भीमाशंकर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून ते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. राजगुरुनगर पासून साठ किलोमीटर अंतरावर भोरगिरी गावच्या हद्दीत हे मंदिर आहे.
भीमाशंकरला जाण्यासाठी राजगुरुनगर मार्गे वाडा,डेहणे,मंदोशी,तळेघर या मार्गे जाता येते. राजगुरुनगर भोरगिरी पर्यंत डांबरी रस्ता आहे. काही हौशी पर्यटक भोरगिरी येथे गाड्या पार्क करून पाय वाटेने भोरगिरी ते भीमाशंकर हा पाच किलोमीटरचा टप्पा पार करतात. आपल्या गाड्या पार्क करून पाय वाटेने निसर्गाच्या सानिध्यातुन भिमाशंकरला जाता येते.
भोरगिरी ते भीमाशंकर हा मार्ग साधारण पाच किलोमीटर आहे.भीमाशंकर येथून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी या ठिकाणी उगम पावते. भीमाशंकर हे तीर्थक्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. हे जंगल सदाहरित अरण्यां पैकी एक आहे. यालाच डाकिनीचे वन असेही म्हटले जाते.
भीमा नदी उगमस्थान
१९८५ साली महाराष्ट्र शासनाने हे अरण्य अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या अभयारण्यात बिबट्या,उदमांजर, ससा, रान मांजर,रान डुक्कर ,सांबर, भेकर , कोल्हा, लांडगा, तरस चितळ, काळवीट, मुंगूस, विविध जातीचे साप इत्यादी प्रकारचे प्राणी आढळतात.
या जंगलातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू हा होय. यालाच उडणारी खार असेही म्हटले जाते.
शेकरू हे तांबूस रंगाचे असून ते फक्त भीमाशंकर अभयारण्यात पाहायला मिळते. अभयारण्य आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असल्याने भीमाशंकर हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.
महाराष्ट्राची उडती खार म्हणजेच शेकरू
या ज्योतिर्लिंगा पासून पूर्वेला पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नदी भीमा ही उगम पावते. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे. भीमाशंकर मंदिर हेमांडपंथी पद्धतीचे असून ते पेशव्यांच्या काळात नानासाहेब फडणवीस यांनी बांधलेले आहे.
हे मंदिर साधारण सतराव्या शतकात बांधलेले आहे. पूर्वीचे मंदिर अतिशय साधे असे होते. मुख्य मंदिरासमोरील सभामंडपाचे काम हे साधारण १९८१ ते १९८५ या काळात केलेली आहे. नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर समोरून बघता येत नाही.
भीमाशंकर मंदिर
मंदिराचा भव्य सभामंडप उंच कळस हे प्रमुख आकर्षण आहे. समोर दोन पाण्याची कुंड असुन पुर्वी भीमाशंकरला आल्यावर या कुंडात स्नान करूनच भीमाशंकराचे दर्शन घेतले जाई. परंतु आता स्नान करण्यास बंदी आहे.
शेजारी दुसरे कुंड सुद्धा आहे 1991 साली या कुंडाच्या तळातील गाळ काढला असता त्यामध्ये अनेक प्राचीन नाणी सापडली. ही नाणी यादव काळापासून असल्याचे पाहायला मिळाले. पूर्वी लोक दर्शनाला आल्यावर कुंडात काही पैसे टाकायचे. त्यामुळे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे.
याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज हे भीमाशंकरला दर्शनासाठी आल्याच्या इतिहासात नोंदी आहेत.
नवनाथांपैकी सर्व नाथ भीमाशंकराच्या दर्शनाला आलेले आहेत. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील याठिकाणी दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत.
वसईचे युद्ध जिंकल्यावर तेथील चर्चमध्ये असलेली भव्य घंटा चिमाजी आप्पा पेशवे यांनी याठिकाणी आणलेली आहे. मंदिराच्या सभामंडपात समोरील बाजूस ही घंटा बांधलेली असून या घंटेवर १७२९ अशी नोंद आहे.
मंदिराच्या दक्षिणेला दोन किलोमीटर अंतरावर गुप्त भीमाशंकर आहे. भीमा नदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगा मध्ये आहे. परंतु तिथून ती गुप्त होते. मंदिरापासून पूर्वेला साधारण एक किलोमीटरवर पुन्हा प्रकट होते. असे मानले जाते. हीच जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.
भीमाशंकरला राममंदिर,कळमजाई मंदिर, कोकणकडा, सिताराम बाबा आश्रम, नागफणी, अंजनीमातेचे तळे, हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे.
भीमाशंकर मंदिराच्या पश्चिमेला कोकणकडा असून त्याची उंची जवळ जवळ अकराशे मीटर इतकी आहे. कोकण कड्यावरून खाली कोकणातले विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबी समुद्रही दिसू शकतो. येथूनच कोकणात जाण्यासाठी शिडीचा घाट, बैल घाट व गणपती घाट असे घाट आहेत.
भीमाशंकरच्या सीमेलगत रायगड आणि ठाणे जिल्हा यांची हद्द आहे.भीमाशंकर ते खांडस हे अंतर साधारण १४ कि.मी. इतके आहे. अनेक पर्यटक खांडस मार्गे भीमाशंकरला येतात. भीमाशंकरच्या जंगलात विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. त्यामुळे देशातून अनेक लोक याठिकाणी पर्यटन,दर्शन. औषधी वनस्पती,अभ्यासासाठी.गिरीभ्रमण यासाठी येत असतात.
अंजनी मातेचे तळे
भीमाशंकर मंदिराच्या नैऋत्यकडे अंजनी तळे प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी सिताराम बाबा यांचा आश्रम आहे. त्याचप्रमाणे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे नागफणी.
सिताराम बाबांच्या आश्रमापासून नागफणी कडे जायला पायवाट आहे. ही पायवाट जंगलातून जाते. नागफणी हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण आहे. याठिकाणी प्रचंड जोरात वारा वाहतो. या ठिकाणावरून कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते.
नागफणी
भीमाशंकरला जाण्यासाठी राजगुरुनगर, मंचर, घोडेगाव मार्गे सुद्धा जाता येते.परंतु वाडा मार्गाने चास मधील सोमेश्वर मंदिर, व त्या समोरील महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेली दीपमाळ शेजारील विस्तीर्ण नदीचा किनारा भव्य असा नदी घाट, अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले बुरसेवाडी जवळील शंभू महादेव मंदिर, चासकमान धरण, पुनर्वसित वाडगाव, कोटेश्वर मंदिर भोरगिरी, मंदोशीचा घाट, चासकमान धरणाचा विस्तीर्ण जलसाठा, हिरवागार निसर्ग, उंच उंच डोंगर, पांढरेशुभ्र जल कोसळणारे मोठमोठे धबधबे,धुओली जवळील नेकलेस धबधबा यामुळे अनेक पर्यटक या मार्गाने भीमाशंकरला जाणे पसंत करतात. आणि पर्यटकांच्या दृष्टीने भाविकांच्या दृष्टीने हाच मार्ग उत्तम आहे हे मात्र तितकेच खरे.
भीमाशंकर जवळील कोंढवळ येथील धबधबा
त्याचप्रमाणे राजगुरुनगर- वाडा- डेहणे शिरगाव - मंदोशी घाटातून तळेघर मार्गे जाता येते. वाडा - डेहणे- शिरगाव -टोकावडे- कारकुडी मार्गे राजपुर वरून भीमाशंकरला जाता येते. राजगुरुनगर -वाडा -शिरगाव भोरगिरी मार्गे कोटेश्वराचे दर्शन घेऊन देखील भीमाशंकरला जाता येते.
भीमाशंकरला प्रत्येक श्रावण महिन्यातील सोमवारी प्रचंड गर्दी असते. श्रावण महिन्यात भीमाशंकरला प्रचंड धुके असते. त्यामुळे आपण स्वर्गात आहोत किंवा आकाशात आहोत असा भास होतो.
भीमाशंकरला प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे खळाळून पांढरेशुभ्र धबधबे वहात असतात. सुंदर रस्ता नागमोडी वळणे, हिरवेगार गवत आणि प्रचंड जंगल उंच उंच डोंगर रांगा यांनी नटलेला हा परिसर आहे. त्यामुळे अनेक निसर्गप्रेमी याठिकाणी भेट देत असतात.
चासकमान धरण
भीमाशंकरचा उल्लेख शिवपुराणात वाचायला मिळतो. भीमाशंकर येथे तेथील स्थानिक लोक विविध औषधी वनस्पती विकण्यासाठी घेऊन बसलेले असतात. या वनस्पतीमुळे अनेक लोकांचे जुने आजार बरे झाल्याची उदाहरणे आहेत.
या अभयारण्यात आंबा,जांभूळ,शिसम, हिरडा, बेहडा, रिठा, उंबर, रानजाई, कोकम, शिकेकाई, आवळा अडसूळ, आपटा, फणस, रानतुळस करवंदे व आपल्याला माहीत नसलेल्या विविध औषधी वनस्पती या अरण्यात आहेत.
तसेच सुतारपक्षी पारवा, कोकीळ, तांबट, मोर ,लांडोर, घुबड, चंडोल, खाटीक, धनेश, रानकोंबड्या आणि अनेक माहित नसलेले पक्षीही या ठिकाणी पाहावयास मिळतात.
भीमाशंकरला संपूर्ण श्रावण महिना महाशिवरात्री, व त्रिपुरारी पौर्णिमा यात्रा भरते. प्रत्येक अमावस्येला स्थानिक लोक दर्शनासाठी जातात.
भीमाशंकरला येणाऱ्या भाविकासाठी व पर्यटकांसाठी मुक्कामासाठी एस.टी.स्टँड जवळच महाराष्ट्र शासनाचे M,T.D.C. (महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ) आहे.
व राजपुर जवळ भव्य भक्त निवास आहे. त्याशिवाय ब्लु माँरमन सारखी भव्य रेस्टाँरंट आहेत. भिमाशंकर येथे अनेक स्थानिक हॉटेलमधून गरमा गरम भजी, गरमागरम बटाटेवडे, मिसळ,भेळ व कडक चहा यांचा आस्वाद घ्यायला एक वेगळाच आनंद मिळतो.
स्थानिक दुकानदारांकडून. बेलफुल किंवा इतर केलेली छोटी खरेदी केल्यावर त्यांच्या चेहर्यावरील समाधान हे परमेश्वराचे दर्शन घेतल्याचा भास होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा