१९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाचे सावट अजूनही पुरते ओसरले नव्हते. १९७३ वेळेवर पाऊस पडला. आणि लोकांच्या जीवात जीव आला. शेतीची कामे पुर्वी सारखी सुरू झाली. परंतु दुष्काळ हा फक्त एक वर्षा पुरता होता. परंतू दुष्काळा पेक्षा महाभयंकर संकट ग्रामीण भागावर येणार आहे. याची पुसटशी कल्पना देखील कुणाला नव्हती.
१९७२ मध्ये रोजगार हमी मधून ठराविक गावोगावी कच्चे रस्ते झाले.परंतु त्या काळात कोणाकडे साधी सायकल देखील कोणाकडे नव्हती.
त्याच वेळी चाकण, राजगुरूनगरच्या व्यापा-यांनी किटाचा व्यवसाय सुरू केला. किटाचा व्यवसाय म्हणजे जंगलातील मोठी मोठी झाडे तोडून तेथेच कोळशाच्या भट्ट्या लावायच्या. व तयार कोळसा व मोठया झाडांचे ओडके वखारीत नेऊन होलसेल विकायचे. यालाच किटाचा व्यवसाय असे म्हणतात.
गरीब लोक आपल्या रानातील मोठी मोठी झाडे प्रापंचिक गरजेपायी कवडीमोल भावाने विकू लागले. व्यापारी निरक्षरतेचा आणि गरीबीचा फायदा घेऊन कवडीमोल भावाने लाकडांची खरेदी करून लोकांच्या गरिबीचा,निरक्षरतेचा असाहयतेचा फायदा घेऊन पिळवणुक करत असे. लोकांना दुसरा पर्याय नव्हता.
वनखाते आधीच लाचार झाल्याने मुग गिळून उघड्या डोळ्यांनी सूरू असणारी वृक्षतोड पहात होते. त्याकाळी प्रचंड वृक्षतोड झाली. जंगलेच्या जंगले ओसाड पडली.त्या काळात जंगल तोड केल्यावर कोळसा तयार करण्यासाठी मोठमोठया भट्टया लावाव्या लागत. हे काम आपल्या भागातील लोकांना येत नव्हते.
हे काम त्याकाळी कोकणातील कातकरी ही जमातच करत असे. मग ह्या व्यापा-यांनी ब-याच कातक-याना कोळशाच्या भट्ट्या लावण्यासाठी कोकणातून देशावरील ग्रामीण भागात आणले गेले.
कातकऱ्यांचा कोळशाच्या भट्ट्या लावण्यात हातखंडा होता. त्यांना मदतीसाठी वृक्षतोडीसाठी स्थानिक लोक मदत करायचे. दिवसभर काम करून कातकरी लोक दमून जायचे. कातकऱ्यांना दररोज संध्याकाळी कष्टाची कामे संपल्यावर हातभट्टीची दारू लागायची.
त्यासाठी ते स्वतः हातभट्टीची दारू काढायचे. दररोज संध्याकाळी दारू प्यायचे व विडया ओढायचे. असा त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा.
स्थानिक लोकही नंतर कामाच्या नादात कातक-यांकडून विडी ओढू लागले. व हळूहळू काहीजण दारूही प्यायला शिकले. परंतू तेव्हा दररोज काही कुणी दारू पित नसत. कधीतरी चोरून कुणाला कळनार नाही अशा पध्दतीने कपभर घेतली जाई.
नंतर दोन तीन कांदे खाल्ले जात. त्यावेळी दारू पिणे म्हणजे फार मोठा गुन्हा समजत. हा किटाचा व्यवसाय साधारणपणे १९८२ पर्यंत चालू होता. त्यानंतर किटाचा व्यवसाय व कोळशाच्या भट्या बंद झाल्या.
कोकणातून आलेले कातकरी एव्हाना बऱ्यापैकी स्थायिक झाले होते. आता ते पुन्हा कोकणात जाऊ शकत नव्हते. या कातकार्यांना ना जमिनी ना काही. त्यामुळे ओढ्या नाल्यांतून आणि नदीमधून मासेमारी करून हे मासे गावागावातून झाडाच्या पानावर स्थानिक गावक-यांना विकले जाऊ लागले.
त्याकाळी लोकांकडे पैसा नव्हता. त्यामुळे हे मासे लोक आपल्याकडील भात, धान्य देऊन त्याबदल्यात मासे घेत. यावरच कातकऱ्यांचा उदरनिर्वाह चालत असे.
जोडीलाच त्यांनी हातभट्टीची दारू गाळणे हा छोटासा उद्योग सुरू केला. व हळूहळू लोक दारू पिण्यासाठी कातकऱ्यांकडे जाऊ लागले. लवकरच कधीतरी दारू पिणार यांचे दररोज दारू पिण्यात रूपांतर झाले.पुढे दारूचे व्यसन लागले.
या व्यसनापायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. ऐन चाळीशीत अनेक दारूडे कैलासवासी झाले. आणि त्यांची मुलेबाळे बायका पोरे रस्त्यावर आली. संसार उध्वस्त झाले.
त्यावेळी लागलेल्या किडीने आता अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. अनेक लोक म्हणतात समाज सुधारला पाहिजे, साक्षरतेचे प्रमाण वाढले पाहिजे. मंदिरे झाली पाहिजेत. रस्ते झाले पाहिजे. बंधारे झाले पाहिजेत. शाळा सुधारल्या पाहिजेत. विद्यार्थी घडले पाहिजेत.
परंतु ही व्यसनाधिनता कमी केली पाहिजे, त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, आपल्या भागात व्यसन मुक्त केंद्र झाले पाहिजे. असे कुणीही म्हणत नाही. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल...
यासाठी अनेक समाजसेवकांनी पुढे येण्याची गरज आहे. सरकार दरबारी पाठपुरावा केला पाहिजे. वर्गण्या व देणग्या गोळा करून आपल्या भागात व्यसनमुक्ती केंद्र चालवण्याची नितांत गरज आहे एवढं मात्र खरं..
रामदास तळपे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा