शेतीची राखणी

 शेतीची राखणी 

जुन महिन्यात अनेक शेतकरी ज्या भागात खूप पाऊस पडतो त्या ठिकाणी भात लागवड करतात.ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी भुईमूग, बटाटा, बाजरी,ज्वारी यांची लागवड केली जाते. चांगला पाऊस झाल्याने पिकांची जोमदारपणे वाढ होते.शेतकरी राजा यावर्षी चांगले पीक येणार म्हणून आनंदात असतो.

जोमदार पिकांची मग निंदणी केली जाते.काही ठिकाणी याला बेननी असेही म्हणतात. निंदणी करणे म्हणजे शेतातील पिकांमधील अनावश्यक गवत,त्याला तण असे म्हणतात. ते काढले जाते.गावातील स्त्रियांचा ग्रुप बनवतात.आणि प्रत्येकाच्या शेतात पाच- सहा बायका सकाळी जेवण वगैरे करून शेतात खुरपे घेऊन जातात.आणि शेतातील अनावश्यक गवत काढतात. हे गवत काढत असताना अनेक प्रकारच्या गप्पा मारत हसत खेळत काम करतात. कुणी अवनी करा कुणी बेननी करा,गुरांना होईल चारा. हे गाणे यातूनच कवीने लिहिले असावे.अशाप्रकारे एकमेकांच्या शेतांची निंदणी केली जाते. ही कामे शक्यतो श्रावण,भाद्रपद महिन्यात चालतात. 

श्रावण महिना हा उपवासाचा महिना असतो. श्रावण महिन्यात शक्यतो मेहनतीची कामे तुलनेने कमी असतात.अनेक घरांमध्ये धार्मिक वातावरण असते.पोथ्या पुराणे वाचली जातात.वृत्त वैकल्ये केली जातात.उपास-तापास धरतात त्यामुळे संध्याकाळी उपवासाच्या दिवशी डाळ भात ,भाजी चपाती, आळुच्या वड्या, तव्यावरची भजी, लसणाची चटणी,लोणचे, पापड कधी कधी मासवड्या पुरणपोळ्या, खीर,बासुंदी यांची रेलचेल असते.

घरातील पुरुष मंडळींना जनावरांसाठी चारा कापून आणणे, जनावरे सांभाळणे. इत्यादी कामे असतात.जोमदार पिके आल्यामुळे शेतकरी राजा आनंदात असतो.आपल्या शेतातील भात, भुईमूग, बटाटे या पिकांना रानटी जनावरांनी उपद्रव करू नये म्हणून अनेक प्रकारे राखण केली जाते.

पूर्वी आम्ही शेतातील उंच जागेवर चार बाजूला चार लाकडे जमिनीत रोवून मांडव तयार करायचो. त्यावर लाकडी फळ्या अंथरून त्यावर चार-पाच जण झोपतील अशी रचना करायचो.  त्यावर पुन्हा मांडव बनवून सर्व बाजू वाळलेल्या गवताने बंदिस्त करायचो.पुढे आत जायला जागा असायची. मांडवावरील उंच असणाऱ्या मचानात जाण्यासाठी लाकडी शिडीचा उपयोग केला जायचा.या मचानात बसून आजूबाजूचा परिसर व हिरवेगार शेत पाहायचा आनंद खूप वेगळा असायचा.आम्ही सुट्टीच्या दिवशी या मांडवात अभ्यास करायचो. रात्री मांडवातील मचानावर  झोपायला जाण्यासाठी लहान मुले हट्ट करायची.

रात्रीची जेवण खाणे झाल्यानंतर एकेकजण जमायचे. कुणाकडे तरी बॅटरी असायची.बॅटरीचे त्यावेळी अनेक प्रकार असायचे,दोन सेलची बॅटरी, तींनसेलची बॅटरी, पाच सेलची बॅटरी.बॅटरी ही स्टीलची लांबट असायची आणि त्यामध्ये एव्हरेडी कंपनीचे सेल असायचे. हे असेल ना लोक मसाला बोलायचे.सेल मधील मसाला संपल्यानंतर पखवाजाच्या वादी खाली हे सेल लावले जायचे.असा त्याचा दुहेरी उपयोग असायचा.

बॅटरी नसेल तर कंदील हा हमखास असायचा.कंदील घेऊन संध्याकाळी राखणावर जायचो.रिमझिम पाऊस चालू असायचा.ओढे-नाले वाहत असायचे,त्यांचा खळखळाट व रातकिड्यांची किरकिर यांचा एक वेगळाच आवाज रात्रीच्या अंधारात यायचा, परंतु दोन-चार जण असल्यामुळे गप्पांच्या नादात त्याचे काहीच वाटायचे नाही, मांडवा जवळ आल्यावर शिडीवर चढून मांडवातील मचानावर  प्रवेश केला जायचा.

मांडवातील फळ्यांवर भाताचा पेंढा अंथरला जायचा, त्यावर पोती (गोणपाट) अंथरली जायची.त्यावर दोन-तीन गोधड्या  अंथरून बिछाना बनवला जायचा. मांडवावर चढून गेल्यावर काहीजण मोठ्यामोठ्याने हळी द्यायचे. कारण पिकांना उपद्रव देण्यासाठी रानडुकरे,रानटी ससे, खोकड ,साळू,उदमांजरे हे प्राणी शेतात यायचे. आणि शेताची नासधूस करायचे. त्यासाठी मोठ्यामोठ्याने आरोळ्या दिल्या जायच्या, प्रसंगी सुतळी फटाके वाजवले जायचे.काही ठिकाणी पत्र्याचा डबा शेतामधील खांबाला बांधून त्यामध्ये घंटीला जशी लाळ असते तसे एक छोटे लाकुड बांधून त्याला दोरी बांधायची,ती दोरी मांडवा पर्यंत असायची. व मांडवात बसून दोरी ओढल्यावर पत्र्याचा डबा वाजायचा. त्यामुळे शक्यतो रानटी जनावरापासून शेतांचे रक्षण व्हायचे.

मांडवात गेल्यावर एका ठिकाणी कंदील लावायचा.पत्त्यांचा कॅट काढायचा.चौघा जणांमध्ये मेंढीकोट किंवा हाथ हाथ असे पत्त्यातील खेळातील प्रकार खेळले जायचे.या खेळामध्ये खूपच मजा यायची. बराच वेळ पत्त्यांचा डाव चालायचा. परंतु हा डाव कधीच पैशावर खेळायला जायचा नाही. फक्त आनंद म्हणून खेळला जायचा.पत्ते खेळून झाल्यावर मोठ्यामोठ्याने दोरी ओढून डब्बा वाजवला जायचा. शिवारातील दुरच्या राखनदारांना हाळी देऊन ते जागे आहेत काय? याची खात्री करायची. शेतात एक फेरफटका मारायचा. दोन -तीन सुतळी फटाके वाजवले जायचे. नंतर मांडवात झोपी जायचे. कधीतरी रात्री उठून पुन्हा डब्बा वाजवला जायचा. 

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे जाग यायची. बाहेर रिमझिम पाऊस चालू असायचा.किंवा आभाळ स्वच्छ व निरभ्र असायचे. सकाळी उठून मग आपापल्या घरी जायचे. अशाप्रकारे महिना-दीड महिना राखणे चालायची.

राखणे जशी पावसाळ्यात असायची तशीच उन्हाळ्यात देखील असायची उन्हाळ्यात बटाटे,हरभरा,वटाणा ,गहू यासाठी राखण करायला लागायचे. राखणाला रात्री गेल्यानंतर वटाणा, हरभरा व गहू यांचा हुळा केला जायचा.मांडवा जवळच्या मोकळ्या जागेत रानातील वाळलेल्या काटक्या एकत्र करून त्या पेटवायच्या. व त्यावर हरभरा, वाटाणा किंवा गव्हाच्या ओंब्या  त्या जाळावर धरून भाजला जायचा. चांगल्या प्रकारे भाजल्यावर काटक्या विझवून तेथेच  चार-पाच जणांनी गरम हुळा खायचा. त्याची चव अप्रतिम असायची. कधीकधी हरभरा म्हणून गरम खडा तोंडात जायचा.जीभ भाजायची.हुळा खाताना अनेक गप्पागोष्टी व्हायच्या. इकडच्या तिकडच्या गप्पा हुळ्या बरोबर चघळल्या जायच्या. 

आता आपण नोकरीच्या निमित्ताने दूर शहरात राहतो. काहीजण बंगल्यात तर काही स्वतःच्या फ्लॅटमध्ये खोल्यांमध्ये राहतात परंतु शेतातील रात्री मित्रांबरोबर मांडवात झोपणे, पत्ते खेळणे, पत्र्याचा डबा वाजवणे, सुतळी फटाके फोडणे चार जिवलग मित्रांशी गप्पागोष्टी करणे टिंगल-टवाळी करणे ,हुळा खाणे, यासारखा आनंद कशातच नाही. हे मात्र खरे .हा आनंद लाख रुपये देऊनही परत मिळणार नाही हेही तितकेच खरे. आता  राहिल्या आहेत त्या फक्त आठवणी.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस