पेटीमास्तर धर्माबुवा तळपे

धर्माबुवा तळपे म्हणजे जुन्या काळातील भजनसम्राट. जबरदस्त दैवी आवाज व तितकेच हार्मोनिअम ची मधुर सुरावट. धर्माबुवांना ओळखत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही.

धर्माबुवा तळपे हे माझे चुलत चुलते. त्यांचे वडील माझे चुलत अजोबा कै.बुधाजी तळपे हे एक अष्टपैलू,शांत व अतिशय संयमी आणि लोकांच्या मदतीला धाऊन जाणारं व्यक्तिमत्व होते. त्यांना धार्मिक कार्याची आवड होती.

श्रावण महिन्यात लोक नवनाथ, रामविजय, हरिविजय असे ग्रंथ (अध्याय) लावायचे. हे अध्याय प्राकृत भाषेत ओविबध्द असत. ह्या अध्यायांचे मराठीत अचूक वर्णन बुधाजी तळपे करायचे. 

शिवाय गावाच्या तमाशात काम करायचे. जाते,पाटे व वरवंटे टाकणे, घराची दगडी जोती घडवणे, सुतारकाम, वनदेवाची पूजाअर्चा अशी सर्व कामे करायचे. 

शिरगाव व मंदोशी गावाच्या खिंडीतील जानका देवीचे मंदिर हे बुधाजी व त्यांचे बंधू ठकू तळपे यांनी बांधले आहे. यावरून त्यांच्या कार्याची प्रचीती येते. 

त्यावेळी गावात एकविचार असायचा. सर्व गाव एकविचाराने रहायचा. सर्वजनिक निर्णय घेतले जायचे. 

त्यावेळी गावचा तमाशा होता. त्यात एक उणीव होती. तमाशात पेटी वाजावणारा कुणी नव्हता. जेष्ठ गाव कारभारी विष्णु हुरसळे यांनी गावाच्या वतीने बुधाजी तळपे यांना गळ घातली. 

बुधा तात्या तुझ्या मुलाला, धर्माला पेटी वाजायला शिकबू. पेटी शिकवायचा खर्च गाव करील. 

बुधा तळपे यांनी तात्काळ या गोष्टीला संमती दिली.अशा प्रकारे धर्माबुवांचा पेटी शिकण्याचा मार्ग मोकळा झाला.

खास पेटी शिकवण्यासाठी सावळा खांडी ता.मावळ येथून पेटीमास्तर बोलावला. वर्षभरात त्याने सुरावटीचे सर्व ज्ञान धर्माबुवानां दिले. पेटीमास्तरची एक वर्षांची फी गावाने वर्गणी काढून भरली. 

त्यावेळी पेटीमास्तरला खूप मानसन्मान व प्रतिष्ठा होती. पायपेटीची क्रेझ होती. सन 1974 साली गावाने वर्गणी काढून रुपये 5000/- जमवले. हे पैसे तमाशा सम्राट कै.शंकरराव कोकाटे यांना देऊन त्यांच्याकडून सेकंड हँड पायपेटी विकत घेतली. 

अप्रतिम सुरावट, पातळ किनार असलेला परंतु पहाडी आवाज यामुळे अल्पावधीत धर्माबुवांचे नाव सर्वत्र दुम्दुमु लागले. अतिशय स्वच्छ असे पांढरेशुभ्र धोतर, पैरण, टोपी व गळ्यात असलेली मफलर असा स्वच्छ व रुबाबदार वेशातील धर्माबुवा अजूनच भारदस्त वाटायचे. 

परंतु दुर्दैव असे की लवकरच तमाशा बंद पडला. पेटी वाजवणे आपसूक बंद पडले. अधून मधून कधीतरी पेटी उघडून साफ सूफ करुन भाता हालऊन काळ्या, पांढऱ्या सुरांची छेडछाड करायची.आणि पेटी ठेऊन द्यायची. एवढंच काम उरलं.

काही दिवसांनी पावसाळ्यातील दमट हवामना मूळे व पेटी न वाजावल्यामूळे पेटीमधील लाकूड फुगले. नंतर पेटीचा भाता कामातून गेला. 

प्रयत्न करूनही सुंदर सुरावट असलेली पायपेटी वाजेचना. शेवटी ही पायपेटी नामशेष झाली. याचे सर्वात जास्त दुःख धर्माबुवांना झाले. अनेक वेळा त्यांनी ही पायपेटी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना कधीच यश आले नाही. पायपेटी दुरुस्त करायला न्यावी तर येणारा खर्च कोण करणार?  गावानेही दुर्लक्ष केले.

गावात नेहमीच भजने होत. धर्माबुवा देखील भजनाला असत. परंतु पेटी नसल्यामूळे भजनला काही रंगत येत नसे. याची नेहमीच त्यांना हुरहूर वाटे. धर्माबुवांची ही खिन्नता त्यांचे जावई भिकाजी गवारी साहेब यांनी अचूक ओळखली. ते तेव्हा बारामतीला दुग्धविभागात नोकरी करत होते. त्यांनी तिकडून अतिशय सुंदर व कर्णमधुर अशी हार्मोनियम (पेटी) आणून त्यांच्या हवाली केली. 

ज्यावेळी ही पेटी वाजवायला सुरू केली तेव्हा मी स्वतः तेथे हजर होतो. अतिशय सुंदर सुरावट व त्यात धर्माबुवाचा गोड आवाज साखर जशी दुधात विरघळते तसा पेटीच्या सुरात एक झाला आणि ते संगीत ऐकून मी मंत्रमुग्ध झालो. 

गावात एक जुना तबला होता. मी त्याला नवीन पान बसवून दुरुस्त करून आणला. श्री.दिगाबर उगले यांच्याकडे डग्गा होताच. 

अल्पावधीत मंदोशी गावचे भजन उदयास आले. श्री.धर्मा तळपे (हार्मोनियम), श्री. दिगंबर उगले व कै.बाळू सुतार (तबला व डग्गा) कै.विष्णू पांडू तळपे (चकवा) कै.मारुती जढर (टाळ) श्री.देवराम कृष्णा तळपे (घुन्गुर काठी) हौसाबाई, देवईबाई, गंगूबाई तळपे या सर्वांच्या साथीने अल्पावधीत नामांकित भजन झाले.

हे भजन पुढे प्रचंड लोकप्रिय झाले. गणपती व नवरात्री आणि यात्रा सीझनमध्ये तर एवढी मागणी वाढली की हे भजन सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा तीनही शिफ्ट मध्ये चालू असायचे. या भजनाने गावचे नाव यशो शिखरावर नेले. 

याचवेळी मंदोशी शाळेचे भजन सुध्दा उदयास येत होते. तेथेही धर्माबुवांनी मुलांकडून सर्व तयारी करुन घेतली. व याच शाळेच्या भजनाचा तालुका व जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक आला. याचे संपूर्ण श्रेय धर्माबुवांना द्यावे लागेल. 

धर्माबुवांचे अलंका पुरी s s s पुण्य भूमी पवित्र.... 

ऐकून अंगावर रोमांच उभे राहत.

त्यांच्या भजनातील काही अभंग व गवळणी अजूनही मला जसेच्या तशा आठवतात.  

रूप पहाता लोचनी,

धरिला पंढरीचा चोर,

येइ शामसुंदरा 

पंढरीचा विट्ठल कुणी पहिला 

जय जय शंभू तू महादेवा 

हरी जय जय राम जय जय राम,

इंद्र पडली भगा, चंद्र झाला काळा,

पांडुरंग उभा वाळबंटी, 

नंदाच्या हरिने बाई रस्ता बंद केला,

डोळे मोडीत राधा चाले,

हरिचा चेंडू पाण्यात गेला कसा, 

कृष्णा मजकडे पाहू नको रे,

नको वाजवू श्रीहरी मुरली रे,

तुझ्या मुरलीने कौतुक केले,

गाया चरितो पेंद्या वनाला

असे कितीतरी अभंग व गवळणी धर्मा बुवानी आपल्या मधुर वाणीने व पेटीच्या अफलातून सुरावटीने अजरामर केले. आजही कधी या अभंग किंवा गौळणी आठवल्या की गुणगुणल्या शिवाय मन शांत होत नाही. ही केवळ धर्माबुवांची कृपाच म्हणावी लागेल. 

अशा या कलेच्या क्षेत्रात अजरामर ठसा उमटवलेल्या धर्मा बुवांचा गावाने यथोचित असा सत्कार करुन त्यांच्या कलेच्या ऋणातून मुक्त झाले पाहिजे. असे नेहमीच वाटते. 

आज धर्माबुवा वयोवृद्ध झाले आहेत. त्याना ऐकायला येत नाही.यात्रेला गावाने नामांकित भजन आणले होते. हे भजन संपे पर्यंत ऐकायला येत नसताना देखील धर्माबुवा तेथे बसून होते.या वरून त्यांची संगीत साधना कळून येते.

आंबेगाव, खेड व मावळ तालुक्यात जुने लोक त्याना पेटीमास्तर या नावानेच ओळखतात. अजूनही त्यांच्या भजनाचा विषय निघाला की लोक भरभरून बोलतात. त्यांचे कौतुक करतात. असा पेटीमास्तर पुन्हा होणार नाही असे बोलतात. 

त्यांच्याकडून मी व माझा चुलत भाऊ, त्यांचा मुलगा कै.मारुती आम्ही दोघांनी पेटी शिकण्याचा खुप प्रयत्न केला. परंतु त्यांच्या कडक स्वभावामूळे आम्हाला ते शक्य झाले नाही.

आता धर्माबुवांचे वय 83 च्या पुढे गेले आहे. त्यांना ऐकायला येत नाही. तरीही गावात यात्रेनिमित्त आम्ही नामांकित भजने आणतो, त्यावेळी धर्मबुवा हे ऐकायला येत नसूनही तेथे बसून असतात. यावरून त्यांची भजनावरील निष्ठा कळून येते.

रामदास तळपे

भाजीवाली ताई

भाजीवाल्या ताईशी माझी ओळख व्हायला

तसे दोनचार वर्षे सहज झाली असावीत. मी तीला ताई म्हणतो कारण ती मला पहील्यांदा भेटलो तेव्हा दादा म्हणाली.

बाजारात माझ्या मित्राचे दुकान आहे. त्या दुकानाच्या पायरीजवळ ती भाजी विकायला बसते. मी मित्राकडे दोन तीन दिवसाआड जायचो. 

रसरशीत हिरव्या भाज्या घेउन ही तिथे बसलेली. साहजिकच भाजी तिच्याकडून घेण्याची सवय लागली. नेहमीच्या ओळखीने एक नातेही निर्माण झाले. 

बारीक अंगकाठी, रापलेला चेहरा, पण नेहमी हसतमुख. प्रत्येक वाक्यात दादा म्हणायची सवय. 

नंतर मित्राने त्याच रोडवर थोडे पुढे  

दुकान घेतले पण जाण्यायेण्याचा रस्ता तोच राहीला. कधीतरी मित्राला भेटून रस्त्यावरून मोटरसायकलने घाईघाईने निघालो की ताईची हाक ठरलेली..

दादा...ओ..दादा आज भाजी नको का? 

मग मी निमुटपणे भाजी घ्यायला थांबतो.

बर दे अर्धा किलो. 

काय दादा अर्धा किलो भाजी पुरते तरी का घरात? एक किलो तरी घ्या.

ताई..चार जण तर आहेत. अर्धाकिलो पुरेल.

असू द्या दादा. एक किलो स्वस्त पडते म्हणून एक किलो घ्यायलाच लावते.

बर..भाजीचे भावही एकदम रास्त, आणि मोजणेही अघळपघळ.

एकदा तर अर्धा किलो कोबी घरी जाऊन बायकोला दिला तर ती म्हणाली कोणी दिला? पाऊण किलोच्या वरतीच आहे. दोनचार भाज्या एकदम घेतल्या तर पाच दहा रूपये स्वतःहून कमी घेणार. शिवाय निघतांना तिच्याजवळ असलेले मुठभर बोरे किंवा चारपाच आवळे पिशवीत टाकणार..

हे वैनीला द्या माझ्याकडून मला आश्चर्य वाटते एवढा दिलदारपणा एवढ्या गरीबीतही ही ठेवते कसा?

एकदा भरदुपारी तीन साडेतीन वाजता मी एस् टी स्टँडजवळ उभा होतो, तेवढ्यात डोक्यावर टोपली आणि हातात एक गोणपाटाची थैली (ज्यात तराजू व वजन असावेत) घेउन ताई चाललेली दिसली. 

मी हाक मारली.

ताई इकडे कुठे ?

दादा घरी चालले. वाडीत.

म्हणजे तू वाडीत राहते? आणि मग येते किती वाजता?

वेळ तर माहीत नाही दादा. पण सकाळी सकाळीच शेतात जाऊन भाजी आणते. मग जी एसटी मिळेल तिने इथे येते. भाजी संपत आली की पुन्हा घरी.

बापरे! मग स्वयंपाक कधी करते?

मीच करते ना दादा. दोन्ही येळा. सकाळी लवकर उठून भाजी भाकरी करते, मग शेतातून भाजी घेते. आता इथून घरी गेल्यावर पुन्हा स्वयंपाक. 

चला. येऊ मी?

मला काय वाटले कुणास ठाऊक. म्हटले थांब ताई. उन किती आहे. थंडगार उसाचा रस घे.

नको दादा. गाडी निघून जाईल.

काही निघणार नाही, ये.

म्हणून मी शेजारीच असलेल्या रसवंतीकडे निघालो 

तेवढयात तिने पुन्हा हाक मारली.

दादा?..

काय गं ताई?

रस महाग असतो. त्यापेक्षा चहाचं पिऊ.

काही फार फरक पडत नाही, आणि पैसे मी देतोय ना..

नको दादा. चहाच पिऊ.

बरं..चहा पिऊ..

आम्ही शेजारच्या हॉटेलमध्ये शिरलो. तिने हॉटेलच्या बाकावर टोपली पिशवी ठेवली. टोपलीत काही भाजी उरलेली असावी कारण त्यावर ओले गोणपाट पसरून ठेवलेले. तिने पदराने घाम पुसला आणि तिथल्या माठातले तांब्याभर पाणी एका दमात घटाघटा प्यायली.

मी चहावाल्याला म्हणालो, एक स्पेशल चहा दे.

दादा तुम्ही नाही घेत?

नाही. आत्ताच जेवण झाले.

असू द्या दादा. तुम्हीही घ्या. उन्हातान्हाचे फिरतात.

मी मनात म्हटले, तुझ्या कष्टापुढे माझे श्रम काहीच नाही.

चहा घेण्याची इच्छा नव्हती. पण तिचे मन मोडवेना. मीही चहा घेतला.

तिने अगदी शांतपणे चवीचवीने चहा घेतला. पुन्हा आपली टोपली उचलली. पुन्हा थांबली. टोपलीतून एक हातभर लांबीची काकडी काढली. 

मला देत म्हणाली घ्या दादा.

नको गं मला कशाला?"

असू द्या. उन्हाळ्याची चांगली असते. 

पोर आली असतील ना सुट्टीची घरी द्या त्यांना.

त्यापेक्षा तुझ्या मुलांना दे.

ते खातात. त्यांची फिकीर नाही. घ्या लवकर, माझी गाडी निघून जाईल.

मी नाईलाजाने काकडी घेतली. तिने टोपली डोक्यावर घेतली. पुन्हा तोंडावरचा घाम पुसला. 

येते दादा. म्हणत निघाली.

मी हातातल्या काकडीकडे आणि लगबगीने जाणाऱ्या तिच्या कृश कायेकडे बघत राहीलो. 

गरीबीतही आनंदी राहणारे आणि उदार असणारे लोक आपल्याला बरेच शिकवून जातात...

रामदास तळपे 

माणुसकीचा झरा दत्ता आंबेकर

मंदोशी गावचे दत्ता आंबेकर हे नोकरीच्या निमित्ताने मुंबईला आले. परंतु गावासाठी काहीतरी केले पाहिजे उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती मुंबईला असूनही गावाच्या ओढीने सतत त्यांचे गावाला जाणे येणे होते. डोक्यात सतत विचार चक्र फिरत होते. गावासाठी काहीतरी भव्य दिव्य करायचे. 

वाडीत देवी आईचे खूप जागृत असे देवस्थान आहे. हे देवस्थान मंदोशी हुरसाळेवाडी टोकावडे रस्त्यावर हुरसाळेवाडी जवळ रस्त्याच्या बाजूला पिंपरीच्या झाडाखाली होते. तेथे फक्त देवी होती. परंतु मंदिर नव्हते.

पूर्वी गावात अनेक साथीचे रोग यायचे. लहान मुले आजारी पडायची. त्यावेळी लोक या देवीला नवस करायचे. सबंध गाव वर्षातून एकदा या देवीचा उत्सव साजरा करायचे. सबंध गावातील स्त्री पुरुष लहान मुले या उत्सवात सहभागी व्हायचे. मोठा कार्यक्रम व्हायचा. त्यानिमित्ताने लोक एकत्र यायचे. हुरसाळे वस्तीला यात्रेचे स्वरूप यायचे. 

देआई:

त्यानिमित्ताने लोकांच्या भेटीगाठी व्हायच्या. लोक चार सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांना सांगून दुःख हलके करायचे. एकमेकांना मदत व्हायची. 

परंतु पुढे काळ बदलला. साथीचे आजार कमी झाले. लोक देवीकडे यायचे कमी झाले. गावाने ही नंतर देवीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. 

अचानक दत्ता आंबेकर यांच्या मनात विचार आला. देवीला मागचे गत वैभव दोन दिले तर? त्या निमित्ताने लोक पुन्हा एकत्र येतील. एक दिवसाचे का होईना वाडीला यात्रेचे स्वरूप येईल. वाडी लोकांच्या आगमनाने गजबज होऊन जाईल. यासाठी काय केले पाहिजे? वेगाने विचारचक्र फिरू लागले. 

त्यांच्या मनात विचार आला. हे आपले एकट्याचे काम नाही. यासाठी अजून काही लोकांची मदत मिळाली तर आणि तरच हे काम तडीस जाईल. चांगल्या कामाला सुरुवात केली तर लगेच केली पाहिजे. नाहीतर उगाचच फाटे फुटत राहतात असा विचार करून त्यांनी लगेचच त्यांची कल्पना त्यांचे बालमित्र श्री भगवान हुरसाळे यांना बोलवून दाखवली. त्यांना ही कल्पना फारच आवडली. 

त्यानंतर त्यांनी वस्तीतील नामांकित पहिलवान श्री अंकुश हुरसाळे यांना ही कल्पना सांगितली. विचारविनिमय झाला. यासाठी पिंपरीच्या झाडाखाली असलेले देवी आईच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला तर? 

मंदिर बांधायचे म्हणजे सोपे काम नाही. पैशाचा प्रश्न तर होताच परंतु गावातील लोकांमध्ये त्यावेळेस मोठ्या प्रमाणात हेवेदावे होते. त्यांची परवानगी आवश्यक होती. चांगल्या कामाला विरोध करणारी माणसे गावात खूप असायची. 

त्याचप्रमाणे देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा म्हणजे त्यासाठी ग्रामदैवत काळभैरवनाथ देवाचा कौल घेणे आवश्यक होते. लोक एकत्र करायची होती. अशी अनेक आव्हाने त्यांच्या समोर उभी होती. 

यासाठी त्यांनी वस्तीतील सर्व तरुण एकत्र केले. मीटिंग आयोजित केली. मीटिंगमध्ये हा विषय चर्चेला आला. विशेष म्हणजे सर्व तरुण मित्रांनी यासाठी होकार दर्शविला. 

दत्ता आंबेकर म्हणाले 

मित्रांनो ! हे काम करायचे असेल तर आपापसातील हेवेदावे, भांडण तंटे याला लगाम लावावा लागेल. 

कोणत्याही मोठेपणासाठी काम न करता एक दिलाने काम केले पुढे नेता येईल. आपण सर्व आपल्या आई वडिलांना सांगायला पाहिजे. वस्तीमध्ये एक भव्य चांगले काम आम्ही करायला घेतले आहे. यासाठी जेणेकरून मंदिर बांधकामास खीळ बसेल असे होता कामा नये. 

सर्वांना हा विचार पटला. आणि सर्वजण पुढील कामासाठी लागले. 

गावातील देवादिकाची जाण असलेले व्यक्तिमत्व म्हणजे गोविंदराव हुरसाळे. त्यांच्याकडे सर्वजण गेले. 

देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. यासाठी पुढे काय करावे लागेल हे त्यांना विचारले. 

त्यांनी सांगितले. आपले ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थान यांस कडे कौल लावावा लागेल. देवाने कौल दिला तर  आपल्याला करता येईल अन्यथा नाही. 

देवाने जर कौल नाही दिला तर? ही भीती मनात आली. तरीही गोविंदराव हुरसाळे यांना घेऊन दत्ता आंबेकर व अजून एक दोन जण एका रविवारी काळभैरवनाथ मंदिराकडे गेले. पुजाऱ्याने देवाला कौल लावला आणि आश्चर्य म्हणजे मंदिर जीर्णोद्धार करायचा कौल मिळाला. 

सर्वांना खूप आनंद झाला. मंदिराचे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पुढचे आव्हान होते. गावकऱ्यांची संमती यासाठी गावात मीटिंग घेतली. सबंध गाववाडे वस्तीतील लोक मिटींगला उपस्थित होते. देआई मंदिर जिर्णोदराचा दत्ता आंबेकर विषय मांडला. अनेक चर्चा झाल्या. काही लोकांनी या कामासाठी खुप विरोध केला. 

तर काही लोकांनी तरुण पोरं करतात ही अतिशय चांगली बाब आहे. असा निष्कर्ष नोंदवला. काहीही झाले आणि कितीही विरोध झाला तरी मंदिर बांधायचे. कारण देवाने कौल दिला होता. तेव्हा मागे हटून चालणार नव्हते. 

परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मंदिर बांधकामासाठी लागणारा पैसा. आमच्याकडे तर साधे शंभर रुपये सुद्धा नव्हते. आणि आम्ही मंदिर बांधकाम करायला निघालो होतो. आजही विचार केला तर हे आठवून अंगावर रोमांच उभे राहतात. 

मंदिर बांधकामासाठी त्यांनी वाडीत मिटींग घेऊन प्रत्येक तरुणामागे दरमहा रुपये दहा वर्गणी ठरवली. दर महिन्याला दहा रुपये वर्गणी जमा व्हायची.

मंदिर बांधकामासाठी वस्तीतील प्रत्येक घरटी वर्गणी जमा केली. 

हातात पैसा आला. दत्ता आंबेकर, अंकुश हुरसाळे,व श्री भगवान हुरसाळे यांनी सुट्टीच्या दिवशी मंदिर कसे बांधायचे. यासाठी मुंबईतील छोटी छोटी मंदिरे पाहून घेतली. बरेच दिवसानंतर त्यांना हवे तसे मंदिर मिळाले. 

लगेच दत्ता आंबेकर गावाला आले. वस्तीतील लोकांची मीटिंग घेतली. आणि मंदिर बांधकाम करण्यासाठी कारागिराची चाचपणी केली. 

नंतर असे लक्षात आले की आपल्याच गावातील श्री दूंदाजी बांगर यांना काम दिले तर? त्यांनी मंदिराची यापूर्वी कामे केली होती. लगेचच त्यांना बोलवून घेतले. आणि त्यांना मंदिराचे काम देण्यात आले. 

सर्व विधिवत पूजा करून मंदिर बांध कामासाठी सुरुवात झाली. दर आठवड्या ला सुट्टीच्या दिवशी मुंबईवरून येऊन मंदिरासाठी काय हवे काय नको ते पाहू लागले. अल्पावधीतच सुंदर असे देखणे छोटे खाणी मंदिर पाहून सर्वाना विशेष आनंद झाला.

वस्तीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सर्व तरुणांचा उत्साह द्विगुणीत होत होता. विरोध करणारे लोकही आता सहभागी होऊन खांद्याला खांदा लावून काम करत होते. 

वस्तीतील रुसवे फुगवे, किरकोळ भांडणे कधीच बंद पडली होती. त्याचेही समाधान वाटत होते. शेवटी एकदा मंदिर तयार झाल्यावर जीर्णोद्धाराचा छानसा कार्यक्रम करावा असे ठरले. 

सर्वजण कामाला लागले. पहिल्याच वर्षी मंदिराचा जीर्णोद्धार व महापूजा ठेवण्यात आली. 

सन 2010 साली अनेक तरुण कार्यकर्ते यांना येऊन मिळाले. आणि आपण अजून काहीतरी भव्यदिव्य केले पाहिजे असा विचार पुढे आला. 

यासाठी अधिकृत असे मंडळ रजिस्टर करणे आवश्यक आहे. अशी भूमिका काही लोकांनी मांडली. 

आणि अल्पवधीत देआई प्रतिष्ठान मंडळाची स्थापना झाली. शासन दरबारी त्यांचे रजिस्ट्रेशन झाले. सर्व तरुण मंडळांनी दत्ता आंबेकर यांची अध्यक्ष पदावर बिनविरोध निवड केली. अशाप्रकारे सामाजिक कार्य करण्यास एक प्रकारे चालना मिळाली. 

सन 2013 साली देवीचा भव्य दिव्य कार्यक्रम करायचा असे सर्वानुमते ठरले. यासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या जमा झाल्या. 

गावच्या यात्रेच्या धरतीवर कार्यक्रम करण्याचे निश्चित झाले. अनेक तरुणांच्या संकल्पनेतून देवीस हारतुरे, मोफत सर्व रोग निदान, मोफत चष्मे वाटप शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शब्दकोश वाटप, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम इत्यादींचे आयोजन करण्याचे एकमताने ठरले. 

असा भव्य दिव्य कार्यक्रम यापूर्वी कधी झाला नव्हता. या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची कसरत सर्वांना करायला लागणार होती. 

श्री बंडूशेठ सिताराम हुरसाळे यांनी महाप्रसादाची जबाबदारी उचलली. श्री एकनाथ आंबेकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना शब्दकोश वाटप करण्याची जबाबदारी उचलली. थोडाफार भार हलका झाला. श्री गणेश हुरसाळे सर, श्री अंकुश हुरसाळे श्री भगवान हुरसाळे आणि दत्ता आंबेकर यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी उचलली. 

मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2013 रोजी भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

गावातील विघ्नसंतोषी लोकांनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला. गावात चुकीच्या पद्धतीने प्रचार केला. मंडळातील काही मुलांना चुकीच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु एकानेही दाद दिली नाही. एकी भक्कमपनाने उभी राहिली. 

मोठ्या प्रमाणात लोक कार्यक्रमासाठी हजर होते. "न भूतो न भविष्यती" अशी लोकांची गर्दी झाली. उत्तम प्रकारे कार्यक्रम यशस्वी झाला. नवा हुरूप आला. 

त्यानंतर भविष्यात मंडळाने विविध प्रकारे सामाजिक कामे कार्यक्रमाच्या माध्यमातून हाती घेतली. 

मोफत रोग निदान, मोफत फळझाडांचे वाटप, मोफत चष्मे वाटप, शालेय विद्यार्थ्यांसाठी संगणकाचे वाटप, 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी गावातील सर्व शाळेतील मुलांना खाऊचे वाटप, मोफत वह्या व गणवेश वाटप, किर्तन, प्रवचन व भजनांचे आयोजन केले गेले. 

सन 1998 पासून आज अखेर पर्यंत त्यांचे हे काम अविरतपणे चालू आहे.

वाडीतील लग्नकार्य, पूजा व इतर धार्मिक कार्यक्रमासाठी अन्नदानाचे कार्य केले जाते. यासाठी वस्तीमध्ये भांडी नव्हती. इकडून तिकडून कार्यक्रमासाठी भांडी गोळा करावी लागायची. हे त्यांच्या लक्षात आल्यावर वस्तीसाठी सर्व प्रकारचे भांडी विकत घ्यायचे असे ठरले. 

मुंबईमधील भांड्यांची विविध दुकाने श्री मनीष हुरसाळे आणि दत्ता आंबेकर यांनी पायाखाली घातली. आणि एक दिवस जेवणासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी विकत घेतली. 

दत्ता आंबेकर हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढे आहेत. गावातील किंवा भागातील अनेक लोकांचे सुखदुःखासाठी ते सतत धावून येतात.

दत्ता आंबेकर हे माझ्यापेक्षा तीन-चार वर्ष वयाने मोठे.

त्यावेळी डेहणे येथे शालेय मुलांच्या बीट पातळीवर स्पर्धा होत्या. पश्चिम भागातील सर्व विद्यार्थी डेहणे येथे क्रीडा स्पर्धांना गेले होते. त्यामध्ये मी पण होतो.

क्रीडा स्पर्धा संपल्यावर घरी येताना रस्त्यामध्ये मी पडलो. माझ्या पायाला बरेच खरचटले होते, थोडेफार रक्तही येत होते. त्यावेळी साधारण मी दुसरीला असेल.

दत्ता आंबेकर यांनी मला वांजळ्यापासून मंदोशी पर्यंत उचलून आणले होते. इतका हा प्रेमळ माणूस. लहानपणापासूनच त्यांच्या अंगी सामाजिक बांधिलकी, प्रेम, जिव्हाळा,आपुलकी इत्यादी गुण असल्यामुळे मुंबईसारख्या मायावी नगरीत ते तरुण गेले.

मुंबईसारख्या नगरीत सुरुवातीला त्यांनी अनेक छोटी मोठी कामे केली. ही कामे करूनही कपडे घेण्यासाठी ही त्यांच्याकडे पैसे नसत.

परंतु परमेश्वर कृपेमुळे त्यांना भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये नोकरी मिळाली आणि त्यांच्या आयुष्याचे सोने झाले.

एकदा आम्ही गावकरी आमच्या गावच्या मंदिराच्या जिर्णोदरासाठी देणग्या गोळा करण्यासाठी मुंबईला गेलो होतो. तेथे सर्वांची श्रेयस गार्डनमध्ये मीटिंग झाली.

मीटिंग साधारण सायंकाळी सात वाजता संपली. त्यानंतर सर्व ग्रामस्थांना दत्ता आंबेकर यांच्या घरी जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

तेथे जेवायला बसल्यावर त्यांच्या पत्नीने मला म्हटले.

रामदास ! अरे, कसं काय बरा आहेस ना? असे विचारले. 

दत्ता आंबेकर व  माझ्यासकट जेवायला बसलेले सर्व आश्चर्यचकित झाले. कारण मी पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेलो होतो. ओळख पण नव्हती.

परंतु त्यांच्या पत्नीने नंतर खुलासा केला. की शाळेमध्ये आम्ही एकाच वर्गात होतो. नंतर लक्षात आले की आम्ही पाचवी ते सातवी पर्यंत एकाच वर्गात होतो. आणि योगायोगाने त्या आमच्या पत्नीच्या नातेवाईकही लागत होत्या.

तर... असे हे दत्ता आंबेकर यांचे कुटुंब. सामाजिक बांधिलकी जपणारे..

लेखक:- रामदास तळपे 


पैलवान हरिभाऊ


सन 1985 साली कुस्ती क्षेत्राची जाणकार व नामांकित मल्ल श्री. जयराम आंबेकर गुरुजी यांनी हुरसाळेवाडी येथे छोटी तालीमच उघडली होती. रोज संध्याकाळी ते स्वतः हुसळेवाडी येथील तरुणांना कुस्तीचे धडे देऊ लागले. त्यामुळे सहजिकच तरुणांना कुस्त्यांचे आकर्षण वाटू लागले. 

रोज संध्याकाळी कुस्त्यांची खडाखडी झडू लागली. वेगवेगळे डाव,प्रति डाव आंबेकर गुरुजी शिकवू लागले. आणि याचाच परिणाम श्री कुशाबा आंबेकर,कै.शंकर हुरसाळे ड्रायव्हर,श्री हरिभाऊ हुरसाळे असे नामांकित मल्ल तयार झाले. त्यांनी एकेकाळी मंदोषी गावचे नाव तीनही तालुक्यात पोहचवले.

कुशाबा आंबेकर यांच्या कुस्तीच्या काळात मी खूप लहान असल्यामुळे असे काही आठवत नाही. परंतु हरिभाऊ हुरसाळे यांची कुस्ती मी अगदी सुरुवातीपासून ते शेवटच्या काळापर्यंत पाहिली.

सन 1985 ते सन 1992 दरम्यान कुस्तीच्या क्षेत्रात मंदोशी गावचे नाव गाजवले ते खऱ्या अर्थाने श्री हरिभाऊ हुरसाळे यांनी.

घरची अतिशय साधारण परिस्थिती.चटणी भाकरी,वरण-भात असा त्यावेळी हरिभाऊ चा आहार असायचा.

ओढ्यावर आंघोळ करायची.तेथेच जोर बैठका काढायच्या. शेतातील मांडवात झोपायचे.शेतीची कामे करायची. संध्याकाळी एकर गुरुजींच्या तालमीत डाव प्रतिडाव विकायचे.कोणताही वेगळा खुराक हरिभाऊ ला कधीच मिळाला नाही.

सन 1985 साली रेवड्यावर कुस्त्यांची सुरुवात करणारे श्री हरिभाऊ हा हा म्हणता नामांकित मल्ल म्हणून उदयास येऊ लागला.

हरिभाऊ कडे अनेक वेगवेगळे डाव होते. एकदा शेंदुर्लीच्या आखाड्यात कुस्त्यांची जोरदार रणधुमाळी चालू होती. आखाडा मद्यापर्यंतही गेला नव्हता.हरिभाऊला वीस रुपयावर धरण्यात आले. आणि लागलीच आंबोलीचा एक पैलवान हरिभाऊ वर उठून आला. या पैलवानाने आंबोलीच्या आखाड्यात त्या काळात पाच हजार रुपयांची कुस्ती निकाली केली होती. हे हरिभाऊला माहित होते. 

हरिभाऊ त्याला म्हटला सुद्धा. 

अरे बाबा, तू पाच हजार रुपयाची निकाली कुस्ती केली आहे. आणि खुशाल वीस रुपयांवर उठून आला आहेस. कशाला खेळतोस उगाच?

हे ऐकून त्या पैलवानाला चेव आला. तो म्हटला खेळायची आहे का बोल.? 

हे ऐकून हरिभाऊ निरुत्तर झाला. शेवटी एकदाची कुस्ती लागली.

दोन्ही पैलवान आखाड्यात आले. देवाचे नाव घेऊन एकमेकांच्या हातात धूळ माती दिली. आणि खडाखडी ला सुरुवात झाली. आणि काय आश्चर्य.अर्ध्या मिनिटाच्या आत. हरिभाऊ ने गोफण मीठी घातली आणि लांग मारून दार मागे ढकलतात तसे आंबोलीच्या पैलवानाला ढकलले. एखादे धूड पैलवान आखाड्याच्या मैदानातील धुळीत धाडकन कोसळला. त्याला काही कळले सुद्धा नाही. आपण कसा पडलो.

क्षणार्धात प्रेक्षकांकडून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. म दोशीचे लोक नाचू लागले. बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पडला. वीस रुपयाच्या कुस्तीवर त्यावेळी हरिभाऊला नऊशे रुपये बक्षीस मिळाले होते. 

हरिभाऊ हा मोठ्या मनाचा माणूस. हा त्या पडलेल्या पैलवानाजवळ जवळ गेला आणि त्याला म्हणाला. अरे बाबा मला तुझ्याशी कुस्ती खेळायची का नव्हती तर तू आंबोलीच्या आखाड्यात पाच हजार रुपयाची कुस्ती केली होती. किरकोळ 20 रुपयावर तू उठून आला होता. हे तुला शोभते का. तो पैलवान म्हणाला. मी कुस्ती खेळायला तयार नव्हतो. बाकीच्या मित्रांनी भारीस घातले. आणि सगळी इज्जत घालून बसलो. पुढे हरिभाऊ या पैलवानाच्या लग्नाला देखील गेला होता.

पुढे हरिभाऊ चे नाव खेड,आंबेगाव,मावळ या तीन ही तालुक्यात दुमदुमू लागले. शेवटची मानाची कुस्ती हे हरिभाऊ वर होऊ लागली.

एकदा शंकर ड्रायव्हर, हरिभाऊ, महादू मोहन व सुरेश आंबेकर हे अगदी सकाळीच बोरघरच्या ता. आंबेगाव आखाड्यासाठी पायी पायी निघाले. दहा वाजता निघालेले हेगडी दुपारी एक वाजता बोरकर ला पोहोचते. शंकर ड्रायव्हरच्या ओळखी होत्या. त्यामुळे तेथे चहापाणी झाला. गप्पा टप्पा झाल्या.

दुपारी आखाड्यास सुरुवात झाली. आखाडा अगदी भरात येऊ लागला. हळूहळू आखाड्याला रंग चढू लागला. त्या भागात हरिभाऊ सारखाच एक नामांकित पैलवान होता. कोकणेवाडी हे त्याचे गाव. हा पैलवान तिकडच्या भागातील सगळ्यांचा लाडका होता. 

आणि अशा या परिस्थितीत हरिभाऊ या पैलवानावर उठून गेला. एकदाची कुस्ती जाहीर झाली. हरिभाऊ कपडे बदलण्यासाठी परत आला. दोन-तीन जण हरिभाऊ ला म्हणाले. कशाला गेला मारायला. बरगड्या मोडून घ्यायच्या आहेत का ?

हरिभाऊ ने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. एकदाचा जंग चढवला. काळभैरवनाथाचे नाव घेतले. आणि कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात सज्ज झाला.

समोरचा पहिला पैलवान ही तितक्याच ताकदीचा होता. सुरुवातीला खूपच खडाखडी झाली.एकमेकाच्या ताकदीचा अंदाज पाहण्यातच दोन मिनिटे गेली. त्यानंतर डाव प्रति डाव होऊ लागले. हरिभाऊ ने सर्व डाव वापरून पाहिले. परंतु यश काही येईना. 

समोरच्या पैलवानाने ही त्याच्याकडचे डाव वापरून पाहिले. तोडिस होऊ लागली. याने डाव काढायचा. आणि त्याने तो डाव फोडायचा. त्याने डाव काढायचा आणि याने डाव तोडायचा. 

आखाड्यात भयान शांतता पसरली होती. लोक कौतुकाने अशी ही नामांकित कुस्ती पाहत होते कुस्ती सोडवायची देखील गावच्या पंचांना आठवण झाली नाही. एवढी ही कुस्ती प्रेक्षणीय आणि रंगतदार होत चालली होती.

आणि अशातच हरिभाऊ ने समोरच्या पैलवानाच्या डाव्या पायाच्या कवळ्याला हात घातला व वर ओढला. आणि दुसऱ्या पायाने त्या पैलवानाच्या उजव्या पायाला टाप मारली. आणि हा हा म्हणता समोरचा पैलवान धाडकन उताणा झाला. हरिभाऊ ने समोरच्या पैलवानाला दिवसा चांदण्या मोजायला लावल्या.

आखाड्यात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. हरिभाऊ त्या तालुक्यात अगदी नवखा पहिल्यांदाच कुस्ती खेळण्यासाठी गेला असतानाही आंबेगावकरांनी अकराशे रुपयांची बक्षिसांची खैरात हरिभाऊ वर केली होती.

अनेक गावच्या आखाड्यातून हरिभाऊने चांदीच्या ढाली, चांदीच्या अंगठ्या, कोंबडे, बकरे,घड्याळ, स्वयंपाकाची भांडी रोख बक्षिसे, रोख इनाम अशी कितीतरी बक्षिसे मिळवली होती.

एकदा तर हरिभाऊ ने कमालच केली. राजपूरच्या आखाड्यात हरिभाऊने नऊ मनगटी घड्याळे एकाच वेळी जिंकली होती.

एकदा असेच हरिभाऊ, महादू मोहन व सुरेश आंबेकर हे आंबेगाव तालुक्यातील राजेवाडीच्या आखाड्यासाठी गेले होते. त्यावेळी हरिभाऊ ला 8 9 भांडी मिळाली होती. आखाडा फुटल्यावर हे सर्वजण डागोबाच्या मंदिरा कडून मंदोशी कडे रानातून खाली चालले होते.

जांभूळ दरडीच्या वर त्यांच्या मागे भूत लागले. सुरेश आंबेकर च्या डोक्यावर भांडी होती. तिघेही जण अक्षरशा पळत होते. एक मोठा दगड हरिभाऊ च्या दिशेने खाली आला. हरिभाऊला वाटले आता आपण या दगडाखाली जाणार परंतु काय आश्चर्य. हा दगड हरिभाऊ जवळ येऊन थांबला. अशा परिस्थितीत ते दम टाकायला. 

श्री विष्णू रोकडे यांच्या घराजवळ आले. विष्णू रोकडे हे नुकतेच जेवण करून बसले होते. त्यांनी या सर्वांची अस्थेने चौकशी केली. सर्वांना पिण्यासाठी पाणी दिले. हरिभाऊने त्यांच्या घरातील सर्वांना रेवड्या दिल्या. आणि पुढे घरी आले.

हरिभाऊ च्या घराचे काम चालू होते. सुतारांनी दगड फोडायचे काम हाती घेतले होते. त्यादिवशी घोटवडीचा आखाडा होता. हरिभाऊ ला सुद्धा घोटवडीच्या आखाड्यासाठी जायचे होते. परंतु सुतार काही जाऊ देत नव्हते. त्यांचे एकच म्हणणं हा दगड फोडल्याशिवाय जायचं नाही. 

शेवटी एकदाचा दगड फोडला गेला. त्यावेळी मंदोशीतच एक वाजले होते. आखाडा हाती लागतो की नाही. हे शंका हरिभाऊ ला भेडसावत होती. अगदी पळतच हरिभाऊ घोटवडीच्या आखाड्यासाठी निघाला होता. 

पायी प्रवास करून अडीच वाजता हरिभाऊ घोटवडीला पोहोचला. तोपर्यंत महादू मोहन, सुरेश आंबेकर हे आधीच पोचले होते. कुस्त्यांचे इनाम वीस रुपयांवर गेले होते.

हळूहळू आखाड्याला रंग चढू लागला. आणि अखेर धंद्रीबुवानी एकदाची हरिभाऊ ची कुस्ती लावली. समोरचा पैलवान हा शंकर ड्रायव्हरचा होणारा साडू होता. हे हरिभाऊला माहीतच नव्हते. म्हणजेच साडू साडू मध्ये कुस्ती लागली होती. समोरचा पहिला नाही अगदीच नवखा नव्हता. 

परंतु हाताला हात भिडवल्याबरोबर अगदी दहा सेकंदातच हरिभाऊ ने समोरच्या पैलवानावर पट भरला. आणि असा काही पैलवानाला उचलून खाली टाकला की त्या धुराळ्यातच पैलवान कुठल्या कुठे हरवला. आखाड्यात नुसताच धुराळा दिसू लागला. अरे खाली पडलेला पैलवान कुठाय? 

लोक बोलू लागले. आंबेकर गुरुजी सुद्धा या आखाड्यासाठी आले होते. आपण शिक्षक आहोत हेच ते विसरले होते. आणि आखाड्यात अक्षरशः नाचत होते. कारण शेवटी आंबेकर गुरुजी हे हरिभाऊ चे गुरु होते. 

आंबेकर गुरुजी व हरिभाऊच्या कर्तुत्वामुळे तीनही तालुक्यात मान सन्मान,प्रतिष्ठा, ईनाम, बक्षिसे मिळवून दिली.

सन 1992 रोजी हरिभाऊ चे लग्न झाल्यानंतर कुस्त्या खेळणे बंद केले. व एका नामांकित पैलवानाचा खेळ पाहण्यास लोक मुकले. आजही जुन्या आठवणी निघाल्या की हरिभाऊ च्या कुस्त्यांची आठवण नक्कीच येते. आणि मग जुन्या आठवणीत रममान होते.

कोणताही आखाडा झाल्यावर सर्व पैलवान मंडळी घरी आल्यावर जेवण खान झाल्यावर हुरसाळे वस्तीतील सर्व लोक गप्पा मारण्यासाठी आंबेकरांच्या अंगणात बसत असत. 

तेथे कुस्त्यांच्या गप्पा चालत. पैलवान मंडळी सर्वांना रेवड्या वाटत. कुस्त्यांच्या गप्पा अगदी चवी चवीने चघळल्या जात. हास्यविनोद होत असत. परंतु काळ बदलला. पूर्वीसारखे आखाडेही आता होत नाहीत.आणि पूर्वीसारखे अंगणात बसून कोण गप्पाही मारत नाही.

रामदास तळपे.

राजगुरुनगर शहराचे अंतरंग

पुणे नाशिक रस्त्यावर पुण्यापासून अवघ्या चाळीस किलोमीटरवर असलेले राजगुरुनगर हे गाव म्हणजेच पूर्वीचे खेड अतिशय जुने आणि ऐतिहासिक असे गाव आहे.

गावामध्ये हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंचा वाडा, दिलावर खानाचा दर्गा, दिलावर खानाने बांधलेले त्या काळातील धरण, अगदी पुरतन असलेले सिद्धेश्वर मंदिर, केदारेश्वर मंदिर, आणि गावठाण पासून दोन किलोमीटर असलेल्या तूकईवाडी येथील पुरातन असे तुकाई देवीचे मंदिर हे पुरातन बाबींची साक्ष देतात.

त्याचप्रमाणे छत्रपती शाहू आणि ताराबाई यांची लढाई हीदेखील खेड येथे झाली होती.

नव्याने उदयास आलेल्या खेड म्हणजेच राजगुरुनगर येथे आता अनेक सोयी सुविधा झाल्या आहेत. त्यापैकी राजगुरुनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, अतिरिक्त सत्र न्यायालय, ग्रामीण रुग्णालय, क्रीडा संकुल, विधी कॉलेज, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, पंचायत समिती, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस स्टेशन, वनविभाग, विविध राष्ट्रीयकृत व सहकारी बँका, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, इलेक्ट्रिसिटी बोर्ड, अशी अनेक कार्यालय राजगुरुनगर मध्ये आहेत.

राजगुरुनगर येथून जवळच असलेल्या चाकण येथे एमआयडीसी कार्यरत असून आशियातील सर्वात मोठे हब आहे. शिवाय विशेष औद्योगिक केंद्र हे सुद्धा राजगुरुनगर जवळ आहे.

राजगुरुनगरचा झपाट्याने विस्तार होत असून विविध मॉल्स, इलेक्ट्रिक मशिनरी, बांधकामाशी निगडित वस्तू, ट्रॅक्टर तसेच विविध कृषी क्षेत्राशी निगडित उत्पादित वस्तू यांचे विक्री केंद्र म्हणून राजगुरुनगर चा उल्लेख करावा लागेल.

राजगुरुनगरचा झपाट्याने विस्तार होत असताना देखील राजगुरुनगर हे राहण्यासाठी उत्तम कोणताही गजबजाट नसलेले अतिशय शांत असे शहर आहे. 

पुरातन सिद्धेश्वर मंदिर :

राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि पवित्र शिव मंदिर आहे. हे मंदिर भीमा नदीच्या काठी वसलेले असून, मंदिरासमोर एक सुंदर भागीरथी कुंड (पुष्करणी) आहे. सिद्धेश्वर मंदिर सन 1725 रोजी बांधले आहे, तर भागीरथी कुंडाचे बांधकाम 12 ऑक्टोबर 1735 रोजी पूर्ण झाले.

राजगुरुनगरचे सिद्धेश्वर मंदिर हे उत्तरमुखी असून, त्यात नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह यांचा समावेश आहे.

शिव मंदिर पूर्णतः दगडाचे आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला भव्य अशा दोन दिपमाळा आहेत. मंदिराच्या समोरच भव्य दगडाचा नंदी असून समोर मारुती मंदिर आहे.

सिद्धेश्वर मंदिराचा इतिहास रंजक आहे आणि या मंदिराचा संबंध नाथ संप्रदायाच्या नवनाथ झुंडी मार्गाशी देखील आहे. मंदिराच्या परिसरात विविध देवतांची मंदिरे आहेत.

पुष्करणी (कुंड):

राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात एक प्राचीन पुष्करणी (कुंड) आहे, ज्याला भागीरथी कुंड असेही म्हटले जाते. या पुष्करणीबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:

हे कुंड १२ महिने पाण्याने भरलेले असते.

हे कुंड ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण ते अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात बांधले गेले असावे असा अंदाज आहे अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक मंदिरे आणि पुष्करणी बांधल्या आहेत.

या कुंडाला पायऱ्या आहेत, ज्यामुळे पाण्याच्या पातळीपर्यंत सहज पोहोचता येते. पुष्करणी म्हणजे विहिरीतील पाण्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या असलेली विहीर.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या या मंदिर परिसर आणि पुष्करणीला दिव्यांनी सजवले जाते, ज्यामुळे एक सुंदर आणि भक्तिमय वातावरण तयार होते.

पुष्करणी हे केवळ पाण्याच्या स्त्रोताचेच नाही, तर ते प्राचीन स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे आणि धार्मिक विधींसाठी देखील वापरले जाते.

दीपमाळ :

सिद्धेश्वर मंदिराच्या समोरच डाव्या बाजूला अतिभव्य अशा दोन दीपमाळा आहेत. पैकी एक दीपमाळ सांडभोरांची आहे. या दीपमाळा पूर्णपणे दगडामध्ये बांधण्यात आलेल्या आहेत. या दीपमाळ साधारण 25 ते 30 फूट इतक्या उंच आहेत. 

राजगुरुनगर, खेड येथील तुकाई माता मंदिर हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आणि प्राचीन देवस्थान आहे.

तुकाई माता मंदिर:

वास्तुशैली

हे मंदिर हेमाडपंती शैलीत बांधलेले आहे, जी प्राचीन मराठी स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हेमाडपंती शैलीची मंदिरे त्यांच्या मजबूत दगडी बांधकामासाठी आणि गुंतागुंतीच्या कोरीव कामांसाठी ओळखली जातात.

गाभारा आणि मूर्ती: 

मंदिराच्या गाभाऱ्यात तुकाई मातेची मूर्ती आहे. याशिवाय, गाभाऱ्यातील देवळ्यांमध्ये गणेश आणि नागाच्या मूर्ती देखील पाहायला मिळतात.

बाह्य भाग: 

मंदिराचा बाह्य भाग प्रशस्त असून, चारही बाजूंनी दगडांनी वेष्टित भिंती आहेत. हे मंदिर पूर्णतः दगडी बांधकामाचे आहे, जे त्याची प्राचीनता आणि टिकाऊपणा दर्शवते.

कळस

मंदिराचा कळस हा मराठेकालीन असावा असे मानले जाते. या कळसावर विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, जे मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात.

दीपमाळ आणि इतर मंदिरे: 

मंदिराच्या प्रांगणात दीपमाळ आणि तुळशी वृंदावन पाहायला मिळते. तसेच, परिसरात इतर काही देवतांची छोटी मंदिरे देखील आहेत, ज्यात काळभैरवाचे मंदिर देखील समाविष्ट आहे.

इतिहास

काही लोककथांनुसार, तुळजापूरच्या श्री भवानी मातेची ही मोठी बहीण असून, ती सिंहगडाच्या रामकड्यावरून हिरुबाई कोंडे देशमुख नावाच्या भक्तासाठी खेड येथे येत असताना कोंढणपूरला स्थिरावली.

नवरात्र उत्सव: 

नवरात्रीच्या काळात मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. या काळात देवीचा विशेष साजशृंगार केला जातो, जो अतिशय आकर्षक असतो.

स्थानिक श्रद्धास्थान: 

तुकाई माता हे राजगुरुनगर, खेड आणि परिसरातील भाविकांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. 'तुकाई' हे नाव 'तुक्क' म्हणजे 'शुक्र' या द्रविड शब्दावरून आले असावे, कारण शुक्रवार हा देवीच्या उपासनेचा महत्त्वाचा वार मानला जातो.

हे मंदिर महाराष्ट्राच्या प्राचीन धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक भाग आहे आणि इतिहास तसेच स्थापत्यकलेमध्ये रस असलेल्यांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

दिलावर खान दर्गा :

दिलावर खान दर्गा राजगुरुनगर येथे आहे. येथे एक ऐतिहासिक दर्गा आणि मशीद आहे, जे एका मोठ्या तटबंदीने वेढलेल्या परिसरात आहे.

ऐतिहासिक माहिती:

हा दर्गा आणि मशीद  इसवी सन 1613 मध्ये निजामाचा  सरदार असलेल्या दिलावर खान सरदाराने बांधली होती.

या ठिकाणी दिलावर खान यांची कबर देखील आहे.

दर्ग्याच्या अगदी जवळच मशीद आहे, ही मशीद दिलावर खानने बांधली होती.

येथील शिलालेखावर इसवी सन  1613- 14 मध्ये दिलावर खानच्या मुलाचा (रैहान) मृत्यू झाला असल्याचे नमूद आहे.

ही वास्तू निजामशाही राजवटीतील स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, ज्यात कमळाच्या आकाराची नक्षीकाम आणि कमानीदार प्रवेशद्वारे आहेत.

वर्तमान स्थिती आणि महत्त्व:

दिलावर खान दर्गा आणि मशीद ही "राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक" म्हणून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) च्या ताब्यात आहे.

सध्या मशिदीची अवस्था पडझडीची झाली असून ती अंशतः जीर्ण अवस्थेत आहे, परंतु दर्गा अजूनही कार्यान्वित आहे.

राजगुरुनगरमधील हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे.

या ठिकाणी  मुसलमान समाज खूप मोठा उरूस साजरा करतात. यासाठी मोठमोठे कव्वालीचे कार्यक्रम आयोजित करतात. या उरसाला मोठ्या प्रमाणात मुसलमान आणि हिंदू उपस्थिती लावतात.

राजगुरुनगर मध्ये पुरातन असे श्रीराम मंदिर, विष्णू मंदिर, लिखिते गणपती मंदिर, चिमण्या गणपती मंदिर, आणि केदारेश्वर मंदिर ही अगदीच पुरातन मंदिरे आहेत.

केदारेश्वर मंदिर:

केदारेश्वर येथे भीमा नदीवर असलेला बंधारा आणि त्यामध्ये विस्तीर्ण असलेला पाण्याचा अथांग सागर हे दृश्य अतिशय रमणीय आहे. अनेक लोक संध्याकाळी केदारेश्वरला जातात. केदारेश्वर हे अतिशय पुरातन असे शिव मंदिर आहे.

डेरेदार पिंपळ वृक्ष:

मंदिराच्या पाठीमागे पिंपळाचे झाड असून ज्या लोकांना गृहपिढा आहे किंवा पितरांचा त्रास आहे असे लोक दररोज सायंकाळी या पिंपळाच्या झाडाला दिवा लावून प्रदक्षिणा मारत असतात.

पिंपळाच्या झाडाच्या दक्षिणेला भीमा नदीचे अथांग पात्र असून बंधारा असल्यामुळे सतत जलसाठा पहावयास मिळतो. नदीत उतरण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला घाट आहे. हात घाट दगडांचा आहे.

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारक :

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील  क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ रोजी पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) येथे झाला.

त्यांनी हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) या संघटनेत काम केले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग आणि सुखदेव थापर यांच्यासोबत त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र लढा दिला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी ब्रिटिश पोलिस अधिकारी सँडर्सवर हल्ला केला.

राजगुरूंना २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासोबत लाहोरमध्ये फाशी देण्यात आले. त्यांनी वयाच्या अवघ्या २२-२३ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ खेड गावाचे नाव बदलून राजगुरुनगर असे ठेवण्यात आले आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी प्राणाचे बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्यवीर शिवराम हरी राजगुरू यांच्या भीमा नदीच्या काठावर असलेल्या वाड्याला  सन 2004 मध्ये राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. राजगुरू वाडा हे शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थान आहे.

हे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र बनावे यासाठी विकसित केले जात असून, त्याचा उद्देश राजगुरूंच्या बलिदानाची माहिती नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे हा आहे. 

यामध्ये त्यांच्या जन्मखोलीचा जीर्णोद्धार, वाचनालय, उपहारगृह, नदी परिसर सुधारणा आणि विविध सुविधांचा समावेश करण्यात आलेला आहे.

मशीद :

राजगुरुनगर येथे मारुती मंदिरा शेजारी वाडा रोड, येथे एक मशिद आहे ही मशीद अगदीच प्राचीन असून दिलावर खानाने ती बांधली आहे. 

त्याचप्रमाणे दुसरी मशीद ही बाजारपेठेत आहे. 

आणि तिसरी मशीद एक कुंभार आळी येथे आहे. 

जैन मंदिर :

वेशीतून आत गेल्यावर बाजारपेठेमध्ये रस्त्याच्या डाव्या बाजूला भव्य असे जैन मंदिर आहे. त्यामध्ये भगवान वर्धमान महावीरांची अतिशय प्रसन्न अशी मूर्ती पाहावयास मिळते.

त्याचप्रमाणे कचेरी रोडला जाताना डाव्या बाजूला कासवा यांच्या बिल्डिंग समोर भव्य असे जैन स्मारक असून तेथे धर्मार्थ दवाखाना आहे. तिथे गरीब लोकांसाठी स्वस्तात उपचार केले जातात.

तेल गिरणी:

पूर्वी राजगुरुनगर हे खाद्य तेलासाठी प्रसिद्ध होते. अनेक तेल गिरण्या राजगुरुनगर मध्ये होत्या. इतिहासात याच्या नोंदी आढळतात. अजूनही तीन-चार तेल गिरणी कार्यरत आहेत.

कासवा बंधू यांची टूरिंग टॉकीज: 

पूर्वी राजगुरुनगर मध्ये कासवा बंधू यांची वाडा रोड शेजारी श्री सिद्धेश्वर टुरींग टॉकीज होती. जी आता बंद आहे.

सिद्धेश्वर टॉकीज हे राजगुरुनगरची शान होती. कासवा यांनी हे थिएटर 1961 साली सुरू केले होते. केबल आणि त्यानंतर आलेल्या डिश मुळे लोक घरातच चित्रपट पाहणे पसंत करू लागल्यामुळे हे थिएटर 2001 साली बंद करावे लागले.

राजगुरुनगर मध्ये आता बऱ्याच सुधारणा होताना दिसत आहेत.

जिल्हा सत्र न्यायालय:

आता राजगुरुनगर येथे जिल्हा सत्र न्यायालय सुरू करण्यात आले आहे. खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर या तालुक्यातील कोर्ट केसेस येथे चालतात. तेथे नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. 

विधी महाविद्यालय :

भविष्यातील गरज ओळखून येथे राजगुरुनगर पासून दोन किलोमीटर अंतरावर पुणे नाशिक रस्त्याच्या कडेला तत्कालीन आमदार दिलीप मोहिते यांचे अथक परिश्रमातून विधी महाविद्यालय सुरू केले आहे. तिथे अनेक विद्यार्थी न्यायालयीन शिक्षण घेत आहेत.

औद्योगिक प्रशिक्षण केंद्र:

राजगुरुनगर येथील चांडोली जवळ भव्य इमारतीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण केंद्र  (I. T. I.) महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे.
त्या ठिकाणी अनेक व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. तेथे अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात.

वैद्यकीय सुविधा :

ग्रामीण रुग्णालय:
ग्रामीण रुग्णालय राजगुरुनगर या ठिकाणी ताप, सर्दी, खोकला यांसारख्या सामान्य आजारांवर उपचार केले जातात. 

गर्भवती महिलांची काळजी, प्रसूती सेवा आणि स्त्रीरोग संबंधित उपचार केले जातात.

लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी विविध लसीकरण कार्यक्रम.
 
किरकोळ जखमांवर उपचार आणि काही लहान शस्त्रक्रिया केल्या जातात. 

प्राथमिक आपत्कालीन वैद्यकीय सेवा (रुग्णालयाच्या क्षमतेनुसार)

रक्त तपासणी, लघवी तपासणी यांसारख्या मूलभूत प्रयोगशाळा चाचण्या.

शासनाच्या विविध आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, जसे की कुटुंब नियोजन, संसर्गजन्य रोग नियंत्रण.

डॉक्टर बांबळे यांचे शुश्रुत हॉस्पिटल :

पुणे नाशिक हायवेवर हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या समोर डॉक्टर बांबळे यांचे सर्व सुविधा युक्त सुसज्ज असे शुश्रुत हॉस्पिटल या नावाचे खाजगी हॉस्पिटल आहे. 
या ठिकाणी सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. येथे अनेक आजारावर उपचार आणि ऑपरेशन केले जातात. 
अनेक आजारी पेशंट उपचार घेण्यासाठी खूप दूरवरून येथे येत असतात.

हुतात्मा राजगुरू महाविद्यालय:

पूर्वी महा विद्यालयीन शिक्षणासाठी पुणे येथे जावे लागायचे. शिक्षणाची गरज ओळखून तात्कालीन आमदार साहेबरावजी बुट्टे पाटील यांनी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. आणि शासनाकडे महाविद्यालयाची मागणी केली. तत्कालीन मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांचे काळात मान्यता देण्यात आली. 

आज या महाविद्यालयाचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. 

येथे विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचे वर्ग आहेत. 

शिवाय व्यावसायिक शिक्षण सुद्धा या महा विद्यालयामार्फत दिली जाते. पुणे नाशिक महामार्गावर सिद्धेश्वर मंदिराजवळ हे महाविद्यालय आहे. महाविद्यालयासमोर असलेल्या प्रांगणात महाविद्यालयाचे संस्थापक स्वर्गीय साहेबरावजी बुट्टे पाटील यांचा पूर्ण कृती पुतळा आहे.

महात्मा गांधी विद्यालय :

राजगुरुनगर शहरात खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे महात्मा गांधी विद्यालय आणि आदिवासी शिक्षण संस्थेचे हुतात्मा राजगुरू विद्यालय अशी दोन विद्यालय आहेत.
 
महात्मा गांधी विद्यालय हे १९३८ मध्ये स्थापन झाले असून, पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग आहेत. हे एक सह-शैक्षणिक विद्यालय आहे आणि येथे शिक्षणाचे माध्यम मराठी आहे. शाळेत २९ वर्गखोल्या, १४ मुलांसाठी आणि २१ मुलींसाठी शौचालये आहेत. शाळेत मैदान, ग्रंथालय (सुमारे १९८०१ पुस्तके) आणि शिक्षणासाठी ९५ संगणक उपलब्ध आहेत. शाळेची इमारत भाड्याने आहे.
महात्मा गांधी विद्यालयात इंग्रजी, सेमी इंग्रजी आणि मराठीतून शिक्षण घेण्याची सुविधा आहे. तेथे बारावीपर्यंत शिक्षण घेण्याची सुविधा आहे.

शिवाय तिथेच नर्सरी ते चौथीपर्यंतचे शिक्षण हे मराठी, सेमी आणि इंग्रजी माध्यमातून दिले जाते. महात्मा गांधी विद्यालयाचे भव्य अशी इमारत आणि प्रशस्त क्रीडांगण याच्यासह अद्यायावत सुविधा उपलब्ध आहेत.

हुतात्मा राजगुरू विद्यालय हे मराठी माध्यमाचे विद्यालय आहे.

क्रीडा संकुल :

राजगुरुनगर पासून दोन किलोमीटर अंतरावर तिन्हेवाडी जवळ प्रशस्त असे क्रीडा संकुल आहे. तेथे सातत्याने विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जाते. अनेक लोक संध्याकाळी हलका व्यायाम करण्यासाठी आणि फिरायला जाण्या साठी क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर जात असतात.

खाऊ गल्ली :

हॉटेल विजयश्री:

राजगुरुनगर वाडा रोड एल.आय.सी. कार्यालयासमोर विजयश्री हॉटेल येथे प्रसिद्ध मिसळ आणि कढी वडा प्रसिद्ध आहे. त्यासमोरच नंदू पोखरकर यांचे हॉटेल सुद्धा मिसळ आणि भेळ साठी प्रसिद्ध आहे.

तृप्ती समोसे :

राजगुरुनगर शहरात वर्धमान महावीर जैन स्मारकाजवळ मोठे यांचे अध्यायावत जागेमध्ये चविष्ट असे समोसे मिळतात. हे समोसे घेण्यासाठी संध्याकाळी पाच ते सात या वेळेत लोकांची खूपच गर्दी असते.

हॉटेल दत्त भुवन :

राजगुरुनगर शहरात वेशीच्या आत मध्ये उजव्या बाजूला हॉटेल दत्त भुवन प्रसिद्ध आहे तेथे स्पेशल चहा, कांदा आणि बटाटा भजी, खाजा खूपच प्रसिद्ध आहे. तेथे खवय्यांची अगदी सकाळी खूप गर्दी असते.

हॉटेल गुडलक :

राजगुरुनगर जवळील स्टॅन्ड जवळ असलेले हॉटेल गुडलक येथील मटण आणि चिकन बिर्याणी खूपच लोकप्रिय आहे.

नगरपरिषदे जवळील रावळ यांचे हॉटेल :

राजगुरुनगर येथील नगर परिषदे जवळ रावळ यांच्या हॉटेल मध्ये कांदा भजी आणि मिसळ अतिशय लोकप्रिय आहे. रोज सकाळी येथे खवव्यांची गर्दी पाहायला मिळते.

रविवारी सकाळी येथे भाजी बाजार भरतो. भाजी घेण्यासाठी आलेली अनेक लोक रावळ यांच्या हॉटेलमध्ये गर्दी कमी होण्याची वाट पहात असतात.

हॉटेल कृष्णाई:

पंचायत समिती जवळ असलेल्या चौकात बाबा राक्षे यांच्या इमारतीमध्ये असलेले हॉटेल कृष्णाई हे साउथ इंडियन डिशेस साठी खूपच लोकप्रिय आहे.

त्या ठिकाणी इडली सांबर, वडा सांबर, मसाले डोसा, कांदा उत्तपा, उपीट, पुरी भाजी असे विविध पदार्थ उपलब्ध असतात. तिथे सुद्धा दररोज खूपच गर्दी पाहायला मिळते.

जैन मिठाई :

राजगुरुनगर येथील तिन्हेवाडी रस्त्यावर अगदी लगतच आवटे प्लाझा जवळ प्रसिद्ध अशी ताजी मिठाई उपलब्ध असते तेथे सुद्धा खूप लोक मिठाई घेण्यासाठी जात असतात. 

तेथील पेढा, इमरती, ढोकळा आणि फापडा खूपच प्रसिद्ध आहे. सणासुदीच्या दिवसात आणि इतर दिवशीही येथे मिठाई घेण्यासाठी गर्दी होत असते.

हरी ओम पूजा भांडार :

तिन्हेवाडी रस्त्यावर जेथे सात नळ आहेत त्याच्या समोर श्री. यशवंत जाधव यांचे हरी ओम भांडार आहे. या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू, पुस्तके, विविध धार्मिक ग्रंथ, अगरबत्ती, विविध प्रकारचे धूप, रुद्राक्ष व इतर सर्व प्रकारच्या माळा, आयुर्वेदिक औषधे उपलब्ध असतात.

श्री यशवंत जाधव हे आयुर्वेदिक तज्ञ असून अनेक आजारावर आयुर्वेदिक उपचार करतात. त्यांच्याकडे विविध आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत.

अनेक धार्मिक लोक या वस्तू घेण्यासाठी, आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी तेथे गर्दी करत असतात.

कांदा लसूण संशोधन केंद्र :

हे केंद्र भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या अंतर्गत येते. 

येथे कांदा आणि लसूण या पिकांवर संशोधन केले जाते. 

नवीन जाती विकसित करणे, बियाणे उत्पादन आणि लागवड तंत्रज्ञान सुधारणे, यांसारखी कामे येथे केली जातात. 

शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. 

राजगुरूनगर (पुणे) येथील केंद्र हे कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (Directorate of Onion and Garlic Research) म्हणून ओळखले जाते. 

कृषि उत्पन्न बाजार समिती राजगुरुनगर: 

खेड कृषि उत्पन्न बाजार समिती ही पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे स्थित आहे आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. या समितीचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे आणि मध्यस्थ, दलाल यांच्याकडून होणारी फसवणूक टाळणे हा आहे.

शेतकऱ्यांचे हित संरक्षण: 

शेतीमाल विक्रीतील गैरप्रकार थांबवून शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा हे सुनिश्चित करणे.

नियमन

बाजारपेठेत होणाऱ्या खरेदी-विक्री व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे, ज्यामुळे पारदर्शकता आणि न्याय सुनिश्चित होतो.

पारदर्शक व्यवहार: 

शेतीमालाची विक्री लिलाव पद्धतीने (open auction) होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळतो.

सुविधा

शेतकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा (उदा. वजन काटे, गोदामांची सोय) उपलब्ध करून दे

बाजारभाव माहिती: 

खेड (राजगुरुनगर) आणि चाकण येथील मुख्य बाजारपेठांमधील शेतीमालाचे (उदा. कांदा, काकडी, टोमॅटो, वांगी, बटाटे, मिरची, आले, इत्यादी) दैनंदिन बाजारभाव उपलब्ध करून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री योग्य दराने करता येते.

मुख्य आणि उप-बाजार आवार:

समितीच्या कार्यक्षेत्रात मुख्य बाजार आवार तसेच उप-बाजार आवार (उदा. चाकण) आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार माल विक्रीसाठी आणता येतो.

व्यवस्थापन

समितीचे कामकाज हे संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांमार्फत चालते. यावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था आणि राज्य स्तरावर महाराष्ट्र पणन संचालक, पुणे यांचे नियंत्रण असते.

इतर उपक्रम: 

समिती शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम आणि सोयी सुविधा पुरवते, ज्यामुळे त्यांना शेतीमाल विक्री प्रक्रियेत मदत मिळते.

बाजार :

राजगुरुनगर मध्ये गढई मैदानावर दर शुक्रवारी खूप मोठा असा भुसार मालाचा आणि भाजीपाल्यांचा बाजार भरतो.

त्याचप्रमाणे नगरपरिषदेजवळ दर रविवारी भाजी बाजार भरत असतो.

विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सुविधा :

राजगुरुनगर मध्ये शालेय मुलांना राहण्यासाठी अनेक वस्तीग्रह उपलब्ध आहेत. त्यापैकी महाराष्ट्र शासनाने शालेय आणि महाविद्यालयीन मुलांसाठी आणि मुलींसाठी वसतीग्रहांची सोय केली आहे. तेथे मुलांना जेवण आणि राहण्याची सेवा मोफत पुरविली जाते. शिवाय महिन्याला रोख स्वरूपात भत्ता मिळतो.

आता नवीन सिमेंट काँक्रेट चा रस्ता झाल्यामुळे व अंतर्गत रस्ते झाल्यामुळे राजगुरुनगर मधील वावरण्यास खूपच सुटसुटीत पण आला आहे.

माऊली सेवा प्रतिष्ठान :

राजगुरुनगर मध्ये सामाजिक कार्यकर्ते, तथा समाजसेवक हे श्री.कैलास दुधाळे यांनी समाजापासून वंचित असलेल्या, अंध, अपंग, गरीब लोकांच्या मदतीसाठी कायमच पुढाकार घेत असतात. 

त्यांच्या माऊली सेवा प्रतिष्ठानने समाजा पासून वंचित असलेल्या लोकांसाठी आतापर्यंत खूपच महत्त्वपूर्ण काम केले आहे. यासाठी शहरातील अनेक दानशूर व्यक्ती त्यांना मदत करत असतात. परंतु त्यांच्या या उपक्रमासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळाला तर त्यांच्या कार्याला गती येईल. यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

व्याख्यानमालेंचे आयोजन :

राजगुरुनगर मध्ये प्रत्येक वर्षी डॉक्टर काजळे हे वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करतात. त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर हे सुद्धा प्रत्येक वर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करत असतात.

अनेक नामवंत व्याख्याते राजगुरुनगर मध्ये येऊन व्याख्यान देतात त्याचा लाभ राजगुरुनगर वासियांना होत असतो.

तरीही राजगुरुनगर मध्ये, नाट्यगृह, गार्डन, वृद्ध लोकांसाठी विश्रांती स्थळ यांची आवश्यकता आहे.

रामदास तळपे




















गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस