बैलपोळा

बैलपोळा 

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रत्येक खेडेगावात बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आज अनेक जण नोकरीच्या धंद्याच्या निमित्ताने आपल्या गावापासून दूर शहरात कार्यरत आहेत. परंतु जेव्हा बैलपोळा असतो तेव्हा प्रत्येक जनाच्या मनात लहानपणाच्या आठवणी ताज्या होतात.

माझ्याही मनात बैल पोळा या सणाविषयी अनेक आठवणी ताज्या आहेत. पूर्वी एक महिन्यापूर्वी पासूनच बैलपोळा सणाची तयारी सुरू होत असे. 

भाद्रपद महिना संपलेला असे. शेती भाती निसर्गाच्या व पावसाच्या कृपेमुळे उत्तम रीतीने वाढलेली असे.या महिन्यात शेतकऱ्यांना बरीच मोकळीक असते.पूर्वी प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबाकडे बैल जोडी असे. अपवादात्मक परिस्थितीत चार-दोन कुटुंबाकडे बैलजोडी नसायची. श्रावण व भाद्रपद महिन्यात दुपारी जेवण झाले की शेतकरी आपापले बैल घेऊन रानात चारायला घेऊन जायचे. माळावर बैल मस्त चरायचे. काहीजण विशिष्ट प्रकारचे लाकूड तोडून त्यापासून बैलपोळ्याला बैलांना सजवण्यासाठी चौरे बनवायचे. यासाठी खूप दिवस लागायचे.

बैल पोळ्याचा दिवस उजाडायचा.शेतकरी वर्ग सकाळी बैलांना रानात चारायला घेऊन जायचे. सकाळी अकरापर्यंत बैल घरी आणायचे.जेवण केल्यावर गावातील शेतकरी बैलांना नदीवर किंवा ओढ्यावर बैल धुण्यासाठी घेऊन जायचे. आम्ही लहान मुले सुद्धा त्यांच्याबरोबर नदीवर जायचो.

नदीवर गेल्यावर बैलांना छान पैकी घासून-पुसून आंघोळ घातली जायची. गावातील बऱ्याच बैलजोड्या नदीवर आलेल्या असत. त्यांच्याबरोबर गावातील लहान मुले सुद्धा आलेली असत. बैलांना आंघोळ घातल्यावर बैलांच्या शेपटीला धरून नदीतील मोठ्या डोहातून नदीच्या पलीकडे जाण्याची मज्जा खूपच न्यारीअसे.नदीच्या मध्यभागी गेल्यावर घाबरल्यासारखे होई.परंतु काहीही झाले तरी बैलाची शेपटी सोडायची नाही हे आधीच सांगितलेले असे.पलीकडे गेल्यावर खूप आनंद व्हायचा. त्यानंतर परत एकदा बैलाच्या शेपटीला धरून अलीकडे यायचो. बैलांना छानआंघोळ घातल्यामुळे बैल खूप स्वच्छ आणि सुंदर दिसायचे. 

त्यानंतर आमचा ताफा घरी यायचा. बैल पोळा सणाच्या आधी बाजारातून बैल सजवण्यासाठी साहित्य आणले जाई. 

पूर्वी बैलांच्या शिंगांना लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची बेगडे असत.ही बेगडं प्लॅस्टिकची असत.पुढील काळात बेगडांच्या ऐवजी बैलांच्या शिंगांना लावण्यासाठी विशिष्ट प्रकारचे तेल व सोनेरी एकत्र कालवून ती बैलांच्या शिंगांना लावली जाऊ लागली.ही सोनेरी कित्येक दिवस बैलांच्या शिंगांना असायची.

त्याच प्रमाणे चौरे,विविध रंगीबेरंगी गोंडे,बैलांच्या कपाळाला लावण्यासाठी विविध प्रकारची आरशांची.काचांची बाशिंगे मोठ्या हौसेने लोक बाजारातून विकत आणत.काही श्रीमंत शेतकरी बैलांना झुली विकत आणत. या झुली घातल्यावर बैल खूपच सुंदर व रुबाबदार दिसत. विविध प्रकारच्या विविध रंगांच्या मण्यांच्या माळा,म्होरक्या,बैलांच्या नाकात घालण्यासाठी वेसनी, सुंदर आवाजाच्या घंटा, घुंगुरमाळा, बैलांना सजवण्यासाठी विविध प्रकारचे लाल हिरवा निळा पिवळा असे रंग बाजारातुन विकत आणले जाई. हे सर्व साहित्य बैलपोळ्याच्या आधीच बाजारातून विकत आणलेले असे.

नदीवरून बैल आणल्यावर थोडावेळ विश्रांती घेतली जाई. आणि दुपारी तीनच्या दरम्यान बैलांना सजवण्याची लगबग सुरू होई.मोठी माणसे मन लावून बैल सजवण्यासाठी मग्न होत. कुणी बैलांच्या शिंगांना बेगडं लावत. तर कुणी विशिष्ट तेलात सोनेरी कालवून ती बैलांच्या शिंगांना लावत असे.कुणी चौरांना वेगवेगळे रंग लावून ते बैलांच्या शिगांमध्ये अडकवले जात. विविध प्रकारचे गोंडे,बाशिंगे बैलांच्या कपाळावर बांधले जाई,  वेगवेगळ्या रंगांमध्ये हात बुडवून हाताचे पंजे बैलाच्या अंगावर उमटवले जात.

रंग उरला की घरातील पाळीव कुत्र्या- मांंजरांना कोंबड्या चितड्यांना रंग लावला जाई.बाजारातून आणलेल्या घुंगुरमाळा किंवा वेगवेगळ्या रंगाच्या मण्यांच्या माळा बैलाच्या गळ्यात बांधल्या जात.बैलांच्या गळ्यातील घंटा आणि त्याचा आवाज आजही ही माझ्या कानात रुंजी घालतो असा मला आजही भास होतो.

बैलांची मिरवणूक ताशा वादन  




काही श्रीमंत शेतकरी बैलाच्या पाठीवर खूप सुंदर रंगाच्या झुली घालत.त्यामुळे बैल अतिशय सुंदर व रुबाबदार दिसत. त्यानंतर बैलांची गावातील ग्रामदैवताकडे जाण्यासाठी मिरवणूक काढली जाई,काही ठिकाणी ढोल लेझीम तर काही ठिकाणी सनई, चौघडा, धोटा, ताशा, हलगी व संबळ इत्यादी वाद्यांच्या गजरात गावातील सर्व बैलांची मिरवणूक संपूर्ण गावाला वेढा मारून ग्रामदैवताकडे जात असे. त्यावेळचा तो आनंद आजही जसाच्या तसा आठवतो. 

मदिराकडे गेल्यानंतर देवाचे दर्शन घेऊन देवाला नारळ फोडून नारळाची शेरणी सर्वांना वाटली जाई. आणि परत लोक आपापले बैल घेऊन घरी येत. तोपर्यंत रात्र झालेली असे. घरी आल्यावर बैलांचे पाय घरातील सुवासिनी स्रिया धूऊन काढत. बैलाची हळद ,कुंकू ,धूप आणि दीप यासह पूजा केली जाई. बैलांना त्यादिवशी पुरणपोळ्यांचा नैवद्य दाखवला जाई.

 थोडक्यात बैलांना पुरणपोळ्यांचे सुग्रास जेवण दिले जाई. आणि नंतरच घरातील लोक जेवण करत. एकमेकांना आग्रहाने घरी सार,पोळी खाण्यासाठी आमंत्रित केले जाई.लोकही आवडीने एकमेकांच्या घरात पुरणपोळी किंवा सार भात खाण्यासाठी जात असत.गावातील काही ठराविक स्त्रियांच्या हातच्या साराची चव अजूनही काही लोकांच्या स्मरणात असेल. त्याकाळात गावात काही स्त्रिया काही विशिष्ट पदार्थ अशा काही बनवायच्या की ज्याने तो पदार्थ खाल्ला असेल ती चव तो कधीही विसरू शकत नाही.

नायफड या गावातही बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे ग्रामदैवत मुक्ताबाई च्या मंदिराजवळ संपूर्ण गाव व वाड्या वस्त्यांच्या बैलांची मिरवणूक काढली जाई.वेगवेगळ्या गावांचे ताफे आणले जायचे. हे ताफे म्हणजे ताशा, सनई, डफ इत्यादी वाद्य वाजवली जात. 

हे ताफे बघण्यासाठी पश्चिम भागातील सर्व गावचे लोक खच्चून गर्दी करायचे. त्यांच्या स्पर्धा लागत. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाद्यकाम चालू असे. त्यानंतर लोक घरी जाताना कोणता ताफा भारी होता.याबाबत चर्चा चर्वन करूत करत घरी जायचे. त्यावेळी ना गाड्या होत्या ना मोटर सायकल, ना सायकल. सर्व लोक पायी यायचे आणि गप्पा मारत घरी जायचे. 

आता प्रत्येक गावात  गाय ,गावठी गाया इत्यादी पाळीव प्राणी खूपच कमी झाले आहेत.आणि बैल पोळ्याचे महत्व सुद्धा. 

आता लोकांना बैलपोळा कधी येतो आणि कधी जातो हेसुद्धा समजत नाही.पूर्वी कधी कुणी बैल आणला,कुणी गाय आणली  तर  सर्वांना खूप आनंद व्हायचा. 

मी लहानपणी दुसरीला असेल.श्रावण महिना होता.आम्ही सर्व मुले शाळेत होतो. वेळ साधरण दुपारनंतर साडेचारची असेल, गुरुजी पाढे शिकवत होते आणि अचानक कुणीतरी शाळेत सांगायला आले की की रामदासच्या घरी गाय आणली आहे. मला खूप आनंद झाला.

काही मुलांनी गाय पाहण्यासाठी  गुरुजींची  परवानगी मागितली.कारण मी तेव्हा खूपच लहान होतो.गुरुजीं सह आम्ही मुले आमच्या वडिलांनी नवीन आणलेली गाय पाहण्यासाठी गेलो.  तर काय  अंगणात पांढरीशुभ्र  गाय उभी होती,  तिच्याबरोबर छोटे वासरू होते. चार-पाच लोक उभे होते.आई  गाईची पुजा करून औक्षण करीत होती.तेवढ्यात आम्ही तेथे गेलो.

माणसे गप्पा मारत होती.सर्वांना माझ्या हस्ते गुळ वाटप करण्यात आला.गुळ वाटल्यावर बाकीची मुले शाळेत गेली.मी तेथेच थांबलो. त्यानंतर मोठ्या माणसांना चहापाणी झाला घरातील सर्वांना त्यावेळी खूपच आनंद झाला होता,तेव्हाचा आनंद आता कशातच मोजता येणार नाही.काळ बदलला. समाज बदलला."कालाय तस्मै नमः". दुसरं काय?



भजनी भारूड मंडळे

खेड तालुक्यात लग्न समारंभ,यात्रा,सण समारंभ इत्यादीच्या माध्यमातून नेहमीच वाद्यवृंद व ताफे यांचा खुप जवळचा सबंध होता.फार पुर्वी अनेक गावांमध्ये भजनी मंडळे,भारूड मंडळे व तमाशे होते.या सर्वांनी त्याकाळात पुणे जिल्ह्यात नावलौकिक मिळवला होता. 

भजनी भारुड मंडळे

खेड तालुक्यात लग्न समारंभ,यात्रा,सण समारंभ इत्यादीच्या माध्यमातून नेहमीच वाद्यवृंद व ताफे यांचा खुप जवळचा सबंध होता.फार पुर्वी अनेक गावांमध्ये भजनी मंडळे,भारूड मंडळे व तमाशे होते.या सर्वांनी त्याकाळात पुणे जिल्ह्यात नावलौकिक मिळवला होता. 

त्याकाळात प्रत्येक गावात भजनासाठी टाळ,मृदंग,वीणा व चिपळ्या यांचा वापर व्हायचा.प्रामुख्याने ही भजने एकतारी या प्रकारात होती.व तेव्हा ती लोकप्रिय देखील होती.शक्यतो ही भजने रात्रीची होत असत. प्रत्येक गावात तेव्हा आठवडयातुन तीन -चार दिवस तरी भजने व्हायचीच.त्यात खंड पडत नसे.

भजनाचा आवाज ऐकल्यावर खुप लांबचा माणुस सुद्धा भजनाला हजर व्हायचा, त्या नंतर पुढची पिढी आली.काळाच्या ओघात एकतारी भजनाची जागा संगीत भजनाने घेतली.वीणा व चिपळ्यांची जागा पायपेटीने घेतली. तबला व डग्गा आले.खंजीरी,छोटा डफ.अशी अनेक वाद्ये आली.

भजन प्रकारात स्तवन,अभग ,गवळणी व त्यानंतर भैरवी हे प्रकार भजनात रूढ झाले.पुढील काळात विवीध गावांमध्ये भजनाच्या स्पर्धा होऊ लागल्या.एकतारी पेक्षा संगीत भजन ऐकायला गोड असायचे.१९८० व १९९० च्या दशकात संगीत भजने व भारूड मंडळांचा सुवर्ण काळ होता. डेहणे, सोळशेवाडी, मंदोशी, टोकावडे,नायफड इत्यादी भजने आघाडीवर होती. 

भजना प्रमाणेच नायफड नाव्हाचीवाडी संपुर्ण रामायण,सरेवाडी यांचे कृष्णलीला ही भारूडे प्रसिद्ध होती. टोकावडे, धामणगाव, पाभे,तांबडेवाडी,चांदुस,पवळेवाडी,ओझर्डे,कानसे माळवाडी पोखरी इत्यादी भारूडे प्रसिद्ध होती.यामध्ये भारूडाचा मुख्य गुरू कै.श्री विठू नांगरे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
 
विठू नांगरे हे आष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.विठू नांगरे हे भारूडात कोणतेही पात्र लिलया करायचे.राजा,प्रधान,राक्षस किंवा स्रीपात्र ते लिलया करायचे. ते कोणत्याही रोल मध्ये सामावुन जायचे.राक्षसाचे पात्र किंवा निगेटिव्ह रोलमध्ये लोक विशेषतः स्रीया त्या पात्राला शिव्या द्यायच्या.तर करूण स्रीचे पात्र असेल तर लोक रडायचे, हळहळायचे इतकी त्यांच्या पात्रातील संवादफेकीत ताकद होती.

८० व ९०च्या दशकात ज्यांनी भारूडे पाहिली असतील त्यांनी आठवा विठू नांगरे यांचे स्री पात्र स्टेजवर यायचे.नऊवारी लुगडे,अंगात चोळी,हातात बांगड्या,तोंडाला भडक मेकअप केलेला कपाळाला मळवट व डोक्यावर अग्नी व त्यावर भाताचे पातेले ठेवलेले.वाद्याच्या ठेक्यावर विठू नांगरे नाचायचे ते भात शिजेपर्यंत.अक्षरशा डोक्यावर भात शिजवला जायचा.प्रेक्षक थक्क व्हायचे.याच विठू नांगरे यांचा मोर व शिमग्यामध्ये प्रत्येक गावाला मरीआईचा देव्हारा हे सोंग अनेकांच्या स्मरणात असेल.

विठू नांगरे यांच्या प्रमाणेच टोकावडे गावचे पै.कासम तांबोळी हे काय जबरदस्त ताशा वाजवायचे विचारू नका.असा ताशा वादक पुन्हा होणे नाही.डेहणे गावचे बापू गायकवाड यांचा डफ त्याकाळात प्रसिद्ध होता.डफ वाजवायच्या आधी थोडा जाळ करून डफ त्यावर धरला जायचा,डफ हा शक्यतो चामड्यापासुन तयार केलेला असायचा. उष्णतेमुळे चामडे प्रसरण पावायचे व त्यावर थाप मारल्यावर वेगळाच नाद घुमायचा. 

कासम तांबोळी ताशा आणि बापू गायकवाड यांचा डफ हा सामना कित्यकांनी बघितला असेल, दोघे एकमेकांना कमी नव्हते. दोघेही पट्टीचे वादक होते. कोणच कमी नव्हता.त्यांच्या नंतर असा सामना मी तरी अजुन बघितला नाही. बापू गायकवाड हे गावात विवीध कारणांच्या निमित्ताने दवंडी द्यायचे.तेव्हा त्यांचा भारदस्त आवाज सुरूवातीचे व शेवटचे पालपुद व त्यानंतर डफड्याचा आवाज आजही कानात जसाच्या तसा अजुन आहे.

त्याच्या नंतर नारायण व वसंत गायकवाड यांनीही उत्तम डफ वाजवला हे नाकारून चालनार नाही.त्याकाळात वाजंत्री मंडळींना प्रचंड महत्त्व होते सनई, चौघडा ,धोटा, ताशा, ढोलकी, डफ इत्यादी वाद्य वाजवली जात त्यावेळी मंदौशी,  भोरगिरी इत्यादी भागातले वाजंत्री मंडळी अवघ्या पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध होते. त्यांनी भागाचे नाव अखंड पुणे जिल्ह्यात नेण्याचे काम केले. त्यापैकी श्री नामदेव रोकडे, श्री.शिवराम रोकडे, श्री बबन अहिरे.कै.श्रीपत रोकडे कै.शांताराम रोकडे यांचा प्रमुख्याने उल्लेख करावा लागेल. 

श्री नामदेव रोकडे यांचे सनई वादन कोणाच विसरू शकत नाही. त्यांची सनई वर प्रचंड हुकमत होती. त्यामागे प्रचंड कष्ट होते हेही तितकेच खरे. 

1990 च्या दशकात वाजंत्री मंडळी मागे पडली. सन 1990 मध्ये पहिल्यांदा बेंजो पार्टीचा उदय झाला. या बंजो पार्टीत एक बुलबुल नावाचे वाद्य होते. हे वाद्य ब्लेड तारेवर घासून व बोटांनी वाजवण्याचे वाद्य होते. त्याची एक वायर लाऊड स्पीकर च्या कर्णाला जोडलेली असे .

या बुलबुल बरोबर ताशा, कच्ची ,ढोल इत्यादी वाद्य असत. प्रथमता पाभे गावात बॅन्जो पार्टी उदयास आली .या बँजो पार्टीमध्ये बुलबुल वर अनेक त्या काळातील उडती गाणी जवा नविन पोपट हा ,ऑंटी ची घंटी ,ले गई  दिल मेरा मनचली खली वली खली वली इत्यादी गाणी वाजवली जात .त्यामुळे आपोआपच बॅन्जो पार्टी समोर तरुण पोरांचे पाय थिरकू लागले. नाचून नाचून पोरे दमायला होत. 

त्यांना नाचायला उत्साह मिळावा म्हणून लग्नकार्यात ताडी, माडी. व दारू यांचा सर्रासपणे वापर होऊ लागला.आणि आनंद साजरा करायला गेलेला तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी कधी गेला हे कोणाला समजलेच नाही. 

बॅन्जो नंतर डीजे आला आणि पुढे काय झाले हे आपणा सर्वांना माहितच आहे.त्याकाळात श्री दत्तात्रय पंघाजी मिलखे गुरुजी, पेटी मास्तर कै.मुक्ता मदगे गुरुजी, श्री राजू मदगे गुरुजी ,श्री धर्मा तळपे पेटी मास्तर श्री कावळे गुरुजी,श्री सदू मोरमारे श्री अंकूश शिंदे,,श्री भारमळ महाराज,श्री मधुकर कोकणे महाराज, श्री तुकाराम भोकटे गुरुजी, श्री सागर महाराज शिर्के, श्री वामन जढर किर्तनकार अमृता व नम्रता जढर श्री कोथे बुवा, श्री सखाराम उगले,श्री चिंधू वनघरे यांचे पश्चिम भागासाठी नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून योगदान राहिलेले आहे त्यांच्यामुळे भागाचे नाव सर्वदूर पोहोचले.हे मान्य करावेच लागेल.


मुंबई प्रांत ते महाराष्ट्र राज्य निर्मिती

मुंबई प्रांत ते महाराष्ट्र राज्य निर्मिती 

महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे १९६० रोजी झाली.त्यापूर्वी प्रथमता इंग्रजांच्या काळात मुंबई प्रांत अस्तित्वात होता. या मुंबई प्रांताची  स्थापना सन १६१८ रोजी करण्यात आली. मुंबई प्रांताची राजधानी मुंबई होती. मुंबई प्रांताचे प्रशासकीय दृष्ट्या चार विभाग करण्यात आले होते.

) गुजरात विभाग :- गुजरात विभागात मुंबई शहर,अहमद          नगर,भरूच,खेडा,पंचमहल,सुरत,ठाणा,कुलावा व                  रत्नागिरी हे जिल्हे होते. 

२) दख्खन विभाग :- दख्खन विभागात अहमदनगर,खानदेश,       नाशिक, पुणा, सातारा व सोलापूर हे जिल्हे होते.

३) कर्नाटक  विभाग :- कर्नाटक विभागात बेळगाव,विजापूर,         धारवाड व उत्तर कानडा इत्यादी जिल्हे होते. 

४)  सिंध विभाग :- कराची, हैदराबाद, शिकारपुर,धर, पारकर व उत्तर सिंधू इत्यादी जिल्हे होते. 

त्याच प्रमाणे मुंबई प्रांतात कोल्हापूर, अक्कलकोट,औंध, जामखंडी, जंजिरा, कुरुंदवाड, मिरज, मुधोळ, फलटण,  रामदुर्ग, सांगली, डफळापुर, जत, सावंतवाडी, सावनूर आणि भोर इत्यादी संस्थाने  मुंबई प्रांतात होती. 

प्रत्येक विभागाला एक कमिशनर नेमलेला होता. 

त्यांची मुख्यालये कराची,अहमदाबाद,पुणे व बेळगाव येथे होती. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाप्रमुख हा कलेक्टर असून त्याच्या जोडीला असिस्टंट कलेक्टर व डेप्युटी कलेक्टर असायचा. 

प्रत्येक जिल्ह्यात साधारणता आठ तालुके असत. प्रत्येक तालुक्यात शंभर ते दोनशे गावे असत. प्रत्येक गावात पाटील, कुलकर्णी, खोत व तलाठी इत्यादी गाव कारभारी असत. त्यापैकी पाटील हा मुख्य असे. तो गावाची संपूर्ण देखरेख करण्याची जबाबदारी पाटलावर होती. 

त्यानंतर गावातील शेतसारा वसूल करणे शेताची प्रतवारी ठरवणे इत्यादी कामे कुलकर्णी, खोत व तलाठी हे करत.

ब्रिटिश काळात मुंबई प्रांतांचा प्रमुख हा गव्हर्नर असे. मुंबई  प्रांताची भाषा ही मराठी,कन्नड, गुजराती ,सिंधी, उर्दू, इंग्रजी व हिंदी इत्यादी भाषा व पोटभाषा बोलल्या जात. मुंबई प्रांत म्हणजे आताचे गुजरात राज्य.

आताच्या महाराष्ट्रातील पश्चिम विभाग, वायव्य कर्नाटक व पाकिस्तानातील सिंध प्रांत आणि येमेनमधील येडन इत्यादी भाग मिळून मुंबई प्रांताची रचना करण्यात आली होती. 

मुंबई प्रांताच्या प्रथमत १९३७ मध्ये  निवडणुका घेण्यात आल्या. त्यानुसार मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे झाले. त्यांनी १९३७ ते १९३९ पर्यंत कारभार पाहिला.

त्यानंतर १९३९ ते १४ ऑगस्ट १९४७ पर्यंत गव्हर्नर चे शासन होते. 

१५ऑगस्ट १९४७ मध्ये भारत देश स्वतंत्र झाल्यावर मुंबई प्रांत विसर्जीत होऊन नविन मुंबई राज्य अस्तित्वात आले. 

मुंबई राज्यात स्वातंत्र्यपूर्व काळातील मुंबई प्रांताचा प्रदेश हा पाकिस्तानात गेला. कच्च व सौराष्ट्र वगळता उर्वरित गुजरात, कोकण, खानदेश, उत्तर कर्नाटक, आताचा पश्चिम महाराष्ट्र, डेक्कन स्टेट्स एजन्सी, गुजरात स्टेट एजन्सी, कोल्हापूर व बडोदा संस्थान यांचे नवीन मुंबई राज्य निर्माण केले. 

मुंबई राज्यात २८ जिल्हे होते. हे २८ जिल्हे म्‍हणजे अमरेली, बनासकांठा, मेहसाना, अहमदाबाद, साबरकांठा, खेडा ,पंचमहल, बडोदा ,भरूच, सुरत, डांग, पश्चिम खानदेश, पूर्व खानदेश, नाशिक, ठाणा, बृहन्मुंबई, कुलाबा, रत्नागिरी, पुना, अहमदनगर, सोलापूर, उत्तर सातारा ,दक्षिण सातारा, कोल्हापूर, विजापूर, बेळगाव, धारवाड आणि उत्तर कानडा इत्यादी ,

मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत बाळासाहेब खेर हे होते.त्यांनी १९४७ ते १९५२ पर्यंत मुख्यमंत्रीपद भूषविले.

त्यानंतर सन १९५२ ते १९५६पर्यंत दिवंगत मोरारजी देसाई यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. 

त्यानंतर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी १९५६ ते १९६० पर्यंत मुंबई राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. 

मुंबई राज्याचे १९४८ ते १९५२ पर्यंत दिवंगत श्री राजा सर  महाराज सिंह हे गव्हर्नर होते. त्यानंतर  सन १९५२ ते १९५४ पर्यंत दिवंगत श्री.सर गिरीजा शंकर बाजपाई हे गव्हर्नर होते. १९५५ ते १९५६ अखेर दिवंगत श्री.हरेकृष्णा महताब हे गव्हर्नर राहिले. त्यानंतर सन १९५६  ते १९६० पर्यंत दिवंगत श्री. श्री. प्रकाश हे मुंबई राज्याचे शेवटचे गव्हर्नर होते. 

त्यानंतर १९५६ च्या पुनर्रचना नियमानुसार भाषावार प्रांतरचना करण्यात आली.त्यानुसार इसवी सन १९६० मध्ये मुंबई राज्याचे विभाजन करण्यात आले.मुंबई राज्यातील सौराष्ट्र, कच्च व उर्वरित गुजरात यांचे गुजरात राज्य अस्तित्वात आले. 

मुंबई राज्यातील कर्नाटक प्रदेश, बेळगाव, धारवाड, उत्तर कन्नडा हा प्रदेश म्हैसूर राज्याला जोडला गेला.कोकण,आताचा पश्चिम महाराष्ट्र,खानदेश,नाशिक, हैदराबाद राज्यातील मराठवाडा,मध्यप्रदेशातील विदर्भ आणि वऱ्हाड यांचे मिळून मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हे राज्य एक मे १९६० रोजी अस्तित्वात आले. 

आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून दिवंगत  यशवंतरावजी चव्हाण साहेब यांना मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळाला. 



खेड/ शिरूरचे आतापर्यंतचे खासदार

खेड/ शिरूरचे आतापर्यंतचे खासदार 

१९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला.व नेहरू पंतप्रधान जरी झाले असले तरी १९५२ पासुन ख-या अर्थाने प्रत्येक पाच वर्षासाठी लोकसभेच्या निवडणूका घेण्यात आल्या. १९६२ साली खेड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला.

 आर के खाडिलकर 

या मतदारसंघात जुन्नर,आंबेगाव,खेड,मावळ,मुळशी हे तालुके होते. १९६२ साली तिसऱ्या लोकसभेच्या निवडणूका घेण्यात आल्या. या निवडणूकी मध्ये पहिले खेडचे खासदार झाले श्री आर.के.खाडिलकर.ते नारिंगा ता.देवगड जि.रत्नागिरीचे होते. ते निष्णांत वकील होते. १९६२ -१९६७ व १९६७-१९७१ पर्यत खेडचे व त्यानंतर १९७१-१९७७ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातुन ते खासदार झाले.

त्यांनी त्यांच्या कार्यकाळात लोकसभेचे उपसभापती ,पुरवठा, कामगार व पुनर्वसन मंत्री ही पदे भूषवली. ते मूळचे कोकणातील होते त्यांचे निधन १९७९ मध्ये झाले.

अनंतराव पाटील 

१९७१ - १९७७ या पाचव्या  व्या लोकसभेचे श्री.अनंतराव पाटील हे खेडचे खासदार होते.



१९७७ ते १९८० या सहाव्या लोकसभेचे खासदार कै. श्री अण्णासाहेब मगर हे खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते.

अण्णासाहेब मगर

अण्णासाहेब मगर हे पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार व पहिले नगराध्यक्ष देखील होते. त्यांनी सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक सहकार क्षेत्रात भरीव कार्य केले ते 1952 पासून हवेली विधानसभेचे आमदार देखील होते.

 रामकृष्ण मोरे

19८०-१९८४ या या सातव्या लोकसभेचे खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार कै.श्री. रामकृष्ण मोरे हे होते. ते 1984 ते 1989 पर्यंत खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. नंतर ते विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात शालेय शिक्षणमंत्री होते. त्यांचे पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेवर  निर्विवाद वर्चस्व होते.ते हवेली तालुक्यातील देहू या गावचे होते.

1984  स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या.त्यावेळी श्री शरद पवार हे समाजवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. समाजवादी काँग्रेस आणि जनता दल यांची युती झाली होती. श्री शरद पवार हे बारामती मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार होते. त्यावेळी बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी श्री.संभाजीराव काकडे हे इच्छुक होते.

परंतु समाजवादी काँग्रेस आणि जनता दल यांची युती झाल्यामुळे संभाजीराव काकडे यांना खेड लोकसभेची जागा सोडण्यात आली. श्री संभाजीराव काकडे यांना खेड आंबेगाव जुन्नर या भागात मानणारा समाज होता. श्री संभाजीराव काकडे यांना सर्वजण लाला म्हणायचे.श्री.शरदराव पवार साहेब यांच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी मंचर येथे शरद बँकेची स्थापना केली.तर मंचर येथेच श्री संभाजीराव काकडे यांच्या समर्थकांनी कै. श्री. किसनराव बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली लाला अर्बन बँकेची स्थापना केली होती.किसनराव बाणखेले हे श्री संभाजीराव काकडे यांना गुरु मानत.

 किसनराव वानखेले

या निवडणुकीत रामकृष्ण मोरे विरुद्ध संभाजीराव काकडे यांची निवडणूक प्रचंड चुरशीची झाली. शेवटच्या फेरीपर्यंत कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. परंतु अवघ्या सोळा हजार मतांनी रामकृष्ण मोरे विजयी झाले. रामकृष्ण मोरे हे याआधी खासदार होते. त्यांच्याकडे पैसा होता. परंतु संभाजीराव काकडे यांच्याकडे या दोन्ही बाबी नव्हत्या.हे प्रामुख्याने लक्षात घ्यावे लागेल.

पुढे नवव्या लोकसभेची निवडणूक घेण्यात आली. खेड लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे रामकृष्ण मोरे व जनता दलाचे श्री संभाजीराव काकडे यांचे पट्टशिष्य कै.श्री. किसनराव बाणखेले हे निवडणुकीसाठी उभे होते. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा तो सामना होता.

त्यावेळी किसनराव बाणखेले यांची ही निवडणूकीसाठी अक्षरशः लोकांनी वर्गणी काढून प्रचार केला. त्यावेळी श्री शरद पवार साहेब हे काँग्रेसमध्ये होते. त्यांनी जाणीवपूर्वक काँग्रेसचे उमेदवार रामकृष्ण मोरे यांच्याकडे दुर्लक्ष केले. या निवडणुकीत कै.किसनराव बाणखेले यांनी त्यांचे गुरु संभाजीराव काकडे यांच्या पराभवाचा वचपा काढला. व नवव्या खेड लोकसभा मतदार संघाचे खासदार झाले.

श्री किसनराव बाणखेले हे आंबेगाव तालुक्यातील मंचर या गावचे होते ते पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य देखील होते. त्यांनी तीन वेळा आंबेगाव विधानसभेचे नेतृत्व केले. त्यावेळी सगळी कडे धोतर गेलं दिल्लीला असे जिकडेतिकडे म्हटले जायचे. पहिल्यांदाच खेड लोकसभा मतदारसंघ काँग्रेस कडून जनता दला कडे गेला. किसनराव बाणखेले १९८९-१९९१ पर्यंत खासदार होते.

 विदुरा नवले 

दहाव्या लोकसभा मतदारसंघाचे १९९१-१९९६ या काळात थेट लोकसभा मतदारसंघाचे श्री विदुरा उर्फ नानासाहेब नवले हे खासदार होते. ते संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी खूप वर्ष होते. ते मुळशी तालुक्यातील होते.

 निवृत्ती शेठ शेरकर 

त्यानंतर १९९६ ते १९९८ या कालावधीत खेड लोकसभा मतदारसंघाचे श्री निवृत्तीशेठ शेरकर खासदार होते. ते जुन्नर तालुक्यातील शिरोली गावचे होते. ते बरेच वर्ष विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते.

अशोकराव मोहोळ 

त्यानंतर १९९८ ते १९९९ पर्यंत खेड लोकसभा मतदार संघाचे श्री.अशोकराव मोहोळ खासदार झाले. ते देखील मुळशी तालुक्यातील होते. 

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर लगेच लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणूका घेण्यात आल्या. १९९९ ते २००४ पर्यंत खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार पुन्हा श्री अशोकराव मोहोळ विजयी झाले. 

त्यानंतर २००४ ते २००९ मध्ये शिवसेनेचे श्री शिवाजीराव आढळराव पाटील हे खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले.ते आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील आहेत. त्यांचे  प्रतिस्पर्धी  उमेदवार श्री अशोक मोहोळ हे होते.

सन २००९ नंतर खेड लोकसभा मतदार संघ संपुष्टात आला. व शिरूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड ,शिरूर, भोसरी व हडपसर इत्यादी भाग सामाविष्ट करण्यात आला, 

 शिवाजीराव आढळराव 

सन २००९ ते २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत श्री शिवाजीराव आढळराव पाटील हे दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी होते राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री विलास लांडे. 

त्यानंतर २०१४ ते २०१९ साठी पुन्हा लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत पुन्हा तिसऱ्यांदा शिवसेनेचे श्री शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पदावर निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी होते राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री देवदत्त निकम. 

संपूर्ण मतदारसंघात प्रत्येक गाव आणि गाव पिंजून काढणारे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील ते एकमेव खासदार असावेत. त्यांच्या काळात खूपच विकास कामे झाली. त्यांनी अगदी वैयक्तिक निधी देऊन विकास कामे केली.

अमोल कोल्हे

सन २०१९ ते २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत श्री अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले, त्यांनी विद्यमान लोकसभेचे खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.

 त्यानंतर पुन्हा 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव करून पुन्हा लोकसभेचे खासदार झाले.

 रामदास तळपे 



शेतीची राखणी

 शेतीची राखणी 

जुन महिन्यात अनेक शेतकरी ज्या भागात खूप पाऊस पडतो त्या ठिकाणी भात लागवड करतात.ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी भुईमूग, बटाटा, बाजरी,ज्वारी यांची लागवड केली जाते. चांगला पाऊस झाल्याने पिकांची जोमदारपणे वाढ होते.शेतकरी राजा यावर्षी चांगले पीक येणार म्हणून आनंदात असतो.

जोमदार पिकांची मग निंदणी केली जाते.काही ठिकाणी याला बेननी असेही म्हणतात. निंदणी करणे म्हणजे शेतातील पिकांमधील अनावश्यक गवत,त्याला तण असे म्हणतात. ते काढले जाते.गावातील स्त्रियांचा ग्रुप बनवतात.आणि प्रत्येकाच्या शेतात पाच- सहा बायका सकाळी जेवण वगैरे करून शेतात खुरपे घेऊन जातात.आणि शेतातील अनावश्यक गवत काढतात. हे गवत काढत असताना अनेक प्रकारच्या गप्पा मारत हसत खेळत काम करतात. कुणी अवनी करा कुणी बेननी करा,गुरांना होईल चारा. हे गाणे यातूनच कवीने लिहिले असावे.अशाप्रकारे एकमेकांच्या शेतांची निंदणी केली जाते. ही कामे शक्यतो श्रावण,भाद्रपद महिन्यात चालतात. 

श्रावण महिना हा उपवासाचा महिना असतो. श्रावण महिन्यात शक्यतो मेहनतीची कामे तुलनेने कमी असतात.अनेक घरांमध्ये धार्मिक वातावरण असते.पोथ्या पुराणे वाचली जातात.वृत्त वैकल्ये केली जातात.उपास-तापास धरतात त्यामुळे संध्याकाळी उपवासाच्या दिवशी डाळ भात ,भाजी चपाती, आळुच्या वड्या, तव्यावरची भजी, लसणाची चटणी,लोणचे, पापड कधी कधी मासवड्या पुरणपोळ्या, खीर,बासुंदी यांची रेलचेल असते.

घरातील पुरुष मंडळींना जनावरांसाठी चारा कापून आणणे, जनावरे सांभाळणे. इत्यादी कामे असतात.जोमदार पिके आल्यामुळे शेतकरी राजा आनंदात असतो.आपल्या शेतातील भात, भुईमूग, बटाटे या पिकांना रानटी जनावरांनी उपद्रव करू नये म्हणून अनेक प्रकारे राखण केली जाते.

पूर्वी आम्ही शेतातील उंच जागेवर चार बाजूला चार लाकडे जमिनीत रोवून मांडव तयार करायचो. त्यावर लाकडी फळ्या अंथरून त्यावर चार-पाच जण झोपतील अशी रचना करायचो.  त्यावर पुन्हा मांडव बनवून सर्व बाजू वाळलेल्या गवताने बंदिस्त करायचो.पुढे आत जायला जागा असायची. मांडवावरील उंच असणाऱ्या मचानात जाण्यासाठी लाकडी शिडीचा उपयोग केला जायचा.या मचानात बसून आजूबाजूचा परिसर व हिरवेगार शेत पाहायचा आनंद खूप वेगळा असायचा.आम्ही सुट्टीच्या दिवशी या मांडवात अभ्यास करायचो. रात्री मांडवातील मचानावर  झोपायला जाण्यासाठी लहान मुले हट्ट करायची.

रात्रीची जेवण खाणे झाल्यानंतर एकेकजण जमायचे. कुणाकडे तरी बॅटरी असायची.बॅटरीचे त्यावेळी अनेक प्रकार असायचे,दोन सेलची बॅटरी, तींनसेलची बॅटरी, पाच सेलची बॅटरी.बॅटरी ही स्टीलची लांबट असायची आणि त्यामध्ये एव्हरेडी कंपनीचे सेल असायचे. हे असेल ना लोक मसाला बोलायचे.सेल मधील मसाला संपल्यानंतर पखवाजाच्या वादी खाली हे सेल लावले जायचे.असा त्याचा दुहेरी उपयोग असायचा.

बॅटरी नसेल तर कंदील हा हमखास असायचा.कंदील घेऊन संध्याकाळी राखणावर जायचो.रिमझिम पाऊस चालू असायचा.ओढे-नाले वाहत असायचे,त्यांचा खळखळाट व रातकिड्यांची किरकिर यांचा एक वेगळाच आवाज रात्रीच्या अंधारात यायचा, परंतु दोन-चार जण असल्यामुळे गप्पांच्या नादात त्याचे काहीच वाटायचे नाही, मांडवा जवळ आल्यावर शिडीवर चढून मांडवातील मचानावर  प्रवेश केला जायचा.

मांडवातील फळ्यांवर भाताचा पेंढा अंथरला जायचा, त्यावर पोती (गोणपाट) अंथरली जायची.त्यावर दोन-तीन गोधड्या  अंथरून बिछाना बनवला जायचा. मांडवावर चढून गेल्यावर काहीजण मोठ्यामोठ्याने हळी द्यायचे. कारण पिकांना उपद्रव देण्यासाठी रानडुकरे,रानटी ससे, खोकड ,साळू,उदमांजरे हे प्राणी शेतात यायचे. आणि शेताची नासधूस करायचे. त्यासाठी मोठ्यामोठ्याने आरोळ्या दिल्या जायच्या, प्रसंगी सुतळी फटाके वाजवले जायचे.काही ठिकाणी पत्र्याचा डबा शेतामधील खांबाला बांधून त्यामध्ये घंटीला जशी लाळ असते तसे एक छोटे लाकुड बांधून त्याला दोरी बांधायची,ती दोरी मांडवा पर्यंत असायची. व मांडवात बसून दोरी ओढल्यावर पत्र्याचा डबा वाजायचा. त्यामुळे शक्यतो रानटी जनावरापासून शेतांचे रक्षण व्हायचे.

मांडवात गेल्यावर एका ठिकाणी कंदील लावायचा.पत्त्यांचा कॅट काढायचा.चौघा जणांमध्ये मेंढीकोट किंवा हाथ हाथ असे पत्त्यातील खेळातील प्रकार खेळले जायचे.या खेळामध्ये खूपच मजा यायची. बराच वेळ पत्त्यांचा डाव चालायचा. परंतु हा डाव कधीच पैशावर खेळायला जायचा नाही. फक्त आनंद म्हणून खेळला जायचा.पत्ते खेळून झाल्यावर मोठ्यामोठ्याने दोरी ओढून डब्बा वाजवला जायचा. शिवारातील दुरच्या राखनदारांना हाळी देऊन ते जागे आहेत काय? याची खात्री करायची. शेतात एक फेरफटका मारायचा. दोन -तीन सुतळी फटाके वाजवले जायचे. नंतर मांडवात झोपी जायचे. कधीतरी रात्री उठून पुन्हा डब्बा वाजवला जायचा. 

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे जाग यायची. बाहेर रिमझिम पाऊस चालू असायचा.किंवा आभाळ स्वच्छ व निरभ्र असायचे. सकाळी उठून मग आपापल्या घरी जायचे. अशाप्रकारे महिना-दीड महिना राखणे चालायची.

राखणे जशी पावसाळ्यात असायची तशीच उन्हाळ्यात देखील असायची उन्हाळ्यात बटाटे,हरभरा,वटाणा ,गहू यासाठी राखण करायला लागायचे. राखणाला रात्री गेल्यानंतर वटाणा, हरभरा व गहू यांचा हुळा केला जायचा.मांडवा जवळच्या मोकळ्या जागेत रानातील वाळलेल्या काटक्या एकत्र करून त्या पेटवायच्या. व त्यावर हरभरा, वाटाणा किंवा गव्हाच्या ओंब्या  त्या जाळावर धरून भाजला जायचा. चांगल्या प्रकारे भाजल्यावर काटक्या विझवून तेथेच  चार-पाच जणांनी गरम हुळा खायचा. त्याची चव अप्रतिम असायची. कधीकधी हरभरा म्हणून गरम खडा तोंडात जायचा.जीभ भाजायची.हुळा खाताना अनेक गप्पागोष्टी व्हायच्या. इकडच्या तिकडच्या गप्पा हुळ्या बरोबर चघळल्या जायच्या. 

आता आपण नोकरीच्या निमित्ताने दूर शहरात राहतो. काहीजण बंगल्यात तर काही स्वतःच्या फ्लॅटमध्ये खोल्यांमध्ये राहतात परंतु शेतातील रात्री मित्रांबरोबर मांडवात झोपणे, पत्ते खेळणे, पत्र्याचा डबा वाजवणे, सुतळी फटाके फोडणे चार जिवलग मित्रांशी गप्पागोष्टी करणे टिंगल-टवाळी करणे ,हुळा खाणे, यासारखा आनंद कशातच नाही. हे मात्र खरे .हा आनंद लाख रुपये देऊनही परत मिळणार नाही हेही तितकेच खरे. आता  राहिल्या आहेत त्या फक्त आठवणी.





गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस