डेहणे गावचा समग्र इतिहास

डेहणे गाव 
डेहणे गाव हे पश्चिम भागातील दळणवळणाचे पुर्वी पासुनचे महत्त्वाचे  केंद्र आहे. माझे माध्यमिक शिक्षण तेथेच झाले. 

गावात प्रवेश करणाऱ्या पायवाटा:

डेहणे गावात प्रवेश करण्यासाठी पूर्वी अनेक पाउलवाटा होत्या. खरोशी, धामणगाव,एकलहरेकरांची पाउलवाट, ही डोंगरु तिटकारे गुरुजींच्या घरासमोरून बैलघाटातून सटवाईच्या मंदिराकडून येत असे. 

नायफड कडून येणारे लोक थेट रस्त्याने येत असत. 

पश्चिम भागातुन येणाऱ्या लोकांची पाऊलवाट ही जानोबा मंदिराच्या पाठीमागून येत असे. पावसाळ्यात तेथील खाचरामध्ये खूपच चिखल होत असे.

शेंदुर्लीवरून येणारे लोक मारुती लांघी फेटेवाले यांच्या शेताच्या कडेकडेने वांजुळडोहा कडून डेहणे गावात प्रवेश करीत असत.

खामकरवाडी, कुडे व घोटवडीकर हे बक्षा आंब्या कडून भीमा नदी ओलांडून डेहणे गावात प्रवेश करीत असत.
 
एकलहरे,आंबेकरवाडी,बांगरवाडीकरांची पाऊलवाट ही आमईकडून नदी ओलांडून सुभाष भोकटे यांच्या आंब्या कडून वर आता जी बाजार समिती आहे तेथून गावात प्रवेश करीत असे.

अशा डेहणे गावात प्रवेश करणा-या ब-याच पाऊलवाटा होत्या.
 
आता गावोगावी रस्ते झाल्याने व प्रत्येकाकडे मोटारसायकल, चारचाकी आल्याने जवळ जवळ पाउलवाटा काळाच्या ओघात लुप्त झाल्या.आता फार क्वचितच त्यांचा उपयोग होत असेल. 

गावात मुख्य रस्त्याने प्रवेश केल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजुला शांताराम कोरडे यांची गिरणी आहे. तेथे भात भरडण्यासाठी व दळणे दळण्यासाठी नेहमीच गर्दी होत असे. सुगीच्या दिवसात अनेक वैदिनी सुई दोरा विकून त्या बदल्यात भात घेऊन येत असत.आणि शांताराम कोरडे यांच्या गिरणीच्या दारात मुक्कामाला असत. तिथे भात भरडून त्याची तांदूळ करून त्या नगरला जात असत.

त्या शेजारी सिताराम कोरडे यांचे टेलरचे अतिशय छोटे दुकान होते.

सिताराम टेलर:

सीताराम टेलर हे धोंडूबाबा कोरडे यांचे चिरंजीव ते जन्मतः अपंग होते. त्यांच्या दुकानात शाळेतील बरीचशी मुले उसवलेली कपडे शिवणे, रफु करणे, तर काही उगाचच शाळेला दांडी मारून वेळ घालवत बसायची. शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ते टाईमपास करण्याचे आवडते ठिकाण होते.  

सिताराम टेलरच्या शेजारी बांबळे पंक्चर कम लाईट लाउडस्पिकर मंडप डेकोरेशवचे दुकान होते. शाळेतील मुले सायकल पंक्चर काढण्यासाठी कायम त्यांच्या जवळ घोळक्याने उभी असायची.

डॉ. शितोळे:    
  
शेजारीच उबाळे यांच्या पडवीला डाँक्टर शितोळे यांचा दवाखाना होता. हे डाँक्टर महाशय कोणताही पेशंट असुद्या. त्याला दोन इंजेक्शन दोन दंडांना देणारच हा नियमच होता.

बोर्डावर मोठ्या अक्षरात डाँ.शितोळे यांचा दवाखाना व त्याखाली छोट्या अक्षरात R.M.P.असे लिहीलेले होते. माझा मित्र सुभाष भोकटे यांनी  R.M.P. चा Longfarm रोगी मारण्यात पटाईत असा मराठीत अर्थ काढला होता.
डॉक्टर शितोळे यांच्याकडे डबल नळीची एज.डी. मोटरसायकल होती.  
 
उबाळे बंधू यांचे हॉटेल: 
                    
त्यांच्या शेजारी प्रताप, संजू व राजू उबाळे यांचे हाँटेल होते व आताही आहे. उबाळे बंधू गणपतीचे डेकोरेशन फार सुंदर करायचे. त्यांच्या हाँटेलात भजी व कुंदा फारच फेमस होता.

उबाळे यांचे हॉटेल अगदी छोटेसे जरी होते. तरी टापटीपीच्या बाबतीत ते अगदी उजवे होते. एकदम स्वच्छ नीटनेटके टापटीप असे ते हॉटेल होते. उबाळे यांच्या हॉटेलत मिसळ, कुंदा,कळीचे व बुंदीचे लाडू, खाजा, शेवपापडी आणि चहा फारच प्रसिद्ध असायचा. प्रताप उबाळे हे गल्ल्यावर असायचे. तर संजू हे गिर्हाईकांना चहा,भजी मिसळ द्यायचे.

लग्नकार्यासाठी अथवा साखरपुड्यासाठी लोक उबाळे यांच्या हॉटेल मधून बुंदी घेऊन जात असत. उबाळे यांच्या हॉटेलात जसा कुंदा प्रसिद्ध होता. तसा खाजा देखील पन्नास पैशाला दोन खाजे मिळत.

नवीन लोक म्हणतील कुंदा हा काय प्रकार आहे ? तर कुंदा म्हणजे खव्यापासून बनवलेला पदार्थ. व खाजा म्हणजे आजच्या बालुशाहीचाच एक प्रकार. परंतु बालुशाही नव्हे. बालुशाही पेक्षा छोटा.

उबाळे यांच्या हॉटेलतील खाजा तोंडात घातल्या वर लगेच विरघाळुन जात असे. व त्याच्या वेगळ्याच चवीने मन अगदी प्रसन्न होई.असा हा खाजा आता कुठेच मिळत नाही. त्याचप्रमाणे कुंदा देखील. परंतु आजही उबाळे यांच्या हॉटेलात हे सर्व पदार्थ आजही मिळतात हे विशेष.

उबाळे यांच्या हॉटेलच्या समोर असलेल्या भट्टीवर हॉटेलचे मालक श्री. राजू उबाळे हे स्वतः ताजा माल बनवीत असत. 

उबाळे यांचे हॉटेलमध्ये चहा देखील अतिशय छान मिळत असे.अगदी सकाळी सकाळी उबाळे यांच्या हॉटेलात चहा पिण्यासाठी व भजी खाण्यासाठी तोबा गर्दी होत असे. 

अगदी सकाळी सकाळी राजू उबाळे हे भट्टीवर असलेल्या कढईमध्ये भज्यांचा घाणा सोडत. भज्यांचा हा घमघमीत वास अगदी दूरवर दरवळत राही. त्यामुळे खव्वयांचे पाय आपोआप हॉटेल कडे वळत. आम्ही दोन दोन प्लेट भजी खात असू.आता उबाळे यांचे हॉटेल मोठ्या भव्य इमारतीत सुरू आहे. आजही राजू उबाळे यांनी पूर्वीची चव टिकवून ठेवली आहे.

व्हिडिओ थिएटर:

उबाळे हाँटेलच्या शेजारीच श्री.शिंदे यांचे व्ही.डी.ओ. थिएटर होते. बाहेर काळ्या बोर्डवर रंगीत खडूंनी मोठ्या अक्षरात चित्रपटाचे नाव व छोट्या अक्षरात कलाकारांची नावे अशी जाहिरात असायची. तसेच नवीन चित्रपटाचे पोस्टर चिकटवलेले असायचे. 

अनेक विद्यार्थी तेव्हा शाळा बुडवून पिक्चर पाहण्यासाठी तेथे जात असत.

शेजारीच इन्नूसभाई तांबोळी यांचे दुकान होते. व आजही आहे. आता त्यांनी मोठी टोलेजंग इमारत बांधली आहे. तिथे त्यांचा दुकान व्यवसाय चालू आहे.

विठ्ठल कहाणे यांचे दुकान:

कै.विठ्ठल कहाणे यांचे किराणा मालाचे दुकान होते. तेथे उधारी मोठ्या प्रमाणात चालत असे. भागातील अनेक लोकांची तेथे उधारी असायची. विठ्ठल कहाणे यांचे चिरंजीव श्री.वनराज कहाणे यांचेकडे ६०८ टेंपो होता. त्यावेळेस या भागात दोनच ट्रक होते. कहाणे यांचा टेम्पो श्री रामदास तुकाराम कोरडे हे चालवायचे.

कहाणे यांचे शेजारी कैलास (बाळासाहेब) सावंत यांचे टेलरचे दूकान होते. त्याआधी किराणा मालाचे दुकान सुद्धा होते.

कै.दत्ताशेठ कोरडे यांचे किराणा दुकान:

सावंत यांचे शेजारी श्री.दत्ताशेठ बाजीराव कोरडे यांचे किराणा दुकान होते. या दुकानात विशेष गर्दी असायची. मला आठवते त्या वेळेस रामायण व महाभारत मालिका टिव्हीवर लागायच्या. मालीकेतील अनेक देवांचे पासपोर्ट साइजचे फोटो याच दुकानातुन चार-आठआणे देऊन पोरं घ्यायची व वहीमध्ये संग्रह करायची.

शिवाय तेथे सर्व शालेय स्टेशनरीचे साहित्य मिळत असे.

याच वेळी अमीरखान व माधुरी दिक्षित यांचा दिल सिनेमा हिट झाला होता.अमीर माधुरी यांचे छोटे फोटो याच दुकानातुन शाळेचे विद्यार्थी घ्यायचे व इस्रीच्या सहाय्याने शाळेच्या गणवेशातील पांढऱ्या शर्टाच्या मागील बाजुला व पुढे खिशावर ते चित्र उमटवयाचे. त्यामुळे अनेकांनी शिक्षकांच्या हातातील छड्यांचा प्रसाद खाल्ला आहे.

सहदेव गायकवाड टेलर:

कोरडे यांच्या दुकानाच्या पाठीमागे सहदेव गायकवाड यांचे टेलरचे दुकान होते. तिथे कैलास, आणि सहदेव गायकवाड कपडे शिवायचे. 

त्यांच्यासमोर असलेल्या सखाराम सावंत यांच्या भिंतीच्या कट्ट्यावर पश्चिम भागातून आलेल्या महिला करवंदे, तोरणे, आंबेळी इत्यादी रानमेवा विकत असायच्या. तिथेच रस्त्यावर खानविलकर   ते हात गाडीवर कुल्फी विकायचे.
 
गणपत भोपळे यांची भाताची व पिठाची गिरणी

कोरडे यांच्या दुकानाच्या शेजारी शाळा व सरकारी दवाखान्याकडे जाणारा रस्ता व त्या शेजारीच कै.गणपत भोपळे यांची भात व पिठाची गिरणी होती. त्या गिरणीवर नावजी वनघरे व सदाशिव देशमुख (सदुमामा) कामाला होते.
तेथे सुद्धा भात भरडण्यासाठी व पीठ दळण्यासाठी लोकांची खूपच व गर्दी असायची.

मच्छिंद्र भोपळे बॅगी पॅन्ट स्पेशलिस्ट टेलर :

गिरणीच्या पाठीमागील पडवी मध्ये मच्छिंद्र भोपळे यांचे टेलर चे दुकान होते. त्यावेळी नवीनच सलमान खानच्या बॅगी पॅन्ट ची फॅशन आली होती. तिथे बॅगी पॅन्ट शिवायला देण्यासाठी अनेक तरुण पोरांची गर्दी असायची. मच्छिंद्र भोपळे हे बॅगी पॅन्ट व शर्ट स्पेशलिस्ट होते.

मुलांचे वस्तीगृह:

गिरणी शेजारी मुलांचे वसतीगृह होते. तेथे शाळेतील मुलांची राहण्याची सोय होती. जुन्नर,आंबेगाव व खेड तालुक्यातील विद्यार्थी वस्तीग्रहा मध्ये राहत असत. शेजारीच कै. शंकर सोळशे यांचे किराणा मालाचे व सावकारीचे दुकान होते. तेथे अनेक शिक्षक लोक व्याजाने पैसे घेण्यासाठी येत असत.

भोपळे यांच्या पुढच्या बाजुला श्री.अंकुश भोकटे यांचे टेलरचे दुकान होते.

डेहणे आदिवासी संस्थेचे कार्यालय : 

भोपळे यांच्या गिरणीच्या समोर डेहणे आदिवासी संस्थेचे कार्यालय होते. तेथे कै.भागुजी हरिभाऊ भाईक 
चेअरमन नेहमी बसलेले असायचे. 

त्यांच्या बाजुला संस्थेचे मॅनेजर चिंतामण जठार बसलेले असायचे.
शेजारीच धोंडीभाऊ म्हातारबा दरेकर सचिव यांचेही स्वतंत्र ऑफिस होते. डेहणे आदिवासी संस्थेचा व्याप मोठा होता. 

तेथे पावसाळ्याच्या सुरुवातीला सोसायटीचे पीक कर्ज प्रकरणासाठी शेतकऱ्यांची खूपच मोठी गर्दी व्हायची.

कै.बाबुरावजी कौदरे यांचे योगदान :

तेथून दक्षिणेला चालत गेल्यावर कै. बाबुराव कौदरे यांच्या इमारतीत पाचवी ते सातवी पर्यत शाळेचे वर्ग भरत. 

शिवाजी विद्यालय डेहणे या शाळेसाठी कै.बाबुरावजी कौदरे यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या स्वतःच्या खोल्या शाळेसाठी दिले होत्या. 

त्याचप्रमाणे शिवाजी विद्यालय हायस्कूल डेहणे येथे आणण्यासाठी त्यांनी खूपच परिश्रम घेतले होते. त्यामुळे आपल्या या शैक्षणिक वाटचालीमध्ये त्यांचा सुद्धा खारीचा वाटा आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र :

पश्चिमेकडे उजव्या बाजुला सरकारी दवाखाना म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत 1979 साली बांधण्यात आली. व दवाखाना सुरू झाला. 

तेथे कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी स्वतंत्र खोल्या बांधण्यात आल्या होत्या. व डेहणे येथील आमराई मधील ओढ्या जवळील विहिरी मधून पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन केली होती. दवाखान्यात नबाबाई कोरडे अर्धवेळ स्त्री कर्मचारी म्हणून काम करायच्या.

त्यावेळेस दवाखान्यात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता. टीव्ही पाहण्यासाठी आम्ही तिथे जात असायचो. कधीकधी तेथे पडद्या वरील चित्रपट सुद्धा दाखवले जायचे.

दवाखान्यात सकाळपासून दुपारपर्यंत आजारी लोकांची खूप गर्दी असायची. त्यावेळी ठिकठिकाणी भिंतीवर 
तांबी बसवा, पाळणा लांबवा, 
विहिरी तळी पायऱ्यांची, साथ होते नारुची, 
गप्पी मासे पाळा, रोगराई टाळा. 
डी डी एस ची गोळी, करी कुष्ठरोगाची होळी 
अशी स्लोगन वाक्य भिंती भिंतीवर  गेरूच्या रंगाने लिहिलेली असत.

हायस्कूलचे आठवी ते दहावी पर्यंतचे वर्ग:

दवाखान्याच्या शेजारी शिवाजी विद्यालयाचे आठवी ते दहावी पर्यतचे वर्ग होते. ही शाळेची इमारत सावंत बंधू यांच्या जागेमध्ये होती. या इमारतीचा मोठा व्हरांडा व दगडी बांधकाम केलेली इमारत, मोठमोठ्या खिडक्या, आणि वर्गात असलेले बेंच याचे आम्हाला खूप अप्रूप वाटायचे.

त्यावेळेस आर जे. पाटील सर, सत्तीकर सर हे मुख्याध्यापक होते. गाडीलकर सर, सुरगुडे सर, क्षीरसागर सर, तांबोळी सर हे इंग्रजी विषय शिकवायचे. 

दातीर सर, बोरकर सर हे गणित विषय शिकवायचे. वामन सर, नढे सर हे विज्ञान शिकवायचे.पोखरकर सर, लाळगे सर हे इतिहास आणि भूगोल शिकवायचे.

महामुनी सर हे मराठी स्पेशलिस्ट शिक्षक होते. कर्वे सर वरकुटे सर असे अनेक शिक्षक होते.

शिपाई कर्मचाऱ्यांपैकी पांडू सांगडे यांची कारकीर्द विशेष होती.

पगार विभाग कार्यालय:

हायस्कूलच्या खाली तालुका मास्तर पगार विभाग डेहणे यांचे कार्यालय होते. डोंगरु कुशाबा तिटकारे हे तालुका मास्तर होते. त्यानंतर श्रीपत देवजी लांघी, श्री दिवाने गुरुजी हेही तालुका मास्तर होते.

त्यांना मदतीसाठी श्री जयराम आंबेकर गुरुजी,आणि ज्योती चिलेकर मॅडम मदत करीत असत.

उजव्या बाजुला शाळेचीच इमारत होती. त्यात दहावी "ब" चा वर्ग भरायचा. त्या वर्गात मी होतो. तिथूनच शिरगाव कडे जाणारी पायवाट होती.

जानोबा महाराजांचे कौलारू मंदिर :

त्या शेजारी श्री.जानोबा महाराजांचे जुने, दगडांच्या भिंती असलेले चौमौळी कौलारू मंदिर होते. मंदिराच्या दर्शनी भिंतीवर इंदिरा गांधी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व छत्रपती शिवाजी महाराज यांची अतिशय सुंदर अशी भिती चित्रे होती. 

मंदिरामध्ये सुंदर निळा ऑइल पेंट रंग दिला होता. कावळे पाटील हे देवाचे पुजारी होते.

मंदिरासमोर दिपमाळ व भव्य असा आयताकृती स्टेजसारखा मोठा पार होता. पाराच्या दोन्ही बाजुच्या कोप-यावर उंच अशी झाडे होती. दक्षिणेस दगडी रांजन होता. याच पारावर गावच्या यात्रेचे कार्यक्रम होत असत.

कौलारू मराठी शाळा :

समोरच भव्य अशी दगडी भिंतीची, कौलारू मराठी शाळा होती. या शाळेत चार वर्ग खोल्या होत्या. पुढे भव्य असे पटांगण होते. शाळेच्या पाठीमागे अनेक झाडे शिवाजी विद्यालयाच्या मुलांनी लावली होती.

शाळे शेजारी मराठी शाळेच्या शिक्षकांसाठी सरकारी निवासस्थान होते. शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात सकाळी प्रार्थना व्हायची. संध्याकाळी हाँलीबाँल खेळत.

सखाराम सावंत यांचा वडा आणि शिरा:

कै.बाजीराव कोरडे यांचे दुकानापासुन रस्त्या पलीकडे कै.सखाराम सावंत यांचे हाँटेल होते.
सखाराम सावंत यांच्या हॉटेलमधला भला मोठा बटाटा वडा, व गोड शिरा फारच प्रसिद्ध होता. 50 पैशाचा शिरा व 50 पैशाचा मोठा वडा अशा एक रुपयात त्यावेळी सकाळचा फुल नाश्ता होत असे. वडा व शिरा घेण्यासाठी लोक सखाराम सावंत यांच्या हॉटेलमध्ये येत असत.( पूर्वीचा मोठा वडा आता खूपच छोटा झाला आहे.)🥲

सखाराम सावंत हे बारीक अंगचनीचे होते. स्वच्छ धोतर व (बॉडी) बंडी परिधान केलेले असायचे. सखाराम सावंत यांच्या त्यांची पत्नी ह्या गल्ल्यावर बसलेल्या असत. सखाराम सावंत हे काही दिवस दूध डेअरीचे चेअरमन सुद्धा होते. त्यांच्याकडे एक ट्रक होता.

भाऊ आजा:

सखाराम सावंत यांच्या हॉटेलच्या समोरच त्यावेळचे प्रसिद्ध आचारी भाऊ आजा 
(भाऊ तिटकारे) हे भट्टीवर असत. वडे, शिरा, शेव पापडी यांचा घाना सतत चालू असे.अगदी सकाळी, सकाळी भाऊ आजा दगडी कोळशाची भट्टी पेटवायचे. 

काही लोक अगदी शेकण्यासाठी भट्टी पुढे ठाण मांडून उभे असत. व भट्टीवरच गप्पांची मैफल चालू होई.

त्या शेजारी रशिदशेठ तांबोळी यांचे किराना दुकान (त्यांचे काही काळ हाँटेलही होते.) त्या शेजारी प्रसिद्ध असे अब्बासभाई तांबोळी यांचे जनसेवा हाँटेल  होते. या होटेलात तर्री फार प्रसिद्ध असायची.

अब्बास शेठ यांची प्रसिद्ध मिसळ आणि तर्री:

अब्बास शेठ यांचे हॉटेल अगदी कळकटलेले असे होते. अतिशय तेलकट व काळपट चार लाकडी टेबल व बाकडे तेथे मांडलेले होते. शेजारीच एक छोटे टेबल होते. त्यावर छोटा स्टोव्ह व चहाचे अधन ठेवलेले असे. स्टोव्हची फरफर सतत चालू असे. शेजारीच मिसळचे एक मोठे भरलेले पातेले असे. त्या शेजारी बटाराची पोती असायची.
 
अब्बास शेठ यांच्या हॉटेलात मिसळ अतिशय उत्तम मिळायची. त्यावेळी मिसळ ही शक्यतो बशीत मिळायची. पश्चिम भागात तेव्हा पावाचा जन्म झालेला नव्हता. लोक भाकरी कपड्यात गुंडाळून आणत असत. व मिसळ बरोबर खात असत. तेव्हा एक रुपयाला मिसळ मिळे. तेव्हा एक रुपयाही मिसळवर खर्च करू न शकणारे खूप लोक होते.अशा लोकांसाठी अब्बास शेठ हे बशीतून नुसती तर्री देत.

ही तर्री चाळीस पैशाला असे. कितीही वेळा तर्री घ्यायची मुभा होती.बिल फक्त 40 पैसे. कित्येक लोक अगदी मी देखील खूप वेळा अब्बास शेठ यांच्या हॉटेलमध्ये तर्री बरोबर भाकरी खाली असेल.

50 पैशाला तांब्याभर ( त्यावेळचा तांब्या ) तर्री मिळे. या तर्रीत दोन जणांचे जेवण होत असे.आम्ही तांब्यातून तर्री घरी नेत असू. त्या तरीची चव ही अप्रतिमच होती. त्यात तर्रीची चव अजूनही माझ्या स्मरणात घर करून आहे.अशी तरी आजच्या कोणत्याही हॉटेलमध्ये मिळत नाही.

आबास शेठ यांच्या हॉटेललात एक रुपयाला दहा बटर मिळत असत. रुपयाची दहा बटर आम्ही घरी नेऊन चहाबरोबर खात असू. ही बटारे केवळ आबास शेठ यांच्याच हॉटेलात मिळत असत.

या हाँटेल शेजारी आणखी एक V.D.O. थिएटर व बाजीराव कोरडे यांचे दुकान होते. एकदा शाँर्टसर्किटमुळे ? हे दुकान जळुन खाक झाले होते.

रशीद शेठ यांचे किराणा मालाचे दुकान :

अब्बास शेठ यांच्या शेजारी रशीद शेठ यांचे किराणा मालाचे दुकान होते. डेहणे गावठाण मधील सर्व उधाऱ्या
या दुकानांमध्ये असत. शिवाय काही काळ त्यांचे हॉटेल देखील होते. तिथे पुरी भाजी अतिशय छान मिळत असे.

गावातील पहिला टेलिफोन एक्सचेंज बुथ :

रशीद शेठ यांचे चिरंजीव आयाज तांबोळी यांनी पहिले टेलिफोन एक्सचेंज बुथ सुरू केले होते. त्यावेळी त्यांच्या टेलिफोन एक्सचेंज बुथ मध्ये फोन करण्यासाठी लोकांची खूप गर्दी घ्यायची. शिवाय त्यांचा पासपोर्ट फोटो काढण्याचा स्टुडिओ देखील होता.

पहिले व्यावसायिक केश कर्तनालाय:

पूर्वी जमिनीवर पोते अंथरून त्यावर बसून केस कापण्याची पद्धत होती. शिवराम माठे हे बलुतेदारी पद्धतीने नाभिक काम करायचे. त्यावेळी वस्तऱ्याला धार लावून टक्कल केले जायचे. तर केवळ पाणी लावून दाढी केली जायची. ब्लेड हा प्रकार गावाला अस्तित्वात नव्हता.

परंतु सन 1986 साली त्यांचे पुत्र श्री रामदास माठे यांनी मोठ्या खुर्च्या, मोठमोठे आरसे, दाढी करण्याच्या क्रीम, पावडर, पाणी मारण्याचा स्प्रे या आधुनिक वस्तूंसह अध्ययवत असे दुकान थाटले होते. डेहणे गावात हे पहिलेच अद्यायावत दुकान होते. या दुकानाचे त्यावेळी खूपच अप्रूप वाटायचे. (पोत्यावरून डायरेक्ट खुर्चीवर) 😂

त्यावेळी मिथुनचा बॉक्सर हा चित्रपट हिट झाला होता.आणि मिथुन कट सुद्धा फेमस झाला होता.

रामदास माठे यांच्या दुकानात मिथुन, अनिल कपूर, जॉकी श्राफ ह्या हिंदी चित्रपट कलाकारांचे पोस्टर लावले होते. त्यामुळे दुकानात अधिकच आकर्षक दिसायचे. मिथुन कट हा तेव्हा फारच प्रसिद्ध होता.
रामदास माठे व शामराव वाजे हे फॅशनचे त्यावेळी शिल्पकार ठरले.

श्री शामराव वाजे यांचे लॉन्ड्रीचे दुकान :

पूर्वी लोक फक्त धुतलेले कपडे वापरत असत. कपड्यांना इस्त्री करतात हे कुणालाही त्यावेळी माहीत नव्हते. परंतु काळाची पावले ओळखून श्री शामराव वाजे यांनी त्यावेळी अध्यायावत असे लॉन्ड्रीचे  दुकान टाकले होते. या दुकानाला मोठा प्रतिसादही मिळाला होता.

डेहणे गावात श्री शांताराम शेंडे यांचा गणपती फार मोठा व आकर्षक डेकोरेशन  असायचे. डेकोरेशन खुपच सुंदर असायचे. दहा दिवस नाच, गाणी अगदी धमाल असायची.

पंचांग, ज्योतिष्य आणि अंगारे धुपारे:

आजारी पडल्यावर लोक दवाखान्यात जात असत तसेच काही लोक भविष्य, ज्योतिष आणि अंगारे धुपारे यासाठी डेहने येथे येत असत.

बबन सोळशे कपाळाला भंडारा लावून लक्ष्मण सुतार यांच्या अंगणात बसलेले असत. त्यावेळी तिथे त्यांच्याकडे पंचांग पाहण्यासाठी अनेक लोक येत.

त्याचप्रमाणे धामणगावचे सोनू भागीत पंचांग आणि बोटचाळी करायचे. त्यांच्याकडे सुद्धा अनेक आजारी लोक येत असत. ते वाजे यांच्या घरात बसलेले असत. तेथे बरेच अंगारे धुपारे चालायचे. लोक त्यांना सोन्या भगत असे देखील म्हणायचे.

मारुती खाडे यांच्याही अंगात वारे येत होते. त्यांच्याकडे अनेक भक्तांची गर्दी होत असे. अमावस्या, पौर्णिमेला उतारे पातारे चालू असायचे.

शिवाय बनाजीबुवा कोरडे हेही पंचांग पाहून लग्नाच्या तिथी जमवत असत. तसेच सत्यनारायणाच्या महापूजा करत असत.

सुतार आळी:

सुतार आळीला काशिनाथ भालेरावसावळेराम भालेराव हे नवीन घरांची कामे करत असत. तर दत्तु भालेराव शिक्षक होते. आणि नथू भालेराव हे तलाठी होते.

सुतारआळी यांचाही सार्वजनिक गणपती असायचा. अतिशय सुंदर नियोजन असायचे. गणपती काळात विवीध कार्यक्रम, मराठी सिनेमे अशी रेलचेल सुतार आळीला असायची.

क्रिकेटचे भव्य स्टेडियम :

त्यावेळी क्रिकेटची मोठ्या प्रमाणात क्रेझ होती. गावागावांमध्ये क्रिकेट खेळला जायचा.परंतु क्रिकेट खेळण्यासाठी भव्य असे स्टेडियम असावे व त्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा भरवाव्यात. यासाठी श्री सुनील भालेराव यांच्या नेतृत्वाखाली डेहणे येथील तरुण वर्ग यांनी कातकरी अळीच्या पाठीमागे दशरथ कोरडे यांच्या पड जमिनीत आठ दिवस कष्ट करून अतिशय सुंदर असे स्टेडियम उभारले होते. व भव्य अशा क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी भरवल्या जात असत.

सुनील भालेराव, यशवंत भालेराव, जाकिर तांबोळी, हरूण तांबोळी,अल्ताफ सर, विठ्ठल डोंगरे असे अनेक क्रिकेटर डेहणे गावात होते.

आब्बास शेठच्या हाँटेल समोर मोठा चौक व पुढे मोठा ध्वजाचा उंच लोखंडी खांब होता.कै.भरत कोरडे या खांबाच्या शेंड्या पर्यंत वर जायचा.या खांबाला वळसा घालूनच एस. टी. आब्बासभाईच्या हाँटेलच्या दारात धुरळा उडवीत थांबायची.

ध्वजाच्या खांबाच्या समोरच दुध डेअरी, शिवाजी विद्यालयाचे कार्यालय व अंगणवाडी होती. त्याशेजारी जनावरांचा दवाखाना आहे.तर जवळच असलेल्या गोडावुनच्या प्रांगणात डेहणे आदिवासी संस्थेची वार्षिक सभा सटवाई मंदिराजवळील गोडाऊनच्या आवारात होत असे. सभा संपल्यावार भेळ, लाडू खाण्यासाठी आम्ही तेथे जात असू.

सटवाई मंदिर :

डेहणे गावच्या पूर्वेला बैल घाटाच्या शेजारी असलेल्या सटवाई मंदिरात मंगळवारच्या दिवशी पश्चिम भागातील अनेक भक्त लोक तिथे कोंबड्या कापत असत. त्यानंतर जेवणावळी चालायच्या. कधी कधी आम्हालाही जेवणाचा लाभ मिळायचा. 

आता जे वाढाणे यांचे हाँटेल आहे. त्या जागेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँक होती. व मारूतीच्या मंदिरासमोर ग्रामपंचायत व पोष्ट आँफिस होते. 

मारूतीच्या मंदिराच्या पुर्वेला खाली बैलगाड्यांचा घाट होता. यात्रेला तेथे अनेक तालुक्यातुन नामांकित बैलगाडे यायचे. प्रचंड गर्दी असायची.

बैलगाड्यांच्या शर्यती व्हायच्या. गाड्यांच्या शर्यती पहायला संपुर्ण पश्चिम भाग लोटायचा. संध्याकाळी जानोबा महारांजांच्या पारावर इनाम वाटप केला जायचा. रात्री तमाशा किंवा भारूडाचा कार्यक्रम व्हायचा.

धर्मरायाचे छप्पर  नसलेले मंदिर :

शांताराम शेंडे यांच्या घरा शेजारी धरमरायाचे छप्पर व भिंती नसलेले देऊळ होते.धरमरायाच्या यात्रेला येथील जागा शेणाने सारवून छानपैकी स्वच्छता केली जायची. सकाळी लोक मांडव डहाळे आणायचे. पुजा झाल्यावर नारळ फोडण्यासाठी तोबा गर्दी व्हायची. लहान मुलांच्या कुस्त्या व्हायच्या. त्यानंतर विवीध गावच्या भजनांचा कार्यक्रम असायचा.
धर्मरायाच्या मंदिराची संपूर्ण देखभाल कै. शिवराम माठे हे करायचे.

धरमरायाच्या देवळा शेजारी मुस्लीम बांधवांचे चीरे होते. त्यांना वर्षातुन एकदा पांढरा चुना लावलेला असे. त्या चिऱ्यांवर  आम्ही बसत असू. परंतु कधीही धर्म भावना दुखावल्या नाहीत. हे विशेष.

याच मंदिराच्या उत्तरेला कातकरी लोकांची चाळ आहे. तेथे सकाळी डेअरीला दुध घालायला आलेले काही लोक दारू पिण्यासाठी तेथे जात असत.

सोळशेवाडी लेझीम पथक :

सोळशेवाडी यांचे ढोल व लेझीम पथक त्यावेळी फार प्रसिद्ध होते. शिवाय त्यांचे भजन मंडळही प्रसिद्ध होते. श्री.दत्ता लांघी साहेब, श्री.एकनाथ लांघी साहेब, कै.बुधाजी खाडे, कै,चिंधू खाडे, श्री.जगदिश कशाळे साहेब, श्री.दगडू लांघी. श्री.दत्ता खाडे सरपंच यांनी खुप वर्षे भजन स्पर्धा भरविल्या होत्या. व त्यास प्रचंड प्रतिसाद लाभला.

भक्ती सांप्रदाय :

त्यावेळी श्री.सुरेश तिटकारे सर, श्री. मनोहर कोरडे, श्री.वनराज कहाणे सर, श्री.नामदेव वाजे गुरूजी यांनी श्रीहरी तरूण मंडळाची स्थापना करून मारूती मंदिराचा जिर्णोद्धार केला व तेथे दररोज सायंकाळी हरिपाठ सुरू केला. दररोज सायंकाळी हरिपाठ म्हणण्यासाठी लोक मंदिरामध्ये जात असत.

मंदिराच्या भिंतीवर अतिशय सुंदर असे सुविचार, व भगवद्गीते मधील श्लोक हे श्री क्षीरसागर सरांनी लिहिले होते.

डेहणे आदिवासी दूध संस्था :

त्यावेळी डेहणे आदिवासी दुध उत्पादक संस्था ही 25 गावांशी संलग्न होती. संस्थेची २२०६ क्रमांक असलेली दुधगाडी अनेकांच्या स्मरणात असेल. दुध संकलनाचे काम कै.नावजी वनघरे,चाहू वायाळ, विठ्ठल सावंत हे करायचे.
संस्थेचे स्वतंत्र इमारत होती.

नावजी वनघरे यांचे दूध केंद्र:

कै.नावजी वनघरे यांच्याकडे बऱ्याच म्हशी होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे ताजे दूध घेण्यासाठी स्थानिक लोक आणि नोकरदार वर्ग येत असत. शिवाय ते हॉटेललाही दूध घालत. त्यांचे चिरंजीव श्री शंकर वनघरे प्रसिद्ध पहिलवान होते.

चिमाजी आप्पा कोरडे यांच्या खोल्या:

चिमाजी आप्पा कोरडे यांच्या बऱ्याच खोल्या भाड्याने दिलेल्या होत्या. तिथे अनेक हायस्कूलचे शिक्षक राहायचे. शिवाय त्यांच्या एका खोलीत एकलहरे आदिवासी संस्थेचे कार्यालय होते. तेव्हा नमाजी आंबेकर हे एकलहरे दूध संस्थेचे चेअरमन होते.

त्यांच्या अंगणात वडाचे मोठे झाड होते. त्या झाडाखाली सकाळी एकलहरे आदिवासी संस्थेचे दूध संकलनाचे काम चालायचे.

हसन सायकल मार्ट :

श्री.तुकाराम भोकटे गुरुजी यांच्या घराशेजारी त्यांच्या जागेत हसन सायकल मार्ट होते. तिथे भाड्याने सायकल मिळायच्या. तेथे सायकल दुरुस्तीचेही काम चालत असेल.

भाड्याने सायकल चालवायचा दर हा एका तासाला एक रुपया असा दर होता. तेथे अनेक छोट्या मोठ्या सायकली असायच्या.आम्ही तेथेच सायकल चालवायला शिकलो.

बक्ष्या आंबा,आमई, सुरांडा व वांजळढोह:
बक्षा आंब्याकडे स्त्रिया कपडे धुण्यासाठी जात असत. तसेच अनेक मुले पोहायला जायचे.

आमई कडे मोठा डोह होता. बैलपोळ्याच्या वेळेस लोक आपापले बैल घेऊन या डोहात पोहोण्या पाडत असत. बैलांच्या शेपटीला धरून खोल डोहातून जाताना वर खाली व्हायचे. परंतु पैलतीराकडे जाण्याचा आनंद असायचा.

आम्ई कडे स्मशानभूमी देखील होती. तेथे मृत व्यक्ती नदीच्या काठी जाळल्या जायच्या. दशक्रिया देखील तिथेच होत असत. शिवाय गणपती विसर्जन ही तेथेच होत असे.

सुरांडा येथे देखील पाण्याचा डोह होता. मुले तिकडे पोहायला जायची.

सर्वात मोठा डोह म्हणजे वांजळडोह परंतु तिकडे भुते असतात म्हणून कोणीही दुपारी फिरकत नसायचे.

सातकं, सुतारबन, बक्षा आंबा, कातोडी रान :

सातकं, सुतारबन, बक्षा आंबा, कातोडी रान या राना मध्ये लोक गुरे राखण्यासाठी, वाळलेले शेण गोळा करण्यासाठी जात असत. तसेच जनावरांसाठी वाळलेले गवत काढण्यासाठी जात असत. अनेक लोक वाळलेल्या गवताच्या पेंड्या झाडावर रुचून ठेवत.

कातवडी देव हे एक उग्र देवस्थान होते. घरात जर काही चोऱ्यामार्‍या झाल्या. किंवा भांडणे झाली तर लोक कातवडी देवाची भीती दाखवायचे.

राजकीय कारकीर्द :

कै.श्री.दामू कोरडे इंग्रज काळापासून डेहणे गावचे मुलकी पाटील होते. दामू पाटील हे अतिशय सज्जन गृहस्थ होते. त्यांची कारकीर्द अतिशय महत्त्वपूर्ण होती. 

स्वातंत्र्योत्तर काळात कावळे पाटील हे प्रसिद्ध होते. कावळे पाटील आता वयस्कर झाले आहेत. 

डेहणे गावचे ग्रामपंचायतचे सरपंच कै.किसन उर्फ दादाभाऊ कोरडे हे होते. त्यानंतर कै.नानासाहेब कशाळे हे बरेच वर्षे सरपंच होते. शिवाय ते सन १९९२ ते १९९७ या कालावधीत जिल्हा परिषद सदस्य देखील होते.

तसेच ह.भ.प. धोंडूबाबा कोरडे हे सुद्धा सन १९६२ ते १९६७ या कालावधीत पंचायत समिती सदस्य होते.
शिवाय श्री.रामदास माठे हे सुद्धा पंचायत समिती सदस्य व सभापती होते.

जि.प. सदस्य, प.स. सदस्य व सभापती:

डेहणे गावाने एक जिल्हा परिषद सदस्य, नानाभाऊ कशाळे, दोन पंचायत समिती सदस्य कै.धोंडू बाबा कोरडेश्री.रामदास शिवराम माठे (सदस्य व सभापती) यांच्या रूपाने दिले. तर बी. के. कशाळे यांना महाराष्ट्र शासनाने आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

गावातील प्रतिष्ठित व्यक्ती:

कै.बी.के.कशाळे (आदिवासी सेवक), मारूती लांघी (फेटेवाले) कावळे पाटील, श्री.नामदेव कशाळे (चेअरमन), कै.श्रीपत वाजे, कै.दादाभाऊ कोरडे, श्री किसन मनाजी कोरडे, भोकटे गुरूजी, कै.डोंगरू तिटकारे गुरुजी व सखाराम सावंत, श्रीपत लांघी गुरुजी इत्यादी मंडळींना भागातुन एक प्रतिष्ठेचे वलय होते.

बी.के.कशाळे आणि मारुती लांघी (गुलाबी फेटा) यांची सुप्रसिद्ध जोडी होती. ते एकमेकांचे मित्र होते. एकमेकांशिवाय राहत नसत. मारुती लांघी डेहणे आदिवासी संस्थेचे डायरेक्टर होते. तर बी.के.कशाळे हे चेअरमन होते. 

व्यापारी वर्ग :

व्यापर क्षेत्रात आब्बास शेठ, रशीद शेठ, कै.बाजीराव कोरडे, कै.विठ्ठल कहाणे, कै.भिकाशेठ उबाळे. श्री.शांताराम कोरडे गिरणीवाले, श्री.सितारामशेठ कोरडे. कै.गणपत भोपळे व्यापार क्षेत्रात प्रसिद्ध होते.

न्युज पेपर एजन्सी :

डेहणे येथे प्रत्येक हॉटेलमध्ये 1980 पासून नियमित सकाळ हे वर्तमानपत्र येत असे. त्यामुळे जगात काय चालले आहे याची माहिती मिळत असे.
काही दिवसानंतर वर्तमानपत्रांची एजन्सी श्री. विठ्ठल डोंगरे पोस्ट मास्तर यांच्याकडे होती.

फिटर सुदूमामा व हिरामण कोरडे :

त्यावेळी मोटा जाऊन शेतीसाठी नवीनच ऑइल इंजिन आले होते. हया इंजिनची ने आण करण्यासाठी लाकडाच्या कडवानावरून बैलांच्या सहाय्याने न्यावे लागत असे. इतकी ही इंजिनें जड होती.

इंजिन बिघडल्यावर इंजिन दुरुस्त करण्यासाठी सदू मामा देशमुख व हिरामण कोरडे हे प्रसिद्ध फिटर होते. त्यांना भागामध्ये खूप मागणी होती.

प्रसिद्ध गाडा मालक:

कै.नाना भिकाजी कशाळे, कै.सखाराम सावंत, कै.चिमाजी आप्पा कोरडे, श्री.सितारामशेठ कोरडे, यांचे नामांकित बैलगाडे प्रसिद्ध होते. 

शिवाय कै.बापू गायकवाड, कै.वंसत व श्री.नारायण गायकवाड हे प्रसिद्ध डफडे वादक होते.

अखंड हरिनाम सप्ताह आयोजन:

गावात गुढीपाडव्याच्या दिवशी जानोबा महाराजांच्या मंदिरासमोर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात असे. या सात दिवसाच्या काळात प्रवचन, हरिपाठ, किर्तन व हरिजागर, होत असे. अनेक नामवंत प्रवचनकार व कीर्तनकार त्यांची भागवत सेवा सादर करीत.

सकाळी साडेअकरा व संध्याकाळी सात वाजता जेवणाची व्यवस्था केलेली असे. अनेक लोक या अखंड हरिनाम सप्ताहात भाग घेत असत. काल्याच्या महाप्रसादासाठी पश्चिम भागातून मोठ्या संख्येने लोक येत असत.

सुतार काम :

कै.लक्ष्मण सुतार यांच्या दारात शेतीची लाकडी औजारे तयार व दुरूस्ती साठी अनेक गावच्या लोकांची वर्दळ असायची. त्यांच्या कट्ट्यावर अनेक लोक गप्पा मारीत बसलेले असायचे.

लोहार काम :

शेतीच्या कामासाठी विळे, कोयते, फाळ, साखळ्या, वसू,फास, पहार, फावडे, टिकाव शेवटन्यासाठी, धार लावण्यासाठी कै.वामन लोहार यांच्या दारात खुपच वर्दळ असायची. त्यांची म्हातारी भाता हलवण्याचे काम करायची.

विष्णु शेंडे:
 
अब्बास शेठ किंवा उबाळे यांच्या हॉटेलमध्ये कै, विष्णू शेंडे हे वेटर चे अर्धवेळ काम करीत असत.

विष्णु शेंडे हे त्यावेळचे प्रगतशील शेतकरी होते. त्यांच्याकडे खिल्लारी बैल, व लाकडी खटार गाडी होती. त्यांच्या घराच्या पाठीमागे त्यांचा जनावरांचा गोठा होता. परंतु केवळ हॉटेलचे खाण्याची आवड असल्यामुळे हे बिन पगारी वेटरचे काम करीत असत.

कातकरी आळी: 

कातकरी अळीला तर बोलायचेच काम नाही. तिकडे हातभट्टीची दारू पिण्यासाठी बेवड्यांची एकच गर्दी होत असे. अनेक लोक दूध घातले की घरचे काम सोडून दारू पिण्यासाठी तिथे बसलेले असत. जास्त दारू पिल्यावर तंगडत, लेझीम खेळत घरी जात असत.

त्या ठिकाणी त्यांच्या मारामाऱ्या, भांडणे होत असत. शहाणी सुरती माणसे शक्यतो तिकडे फिरकत नसत.
कातकरी अळीला शासनाने घरकुले बांधून दिली होती. 

परंतु हे कातकरी रात्री घरात न झोपता बाहेर झोपत असत. शिवाय बाहेरच स्वयंपाक देखील करत असत. मग या घरकुलांचे ते काय करतात हा मोठा प्रश्नच असे.

जानू कातकरी त्यांचा मुलगा मुक्या कातकरी, तारी कातकरीण यांची दररोज संध्याकाळी दारू पिल्यावर भांडणे होत असत. एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण होत असे.

जो त्रयस्थ माणूस त्यांचे भांडण सोडवायला जात असे. त्यालाच हे कातकरी लोक मारत असत. त्यामुळे त्यांची भांडणे सोडवण्याच्या कुणी फंदात पडत नसे.

मुक्या कातकार्याची मुले लक्ष्या, रड्या आणि बंदया यांच्याबरोबर गिलवर घेऊन आम्ही पाखरे मारायला जात असू.
कातकरी बाया आणि बापे रात्री दारू पीत असत. व मोठमोठ्याने डबे वाजवून नाचत राहत. अगदी मध्यरात्रीपर्यंत त्यांचा नाच गाण्याचा आणि डबे वाजविण्याचा कार्यक्रम चालू राही.

कातकरी आळीला शंकर शिंदे (भोई) हे सुद्धा राहत असत. त्यांच्याकडे ताजे मासे, बोंबील, सुकट,वाकट व व खरा मासा घेण्यासाठी लोक त्यांच्याकडे गर्दी करत.

डेहणे हे पश्चिम भागाचे सत्ता केंद्र:

डेहणेगाव हे पश्चिम भागाचे महत्वाचे सत्ता कारण केंद्र आहे. त्या ठिकाणी विविध गावच्या सोसायटी यांची कार्यालये, बँका, हायस्कूल, शाळा बीट, पोस्ट ऑफिस, दवाखाने, हे सर्व असल्यामुळे इथूनच पश्चिम भागाचे राजकारण चालते. 

तेव्हाही इथूनच चालायचे. राजकारणाची सर्व सूत्रे इथूनच फिरायची.
त्या काळात भिवेगावचे पांडुरंग वनघरे, ढवळा वनघरे, टोकावडेचे दिगंबर धोंडीबा मुऱ्हे, मंदोशीचे किसन देहू तळपे (गुरुजी), धुओलीचे ठकुजी जठार, नायफडचे श्रीपत तावजी ठोकळ, खरोशीचे श्रीपत लांघी, डेहणेचे मारुती लांघी फेटेवाले व दादाभाऊ कोरडे हे डेहणे आदिवासी संस्थेचे संचालक होते. तर भागुजी भाईक हे चेअरमन होते.

त्याचप्रमाणे गामाशेठ मराडेकिसन लांघी, बाळासाहेब तळपे (सरपंच), शंकर राघुजी हुरसाळे (कोटेश्वर दूध संस्था संस्थापक व उपसरपंच), नारायण जठार, (उपसरपंच डेहणे ग्रुप ग्रामपंचायत) सिताराम मारुती मोहन (कारभारी)चिंधू उर्फ मारुती धोंडू तळपे (चेअरमन), सिताराम आंबेकर (पाटील), नमाजी आंबेकर (चेअरमन), धोंडीभाऊ दरेकर (सचिव), विठ्ठल आंबेकर (सभापती), पांडुरंग तिटकारे (पं.स.सदस्य) धोंडू बाबा कोरडे,(पं.स.सदस्य)नानाभाऊ कशाळे (जि.प.सदस्य), बी.के. कशाळे (चेअरमन डेहणे आदिवासी) नारायण भोरबबन जाधव (सेक्रेटरी)  भाऊ काठे पाटील, दगडू नांगरे, जिजाबा नांगरे, दामू कुडळ, पर्वत जंगले (प.सं.सदस्य), तुळाजी लांघी असे त्यावेळी अनेक पुढारी होते. 

विठ्ठल आंबेकर हे अनेक वर्ष पंचायत समितीचे उपसभापती व सभापती होते.

दिगंबर मुऱ्हे हे पुणे जिल्हा दूध उत्पादक संस्थेचे संचालक होते.

त्यावेळी पश्चिम भागात आमदार नारायणराव पवार गट व सहकार महर्षी साहेबराव सातकर गट असे दोन गट होते.
त्यावेळी सत्ताकरणाची सर्व सूत्रे सहकार गटाकडे असायची. त्यामुळे सहकारातले सर्व पुढारी साहेबराव सातकर यांच्याकडे होते. 

आता सहकाराला कायमची घरघर लागली आहे. का? ते आपणा सर्वांना माहीतच आहे.🥲

पश्चिम भागातले विविध गावचे सरपंच उपसरपंच हे आमदार नारायणराव पवार गटाकडे होते. 

परंतु सातकर गटाचा माणूस कधीच पवार गटात जात नसे. व पवार गटाचा माणूस कधीच सातकर गटात येत नसे. त्यावेळेस या डोहातून त्या डोहात बेडूक उड्या मारण्याची पद्धत बहुतेक नसावी. 

तत्कालीन खाद्यपदार्थ :

त्यावेळी कळीचे लाडू, बुंदीचे लाडू, शेव पापडी, कुंदा, खाजा, वडा व शिरा,बुंदी, मिसळ व चहा,गुळाची शिंगोळी व उपवासाचा चिवडा हे पदार्थ मिळायचे. हे पदार्थ त्यावेळी फारच प्रसिद्ध होते. त्यांची चव अजूनही अनेकांच्या मनात असेल. 

परंतु आज जर विचार केला तर यातील बरेचसे पदार्थ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु त्यावेळी गरिबीच्या काळात हे पदार्थ कधीतरी खाण्यासाठी मिळत. लोक आवडीने पदार्थ खात असत. त्याला वेगळीच चव होती.ती चव म्हणजे कष्टाची,गरिबीत पैशाची किंमत असल्याची, माणुसकीची, प्रेमाची व आदराची होती.

हॉटेल वाले कष्ट, पैशाची जाण असलेले गरीब लोक,माणुसकी, प्रेम, आदर व नीतिमत्ता हे सर्व एकत्र करून हे पदार्थ बनवत होते. म्हणूनच त्यांची चव अवीट होती. आपले भाग्य थोर म्हणूनच हे पदार्थ आपल्याला चाखायला मिळाले. धन्य ते लोक धन्य ते पदार्थ.

डेहणे गावच्या जडण घडणी मध्ये या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचा सिंहाचा वाटा होता. त्याचप्रमाणे भागाचा देखील हेही तितकेच खरे..

लेखक:-  रामदास तळपे 

टीप :- पूर्वी मी याच विषयावर लेख लिहिला होता.परंतु या लेखाखालील माझे नाव वगळून काही महाभागानी त्यांचे नाव टाकले होते.

त्यामुळे एखाद्या लेखाची नक्कल करणे हे कॉपीराईट कायद्याचा भंग करणारे आहे.

लेख लिहिण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात.

तरी कृपया कुणीही लेखक म्हणून आपले नाव टाकण्याचा प्रयत्न करू नये.

आपलाच, रामदास तळपे 


 


मोबाईल दुरुस्ती कोर्सेस mobile repairing course

मोबाईल दुरुस्ती mobile repairing course

आजच्या आधुनिक युगात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. त्यामुळे जर तुमचा मोबाईल खराब झाला, तर अनेक अडचणी येऊ शकतात. 

मोबाईल दुरुस्तीमध्ये विविध प्रकारच्या समस्यांवर उपाय शोधले जातात, जेणेकरून तुमचा फोन पुन्हा व्यवस्थित काम करू शकेल.

सामान्य मोबाईल समस्या आणि त्यांची दुरुस्ती:

स्क्रीन तुटणे/फुटणे : ही सर्वात सामान्य समस्या आहे. अशा वेळी, तुटलेली स्क्रीन बदलून नवीन स्क्रीन (display) बसवली जाते. यामध्ये टचस्क्रीन आणि डिस्प्ले युनिट दोन्ही बदलले जातात.

बॅटरी समस्या : मोबाईलची बॅटरी लवकर उतरणे,फोन गरम होणे किंवा फोन बंद पडणे या बॅटरीशी संबंधित समस्या आहेत.जुनी बॅटरी काढून नवीन बॅटरी टाकल्याने ही समस्या दूर होते.

चार्जिंग समस्या : फोन चार्ज न होणे किंवा चार्जिंग पोर्ट खराब होणे या समस्या चार्जिंग पोर्ट बदलून किंवा चार्जिंग सर्किट दुरुस्त करून सोडवल्या जातात.

सॉफ्टवेअर समस्या : फोन हँग होणे, ॲप्स क्रॅश होणे, फोन बूट न होणे किंवा सतत रीस्टार्ट होणे या सॉफ्टवेअरशी संबंधित समस्या आहेत. अशा वेळी, सॉफ्टवेअर अपडेट करणे, रीसेट करणे किंवा नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे (flashing) आवश्यक असते.

पाण्यात पडणे : फोन पाण्यात पडल्यास, त्वरित बॅटरी काढून टाकावी आणि फोन पूर्णपणे सुकवावा. त्यानंतर, तज्ञांकडून त्याची तपासणी करून आतील भागांची स्वच्छता आणि दुरुस्ती करणे गरजेचे आहे. पाणी लागल्याने शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते.

स्पीकर/माइकच्या समस्या: आवाज (स्पीकर) नसणे किंवा इतरांकडून तुमचा आवाज (माइक) ऐकू न येणे यासारख्या समस्या स्पीकर किंवा माइक बदलून सोडवता येतात.

कॅमेरा समस्या : कॅमेरा काम न करणे, फोटो अस्पष्ट येणे किंवा कॅमेरा ॲप ओपन न होणे या समस्या कॅमेरा मॉड्यूल बदलून किंवा सॉफ्टवेअर दुरुस्त करून सोडवल्या जातात.

नेटवर्क समस्या : फोनला नेटवर्क न येणे किंवा वारंवार नेटवर्क जाणे ही समस्या ॲंटेना किंवा नेटवर्क आयसी (IC) दुरुस्त करून सोडवली जाते.

कोर्सचा प्रकार डिप्लोमा:

यात मोबाईल फोनच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दुरुस्तीचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये विविध ब्रँड आणि मॉडेल्सच्या मोबाईलची दुरुस्ती, देखभाल आणि समस्यानिवारण यावर लक्ष केंद्रित केले जाते. 

कमी कालावधीचे कोर्सेस:

हे कोर्सेस कमी वेळात मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण देतात, जसे की 2-3 महिन्यांत. यात दुरुस्तीच्या मूलभूत पद्धती आणि प्रक्रिया शिकवल्या जातात. 

अभ्यासक्रम:

मोबाईल फोनचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर घटक

दुरुस्तीच्या विविध पद्धती (उदा. सोल्डरिंग, कंपोनंट रिप्लेसमेंट)

समस्यानिवारण तंत्रे

विविध मोबाईल फोन ब्रँड आणि मॉडेल्सची माहिती 

नोकरीच्या संधी:

तुम्ही मोबाईल दुरुस्तीची स्वतःची दुकान उघडू शकता.

तुम्ही स्थापित दुरुस्ती केंद्रांमध्ये काम करू शकता.

मोबाईल कंपन्यांच्या सेवा केंद्रांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.

ई-कॉमर्स कंपन्यांच्या दुरुस्ती विभागात काम करू शकता. 

कोर्स निवडताना काय विचारात घ्यावे:

तुमच्या वेळेनुसार आणि बजेटनुसार योग्य कोर्स निवडा.

प्रशिक्षण संस्थेची प्रतिष्ठा आणि अभ्यासक्रम तपासा.

नोकरीच्या संधी आणि प्लेसमेंट सुविधांची माहिती घ्या. 

मोबाईल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट:

गुरुनानक रोड, डी / २, नूतन नगर, वांद्रे तलाव, वांद्रे (प), मुंबई, ४०० ०५०.

मोबाईल टेक्नॉलॉजी अल्फा इन्स्टिट्यूट - सी-१५, सायबा शॉपिंग सेंटर, न्यू मिल रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई, ४०० ०७०.

स्टार इन्स्टिट्यूट (मोबाईल रिपेअर) मुंबई महानगरपालिका इमारत, स्टेशन रोड, दिना बामा इस्टेट, भांडुप पश्चिम, मुंबई -४०००७८.

महेंद्र टेक्निकल इन्स्टिट्यूट - ब/३ पहिला माळा, एम.बी.क्लासिक इमारत, चिंचवड स्टेशन, पुणे ४११०१९.

मेमोन सेलफोन केयर मोबाइल ट्रेनिंग क्लास इन्स्टिट्यूट चंदन नगर, पुणे, ४११०१४.

ग्लोबल मोबाइल दुरुस्ती केंद्र - ७६७/ई, ६ लेन, शाहूपुरी कोल्हापूर – ४१६००१.

रामदास तळपे

              वाढदिवस अभिष्टचिंतन






बारावी नंतरचे विविध कोर्स



दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यावर तुमच्यासाठी अनेक कोर्सेस उपलब्ध असतात.

तुम्ही आयटीआय, पॉलिटेक्निक डिप्लोमा किंवा पॅरामेडिकल कोर्सेस निवडू शकता. तसेच, शॉर्ट टर्म कोर्सेस सुद्धा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात म्हणजेच आयटीआय मध्ये उपलब्ध असतात.

दहावी व बारावी नंतरचे काही लोकप्रिय कोर्सेस

आयटीआय (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्था. 

आय.टी.आय. हे एक व्यावसायिक शिक्षण आहे, जे विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक व व्यावसायिक क्षेत्रांमध्ये कौशल्ये शिकवते.

आय.टी.आय. अभ्यासक्रमांची माहिती:

अभ्यासक्रमांचा प्रकार:

आयटीआय मध्ये अभियांत्रिकी व गैर-अभियांत्रिकी असे दोन प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. 

अभ्यासक्रमांचा कालावधी:

अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत असतो. 

प्रवेश प्रक्रिया:

आयटीआय मध्ये प्रवेश दहावी व बारावीच्या गुणांवर आधारित असतो. 

उपलब्ध ट्रेड:

आयटीआय मध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, संगणक ऑपरेटर, कारपेंटर, पेंटर, ड्रेस मेकिंग आणि फॅशन डिझायनिंग यांसारख्या अनेक ट्रेडमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध असतात. 

स्वयंरोजगाराच्या संधी:

आयटीआय केलेले विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात. 

उच्च शिक्षणाच्या संधी:

आयटीआय केल्यानंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षण घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 

आयटीआय मध्ये उपलब्ध काही प्रमुख अभ्यासक्रम:

Electriciyan: इलेक्ट्रिशियन:

विद्युत उपकरणांची दुरुस्ती आणि देखभाल करणे.

Fiter: फिटर:

यंत्रसामग्रीची दुरुस्ती आणि देखभाल करणे.

फिटरची कामे:

यंत्रसामग्रीची जोडणी:

फिटर यंत्रांचे भाग एकत्र जोडणे.


दुरुस्ती व देखभाल

यंत्रामध्ये काही बिघाड झाल्यास, दुरुस्त करणे

नवीन यंत्रे स्थापित करणे आणि ती कार्यान्वित करणे

यंत्रांची नियमित तपासणी करून त्यांची देखभाल करणे. 

फिटरचे विविध प्रकार: 

जनरल फिटर: 

विविध प्रकारची कामे करणारा.

मेकॅनिकल फिटर: 

यंत्रसामग्रीच्या दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करणारा.

मेंटेनन्स फिटर: यंत्रांची नियमित देखभाल करणारा. 

Velder: वेल्डर 

धातू जोडणे आणि दुरुस्त करणे.

वेल्डिंग हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे, जे आधुनिक जगाच्या अनेक भागांमध्ये आवश्यक आहे. 

Carpenter: कारपेंटर:

लाकडी वस्तू बनवणे आणि दुरुस्त करणे 







Painter: पेंटर :

विविध पृष्ठभागांवर रंगकाम करणे.

Dress Meking: 

ड्रेस मेकिंगमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन आणि कलात्मकता यांचा संगम असतो. या कलेमुळे व्यक्ती  सुंदर आणि योग्य कपडे तयार करू शकते.आधुनिक युगात दररोज कपड्यांची फॅशन वेगवेगळ्या माध्यमांनी वाढत आहे. त्यामुळे ड्रेस मेकिंग ला फारच महत्त्व आले आहे. व व्यवसायाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. 

Dress Designing:

ड्रेस डिझायनर कपड्यांच्या डिझाइनवर काम करतात, ज्यात रंग, पोत,आकार आणि प्रमाण यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो.ते कपड्यांचे नमुने तयार करतात, फॅब्रिक निवडतात आणि कपड्यांचे उत्पादन कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन करतात. ड्रेस डिझाईनिंग ला आधुनिक युगात प्रचंड महत्व आले आहे. एक ब्लाउज डिजाइनिंग करायला काही स्त्रिया पाच पाच हजार रुपये मोजतात. म्हणजे विचार करा ड्रेस डिझाईनिंग हे किती महत्त्वाचे आहे. या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या प्रचंड संधी उपलब्ध असतात.
हा एक व्यावसायिक आहे जो लेथ मशीन वापरून धातू, लाकूड किंवा इतर सामग्रीला विशिष्ट आकार देतो.

तो धातूचे भाग बनवतो, नट-बोल्ट तयार करतो किंवा इतर वस्तू वळवून योग्य आकार देतो.

मेकॅनिक (मोटार वाहन)

यंत्रे,उपकरणे किंवा वाहनांची दुरुस्ती करणे.

यांत्रिक भागांची तपासणी करणे, त्यांची दुरुस्ती करणे आणि त्यांची देखभाल करणे.

यंत्रांमध्ये काही समस्या असल्यास त्यांचे निदान करणे आणि दुरुस्त करणे.

वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांसाठी विशिष्ट ज्ञान आणि कौशल्ये असणे

रेफ्रिजरेशन आणि एअर कंडीशनिंग:

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आहे, जिथे विविध अभ्यासक्रम उपलब्ध असतात.

नोकरीच्या संधी:

उत्पादन युनिट्स, बांधकाम कंपन्या, रेल्वे, ऑटोमोबाइल उद्योग,वीज वितरण कंपन्या, इत्यादी. 

स्वयंरोजगाराच्या संधी:

आयटीआय केलेले विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात. 

उच्च शिक्षणाच्या संधी:

आयटीआय केल्यानंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षण घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 

वायरमन : 

सध्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना आजच्या युगात खूपच महत्त्व आले आहे. दैनंदिन जीवनात इलेक्ट्रॉनिक हा अविभाज्य घटक झाला आहे. त्यासाठी वायरमन कोर्स व्यवसायिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण वायरमन साठी लोकांची खूपच मागणी असते.

निष्कर्ष:

ITI अभ्यासक्रम हे तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्ये शिकण्यासाठी एक उत्तम माध्यम आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्ये विकसित करून चांगले करिअर घडवू शकता. 

इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये विविध ट्रेडमध्ये प्रशिक्षण दिले जाते.

Polytechnic: पॉलिटेक्निक 

अभियांत्रिकी डिप्लोमा कोर्सेससाठी हे उत्तम आहे.

आयटीआय केल्यानंतर विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक किंवा अभियांत्रिकी (B.Tech) अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येतो, ज्यामुळे त्यांचे तांत्रिक ज्ञान वाढते आणि करिअरमध्ये प्रगती करता येते. 

छोट्या कालावधीचे कोर्सेस :

कमी कालावधीत एखादे कौशल्य शिकण्यासाठी हे कोर्सेस उपयुक्त आहेत,

कॉम्प्युटर:

संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक: 

(COPA):

Comput & programming

ब्युटीशियन

आजच्या या आधुनिक युगात प्रत्येक स्त्रीला आपण आधुनिक आणि सुंदर दिसलो पाहिजे असे वाटते. यासाठी ब्युटी पार्लरमध्ये भेट देऊन ते आपले सौंदर्य अधिकच सुंदर करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे ब्रिटिशन या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे. हल्ली ब्रिटिशियनचे अनेक कोर्स उपलब्ध असतात. 

ब्रिटिशियनचा कोर्स पूर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. वेगवेगळे कार्यक्रम,लग्नकार्य, छोटे-मोठे इव्हेंट, सण समारंभ,वाढदिवस, इत्यादी कार्यक्रमासाठी आपण ऍडव्हान्स बुकिंग करू शकता.

 रांगोळी

आजच्या आधुनिक युगात रांगोळीला खूप महत्त्व आले आहे. विविध कार्यक्रमांमध्ये रांगोळी काढण्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. त्याचप्रमाणे लग्न समारंभ, वेगवेगळे इव्हेंट यासाठी सुद्धा रांगोळीसाठी पाचारण करावे लागते.

रांगोळीला आज व्यवसायाचे रूप आले आहे. तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरात रांगोळीचे अनेक कोर्स उपलब्ध आहे. हे कोर्स पूर्ण करून आपण त्याला व्यवसाय करून देऊ शकता. 

मेहंदी:

 

लग्न समारंभ, हिंदू धर्मातील वेगवेगळे सण, छोटे मोठे कार्यक्रम, वाढदिवस यासाठी मोठे हौसेने मेहंदी काढली जाते. लग्न समारंभासाठी चांगल्या मेहंदी व्यवसायिका  ला बुकिंग करावे लागते. मेहंदीची क्रेझ सध्या खूप असल्याकारणाने मेहंदीला व्यवसायाचे रूप आले आहे.

छोट्या शहरात अनेक ठिकाणी मेहंदीचे कोर्स उपलब्ध असतात. मेहंदी चा कोर्स पूर्ण करून आपण त्याची व्यवसायात रूपांतर करू शकता.

हॉटेल मॅनेजमेंट: 

बारावी नंतर हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण घेता येते. अनेक महाविद्यालये आणि संस्थांमध्ये हॉटेल व्यवस्थापनाचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण:

बारावी नंतर हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण घेता येते. अनेक महाविद्यालये आणि संस्थांमध्ये हॉटेल व्यवस्थापनाचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. व्यवस्थापन.

अतिथी सेवा:

अतिथींच्या गरजा पूर्ण करणे, चांगली सेवा देणे, आणि तक्रारींचे निराकरण करणे. 

आर्थिक व्यवस्थापन:

हॉटेलचे बजेट, खर्च, आणि उत्पन्न यांचा ताळमेळ राखणे. 

ऑपरेशनल व्यवस्थापन:

हॉटेलच्या दैनंदिन कामांचे व्यवस्थापन करणे, जसे की साफसफाई, अन्न आणि पेय सेवा, इत्यादी. 

विक्री आणि विपणन:

हॉटेलचे जाहिरात आणि प्रमोशन करणे. 

तंत्रज्ञान:

हॉटेलमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे, जसे की ऑनलाइन बुकिंग, डिजिटल पेमेंट, इत्यादी. 

हॉटेल व्यवस्थापनाचे फायदे:

करिअरच्या संधी:

हॉटेल व्यवस्थापनामध्ये विविध करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.

चांगली कमाई:

हॉटेल व्यवस्थापनातील करिअरमध्ये चांगली कमाई होऊ शकते.

व्यक्तीमत्व विकास:

हॉटेल व्यवस्थापनातील कामामुळे व्यक्तीमत्व विकास होतो. 

हॉटेल व्यवस्थापनासाठी आवश्यक कौशल्ये:

नेतृत्व क्षमता, संवाद कौशल्ये, समस्या सोडवण्याची क्षमता, ग्राहक सेवा कौशल्ये, व्यवस्थापन कौशल्ये

भाषा कौशल्ये (इंग्रजी आणि इतर भाषा) 

आरोग्य क्षेत्रातील विविध कोर्सेस:

लॅब टेक्निशियन:

लॅब टेक्निशियन कोर्सचे प्रकार:

डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (DMLT):

हा एक लोकप्रिय डिप्लोमा कोर्स आहे, जो बरावी नंतर करता येतो. भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व जीवशास्त्रामध्ये 50% पेक्षा मार्क्स असणे आवश्यक आहे.

अभ्यासक्रमामध्ये काय शिकवतात:

रक्त, लघवी आणि इतर शारीरिक द्रव्यांचे नमुने घेणे आणि त्यांचे विश्लेषण करणे.

सूक्ष्मजीवशास्त्र, शरीरशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान आणि पॅथॉलॉजी यांसारख्या विषयांचा अभ्यास.

विविध वैद्यकीय चाचण्या करणे, जसे की हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर, इत्यादी.

प्रयोगशाळेतील उपकरणांचे व्यवस्थापन आणि देखभाल. 

नोकरीच्या संधी:

सरकारी आणि खाजगी रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर्स, ब्लड बँक्स, रिसर्च लॅबोरेटरीज, फार्मास्युटिकल कंपन्या.

फार्मसी असिस्टंट:

प्रवेश पात्रता:

फार्मसी असिस्टंट कोर्ससाठी साधारणपणे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अभ्यासक्रमाचा कालावधी:

फार्मसी असिस्टंट कोर्स साधारणपणे 6 महिने ते 1 वर्षाचा असतो.

अभ्यासक्रम:

औषधं कशी बनवतात आणि साठवतात.

औषधांची माहिती (उदा. उपयोग, दुष्परिणाम, डोस).

औषधं कशी द्यायची.

रुग्णांना औषधांबद्दल माहिती देणे.

फार्मसीमध्ये कायदे आणि नियम.

फार्मसीतील कामाचे व्यवस्थापन.

नोकरीच्या संधी:

फार्मसी असिस्टंट कोर्स केल्यानंतर तुम्हाला फार्मसी, हॉस्पिटल, किंवा आरोग्य केंद्रांमध्ये काम मिळू शकते.

महाराष्ट्रात अनेक शासकीय आणि खाजगी संस्था फार्मसी असिस्टंट कोर्स ऑफर करतात. तुम्ही तुमच्या जवळच्या संस्थेत चौकशी करू शकता. 

फार्मसी असिस्टंट कोर्सचे फायदे:

तुम्ही कमी वेळेत (6 महिने ते 1 वर्ष) फार्मसी क्षेत्रात प्रवेश करू शकता.

तुम्हाला औषधं आणि आरोग्य सेवांबद्दल माहिती मिळते.

तुम्हाला फार्मसीमध्ये चांगली नोकरी मिळू शकते.

तुम्ही लोकांच्या आरोग्यासाठी मदत करू शकता. 

फार्मसी असिस्टंट कोर्स एक चांगला पर्याय आहे ज्यांना फार्मसी क्षेत्रात करिअर करायचे आहे. हा कोर्स तुम्हाला आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये देईल, ज्यामुळे तुम्ही फार्मसीमध्ये यशस्वी होऊ शकता. 

नर्सिंग कोर्स:

नर्सिंग कोर्सेसचे प्रकार:

ए.एन.एम. (ANM - Auxiliary Nursing Midwifery):

हा 2 वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे. हा कोर्स मुख्यतः ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी असतो. 

जी.एन.एम. (GNM - General Nursing and Midwifery):

हा 3.5 वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे. यात 6 महिन्यांची इंटर्नशिप असते. 

शैक्षणिक अहर्ता :

या कोर्स साठी विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

एमबीबीएस (MBBS): 

बॅचलर्स ऑफ मेडिसिन, बॅचलर्स ऑफ सर्जरी. हा डॉक्टर होण्यासाठीचा मूलभूत अभ्यासक्रम आहे. यासाठी NEET (National Eligibility cum Entrance Test) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

बीडीएस (BDS): 

बॅचलर्स ऑफ डेंटल सर्जरी.

बीएएमएस (BAMS): 

बॅचलर्स ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी.

बीएचएमएस (BHMS): 

बॅचलर्स ऑफ होमियोपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी.

बी.फार्म (B.Pharm):

बॅचलर्स ऑफ फार्मसी.

अभियांत्रिकी (Engineering)

अभियांत्रिकी (Engineering) 

हा बरावी सायन्स नंतरचा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. यामध्ये विविध शाखा उपलब्ध आहेत:

कॉम्प्युटर अभियांत्रिकी (Computer Engineering): 

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स.

मेकॅनिकल अभियांत्रिकी (Mechanical Engineering):

यंत्रांची रचना, उत्पादन आणि देखभाल.

सिव्हिल अभियांत्रिकी (Civil Engineering): इमारती, पूल आणि इतर पायाभूत सुविधांची निर्मिती.

इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी (Electronics & Telecommunication Engineering): इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि दूरसंचार प्रणाली.

इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी (Electrical Engineering): 

विद्युत प्रणाली आणि ऊर्जा.

केमिकल अभियांत्रिकी (Chemical Engineering):

रासायनिक प्रक्रिया आणि उत्पादने.

प्रवेश: JEE Mains, MHT-CET यांसारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून तुम्ही बी.ई. (B.E.) किंवा बी.टेक (B.Tech) कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता.

विज्ञान (Science)

विज्ञान क्षेत्रात पदवी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध पर्याय आहेत:

बी.एस्सी. (B.Sc.): 

भौतिकशास्त्र (Physics), 

रसायनशास्त्र (Chemistry), 

गणित (Mathematics), 

जीवशास्त्र (Biology), 

वनस्पतीशास्त्र (Botany), 

प्राणीशास्त्र (Zoology), 

सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology), 

जैवतंत्रज्ञान (Biotechnology), 

संगणकशास्त्र (Computer Science) 

यांसारख्या विषयांमध्ये तुम्ही बी.एस्सी. करू शकता.

बी.सी.ए. (BCA - Bachelor of Computer Applications): 

कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी.

बी.एस्सी. कृषी (B.Sc. Agriculture): 

कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान.

प्रवेश: अनेक महाविद्यालये बरावीच्या गुणांवर आधारित प्रवेश देतात, तर काही प्रवेश परीक्षा घेतात.

वाणिज्य (Commerce)

वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हे पर्याय उपलब्ध आहेत:

बी.कॉम: 

(B.Com - Bachelor of Commerce): लेखाशास्त्र, वित्त, व्यवसाय व्यवस्थापन यांसारख्या विषयांचा अभ्यास.

बी.बी.ए :

(BBA - Bachelor of Business Administration): व्यवसाय व्यवस्थापन आणि प्रशासनाचे मूलभूत ज्ञान.

बी.एम.एस :

(BMS - Bachelor of Management Studies): व्यवस्थापन कौशल्यांवर लक्ष केंद्रित.

सी.ए: 

(CA - Chartered Accountancy): लेखापाल (अकाउंटंट) बनण्यासाठीचा व्यावसायिक कोर्स.

सी.एस:

(CS - Company Secretary): कंपनी सेक्रेटरी बनण्यासाठीचा व्यावसायिक कोर्स.

प्रवेश: बहुतांश अभ्यासक्रमांसाठी बरावीच्या गुणांवर आधारित प्रवेश असतो, तर काही संस्था स्वतःच्या प्रवेश परीक्षा घेतात.

कला (Arts)

कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक वैविध्यपूर्ण पर्याय आहेत:

बी.ए:

(BA - Bachelor of Arts): इतिहास (History), भूगोल (Geography), राज्यशास्त्र (Political Science), अर्थशास्त्र (Economics), समाजशास्त्र (Sociology), मानसशास्त्र (Psychology), साहित्य (Literature) यांसारख्या अनेक विषयांमध्ये बी.ए. करता येते.

बी.जे.एम.सी: 

(BJMC - Bachelor of Journalism and Mass Communication): पत्रकारिता आणि जनसंवाद क्षेत्रात करिअरसाठी.

बी.एस.डब्ल्यू:

(BSW - Bachelor of Social Work): सामाजिक कार्य क्षेत्रात रुची असलेल्यांसाठी.

बी.एफ.ए: 

(BFA - Bachelor of Fine Arts): चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला (Applied Arts) यांसारख्या कला प्रकारांमध्ये.

एल.एल.बी :

(LLB - Bachelor of Legislative Law): बारावीनंतर पाच वर्षांचा इंटिग्रेटेड एलएल.बी. कोर्स असतो.

प्रवेश: 12वीच्या गुणांवर आधारित प्रवेश, काही ठिकाणी प्रवेश परीक्षा.

व्यावसायिक व कौशल्य-आधारित अभ्यासक्रम (Vocational and Skill-based Courses)

आजकाल व्यावसायिक आणि कौशल्य-आधारित अभ्यासक्रमांना खूप महत्त्व दिले जाते.

ॲनिमेशन आणि मल्टीमीडिया:

ॲनिमेशनचे मुख्य प्रकार:

पारंपारिक ॲनिमेशन:

यामध्ये हाताने काढलेल्या चित्रांचा किंवा रेखाचित्रांचा वापर केला जातो, जी एका विशिष्ट क्रमाने दर्शवून हालचाल निर्माण केली जाते. 

संगणक ॲनिमेशन:

यामध्ये संगणकाचा वापर करून 2D किंवा 3D प्रतिमा तयार केल्या जातात आणि त्या हलवल्या जातात. 

स्टॉप मोशन ॲनिमेशन:

यामध्ये वस्तू किंवा बाहुल्यांची छायाचित्रे एका विशिष्ट क्रमाने घेतली जातात आणि नंतर ती एकत्रित करून हालचाल दर्शवली जाते. 

ॲनिमेशनचा उपयोग चित्रपट, टीव्ही शो, व्हिडिओ गेम्स, मोबाईल ॲप्स आणि इतर अनेक ठिकाणी केला जातो. 

(Animation & Multimedia): 

ग्राफिक डिझायनिंग:

ग्राफिक डिझाईनमध्ये, डिझायनर विविध व्हिज्युअल घटक जसे की चित्रे, रंग, फॉन्ट आणि लेआउट (layout) वापरून माहितीपूर्ण आणि आकर्षक डिझाईन्स तयार करतात. 

उदाहरणे:

पुस्तके, मासिके आणि वृत्तपत्रांसाठी लेआउट तयार करणे

जाहिरात (ऍडव्हर्टायझिंग) आणि मार्केटिंग साहित्य तयार करणे

वेबसाइट्स आणि ॲप्ससाठी डिझाइन तयार करणे

उत्पादन पॅकेजिंग डिझाइन करणे

लोगो आणि ब्रँड ओळख (ब्रांड आयडेंटिटी) तयार करणे 

ग्राफिक डिझाईनचे घटक:

टायपोग्राफी:

अक्षरांचे (फॉन्ट) आणि शब्दांचे डिझाइन.

रंग:

रंगांचा वापर करून डिझाइनमध्ये भावना आणि अर्थ निर्माण करणे.

प्रतिमा:

चित्रे, ग्राफिक्स आणि इतर व्हिज्युअल घटकांचा वापर.

लेआउट:

घटकांची मांडणी आणि व्यवस्था. 

ग्राफिक डिझाईनचा उपयोग:

ग्राफिक डिझाईनचा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये केला जातो, जसे की: 

वृत्तपत्रे आणि मासिके:

बातम्या आणि माहिती प्रभावीपणे सादर करणे.

जाहिरात आणि मार्केटिंग:

उत्पादने आणि सेवा लोकांपर्यंत पोहोचवणे.

वेबसाइट्स आणि ॲप्स:

वापरकर्त्यांना आकर्षक आणि वापरण्यास सोपा अनुभव देणे.

शिक्षण:

माहिती सोप्या पद्धतीने सादर करणे.

ब्रँडिंग:

कंपनीची ओळख (आयडेंटिटी) निर्माण करणे.

वेब डिझायनिंग:

वेब डिझाईनिंग म्हणजे वेबसाईट (website) तयार करण्याची प्रक्रिया. यात वेबसाईटचे स्वरूप, रचना, नेव्हिगेशन, आणि वापरकर्ता अनुभव (user experience) यांचा समावेश असतो. थोडक्यात, लोकांना वेबसाईटवर सहजपणे माहिती मिळवण्यासाठी आणि ती वापरण्यासाठी सोयीस्कर बनवण्याची प्रक्रिया म्हणजे वेब डिझाईनिंग. 

टूरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट :

(Tourism & Travel Management): पर्यटन उद्योगात करिअरसाठी.

प्रवेश: बरावीच्या गुणांवर आधारित किंवा थेट प्रवेश.

इतर पर्याय 

संरक्षण दल :

(Defence Services): एनडीए (NDA -National Defence Academy) द्वारे सैन्य, नौदल किंवा वायुदलात अधिकारी म्हणून सामील होऊ शकता.

शिक्षक:

(Education): डी.एड (D.Ed - Diploma in Education) किंवा बी.एल.एड (B.El.Ed - Bachelor of Elementary Education) करून प्राथमिक शिक्षक बनू शकता.

ग्रामसेवक कोर्स:

बारावीनंतर ग्रामसेवक प्रशिक्षणाचा दोन वर्षाचा कोर्स करू शकता.

एल एस एस

हा पशुवैद्यकीय कोर्स आहे. सध्या या क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रातील विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी MH CET Law किंवा इतर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

शैक्षणिक पात्रता:

बरावी उत्तीर्ण किंवा पदवीधर उमेदवार विधी अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात. 

कागदपत्रे:

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे, जसे की शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला (लागू असल्यास), आणि इतर आवश्यक कागदपत

योग्य कोर्स कसा निवडावा?

तुमची आवड : तुम्हाला कोणत्या विषयात किंवा क्षेत्रात अधिक रस आहे हे ओळखा.

तुमची क्षमता : तुमची कोणत्या विषयात चांगली समज आहे किंवा कोणत्या प्रकारचे काम तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे जमेल.

करिअरचे ध्येय : तुम्हाला भविष्यात काय बनायचे आहे? कोणत्या क्षेत्रात नोकरी करायची आहे?

संशोधन : विविध कोर्सेस, महाविद्यालये आणि त्यांच्या भविष्यातील संधींबद्दल सखोल माहिती मिळवा.

पालक आणि शिक्षकांशी चर्चा (Discuss with Parents & Teachers): त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्या.

तुमच्या आवडीचे आणि क्षमतांचे विश्लेषण करा, विशिष्ट करिअर ध्येये निश्चित करा, विविध कोर्सेसची माहिती मिळवा, शैक्षणिक संस्था आणि त्यांच्या अभ्यासक्रमांची माहिती घ्या, करिअर समुपदेशकाशी संपर्क साधा.

बारावीनंतर उपलब्ध असलेल्या कोर्सेसची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे, तुमच्यासाठी योग्य कोर्स निवडण्यासाठी थोडा वेळ द्या आणि सखोल संशोधन करा.

रामदास तळपे 





गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस