दसरा (विजयादशमी)

दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा..असे म्हटले जायचे...ते तंतोतंत खरे होते.पण ते कधी? तेव्हा.आता सगळ्याच  सणांचे महत्त्व कमी झाले आहे. पुर्वी प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व होते.प्रत्येक सणाचा बाज वेगळा होता.जो तो सण साजरा करण्याची  सणाची गम्मतच न्यारी.ढंग वेगळा व आनंदही वेगळाच.दसरा हा सणही एक वेगळाच आनंद देऊन जायचा.

पुर्वी वेळेवर पाऊस पडायचा.बैल पोळ्या नंतर पाऊस पडायचा बंद व्हायचा.बैलपोळ्या नंतर ठराविक चार- पाच शेतक-यांची हळवी जात असलेली पिके काढायला यायची.आणि अशातच यायचा दसरा सण..ग्रामीण भागात दस-याचे महत्त्व अनन्यसाधारण असते.दस-याला हमखास पुण्या- मुंबईवरून चाकरमानी आई वडीलांना गावातील लोकांना व नातेवाईकांना भेटायला हमखास येत असत.सकाळ पासुन नातेवाईकांची गर्दी गावात भेटण्यासाठी होत असे.प्रत्येक गावात हेच चित्र असे. सकाळपासुन प्रत्येक सासुरवाशीन आई वडील,नातेवाईक यांना भेटण्यासाठी परत त्याच दिवशी फिरून यायच्या बोलीवर निघायच्या तयारीला लागायच्या. माहेरी जाताना एखाद्या फडक्यात दोन-चार भाकरीचे पीठ.गुळाचा खडा नेण्याची पध्दत होती.आता सारख्या तेव्हा गाड्या-घोड्या नव्हत्या.सगळीकडे पायी प्रवास असे.

आपली लेक व नातवंडे येणार म्हणुन सासुरवाशिनीची आई सकाळ पासून स्वयंपाकाला लागे.डांगरभोपळ्याचे भोकाचे वडे.व गुळवणी,काकडीची पीसोळी,रव्याचा गोड शीरा किंवा गुळ व शेंगदाण्याच्या पीठाच्या पोळ्या हा मेणू असे.लवकरच मुलगी माहेराला येई.सर्वांना भेटून चार सुख-दुखाच्या गोष्टी सांगीतल्या जात दिवस मावळतीकडे झुकल्यावर आपल्याला पुन्हा सासरी जायचे आहे याची जाणिव होई.चार घास गोडाधोडाचे खाल्यावर माहेवाशीन ससरच्या दिशेने निघे.तिच्या डोक्यावर पीठ व गुळ असलेले गाठोडे असे.त्याच्या जोडीला एखादा डांगरभोपळा,हातभर लांबीची काकडी असे.घरी येऊन परत तीला स्वयपाक करावा लागे.

गावात सकाळची नित्याची कामे पुर्ण झाल्यावर लहान मुले झेंडूची फुले आणुन त्याचे तोरण घराला बांधले जाई.उर्वरीत माळा देवासाठी असत. पुरूष मंडळी घरातील सर्व हत्यारे व औजारे नदीवर किंवा ओढ्यावर घेऊन जात.या सर्व वस्तू चांगल्या घासुन. पुसून पाण्यात  स्वच्छ धुतल्या जात.मोठ्या मानसांबरोबर लहान मुले सुद्धा जात.व पाण्यात मस्तपैकी पोहत राहत.सर्व हत्यारे घरी आणुन एका कोप-यात पोत्यावर ठेवली जात.प्रत्येक वस्तूला हळद,कुंकू लावुन फुले वाहीली जात.व जमेल तशी पुजा करत.जोडीला लहान मुलांची पाठ्यपुस्तके सुद्धा असत.

दुपारनंतर सर्व गावकरी एकत्र जमत.शिलंगनाचे सोने आणन्यासाठीची तयारी सुरू होई एकजणाच्या गळ्यात ढोल असे.तर एक दोघांकडे कोयता असे.गावातील लहानमोठे लोक,पोरे टोरे शिलंगनाचे सोने आणन्यासाठी रानात जात.आपट्याच्या झाडाजवळ जाऊन त्याची पुजा करून लहान फांद्या कोयत्याने छाटल्या जात.प्रत्येकाकडे आपट्याच्या एकदोन छोट्या फांद्या दिल्या जात.ढोल वाजवत सर्वांचा घोळका गावच्या ग्रामदैवताकडे जात असे.सर्व देवांना सोने देऊन दंडवट घालून दर्शन घेऊन मगच गावात जायचे.आणलेल्या आपट्याच्या फांद्या  हत्यारे पुजेसाठी ठेवली असत तेथे ठेवल्या जात.

इकडे प्रत्येकाच्या घरात डांगर भोपळ्याचे भोकाचे वडे किंवा काकडीचे पीसोळे हा मेणू सर्रास असायचाच.त्यांचा खमंग सुवास नाकातोंडात दरवळायचा.डांगर भोपळा कापून त्याच्या फोडी करून तो शिजवला जातो.शिजवल्यावर त्याचा गर त्यातील पाणी काढून तांदळाच्या पिठात गुळ घालून एकत्रित मिस्रण तयार केले जाते.त्याचे छोटे छोटे वडे करून ते तेलात तळले जातात.काकडीची पिसोळी करण्याची पद्धत वेगळी असते.काकडीचा गर काढुन तांदळाच्या पिठात गुळ वेलची व हळद  मिठ घालून मिस्रण तयार केले जाते.हे मिस्रण हळदीच्या पानावर थापून त्यावर दुसरे हळदीचे पान ठेऊन वाफेवर शिजवून तयार केले जाते.हे सर्व पदार्थ फक्त दसरा व दिवाळी या सणांनाच असत.इतर वेळेला नाही.लाडू,करंज्या हे पदार्थ खुप नंतर गावाकडे आले.भोकाचे वडे व पिसोळी यांची चव अजुनही जुन्या लोकांच्या जीभेवर असेल.

संध्याकाळी जेवणे होत.एकमेकांना जेवणाचे आमंत्रण दिले जाई.लोकही प्रेमाने आमंत्रण स्विकारून एकेक जण चार - पाच घरांमध्ये जेवण करत.

सकाळ पासुन गाव नातेवाईक ,आप्तेष्ट व सगेसोयरे,वाड्या वस्त्यातील लोक,बाया बापड्या ,पोरे बाळे यांच्या गर्दीने फुलुन जाई.एकमेकांना भेटायला गर्दी होई.

आमच्याकडे सुद्धा हुरसाळेवाडीचे सर्वलो क भेटण्यासाठी व शिलंगनाचे सोने देण्यासाठी मोहनवाडीत येत.नंतर दोन्ही वस्त्यांतील लोक मंदोशी गावात येत.सोने देऊन झाल्यावर सर्वजण मंदोशी गावच्या थोडे दुर असलेल्या जावळेवाडीला जात.तेव्हा संपुर्ण गाव व सर्व वाड्यावस्त्यातील लोक दस-याच्च्या दिवशी जावळेवाडीला जात असत.शिलंगनाचे सोने देउन झाल्यावर जेवनाचा आग्रह केला जाई.तो पर्यत रात्रीचे आकरा वाजत.नंतर सर्व लोक आपापल्या घरी जात..असा तो काळ होता.एकत्र कुटुंबपध्दती होती.संपुर्ण गाव एकविचाराने रहायचा.एकमेकाबद्दल आदर होता. प्रेमभावना होती. परंतू हळुहळू लोक कामानिमीत्त शहरात गेले.शहरातील संस्कृती गावात आली.एकत्र कुटुंबपद्धती जाऊन विभक्त कुटुंबपद्धती आली. एकमेकांविषयीआदर व प्रेम कमी झाले.लोकांकडे पैसा आला.पुर्वी कधीतरी सणावाराला केले जाणा-या पदार्थापेक्षा चांगले पदार्थ दररोज घरात केले जाऊ लागले. हाँटेल व ढाबा संस्कृती आली.बाहेर खान्याची चटक लागली.लोकांकडे मोटारसायकल,कार आल्या.पुर्वी नातेवाइकांच्या घरी मुक्काम करणारे लोक मोटारसायकल,कार आल्याने उभ्या उभ्या भेटुन थांबायला वेळ नसल्याचे सांगुन चहा घेऊन आल्या पाऊली जाऊ लागले. 

आता तर मोबाईल आले,पुर्वी साधे मोबाइल होते.तेव्हा लोक नांतेवाईकांना,मित्रांना न भेटता मोबाईलवरून फोन करून शुभेच्छा देऊ लागले.त्यानंतर काळ बदलला.लोकाकडे अँड्राव्ह्यूड स्मार्ट फोन आले.आता लोक फक्त शुभेच्छा असलेले मेसेज फाँरवर्ड करायचे काम करू लागले.याबाबत लोकांना विचारले असता अहो! वेळच मिळत नाही..काय करणार...असे उत्तर मिळते....

माझी किमान अपेक्षा आपण जेथे आहात तेथील नातेवाईक,मित्र यांना किमान भेटावे हीच अपेक्षा .🙏

सर्वांना दस-याच्या हर्दिक शुभेच्छा ....



वीज आली आणि प्रगती झाली




वीज आणि ग्रामीण भाग 

ग्रामीण भागात १९७८ मध्ये खऱ्या अर्थाने गावामध्ये वीज आली. त्यापूर्वी ग्रामीण भागात वीज नव्हती.

पूर्वी ग्रामीण भागात संध्याकाळी लवकर स्वयंपाक केला जायचा. चुलीतील लाकडांच्या ज्वालांच्या उजेडात लोक जेवण करायचे. व लगेच झोपायचे. सकाळी पहाटे उठून लोक कामाला लागत. 

कधीतरी काही महत्त्वाचे काम असेल तर गोडे तेलाचा व दो-याची वात करून दगडाचा दिवा लावला जायचा. हे फक्त कधीतरीच.दगडाचा दिवा हा सगळ्यांकडे असायचा.

त्यानंतर महाराष्ट्र शासनाने रेशन दुकानाची योजना आणली. प्रत्येकाला रेशनवर रॉकेल (घासलेट) साखर, डालडा व तांदूळ मिळू लागला.

लोक छोट्या काचेच्या बाटलीत रॉकेल भरून वरच्या झाकणाला कपड्याची वात करून त्याची बत्ती करू लागले. तर काही लोक बाजारातून शंकूच्या आकाराचे लोखंडी पत्र्याचा दिवा आणून त्यात रॉकेल भरायचे व कापडाची वात त्यामध्ये घालून दिवा पेटवला जायचा. त्यालाच लोक चीमणी म्हणायचे. 

कंदील

गावातील बऱ्यापैकी परिस्थिती असलेल्या लोकांकडे छोटे कंदील असायचे. या कंदिलाच्या तळाशी रॉकेल भरण्यासाठी छोटा टँक असायचा, त्यावर अतिशय पातळ अशी उभट आकाराची गोल काच व त्यावर पत्र्याचे गोल झाकण असायचे. काच फुटू नये म्हणून त्यावर दोन तारा बसवलेल्या असायच्या. 

कंदिलाचा उजेड हा चिमणीपेक्षा थोडा मोठा असायचा, कंदिलाचा उजेड कमी-जास्त करण्यासाठी तारेची एक गोल चावी असायची. पाहिजे तसा उजेड मोठा करायचा किंवा लहान करायचा. ही सोय कंदीला मध्ये होती. 

गावातील ठराविक लोकांकडे हे कंदील असायचे. कंदिलाला काचेचे संरक्षण असल्यामुळे कंदील कोठेही घेऊन गेले तरी दिवा वा-यामुळे विझायचा नाही. त्यामुळे कंदील हा वापरण्यासाठी खूपच सोयीचा होता.

कंदिलाचा उपयोग रात्री बाहेर जाण्यासाठी शेताच्या राखणीसाठी केला जायचा. कंदिलाच्या मध्ये असलेली वात जळायची त्या वातीची काजळी काचेवर जमा व्हायची. त्यामुळे दररोज कंदिलाची काच स्वच्छ करावी लागायची. कंदिलाची काच स्वच्छ करण्याचे काम हे प्रामुख्याने स्त्रिया करत असत.

पेट्रोमॅक्स ( गॅस बत्ती ) 

गावातल्या श्रीमंत लोकांकडे गॅस बत्ती असायची, गॅस बत्तीचा उजेड हा आताच्या ट्यूबलाइट सारखाच असायचा. गॅसबत्ती म्हणजे कंदीला पेक्षा कितीतरी पटीने मोठी असायची. गॅस बत्ती ही गोलाकार उभट दुधाच्या किटलीच्या आकाराची असायची, खाली गोल आकाराची छोटी टाकी असायची, या टाकीत साधारण दोन-तीन लिटर रॉकेल बसायचे. त्यावर षटकोनी आकाराची किंवा अष्टकोणी आकाराची जाड काच असायची.

या काचेच्या आत निर्वात पोकळी असायची, त्यामध्ये मध्यभागी वर जाळीदार पांढऱ्या कापडयाला लिंटल असे म्हटले जायचे. हे लिंटल बसवून गॅसबत्तीस असलेल्या पंपाने हवा भरायची. व लिंटल पेटवायचा. लिटल पेटवल्यावर गॅसबत्तीतुन मोठमोठ्या ज्वाळा निघायच्या. व हळूहळू कमी व्हायच्या. लिटल लालबुंद व्हायचा आणि नंतर हवा भरल्यावर पांढराशुभ्र होत जायचा.

थोड्याच वेळात आताच्या ट्यूबलाईट सारखा प्रकाश पडायचा. या प्रकाशात सर्व परिसर उजळून निघायचा. गॅसबत्तीचा उपयोग हा विशेषता लग्नकार्य, सत्यनारायणाची पूजा, वरात, संगीत भजनी भारुड, यात्रा व जत्रा इत्यादी मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी व्हायचा. परंतु या गॅसबत्ती साठी खूपच रॉकेल लागायचे. त्यामुळे ते आर्थिक दृष्ट्या परवडत नसे.

ज्यांच्याकडे गॅस बत्ती नसायची ते रॉकेलचे पलीते (टेंभा) करून कार्यक्रम मार्गी लावायचे. परंतु पलीत्या पेक्षा गॅस बत्तीच्या उजेडतील कार्यक्रम अतिशय सुंदर वाटायचे. 

गॅस बत्ती बद्दल मला नेहमीच कुतूहल वाटायचे. आपल्याकडेही अशी गॅसबत्ती असावी असे नेहमीच माझ्या बाल मनाला वाटायचे. आपण मोठे झाल्यावर पहिल्यांदा गॅस बत्ती घ्यायची असा मी तेव्हा विचार करायचो. बाल मित्रांना बोलून दाखवायचो. परंतु पुढे काळाच्या ओघात अनेक प्रकारचे विजेचे शोध लागत गेले व माझी गॅस बत्ती घेण्याची इच्छा अपुर्णच राहीली.

आणि खेडेगावात वीज आली 

इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्री असताना त्यांनी वीस कलमी कार्यक्रम राबवला होता. त्यामध्ये गरिबी हटाव, त्या मुद्द्याप्रमाणेच गावागावात वीज हा मुद्दा होता. 

महाराष्ट्रात तेव्हा मा.ना.शंकररावजी चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी ग्रामीण भागात वीज पोहोचवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.१९७७ साली नारायणगाव सबस्टेशन कडून ग्रामीण भागाला वीज पुरवठा करण्याचा आराखडा तयार झाला. 

घोडेगाव, डिंभे ,पोखरी, तळेघर मार्गे मंदोशी मार्गे खेड तालुक्यात विजेचे खांब रोवले गेले. त्यामार्फत मुख्य वाहिनी आणली गेली. गाव निहाय डीपी बसवल्या गेल्या. त्यामार्फत छोटे पोल उभे करून गावागावांमधून वीज पुरवठा केला गेला.

सुरुवातीला ज्यांची कौलांची किंवा पत्र्याची घरे होती त्यांना वीज पुरविण्यात आली. त्यामुळे गावातील पंचवीस ते तीस टक्के लोकांकडे वीज आली. बाकी लोकांची घरे ही गवताची व केंबळाची असल्यामुळे ती अंधारातच राहिली. परंतु ही वीज आपल्याकडेही कधीतरी येईल ही अशा सर्वांना होती.

सुरुवातीला ह्या विजेबद्दल अनेक लोकांना प्रचंड कुतुहल व भीतीसुद्धा वाटायची. घर पेटेल, शॉक बसेल, जीवित हानी होईल असे अनेकांना वाटायचे. काही लोकांनी या भीतीपायी वीज कनेक्शन घेतले नाही.

त्या काळातील विजेची बटने (स्विच) हे एका लाकडी पाटावर बसवलेले असायचे ते काळे आणि खालीवर खटाक्यांचे व मोठे असायचे. ही बटणे खूप सुंदर असायची. काळाच्या ओघात या बटनांमध्ये अनेक प्रकारचे बदल होत गेले. ही काळी बटने काळाच्या पडद्याआड गेली.

 बल्ब 

पुर्वी नुसतीच वायरिंगची फिटिंग असायची.नंतर काळ्या नळ्यांची फिटींग आली आणि त्यानंतर केसिंग पाइप व अंतर्गत फिटींग असे बदल होत गेले. अनेकांकडे ४० व ६० वॅटचे छोटे बल असायचे. हा बल्ब म्हणजे छोट्या पातळ पारदर्शक काचेच्या निर्वात पोकळीमध्ये टंगस्टन या धातूची तार बसवलेली असायची. त्या तारेला केसाच्या आकाराच्या तीन तारा जोडलेल्या असायच्या. विद्युत प्रवाह सुरू झाल्यावर टंगस्टन धातुची तार पेट घ्यायची व सगळीकडे उजेड पडायचा.

पूर्वी लोक विडी पेटवायची असेल तर चुलीवरच्या पेटलेल्या लाकडावर विडी पेटवत असत. एकदा दुपारी चुल विझलेली असल्यामुळे कै.आनंदराव वाजे यांनी लाईट लावून पेटलेल्या बल्ब वर वेडी धरली. परंतु विडी काही पेटेना.

 ट्यूबलाइट 

त्यानंतर लांब असलेल्या ट्युबचा जमाना आला परंतु या  ट्यूब महाग असत. त्या सामान्य लोकांना घ्यायला परवडत नसत. कुणी नवीन घर बांधले किंवा मोठे घर असेल तर लोक हौसेने ट्यूबलाइट लावायचे. त्यामध्ये चोक व स्टार्टर असायचा. परंतु कोणता स्टार्टर आणि कोणता चोक हे काही समजायचे नाही. ट्यूबलाइटचा उजेड बल्ब पेक्षा कितीतरी पटीने सुंदर होता.

त्यानंतर पुढे बराच बदल झाला.वेगवेगळ्या प्रकारचे बदल वेगवेगळ्या प्रकारच्या ट्यूबलाईट बाजारात आल्या.ओरपेट चे बल आले त्यामुळे पूर्वीचे ४०,६०.१००  वँट असलेले साधे बदल हद्दपार होऊ लागले.

ओरपेटच्या बल्ब नंतर लेडचे बल्ब आले व सगळीकडे प्रकाशच प्रकाश झाला. 

पूर्वी मोठ्या गावात प्रत्येक चौकात पेट्रोमॅक्स चे कंदील लावले जायचे. संध्याकाळी अंधार पडल्यावर ग्रामपंचायतचा कर्मचारी चौकात येऊन कंदील लावायचा. हे कंदील पहाटेपर्यंत प्रकाश देत राहायचे. त्या कंदिलांचा मिणमिणता प्रकाश चौकात पडायचा. त्यानंतर वीज आल्यावर प्रत्येक खांबळयावर बल्ब बसवण्यात आले, त्यामुळे संध्याकाळी गावात सगळीकडे पुरेसा उजेड पडू लागला. 

धान्य दळण्याचे जाते 

विज येण्यापूर्वी प्रत्येक घराघरांमध्ये धान्य दळण्यासाठी जाते, भात कांडण्यासाठी उखळ-मुसळ, मिरची वाटण्यासाठी व मसाला करण्यासाठी पाटा-वरवंटा या वस्तूंचा सर्रास उपयोग केला जायचा. परंतु १९७८ मध्ये वीज आल्यावर डेहणे येथे कै. गणपतराव भोपळे यांनी पिठाची चक्की व राईस मिल सुरू केली.या पीठ गिरणी वर कै.नावजी वनघरे व कै.सदू मामा देशमुख यांनी बरेच वर्ष काम केले.

बापू जठार व चांदोबा मासिक:

धुओली येथेसुद्धा श्री.चिंतामण जठार (मँनेजर) यांची पीठ व भात गिरणी होती. तेथे पंचक्रोशीतील दळणे व भात भरडण्यासाठी लोक जात असत.

आम्हीसुद्धा शाळेत जाताना तेथे दळण दळायला द्यायचो. त्या गिरणी मध्ये कै.बापू जठार हे खाटेवर बसलेले असायचे. त्यांच्या मिशांचे आम्हाला अप्रूप वाटायचे, त्यांच्या खाटेवर नेहमी चांदोबा मासिकाचा अंक असायचा. तेथे गेल्यावर चांदोबा मासिकातील गोष्टी वाचताना मजा यायची. एकदा मी त्यांच्या नकळत चांदोबा मासिकाचा अंक घरी आणला होता. त्यामुळे पुढे वाचनाची आवड निर्माण झाली. टोकावडे येथे सुद्धा त्र्यंबक मास्तर यांची पीठ व भात गिरणी होती. लोक डोक्यावर किंवा बैलगाडी मध्ये भात भरडण्यासाठी घेऊन जायचे . 

पूर्वी वीज नव्हती तेव्हा स्रिया भल्या पहाटे उठून जात्यावर दळण दळीत असत. दळता दळता सुंदर ओव्या गात असत. जात्याची घरघर व ओव्या ऐकायला खूप सुंदर वाटत असे. त्यामुळे प्रत्येकाचा दिवस चांगला जात असे.

शेताला गेली कुरी, शेत काजळाची वडी 

माझ्या ग बंधवाची, बारा बैलाची जोडी  

दुपारनंतर स्रिया भात कांडणाचे काम करत असत. प्रत्येकाच्या घरी उखळ आणि मुसळ असे. परंतु वीज आल्यावर या वस्तू हळूहळू हद्दपार होत गेल्या.

शेताला पाणी देण्यासाठी असलेली मोट

पूर्वी ठराविक गावांमध्ये शेताला पाणी भरण्यासाठी मोटा होत्या. मोट ही खूप मोठ्या चामड्याच्या कातड्याची बनवलेली असे. त्याला पखाल म्हणत. त्याला दोर बांधलेले असत. ही मोट विहिरीत सोडलेली असे.

वर दगडाचा चौथरा केलेला असे दोन बाजूला दोन घडीव दगड असत व त्यांना भोके असत त्यावर गोल लोखंडी चाके असत. त्याला रहाट म्हणत. त्यातून दोरीवरून ती बैलांच्या जुकाडाला जोडलेली असे. एकाच जागेवर बैल गोल गोल फिरवायचे. त्याप्रमाणे बैलांच्या सहाय्याने विहिरीतील किंवा ओढा किंवा नदी मधील पाणी वर शेतात पाटाला सोडले जाई. 

चल माझ्या राजा, चल माझ्या सर्जा 
बिगी बिगी डौलान रं, डौलान...
गाऊ मोट वरच गाणं.. रं गाणं.. हे दादा कोंडके यांचे गाणे माहीतच असेल. 

मोट चालवायला एक माणूस असायचा. मोट चालवताना तोसुद्धा मोठमोठ्याने मोटेवरची गाणी म्हणायचा, त्यामुळे सर्व शिवारात गाण्याचा निनाद घुमायचा, वातावरण अतिशय प्रसन्न असायचे. मोटेची गाणी ऐकायल खूप सुंदर वाटायचे. 

ऑइल इंजिन पंप

परंतु वीज आल्यावर मोट केव्हाच हद्दपार झाली व त्याऐवजी डिझेलवर चालणारे इंजिन पंप आले. ही इंजने डिझेलवर चालू करण्यासाठी हँडल चा उपयोग करावा लागायचा. ही इंजिने खूप जड असत. त्यांना ने आण करण्यासाठी बैलांचा उपयोग करावा लागायचा. त्यामुळे हेसुद्धा खूप कष्टाचे काम होते. काही दिवसांनी ही इंजिने सुद्धा हद्दपार झाली आणि त्यापेक्षा छोटी दोरीच्या साह्याने चालणारी डिझेल व पेट्रोलवर चालणारी छोटी छोटी इंजिने आली.

काळाचा महिमा:

काळ बदलत गेला तसे माणसांचे, वस्तूंचे मुल्य सुद्धा शुन्य झाले. काळाच्या या रहाटगाडग्यात वस्तू कितीही उपयोगाच्या असतील, माणूस कितीही उपयोगाचा असेल परंतु त्यांचे महत्त्व कमी झाल्यावर काळाच्या महिम्यानुसार लोक आपोआप दुर्लक्ष करतात हे मात्र तितकेच खरे.

मोट,जाते,उखळ-मुसळ, विविध जुनी अवजारे,अतिशय जुन्या चीजवस्तू व चांगली कतृत्ववान माणसे सुद्धा काळाच्या ओघात लुप्त झालीअसली तरी त्यांचे कार्य कधीच लुप्त होऊ शकत नाही. हे ही तितकेच खरे आहे.






श्री गणेश हुरसाळे यांचा यशस्वी प्रवास


 श्री गणेश हुरसाळे यांचा यशस्वी प्रवास 

जमीनीमध्ये अनेक प्रकारचे धातू असतात रत्ने असतात. जमीनीमध्ये ती सुप्त अवस्थेत असतात.जेव्हा आपण त्यांच्या सानिध्यात येतो तेव्हाच आपणास त्यांचे महत्त्व पटते.अशाच प्रकारे  ग्रामीण भागात असे अनेक व्यक्ती आहेत की आपण जेव्हा त्यांच्या सानिध्यात जातो तेव्हा आपणास त्यांचे महत्त्व कळते.

प्रत्येक धातू हा ज्या वेळी जमीनीतुन प्रथम आपण बाहेर काढतो त्यावेळी तो खुपच ओबडधोबड असतो.त्या धातुला अनेक कष्टप्राय प्रक्रियेला सामोरे जावे लागते तेव्हाच तो लोकांच्या पसंतीला प्राप्त होतो.

ग्रामीण भागात सुद्धा अशी अनेक धातू व रत्ने आहेत की जे  या धातू प्रमाणे अनेक ठेचा खाऊन शुन्यातुन त्यांनी स्वतःचे अस्तीत्व निर्माण केले आहे. त्यापैकी एक म्हणजेच प्राध्यापक श्री.गणेश हुरसाळे.

श्री गणेश हे मंदोशी गावचे.ग्रामीण भागातील अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेला तरुण.अनेकांची जशी हालाकीची परिस्थिती असते.तशीच गणेशाची सुद्धा. 

त्यावेळी शिक्षणाबद्दल अनास्था असायची.पुर्वी लोक दहावी पास होऊ अथवा नापास द्यायचे मुंबईला पाठवून.अशी स्थीती होती. 

१९९६ साली मी पंचायत समिती घोडेगांव येथे असताना गणेश सर तेव्हा जनता विद्या मंदीर घोडेगांव येथे दहावी किंवा आकरावीला शिकत असतील.ते तेव्हा होस्टेल मध्ये होते.ज्या लोकांनी होस्टेलमध्ये राहुन शिक्षण घेतले आहे त्यांना होस्टेल हे ठिकाण काय चिज असते याची जाणिव असेलच.

मला आठवतेय मी तेव्हा मंदोशी ते घोडेगांव असा दररोज आँफिसला जाण्यासाठी प्रवास करायचो.प्रत्येक सणावाराला किंवा कधी एखादा विशिष्ट पदार्थ गावाला गणेशजींच्या घरी बनवला तर त्यांचे वडिल श्री.केशव हुरसाळे सकाळी सकाळीच जेवणाचे गाठोडे घेऊन यायचे. त्यामध्ये पाच - सात जण सहज जेऊ शकतील असे जेवण असायचे. हा प्रकार १९९६ ते २००२ पर्यत चालू होता. 

परिस्थिती नुसार व शिक्षणाचा खर्च व घरची जबाबदारी अशी तिहेरी जबाबदारी मुळे त्यांना पार्टटाईम जाँब करावा लागला. शेतात काम करणे, आँईलमील मध्ये गरम पेंड पोत्यात भरण्याचे काम केले. तसेच कमवा व शिका या योजनेतुन सुद्धा काम केले. 

डाँ.काळे यांच्या दवाखान्यात त्यांनी अर्धवेळ नोकरी पत्करली. डाँ.काळे यांच्या दवाखान्यात त्यांनी चोकशी कक्ष.पेशंटचे केसपेपर काढणे, दवाखान्याची सफाई व स्वच्छता ,बेडशिट धुणे अशी अनेक कामे केली. हे सर्व पहाताना खुप वाईट वाटायचे,जीव गलबलून जायचा.परंतू त्यांनी शिक्षणासाठी हे सर्व आनंदाने केले.

आपला महिन्याचा  शिक्षणाचा व इतर खर्च भागवून गणेशजी दर महिन्याला माझ्याकडे त्यांच्या घरी देण्यासाठी ३००-४०० रूपये द्यायचे.

एकदा त्यांनी त्यांच्या दवाखान्याच्या पगारातुन एक लांबनळी असलेली ट्यूब घेतली.तो शुक्रवार असावा.ही ट्युब घेऊन साडेपाचच्या दरम्यान आमच्या आँफिसमध्ये आले.आमच्या आँफिसमधील सर्व अधिकारी गणेशजींना चांगले ओळखायचे. त्या पैकी वैद्य नावाचे कृषि विस्तार अधिकारी होते.ते कौतुकाने म्हणायचे. 
काय हा पोरगा आहे? घरच्यांनी शिक्षणासाठी याला पैसे पुरवायचे सोडून हाच घरी पैसे देतो. नक्कीच पुढे काहीतरी हा करून दाखवनार.गणेशजींना गावी यायचे होते.ती ट्यूब घेंऊन.

आमचा गावच्या दिशेने प्रवास सुरू झाला.त्यांनी आणलेली ट्युब ही आजच लागली पाहीजे अशी त्यांची जिद्द होती. घरी जाताच ते म्हणाले.दादा, तुम्ही घरी चला आपण ट्युब लावू, त्यांचा उत्साह मला मोडवेना.मग मी माझा भाऊ मारूती जो आता वायरमन आहे त्याला घेऊन गेलो. त्यांने ती ट्युब लावुन दिली.तेव्हा त्या ट्युबच्या उजेडापेक्षा शतपटीने मला गणेशजींच्या चेह-यावरील समाधान दिसले.

त्यानंतर त्यांनी सन २००१ साली शाळा शिकत असताना त्यांनी घोडेगांव येथे उसाचे गु-हाळ सुरू केले होते.व त्यातुन शिक्षण व घरखर्चाची सांगड घालता होते.

श्री गणेशजी यांचे करियर घडवण्यासाठी  मा.श्री रमेश काळे अधीक्षक जनता वस्तीगृह घोडेगाव यांचे मोलाचे योगदान लाभले, बारावीनंतर वस्तीगृहात राहण्यासाठी परवानगी नसताना सुद्धा धडपड करून मा.श्री काळे यांनी नियम शिथिल केले व श्री गणेशजी यांना ग्रॅज्युएट पर्यंत वस्तीगृहात राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. 

त्याच प्रमाणे पुढील आयुष्यात मा.श्री संजय नाईकरे सर यांचेही मोठे योगदान लाभले त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यात स्थिरता निर्माण झाली.

काँलेज संपल्यावर त्यांनी पुण्यात P,G,D,B,M हा कोर्स पुर्ण केला.त्याचा खर्च भागविण्यासाठी त्यांच्या वडिलांना शेतीचा आँईल ईजीन पंप विकावा लागला. बैल विकावे लागले.

कोर्स पुर्ण केल्यावर मग सुरू झाली नोकरीसाठी धडपड ,सर्व ठिकाणी प्रयत्न करूनही ना नोकरी ना काही.नोकरीच्या भानगडीत पडण्यापेक्षा काहीतरी व्यावसाय करावा.असे त्यांना वाटले.

आपण पुण्यात क्लासेस सुरू करावेत व गरीब मुलांना अल्पदरात ज्ञानार्जनाचे काम करावे असे त्यानी ठरवले. सन २००४ साली मला साल आठवत नाही.त्यांनी ज्ञानज्योत क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय धाडसी व हस्यास्पद होता. पुण्यात खाजगी क्लासेसला काही तोटा नाही. 

त्यात सगळीकडे हाय-फाय क्लास.आणि हा खेड तालुक्यातील पश्चिम ग्रामीण भागातील मुलगा.याच्याकडे ना भांडवल ना अनुभव. पुण्यातले बोलणे व ग्रामीण भागातील बोली.ही तफावत. त्यात स्पर्धेला तोंड द्यावे लागणार ते वेगळेच. आणि अशाही परिस्थितीत त्यांचे सहकारी प्रध्यापक विजयकुमार कौदरे यांना सोबत घेऊन ज्ञानज्योत क्लासेसची निर्मिती केली.

त्यावेळी गणेशजी माझ्याकडे आले.आणि म्हणाले दादा, मी क्लास सुरू करतोय, मला पंचवीस हजार रूपये भांडवल उपलब्ध करून द्या. मी महिन्याला जो काही हप्ता असेल तो भरील.
मी क्षणाचाही विलंब न करता स्वामी विवेकानंद पतसंस्थेत पंचवीस हजार रूपयांचे कर्ज प्रकरण करून श्री गणेशजींना पंचवीस हजार रुपये दिले.व त्यांनी सुद्धा वेळेत ते कर्ज फेडले.

त्यांनी त्यावेळी लावलेल्या ज्ञानज्योत क्लासेसच्या रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे.ही नक्कीच समाधानाची बाब आहे.सुरूवातीला १३ विद्यार्थ्यांचे १८० विद्यार्थी कधी झाले हे कळलेच नाही. 

२०१२ साली सिंहगड रोड भागात त्यांनी अद्ययावत विशेष सोयी-सुविधा असलेले सुसज्ज असलेल्या वास्तूमध्ये प्रोफेशनल ज्ञानज्योत अकॅडमी ची स्थापना केली आहे. त्यांना त्यांचे सहभागीदार प्राध्यापक विजय कुमार कौदरे हे लक्ष्मणा सारखे उत्तम साथ देत आहेत.
सामाजीक बांधिलकीच्या दृष्टीने ते आजही त्यांचे सामाजीक काम सुरु आहे.ग्रामीण भागातील शाळांमधील दहावी व बारावीच्या मुलांना विशेष मार्गदर्शन करणे.पायी प्रवास करणा-या विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करणे,गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप करणे आदिवासी कातकरी समाजासाठी दिवाळीमध्ये फराळ वाटप, स्वामी विवेकानंद जीवन ज्योत संस्थेच्या माध्यमातून गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप. सर्वरोग निदान आरोग्य शिबिर व औषधोपचार. डोळे तपासणी व चष्मे वाटप. यासाठी शिबिरे आयोजित केली आहेत. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांसाठी वृक्षारोपण व कलमी रोपांचे वाटप असे विविध उपक्रम राबवले आहेत. अशी सामाजीक कामे ते सतत करत असतात.
त्यांचे चला करूया मैत्री अभ्यासाशी.अशी जिंकूया लढाई दहावीची. तयारी दहावीची झेप यशाची व व्यक्तिमत्व विकास. ही व्याख्याने ते गेली 13 वर्ष ग्रामीण भागातील शाळांमधून देत आहेत. 

त्यांना आतापर्यंत विश्व माता फाउंडेशन पुणे या संस्थेने इनोव्हेटिव्ह टीचर्स ऑफ इंडिया नॅशनल अवॉर्ड या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे सकाळ वृत्तपत्र समूहाने त्यांना संघर्ष यशोगाथा या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ते सध्या ज्ञानज्योत क्लासेसचे संचालक आहेत. तसेच दे आई प्रतिष्ठान मंदोशी दोशी ता. खेडचे सचिव आहेत व स्वामी विवेकानंद जीवन ज्योत संस्था पुणे या संस्थेचे सहसचिव आहेत.
त्यांनी आता शालेय आणि माध्यमिक क्लासेस बरोबर, अद्ययावत असे  एम.पी.एस.सी. आणि यू.पी.एस.सी. ची अकॅडमी सुरु आली आहे. त्यांच्या या संस्थेत जवळजवळ शंभर लोक काम करत आहेत.
त्यांचे शैक्षणिक सामाजिक कार्य असेच बहरत राहो व त्याचा फायदा ग्रामीण भागातील सर्व जनतेला लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो .व अशा या ग्रामीण भागातील ऊगवत्या ताऱ्याला ग्रामीण संस्कृती कडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.🖊️💐💐🏆


म्हसा यात्रा व बैलांचा बाजार


म्हसा यात्रा व बैलांचा बाजार 

पूर्वी गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे बैलजोडी असायचीच. शेतकरी आपल्या बैलांकडून वर्षभर शेतीची कामे करून घ्यायचा.शेतीच्या आवश्यकतेच्या नुसार बैलजोडी किंवा एखादा बैल बदलायचा. तो विकून दुसरा नविन घ्यायचा. यासाठी लोक आपापले बैल घेऊन म्हशाला जायचे. म्हसा ता.मुरबाड येथे पौष पौर्णिमेला फार मोठी यात्रा भरते. ही यात्रा पुर्वी पंधरा दिवस चालायची. यात्रेला मोठ्या प्रमाणावर बैलांचा बाजार भरतो. त्याशिवाय शेळ्या मेंढया,म्हशी सुद्धा विक्रीस उपलब्ध असतात.महाराष्ट्रातील सर्व तमाशे राहुट्या ठोकून असतात.

ग्रामीण भागातील ज्या शेतक-यांना बैल विकायचे आहेत.ते म्हशाच्या यात्रेच्या चार महिने आधीपासून तयारीला लागत.बैलांना रोज ओढ्यावरा नेऊन अंघोळ घालने,गोठा टापटिप ठेवणे,बैलांना पेंड,गव्हाच्या पिठाचे गोळे खायला घालने.हिरवा चारा,कोंहंबळ व गोळी या झाडांचा कोवळा पाला खायला घालून बैल चांगले तयार करत.

म्हशाच्या यात्रेच्या आधी प्रत्येक गावचे लोक आपापल्या गावातुन सकाळी सहा वाजताच बैल घेऊन निघत. काही लोक भोरगीरी मार्गे,काही रानमळ्यातून भिमाशंकर काही आहूपे मार्गे तर काही घाटघर मार्गे आपापले बैल घेऊन म्हशावर पायी जात असत.

आम्ही सुद्धा सकाळी सहा वाजताच बैल विकण्यासाठी म्हशावर जाण्यासाठी सकाळी सहा वाजताच गाव सोडले.ज्या बैलांनी आपल्या शेतीची सेवा केली त्या बैलांना विकायचे ही कल्पनाच घरातील बाया बापड्यांना मान्य व्हायची नाही. घरातील स्रीया बैलांना गौठ्यातुन बाहेर नेतांना पदरात डोके घालून हमसू हमसून रडायच्या. परंतू त्या तरी काय करतील बापड्या.प्रपंचात राग, लोभ, द्वेश, मत्सर, मोह जास्त करून भागत नाही. नव्हे नियतीला हे मान्य नाही.आपल्या बैलांची शेवटची गळाभेट घ्यायच्या. दोन चार भाकरी किंवा काही गोडधोड बैलांना चारायच्या.आणि जो पर्यंत आपले बैल दृष्टी आड होत नाहीत तो पर्यंत तेथेच उभ्या असायच्या.

बैल एव्हांना टोकावडे,भिवेगावच्या पुढे गेलेले असायचे.तेव्हा घरातील लहान लेकरे उठायची. गोठ्यात बैल कोठे गेले असतील असा प्रश्न त्यांना पडायचा. गोठ्यातील आपले बैल कोठे गेले असे ती मुले आई किंवा आजीला विचारायची.हे सांगतांना सर्वजण गहीवरून जायची. मुले गोरीमोरी व्हायची, रडायची. परंतू आपण दुसरे नविन बैल आणनार आहोत असे समजावल्यावर कुठे शांत.

आम्ही आमचे बैल घेऊन भोरगीरी, भिमाशंकर मार्गे बैलघाटातुन पायी चालत जायचो.दुपारी तीन वाजता कोकणातील लव्हाळीवर पोहचायचो. तेथे नदीवर अंघोळ करायची. घरून आणलेली शिदोरी फडक्यातुन सोडायची. शिदोरीत तांदळाची नाचनीची भाकरी असायच्या.लसणाची, सुकट, बोंबील किंवा वाकटीची चटणी असायची.जोडीला हरभ-याच्या पिठाचे मोकळे बेसन व पातळ भजी असायची. यावर यथेच्छ ताव मारायचा. बैलांना चारा टाकायचा. 

थोडावेळ आराम करून भिलावरे गावाच्या दिशेने कुच करायचे. व तेथेच मुक्काम करायचा.दुसऱ्या दिवशी लवकर उठून काही लोकांना जागा पकडन्यासाठी पुढे पाठवायचे.पुढे गेलेले लोक जागा पकडून तेथे खुंटे ठोकून ठेवत. त्यानंतर दुपारी बैल घेऊन लोक जागा धरून ठेवलेल्या ठिकाणी खुंट्याला बैल बांधत. तेथेच सध्याकाळी राहण्यासाठी गवताची खोप करत.संथ्याकाळचे जेवण तेथेच असे.

म्हशावर टेप व मुळनदी असे दोन भाग असत.खेड,आंबेगाव व जुन्नर व अकोले भागातील लोक टेपावर आपले बैल विक्रीला आनत, तर मुळ नदीवर नगर, नाशिक शहापुर व ठाणे जिल्ह्यातील बैल विक्रीसाठी असत. जिकडे तिकडे बैलच बैल दिसत. मानसांची ही गर्दी उसळलेली असे.प्रचंड गर्दीचा कोलाहाल असे. कुणाला आपले बैल विकायचे असत. तर कुनाला आपले बैल विकून पुन्हा नविन बैल घ्यायचे असत. या यात्रेला हौशे. नौशै व गौशे असे तीनही प्रकारचे लोक असत.

शिवाय उंचच उंच पाळणे,खेळण्यांची दुकाने, हाँटेले, मिठायांची दुकाने, ठिकठिकाणी असत. ग्रामीण भागातील लोक बैल विकल्यावर व नविन बैल घेतल्यावर काही खरेदी करत. त्यामध्ये पिठ मळन्यासाठी काठवट,पेजवळ्या (घावने)ची कहाल, संसारोपयोगी भांडी, सुप, घोंगड्या, चादर, ब्लँकेट सुकट, वाकट, बोंबील, ढोमेली, सोडा (वाळलेल्या माशांचा प्रकार) यांची खरेदी व्हायची. लोक सार्वजानिक कार्यक्रमासाठी डेंगी व भांडी घ्यायचे.मुलांसाठी खेळणी गळ्यात घालन्यासाठी वाघनखे,गळ्यातील गोफ, भोंडीच्या माळा, बांगड्या, रिबनी, आरसे, कंगवे.फण्या अशी खरेदी केली जायची. विवीध प्रकारचा खाऊ घेतला जाई.

म्हशाची यात्रा म्हणजे तमाशाची पंढरी. झाडून सारे तमासगिर तिथे गोळा होत.आपली तमाशाची बारी यात्रेला उभी करत. तमासगीर रसिकांसमोर आपला खेळ सादर करत. मा.रघुविर खेडकर,मंगला बनसोडे,पांडुरंग मुळे,भिका भिमा.गणपत व्ही माने, मा.दत्ता महाडीक पुणेकर,मा. तुकाराम खेडकर, महादू, दत्तोबा तांबे शिरोलीकर, विठा भाऊ मांग, काळू बाळू या प्रसिद्ध तमासगिरांच्या बा-या म्हशाला होत.

बैल विक्रिसाठी किंवा विकत घेण्यासाठी आलेले शेतकरी दोन चार घटका जीवाचं मनोरंजन करण्यासाठी तमाशाकडे धाव घेत.तुफान गर्दी व्हायची. कधी कधी तमासगिरांचा सामनाही रंगे. गण, गवळण, रंगबाजी, फार्स आणि वग असा मोठा कार्यक्रम असे. पहाटेचं तांबडं फुटेपर्यंत पायातल्या चाळांची छुमछुम,कडयांचा कडकडाट आणि डफ, तुणतुणे आणि ढोलकीची धुमाळी चालू राही. 

तिकडे सुर्य डोंगराआडून डोकावून पाहू लागला की तमाशाचा खेळ मोडत असे. रात्री ज्यांनी पात्र रंगवली त्यांना सकाळी मेकअप नसताना पाहताना आमचा भ्रमनिरास होत असे.

लाईटच्या झगमगाटातील लावण्यवतीचं खरं रुप सकाळच्या हजेरीत पहावसंही वाटत नसे.तमाशाला गर्दी करणाऱ्या प्रेक्षकांपैकी मीही एक होतो.आम्हाला गण, गवळण, रंगबाजी आणि फार्समधील नाचगाणी, गवळणी, मावशीची फिरकी यापेक्षा तमाशाचा वग पाहणे आवडायचे. त्यातही काही अद्भुत ट्रीक सिन्स असतील तर मला फारच आवडे.

मा. दत्ता महाडिक सह गुलाबराव बोरगावकर मा.,चंद्रकांत ढवळपुरीकर, मा.माधवराव गायकवाड मा.,गणपत व्ही माने, मा. शंकरराव कोकाटे, वसंतराव अवसरीकर, साहेबराव नांदवडकर, काळू बाळू, पांडूरंग मुळे, मंगला बनसोडे,रघुविर खेडकर,भिका भिमा अशी मला माहित असलेली नामांकित मंडळी त्यावेळी तमाशात होती.

त्याकाळी काही तमाशे वगाचे नाव अगोदर जाहिर करीत असत व प्रेक्षकांची गर्दी खेचत असत.दत्ता महाडीक यांचा महाराष्ट्र झुकत नाही अर्थात धर्मवेडा संभाजी अप्रतिम वगनाट्य होते. महाराष्ट्र झुकलाच पाहिजे यापुढे जाऊन तिसरे वग नाटय आले, महाराष्ट्र झुकेल पण केंव्हा ? लग्नाआधी कुंकू पुसले, संसाराचा झाला सिनेमा, कऱ्हाडची कुर्हाड, खन्डोबाची आण, सत्या बेरड, माता न तू वैरीणी असे सामाजिक विषय असणारी वगनाट्य असत, तमासगिरांमध्ये स्पर्धा चाले. 

दत्ता महाडीकांचा तमाशा मला फार आवडे. दत्ता महाडीक म्हणजे विनोदाचा बादशहा. कवी आणि उत्तम गायक. स्टेजवर एंट्री घेतली आणि शिटया व टाळयांचा कडकडाट झाला नाही असे कधीच घडले नाही. त्यांचं वग नाटय फार जबरदस्त असे. माधवराव गायकवाड त्यात संभाजीची भुमिका करत. काय तो अभिनय,संवादफेक आणि रुबाब अहाहा ! मी त्यांच्या कामावर फिदा झालो होतो. 

म्हशाच्या तमाशा पंढरीत परंपरा म्हणून तमासगीर दरवर्षी त्यांची बारी रसिकां चरणी सादर करीत.त्या खेळावरुन अनेक गावच्या जत्रांच्या सुपा-या ठरवल्या जायच्या. मैदानात तमाशाच्या बा-या सुरु होत्या. चालताना विठाबाईच्या तमाशा जवळ थांबलो विठाबाई त्यांच्या पहाडी आवाजात पट्ठे बापूरावांची लावणी म्हणत होत्या.

"तू गं ऐक नंदाच्या नारी,काल दुपारी,

यमुनेच्या तिरी ग हा हा हा ,

धुणं धूत होतो गवळ्याच्या नारी ,

जी जी ग जी जी ग हा. 

आम्ही गवळण ऐकून पुढे सरकलो.पुढच्या बारीत ढोलकी. तुणतुणे हलगी,कडे यांची जुगलबंदी सुरु होती. या वाद्यांनी लोकांवर जादू केली आहे, ढोलकी तुणतुण्याच्या आवाज ऐकला की लोक वेडे बनून तिकडे धावत सुटतात मग 'लावणी 'या वाद्यांच्या साथीत तिचा तोरा मिरवते.काशिनाथ  म्हणाला,थांब रे, गण ऐकुन जाऊ. त्याला गण म्हणण्याचा नाद होता.

डफावर थाप मारून, ढोलकीचा तोडा संपताच शाहिरानं फेट्याचा सोगा पाठीवर भिरकावला. डाव्या हाताचा पंजा कानावर ठेवला आणि एकदम कडक आवाजात सुरु केलं,

आधी गणाला रणी आणला "

काशिनाथला दम धरवेना त्यानेही मोठ्याने सुरु केलं 

नाहीतर रंग पुन्हा सुना सुना ना... 

मी  त्याला गप्प करण्याची केविलवाणी धडपड करीत होतो पण त्याच्यात साक्षात पट्ठे बापूरावच संचारला होता.

पट्ठे बापूराव कवी कवणाचा,

हा एक तुकडा जुना जुना ना "

गण संपताच ढोलकीचा ठेका सुरु झाला चाळांची छुम छुम ऐकू येऊ लागली,लोकं मांडी घालून बसले होते ते चवड्यावर आले.आम्ही पुढच्या बारीकडे निघालो तुकाराम खेडकरांचा तमाशा चालू होता गवळणी बाजाराला निघाल्या होत्या,

"चला चला गं फार येळं झाला,

मथुरेच्या हाटा आता निघा चला ग,

बाजार मोठा, लवकर गाठा 

मथुरेच्या हाटा आता निघा चला ग "

भाऊ फक्कडांची ही प्रसिद्ध गवळण ढोलकीच्या तालावर  आणि नर्तकींच्या अदाकारीत चालू होती,गण गवळण झाल्यानंतर फार्स सुरु झाला,

मी म्हटलं.चला आता दत्ता महाडीकांचा वग सुरु होईल. 

थांबा थोडं, थोडा फार्स बघून जाऊ  काशिनाथ म्हणाला. त्याला सोंगाड्याचं काम भारी आवडायचं, तो टाचा वर करून बघू लागला. फार्स चांगलाच रंगला होता.

आरं ! एवढ्या घाईनं रातच्याला कुठं चाललास ?"

कुठं म्हंजी तमाशाला. 

लईच घाईत निघालास वाटत.

व्हय, वाईच डोळा लागला व्हता. आथुरणातून उठून घाइघाईन उशाला ठेवलेला पटका डोक्याला गुंडाळला,आन तडक निघालो. म्हटलं, गवळण हुकायला नको. 

आरं येड्या ! तू डोक्याला पटका नाय तर उशाशी पडलेलं बायकोचं लुगडं गुंडाळून आलास लेका ...

आणि हास्याचा गडगडाट  झाला.

आम्ही गर्दीतून आणखी पुढे सरकलो. दत्ता महाडीकांच्या स्टेजसमोर आलो. प्रेक्षकांची ही तुफान गर्दी. शिटया आणि गोंगाटाने काही ऐकू येत नव्हते. तमाशा थांबलेला होता आणि स्टेजवर एक ग्रामस्थ खुर्ची टाकून बसले होते.आम्ही आजुबाजुला चौकशी केली. 

काय झालय ? " 

काही माहित नाही, तमाशा थांबवलाय जणू. का ? खेळ लावलाय तो लोकांना पसंत नाही वाटतं? कोणता वग लावलाय ? 

ज्ञानेश्वर माझी माय माऊली.  

खेडच्या यात्रेत मी त्यांचा संत तुकाराम वग पाहिला होता.दत्ता महाडीक स्वतः गायक व कवी होते. त्यांनी केलेली संत तुकारामाची भुमिका व मा.चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी मुंबाजी बुवाची केलेली भुमिका आणि त्यात घेतलेले ट्रीक सिन्स माझ्या आजन्म लक्षात राहतील. एवढा सुंदर, निटनेटका वग मी प्रथमच पाहिला होता. त्यामुळे ज्ञानेश्वर माझी माय माऊली मला आवडला असता.

अरे! मी हा वग अगोदर खेडच्या जत्रेत पाहिला आहे. स्टेजवर ठाण मांडून बसलेला माणूस उठला. तोंडात साचलेला पानाचा चोथा स्टेजच्या कडेला थुकून आला व माईककडे जाऊन म्हणाला, रक्तात भिजला बंगला झालाच पाहिजे. 

मी म्हटलं, बंगला काय आहे? काही तरी हाणामारीची गोष्ट ? 

नाही, रक्तात भिजला बांगला असे त्यांना म्हणायचं आहे.  

स्टेजवरील गृहस्थ पुन्हा माईकवरुन ओरडत होता, ते काय नाय, रक्तात भिजला बंगला झालाच पाहिजे.  

पुर्वी पाकिस्तान व बांगला देशाचे युद्ध चालू होते. शेख मुजिब रेहमानच्या मुक्ती सेनेला भारताने पाठींबा दिल्याने त्या युद्धाचं वारं भारतातही फिरत होतं. त्यावर दत्ता महाडीक यांनी रक्तात भिजला बांगला हा वग बसवला होता. व तो तुफान लोकप्रिय झाला होता. 

तेवढ्यात तमाशातील एक वरीष्ठ नट चंद्रकांत ढवळपुरीकर माईकसमोर आले व आम्ही हा वग आज सादर करु शकत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्या तमाशातील प्रमुख कलावंत माधवराव गायकवाड हे आज उपस्थित नसल्याने हा खेळ आज करता येत नाही म्हणत त्यांनी हात जोडले परंतु लोक इरेला पेटले. 

सारे प्रेक्षक  बांगला ! बांगला !  बांगला !  म्हणून ओरडू लागले.

बांगला! बांगला ! रक्तात भिजला, बांगला मी पण एकदा ओरडलो. 

५-१० मिनिटांनतर दत्ता महाडीक स्वतः ज्ञानेश्वरांच्या वेशात स्टेजवर आले. सगळीकडे शांतता पसरली. लोकं गपगुमान झाली. 

रसिक मायबापहो, आपल्या विनंतीचा मान ठेऊन आम्ही 'रक्तात भिजला बांगला  हा वग सादर करीत आहोत. लोकांनी टाळयांचा कडकडाट केला. 

आम्हीही त्या गर्दीत घुसलो आणि जिथून चांगले दिसेल अशा ठिकाणी जागा धरुन बसलो. मला व्यवस्थित दिसत नव्हतं, चवड्यावर बसून पहावं लागत होते.  

मला फक्त अर्धा तास द्या.  महाडीकांनी माईकवरुन पुकारलं, एवढा मोठा समुदाय चक्क अर्धा तास गप्प बसून राहिलेला मी पाहिला, स्टेजवरचे पडदे सोडून त्याठिकाणी दुसरे पडदे लावण्यात आले. आणखी आवश्यक ते बदल नेपथ्यात करण्यात आले, विजेच्या चपळाईने सारे घडत होते आणि अर्ध्या तासाने सुरु झालं 'रक्तात भिजला बांगला हे वगनाट्य.

मुक्ती सेनेत गेलेल्या एका तरुणाची आणि त्याच्या कुटुंबाची व बांगला देश पाकिस्तानच्या लढाईची ती कथा होती. सुरुवातीलाच माधवराव गायकवाड मुस्तफाच्या (तो तरुण) वेषात स्टेजवर अवतीर्ण झाले, लोकांनी टाळयांचा कडकडाट केला. 

त्या दिवशी त्या वगाचे अप्रतिम सादरीकरण झाले. विमानांचा आवाज, बाँब, हातबाँब, रायफलच्या गोळया. मला तर वाटले  खरोखर स्टेजवर लढाईच चाललीय. चवडयावर बसून तमाशा पाहताना कळ लागली की मधुनच उभा राहूनही पहात होतो. तमाशाच्या इतर बा-यांनी कधीच आपला खेळ मोडला होता.

सगळं पब्लिक,' रक्तात भिजला बांगला ' ला लोटलं होतं. जणू काय माणसांचा महापूरच आल्यासारखं वाटत होतं. स्टेजवर होणारे बाँबस्फोट, विमानाने टाकलेले बाँब, बंदुकीच्या फैरी त्यासाठी वापरलेले आपटीबार यामुळे स्टेजच्या आजुबाजुचा परिसर धुरानं भरुन गेला, माधवराव गायकवाड, दत्ता महाडीक, गुलाबराव बोरकर,चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी अप्रतिम भुमिका केल्या. माझ्या बालमनावर कोरलेलं ते वगनाटय अजुनही माझ्या नजरेसमोर जसेच्या तसे कालच पाहिल्यासारखे ऊभे राहते.

एका तमाशाला एवढी लोकं जमतात हे मी पहिल्यांदा पहात होतो.तमाशाला दिलेले ' लोकनाट्य 'हे नाव खऱ्या अर्थाने सार्थ होत होते.

तमाशाचा खेळ पाहुन दुस-या दिवशी पुन्हा घरी जाण्यासाठी  संध्याकाळी पाच वजता म्हशातून आमचा जथा निघाला. संध्याकाळी भोमाळवाडी येथे एक मुक्काम करून पहाटे तीन वाजता प्रचंड थंडीत आमचा प्रवास सुरू झाला. रानावनातुन, खाचखळग्यातून, बैल घाटाने आम्ही सकाळी आ वाजता भिमाशंकरला आलो. तेथून पुढे चालवेना.परंतू आठ दिवसापुर्वी गाव सोडले होती. घरी जाण्याची ओढ लागली होती.आणि एकमेव त्या ध्यासाने भोरगीरी मार्गे आम्ही दुपारी साडेबारा वाजता घरी पोहचलो. नविन बैलांचे चांगले स्वगत केले गेले.🖊️🙏


मा.चंद्रकांत ढवळपुरीकर


मा.चंद्रकांत ढवळपुरीकर

चंद्रकांत ढवळपुरीकर, ढोलकी फडाच्या तमाशाचे मालक, ज्येष्ठ कलावंत. पूर्ण नाव चंद्रकांत शिवराम जाधव.

त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे झाला,त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. एक बहीण व सात भाऊ असा त्यांचा घरचा परिवार.चंद्रकांतजी बालवयात गुरे सांभाळून जेमतेम इयत्ता ३ री पर्यंत शिक्षण घेऊ शकले. त्यांचा जन्म गोंधळी समाजातला आहे.

बालवयातच ते आपल्या मामांच्या तमाशात काम करू लागले. विष्णूबुवा बेल्हेकर सह देविदास रांधेकर या तमाशात प्रथम बिगारी काम करीत असतानाच नंतर ते नृत्य कला शिकले. ते नाचाची उत्तम भूमिका करीत असत. 

१९५५ मध्ये जगताप पाटील पिंपळेकर यांच्या फडात त्यांनी वगात छोट्या मोठ्या भूमिका केल्या. त्यांचा आत्मविश्वास वाढला,संवादातून संभाषण कौशल्य विकसित झाले.

१९५६ साली तुकाराम खेडकर सह विठ्ठल कवठेकर या तमाशात त्यांनी प्रवेश केला. तुकाराम खेडकर हे कुशल तमाशा कलावंत होते. त्यांचे अभिनय कौशल्य अप्रतिम होते. ते शब्दसृष्टीचे उपासक होते. त्यांचा चंद्रकांतजींवर चांगलाच प्रभाव पडला. 

त्याच तमाशात चंद्रकांतजी उर्फ भाऊ खलनायक म्हणून प्रसिद्ध झाले.१९५८ मध्ये माधवराव नगरकर तमाशा मंडळात सारंगपूरची होळी या वगात खलनायकाची भूमिका अत्यंत चांगल्या प्रकारे सादर केली. 

१९५९ ते १९६२ पर्यंत तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर तमाशा मंडळात त्यांच्या कलेला बहर आला. त्यांची खलनायकाची भूमिका पाहण्यासाठी तमाशाचा तंबू खचून भरत असे. त्याच काळात पानिपतचा सूड  हा त्यांनी भूमिका केलेला ऐतिहासिक वग अतिशय गाजला. त्या वगात ‘ सादुल्ला ‘ नावाची खलनायकाची भूमिका त्यांनी यशस्वीपणे सादर केली. त्याच काळात त्यांनी काळ रक्त,लडूसिंग, गवळ्याची भूमिका सादर केल्या.ते रसिकांचे खलनायक म्हणून प्रसिद्ध झाले.

महाराष्ट्रातील तमाम तमाशा रसिकांनी त्यांना वगसम्राट ही पदवी बहाल केली.१९६३ ते १९६४ या कालावधीत जगताप पाटील पिंपळेकर या तमाशा मंडळात दत्ता महाडिक पुणेकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला.परिचयातून स्नेह वाढला. दत्ता महाडिक यांच्यासारखा उत्कृष्ट कलावंताचे ते मित्र बनवले. स्वतःच्या मालकीचे लोकनाट्य मंडळ असावे अशी प्रेरणा त्यांना झाली.

त्याचाच परिणाम म्हणून १९६४ मध्ये वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर सह बाबुराव सविंदणेकर नावाने तमाशा फड सुरु केला.बिगारी कामगार बनून दाखल झालेला तमाशातील कामगार तमाशा मंडळाचा मालक बनला; परंतु आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांच्यापुढे अडचणी निर्माण झाल्या.

१९६६ सालापासून चंद्रकांत ढवळीपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर तमाशा मंडळ अस्तित्वात आले. या तमाशा मंडळाने त्यांच्या वैभवाच्या व प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. त्यांनी गणपतराव चव्हाण सविंदणेकर यांना गुरुस्थानी मानले होते.

त्यांची गाजलेली वगनाट्य व त्यातील भूमिका :  महाराष्ट्र झुकत नाही – गणोजी शिर्के, महाराष्ट्रा तू जागा रहा – बहिर्जी नाईक, चित्ता फाडला जावळीचा – चंद्रराव मोरे, चिचोंलीचा देशमुख – देशमुख , गवळ्याची रंभा – रंगभल महाराज ,संत तुकाराम – मंबाजी, भक्त पुंडलिक – अंबाजी पाटील, चाकणचा किल्लेदार – फिरंगोजी नरसाळे, ज्ञानेश्वर माझी माऊली – दादभट, झाला उद्धार  वाल्मिकीचा – वाल्मिकी, याशिवाय त्यांची  रक्तात भिजला बांगला, असे पुढारी ठार करा,पुढाऱ्यांनी काढली शाळा,पुढारी पाहिजे गावाला, तिथं मठातील सैतान, मुंबईचा रेल्वे हमाल, काय दिले या स्वातंत्र्याने ,यासाठी स्वातंत्र्य हवे का ?, इंदिरा मठाचे गुपित, करा ठार हे गॅंगवॉर, रनात रंगली इंदिरा,राजीव गांधी झिंदाबाद,ही झुंज मुरारबाजीची, संत सावता माळी, करितो चोखोबा जोहार, संत एकनाथ, खुर्चीसाठी वाटलं ते, संभाळ तुझ्या सौभाग्याला, चांडाळ चौकडी गाव गुंडांची, तिकीट मिळालं गुंडाला , लोकशाहीचे मारेकरी अशी अनेक वगनाट्ये गाजली. 

महाराष्ट्र झुकत नाही या वगनाट्याने तर त्यांची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचविली. इराण सरकारचे सांस्कृतिक मंडळ भारतातील सांस्कृतिक जीवनाचा विकास कशाप्रकारे झाला आहे याचा अभ्यास करण्यासाठी १९६७ साली महाराष्ट्रात आले होते.त्यांनी भाऊंच्या वगनाट्याचे शूटिंग करून नेले आणि ते इराण च्या दूरचित्रवाणीवरून प्रसारित केले.

चंद्रकांत ढवळीपुरकर यांना मिळालेले पुरस्कार :  ढवळपुरी ग्रामस्थांकडून ६५ वी निमित्त सत्कार व पुरस्कार (१९९४), विठ्ठलराव विखे पाटील कला गौरव पुरस्कार (२००१) , पुणे महानगरपालिका पट्ठे बापूराव पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद दादू इंदुरीकर स्मृती पारितोषिक (२००३) , पुणे नवरात्रौ महोत्सव पुरस्कार (२००४), महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२००४) , उत्कृष्ट तमाशा अभिनय सम्राट ( पवळा पुरस्कार – २००१ ) , सहकार महर्षी जयंती समारंभ पुरस्कार (२००५), नाद निनाद तमाशा महोत्सव पुरस्कार (२००६), नांदेड जिल्हापरिषद तमाशा महोत्सव पुरस्कार (१९९०). 

तमाशा करत असताना त्यांनी अनेक गावातील शाळांना व मंदिरांना भरघोस देणग्या दिल्या. ढवळपुरी गावातली शाळा बांधली. मारुती मंदिर व दत्त मंदिर बांधले. ह्यात असे पर्यंत शालेयपयोगी वस्तूंचे मुलांना वाटप केले. 

त्यांनी १६ ऑक्टोबर २००९ साली जगाचा निरोप घेतला अखिल महाराष्ट्र तमाशा परिषदेत त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले. 

सध्या त्यांची दोन्ही मुले किरण चंद्रकांत जाधव ( किरण कुमार ढवळीपुरकर ) व संतोष चंद्रकांत जाधव ( संतोष ढवळीपुरकर ) लोकनाट्य तमाशा मंडळाचे काम आजतागायत सांभाळत आहेत.


सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस