

पूर्वी गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे बैलजोडी असायचीच. शेतकरी आपल्या बैलांकडून वर्षभर शेतीची कामे करून घ्यायचा.शेतीच्या आवश्यकतेच्या नुसार बैलजोडी किंवा एखादा बैल बदलायचा. तो विकून दुसरा नविन घ्यायचा. यासाठी लोक आपापले बैल घेऊन म्हशाला जायचे. म्हसा ता.मुरबाड येथे पौष पौर्णिमेला फार मोठी यात्रा भरते. ही यात्रा पुर्वी पंधरा दिवस चालायची. यात्रेला मोठ्या प्रमाणावर बैलांचा बाजार भरतो. त्याशिवाय शेळ्या मेंढया,म्हशी सुद्धा विक्रीस उपलब्ध असतात.महाराष्ट्रातील सर्व तमाशे राहुट्या ठोकून असतात.
ग्रामीण भागातील ज्या शेतक-यांना बैल विकायचे आहेत.ते म्हशाच्या यात्रेच्या चार महिने आधीपासून तयारीला लागत.बैलांना रोज ओढ्यावरा नेऊन अंघोळ घालने,गोठा टापटिप ठेवणे,बैलांना पेंड,गव्हाच्या पिठाचे गोळे खायला घालने.हिरवा चारा,कोंहंबळ व गोळी या झाडांचा कोवळा पाला खायला घालून बैल चांगले तयार करत.
म्हशाच्या यात्रेच्या आधी प्रत्येक गावचे लोक आपापल्या गावातुन सकाळी सहा वाजताच बैल घेऊन निघत. काही लोक भोरगीरी मार्गे,काही रानमळ्यातून भिमाशंकर काही आहूपे मार्गे तर काही घाटघर मार्गे आपापले बैल घेऊन म्हशावर पायी जात असत.
आम्ही सुद्धा सकाळी सहा वाजताच बैल विकण्यासाठी म्हशावर जाण्यासाठी सकाळी सहा वाजताच गाव सोडले.ज्या बैलांनी आपल्या शेतीची सेवा केली त्या बैलांना विकायचे ही कल्पनाच घरातील बाया बापड्यांना मान्य व्हायची नाही. घरातील स्रीया बैलांना गौठ्यातुन बाहेर नेतांना पदरात डोके घालून हमसू हमसून रडायच्या. परंतू त्या तरी काय करतील बापड्या.प्रपंचात राग, लोभ, द्वेश, मत्सर, मोह जास्त करून भागत नाही. नव्हे नियतीला हे मान्य नाही.आपल्या बैलांची शेवटची गळाभेट घ्यायच्या. दोन चार भाकरी किंवा काही गोडधोड बैलांना चारायच्या.आणि जो पर्यंत आपले बैल दृष्टी आड होत नाहीत तो पर्यंत तेथेच उभ्या असायच्या.
बैल एव्हांना टोकावडे,भिवेगावच्या पुढे गेलेले असायचे.तेव्हा घरातील लहान लेकरे उठायची. गोठ्यात बैल कोठे गेले असतील असा प्रश्न त्यांना पडायचा. गोठ्यातील आपले बैल कोठे गेले असे ती मुले आई किंवा आजीला विचारायची.हे सांगतांना सर्वजण गहीवरून जायची. मुले गोरीमोरी व्हायची, रडायची. परंतू आपण दुसरे नविन बैल आणनार आहोत असे समजावल्यावर कुठे शांत.
आम्ही आमचे बैल घेऊन भोरगीरी, भिमाशंकर मार्गे बैलघाटातुन पायी चालत जायचो.दुपारी तीन वाजता कोकणातील लव्हाळीवर पोहचायचो. तेथे नदीवर अंघोळ करायची. घरून आणलेली शिदोरी फडक्यातुन सोडायची. शिदोरीत तांदळाची नाचनीची भाकरी असायच्या.लसणाची, सुकट, बोंबील किंवा वाकटीची चटणी असायची.जोडीला हरभ-याच्या पिठाचे मोकळे बेसन व पातळ भजी असायची. यावर यथेच्छ ताव मारायचा. बैलांना चारा टाकायचा.
थोडावेळ आराम करून भिलावरे गावाच्या दिशेने कुच करायचे. व तेथेच मुक्काम करायचा.दुसऱ्या दिवशी लवकर उठून काही लोकांना जागा पकडन्यासाठी पुढे पाठवायचे.पुढे गेलेले लोक जागा पकडून तेथे खुंटे ठोकून ठेवत. त्यानंतर दुपारी बैल घेऊन लोक जागा धरून ठेवलेल्या ठिकाणी खुंट्याला बैल बांधत. तेथेच सध्याकाळी राहण्यासाठी गवताची खोप करत.संथ्याकाळचे जेवण तेथेच असे.
म्हशावर टेप व मुळनदी असे दोन भाग असत.खेड,आंबेगाव व जुन्नर व अकोले भागातील लोक टेपावर आपले बैल विक्रीला आनत, तर मुळ नदीवर नगर, नाशिक शहापुर व ठाणे जिल्ह्यातील बैल विक्रीसाठी असत. जिकडे तिकडे बैलच बैल दिसत. मानसांची ही गर्दी उसळलेली असे.प्रचंड गर्दीचा कोलाहाल असे. कुणाला आपले बैल विकायचे असत. तर कुनाला आपले बैल विकून पुन्हा नविन बैल घ्यायचे असत. या यात्रेला हौशे. नौशै व गौशे असे तीनही प्रकारचे लोक असत.शिवाय उंचच उंच पाळणे,खेळण्यांची दुकाने, हाँटेले, मिठायांची दुकाने, ठिकठिकाणी असत. ग्रामीण भागातील लोक बैल विकल्यावर व नविन बैल घेतल्यावर काही खरेदी करत. त्यामध्ये पिठ मळन्यासाठी काठवट,पेजवळ्या (घावने)ची कहाल, संसारोपयोगी भांडी, सुप, घोंगड्या, चादर, ब्लँकेट सुकट, वाकट, बोंबील, ढोमेली, सोडा (वाळलेल्या माशांचा प्रकार) यांची खरेदी व्हायची. लोक सार्वजानिक कार्यक्रमासाठी डेंगी व भांडी घ्यायचे.मुलांसाठी खेळणी गळ्यात घालन्यासाठी वाघनखे,गळ्यातील गोफ, भोंडीच्या माळा, बांगड्या, रिबनी, आरसे, कंगवे.फण्या अशी खरेदी केली जायची. विवीध प्रकारचा खाऊ घेतला जाई.
बैल विक्रिसाठी किंवा विकत घेण्यासाठी आलेले शेतकरी दोन चार घटका जीवाचं मनोरंजन करण्यासाठी तमाशाकडे धाव घेत.तुफान गर्दी व्हायची. कधी कधी तमासगिरांचा सामनाही रंगे. गण, गवळण, रंगबाजी, फार्स आणि वग असा मोठा कार्यक्रम असे. पहाटेचं तांबडं फुटेपर्यंत पायातल्या चाळांची छुमछुम,कडयांचा कडकडाट आणि डफ, तुणतुणे आणि ढोलकीची धुमाळी चालू राही.
तिकडे सुर्य डोंगराआडून डोकावून पाहू लागला की तमाशाचा खेळ मोडत असे. रात्री ज्यांनी पात्र रंगवली त्यांना सकाळी मेकअप नसताना पाहताना आमचा भ्रमनिरास होत असे.लाईटच्या झगमगाटातील लावण्यवतीचं खरं रुप सकाळच्या हजेरीत पहावसंही वाटत नसे.तमाशाला गर्दी करणाऱ्या प्रेक्षकांपैकी मीही एक होतो.आम्हाला गण, गवळण, रंगबाजी आणि फार्समधील नाचगाणी, गवळणी, मावशीची फिरकी यापेक्षा तमाशाचा वग पाहणे आवडायचे. त्यातही काही अद्भुत ट्रीक सिन्स असतील तर मला फारच आवडे.
मा. दत्ता महाडिक सह गुलाबराव बोरगावकर मा.,चंद्रकांत ढवळपुरीकर, मा.माधवराव गायकवाड मा.,गणपत व्ही माने, मा. शंकरराव कोकाटे, वसंतराव अवसरीकर, साहेबराव नांदवडकर, काळू बाळू, पांडूरंग मुळे, मंगला बनसोडे,रघुविर खेडकर,भिका भिमा अशी मला माहित असलेली नामांकित मंडळी त्यावेळी तमाशात होती.
त्याकाळी काही तमाशे वगाचे नाव अगोदर जाहिर करीत असत व प्रेक्षकांची गर्दी खेचत असत.दत्ता महाडीक यांचा महाराष्ट्र झुकत नाही अर्थात धर्मवेडा संभाजी अप्रतिम वगनाट्य होते. महाराष्ट्र झुकलाच पाहिजे यापुढे जाऊन तिसरे वग नाटय आले, महाराष्ट्र झुकेल पण केंव्हा ? लग्नाआधी कुंकू पुसले, संसाराचा झाला सिनेमा, कऱ्हाडची कुर्हाड, खन्डोबाची आण, सत्या बेरड, माता न तू वैरीणी असे सामाजिक विषय असणारी वगनाट्य असत, तमासगिरांमध्ये स्पर्धा चाले.दत्ता महाडीकांचा तमाशा मला फार आवडे. दत्ता महाडीक म्हणजे विनोदाचा बादशहा. कवी आणि उत्तम गायक. स्टेजवर एंट्री घेतली आणि शिटया व टाळयांचा कडकडाट झाला नाही असे कधीच घडले नाही. त्यांचं वग नाटय फार जबरदस्त असे. माधवराव गायकवाड त्यात संभाजीची भुमिका करत. काय तो अभिनय,संवादफेक आणि रुबाब अहाहा ! मी त्यांच्या कामावर फिदा झालो होतो.
म्हशाच्या तमाशा पंढरीत परंपरा म्हणून तमासगीर दरवर्षी त्यांची बारी रसिकां चरणी सादर करीत.त्या खेळावरुन अनेक गावच्या जत्रांच्या सुपा-या ठरवल्या जायच्या. मैदानात तमाशाच्या बा-या सुरु होत्या. चालताना विठाबाईच्या तमाशा जवळ थांबलो विठाबाई त्यांच्या पहाडी आवाजात पट्ठे बापूरावांची लावणी म्हणत होत्या.
"तू गं ऐक नंदाच्या नारी,काल दुपारी,
यमुनेच्या तिरी ग हा हा हा ,
धुणं धूत होतो गवळ्याच्या नारी ,
जी जी ग जी जी ग हा.
आम्ही गवळण ऐकून पुढे सरकलो.पुढच्या बारीत ढोलकी. तुणतुणे हलगी,कडे यांची जुगलबंदी सुरु होती. या वाद्यांनी लोकांवर जादू केली आहे, ढोलकी तुणतुण्याच्या आवाज ऐकला की लोक वेडे बनून तिकडे धावत सुटतात मग 'लावणी 'या वाद्यांच्या साथीत तिचा तोरा मिरवते.काशिनाथ म्हणाला,थांब रे, गण ऐकुन जाऊ. त्याला गण म्हणण्याचा नाद होता.
डफावर थाप मारून, ढोलकीचा तोडा संपताच शाहिरानं फेट्याचा सोगा पाठीवर भिरकावला. डाव्या हाताचा पंजा कानावर ठेवला आणि एकदम कडक आवाजात सुरु केलं,
आधी गणाला रणी आणला "
काशिनाथला दम धरवेना त्यानेही मोठ्याने सुरु केलं
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना ना...
मी त्याला गप्प करण्याची केविलवाणी धडपड करीत होतो पण त्याच्यात साक्षात पट्ठे बापूरावच संचारला होता.
पट्ठे बापूराव कवी कवणाचा,
हा एक तुकडा जुना जुना ना "
गण संपताच ढोलकीचा ठेका सुरु झाला चाळांची छुम छुम ऐकू येऊ लागली,लोकं मांडी घालून बसले होते ते चवड्यावर आले.आम्ही पुढच्या बारीकडे निघालो तुकाराम खेडकरांचा तमाशा चालू होता गवळणी बाजाराला निघाल्या होत्या,
"चला चला गं फार येळं झाला,
मथुरेच्या हाटा आता निघा चला ग,
बाजार मोठा, लवकर गाठा
मथुरेच्या हाटा आता निघा चला ग "
भाऊ फक्कडांची ही प्रसिद्ध गवळण ढोलकीच्या तालावर आणि नर्तकींच्या अदाकारीत चालू होती,गण गवळण झाल्यानंतर फार्स सुरु झाला,
मी म्हटलं.चला आता दत्ता महाडीकांचा वग सुरु होईल.
थांबा थोडं, थोडा फार्स बघून जाऊ काशिनाथ म्हणाला. त्याला सोंगाड्याचं काम भारी आवडायचं, तो टाचा वर करून बघू लागला. फार्स चांगलाच रंगला होता.
आरं ! एवढ्या घाईनं रातच्याला कुठं चाललास ?"
कुठं म्हंजी तमाशाला.
लईच घाईत निघालास वाटत.
व्हय, वाईच डोळा लागला व्हता. आथुरणातून उठून घाइघाईन उशाला ठेवलेला पटका डोक्याला गुंडाळला,आन तडक निघालो. म्हटलं, गवळण हुकायला नको.
आरं येड्या ! तू डोक्याला पटका नाय तर उशाशी पडलेलं बायकोचं लुगडं गुंडाळून आलास लेका ...
आणि हास्याचा गडगडाट झाला.
आम्ही गर्दीतून आणखी पुढे सरकलो. दत्ता महाडीकांच्या स्टेजसमोर आलो. प्रेक्षकांची ही तुफान गर्दी. शिटया आणि गोंगाटाने काही ऐकू येत नव्हते. तमाशा थांबलेला होता आणि स्टेजवर एक ग्रामस्थ खुर्ची टाकून बसले होते.आम्ही आजुबाजुला चौकशी केली.
काय झालय ? "
काही माहित नाही, तमाशा थांबवलाय जणू. का ? खेळ लावलाय तो लोकांना पसंत नाही वाटतं? कोणता वग लावलाय ?
ज्ञानेश्वर माझी माय माऊली.
खेडच्या यात्रेत मी त्यांचा संत तुकाराम वग पाहिला होता.दत्ता महाडीक स्वतः गायक व कवी होते. त्यांनी केलेली संत तुकारामाची भुमिका व मा.चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी मुंबाजी बुवाची केलेली भुमिका आणि त्यात घेतलेले ट्रीक सिन्स माझ्या आजन्म लक्षात राहतील. एवढा सुंदर, निटनेटका वग मी प्रथमच पाहिला होता. त्यामुळे ज्ञानेश्वर माझी माय माऊली मला आवडला असता.
अरे! मी हा वग अगोदर खेडच्या जत्रेत पाहिला आहे. स्टेजवर ठाण मांडून बसलेला माणूस उठला. तोंडात साचलेला पानाचा चोथा स्टेजच्या कडेला थुकून आला व माईककडे जाऊन म्हणाला, रक्तात भिजला बंगला झालाच पाहिजे.
मी म्हटलं, बंगला काय आहे? काही तरी हाणामारीची गोष्ट ?
नाही, रक्तात भिजला बांगला असे त्यांना म्हणायचं आहे.
स्टेजवरील गृहस्थ पुन्हा माईकवरुन ओरडत होता, ते काय नाय, रक्तात भिजला बंगला झालाच पाहिजे.
पुर्वी पाकिस्तान व बांगला देशाचे युद्ध चालू होते. शेख मुजिब रेहमानच्या मुक्ती सेनेला भारताने पाठींबा दिल्याने त्या युद्धाचं वारं भारतातही फिरत होतं. त्यावर दत्ता महाडीक यांनी रक्तात भिजला बांगला हा वग बसवला होता. व तो तुफान लोकप्रिय झाला होता.
तेवढ्यात तमाशातील एक वरीष्ठ नट चंद्रकांत ढवळपुरीकर माईकसमोर आले व आम्ही हा वग आज सादर करु शकत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्या तमाशातील प्रमुख कलावंत माधवराव गायकवाड हे आज उपस्थित नसल्याने हा खेळ आज करता येत नाही म्हणत त्यांनी हात जोडले परंतु लोक इरेला पेटले.
सारे प्रेक्षक बांगला ! बांगला ! बांगला ! म्हणून ओरडू लागले.
बांगला! बांगला ! रक्तात भिजला, बांगला मी पण एकदा ओरडलो.
५-१० मिनिटांनतर दत्ता महाडीक स्वतः ज्ञानेश्वरांच्या वेशात स्टेजवर आले. सगळीकडे शांतता पसरली. लोकं गपगुमान झाली.
रसिक मायबापहो, आपल्या विनंतीचा मान ठेऊन आम्ही 'रक्तात भिजला बांगला हा वग सादर करीत आहोत. लोकांनी टाळयांचा कडकडाट केला.
आम्हीही त्या गर्दीत घुसलो आणि जिथून चांगले दिसेल अशा ठिकाणी जागा धरुन बसलो. मला व्यवस्थित दिसत नव्हतं, चवड्यावर बसून पहावं लागत होते.
मला फक्त अर्धा तास द्या. महाडीकांनी माईकवरुन पुकारलं, एवढा मोठा समुदाय चक्क अर्धा तास गप्प बसून राहिलेला मी पाहिला, स्टेजवरचे पडदे सोडून त्याठिकाणी दुसरे पडदे लावण्यात आले. आणखी आवश्यक ते बदल नेपथ्यात करण्यात आले, विजेच्या चपळाईने सारे घडत होते आणि अर्ध्या तासाने सुरु झालं 'रक्तात भिजला बांगला हे वगनाट्य.
मुक्ती सेनेत गेलेल्या एका तरुणाची आणि त्याच्या कुटुंबाची व बांगला देश पाकिस्तानच्या लढाईची ती कथा होती. सुरुवातीलाच माधवराव गायकवाड मुस्तफाच्या (तो तरुण) वेषात स्टेजवर अवतीर्ण झाले, लोकांनी टाळयांचा कडकडाट केला.
त्या दिवशी त्या वगाचे अप्रतिम सादरीकरण झाले. विमानांचा आवाज, बाँब, हातबाँब, रायफलच्या गोळया. मला तर वाटले खरोखर स्टेजवर लढाईच चाललीय. चवडयावर बसून तमाशा पाहताना कळ लागली की मधुनच उभा राहूनही पहात होतो. तमाशाच्या इतर बा-यांनी कधीच आपला खेळ मोडला होता.
सगळं पब्लिक,' रक्तात भिजला बांगला ' ला लोटलं होतं. जणू काय माणसांचा महापूरच आल्यासारखं वाटत होतं. स्टेजवर होणारे बाँबस्फोट, विमानाने टाकलेले बाँब, बंदुकीच्या फैरी त्यासाठी वापरलेले आपटीबार यामुळे स्टेजच्या आजुबाजुचा परिसर धुरानं भरुन गेला, माधवराव गायकवाड, दत्ता महाडीक, गुलाबराव बोरकर,चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी अप्रतिम भुमिका केल्या. माझ्या बालमनावर कोरलेलं ते वगनाटय अजुनही माझ्या नजरेसमोर जसेच्या तसे कालच पाहिल्यासारखे ऊभे राहते.
एका तमाशाला एवढी लोकं जमतात हे मी पहिल्यांदा पहात होतो.तमाशाला दिलेले ' लोकनाट्य 'हे नाव खऱ्या अर्थाने सार्थ होत होते.
तमाशाचा खेळ पाहुन दुस-या दिवशी पुन्हा घरी जाण्यासाठी संध्याकाळी पाच वजता म्हशातून आमचा जथा निघाला. संध्याकाळी भोमाळवाडी येथे एक मुक्काम करून पहाटे तीन वाजता प्रचंड थंडीत आमचा प्रवास सुरू झाला. रानावनातुन, खाचखळग्यातून, बैल घाटाने आम्ही सकाळी आ वाजता भिमाशंकरला आलो. तेथून पुढे चालवेना.परंतू आठ दिवसापुर्वी गाव सोडले होती. घरी जाण्याची ओढ लागली होती.आणि एकमेव त्या ध्यासाने भोरगीरी मार्गे आम्ही दुपारी साडेबारा वाजता घरी पोहचलो. नविन बैलांचे चांगले स्वगत केले गेले.🖊️🙏
मा.चंद्रकांत ढवळपुरीकर
चंद्रकांत ढवळपुरीकर, ढोलकी फडाच्या तमाशाचे मालक, ज्येष्ठ कलावंत. पूर्ण नाव चंद्रकांत शिवराम जाधव.
त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे झाला,त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. एक बहीण व सात भाऊ असा त्यांचा घरचा परिवार.चंद्रकांतजी बालवयात गुरे सांभाळून जेमतेम इयत्ता ३ री पर्यंत शिक्षण घेऊ शकले. त्यांचा जन्म गोंधळी समाजातला आहे.
बालवयातच ते आपल्या मामांच्या तमाशात काम करू लागले. विष्णूबुवा बेल्हेकर सह देविदास रांधेकर या तमाशात प्रथम बिगारी काम करीत असतानाच नंतर ते नृत्य कला शिकले. ते नाचाची उत्तम भूमिका करीत असत.
१९५५ मध्ये जगताप पाटील पिंपळेकर यांच्या फडात त्यांनी वगात छोट्या मोठ्या भूमिका केल्या. त्यांचा आत्मविश्वास वाढला,संवादातून संभाषण कौशल्य विकसित झाले.
१९५६ साली तुकाराम खेडकर सह विठ्ठल कवठेकर या तमाशात त्यांनी प्रवेश केला. तुकाराम खेडकर हे कुशल तमाशा कलावंत होते. त्यांचे अभिनय कौशल्य अप्रतिम होते. ते शब्दसृष्टीचे उपासक होते. त्यांचा चंद्रकांतजींवर चांगलाच प्रभाव पडला.
त्याच तमाशात चंद्रकांतजी उर्फ भाऊ खलनायक म्हणून प्रसिद्ध झाले.१९५८ मध्ये माधवराव नगरकर तमाशा मंडळात सारंगपूरची होळी या वगात खलनायकाची भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे सादर केली.
१९५९ ते १९६२ पर्यंत तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर तमाशा मंडळात त्यांच्या कलेला बहर आला. त्यांची खलनायकाची भूमिका पाहण्यासाठी तमाशाचा तंबू खचून भरत असे. त्याच काळात पानिपतचा सूड हा त्यांनी भूमिका केलेला ऐतिहासिक वग अतिशय गाजला. त्या वगात ‘ सादुल्ला ‘ नावाची खलनायकाची भूमिका त्यांनी यशस्वीपणे सादर केली. त्याच काळात त्यांनी काळ रक्त,लडूसिंग, गवळ्याची भूमिका सादर केल्या.ते रसिकांचे खलनायक म्हणून प्रसिद्ध झाले.
महाराष्ट्रातील तमाम तमाशा रसिकांनी त्यांना वगसम्राट ही पदवी बहाल केली.१९६३ ते १९६४ या कालावधीत जगताप पाटील पिंपळेकर या तमाशा मंडळात दत्ता महाडिक पुणेकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला.परिचयातून स्नेह वाढला. दत्ता महाडिक यांच्यासारखा उत्कृष्ट कलावंताचे ते मित्र बनवले. स्वतःच्या मालकीचे लोकनाट्य मंडळ असावे अशी प्रेरणा त्यांना झाली.
त्याचाच परिणाम म्हणून १९६४ मध्ये वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर सह बाबुराव सविंदणेकर नावाने तमाशा फड सुरु केला.बिगारी कामगार बनून दाखल झालेला तमाशातील कामगार तमाशा मंडळाचा मालक बनला; परंतु आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांच्यापुढे अडचणी निर्माण झाल्या.
१९६६ सालापासून चंद्रकांत ढवळीपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर तमाशा मंडळ अस्तित्वात आले. या तमाशा मंडळाने त्यांच्या वैभवाच्या व प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. त्यांनी गणपतराव चव्हाण सविंदणेकर यांना गुरुस्थानी मानले होते.
त्यांची गाजलेली वगनाट्य व त्यातील भूमिका : महाराष्ट्र झुकत नाही – गणोजी शिर्के, महाराष्ट्रा तू जागा रहा – बहिर्जी नाईक, चित्ता फाडला जावळीचा – चंद्रराव मोरे, चिचोंलीचा देशमुख – देशमुख , गवळ्याची रंभा – रंगभल महाराज ,संत तुकाराम – मंबाजी, भक्त पुंडलिक – अंबाजी पाटील, चाकणचा किल्लेदार – फिरंगोजी नरसाळे, ज्ञानेश्वर माझी माऊली – दादभट, झाला उद्धार वाल्मिकीचा – वाल्मिकी, याशिवाय त्यांची रक्तात भिजला बांगला, असे पुढारी ठार करा,पुढाऱ्यांनी काढली शाळा,पुढारी पाहिजे गावाला, तिथं मठातील सैतान, मुंबईचा रेल्वे हमाल, काय दिले या स्वातंत्र्याने ,यासाठी स्वातंत्र्य हवे का ?, इंदिरा मठाचे गुपित, करा ठार हे गॅंगवॉर, रनात रंगली इंदिरा,राजीव गांधी झिंदाबाद,ही झुंज मुरारबाजीची, संत सावता माळी, करितो चोखोबा जोहार, संत एकनाथ, खुर्चीसाठी वाटलं ते, संभाळ तुझ्या सौभाग्याला, चांडाळ चौकडी गाव गुंडांची, तिकीट मिळालं गुंडाला , लोकशाहीचे मारेकरी अशी अनेक वगनाट्ये गाजली.
महाराष्ट्र झुकत नाही या वगनाट्याने तर त्यांची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचविली. इराण सरकारचे सांस्कृतिक मंडळ भारतातील सांस्कृतिक जीवनाचा विकास कशाप्रकारे झाला आहे याचा अभ्यास करण्यासाठी १९६७ साली महाराष्ट्रात आले होते.त्यांनी भाऊंच्या वगनाट्याचे शूटिंग करून नेले आणि ते इराण च्या दूरचित्रवाणीवरून प्रसारित केले.
चंद्रकांत ढवळीपुरकर यांना मिळालेले पुरस्कार : ढवळपुरी ग्रामस्थांकडून ६५ वी निमित्त सत्कार व पुरस्कार (१९९४), विठ्ठलराव विखे पाटील कला गौरव पुरस्कार (२००१) , पुणे महानगरपालिका पट्ठे बापूराव पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद दादू इंदुरीकर स्मृती पारितोषिक (२००३) , पुणे नवरात्रौ महोत्सव पुरस्कार (२००४), महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२००४) , उत्कृष्ट तमाशा अभिनय सम्राट ( पवळा पुरस्कार – २००१ ) , सहकार महर्षी जयंती समारंभ पुरस्कार (२००५), नाद निनाद तमाशा महोत्सव पुरस्कार (२००६), नांदेड जिल्हापरिषद तमाशा महोत्सव पुरस्कार (१९९०).
तमाशा करत असताना त्यांनी अनेक गावातील शाळांना व मंदिरांना भरघोस देणग्या दिल्या. ढवळपुरी गावातली शाळा बांधली. मारुती मंदिर व दत्त मंदिर बांधले. ह्यात असे पर्यंत शालेयपयोगी वस्तूंचे मुलांना वाटप केले.
त्यांनी १६ ऑक्टोबर २००९ साली जगाचा निरोप घेतला अखिल महाराष्ट्र तमाशा परिषदेत त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
सध्या त्यांची दोन्ही मुले किरण चंद्रकांत जाधव ( किरण कुमार ढवळीपुरकर ) व संतोष चंद्रकांत जाधव ( संतोष ढवळीपुरकर ) लोकनाट्य तमाशा मंडळाचे काम आजतागायत सांभाळत आहेत.
पुर्वी पासून ग्रामीण भागाला बैलगाडा शर्यतीची परंपरा लाभली आहे. पश्चिम भागात वाडा, डेहणे, गोरेगाव, साकुर्डी, वाशेरे, वाळद, आव्हाट, खरोशी, एकलहरे व शेंदुर्ली या गावामध्ये प्रामुख्याने यात्रेच्या निमित्ताने बैलगाड्यांच्या शर्यती आयोजीत केल्या जात.
या साठी यात्रा कमीटी एक महिना आधीपासुनच तयारीला लागत. वर्गण्या व देणग्या गोळा केल्या जात.काही उत्साही लोक बैलगागाडा शर्यतींसाठी वस्तूरूपाने देणग्या देत.त्यामध्ये कपाट, टिव्ही, पंखा, घड्याळ यांचा सामावेश असे.
बैलगाडयांच्या शर्यतीसाठी एक ते पाच क्रमांक काढले जात. बक्षीसांची संख्या जर जास्त असेल तर एक ते पाच क्रमांकासाठी वस्तुंची विभागणी केली जायची. परत फळीफोड गाड्यासाठी वेगळे इनाम असायचे.
सतत तीन वर्ष प्रथम येणा-या गाड्यांसाठी वेगळे इनाम असायचे.हे इनाम वैयक्तिक स्वरुपात असायचे.बैलगाडा घाट दुरूस्ती साठी आठ दिवस आधीच गाडाशौकिन ग्रामस्थ तेथे जाऊन दुरूस्ती करत. त्यांना भेळ व जिलेबी दिली जाई.
पुर्वी यात्रेच्या आदल्या दिवशीच गाडा मालक सायंकाळी यात्रा असलेल्या गावी दाखल होत.दुस-या दिवशी सकाळी टोकन देण्याचे काम सुरू होई.त्यासाठी गाडामालकाची रांग लाऊन टोकन दिले जात.
नंतर पुढे ही पद्धत बदलली गेली यात्रेच्या दिवशी सकाळी नऊ ते बारा या काळात सर्व गाडामलकांच्या नावाच्या चिठ्ठया काढून सोडत पद्धतीने टोकन काढले जाऊ लागले.
पुर्वीचा घाट व नंतर बनवलेला घाट यात अधूनिकपणा आला. घाटातील बैलगाड्यांची अचुक माहीती आँखो देखा हाल पहाण्यासाठी घाटाच्या शेजारी उंच मचान तयार करून चार बाजुला लाऊडस्पीकरची कर्णे बांधन्यात येत. मचाणावर पाच-पंचवीस गावचे कार्यकर्ते गर्दी करून बसत. त्यापैकी एकाकडे सेकंद पहाण्याचे घड्याळ असे. तर दोन जण अलाउंसींग करायला असत. शेजारीच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली असे. कार्यकर्त्यांसाठी भेळ,शेवरेवडीची व्यवस्था असे.मलाही लहानपणी त्या मचाणावर जाऊन गाडे पाहण्याची मजा घ्यावी असे वाटायचे. परंतु ही इच्छा कधीही पुर्ण झाली नाही.
काही जण झाडावर बसुन गाडे पाहाण्याचा आनंद लुटायचे. .झाडावर आधीच बरेचजण बसलेले असायचे.तेथेही आमचा नंबर लागला नाही.
दुपारी बाराच्या नंतर घाट चालू व्हायचा. घाटाच्या खाली मैदानात सगळीकडे खिल्लारी पंढरेशुभ्र बैलच बैल दिसायचे. प्रचंड भंडार उधळला जायचा. काही अवखळ बैलांना सांभाळताना लोकांची त्रेधातिरपट व्हायची. घाटाच्या दुतर्फा व जिकडे तिकडे लोकांचा प्रचंड कोलाहाल दिसायचा. धोतर, पैरण, टोपी, पायजमा, खमीस, पँन्टव शर्ट घालून लोक यात्रेला येत.
लांबुन सगळीकडे पांढरेच पांढरे दिसे. जागोजागी सुस्पष्ट आवाज यावा म्हणून लाऊडस्पिकरची कर्णे लावली जात. काही कर्णे झाडांवर देखील बांधली जात. जागोजागी लोकांना थंडगार करण्यासाठी सायकलीवर बर्फाच्या गारीगारी, कुल्फ्या, आईसक्रिम,फालुदा इत्यादी पदार्थ विकले जात. जोडीला लेमनगोळ्या, कलिंगडाच्या खापा लहानमुले विकत असत.बैलगाडयांच्या घाटाजवळ गेल्यावर...एक वेगळेच वातावरण असायचे.सगळीकडे नुसती गर्दी व गोंगाट यांचा कोलाहाल असायचा.
हे पहा सर्व गाडामालकांना नम्र सुचना.कृपया टोकन नंबर प्रमाणे आपापले गाडे जुंपावेत..ग्रामस्थ मंडळी पुढील गाडा जुंपायला मदत करा...घाटात जास्त गर्दी करू नका ...एकदा जुंपलेला गाडा पुन्हा जुंपल्यास स्पर्धेतुन बाद करण्यात येईल...अशा स्पिकरवर सारख्या सुचना चालू असतात......टोकन नंबर बारा..श्री.सोमाजी गोमाजी कापसे यांचा सुटत आहे गाडा...खेड तालुक्याचे प्रगतशिल शेतकरी...डेहणे गावचे सरपंच/पाटील/चेअरमन इत्यादी इत्यादी श्री सोमाजी गोमाजी कापसेssss फार नामांकित बारी आहे बरं का मंडळी ! पहाल तर हसाल नाही तर फसाल. निशान.पडताच भिर्ररररस्स्स्स्स्स
आराराराराssssssझाssssलीsssssssनुसतं.भुंगाटन.सेकंद.. बाsssssराsssss,असे पुकारताच घाटातुन लोक गाड्याच्या पठीमागे पळायचे. काही उत्साही लोक क्षणार्धात बैलांना पकडुन आणायचे. काही बैलगाडे घाट संपल्यावर सुद्धा कितीतरी वेळ पळतच राह्यचे.त्याच्या मागे गाडामालका बरोबर आलेले कार्यकर्ते बैलांना पकडण्यासाठी धावाधाव करायचे.काही बैलगाडे निशान पडताच किंवा घाट संपताच थांबायचे.
कमी सेकंद मध्ये आलेल्या बैलांची सनई.डफडे व ताशाच्या गजरात..भंडार उधळत मिरवणूक वाजत गाजत निघायची. म्हातारे, कोतारे, अबाल, वृध्द देहभान विसरून नाचायचे...काय आनंद होता तो?.असा आनंद आता होणे नाही.
आज एखाद्या वयोवृद्ध माणसाला जरी लाख रुपये मिळाले. तरी तो इतका कधी नाचू शकत नाही.अनेक बैलगाडा मालकांकडे घोड्या होत्या.या घोड्या बैलगाड्याच्या पुढे थोड्या अंतरावर उभी केलेली असे. त्यावर घोडेस्वार बसलेला असे. निशान पडताच ही घोडी वायूवेगाने घाटातून पळत असे. त्यामागे बैलगाडाआसे. हे दृश्य अतिशय जबरदस्त असे.श्वास रोखुन लोक स्पर्था पहात. घोडेस्वरांचे अतिशय कौतुक वाटायचे.
सुत्रसंचालन करणारा,बैलगाडा शर्यती पहायला आलेल्या मान्यवरांचे स्वागत करायला असायचा.श्री.अमुक तमुक यांचे घाटात अगमन झालेले आहे.त्यांचे यात्रा कमिटीच्या वतीने हर्दिक स्वागत...यात्रा कमिटीने आपले स्वागत केल्याचे ऐकल्यावर एखाद्या साधारण माणसाचा उर इंचभर वाढे...तो घरी गेल्यावर पाच पंचवीस लोकांना माझा यात्रा कमेटीने स्वागत केले असे गावभर सांगत सुटे,
बारा वाजे पासून ते संध्याकाळी सुर्य मावळेपर्यंत बैलगाडयांच्या शर्यती चालू असायच्या. संध्याकाळी इनाम वाटप केले जाई. पश्चिम भागात अनेक नामांकित गाडे होते. त्यापैकी कै.नानासाहेब भिकाजी कशाळे माजी जि.प,सदस्य गाव डेहणे कै.सखाराम सावंत,
गणपत गिरजू कशाळे, कै.चिमण श्रीपत कोरडे श्री सितारामशेठ कोरडे (मा.सरपच) गाव डेहणे, पांडू बांगर,भागू बांगर ,मारूती भोपळे,आंबेकर,किसन रंगाजी भालेराव गाव एकलहरे,श्री.धोंडीभाऊ म्हतारबा दरेकर श्री.रामभाऊ सिताराम खामकर कै.दगडू उमाजी खामकर,दगडू भिवाजी वाघमारे- गाव शेंदुर्ली. धोंडू लक्ष्मण शिंदे,विठ्ठल सोळशे गाव वाजळे श्री.जीजाबा आप्पा पौखरकर,किसन धोंडिबा पोखरकर ,राघू हरि पोखरकर सखाराम भिकाजी गाडेकर- गाव वाळद कै.बाजीराव मोरे श्री.ज्ञानदेव काशिनाथ सुरकुले.श्री पुनाजी भागुजी सुपे श्री.शिवराम धोंडिबा पावडे,नथू गणा हुंडारे दत्तात्रय वाडेकर,भिकाजी हुंडारे ,पारूशेठ हुंडारे ,बाबुराव माळी,काशिनाथ माळी ,प्रकाश नागू साबळे ,राम नाईकडे,नानाभाऊ माळी बबुशा पावडे ,विठोबा रामा लांडगे गाव वाडा,गजाबा गिलबीले ,कोयाळी गंगाराम कडलक गाव तिफनवाडी संभाजी रोकडे,कै.सहादू भागू वर्ये,कमा भिमा कोकणे चौधरी गाव साकुर्डी राघू बाळा चिमटे गाव वाशेरे..श्री.धारू कृष्णा गवारी (गुरूजी)गोरेगाव..नामदेव धोंडू मडके,नारायण दुलाजी भवारी गाव धामणगाव बु!! नथू बुरसे - बुरसेवाडी इत्यादी बा-या नामांकित होत्या.
जसे गावागावातून बैलगाडा मालक होते तसेच बैलगागाडा शर्यतींचे अलांउसर (सुत्रसंचालन) करणारे सुद्धा फार प्रसिद्ध होते.श्री.मनोहर दत्तू कोरडे (पोष्टमन) डेहणे श्री दामू लांडगे गाव वाळद कै.कोळेकर (कोये,कुरकुंडी) यांच्या नावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.कोळेकर यांचा आवाज व बैलगाड्यांच्या चकारींचा आवाज एकमेकाशी एकरूप होत असे.व एक वेगळाच नाद असमंत दणानुन सोडे. हा आवाज ऐकताना मन थरारून जाई.अजुनही हा आवाज कित्येकांच्या कानात जसाच्या तसा असेल. विशेषतः विठोबा रामा पावडे यांचा गाडा घाटातुन पळताना लोक झालीssss विठू रामाची बारी असे सगळे ओरडायचे.
तसेच कै.सभाजी रावजी पावडे यांना घाटातील गाडे जुंपन्याचा भलताच शौक होता.व घाटातच त्यांच्या अंगावरून गाडा गेल्याने त्यांना १९७१ साली प्राण गमवावा लागला. त्यांचे स्मारक जुन्या वाड्यात बांधले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा बबुशा संभाजी पावडे यांनीसुद्धा बैलगाडा सुरू ठेवला.
लोकांना जसे बैलगाड्या विषयी आकर्षण होते तसेच बैलगाडयांच्या पुढे पळणा-या घोड्यांबद्दलही होते.कै. बाजीराव मोरे यांच्याकडे एक पांढरी शुभ्र घोडी होती. त्या घोडीवर शक्यतो कोण बसत नसत. ही घोडी बैलगाड्या पुढे पळत असे. बैलातील व घोडीतील अंतर वाढल्यावर ती घोडीआपला वेग कमी करून मागे पाहून पुढे पळत असे.
अनेकांकडे घोड्या होत्या.शेतक-यांनी त्यांच्या बैलावर प्रचंड प्रेम केले,जीव लावला.कित्येकांनी बैलांच्या दशक्रिया केल्या. बैलांचे पोटच्या मुलासारखे लाड केले.हे कुनीही नाकारू शकणार नाही. या बैलगाडा शर्यती हा ग्रामीण भागाच्या यात्रेमधील करमणुकीचा एक अविभाज्य घटक होता. विरंगुळ्याचे महत्त्वाचे साधन होते.या बैलगाडा शर्यतीवर खेडेगावची अर्थव्यवस्था अवलंबून होती.अनेकांचे संसार त्यावर अवलंबून होते. बैलगाड्याशिवाय यात्रा म्हणजे बीनमिठाचा स्वयंपाक असेच म्हणावे लागेल.
मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...