मंदोशी गावचा पार

                      
 मंदोशी गावचा पार

आमच्या मंदोशी गावचा अभिमान व गावाचे वैभव म्हणजे गोठणी वरचा पार आणि त्यावर असलेले वडाचे व पिपरीचे झाड. गोठणी वरील पारावरच्या  कितीतरी आठवणी गावच्या प्रत्येकाच्या ह्रदयातअगदी ताज्या आहेत.
 
गावचा पार साधारणपणे सन १९०२ साली ग्रामस्थांनी बांधला होता. हे भुमी अभिलेख कार्यालय खेड मधिल जुन्या दस्तऐवजा वरून स्पष्ट होते.
गोठणीवरील पार जरी ओबडधोबड असला तरी त्यावर असलेले वड व पिंपरीचे डेरेदार वृक्ष गावची एक शान म्हणुन उभे होते. वड व पिंपरीच्या झाडावर अनेक पक्षी घरटे करून असायचे. सतत या पक्षांचा किलबिलाट कानावर ऐकू यायचा.

या गोठनी वरील पारावर आमच्या गावच्या यात्रेच्या बैठका व्हायच्या. गावात नेहमीच दोन गट असायचे.या पारावर, ग्रामस्थांचे यात्रेच्या बैठकीत कितीतरी वादविवाद व्हायचे. परंतु ते कधीच विकोपाला जात नसत. हे वाद फक्त पारावरच चालत.

पारावरील बैठकांमध्ये गावच्या यात्रेला भव्य करमणुकीचे कार्यक्रम आणन्याबाबत चर्चा व्हायच्या. गावच्या यात्रेची वर्गणी ठरायची.लोक यात्रेसाठी भरघोस देणग्या द्यायचे. मा.रघुवीर खेडकर, मा.पांडुरंग मुळे, मा.शंकरराव कोकाटे, मा.भिका भिमा, मा.गणपत व्ही.माने, मा.मालती इनामदार, मा.लता सुरेखा पुणेकर असे कितीतरी नामवंत तमाशे गावच्या यात्रेसाठी आणले गेले आहेत.यासाठी या पारावर यात्रेचे संपूर्ण नियोजन होत असे.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता भारूड किंवा तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम या पारावर व्हायचा.आहुप्याचा तमाशा, भिवेगावचा तमाशा,उगलेवाडीचा तमाशा, जावळेवाडी चा तमाशा व कितीतरी प्रसादिक भारूडांचे खेळ आम्ही बर्फाची गारीगार खात पहायचो.या पाराच्या परिसरात लोकांची तुफान गर्दी असायची.तमाशा किंवा भारूडांच्या हजेरीचा कार्यक्रम पहायला गावचे व पंचक्रोशीतील लोक तुफान गर्दी करायचे.लाल बर्फाची गारीगार खात कार्यक्रम पहायचा.ही मोठी वेगळीच मजा असायची.

रेवडया व लाल शेंगुळ्या, लाडु, भेळेची दुकाने, काचेच्या बांगडयांची दुकाने,कलिंगड,द्राक्षे ,विविध खेळण्यांची दुकाने यात्रेच्या दुसऱ्या दिवशी या परावरील गोठणीवर असायची.
      
यात्रेला आलेल्या पाहुण्या रावळ्यांना,बायाबापड्यांना व लहान मुलांना रेवड्या,खाऊ,खेळणी,बर्फाची गारेगार व बायकांना बांगडया भरण्यासाठी गोठणीवर खुप गर्दी व्हायची.अर्थात हे सर्व यात्रेच्या दुसऱ्या दिवशीचे चित्र असायाचं.

गोठनी वरील पारावरील वड आणि पिपरीची तांबडी व चाँकलेटी रंगाची गोड,तुरट फळे खाण्यासाठी गावातील आम्ही मुले दिवसभर पारावर असायचो. दिवसभर एकच गोंगाट व्हायचा.

गोठणीवरील पारावर दरवर्षी  घिसाडी यायचा.त्याचा मोठा लाकडी भाता लावायचा. गावातील व पंचक्रोशीतील शेतकरी नवीन कोयते,विळे,पहारी,खटारगाडीच्या लोखंडी धावा बनवून घेत.घिसाड्याचा मुक्काम आठ दिवस गोठणीवर असायचा.

गावातील कुणाचा बैल बडवायचा असेल तर  या गोठणीवर कै.किसन चांभार बैल बडवायचा. कुणाच्या बैलाच्या पायात काटा भरला असेल तर काटे काढायचा.त्यासाठी बरेच लोक त्यांना मदत करण्यासाठी जमत.

या गोठनीवरील पाराजवळ उन्हाळ्यात अनेक गाई, गुरे-वासरे वड व पिंपरीच्या झाडांच्या सावलीत बसायाची व रवंथ करायची.

गोठनीवरील मैदानात मुले सुट्टीत दिवसभर क्रिकेट खेळायची. व शेजारीच असलेल्या गाव डोहात पोहायचो.गावडोहात पोह ण्याची मजा वेगळीच होती.या गोठणीवर मी सायकल चालवायला शिकलो. कितीतरी वेळा पडलो.गुडघे,कोपर फुटले.परंतु सायकल चालवायला शिकलोच.

गावात लग्नाला आहेर व रूखवत घेऊन आलेल्या बायका या पारावर बसायच्या व गावात आल्याची वर्दी द्यायच्या.नंतर वाजंत्री गोठणीवर येऊन लग्नाचे आहेर वाजवत गाजवत लग्नमंडपा पर्यत घेऊन जात असत

या गोठणीवरून पुढे शिरगावला ओढ्यातुन जावे लागत असे.तेव्हा पुल नव्हता.दगडांचा आडवा बांध होता.व मध्ये एक मोठा दगडी चीरा होता. याला उतार म्हणत.चि-यावरून पाणी गेले तर कुणी पलीकडे जात नसत.

पावसाळ्यात रात्रीच्या वेळी या उतारावरून व गोठणीवरून जाताना खुप भिती वाटे.पाण्याचा खळखळ आवाज व रातकिड्यांची किरकिर अजुनच भेसुरता वाढवी. त्यातच समोर असलेल्या पारावरील वड व पिंपरीचे झाड पाहून खुपच भयानक वाटे.अंगावर काटा येई.परंतू दुसऱ्या दिवशी मात्र तेथून जाताना अजीबात भिती वाटत नसे.

भीमाशंकर रस्ता रिवायडींग  व उड्डाण पुल झाल्यावर गोठणीची बरीचशी जागा  गेली. आणि गोठणीचे अस्तित्व संपुष्टात आले.यात्रेचे व इतर सर्व कार्यक्रम जागे अभावी दुसरीकडे हलवले गेले.व गोठणी वरचे पुर्वीचे वैभव लयाला गेले 

 गोठणीचे अस्तित्व संपल्यावर नियतीला पारावरील झाडांचे अस्तित्व मान्य नव्हती किंवा काय म्हणून 2020 च्या वादळात शेवटची आठवण असणारी वड व पिपरीचे झाडेहीं मुळापासून कोसळली.एकेकाळचे गोठण आणि पार यांचे अस्तित्व काळाच्या ओघात लुप्त झाले.आणि मन सुन्न झाले.नकळत लहानपणापासून ते आतापर्यंतच्या या पारावरील व गोठणीवरील सर्व आठवणी तरळुन गेल्या आणि नकळत डोळे पानावले. कंठ दाटून आला.

बायको व मुले म्हाणाली पप्पा काय झाले तुम्हाला रडायला.?परंतू त्यांना यातलं काय कळनार? गावची शेवटची आठवण नष्ट झाली.कालाय तस्मैय नम: काळाचा महिमा दुसरं काय? 



धुओली गावचा कायापालट.

                     
धुओली गावचा कायापालट       
 
खेड तालुक्यातील पश्चिम भागात धुओली गाव छोटे असल्यामुळे शक्यतो मोठी यात्रा तेव्हा भरत नसे. परंतू दत्त जयंतीचा उत्सव मोठया उत्सहात पार पडायचा. सा-या भागाला या छोटया यात्रेचे आकर्षण असायचे. याचे प्रमुख कारण म्हणजे भागात यात्रेचा हंगाम साधारण मार्च नंतर असायचा.आणि दत्तजयंती डिसेंबर महिन्यात असायची.

धुओली गावातील कार्यकर्ते अत्यंत नेटकेपणाने कार्यक्रमाचे नियोजन करायचे. दत्तजयंती निमित्ताने दोन दिवस क्रिकेटच्या भव्य स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. रात्री मोठया भव्य  पडद्यावर मराठी चित्रपट असायचे. त्यामुळे या यात्रेचे आम्हाला प्रचंड आकर्षण आसायचे.

धुओली गावचे मुंबईकर पुणेकर व इतर ठिकाणी असलेले गावकरी झाडुन यात्रेनिमित्त हजर असायचे. गावात एक नवचैतन्य यायचे. क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक नामांकित संघ दाखल व्हायचे. गाव गर्दीने फुलुन जायचे. परंतु कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ भांडण तंटा न होता मोठ्या शांततेत क्रिकेटचे सामने रंगायचे.

दुस-या दिवशी सेमी फायनल व फायनलचे सामने व्हायचे. बक्षिसाची रक्कम अतिशय तुटपुंजी असायची.परतु बक्षिसाची पर्वा न करता गावाच्या नावाने खेळायचे व आलाच नंबर तर गावाचे नाव रोशन होइल.ह्या एकच विचारांनी प्रत्येकजण प्रेरित व्हायचा. 

तेव्हा स्वतापेक्षा गावाला जास्त किंमत होती.गावाभिमाण प्रत्येकाच्या नसानसात संचारलेला असायचा.आम्हीही मग टिमची जमवाजमव करायचो.परंतु अनेक नामांकित संघापुढे आमची डाळ शिजायची नाही.आम्ही नाराज व्हायचो,हाताश व्हायचो.परंतू  हे फक्त थोडावेळापुतं चित्र असायचं.नंतर काही वेळाने हारलेले संघ आमच्या सोबतीला यायचे आणि आमचे दुख: हालके व्हायचे.
संध्याकाळी गावात यात्रेच्या निमित्ताने पुरण पोळ्यांचे जेवण असायचे. मी माझा मित्र श्री सुनिल वाघमारे याचा मावसभाऊ श्री राजू जठार यांच्या घरी जेवायचो.तेथुनच एखादी गोधडी घेऊन मंदिराच्या पटांगणात जायचो. तेथे पटांगण गर्दीने खच्चून फुलून गेलेले असायचे.आम्ही पण जिथे जागा मिळेल तेथे बसायचो.

समोर एक भव्य असा पांढरा पडदा लावलेला असायचा.त्या समोरच २०-२५ फुटावर मशिन असायची त्या मशिनचा फ्लँश पडद्यावर पडायचा.व हळूहळू चित्र दिसायचे.

याच पटांगणात धुमधडाका,आली अंगावर,संत ज्ञानेश्वर ,संत सखू असे अनेक चित्रपट पाहिले आहेत. 

त्यानंतर धुओली गावच्या कार्यकर्त्यांनी नंतर चैत्र महिन्यात भैरवनाथाची यात्रा भरवण्याची धाडसी परंपरा सुरू केली.व पहिल्याच यात्रेला त्यांनी त्याकाळातील अत्यंत नामांकित असे कानसे माळवाडीचा भारूडाचा कार्यक्रम ठेवला.तेव्हा ते भारूड आंबेगाव व जुन्नर अत्यंत गाजलेले होते. त्यावेळी दुरदर्शनवर त्यांचा कार्यक्रम झाला होता.व हे भारूड प्रथमच खेड तालुक्यात धुओलीकरांनी आणले होते.
त्यामुळे पश्चिम भागातील संपुर्ण समाज धुओली मध्ये भारूड पाहण्यासाठी आपापल्या गोधड्या घेऊन हजर होता. प्रचंड गर्दीने पटांगण भरून गेले होते,दाटीवाटीने लोक बसले होते. धुओली गावात "न भुतो,न भविष्यती " असा समाज जमला होता. 
प्रचंड समाजापुढे गाव खुजा दिसत होता.प्रत्येक घरातील पुरणपोळ्या कधीच संपल्या होत्या.नंतर प्रत्येक घरातील गावकरी पाहुण्यांना नुसताच डाळभात वाढत  होते. 
 एव्हाना देवाच्या पालखीचा कार्यक्रम सुरू होऊन संपला देखील होता. परंतु भारुडाची गाडी अद्याप आलेली नव्हती.

भारूडाची गाडी यायला खुप उशिर झाला होता.तरीही समाज एकाजागी स्थीर होता. आणि एकदाचे भारूड आले. अर्ध्या तासात स्टेज उभा राहून भारूड सुरू झाले. अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी सादर केला. लोक भान हरपून भारुडाचा कार्यक्रम पाहू लागले. हास्याचे फवारे उडू लागले.

धुओली गावात पूर्वी खूप गट तट  होते.नंतर  खुप मोठी क्रांती झाली.गाव एकत्र आला.अनेक योजना राबवल्या . मंदिराचे काम सभामंडप व इतर कामे यात कै.श्री सुभाष जठार हवालदार साहेब यांचा सिंहाचा वाटा होता. गावक-यांनी त्यांच्या सन्मानार्थ त्यांची आठवण म्हणुन भव्य कमान बांधली आहे.

गावात श्री पांडुरंग जठार (मा.सरपंच ), श्री शरद जठार (उप सरपंच),सामाजीक कामाची आवड असणारे श्री संजय जठार उद्योजक, श्री हरिदास जठार,उद्योजक,श्री.भिमाजी जठार व इतर अशा अनेक तरूण कार्यकर्त्यांची फौज तयार झाली. श्री पोपट कोरडे यांचे गावासाठी सतत योगदान राहिले आहे.

पश्चिम भागातील एक आदर्श नेतृत्व म्हणून शरद जठार यांचा उल्लेख करावा लागेल. ते उपसरपंच असताना त्यांनी गावात अनेक विकासाची कामे खेचून आणली. विकासाच्या बाबतीत आज पश्चिम भागात गावाने आघाडी घेतली आहे ही नक्कीच समाधानाची बाब आहे.

धुओली इथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. अतिशय नेटका कार्यक्रम केला जातो. पुणे मुंबई राजगुरुनगर येथे असलेले सर्व लोक सप्ताहाच्या कार्यक्रमाला गावाला येतात. अतिशय आनंदाचे  व उत्साहाचे वातावरण असते.

धुओली गावच्या कै.सुभाष जठार व इतर कार्यकर्त्यांनी मंदोशी व शिरगावच्या ग्रामस्थांना एकत्र आणून सुळ्याच्या महादेवाच्या मंदिराचा जिर्णोद्धार केला. अतिशय उंच डोंगरावर असलेले हे मंदिर. या मंदिराचा कायापालट करण्याचे काम हे धुओली गावच्या कार्यकर्त्यांचे आहे.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुणे मुंबई चाकण खेड किंवा इतर बाहेरगावी राहणा-या धुओलीकरांचे गावावर प्रचंड प्रेम आहे.आणि ते असलेच पाहिजे. कारण काळाच्या ओघात गावाचे गावपण रितीभाती व जुन्या परंपरा टिकवून ठेवणे हे आपल्याच हातात आहे.




अघुट


                    अघुट

ग्रामिण भागात पुर्वी आणि आताही अघुट या शब्दाला फार महत्त्व आहे.अघुट म्हणजे काय याचे महत्त्व नविन पिढीला समजणे अत्यंत आवश्यक आहे.त्यामुळेच ग्रामिण भागातील संस्कृती तरूण पिढीला समजेल व त्याची माहिती होईल.

पुर्वी जुन महिन्याच्या पहिल्या आठवडयात आकाशात ढग जमायला लागायचे.तुरळक ठिकाणी विजा चमकायच्या सोसाटयाचा वारा वाहायचा व वळवाचा पाऊस पडायचा. आणि पावसाळ्याचे वेध लागायचे.

ग्रामिण भागातील  सर्व शेतकरी बांधवांची एकच धावपळ उडायची. अनेक कामे समोर "आ " वासुन उभी राहायची. सर्वजण अघुट आली आता सगळी कामे उरकली पाहिजेत या एकाच विचारांनी हबकुन जायची. सर्व बायका पोरं उन्हाळ्यात रानात साठवुन ठेवलेल्या सरपणाच्या मोळ्या आणल्या जायच्या.प्रत्येक सरपणाचे कोयत्याने छोटे छोटे तुकडे केले जायचे. त्याला फाटी म्हणतात.फाटयांचे प्रत्येकाच्या घरासमोर ढिग लागायचे. पाच सहा फाटी एकत्र केली जायची त्याला कवळी असे म्हणतात.

लहानमुले या सरपणाच्या कवळ्या घरात ओटीवर नेऊन ठेवायची .घराच्या माळ्यावर कुणितरी मोठं माणुस किंवा स्त्री असते. तिच्या हातात एकजण सरपण द्यायला असतात माळ्यावरील व्यक्ती अगदी व्यवस्थित माळ्यावर सरपण रचुन ठेवते.
याच पध्दतीने गुरांना खाण्यासाठीचा पेंढा ,वाळलेले गवत याला "पयान"असाही शब्द आहे.चुल पेटवण्यासाठी गव-या व डवणा यांची माळ्यावर साठवणूक केली जाते..गोव-या साठवताना अनेकांना विंचू चावायचे. एकच आरडाओरडा व्हायचा.विंचु उतारणाराकडे पेशंट नेला जायचा.व एका झटक्यात खांद्यापर्यंत गेलेला विंचुचे विष जीथे विंचु चावला आहे तीथे येऊन फुणफुण करायचा.

तसेच धावत पळत जाऊन इतर कामे केली जायची.कारण पाऊस कधी कोसळेल काहीच शाश्वती नसते..याच वेळी शेतात कोणते भात (तांदळाची साळ)पेरायची याचे नियोजन केले जाते.
भाताचे अनेक प्रकार असतात. उदा. खडक्या, कोळंबा, रायभोग, कमवत्या (कमोद) जीर ,तांबडा रायभोग,तामकुडा असे अनेक अस्सल भाताचे वाण त्यावेळी प्रसिद्ध होते.या पैकी जसा जमिनीचा पोत तसी वाणाची निवड केली जाते.आता या पैकी बरेच वाण काळाच्या ओघात इतिहास जमा झाले.

एखादा मुहूर्त पाहुन भाताची पेर केली जाते.यासाठी संपुर्ण गावात सकाळपासून एकच लगबग सुरू असते. शेतात शेताची भाजणी केलेल्या ठिकाणी त्याला दाढ म्हणतात.भात पेरले जाते.त्याला रोमठा म्हणतात.त्यावर कुळव फिरवला म्हणजे झाली पेरणी.

अशा प्रकारे शेतीची कामे झाल्यावर संसारपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी पुर्वी आठवडा बाजाराच्या ठिकाणी प्रचंड झुंबड उडायची शेतकरी आपल्याकडे असणारा वाळलेला हिरडा ,मध तांदुळ व खुरासणी विकुन पावसाळ्यात चार महिने पुरेल असे मीठ मिरची कांदा लसुण बाजरी तेल मुलांना शाळेचा गणवेश,दप्तर, छत्री व पाठ्यपुस्तके वह्या व घरातील मोठ्या मानसांना घोंगडयांची मोठया प्रमाणात खरेदी केली जायची.आजही काही प्रमाणात हे चालू आहे.
पुर्वी गावाकडे गवताची घरे असायची त्याला केंबळाची किंवा कुहीटीची घरे असे म्हणतात.गुरांना बांधन्यासाठी जी जागा असते त्याला सोपा किंवा पडाळ म्हणतात. तर ही घरे व पडाळी विशिष्ट लांब गवतांनी शेकारली जायची.

प्रत्येक गावात घरे शाकारणारे दोन तीन जण असायचे त्यांना त्या काळी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जायचा. तर या केंबळांची घरे किंवा पडाळी कितीही मोठा पाऊस झाला तरी अजिबात गळायची नाहीत हे विशेष होते.

पावसाळ्यात शेतीची कामे करताना भिजुन जाऊ नये म्हणुन गावातील कारागीराकडुन मेसाच्या बांबुपासुन व पळसाच्या पानापासुन सुंदर इरणे तयार करण्यासाठी त्याच्या जवळ गर्दी व्हायची. तो त्याचे काम सराइतपणे करायचा व बाकीचे  उगाचच गप्पा चघळत राहायाचे. 

गुरे संभाळणारे गुराखी पाऊसाने भिजू नये व थंडी वाजू नये म्हणुन घोगडी व प्ल्यँस्टिक कागद यांचा घोंगता करण्यासाठी लोखंडी व तो सुटुन जाऊ नये यासाठी जाड तार वापरतात त्याला "तीळस " असे म्हणतात.तर ही तीळस अतिशय नक्षीदार बनवुन घेण्यासाठी ज्याला ती बनवता येते त्याला मस्का लावावा लागे.असा तो काळ होता, 

उन्हाळ्यानंतर व पावसाळ्यापुर्वी म्हणजेच दिवसभर आकाशात ढग घोंगावतात.विजा चमकतात, ढग गडगडतात. काही ठिकाणी पाउस पडलेला असतो.काही ठिकाणी हिरवेगार गवत नुकतेच उगवत असते व शेतकरी माणसे व जनावरे यांच्या अन्न ,वस्र व निवा-याची पुढिल तीन चार महिन्यांची सोय करण्यासाठी जे या हंगामात कष्ट घेतो यालाच अघुट असे म्हणतात.


रात्री खेकडे पकडणे एक अनुभव

रात्री खेकडे पकडणे एक अनुभव 

पावसाळ्यात भात लावणी झाल्यावर व शेतीची इतर कामे झाल्यावर ब-याच लोकांना गुरे ढोरे सांभाळणे या व्यतीरिक्त काही काम नसते.पाऊसहीआळीपाळीने पडत असतो.रानात भरपुर हिरवेगार गवत उगवलेले असते.ओढे-नाले ओसांडुन वाहत असतात.सगळी कडेआबादी अबाद असते.हिरवागार निसर्ग, आणि शुभ्र फेसाळत कोसळणारे धबधबे मन प्रसन्न करत असतात. बऱ्यापैकी पावसाची उघडीप असते. मध्येच एखादी जोरदार पावसाची सर येते. ओढ्या नाल्यांना पूर काढते.आकाशात ढगामागून ढग पळू लागतात. ढगांची नुसतीच धावण्याची स्पर्धा चालू असते.आणि उन्हाची एक  तिरीप ढगांच्या गर्दीतून खाली जमिनीवरील हिरव्यागार गवतावर आणि पांढऱ्या शुभ्र झऱ्यावर,ओढ्या नाल्यावरील धावत्या पाण्यावर पडते.आणि हे निसर्गाचे मनमोहक रूप पाहून मन अगदी प्रसन्न होते.

श्रावण महिना
श्रावण भाद्रपदातील या ऊन पावसाच्या या खेळामुळे दूर क्षितिजावर सुंदर असे इंद्रधनु पडते.आणि आकाशातील ते इंद्रधनुचे रंग पाहून मन मोर पिसासारखे थुई थुई नाचत राहते.
रानात गाईगुरे चरत असतात. गुराखी दूर कुठेतरी आपली बासरी वाजवत असतो.बासरीचे ते सूर ( वाजवी पावा गोविंद ) मनाला एक वेगळीच मोहिनी घालतात.आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. या काव्यपंक्ती गुणगुणत मी आनंदाने निसर्गाच्या या अवनी वरून चालत राहतो.

भाद्रपद महिन्यात शेतकरी वर्गाला भरपूर निवांतवेळ असतो. पुर्वी ग्रामिण भागात रात्री जेवणही लवकरच होत असायचे. त्यावेळी बरीचशी लग्न न झालेली तरूण पोरं रात्री चावडीत , शाळेत,मंदिरात किंवा एखाद्याच्या प्रशस्त जागेत झोपायला असत.रात्री ही मंडळी बरीच उपद्व्यापी असायची.कुणाचा भुईमुग उपटुन आण,कुनाचा हरभरा तर कुनाचा वाटाना उपटुन त्याचा हुळा कर,असे उद्योग चालायचे.

एकदा असेच आम्ही तीन चार जण रात्रीचे जेवण करून चावडीत झोपायला आलो.पाऊसाची रिमझिम चालू होती. अचानक आमचा मारुती म्हणाला. खेकडे पकडायला जायचे का? ही कल्पना सर्वाना आवडली.लगेचच काशिनाथ जढर पलीत्यासाठी राँकेल (घासलेट) आणायला गेला.एका  मित्राने  लोखंडी तार व कापडाच्या सहाय्याने पलीता (हिरळा) तयार केला. तो पर्यंत दुसरा राँकेल घेऊनच आला. कुठल्या ओढ्याला जायचे हे नक्की  झाले.आणि एक रिकामे पोते घेऊन आम्ही खेकडे पकडण्याच्या स्वारीवर निघालो.

पावसाची रिपरिप चालुच होती.जवळपास अनेकांचे पलित्यांचे उजेड आम्हाला दिसत होते.याचा अर्थ आमच्या आधी ब-याच जणानी खेकडे पकडण्यासाठी जागा काबीज केल्या होत्या.आता काय  करायचे? चला झोपायला ? (एक नकारात्मक विचार) परंतू दुसरा मित्र प्रचंड आशावादी.(सकारात्मकता त्याच्या  मेंदुत ठासुन भरलेली.)
 हँ ..एवढे काय घाबरायचे त्यात? काही झाले तरी आपण खेकडं पकडणारच.
अरे पण कसं? सगळ्या ओढ्याला तर पलितेच पलिते आहेत? मग आपल्याला खेकडे कशी मिळणार?
तु फक्त पोते धरायचे काम कर!.पाहिली तुझी अक्कल अरे! आपण गावाबाहेर लांबच्या हद्दित जाणार आहोत.अमुक तमुक ठिकाणी .
अरे पण तिथे म्हणे भुतं असतात ना?
 तु कशाला घाबरतोस आम्ही भुताचे बाप आहोत.तु फक्त खेकडे पकडण्यासाठी पोते धरायचे काम कर.बाकी आम्ही पहातो..एकजण म्हणाला .
ओढा
असे म्हणुन आम्ही चोघे जण जिथे कोणी जात नाही अशा ठिकाणी गेलो.खेकडे पकडनारा जसा निष्णांत तसा पलीता पकडणारा पण निष्णांत लागतो.अर्थात पलिता पकडण्याचे काम माझ्याकडे होते. त्या काळ्याभिन्न रात्री पावसाच्या सरींचा आवाज ओढ्याच्या पाण्याचा विशिष्ट आवाज,बेडकांचे ओरडणे व रातकिड्यांची किरकिर या सगळ्यांच्या वेगळ्याच संगीतावर आमचे खेकडे पकडण्याचे काम चालू होते.दूरवरून भजनाचे सूर वाऱ्याच्या मंद झुळके प्रमाणे येत होते. मनाप्रमाणे खेकडे सापडतही होते.खेकडे पकडण्याच्या नादात आम्ही कधी दोन गावांच्या हद्दीतुनही पुढे गेलो हे कळलेच नाही. बराच उशिरही झाला होता.बरेच खेकडे पकडले होते.शेवटी आता खेकडे पकडणे बस्स,यावर एकमत झाले.

नंतर ओढा सोडुन आम्ही चांगल्या रस्त्याने चालू लागलो.आम्ही मोकळ्या माळरानावरून चालत होतो.थोड्या -थोडया वेळाने पावसाच्या सरी येत होत्या.व पाऊसाची सर आल्यावर माळरानावरील खेकडे आपल्या बिळातुन बाहेर येत होते. याला किरवा असे म्हणतात.पाण्यातील खेकडे वेगळे व माळरानावरील वेगळे असतात.माळावरील खेकडे पकडायची ट्यून पुढे आली.

आम्ही चाललो होतो तेथे रस्त्याजवळच एक घर होते.तेथील एक माणुस बाहेर आला.आमची विचारपुस केली.पाऊसाची एक जोरदार सर आली होती. त्यांनी घरात येण्याचा आग्रह केला. आम्ही त्यांच्या घरात गेलो. सदरची व्यक्ती  एक सेवानिवृत्त शिक्षक होती. ते प्रतिष्ठित होते.पंचक्रोशित त्यांचा दबदबा होता, शिवाय ते माळकरीही होते.आम्ही पावसाने भिजून गारठुन गेलो होतो. आम्हीही न संकोचता त्यांच्या घरात गेलो. त्यांनी आम्हाला चहा ठेवला. व तुम्ही हे जे खेकडे पकडता हे कसे चुक आहे. तुम्ही अध्यात्माची कास धरली पाहिजे.गळ्यात तुळशीच्या  माळा घातल्या पाहिजेत.यावर एक विशेष प्रवचन करून अनेक उपदेशांचे डोस आम्हाला पाजले.विशेषता मला तर खुपच धारेवर धरले. कारण त्या तिघांमध्ये मी एकटाच सुशिक्षित म्हणजे काँलेजला जाणारा मुलगा होतो. ते माझ्या विशेष परिचयाचे होते.

आम्ही मग निवांत चहा प्यायलो.खुप बरे वाटले.पुढील खेकडे पकडायचा प्लँन रद्द करण्याचा ठराव मी मांडला.पण तो तीन विरूद्ध एक मताने फेटाळला गेला.पोत्यात बरीच खेकडे जमा झाली होती.पोते जड झाले होते. पोते धरनारा कंटाळला होता.पोते त्या माणसाच्या घरातील ओटीवर ठेऊन दुस-या पिशवीत खेकडे पकडायाचा निर्णय झाला. 
पोते त्यांच्या ओटीवर ठेवले व आम्ही परत खेकडे पकडण्यासाठी माळावर गेलो. ब-याच वेळाने खेकडे पकडुन आल्यावर परत त्या घरात आलो. घरातील खेकडे ठेवलेल्या पोत्यातील बरीच खेकडे गायब झाली होती. मित्रांनी पुन्हा पुन्हा चाचपुन पाहिली. निश्चितच खेकडे खुपच कमी होती.घरातील प्रतिष्ठित मानसावर संशय घ्यायला मार्ग नव्हता.कारण मघाशीच त्याने आम्हाला जीवाची हत्या न करण्याबाबत उपदेशाचे डोस पाजले होते, पण त्याचा थोडासुध्दा परिनाम आमच्यावर झाला नव्हता. काय करायचे?

एवढ्यात मित्राने मार्ग काढला. सर्वांनी शांत रहा व खेकडांचा आवाज कुठून येतोय का ? याचा शोध घ्या..आणि काय अश्चर्य ! भांड्यांच्या मांडणीवरील एका मोठ्या पातेल्यातुन आम्हाला खेकडांचा आवाज आला...
अरे? ही खेकडे पातेल्यात गेली कशी?तात्काळ मित्राने पातेल्यातील खेकडे पुन्हा पोत्यात टाकली.तेव्हा ती घरातील व्यक्ती म्हणाली 
अरे पोरांनो.. मीच ठेवली होती खेकडे पातेल्यात, माझ्या नातावांसाठी.

अहो पण ! आम्हाला सांगायचेना ? आम्ही नसती का दिली.असे म्हणुन मित्रांनी पुन्हा थोडी खेकडे पातेल्यात टाकली.आणि यापुढे प्रवचन करू नका अशी एकाने हळूच तंबी दिली.आणि खेकडे घेऊन आम्ही घरी आलो. 

रामदास तळपे


भुते एक सत्य अनुभव

माझा मित्र काशिनाथ जढर एके दिवशी माझ्या कडे
आला व मला म्हणाला. रामदास आज रात्री माझ्या बरोबर झोपायला रानात आमच्या गोठ्यावर यावे लागेल मी विचारले का रे ? 
तो म्हणाला अरे दादा व वहिनी लग्नाला गेले आहेत. ते येनार नाहीत व गोठ्यावर गायी बैल व म्हशी आहेत.तेव्हा जावं लागेल.मी त्याला होकार दिला.
रात्री आम्ही दोघे रानातील गोठ्यावर झोपायला गेलो.रात्री तेथे शांत झोप लागली. सकाळी अगदी पहाटेच जाग आली.नंतर झोप काही येईना.

चला बाहेर लगवीला जाऊ असा विचार करून काशिनाथला उठवले.आम्ही बाहेर आलो. नुकतेच उजाडत होते. गार वारा सुटला होता.

आमच्या गोठ्याच्या पुढे एक मोठा कडयासारखा डोंगर होता. तेथुन गावात येण्यासाठी पाउलवाट होती. ती वाट वळणावळणाची होती.आम्ही तेथेच लगवीला उभे होतो. 

मी अचानक वर समोर असलेल्या कड्याकडे पाहिले. तेथील पाउलवाटेने एक नउवारी लुगडे नेसलेली व डोक्यावर गाठोडे असलेली बाई चालली होती. मी काशिनाथला दाखविले.
तो म्हणाला अरे! ही तर चिंधाबाई आहे. आमच्या गावातील एक बाई जवळच असलेल्या नायफड या गावात दिली होती.आम्हाला वाटले तिच आहे. 

काशिनाथ म्हणाला अरे ! ही इतक्या सकाळी कशाला आली असेल ? ही उठली असेल तरी कधी ? आणि निघाली असेल कधी ? कारण नायफड ते आमचे मंदोशी गाव सुमारे ५ कि.मी.असेल. 

शिवाय रानातून व डोंगरातून येणारी वाट.असे आम्ही बोलत होतो. चिंधाबाई वळणवळणाने असलेल्या पाउलवाटेने चालत होती. ती ज्या वळणावर आली,तेथे मोठे झाड होते.तेथे जवळच मोठा दगड होता.

आम्ही पहात असताना अचानक त्या झाडाचा कडकड आवाज झाला आणि झाड उन्मळून त्या बाईच्या अंगावर पडले. त्या बरोबर ते झाड व तो मोठा दगड खाली घरंगळत आला. एकच मोठा आवाज झाला. चिंधाबाईचे काय झाले असेल या विचारांनी आम्ही सुन्न झालो.

नंतर लगेचच गावात जाउन ही खबर लोकांना दिली.सर्व जण घटना घडली तेथे आलो.तर त्या ठिकाणी झाड, चिंधाबाई व दगड या पैकी काहीही दिसले नाही.लोकांनी आम्हांला वेडयात काढले. तुम्हाला भास झाला असेल असे म्हणून निघुन गेले.

परंतु एक कळले नाही.एकाच वेळी दोघांना कसा भास झाला. नव्हे ते भुतच होते याची पक्की खात्री झाली.

(विशेष म्हणजे चिंधाबाई अजुनही हयात आहे.) ..........सत्य घटना .दि.५/१२/१९९२.




गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस