
पूर्वी ग्रामीण भागात संध्याकाळी लवकर स्वयंपाक केला जायचा. चुलीतील लाकडांच्या ज्वालांच्या उजेडात लोक जेवण करायचे. व लगेच झोपायचे. सकाळी पहाटे उठून लोक कामाला लागत.
कधीतरी काही महत्त्वाचे काम असेल तर गोडे तेलाचा व दो-याची वात करून दगडाचा दिवा लावला जायचा. हे फक्त कधीतरीच.दगडाचा दिवा हा सगळ्यांकडे असायचा.त्यानंतर महाराष्ट्र शासनाने रेशन दुकानाची योजना आणली. प्रत्येकाला रेशनवर रॉकेल (घासलेट) साखर, डालडा व तांदूळ मिळू लागला.
लोक छोट्या काचेच्या बाटलीत रॉकेल भरून वरच्या झाकणाला कपड्याची वात करून त्याची बत्ती करू लागले. तर काही लोक बाजारातून शंकूच्या आकाराचे लोखंडी पत्र्याचा दिवा आणून त्यात रॉकेल भरायचे व कापडाची वात त्यामध्ये घालून दिवा पेटवला जायचा. त्यालाच लोक चीमणी म्हणायचे.
कंदील

गावातील बऱ्यापैकी परिस्थिती असलेल्या लोकांकडे छोटे कंदील असायचे. या कंदिलाच्या तळाशी रॉकेल भरण्यासाठी छोटा टँक असायचा, त्यावर अतिशय पातळ अशी उभट आकाराची गोल काच व त्यावर पत्र्याचे गोल झाकण असायचे. काच फुटू नये म्हणून त्यावर दोन तारा बसवलेल्या असायच्या.
कंदिलाचा उजेड हा चिमणीपेक्षा थोडा मोठा असायचा, कंदिलाचा उजेड कमी-जास्त करण्यासाठी तारेची एक गोल चावी असायची. पाहिजे तसा उजेड मोठा करायचा किंवा लहान करायचा. ही सोय कंदीला मध्ये होती.
गावातील ठराविक लोकांकडे हे कंदील असायचे. कंदिलाला काचेचे संरक्षण असल्यामुळे कंदील कोठेही घेऊन गेले तरी दिवा वा-यामुळे विझायचा नाही. त्यामुळे कंदील हा वापरण्यासाठी खूपच सोयीचा होता.
कंदिलाचा उपयोग रात्री बाहेर जाण्यासाठी शेताच्या राखणीसाठी केला जायचा. कंदिलाच्या मध्ये असलेली वात जळायची त्या वातीची काजळी काचेवर जमा व्हायची. त्यामुळे दररोज कंदिलाची काच स्वच्छ करावी लागायची. कंदिलाची काच स्वच्छ करण्याचे काम हे प्रामुख्याने स्त्रिया करत असत.
पेट्रोमॅक्स ( गॅस बत्ती )

गावातल्या श्रीमंत लोकांकडे गॅस बत्ती असायची, गॅस बत्तीचा उजेड हा आताच्या ट्यूबलाइट सारखाच असायचा. गॅसबत्ती म्हणजे कंदीला पेक्षा कितीतरी पटीने मोठी असायची. गॅस बत्ती ही गोलाकार उभट दुधाच्या किटलीच्या आकाराची असायची, खाली गोल आकाराची छोटी टाकी असायची, या टाकीत साधारण दोन-तीन लिटर रॉकेल बसायचे. त्यावर षटकोनी आकाराची किंवा अष्टकोणी आकाराची जाड काच असायची.
या काचेच्या आत निर्वात पोकळी असायची, त्यामध्ये मध्यभागी वर जाळीदार पांढऱ्या कापडयाला लिंटल असे म्हटले जायचे. हे लिंटल बसवून गॅसबत्तीस असलेल्या पंपाने हवा भरायची. व लिंटल पेटवायचा. लिटल पेटवल्यावर गॅसबत्तीतुन मोठमोठ्या ज्वाळा निघायच्या. व हळूहळू कमी व्हायच्या. लिटल लालबुंद व्हायचा आणि नंतर हवा भरल्यावर पांढराशुभ्र होत जायचा.
थोड्याच वेळात आताच्या ट्यूबलाईट सारखा प्रकाश पडायचा. या प्रकाशात सर्व परिसर उजळून निघायचा. गॅसबत्तीचा उपयोग हा विशेषता लग्नकार्य, सत्यनारायणाची पूजा, वरात, संगीत भजनी भारुड, यात्रा व जत्रा इत्यादी मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी व्हायचा. परंतु या गॅसबत्ती साठी खूपच रॉकेल लागायचे. त्यामुळे ते आर्थिक दृष्ट्या परवडत नसे.
ज्यांच्याकडे गॅस बत्ती नसायची ते रॉकेलचे पलीते (टेंभा) करून कार्यक्रम मार्गी लावायचे. परंतु पलीत्या पेक्षा गॅस बत्तीच्या उजेडतील कार्यक्रम अतिशय सुंदर वाटायचे.
गॅस बत्ती बद्दल मला नेहमीच कुतूहल वाटायचे. आपल्याकडेही अशी गॅसबत्ती असावी असे नेहमीच माझ्या बाल मनाला वाटायचे. आपण मोठे झाल्यावर पहिल्यांदा गॅस बत्ती घ्यायची असा मी तेव्हा विचार करायचो. बाल मित्रांना बोलून दाखवायचो. परंतु पुढे काळाच्या ओघात अनेक प्रकारचे विजेचे शोध लागत गेले व माझी गॅस बत्ती घेण्याची इच्छा अपुर्णच राहीली.
आणि खेडेगावात वीज आली

सुरुवातीला ज्यांची कौलांची किंवा पत्र्याची घरे होती त्यांना वीज पुरविण्यात आली. त्यामुळे गावातील पंचवीस ते तीस टक्के लोकांकडे वीज आली. बाकी लोकांची घरे ही गवताची व केंबळाची असल्यामुळे ती अंधारातच राहिली. परंतु ही वीज आपल्याकडेही कधीतरी येईल ही अशा सर्वांना होती.
सुरुवातीला ह्या विजेबद्दल अनेक लोकांना प्रचंड कुतुहल व भीतीसुद्धा वाटायची. घर पेटेल, शॉक बसेल, जीवित हानी होईल असे अनेकांना वाटायचे. काही लोकांनी या भीतीपायी वीज कनेक्शन घेतले नाही.
त्या काळातील विजेची बटने (स्विच) हे एका लाकडी पाटावर बसवलेले असायचे ते काळे आणि खालीवर खटाक्यांचे व मोठे असायचे. ही बटणे खूप सुंदर असायची. काळाच्या ओघात या बटनांमध्ये अनेक प्रकारचे बदल होत गेले. ही काळी बटने काळाच्या पडद्याआड गेली.
बल्ब

पूर्वी लोक विडी पेटवायची असेल तर चुलीवरच्या पेटलेल्या लाकडावर विडी पेटवत असत. एकदा दुपारी चुल विझलेली असल्यामुळे कै.आनंदराव वाजे यांनी लाईट लावून पेटलेल्या बल्ब वर वेडी धरली. परंतु विडी काही पेटेना.
ट्यूबलाइट
त्यानंतर लांब असलेल्या ट्युबचा जमाना आला परंतु या ट्यूब महाग असत. त्या सामान्य लोकांना घ्यायला परवडत नसत. कुणी नवीन घर बांधले किंवा मोठे घर असेल तर लोक हौसेने ट्यूबलाइट लावायचे. त्यामध्ये चोक व स्टार्टर असायचा. परंतु कोणता स्टार्टर आणि कोणता चोक हे काही समजायचे नाही. ट्यूबलाइटचा उजेड बल्ब पेक्षा कितीतरी पटीने सुंदर होता.त्यानंतर पुढे बराच बदल झाला.वेगवेगळ्या प्रकारचे बदल वेगवेगळ्या प्रकारच्या ट्यूबलाईट बाजारात आल्या.ओरपेट चे बल आले त्यामुळे पूर्वीचे ४०,६०.१०० वँट असलेले साधे बदल हद्दपार होऊ लागले.ओरपेटच्या बल्ब नंतर लेडचे बल्ब आले व सगळीकडे प्रकाशच प्रकाश झाला.
पूर्वी मोठ्या गावात प्रत्येक चौकात पेट्रोमॅक्स चे कंदील लावले जायचे. संध्याकाळी अंधार पडल्यावर ग्रामपंचायतचा कर्मचारी चौकात येऊन कंदील लावायचा. हे कंदील पहाटेपर्यंत प्रकाश देत राहायचे. त्या कंदिलांचा मिणमिणता प्रकाश चौकात पडायचा. त्यानंतर वीज आल्यावर प्रत्येक खांबळयावर बल्ब बसवण्यात आले, त्यामुळे संध्याकाळी गावात सगळीकडे पुरेसा उजेड पडू लागला.
धान्य दळण्याचे जाते
विज येण्यापूर्वी प्रत्येक घराघरांमध्ये धान्य दळण्यासाठी जाते, भात कांडण्यासाठी उखळ-मुसळ, मिरची वाटण्यासाठी व मसाला करण्यासाठी पाटा-वरवंटा या वस्तूंचा सर्रास उपयोग केला जायचा. परंतु १९७८ मध्ये वीज आल्यावर डेहणे येथे कै. गणपतराव भोपळे यांनी पिठाची चक्की व राईस मिल सुरू केली.या पीठ गिरणी वर कै.नावजी वनघरे व कै.सदू मामा देशमुख यांनी बरेच वर्ष काम केले.
धुओली येथेसुद्धा श्री.चिंतामण जठार (मँनेजर) यांची पीठ व भात गिरणी होती. तेथे पंचक्रोशीतील दळणे व भात भरडण्यासाठी लोक जात असत.
आम्हीसुद्धा शाळेत जाताना तेथे दळण दळायला द्यायचो. त्या गिरणी मध्ये कै.बापू जठार हे खाटेवर बसलेले असायचे. त्यांच्या मिशांचे आम्हाला अप्रूप वाटायचे, त्यांच्या खाटेवर नेहमी चांदोबा मासिकाचा अंक असायचा. तेथे गेल्यावर चांदोबा मासिकातील गोष्टी वाचताना मजा यायची. एकदा मी त्यांच्या नकळत चांदोबा मासिकाचा अंक घरी आणला होता. त्यामुळे पुढे वाचनाची आवड निर्माण झाली. टोकावडे येथे सुद्धा त्र्यंबक मास्तर यांची पीठ व भात गिरणी होती. लोक डोक्यावर किंवा बैलगाडी मध्ये भात भरडण्यासाठी घेऊन जायचे .
पूर्वी वीज नव्हती तेव्हा स्रिया भल्या पहाटे उठून जात्यावर दळण दळीत असत. दळता दळता सुंदर ओव्या गात असत. जात्याची घरघर व ओव्या ऐकायला खूप सुंदर वाटत असे. त्यामुळे प्रत्येकाचा दिवस चांगला जात असे.
शेताला गेली कुरी, शेत काजळाची वडी
माझ्या ग बंधवाची, बारा बैलाची जोडी
दुपारनंतर स्रिया भात कांडणाचे काम करत असत. प्रत्येकाच्या घरी उखळ आणि मुसळ असे. परंतु वीज आल्यावर या वस्तू हळूहळू हद्दपार होत गेल्या.
शेताला पाणी देण्यासाठी असलेली मोट
पूर्वी ठराविक गावांमध्ये शेताला पाणी भरण्यासाठी मोटा होत्या. मोट ही खूप मोठ्या चामड्याच्या कातड्याची बनवलेली असे. त्याला पखाल म्हणत. त्याला दोर बांधलेले असत. ही मोट विहिरीत सोडलेली असे.
मोट चालवायला एक माणूस असायचा. मोट चालवताना तोसुद्धा मोठमोठ्याने मोटेवरची गाणी म्हणायचा, त्यामुळे सर्व शिवारात गाण्याचा निनाद घुमायचा, वातावरण अतिशय प्रसन्न असायचे. मोटेची गाणी ऐकायल खूप सुंदर वाटायचे.
ऑइल इंजिन पंप

काळ बदलत गेला तसे माणसांचे, वस्तूंचे मुल्य सुद्धा शुन्य झाले. काळाच्या या रहाटगाडग्यात वस्तू कितीही उपयोगाच्या असतील, माणूस कितीही उपयोगाचा असेल परंतु त्यांचे महत्त्व कमी झाल्यावर काळाच्या महिम्यानुसार लोक आपोआप दुर्लक्ष करतात हे मात्र तितकेच खरे.
मोट,जाते,उखळ-मुसळ, विविध जुनी अवजारे,अतिशय जुन्या चीजवस्तू व चांगली कतृत्ववान माणसे सुद्धा काळाच्या ओघात लुप्त झालीअसली तरी त्यांचे कार्य कधीच लुप्त होऊ शकत नाही. हे ही तितकेच खरे आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा