खेड/ शिरूरचे आतापर्यंतचे खासदार

खेड/ शिरूरचे आतापर्यंतचे खासदार 

१९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला.व नेहरू पंतप्रधान जरी झाले असले तरी १९५२ पासुन ख-या अर्थाने प्रत्येक पाच वर्षासाठी लोकसभेच्या निवडणूका घेण्यात आल्या. १९६२ साली खेड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला.

 आर के खाडिलकर 

या मतदारसंघात जुन्नर,आंबेगाव,खेड,मावळ,मुळशी हे तालुके होते. १९६२ साली तिसऱ्या लोकसभेच्या निवडणूका घेण्यात आल्या. या निवडणूकी मध्ये पहिले खेडचे खासदार झाले श्री आर.के.खाडिलकर.ते नारिंगा ता.देवगड जि.रत्नागिरीचे होते. ते निष्णांत वकील होते. १९६२ -१९६७ व १९६७-१९७१ पर्यत खेडचे व त्यानंतर १९७१-१९७७ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातुन ते खासदार झाले.

त्यांनी त्यांच्या कार्यकाळात लोकसभेचे उपसभापती ,पुरवठा, कामगार व पुनर्वसन मंत्री ही पदे भूषवली. ते मूळचे कोकणातील होते त्यांचे निधन १९७९ मध्ये झाले.

अनंतराव पाटील 

१९७१ - १९७७ या पाचव्या  व्या लोकसभेचे श्री.अनंतराव पाटील हे खेडचे खासदार होते.



१९७७ ते १९८० या सहाव्या लोकसभेचे खासदार कै. श्री अण्णासाहेब मगर हे खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते.

अण्णासाहेब मगर

अण्णासाहेब मगर हे पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार व पहिले नगराध्यक्ष देखील होते. त्यांनी सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक सहकार क्षेत्रात भरीव कार्य केले ते 1952 पासून हवेली विधानसभेचे आमदार देखील होते.

 रामकृष्ण मोरे

19८०-१९८४ या या सातव्या लोकसभेचे खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार कै.श्री. रामकृष्ण मोरे हे होते. ते 1984 ते 1989 पर्यंत खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. नंतर ते विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात शालेय शिक्षणमंत्री होते. त्यांचे पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेवर  निर्विवाद वर्चस्व होते.ते हवेली तालुक्यातील देहू या गावचे होते.

1984  स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या.त्यावेळी श्री शरद पवार हे समाजवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. समाजवादी काँग्रेस आणि जनता दल यांची युती झाली होती. श्री शरद पवार हे बारामती मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार होते. त्यावेळी बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी श्री.संभाजीराव काकडे हे इच्छुक होते.

परंतु समाजवादी काँग्रेस आणि जनता दल यांची युती झाल्यामुळे संभाजीराव काकडे यांना खेड लोकसभेची जागा सोडण्यात आली. श्री संभाजीराव काकडे यांना खेड आंबेगाव जुन्नर या भागात मानणारा समाज होता. श्री संभाजीराव काकडे यांना सर्वजण लाला म्हणायचे.श्री.शरदराव पवार साहेब यांच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी मंचर येथे शरद बँकेची स्थापना केली.तर मंचर येथेच श्री संभाजीराव काकडे यांच्या समर्थकांनी कै. श्री. किसनराव बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली लाला अर्बन बँकेची स्थापना केली होती.किसनराव बाणखेले हे श्री संभाजीराव काकडे यांना गुरु मानत.

 किसनराव वानखेले

या निवडणुकीत रामकृष्ण मोरे विरुद्ध संभाजीराव काकडे यांची निवडणूक प्रचंड चुरशीची झाली. शेवटच्या फेरीपर्यंत कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. परंतु अवघ्या सोळा हजार मतांनी रामकृष्ण मोरे विजयी झाले. रामकृष्ण मोरे हे याआधी खासदार होते. त्यांच्याकडे पैसा होता. परंतु संभाजीराव काकडे यांच्याकडे या दोन्ही बाबी नव्हत्या.हे प्रामुख्याने लक्षात घ्यावे लागेल.

पुढे नवव्या लोकसभेची निवडणूक घेण्यात आली. खेड लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे रामकृष्ण मोरे व जनता दलाचे श्री संभाजीराव काकडे यांचे पट्टशिष्य कै.श्री. किसनराव बाणखेले हे निवडणुकीसाठी उभे होते. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा तो सामना होता.

त्यावेळी किसनराव बाणखेले यांची ही निवडणूकीसाठी अक्षरशः लोकांनी वर्गणी काढून प्रचार केला. त्यावेळी श्री शरद पवार साहेब हे काँग्रेसमध्ये होते. त्यांनी जाणीवपूर्वक काँग्रेसचे उमेदवार रामकृष्ण मोरे यांच्याकडे दुर्लक्ष केले. या निवडणुकीत कै.किसनराव बाणखेले यांनी त्यांचे गुरु संभाजीराव काकडे यांच्या पराभवाचा वचपा काढला. व नवव्या खेड लोकसभा मतदार संघाचे खासदार झाले.

श्री किसनराव बाणखेले हे आंबेगाव तालुक्यातील मंचर या गावचे होते ते पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य देखील होते. त्यांनी तीन वेळा आंबेगाव विधानसभेचे नेतृत्व केले. त्यावेळी सगळी कडे धोतर गेलं दिल्लीला असे जिकडेतिकडे म्हटले जायचे. पहिल्यांदाच खेड लोकसभा मतदारसंघ काँग्रेस कडून जनता दला कडे गेला. किसनराव बाणखेले १९८९-१९९१ पर्यंत खासदार होते.

 विदुरा नवले 

दहाव्या लोकसभा मतदारसंघाचे १९९१-१९९६ या काळात थेट लोकसभा मतदारसंघाचे श्री विदुरा उर्फ नानासाहेब नवले हे खासदार होते. ते संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी खूप वर्ष होते. ते मुळशी तालुक्यातील होते.

 निवृत्ती शेठ शेरकर 

त्यानंतर १९९६ ते १९९८ या कालावधीत खेड लोकसभा मतदारसंघाचे श्री निवृत्तीशेठ शेरकर खासदार होते. ते जुन्नर तालुक्यातील शिरोली गावचे होते. ते बरेच वर्ष विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते.

अशोकराव मोहोळ 

त्यानंतर १९९८ ते १९९९ पर्यंत खेड लोकसभा मतदार संघाचे श्री.अशोकराव मोहोळ खासदार झाले. ते देखील मुळशी तालुक्यातील होते. 

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर लगेच लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणूका घेण्यात आल्या. १९९९ ते २००४ पर्यंत खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार पुन्हा श्री अशोकराव मोहोळ विजयी झाले. 

त्यानंतर २००४ ते २००९ मध्ये शिवसेनेचे श्री शिवाजीराव आढळराव पाटील हे खेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले.ते आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील आहेत. त्यांचे  प्रतिस्पर्धी  उमेदवार श्री अशोक मोहोळ हे होते.

सन २००९ नंतर खेड लोकसभा मतदार संघ संपुष्टात आला. व शिरूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड ,शिरूर, भोसरी व हडपसर इत्यादी भाग सामाविष्ट करण्यात आला, 

 शिवाजीराव आढळराव 

सन २००९ ते २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत श्री शिवाजीराव आढळराव पाटील हे दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी होते राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री विलास लांडे. 

त्यानंतर २०१४ ते २०१९ साठी पुन्हा लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत पुन्हा तिसऱ्यांदा शिवसेनेचे श्री शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पदावर निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी होते राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री देवदत्त निकम. 

संपूर्ण मतदारसंघात प्रत्येक गाव आणि गाव पिंजून काढणारे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील ते एकमेव खासदार असावेत. त्यांच्या काळात खूपच विकास कामे झाली. त्यांनी अगदी वैयक्तिक निधी देऊन विकास कामे केली.

अमोल कोल्हे

सन २०१९ ते २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत श्री अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले, त्यांनी विद्यमान लोकसभेचे खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.

 त्यानंतर पुन्हा 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव करून पुन्हा लोकसभेचे खासदार झाले.

 रामदास तळपे 



शेतीची राखणी

 शेतीची राखणी 

जुन महिन्यात अनेक शेतकरी ज्या भागात खूप पाऊस पडतो त्या ठिकाणी भात लागवड करतात.ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी भुईमूग, बटाटा, बाजरी,ज्वारी यांची लागवड केली जाते. चांगला पाऊस झाल्याने पिकांची जोमदारपणे वाढ होते.शेतकरी राजा यावर्षी चांगले पीक येणार म्हणून आनंदात असतो.

जोमदार पिकांची मग निंदणी केली जाते.काही ठिकाणी याला बेननी असेही म्हणतात. निंदणी करणे म्हणजे शेतातील पिकांमधील अनावश्यक गवत,त्याला तण असे म्हणतात. ते काढले जाते.गावातील स्त्रियांचा ग्रुप बनवतात.आणि प्रत्येकाच्या शेतात पाच- सहा बायका सकाळी जेवण वगैरे करून शेतात खुरपे घेऊन जातात.आणि शेतातील अनावश्यक गवत काढतात. हे गवत काढत असताना अनेक प्रकारच्या गप्पा मारत हसत खेळत काम करतात. कुणी अवनी करा कुणी बेननी करा,गुरांना होईल चारा. हे गाणे यातूनच कवीने लिहिले असावे.अशाप्रकारे एकमेकांच्या शेतांची निंदणी केली जाते. ही कामे शक्यतो श्रावण,भाद्रपद महिन्यात चालतात. 

श्रावण महिना हा उपवासाचा महिना असतो. श्रावण महिन्यात शक्यतो मेहनतीची कामे तुलनेने कमी असतात.अनेक घरांमध्ये धार्मिक वातावरण असते.पोथ्या पुराणे वाचली जातात.वृत्त वैकल्ये केली जातात.उपास-तापास धरतात त्यामुळे संध्याकाळी उपवासाच्या दिवशी डाळ भात ,भाजी चपाती, आळुच्या वड्या, तव्यावरची भजी, लसणाची चटणी,लोणचे, पापड कधी कधी मासवड्या पुरणपोळ्या, खीर,बासुंदी यांची रेलचेल असते.

घरातील पुरुष मंडळींना जनावरांसाठी चारा कापून आणणे, जनावरे सांभाळणे. इत्यादी कामे असतात.जोमदार पिके आल्यामुळे शेतकरी राजा आनंदात असतो.आपल्या शेतातील भात, भुईमूग, बटाटे या पिकांना रानटी जनावरांनी उपद्रव करू नये म्हणून अनेक प्रकारे राखण केली जाते.

पूर्वी आम्ही शेतातील उंच जागेवर चार बाजूला चार लाकडे जमिनीत रोवून मांडव तयार करायचो. त्यावर लाकडी फळ्या अंथरून त्यावर चार-पाच जण झोपतील अशी रचना करायचो.  त्यावर पुन्हा मांडव बनवून सर्व बाजू वाळलेल्या गवताने बंदिस्त करायचो.पुढे आत जायला जागा असायची. मांडवावरील उंच असणाऱ्या मचानात जाण्यासाठी लाकडी शिडीचा उपयोग केला जायचा.या मचानात बसून आजूबाजूचा परिसर व हिरवेगार शेत पाहायचा आनंद खूप वेगळा असायचा.आम्ही सुट्टीच्या दिवशी या मांडवात अभ्यास करायचो. रात्री मांडवातील मचानावर  झोपायला जाण्यासाठी लहान मुले हट्ट करायची.

रात्रीची जेवण खाणे झाल्यानंतर एकेकजण जमायचे. कुणाकडे तरी बॅटरी असायची.बॅटरीचे त्यावेळी अनेक प्रकार असायचे,दोन सेलची बॅटरी, तींनसेलची बॅटरी, पाच सेलची बॅटरी.बॅटरी ही स्टीलची लांबट असायची आणि त्यामध्ये एव्हरेडी कंपनीचे सेल असायचे. हे असेल ना लोक मसाला बोलायचे.सेल मधील मसाला संपल्यानंतर पखवाजाच्या वादी खाली हे सेल लावले जायचे.असा त्याचा दुहेरी उपयोग असायचा.

बॅटरी नसेल तर कंदील हा हमखास असायचा.कंदील घेऊन संध्याकाळी राखणावर जायचो.रिमझिम पाऊस चालू असायचा.ओढे-नाले वाहत असायचे,त्यांचा खळखळाट व रातकिड्यांची किरकिर यांचा एक वेगळाच आवाज रात्रीच्या अंधारात यायचा, परंतु दोन-चार जण असल्यामुळे गप्पांच्या नादात त्याचे काहीच वाटायचे नाही, मांडवा जवळ आल्यावर शिडीवर चढून मांडवातील मचानावर  प्रवेश केला जायचा.

मांडवातील फळ्यांवर भाताचा पेंढा अंथरला जायचा, त्यावर पोती (गोणपाट) अंथरली जायची.त्यावर दोन-तीन गोधड्या  अंथरून बिछाना बनवला जायचा. मांडवावर चढून गेल्यावर काहीजण मोठ्यामोठ्याने हळी द्यायचे. कारण पिकांना उपद्रव देण्यासाठी रानडुकरे,रानटी ससे, खोकड ,साळू,उदमांजरे हे प्राणी शेतात यायचे. आणि शेताची नासधूस करायचे. त्यासाठी मोठ्यामोठ्याने आरोळ्या दिल्या जायच्या, प्रसंगी सुतळी फटाके वाजवले जायचे.काही ठिकाणी पत्र्याचा डबा शेतामधील खांबाला बांधून त्यामध्ये घंटीला जशी लाळ असते तसे एक छोटे लाकुड बांधून त्याला दोरी बांधायची,ती दोरी मांडवा पर्यंत असायची. व मांडवात बसून दोरी ओढल्यावर पत्र्याचा डबा वाजायचा. त्यामुळे शक्यतो रानटी जनावरापासून शेतांचे रक्षण व्हायचे.

मांडवात गेल्यावर एका ठिकाणी कंदील लावायचा.पत्त्यांचा कॅट काढायचा.चौघा जणांमध्ये मेंढीकोट किंवा हाथ हाथ असे पत्त्यातील खेळातील प्रकार खेळले जायचे.या खेळामध्ये खूपच मजा यायची. बराच वेळ पत्त्यांचा डाव चालायचा. परंतु हा डाव कधीच पैशावर खेळायला जायचा नाही. फक्त आनंद म्हणून खेळला जायचा.पत्ते खेळून झाल्यावर मोठ्यामोठ्याने दोरी ओढून डब्बा वाजवला जायचा. शिवारातील दुरच्या राखनदारांना हाळी देऊन ते जागे आहेत काय? याची खात्री करायची. शेतात एक फेरफटका मारायचा. दोन -तीन सुतळी फटाके वाजवले जायचे. नंतर मांडवात झोपी जायचे. कधीतरी रात्री उठून पुन्हा डब्बा वाजवला जायचा. 

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे जाग यायची. बाहेर रिमझिम पाऊस चालू असायचा.किंवा आभाळ स्वच्छ व निरभ्र असायचे. सकाळी उठून मग आपापल्या घरी जायचे. अशाप्रकारे महिना-दीड महिना राखणे चालायची.

राखणे जशी पावसाळ्यात असायची तशीच उन्हाळ्यात देखील असायची उन्हाळ्यात बटाटे,हरभरा,वटाणा ,गहू यासाठी राखण करायला लागायचे. राखणाला रात्री गेल्यानंतर वटाणा, हरभरा व गहू यांचा हुळा केला जायचा.मांडवा जवळच्या मोकळ्या जागेत रानातील वाळलेल्या काटक्या एकत्र करून त्या पेटवायच्या. व त्यावर हरभरा, वाटाणा किंवा गव्हाच्या ओंब्या  त्या जाळावर धरून भाजला जायचा. चांगल्या प्रकारे भाजल्यावर काटक्या विझवून तेथेच  चार-पाच जणांनी गरम हुळा खायचा. त्याची चव अप्रतिम असायची. कधीकधी हरभरा म्हणून गरम खडा तोंडात जायचा.जीभ भाजायची.हुळा खाताना अनेक गप्पागोष्टी व्हायच्या. इकडच्या तिकडच्या गप्पा हुळ्या बरोबर चघळल्या जायच्या. 

आता आपण नोकरीच्या निमित्ताने दूर शहरात राहतो. काहीजण बंगल्यात तर काही स्वतःच्या फ्लॅटमध्ये खोल्यांमध्ये राहतात परंतु शेतातील रात्री मित्रांबरोबर मांडवात झोपणे, पत्ते खेळणे, पत्र्याचा डबा वाजवणे, सुतळी फटाके फोडणे चार जिवलग मित्रांशी गप्पागोष्टी करणे टिंगल-टवाळी करणे ,हुळा खाणे, यासारखा आनंद कशातच नाही. हे मात्र खरे .हा आनंद लाख रुपये देऊनही परत मिळणार नाही हेही तितकेच खरे. आता  राहिल्या आहेत त्या फक्त आठवणी.





आदिवासी समाज दशा आणि दिशा


आदिवासी समाज दश आणि दिशा 

.

आदिवासी म्हणजे अधिवास म्हणजे प्राचीन काळापासून इतिहास ज्यावेळी लिहिला गेला त्याच्याही आधीपासून भारतात राहणारा समाज होय आज आपण महाराष्ट्राचा इतिहास पहिला भारताचा इतिहास पाहिला जगाचा इतिहास पाहिला या इतिहासामध्ये अगदी प्राचीन काळाचे वर्णन आहे परंतु आदिवासी समाज हा इतिहास लिहिणार यांचाही आधीपासून भारतात महाराष्ट्रात नांदतो आहे हे सर्वांनी मान्य केले आहे भारतात महाराष्ट्रात अनेक स्थित्यंतरे झाली परंतु आदिवासी समाज हा मूळ निवासीच राहीला. 1970 पर्यंत आदिवासी समाज मुख्य प्रवाह प्रवाहात आलेल्या नव्हता तथापि माननीय कृष्णराव मुंडे साहेब हे आमदार झाल्याने ते नियोजन मंडळाचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या काळात शिक्षक ग्रामसेवक तलाठी अशा अनेक नोकऱ्या आदिवासी समाजातील तरुणांना मिळवून दिल्या त्यामुळे समाज मुख्य प्रवाहात हळू हळू येऊ लागला शिक्षणाचे महत्व कळले शिक्षणामुळे काही का होईना प्रगती झाली आज अनेक लोक आईएएस अधिकारी वर्ग 1 चा अधिकारी वर्ग 2 चे अधिकारी वकील डॉक्टर इंजिनीयर आहेत अनेक लोक पुणे मुंबई संपूर्ण महाराष्ट्र नोकरीच्या निमित्ताने कार्यरत आहेत शिवाय विधानसभेत आपले 24 आमदार कार्यरत आहेत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत याठिकाणी आपले बरेच पदाधिकारी राजकीय पातळ्यांवर कार्यरत आहेत ही आपल्या जमेची बाजू असली तरी अजूनही 75% आदिवासी समाज विविध योजना शिक्षण नोकरी या पासून वंचित आहे ही खरी शोकांतिका म्हणावी लागेल. आपल्या समाजात तीन वर्ग तयार झाले आहेत. पहिला वर्ग म्हणजे सुपर क्लास वन अधिकारी उच्चशिक्षित यांचा उच्चभ्रू वर्ग. त्यातील ठराविक हाताच्या बोटावर मोजता येईल इतके लोक समाजासाठी काहीतरी करतात. परंतु बाकीचे कधी वर्षानुवर्ष गावाला येत सुद्धा नाहीत ,त्यामुळे ते लोक समाजापासून काहीसे अलिप्त आहेत. आता पाहूया वर्ग 2 समाज वर्ग दोन समाज म्हणजे सर्वसाधारण नोकरी करणारे तुम्ही-आम्ही वर्ग 2 वर्ग-3 वर्ग 4 मध्ये नोकरी करणारे तुम्ही-आम्ही. चांगल्या कंपन्यांमध्ये बऱ्यापैकी नोकरी करणारे लोक. तसेच समाजाची आवड असणारे लोक.या लोकांचे सतत विविध कार्यक्रमानिमित्त गावाला नेहमी येणे-जाणे असते. त्यामुळे गावाकडील लोकांचे दयनीय संसार पाहून अनेकांना आपल्या गावाविषयी काहीतरी करावे, गावाचा विकास झाला पाहिजे, आपल्या आदिवासी समाजाचा विकास झाला पाहिजे ही सततची भावना त्यांच्या मनात असते. ते इतरांना तसे बोलूनही दाखवतात. परंतु रोजचे दैनंदिन कामकाज सुट्ट्यांमध्ये घरातील कामे यामुळे त्यांना ना म्हणावा तसा वेळ मिळत नाही, त्यामुळे त्यांना आदिवासी समाजाविषयी सामाजिक आर्थिक मदत करायची इच्छा असूनही व योग्य संघटन नसल्याने म्हणावी तशी मदत करणे किंवा योगदान देणे शक्य होत नाही.आता राहता राहिला वर्ग तीन चा समाज. या समाजात गावाकडील शेतकरी मजूर ,कामगार, नोकरी नसलेले तरुण, तात्पुरती नोकरी करणारे तरुण यांचा वर्ग या समाजाचा खऱ्या अर्थाने विचार केला तर त्यांचा पुढील भविष्याविषयी निश्चित असा फोकस नसल्याने व हातात जगण्या इतके पैसे नसल्याने हा वर्ग मुख्य प्रवाहापासून भरकटला आहे. त्यामुळे बाकीच्यांनी कितीही जीव तोडून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला तरी अशक्य आहे. याचा विचार सुशिक्षित समाजांनी करणे गरजेचे आहे. आपला समाज पूर्वीची परंपरागत शेती अजूनही करत आहे, त्यामध्ये नवीन सुधारणा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत नाही. आपल्याकडील अंगभूत कौशल्याचा वापर करताना दिसत नाही, काही लोकांना भरपूर शेती असूनही ते नोकरीच्या शोधात किंवा रोजगाराच्या शोधात गाव सोडून तुटपुंजा वेतनावर दूर शहरात फटके जिणे जगत आहेत. ही शोकांतिका म्हणावी लागेल. वाढती व्यसनाधीनता आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचे प्रमाण जास्त आहे, त्याचप्रमाणे निकृष्ट आहारामुळे स्त्रियांच्या शरीरातील हिमोग्लोबीन चे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. याही बाबी अतिशय महत्वाच्या  आहेत. आज गावोगावी वाढत्या व्यसनाधीनतेमुळे समाज अनेक वर्ष मागे गेला आहे. यासाठी ठोस नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी बृहत आराखडा करून शासनाच्या माध्यमातून, समाजसेवकांच्या माध्यमातून, विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, तुम्हा-आम्हा नोकरदारांच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळ देणे हे आवश्यक आहे. आपल्या समाजात आपण काही लोकांना प्रतिनिधी किंवा विविध पदावर नेमणूक करतो. परंतु काही लोक एखाद्या कार्यक्रमा पुरते हजेरी लावतात. आणि निघून जातात. यासाठी सामाजिक आवड असणाऱ्या व समाजाची तळमळ असणाऱ्या लोकांची राज्य,  जिल्हा,  तालुका, भाग आणि ग्राम समिती समिती गठित  करणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून प्रत्येक भागात किंवा गावात शेती विषयक व्यसनमुक्ती विषयक, आरोग्यविषयक, शैक्षणिक अशी नामांकित व्याख्याने आयोजित केली पाहिजेत. एखाद्या भागात व्यसनमुक्ती केंद्र ,कृषी सहाय्य व सल्ला केंद्र, रोजगाराच्या संधी मार्गदर्शन इत्यादी मेळावे आयोजित केली पाहिजेत. आदिवासी समाज हा मुख्यत्वे डोंगर दर्‍यात राहणारा समाज आहे. अनेक लोकांना चांगल्या शेतजमिनी आहेत. तर काही जणांना माळरान आहे. या माळरानात किंवा डोंगरावर पावसाळ्यातील पाणी ठराविक ठिकाणी आडवून उन्हाळ्यात या माळरानावर किंवा डोंगरावर कलमी आंबे ,जांभूळ, फणस किंवा अनेक फळझाडे लावली तर येत्या चार-पाच वर्षात त्यांना दोन तीन लाखाचे उत्पन्न मिळू शकते. शिवाय परिस्थिती नुसार वेगवेगळी पिके येतील का?याचाही विचार करावा लागेल.त्यासाठी प्रत्येक भागात प्रत्येक गावात पाणी फाउंडेशन ही योजना राबवली पाहिजे. पावसाळ्यातील ओढया नाल्याने वाहणारे पाणी प्रत्येक गावात  कधी श्रमदानाने तर कधी शासनाच्या मदतीनेआडवले गेले पाहिजे.  त्याचा योग्य वापर करून झाडे फळे फुले व शेती यासाठी उपयोग केला पाहिजे.आपल्या समाजात अनेक ग्रामसेवक,कृषि सेवक,कृषि सहायक,कृषि अधिकारी,जनावरांचे डाँक्टर,शिक्षक आरोग्य कर्मचारी,समाजसेवक सरपंच,सदस्य विवीध पदाधिकारी आहेत.त्यांचाही समाजासाठी उपयोग करून घेतला पाहिजे.त्यांना मान सन्मान दिला तर ते स्वयंस्फुर्तीने मदतीसाठी पुढे येतील.त्यासाठी भागनिहाय या लोकांची समिती गठित करणे आवश्यक आहे.त्यामधून कुणीही वंचीत राहता कामा नये.सर्वांची मिटिंग महिन्यातून एकदा झाली पाहिजे. सर्वांनी मिटींगला येणे बंधनकारक केले पाहिजे. आपणही आपल्या समाजाची काही देणे लागतो ही भावना त्यांच्यात रुजवली पाहिजे. त्यामुळे लोक एकत्र येतील संवाद साधला जाईल. एकमेकांच्या भेटीगाठी होतील. यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे .मासिक सभेमध्ये सरकारी योजनांचा आढावा, नामांकित व्याख्या त्याचे व्याख्यान आयोजित करण्याचे नियोजन करणे, सर्व अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ यांच्याशी योग्य समन्वय ठेवणे इत्यादी अनेक कामांचा आढावा घेता येईल. यासाठी समाज परिवर्तन करणे, आदिवासी समाजाला  दिशा देणे ही काळाची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने आदिवासी समाज प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही. व लोकही आर्थिक मदत सामाजिक मदत करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येतील. परंतु त्याचे बीज कुठेतरी पेरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आणि आपण आपली स्वतःपुरतं न पाहता समाजासाठी काहीतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत केली पाहिजे, समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेतला पाहिजे. एकमेकांचा सन्मान केला पाहिजे.  हीच खरी मा. बिरसा मुंडा मा. राघोजी भांगरे मा. सत्तू मराडे, मा. नाग्या कातकरी शिवनेरी वरील थोर क्रांतीकारक हुतात्म्यांना  आदरांजली ठरेल .

आदिवासी दिनानिमित्त या सर्व नेत्यांना माझी भावपूर्ण आदरांजली 



ग्रामीण भाग दशा आणि दिशा


 ग्रामीण भाग दशा आणि दिशा 

१९७२ मध्ये आलेल्या दुष्काळामध्ये अनेक ग्रामीण भागातील अनेक लोक विस्थापित झाले.पोट भरण्यासाठी अनेक लोक गाव सोडून नोकरीच्या शोधात मुंबई ,भिवंडी.पुणे अशा शहरात किंवा अन्य ठिकाणी गेले. तिकडे मिळेल ती नोकरी करून पोट भरू लागले व जमेल तशी मदत गावी कुटुंबाला करू लागले.

काही जण खटपटी करून सरकारी नोकरीत चिकटले.तर काहीजण कुठं खाजगी मध्ये किंवा हमाली वगैरे मिळेल ती नोकरी करू लागले व जमेल तशी मदत गावाला आपल्या कुटुंबाला करू लागले.

मुंबईच्या मानाने गावचे जीवन तसे खुप चांगले होते.गावाला काम केलेच पाहिजे असे काही नव्हते,दोन वेळची भाकर व राहायला निवारा होता.पण मुंबईचे जीवन मात्र अतिशय खडतर होते. 

कामाचे स्वरूप,राहाण्याची व खानावळीची सोय याचे काय वर्णन करावे? शब्दात वर्णन करणे कठिण.मुंबईचे जीवन दहा बाय दहाच्या अत्यंत छोट्या खोल्या.त्यात राहणारी सात,आठ पोराबाळांसह राहणारी माणसे.त्यामध्ये त्यांच्याकडे जेवायचे. बाहेर कुठेतरी रस्त्यावर, झाडाखाली,किंवा मिळेल त्या जागेवर झोपायचे. आंघोळ व कपडे धुण्याचे हाल तर विचारूच नका. काहीजण कामाच्या ठिकाणी अंघोळ करायचे व कपडे धुऊन तसेच ओले कपडे अंगात घालायचे.जेवणाचे त्यातल्या त्यात जरा बरे होते.कारण गावच्या किंवा भागातल्या ओळखीच्या ठिकाणी खानावळीची.व्यवस्था असे.

गावावरून आलेला तरूण रोजचे कष्टाचे काम.त्त्यामुळे त्याचा खाण्याचा आहार साहजीकच जादा असायचा.परंतु त्यामानाने खानावळीत भरपेट जेवण मिळायचे नाही.अर्धपोटी राहुन काम करावे लागे.हे दररोज च्या कामाचे स्वरूप असे.

त्याकाळी लोक जास्त शिकलेले नसायचे.त्यामुळे नोकरीचे चान्सेस कमीच असायचे.पण प्रत्येक जणाचा एकच उद्देश असायचा तो म्हणजे गावाकडचे आपले कुटुंब जगवले पाहिजे. भले आपल्याला कितीही कष्ट पडले तरी चालतील.कितीही यातना भोगाव्या लागल्या तरी चालतील.आता हेच आपले जीवन. परंतु आता माघारी फिरणे नाही.घरी गावाला जाणे नाही अशी पक्की मनाशी खुणगाठ बांधुन नव्या जोमाने काम करत.व आलेले दिवस कसेतरी कष्टाने ढकलत.मुंबईला गेलेला कष्टकरी समाज मिळेल तसे काम करत होते.

काहीजण मिल मध्ये तर काहीजण कुठे सरकारी नोकरी मिळते का? या साठी प्रयात्न करत.त्यांचे कामाचे खाडे होत. त्यांचे हाल तर विचारू नका.प्रसंगी त्यांना उपाशी तापाशी रहावे लागे. नोकरी शोधायला. दिवस- दिवस पायी वणवण करायची.दिवसभर अन्नाचा कण पोटात नसायचा. शिवाय नोकरी मिळेलच याची शाश्वती नसे. शिवाय इकडे कामाचा खाडा व्हायचा ते वेगळाच.

कधी कधी असलेली तात्पुरती नोकरी पण जायची आणि बेरोजगार व्हायची वेळ यायची.अशाही परिस्थितीत सरकारी नोकरी मिळेल ही आस असायची. 

त्याकाळी भागातील काही लोक सरकारी नोकरी करायचे. त्याकाळात टाकसाळ, फोर्ट अमिनेशन फॅक्टरी ,विविध बँका, मंत्रालय इत्यादी ठिकाणी वर्ग 4 मध्ये काही लोक कामाला होते. 

त्यावेळी त्या ठिकाणी कधी कधी भरती निघायची.आणि हे लोक आपल्या गावातील आपल्या भागातील लोकांना  मुंबईला आणायचे.त्यांचे खाण्यापिण्याची राहायची व्यवस्था करायचे.आणि तेथे चिटकवायचे. 

त्याकाळात जे नोकरीला होते त्यांना गावचा, भागाचा, प्रचंड अभिमान असायचा. आपल्या भागातील आपल्या गावातील तरुण नोकरीला लागले पाहिजेत. त्यांची घरेदारे सुखी झाली पाहिजेत. सुखाचा संसार झाला पाहिजे. समाजासाठी त्यांचा हातभार लागला पाहिजे. ही भावना होती. ही सामाजिक बांधिलकी होती. त्यांनी कधीच स्वतःपुरते पाहिले नाही. नेहमीच समाजाचा विचार केला आणि या विचारातूनच अनेक तरुण नोकरीला लागले. त्यांना रोजीरोटी मिळू लागली. त्यांचे संसार झाले. फुलले, बहरले. तर काही लोक आहे ते काम प्रामाणिकपणे करू लागले. जरी त्यांना सरकारी नोकरी मिळाली नाही तरी त्यांचेही संसार चांगल्या प्रकारे झाले. त्यांनीही भागाची, गावची आपल्या कुटुंबाची उत्तम प्रकारे सेवा केली.

त्याकाळात मुंबईकरांनी गावाला आपल्या कुटुंबाला वेळोवेळी आर्थिक मदत केली. घरात आठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या भावा बहिणींची लग्न, नवीन घराचे बांधकाम, स्वतःचे लग्न, शेतीची सुधारणा, विहिरी बांधल्या. बैल, जनावरे घेताली. भावा-बहिणीच्या मुलांचे शिक्षण केले  त्यांना नोकऱ्या लावल्या नातेवाईकांना मदत केली. गावच्या त्यांच्या कुटुंबानेही त्यांनी दिलेल्या पैशाचा योग्य विनियोग केला. त्यामुळे त्यांची घरेदारे सुधारली. जमीन सुधारणा झाली. शेतात चांगले उत्पन्न येऊ लागले. कधीकधी काही जमिनी विकत घेतल्या गेल्या. त्यात सुधारणा केल्या. 

त्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. एकमेकाबद्दल प्रेम होते आपुलकी होती. जिव्हाळा होता. मुंबईकर प्रत्येक वर्षी गावाला येत असत. गावकरी त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत करत. गावच्या विकासासाठी, मंदिरासाठी, धर्म शाळेसाठी, चावडी साठी सार्वजनिक भांडी, सार्वजनिक खेळांचे उदा.लेझिम, झांज ढोल,भजनाचे साहित्य,मंदिर जीर्णोद्धार, यात्रा -जत्रा सणवार यासाठी मुंबईकर आर्थिक मदतीत नेहमीच गावाच्या पाठीशी असत. 

या मुंबईकरामुळे नोकरी करणाऱ्या मंडळींमुळे खऱ्या अर्थाने कुटुंबाचा, गावाचा, भागाचा विकास झाला. लोक प्रपंचाला लागले. त्यांनी जर स्वतःचा जीव मारला नसता, त्याग केला नसता तर क्षणभर विचार करा.

आज आपण कितीतरी वर्ष मागे असतो. आपली अवस्था काय झाली असती. हा विचार न करणेच बरे.परंतु पुढे काळ बदलला.

परंतु आजकाल लोक साधे सख्ख्या भावाला किंवा बहिणीला व नातेवाईकांना विचारत नाहीत. सामाजीक कामात भाग घेत नाहीत. कोणाच्या सुख-दुःखात भाग घेत नाहीत. असे लोक म्हणतात की समाजाचा विकास झाला पाहिजे. भागाचा विकास झाला पाहिजे. देशाचा विकास झाला पाहिजे. त्यावेळी फार मोठे आश्चर्य वाटते. कधीकधी हसावे की रडावे हेच कळत नाही.

कधीकधी हेच लोक समाजाचा विकासासाठी समाजाचे नेतृत्व Target निघतात. त्यावेळी आश्चर्य वाटतं.अशा लोकांना समाज किती स्वीकारेल याचेही भान या महाभागांना नसते.

आपल्या आधीच्या पिढीने अतिशय दुःखात स्वतःचा जीव मारून कुटुंबांचा विकास केला आहे प्रसंगी त्यांनी त्यांच्या आवडी निवडी हौस मोज त्यांचे छंद खाणे पिणे यांना कधीच महत्व न देता आपल्या पुढच्या पिढीला आपल्यासारखे वाईट दिवस येऊ नयेत आपली पुढची पिढी सुखी झाली पाहिजे हा विचार त्यांनी सतत डोळ्यांपुढे ठेवून ते जगले.

आणि आज आपण आपल्या आजोबा, पंजोबा, वडील ,चुलते यांच्यामुळे सुखाचे चार घास खातोय. याचा तरुण पिढीने विचार केला पाहिजे.आपल्या वडील व आजोबांना तुम्ही संसार कसा उभा केला? त्यासाठी काय  यातना भोगल्या? हे विचारणे आवश्यक आहे. त्यांना मानसन्मान दिला पाहिजे. त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. 

कधीकधी काळाच्या ओघात त्यांचा सल्ला कसा निरुपयोगी आहे हेही ही तरुण पिढीने खुबीने त्यांना पटवून दिले पाहिजे. उगाच तुम्हाला काही कळत नाही. तुम्हाला अकलेचा भाग नाही. तुम्ही आमच्यासाठी काय केले ? केले तर उपकार केले का? ही भाषा असेल तर सामाजिक विकास होणे अवघड आहे हेही तितकेच खरे.

भिमाशंकर धार्मिक पर्यटन स्थळ

भीमाशंकर धार्मिक पर्यटन स्थळ 

भीमाशंकर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून ते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. राजगुरुनगर पासून साठ किलोमीटर अंतरावर भोरगिरी गावच्या हद्दीत हे मंदिर आहे. 

भीमाशंकरला जाण्यासाठी राजगुरुनगर मार्गे वाडा,डेहणे,मंदोशी,तळेघर या मार्गे जाता येते. राजगुरुनगर भोरगिरी पर्यंत डांबरी रस्ता आहे. काही हौशी पर्यटक भोरगिरी येथे गाड्या पार्क करून पाय वाटेने भोरगिरी ते भीमाशंकर हा पाच किलोमीटरचा टप्पा पार करतात. आपल्या गाड्या पार्क करून पाय वाटेने निसर्गाच्या सानिध्यातुन भिमाशंकरला जाता येते. 

भोरगिरी ते भीमाशंकर हा मार्ग साधारण पाच किलोमीटर आहे.भीमाशंकर येथून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी या ठिकाणी उगम पावते. भीमाशंकर हे तीर्थक्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. हे जंगल सदाहरित अरण्यां पैकी एक आहे. यालाच डाकिनीचे वन असेही म्हटले जाते.

भीमा नदी उगमस्थान

१९८५ साली महाराष्ट्र शासनाने हे अरण्य अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या अभयारण्यात बिबट्या,उदमांजर, ससा, रान मांजर,रान डुक्कर ,सांबर, भेकर , कोल्हा, लांडगा, तरस चितळ, काळवीट, मुंगूस, विविध जातीचे साप इत्यादी प्रकारचे प्राणी आढळतात.

या जंगलातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू हा होय. यालाच उडणारी खार असेही म्हटले जाते. 

शेकरू हे तांबूस रंगाचे असून ते फक्त भीमाशंकर अभयारण्यात पाहायला मिळते. अभयारण्य आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असल्याने भीमाशंकर हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.

महाराष्ट्राची उडती खार म्हणजेच शेकरू 

भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर होय. 

या ज्योतिर्लिंगा पासून पूर्वेला पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नदी भीमा ही उगम पावते. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे. भीमाशंकर मंदिर हेमांडपंथी पद्धतीचे असून ते पेशव्यांच्या काळात नानासाहेब फडणवीस यांनी बांधलेले आहे. 

हे मंदिर साधारण सतराव्या शतकात बांधलेले आहे. पूर्वीचे मंदिर अतिशय साधे असे होते. मुख्य मंदिरासमोरील सभामंडपाचे काम हे साधारण १९८१ ते १९८५ या काळात केलेली आहे. नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर समोरून बघता येत नाही.

भीमाशंकर मंदिर
मंदिराचा भव्य सभामंडप उंच कळस हे प्रमुख आकर्षण आहे. समोर दोन पाण्याची कुंड असुन पुर्वी भीमाशंकरला आल्यावर या कुंडात स्नान करूनच भीमाशंकराचे दर्शन घेतले जाई. परंतु आता स्नान करण्यास बंदी आहे. 

शेजारी दुसरे कुंड सुद्धा आहे 1991 साली या कुंडाच्या तळातील गाळ काढला असता त्यामध्ये अनेक प्राचीन नाणी सापडली. ही नाणी यादव काळापासून असल्याचे पाहायला मिळाले. पूर्वी लोक दर्शनाला आल्यावर कुंडात काही पैसे टाकायचे. त्यामुळे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे.

याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज हे भीमाशंकरला दर्शनासाठी आल्याच्या इतिहासात नोंदी आहेत. 

नवनाथांपैकी सर्व नाथ भीमाशंकराच्या दर्शनाला आलेले आहेत. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील याठिकाणी दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. 

वसईचे युद्ध जिंकल्यावर तेथील चर्चमध्ये असलेली भव्य घंटा चिमाजी आप्पा पेशवे यांनी याठिकाणी आणलेली आहे. मंदिराच्या सभामंडपात  समोरील बाजूस ही घंटा बांधलेली असून या घंटेवर १७२९  अशी नोंद आहे.

मंदिराच्या दक्षिणेला दोन किलोमीटर अंतरावर गुप्त भीमाशंकर आहे. भीमा नदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगा मध्ये आहे. परंतु तिथून ती गुप्त होते. मंदिरापासून पूर्वेला साधारण एक किलोमीटरवर पुन्हा प्रकट होते. असे मानले जाते. हीच जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.

भीमाशंकरला राममंदिर,कळमजाई मंदिर, कोकणकडा, सिताराम बाबा आश्रम, नागफणी, अंजनीमातेचे तळे, हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे.

भीमाशंकर मंदिराच्या पश्चिमेला कोकणकडा असून त्याची उंची जवळ जवळ अकराशे मीटर इतकी आहे. कोकण कड्यावरून खाली कोकणातले विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबी समुद्रही दिसू शकतो. येथूनच कोकणात जाण्यासाठी शिडीचा घाट, बैल घाट व गणपती घाट असे घाट आहेत.
 
भीमाशंकरच्या सीमेलगत रायगड आणि ठाणे जिल्हा यांची हद्द आहे.भीमाशंकर ते खांडस हे अंतर साधारण १४ कि.मी. इतके आहे. अनेक पर्यटक खांडस मार्गे भीमाशंकरला येतात. भीमाशंकरच्या जंगलात विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. त्यामुळे देशातून अनेक लोक याठिकाणी पर्यटन,दर्शन. औषधी वनस्पती,अभ्यासासाठी.गिरीभ्रमण यासाठी येत असतात.

अंजनी मातेचे तळे 
भीमाशंकर मंदिराच्या नैऋत्यकडे अंजनी तळे प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी सिताराम बाबा यांचा आश्रम आहे. त्याचप्रमाणे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे नागफणी.

सिताराम बाबांच्या आश्रमापासून नागफणी कडे जायला पायवाट आहे. ही पायवाट जंगलातून जाते. नागफणी हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण आहे. याठिकाणी प्रचंड जोरात वारा वाहतो. या ठिकाणावरून कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते.

नागफणी 
भीमाशंकरला जाण्यासाठी राजगुरुनगर, मंचर, घोडेगाव मार्गे सुद्धा जाता येते.परंतु वाडा मार्गाने चास मधील सोमेश्वर मंदिर, व त्या समोरील महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेली दीपमाळ शेजारील विस्तीर्ण नदीचा किनारा भव्य असा नदी घाट, अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले बुरसेवाडी जवळील शंभू महादेव मंदिर, चासकमान धरण, पुनर्वसित वाडगाव, कोटेश्वर मंदिर भोरगिरी, मंदोशीचा घाट, चासकमान धरणाचा विस्तीर्ण जलसाठा, हिरवागार निसर्ग, उंच उंच डोंगर, पांढरेशुभ्र जल कोसळणारे मोठमोठे धबधबे,धुओली जवळील नेकलेस धबधबा यामुळे अनेक पर्यटक या मार्गाने भीमाशंकरला जाणे पसंत करतात. आणि पर्यटकांच्या दृष्टीने भाविकांच्या दृष्टीने हाच मार्ग उत्तम आहे हे मात्र तितकेच खरे.

भीमाशंकर जवळील कोंढवळ येथील धबधबा
 
त्याचप्रमाणे राजगुरुनगर- वाडा- डेहणे शिरगाव - मंदोशी  घाटातून तळेघर मार्गे जाता येते. वाडा - डेहणे- शिरगाव -टोकावडे- कारकुडी मार्गे राजपुर वरून भीमाशंकरला जाता येते. राजगुरुनगर -वाडा -शिरगाव भोरगिरी मार्गे कोटेश्वराचे दर्शन घेऊन देखील भीमाशंकरला जाता येते.

भीमाशंकरला प्रत्येक श्रावण महिन्यातील सोमवारी प्रचंड गर्दी असते. श्रावण महिन्यात भीमाशंकरला प्रचंड धुके असते. त्यामुळे आपण स्वर्गात आहोत किंवा आकाशात आहोत असा भास होतो. 

भीमाशंकरला प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे खळाळून पांढरेशुभ्र धबधबे वहात असतात. सुंदर रस्ता नागमोडी वळणे, हिरवेगार गवत आणि प्रचंड जंगल उंच उंच डोंगर रांगा यांनी नटलेला हा परिसर आहे. त्यामुळे अनेक निसर्गप्रेमी याठिकाणी भेट देत असतात. 

चासकमान धरण 

भीमाशंकरचा उल्लेख शिवपुराणात वाचायला मिळतो. भीमाशंकर येथे तेथील स्थानिक लोक विविध औषधी वनस्पती विकण्यासाठी घेऊन बसलेले असतात. या वनस्पतीमुळे अनेक लोकांचे जुने आजार बरे झाल्याची उदाहरणे आहेत. 

या अभयारण्यात आंबा,जांभूळ,शिसम, हिरडा, बेहडा, रिठा, उंबर, रानजाई, कोकम, शिकेकाई, आवळा अडसूळ, आपटा, फणस, रानतुळस करवंदे व आपल्याला माहीत नसलेल्या विविध औषधी वनस्पती या अरण्यात आहेत.

तसेच सुतारपक्षी पारवा, कोकीळ, तांबट, मोर ,लांडोर, घुबड, चंडोल, खाटीक, धनेश, रानकोंबड्या आणि अनेक माहित नसलेले पक्षीही या ठिकाणी पाहावयास मिळतात. 

भीमाशंकरला संपूर्ण श्रावण महिना महाशिवरात्री, व त्रिपुरारी पौर्णिमा यात्रा भरते. प्रत्येक अमावस्येला स्थानिक लोक दर्शनासाठी जातात.

भीमाशंकरला येणाऱ्या भाविकासाठी व पर्यटकांसाठी मुक्कामासाठी एस.टी.स्टँड जवळच महाराष्ट्र शासनाचे  M,T.D.C. (महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ) आहे.

व राजपुर जवळ भव्य भक्त निवास आहे. त्याशिवाय ब्लु माँरमन सारखी भव्य रेस्टाँरंट आहेत. भिमाशंकर येथे अनेक स्थानिक हॉटेलमधून गरमा गरम भजी, गरमागरम बटाटेवडे, मिसळ,भेळ व कडक चहा यांचा आस्वाद घ्यायला एक वेगळाच आनंद मिळतो. 

स्थानिक दुकानदारांकडून. बेलफुल किंवा इतर केलेली छोटी खरेदी केल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान हे परमेश्वराचे दर्शन घेतल्याचा भास होतो.

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस