे सर्व भांडे पुसल्यावर सगळीकडे भांडे चकचकीत स्टील सारखे दिसे.आणि जुन्या कळकट झालेल्या तांब्या-पितळेच्या भांड्याला नवे रूप येई.त्यावेळेस खेडेगावात स्टिलच्या भांड्यांचा जन्म देखील झालेला नव्हता.तेव्हा कल्हई केल्यावर ही भांडी खूपच सुंदर दिसत असत. ही कल्हई सुद्धा धान्य मोबदल्यात केली जात असे.

आपल्याकडे साकुर्डी गावात बागलाणे नावाचे कल्हईवाले  हे कायम वास्तव्यास होते.कल्हईवाल्याला तांबटकर या नावाने देखील संबोधीत असत.

 घिसाडी  

त्याचप्रमाणे घिसाडी सुद्धा गावागावात येत असत. घिसाड्याकडे घोडा किंवा घोडी असे.कदाचित दोन तीन म्हशी सुध्दा असत. लाकडाचा मोठा भाता लोखंडी साहित्याची पेटी बायका-मुलांसह त्याची स्वारी गावात येई. कल्हई वाल्या प्रमाणेच गावातील मोकळ्या जागेत ठाण मांडून भाता व्यवस्थित लावून काम सुरू होई.लोखंडी वस्तूपासून कुऱ्हाड, कोयते, विळे, पहार,सुरुंग घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पहारी,शेतीचे साहित्य वसू,फाळ, फास, लोखंडी साखळीला जोड देणे,जुन्या वस्तूंना धार लावून देणे.लाकडी खटार गाडीच्या धावा इत्यादी कामे घिसाडी करायचा. त्याबदल्यात गावातील शेतकरी त्याला धान्य रुपात मजुरी द्यायचे. 

कुंभार लोकसुद्धा आपल्या गाढवावर मातीच्या चुली, रांजण, माठ! गाडगी - मडकी प्रत्येक गावात येऊन विकत असत. त्याबदल्यात धान्य रुपात त्यांचा मोबदला घेत असत. 

१९९० नंतर भारत देशाने मुक्त अर्थव्यवस्था स्विकारल्यावर हळूहळू हे सर्व बंद झाले.व पैशाला जास्त महत्व आले. एवढे सर्वांना धान्य देऊनही शेतकरी त्यामानाने गरिबीतही सुखी होता. 

तेव्हा ना होते त्याच्याकडे पैसे, ना दागिने, ना कपडे, ना चोपडे, ना हौस ना मौज ना ऐष आरामी राहणीमान, ना बंगला गाडी, ना ढाबा ना  हॉटेल, तरीही त्यांना कोणतेही आजार पाजार नव्हते.कोणत्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावर नव्हता.कधीही त्यांचा रक्तदाब वाढला नाही की हार्टअँटक आला नाही.की डायबेटिज झाला नाही. लोक त्याकाळात वृध्दपकाळाने मृत्यू पावत. कुणीही तेव्हा ऐन तारुण्यात मरत नव्हता हेही विशेष. सर्व लोक तेवढेच सुखी समाधानी होते हे नक्कीच.

 रामदास तळपे 


बैलपोळा

बैलपोळा 

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रत्येक खेडेगावात बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आज अनेक जण नोकरीच्या धंद्याच्या निमित्ताने आपल्या गावापासून दूर शहरात कार्यरत आहेत. परंतु जेव्हा बैलपोळा असतो तेव्हा प्रत्येक जनाच्या मनात लहानपणाच्या आठवणी ताज्या होतात.

माझ्याही मनात बैल पोळा या सणाविषयी अनेक आठवणी ताज्या आहेत. पूर्वी एक महिन्यापूर्वी पासूनच बैलपोळा सणाची तयारी सुरू होत असे. 

भाद्रपद महिना संपलेला असे. शेती भाती निसर्गाच्या व पावसाच्या कृपेमुळे उत्तम रीतीने वाढलेली असे.या महिन्यात शेतकऱ्यांना बरीच मोकळीक असते.पूर्वी प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबाकडे बैल जोडी असे. अपवादात्मक परिस्थितीत चार-दोन कुटुंबाकडे बैलजोडी नसायची. श्रावण व भाद्रपद महिन्यात दुपारी जेवण झाले की शेतकरी आपापले बैल घेऊन रानात चारायला घेऊन जायचे. माळावर बैल मस्त चरायचे. काहीजण विशिष्ट प्रकारचे लाकूड तोडून त्यापासून बैलपोळ्याला बैलांना सजवण्यासाठी चौरे बनवायचे. यासाठी खूप दिवस लागायचे.

बैल पोळ्याचा दिवस उजाडायचा.शेतकरी वर्ग सकाळी बैलांना रानात चारायला घेऊन जायचे. सकाळी अकरापर्यंत बैल घरी आणायचे.जेवण केल्यावर गावातील शेतकरी बैलांना नदीवर किंवा ओढ्यावर बैल धुण्यासाठी घेऊन जायचे. आम्ही लहान मुले सुद्धा त्यांच्याबरोबर नदीवर जायचो.

नदीवर गेल्यावर बैलांना छान पैकी घासून-पुसून आंघोळ घातली जायची. गावातील बऱ्याच बैलजोड्या नदीवर आलेल्या असत. त्यांच्याबरोबर गावातील लहान मुले सुद्धा आलेली असत. बैलांना आंघोळ घातल्यावर बैलांच्या शेपटीला धरून नदीतील मोठ्या डोहातून नदीच्या पलीकडे जाण्याची मज्जा खूपच न्यारीअसे.नदीच्या मध्यभागी गेल्यावर घाबरल्यासारखे होई.परंतु काहीही झाले तरी बैलाची शेपटी सोडायची नाही हे आधीच सांगितलेले असे.पलीकडे गेल्यावर खूप आनंद व्हायचा. त्यानंतर परत एकदा बैलाच्या शेपटीला धरून अलीकडे यायचो. बैलांना छानआंघोळ घातल्यामुळे बैल खूप स्वच्छ आणि सुंदर दिसायचे. 

त्यानंतर आमचा ताफा घरी यायचा. बैल पोळा सणाच्या आधी बाजारातून बैल सजवण्यासाठी साहित्य आणले जाई. 

पूर्वी बैलांच्या शिंगांना लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची बेगडे असत.ही बेगडं प्लॅस्टिकची असत.पुढील काळात बेगडांच्या ऐवजी बैलांच्या शिंगांना लावण्यासाठी विशिष्ट प्रकारचे तेल व सोनेरी एकत्र कालवून ती बैलांच्या शिंगांना लावली जाऊ लागली.ही सोनेरी कित्येक दिवस बैलांच्या शिंगांना असायची.

त्याच प्रमाणे चौरे,विविध रंगीबेरंगी गोंडे,बैलांच्या कपाळाला लावण्यासाठी विविध प्रकारची आरशांची.काचांची बाशिंगे मोठ्या हौसेने लोक बाजारातून विकत आणत.काही श्रीमंत शेतकरी बैलांना झुली विकत आणत. या झुली घातल्यावर बैल खूपच सुंदर व रुबाबदार दिसत. विविध प्रकारच्या विविध रंगांच्या मण्यांच्या माळा,म्होरक्या,बैलांच्या नाकात घालण्यासाठी वेसनी, सुंदर आवाजाच्या घंटा, घुंगुरमाळा, बैलांना सजवण्यासाठी विविध प्रकारचे लाल हिरवा निळा पिवळा असे रंग बाजारातुन विकत आणले जाई. हे सर्व साहित्य बैलपोळ्याच्या आधीच बाजारातून विकत आणलेले असे.

नदीवरून बैल आणल्यावर थोडावेळ विश्रांती घेतली जाई. आणि दुपारी तीनच्या दरम्यान बैलांना सजवण्याची लगबग सुरू होई.मोठी माणसे मन लावून बैल सजवण्यासाठी मग्न होत. कुणी बैलांच्या शिंगांना बेगडं लावत. तर कुणी विशिष्ट तेलात सोनेरी कालवून ती बैलांच्या शिंगांना लावत असे.कुणी चौरांना वेगवेगळे रंग लावून ते बैलांच्या शिगांमध्ये अडकवले जात. विविध प्रकारचे गोंडे,बाशिंगे बैलांच्या कपाळावर बांधले जाई,  वेगवेगळ्या रंगांमध्ये हात बुडवून हाताचे पंजे बैलाच्या अंगावर उमटवले जात.

रंग उरला की घरातील पाळीव कुत्र्या- मांंजरांना कोंबड्या चितड्यांना रंग लावला जाई.बाजारातून आणलेल्या घुंगुरमाळा किंवा वेगवेगळ्या रंगाच्या मण्यांच्या माळा बैलाच्या गळ्यात बांधल्या जात.बैलांच्या गळ्यातील घंटा आणि त्याचा आवाज आजही ही माझ्या कानात रुंजी घालतो असा मला आजही भास होतो.

बैलांची मिरवणूक ताशा वादन  




काही श्रीमंत शेतकरी बैलाच्या पाठीवर खूप सुंदर रंगाच्या झुली घालत.त्यामुळे बैल अतिशय सुंदर व रुबाबदार दिसत. त्यानंतर बैलांची गावातील ग्रामदैवताकडे जाण्यासाठी मिरवणूक काढली जाई,काही ठिकाणी ढोल लेझीम तर काही ठिकाणी सनई, चौघडा, धोटा, ताशा, हलगी व संबळ इत्यादी वाद्यांच्या गजरात गावातील सर्व बैलांची मिरवणूक संपूर्ण गावाला वेढा मारून ग्रामदैवताकडे जात असे. त्यावेळचा तो आनंद आजही जसाच्या तसा आठवतो. 

मदिराकडे गेल्यानंतर देवाचे दर्शन घेऊन देवाला नारळ फोडून नारळाची शेरणी सर्वांना वाटली जाई. आणि परत लोक आपापले बैल घेऊन घरी येत. तोपर्यंत रात्र झालेली असे. घरी आल्यावर बैलांचे पाय घरातील सुवासिनी स्रिया धूऊन काढत. बैलाची हळद ,कुंकू ,धूप आणि दीप यासह पूजा केली जाई. बैलांना त्यादिवशी पुरणपोळ्यांचा नैवद्य दाखवला जाई.

 थोडक्यात बैलांना पुरणपोळ्यांचे सुग्रास जेवण दिले जाई. आणि नंतरच घरातील लोक जेवण करत. एकमेकांना आग्रहाने घरी सार,पोळी खाण्यासाठी आमंत्रित केले जाई.लोकही आवडीने एकमेकांच्या घरात पुरणपोळी किंवा सार भात खाण्यासाठी जात असत.गावातील काही ठराविक स्त्रियांच्या हातच्या साराची चव अजूनही काही लोकांच्या स्मरणात असेल. त्याकाळात गावात काही स्त्रिया काही विशिष्ट पदार्थ अशा काही बनवायच्या की ज्याने तो पदार्थ खाल्ला असेल ती चव तो कधीही विसरू शकत नाही.

नायफड या गावातही बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे ग्रामदैवत मुक्ताबाई च्या मंदिराजवळ संपूर्ण गाव व वाड्या वस्त्यांच्या बैलांची मिरवणूक काढली जाई.वेगवेगळ्या गावांचे ताफे आणले जायचे. हे ताफे म्हणजे ताशा, सनई, डफ इत्यादी वाद्य वाजवली जात. 

हे ताफे बघण्यासाठी पश्चिम भागातील सर्व गावचे लोक खच्चून गर्दी करायचे. त्यांच्या स्पर्धा लागत. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाद्यकाम चालू असे. त्यानंतर लोक घरी जाताना कोणता ताफा भारी होता.याबाबत चर्चा चर्वन करूत करत घरी जायचे. त्यावेळी ना गाड्या होत्या ना मोटर सायकल, ना सायकल. सर्व लोक पायी यायचे आणि गप्पा मारत घरी जायचे. 

आता प्रत्येक गावात  गाय ,गावठी गाया इत्यादी पाळीव प्राणी खूपच कमी झाले आहेत.आणि बैल पोळ्याचे महत्व सुद्धा. 

आता लोकांना बैलपोळा कधी येतो आणि कधी जातो हेसुद्धा समजत नाही.पूर्वी कधी कुणी बैल आणला,कुणी गाय आणली  तर  सर्वांना खूप आनंद व्हायचा. 

मी लहानपणी दुसरीला असेल.श्रावण महिना होता.आम्ही सर्व मुले शाळेत होतो. वेळ साधरण दुपारनंतर साडेचारची असेल, गुरुजी पाढे शिकवत होते आणि अचानक कुणीतरी शाळेत सांगायला आले की की रामदासच्या घरी गाय आणली आहे. मला खूप आनंद झाला.

काही मुलांनी गाय पाहण्यासाठी  गुरुजींची  परवानगी मागितली.कारण मी तेव्हा खूपच लहान होतो.गुरुजीं सह आम्ही मुले आमच्या वडिलांनी नवीन आणलेली गाय पाहण्यासाठी गेलो.  तर काय  अंगणात पांढरीशुभ्र  गाय उभी होती,  तिच्याबरोबर छोटे वासरू होते. चार-पाच लोक उभे होते.आई  गाईची पुजा करून औक्षण करीत होती.तेवढ्यात आम्ही तेथे गेलो.

माणसे गप्पा मारत होती.सर्वांना माझ्या हस्ते गुळ वाटप करण्यात आला.गुळ वाटल्यावर बाकीची मुले शाळेत गेली.मी तेथेच थांबलो. त्यानंतर मोठ्या माणसांना चहापाणी झाला घरातील सर्वांना त्यावेळी खूपच आनंद झाला होता,तेव्हाचा आनंद आता कशातच मोजता येणार नाही.काळ बदलला. समाज बदलला."कालाय तस्मै नमः". दुसरं काय?



भजनी भारूड मंडळे

खेड तालुक्यात लग्न समारंभ,यात्रा,सण समारंभ इत्यादीच्या माध्यमातून नेहमीच वाद्यवृंद व ताफे यांचा खुप जवळचा सबंध होता.फार पुर्वी अनेक गावांमध्ये भजनी मंडळे,भारूड मंडळे व तमाशे होते.या सर्वांनी त्याकाळात पुणे जिल्ह्यात नावलौकिक मिळवला होता. 

भजनी भारुड मंडळे

खेड तालुक्यात लग्न समारंभ,यात्रा,सण समारंभ इत्यादीच्या माध्यमातून नेहमीच वाद्यवृंद व ताफे यांचा खुप जवळचा सबंध होता.फार पुर्वी अनेक गावांमध्ये भजनी मंडळे,भारूड मंडळे व तमाशे होते.या सर्वांनी त्याकाळात पुणे जिल्ह्यात नावलौकिक मिळवला होता. 

त्याकाळात प्रत्येक गावात भजनासाठी टाळ,मृदंग,वीणा व चिपळ्या यांचा वापर व्हायचा.प्रामुख्याने ही भजने एकतारी या प्रकारात होती.व तेव्हा ती लोकप्रिय देखील होती.शक्यतो ही भजने रात्रीची होत असत. प्रत्येक गावात तेव्हा आठवडयातुन तीन -चार दिवस तरी भजने व्हायचीच.त्यात खंड पडत नसे.

भजनाचा आवाज ऐकल्यावर खुप लांबचा माणुस सुद्धा भजनाला हजर व्हायचा, त्या नंतर पुढची पिढी आली.काळाच्या ओघात एकतारी भजनाची जागा संगीत भजनाने घेतली.वीणा व चिपळ्यांची जागा पायपेटीने घेतली. तबला व डग्गा आले.खंजीरी,छोटा डफ.अशी अनेक वाद्ये आली.

भजन प्रकारात स्तवन,अभग ,गवळणी व त्यानंतर भैरवी हे प्रकार भजनात रूढ झाले.पुढील काळात विवीध गावांमध्ये भजनाच्या स्पर्धा होऊ लागल्या.एकतारी पेक्षा संगीत भजन ऐकायला गोड असायचे.१९८० व १९९० च्या दशकात संगीत भजने व भारूड मंडळांचा सुवर्ण काळ होता. डेहणे, सोळशेवाडी, मंदोशी, टोकावडे,नायफड इत्यादी भजने आघाडीवर होती. 

भजना प्रमाणेच नायफड नाव्हाचीवाडी संपुर्ण रामायण,सरेवाडी यांचे कृष्णलीला ही भारूडे प्रसिद्ध होती. टोकावडे, धामणगाव, पाभे,तांबडेवाडी,चांदुस,पवळेवाडी,ओझर्डे,कानसे माळवाडी पोखरी इत्यादी भारूडे प्रसिद्ध होती.यामध्ये भारूडाचा मुख्य गुरू कै.श्री विठू नांगरे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
 
विठू नांगरे हे आष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.विठू नांगरे हे भारूडात कोणतेही पात्र लिलया करायचे.राजा,प्रधान,राक्षस किंवा स्रीपात्र ते लिलया करायचे. ते कोणत्याही रोल मध्ये सामावुन जायचे.राक्षसाचे पात्र किंवा निगेटिव्ह रोलमध्ये लोक विशेषतः स्रीया त्या पात्राला शिव्या द्यायच्या.तर करूण स्रीचे पात्र असेल तर लोक रडायचे, हळहळायचे इतकी त्यांच्या पात्रातील संवादफेकीत ताकद होती.

८० व ९०च्या दशकात ज्यांनी भारूडे पाहिली असतील त्यांनी आठवा विठू नांगरे यांचे स्री पात्र स्टेजवर यायचे.नऊवारी लुगडे,अंगात चोळी,हातात बांगड्या,तोंडाला भडक मेकअप केलेला कपाळाला मळवट व डोक्यावर अग्नी व त्यावर भाताचे पातेले ठेवलेले.वाद्याच्या ठेक्यावर विठू नांगरे नाचायचे ते भात शिजेपर्यंत.अक्षरशा डोक्यावर भात शिजवला जायचा.प्रेक्षक थक्क व्हायचे.याच विठू नांगरे यांचा मोर व शिमग्यामध्ये प्रत्येक गावाला मरीआईचा देव्हारा हे सोंग अनेकांच्या स्मरणात असेल.

विठू नांगरे यांच्या प्रमाणेच टोकावडे गावचे पै.कासम तांबोळी हे काय जबरदस्त ताशा वाजवायचे विचारू नका.असा ताशा वादक पुन्हा होणे नाही.डेहणे गावचे बापू गायकवाड यांचा डफ त्याकाळात प्रसिद्ध होता.डफ वाजवायच्या आधी थोडा जाळ करून डफ त्यावर धरला जायचा,डफ हा शक्यतो चामड्यापासुन तयार केलेला असायचा. उष्णतेमुळे चामडे प्रसरण पावायचे व त्यावर थाप मारल्यावर वेगळाच नाद घुमायचा. 

कासम तांबोळी ताशा आणि बापू गायकवाड यांचा डफ हा सामना कित्यकांनी बघितला असेल, दोघे एकमेकांना कमी नव्हते. दोघेही पट्टीचे वादक होते. कोणच कमी नव्हता.त्यांच्या नंतर असा सामना मी तरी अजुन बघितला नाही. बापू गायकवाड हे गावात विवीध कारणांच्या निमित्ताने दवंडी द्यायचे.तेव्हा त्यांचा भारदस्त आवाज सुरूवातीचे व शेवटचे पालपुद व त्यानंतर डफड्याचा आवाज आजही कानात जसाच्या तसा अजुन आहे.

त्याच्या नंतर नारायण व वसंत गायकवाड यांनीही उत्तम डफ वाजवला हे नाकारून चालनार नाही.त्याकाळात वाजंत्री मंडळींना प्रचंड महत्त्व होते सनई, चौघडा ,धोटा, ताशा, ढोलकी, डफ इत्यादी वाद्य वाजवली जात त्यावेळी मंदौशी,  भोरगिरी इत्यादी भागातले वाजंत्री मंडळी अवघ्या पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध होते. त्यांनी भागाचे नाव अखंड पुणे जिल्ह्यात नेण्याचे काम केले. त्यापैकी श्री नामदेव रोकडे, श्री.शिवराम रोकडे, श्री बबन अहिरे.कै.श्रीपत रोकडे कै.शांताराम रोकडे यांचा प्रमुख्याने उल्लेख करावा लागेल. 

श्री नामदेव रोकडे यांचे सनई वादन कोणाच विसरू शकत नाही. त्यांची सनई वर प्रचंड हुकमत होती. त्यामागे प्रचंड कष्ट होते हेही तितकेच खरे. 

1990 च्या दशकात वाजंत्री मंडळी मागे पडली. सन 1990 मध्ये पहिल्यांदा बेंजो पार्टीचा उदय झाला. या बंजो पार्टीत एक बुलबुल नावाचे वाद्य होते. हे वाद्य ब्लेड तारेवर घासून व बोटांनी वाजवण्याचे वाद्य होते. त्याची एक वायर लाऊड स्पीकर च्या कर्णाला जोडलेली असे .

या बुलबुल बरोबर ताशा, कच्ची ,ढोल इत्यादी वाद्य असत. प्रथमता पाभे गावात बॅन्जो पार्टी उदयास आली .या बँजो पार्टीमध्ये बुलबुल वर अनेक त्या काळातील उडती गाणी जवा नविन पोपट हा ,ऑंटी ची घंटी ,ले गई  दिल मेरा मनचली खली वली खली वली इत्यादी गाणी वाजवली जात .त्यामुळे आपोआपच बॅन्जो पार्टी समोर तरुण पोरांचे पाय थिरकू लागले. नाचून नाचून पोरे दमायला होत. 

त्यांना नाचायला उत्साह मिळावा म्हणून लग्नकार्यात ताडी, माडी. व दारू यांचा सर्रासपणे वापर होऊ लागला.आणि आनंद साजरा करायला गेलेला तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी कधी गेला हे कोणाला समजलेच नाही. 

बॅन्जो नंतर डीजे आला आणि पुढे काय झाले हे आपणा सर्वांना माहितच आहे.त्याकाळात श्री दत्तात्रय पंघाजी मिलखे गुरुजी, पेटी मास्तर कै.मुक्ता मदगे गुरुजी, श्री राजू मदगे गुरुजी ,श्री धर्मा तळपे पेटी मास्तर श्री कावळे गुरुजी,श्री सदू मोरमारे श्री अंकूश शिंदे,,श्री भारमळ महाराज,श्री मधुकर कोकणे महाराज, श्री तुकाराम भोकटे गुरुजी, श्री सागर महाराज शिर्के, श्री वामन जढर किर्तनकार अमृता व नम्रता जढर श्री कोथे बुवा, श्री सखाराम उगले,श्री चिंधू वनघरे यांचे पश्चिम भागासाठी नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून योगदान राहिलेले आहे त्यांच्यामुळे भागाचे नाव सर्वदूर पोहोचले.हे मान्य करावेच लागेल.


सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस