गावाकडच्या यात्रा

महाराष्ट्रात अनेक गावागावात ग्रामदेवतांच्या यात्रा भरतात.माघ महिन्यापासुन ख-या अर्धाने यात्रेचा हंगाम सूरू होतो.यात्रेचा हंगाम म्हणजे संपुर्ण भागात एक उत्साहवर्धक वातावरण असते.

आमच्याकडे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडयापासुन यात्रा सुरू होतात. यात्रेच्या मिटींगची दवंडी कधी देतात याकडे आमचे लक्ष असायचे.मग एखाद्या वारी मांग प्रत्येक गल्ली बोळात किंवा चौकात किंवा चावडीच्या दारात दवंडी द्यायचा.दवंडी संपताच डफडे वाजवायचा.त्याचे शेवटचे हो...हो...हो...व त्यानंतरचा डफड्याचा आवाज ऐकूण अंगावर रोमांच उभा रहायचा.यात्रेची पुर्वतयारी काय वर्णावी.

गावागावात मंदीराचे पटांगण.गावचा पार,चावडी येथे गावची बैठक भरायची.अनेक वादविवाद झडायचे.एका बैठकीत निर्णय होत नसे.पुढील आठवड्यात पुन्हा बैठक बोलवली जाई.यात्रेसाठी करमणुकीचा कोणता कार्यक्रम आणायचा यावर खलबतं सुरू होत.नामांकित तमाशा,किंवा प्रसादिक भारूडे यांच्या बिदागीचा आकडा किती आहे यावर चर्चा केली जायची.त्यानुसार आखणी केली जाई.

पुर्वी तमाशा व प्रसादिक भारूडे ही खाली जमीनीवर केली जात.या तमाशा व भारूडाचे फक्त सात-आठ कलाकार असत.त्यांच्याकडे एक मोठी पायपेटी,ढोलकी व कपडेपटाची एक मोठी ट्रंक (पत्याची पेटी) एवढेच माफक साहित्य असे.रात्री राजा झालेला नटाच्या डोक्यावर पायपेटी किंवा कपडेपटाची ट्रंक असे.भारूडात व तमाशात  स्री पात्र करनारा पुरूष नट असे त्याला नाच्या म्हणत.

नाच्याचे काम करणारा नट केस कापत नसत.स्री प्रमाणे केस राखत असत.माझ्या माहितीप्रमाणे भागात अनेक नाचे होऊन गेले त्यापैकी कै.मोतीराम भाऊ मोहन,कै संपत (चंपा) जढर, मंदोशी श्री.सखाराम उगले कारकुडी श्री.गणपत सातपुते घोटवडी श्री.शंकर माळी नायफड श्री.निधन,भिवेगाव पालखेवाडी श्री गबाजी धामणगाव व कै.विठू नांगरे मोरोशी यांचे सर्वात मोठे योगदान लाभले.त्यांच्या कार्याचा ठसा अजुनही अनेकांच्या मनात घर करून आहे.

भारूडात प्रथम उमवरा,सावळ्या,गणपती व सरस्वती ही पात्रे रंगपटावर येत नंतर मुख्य वग सुरू होई.तर तमाशात गण,गवळन,सवालजबाब,बतावनी व नंतर वगनाट्य असायचे.

नंतर जमीनीवरील खेळ स्टेजवर होऊ लागले.भारूड व तमाशाच्या  साहित्याची टेंपो व ट्रकमधुन वाहतुक होऊ लागली.स्टेज,पडदे,लायटिंग आली.तमाशात व भारूडात नाच्यांची सद्दी संपुन स्रीया काम करू लागल्या.पुर्भावीच्रूया भारुडांचा ढाचा बदलला.मारूड म्हणजे मिनि तमाशाच झाला.तमाशात रंगबाजी हा नविन प्रकार आला.तमाशा आता आर्केस्ट्रा झाला आहे.कालाप्रमाणे प्रचंड  बदल झाले.

यात्रेच्या बैठकित नंतर घरपट वर्गण्या ठरवल्या जाई.देणग्या गोळा करत.प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी दिली जाई.भारूड किंवा तमाशा ठरवनारे,देवाचा बाजार आणनारे, हारतुरे आणनारे, मंदिर रंगकाम करून घेणारे बैलगाडयांचे टोकन काढणारे लाईट लाउड स्पिकर व्यावस्था करणे यात्रेचे हँडबील छापणे व ते सर्वांपर्यंत वाटणे इत्यादी कामे असत.बाकी सर्व कामे यात्रा कमिटी करत असे.

गावची यात्रा जसजशी जवळ येई तसतसे लोक यात्रेचा तयारीला  लागत.प्रत्येक घराच्या भिंती आतुन बाहेरून शेणामातीने व राखेने सारवल्या जात.आंगणाला मुरूम घालून अंगण शेणाने सारवुन मस्त बनवले जाई.अंगणाला छान पैकी मांडव घातला जाई.

दुपारच्या वेळेस आंगणात बसुन छानपैकी गप्पा मारणे.किंवा पत्ते खेळणे असा आनंद नाही.मध्येच दुपारच्या वेळेस  सायकल वर पेटारे घेऊन एखादा गारेगारवाला येई.बर्फाची लाल,गुलाबी,हिरवी,पिवळी गारेगार घेण्यासाठी बायका पोरांची झुम्मड होई.दुपारच्या रणरणत्या उन्हात अंगणात बसुन बर्फाची गारेगार खाण्यात फार मोठे समाधान असे.व वेगळाच आनंद होई.

घरादाराची साफसफाई झाल्यावर आठवडे बाजारातून बायकापोरांना,बाप्या मानसांना नवीन कपडे खरेदी केली जात.काहीजण लवकर कपडे शिवन्यासाठी टेलरकडे दररोज चकरा मारत.टेलर दररोज त्यांना आज नाही बाळा सकाळ ये हे पालपुद त्याला म्हणुन दाखवत असे.व बिचारा हिरमुसून घरी जाई.

ज्यावेळी टेलरकडुन तुझे कपडे शिवून तयार आहेत व हे घेऊन टाक.असे म्हणे त्यावर याचा आनंद गगणात मावेनासा होत असे.कपडे ताब्यात घेतल्यावर कधी घरी जाऊ व हे कपडे सगळ्यांना दाखवु असे त्याला होत असे.व आपोआप त्याचे पाय वेगाने घराच्या दिशेने चालू लागत.

यात्रा जवळ आल्यावर प्रत्येक घरातील माणुस आपापल्या दुरच्या नातेवाईकांना आमंत्रण देण्यासाठी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना यात्रेचे आमंत्रण देत असे.मी सुद्धा मित्रांबरोबर  डोंगरद-यातुन,आडवाटेने,पायवाटेने जाऊन नातेवाईकांच्या गावी जाऊन यात्रेचे आमंत्रण दिले आहे.नातेवाईक सुद्धा यात्रेला  यात्रेच्या एक दिवस आधीच येत असत.गावचे मुंबई पुण्याकडील लोकही सर्व कुटुंबासह यात्रेच्या आदल्या दिवशी हजर असत.

यात्रेच्या दिवशी भल्या पहाटे उठून लोक अंघोळी पांघोळी करून तयार असत.सकाळी सकाळीच मंदीराकडे स्पिकर लावलेला असे.व त्यावर प्रल्हाद शिंदे किंवा इतर मराठी लोकगीतांचा आवाज कानी पडत असे.एकुणच यात्रेचा उत्साह काही औरच असे.

सकाळी देवास मांडव डहाळ्याचा कार्यक्म आटोपुन लोक हारतुरे आणन्यासाठी झुंडीच्या झुंडीने जात.हारतु-यांची मोठी मिरवणूक काढली जाई.गुलालाची उधळण होई.ढोल ताशा सनई व चौघड्याच्या वाद्यात हारतु-यांची मिरवनुक मंदिराच्या दिशेने रवाना होई.मंदीरात आल्यावर देवास कपडे चढवले जात.हार घातले जात.नारळ फोडून प्रसाद वाटला जाई.

तो पर्यत गावात अनेक दुकाने थाटलेली असत.खेळण्यांची दुकाने, लाडु,रेवड्या,शेव व भेळ यांची दुकाने,कलिंगड व कलिंगडाच्या खापा,द्राक्षे यांची दुकाने.थंड सरबत, गारीगार, कुल्फी स्रीयांची आभुषणे बांगड्या, पोत, माळा, पावडर, नेलपाँलीश इत्यादी अनेक दुकाने लावलेली असत.

काही मोठ्या गावांमध्ये बैलगाडयांच्या शर्यती असत.बैलगाडा घाटाकडे अनेक बैलगाडे आलेले असत.प्रचंड गर्दी झालेली असे.उंच मचानावर बसुन टोकन पुकारले जात.ठिकठिकाणी स्पिकरची कर्णे लावलेली असत.घाटाच्या दुतर्फा लोक  गर्दी करून बसलेले असत.काही लोक उंचावर काही झाडावर बसुन घाटातील बैलगाडयांच्या शर्यती पहात असत.संध्याकाळी इनाम वाटप केला जाई.

इकडे प्रत्येक पाहुण्यारावळ्याला जेवायला घातले जाई.संध्याकाळी ४ ते ५ या वेळात मंदिराकडे दंडवटे घेण्याचा कार्यक्रम असे.सर्व अबालवृद्ध,बायका पोरे सजुन धजुन मंदिराकडे दर्शनासाठी जात असत.अनेकांचे नवस फेडले जात.गुळ खोबरे.पेढे व बर्फी वाटली जाई.

संध्याकाळी सर्व पाहुणे रावळे यांना आग्रह करून जेवायला वाढले जाई.संध्याकाळी भारूड किंवा तमाशाचा कार्यक्रम असे.लोक सर्वात पुढे बसुन कार्यक्रम पहाता यावा म्हणुन अगोदरच जाऊन जागा धरत.स्टेजपुढे प्रेक्षकांची तोबा गर्दी व्हायची.रात्री पालखीचा कार्यक्रम झाल्याशिवाय भारूड किंवा तमाशा होत नसे.

काही ठिकाणी पालखी रात्री १२ वाजता निघायची.तो पर्यत लोक ताटकळुन जायचे.लहान मुले झोपी जायची.पालखीचा कार्यक्रम निघाल्या वर ढोल ताशांचा  सनई चौघड्यांच्या निनादात पालखी चालायची अनेक लोक पालखीच्या मागे पुढे चालायचे.अनेकांच्या अंगात वारे घुमायचे.ते पालखीपुढे दोन्ही हात हातात घालून विशिष्ट पद्धतीने नाचत राह्यचे.पालखीच्या पुढे फटाके व पाऊस पेटवले जायचे. पालखीचा कार्यक्रम संपल्यानंतर तमाशा किंवा भारूडाचा कार्यक्रम व्हायचा.

दुसऱ्या दिवशी सकाळीच काही लोक अखाड्याचे जेवण बनवण्यासाठी जायचे.त्यांनी बनवलेल्या आमटी भात व शाक भाजीचा दरवळ व लज्जत कायम मनात घर करून आहे.

सकाळी ९ वाजता हजेरीचा कार्यक्रम असायचा स्रीया  व बापे घरचे आवरून पोरांबाळासह हजेरीचा कार्यक्रम पहायचे.तो पर्यंत उन लागायला सुरूवात व्हायची.लोक मग बर्फाची गारीगार खाऊन जीव थंड करू पहायचे.

हजेरीचा कार्यक्रम संपल्यावर बायकांमाणसे पुहुण्या आलेल्या बायकांपोरींना बांगड्या भरायच्या.शेवरेवड्या घेऊन द्यायच्या.लहान मुलांना खेळणी घेऊन द्यायच्या.जेवण झाल्यावर यात्रेला आलेली  बायकपोरे आपापल्या गावाला निघत.

त्यानंतर आखाड्याचे जेवण असे.लांबलाबून पहिलवान आलेले असत.कुस्ती शोकींनाची मांदीयाळी जमलेली असे.मोठ्या भातखाचरात,ढेकळामधुन आखाड्याच्या जेवणाच्या पंगती बसत.वर उन्हाचा कहार व खाली तापलेली जमीन अशा परिस्थितीत  पानात भात व तिखट आमटीचा आणि शाकभाजीचा खमंग वास आसमंत दरवळून सोडे.प्रचंड भुक लागलेली असे.उन्हाच्या काहीलीने जीव मेटाकुटीला आला असे.

आणि अशातच श्लोक म्हणला जाई.पुंडलीकवरदेव हारीssssssविठ्ठल म्हणे पर्यंत लोकांना दम धरवत नसे.दुसरी वाढी झाल्यावर ७५%लोक तृप्त होत.काही खवय्ये तिसरी वाढी संपवून मगच उठत.

जेवण झाल्यावर लोक अंगणात,झाडाखाली बसुन वामकुक्षी घेत तर काही उगाचच कालच्या तमाशा व भारूडाच्या,पहिलवांनाच्या गप्पा चघळत बसत.आणि अचानक सनई,चौघडा,व डफड्याचा अवाज आल्यावर लोक खडबडून उठत.झोपलेल्या लोकांना जागे केले जाई.तो पर्यंत लोक बक्षीसांच्या वस्तू घेऊन नाचत गुलाल उधळीत आखाड्याच्या ठिकाणी हजर होत.

पंच कमिटी स्थनापन्न झाल्यावर लहान मुलांच्या कुस्या लावल्या जात.हळुच आखाड्यात रेवड्या उधळल्या जात.नंतर ५रूपया पासून इनाम सुरू होई.हळूहळू अखाड्याला रंगत येऊ लागे.नामांकित कुस्त्यांचे डाव पहाताना लोक तल्लीन होत.शेवटच्या कुस्तीवर सर्वात जास्त इनाम असे.शेवटची कुस्ती ही भागाची शान असलेल्या नामांकित पहिलवानावर लावली जायची.त्या नंतर हरहर महादेव चा गजर व्हायचा. व अखाडा संपायचा.

अशा प्रकारे प्रत्येक गावचा हा दोन दिवसाचा कार्यक्रम संपल्यावर गावात भयाण शांतता पसरायची.यात्रेचे दोन दिवस लोक पुन्हा पुन्हा आठवायचे.व पुढच्या यात्रेची वाट पाहीली जायची.

मित्रांनो आजही यात्रा भरवल्या जातात.परंतू यात पुर्वीची मजा नाही.नातेवाइकांविषयी आपुलकी नाही.जुन्या स्मृती विषयी ओढ नाही.लोकांना वेळ नाही.काहीजण तर यात्रेला सुट्टी नाही म्हणून येत नाहीत.आज पैसा आहे सर्व काही पैशाने विकत घेता येते.पुर्वी पैसे नसायचे.साधी बर्फाची गारीगार घेण्याची काहींची ऐपत नसायची.परंतू समाधान व आनंद हा प्रत्येकात कमालीचा होता.नातेवाईक,मित्र,मजा हिच त्यांची श्रीमती होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस