श्रावण महिन्यातील ग्रामीण जीवन




श्रावण महिन्यातील ग्रामीण जीवन

जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झालेला असायचा. भाताची पेरणी केली जायची. थोड्याफार प्रमाणात पाऊस सुरू असायचा. आणि मग अशातच ग्रामीण भागातील स्रीयांची लगबग सुरू व्हायची. ती म्हणजे घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत कुंपण करणे. घरातील लहान मोठ्यांच्या मदतीने जंगलात जाऊन टनटनी, निरगुडी, रामेठा अशाच अंगठ्या एवढ्या परंतु उंच झाडाची लाकडे आणली जात. त्याला खाकर असे म्हणतात. 

घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत जमीन सपाट करून त्यावर शेणखत टाकले जाई.ते मातीत मिसळून संपूर्ण जागा सपाट केली जाई. मधील जागा उंच ठेऊन त्यावर पावसाळी आळूचे कंद लावले जात. ती जागा थोडे उंच ठेवतात आणि  बाकीची जागा पाणी निघून जाण्यासाठी विशिष्ट पद्धतीने तयार केली जाते. 

या कुंपणाला पश्चिम भागात वाडगे असेही म्हटले जाते. या वाड्ग्यात पावसाळी आळु (आळवड) भोपळ्याचे (डांगर) बी, दोडक्याचे बी, घेवडा आणि घोसाळेचे बी तसेच कारले आणि काकडीचे बी पेरले जाई. गवती चहा लावला जाई.  त्यानंतर छान पैकी कुंपण केले जाई .हे सर्व लावल्यावर थोड्याच दिवसात वाडग्यातील अळूच्या कंदांना छान पैकी कोंब फुटत. पेरलेले सर्व बी उतरून येई. आम्हा लहान मुलांना याची प्रचंड उत्सुकता असे की उतरून आलेला कोंब हा कोणत्या भाजीचा आहे. यावरून आमच्या पैजा लागत. कोण काकडीचा तर कोण भोपळ्याचा, दोडक्याचा ,कारल्याचा यावरून वादविवाद व्हायचे. जास्तच गोंगाट झाल्यावर घरातील बायामाणसे आमच्या जवळ येत व आम्हाला चांगलेच दटावत. अजिबात वाडग्यात जाऊ नका.अशी तंबी दिली जाई. 

पूर्वी पावसाळ्यात त्याकाळात शासनाकडून प्रत्येक शाळेला प्रत्येक विद्यार्थ्यांना पावसाळ्यात दोन झाडे लावण्याबाबत परिपत्रक आलेले असायचे. त्यानुसार गुरुजी आम्हाला प्रत्येकाने दोन झाडे लावावी. अशा सूचना देत. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अभ्यासापेक्षा झाडे लावन्यावर जास्त भर देत. प्रत्येक जण आपापल्या शेतात किंवा घरामागील वाडग्यात आंबा आणि जांभूळ ही दोन झाडे सर्रास पणे लावायचे. दुसऱ्या दिवशी प्रत्येकाला गुरुजी किती झाडे लावली याबाबत विचारून यादी तयार करायचे. व तालुक्याला पाठवून द्यायचे. आम्ही मुले दररोज झाडांची किती वाढ झाली आहे हे पाहायचो. हे साधारण पंधरा ते वीस दिवस चालायचे. नंतर उत्साह मावळून जायचा.

शाळेत पूर्वी प्रत्येक मुलाला एक खाकी चड्डी आणि मांजर पाट पांढरा शर्ट मिळायचा.तर मुलींना एक निळी पांढरी फ्रॉक मिळायची. शाळेत जेव्हा कपडे वाटप व्हायचे तेव्हा शाळेत न येणारे विद्यार्थी सुद्धा शाळेत हजेरी लावायचे. आणि कपडे मिळताच पुन्हा गैरहजर राहायचे. या कपड्यांचे प्रत्येक मुलाला नवीन नवीन खूप अप्रूप वाटायचे. कपडे नवीन परंतू पावसाळ्याचे दिवस घरात माळ्यावर पेंढा (वैरण) सरपण व गोव-या साठवल्यामुळे घरात खुप धुर व्हायचा आणि बाहेर गाळ व पाऊस यामुळे हे कपडे आठ दहा दिवसात नवे आहेत यावर कोणाचाच विश्वास बसत नसे. त्याच प्रमाणे त्याची क्वालिटी अत्यंत खराब असल्यामुळे हे कपडे नवीन वाटायची नाहीत. नंतर या कपड्यांविषयी असलेली नवलाई निघून जायची.

पावसाळ्यात खुप जण माळावरून खेकडे (किरवे) आणायचे. प्रत्येकाकडे रात्री खेकडाचे कालवन असायचे.कधीकधी लोक भरलेल्या खेकडांचे कालवन करायचे.खेकडांच्या कवटात हुलग्याचे,बाजरीचे किंवा हरबऱ्याचे पीठ मिठ मिरची व मसाल्यासह घालून  त्याचे कालवण बनवले जाते.त्याची चव न्यारीच असते.

हे सर्व झाल्यानंतर यायचा श्रावण महिना.श्रावण महिन्यात प्रत्येक घरात मोठ्या माणसांना उपवास असायचे.उपवास असल्यावर दुपारपासूनच उपवासाची तयारी सुरू व्हायची.

वाडग्यातून आळूची पाने आनायची. ती स्वच्छ धुऊन त्यावर बाजरीचे किंवा बेसन पीठ मीठ-मसाला लावून त्याचे पाचवड केले जात. घरात त्यावेळी खूप माणसे असायची.(एकत्र कुटुंबपध्दती) त्यानुसार आळूचे पातवडही खूप करावे लागत. पातवड झाल्यावर आंघोळीच्या मोठ्या पातेल्यात थोडा पेंढा ठेवायचा. त्यात पाणी घालायचे व त्यावर चाळण व भांड्यात पातवड ठेवले जायचे .आणि हे पातेले चुलीवर ठेवून खाली खुप जाळ केला जायचा. वर परात ठेवायची.अशाप्रकारे पातवड बनवत.

काही घरांमध्ये पातवडाच्या वड्या केल्या जात तर काही ठिकाणी तसेच पातवड खाल्ले जायचे.या भाजीचा गिरंगीटा सुध्दा केला जाई. 

श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस पडायचा. ओढ्या नाल्यांना स्वच्छ पांढरे शुभ्र पाणी असायचे. गावात ठिकठिकाणी रात्री भजने असायची. मोठे धार्मिक वातावरण असायचे. दर सोमवारी भाविक मोरगिरी मार्गे कोटेश्वराचे दर्शन घेऊन भीमाशंकरला जात.

आम्ही लहानपणी कोटेश्वर मार्गे भोरगिरी वरून भीमाशंकरला गेलेलो आहे.तेव्हा पायी चालण्यात खूप मजा वाटायची. भीमाशंकर ला गेल्यावर तिथल्या कुंडात पाण्यात खूप मजा वाटायची भीमाशंकरला भाविकांची खूप गर्दी असायची. दर्शन झाल्यावर लाह्या आणि खडीसाखर घेऊन आम्ही पुन्हा कोटेश्वर मार्गे भोरगिरी वरून घरी जायचो, तेव्हा प्रत्येक जण स्वच्छंदी असायचा. कोणालाही कसलाही कामाचा किंवा कशाचाच ताण नसायचा. त्यामुळे त्यावेळी कुणीही आजारी पडत नसे. कुणालाही रक्तदाब,डायबेटीस नव्हता. हृदय विकार नव्हता. मुळव्याध नव्हते.पोटाचे आजार नव्हते कारण त्यावेळी प्रत्येक जण निसर्गाच्या सानिध्यात राहायचा.

परंतु आता मात्र आपण आपल्या कामामुळे निसर्गापासून दूर गेलो त्यामुळे आपल्याला नाना आजार जडले. चाळिशीत असलेला माणूस जणू साठ पासष्ठ वर्षाचा म्हातारा वाटतो हे उदाहरण आहे. म्हणूनच गड्या आपुला गाव बरा  हे सूत्र प्रत्येकाने जपले पाहिजे, गावाला गेले पाहिजे, आपण लहानपणी ज्या ठिकाणी ज्या माळावर ज्या रानात अनेक वेळा गेलो त्या ठिकाणी आपण गेलो पाहिजे. पहा आपणाला एक वेगळाच आनंद मिळेल. आणि बालपणीच्या आठवणी दाटून येतील एवढे मात्र खरे. 


श्रावण महिना ग्रंथ वाचन

पूर्वी सात जूनला शाळा सुरू व्हायच्या. आकाशात ढग काळे काळे ढगही घोगवायला सुरुवात व्हायची. तोपर्यंत पश्चिम भागातील सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या असायच्या. पेरण्या झाल्यावर सात आठ दिवसात नियमित पावसाला सुरुवात व्हायची. प्रसंगी खूप पाऊस पडायचा. नदीच्या पलीकडे जायला उतार व्हायचा नाही.गुरेढोरे घरातच बांधून ठेवावी लागायची. 

चार-पाच दिवस सतत धुवाधार पाऊस पडायचा. ओढे नाले दुथडी भरुन वहायचे. नदी नाल्यांना पूर यायचा. सारा गाव ओढ्याला किंवा नदीला आलेला पूर पाहायला जायचे.

पुरामध्ये रानातून झाडाचे मोठेच्या मोठे ओंडके वाहून यायचे. वाहून आलेले कोंडके क्षणात गायब व्हायचे. तर थोड्याच वेळात परत दूरवर वाहत गेलेली दिसायचे. हे पाहताना मोठी गंमत वाटायची.

अशातच गावातील एखादा पट्टीचा पोहणारा अंगातील कपडे काढायचा. त्याला जोडी कधीतरी आणखी एखादा असायचा. त्यांना एवढ्या मोठ्या पुरात उडी घेऊ नको असे जुने जाणते लोक सांगायचे. परंतु पोहणारे ऐकेल तर शपथ ! त्याला आणखी चेव यायचा. 

आणि अशा पुरतच तो उडी मारायचा. क्षणात दिसेनासा व्हायचा.पाहणाऱ्याच्या ह्रदयाचे ठोके चुकायचे. एकच थरकाप व्हायचा. लोक श्वास रोखून पाहू लागायचे. काहीजण देवाला हात जोडायचे.

आणि इतक्यात पोहणा-याचे दूरवर छोटेसे डोके दिसायचे. बघणाऱ्यांच्या जीवात जीव यायचा. पोहणारा पलीकडे जायचा. थोडावेळ थांबून परत पुरामध्ये उडी मारून अलीकडे यायचा. बरेच जण त्याचे कौतुक करायचे. त्यावेळी हिंदकेसरी पुरस्कार मिळाल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायचे. 

थोडा पाऊस वाढल्यावर अनेक जणांच्या शेतामध्ये नदी ओढे नाल्यांनी चढणीचे मासे वर चढायचे. ते मासे शेतात दूरवर लांब जायचे. लोक मासे पकडण्यासाठी येंडी घेऊन नदीच्या काठाला इकडून तिकडे फिरताना दिसायचे, उगाचच एकमेकांना किती मासे पकडले आहेत असे विचारायचे. अजूनही मोठा पाऊस झाला तर लोक मासे पकडायला नदीवर जातात. 

हे सर्व करत असताना भाताची रोपे भात लावणी करायला तयार असतात. मग सुरू होते अवनी. अवनीच्या कालावधीत संपूर्ण गावात कुणीच माणूस दिसत नाही. सर्वजण शेतात भाताची आवणी करायला गेलेले असतात. 

भातशेतीची आवणी झाल्यावर काही लोक नाचणी व सव्याची अवनी करायचे. आता नाचणी आणि सावा पीक घेताना कोणी दिसत नाही. 
बऱ्याच शेतकऱ्यांचे अवणीचे कामे बऱ्यापैकी झालेले असते.
अशातच येतो श्रावण महिना. श्रावण महिन्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी. 

नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. स्त्रियांना दिवसभर उपवास असतो. त्या दिवशी अनेक स्रिया ज्वारी किंवा बाजरीच्या लाह्या व राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू गुळाचा पाक घालून करतात. हे लाडू आता करतात की नाही माहीत नाही परंतु हे लाडू फारच स्वादिष्ट असतात, एवढे मात्र खरे.. 

पंचमी झाल्यावर अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामे उरकली असायची.पावसाचा जोरही बर्‍यापैकी कमी झालेला असायचा. लोकांना गुरा ढोरा शिवाय काम नसायचे. सकाळी गवत कापून आनायचे.जेवण झाल्यावर कोणाच्या तरी येथे पत्त्यांचा डाव मांडून मेंढीकोट खेळत बसायचे, व दुपारी गुरे चारण्यासाठी रानात किंवा माळावर जायचे. एवढाच उद्योग असायचा. 

प्रत्येक गावात दोन-तीन जण हमखास त्यांच्या घरात नागपंचमी झाल्यावर धार्मिक ग्रंथ लावायचे. त्याकाळात नवनाथ,पांडवप्रताप, हरिविजय, रामविजय इत्यादी ग्रंथ सुरू करायचे. 
त्याकाळात करमणुकीची साधने नव्हती, गावात कुणाकडेही टीव्ही नव्हता, एखाद दोघांकडे फक्त रेडिओ असायचा. त्या रेडिओला एव्हरेडी कंपनीचे सेल असायचे. सेल संपल्यावर जवळजवळ रेडिओ बंद असायचा. घराच्या सर्व भिंती राखेने सारवल्या जायच्या. घरातील खालची जमीन शेणाने मस्तपैकी सारवून घेतली जायची, यासाठी शेजारीपाजारी बाया मदत करायच्या. 

त्यानंतर बाहेर ओटीवर चौरंग मांडला जायचा. रेशमी कापडात धार्मिक ग्रंथ ठेवला जायचा. शेजारी समई मांडलेली असायची. उदबत्त्या लावल्या जायच्या, संध्याकाळी जेवण झाल्यानंतर अनेक बाया व पुरुष ग्रंथ ऐकण्यासाठी जमायचे. एक जण वाचायला असायचा तर दुसरा ग्रंथांचा अर्थ समजावून सांगायचा, नवनाथ ग्रंथात नाथांच्या अनेक सुरस कथा देहभान विसरून ऐकल्या जायाच्या. त्यांच्याप्रमाणे मंत्र म्हणून आपल्यालाही नाथा सारखे करता येईल काय ? यासाठी आम्ही काहीजण त्यांच्यासारखे प्रयत्न करायचो. 

प्रत्येक ग्रंथ वाचल्यावर पुढे काय होणार याची प्रचंड उत्सुकता वाटायची. रामायण ग्रंथ ऐकायला खूप मजा यायची. आमच्याकडे श्री सुदाम बारवेकर मंदोशी हे ग्रंथ फार सुंदर व तारस्वरात वाचायचे.

आम्ही पण ग्रंथ वाचायचो पण प्रत्येकाला श्री सुदाम बारवेकर यांच्यासारखा ग्रंथ आपल्यालाही वाचायला यायला पाहिजे असे वाटायचे. अध्याय सांगायला आमच्याकडे श्री लक्ष्मण मोहन महाराज मंदोशी हे वेगळे संदर्भ देऊन ग्रंथांचे अर्थ सांगायचे.

आम्हाला या दोघांचा फार अभिमान वाटायचा. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे या जोडी सारखी ही त्यांची जोडी होती. गावातील अनेक बायामाणसे ग्रंथ ऐकायला येताना प्रसाद घेऊन यायच्या.
ग्रंथांचे पारायण संपल्यावर दररोज संध्याकाळी सर्वांना प्रसाद वाटला जायचा. प्रत्येक ग्रंथांमध्ये साधारण 40 अध्याय असायचे. 

हा कार्यक्रम जवळजवळ महिनाभर चालायचा. त्यामुळे चांगल्या प्रकारची करमणूक व्हायची. त्यानिमित्त लोक एकत्र यायचे. एकमेकांच्या सुखदुःखाची जाणीव व्हायची.  लोक एकमेकांना मदत करायचे. एकमेकांबद्दल प्रत्येकाला आपुलकी व प्रेम असायचे. 

एखाद्याच्या घरात कुठलाही सणवार किंवा काही विशिष्ट पदार्थ केला तर हमखास चार-पाच घरात हा पदार्थ दिला जायचा.
श्रावण महिना संपल्यानंतर ग्रंथांची समाप्ती असे. समाप्तीच्या दिवशी बाजारातून समाप्तीचा बाजार आणला जाई.

अनेक नातेवाईकांना पै पाहुण्यांना ग्रंथाच्या समाप्तीची आमंत्रण दिले जात. गावातील सर्व वाड्या-वस्त्यातील प्रत्येक घराला समाप्तीचे आमंत्रण दिले जाई.

सकाळपासून घरात मोठे धार्मिक वातावरण असे. चाफ्याची फुले व रानातील वेगवेगळी फुले आणून मुली त्यांच्या माळा बनवत. घरातील जमीन स्वच्छ सारवली जाई. नदीवरून कळशीत पाणी आणले जाई, खरोशी वरून बेल आणला जाई. शिरगाव वरून दिगू तात्या या ब्राह्मणाला आणले जाई.

गावातील सर्व जण समाप्तीच्या सार्वजनिक स्वयंपाकाला हातभार लावत. आमटी, भात व शाक भाजी हा जेवणाचा मेनू असे. संध्याकाळी शेवटचा ग्रंथ वाचून ग्रंथाची समाप्ती होई. त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा.

पोथी वाचल्यावर आरती वगैरे झाल्यावर लोकांना प्रसाद वाटला जाई. त्यानंतर जेवणाच्या पंगती बसत. त्यावेळची आमटी भात व शाकभाजीची चव अजूनही विसरता येण्यासारखी नाही.जेवण झाल्यानंतर आलेल्या पाहुण्यांना बिडी काडी पानसुपारी दिली जाई. आणि त्यानंतर भजनाचा कार्यक्रम सुरू होई.

अलंकापुरीने भजनाची सुरुवात होत असे. रात्री दोन वाजेपर्यंत भजन चालायचे. भजना वाल्यांना दोन वेळा चहा पाणी व्हायचे. तोपर्यंत लहान मुले झोपी गेलेली असत. 

असाच एकदा मी झोपी गेलेलो असताना स्वप्नात देव व राक्षसांचे तुंबळ युद्ध पहात असताना आईने अचानक मला जागे केले. तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. समाप्तीला आलेले पाहुणेरावळे 
एव्हाना निघून गेले होते. वडीलही शिक्षक असल्याने शाळेला निघून गेले होते. घरात आई आणि मीच असल्याने सर्व घर खायला उठले आहे असा भास होत होता.

रामदास तळपे


१९५५चा भारतीय फिल्मफेअर व बिना का गीतमाला

१९५५चा भारतीय  फिल्मफेअर आणि बिना का गीतमाला

1955 मध्ये दुसरा भारतीय फिल्मफेअर पुरस्कार हिंदी चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना जाहीर झाले. 

सहाय्यक अभिनेत्री चा पुरस्कार उषा किरण यांना "बागवान" या चित्रपटासाठी देण्यात आला. सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार डेव्हिड चौलकर यांना "बूट पॉलिश" या चित्रपटासाठी मिळाला. तर उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार हा एस डी बर्मन यांना  चित्रपट "टॅक्सी ड्रायव्हर " जाये तो जाये कहा, या चित्रपटासाठी मिळाला. उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार हा मीना कुमारी यांना "प्रणिता" या चित्रपटासाठी देण्यात आला. तर उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार भारत भूषण यांना "चैतन्य महाप्रभू" या चित्रपटासाठी मिळाला. उत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार  बिमल रॉय यांना "प्रणिता "या चित्रपटासाठी देण्यात आला. 1955 चा उत्कृष्ट चित्रपट "बूट पॉलिश" या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला.

1955 मध्ये श्री 420 ,नास्तिक, मुनीमजी, झनक झनक पायल बाजे, सीमा, बाप रे बाप व तांगेवाली असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी बिनाका गीतमाला या लोकप्रिय गाण्यांच्या मालिकेत श्री 420 मधील इचक दाना बिचक दाना हे लहान मुलांवरील गाणे अतिशय लोकप्रिय झाले.अजूनही  त्याची गोडी कमी झालेली नाही. 

श्री 420 या चित्रपटात राजकपूर आणि नर्गिस यांच्या प्रमुख भूमिका होत्या. शैलेंद्र यांची गीते तर शंकर-जयकिशन यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते. या चित्रपटातील मेरा जूता है जपानी हे गीत तेव्हा प्रचंड लोकप्रिय झाले. हे गीत मुकेशजी यांनी गायले होते.

त्याच प्रमाणे उडन खटोला या चित्रपटात शकील बदायुनी यांची गीतरचना तर नौशाद जी यांनी संगीत दिले होते. या चित्रपटात दिलीप कुमार व निम्मी यांची ची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेले चले आज तुम जहा से दूर के मुसाफिर हे दर्द भरे गाने लोकप्रिय झाले.

1955 मध्ये आलेल्या नस्तिक या चित्रपटात अजित यांची प्रमुख भूमिका होती. तर कवी प्रदीप यांची गीत रचना होती. संगीतकार श्री रामचंद्र यांनी या गीतांना स्वरसाज चढवला होता. या चित्रपटातील देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान हे गीत त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाले. 

त्याचवेळी प्रदर्शित झालेला मुनीमजी हा देवानंद आणि नलिनी जयवंत यांचा चित्रपट लोकप्रिय झाला. या चित्रपटाला साहिर लुधियानवी यांनी गीते लिहिली होती. तर एस डी बर्मन यांनी संगीत दिले होते. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील जीवन के सफर मे राही हे मिलते है जाने को हे अतिशय लोकप्रिय गीत बिनाका गीतमाला मध्ये धुमाकूळ घालत होते.अजूनही या गाण्याची ची गोडी कमी झालेली नाही. 

1955 मध्ये आलेल्या सीमा या चित्रपटातील गाणी शैलेंद्र यांनी लिहिली होती.तर शंकर-जयकिशन यांचे संगीत लाभले होते. प्रमुख भूमिका बलराज सहानी यांची होती. या चित्रपटातील मन्ना डे यांच्या आवाजातील तू प्यार का सागर है तेरे एक बंद के प्यासे हम हे गीत अतिशय लोकप्रिय झाले. 

1955 मधील अजून एक चित्रपट तो म्हणजे बाप रे बाप. या चित्रपटातील गाणी जा निसार अख्तर यांची गीतरचना तर ओ पी.नय्यर यांनी संगीत दिले होते. या चित्रपटातील आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील पिया पिया पिया मोरा जिया पुकारे, हम भी जी लेंगे सह्या संघ हे गीत त्याकाळात प्रचंड लोकप्रिय झाले. 

1955 मध्ये आलेल्या तांगेवाली या चित्रपटात अनिता गुप्ता, शम्मी कपूर आणि निरुपा राय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्रेम धवन यांची गीतरचना तर हेमंत कुमार यांनी संगीत दिले होते. हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील हलके हलके चलो सांवरे हे रोमँटिक गीत अतिशय असं सुंदर गायलेलं होतं.

याच वर्षात व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला झनक झनक पायल बाजे या चित्रपटात संध्या आणि गोपीकृष्णन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला हसरत जयपुरी यांची गीतरचना व वसंत देसाई यांनी संगीत दिले होते. या चित्रपटात हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांनी गीते गायली होती. हा संपूर्ण चित्रपट संगीत प्रधान असा होता. 

या चित्रपटातील नैन से नैन मिलाओ हे रोमॅण्टिक गीत त्यावेळी खूप लोकप्रिय झाले. या चित्रपटातील सर्वच गीते सुपर डुपर हीट होती. सर्व गीते या काळात बिनाका गीतमाला मध्ये हे प्रचंड लोकप्रिय झाली अद्यापही या गीतांची गोडी तसू भरही कमी झालेले नाही. 

ही गाणी आजही आपण यूट्यूब चॅनल आणि इतर दृक  माध्यमाच्या सहाय्याने पाहू किंवा शकतो ऐकू शकतो. ही गीते म्हणजे आपणा सर्वांना मिळालेली एक देणगीच म्हणावी लागेल. 
पुढील भागात 1956 मधील चित्रपटांचा आढावा घेऊ. धन्यवाद....



ग्रामीण भागातील नागपंचमी सण

ग्रामीण भागातील नागपंचमी सण ग्रामीण भागात पूर्वी व आतासुद्धा सणांना फार महत्व असते. हिंदू धर्मात पहिला सण नागपंचमी तर शेवटचा सण हा अक्षय तृतिया असतो..अक्षय तृतीया नंतर जवळ जवळ दोन अडीच महिने कोणताही सण नसतो. त्यामुळे ग्रामीण भागातील अबालवृद्ध नागपंचमी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात.

पूर्वीच्या काळात सणांबद्दल असलेली आतुरता आता तितकीशी राहिली नाही. पूर्वी नागपंचमी हा सण खूप उत्सवात साजरा केला जायचा. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात असतो.

पूर्वी भरपूर पाऊस पडायचा. शेतीभातीची कामे नागपंचमीच्या आधी जवळजवळ पूर्ण होत असत. शेतकऱ्यांना थोडासा विसावा मिळायचा.अशातच नागपंचमी यायची. 

नागपंचमीच्या दोन दिवस आधी नवीन लग्न झालेल्या नववधूला आपल्याला माहेरी घेऊन जाण्यासाठी कोणीतरी येईल याची त्या आतुरतेने वाट पाहत असायच्या. त्याकाळात  आजच्या सारखी मोबाईल सारखी सुविधा नव्हती. गाड्या नव्हत्या. रस्ते नव्हते. पाऊलवाटा असायच्या.

नागपंचमीच्या आदल्या दिवशी नवीन लग्न झालेल्या नववधूला आणण्यासाठी माहेरून नववधूचा भाऊ किंवा कुणीतरी जात असे. त्याला मु-हाळी असे म्हणत. माहेराहून आलेल्या भावाला पाहून नववधू हरकून जात असे. तिला आभाळ ठेंगणे होई.

त्याकाळात नववधूला सासू कडून खुपच सासुरवास व्हायचा. जेवणावर सुध्दा तिचा हक्क नसे.सासु जे शिळेपाके देई त्यावरच अर्धपोटी रहावे लागे. सासू खोबरेल तेल व साबण सुध्दा देत नसे. जेवण कुलूपबंद पेटीत ठेवले जाई.असे ते दिवस होते.
 
इकडच्या तिकडच्या गप्पा चहापाणी झाल्यावर मु-हाळी नववधूच्या सासूला नागपंचमी निमित्त माहेरी घेऊन जाण्याबाबत हळूच विषय काढायचा.सासरकडची मंडळी परवानगी देतात की नाही याबाबत नववधूच्या हृदयात धडधड व्हायची.कारण तिला माहेरची ओढ वाटायची. रडतखडत सासरकडच्यांची मिनतवारी करून मु-हाळी कसेतरी दोन दिवसाच्या बोलीवर नववधूला माहेरी घेऊन जाण्यासाठी तयार करायचा.

मग नववधूची लगबग सुरू व्हायची. तिला माहेरी कधी जाईल आणि आणि आई-वडील यांना कधी पाहिल असं होऊन जायचं. 

सर्व तयारी पूर्ण झाल्यावर एका गाठोड्यात थोडेसे पीठ, एखादी भाकर व गुळ सासू तिला बांधून देत असे. आणि पंचमी झाल्यावर दोन दिवसांनी लगेच सासरी ये अशी सासू दटावणी देत असे.आणि मग नववधू आणि तिचा भाऊ माहेरच्या वाटेला लागत. 

त्यावेळेस रस्ते नसत, गाड्या नसत पायवाट हाच एक मार्ग असायचा. डोंगरावरून, माळावरून, झाडाझाडातून ही पाय वाट या गावावरून त्या गावाला जात असे. श्रावण महिना असल्यामुळे सगळीकडे हिरवेगार डोंगर आणि पांढरे शुभ्र धबधबे ,कधी कधी ऊन तर कधी पावसाच्या हलक्या सरी पडत असत.

प्रत्येक नववधू ही त्या काळात सासुरवाशीण असायची. खूप सासवा नवीन सुनांना प्रचंड त्रास द्यायच्या.

पाय वाटेने जात असताना नववधू तिच्या भावाला सासू कशी त्रास देते, परंतु नवरा कसा चांगला आहे हे सांगायची. माहेरी आई बाबा कसे आहेत? अमुक-तमुक मैत्रीण कशी आहे ?अमुक-तमुक लग्न झालेल्या मैत्रिणीचे काय चालले आहे? लग्न झाल्यानंतर कोण कोण मुली माहेरी आल्या होत्या?  शेतीची काय कामे झाली? छोटू शाळेत जातो का ?असे अनेक नाना प्रश्न ती तिच्या भावाला विचारत असे. हे विचारत असताना तिला कधी एकदा आपल्या माहेरी जाईल आणि सर्वांना पाहिल असे वाटायचे.

सासरच्या आणि माहेरच्या गप्पा मारत असताना एकदाचे माहेरच्या गावात यायचे. गावातून येत असताना प्रत्येक घरातून वडीलधारे नववधूला प्रेमाने तोंड भरून खुशाली विचारायची.  आणि नववधू आपण कसे खुश आहोत सर्व सासरचे कसे चांगले आहेत हे सांगायची. 

गावातून एकदाची नववधू दारात यायची.आपली मुलगी आली आहे याची खबर आईला आधीच लागायची.आई भाकरीचा तुकडा आणि तांब्या भरून पाणी घेऊन यायची. मुलीच्या डोक्यावरून उतरून दूर टाकायचे. आणि मग मायलेकींची भेट व्हायची. दोघींचेही डोळ्यात अश्रू दाटून यायचे.परंतु ते प्रेमाचे अश्रू असायचे.

आई मुलीला घरात घेऊन जाई तोपर्यंत आजूबाजूच्या बाया मुलीची ख्यालीखुशाली विचारायला येत असत. त्यामध्ये कसा वेळ जाई हेच कळत नसे. संध्याकाळी मग जेवण होत. 
    
नववधू घरातील लहान मुले मुली यांच्या हाताला मेंदी काढायची. सर्व काम आटोपले की आई आणि मुलगी यांचा संवाद चालायचा. हा संवाद रात्री दोन अडीच वाजेपर्यंत चालायचा. नववधू तिची सुखदुःख आईला सांगायची. एकमेकींच्या डोळ्यात अश्रू यायचे. हे अश्रू कधी सुखाचे तर कधी दुःखाचे असत.आई तीला अनुभवाच्या चार गोष्टी सांगायची.

दुसऱ्या दिवशी नागपंचमीचा सण असे.अनेक नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी आलेल्या असत. नागपंचमी या सणाच्या दिवशी या सगळ्या जणींची भेट होत असे.काही नववधू त्यांच्या खाष्ट सासवांनी पाठवलेल्या नसत. त्यामुळे प्रत्येकीला आपल्या मैत्रिणी बद्दल सहानुभूती वाटे.अनेक गप्पागोष्टी होत. 

प्रत्येकाच्या घरात पुरणपोळीचा स्वयंपाक असे. दुपारच्या वेळेस सर्व बायका, मुली, लहान मुले जवळच असलेल्या माळावर नागोबाचे वारूळ असलेल्या ठिकाणी जमा होत. सार्वजनिक रित्या वारुळाची पूजा केली जाई. नागोबाला लाह्या, दूध यांचा प्रसाद दाखवला जाई. त्यानंतर झिम्मा, फुगडी व गाणी विविध प्रकारचे त्या काळातील खेळ खेळले जात. झोक्यावर बसून झोका खेळला जाई.

हिरवागार निसर्ग, दुथडी भरून वाहत असलेले नदी-नाले आभाळात दाटून आलेले ढग ,कधी कधी रिमझिम पाऊस तर कधी मध्येच ऊन पडत असे. कधीकधी आकाशात इंद्रधनु दिसत असे. तर कधीकधी ऊन आणि पाऊस या दोघांचेही दर्शन घडायचे. झिम्मा फुगडी व गाणी गाताना कधी अंधार पडायचा हे कळायचे सुद्धा नाही.

सर्वांना घरी जायची घाई असायची. घरी गेल्यावर हात पाय धुऊन देवपूजा आटोपून सर्वजण जेवायला बसत. पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा. प्रत्येक जण नववधूला भरपूर खाण्याचा आग्रह करायचे. 
रात्रीची सर्व कामे आटोपून नववधूला तिच्या सासरच्या मंडळी विषयी अनेक प्रश्न, ख्यालीखुशाली विचारली जात असे. माहेरची मंडळी तिला आपण पण कसे संयमाने वागायला पाहिजे हे पटवून देत असत.आपण कामात कुठेही कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याबद्दल सांगत असत. पुढे कधीतरी चांगले दिवस येतील असा सल्ला दिला जाई. या गप्पातच खूप रात्र झालेली असे. 
   
अशाच प्रकारे दुसऱ्या दिवशी गावातील सर्वांच्या भेटीगाठी ख्यालीखुशाली विचारली जाई. आणि अशा रीतीने दुसराही दिवस कधी संपला हे कळत नसे. 
 
तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नववधूला सासरी जायची तयारी करावी लागे. अतिशय दुःखी अंतकरणाने सर्वांची भेट घेऊन ती सासरच्या पाऊलवाटेने चालू लागे. परंतु तिचे मन मात्र माहेरच्या माणसांमधून निघायला तयार नसे.






पुर्वीची कलानाट्य व भारूड मंडळे

पूर्वीची कला नाट्य व भारुड मंडळे

पूर्वी ग्रामीण भागात अनेक कला नाट्य व प्रसादिक भजनी भारुड मंडळ होती. त्यापैकी पोखरी व कानसे माळवाडी तालुका आंबेगाव व मावळ तालुक्यातील ओझर्डे आणि पवळेवाडी ही भारुडे त्या काळात फार प्रसिद्ध होती.त्यांच्याकडे अद्यायावत स्टेज व इतर सामग्री होती.सामान वाहतुकीसाठी ट्रकची व्यवस्था असायची.तर तळेघर ,भिवेगाव, उगलेवाडी, आहुपे या गावांचा तमाशा त्याकाळात फार प्रसिद्ध होता.

पश्चिम भागात टोकावडे,भोमाळे,धामणगाव, (मदगेवाडी) नायफडची (सरेवाडी) नाव्हाचीवाडी व खरोशी या गावांची कला नाट्य व भारुडे प्रसिद्ध होती.नाव्हाच्यावाडीची रामलीला व सरेवाडीची कृष्णलीला फार प्रसिद्ध होती.अनेक गावांच्या यात्रा,पूजा इत्यादी कार्यक्रमांना भारुडाचा कार्यक्रम होत असे.पोखरी,कानसे माळवाडी,ओझर्डे  व पवळेवाडी, आपटी, चांदुस कोरेगाव ही भारुडे  मुख्यता स्टेजवर होत असत. तर  बाकीची लहान भारुडे ही जमिनीवर होत असत.छोटासा मंडप  व एक पडदा असायचा.पडद्याच्या पाठीमागे भारूडातील पात्रांचा मेकअप चालायचा.मंडपाच्या पुढील भागात भारूडातील भजन मंडळी बसलेली असत.प्रत्येक भारूडात एक पायपेटी असायची व एक पेटी वादक त्यालाच पूर्वी पेटी मास्तर असे  म्हणत.

तेव्हा पेटीमास्तरला समाजात फार मान असे.पेटीमास्तरचाचा पोशाख म्हणजे निळ दिलेले धोतर किंवा पायजमा व नेहरूशर्ट व निळ दिलेली टोपी.उन्हाळा,पावसाळा व हिवाळा सतत गळ्यात कायम मफलर कडक इस्त्रीचा असा पोशाख असायचा. श्री धर्मा बुधाजी तळपे, श्री दत्तात्रय पंगाजी  मिलखे असे पेटी मास्तर प्रसिद्ध होते तर ढोलकी वाजवण्यात विठ्ठल उगले प्रसिद्ध होते.

पेटी मास्तर हा खुर्चीवर बसून पेटी वाजवायचा.पेटी मास्तर हा  स्वतः गायक असायचा.त्यानंतर पखवाज टाळ व खंजिरी  इत्यादी वादक व पाठीमागे भजन म्हणणारे असत.असा त्यांचा  संच असायचा.आम्हा लहान मुलांना भारूडातील नटमंडळी घालत असलेले कपडे यांचे फार आकर्षण असायचे. 

प्रथमता भारूडाची सुरुवात ही उमवरा या पात्राने होत असे. उमवरा हे पात्र स्टेजवर म्हणजेच मंडपात म्हणजेच पडद्याच्या पुढे आल्यावर भजन मंडळ मुख्यता पेटी मास्तर उमवरा शिरीधरा दयेचा देतो असारा हे भजन म्हणत असे व त्यापाठीमागे विशिष्ट वाद्यांचा आवाज तालासुरात बाकीचे भजने, भजन म्हणत. त्या तालावर उमवरा हे पात्र डुलत डुलत नाचत असे.उमवरा या पात्राचा पेहराव म्हणजे लेंगा घातलेला व त्यावर महाराजांचा अंगरखा व मुकुट असे.त्याच्या हातात एक पितळी किंवा ताट असायचे.

त्यानंतर पुढील पात्र हे सावळ्या वनमाळी हे असायचे. सावळ्याचा पोशाख हा उमवरा सारखाच असायचा.त्याच्या हातात शाल किंवा मफलर असायची दोन्ही हातात शालीचे दोन्ही बाजूचे पदराचे टोक घेऊन तो पेटी मास्तरच्या व भजन मंडळीच्या सावळ्या येरे वनमाळी, सावळ्या येरे वनमाळी ! भक्त तारीले, दुष्ट मारले येरे वनमाळी ! या भजनावर दोन्ही हात खालीवर करून नाचायचा.

त्यानंतर गणपतीचे पात्र यायचे.कधीकधी गणपतीचे पात्र हे एखादा लहान मुलगा करायचा.गणपतीचे सोंड असलेला मुकुट तोंडावर बांधून व गळ्यात चमकीच्या माळा रंगीत धोतर असा गणपतीचा पोशाख असायचा.कधीकधी पात्र काम करणारा छोटा मुलगा असायचा तर मुकुट मोठा असायचा. त्यामुळे व्हायचे काय की त्याला समोर काय चाललं आहे हेच दिसायचं नाही.आणि तो भलतीकडेच नाचायचा. त्यामुळे एकच हशा पिकायचा.गणपतीचे पात्र गेल्यावर पुन्हा सावळ्या वनमाळी हे पात्र यायचे आणि ते उमवरा असलेल्या पात्राला विचारायचे. येथे कोण आले होते? उमवरा हे पात्र त्याला सांगायचे येथे  भगवान श्री गणपती आले होते.ते ऐकुण वनमाळी मग म्हणायचा माझं त्यांच्याकडे एक छोटंसं काम होतं. उमवरा हे पात्र विचारायचे, त्यांच्याकडे तुमचे काय काम होते? सावळ्या वनमाळी हे पात्र म्हणायचे. मला त्यांची सोंड पिरगाळायची होती.उमवरा म्हणायचे अरे असे दुष्टा सारखे भाषण करू नको.

त्यानंतर शारदा हे पात्र यायचे.शारदा झालेले पात्र हे मोरावर बसून येत असे.मोर हा जुने पुराणे इरणे मध्यभागी कापून ते कमरेला बांधायचे, त्यावर रंगीत कापड असायचे. भंगारमधल्या पत्र्यापासून त्याची मान व चोच बनवलेलीअसे. हे पात्र लहान मुलांना खूप आवडायचे.भजन मंडळ  तालासुरात आली शारदा सुंदर ,आली शारदा सुंदर, आली मोरावर बसून.असे भजन म्हणायचे.त्यावर शारदा झालेली झालेले पात्र विशिष्ट तालात व ठेक्यात नाचायचे .शक्यतो हे पात्र कै.विठू नांगरे फार उत्तम करायचे.यानंतर परत सावळ्या वनमाळी हे पात्र यायचे.थोडासा नाच झाल्यावर ते उमवराला विचारायचे, येथे कोण आले होते? उमवरा सांगायचा येथे श्रीगणेशाची पत्नी शारदा माता या मोरावर बसून आल्या होत्या.सावळ्या म्हणायचा माझे त्यांच्याकडे थोडेसे काम होते? उमवरा म्हणायचा त्यांच्याकडे काय काम होते? मला त्यांच्या मोराची मान पिरगाळायची होती. व पिसे कधीकधी ग्रामीण मराठी भाषेत पखाडं उपटायची होती.उमवरा म्हणायचा अरे असे दुष्टा सारखे भाषण करू नको. हे सर्व झाल्यावर मुख्य भारुडाच्या वगनाट्यला सुरुवात व्हायची.

प्रत्येक भारुडात राजा, प्रधान, राणी ,द्वारपाळ ,राक्षस किंवा निगेटिव्ह रोल करणारे पात्र असायचे.भारुडात द्वारपाल यांचे काम अतिशय विनोदी असायचे. 

महाराजांच्या हातात कायम चाबूक असायचा व कमरेला तलवार असायची. आणि तो राजा द्वारपळाला म्हणायचा द्वारपाल दरबारात उशिरा का आला? त्यावर द्वारपाल म्हणायचा काय सांगू महाराज दरबारात यायला निघालो होतो परंतु येताना एक मोठा आंब्याचं झाड होतं. झाडावर खूप आंबे होते.मला आंबे खाऊशी वाटले. मी झाडावर चढलो, आंबे खाल्यावर मला काही झाडावरून उतरता आलं नाही मग काय केलं? असं राजा म्हणायचा. यावर पळत पळत घरी जाऊन शिडी आणली खाली उतरलो आणि धावत धावत दरबारात आलो असं म्हटल्यावर राजा त्याच्या पाठीवर चाबूक मारायचा. प्रेक्षक हास्य सागरात बुडून जायचे.

असेच दुसऱ्या द्वारपाळला राजा विचारायचा. दरबारात उशिरा येण्याचे कारण काय ?यावर द्वारपाल म्हणायचा.काय सांगू महाराज दरबारात येत असताना माझ्यापाठी एक वाघ लागला.मी घाबरून झाडावर चढलो.वाघ खाली बसून राहिला. शेवटी बराच वेळ बसल्यावर मला लघवीला आली मी झाडावर बसून लघवी करू लागलो आणि काय सांगू महाराज, त्या लगवीच्या धारेला पकडून वाघ झाडावर चढू लागला. इतक्यात मी लघवी आखडली आणि वाघ धाडकन खाली पडला. तसाच मी झाडावर उतरून लगेच दरबारात हजर झालो हे म्हटल्यावर महाराज चाबकाचा फटका द्वारपालाच्या पाठीवर मारायचे.अशा प्रकारचे त्यावेळेस विनोद होत असत.

द्वारपाळांची पात्र ही विनोदी असायची.भारुडात त्याकाळात स्री पात्रासाठी पुरुष भूमिका करायचे. त्यांना नाच्या असं म्हटलं जाई. त्याकाळात सखाराम उगले,(उगलेवाडी) गणपत सातपुते, घोटावडी, धामणगावचे गबाजी,शंकर माळी नायफड (माळेवाडी) पालखे वाडीचे निधन हे भिवेगावच्या तमाशात नाच्याचे काम करायचे. प्रत्येक नाच्याने स्री सारखे केस वाढवलेले असत. इतर वेळी केसांचा बुचडा बांधून त्यावर टोपी घालत.असा तो काळ होता. 
कै.विठू नांगरे हे भारुडातील कोणतेही पात्र लिलया करायचे. ते त्या काळातील भारुडाचे अनभिशिक्त सम्राट होते. सिताराम मुऱ्हे, टोकवड्याचे रामू न्हावी, किसन कोरडे, विठ्ठल लांघी, देवराम मुऱ्हे,बाबुराव गुंजाळ,काशिनाथ गुंजाळ, पंढरीनाथ भागीत, भिमाजी गोडे,दुलाजी गोडे, बबन गोडे (सरपंच), शंकर गवारी,काळू तिटकारे, देवराम तिटकरे, सखाराम उगले, विठ्ठल उगले, चिंधू वनघरे, बापू साबळे असे अनेक थोर कलावंत होते.

अनेक गावच्या  यात्रा ,पूजा या कार्यक्रमासाठी ते पायीच जात असत. त्यांचे सामान, भारुडात वापरायचे कपडे ,पाय पेटी, पखवाज ,टाळ इत्यादी असे मजल दर मजल करत ते गावोगावच्या यात्रेला जात असत. गावाने दिलेली बिदागी घेऊन ते दुसऱ्या गावच्या यात्रेला जात असत. रात्री भारुडात राजाचे काम केलेला नट सकाळी कपड्याची पेटी किंवा पाय पेटी डोक्यावर घेऊन पायी चालत असे. हे लोक केवळ गावाच्या नावासाठी पायपीट करत.आणि त्यातच ते समाधानी असत. पैशासाठी कुणीही हे उद्योग करत नसे हे विशेष.

भारुडाचे कार्यक्रम हे रात्री दोन बाजुला राँकेलचे पलीते लावुन केले जात असत. पुढील काळात गॅस बत्ती आल्यावर गँसबत्तीच्या उजेडात होत असत.त्यानंतर लाईट आली.स्पिकर आले. 

टोकावड्याच्या भारुडात झाकझुक करणारी एक विजेरी होती.लढाईच्या वेळी ती चमकवली जात असे.कधीकधी खुप वेळ लढाई चालायची.प्रेक्षक कंटाळुन जायचे.शेवटी प्रेक्षकांमधला एकजन उठून म्हणायचा.आता बास करा या लढाया.पुढचे पात्र येउद्या.

भारूडात भक्त प्रल्हाद अर्थात हिरण्यकशपुचा वध,राजा हरिश्चद्र, उज्जैनीचा राजा विक्रम अर्थात शनी आला साडेसात वर्ष,असे धार्मिक वग असायचे.हे वग पाहण्यासाठी बाकीच्या गावचे लोक आपापल्या गोधड्या घेऊन भारूड किंवा तमाशा पाहण्यासाठी जागा धरून बसायचे. तमाशात देखील अशाच प्रकारचे हास्यविनोद व वगनाट्य व्हायचे.हे तमाशे बिगर स्टेजचे व जमिनीवर चालायचे.फक्त एक पडदा असायचा. त्यापुढे तमाशा चालायचा.

तमाशात असलेल्या  नाचाचे काम करणारा नट अनेक स्री पात्र करायचा. कधीकधी दुसरा नाच्या असायचा. त्याकाळात चवली पावली वर तमाशे व्हायचे.गाव त्यांना देईल ते मानधन ते कोणतीही घासाघीस न करता घ्यायचे. बिगर आमंत्रणाचे  हे तमाशे यात्रा हंगामात गावोगावी फिरत असत. तमाशा किती लांबून आला आहे यावर त्यांची बिदागी ठरली जाई. तमाशात नाच्याचे काम करणारा प्रेक्षकांमध्ये जाऊन चवली पावली गोळा करत असायचा. एखादा माणुस चवली पावली देऊन त्याच्या मित्राला चवली पावली देण्याविषयी नाच्याला सांगायचा. नाच्या नाचत नाचत म्हणायचा. सोमाजीचे सांगनं आहे कोणाला, तर गोमाजी यांना. बाबारे तू मुंबईवरून आला आहेस.तमाशासाठी काहीतरी चवली पावली सोड .नुसतं तोंडात माशा गेल्यावानी नुसताच तमाशा पाहू नकोस.असे नाच्याने म्हणल्यावर गोमाजीला सुद्धा काहीतरी चवली पावली सोडायला लागायची. त्यानंतर तमाशातील नाचण्याचे काम करणारा नाच्या म्हणायचा.सोमाजीच्या शेपटाला बांधलाय डबा,गोमाजी वाजवी खबा खबा असे म्हणून तो पायातील चाळ वाजवीत विशिष्ट पद्धतीने नाचायचा .पायाचा ठेका, घुंगरांचा आवाज व ढोलकीची थाप याचा अतिशय सुंदर आवाज घुमायचा.असा तो काळ होता. 

काळाच्या ओघात महाराष्ट्राची ही लोककला लोप पावली. त्यानंतर टीव्ही, व्हिडिओ, कँसेट ,व्हिसीडी, डीव्हीडी, विविध प्रकारचे चैनल पेन ड्राईव्ह ,साधे फोन,रंगीत फोन, स्मार्टफोन, पेन ड्राईव्ह यांचा जमाना आला.आणि पूर्वीच्या लोककला काळाच्या ओघात लुप्त झाल्या.  




      

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस