डाँ.क्षिरसागर, देवमाणुस.

डाँ.क्षिरसागर, देवमाणुस.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अजुनही आरोग्याच्या म्हणाव्या तशा सुविधा उपलब्ध नाहीत.सन 1979 साली डेहणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहीली.व सन १९८० साली दवाखाना सुरू झाला.परंतू १९८१ पासुन आजतागायत ठराविक नर्स व आरोग्य सेवक सोडले तर दवाखान्याचा कोणत्याही पेशंटला उपयोग झाला नाही.

कोलमडलेली ग्रामीण आरोग्य सेवा 

आला पेशंट, डाँक्टर नाहीत,.

आला पेशंट, गोळ्या औषधे नाहीत,.

आला पेशंट येथे उपचार होणार नाहीत.पेशंट पुढे हालवा..

आला पेशंट स्टाफ कमी आहे.

अशी अनेक प्रकारची उत्तरे तयारच असतात.या बाबत कोणताही पुढारी आवाज उठवताना दिसत नाहीत.,जर कुणी आवाज उठवलाच तर त्याची मुस्कटदाबी करून गप्प बसवले जाते,.तर असो,

कधी कधी सरकारी हलगर्जी पणाही यासाठी जबाबदार असतो.एकदा रात्री मी पेशंटला पाहण्यासाठी दवाखान्यात गेलो असता तेथे लाईटच नव्हती.

प्रत्येक पेशंटच्या कॉटवर मेणबत्ती लावलेल्या होत्या. त्याही पेशंटच्या पैशाच्या. लाईट का नाही विषय विचारले असता. विज बिल न भरल्यामुळे दवाखान्याची लाईट तोडली आहे असे उत्तर मिळाले. 🙂

कधीकधी मेडिसिन नसल्यामुळे ठराविक त्याच त्याच गोळ्या प्रत्येक आजारावर दिल्या जातात. (पूर्वी तर दिल्या जात होत्या आता कशी परिस्थिती आहे माहीत नाही.)

या भागात एकच डाँक्टर होऊन गेले ते म्हणजे डाँ,क्षिरसागर..नव्हे भागाच्या दृष्टीने देवमाणुसच...

डाँ.क्षिरसागर हे साधारण १९८५-८६ च्या आसपास आले. त्यांनी टोकावडे येथे एका झोपडीवजा सफरात आपला दवाखाना थाटला..

कुडाचे सफार त्या सफरात पेशंटला झोपण्यासाठी एक लाकडाची खाट.शेजारी लाकडाची छोटी रँक शेजारीच एक मोडका टेबल त्यावर औषधांच्या बाटल्या विवीध गोळ्यांची पाकिटे डाँक्टरांना बसण्यासाठी मोडकी खुर्ची व समोर दहा-पाच पेशंट असत.आर्ध्या झोपडीत एक मोठा पडदा लावलेला व त्या पडद्याच्या आत डाँक्टरांचा संसार बायको व दोन मुले.एक मुलगा व एक मतीमंद मुलगी..

डाँक्टरांच्या अशा या दवाखान्याला ना अमुक दवाखाना..असे नाव ना तमुक डाँक्टरांची डिग्री..ना अमुक ढमुक आजारावर अमुक तमुक इलाज करणार अशी जाहीरात...त्यामुळे डाँक्टरांची डिग्री कोणती हे ते गेल्यानंतरही कुणाला कळले नाही..नव्हे कुणालाही या डिग्रीचे घेणेदेणे नव्हते...या भागासाठी डाँ.क्षिरसागर हे डाँक्टर नसुन देवच होते..

डाँक्टर जेव्हा आले तेव्हा त्यांची फी होती.रूपये पाच. यामध्ये इंजेक्शन व गोळ्या धरून पाच रूपये फी..त्यामध्ये काही पेशंटकडे पाच रूपये सुद्धा नसत..अशा पेशंट कडुन जे काही रुपाया दोन रूपये असत तेवढेच पैसे घेत.व उरलेले पुढच्या वेळेला द्या.असे पेशंटला सांगत.परंतू डाँक्टरांनी उधारीचा कधीही लेखी हिशोब ठेवला नाही.

डाँक्टर एकाच ठिकाणी म्हणजे दवाखान्यात रोज नसत..तर स्वतः औषधांची बँग खांद्यावर टाकुन भोरगीरी,भिवेगाव,वरचे भोमाळे.खालचे भोमाळे,पाभे,मंदोशी,शिरगाव,कारकुडी अशा गावांतील पेशंटला तपासण्यासाठी पायी- पायी जात असत.व गोळ्या व औषधे देऊन आपली सेवा पुरवत असत..

डाँक्टर एखाद्या मोठ्या पदावर असलेल्या किंवा नोकरी करत असलेल्या माणसाविषयी अभिमानाने हा तो अमुक तमुक ना तो माझा पेशंट आहे बरंका? असे म्हणायचे..आणि ते खरेही असायचे.

डाँक्टररांचा डावा हात पोलीओ मुळे अपंग होता.त्यामुळे डाँक्टरांना लोक खुळा डाँक्टर असे म्हणत..आणि त्याचे डाँक्टरांनाही काहीच वाटत नसे.

पुर्वी मे महिन्याच्या शेवटी व जुनच्या सुरूवातीला लोकांना दिवसाआड थंडी व ताप यायचा...थंडी ही साधारण दुपार नंतर येत असे..एकदा थंडी आली की कितीही ताटम माणुस असला की त्याचा विळा व्हायचा..

एकावर एक अशा सात आठ गोधड्या अंंगावर घालुनही तो किंवा ती मोठमोठ्याने हुss हुss हुss असा आवाज काढायचे. थंडी साधारण अर्धा तास टिकायची त्यानंतर प्रचंड ताप यायचा ताप गेल्यावर अंगातुन घामाचा पुर वाहायचा..घराघरात सर्रास असे पेशंट असायचे.त्यामध्ये मी ही एक होतो.अशा वेळी देवासारखे धाऊन यायचे ते म्हणजे डाँक्टर क्षिरसागर (खुळे डांक्टर)

कुणाच्या तरी घरात घोंगडीवर डाँक्टर आपली गोळ्या, औषधांची बँग व स्टेथोस्कोप घेऊन बसलेले असायचे..आणि त्यांच्या पुढे दहा वीस पेशंट बसलेले असायचे.ना रांग ना गोंधळ...

डाँ.प्रत्येक पेशंटला इंजेक्शन व गोळ्या देत..जास्त ताप असलेल्या पेशंटला इंजेक्शन देत नसत.गोळ्या देत व ताप उतरल्यावर त्यांच्या  दवाखान्यात पाठवुन द्या असे सांगत.डाँक्टरांनी कधीही कोणाला औषध व गोळ्या लिहून दिल्या नाहीत,स्वतः कडचीच औषधे देत..

शिवाय फी पण माफक सुरूवातीला पाच रुपये जशीजशी महागाई वाढत गेली तशी फीही वाढली.पाच नंतर सात नंतर दहा नंतर पंधरा त्यांनंतर वीस,पंचवीस व शेवटी तीस रूपये इतकीच वाढ,बस्स.

एकदा आम्ही सार्वजनिक गणपती बसवला होता.डाँक्टर आमच्या गावातील पेशंट तपासुन त्यांच्या घरी टोकावड्याला चालले होते..आमच्या घराशेजारूनच पायवाट होती.आम्ही कार्यकर्ते आमच्या आंगणात बसलो होतो.

आणि अचानक डाँक्टर दिसले..एकजण म्हणाला डाँक्टरांकडे देणगी मागायची का? परंतू एकही जण काहीच बोलेना.मग मीच बोललो डाँक्टर गणपती बसवलाय काहीतरी देणगी द्या.तात्काळ डाँक्टरांनी खिशात हात घातला व दहा पाच रूपये व काही चिल्लर मोजून एकावन्न रूपये हातावर टेकवले...आणि निघून गेले..आम्ही आवाक्क..! कारण गणपतीच ५०/-रूपयांचा होता.

अनेक गावांच्या यात्रांना ते  देणगी देत असत.

एकदा मी आजारी होतो.पायी पायी सहकारी मित्रासह डाँक्टरांकडे गेलो.पैसे फक्त पाचच रूपये..तपासुन झाले गोळ्या औषधे दिली..तेवढ्यात एस.टी भोरगीरीला जाताना दिसली. वेळ साधारण ११.०० ची.रणरणते उन मी आजारी,.

डाँक्टर म्हणाले आता जाताना एस,टी ने जा.परंतू आम्ही पायीच जातो असे आम्ही म्हणालो. डाँक्टरांच्या काय ते लक्षात आले पाच रूपये फी परत माझ्याकडे दिली व तुम्ही सर्वजण एसटीने शिरगाव पर्यंत जा असा सल्ला दिला. तर असे हे डाँक्टर.

त्यावेळेस प्रामुख्याने सर्दी ताप,थंडीताप, जुलाब उलट्या, पोटदुखी, डोकेदुखी,किंवा खरूज, नायटा, इसाब, गजकर्ण, केसतुटी,गालफुगी इत्यादी त्वचारोग तर उवा, लिखा, कपड्यमधील पांढऱ्या उवा इत्यादी आजार होत असत. 

डाँक्टरांचा हातगुण असा की इंजेक्शन कधी मारले हेच मुळी कळायचे नाही.काही पेशंट तर इंजेक्शन मध्ये अजुन दवा भरा अशीही सुचना करत.परंतू डाँक्टर आपल्या मताशी ठाम असत. डाँक्टरांना बरेच बाया पुरूष अरे तुरे मधे बोलत.परंतू डाँक्टरांनी या बाबत कधीही तक्रार केली नाही.

एखादा पेशंट जरा जास्तच सिरियस असेल तर डाँक्टर किरकोळ दवा औषधे देऊन शहरातील मोठ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला देत.परंतू अमुकच दवाखान्यात पेशंटला न्या व माझे नाव सांगा.तुमची फी डाँक्टर कमी करतील अशी कधीही चिठ्ठी किंवा सल्ला दिला नाही.व त्या डाँक्टरांकडून कमिशन उकळले नाही.

खेडेगावात राहून मुलांचे शिक्षण होणार नाही हे जाणुन ते देहूरोडला स्थायीक झाले..तरीही ते तेथून टोकावड्याला येऊन तीन चार दिवस एकटे राहुन समाजाची सेवा करत..

गेल्याच वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले.ही बातमी कळताच त्यांचा १९८५ पासुन सन २०१९ पर्यंतचा जीवनपट डोळ्यापुढुन सर्रकन पुढे गेला आणि नकळत डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

रामदास तळपे

श्री.काळभैरवनाथ (वनदेव) मंदोशी

श्री.काळभैरवनाथ (वनदेव) मंदोशी

राजगुरूनगर पासुन ५० कि.मी. भिमाशंकर मार्गावर मंदोशी ता.खेड जि.पुणे येथील श्री.काळभैरवनाथ (वनदेव) हे वनश्रीने नटलेल्या निसर्गरम्य परिसरात असलेले अतिशय जागृत, कडक, उग्र व नवसाला पावणारे असे देवस्थान आहे. दर रविवारी महाराष्ट्रातील अनेक भाविक नवस करण्यासाठी/फेडण्यासाठी व दर्शनासाठी येत असतात. या बाबतचा मंदिराचा इतिहास हा जाणुन घेऊया

शाळुंका

खुप पुर्वी देवांच्या मुर्तीच्याही आधी दगडाच्या वाटोळ्या आकाराच्या गुळगुळगुळीत अशी साधारण चार ते पाच शाळुंका होत्या.(अद्यापही त्या आहेत.) या शाळुंखांचीच तेव्हा पुजा केली जात असे.या शाळुंका या स्वयंभू असाव्यात असे माझे तरी मत आहे.

मुर्ती

सध्या मंदिरात दोन मुर्ती आहेत या दोनही मुर्ती एकाच देवाच्या म्हणजेच श्री. काळभैरवाच्या आहेत. उजव्या बाजुची मोठ्या आकाराची मुर्ती ही अतीप्राचीन व अतिशय सुबक होती. ही मुर्ती साधारणतः सुमारे नवव्या शतकात घडवली असावी. त्यावेळी सातवाहनांचे राज्य होते. सातवाहनांच्या काळात भोरगिरी येथील कोटेश्वर मंदिर बांधले गेले आहे. शिवनेरी किल्ला सुद्धा सातवाहनांच्यांच काळातला. सातवाहनांच्या काळात अशाच मूर्ती तयार करण्यात आलेल्या आहेत.

पुर्वी मंदिर नसल्यामुळे उन,वारा व पाऊस या मुळे मुर्तीची बरीच झीज झाली,त्यानंतर गावक-यांनी दुसरी अतिशय सुंदर व प्रसन्न अशी मुर्तीया मुर्तीच्या शेजारीच घडवून बसवली आहे.

ह्या मुर्तीच्या हातात नाग आहे.ह्या मुर्तीचे वैशिष्ट्य असे आहे. ज्यावेळी देवाचा अंश मुर्तीत असतो तेव्हा ही मुर्ती अतिशय प्रसन्न दिसते.आणि मुर्तीमध्ये विलक्षण तेज असल्याचे जाणवते, हे शक्यतो रविवारी सकाळी १२.०० पर्यंतच हं...इतर दिवशी मुर्तीत असे भाव बघायला मिळत देखील नाही.

ह्या दोन्ही मुर्तींच्या डाव्या बाजुला एक दगडी चीरा आहे.हा चीरा म्हणजेच ज्याच्या मुळे श्री.काळभैरवनाथ येथे आले तो त्यांचा भक्त होय,

चि-याचा इतिहास

श्री.काळभैरवनाथाचे मुख्य ठाणे खरबाच्या माळावर आहे. या माळावर अनेक गुराखी आपल्या गायी घेऊन चरावयास नेत असत. त्या गुराख्या पैकी एका हरीजन (रोकडे)असलेला गुराखी या देवाची सेवा करू लागला.(सेवा म्हणजे काय तर दररोज देवाला पाणी घालने व दर्शन घेणे.)

नंतर हा भक्त वयोवृद्ध झाल्यामुळे त्याला वर डोंगर चढुन माळावर जायचे जमेना.हे पाहून मग खरबाच्या माळावर असलेला देवच खाली आता सध्याआहे त्या ठिकाणी आला.देव खाली आल्यावर आपोआप तेथे शाळूंका निर्माण झाल्या.

त्यानंतर मात्र हा वयोवृद्ध झालेला भक्त न चुकता दररोज देवावर जलाभिषेक करू लागला..त्याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी देवाच्या सांगण्यावरून देवाच्या डाव्या बाजुला त्या भक्ताला स्थान दिले.तोच हा चीरा होय.(बनाच्या पायठ्याच्या) उत्तरेला रोकडे यांची दोन गवताची घरे होती.

काळभैरवनाथ मंदिर जिर्णोद्धार

खुप पुर्वी येथे मंदिर नव्हते,.एका छोट्या ओबडधोबड चबुत-यावर दगडाच्या वाटोळ्या आकाराच्या शाळूंका होत्या. त्यावेळी शाळूंकाचीच पूजा केली जात असे. त्यानंतर मंदिर बांधले गेले.सुरूवातीचे मंदिर हे दगडाच्या भिंतींचे होते.वरचे छप्पर मात्र लाकुड व गवताचे होते. हे मंदिर आठराव्या शतकात बांधले गेले असावे.

दुसऱ्यांदा मंदिर जिर्णोद्धार

त्यानंतर सन १९४१-४२ सालात घडीव जोते व डबारात चौमोळी आकाराचे पाच खण लांबी व रुंदीचे मंदिर बांधकाम करण्याचा संकल्प गावक-यांनी केला.

मंदिराच्या घडीव जोत्याचे व भिंतीच्या दगडांचे काम हे गिरवली ता.आंबेगाव येथील काशिनाथ गवंडी यांनी केले. खांब, वासे. तुळया, लगी हे सर्व प्रकारचे लाकडी काम तसेच सुबक मखराचे काम हे गावचेच सुतार कै. सखाराम बारवेकर यांनी केले,

मंदीराची कौले व जमीनीवरील लादी (शहाबादी फरशी) लोखंडी जाळ्या इत्यादी साहित्य तत्कालीन मुंबईकर कै.राघुजी हुरसाळे यांच्या देखरेखीखाली मुंबईहून आणले होते.हे मंदीर पुर्णतः सागवानी होते.

तिसऱ्यांदा मंदिर जिर्णोद्धार

सन १९८४-८५ मध्ये पुन्हा बाळासाहेब दगडू तळपे (सरपंच) शंकर राघोजी हुरसाळे(उपसरपंच) विष्णू कामाजी हुरसाळे(कारभारी) किसन देहू तळपे(गुरूजी) चिंधू धोंडू तळपे, भीमाजी गोडे,दुलाजी गोडे ,सिताराम मोहन,शंकर नाना मोहन,शंकर दुलाजी तळपे, सोनु मारूती तळपे,तुळशिराम रोकडे,देवराम आंबेकर इत्यादी मान्यवरांच्या संकल्पनेतून नवीन मंदिर बांधकाम करण्याचे ठरवले. 

हे मंदिर पूर्वीच्याच मंदिराच्या दगडी जोत्यावर गुळगुळीत डबरा मध्ये बांधकाम करण्याचे ठरले. गुळगुळीत डबर तयार करण्याचे काम जवळजवळ वर्षभर चालू होते. दगड घडवण्याचे काम श्री.दत्तात्रय बारवेकर, श्री सुदाम बारवेकर, श्री सोपान बारवेकर आणि श्री दुदाजी बांगर यांनी केले. 

मंदिराचे संपूर्ण लाकडी काम हे सागवानी लाकडामध्ये करायचे ठरले होते. ही लाकडे कोकणातून आणली होती. यासाठी कै.विष्णू कामाजी हुरसाळे यांचे खूप मोठे योगदान होते. त्यांच्या नेतृत्वाखाली श्री.चिंधू धोंडू तळपे/ आणि अजुन चार पाचजण कोकणात दोन महिने आधी लाकडे तोडण्यासाठी गेले होते.

यासाठी कै.विष्णू कमाजी हुरसाळे यांच्या मामाने जवळजवळ दोन महिने मंदोशी गावच्या ग्रामस्थांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. सर्व लाकडे तोडून झाल्यावर गावातील संपुर्ण झाडून पुरूष मंडळी लाकडे आणण्यासाठी कोकणात गेले होते. 

तेथुन डोक्यावरून लाकडे वाहून मंदोशी येथे आणली गेली.ही लाकडे पुर्णतः सागवानी होती.मंदिराला एक किलचीही इतर झाडांची वापरलेली नव्हती.

हे मंदिर अतिशय सुंदर असे होते.खाली सुबक आशी गुळगुळीत काळी पांढरी लादी,सुंदर लाकडी खांब अतिशय छान अशी गच्ची व लोखंडी जाळ्या बनवलेल्या होत्या.असे मंदिर भागात असे कोठे नव्हतेच.

प्रथा परंपरा

श्री.काळभैरव मंदिरात रोज सकाळ व संध्याकाळ दिवाबत्ती व देवपुजा केली जाते.तळपे हे अधिकृत देवाचे पुजारी आहेत.

यात्रा

चैत्र महिन्याच्या दुसऱ्या रविवारी गावची यात्रा असते.सकाळी नेहमी प्रमाणे पुजा होते.सकाळी मांडव डहाळे करून लोक प्रथा व परंपरेनुसार हारतुरे आणन्यासाठी मोठ्या संख्येने शिरगाव येथे जुन्या एस,टी.स्टँडवर जमतात.(पुर्वी हारतुरे हे मुंबईकर आणत असत.आता अगदी वैयक्तिक हार फुले लोक आणतात.)

सर्वलोक जमल्यावर हारतु-यांची पुजा होते.हा मान शिरगावच्या सवाष्ण महिलांना असतो.त्यानंतर भव्य मिरवणूक सनई चौघड्यांच्या गजरात मंदोशी गावच्या दिशेने निघते.

हारतुरे,मंदिरात आल्यवर ,वस्रअलंकार व हारफुले देवावर चढवले जातात.सनई चौघडा च्या गजरात व मोठमोठ्या घंटाच्या निनादात महापुजा होते.असंख्य नारळ फुटतात. नवस फेडले जातात.

दंडवते

दुपारी ५.०० वा.सर्व ग्रामस्थ/पैपाहुने बायकामुलासह नवीन कपडे परिधान करून हातात पुजेचे ताट व प्रसाद घेऊन मंदिराच्या दिशेने मोठ्या संख्येने चालू लागतात.नवस केलेले भाविक जागोजागी जमीनीवर उपडे पडून देवाच्या नावाने मोठ्या भक्तीभावाने नतमस्तक होताना दिसतात.मंदिराच्या बाहेर व आत प्रचंड गर्दी असते.भाविक गुळ खोबरे,पेढे असा प्रसाद वाटतात.नवस फेडले जातात.बाजुलाच विविध गावांची नामांकित भजने सुरू असतात. प्रत्येकाच्या घरी पुरण पोळ्यांचे जेवण असते,

पालखी

रात्री ११.३० वा.च्या दरम्यान छबिन्यासह सनई चौघड्यांच्या गजरात,एकतारी भजन म्हणत पालखी काढली जाते.पालखीच्या वेळी प्रचंड जनसमुदाय असतो. 

पालखीचे मानकरी

खुप पुर्वीपासून पालखीचे भोई (मानकरी) बांगर व मसळे हे आहेत.

फटाके व दारूकाम रोषणाई

पालखीच्या वेळीआकाशात अतिशय सुंदर,नेत्रसुखद असे दारूकाम बघायला मिळते.

करमणूक कार्यक्रम

पालखीनंतर भारूड अथवा तमाशाचा कार्यक्रम असतो.दुसऱ्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम व कुस्त्यांचा जंगी हंगामा असतो.तत्पुर्वी अतिशय रूचकर असे सार्वजनिक जेवण असते.

अखंड हरिनाम सप्ताह 

सन 2014 पासून दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. श्री वामन महाराज जढर, श्री गोपाळ हुरसाळे व श्री रोहिदास वाघमारे श्री. नामदेव शंकर तळपे यांच्या नेतृत्वाखाली समस्त ग्रामस्थ मंडळ मंदोशी हे अतिशय उत्तम प्रकारे अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन व आयोजन करतात.

अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या दिवशी हरी कीर्तनासाठी भक्तांचा महापूर लोटतो.

आलेल्या पाहुण्यांचा मानसन्मान 

आलेल्या जनसमुदायाचा सत्कार व मानसन्मान गावच्या वतीने श्री यमन हुरसाळे, श्री एकनाथ तळपे, श्री राजू तळपे, श्री नामदेव हुरसाळे,श्री.किसन तळपे गुरुजी श्री बबन गोडे, श्री मारुती मोहन,श्री नामदेव रोकडे, श्री. बाळशीराम रोकडे,नितीन तळपे,अनंता तळपे हे करतात.

गावची साथ

भात लावणी सुरू करायच्या आधी एखाद्या रविवारी गावची साथ असते.या दिवशी शिवारातील सर्व देवांना तेलाचे/शेंदराचे माजने करतात.बोकडाचा बळी दिला जातो.शिवारातील देवांना नैवद्य दाखवून मग गावकरी जेवण करतात.अशाच प्रकारे भात काढणीच्या आधी साथ केली जाते,(वर्षातुन दोनदा साथ होते.)

घटस्थापना (देवघटी बसणे)

आश्विन शुद्ध प्रतिपदेला देव घटी बसतात.यासाठी प्रत्येक देवापुढे मातीचा घट करून त्यामध्ये धान्ये पेरतात.त्यावर लाकडी छोटा मांडव बनवुन एक नवेकोरे मडके पाणी भरून ठेवतात.भक्त लोक दहा दिवस उपवास करतात. भाविक त्यांना केळी,उपवासाचे जिन्नस,देवाला देवाला दिवाबत्ती साठी तेल देतात.रात्री भजन केले जाते.

देव घटी बसल्यावर दरोरोज एक तीळांच्या फुलांची माळ घातली जाते.

पहिलीमाळ ते दहावीमाळ असे दहा दिवस घटाला माळ घालतात.देव घटी बसवायच्या वेळी,पाचव्या माळेला व दहाव्या माळेला देवाकडे भक्तांची खुप गर्दी असते.खुप लांबून भाविक दर्शनासाठी येतात.

दहावी माळ घालून घट हलवतात.यालाच देव उठले असे म्हणतात.घटातील माती चिमुटभर का होईना आपापल्या शेतात टाकायची पद्धत आहे.याच दिवशी दसरा असतो.सायंकाळी लोक आपट्याची पाने घेऊन प्रथम देवाला भेटतात.त्यानंतर इतर लोकांना भेटायची पद्धत आहे.

देव पारधी जाणे

अश्विन प्रतिपदेला देव पारधी जातात.रात्री ८.००वा.च्या दरम्यान सर्व वाड्यावस्यातील व गावचे लोक मंदिरात जातात. देवाची पुजा होते.एखाद्याच्या अंगात वारे संचारते.देवाला नैवद्य दाखवला जातो.

नैवेद्याचा काही भाग घेऊन पुढे भगत,शेजारीअंगात वारे आलेला माणुस व त्यामागे लोकढोल वाजवत मंदिराबाहेर चालू लागतात. मुक्तारदेवाच्या पाठीमागे उंच झाडांच्या खाली असलेल्या विशिष्ट अशा दगडाच्या खोबणीत नैवद्य ठेवतात.

त्यावर त्याच मापाचा दगड ठेवतात.पुढे दिवा लावला जातो.हाच नैवद्य पुढे एक महिन्यानंतर देव पारधीहून आल्यावर अशाच प्रकारे वाजतगाजत दगडाच्या खोबनीतुन बाहेर काढला जातो.

हा नैवद्य एक महिन्यानंतरही जसाच्या तसाच असतो.प्रत्येक घराण्यातील प्रमुखाला भगत नैवद्य वाटप करतो.हा नैवद्य लोक धान्यामध्ये ठेवतात.

देवाचे भगत

चीमाजी तळपे,लक्ष्मण तळपे, ठकू तळपे, बुधा तळपे,शंकर अहिलू तळपे, विठ्ठल तळपे, मारूती रामभाऊ तळपे हे होते. हे सर्वजण आता हयात नाहीत.

या पैकी कै.विठ्ठल तळपे यांची कारकिर्द सर्वांच्या स्मरणात राहील अशीच होती.

आता श्री.गणपत तळपे हे देवाचे भगत आहेत.

अंगात वारे येणारे

गावात पुर्वी देवाच्या पुजे अर्चेबाबत सर्व इत्यंभुत माहिती असलेले व कडक अंगात वारे येणारे एकमेव मणुष्य म्हणजे कै. तुकाराम आंबवणे हे होय. शिवाय कै.काळू गवारी, श्री. धोंडू मसळे,श्री.बनाजी आंबवणे, श्री.विष्णू रोकडे यांच्याही अंगात वारे येत होते.

स्रीयांमध्ये कै.नकाबाई जढर व कै.यमुनाबाई तळपे यांच्याही अंगात वारे येत होते.व लोकांच्या समस्येचे निवारण होत होते.

इतर देव व देवता

मुक्तार देव

श्री.काळभैरवनाथाच्या मुख्य मंदिराच्या समोर मुक्तारदेवाचे मंदिर आहे.मुक्तारदेव हा काळभैरवाचा अत्यंत जवळचा मानला जातो. मुक्तार देव हा श्री काळभैरवनाथाचा सेनापती आहे.

मुक्तार मंदिराच्या पाठीमागे गर्द झाडीमध्ये 25 ते 30 दगडांच्या रेखीव व सुबक अशा मूर्ती आहेत. हे श्री.काळभैरवनाथाचे सैन्य आहे. जेथे जेथे काळभैरवाचे मंदिर आहे तेथे तेथे मुक्तार मंदिरअसतेच.

मुक्तार देव हा मोहनांचा मानला जातो. परंतु प्रामुख्याने या देवाची पूजा श्री बनाजी उर्फ रघुनाथ आंबवणे हे करतात. त्यांचे मुक्तार मंदिरासाठी खूप मोठे योगदान आहे.

मारूती मंदिर

मुख्य मंदिराच्या उत्तरेला दक्षिण मुखी मारूती मंदिर असुन अत्यंत अप्रातिम अशी मारूती रायाची भव्य मुर्ती आहे. इतकी सुबक मुर्ती इतरत्र कोठेही नाही.

पुर्वी मारूतीची लहान मुर्ती होती. ती मुर्ती पोखरी ता.आंबेगावा येथील लोकांनी चोरून नेली. व वैदवाडीच्या उत्तरेला असलेल्या बनात त्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आजही ही मुर्ती आपणास त्या ठिकाणी पहायला मिळेल.

तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मंदोशीच्या ग्रामस्थांना समजले की मारूतीरायाची मुर्ती चोरी झाली आहे. तेव्हा लोकांनी भल्या मोठ्या दगडावर सुंदर अशी मुर्ती कोरून घेतली.जी कोणच चोरून नेऊ शकत नाही.

कळमजा

मुख्य मंदिराच्या डाव्या बाजुला कळमजाईचे छोटेसे मंदिर आहे.

शिवाय कळमजाईचे मुख्य ठाणे हे वर डोंगरावर जंगलात आहे.हे मंदिर भिवंडीकर व ग्रामस्थांच्या सहयोगातुन झाले आहे. ह्या मंदिराच्या बांधकामासाठी श्री.लक्ष्मण चिमाजी सुतार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मी स्वतः सिमेंटच्या व वाळूच्या गोणी मोटारसायकल वरून मंदिर बांधकामाच्या ठिकाणी पोहचवल्या आहेत. परंतु आता जमीन मालकाने जमीन सुधारण्याच्या नावाखाली हे मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त केले आहे.

कनीरबाबा

कनीरबाबा हे ठाणं मंदोशीच्या वरच्या वाडीत नविन नाव (केळेवाडी) येथील जंगलात आहे.

कनीरबाबा हा देव म्हणजे एक मोठा दगड आहे.अतिशय गरीब असा हा देव आहे. डोळ्यांना इजा झाली.डोळ्यात फुल पडले किंवा डोळ्यांविषयी काही आजार झाले तर कनीरबाबाचे दर्शन घेऊन जाळीच्या पानात जाळीचा काटा खुपसुन कनीरबाबा असलेल्या दगडात खोचायचा व नवस करायचा. देव नवसाला पावतो.

काही लोक नारळ फोडायचे. व गुळभाताचा नैवेद्य द्यायचे. तर काही चांदीचे पाणी दिलेल्या पत्र्याचे डोळे,नारळ व गुळभाताचा नैवेद्य द्यायचे. परंतू १००% गुण यायचाच. याची मी स्वतः अनुभुती घेतलेली आहे.

वेताळ

भुतांचा राजा म्हणजे वेताळ हे अगदी छोटेसे मंदिर काळभैरव मंदिराच्या उजव्या बाजूला आहे.

बाळाव

मंदिराच्या उजव्या बाजूला थोड्याशा दुर अंतरावर हा दे आहे.पुर्वी लोकांना किंवा लहान मुलांना खोकला झाल्यास बाळाव देवाला गुळभाताचा नवस करत.

सत्या

बाळावच्या दक्षिणेस थोड्या अंतरावर सट्या देव आहे.पुर्वी कुणाला भाजल्यास या देवाला गुळभाताचा व पाणी भरलेला नारळ असा नवस करत.

देआई

दे आई हे वडाचीवाडी (हुरसाळेवाडी) येथे टोकावड्याला जाणा-या रस्त्यावर आहे. पुर्वी येथे मंदिर नव्हते.

यात्रा झाल्यावर येणा-या मंगळवारी गावातील सर्व वाड्यावस्त्यांचे लोक बायकांपोरांसह गोठणीवर जमत.

ढोलाच्या गजरात लोकांची भव्य मिरवणूक देआईकडे निघे.देवजी बांगर,रामजी तळपे,बबन गोडे मा.सरपंच हे उत्तम ढोल वादक होते. तेथे गेल्यावर गावच्या वतीने देवीची शेंदुर व तेल लावून महापुजा करत. ही पुजा करत असताना कै. नकाबाई जढर यांच्या अंगात देवीचा संचार होई.

जुने जानते लोक देवी पुढे पदर पसरत.देवीची म्हणजेच भक्तीनीचे लुगडे व चोळी देऊन बोळवन करत.यालाच देवी बोळवने म्हणत. हा संपुर्ण खर्च गावचा असे.त्यानंतर नारळ फोडले जात. प्रसाद वाटला जाई.

त्यावेळी हे सर्व अनुभवतांना खुप आनंद होई.त्या निमित्ताने लोक एकत्र येत.भेटीगाठी होत. चहापाणी होई. परंतु आता काळ बदालला.पुर्वीच्या साध्या- सुध्या आजारांची जागा आता डायबेटीस, ब्लडप्रेशर, कँन्सर, हार्टअँटक,पँरेलीसेस यांनी घेतली.लोकांचे आयुष्य कमी कमी होत चालले. एकमेकांशी संवाद हरवला.

या मंदिराच्या जिर्णोद्धार करण्याचे काम श्री.दत्तात्रय आंबेकर (अध्यक्ष )श्री.भगवानराव हुरसाळे (उपाध्यक्ष) श्री.गणेश हुरसाळे (सचीव) श्री.अंकुश हुरसाळे (खजीनदार) सर्व देआई प्रतिष्ठान मंदोशी व सर्व संचालक यांनी केली. बंद पडलेले व ग्रामस्थांकडून दुर्लक्षित झालेली देवी मंदिराच्या रुपाने पुन्हा वलयांकित झाली.

या सर्वानी भजन,प्रवचन किर्तन, हळदीकुंकू, मोफत आरोग्य शिबीर,झाडे वाटप इत्यादी उपक्रम राबवून एकेकाळचे गतवैभव देवीस पुन्हा मिळवून दिले.देवीच्या अशिर्वादाने सर्वांचे आयुष्य व प्रगती चांगली चालू आहे.

रूढी व परंपरा

श्री.काळभैरवनाथ देवस्थान अतिशय कडक असल्यामुळे मंदिराच्या परीसरामध्ये कुनीही मद्यपान करून जात नाही अद्यापही ही परंपरा टिकुन आहे.

त्याचप्रमाणे पायातील चप्पल/ पायतान मंदिरापासुन २०० फुट बाहेर काढाव्या लागतात.

स्रियांना मंदिरात अथवा मंडपात दर्शन घेणे निशिद्ध मानले जाते.

मात्र यात्रेच्या दिवशी स्रियां सभामंडपातून दर्शन घेऊ शकतात.

गावातील लोक जेव्हा मंदिरात दर्शनासाठी जातात तेव्हा अंघोळ करून व धुतलेली कपडे घालूनच मंदिरात प्रवेश करतात.अन्यथा बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते.

देवाला होळी आणि गुढीपाडव्यालाच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.इतर वेळी नारळ फोडतात.

देवाच्या गाभाऱ्यात भगताशिवाय इतर कोणालाही जाण्यास निश्चिद्ध मानले जाते.तेथे जाण्यास कोणाचेही धाडस होत नाही.

देवाची सकाळ व संध्याकाळ दिवाबत्ती करून पुजा होते.

मंदिरात काळी कपडे घालून जाणे निशिद्ध मानले जाते. शक्यतो गावकरी काळे कपडे घालतच नाहीत,

देवाला सकाळी केलेला पाण्याचा जलाभिषेक प्रिय असतो.

देवाचा वार रविवार व गुरूवार मानला जातो. तथापि रविवारी मोठ्या प्रमाणावर लोक दर्शनासाठी गर्दी करतात.

सकाळी १०.००वा.पर्यत घेतलेले दर्शन फलदायी ठरते.त्या कावेळी देवाच्या मुर्तीमधील तेजोवलय अतिशय प्रसन्न दिसते.इतर वेळी तसे दिसत नाही.सांगण्याचा मुद्दा असा की सकाळी देव मुर्तीमध्ये स्थित असतो.

दर रविवारी काही समस्याने ग्रस्त असलेले लोक भगताडे आपली समस्या मांडतात.भगत देवाच्या मुर्तीवर डाव्या व उजव्या बाजुला चाफ्याच्या कळ्या लावून कौल मागतो.

गावात कोणाचेही महत्त्वाचे काम असल्यास देवाकडे कौल लावून देवाची मान्यता घेण्याची पद्धत आहे.

दर रविवारी व गुरूवारी देवाच्या मुर्तीला तीळाच्या तेलाचा अभिषेक करतात.(इतर दिवशी नाही.) यालाच देवास माजने करणे म्हणतात,

यात्रेच्या दिवशी देवास नारळ फोडतात. नारळातील खोब-याचे तुकडे व गुळ प्रसाद म्हणुन भाविक भक्तांना वाटतात.यालाच शेरणी म्हणतात.

यात्रेला घरोघरी पुरणपोळी करतात. 

देवाला कोंबडा/ बक-यांचा बळी देतात. तरी सदरचा नैवेद्य मदिरात/सभामंडपात घेऊन जात नाहीत.निशिद्ध आहे. 

श्री.भैरवनाथ मंदिर प्रेक्षणीय स्थळ 

श्री काळभैरवनाथाच्या उत्तर पूर्व दिशेला भीमाशंकर ला जाणारा अतिशय सुंदर असा घाट रस्ता आहे. हिरवेगार डोंगर, ठिकठिकाणी असलेले धबधबे आणि त्यात मधून नागमोडी वळणे घेत असलेला सुंदर असा डांबरी रस्ता हे पावसाळ्यात एक विलोभनीय दृश्य असते.

या ठिकाणी जून ते सप्टेंबर असा चार महिने पाऊस पडतो. त्यामुळे ओढे नाले, धबधबे ओसंडून वाहत असतात.

मंदिराच्या समोरच नदीसारखा ओढा आहे. एवढ्याला आठ ते नऊ महिने पाणी असते. शिवाय मंदिराच्या पाठीमागे खूप मोठा धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून पर्यटक येत असतात.

मंदिराच्या समोर खूप मोठी विहीर असून बाराही महिने पाणी असते. शिवाय मंदिराच्या शेजारी दोन मोठे सभा मंडप असल्यामुळे भाविकांची निवाऱ्याची सोय झाली आहे.

मंदिराच्या आसपास करवंदाच्या जाळी, आंबे व जांभूळ हे वृक्ष असल्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा लोकांची गर्दी असते.

मंदोशी गाव ही धबधब्यासाठी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे 

त्यामुळे लांब लांबून पर्यटक सतत येत असतात. त्याचप्रमाणे दर रविवारी श्री काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी सुद्धा खूप लांबून लोक येत असतात. सतत वर्दळ चालू असते.

लेखक :- श्री.रामदास तळपे


पर्यटनाला जाताना मंदोशी घाटातील श्री.विशाल गवारी यांच्या हॉटेल निसर्गला नक्की भेट द्या.
                  संपर्क :-7378763052










शंकर दादा

गावी यात्रेच्या हंगामात कुस्त्यांचे जंगी आखाडे पहाण्यासाठी गावोगावी जाणे ही वेगळीच मजा असायची. जवळपासच्या गावांच्या आखाड्याला गावातील पंधरावीस जण हमखास असायचे.परंतू खुप दुरच्या गावचा आखाडा असेल तर जाणे टाळत.

एकदा असाच निवांत बसलो असताना माझ्या आत्याचा मुलगा शंकरदादा वनघरे (डेहणे )आला. आणि मला म्हणाला.

उद्या माझ्याबरोबर घोटवडी गावच्या कुस्त्यांच्या आखाड्याला येशील कामी म्हणालो. तसेही मला काही काम नाही आणि मी घोटवडी गाव पाहिले नाही. निदान गाव तरी पहाता येईल.जाऊ आपण.

आजुन कुणी येणार असेल तर बघ.मी त्याला म्हणालो.

शंकरदादा हा १९८५ ते १९९३ या काळात पश्चिम भागात एक नामांकित पहिलवान होता.भागात त्याचा दरारा होता.पानाला चुना लावायच्या आत तो समोरच्या पहिलवानाला आस्मानातील चांदण्या मोजायला लावायचा.असा त्याचा खेळ होता.

दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वा.आम्ही दोघे पायवाटेने,रानामाळातुन पायवाटेने दरमजल करीत घोटवडीच्या दिशेने निघालो.पायवाटेने जात असताना वाटेच्या अगदी कडेला घर असलेल्या श्री.काळुराम भवारी यांचे दारातील मांडवात विश्रांतीसाठी थांबलो व बाहेरूनच पाणी मागीतले.श्री.भवारी यांच्या पत्नीचे माहेर आमच्या गावचे होते. सासुरवाशीनीला माहेरचे कुणीही भेटले तरी किती आनंद होतो हे सांगावयास नलगे.त्यांनी पाणी दिल्यावर आम्हा दोघांनाही जेवण्याचा आग्रह केला.आम्हाला दोघांनाही तशी खुपच भुक लागली होती.कारण आम्ही दोघेही जेवण न करताच निघालो होतो.चट आखाड्याला भात खाता येईल हा विचार केलेला.

प्रथम आम्ही नको नकोच म्हणालो.परंतु मनातुन जेवायची इच्छा होतीच. 

अरे जेवा थोडंथोडं? मटन आहे.

मटन म्हटल्यावर आम्ही बसलोच जेवायला.

पोटभर जेवल्यावर आमचा घोटवडीच्या दिशेने प्रवास सुरू झाला.उन्हातान्हातुन,डोंगरवाटेने कपाळावरचा घाम पुसत आम्ही चाललो होतो.उन मी म्हणत होतं,पायवाटेने अनेक लोक आखाडा पाहण्यासाठी चालले होते.ओळखीच्या लोकांबरोबर आम्ही गप्पा मारत एकदाचे घोटवडी गावात पोहचलो.

तेथे मंदिराच्या बाजुला भारूडाचा कार्यक्रम चालू होता. लोक भर उन्हात बसुन भारूडाचे वगनाट्य बघत होते.

काहीजण बर्फाच्या गारेगारी खात होते.स्रीया पाव्हण्यारावळ्या स्रीयांना कासाराकडुन बांगड्या भरून घेत होत्या. रेवड्या, शेंगोळी,खेळणी घेत होत्या.

थोड्याच वेळात भारूडाचा कार्यक्रम संपला.माईकवार अनाउंसमेंट झाली.सर्व यात्रेकरूंनी आखाड्याच्या जेवणासाठी बसुन घ्यायचे आहे.

अनाउंसमेंट झाल्याबरोबर आखाड्याला आलेले लोक तिकडे धावले.झाडाखाली विसाव्याला बसलेले,लोक झाडाखाली झोपलेल्या लोकांना उठवू लागले.लोकांचा लोंढा आखाड्याच्या जेवणाकडे चालू लागला.

भात खाचरांत,मोठमोठया ढेकळांतून लोकांच्या पंक्ती बसल्या.वडाच्या पानांचा पत्रावळीसारखा आकार करून लोक भात येण्याची वाट पाहू लागले.शेवटी एकदाच्या भाताच्या व आमटीच्या बादल्या घेऊन वाढपे लोक पंक्तीमधुन वाढू लागले.श्लोक झाल्यावर लोक आमटी भातात कालवुन खाऊ लागले.वर उन्हाचा कडाक्यात खाली तिखट आमटीचा ठसका व जीर तांदळाच्या भातावर लोक तुटून पडले.चारचारदा वाढपे बादल्या घेऊन वाढत होते.हाश्यहुश्य करत लोक जेवत होते.

च्यायला ! इथे एखादेतरी झाड असते तर झाडाच्या सावलीखाली निवांत जेवता आले असते असे विचार अनेकांच्या मनात तरळून जात होते.

शेवटी एकदाचे आम्ही जेवन करून आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसलो.

काही पोरांनी झाडाखाली पत्यांचा डाव मांडला.पोरं तीन पत्ती खेळू लागली.काहीजण गलीवर चिल्लर नाणी फेकून खेळू लागली.तर काहीजण वामकुक्षीसाठी सावलीला लवंडले.

तासाभरानंतर सनई,चौघडे वाजू लागले.

अरे उठा... जागे व्हा...

आखाडा निघाला. झोपलेल्यांना जागी करत लोक बोलू लागले. तीनपत्ती,गलीवरचे चिल्लर खेळ बंद करून लोक आखाड्याच्या दिशेने चालू लागले.

कुस्त्यांची दंगल

आखाडा सुरू झाला.सुरूवातीला लहान मुलांच्या कुस्त्या चालू झाल्या.आखाड्यात रेवड्या उधळल्या गेल्या.पोर शर्ट काढुन आखाड्यात एकमेकांना भिडू लागली.तार काही पोरं नुसतीच रेवड्या गोळा करू लागली.एकाच वेळी लहान पोरांच्या पंधरा वीस कुस्त्या सुरू झाल्या.एकच गलका झाला.नुसताच धुराळा...

सुरूवातीला दहा रूपयापासुन कुस्त्या चालू झाल्या.हळुहळू आखाड्याला रंग चढू लागला.पंचांच्या निर्णयावरून वाद झडू लागले.

शेवटी एकदा एका नामांकित मल्लावर म्हैस बक्षिस असलेली कुस्ती जाहिर झाली.कसलेला पहिलवान बघुन अनेकांनी आंदाज घेतला.व आपल्या आवाक्यात नाही हे ओळखुन अनेक जण जागीच थिजले.

इतकावेळ शंकरदादाही अंदाज करीत होता.समोर धरलेल्या पहिलवानापुढे शंकरदादा खुपच खुजा वाटत होता.आणि अचानक शंकरदादा उठला व समोर धरलेल्या पहिलवानापुढे जाऊन म्हणाला मी खेळतो याच्याबरोबर..

कुस्ती लावनारे श्री.मारूती धंद्रे बोलले.अरे तुझा याच्या बरोबर जोड आहे काय? मरायचय का तुला? समोरचा पहिलवान केवढा तु केवढा? तुझा पाडाव लागनार नाही! चल जागेवर जाऊन बस ?

हे ऐकून मलाही बरं वाटलं.खरंच शंकरदादा त्या पहिलवानापुढे अगदी खुजा व तब्येतीने खुपच बारीक होता.

शंकरदादा परत माघारी फिरला.तेवढ्यात खाली बसलेले पब्लीकमध्ये असणारा एकजण ओरडला.

होऊद्या या दोघांची कुस्ती तुम्हाला काय अडचण आहे?तो खेळायला तायार आहे ना ? नाहीतरी दुसरा कुनीच पहिलवान तायार नाहीय.

खाली बसलेला समाज ही कुस्ती झालीच पाहीजे म्हणून एकच गलका केला.

आणि शंकर दादाची कुस्ती लागली 

शेवटी गावकरी व धंद्रेसाहेबांची चर्चा झाली व एकदाची कुस्ती लागली.

शंकरदादाला मी खुपच दुषणं देऊ लागलो. तुला अकलेचा भाग आहे का? मरायचय का तुला त्याच्यासमोर? असे मी त्याला बोलू लागलो.

तो एवढचं बोलायचा गप तुला काय कळतयं ? पडलो तर पडलो.

दोनही पहिलवानांनी काच्या केला.आपापल्या देवाला नमस्कार केला.व दोघेही मैदानात उतरले.

जय बजरंग बली अशी गर्जना करीत‚ एका पायावर नाचत‚ जांग कसलेला समोरचा पैलवान मैदानभर फिरला. त्याची तयारी दाबजोर होती.दुसऱ्या बाजूनं शंकरदादाही ‘बजरंग बली कीऽ जय.’ असं गर्जत एका पायावर नाचत मैदानात उतरला. कळकाच्या दांड्यासमोर तुरकाठी दिसावी तसा शंकरदादा त्या पहिलवानापुढे किरकोळ दिसू लागला.अनेक जण हळहळले. हा हा म्हणता हा पहिलवान शंकरदादाला पाडणार हे सगळ्या लोकांना उघड दिसत होतं.

दोन पहिलवानांची खडाखडी 

पाच-दहा मिनिटं झाली. दोन्ही पैलवानांची मैदानात खडाखडी चालली होती. समोरच्या पहिलवानाने शंकरदादाला पटात घेतलं. कौशल्यानं शंकरदादानं पट फोडला.‘हे रे माज्या भाद्दरा!’ धंद्रे साहेब ओरडले.आपण कुस्त्या लावायला उभे आहोत हेच ते विसरले होते. शंकरदादा मैदानात एवढा वेळ कधीच कुचमला नव्हता. दमछाकीला तो टिकणं शक्यच नव्हतं. शंकरदादानं त्वरेने काही केलं तरच जमणार होतं. 

शंकरदादा सावध झाला. गळ्यात हात चढवायला चालून येणारा समोरचा मल्ल बघून‚ नाकात माती शिरल्याच्या आविर्भावानं चिमटी लावून त्यानं नाक शिंकरलं. 

तो ओला हात ढालीसारखा तसाच पुढं धरला. त्याच्या घाणेरड्या ओल्या हाताचा स्पर्श होणार म्हणून बिचकलेला पहिलवान आठ्या घालीत एक पाऊल मागं हटला.थोडावेळ त्याचं चित्त चलबिचल झालं. 

तेवढ्यात शंकरदादानं चपळाई करून त्याच्या दोन्ही पायांना आपल्या पायांची गोफणीमिठी घातली.आणि दार ढकलावं तसं त्याला नुसतं मागं ढकललं. पायाला आढा बसलेला धिप्पाड रपहिलवान ‘आकडीच्या’ डावावर हां हां म्हणता सरळ मैदानात उताणा झाला.

शंकरदादानं त्याला दिवसा चांदण्या मोजायला लावल्या. ‘बजरंग बली कीऽ जय!’ फटाकड्यासारखी उसळी घेत शंकरदादा मैदानभर बेहोश होऊन नाचू लागला.

म्हशी वरची कुस्ती जिंकली बक्षिसांची खैरात 

रोख बक्षिसांची तर नुसती खैरात झाली.

म्हशीवर कुस्ती जिंकली असल्यामुळे एका गावक-याने आम्हाला गोठ्यात बांधलेली म्हैस सोडून आमच्या हवाली केली.

अरेरे... काय ह्या म्हशीची अवस्था  

म्हशीला बघुन आम्ही टरकलोच.म्हशीचा अगदी सांगाडा दिसत होता.म्हैस घरी न्यावी की नाही याबाबत आमच्यात चलबीचल झाली. परंतू ही बक्षीस मिळालेली म्हैस आहे.न्यावीच लागेल असा विचार करून आम्ही दोघे म्हशीला घेऊन परत आल्या वाटेने घरी चालू लागलो.

डेहणे गावच्या हद्दीत सातक्यात (रानाचे नांव ) आल्यावर म्हैस जे बसली ती उठेचना. खुप प्रयत्न करूनही म्हैस काही उठेना.आम्ही मग तसेच घरी आलो.

दुसऱ्या दिवशी आम्ही वाळलेल्या गवताच्या पेंढ्या व पाणी घेऊन गेलो.तर तेथे म्हैस बसलेलीच.गेल्यावर म्हशीला गवत टाकले.पाणी पाजले..म्हशीने आम्ही नेलेले सर्व गवत खाल्ले.परंतु म्हैस काही उठली नाही.आज उठेल उद्या उठेल असे करता करता आठ दिवस झाले तरीही म्हैस काही उठली नाही.

शेवटी आम्ही सात आठ लोकांना घेऊन गेलो.लाकडाची दंडाळी घालून म्हशीला उठवले.सुरूवातीला म्हैस पायच धरेना..आता काय करायचे असा प्रश्न उभा राहिला..

सल्ला फायद्यात पडला 

कुणीतरी सल्ला दिला. म्हशीला काही दिवस पेंड,सुग्रास चालू करा.आपोआप तिच्यात उठायचे बळ येईल.असा सल्ला देऊन लोक घरी आले.

शंकरदादा दररोज म्हशीला पेंड,सुग्रास.गवत देत होता.पाणी पाजत होता.आणि अश्चर्याची गोष्ट तीन दिवसात म्हैस ऊभी राहीली.शंकरदादाला तो पहिलवान पाडल्यापेक्षा जास्त आनंद झाला.

अजुन चार दिवसांनी म्हैस स्वतःहून चालत घरी आली. हीच म्हैस पुढे अनेक वर्ष शंकरदादाकडे होती. म्हशीने दूध देऊन शंकरदादाची पुढे सेवा केली.

<center><a href="http://marathibloglist.blogspot.in/" target="_blank"><img src="https://i.ibb.co/N3wkPrP/120-8abc.png" alt="120-8abc" border="0" /></a></center>

रामदास तळपे





श्री बाळासाहेब मेदगे यांचा आदरांजली पर लेख

सुप्रसिद्ध लेखक आणि सामाजिक बांधिलकी जपणारे आमचे मित्र श्री बाळासाहेब मेदगे यांनी त्यांच्या शिक्षका विषयी आदरांजली पर लेखन केले आहे.

आदरांजली शिंदे गुरुजी यांना

सन 1979 असावे त्या दरम्यान औदर गावात फक्त दोन शिक्षकच सातवी पर्यंत वर्ग शिकवत होते.आम्हाला असणारे आदरणीय निर्मळ गुरुजी एक महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीवर गेले होते.अशा वेळी दुसऱ्या गावातील शिक्षक येऊन तो कार्यकाल पूर्ण करत होते.

आमच्या शेजारी असणाऱ्या देवोशी गावात शिंदे गुरुजी म्हणून प्रख्यात शिक्षण महर्षी गुरूंचे काम पहात होते.शासनाच्या आदेशाने त्यांना औदर मध्ये एक महिन्यासाठी यावे लागणार होते.

जानेवारी महिन्यातील पहिला सोमवार होता.एक पँट शर्ट घातलेली व्यक्ती सायकल वरून उतरत होती. गोऱ्या साहेबांची लय प्राप्त झालेली,केस रचना व्यवस्थित असलेली,व्यक्ती सायकल पार्क करून शाळेच्या होरंड्यावर प्रवेश करती झाली.

आल्या नंतर सरळ ते मुख्याध्यापक यांना भेटले होते. शाळेत एक कुजबुज चालली होती.बदली गुरुजी म्हणून शिंदे गुरुजी एक महिन्यासाठी आलेले आहे.आणि लगेच ते आमच्या वर्गात आले. त्यांनी त्यांचा परिचय सगळ्यांना करून दिला.एक सुंदर हास्य चेहऱ्यावर दिसत होते.

आमच्या वर्गात तीन वर्ग होते. दुसरी,चवथी,आणि सहावी, प्रत्येकी वर्गात साधारण आठ दहा विद्यार्थी होते. दोन वर्गांना त्यांनी काही तरी अभ्यास दिला होता, त्यामुळे त्या दोन्ही वर्गातील विद्यार्थी त्यांचा अभ्यास करण्यात गर्क झाले होते.आमचा वर्ग सहावीचा होता. गुरुजींनी आमच्या कडे त्यांचे लक्ष वेधले.

गुरुजी हसत हसत म्हणाले,

विद्यार्थी मित्रानो, 

आज एक कविता तुम्हाला मी शिकवणार आहे, कवितेचे नाव आहे "आला क्षण, गेला क्षण"  प्रत्येकाने मराठीचे पुस्तक उघडून ही कविता काढा,असे म्हटल्या बरोबर सगळ्यांनी मराठीचे पुस्तक उघडले.आमच्या वर्गात पंधरा मुले होती. वर्ग स्तब्ध झाला होता. वर्गात शांतता पसरली होती.कारण गुरुजी हे सगळ्यांना नवीन होते,कसे शिकवणार या कडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

बाहेर वातावरण थंडीचे होते.शेतकरी वर्ग बटाट्याच्या शेताला पाणी भरण्यात व्यस्त होता.आणि गुरुजी नी आपली वाणी आमच्या पुढे प्रस्तुत करण्यास सुर वात केली होती.

गुरुजींनी कवितेच्या कवीचा परिचय एवढा सुंदर करून दिला की, विद्यार्थी पूर्ण कान लावून ऐकत होते.पुढे काय होणार. कवितेच्या शीर्षकावर जवळ पास दीड तास गुरुजी बोलत होते आणि आम्ही बळ बांधून ऐकत होतो.

क्षण या दोन शब्दावर एवढे सुध्दा बोलता येते या विचाराने मी तर पूर्ण भारावून गेलो होतो.कविता शेवटच्या चरणावर येऊन पोहचली होती मधून मधून गुरुजी काही प्रश्न सुध्दा विचारत होते जो तो आपापल्या बुद्धीी प्रमाणे उत्तरे देत होता. गुरुजींनी त्यांच्या ही उत्तराचा सन्मान केला होता.

आणि तो दिवस एका कवीच्या प्रतिभेच्या विषयाला अनुसरून आनंदात गेला होता.आम्ही शाळा सुटल्या नंतर गुरुजींचे कौतुक करत होतो.

एक महिना कुठे गेला कळलेच नाही. तसे आमचे निर्मळ गुरुजी सुध्दा त्याच प्रमाणे शिकवत होते. त्यामुळे आम्ही त्यांची तुलना कधी केलीच नव्हती. 

सातवी झाल्यानंतर आठवीला ज्यावेळी वाड्यात प्रवेश घेतला त्यावेळी सहजच आमचे लक्ष एस.एस.सी.बोर्डात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या यादी वर गेले तर त्या ठिकाणी 1967 बॅच मध्ये प्रथम क्रमांक या गुरुजींचा दिसला होता.त्याच वेळी त्यांची ती कविता पुन्हा एकदा मनाच्या पार्लमेंट मध्ये आनंदाचे भरते करत होती.

आज सकाळी गुरुजींच्या जाण्याची बातमी कळली त्यावेळी मात्र आम्ही पूर्ण निशब्द झालो.


लेखक:- बाळासाहेब मेदगे औदर ता.खेड (पुणे)

ग्रामीण एसटी प्रवासाचे दिवस


पूर्वी गावाकडे कच्चे रस्ते असायचे.1990 पर्यंत कडधे गावापर्यंत डांबरी रस्ता होता. यापुढे भोरगिरी पर्यंत कच्चा खडीचा रस्ता असायचा.

ग्रामीण एसटी प्रवास 

त्यावेळी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच एसटी बस होत्या.लाल धुराळा उधळीत एसटी यायची.एसटीच्या पाठीमागे धुराचा डोंगर तयार व्हायचा. या धुराळ्यात मागचे काहीच दिसत नसायचे.एसटी आल्यावर आम्ही वाऱ्याची दिशा बघून एसटीचा धुरळा चुकवायचा प्रयत्न करायचो.

त्याकाळी रस्ते झाले नव्हते.त्यामुळे ठराविक ठिकाणीच एसटीची सेवा उपलब्ध होती.तेही कच्चे रस्ते होते.अनेक लोक एसटी पकडण्यासाठी घरातून तासभर आधीच पायवाटेने, राना माळातून, डोंगर वाटेने पायी चालत एसटीच्या स्टॉप जवळ येत असत.कधी कधी आधीच एसटी निघून जाई.नाईलाजाने मग लोक पायी चालत. मी सुद्धा अनेक वेळी असा प्रवास केला आहे.

सन 1990 पूर्वीची एसटी 

त्यावेळी वाहतूकही तूरळक असायची.राजगुरूनगर - डेहणे ही एसटी सकाळी दहा वाजता डेहण्याला यायची. या गाडीत प्रामुख्याने शाळेचे शिक्षक,सरकारी कर्मचारी आणि ठराविक गावाकडचे प्रवासी असायचे.याच गाडीत सकाळ वर्तमान पत्र, पावच्या लाद्या आणि बटर खेड वरून पाठवत असत.पूर्वी 90 % लोकांकडे घड्याळे नसायची. ही गाडी आली म्हणजे दहा वाजले असे लोक बिनधास्त समजायचे.आणि त्या प्रमाणे कामाचे नियोजन करायचे. काही दिवसानंतर ही गाडी बंद झाली.

ग्रामीण महाराष्ट्रातील एसटी चे महत्व

समस्थ पश्चिम पट्ट्याची आणि मुंबईकरांची आवडती गाडी म्हणजे परेल -भोरगिरी ही होय.सकाळी 9.40 वाजता ही गाडी डेहण्याच्या स्टॉप वर उभी असे. या गाडीला त्यावेळी प्रचंड गर्दी असायची.शनिवारी आमची शाळा सकाळी 9.30 वा. सुटायची.बऱ्याच मुलामुलींचा लोंढा डेहण्याच्या स्टॉपला जमा व्हायचा.त्या वेळी डेहणे ते शिरगांव तिकीट होती 75 पैसे. तर हापतिकीट होती 40 पैसे. बऱ्याच मुलांकडे हे पैसेही नसायचे. त्यामुळे बरीच मुले पायीच प्रवास करत असत.

काही लोकांना मुंबईला जायचं असल्यामुळे व होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून वाळद आव्हाट, खरोशी व डेहण्यावरून या गाडीने मुंबईकर प्रवासी भोरगिरीला जात. व येताना मुंबईचे तिकीट काढत असत.

अनेक लोक सणावाराला,यात्रेला,लग्नकार्याला व सुट्टीला बायकामुलांसह गावी येत.मुंबईकरांच्या मुलांची कपड्यांची फॅशन,पायातील बूट किंवा चपला आणि बोलण्याची स्टाईल खुपच रुबाबदार असे.परंतु गावाकडच्या पोरांना त्यांचे कधीच आकर्षण वाटायचे नाही.खाकी चड्डी, पांढरा शर्ट व बिगर चप्पलेचे कोठेही रानोमाळ भटकणे,ओढ्यात किंवा नदीत पोहणे, गोटया, विटीदांडू व क्रिकेट खेळणे,आंबे करवंदे, जांभळे खायला रानात भटकणे हाच त्यांचा खरा आनंद व समाधान होते.हे मुंबईकर पोरांना जमत नसे. त्यांना गावच्या पोरांचा हेवा वाटे.

गावची यात्रा असेल त्या दिवशी सारा गाव एसटी स्टॉपवर येऊन आतुरतेने परेल - भोरगिरी गाडीची वाट पाहायचा. मुंबईकर येताना देवासाठी हरतुरे, देवाच्या रंगीत मखमली छत्र्या, छात्र चामरे व हारतुरे घेऊन येत असत.लोकांच्या दृष्टीक्षेपात गाडी येताच सनई,चौघडे ही वाद्य वाजत्री वाजू लागत.स्टॉप वर गाडी उभी राहताच गाडी भोवती गर्दी जमा होई.साहित्य गाडीतून बाहेर काढले जाई.

मुंबईकरांची सुट्टी संपल्यावर त्यांना गाडीत बसवून देण्यासाठी निम्मा गाव स्टॉपपर्यंत जात असे.

त्याही पूर्वी तळेगाव - टोकवडे ही गाडी तळेगाव येथून 7.30 वाजता तर खेड येथून सव्वानऊ वाजता निघत असे.तर डेहाण्याला आकरा वाजता येत असे. या गाडीत पोस्ट ऑफिसच्या पत्राची पार्सल येत असत..ही गाडी सर्वात आधी म्हणजे साधारण 1975 ला सुरु झाली.आणि त्यानंतर मग इतर दुसऱ्या.निवांतपणाने जगणारे लोक या गाडीने प्रवास करत असत.

मी शाळेत होतो.नववीची वार्षिक परीक्षा होती. साडे आकराचा पेपर. आम्ही बरीच शाळेची मुले मुली तळेगाव गाडीची वाट पाहत बसलो. 11.20 झाले.गाडी काही येईना.आता काय करायचं ? पेपरला गेलो नाही तर नापास व्हायची भीती. मग काय निघालो आम्ही पळत. अर्धा तास उशीर झाला. परंतु एकदाचे आम्ही शाळेत पोचलो. व पेपर लिहिला.

राजगुरुनगर भोरगिरी ही एसटी शिरगावला दोन वाजता यायची.व अडीच तीन वाजता फिरून परत जायची. या गाडीला त्यामानाने गर्दी कमी असायची.

मुक्कामची गाडी बऱ्याच लोकांची सर्वात आवडती गाडी होती.बाहेरगावी गेलेले सर्व लोक मुक्काम गाडीने घरी येत असत. ही गाडी साधारण आठ वाजता शिरगाव स्टॉप ला येत असे. या गाडीला सुद्धा प्रचंड गर्दी असायची. 

या गाडीत पिणारे खाणारे लोक असायचे. कंडक्टर बरोबर त्यांचे वादविवाद व्हायचे.जास्त वादावादी झाल्यावर ड्रायव्हर गाडी उभी करत असे.आता इथून पुढे गाडी जाणार नाही. सर्वांनी उतरून घ्या.असे म्हणल्यावर लोक तंटा सोडवत असत.रात्रीच्या काळ्याकभिन्न अंधारात मुक्कामची गाडी धावत राही. पुढचा उजेड सोडला तर बाहेर खिडकीतून पाहिल्यावर दूरवर नुसता अंधार दिसे. आपण कोठे आलो आहोत हेही कळत नसे.

हीच मुक्कामची गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता राजगुरुनगरला जायला निघे. प्रत्येक स्टॉपचे सकाळचे प्रवासी घेऊन ही गाडी राजगुरुनगरच्या दिशेने रवाना होई. 

त्यावेळी ठिकठिकाणीच्या स्टॉप वर गावाकडचे दूध घालणारे गवळी दूध घालण्यासाठी जमत असेल. त्या ठिकाणी दूध संकलनाचे काम चालू असायचे. एसटीच्या ड्रायव्हरला मोफत पिण्यासाठी दूध दिले जायचे.काही ड्रायव्हर कंडक्टर त्यांच्याजवळ असलेल्या किटलीत फुकट दूध घ्यायचे. 

दूध संस्थेवाले लोकही त्यांना फुकट दूध द्यायचे. काही लोकांना ड्रायव्हर बसतो त्या केबिनमध्ये बसायला खूप आवडायचे.ओळखीचा ड्रायव्हर असेल तर तीन-चार जण बसायचे.त्यावेळी एसटी ड्रायवर व कंडक्टरची लोक खुप काळजी घेत.

पूर्वी एसटीला मागे दरवाजा होता. त्यानंतर एसटीचे रूप बदलले.अनेक अमुलाग्र बदल झाले.पाठीमागचा दरवाजा पुढे आला.नवीन सुरवातीला लोक एसटी आल्यावर गाडीत जागा धरण्यासाठी मागच्या बाजूला पळत जायचे.परंतु दरवाजा असायचा पुढे.परत लोक पुढे धावायचे.खूपच गंमत व्हायची.

काही लोक एसटीची गर्दी बघून गाडीच्या मागच्या खिडकीतुन मागच्या बाजूने शिरायचा प्रयत्न करायचे. तर ड्रायव्हर नाही हे बघून काहीजण ड्रायव्हरच्या दरवाज्यातून गाडीत घुसायचे. काहीजण एसटीच्या मोडक्या खिडकीतून शरीर एसटीत ढकलायचा प्रयत्न करायचे. 

अनेकांकडे पिशव्या, गाठोडी,भांडीकुंडी,बाजाराचे साहित्य, कोंबड्या चितड्या व कामधंद्याचे साहित्य असायचे. ते सर्व एसटीत भरताना लोकांची प्रचंड धांदल व्हायची. काही जन बाहेरून खिडकीतून रुमाल किंवा टोप्या एसटीतील सीटवर टाकायचे. त्या ठिकाणी आत सीटवर दुसरेच कोणीतरी बसलेले असायचे.त्यावरून प्रचंड भांडणे व्हायची. एकच कोलहाल व्हायचा.

एसटी बस ग्रामीण भागासाठी जीवनवाहिनी

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी एसटीचा प्रवास करून त्यांनी त्यांची शाळा कॉलेज पूर्ण केले. दूर शहरात केव्हा तालुक्याचे ठिकाणी शिक्षणासाठी असलेल्या आपल्या मुलांना ग्रामीण भागातून जेवणाचे डबे,पोहोचवण्याचे काम सुद्धा ड्रायव्हर,कंडक्टर करत असत.

ग्रामीण भागात नोकरी करणारे अनेक नोकरदार एसटीच्या सेवेवर अवलंबून असत. प्रत्येकासाठी एसटी अगदी वाट बघत थांबत असे. इतके एसटीचे प्रवाशावर प्रेम होते.

काळ बदलला.प्रवासासाठी अनेक साधने निर्माण झाली. अनेकांकडे मोटरसायकली,चार चाकी गाडी आल्या. तर काही लोक गाडी वेळेवर नाही म्हणून अन्य वाहनाने प्रवासासाठी जाऊ लागले.त्यामुळे एसटीचे महत्त्व कमी झाले.अजूनही कधी एसटीने प्रवास केला तर जुने दिवस आठवतात. आणि जुन्या आठवणीत एसटीचे जुने किस्से,जुन्या आठवणीत मन रमून जाते.

रामदास तळपे 



गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस