शरदराव जठार एक समाजसेवक



 शरद जठार एक समाजसेवक 

समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला पाठिंबा देऊन त्याच्या मागे उभे राहून त्याला सतत प्रेरणा देणे हे प्रत्येकाचे काम आहे.यामुळे निश्चितच चांगले कार्यकर्ते घडुन भागाचा विकास,लोकांचे प्रश्न सोडवण्यास मदत होत असते.असेच आपल्या भागात श्री शरद जठार यांचे सामाजिक काम पाहून प्रत्येकाला एक नविन उर्जा प्राप्त होत असते.आज २९ श्री.शरद जठार यांचा वाढदिवस हेच औचित्य साधून त्यांच्याविषयी त्यांच्या कर्तुत्वाची माहीती वाचकांपर्यंत पोहचवावी या उद्देशाने दोन शब्द त्यांच्याविषयी लिहितो.

श्री.शरद जठार यांचा तसा माझा फारसा परिचय नव्हता..फक्त ते धुओली गावचे उपसरपंच आहेत.व भोसरी येथे राहतात.एवढेच माहीती होते.एकदा आँफिसमध्ये काम करत असताना एक शिक्षक काही कामानिमित्त आँफिसमध्ये आले व बोलता बोलता त्यांनी 

साहेब तुम्ही जुन्नर तालुक्यातील  का? असे विचारले.

मी म्हणालो मी खेड तालुक्यातील मंदोशी गावचा आहे.वाडा गावच्या  पश्चिम भागात माझे गाव आहे.

ते म्हणाले धुओली गाव पण तिकडे आहे का? 

मी -  हो.

तर ते म्हणाले तुम्हाला ते शरद जठार माहीत असतील ? 

मी - हो.माहित आहेत.

ते - अहो त्यांच्यामुळे आमचा पेशंट वाचला आमच्या पेशंटला यशवंतराव चव्हाण मेमोरियल हाँस्पिटलला (वाय.सी.एम.) अँडमीट करून घेत नव्हते.सर्व प्रयत्न करून पाहिले पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.कुणीतरी श्री. शरद जठार यांचा फोन नंबर दिला.शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांना फोन केला.आणि पुढच्या दहाच मिनीटात आमचा पेशंट अँडमिट करून घेतला. 

पुढे तो सुखरूप बरा झाला.इथेच आमची चर्चा संपली.पुढे एकदा काहीतरी कामानिमित्त शरद जठार यांना फोन केला होता.त्यांनी मला त्यांच्या नायफड पंचायत समिती गण या ग्रूपमध्ये सामाविष्ट केले.व पुढे त्या ग्रूपच्या माध्यमातून श्री शरद यांचे सामाजीक कामाचे एकेक पैलू उलगडत गेले.व त्यांच्या विषयी आदर वाटू लागला.

ते करीत असलेले काम पश्चिम भागाच्या दृष्टीने अतिशय मोलाचे आहे.सामाजिक काम करत असताना अनेकांचे स्वार्थ त्यात आडवे येतात.त्यामुळे सामाजिक कामाला गती मिळत नाही.त्यासाठी सर्व लोकांनी सामाजीक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सशर्त पाठिंबा दिला पाहिजे व प्रसंगी त्यासाठी रस्त्यावर उतरायची तयारीही ठेवली पाहिजे.

मझ्या मते पश्चिम भागात जर सामाजिक कार्यकर्त्यांची फौज असेल तर सर्व शासकिय योजना वैयक्तिक लाभाच्या योजना व इतर कामे चांगल्या प्रकारे राबल्या जातील. श्री शरद जठार यांच्कडे ग्रामपंचायतचे नेतृत्व आहे.

मानव अधिकार तालुका अध्यक्ष पद आहे जिल्हास्तरावर अनेक राजकिय व सामाजीक प्रमुख व्यक्तीबरोबर चांगले सबंध आहेत व या माध्यमातून ते चांगले काम करत आहेत ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. 

आपल्या भागातील कोरोनाचा संसर्ग असलेल्या व्यक्तीला रक्तातील प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याचे कामसुद्धा त्यांनी केले आहे. तर रात्री आपल्या भागातील मयत झालेल्या कोरोणा पेशंटला रात्री दोन वाजता स्मशानभुमीत P.P.P किट घालूनअग्नीडाग दिला आहे. 

आपआपसातील वादविवाद, मतभेद विसरून चांगले काम करणा-या व्यक्तीला नक्कीच पाठिंबा दिला पाहिजे.पश्चिम भागाला आज व्यसनमुक्ती केंद्राची गरज आहे.छोटे व्यवसाय मार्गदर्शन केंद्र व  मेळावे.व्यसनाधिन लोकांसाठी प्रबोधनकार यांची व्याख्याने आयोजीत करणे.

सर्व भागातील सरंपंच,ग्रामसेवक,कृषिसेवक,तलाठी,आरोग्य सेविका,शिक्षक प्रतिनीधी ,पशुधन पर्यवेक्षक यांचा मेळावा आयोजीत करून सर्वसामान्यां पर्यत सरकारी योजना कशा राबवता येतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.आजही पैशाने न होणारी कामे  

शरद जठार यांच्या शब्दाने होतात.हे ही महत्त्वाचे आहे.त्यांनी केलेल्या कामाची माहीती समाजातील प्रत्येक माणसापर्यंत पोहचली पाहीजे व त्या कामाची दखल सर्वांनी घ्यावी यासाठी मी त्यांच्या काही सहका-यांकडून त्यांच्या विषयी माहीती मिळवली.त्या माहीतीवर थोडासा प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो.

*केलेली सुरवात*

भोसरीसारख्या ठिकाणी शिक्षण घेत असताना सकाळी काॅलेज  व दुपार नंतर  STD बुथवर 500 रूपये महिना पगारावर काम केले.

नंतर प्रायव्हेट कंपनीत करत असताना भरपुर असा मित्र परिवार जमवला.व त्यांचेशी चांगले सबंध ठेवले.नंतर माॅ साहेब ग्रुपची स्थापना केली व तिथुन पुढे सामाजिक कार्याची आवड निर्माण होत गेली. 

ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असताना भोसरी सारख्या ठिकाणी असलेले विविध भागातील मा.नगरसेवक, मा.आमदार मा.लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी  दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. आपल्याला मिळत असलेला मित्र परिवार व लोक प्रतिनिधी यांच्या सहकार्याच्या जोरावर धुओली गावात व पश्चिम भागात काम करण्यास सुरुवात केली. 

पश्चिम भागातील तरुण सहकारी, मा.पंचायत समिती सदस्य, मा.जिल्हा परिषद सदस्य, मा.आमदार या लोक प्रतिनिधींच्या सहकार्याच्या जोरावर पश्चिम भागात चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मिळत आहे.  

*उपसरपंच म्हणून बिनविरोध*  *निवडून आल्यानंतर पहिला* *ध्वजारोहण  गावातील जेष्ठ* *नागरिकाच्या हस्ते केला.*

*गावातील असणारा वादविवाद* *मिटवले.*.

*गावातील विविध चांगल्या कामांची प्रशासनाने दखल घेत, गावाला जिल्हा परिषद गटात *संत गाडगे बाबा*ग्रामस्वच्छता पुरस्कार प्रथम क्रमांक मिळाला*गावात विविध विकास कामे मार्गी लावली.*

*वाढदिवसाचा खर्च टाळून गावातील*गरजू महिलांना साड्या* *वाटप केल्या.*

*गावातील एका गरीब कुटुंबाला* *दरवर्षी दिवाळीला मिठाई व कपडे करण्यात येतात.*  

*नायफड पंचायत समिती गण* *ग्रुपच्या माध्यमातून मित्र* *परिवाराच्या*सहकार्याने कोरोना* *काळात रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले*

मा.आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस् च्या माध्यमातून पश्चिम* भागात जेष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट  वाटप करण्यात आले

नायफड पंचायत समिती गण ग्रुपच्या*माध्यमातून अपघात ग्रस्त तरुण राजु लांघी या तरुणाला पैसे व धान्य वाटप करण्यास मदत..

*पुणे या ठिकाणी असलेले* *यशवंतराव*चव्हाण हाॅस्पिटल* *(YCM) या ठिकाणी आपल्या    पश्चिम*भागातील नागरिकांचा* *कुठल्या ना कुठल्या कामासाठी* *संपर्क येतो तेव्हा त्यांना अ‍ॅडमिट* *करण्यापासून तर ते डब्याची व्यवस्था*करणे, वेळ प्रसंगी घरून* *डब्बा देणे, त्यांच बिल कमी करणे गाडीची व्यवस्था करून देणे* *काही नागरिकांचा वेळ व पैशाची* *बचत व्हावी, या वेळी त्या* *नागरिकांच्या नातेवाईक यांचे जन्म व*मृत्यू दाखले अगदी घर* *पोहच करणे, अगदी  अ‍ॅडमिट* *असलेल्या पेशंटला वेळो वेळी फोन*करून चौकशी करणे, त्यांना* *धीर देणे. रात्री अपरात्री फोन*आला तर त्या ठिकाणी जाऊन*मदत करणे, कोरोना* *काळात मयत झालेल्या आपल्या* *भागातील पाॅझिटीव पेशंटच्या* *नातेवाईक यांना रात्री दोन- तीन* *वाजता स्वता: त्या ठिकाणी* *उपस्थित*राहुन अंत्यविधी* *करण्यास*मदत करणे.आगदी* *कोरोना काळात वैयक्तिक लक्ष* *घालुन गावातील लोकांना अर्सेनिक*गोळ्यांचे वाटप केले*  *कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या* *महापुरात पुरग्रस्त भागाला खेड* *तालुका पश्चिम भागातुन 500 किलो*तांदुळ जमा करून* *पुरगरस्तांना  पश्चिम भागाच्या वतीने मदत पोहचवली* 

धुवोली/ वांजाळे संयुक्त ग्रामपंचायत ग्रामस्तरीय कोरोना समितीच्या वतीने  कोरोना विषयी नियोजन करण्यात येऊन  गावात सॅनिटाईजर, मास्क चे वाटप करण्यात आले. तसेच भविष्यात गावात कोणी रुग्ण पाॅझिटीव आला, तर त्याच्यासाठी ग्रामपंचायतचा असलेला हाॅल रिकामा करुन त्या ठिकाणी विलगीकरण (Corantine) करण्याची व्यवस्था करण्यात आली. यामुळे गावात  लोक सुरक्षित राहातील  आणि प्रशासनाचा ताण देखील कमी होईल. असेच नियोजन ग्रामीण भागातील लोक प्रतिनिधींनी करणे आवश्यक आहे..  जेणेकरून प्रशासनाचा ताण नक्कीच कमी होईल. हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य म्हणावा लागेल.

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्यांच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मानवाधिकार मीडीया फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

शरद जठार करत असलेले हे सामाजिक काम खरोखरच उल्लेखनीय आहे.हे नाकारून चालनार नाही.त्यांच्या या सामाजीक कामाची सर्वांनी दखल घेऊन त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे.


 


उतावळा नवरा



 उतावळा नवरा 

हा किस्सा मी खेड पंचायत  समिती येथे कार्यरत असतानाचा आहे. त्यावेळी माझा एक मित्र  प्रत्येक सुट्टी च्या दिवशी माझी टु व्हीलर घेऊन त्याच्या मैत्रिणीला घेऊन फिरायला जायचा. मला तिच्या बाबतीत फारशी माहिती नव्हती.आणि तशी काही गरज सुध्दा नव्हती. 

एक दिवस सकाळीच मला माझा मुंबईला नोकरी करत असलेला एक मित्र आँफिसमध्ये भेटायला आला.रामदास एक आनंदाची बातमी आहे. पहिल्यांदा ती तुलाच सांगायची आहे म्हणून सकाळी सकाळी तुझ्याकडे आलोय.

बोल काय आनंदाची बातमी आहे? मी म्हणालो.

काल मी अमुक गावाला लग्नासाठी मुलगी पहायला गेलो होतो. एक नंबर… जबरदस्तच आहे पोरगी. डोळ्यापुढुन तिचा चेहरा जाता जात नाही. येत्या मंगळवारी ठरवूनच टाकायचे आहे.असे म्हणत पाकिटातून त्याने आयकार्ड साईज रंगीत फोटो मला पहायला दिला.

आनंदाची गोष्ट आहे फक्त गडबड करु नकोस. जरा दमाने घे..मी म्हणालो. 

गडबड करु नकोस काय म्हणतोस? उलट मी तर म्हणतोय येत्या मंगळवारी साखरपुडा उरकुनच टाकायचा.मित्र म्हणाला.

केव्हा एकदा लग्न होतय असे मला झाले आहे. तु सुट्टी काढ आपण सर्व नियोजन या आठवड्यात करून टाकू. 

त्याच गावचा माझा एक मित्र आहे त्याच्याकडून काही माहिती मिळाते का ते पाहू.मी त्याला म्हणालो.

काही माहिती घ्यायची गरज नाही आमच्या जुन्या पाहुण्यां पैकीच आहे गेलं वर्ष दिड वर्ष तिचे वडील लग्नासाठी माझ्या वडिलांच्या मागे लागले आहेत. मित्र म्हणाला.

पाच दहा मिनिटे अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मुलीचा फोटो माझ्या हतातच होता.आणि तेवढ्यात माझा तो दुसरा मित्र आला जो माझी टु व्हिलर न्यायचा.

मी त्याला माझ्या टेबलाजवळ बोलवून घेतले आणि फोटो त्याच्या समोर धरून विचारले.या मुलीला ओळखतोस? 

त्याने खिसे चापचायला सुरुवात केली.आणि मला म्हणाला. कधी खिशातून पडला कोणास ठाऊक ? दे की रामदास प्लिज..

मला घटनेचा पुर्ण अंदाज आला होता मी त्याला गप्प बसवायचा प्रयत्न करत होतो आणि तो पुढेच बोलत होता.

मी त्याला दरडाऊन म्हणालो उगाच काहीतरी बोलू नकोस हा फोटो तुझ्या कडील नाही आणि या मुलीचा आणि तुझा काही संबंध नाही.

अरे, काल खूप मोठा प्रॉब्लेम झाला. मी तिची वाट पहात थांबलो होतो पण ती आलीच नाही खुप उशीराने तिच्या चुलत बहीणीने येऊन मला सांगितले की तिला पहायला तमुक गावचे पाहुणे आले आहेत. सगळा पचका झाला ना राव माझा. नाही तर काल आम्ही पुर्ण नियोजन केले होते.( हे सांगत सांगत त्याने पाकीटातून त्या मुलीचा फोटो काढला) माझा तर माझ्याकडे आहे मग हा कुठला?

 हा..हा...आठवले गेल्या महिन्यात माझ्याकडील फोटो हरवला होता तो तुला सापडला असेल..हो.ना.? अशीच काही मिनिटे चर्चा चालली.

तिच्या सोबत लग्न करायला उत्सुक असलेला मित्र काय समजायचे ते समजून गेला. आणी काही न बोलता तिथून निघून गेला.

यालाच म्हणतात " उतावळा नवरा.आणि गुडघ्याला बाशिंग...

 

गावाकडच्या यात्रा

महाराष्ट्रात अनेक गावागावात ग्रामदेवतांच्या यात्रा भरतात.माघ महिन्यापासुन ख-या अर्धाने यात्रेचा हंगाम सूरू होतो.यात्रेचा हंगाम म्हणजे संपुर्ण भागात एक उत्साहवर्धक वातावरण असते.

आमच्याकडे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडयापासुन यात्रा सुरू होतात. यात्रेच्या मिटींगची दवंडी कधी देतात याकडे आमचे लक्ष असायचे.मग एखाद्या वारी मांग प्रत्येक गल्ली बोळात किंवा चौकात किंवा चावडीच्या दारात दवंडी द्यायचा.दवंडी संपताच डफडे वाजवायचा.त्याचे शेवटचे हो...हो...हो...व त्यानंतरचा डफड्याचा आवाज ऐकूण अंगावर रोमांच उभा रहायचा.यात्रेची पुर्वतयारी काय वर्णावी.

गावागावात मंदीराचे पटांगण.गावचा पार,चावडी येथे गावची बैठक भरायची.अनेक वादविवाद झडायचे.एका बैठकीत निर्णय होत नसे.पुढील आठवड्यात पुन्हा बैठक बोलवली जाई.यात्रेसाठी करमणुकीचा कोणता कार्यक्रम आणायचा यावर खलबतं सुरू होत.नामांकित तमाशा,किंवा प्रसादिक भारूडे यांच्या बिदागीचा आकडा किती आहे यावर चर्चा केली जायची.त्यानुसार आखणी केली जाई.

पुर्वी तमाशा व प्रसादिक भारूडे ही खाली जमीनीवर केली जात.या तमाशा व भारूडाचे फक्त सात-आठ कलाकार असत.त्यांच्याकडे एक मोठी पायपेटी,ढोलकी व कपडेपटाची एक मोठी ट्रंक (पत्याची पेटी) एवढेच माफक साहित्य असे.रात्री राजा झालेला नटाच्या डोक्यावर पायपेटी किंवा कपडेपटाची ट्रंक असे.भारूडात व तमाशात  स्री पात्र करनारा पुरूष नट असे त्याला नाच्या म्हणत.

नाच्याचे काम करणारा नट केस कापत नसत.स्री प्रमाणे केस राखत असत.माझ्या माहितीप्रमाणे भागात अनेक नाचे होऊन गेले त्यापैकी कै.मोतीराम भाऊ मोहन,कै संपत (चंपा) जढर, मंदोशी श्री.सखाराम उगले कारकुडी श्री.गणपत सातपुते घोटवडी श्री.शंकर माळी नायफड श्री.निधन,भिवेगाव पालखेवाडी श्री गबाजी धामणगाव व कै.विठू नांगरे मोरोशी यांचे सर्वात मोठे योगदान लाभले.त्यांच्या कार्याचा ठसा अजुनही अनेकांच्या मनात घर करून आहे.

भारूडात प्रथम उमवरा,सावळ्या,गणपती व सरस्वती ही पात्रे रंगपटावर येत नंतर मुख्य वग सुरू होई.तर तमाशात गण,गवळन,सवालजबाब,बतावनी व नंतर वगनाट्य असायचे.

नंतर जमीनीवरील खेळ स्टेजवर होऊ लागले.भारूड व तमाशाच्या  साहित्याची टेंपो व ट्रकमधुन वाहतुक होऊ लागली.स्टेज,पडदे,लायटिंग आली.तमाशात व भारूडात नाच्यांची सद्दी संपुन स्रीया काम करू लागल्या.पुर्भावीच्रूया भारुडांचा ढाचा बदलला.मारूड म्हणजे मिनि तमाशाच झाला.तमाशात रंगबाजी हा नविन प्रकार आला.तमाशा आता आर्केस्ट्रा झाला आहे.कालाप्रमाणे प्रचंड  बदल झाले.

यात्रेच्या बैठकित नंतर घरपट वर्गण्या ठरवल्या जाई.देणग्या गोळा करत.प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी दिली जाई.भारूड किंवा तमाशा ठरवनारे,देवाचा बाजार आणनारे, हारतुरे आणनारे, मंदिर रंगकाम करून घेणारे बैलगाडयांचे टोकन काढणारे लाईट लाउड स्पिकर व्यावस्था करणे यात्रेचे हँडबील छापणे व ते सर्वांपर्यंत वाटणे इत्यादी कामे असत.बाकी सर्व कामे यात्रा कमिटी करत असे.

गावची यात्रा जसजशी जवळ येई तसतसे लोक यात्रेचा तयारीला  लागत.प्रत्येक घराच्या भिंती आतुन बाहेरून शेणामातीने व राखेने सारवल्या जात.आंगणाला मुरूम घालून अंगण शेणाने सारवुन मस्त बनवले जाई.अंगणाला छान पैकी मांडव घातला जाई.

दुपारच्या वेळेस आंगणात बसुन छानपैकी गप्पा मारणे.किंवा पत्ते खेळणे असा आनंद नाही.मध्येच दुपारच्या वेळेस  सायकल वर पेटारे घेऊन एखादा गारेगारवाला येई.बर्फाची लाल,गुलाबी,हिरवी,पिवळी गारेगार घेण्यासाठी बायका पोरांची झुम्मड होई.दुपारच्या रणरणत्या उन्हात अंगणात बसुन बर्फाची गारेगार खाण्यात फार मोठे समाधान असे.व वेगळाच आनंद होई.

घरादाराची साफसफाई झाल्यावर आठवडे बाजारातून बायकापोरांना,बाप्या मानसांना नवीन कपडे खरेदी केली जात.काहीजण लवकर कपडे शिवन्यासाठी टेलरकडे दररोज चकरा मारत.टेलर दररोज त्यांना आज नाही बाळा सकाळ ये हे पालपुद त्याला म्हणुन दाखवत असे.व बिचारा हिरमुसून घरी जाई.

ज्यावेळी टेलरकडुन तुझे कपडे शिवून तयार आहेत व हे घेऊन टाक.असे म्हणे त्यावर याचा आनंद गगणात मावेनासा होत असे.कपडे ताब्यात घेतल्यावर कधी घरी जाऊ व हे कपडे सगळ्यांना दाखवु असे त्याला होत असे.व आपोआप त्याचे पाय वेगाने घराच्या दिशेने चालू लागत.

यात्रा जवळ आल्यावर प्रत्येक घरातील माणुस आपापल्या दुरच्या नातेवाईकांना आमंत्रण देण्यासाठी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना यात्रेचे आमंत्रण देत असे.मी सुद्धा मित्रांबरोबर  डोंगरद-यातुन,आडवाटेने,पायवाटेने जाऊन नातेवाईकांच्या गावी जाऊन यात्रेचे आमंत्रण दिले आहे.नातेवाईक सुद्धा यात्रेला  यात्रेच्या एक दिवस आधीच येत असत.गावचे मुंबई पुण्याकडील लोकही सर्व कुटुंबासह यात्रेच्या आदल्या दिवशी हजर असत.

यात्रेच्या दिवशी भल्या पहाटे उठून लोक अंघोळी पांघोळी करून तयार असत.सकाळी सकाळीच मंदीराकडे स्पिकर लावलेला असे.व त्यावर प्रल्हाद शिंदे किंवा इतर मराठी लोकगीतांचा आवाज कानी पडत असे.एकुणच यात्रेचा उत्साह काही औरच असे.

सकाळी देवास मांडव डहाळ्याचा कार्यक्म आटोपुन लोक हारतुरे आणन्यासाठी झुंडीच्या झुंडीने जात.हारतु-यांची मोठी मिरवणूक काढली जाई.गुलालाची उधळण होई.ढोल ताशा सनई व चौघड्याच्या वाद्यात हारतु-यांची मिरवनुक मंदिराच्या दिशेने रवाना होई.मंदीरात आल्यावर देवास कपडे चढवले जात.हार घातले जात.नारळ फोडून प्रसाद वाटला जाई.

तो पर्यत गावात अनेक दुकाने थाटलेली असत.खेळण्यांची दुकाने, लाडु,रेवड्या,शेव व भेळ यांची दुकाने,कलिंगड व कलिंगडाच्या खापा,द्राक्षे यांची दुकाने.थंड सरबत, गारीगार, कुल्फी स्रीयांची आभुषणे बांगड्या, पोत, माळा, पावडर, नेलपाँलीश इत्यादी अनेक दुकाने लावलेली असत.

काही मोठ्या गावांमध्ये बैलगाडयांच्या शर्यती असत.बैलगाडा घाटाकडे अनेक बैलगाडे आलेले असत.प्रचंड गर्दी झालेली असे.उंच मचानावर बसुन टोकन पुकारले जात.ठिकठिकाणी स्पिकरची कर्णे लावलेली असत.घाटाच्या दुतर्फा लोक  गर्दी करून बसलेले असत.काही लोक उंचावर काही झाडावर बसुन घाटातील बैलगाडयांच्या शर्यती पहात असत.संध्याकाळी इनाम वाटप केला जाई.

इकडे प्रत्येक पाहुण्यारावळ्याला जेवायला घातले जाई.संध्याकाळी ४ ते ५ या वेळात मंदिराकडे दंडवटे घेण्याचा कार्यक्रम असे.सर्व अबालवृद्ध,बायका पोरे सजुन धजुन मंदिराकडे दर्शनासाठी जात असत.अनेकांचे नवस फेडले जात.गुळ खोबरे.पेढे व बर्फी वाटली जाई.

संध्याकाळी सर्व पाहुणे रावळे यांना आग्रह करून जेवायला वाढले जाई.संध्याकाळी भारूड किंवा तमाशाचा कार्यक्रम असे.लोक सर्वात पुढे बसुन कार्यक्रम पहाता यावा म्हणुन अगोदरच जाऊन जागा धरत.स्टेजपुढे प्रेक्षकांची तोबा गर्दी व्हायची.रात्री पालखीचा कार्यक्रम झाल्याशिवाय भारूड किंवा तमाशा होत नसे.

काही ठिकाणी पालखी रात्री १२ वाजता निघायची.तो पर्यत लोक ताटकळुन जायचे.लहान मुले झोपी जायची.पालखीचा कार्यक्रम निघाल्या वर ढोल ताशांचा  सनई चौघड्यांच्या निनादात पालखी चालायची अनेक लोक पालखीच्या मागे पुढे चालायचे.अनेकांच्या अंगात वारे घुमायचे.ते पालखीपुढे दोन्ही हात हातात घालून विशिष्ट पद्धतीने नाचत राह्यचे.पालखीच्या पुढे फटाके व पाऊस पेटवले जायचे. पालखीचा कार्यक्रम संपल्यानंतर तमाशा किंवा भारूडाचा कार्यक्रम व्हायचा.

दुसऱ्या दिवशी सकाळीच काही लोक अखाड्याचे जेवण बनवण्यासाठी जायचे.त्यांनी बनवलेल्या आमटी भात व शाक भाजीचा दरवळ व लज्जत कायम मनात घर करून आहे.

सकाळी ९ वाजता हजेरीचा कार्यक्रम असायचा स्रीया  व बापे घरचे आवरून पोरांबाळासह हजेरीचा कार्यक्रम पहायचे.तो पर्यंत उन लागायला सुरूवात व्हायची.लोक मग बर्फाची गारीगार खाऊन जीव थंड करू पहायचे.

हजेरीचा कार्यक्रम संपल्यावर बायकांमाणसे पुहुण्या आलेल्या बायकांपोरींना बांगड्या भरायच्या.शेवरेवड्या घेऊन द्यायच्या.लहान मुलांना खेळणी घेऊन द्यायच्या.जेवण झाल्यावर यात्रेला आलेली  बायकपोरे आपापल्या गावाला निघत.

त्यानंतर आखाड्याचे जेवण असे.लांबलाबून पहिलवान आलेले असत.कुस्ती शोकींनाची मांदीयाळी जमलेली असे.मोठ्या भातखाचरात,ढेकळामधुन आखाड्याच्या जेवणाच्या पंगती बसत.वर उन्हाचा कहार व खाली तापलेली जमीन अशा परिस्थितीत  पानात भात व तिखट आमटीचा आणि शाकभाजीचा खमंग वास आसमंत दरवळून सोडे.प्रचंड भुक लागलेली असे.उन्हाच्या काहीलीने जीव मेटाकुटीला आला असे.

आणि अशातच श्लोक म्हणला जाई.पुंडलीकवरदेव हारीssssssविठ्ठल म्हणे पर्यंत लोकांना दम धरवत नसे.दुसरी वाढी झाल्यावर ७५%लोक तृप्त होत.काही खवय्ये तिसरी वाढी संपवून मगच उठत.

जेवण झाल्यावर लोक अंगणात,झाडाखाली बसुन वामकुक्षी घेत तर काही उगाचच कालच्या तमाशा व भारूडाच्या,पहिलवांनाच्या गप्पा चघळत बसत.आणि अचानक सनई,चौघडा,व डफड्याचा अवाज आल्यावर लोक खडबडून उठत.झोपलेल्या लोकांना जागे केले जाई.तो पर्यंत लोक बक्षीसांच्या वस्तू घेऊन नाचत गुलाल उधळीत आखाड्याच्या ठिकाणी हजर होत.

पंच कमिटी स्थनापन्न झाल्यावर लहान मुलांच्या कुस्या लावल्या जात.हळुच आखाड्यात रेवड्या उधळल्या जात.नंतर ५रूपया पासून इनाम सुरू होई.हळूहळू अखाड्याला रंगत येऊ लागे.नामांकित कुस्त्यांचे डाव पहाताना लोक तल्लीन होत.शेवटच्या कुस्तीवर सर्वात जास्त इनाम असे.शेवटची कुस्ती ही भागाची शान असलेल्या नामांकित पहिलवानावर लावली जायची.त्या नंतर हरहर महादेव चा गजर व्हायचा. व अखाडा संपायचा.

अशा प्रकारे प्रत्येक गावचा हा दोन दिवसाचा कार्यक्रम संपल्यावर गावात भयाण शांतता पसरायची.यात्रेचे दोन दिवस लोक पुन्हा पुन्हा आठवायचे.व पुढच्या यात्रेची वाट पाहीली जायची.

मित्रांनो आजही यात्रा भरवल्या जातात.परंतू यात पुर्वीची मजा नाही.नातेवाइकांविषयी आपुलकी नाही.जुन्या स्मृती विषयी ओढ नाही.लोकांना वेळ नाही.काहीजण तर यात्रेला सुट्टी नाही म्हणून येत नाहीत.आज पैसा आहे सर्व काही पैशाने विकत घेता येते.पुर्वी पैसे नसायचे.साधी बर्फाची गारीगार घेण्याची काहींची ऐपत नसायची.परंतू समाधान व आनंद हा प्रत्येकात कमालीचा होता.नातेवाईक,मित्र,मजा हिच त्यांची श्रीमती होती.


कँसेट पुराण

कँसेट पुराण

कँसेट्स यायच्या आधी लोखंडी पत्र्याच्या तबकड्या होत्या. लग्न,सत्यनारायण पुजा.यात्रा इत्यादी कार्यक्रम असतील तर सकाळ पासून स्पिकरवर गाणी वाजायची. कौलारू घराच्या आड्यावर दोन दिशांना दोन कर्ण (भोंगी) ठेवली जात.त्यावर अनेक गाणी वाजायची.हे स्पीकर पुर्वी श्री सिताराम मु-हे (टोकावडे )यांचेकडे होता.त्यानंतर श्री.सुदाम बारवेकर, श्री.चीमाजी गोडे,श्री.मारूती तळपे (मंदोशी). श्री.पांडुरंग लांघी (शिरगाव) अशा अनेक लोकांनी लाउडस्पीकरचा व्यवसाय केला.

९० च्या दशकाचा काळ म्हणजे कॅसेटयुगाचा सुवर्णकाळ होता.विश्वात्मा, त्रिदेव, मोहरा, साजन, बाजीगर, दिवाना,दिल,आशिकी,सडक,बेटा,बोलराधा बोल,राजा हिंदुस्तानी,पत्थर के फुल,रंग. अशा अनेक कॅसेट्स केशकर्तनालय,ऑटोरिक्षा, उसाचे गु-हाळ, जीप.लग्नकार्य,पुजा,अशा अनेक ठिकाणी  कानाकोपऱ्यातुन वाजत असत. रिक्षावाले तर म्युजिक सिस्टिम आहे ह्या कारणास्तव जास्त भाडे घेई.

गुलशनकुमारने टी सिरीजच्या माध्यमातून आणलेल्या सोनू निगम, अनुराधा पौडवालच्या आवाजातल्या अनेक भक्तीगीतांच्या कॅसेट्स तडाखेबंद विकल्या जाई.

अल्ताफ राजाच्या 'तुम तो ठहरे परदेसी',ले गयी दिल मेरा मनचली.खलीवली खलीवली.अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का अशी अनेक गैरफिल्मी गाणी हिट झाली.

फक्त फिल्मी गाणीच नव्हे तर जॉनी लिव्हर, जॉनी रावत ह्यांच्या मिमिक्री, विनोदांच्या कॅसेट्स पण लोकप्रिय होत्या. 

कोळीगीतांच्या गाण्यांची एक वेगळी क्रेझ होती. वेसावची पारू,38 कोळीगीते किंवा टॉप टेन कोळीगीताच्या कॅसेट्स हातोहात विकल्या जाई.

आनंद शिंदे यांच्या कँसेट तर खुपच फेमस होत्या.जवा नवीन पोपट हा.आंटीची घंटी.जावयाने कमाल केली तर दादा कोंडके यांच्या चित्रपटातील गाण्यांनी अक्षरशा ग्रामीण भागाला मोहीनी घातली होती.त्याच प्रमाणे मा.दत्ता महाडिक यांच्या तमाशाच्या कँसेट लोक घोळका करून ऐकायचे.व हास्यकल्लोळात लोक बुडून जायचे.गवळ्याची रंभा,गुरूची विद्या,असे घराणे नष्ट करा.तर काळू बाळू यांचा जहरी प्याला व दादू इंदुरीकर यांचे गाढवाचे लग्न लोक पुन्हा पुन्हा ऐकायचे.दत्ता महाडिक यांचे तरी लंगड कसं उडून मारतय तंगडं,बाप्या का बाई कळना काही.कुनी कुनाला नाही बोलायचं हे असच चालायचं ही गाणी ऐकायला मजा यायची.

छगन चौघुलेंच्या आवाजातल्या चांगुणाची कथा, सती अनुसयाची कथा, चिलया बाळाची कथा.... अशा अनेक आख्यायिकांचा स्वतःचा एक श्रोतावर्ग होता. 

स्वातंत्र्यदिन जवळ आला की महेंद्र कपुरच्या देशभक्तीपर गीतांना मागणी येई. गणेशोत्सव जवळ आला की, मंगेशकर भगिनींच्या अष्टविनायक कॅसेट्सची विचारणा सुरू होई. 

आषाढी-कार्तिकीला प्रल्हाद शिंदेंच्या आवाजातील 'चल ग सखे पंढरीला' कॅसेट घ्यायला एखादा तरी नक्की येई. शिवजयंतीला "सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला, शाहीर देशमुख गातो पोवाड्याला' हे गल्लीच्या मधोमध असलेल्या कॅसेटप्लेअरवर ऐकताना  महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्या घडल्या असतील.

'निसर्गराजा', मेहंदीच्या पानावर मधली मराठी गायकांची गाणी म्हणजे एक अनमोल ठेवा वाटायचा. सुलभा देशपांडे, आश्विनी भावे, उषा नाडकर्णी ह्यांच्या आवाजातल्या 'छान छान गोष्टी' पण धमाल.

सुरेश वाडकरांचं 'ओंकार स्वरूपा', अजित कडकडेंच दत्ताची पालखी, रवींद्र साठेंच्या आवाजातील मनाचे श्लोक, अनुप जलोटांचं 'ऐसी लागी लगन', बाबासाहेब सातारकर यांची किर्तने अशा अनेक कॅसेटसने तो काळ अक्षरशः गाजवला होता.

आपल्या आवडत्या निवडक गाण्यांची कॅसेट तयार करून घेणे हा एक मस्त प्रकार होता. 

कॅसेटच्या क्षमतेनुसार त्यात किती गाणी बसतील आणि कोणती गाणी भरायची ह्याचा हिशोब करण्यात एक वेगळी मजा होती. प्रत्येकाची आवडनिवड जपावी लागे.

एखाद्याच आवडत्या गाण्यासाठी 50 रुपये मोजण्यापेक्षा हा स्वस्त पर्याय तेव्हा होता. इंडिपॉपचे कित्येक अल्बम असे एकाच कॅसेटमध्ये भरले होते.

कधी कधी स्वतःच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करण्याची हौस देखिल भागवली जाई. त्यात पार्श्वभूमीला कोणीतरी मध्येच बोलण्याचा आवाज जर आला तर एडिट करायची सोय नव्हती. वॉकमन, सीडी प्लेअर, पेन ड्राइव्ह, स्मार्टफोन असा प्रवास करताना त्यांची उपयुक्तता संपून गेली होती. 

आतमधील टेप बाहेर काढून पेनने गोल फिरवत परत जागेवर न्यायचं अस लहान मुलांच खेळण एवढंच त्याच मोल उरल होत.

शेवटची कॅसेट 'साथीया'ची घेतल्याचं आठवत. पण आता कॅसेट नावाचा साथीया कायमचा साथ सोडुन गेलाय एक युगांत करून..!!


दसरा (विजयादशमी)

दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा..असे म्हटले जायचे...ते तंतोतंत खरे होते.पण ते कधी? तेव्हा.आता सगळ्याच  सणांचे महत्त्व कमी झाले आहे. पुर्वी प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व होते.प्रत्येक सणाचा बाज वेगळा होता.जो तो सण साजरा करण्याची  सणाची गम्मतच न्यारी.ढंग वेगळा व आनंदही वेगळाच.दसरा हा सणही एक वेगळाच आनंद देऊन जायचा.

पुर्वी वेळेवर पाऊस पडायचा.बैल पोळ्या नंतर पाऊस पडायचा बंद व्हायचा.बैलपोळ्या नंतर ठराविक चार- पाच शेतक-यांची हळवी जात असलेली पिके काढायला यायची.आणि अशातच यायचा दसरा सण..ग्रामीण भागात दस-याचे महत्त्व अनन्यसाधारण असते.दस-याला हमखास पुण्या- मुंबईवरून चाकरमानी आई वडीलांना गावातील लोकांना व नातेवाईकांना भेटायला हमखास येत असत.सकाळ पासुन नातेवाईकांची गर्दी गावात भेटण्यासाठी होत असे.प्रत्येक गावात हेच चित्र असे. सकाळपासुन प्रत्येक सासुरवाशीन आई वडील,नातेवाईक यांना भेटण्यासाठी परत त्याच दिवशी फिरून यायच्या बोलीवर निघायच्या तयारीला लागायच्या. माहेरी जाताना एखाद्या फडक्यात दोन-चार भाकरीचे पीठ.गुळाचा खडा नेण्याची पध्दत होती.आता सारख्या तेव्हा गाड्या-घोड्या नव्हत्या.सगळीकडे पायी प्रवास असे.

आपली लेक व नातवंडे येणार म्हणुन सासुरवाशिनीची आई सकाळ पासून स्वयंपाकाला लागे.डांगरभोपळ्याचे भोकाचे वडे.व गुळवणी,काकडीची पीसोळी,रव्याचा गोड शीरा किंवा गुळ व शेंगदाण्याच्या पीठाच्या पोळ्या हा मेणू असे.लवकरच मुलगी माहेराला येई.सर्वांना भेटून चार सुख-दुखाच्या गोष्टी सांगीतल्या जात दिवस मावळतीकडे झुकल्यावर आपल्याला पुन्हा सासरी जायचे आहे याची जाणिव होई.चार घास गोडाधोडाचे खाल्यावर माहेवाशीन ससरच्या दिशेने निघे.तिच्या डोक्यावर पीठ व गुळ असलेले गाठोडे असे.त्याच्या जोडीला एखादा डांगरभोपळा,हातभर लांबीची काकडी असे.घरी येऊन परत तीला स्वयपाक करावा लागे.

गावात सकाळची नित्याची कामे पुर्ण झाल्यावर लहान मुले झेंडूची फुले आणुन त्याचे तोरण घराला बांधले जाई.उर्वरीत माळा देवासाठी असत. पुरूष मंडळी घरातील सर्व हत्यारे व औजारे नदीवर किंवा ओढ्यावर घेऊन जात.या सर्व वस्तू चांगल्या घासुन. पुसून पाण्यात  स्वच्छ धुतल्या जात.मोठ्या मानसांबरोबर लहान मुले सुद्धा जात.व पाण्यात मस्तपैकी पोहत राहत.सर्व हत्यारे घरी आणुन एका कोप-यात पोत्यावर ठेवली जात.प्रत्येक वस्तूला हळद,कुंकू लावुन फुले वाहीली जात.व जमेल तशी पुजा करत.जोडीला लहान मुलांची पाठ्यपुस्तके सुद्धा असत.

दुपारनंतर सर्व गावकरी एकत्र जमत.शिलंगनाचे सोने आणन्यासाठीची तयारी सुरू होई एकजणाच्या गळ्यात ढोल असे.तर एक दोघांकडे कोयता असे.गावातील लहानमोठे लोक,पोरे टोरे शिलंगनाचे सोने आणन्यासाठी रानात जात.आपट्याच्या झाडाजवळ जाऊन त्याची पुजा करून लहान फांद्या कोयत्याने छाटल्या जात.प्रत्येकाकडे आपट्याच्या एकदोन छोट्या फांद्या दिल्या जात.ढोल वाजवत सर्वांचा घोळका गावच्या ग्रामदैवताकडे जात असे.सर्व देवांना सोने देऊन दंडवट घालून दर्शन घेऊन मगच गावात जायचे.आणलेल्या आपट्याच्या फांद्या  हत्यारे पुजेसाठी ठेवली असत तेथे ठेवल्या जात.

इकडे प्रत्येकाच्या घरात डांगर भोपळ्याचे भोकाचे वडे किंवा काकडीचे पीसोळे हा मेणू सर्रास असायचाच.त्यांचा खमंग सुवास नाकातोंडात दरवळायचा.डांगर भोपळा कापून त्याच्या फोडी करून तो शिजवला जातो.शिजवल्यावर त्याचा गर त्यातील पाणी काढून तांदळाच्या पिठात गुळ घालून एकत्रित मिस्रण तयार केले जाते.त्याचे छोटे छोटे वडे करून ते तेलात तळले जातात.काकडीची पिसोळी करण्याची पद्धत वेगळी असते.काकडीचा गर काढुन तांदळाच्या पिठात गुळ वेलची व हळद  मिठ घालून मिस्रण तयार केले जाते.हे मिस्रण हळदीच्या पानावर थापून त्यावर दुसरे हळदीचे पान ठेऊन वाफेवर शिजवून तयार केले जाते.हे सर्व पदार्थ फक्त दसरा व दिवाळी या सणांनाच असत.इतर वेळेला नाही.लाडू,करंज्या हे पदार्थ खुप नंतर गावाकडे आले.भोकाचे वडे व पिसोळी यांची चव अजुनही जुन्या लोकांच्या जीभेवर असेल.

संध्याकाळी जेवणे होत.एकमेकांना जेवणाचे आमंत्रण दिले जाई.लोकही प्रेमाने आमंत्रण स्विकारून एकेक जण चार - पाच घरांमध्ये जेवण करत.

सकाळ पासुन गाव नातेवाईक ,आप्तेष्ट व सगेसोयरे,वाड्या वस्त्यातील लोक,बाया बापड्या ,पोरे बाळे यांच्या गर्दीने फुलुन जाई.एकमेकांना भेटायला गर्दी होई.

आमच्याकडे सुद्धा हुरसाळेवाडीचे सर्वलो क भेटण्यासाठी व शिलंगनाचे सोने देण्यासाठी मोहनवाडीत येत.नंतर दोन्ही वस्त्यांतील लोक मंदोशी गावात येत.सोने देऊन झाल्यावर सर्वजण मंदोशी गावच्या थोडे दुर असलेल्या जावळेवाडीला जात.तेव्हा संपुर्ण गाव व सर्व वाड्यावस्त्यातील लोक दस-याच्च्या दिवशी जावळेवाडीला जात असत.शिलंगनाचे सोने देउन झाल्यावर जेवनाचा आग्रह केला जाई.तो पर्यत रात्रीचे आकरा वाजत.नंतर सर्व लोक आपापल्या घरी जात..असा तो काळ होता.एकत्र कुटुंबपध्दती होती.संपुर्ण गाव एकविचाराने रहायचा.एकमेकाबद्दल आदर होता. प्रेमभावना होती. परंतू हळुहळू लोक कामानिमीत्त शहरात गेले.शहरातील संस्कृती गावात आली.एकत्र कुटुंबपद्धती जाऊन विभक्त कुटुंबपद्धती आली. एकमेकांविषयीआदर व प्रेम कमी झाले.लोकांकडे पैसा आला.पुर्वी कधीतरी सणावाराला केले जाणा-या पदार्थापेक्षा चांगले पदार्थ दररोज घरात केले जाऊ लागले. हाँटेल व ढाबा संस्कृती आली.बाहेर खान्याची चटक लागली.लोकांकडे मोटारसायकल,कार आल्या.पुर्वी नातेवाइकांच्या घरी मुक्काम करणारे लोक मोटारसायकल,कार आल्याने उभ्या उभ्या भेटुन थांबायला वेळ नसल्याचे सांगुन चहा घेऊन आल्या पाऊली जाऊ लागले. 

आता तर मोबाईल आले,पुर्वी साधे मोबाइल होते.तेव्हा लोक नांतेवाईकांना,मित्रांना न भेटता मोबाईलवरून फोन करून शुभेच्छा देऊ लागले.त्यानंतर काळ बदलला.लोकाकडे अँड्राव्ह्यूड स्मार्ट फोन आले.आता लोक फक्त शुभेच्छा असलेले मेसेज फाँरवर्ड करायचे काम करू लागले.याबाबत लोकांना विचारले असता अहो! वेळच मिळत नाही..काय करणार...असे उत्तर मिळते....

माझी किमान अपेक्षा आपण जेथे आहात तेथील नातेवाईक,मित्र यांना किमान भेटावे हीच अपेक्षा .🙏

सर्वांना दस-याच्या हर्दिक शुभेच्छा ....



गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस