डेहणे गाव

डेहणे गाव 

डेहणे गाव हे पश्चिम भागातील दळणवळणाचे पुर्वी पासुनचे महत्त्वाचे  केंद्र आहे. माझे माध्यमिक शिक्षण तेथेच झाले. 

गावात प्रवेश करणाऱ्या पायवाटा:

डेहणे गावात प्रवेश करण्यासाठी पूर्वी अनेक पाउलवाटा होत्या. खरोशी, धामणगाव,एकलहरेकरांची पाउलवाट,ही डोंगरु तिटकारे गुरुजींच्या घरासमोरून बैलगाटातून येत असे. 

नायफड कडून येणारे लोक थेट रस्त्याने येत असत. 

पश्चिम भागातुन येणाऱ्या लोकांची पाऊलवाट ही जानोबा मंदिराच्या पाठीमागून येत असे.
शेंदुर्लीवरून येणारे लोक मारुती लांघी फेटेवाले यांच्या शेताच्या कडेकडेने वांजुळडोहा कडून डेहणे गावात प्रवेश करीत असत.

खामकरवाडी,कुडे व घोटवडीकर हे बक्षा आंब्या कडून भीमा नदी ओलांडून डेहणे गावात प्रवेश करीत असत.
 
एकलहरे,आंबेकरवाडी,बांगरवाडीकरांची पाऊलवाट ही आमईकडून नदी ओलांडून आता जी बाजार समिती आहे तेथून गावात प्रवेश करीत असे.

अशा डेहणे गावात प्रवेश करणा-या ब-याच पाऊलवाटा होत्या.
 
आता गावोगावी रस्ते झाल्याने व प्रत्येकाकडे मोटारसायकल,चारचाकी आल्याने जवळ जवळ पाउलवाटा काळाच्या ओघात लुप्त झाल्या.आता फार क्वचितच त्यांचा उपयोग होत असेल. 

गावात मुख्य रस्त्याने प्रवेश केल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजुला शांताराम कोरडे यांची गिरणी,त्या शेजारी सिताराम कोरडे यांचे टेलरचे अतिशय छोटे दुकान होते.

सिताराम टेलर 

सीताराम टेलरच्या दुकानात शाळेतील बरीचशी मुले उसवलेली कपडे शिवणे, रफु करणे, तर काही उगाचच शाळेला दांडी मारून वेळ घालवत बसायची. शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ते टाईमपास करण्याचे आवडते ठिकाण होते.  

सितारामच्या शेजारी बांबळे पंक्चर कम लाईट लाउडस्पिकर मंडप डेकोरेशवचे दुकान  होते. शाळेतील मुले सायकल पंक्चर काढण्यासाठी कायम त्यांच्या जवळ घोळक्याने उभी असायची.    
  
शेजारीच उबाळे यांच्या पडवीला डाँक्टर शितोळे यांचा दवाखाना होता. हे डाँक्टर महाशय कोणताही पेशंट असुद्या. त्याला दोन इंजेक्शन दोन दंडांना देणारच हा नियमच होता.बोर्डावर मोठ्या अक्षरात डाँ.शितोळे यांचा दवाखाना व त्याखाली छोट्या अक्षरात R.M.P.असे लिहीलेले होते.आम्ही R.M.P. चा Longfarm रोगी मारण्यात पटाईत असा मराठीत अर्थ काढला होता.  
                    
त्यांच्या शेजारी उबाळे यांचे हाँटेल होते व आताही आहे.उबाळे बंधू गणपतीचे डेकोरेशन फार सुंदर करायचे.उबाळे यांचे हाँटेलात भजी व कुंदा फारच फेमस होता.

उबाळे हाँटेलच्या शेजारीच श्री.शिंदे यांचे व्ही.डी.ओ. थिएटर होते. बाहेर काळ्या बोर्डवर रंगीत खडूंनी मोठ्या अक्षरात चित्रपटाचे नाव व छोट्या अक्षरात कलाकारांची नावे अशी जाहिरात असायची.विद्यार्थी तेव्हा शाळा बुडवून पिक्चर पाहण्यासाठी तेथे जात असत.

शेजारीच इन्नूसभाई तांबोळी व कै.विठ्ठल कहाणे यांचे किराणा मालाचे दुकान होते. श्री.वनराज कहाणे यांचेकडे ६०८ टेंपो होता. 

त्यांचे शेजारी कै.कैलास (बाळासाहेब) सावंत यांचे टेलरचे दूकान होते. 

त्या शेजारी श्री.दत्ताशेठ बाजीराव कोरडे यांचे किराणा दुकान होते.या दुकानात विशेष गर्दी असायची. मला आठवते त्या वेळेस रामायण व महाभारत मालिका टिव्हीवर लागायच्या.मालीकेतील अनेक देवांचे पासपोर्ट साइजचे फोटो याच दुकानातुन चार-आठआणे देऊन पोरं घ्यायची व वहीमध्ये संग्रह करायची.

याच वेळी अमीरखान व माधुरी दिक्षित यांचा दिल सिनेमा हिट झाला होता.अमीर माधुरी यांचे छोटे फोटो याच दुकानातुन शाळेचे विद्यार्थी घ्यायचे व इस्रीच्या सहाय्याने शाळेच्या गणवेशातील पांढऱ्या शर्टाच्या मागील बाजुला व पुढे खिशावर ते चित्र उमटवयाचे. त्यामुळे अनेकांनी शिक्षकांच्या हातातील छड्यांचा प्रसाद खाल्ला आहे. 

कोरडे यांच्या दुकानाच्या शेजारी शाळा व सरकारी दवाखान्याकडे जाणारा रस्ता व त्या शेजारीच कै.गणपत भोपळे यांची भात व पिठाची गिरणी होती. त्या गिरणीवर कै.नावजी वनघरे व कै.सदाशिव देशमुख (सदुमामा) कामाला होते. त्या शेजारी मुलांचे वसतीगृह व श्री. शंकर सोळशे यांचे दुकान होते.

भोपळे यांचे पुढच्या बाजुला श्री.अंकुश भोकटे यांचे टेलरचे दुकान होते. शेजारी डेहणे आदिवासी संस्थेचे कार्यालय होते. त्यांच्या बाजुला दक्षिणेस कै.बाबुराव कौदरे यांच्या इमारतीत पाचवी ते सातवी पर्यत शाळेचे वर्ग भरत.

पश्चिमेकडे उजव्या बाजुला सरकारी दवाखाना व पुढे शिवाजी विद्यालयाचे आठवी ते दहावी पर्यतचे वर्ग होते. त्याच्या खाली तालुका मास्तर पगार विभाग डेहणे यांचे कार्यालय होते.व उजव्या बाजुला शाळेचीच इमारत होती. त्यात दहावी "ब" चा वर्ग भरायचा.

त्या शेजारी श्री.जानोबा महाराजांचे जुने कौलारू मंदिर होते. मंदिरावर इंदिरा गांधी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराज यांची अतिशय सुंदर अशी भिती चित्रे होती.

मंदिरासमोर दिपमाळ व भव्य असा आयताकृती स्टेजसारखा मोठा पार होता. पाराच्या दोन्ही बाजुज्या कोप-यावर उंच अशी झाडे होती. दक्षिणेस दगडी रांजन होता. याच पारावर गावच्या यात्रेचे कार्यक्रम होत असत. 

समोरच भव्य अशी दगडी भिंतीची, कौलारू मराठी शाळा होती. त्या शेजारी मराठी शाळेच्या शिक्षकांसाठी सरकारी निवासस्थान होते. शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात सकाळी प्रार्थना व्हायची. संध्याकाळी हाँलीबाँल खेळत.

कै.बाजीराव कोरडे यांचे दुकानापासुन रस्त्या पलीकडे कै. सखाराम सावंत यांचे हाँटेल त्या शेजारी रशिदशेठ तांबोळी यांचे किराना दुकान (त्यांचे काही काळ हाँटेलही होते.)  त्या शेजारी प्रसिद्ध असे अब्बासभाई तांबोळी यांचे जनसेवा हाँटेल  होते.या होटेलात तर्री फार प्रसिद्ध असायची.

गावातील स्रीया कधीकधी आमच्याकडे आठ आणे व स्टिल तांब्या देऊन आब्बासशेठच्या येथुन तर्री आणायला पाठवायच्या. आब्बासशेठ हे सतत चहा पित असायचे.

या हाँटेल शेजारी आणखी एक V.D.O. थिएटर व बाजीराव कोरडे यांचे दुकान होते.एकदा शाँर्टसर्किटमध्ये हे दुकान जळुन खाक झाले होते.

डेहणे गावात श्री शांताराम शेंडे यांचा गणपती फार मोठा व आकर्षक डेकोरेशन  असायचे. डेकोरेशन खुपच सुंदर असायचे. दहा दिवस नाच,गाणी अगदी धमाल असायची.

खाली सुतारआळी यांचाही सार्वजनिक गणपती असायचा.अतिशय सुंदर नियोजन असायचे. गणपती काळात विवीध कार्यक्रम,मराठी सिनेमे अशी रेलचेल असायची.

आब्बास शेठच्या हाँटेल समोर मोठा चौक व पुढे मोठा ध्वजाचा उंच लोखंडी खांब होता. या खांबाला वळसा मारूनच एस. टी. आब्बासभाईच्या हाँटेलच्या दारात धुरळा उडवीत थांबायची.

ध्वजाच्या खांबाच्या समोरच दुध डेअरी, शिवाजी विद्यालथाचे कार्यालय व अंगणवाडी होती. त्याशेजारी जनावरांचा दवाखाना आहे.तर जवळच असलेल्या गोडावुनच्या प्रांगणात डेहणे आदिवासी संस्थेची वार्षिक सभा असे. 

सभा संपल्यावार भेळ लाडू खाण्यासाठी आम्ही तेथे जात असू.

आता जे वाढाणे यांचे हाँटेल आहे. त्या जागेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक होती. व मारूतीच्या मंदिरासमोर ग्रामपंचायत व पोष्ट आँफिस होते. 

मारूतीच्या मंदिराच्या पुर्वेला खाली बैलगाड्यांचा घाट होता. यात्रेला तेथे अनेक तालुक्यातुन नामांकित बैलगाडे यायचे. प्रचंड गर्दी असायची.

बैलगाड्यांच्या शर्यती व्हायच्या.गाड्यांच्या शर्यती पहायला संपुर्ण पश्चिम भाग लोटायचा.संध्याकाळी जानोबा महारांजांच्या पारावर इनाम वाटप केला जायचा. रात्री तमाशा किंवा भारूडाचा कार्यक्रम व्हायचा.

शांताराम शेंडे यांच्या घरा शेजारी धरमरायाचे छप्पर व भिंती नसलेले देऊळ होते.धरमरायाच्या यात्रेला येथील जागा शेणाने सारवून छानपैकी स्वच्छता केली जायची. सकाळी लोक मांडव डहाळे आणायचे. पुजा झाल्यावर नारळ फोडण्यासाठी तोबा गर्दी व्हायची. लहान मुलांच्या कुस्त्या व्हायच्या. त्यानंतर विवीध गावच्या भजनांचा कार्यक्रम असायचा.

धरमरायाच्या देवळा शेजारी मुस्लीम बांधवांचे चीरे होते.त्यांना वर्षातुन एकदा पांढरा चुना लावलेला असे. 

याच मंदिराच्या उत्तरेला कातकरी लोकांची चाळ आहे. तेथे सकाळी डेअरीला दुध घालायला आलेले काही लोक दारू पिण्यासाठी तेथे जात असत.

सोळशेवाडी यांचे ढोल व लेझीम पथक त्यावेळी फार प्रसिद्ध होते. शिवाय त्यांचे भजन मंडळही प्रसिद्ध होते. श्री.दत्ता लांघी साहेब, श्री.एकनाथ लांघी साहेब, कै.बुधाजी खाडे, कै,चिंधू खाडे, श्री.जगदिश कशाळे साहेब, श्री.दगडू लांघी. श्री.दत्ता खाडे सरपंच यांनी खुप वर्षे भजन स्पर्धा भरविल्या होत्या. व त्यास प्रचंड प्रतिसाद लाभला..

त्यावेळी श्री.सुरेश तिटकारे सर, श्री.मनोहर कोरडे,श्री.वनराज कहाणे सर, श्री.नामदेव वाजे गुरूजी श्रीहरी तरूण मंडळाची स्थापना करून मारूती मंदिराचा जिर्णोद्धार केला व तेथे दररोज सायंकाळी हरिपाठ सुरू केला.

त्यावेळी डेहणे आदिवासी दुध उत्पादक संस्था ही 25 गावांशी संलग्न होती. संस्थेची २२०६ क्रमांक असलेली दुधगाडी अनेकांच्या स्मरणात असेल. दुध संकलनाचे काम कै.नावजी वनघरे,चाहू वायाळ हे करायचे.

गावात कै.नानासाहेब कशाळे हे बरेच वर्षे सरपंच होते.शिवाय ते सन १९९२ ते १९९७ या कालावधीत जिल्हा परिषद सदस्य देखील होते. तसेच ह.भ.प. धोंडूबाबा कोरडे हे सुद्धा सन १९६२ ते १९६७ या कालावधीत पंचायत समिती सदस्य होते.
शिवाय श्री.रामदास माठे हे सुद्धा पंचायत समिती सदस्य व सभापती होते.

त्याशिवाय दादाभाऊ कोरडे सरपंच, बी.के.कशाळे (आदिवासी सेवक), मारूती लांघी (फेटेवाले) कावळे पाटील, श्री.नामदेव कशाळे चेअरमन, कै.श्रीपत वाजे,भोकटे गुरूजी, कै.डोंगरू तिटकारे गुरुजी व सखाराम सावंत इत्यादी मंडळींना भागातुन एक प्रतिष्ठेचे वलय होते.

तर व्यापर क्षेत्रात आब्बास शेठ, रशीद शेठ, कै.बाजीराव कोरडे, कै.विठ्ठल कहाणे,कै.भिकाशेठ उबाळे.श्री.शांताराम कोरडे गिरणीवाले,श्री.सितारामशेठ कोरडे. कै.गणपत भोपळे व्यापार क्षेत्रात प्रसिद्ध होते.

कै.नाना भिकाजी कशाळे, कै.सखाराम सावंत, कै.चिमाजी आप्पा कोरडे, श्री.सितारामशेठ कोरडे,यांचे नामांकित बैलगाडे प्रसिद्ध होते. 

शिवाय कै.बापू गायकवाड, कै.वंसत व श्री.नारायण गायकवाड हे प्रसिद्ध डफडे वादक होते.

कै.लक्ष्मण सुतार यांच्या दारात शेतीची लाकडी औजारे तयार व दुरूस्ती साठी अनेक गावच्या लोकांची वर्दळ असायची.

शेतीच्या कामासाठी विळे, कोयते, फाळ, साखळ्या, वसू,फास, पहार, फावडे, टिकाव शेवटन्यासाठी,धार लावण्यासाठी कै.वामण लोहार यांच्या दारात खुपच वर्दळ असायची.

याशिवाय अगदी सकाळी लवकर उठून आब्बास शेठ,उबाळे बंधू यांना मदत करणारे कै.विष्णू शेंडे हेही अनेकांच्या स्मरणात असतील.

डेहणे गावच्या जडण घडणी मध्ये या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचा सिंहाचा वाटा होता. त्याचप्रमाणे भागाचा देखील हेही तितकेच खरे..

आता मात्र या धकाधकीच्च्या व धावपळीच्या युगात पायी चालायला वेळ नाही.यात्रा उरूस भारूड,तमाशे पहायला वेळ नाही. 

इतकेच कशाला पाहुणे रावळे नातेवाईक यांना भेटायला किंवा त्यांच्या बरोबर बोलायला वेळ नाही.तसा आपण खरा आनंद कधीच गमावला आहे हे मात्र तितकेच खरं आहे.

 


दुष्काळ सदृश्य परिस्थितीत देव कोंडणे.

जुन महिन्याच्या १० तारखेनंतर भातरोपांसाठी पेरणी केल्यावर शेतकरी मोठ्या आशेने पावसाची वाट पहात असतो. थोड्याशा पावसाने रोपे उतरून वर आलेले असतात. परंतु त्यानंतर पावसाने विश्रांती घेतलेली असते. पाऊस काही पडत नाही. भात रोपे सुकून जाऊ लागतात. कधी स्वच्छ ऊन तर कधी नुसतेच आकाशात काळे ढग घोंगावत राहतात. कधी असे वाटते की आता खुप पाऊस पडेल पण कसले काय ? पाऊस पडेल तर शपथ,उगाच शेतकऱ्यांना आशेला लावायचे काम निसर्ग करत असतो. पाऊस काही पडत नाही.

एव्हांना काही ठिकाणी रोपांनी माना टाकायला सुरूवात झालेली असते.मग काही शेतकरी मोटारपंप इंजीनपंप तर काही शेतकरी हंडयांमध्ये पाणी भरून भातरोपे जगवन्याचा केवीलवाना प्रयत्न करत असतात. 

हे सर्व झाल्याव शेवटचा पर्याय म्हणुन ठिकाणी सर्व महिला एकत्र येतात. प्रत्येक महिला घागर भरून पाणी घेऊन डोंगरावरील शंकराच्या पिंडीवर मोठया भक्तीभावाने व विवीध प्रकारची गाणी म्हणुन पाणी घालतात. हे पाणी बाहेर जाणार नाही याची काळजी घेतात. यालाच देव कोंडणे असे म्हणतात.

मला आठवते, माझ्या लहानपणी एकदा भातरोपांसाठी पेरणी केल्यावर अशीच एकदा पाऊसाने ओढ दिली होती. शेतकरी वर्ग मोठया जिद्दीने पोराबाळांसह घागर,कळशी,हांडा यांच्या सहाय्याने रोपे जगवत होता. त्यामध्ये मी सुद्धा होतो.

परंतू तो एक केविलवाना प्रयत्न होता.पाऊस काही पडत नव्हता.पाऊस असता तर सर्व भागाची आवणी (लावणी) केव्हाच झाली असती. 
आणि एके दिवशी अचानक धुओली, वांजाळे, शिरगाव व मंदोशी या चार गावच्या महिलांनी निर्णय घेतला की सर्वांनी घागरी भरून पाणी आणायचे व सुळ्याचा महादेव कोंडायचा.(चार गावच्या हद्दीत उंच डोंगरावर शंकराचे जागृत देवस्थान)

ठरल्या प्रमाणे सकाळी सर्व गावच्या महिला जंगलातील उंच डोंगर असलेल्या महादेव मंदिराकडे घागरीत पाणी घेऊन निघाल्या. त्यात आम्ही मुलेही होतो. सकाळीच पाऊसाचे वातावरण तयार झाले होते.

अगदी सकाळी जंगलातुन चालताना मजा वाटत होती. पक्षी गात होते.मध्येच एखादा ससा आम्हाला पाहुन वायू वेगाने पळत होता.आम्ही आम्ही उभा डोंगर चढून वर चालत होतो. घामाच्या धारा अंगातुन वाहत होत्या.

असेच चालत वर उंच डोंगरावर पोहचलो.आणि थंडगार  हवेची झुळुक लागायला सुरूवात झाली.आणि क्षणात मन टवटवीत झाले.

थोडयाफार फरकाने वांजळे,धुओली,शिरगाव व मंदोशी या गावच्या महिला जमा झाल्या.सुळ्याच्या महादेवाची यथासांग पुजा करण्यात आली. देवाचे न्हाणीद्वार बंद करण्यात आले.आणि प्रत्येक महिला तिने आणलेली घागर महादेवाच्या पिंडीवर रिती करू लागली. 
चार गावच्या महिलांच्या पाण्याने महादेवाची पिंड बुडुन गेली. त्यानंतर सर्व महिला मंदिराबाहेर फेर धरून महादेवाला पाऊस पाडण्यासाठी विवीध गाण्यांच्या माध्यमातून साकडे घालू लागल्या. हे दृश्य आझ्या आयुष्यातील सर्वात विलोभनीय दृष्य आहे.बराच वेळ त्यांची विवीध नाचगाण्यांच्या माध्यमातून देवाकडे पाऊस पाडण्याविषयी आळवणी चालू होती.या सर्व महिलांना एकत्र आणण्याचे काम आमच्या गावातील आदरणीय मातृतुल्य सौ.सुंदरबाई देवराम बांगर आंगणवाडी सेवीका यांनी केले होते. 
आणि काय अश्चर्य थोडयाच वेळात टपटप पाऊसाचे थेंब पडायला लागले. आणि थोड्याच वेळात जोरदार सरी कोसळायला लागल्या. सर्व भिजुन चिंब झाले. जोरदार पाऊस पडु लागला प्रत्येक महिला व मुले देवाचे दर्शन घेऊन वाट फुटेल तशी घराकडे परतु लागली. 

पाऊस पडतच होता.एव्हाना ओढ्यानाल्यांना पुर आला.

जिकडे तिकडे पाणीच पाणीच खळखळणारे झरे ! झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे!...दिसु लागले.

आम्ही पाउलवाटेने चाललो होतो.पाऊस आम्हाला त्याच्या जोरदार सरींमुळे झोडपत होता. खाली गावात ओढ्याला मोठा पुर आला होता.व त्या पुरात जंगलातील ओंडके वाहत येत होते. मोठ्या लांटामध्ये हे ओंडके अचानक गायब व्हायचे व थोड्याच वेळात दुर कोठेतरी अचानक दिसायचे.


हा एवढा पाऊस पाहुन 
उघड पावसा ऊन पडू दे ! उडू बागडू हसू खेळूदे! 
असे म्हणन्याची पाळी आमच्यावर आली.परंतू दुस-याच दिवसापासून खोळंबलेली शेतीची भात लागवडीची कामे जलदगतीने सुरू झाली...

गावाची साथ व मटणाचा पातळ रस्सा


गावची सात व मटणाचा पातळ रस्सा 

जूनचा पहिला आठवडा संपून दुसरा आठवडा सुरू होतो.आकाशात काळे काळे ढग नुसतेच घोंगावत राहतात. पाऊस पडण्याची चिन्हे सुरू होतात.धूळ वाफेत शेतकरी भात रोपांची पेरणी करूनही बरेच दिवस पाऊस पडत नाही.

शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन बसलेला असतो.थोड्याच दिवसात रिमझिम पाऊस पडायला सुरुवात होते.भातांची पेरणी झालेली असते.रोपे तारारून उगवुन वर आलेली असतात.या भाताच्या रोपांना आमच्याकडे दाढ म्हणतात.
                           .        
रिमझिम पावसाचे रूपांतर पुढे मोठ्या पावसात होते.धुवाधार पाऊस पडू लागतो.ओढ़े नाले,नद्या अगदी ओसंडून आणि दुधडी भरून वाहू लागतात.अगदी मोठमोठे पूर येतात.भाताच्या रोपांची वाढ होत असते.आणि अशातच भाताची लागवड  सुरू करायची घाई प्रत्येकाला झालेली असते.

परंतु आमच्याकडे,आमच्या भागात गावची साथ झाल्याशिवाय कोणीही भाताची लागवड करत नाहीत. ही एक जुनी परंपरा आहे.त्या परंपरेचे पालन आजही केले जाते.

गाव व वाडया वस्त्यामधील सर्व लोक वर्गणी काढून बोकड किंवा मेंढा आणतात.मंगळवार किंवा रविवारी दुपारनंतर गावच्या हद्दीतील (पांढरीतील) मुख्य देवाची विधिवत पूजा केली जाते. 

गावच्या हद्दीतील सर्व देवांना तेल व शेंदुर लावतात.यालाच "माजणं" करणे असे म्हणतात.सर्व देवांची पुजा झाल्यावर प्रत्येक जण ग्रामदेवतेच्या पुढे नारळ फोडतात.त्यानंतर ठराविक अंतरावर बोकड किंवा मेंढा यांचा बळी देतात.

तेथेच हाळ खोदुन (जमिन आयताकृती फुटभर खोदुन बनवलेली चुल ) त्यावर भात आणि मटणाचा कांजी (रस्सा) बनवला जातो.आमच्याकडे भात व आमटी किंवा मटण बनवण्यासाठी अजूनही तांब्यांच्या डेंगीचा उपयोग केला जातो.

डेंग म्हणजे भात,आमटी, वरण व रस्सा बनवण्याचे पुरातन भांडे होय.ही डेंग"तांबे" या धातुची असते. 

प्रत्येक गावात चार पाच डेंगी,पितळाचे वरगळे पितळाचा मोठा कलथा,दहा, पंधरा पितळेच्या बादल्या,ग्लास, मोठमोठ्या पराती इत्यादी अनेक वस्तु असायच्या. 

ह्या सर्व वस्तू गावकरी वर्गणी काढुन जमा करायचे.याचा वापर लग्न,पुजा व देवाचे जेवणाचे कार्यक्रम यासाठी व्हायचा.आता ही सर्व भांडी हद्दपार झाली आहेत.
प्रत्येक गावात पुर्वी एकविचार असायचा कोणाचेही धार्मिक कार्य असो किंवा सार्वजनिक कार्य असो  ते उत्तम प्रकारे विनामोबादला करायचे. यात कोणत्याही प्रकारचा गर्व अभिमान याचा लवलेश नसायचा. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पायरीने राहायचा.

गावात पाटील,सरपंच पुढारी, पहिलवान,हर्मोनियम/ तबला/ढोल/पखवाद वादक,अभंग गवळणी गायक.अंगात देव आणनारे भगत,उंच झाडावर चढणारे किंवा पोहणारे, मुरगळा काढणारे,विंचू उतरणारे, झाडपाल्याचे औषध देणारे,पंचांग पाहणारे, सुतार, लोहार, कुंभार,स्त्रियांचे बाळंतपण करणाऱ्या सुईनी. धार्मिक कार्यक्रम लग्न समारंभ यांची संपूर्ण माहिती असलेल्या महिला,उत्तम गावजेवण बनवनारे असे ठराविक लोक असायचे. 

हे सर्व लोक एकमेकांना मान द्यायचे. कुणीही एकमेकांच्या कामात चुकुनही ढवळाढवळ करीत नसत.  
गावजेवण बनवणा -यांचा उत्त्तम गाव जेवण बनवण्यात  हातखंडा असायचा.त्यांना येणा-या लोकांचा बरोबर अंदाज असायचा. आणि त्या पध्दतीनेच ते जेवण बनवायचे. 

गावच्या साथीच्या कार्यक्रमाचे जेवणही ते असेच बनवत.जेवण तयार झाल्यावर प्रत्येक वाडयावस्त्यांचे लोक पोरंटोरं आपापल्या घरातुन पितळ्या (जुने पुर्वीचे जेवणाचे ताट ) घेऊन जायचे. प्रत्येकाच्या पितळीत भात वाढला जायचा.त्यावर भरपुर गरम मटणाचा पातळ रस्सा वाढला जायचा. याला ग्रामीण भागात कांजी असे म्हणतात.कांजी हा शब्दआता जवळजवळ हद्दपार झाला आहे.

त्यानंतर खास मटण वाढणारा माणूस यायचा.तो फक्त मटण वाढायचेच काम करायचा. कारण मटणाचे पातेले दुस-याकडे असायचे.काही मटणवाढपे पंक्तीभेद करायचे. म्हणजे ते आपल्या मुलांबाळांना किंवा त्याच्या जवळच्या माणसांना जास्त मटण वाढायचे.व बाकीच्यांना एकसमान वाढायचे. त्यांना गावात लोक नावे ठेवायचे. मटणाला "खडे "किंवा "बाव"असेही ग्रामिण भाषेत म्हणतात.परंतु हे शब्दही आता हद्दपार झाले आहेत.

साथीच्या आदल्या दिवशी गावातील ठराविक लोक बोकड किंवा मेंढा विकत आणतात. दुसऱ्या दिवशी सकाळी  प्रत्येक घरातील माणूस मंदिराकडे जाऊन दर्शन घेऊन नारळ फोडून घरी येतो. 

दुपारनंतर बोकड किंवा मेंढा घेऊन लोक मंदिराकडे जातात.मंदिरापासून थोड्या अंतरावर मेंढ्याला किंवा बोकडाला बळी देतात.तेथेच नैवेद्य वगैरे दाखवला जातो. बोकडाचा किंवा मेंढ्याचा नैवेद्य मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा मंदिरात नेला जात नाही.जेवण बनवनारे यांची धावपळ सुरू होते. दोन-तीन तासात जेवण तयार केले जाते.

जेवणासाठी हळूहळू लोक जमू लागतात.तेथे गप्प गोष्टी होत असतात.लोक गप्पा मारता मारता जेवणाचे कधी आमंत्रण येईल याची वाट पाहत राहतात.कारण सर्वांना भुका लागलेल्या असतात. काही लोक मुद्दाम उपवास धरतात.

जेवणाची वाट बघत बसलेल्या लोकांच्या गप्पांचा एक नमुना :

भागाजी :- काशिनाथ, वाक्षेपतच्या खाचरांना पाणी हाये काय, रे?

काशिनाथ :- अजून न्हाय.दोन दिवसापासून आम्ही सगळे जातोय पाट खनायला. कोल्ह्याच्या शेतापर्यंत आणलाय खनिज-खणीत. आता जेवलो की जाणारय परत.

भागाजी :- आमच्या खाचरांना झालय पाणी. उद्यापासून आवणीला हात लावायचाय. उद्या तुमच्या माणसांना पाठव दाढ खाणायला ?

काशिनाथ :- उद्या आमची माणसं जाणार हायेत नामदेवची दाढ खणायला.त्याने आठ दिवस आधीच सांगितलं होतं.त्याला भरावसा दिलाय.

भागाजी :- आमची मंबई, पुण्यावाली येणार हायत आज. ती आली तर बर होईल.

काशिनाथ :- तुला माणसं पाहिजे असतील तर एक काम कर. नारायणला विचारून बघ.त्याने अजून कोणाला भरवसा दिला नाही.

भागाजी :- बरं झालं सांगितलं, नारायण आलाय का जेवायला बघतो बरं.असं म्हणत भागाची नारायणला शोधण्यासाठी जातो.

दुसरा एक संवाद:

मारुती :- तुकाराम,तुमच्या मंबई वाल्यांच्या दाढीमध्ये लईच गवात झालंय रे.आन,दाढ पण लय पातळयं. त्याला खत मारायला पाहिजे होतं. 

तुकाराम :- अरे दाढ भाजली न्हाय.उत प्यारलं. त्यामुळे गवात लय उगावलय. 
मंबईवाली अवनीला येतात का नाहीत काय माहित? अजून तर काय सांगितलं नाही.

मारुती :- आख्खी अवनी होऊन जाईल तरी मुंबई वाल्यांची दाढ लावायला येणार नाही. 

तुकाराम :- त्यांनला न्हाय काळजी मग आपण काय करायचं?

मारुती :- मंबईवाली आली तर त्यांना सांग, मारुतीकडे आवान शिल्लक हाये.त्याच्याकडून घेऊन जा.

तुकाराम :- मग तर बरं होईल.
   
एकदाचे जेवण तयार होते. लोकांच्या पंगती बसू लागतात.वाढपे लोक बादलीने भात व मटणाचा रस्सा वाढू लागतात. 

इंद्रायणी किंवा खडक्याच्या तांदळाचा भात,आणि हा मटणाचा रस्सा याचा सुवास नाकातोंडातून घमघमत राहतो.कधी एकदा जेवण करतो असे प्रत्येकाला वाटत राहते. 

जेवणापेक्षा प्रत्येकाला चवदार रस्सा प्यायचा असतो. कारण भात खाण्यापेक्षा रस्सा पिण्यात गावाकडे खरी मजा असते. गावचा मटणाचा पातळ रस्सा अप्रतिम का असतो. हे अजूनही भल्या भल्यांना समजले नाही. कितीही मसाले घातले तरी गावच्या पातळ रश्याची चव येत नाही हे विशेष.

मटणाच्या जेवणात काही लोक तीन- चार पितळ्या पातळ रस्सा (कांजी) पितात. मटणाच्या  या पातळ रश्याला अप्रतिम चव असते.परंतू कुणालाही कधीच कसलाच त्रास झाल्याचे माझ्या ऐकिवात नाही.

गावची साथ म्हणजेच सर्व गाव वाडयावस्त्यांचे लोक एकत्र येऊन शिवारातील सर्व अदृश्य शक्ती व देवांना मटण,भात व रशाचा नैवेद्य दाखवतात. शिवारात उद्या पासुन आम्ही भातलागवड (आवणी) करत आहोत. सर्व शिवारातील पीक चांगले येऊन गाव धनधान्याने भरून जाऊदे.अशी गावच्या मुख्य देवाकडे करूणा भाकतात. यालाच गावची साथ असे म्हणतात.

गावची साथ झाल्याशिवाय कुणीही भातलागवड (आवणी) करत नाही.ही प्रथा अजुनही खेड,तालुक्याच्या पश्चिम भागात चालू आहे. हे विशेष.

रामदास तळपे 






                 

आवणी (भात लावणी)

                        जुन महिन्याचा दुसरा आठवडा असतो.आकाशात काळे काळे ढग जमू लागतात.सोसाटयाचा वारा वाहू लागतो. विजा चमकू लागतात.ढगांचा गडगडाट सुरू होतो. सुरूवातीला काही ठिकाणी वळवाचा पाऊस पडु लागतो .काही ठिकाणी जनावरे, झाडे झुडपे, प्रसंगी माणसांवर विज पडते. अनेकांचे नुकसान होते.

त्यानंतर मोसमी पावसाला सुरूवात होते.उशिरा का होइना पाऊस पडू लागतो.ओढे- नाले,नद्या,ओहोळ खळखळून वाहू लागतात. शेतकऱ्यांना भाताची आवणी करण्याचे वेध लागतात.(आवणी हा ग्रामीण भागातील भातलागवड करणे या अर्थाने वापरतात.)

धुवाधार पाऊस पडत असतो.भातरोपे तरारून वर आलेली असतात.जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन जाते.भातखाचरे पाण्याने फुल्ल भरून वाहू लागतात.आणि मग आवणी करण्यासाठी शेतक-यांची एकच धावपळ होते.सर्वांचे एकच लक्ष असते.लवकरात लवकर आपली आवणी संपवणे. 

काही शेतकऱ्यांना थोडी भातशेती असते.त्यांची लवकरच  आवणी होते. परंतु ब-याच शेतक-यांची शेती जास्त असते. मणुष्यबळ कमीअसते. अनेकांकडे चिखलणी करण्यासाठी बैल नसतात. त्यांची या मोसमात खुपच ओढातान होते.या शेतकऱ्यांना मनुष्य बळ व औतकाठीसाठी वाट पहावी लागते.

ज्यांना थोडी शेती असते.व त्यांची आवणी लवकर होते ते शेतकरी एकत्र येतात. अनेक गावांमध्ये गरजु शेतकरी असतात.हे गरजू शेतकरी ज्यांची आवणी झाली आहे या शेतक-याकडे येतात. (पश्चिम भागातील अनेक शेतक-यांना प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना किती जमीन आहे. व ती कोठे कोठे आहे याची इंत्यभुत माहिती असते.) 
गरजू शेतक-यांची संपुर्ण आवणी करून देण्यासाठी विशिष्ट  रक्कम देण्याचे ठरवले जाते.त्यास "डफा" किंवा "खोती" देणे असे शब्द आहेत.

पुर्वी भागातील मुत्सुद्धी पुर्वजानी जशी शासकीय सुट्टी असते तशी शेतकऱ्यांना सुद्धा आठवडयातुन एकदा सुट्टीची योजना केलेली असते. यालाच "मोडा "असे म्हणतात. प्रत्येक गावचा मोडा हा मंगळवार किंवा रविवारी असतो.त्या दिवशी शेतीची कोणतीच कामे शेतकरी करत नाहीत.

आवणी करताना खुपच मजा येते.कधी जोरदार तर कधी रिमझिम पाऊस पडत असतो.भात खाचरात गुडघाभर पाणी असते.भात खाचरातील रोपे विशिष्ट पण सोप्या पध्दतीने काढली जातात त्याला दाढ खणने असे म्हणतात. छोटया रोपांची अगदी छोटी गड्डी बांधतात त्याला "मुठ "असे म्हणतात.असे अनेक मुठ एकत्रित केल्यावर या सर्वांना "आवान" असे म्हटले जाते.

 दाढ खणणे 
प्रथमतः दाढ खणल्यावर त्याचे मुठ जेथे भातरोपे लावायची आहेत त्या ठिकाणी घेऊन जातात.भात रोपे लावायच्या आधी त्या खाचरात बैलांच्या सहाय्याने (यालाच औत म्हणतात.) गाळ केला जातो, मगच आवणी केली जाते.

 गाळ करणे 
आवणी करताना पाऊस पडत असतो.सर्वजण भिजुन गेलेले असतात. प्रत्येकाकडे ईरणे किंवा प्ल्यास्टिक कागद असतो. खुपच मोठा पाऊस आलातर अंगावर ईरणे व कागद घेतात. अन्यथा इरणे व कागद बांधावर ठेवतात.दुपारचे जेवण भाकरी मसुराची किंवा काळ्या वटाण्याचीआमटी, लसणाची चटणी, कांदा व भात असे जेवण असते.सर्व शेतकरी पावसात बांधावर एकत्रित बसुन जेवतात.जेवण झाल्यावर पुरूष मंडळींना तंबाखू व विडीकाडी दिली जाते.व थोडयावेळाने परत कामाला सुरूवात केली जाते.
मुठ

आवणी करणा-या माणसांना मुठ पुरवणे खुपच आनंदाचे काम असते.दहा पंधरा मुठ दोन्ही हातात धरून पाण्यावरून ओढत नेऊन आवणी करणा-या माणसांपर्यत विशिष्ट पद्धतीने फेकने ही एक कलाच असते.काम करताना अजीबात श्रम होत नाही.

ग्रामीण भागात खुप पाऊस पडतो.त्यामुळे त्या ठिकाणी मुख्यत्वे भातपीक घेतले जाते.ग्रामीण भागातील शेती ही चढ उताराची असल्याने छोटे छोटे दगड लावून बांध घालून प्लाँट केले जातात. हे प्लाँट कमीत कमी दोन गुंठे व जास्तीत जास्त वीस गुंठयापेक्षा जास्त मोठे असतात.याला 'खाचर' असे म्हटले जाते. 

उताराच्या जमीनीवरील पाणी वाहुन जाण्यासाठी प्रत्येक खाचराला विशिष्ट प्रकारे दगड लावले जातात.त्यावरून पाणी वाहून जाते.हे एकप्रकारे छोटे छोटे धबधबेच असतात.याला "प-ह्या"  म्हणतात.ज्या वेळी पाऊस पडतो.तेव्हा भातखाचरे भातलागवड केली असल्याने हिरवीगार दिसतात.व त्या खाचरांच्या प-ह्या वरून खाली कोसाळणारे पाणी हे दृश्य अतिशय विलोभनीय दिसते.स्वर्गीय सुखाचा भास होतो.
जिकडे तिकडे हिरवेगार व पांढरेशुभ्र झरे,ओढे-नाले ,प-ह्ये नदी धबधबे भात खाचरातुन वाहणारे पाणी, हिरवेगार डोंगर ,हिरवीगार राने याची निसर्ग मुक्त उधळन करीत असतो.हे पाहून मन प्रसन्न होते.प्रफुल्लीत होते.पश्चिम भागातील  जीर,रायभोग,खडक्या,इंद्रायणी तांदुळ फार प्रसिद्ध आहेत.मोठ्या प्रमाणावर या तांदळांची खरेदी केली जाते.





भुते खुळचटपणा

                          भुते खुळचटपणा 

खुप दिवसाची गोष्ट आहे.आमच्या गावात घडलेली .माझा मित्र बरेच दिवस आजारी पडला होता.तेव्हा कुणी आजारी पडले की अंगात देव येणाऱ्या भगताकडे पेशंट घेऊन लोक जायचे.

भगत मांडी घालून अंगातली बंडी काढुन बसलेला असायचा. भगताजवळ अनेक लोक निशब्द बसायचे.भगत कारण नसताना बळेच जांभाया द्यायचा.आणि जांभाया देतादेता अचानक आरोळी ठोकायचा.ही आरोळी आख्या गावात घुमायची.भगताची आरोळी ऐकुन आजुबाजुचे लोक धावत पळत भगताकडे  गा-हाणे मांडण्यासाठी यायचे.तो पर्यत अंगात आलेला देव ब-यापैकी घुमत असायचा.भगताच्या या घुमन्यामुळे तेथे एकच सन्नाटा पसरायचा.आणि अचानक अंगात आलेला देव बोल काय गा-हाण आहे तुझ.? असं विशिष्ट हेल काढुन म्हणायचा.

अनेक लोक त्यांचे गा-हाण सांगायचे. त्यावर अनेक उपाय भगत सांगायचा.भगता समोर असलेली राख तो पेशन्टला (रोगी) द्यायचा.या राखेला अंगारा असे म्हणतात.हा अंगारा तीन दिवस सकाळ दुपार व संध्याकाळ कपाळाला लावायचा रोगी कसा बरा होत नाही पहातोच. असे म्हणुन उतारा द्यायला सांगायचा.
उतारा हा ठरलेला असायचा.तीन धान्याची दामटी (भाकरी) त्याला तेलाचे बोट व तव्याचे काळे बोंबील आंडे व थोडासा भात तंबाखू ,गांजा ,विडी कधी कधी दारू,आणि फार जहाल भुत असेल तर उरफाट्या पिसाचे कोंबडे किंवा बोकड यांचा बळी.
हाडळ (स्त्री भुत )असेल तर दही भात अंडे व मशेरी किंवा तंबाखू  गुण आला नाहीतर परत माझ्याकडे या.असे बजावुन सांगायचा.व रोग्याच्या डोक्यात हाताने चार पाच रट्टे हाणायचा. यालाच झाडणी करणे असे म्हणतात .अनेक रोगी भगताच्या कसा बरा होत नाही ह्या सकारात्मक विचार (Positive Thinking ) यांनेच बरे व्हायचे.

तुम्हाला सांगतो ग्रामिण भागातील लोकांकडे मुळातच प्रतिकार क्षमता जास्त असते.त्यांचे कोरोना सारखा विषाणूसुध्दा काही वाकडे करू शकत नाही. तर इतर फालतु रोगांची काय कथा.

ग्रामीण भागातील लोकांचे आजारही हस्यास्पद असतात.रात्री स्वप्न पडणे,डोके दुखणे,अचानक चक्कर येणे,कुणीतरी आपल्या कुंटुंबावर करणी किंवा देव छळला आहे असा संशय मनाशी बाळगणे.आपल्याला भुताने झपाटले असा सतत भास होणे,कुटुंबातील एखादा सदस्य खुप दारू पिणे व याचे खापर भुते व करणी जादुटोणा यावर फोडणे असे अनेक आजारांने ग्रस्त असतात. यासाठी भगताकडे जाऊन अनेक प्रकारचे गंडेदोरे,ताईत,उतारे पातारे करत राहतात.

या भगतासारखेच शहरात मोठेमोठे डाँक्टर व त्यांचे चकचकीत दवाखाने असतात. शहरातील लोकांचे आजार गाववाल्यांच्या पेक्षा वेगळे असतात.डायबेटिज,उच्च रक्तदाब किडणी,मुळव्याधी,कँन्सर,लिव्हर खराब होणे,अपचन, अर्धांगवायू वगैरे ....या आजारातुन आपण बरे होऊ शकतो.असा सकारात्मक( positive ) विचार हे लोक कधीच करत नाहीत.

फक्त दररोज औषधे घेणे व डाँक्टरने सांगीतलेले पथ्य पाळणे. आपण आता या आजारातुन कधीच बरे होणार नाही आसा विचार करत असतात.

तर असाच एकदा गावाला असाताना माझा मित्र आजारी पडला होता.भगताने त्याला खुप मोठे भुत लागले असुन हे भुत उतरावे लागेल व रोगी बरा झाल्यावर उतारा म्हणुन एक बोकडाचा बळी द्यावा लागेल असे सांगीतले.परंतू एवढा खर्च आवाक्याबाहेरअसल्याने मित्राचे वडिल चालढकल करू लागले.भगत सारखाच येऊन त्यांना सांगू लागला. ते भुत माझ्याकडे येऊन सतत मला तु सांगीतलेल्या प्रमाणे रोगी बरा झाला आहे.आता बोकडाचा बळी लवकर द्या.नाहीतर  तुझ्याकडेच पहातो. असे म्हणत आहे. तुम्ही ताबडतोब तयारी करा नाहीतर पुढे मी जबाबदार राहणार नाही.

मित्राचे वडिल सुशिक्षित असुनही हादरले.लगेच एका शुक्रवारी गावच्या हद्दीच्या बाहेर मध्यरात्री बोकडचा बळी देण्याचा कार्यक्रम ठरला.त्या प्रमाणे तयारी करण्यात आली. या कार्यक्रमाला माझ्यासारखेच अनेक उत्साही लोक आले होते.बाहेर गावचे अनेक नातेवाईक व त्यांचे मित्र जेवणासाठी आले होते.

बोकडाच्या मानाने जेवायला आलेली गर्दी पाहुन आपल्याला आता अर्धपोटी रहावे लागते की काय अशी मला शंका आली. मी माझ्या आत्याचा मुलगा (आता तो पन्नाशीत आहे) श्री शंकर वनघरे (अत्यंत व्रात्य व्यक्तिमत्त्व) त्याला बोलुन दाखवली. तो म्हणाला अजिबात काळजी करू नको मी आहे.कारण तो खुप वेळा असल्या कार्यक्रमांना जाऊन आला होता. 

ठरल्या प्रमाणे सर्व तयारी झाली.भगताच्या अंगात देव संचारला.तो सांगेल तो विधी करण्यात आला.पळसाच्या मोठया पानावर नुसत्याच भरपुर मटणाचा नैवेद्य भुतासाठी थोडया अंतरावर भगताने सांगीतलेल्या ठिकाणी ठेवण्यात आला.नैवेद्य ठेवायला अर्थात श्री शंकर वनघरे गेला होता.विशेष म्हणजे हा नैवेद्य थोडयावेळाने परत आणुन भगताने खायचा असतो.
इकडे विधी चालुच होता.भगताला नविन धोतर,नेहरूशर्ट,टोपी व उपरने व रोख एक हजार रूपये देण्यात आले.हा कार्यक्रम चालू असताना शंकररावने भुताला दाखवलेला नैवेद्य उचलुन आणला.व थोडया अंतरावर आम्ही दोघांनी जाऊन त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला. व परत गर्दीत येऊन मिसळलो.

रात्र बरीच झाली होती.विधी संपला सर्वजण जेवायला बसलो. भगतासाठी भुताला दाखवलेला नैवद्य आनायला सांगीतला. तेथे अर्थातच नैवेद्य नव्हता.खरोखरच भुताने प्रत्यक्ष येऊन नैवद्य खाल्ला अशी भगताने सगळ्या जमलेल्या लोकांना सांगीतले.भुत फार जालीम होते.ते सतत माझ्याकडे जेवण मागत होते.पाहिलत ना, तुम्ही प्रत्यक्ष.झाली ना तुमची खात्री असे म्हणुन भविष्यात अशीच सावज मिळविण्यासाठी स्वत:ची जाहीरात करून घेतली.आणि पुढे हाच भगत पश्चिम भागात नावारूपाला आला. 

डाँक्टर पेक्षा पेशन्टची गर्दी याच्याकडे होऊ लागली.(त्या काळात एवढी प्रचंड अंधश्रद्धा होतो की भुताचा नैवेद्य खाणे  दुरच पण ठराविक ठिकाणी असलेल्या भुताचे नाव जरी काढले तरी अंगावर काटा यायचा.तेव्हा एवढी हिम्मत आम्ही दोघे सोडुन कुणाच्यातच नव्हती.विशेष म्हणजे तेव्हा मी दहावीला होतो.



सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस