बारावी नंतरचे विविध कोर्स



दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यावर तुमच्यासाठी अनेक कोर्सेस उपलब्ध असतात.

तुम्ही आयटीआय, पॉलिटेक्निक डिप्लोमा किंवा पॅरामेडिकल कोर्सेस निवडू शकता. तसेच, शॉर्ट टर्म कोर्सेस सुद्धा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात म्हणजेच आयटीआय मध्ये उपलब्ध असतात.

दहावी व बारावी नंतरचे काही लोकप्रिय कोर्सेस

आयटीआय (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्था. 

आय.टी.आय. हे एक व्यावसायिक शिक्षण आहे, जे विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक व व्यावसायिक क्षेत्रांमध्ये कौशल्ये शिकवते.

आय.टी.आय. अभ्यासक्रमांची माहिती:

अभ्यासक्रमांचा प्रकार:

आयटीआय मध्ये अभियांत्रिकी व गैर-अभियांत्रिकी असे दोन प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. 

अभ्यासक्रमांचा कालावधी:

अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत असतो. 

प्रवेश प्रक्रिया:

आयटीआय मध्ये प्रवेश दहावी व बारावीच्या गुणांवर आधारित असतो. 

उपलब्ध ट्रेड:

आयटीआय मध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, संगणक ऑपरेटर, कारपेंटर, पेंटर, ड्रेस मेकिंग आणि फॅशन डिझायनिंग यांसारख्या अनेक ट्रेडमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध असतात. 

स्वयंरोजगाराच्या संधी:

आयटीआय केलेले विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात. 

उच्च शिक्षणाच्या संधी:

आयटीआय केल्यानंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षण घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 

आयटीआय मध्ये उपलब्ध काही प्रमुख अभ्यासक्रम:

Electriciyan: इलेक्ट्रिशियन:

विद्युत उपकरणांची दुरुस्ती आणि देखभाल करणे.

Fiter: फिटर:

यंत्रसामग्रीची दुरुस्ती आणि देखभाल करणे.

फिटरची कामे:

यंत्रसामग्रीची जोडणी:

फिटर यंत्रांचे भाग एकत्र जोडणे.


दुरुस्ती व देखभाल

यंत्रामध्ये काही बिघाड झाल्यास, दुरुस्त करणे

नवीन यंत्रे स्थापित करणे आणि ती कार्यान्वित करणे

यंत्रांची नियमित तपासणी करून त्यांची देखभाल करणे. 

फिटरचे विविध प्रकार: 

जनरल फिटर: 

विविध प्रकारची कामे करणारा.

मेकॅनिकल फिटर: 

यंत्रसामग्रीच्या दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करणारा.

मेंटेनन्स फिटर: यंत्रांची नियमित देखभाल करणारा. 

Velder: वेल्डर 

धातू जोडणे आणि दुरुस्त करणे.

वेल्डिंग हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे, जे आधुनिक जगाच्या अनेक भागांमध्ये आवश्यक आहे. 

Carpenter: कारपेंटर:

लाकडी वस्तू बनवणे आणि दुरुस्त करणे 







Painter: पेंटर :

विविध पृष्ठभागांवर रंगकाम करणे.

Dress Meking: 

ड्रेस मेकिंगमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन आणि कलात्मकता यांचा संगम असतो. या कलेमुळे व्यक्ती  सुंदर आणि योग्य कपडे तयार करू शकते.आधुनिक युगात दररोज कपड्यांची फॅशन वेगवेगळ्या माध्यमांनी वाढत आहे. त्यामुळे ड्रेस मेकिंग ला फारच महत्त्व आले आहे. व व्यवसायाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. 

Dress Designing:

ड्रेस डिझायनर कपड्यांच्या डिझाइनवर काम करतात, ज्यात रंग, पोत,आकार आणि प्रमाण यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो.ते कपड्यांचे नमुने तयार करतात, फॅब्रिक निवडतात आणि कपड्यांचे उत्पादन कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन करतात. ड्रेस डिझाईनिंग ला आधुनिक युगात प्रचंड महत्व आले आहे. एक ब्लाउज डिजाइनिंग करायला काही स्त्रिया पाच पाच हजार रुपये मोजतात. म्हणजे विचार करा ड्रेस डिझाईनिंग हे किती महत्त्वाचे आहे. या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या प्रचंड संधी उपलब्ध असतात.
हा एक व्यावसायिक आहे जो लेथ मशीन वापरून धातू, लाकूड किंवा इतर सामग्रीला विशिष्ट आकार देतो.

तो धातूचे भाग बनवतो, नट-बोल्ट तयार करतो किंवा इतर वस्तू वळवून योग्य आकार देतो.

मेकॅनिक (मोटार वाहन)

यंत्रे,उपकरणे किंवा वाहनांची दुरुस्ती करणे.

यांत्रिक भागांची तपासणी करणे, त्यांची दुरुस्ती करणे आणि त्यांची देखभाल करणे.

यंत्रांमध्ये काही समस्या असल्यास त्यांचे निदान करणे आणि दुरुस्त करणे.

वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांसाठी विशिष्ट ज्ञान आणि कौशल्ये असणे

रेफ्रिजरेशन आणि एअर कंडीशनिंग:

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आहे, जिथे विविध अभ्यासक्रम उपलब्ध असतात.

नोकरीच्या संधी:

उत्पादन युनिट्स, बांधकाम कंपन्या, रेल्वे, ऑटोमोबाइल उद्योग,वीज वितरण कंपन्या, इत्यादी. 

स्वयंरोजगाराच्या संधी:

आयटीआय केलेले विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात. 

उच्च शिक्षणाच्या संधी:

आयटीआय केल्यानंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षण घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 

वायरमन : 

सध्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना आजच्या युगात खूपच महत्त्व आले आहे. दैनंदिन जीवनात इलेक्ट्रॉनिक हा अविभाज्य घटक झाला आहे. त्यासाठी वायरमन कोर्स व्यवसायिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण वायरमन साठी लोकांची खूपच मागणी असते.

निष्कर्ष:

ITI अभ्यासक्रम हे तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्ये शिकण्यासाठी एक उत्तम माध्यम आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्ये विकसित करून चांगले करिअर घडवू शकता. 

इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये विविध ट्रेडमध्ये प्रशिक्षण दिले जाते.

Polytechnic: पॉलिटेक्निक 

अभियांत्रिकी डिप्लोमा कोर्सेससाठी हे उत्तम आहे.

आयटीआय केल्यानंतर विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक किंवा अभियांत्रिकी (B.Tech) अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येतो, ज्यामुळे त्यांचे तांत्रिक ज्ञान वाढते आणि करिअरमध्ये प्रगती करता येते. 

छोट्या कालावधीचे कोर्सेस :

कमी कालावधीत एखादे कौशल्य शिकण्यासाठी हे कोर्सेस उपयुक्त आहेत,

कॉम्प्युटर:

संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक: 

(COPA):

Comput & programming

ब्युटीशियन

आजच्या या आधुनिक युगात प्रत्येक स्त्रीला आपण आधुनिक आणि सुंदर दिसलो पाहिजे असे वाटते. यासाठी ब्युटी पार्लरमध्ये भेट देऊन ते आपले सौंदर्य अधिकच सुंदर करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे ब्रिटिशन या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे. हल्ली ब्रिटिशियनचे अनेक कोर्स उपलब्ध असतात. 

ब्रिटिशियनचा कोर्स पूर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. वेगवेगळे कार्यक्रम,लग्नकार्य, छोटे-मोठे इव्हेंट, सण समारंभ,वाढदिवस, इत्यादी कार्यक्रमासाठी आपण ऍडव्हान्स बुकिंग करू शकता.

 रांगोळी

आजच्या आधुनिक युगात रांगोळीला खूप महत्त्व आले आहे. विविध कार्यक्रमांमध्ये रांगोळी काढण्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. त्याचप्रमाणे लग्न समारंभ, वेगवेगळे इव्हेंट यासाठी सुद्धा रांगोळीसाठी पाचारण करावे लागते.

रांगोळीला आज व्यवसायाचे रूप आले आहे. तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरात रांगोळीचे अनेक कोर्स उपलब्ध आहे. हे कोर्स पूर्ण करून आपण त्याला व्यवसाय करून देऊ शकता. 

मेहंदी:

 

लग्न समारंभ, हिंदू धर्मातील वेगवेगळे सण, छोटे मोठे कार्यक्रम, वाढदिवस यासाठी मोठे हौसेने मेहंदी काढली जाते. लग्न समारंभासाठी चांगल्या मेहंदी व्यवसायिका  ला बुकिंग करावे लागते. मेहंदीची क्रेझ सध्या खूप असल्याकारणाने मेहंदीला व्यवसायाचे रूप आले आहे.

छोट्या शहरात अनेक ठिकाणी मेहंदीचे कोर्स उपलब्ध असतात. मेहंदी चा कोर्स पूर्ण करून आपण त्याची व्यवसायात रूपांतर करू शकता.

हॉटेल मॅनेजमेंट: 

बारावी नंतर हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण घेता येते. अनेक महाविद्यालये आणि संस्थांमध्ये हॉटेल व्यवस्थापनाचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण:

बारावी नंतर हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण घेता येते. अनेक महाविद्यालये आणि संस्थांमध्ये हॉटेल व्यवस्थापनाचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. व्यवस्थापन.

अतिथी सेवा:

अतिथींच्या गरजा पूर्ण करणे, चांगली सेवा देणे, आणि तक्रारींचे निराकरण करणे. 

आर्थिक व्यवस्थापन:

हॉटेलचे बजेट, खर्च, आणि उत्पन्न यांचा ताळमेळ राखणे. 

ऑपरेशनल व्यवस्थापन:

हॉटेलच्या दैनंदिन कामांचे व्यवस्थापन करणे, जसे की साफसफाई, अन्न आणि पेय सेवा, इत्यादी. 

विक्री आणि विपणन:

हॉटेलचे जाहिरात आणि प्रमोशन करणे. 

तंत्रज्ञान:

हॉटेलमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे, जसे की ऑनलाइन बुकिंग, डिजिटल पेमेंट, इत्यादी. 

हॉटेल व्यवस्थापनाचे फायदे:

करिअरच्या संधी:

हॉटेल व्यवस्थापनामध्ये विविध करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.

चांगली कमाई:

हॉटेल व्यवस्थापनातील करिअरमध्ये चांगली कमाई होऊ शकते.

व्यक्तीमत्व विकास:

हॉटेल व्यवस्थापनातील कामामुळे व्यक्तीमत्व विकास होतो. 

हॉटेल व्यवस्थापनासाठी आवश्यक कौशल्ये:

नेतृत्व क्षमता, संवाद कौशल्ये, समस्या सोडवण्याची क्षमता, ग्राहक सेवा कौशल्ये, व्यवस्थापन कौशल्ये

भाषा कौशल्ये (इंग्रजी आणि इतर भाषा) 

आरोग्य क्षेत्रातील विविध कोर्सेस:

लॅब टेक्निशियन:

लॅब टेक्निशियन कोर्सचे प्रकार:

डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (DMLT):

हा एक लोकप्रिय डिप्लोमा कोर्स आहे, जो बरावी नंतर करता येतो. भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व जीवशास्त्रामध्ये 50% पेक्षा मार्क्स असणे आवश्यक आहे.

अभ्यासक्रमामध्ये काय शिकवतात:

रक्त, लघवी आणि इतर शारीरिक द्रव्यांचे नमुने घेणे आणि त्यांचे विश्लेषण करणे.

सूक्ष्मजीवशास्त्र, शरीरशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान आणि पॅथॉलॉजी यांसारख्या विषयांचा अभ्यास.

विविध वैद्यकीय चाचण्या करणे, जसे की हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर, इत्यादी.

प्रयोगशाळेतील उपकरणांचे व्यवस्थापन आणि देखभाल. 

नोकरीच्या संधी:

सरकारी आणि खाजगी रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर्स, ब्लड बँक्स, रिसर्च लॅबोरेटरीज, फार्मास्युटिकल कंपन्या.

फार्मसी असिस्टंट:

प्रवेश पात्रता:

फार्मसी असिस्टंट कोर्ससाठी साधारणपणे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अभ्यासक्रमाचा कालावधी:

फार्मसी असिस्टंट कोर्स साधारणपणे 6 महिने ते 1 वर्षाचा असतो.

अभ्यासक्रम:

औषधं कशी बनवतात आणि साठवतात.

औषधांची माहिती (उदा. उपयोग, दुष्परिणाम, डोस).

औषधं कशी द्यायची.

रुग्णांना औषधांबद्दल माहिती देणे.

फार्मसीमध्ये कायदे आणि नियम.

फार्मसीतील कामाचे व्यवस्थापन.

नोकरीच्या संधी:

फार्मसी असिस्टंट कोर्स केल्यानंतर तुम्हाला फार्मसी, हॉस्पिटल, किंवा आरोग्य केंद्रांमध्ये काम मिळू शकते.

महाराष्ट्रात अनेक शासकीय आणि खाजगी संस्था फार्मसी असिस्टंट कोर्स ऑफर करतात. तुम्ही तुमच्या जवळच्या संस्थेत चौकशी करू शकता. 

फार्मसी असिस्टंट कोर्सचे फायदे:

तुम्ही कमी वेळेत (6 महिने ते 1 वर्ष) फार्मसी क्षेत्रात प्रवेश करू शकता.

तुम्हाला औषधं आणि आरोग्य सेवांबद्दल माहिती मिळते.

तुम्हाला फार्मसीमध्ये चांगली नोकरी मिळू शकते.

तुम्ही लोकांच्या आरोग्यासाठी मदत करू शकता. 

फार्मसी असिस्टंट कोर्स एक चांगला पर्याय आहे ज्यांना फार्मसी क्षेत्रात करिअर करायचे आहे. हा कोर्स तुम्हाला आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये देईल, ज्यामुळे तुम्ही फार्मसीमध्ये यशस्वी होऊ शकता. 

नर्सिंग कोर्स:

नर्सिंग कोर्सेसचे प्रकार:

ए.एन.एम. (ANM - Auxiliary Nursing Midwifery):

हा 2 वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे. हा कोर्स मुख्यतः ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी असतो. 

जी.एन.एम. (GNM - General Nursing and Midwifery):

हा 3.5 वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे. यात 6 महिन्यांची इंटर्नशिप असते. 

शैक्षणिक अहर्ता :

या कोर्स साठी विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

एमबीबीएस (MBBS): 

बॅचलर्स ऑफ मेडिसिन, बॅचलर्स ऑफ सर्जरी. हा डॉक्टर होण्यासाठीचा मूलभूत अभ्यासक्रम आहे. यासाठी NEET (National Eligibility cum Entrance Test) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

बीडीएस (BDS): 

बॅचलर्स ऑफ डेंटल सर्जरी.

बीएएमएस (BAMS): 

बॅचलर्स ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी.

बीएचएमएस (BHMS): 

बॅचलर्स ऑफ होमियोपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी.

बी.फार्म (B.Pharm):

बॅचलर्स ऑफ फार्मसी.

अभियांत्रिकी (Engineering)

अभियांत्रिकी (Engineering) 

हा बरावी सायन्स नंतरचा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. यामध्ये विविध शाखा उपलब्ध आहेत:

कॉम्प्युटर अभियांत्रिकी (Computer Engineering): 

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स.

मेकॅनिकल अभियांत्रिकी (Mechanical Engineering):

यंत्रांची रचना, उत्पादन आणि देखभाल.

सिव्हिल अभियांत्रिकी (Civil Engineering): इमारती, पूल आणि इतर पायाभूत सुविधांची निर्मिती.

इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी (Electronics & Telecommunication Engineering): इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि दूरसंचार प्रणाली.

इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी (Electrical Engineering): 

विद्युत प्रणाली आणि ऊर्जा.

केमिकल अभियांत्रिकी (Chemical Engineering):

रासायनिक प्रक्रिया आणि उत्पादने.

प्रवेश: JEE Mains, MHT-CET यांसारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून तुम्ही बी.ई. (B.E.) किंवा बी.टेक (B.Tech) कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता.

विज्ञान (Science)

विज्ञान क्षेत्रात पदवी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध पर्याय आहेत:

बी.एस्सी. (B.Sc.): 

भौतिकशास्त्र (Physics), 

रसायनशास्त्र (Chemistry), 

गणित (Mathematics), 

जीवशास्त्र (Biology), 

वनस्पतीशास्त्र (Botany), 

प्राणीशास्त्र (Zoology), 

सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology), 

जैवतंत्रज्ञान (Biotechnology), 

संगणकशास्त्र (Computer Science) 

यांसारख्या विषयांमध्ये तुम्ही बी.एस्सी. करू शकता.

बी.सी.ए. (BCA - Bachelor of Computer Applications): 

कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी.

बी.एस्सी. कृषी (B.Sc. Agriculture): 

कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान.

प्रवेश: अनेक महाविद्यालये बरावीच्या गुणांवर आधारित प्रवेश देतात, तर काही प्रवेश परीक्षा घेतात.

वाणिज्य (Commerce)

वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हे पर्याय उपलब्ध आहेत:

बी.कॉम: 

(B.Com - Bachelor of Commerce): लेखाशास्त्र, वित्त, व्यवसाय व्यवस्थापन यांसारख्या विषयांचा अभ्यास.

बी.बी.ए :

(BBA - Bachelor of Business Administration): व्यवसाय व्यवस्थापन आणि प्रशासनाचे मूलभूत ज्ञान.

बी.एम.एस :

(BMS - Bachelor of Management Studies): व्यवस्थापन कौशल्यांवर लक्ष केंद्रित.

सी.ए: 

(CA - Chartered Accountancy): लेखापाल (अकाउंटंट) बनण्यासाठीचा व्यावसायिक कोर्स.

सी.एस:

(CS - Company Secretary): कंपनी सेक्रेटरी बनण्यासाठीचा व्यावसायिक कोर्स.

प्रवेश: बहुतांश अभ्यासक्रमांसाठी बरावीच्या गुणांवर आधारित प्रवेश असतो, तर काही संस्था स्वतःच्या प्रवेश परीक्षा घेतात.

कला (Arts)

कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक वैविध्यपूर्ण पर्याय आहेत:

बी.ए:

(BA - Bachelor of Arts): इतिहास (History), भूगोल (Geography), राज्यशास्त्र (Political Science), अर्थशास्त्र (Economics), समाजशास्त्र (Sociology), मानसशास्त्र (Psychology), साहित्य (Literature) यांसारख्या अनेक विषयांमध्ये बी.ए. करता येते.

बी.जे.एम.सी: 

(BJMC - Bachelor of Journalism and Mass Communication): पत्रकारिता आणि जनसंवाद क्षेत्रात करिअरसाठी.

बी.एस.डब्ल्यू:

(BSW - Bachelor of Social Work): सामाजिक कार्य क्षेत्रात रुची असलेल्यांसाठी.

बी.एफ.ए: 

(BFA - Bachelor of Fine Arts): चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला (Applied Arts) यांसारख्या कला प्रकारांमध्ये.

एल.एल.बी :

(LLB - Bachelor of Legislative Law): बारावीनंतर पाच वर्षांचा इंटिग्रेटेड एलएल.बी. कोर्स असतो.

प्रवेश: 12वीच्या गुणांवर आधारित प्रवेश, काही ठिकाणी प्रवेश परीक्षा.

व्यावसायिक व कौशल्य-आधारित अभ्यासक्रम (Vocational and Skill-based Courses)

आजकाल व्यावसायिक आणि कौशल्य-आधारित अभ्यासक्रमांना खूप महत्त्व दिले जाते.

ॲनिमेशन आणि मल्टीमीडिया:

ॲनिमेशनचे मुख्य प्रकार:

पारंपारिक ॲनिमेशन:

यामध्ये हाताने काढलेल्या चित्रांचा किंवा रेखाचित्रांचा वापर केला जातो, जी एका विशिष्ट क्रमाने दर्शवून हालचाल निर्माण केली जाते. 

संगणक ॲनिमेशन:

यामध्ये संगणकाचा वापर करून 2D किंवा 3D प्रतिमा तयार केल्या जातात आणि त्या हलवल्या जातात. 

स्टॉप मोशन ॲनिमेशन:

यामध्ये वस्तू किंवा बाहुल्यांची छायाचित्रे एका विशिष्ट क्रमाने घेतली जातात आणि नंतर ती एकत्रित करून हालचाल दर्शवली जाते. 

ॲनिमेशनचा उपयोग चित्रपट, टीव्ही शो, व्हिडिओ गेम्स, मोबाईल ॲप्स आणि इतर अनेक ठिकाणी केला जातो. 

(Animation & Multimedia): 

ग्राफिक डिझायनिंग:

ग्राफिक डिझाईनमध्ये, डिझायनर विविध व्हिज्युअल घटक जसे की चित्रे, रंग, फॉन्ट आणि लेआउट (layout) वापरून माहितीपूर्ण आणि आकर्षक डिझाईन्स तयार करतात. 

उदाहरणे:

पुस्तके, मासिके आणि वृत्तपत्रांसाठी लेआउट तयार करणे

जाहिरात (ऍडव्हर्टायझिंग) आणि मार्केटिंग साहित्य तयार करणे

वेबसाइट्स आणि ॲप्ससाठी डिझाइन तयार करणे

उत्पादन पॅकेजिंग डिझाइन करणे

लोगो आणि ब्रँड ओळख (ब्रांड आयडेंटिटी) तयार करणे 

ग्राफिक डिझाईनचे घटक:

टायपोग्राफी:

अक्षरांचे (फॉन्ट) आणि शब्दांचे डिझाइन.

रंग:

रंगांचा वापर करून डिझाइनमध्ये भावना आणि अर्थ निर्माण करणे.

प्रतिमा:

चित्रे, ग्राफिक्स आणि इतर व्हिज्युअल घटकांचा वापर.

लेआउट:

घटकांची मांडणी आणि व्यवस्था. 

ग्राफिक डिझाईनचा उपयोग:

ग्राफिक डिझाईनचा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये केला जातो, जसे की: 

वृत्तपत्रे आणि मासिके:

बातम्या आणि माहिती प्रभावीपणे सादर करणे.

जाहिरात आणि मार्केटिंग:

उत्पादने आणि सेवा लोकांपर्यंत पोहोचवणे.

वेबसाइट्स आणि ॲप्स:

वापरकर्त्यांना आकर्षक आणि वापरण्यास सोपा अनुभव देणे.

शिक्षण:

माहिती सोप्या पद्धतीने सादर करणे.

ब्रँडिंग:

कंपनीची ओळख (आयडेंटिटी) निर्माण करणे.

वेब डिझायनिंग:

वेब डिझाईनिंग म्हणजे वेबसाईट (website) तयार करण्याची प्रक्रिया. यात वेबसाईटचे स्वरूप, रचना, नेव्हिगेशन, आणि वापरकर्ता अनुभव (user experience) यांचा समावेश असतो. थोडक्यात, लोकांना वेबसाईटवर सहजपणे माहिती मिळवण्यासाठी आणि ती वापरण्यासाठी सोयीस्कर बनवण्याची प्रक्रिया म्हणजे वेब डिझाईनिंग. 

टूरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट :

(Tourism & Travel Management): पर्यटन उद्योगात करिअरसाठी.

प्रवेश: बरावीच्या गुणांवर आधारित किंवा थेट प्रवेश.

इतर पर्याय 

संरक्षण दल :

(Defence Services): एनडीए (NDA -National Defence Academy) द्वारे सैन्य, नौदल किंवा वायुदलात अधिकारी म्हणून सामील होऊ शकता.

शिक्षक:

(Education): डी.एड (D.Ed - Diploma in Education) किंवा बी.एल.एड (B.El.Ed - Bachelor of Elementary Education) करून प्राथमिक शिक्षक बनू शकता.

ग्रामसेवक कोर्स:

बारावीनंतर ग्रामसेवक प्रशिक्षणाचा दोन वर्षाचा कोर्स करू शकता.

एल एस एस

हा पशुवैद्यकीय कोर्स आहे. सध्या या क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रातील विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी MH CET Law किंवा इतर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

शैक्षणिक पात्रता:

बरावी उत्तीर्ण किंवा पदवीधर उमेदवार विधी अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात. 

कागदपत्रे:

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे, जसे की शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला (लागू असल्यास), आणि इतर आवश्यक कागदपत

योग्य कोर्स कसा निवडावा?

तुमची आवड : तुम्हाला कोणत्या विषयात किंवा क्षेत्रात अधिक रस आहे हे ओळखा.

तुमची क्षमता : तुमची कोणत्या विषयात चांगली समज आहे किंवा कोणत्या प्रकारचे काम तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे जमेल.

करिअरचे ध्येय : तुम्हाला भविष्यात काय बनायचे आहे? कोणत्या क्षेत्रात नोकरी करायची आहे?

संशोधन : विविध कोर्सेस, महाविद्यालये आणि त्यांच्या भविष्यातील संधींबद्दल सखोल माहिती मिळवा.

पालक आणि शिक्षकांशी चर्चा (Discuss with Parents & Teachers): त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्या.

तुमच्या आवडीचे आणि क्षमतांचे विश्लेषण करा, विशिष्ट करिअर ध्येये निश्चित करा, विविध कोर्सेसची माहिती मिळवा, शैक्षणिक संस्था आणि त्यांच्या अभ्यासक्रमांची माहिती घ्या, करिअर समुपदेशकाशी संपर्क साधा.

बारावीनंतर उपलब्ध असलेल्या कोर्सेसची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे, तुमच्यासाठी योग्य कोर्स निवडण्यासाठी थोडा वेळ द्या आणि सखोल संशोधन करा.

रामदास तळपे 





डाँ.क्षिरसागर, देवमाणुस.

डाँ.क्षिरसागर, देवमाणुस.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अजुनही आरोग्याच्या म्हणाव्या तशा सुविधा उपलब्ध नाहीत.सन 1979 साली डेहणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहीली.व सन १९८० साली दवाखाना सुरू झाला.परंतू १९८१ पासुन आजतागायत ठराविक नर्स व आरोग्य सेवक सोडले तर दवाखान्याचा कोणत्याही पेशंटला उपयोग झाला नाही.

कोलमडलेली ग्रामीण आरोग्य सेवा 

आला पेशंट, डाँक्टर नाहीत,.

आला पेशंट, गोळ्या औषधे नाहीत,.

आला पेशंट येथे उपचार होणार नाहीत.पेशंट पुढे हालवा..

आला पेशंट स्टाफ कमी आहे.

अशी अनेक प्रकारची उत्तरे तयारच असतात.या बाबत कोणताही पुढारी आवाज उठवताना दिसत नाहीत.,जर कुणी आवाज उठवलाच तर त्याची मुस्कटदाबी करून गप्प बसवले जाते,.तर असो,

कधी कधी सरकारी हलगर्जी पणाही यासाठी जबाबदार असतो.एकदा रात्री मी पेशंटला पाहण्यासाठी दवाखान्यात गेलो असता तेथे लाईटच नव्हती.

प्रत्येक पेशंटच्या कॉटवर मेणबत्ती लावलेल्या होत्या. त्याही पेशंटच्या पैशाच्या. लाईट का नाही विषय विचारले असता. विज बिल न भरल्यामुळे दवाखान्याची लाईट तोडली आहे असे उत्तर मिळाले. 🙂

कधीकधी मेडिसिन नसल्यामुळे ठराविक त्याच त्याच गोळ्या प्रत्येक आजारावर दिल्या जातात. (पूर्वी तर दिल्या जात होत्या आता कशी परिस्थिती आहे माहीत नाही.)

या भागात एकच डाँक्टर होऊन गेले ते म्हणजे डाँ,क्षिरसागर..नव्हे भागाच्या दृष्टीने देवमाणुसच...

डाँ.क्षिरसागर हे साधारण १९८५-८६ च्या आसपास आले. त्यांनी टोकावडे येथे एका झोपडीवजा सफरात आपला दवाखाना थाटला..

कुडाचे सफार त्या सफरात पेशंटला झोपण्यासाठी एक लाकडाची खाट.शेजारी लाकडाची छोटी रँक शेजारीच एक मोडका टेबल त्यावर औषधांच्या बाटल्या विवीध गोळ्यांची पाकिटे डाँक्टरांना बसण्यासाठी मोडकी खुर्ची व समोर दहा-पाच पेशंट असत.आर्ध्या झोपडीत एक मोठा पडदा लावलेला व त्या पडद्याच्या आत डाँक्टरांचा संसार बायको व दोन मुले.एक मुलगा व एक मतीमंद मुलगी..

डाँक्टरांच्या अशा या दवाखान्याला ना अमुक दवाखाना..असे नाव ना तमुक डाँक्टरांची डिग्री..ना अमुक ढमुक आजारावर अमुक तमुक इलाज करणार अशी जाहीरात...त्यामुळे डाँक्टरांची डिग्री कोणती हे ते गेल्यानंतरही कुणाला कळले नाही..नव्हे कुणालाही या डिग्रीचे घेणेदेणे नव्हते...या भागासाठी डाँ.क्षिरसागर हे डाँक्टर नसुन देवच होते..

डाँक्टर जेव्हा आले तेव्हा त्यांची फी होती.रूपये पाच. यामध्ये इंजेक्शन व गोळ्या धरून पाच रूपये फी..त्यामध्ये काही पेशंटकडे पाच रूपये सुद्धा नसत..अशा पेशंट कडुन जे काही रुपाया दोन रूपये असत तेवढेच पैसे घेत.व उरलेले पुढच्या वेळेला द्या.असे पेशंटला सांगत.परंतू डाँक्टरांनी उधारीचा कधीही लेखी हिशोब ठेवला नाही.

डाँक्टर एकाच ठिकाणी म्हणजे दवाखान्यात रोज नसत..तर स्वतः औषधांची बँग खांद्यावर टाकुन भोरगीरी,भिवेगाव,वरचे भोमाळे.खालचे भोमाळे,पाभे,मंदोशी,शिरगाव,कारकुडी अशा गावांतील पेशंटला तपासण्यासाठी पायी- पायी जात असत.व गोळ्या व औषधे देऊन आपली सेवा पुरवत असत..

डाँक्टर एखाद्या मोठ्या पदावर असलेल्या किंवा नोकरी करत असलेल्या माणसाविषयी अभिमानाने हा तो अमुक तमुक ना तो माझा पेशंट आहे बरंका? असे म्हणायचे..आणि ते खरेही असायचे.

डाँक्टररांचा डावा हात पोलीओ मुळे अपंग होता.त्यामुळे डाँक्टरांना लोक खुळा डाँक्टर असे म्हणत..आणि त्याचे डाँक्टरांनाही काहीच वाटत नसे.

पुर्वी मे महिन्याच्या शेवटी व जुनच्या सुरूवातीला लोकांना दिवसाआड थंडी व ताप यायचा...थंडी ही साधारण दुपार नंतर येत असे..एकदा थंडी आली की कितीही ताटम माणुस असला की त्याचा विळा व्हायचा..

एकावर एक अशा सात आठ गोधड्या अंंगावर घालुनही तो किंवा ती मोठमोठ्याने हुss हुss हुss असा आवाज काढायचे. थंडी साधारण अर्धा तास टिकायची त्यानंतर प्रचंड ताप यायचा ताप गेल्यावर अंगातुन घामाचा पुर वाहायचा..घराघरात सर्रास असे पेशंट असायचे.त्यामध्ये मी ही एक होतो.अशा वेळी देवासारखे धाऊन यायचे ते म्हणजे डाँक्टर क्षिरसागर (खुळे डांक्टर)

कुणाच्या तरी घरात घोंगडीवर डाँक्टर आपली गोळ्या, औषधांची बँग व स्टेथोस्कोप घेऊन बसलेले असायचे..आणि त्यांच्या पुढे दहा वीस पेशंट बसलेले असायचे.ना रांग ना गोंधळ...

डाँ.प्रत्येक पेशंटला इंजेक्शन व गोळ्या देत..जास्त ताप असलेल्या पेशंटला इंजेक्शन देत नसत.गोळ्या देत व ताप उतरल्यावर त्यांच्या  दवाखान्यात पाठवुन द्या असे सांगत.डाँक्टरांनी कधीही कोणाला औषध व गोळ्या लिहून दिल्या नाहीत,स्वतः कडचीच औषधे देत..

शिवाय फी पण माफक सुरूवातीला पाच रुपये जशीजशी महागाई वाढत गेली तशी फीही वाढली.पाच नंतर सात नंतर दहा नंतर पंधरा त्यांनंतर वीस,पंचवीस व शेवटी तीस रूपये इतकीच वाढ,बस्स.

एकदा आम्ही सार्वजनिक गणपती बसवला होता.डाँक्टर आमच्या गावातील पेशंट तपासुन त्यांच्या घरी टोकावड्याला चालले होते..आमच्या घराशेजारूनच पायवाट होती.आम्ही कार्यकर्ते आमच्या आंगणात बसलो होतो.

आणि अचानक डाँक्टर दिसले..एकजण म्हणाला डाँक्टरांकडे देणगी मागायची का? परंतू एकही जण काहीच बोलेना.मग मीच बोललो डाँक्टर गणपती बसवलाय काहीतरी देणगी द्या.तात्काळ डाँक्टरांनी खिशात हात घातला व दहा पाच रूपये व काही चिल्लर मोजून एकावन्न रूपये हातावर टेकवले...आणि निघून गेले..आम्ही आवाक्क..! कारण गणपतीच ५०/-रूपयांचा होता.

अनेक गावांच्या यात्रांना ते  देणगी देत असत.

एकदा मी आजारी होतो.पायी पायी सहकारी मित्रासह डाँक्टरांकडे गेलो.पैसे फक्त पाचच रूपये..तपासुन झाले गोळ्या औषधे दिली..तेवढ्यात एस.टी भोरगीरीला जाताना दिसली. वेळ साधारण ११.०० ची.रणरणते उन मी आजारी,.

डाँक्टर म्हणाले आता जाताना एस,टी ने जा.परंतू आम्ही पायीच जातो असे आम्ही म्हणालो. डाँक्टरांच्या काय ते लक्षात आले पाच रूपये फी परत माझ्याकडे दिली व तुम्ही सर्वजण एसटीने शिरगाव पर्यंत जा असा सल्ला दिला. तर असे हे डाँक्टर.

त्यावेळेस प्रामुख्याने सर्दी ताप,थंडीताप, जुलाब उलट्या, पोटदुखी, डोकेदुखी,किंवा खरूज, नायटा, इसाब, गजकर्ण, केसतुटी,गालफुगी इत्यादी त्वचारोग तर उवा, लिखा, कपड्यमधील पांढऱ्या उवा इत्यादी आजार होत असत. 

डाँक्टरांचा हातगुण असा की इंजेक्शन कधी मारले हेच मुळी कळायचे नाही.काही पेशंट तर इंजेक्शन मध्ये अजुन दवा भरा अशीही सुचना करत.परंतू डाँक्टर आपल्या मताशी ठाम असत. डाँक्टरांना बरेच बाया पुरूष अरे तुरे मधे बोलत.परंतू डाँक्टरांनी या बाबत कधीही तक्रार केली नाही.

एखादा पेशंट जरा जास्तच सिरियस असेल तर डाँक्टर किरकोळ दवा औषधे देऊन शहरातील मोठ्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला देत.परंतू अमुकच दवाखान्यात पेशंटला न्या व माझे नाव सांगा.तुमची फी डाँक्टर कमी करतील अशी कधीही चिठ्ठी किंवा सल्ला दिला नाही.व त्या डाँक्टरांकडून कमिशन उकळले नाही.

खेडेगावात राहून मुलांचे शिक्षण होणार नाही हे जाणुन ते देहूरोडला स्थायीक झाले..तरीही ते तेथून टोकावड्याला येऊन तीन चार दिवस एकटे राहुन समाजाची सेवा करत..

गेल्याच वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले.ही बातमी कळताच त्यांचा १९८५ पासुन सन २०१९ पर्यंतचा जीवनपट डोळ्यापुढुन सर्रकन पुढे गेला आणि नकळत डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

रामदास तळपे

श्री.काळभैरवनाथ (वनदेव) मंदोशी

श्री.काळभैरवनाथ (वनदेव) मंदोशी

राजगुरूनगर पासुन ५० कि.मी. भिमाशंकर मार्गावर मंदोशी ता.खेड जि.पुणे येथील श्री.काळभैरवनाथ (वनदेव) हे वनश्रीने नटलेल्या निसर्गरम्य परिसरात असलेले अतिशय जागृत, कडक, उग्र व नवसाला पावणारे असे देवस्थान आहे. दर रविवारी महाराष्ट्रातील अनेक भाविक नवस करण्यासाठी/फेडण्यासाठी व दर्शनासाठी येत असतात. या बाबतचा मंदिराचा इतिहास हा जाणुन घेऊया

शाळुंका

खुप पुर्वी देवांच्या मुर्तीच्याही आधी दगडाच्या वाटोळ्या आकाराच्या गुळगुळगुळीत अशी साधारण चार ते पाच शाळुंका होत्या.(अद्यापही त्या आहेत.) या शाळुंखांचीच तेव्हा पुजा केली जात असे.या शाळुंका या स्वयंभू असाव्यात असे माझे तरी मत आहे.

मुर्ती

सध्या मंदिरात दोन मुर्ती आहेत या दोनही मुर्ती एकाच देवाच्या म्हणजेच श्री. काळभैरवाच्या आहेत. उजव्या बाजुची मोठ्या आकाराची मुर्ती ही अतीप्राचीन व अतिशय सुबक होती. ही मुर्ती साधारणतः सुमारे नवव्या शतकात घडवली असावी. त्यावेळी सातवाहनांचे राज्य होते. सातवाहनांच्या काळात भोरगिरी येथील कोटेश्वर मंदिर बांधले गेले आहे. शिवनेरी किल्ला सुद्धा सातवाहनांच्यांच काळातला. सातवाहनांच्या काळात अशाच मूर्ती तयार करण्यात आलेल्या आहेत.

पुर्वी मंदिर नसल्यामुळे उन,वारा व पाऊस या मुळे मुर्तीची बरीच झीज झाली,त्यानंतर गावक-यांनी दुसरी अतिशय सुंदर व प्रसन्न अशी मुर्तीया मुर्तीच्या शेजारीच घडवून बसवली आहे.

ह्या मुर्तीच्या हातात नाग आहे.ह्या मुर्तीचे वैशिष्ट्य असे आहे. ज्यावेळी देवाचा अंश मुर्तीत असतो तेव्हा ही मुर्ती अतिशय प्रसन्न दिसते.आणि मुर्तीमध्ये विलक्षण तेज असल्याचे जाणवते, हे शक्यतो रविवारी सकाळी १२.०० पर्यंतच हं...इतर दिवशी मुर्तीत असे भाव बघायला मिळत देखील नाही.

ह्या दोन्ही मुर्तींच्या डाव्या बाजुला एक दगडी चीरा आहे.हा चीरा म्हणजेच ज्याच्या मुळे श्री.काळभैरवनाथ येथे आले तो त्यांचा भक्त होय,

चि-याचा इतिहास

श्री.काळभैरवनाथाचे मुख्य ठाणे खरबाच्या माळावर आहे. या माळावर अनेक गुराखी आपल्या गायी घेऊन चरावयास नेत असत. त्या गुराख्या पैकी एका हरीजन (रोकडे)असलेला गुराखी या देवाची सेवा करू लागला.(सेवा म्हणजे काय तर दररोज देवाला पाणी घालने व दर्शन घेणे.)

नंतर हा भक्त वयोवृद्ध झाल्यामुळे त्याला वर डोंगर चढुन माळावर जायचे जमेना.हे पाहून मग खरबाच्या माळावर असलेला देवच खाली आता सध्याआहे त्या ठिकाणी आला.देव खाली आल्यावर आपोआप तेथे शाळूंका निर्माण झाल्या.

त्यानंतर मात्र हा वयोवृद्ध झालेला भक्त न चुकता दररोज देवावर जलाभिषेक करू लागला..त्याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी देवाच्या सांगण्यावरून देवाच्या डाव्या बाजुला त्या भक्ताला स्थान दिले.तोच हा चीरा होय.(बनाच्या पायठ्याच्या) उत्तरेला रोकडे यांची दोन गवताची घरे होती.

काळभैरवनाथ मंदिर जिर्णोद्धार

खुप पुर्वी येथे मंदिर नव्हते,.एका छोट्या ओबडधोबड चबुत-यावर दगडाच्या वाटोळ्या आकाराच्या शाळूंका होत्या. त्यावेळी शाळूंकाचीच पूजा केली जात असे. त्यानंतर मंदिर बांधले गेले.सुरूवातीचे मंदिर हे दगडाच्या भिंतींचे होते.वरचे छप्पर मात्र लाकुड व गवताचे होते. हे मंदिर आठराव्या शतकात बांधले गेले असावे.

दुसऱ्यांदा मंदिर जिर्णोद्धार

त्यानंतर सन १९४१-४२ सालात घडीव जोते व डबारात चौमोळी आकाराचे पाच खण लांबी व रुंदीचे मंदिर बांधकाम करण्याचा संकल्प गावक-यांनी केला.

मंदिराच्या घडीव जोत्याचे व भिंतीच्या दगडांचे काम हे गिरवली ता.आंबेगाव येथील काशिनाथ गवंडी यांनी केले. खांब, वासे. तुळया, लगी हे सर्व प्रकारचे लाकडी काम तसेच सुबक मखराचे काम हे गावचेच सुतार कै. सखाराम बारवेकर यांनी केले,

मंदीराची कौले व जमीनीवरील लादी (शहाबादी फरशी) लोखंडी जाळ्या इत्यादी साहित्य तत्कालीन मुंबईकर कै.राघुजी हुरसाळे यांच्या देखरेखीखाली मुंबईहून आणले होते.हे मंदीर पुर्णतः सागवानी होते.

तिसऱ्यांदा मंदिर जिर्णोद्धार

सन १९८४-८५ मध्ये पुन्हा बाळासाहेब दगडू तळपे (सरपंच) शंकर राघोजी हुरसाळे(उपसरपंच) विष्णू कामाजी हुरसाळे(कारभारी) किसन देहू तळपे(गुरूजी) चिंधू धोंडू तळपे, भीमाजी गोडे,दुलाजी गोडे ,सिताराम मोहन,शंकर नाना मोहन,शंकर दुलाजी तळपे, सोनु मारूती तळपे,तुळशिराम रोकडे,देवराम आंबेकर इत्यादी मान्यवरांच्या संकल्पनेतून नवीन मंदिर बांधकाम करण्याचे ठरवले. 

हे मंदिर पूर्वीच्याच मंदिराच्या दगडी जोत्यावर गुळगुळीत डबरा मध्ये बांधकाम करण्याचे ठरले. गुळगुळीत डबर तयार करण्याचे काम जवळजवळ वर्षभर चालू होते. दगड घडवण्याचे काम श्री.दत्तात्रय बारवेकर, श्री सुदाम बारवेकर, श्री सोपान बारवेकर आणि श्री दुदाजी बांगर यांनी केले. 

मंदिराचे संपूर्ण लाकडी काम हे सागवानी लाकडामध्ये करायचे ठरले होते. ही लाकडे कोकणातून आणली होती. यासाठी कै.विष्णू कामाजी हुरसाळे यांचे खूप मोठे योगदान होते. त्यांच्या नेतृत्वाखाली श्री.चिंधू धोंडू तळपे/ आणि अजुन चार पाचजण कोकणात दोन महिने आधी लाकडे तोडण्यासाठी गेले होते.

यासाठी कै.विष्णू कमाजी हुरसाळे यांच्या मामाने जवळजवळ दोन महिने मंदोशी गावच्या ग्रामस्थांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. सर्व लाकडे तोडून झाल्यावर गावातील संपुर्ण झाडून पुरूष मंडळी लाकडे आणण्यासाठी कोकणात गेले होते. 

तेथुन डोक्यावरून लाकडे वाहून मंदोशी येथे आणली गेली.ही लाकडे पुर्णतः सागवानी होती.मंदिराला एक किलचीही इतर झाडांची वापरलेली नव्हती.

हे मंदिर अतिशय सुंदर असे होते.खाली सुबक आशी गुळगुळीत काळी पांढरी लादी,सुंदर लाकडी खांब अतिशय छान अशी गच्ची व लोखंडी जाळ्या बनवलेल्या होत्या.असे मंदिर भागात असे कोठे नव्हतेच.

प्रथा परंपरा

श्री.काळभैरव मंदिरात रोज सकाळ व संध्याकाळ दिवाबत्ती व देवपुजा केली जाते.तळपे हे अधिकृत देवाचे पुजारी आहेत.

यात्रा

चैत्र महिन्याच्या दुसऱ्या रविवारी गावची यात्रा असते.सकाळी नेहमी प्रमाणे पुजा होते.सकाळी मांडव डहाळे करून लोक प्रथा व परंपरेनुसार हारतुरे आणन्यासाठी मोठ्या संख्येने शिरगाव येथे जुन्या एस,टी.स्टँडवर जमतात.(पुर्वी हारतुरे हे मुंबईकर आणत असत.आता अगदी वैयक्तिक हार फुले लोक आणतात.)

सर्वलोक जमल्यावर हारतु-यांची पुजा होते.हा मान शिरगावच्या सवाष्ण महिलांना असतो.त्यानंतर भव्य मिरवणूक सनई चौघड्यांच्या गजरात मंदोशी गावच्या दिशेने निघते.

हारतुरे,मंदिरात आल्यवर ,वस्रअलंकार व हारफुले देवावर चढवले जातात.सनई चौघडा च्या गजरात व मोठमोठ्या घंटाच्या निनादात महापुजा होते.असंख्य नारळ फुटतात. नवस फेडले जातात.

दंडवते

दुपारी ५.०० वा.सर्व ग्रामस्थ/पैपाहुने बायकामुलासह नवीन कपडे परिधान करून हातात पुजेचे ताट व प्रसाद घेऊन मंदिराच्या दिशेने मोठ्या संख्येने चालू लागतात.नवस केलेले भाविक जागोजागी जमीनीवर उपडे पडून देवाच्या नावाने मोठ्या भक्तीभावाने नतमस्तक होताना दिसतात.मंदिराच्या बाहेर व आत प्रचंड गर्दी असते.भाविक गुळ खोबरे,पेढे असा प्रसाद वाटतात.नवस फेडले जातात.बाजुलाच विविध गावांची नामांकित भजने सुरू असतात. प्रत्येकाच्या घरी पुरण पोळ्यांचे जेवण असते,

पालखी

रात्री ११.३० वा.च्या दरम्यान छबिन्यासह सनई चौघड्यांच्या गजरात,एकतारी भजन म्हणत पालखी काढली जाते.पालखीच्या वेळी प्रचंड जनसमुदाय असतो. 

पालखीचे मानकरी

खुप पुर्वीपासून पालखीचे भोई (मानकरी) बांगर व मसळे हे आहेत.

फटाके व दारूकाम रोषणाई

पालखीच्या वेळीआकाशात अतिशय सुंदर,नेत्रसुखद असे दारूकाम बघायला मिळते.

करमणूक कार्यक्रम

पालखीनंतर भारूड अथवा तमाशाचा कार्यक्रम असतो.दुसऱ्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम व कुस्त्यांचा जंगी हंगामा असतो.तत्पुर्वी अतिशय रूचकर असे सार्वजनिक जेवण असते.

अखंड हरिनाम सप्ताह 

सन 2014 पासून दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. श्री वामन महाराज जढर, श्री गोपाळ हुरसाळे व श्री रोहिदास वाघमारे श्री. नामदेव शंकर तळपे यांच्या नेतृत्वाखाली समस्त ग्रामस्थ मंडळ मंदोशी हे अतिशय उत्तम प्रकारे अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन व आयोजन करतात.

अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या दिवशी हरी कीर्तनासाठी भक्तांचा महापूर लोटतो.

आलेल्या पाहुण्यांचा मानसन्मान 

आलेल्या जनसमुदायाचा सत्कार व मानसन्मान गावच्या वतीने श्री यमन हुरसाळे, श्री एकनाथ तळपे, श्री राजू तळपे, श्री नामदेव हुरसाळे,श्री.किसन तळपे गुरुजी श्री बबन गोडे, श्री मारुती मोहन,श्री नामदेव रोकडे, श्री. बाळशीराम रोकडे,नितीन तळपे,अनंता तळपे हे करतात.

गावची साथ

भात लावणी सुरू करायच्या आधी एखाद्या रविवारी गावची साथ असते.या दिवशी शिवारातील सर्व देवांना तेलाचे/शेंदराचे माजने करतात.बोकडाचा बळी दिला जातो.शिवारातील देवांना नैवद्य दाखवून मग गावकरी जेवण करतात.अशाच प्रकारे भात काढणीच्या आधी साथ केली जाते,(वर्षातुन दोनदा साथ होते.)

घटस्थापना (देवघटी बसणे)

आश्विन शुद्ध प्रतिपदेला देव घटी बसतात.यासाठी प्रत्येक देवापुढे मातीचा घट करून त्यामध्ये धान्ये पेरतात.त्यावर लाकडी छोटा मांडव बनवुन एक नवेकोरे मडके पाणी भरून ठेवतात.भक्त लोक दहा दिवस उपवास करतात. भाविक त्यांना केळी,उपवासाचे जिन्नस,देवाला देवाला दिवाबत्ती साठी तेल देतात.रात्री भजन केले जाते.

देव घटी बसल्यावर दरोरोज एक तीळांच्या फुलांची माळ घातली जाते.

पहिलीमाळ ते दहावीमाळ असे दहा दिवस घटाला माळ घालतात.देव घटी बसवायच्या वेळी,पाचव्या माळेला व दहाव्या माळेला देवाकडे भक्तांची खुप गर्दी असते.खुप लांबून भाविक दर्शनासाठी येतात.

दहावी माळ घालून घट हलवतात.यालाच देव उठले असे म्हणतात.घटातील माती चिमुटभर का होईना आपापल्या शेतात टाकायची पद्धत आहे.याच दिवशी दसरा असतो.सायंकाळी लोक आपट्याची पाने घेऊन प्रथम देवाला भेटतात.त्यानंतर इतर लोकांना भेटायची पद्धत आहे.

देव पारधी जाणे

अश्विन प्रतिपदेला देव पारधी जातात.रात्री ८.००वा.च्या दरम्यान सर्व वाड्यावस्यातील व गावचे लोक मंदिरात जातात. देवाची पुजा होते.एखाद्याच्या अंगात वारे संचारते.देवाला नैवद्य दाखवला जातो.

नैवेद्याचा काही भाग घेऊन पुढे भगत,शेजारीअंगात वारे आलेला माणुस व त्यामागे लोकढोल वाजवत मंदिराबाहेर चालू लागतात. मुक्तारदेवाच्या पाठीमागे उंच झाडांच्या खाली असलेल्या विशिष्ट अशा दगडाच्या खोबणीत नैवद्य ठेवतात.

त्यावर त्याच मापाचा दगड ठेवतात.पुढे दिवा लावला जातो.हाच नैवद्य पुढे एक महिन्यानंतर देव पारधीहून आल्यावर अशाच प्रकारे वाजतगाजत दगडाच्या खोबनीतुन बाहेर काढला जातो.

हा नैवद्य एक महिन्यानंतरही जसाच्या तसाच असतो.प्रत्येक घराण्यातील प्रमुखाला भगत नैवद्य वाटप करतो.हा नैवद्य लोक धान्यामध्ये ठेवतात.

देवाचे भगत

चीमाजी तळपे,लक्ष्मण तळपे, ठकू तळपे, बुधा तळपे,शंकर अहिलू तळपे, विठ्ठल तळपे, मारूती रामभाऊ तळपे हे होते. हे सर्वजण आता हयात नाहीत.

या पैकी कै.विठ्ठल तळपे यांची कारकिर्द सर्वांच्या स्मरणात राहील अशीच होती.

आता श्री.गणपत तळपे हे देवाचे भगत आहेत.

अंगात वारे येणारे

गावात पुर्वी देवाच्या पुजे अर्चेबाबत सर्व इत्यंभुत माहिती असलेले व कडक अंगात वारे येणारे एकमेव मणुष्य म्हणजे कै. तुकाराम आंबवणे हे होय. शिवाय कै.काळू गवारी, श्री. धोंडू मसळे,श्री.बनाजी आंबवणे, श्री.विष्णू रोकडे यांच्याही अंगात वारे येत होते.

स्रीयांमध्ये कै.नकाबाई जढर व कै.यमुनाबाई तळपे यांच्याही अंगात वारे येत होते.व लोकांच्या समस्येचे निवारण होत होते.

इतर देव व देवता

मुक्तार देव

श्री.काळभैरवनाथाच्या मुख्य मंदिराच्या समोर मुक्तारदेवाचे मंदिर आहे.मुक्तारदेव हा काळभैरवाचा अत्यंत जवळचा मानला जातो. मुक्तार देव हा श्री काळभैरवनाथाचा सेनापती आहे.

मुक्तार मंदिराच्या पाठीमागे गर्द झाडीमध्ये 25 ते 30 दगडांच्या रेखीव व सुबक अशा मूर्ती आहेत. हे श्री.काळभैरवनाथाचे सैन्य आहे. जेथे जेथे काळभैरवाचे मंदिर आहे तेथे तेथे मुक्तार मंदिरअसतेच.

मुक्तार देव हा मोहनांचा मानला जातो. परंतु प्रामुख्याने या देवाची पूजा श्री बनाजी उर्फ रघुनाथ आंबवणे हे करतात. त्यांचे मुक्तार मंदिरासाठी खूप मोठे योगदान आहे.

मारूती मंदिर

मुख्य मंदिराच्या उत्तरेला दक्षिण मुखी मारूती मंदिर असुन अत्यंत अप्रातिम अशी मारूती रायाची भव्य मुर्ती आहे. इतकी सुबक मुर्ती इतरत्र कोठेही नाही.

पुर्वी मारूतीची लहान मुर्ती होती. ती मुर्ती पोखरी ता.आंबेगावा येथील लोकांनी चोरून नेली. व वैदवाडीच्या उत्तरेला असलेल्या बनात त्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आजही ही मुर्ती आपणास त्या ठिकाणी पहायला मिळेल.

तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मंदोशीच्या ग्रामस्थांना समजले की मारूतीरायाची मुर्ती चोरी झाली आहे. तेव्हा लोकांनी भल्या मोठ्या दगडावर सुंदर अशी मुर्ती कोरून घेतली.जी कोणच चोरून नेऊ शकत नाही.

कळमजा

मुख्य मंदिराच्या डाव्या बाजुला कळमजाईचे छोटेसे मंदिर आहे.

शिवाय कळमजाईचे मुख्य ठाणे हे वर डोंगरावर जंगलात आहे.हे मंदिर भिवंडीकर व ग्रामस्थांच्या सहयोगातुन झाले आहे. ह्या मंदिराच्या बांधकामासाठी श्री.लक्ष्मण चिमाजी सुतार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मी स्वतः सिमेंटच्या व वाळूच्या गोणी मोटारसायकल वरून मंदिर बांधकामाच्या ठिकाणी पोहचवल्या आहेत. परंतु आता जमीन मालकाने जमीन सुधारण्याच्या नावाखाली हे मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त केले आहे.

कनीरबाबा

कनीरबाबा हे ठाणं मंदोशीच्या वरच्या वाडीत नविन नाव (केळेवाडी) येथील जंगलात आहे.

कनीरबाबा हा देव म्हणजे एक मोठा दगड आहे.अतिशय गरीब असा हा देव आहे. डोळ्यांना इजा झाली.डोळ्यात फुल पडले किंवा डोळ्यांविषयी काही आजार झाले तर कनीरबाबाचे दर्शन घेऊन जाळीच्या पानात जाळीचा काटा खुपसुन कनीरबाबा असलेल्या दगडात खोचायचा व नवस करायचा. देव नवसाला पावतो.

काही लोक नारळ फोडायचे. व गुळभाताचा नैवेद्य द्यायचे. तर काही चांदीचे पाणी दिलेल्या पत्र्याचे डोळे,नारळ व गुळभाताचा नैवेद्य द्यायचे. परंतू १००% गुण यायचाच. याची मी स्वतः अनुभुती घेतलेली आहे.

वेताळ

भुतांचा राजा म्हणजे वेताळ हे अगदी छोटेसे मंदिर काळभैरव मंदिराच्या उजव्या बाजूला आहे.

बाळाव

मंदिराच्या उजव्या बाजूला थोड्याशा दुर अंतरावर हा दे आहे.पुर्वी लोकांना किंवा लहान मुलांना खोकला झाल्यास बाळाव देवाला गुळभाताचा नवस करत.

सत्या

बाळावच्या दक्षिणेस थोड्या अंतरावर सट्या देव आहे.पुर्वी कुणाला भाजल्यास या देवाला गुळभाताचा व पाणी भरलेला नारळ असा नवस करत.

देआई

दे आई हे वडाचीवाडी (हुरसाळेवाडी) येथे टोकावड्याला जाणा-या रस्त्यावर आहे. पुर्वी येथे मंदिर नव्हते.

यात्रा झाल्यावर येणा-या मंगळवारी गावातील सर्व वाड्यावस्त्यांचे लोक बायकांपोरांसह गोठणीवर जमत.

ढोलाच्या गजरात लोकांची भव्य मिरवणूक देआईकडे निघे.देवजी बांगर,रामजी तळपे,बबन गोडे मा.सरपंच हे उत्तम ढोल वादक होते. तेथे गेल्यावर गावच्या वतीने देवीची शेंदुर व तेल लावून महापुजा करत. ही पुजा करत असताना कै. नकाबाई जढर यांच्या अंगात देवीचा संचार होई.

जुने जानते लोक देवी पुढे पदर पसरत.देवीची म्हणजेच भक्तीनीचे लुगडे व चोळी देऊन बोळवन करत.यालाच देवी बोळवने म्हणत. हा संपुर्ण खर्च गावचा असे.त्यानंतर नारळ फोडले जात. प्रसाद वाटला जाई.

त्यावेळी हे सर्व अनुभवतांना खुप आनंद होई.त्या निमित्ताने लोक एकत्र येत.भेटीगाठी होत. चहापाणी होई. परंतु आता काळ बदालला.पुर्वीच्या साध्या- सुध्या आजारांची जागा आता डायबेटीस, ब्लडप्रेशर, कँन्सर, हार्टअँटक,पँरेलीसेस यांनी घेतली.लोकांचे आयुष्य कमी कमी होत चालले. एकमेकांशी संवाद हरवला.

या मंदिराच्या जिर्णोद्धार करण्याचे काम श्री.दत्तात्रय आंबेकर (अध्यक्ष )श्री.भगवानराव हुरसाळे (उपाध्यक्ष) श्री.गणेश हुरसाळे (सचीव) श्री.अंकुश हुरसाळे (खजीनदार) सर्व देआई प्रतिष्ठान मंदोशी व सर्व संचालक यांनी केली. बंद पडलेले व ग्रामस्थांकडून दुर्लक्षित झालेली देवी मंदिराच्या रुपाने पुन्हा वलयांकित झाली.

या सर्वानी भजन,प्रवचन किर्तन, हळदीकुंकू, मोफत आरोग्य शिबीर,झाडे वाटप इत्यादी उपक्रम राबवून एकेकाळचे गतवैभव देवीस पुन्हा मिळवून दिले.देवीच्या अशिर्वादाने सर्वांचे आयुष्य व प्रगती चांगली चालू आहे.

रूढी व परंपरा

श्री.काळभैरवनाथ देवस्थान अतिशय कडक असल्यामुळे मंदिराच्या परीसरामध्ये कुनीही मद्यपान करून जात नाही अद्यापही ही परंपरा टिकुन आहे.

त्याचप्रमाणे पायातील चप्पल/ पायतान मंदिरापासुन २०० फुट बाहेर काढाव्या लागतात.

स्रियांना मंदिरात अथवा मंडपात दर्शन घेणे निशिद्ध मानले जाते.

मात्र यात्रेच्या दिवशी स्रियां सभामंडपातून दर्शन घेऊ शकतात.

गावातील लोक जेव्हा मंदिरात दर्शनासाठी जातात तेव्हा अंघोळ करून व धुतलेली कपडे घालूनच मंदिरात प्रवेश करतात.अन्यथा बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते.

देवाला होळी आणि गुढीपाडव्यालाच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.इतर वेळी नारळ फोडतात.

देवाच्या गाभाऱ्यात भगताशिवाय इतर कोणालाही जाण्यास निश्चिद्ध मानले जाते.तेथे जाण्यास कोणाचेही धाडस होत नाही.

देवाची सकाळ व संध्याकाळ दिवाबत्ती करून पुजा होते.

मंदिरात काळी कपडे घालून जाणे निशिद्ध मानले जाते. शक्यतो गावकरी काळे कपडे घालतच नाहीत,

देवाला सकाळी केलेला पाण्याचा जलाभिषेक प्रिय असतो.

देवाचा वार रविवार व गुरूवार मानला जातो. तथापि रविवारी मोठ्या प्रमाणावर लोक दर्शनासाठी गर्दी करतात.

सकाळी १०.००वा.पर्यत घेतलेले दर्शन फलदायी ठरते.त्या कावेळी देवाच्या मुर्तीमधील तेजोवलय अतिशय प्रसन्न दिसते.इतर वेळी तसे दिसत नाही.सांगण्याचा मुद्दा असा की सकाळी देव मुर्तीमध्ये स्थित असतो.

दर रविवारी काही समस्याने ग्रस्त असलेले लोक भगताडे आपली समस्या मांडतात.भगत देवाच्या मुर्तीवर डाव्या व उजव्या बाजुला चाफ्याच्या कळ्या लावून कौल मागतो.

गावात कोणाचेही महत्त्वाचे काम असल्यास देवाकडे कौल लावून देवाची मान्यता घेण्याची पद्धत आहे.

दर रविवारी व गुरूवारी देवाच्या मुर्तीला तीळाच्या तेलाचा अभिषेक करतात.(इतर दिवशी नाही.) यालाच देवास माजने करणे म्हणतात,

यात्रेच्या दिवशी देवास नारळ फोडतात. नारळातील खोब-याचे तुकडे व गुळ प्रसाद म्हणुन भाविक भक्तांना वाटतात.यालाच शेरणी म्हणतात.

यात्रेला घरोघरी पुरणपोळी करतात. 

देवाला कोंबडा/ बक-यांचा बळी देतात. तरी सदरचा नैवेद्य मदिरात/सभामंडपात घेऊन जात नाहीत.निशिद्ध आहे. 

श्री.भैरवनाथ मंदिर प्रेक्षणीय स्थळ 

श्री काळभैरवनाथाच्या उत्तर पूर्व दिशेला भीमाशंकर ला जाणारा अतिशय सुंदर असा घाट रस्ता आहे. हिरवेगार डोंगर, ठिकठिकाणी असलेले धबधबे आणि त्यात मधून नागमोडी वळणे घेत असलेला सुंदर असा डांबरी रस्ता हे पावसाळ्यात एक विलोभनीय दृश्य असते.

या ठिकाणी जून ते सप्टेंबर असा चार महिने पाऊस पडतो. त्यामुळे ओढे नाले, धबधबे ओसंडून वाहत असतात.

मंदिराच्या समोरच नदीसारखा ओढा आहे. एवढ्याला आठ ते नऊ महिने पाणी असते. शिवाय मंदिराच्या पाठीमागे खूप मोठा धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून पर्यटक येत असतात.

मंदिराच्या समोर खूप मोठी विहीर असून बाराही महिने पाणी असते. शिवाय मंदिराच्या शेजारी दोन मोठे सभा मंडप असल्यामुळे भाविकांची निवाऱ्याची सोय झाली आहे.

मंदिराच्या आसपास करवंदाच्या जाळी, आंबे व जांभूळ हे वृक्ष असल्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा लोकांची गर्दी असते.

मंदोशी गाव ही धबधब्यासाठी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे 

त्यामुळे लांब लांबून पर्यटक सतत येत असतात. त्याचप्रमाणे दर रविवारी श्री काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी सुद्धा खूप लांबून लोक येत असतात. सतत वर्दळ चालू असते.

लेखक :- श्री.रामदास तळपे


पर्यटनाला जाताना मंदोशी घाटातील श्री.विशाल गवारी यांच्या हॉटेल निसर्गला नक्की भेट द्या.
                  संपर्क :-7378763052










शंकर दादा

गावी यात्रेच्या हंगामात कुस्त्यांचे जंगी आखाडे पहाण्यासाठी गावोगावी जाणे ही वेगळीच मजा असायची. जवळपासच्या गावांच्या आखाड्याला गावातील पंधरावीस जण हमखास असायचे.परंतू खुप दुरच्या गावचा आखाडा असेल तर जाणे टाळत.

एकदा असाच निवांत बसलो असताना माझ्या आत्याचा मुलगा शंकरदादा वनघरे (डेहणे )आला. आणि मला म्हणाला.

उद्या माझ्याबरोबर घोटवडी गावच्या कुस्त्यांच्या आखाड्याला येशील कामी म्हणालो. तसेही मला काही काम नाही आणि मी घोटवडी गाव पाहिले नाही. निदान गाव तरी पहाता येईल.जाऊ आपण.

आजुन कुणी येणार असेल तर बघ.मी त्याला म्हणालो.

शंकरदादा हा १९८५ ते १९९३ या काळात पश्चिम भागात एक नामांकित पहिलवान होता.भागात त्याचा दरारा होता.पानाला चुना लावायच्या आत तो समोरच्या पहिलवानाला आस्मानातील चांदण्या मोजायला लावायचा.असा त्याचा खेळ होता.

दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वा.आम्ही दोघे पायवाटेने,रानामाळातुन पायवाटेने दरमजल करीत घोटवडीच्या दिशेने निघालो.पायवाटेने जात असताना वाटेच्या अगदी कडेला घर असलेल्या श्री.काळुराम भवारी यांचे दारातील मांडवात विश्रांतीसाठी थांबलो व बाहेरूनच पाणी मागीतले.श्री.भवारी यांच्या पत्नीचे माहेर आमच्या गावचे होते. सासुरवाशीनीला माहेरचे कुणीही भेटले तरी किती आनंद होतो हे सांगावयास नलगे.त्यांनी पाणी दिल्यावर आम्हा दोघांनाही जेवण्याचा आग्रह केला.आम्हाला दोघांनाही तशी खुपच भुक लागली होती.कारण आम्ही दोघेही जेवण न करताच निघालो होतो.चट आखाड्याला भात खाता येईल हा विचार केलेला.

प्रथम आम्ही नको नकोच म्हणालो.परंतु मनातुन जेवायची इच्छा होतीच. 

अरे जेवा थोडंथोडं? मटन आहे.

मटन म्हटल्यावर आम्ही बसलोच जेवायला.

पोटभर जेवल्यावर आमचा घोटवडीच्या दिशेने प्रवास सुरू झाला.उन्हातान्हातुन,डोंगरवाटेने कपाळावरचा घाम पुसत आम्ही चाललो होतो.उन मी म्हणत होतं,पायवाटेने अनेक लोक आखाडा पाहण्यासाठी चालले होते.ओळखीच्या लोकांबरोबर आम्ही गप्पा मारत एकदाचे घोटवडी गावात पोहचलो.

तेथे मंदिराच्या बाजुला भारूडाचा कार्यक्रम चालू होता. लोक भर उन्हात बसुन भारूडाचे वगनाट्य बघत होते.

काहीजण बर्फाच्या गारेगारी खात होते.स्रीया पाव्हण्यारावळ्या स्रीयांना कासाराकडुन बांगड्या भरून घेत होत्या. रेवड्या, शेंगोळी,खेळणी घेत होत्या.

थोड्याच वेळात भारूडाचा कार्यक्रम संपला.माईकवार अनाउंसमेंट झाली.सर्व यात्रेकरूंनी आखाड्याच्या जेवणासाठी बसुन घ्यायचे आहे.

अनाउंसमेंट झाल्याबरोबर आखाड्याला आलेले लोक तिकडे धावले.झाडाखाली विसाव्याला बसलेले,लोक झाडाखाली झोपलेल्या लोकांना उठवू लागले.लोकांचा लोंढा आखाड्याच्या जेवणाकडे चालू लागला.

भात खाचरांत,मोठमोठया ढेकळांतून लोकांच्या पंक्ती बसल्या.वडाच्या पानांचा पत्रावळीसारखा आकार करून लोक भात येण्याची वाट पाहू लागले.शेवटी एकदाच्या भाताच्या व आमटीच्या बादल्या घेऊन वाढपे लोक पंक्तीमधुन वाढू लागले.श्लोक झाल्यावर लोक आमटी भातात कालवुन खाऊ लागले.वर उन्हाचा कडाक्यात खाली तिखट आमटीचा ठसका व जीर तांदळाच्या भातावर लोक तुटून पडले.चारचारदा वाढपे बादल्या घेऊन वाढत होते.हाश्यहुश्य करत लोक जेवत होते.

च्यायला ! इथे एखादेतरी झाड असते तर झाडाच्या सावलीखाली निवांत जेवता आले असते असे विचार अनेकांच्या मनात तरळून जात होते.

शेवटी एकदाचे आम्ही जेवन करून आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसलो.

काही पोरांनी झाडाखाली पत्यांचा डाव मांडला.पोरं तीन पत्ती खेळू लागली.काहीजण गलीवर चिल्लर नाणी फेकून खेळू लागली.तर काहीजण वामकुक्षीसाठी सावलीला लवंडले.

तासाभरानंतर सनई,चौघडे वाजू लागले.

अरे उठा... जागे व्हा...

आखाडा निघाला. झोपलेल्यांना जागी करत लोक बोलू लागले. तीनपत्ती,गलीवरचे चिल्लर खेळ बंद करून लोक आखाड्याच्या दिशेने चालू लागले.

कुस्त्यांची दंगल

आखाडा सुरू झाला.सुरूवातीला लहान मुलांच्या कुस्त्या चालू झाल्या.आखाड्यात रेवड्या उधळल्या गेल्या.पोर शर्ट काढुन आखाड्यात एकमेकांना भिडू लागली.तार काही पोरं नुसतीच रेवड्या गोळा करू लागली.एकाच वेळी लहान पोरांच्या पंधरा वीस कुस्त्या सुरू झाल्या.एकच गलका झाला.नुसताच धुराळा...

सुरूवातीला दहा रूपयापासुन कुस्त्या चालू झाल्या.हळुहळू आखाड्याला रंग चढू लागला.पंचांच्या निर्णयावरून वाद झडू लागले.

शेवटी एकदा एका नामांकित मल्लावर म्हैस बक्षिस असलेली कुस्ती जाहिर झाली.कसलेला पहिलवान बघुन अनेकांनी आंदाज घेतला.व आपल्या आवाक्यात नाही हे ओळखुन अनेक जण जागीच थिजले.

इतकावेळ शंकरदादाही अंदाज करीत होता.समोर धरलेल्या पहिलवानापुढे शंकरदादा खुपच खुजा वाटत होता.आणि अचानक शंकरदादा उठला व समोर धरलेल्या पहिलवानापुढे जाऊन म्हणाला मी खेळतो याच्याबरोबर..

कुस्ती लावनारे श्री.मारूती धंद्रे बोलले.अरे तुझा याच्या बरोबर जोड आहे काय? मरायचय का तुला? समोरचा पहिलवान केवढा तु केवढा? तुझा पाडाव लागनार नाही! चल जागेवर जाऊन बस ?

हे ऐकून मलाही बरं वाटलं.खरंच शंकरदादा त्या पहिलवानापुढे अगदी खुजा व तब्येतीने खुपच बारीक होता.

शंकरदादा परत माघारी फिरला.तेवढ्यात खाली बसलेले पब्लीकमध्ये असणारा एकजण ओरडला.

होऊद्या या दोघांची कुस्ती तुम्हाला काय अडचण आहे?तो खेळायला तायार आहे ना ? नाहीतरी दुसरा कुनीच पहिलवान तायार नाहीय.

खाली बसलेला समाज ही कुस्ती झालीच पाहीजे म्हणून एकच गलका केला.

आणि शंकर दादाची कुस्ती लागली 

शेवटी गावकरी व धंद्रेसाहेबांची चर्चा झाली व एकदाची कुस्ती लागली.

शंकरदादाला मी खुपच दुषणं देऊ लागलो. तुला अकलेचा भाग आहे का? मरायचय का तुला त्याच्यासमोर? असे मी त्याला बोलू लागलो.

तो एवढचं बोलायचा गप तुला काय कळतयं ? पडलो तर पडलो.

दोनही पहिलवानांनी काच्या केला.आपापल्या देवाला नमस्कार केला.व दोघेही मैदानात उतरले.

जय बजरंग बली अशी गर्जना करीत‚ एका पायावर नाचत‚ जांग कसलेला समोरचा पैलवान मैदानभर फिरला. त्याची तयारी दाबजोर होती.दुसऱ्या बाजूनं शंकरदादाही ‘बजरंग बली कीऽ जय.’ असं गर्जत एका पायावर नाचत मैदानात उतरला. कळकाच्या दांड्यासमोर तुरकाठी दिसावी तसा शंकरदादा त्या पहिलवानापुढे किरकोळ दिसू लागला.अनेक जण हळहळले. हा हा म्हणता हा पहिलवान शंकरदादाला पाडणार हे सगळ्या लोकांना उघड दिसत होतं.

दोन पहिलवानांची खडाखडी 

पाच-दहा मिनिटं झाली. दोन्ही पैलवानांची मैदानात खडाखडी चालली होती. समोरच्या पहिलवानाने शंकरदादाला पटात घेतलं. कौशल्यानं शंकरदादानं पट फोडला.‘हे रे माज्या भाद्दरा!’ धंद्रे साहेब ओरडले.आपण कुस्त्या लावायला उभे आहोत हेच ते विसरले होते. शंकरदादा मैदानात एवढा वेळ कधीच कुचमला नव्हता. दमछाकीला तो टिकणं शक्यच नव्हतं. शंकरदादानं त्वरेने काही केलं तरच जमणार होतं. 

शंकरदादा सावध झाला. गळ्यात हात चढवायला चालून येणारा समोरचा मल्ल बघून‚ नाकात माती शिरल्याच्या आविर्भावानं चिमटी लावून त्यानं नाक शिंकरलं. 

तो ओला हात ढालीसारखा तसाच पुढं धरला. त्याच्या घाणेरड्या ओल्या हाताचा स्पर्श होणार म्हणून बिचकलेला पहिलवान आठ्या घालीत एक पाऊल मागं हटला.थोडावेळ त्याचं चित्त चलबिचल झालं. 

तेवढ्यात शंकरदादानं चपळाई करून त्याच्या दोन्ही पायांना आपल्या पायांची गोफणीमिठी घातली.आणि दार ढकलावं तसं त्याला नुसतं मागं ढकललं. पायाला आढा बसलेला धिप्पाड रपहिलवान ‘आकडीच्या’ डावावर हां हां म्हणता सरळ मैदानात उताणा झाला.

शंकरदादानं त्याला दिवसा चांदण्या मोजायला लावल्या. ‘बजरंग बली कीऽ जय!’ फटाकड्यासारखी उसळी घेत शंकरदादा मैदानभर बेहोश होऊन नाचू लागला.

म्हशी वरची कुस्ती जिंकली बक्षिसांची खैरात 

रोख बक्षिसांची तर नुसती खैरात झाली.

म्हशीवर कुस्ती जिंकली असल्यामुळे एका गावक-याने आम्हाला गोठ्यात बांधलेली म्हैस सोडून आमच्या हवाली केली.

अरेरे... काय ह्या म्हशीची अवस्था  

म्हशीला बघुन आम्ही टरकलोच.म्हशीचा अगदी सांगाडा दिसत होता.म्हैस घरी न्यावी की नाही याबाबत आमच्यात चलबीचल झाली. परंतू ही बक्षीस मिळालेली म्हैस आहे.न्यावीच लागेल असा विचार करून आम्ही दोघे म्हशीला घेऊन परत आल्या वाटेने घरी चालू लागलो.

डेहणे गावच्या हद्दीत सातक्यात (रानाचे नांव ) आल्यावर म्हैस जे बसली ती उठेचना. खुप प्रयत्न करूनही म्हैस काही उठेना.आम्ही मग तसेच घरी आलो.

दुसऱ्या दिवशी आम्ही वाळलेल्या गवताच्या पेंढ्या व पाणी घेऊन गेलो.तर तेथे म्हैस बसलेलीच.गेल्यावर म्हशीला गवत टाकले.पाणी पाजले..म्हशीने आम्ही नेलेले सर्व गवत खाल्ले.परंतु म्हैस काही उठली नाही.आज उठेल उद्या उठेल असे करता करता आठ दिवस झाले तरीही म्हैस काही उठली नाही.

शेवटी आम्ही सात आठ लोकांना घेऊन गेलो.लाकडाची दंडाळी घालून म्हशीला उठवले.सुरूवातीला म्हैस पायच धरेना..आता काय करायचे असा प्रश्न उभा राहिला..

सल्ला फायद्यात पडला 

कुणीतरी सल्ला दिला. म्हशीला काही दिवस पेंड,सुग्रास चालू करा.आपोआप तिच्यात उठायचे बळ येईल.असा सल्ला देऊन लोक घरी आले.

शंकरदादा दररोज म्हशीला पेंड,सुग्रास.गवत देत होता.पाणी पाजत होता.आणि अश्चर्याची गोष्ट तीन दिवसात म्हैस ऊभी राहीली.शंकरदादाला तो पहिलवान पाडल्यापेक्षा जास्त आनंद झाला.

अजुन चार दिवसांनी म्हैस स्वतःहून चालत घरी आली. हीच म्हैस पुढे अनेक वर्ष शंकरदादाकडे होती. म्हशीने दूध देऊन शंकरदादाची पुढे सेवा केली.

<center><a href="http://marathibloglist.blogspot.in/" target="_blank"><img src="https://i.ibb.co/N3wkPrP/120-8abc.png" alt="120-8abc" border="0" /></a></center>

रामदास तळपे





गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस