विठू नांगरे कलंदर माणूस


विठू नांगरे कलंदर माणूस 

विठू नांगरे हा आमच्या भागातील असा अवलिया होता की त्याला कोणते काम जवळ जमत नाही.असे कधी झाले नाही.

1975 ते सन 2000 पर्यंत आमच्या भागात नाट्यरूपी भारुड मंडळे जोमात होती. त्या काळात गावातील ठराविक घरामध्ये श्रावण महिन्यात धार्मिक ग्रंथांची पारायणे चालत असत. चैत्र आणि वैशाख महिन्यात सत्यनारायणाच्या महापूजा होत. प्रत्येक गावात यात्रा,जत्रा आणि उरूस असत. त्यामुळे धार्मिक वातावरणाबरोबर सांस्कृतिक वातावरण सुद्धा तयार झाले होते. त्यामुळे वेगवेगळ्या लोककलांना समाजाकडून प्रोत्साहन मिळत असे. या सर्व वेगवेगळ्या कार्यक्रमामुळे नातेवाईक गण गोत्र, मित्र,आप्तेष्ट यांचा एकमेकांकडे नेहमी राबता असे. 

परंतु काहीही म्हणा त्यावेळी धार्मिक वातावरणाने लोक भारलेले होते. रामायण, महाभारतातील कथा, नवनाथ भक्तिसार मधील कथा विविध पुराणातील कथा यांनी समाजावर एक वेगळेच गारुड तयार केले होते. या कथांना कुठेतरी प्रत्यक्ष नाट्यरूपाने समाजासमोर आणले पाहिजे या उद्देशाने अनेक गावागावांमध्ये नाट्यरूपी भारुड मंडळ उदयास आली.वांजळे, वरचे भोमाळे, पाभे,धामणगाव, टोकावडे, मंदोशी,पोखरी, पवळेवाडी, देवतोरणे, नायफडसरेवाडची सारेवाडी,नाव्हाचीवाडी अशा अनेक गावांमध्ये नाट्यरूपी भारुड मंडळे उदयाला आली. अनेक कलाकार उदयाला आले आणि त्यात सर्वश्रेष्ठ कलाकार म्हणजे विठू नांगरे. या काळात या नाट्यरूपी भारुड मंडळांना समाजाकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकाश्रय मिळाला.

विठू नांगरे यांचे कोणतेही प्रकारचे शिक्षण झाले नव्हते. तरीही त्यांच्या रामायण महाभारतातील कथा आणि पुराणातील कथा तोंडपाठ होत्या. विठू नांगरे यांच्या गावात नाट्यरूपी भारुड नव्हते. तर ही विठू नांगरे भागातील कोणत्याही नाट्यरूपी भारुड मंडळात कोणत्याही प्रकारचे पात्र साकारत असे. मग तो राजा असो अथवा प्रधान, देव असो वा दानव किंवा स्त्री पात्र कोणतेही पात्र विठू नांगरे लिलया करत असे. विठू नांगरे च्या कोणत्याही भूमीकेला  समाज प्रचंड दात देत असे.

भारुडातील प्रसंगानुसार विठू नांगरे स्त्री भूमिका करत असे. नऊवारी लुगडे चापून चोपून नेसलेला व तशाच रंगाची चोळी परिधान केलेला विठू नांगरे कधी स्त्री प्रमाणे भासत असे. डोक्यावर चुंबळ, त्यावर पेटते निखारे आणि त्याच्यावर भाताचे पातेले एवढे सर्व डोक्यावर घेऊन विठू नांगरे गाण्याच्या तालावर नाचत असे. नाचता नाचता डोक्यावरचा भात शिजला जाई. तो पाबेतो त्याने कधीही डोक्याला हात लावलेले नसे. शिजलेला भात पाहून लोक अचंबित होत असत. विठू नांगरे यांना जमलेल्या प्रेक्षकांकडून प्रचंड दाद मिळत असे.

पुराणा मध्ये अनेक कथा असत.त्यानुसार भारुडात वगनाट्य होत असे. त्यापैकी गरुडाची आई विनता व सर्पाची आई कद्रू या दोन सवतींची कथा पुराणा मध्ये आहे. विनताचे सत्य असूनही कद्रुने कशी खोटेपणाने पैज जिंकली. व विनताचा छळ केला हे वगनाट्य खूपच त्यावेळी लोकप्रिय झाले होते. विठू नांगरे विनताचे पात्र करायचा. ते पात्र इतके प्रभावी होते की लोक अक्षरशः रडायचे. स्रिया डोळ्याला पदर लावून मुसमुसून रडायच्या. हीच विठू नांगरे यांच्या कलेची पावती होती.

दरवर्षी शिमग्याला विठू नांगरे मरीआईच्या देव्हाऱ्याचे सोंग घेऊन भागातील गावांमध्ये जात असे. व मरीआईच्या भक्ताप्रमाणे कपडे परिधान करून स्वतःलाच चाबकाचे फटकारे मरत असे. लोक याही कलेला प्रचंड दात देत असत. व त्याला योग्य ती बिदागी देत असे.

विठू नांगरे यांचा सर्वात प्रभावी कार्यक्रम तो म्हणजे मोर नाचवणे. विठू नांगरे यांनी लाकडांच्या बांबूपासून मोर तयार केला होता. त्याला एक लोखंडी चोच तयार केली होती. त्यावर निळसर कपडे व पाठीमागे खरोखरच्या मोरांचा पिसारा मोराचे पिसे लावून तयार केला होता. अगदी खरोखरच्या मोराप्रमाणे. त्यामध्ये विठू नांगरे प्रवेश करून वेगवेगळ्या प्रकारे सनई चौघडांसमोर नाचत असे. त्यावेळी विशेषता लग्नामध्ये, यात्रांच्या मिरवणुकीमध्ये विठू नांगरे यांच्या मोराला प्रचंड मागणी होती. लहान थोर, आबाल वृद्ध स्त्रिया विठू नांगरे यांच्या मोराचा नाच पाहून आनंदित होत असत. विठू नांगरे यांच्या मोराला जुन्नर, आंबेगाव खेड आणि मावळ या चारही तालुक्यांमध्ये प्रचंड मागणी होती. मोर नाचवावा तर विठू नांगरे यांनीच असे लोक त्यावेळी म्हणत असत. वेगवेगळ्या भारोनामध्ये सुद्धा मोर नाचवला जाई.

विठू नांगरे यांना जसे धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला आवडे. तसेच त्यांना कुस्तीची सुद्धा प्रचंड आवड होती. विठू नांगरे यांना कुस्तीचे कोणतेही डाव येत नसत तरीही ते विविध यात्रांच्या आखाड्यामध्ये कुस्तीमध्ये भाग घेत असत. विठू नांगरे यांनी कुस्ती खेळताना कधीही लंगोट किंवा काच्या याचा उपयोग केला नाही. कारण विठू नांगरे हे मुळातच पैलवान नव्हते. त्यांच्याजवळ लंगोट आणि काच्या असणार कसा. त्यामुळे विठू नांगरे हे चड्डीवरच कुस्ती खेळत असत. कुस्ती खेळताना एकदा का विठू नांगरे यांनी भुई धरली की समोरचा पैलवान कितीही ताकदीचा व डावपेचाचा असला तरी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा विठू नांगरे त्याला पलटी होत नसे.आखाड्यात नुसताच फुफाटा उधळत राही. नाट्यरूपी भारुड मंडळात स्त्री पात्र  काम करताना रडविणारे विठू नांगरे कुस्ती खेळताना मात्र लोकांना प्रचंड हसवत असत.शेवटी ही कुस्ती सोडवली जाई.सोडवलेल्या कुस्तीला थोडेफार का होईना इनाम विठू नांगरे यांना मिळत असे. कधीही पैलवानकी न केलेल्या विठू नांगरे यांच्या कुस्तीची नेहमीच चर्चा होई.अजूनही एखादी कुस्ती पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ चालली की लोक विठू नांगरे यांच्या कुस्तीची आठवण काढतात.

 विठू नांगरे यांना नाट्यरूपी भारुड मंडळात पात्र काम करायची आवड होती तशीच पावसाळ्यात नदीला आलेल्या पुरामध्ये मासे पकडण्याची सुद्धा खूप आवड होती. नदीला मोठा पूर आल्यावर बांबू पासून बनवलेल्या येंडी मधून विठू नांगरे खूप मासे पकडत असत. पावसाळ्यात जेव्हा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येई. त्यावेळी आम्ही मासे पकडण्यासाठी नदीवर जात असू. त्यावेळी विठू नांगरे यांची हमखास आमची भेट होत असे.

प्रचंड गरिबी,जगण्यासाठी केलेली धडपड,अशाही परिस्थितीत आपल्या मधील कलेला वाव देत मनाला विरंगुळा देऊन विठू नांगरे आपल्या फाटलेल्या संसाराला ठिगळे लाऊ बघे. त्यावेळी सर्वच लोक गरीब होते. परंतु गरीब असूनही आपापले छंद जोपासून होते.

आजही समाजात यात्रांच्या हंगामात, शिमग्यात,लग्न कार्यामध्ये विठू नांगरे यांचे आजही जुने जाणते लोक नाव काढतात. व त्यांच्या केलेल्या कलेच्या कामाच्या स्मृतींना उजाळा देतात. अनेकांना शिवाजी पैलवान सुद्धा माहीत असेल. त्याविषयी सुद्धा दोन शब्द लिहून शिवाजी पैलवान यांना प्रकाशात आणूया. वाचकांचा प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा.


 



.

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम


माझ्या काकाला मुलगी पाहायला आम्ही दोघेच सुरुवातीला गेलो होतो. पण जाताना आजीने व आईने सांगितले होते. काकी व्यवस्थित पहा बरं. कशी आहे. काय आहे. घर कसंय. माणसं कशीय. सारं निट पहा बरं.

काका आणि मी स्प्लेंडरवरून जात असतानाच वाटेत अवकाळी पाऊस लागला. एका टपरीवजा हॉटेलात आश्रय मिळाला. एक बेवडा तिथेच दारू ढोसत होता.आम्ही दुर्लक्ष केले. काकांनी विचारले " चहा घ्यायचा का"? मीही हो म्हणालो.

त्या बेवड्याने जरासं पुढं जात कोपऱ्यावर लघुशंका केली. ते हॉटेल चालवणारी महिला. दुसरीकडे तोंड करत शिव्या देऊ लागली. याचा राग येऊन बेवडा तिच्या अंगावर धावून आला. पण त्याच्या हाताचा धक्का मला लागल्याने चहा सांडला. काकाला राग आला पण नविन गाव असल्याने तोंडातल्या शिव्या गिळून व रागाने उगारलेला हात खाली घेऊन. "अहो काका जरा नीट चाला की चहा सांडला ना पोराचा"!

पण त्या बेवड्यानं उलट काकांनाही शिव्या द्यायला चालू केल्या. काकांनी इकडे तिकडे पाहिले. त्या बाईनेही मुकसंमती देत खुणावले. मग काय पहलवान काकानं चांगलाच बडवला. पण त्यात त्या बिचाऱ्याचा दात मात्र पडला.

त्या बेवड्याच्या तोंडाला रक्त येत आहे हे पाहूनच मी घाबरलो. जवळच एक दात पडलेला दिसला. पण त्याच्या तोंडातली तर वरच्या दातांची अख्खी फळीच गायब होती. म्हणजे बाकीचे दात घशात गेले की काय ? असे वाटल्याने मी त्या बाईला म्हटलं " आजी इथं एकच दात आहे. पण बाबांचे तर चार दात गायब आहेत ? "ते व्हय ते मागल्या बारीला पाडलेत एक जणानं असेच."

गर्दी व्हायच्या आत आम्ही तिथून पळ काढला.

नाव व पत्ता विचारत विचारत शेवटी मुलीच्या घरी आलो. घरी कुणीच दिसत नव्हतं. दारात एक नांदुर्गीच झाड होतं. त्या झाडाखालीच एक खुप थकलेली म्हातारी बसली होती. बहुतेक तिला ऐकायला आणि दिसायला पण कमी येत होतं.

"घरी कुणी नाही का आजी?" पण आजीला रेंज काय मिळेना.

शेवटी दाराचा आवाज आला. तो मोठा वाडा होता. त्या आवाजामुळे आम्ही सावध झालो. काकांनी घरी कोणी आहे का ? हे विचारलं.

परकर पोलक्यातली मुलगी बहुतेक शेणानं सारवत होती. काहीसं केसांनाही शेण लागलं होतं.

तिनं काकांना विचारलं "कोण हवंय तुम्हाला?"

तिच्या प्रश्नानं काकाच गोंधळून गेले. " ते...ते... आम्ही मंदोशी वरून आलोत"

हं मग .. मंदोशी.. अय्या मंदोशी म्हणत तिनं खाडकन दरवाजा लावून घेतला.

आम्हाला कांहीच समजले नाही. आम्ही तसेच दारात उभे होतो. बहुतेक त्या वाडयाला दुसराही एक दरवाजा होता. जो पाठीमागच्या बाजूला होता.जो त्यांच्या शेतात जायचा शेतही वाडयाजवळच होते.

क्षणात तिने जत्राच भरवली. शेतात काम करणारी मजुर पण आम्हाला बघायला आली. या की या... काय खबर नाय कळीवलं नाय.. आसं अचानक यायचं आस्तं व्हय वं पावणं.

त्यांनी बसायला घोंगडी अंथरली. मी आणि काका घोंगडीवर बसलो. त्या माणसांनी चहुबाजूंनी आम्हाला घेरलं होतं. मला तर स्वतःला जंगलात असून जंगली लोकांनी आम्हाला चहुबाजूंनी घेरल्यासारखंच वाटायला लागले. आणि जोराचा ओरडलो " काका वाचवा !

याला असं काय झालं म्हणून सगळे पुन्हा माझ्याकडे पाहू लागले. काय नाही.. काय नाही... टि.व्ही जास्त बघतो ना आणि त्यातल्या त्यात भुताच्या मालिका बघायची हौस. त्यामुळे सगळीकडे त्याला....

असं असं... टिव्ही लावायची का बाळा. वय गं काके लाव. ये थांबय चिवे मी लावणारे. म्हणत जि.प. शाळेच्या गणवेशात भांडणारे बहिण भावंडं. काकीनं म्हणजेच आमच्या काकांच्या सासूबाईनं धपाटं देऊन दोघे पळविली.

बारका टिव्ही टिपावर ठेवला होता. त्याखाली पोत्याला पोतं शिवून टिप झाकला होता. टिव्ही चालू केला Black and White खरखर आवाज करत होता.

कुणीतरी आठवण करून दिली " ये आंटीना हालीव रं म्हादया"

म्हाद्या आधीच अँटीनाच्या पोलवर चढला होता. आणि अँटीना हलवत " आलंय का चितार म्हणत ओरडत होता.

नाही... नाही... आलं... गेलं....नाही... नाही... आलं... गेलं.... आलं आलं आलं... असं लहानगी पोरं ताला सुरात ओरडत होती. मीही त्यांच्यात सामिल होऊन योगदान दिले होते. हळूहळू मीही मिसळून गेलो.

कांही चित्र दिसते ना दिसते तोच लाईटच गेली. सारे प्रयत्न निष्फळ ठरले.

मुलगी नविन धुतलेला ड्रेस घालून आली. मध्येच कुणीतरी म्हातारी म्हणते " आगं तायडे साडी घालाव लागती वं... ?

ये आजे नाय माझ्याकं साडी.. आन मला नाय आवडत साडी घालाया... 

तु उठ बर हितून पईली.. जा तुज्या घरी.... ढंगरी.?

आता काका आणि मी चांगलेच घाबरलो.

ये तायडे आसं म्हणत नसत्याती, म्हाताऱ्या माणसास्नी... पिकलं पान हाय !

आजी बिनलाज्यावानी आमच्याकडे बघून हसती.

ती नवरी मुलगी म्हणते - " हयॅ ह्यॅ म्हणं पिकलं पान... गळून बी पडना एकदाचं...!

आता आजी थयाथया करू लागली. नवरीच्याच आईनं व शेजारच्या बाईनं आजीची समजूत काढत बाहेर नेलं.

बाहेरच्या नादुर्गीच्या झाडाखालच्या म्हातारी जवळ आजीला बसवलं.

समजावणीच्या सुरात नवरीची आई आजीला म्हणते " तुमी बी अत्याबाय पोरीच्या नादी लागतयासा अजून कळती नाय ती.

काय गं पारे म्हण... कळती नाय आज लगीन केलं तर वरसात पोरं व्हत्याल की, आन मग कळती नाय! लय ऐकूनी घेतलं मी बी. अं लय नगं तोरा दावू. असंच व्हतं. बग असलाच म्हातारडा नवरा भेटंन. सराप हाय मपल्या म्हातारीचा.'

काय बाय करावं अत्याबायला आवं आसलं वंगाळ नगा बोलू वं... पावणं आल्यात दारात ते काय म्हणतली...

आल्यात म्हंजी काय म्या आमंतरण दिलं व्हतं वय यायचं.. त्यांच ती आल्याती... त्यांचं ती जात्याली.

दुर्लक्ष करून नवरीच्या आईनं आजीला बाहेर सोडलं.

आणि वाड्याचं दार लावून आमच्या समोर येऊन बसली. काकांला दबक्या आवाजात म्हणाली "चकारली मातारी, खुळ बसलंया.. मातारपणात नवरा गेला... ल्योक गेला. आमीच संभाळतो तिला. काय वं लागतंया माताऱ्या माणसाला. कोरभर भाकर तुकडा तर आपुन कुतऱ्यालाबी टाकतूया.

माणसाला दिला तर तेवढंच पुण्य लागतंया.. लै बाय बेकार अस्तो मातारपणाचा जल्म. देव लवकर बी नेत नाय वं असल्याला. तरणीबांड जवान माणसांनाच काय व्हया लागलं की ती मरत्याती कायनु बायनू कारनांनी.. आन ही आसली आमच्या मढ्यावर सोडत्याती.

तिचा एकटीचाच पट्टा चालू व्हता. तेवढयात मोठ्ठा कर्कश आवाज झाला. सगळेच दचकून गेले. लाईट आली होती. व टिव्हीला मुंग्या आल्याने आवाज येत होता.

काकानं मुलगी पाहिली त्यांना पसंदही पडली. ते दोघंही बराचवेळ एकमेकांना चोरून बघायचे. मी खिशातल्या डायरीत माझं लिखानकाम करत होतो.

जेवणं झाली. बेसन वड्या. दही ताक वाढताना नवरीची आई पुन्हा म्हणाल्या " आदी कळवली असतं तर मटान केलं असतं.

आमची जेवणं झाली. "तायडे, पावण्याला हात पुसाय दी की"

पण लाजाळू काकानं नाही राहूद्या घेतो. म्हणत बसूनच पाठीमागचा टॉवेल ओढला. आणि जेवढया घरातल्या होत्या  नव्हत्या तेवढ्या गुंडाळून कोंबून ठेवण्यात आलेल्या साड्या  त्याच्या अंगावर. खरकाट्या ताटात एकूणच वाड्याभर पसरल्या.

सारवासारव करीत पुन्हा म्हणाल्या " आमच्या तायडीला गोदडी शिवायचा लई नाद हाय" बसून म्हणून काय ऱ्हात नाही.. काय बाय करतच असती.

निघण्याची वेळ आली. पण माझं लिखाण काम चालूच व्हतं. काका म्हणाले - " काय रं राम काय लिहतोस मगापास्न"

काय नाही. तुम्हाला नाही दाखवणार.''

माझं निरीक्षण चालूच होतं आणि टिप्पणही मी माझ्या डायरीत नोंदवत होतो. भिंतीवरती फॅमिली फोटो लावलेला होता. त्यात नवरी मुलगी तिच्या दोन वेण्या आणि गावकडची लहान मुलांना बोटभर डोळयाला काजळ लावायची पद्धत. मी काकाला म्हणालो " काका ती नवरी आहे काय ?"

नवरीचीच आई मध्ये बोलली " व्हय बाळा तुझ्या एवढी व्हती ना तवा जत्रात काढला व्हता फोटू. मी तायडी आणि तायडीचा बाप. येईलच एवढयात फाट्यावर गेला आसंल मुतारा ढोसायला."

आणि मग माझं आणि काकांचं दोघांचंबी एकाचवेळी लक्ष गेलं फोटोकडे.

अरे हा तर मघाचाच " बेवडा "

तेवढयात कानावर आवाज आला. ये म्हातारे झाडाखली काय बसलीस.

आजी - तुहया पोरीनं हाकलून लावलंय मला. सजनीनं.... नवरा कराय निघालीय झिप्री...

कुठाय ती... तायडे S S S

तायडी म्हणजेच नवरीनं दार उघडले. तो बेवडा आत आला.

दार लावून काय बसलीस माझ्या आजीला बाहेर काढून... तुझ्या मायला तुझ्या...

खरकाटी भांडी न्हाणीत ठेवत झटकन तीची आई मध्ये येत म्हणते "आवं आवं असं पोरीला मारू नगासा' पाव्हण्यापुढं ग्वांड दिसतं का ते...

पाव्हणं .... कुठाय पाव्हणं....

सगळी आम्हाला शोधत होती... आणि आम्ही खुष्कीच्या मार्गाने म्हणजे वाड्याच्या मागच्या दारानं वावरा वावरानं पळत होतो.

कसंबसं घरी आलो. संध्याकाळी घरचे सर्वजण जेवायला बसलो होतो. आमचं खटल्याचं घर वडिल धरून पाचजण भावंडाचं. त्यांची मुलं म्हणजे कसा भरलेला वाडा.

सर्वात लहान चुलताच लग्नाचा राहिल्याने सगळी धावपळ होती. शोधाशोध होती.

आजीनं मला विचारलं . " मग राम कशीय नवीन काकू.. मी छान म्हटलं. "

घर कसंय - वाडा हाय मोठ्ठा एवढा दोन्ही हातानं दाखवत.

आत कसाय रं वाडा. मग मी जेवता जेवता उठलो. खिशातली डायरी काढली अन् वाचू लागलो.

दारात नांदुर्गीचं झाड त्याखाली म्हातारी

सतरा कोंबड्या

37 पिल्लं

एक रेडकू

5 कुत्र्याची पिल्लं

दोन गाई

दोन बैलजोडी

घरात टिप

टिपावर पोत्यांचं कव्हर

बारका ONIDA TV

जुना फॅन

कपाट

03 पितळी ताटं

0 4 जर्मन ताटं

मोठा स्टिलचा तांब्या

चेंबलेला जग

धान्याची दीड पोती

1 घोंगडी

वाड्याभर चिंध्या

2 पातेली

तेवढयात काकांनी डायरी हिसकावून घेतली. हे ल्हेत व्हतास व्हय रं.

आता तुम्हीच सांगा एखाद स्थळ (बायको) बघायला गेल्यावर काय काय गोष्टी करायच्या.


गावाकडच्या रेसिपी व पदार्थ..


गावाकडच्या रेसिपी व पदार्थ 

आजकाल प्रत्येक गृहिनीला संध्याकाळी कोणती भाजी करावी. किंवा कोणता स्वयंपाक करावा हा मोठा प्रश्न असतो.शहरात तर सुट्टी असेल तर सर्रास लोक ढाब्यावर जेवायला जातात. त्यात मीही एक.

ढाब्यावर जायला नकोच वाटते.त्याच त्या पनीरच्या भाज्या?? कोल्हापुरी व्हेज,व्हेज तिरंगा,स्टार्टरला पनीर चिल्ली,सोयाबीन चिल्ली,मसाला पापड. ... . नुसता विचार जरी आला तरी असलेली भुक निघुन जाते.परंतु घराच्या किंवा मित्रांच्या आग्रहामूळे जावेच लागते.

पूर्वी लोकांना खायला नीट मिळत नव्हते.आणि आता सुग्रास ? भोजन असूनही भुक लागत नाही.

एकदा असाच निवांत बसलो असता लहानपनाच्या अनेक आठवणी डोळ्या समोरून तरळून गेल्या.

मला आठवतंय ग्रामीण भाग तेव्हा स्वयंपूर्ण होता.आमच्या कडे भाताची व नाचणीची लावणी झाल्यावर लोक बऱ्या पैकी निवांत असायचे. गणपती मध्ये पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला असायचा.माझा नाना व इतर गावातील लोक मुरमाड असलेली किंवा डोंगर उतारावरील जमीन नांगरून त्यामध्ये हूलगे पेरत असत.कुणी उडीद,खुरासनी (काळे तीळ),भुईमुग पेरत असत. तर भात निघाल्यावर हरभरा,वाटाणा,मसूर,गहू पेरत असत.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे भाता बरोबरच भरपूर कडधान्ये होत असे

 गावाकडची शेंगुळी 


गावाकडे हूलग्याच्या पिठापासून शेंगोळी सर्रास बनवली जात असत.माझी आई परातीच्या बूडावर खुप छान शेंगोळीचे वेढे बनवत असे.शेंगोळीच्या वेढ्याचे झणझणीत कालवण,भाकरी व कांदा ही एक वेगळीच फर्माईश असे.शेंगोळयाचा रस्सा भाताबरोबरही तितकाच चविष्ट लागत असे.दोन घास सरस अन्न पोटात जात असे.

हूलग्याचे कढाण (वरण) नुसते मीठ टाकून देखील छान चव लागायची.

वाफवड्याचे कालवण 

अजून एक चविष्ट पदार्थ गावाकडे हमखास असायचा.तो म्हणजे हरबरा डाळ भिजत घालायची.नंतर पाट्यावर सरभरीत वाटायची.तव्यावर त्याचे छोटे छोटे सांडगे थोड्या तेलात परतायचे. नंतर त्याचे कालवण (रस्सा) बनवायचे.खूपच अप्रतिम चव असायची.

शेतातील कामासाठी जर माणसे असतील तर दुपारच्या जेवणाची मोठी लगबग असायची.मसूराची झणझणीत घट्ट आमटी,नाचणी किंवा तांदळाच्या भाकरी,गावाकडील बनवलेले पापड,कांदा आणि खडक्या किंवा रायभोग तांदळाचा भात हे जेवण मोठ्या पाटीतून शेतातील झाडाखाली आणले जाई.

लोक काम थांबवून ओढ्यात हातपाय धुऊन झाडाच्या थंडगार सवलीत पंगती करुन बसत असत.पितळीमध्ये भरपूर आमटी वाढली जाई.सोबतीला कांदा,लसणाची चटणी,पापड असे.लोक आमटीत भाकरी चुरुन खात असत.शेतात झाडाच्या सावलीला पंगतीत जेवण्याची मजा काही औरच असायची.

त्या काळी गरिबी असल्यामूळे अनेक महिला घरात अगदीच काही नसल्यास नुसत्या कांद्याचे (कांदवणी) कालवण करत असत. काही लोक मुद्दाम घरधनीनला आठवण करुन देत असत.आज कांदवणी कर बरका !.कांदा चिरायचा. तो तेलात तळायचा. त्यात मीठ मसाला घालायचा. पाणी घालायचे दोन उकळ्या आल्यावर कालवण तयार.तर मला हे कांदवणी खूपच आवडायचे.

 तव्यावरची वाटोळी भजी 

हरबरे भिजत घालून ते भिजले की तव्यावर केलेली डाळीच्या पिठाची वाटोळी भाजी तांदळाच्या भाकरी बरोबर खाताना वेगळीच मजा यायची.

 तिळाची कोंड 

उखळ।त काळे तीळ,लाल मिरची व मीठ कुटून बनवलेली कोंड तोंडी लावण्यासाठी छानच असायची.




तव्यावरचे सुक्क बेसन 

तव्यावर केलेले मोकळं (सुक्क) बेसन हा एक अप्रतिम चवीचा पदार्थ असायचा.त्याचप्रमाणे तव्यावरची बेसनाची पोळी सुद्धा 
अप्रतिम चव द्यायची.

तव्यावरची बेसनाची पोळी (धीरडे)

उकडलेल्या अंड्यांचे कालवण सुध्दा beshच असायचे.




उकडलेल्या अंड्याची कालवण 
पूर्वी दुपार नंतर कातकरी नदीचे मासे गावात विकायला घेऊन यायचे.छोट्या पानावर वाटा असायचा. त्यावर नदीचे छोटे छोटे (चिंगळया) मासे असायचे. हे मासे तव्यावर बनवले जात असत. या माशांची चटणी भाकरी बरोबर छानच लागत असे.

कैरीच्या कचऱ्या

हळद मीठ लाऊन मडक्यात मुरत ठेवलेल्या कैऱ्या भाकरी बरोबर खाण्यात वेगळीच खुमारी होती.

गावाला अनेक भाज्या केल्या जात असत.कौदरीच्या सोंडग्याची भाजी,भोकरीच्या कोवळ्या पानांची मुटकी,कुर्डूची भाजी,वाळवलेल्या भोकराची भाजी,चिलुची भाजी,सायरीच्या फुलांची भाजी,ते-याची भाजी,चैताची भाजी अशा अनेक रानभाज्याची चव छानच असायची.

 केळ फुलाची भाजी 



केळ फुलांची भाजी तर अप्रतिमच असते. केळीला जे मोठ्या नारळ एवढे फळ येते.ते तोडून आणायचे. कोबी सारखे असते. त्याची पाने काढून टाकायची.आत कंगव्यासारख्या दात्रे असलेल्या भाग असतो.तो सर्व भाग काढून घ्यायचा. तू भाग उभा चिरून रात्रभर पाण्यात ठेवायचा.दुसऱ्या दिवशी पातेल्यात टाकून उकडून घ्यायचा. अनावश्यक पाणी पिळून बाहेर टाकायचे. नंतर पातेल्यात तेल,कांदा, जिरे मोहरी, लसणाच्या पाकळ्या परतून घ्यायच्या. त्यामध्ये केळ फुलाचा हा भाग टाकायचा. मीठ व गोडा मसाला घालून मंद आचेवर शिजवून द्यायचे. ही भाजी अप्रतिम असते.

या भाजी बाबत सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार नाना पाटेकर सांगतात. तिरंगा चित्रपटाचे शूटिंग चालू होते. ते चित्रपटात प्रसिद्ध कलाकार राजकुमार हे काम करत होते. नाना पाटेकर अजूनही शेतातल्या आणि गावरान भाज्या खातात. शूटिंगला जाताना नाना पाटेकर यांना त्यांच्या आईने केळीच्या फुलांची भाजी डब्यात दिली. नाना पाटेकर तो डबा घेऊन शूटिंगला गेले.

दुपारी जेवणाचा लंच ब्रेक झाला. नाना पाटेकर व राजकुमार जेवायला बसले. राजकुमार नानाला म्हणाले. हा माझा डबा तुम्ही खा. व तुमचा डबा आज मी खाणार.

ठीक आहे नाना बोलले आणि त्यांनी त्यांचा डबा राजकुमार यांना दिला.

डबा खाऊन झाल्यावर राजकुमार नानांना बोलले.

नाना ! मा को कहना, खिमा बहुत अच्छा बनाया था.

यावर नाना राजकुमार यांना म्हणाले. राजकुमार जी तो खिमा नव्हता.केळीच्या फुलांची भाजी होती.

यावर राजकुमार नानांना बोलले. नही जानी,ये तो खिमा ही था !

तर अशा या गावाकडच्या भाज्या जो खरा खावय्या आहे त्यालाच ही चव कळणार.

केळीच्या फुलासारखीच कोवळ्या फणसाची भाजी पण अशाच पद्धतीने बनवले जाते. या भाजीची चव सुद्धा अप्रतिमच असते बर का !

 भिजवलेल्या गहू हरभऱ्याच्या घुगऱ्या 

गावात लहान मुलाचे नाव ठेवायच्या वेळी किंवा वीर (देव) नाचवायच्या वेळी मीठ घालून उकडलेले गहू व हरभऱ्याच्या घुगऱ्या सुध्दा छानच चवदार लागायच्या.

पूर्वी लोक घराच्या पाठीमागे भाज्या लावत.अळू,डांगर भोपळा,दोडका,कारली,घोषाळी,काकडी यांचे बी पेरत.यापैकी कोवळया काकडीचे कळे खायची मजा औरच असायची.शिवाय भोपाळघारी,भोकाचे वडे,काकडीचा गर तांदळाच्या पिठात गुळ कालऊन हाळदीच्या पानात बनवलेले पातोळे खुपच छान असायचे.

फास्ट फूडच्या जमान्यात मात्र हे सर्व पदार्थ नामशेष झाले किंवा होत आहेत.त्यामुळे मात्र हार्ड,रक्तदाब,बद्धकोष्ठ,शुगर अपचन वेगवेगळे पोटाचे आजार मात्र ओढऊन घेत आहोत. कळतंय पण वळत नाही.असेच म्हणावे लागेल.


 

भारताने दहशतवादी तळावर केलेला हल्ला आणि ट्रोलर

भारताने दहशतवादी तळावर केलेला हल्ला आणि  ट्रोलर
  
नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाच्या स्थगितीमुळे ट्रॉलर्सनी आणि वाचाळ वीर नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. यासाठी ते वेळोवेळी इंदिराजींची तुलना करून 1971 मध्ये झालेल्या भारत पाक युद्धाचे दाखले देत आहेत.

पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 26 निष्पाप लोक मारले गेले. यावर काहीतरी कारवाई करणे आवश्यक होते. त्यासाठी भारत सरकारने पाकिस्तान बरोबर युद्ध न करता त्यांच्या दहशतवादी तळावर हल्ले करण्याचा निर्णय घेतला. व त्याप्रमाणे पाकिस्तानी दहशतवादांच्या नऊ तळावर हल्ला केला. त्यामध्ये शंभर अतिरेकी व 50 सैनिक मारले गेले. याचे पुरावे ही भारतीय सैन्याने व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहेत.

परंतु तथाकथित वाचाळ वीर नेत्यांनी व ट्रॉलर्सनी भारताने केलेल्या स्ट्राइक हल्ल्यांना युद्धाची उपमा दिली.आणि हे युद्ध संपूच नये. यासाठी मीडियावर मोठ्या प्रमाणात गवगवा केला. परंतु त्यांना हे कळले नाही की मुळात हे युद्धच नव्हते. हा पाकिस्तानी दहशतवाद्यावर स्ट्राइक हल्ला होता. परंतु दहशतवाद्यावरील स्ट्राइक हल्ला आणि प्रत्यक्ष युद्ध यातील फरक या महाभागांना कळलाच नाही.

 देशाचे नेतृत्व करत असताना देशाच्या प्रमुखाला अनेक निर्णय घ्यावे लागतात.भारत हा अनेक राज्यांनी बनवलेला खंडप्राय देश आहे, भारत देशात विविध जाती-धर्माचे लोक भारतात राहतात.येथे अनेक संस्कृती एकत्रितपणे नांदत आहेत याचे भान देशाच्या प्रमुखाला ठेवावे लागते. मग तो कोणत्याही पक्षाचा नेता असो.

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना सतत भारतीय तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्याबरोबर केली जाते. व सन 1971 मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे केल्याबद्दल त्यांचा उदो उदो केला जातो.

परंतु सन 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तानचे 90 हजार सैनिक भारतीय सैन्याने पकडले होते. व भारतीय सैन्याने लाहोरपर्यंत पाकिस्तानचा प्रदेश जिंकलेला होता.असे असतानाही भारत पाकिस्तान मध्ये जो द्विपक्षीय करार सिमला येथे झाला. त्या करारामध्ये एकमेकांनी एकमेकांच्या देशावर हल्ले करायचे नाहीत.भविष्यात युद्ध करायचे नाही. तसेच भारतीय सैन्याने पकडलेले पाकिस्तानचे 90 हजार सैनिक त्यांना परत करायचे. त्याचप्रमाणे भारताने लाहोर पर्यंत पाकिस्तानचा जो प्रदेश जिंकला आहे तो प्रदेश पाकिस्तानला परत द्यायचा. असा द्वीपक्षीय करार करण्यात आला.

परंतु यापुढे पाकिस्तानने सिमला कराराला केराची टोपली दाखवली व सतत भारताविरुद्ध कुरापती सुरू केल्या. त्यामुळे 1971 चे युद्ध जिंकूनही भारताच्या पदरी काहीच पडले नाही. त्यावेळी संधी असतानाही पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा 720 चौरस किलोमीटरचा भू भाग परत मिळवता आला असता. कारण भारताने युद्ध जिंकले होते. पाकिस्तानचे 90 हजार सैनिक पकडले होते. शिवाय पाकिस्तानचा लाहोरपर्यंतचा प्रदेशही जिंकला होता. असे असतानाही पाकव्याप्त काश्मीर परत मिळवता आला नाही. इंदिराजींनी तेव्हा वाटाघाटीच्या वेळी युनोच्या शिष्ट मंडळांला जर सहभागी करून घेतले असते. तर नक्कीच काहीतरी तोडगा निघाला असता. परंतु त्याची आजही किंमत भारतीयांना चुकवावी लागते.

पण ट्रोलर आणि नेते म्हणतात की, इंदिराजी ह्या भारतातील सर्वश्रेष्ठ पंतप्रधान पैकी एक आहेत. परंतु त्यांचे लोकसभा सदस्यत्व अलाहाबाद सत्र न्यायालयाने रद्द केले तेव्हा इंदिरा गांधी यांनी भारतावर आणीबाणी लादली.आणि राष्ट्रपती राजवट लागू केली.भारतीय पत्रकारितेवर निर्बंध आणले गेले, विरोधी पक्षातील लोकांना व इंदिरा गांधी यांना विरोध करणाऱ्या लोकांना तुरुंगात पाठवले.अनेकांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागला,अनेकांना नजर कैदेत ठेवले. लोकशाहीची ढळढळीत हत्या केली.
असे असतानाही आता हेच मीडियावाले, तथाकथित पुढारी बोलतात,की मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत. मोदी हुकूम शहा आहेत.केवळ मन की बात सांगतात.परंतु मोदींनी कधीही पत्रकारांवर निर्बंध लादले नाहीत, आज आपण फेसबुक इंस्टाग्राम वर यूट्यूब चैनल वर एखाद्या पोस्टवर लोक मोदी विषयी किती वाईट कमेंट करतात हे एकदा पहा.अशा कमेंट जर इंदिराजींच्या काळात झाल्या असत्या तर नक्कीच त्यांनी यांना फासावर लटकवले असते.

काही लोक म्हणतात की भाजपमध्ये मोदी आणि शहा यांच्या बाबतीत बोलायला कोणाचीही हिंमत नाही.परंतु त्या काळात इंदिराजीवर बोलण्याची त्यांच्या पक्षातील तर सोडाच परंतु भारतातील एकही नागरिकांमध्ये हिम्मत नव्हती.

अनेक तथाकथित पुढारी म्हणतात की मोदी हुकूमशहा आहेत. मग ते इंदिरा गांधी यांच्यासारखी आणीबाणी का लागू करू शकत नाहीत?



इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळाने त्यावेळी जो नसबंदीचा निर्णय घेतला तो जरी चांगला निर्णय असला तरी त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केली गेली नाही.त्या काळात सापडेल त्याची नसबंदी करायचे आदेश देण्यात आले. हे आदेश संजय गांधी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिले होते. व दररोज किती नसबंदी झाली याचे अहवाल दररोज पाठवण्यात यावेत असेही आदेश होते. त्यावेळी अनेक हिंदू गरिबांवर अत्याचार झाला. ज्यांची लग्नच झाली नाहीत त्यांच्याही नसबंदी करून टाकल्या. परंतु हाच निर्णय मुस्लिमांना बाकी लागू नव्हता. त्यांना बारा बारा मुले झाली तरी त्यांना नसबंदीचा निर्णय लागू नव्हता. मग हा हिंदू मुस्लिम भेदभाव त्यांनी का केला? केवळ मुस्लिमांची संख्या वाढवण्यासाठी तर नव्हे?


पंजाब मध्ये नेहमीच अकाली दलाची सत्ता येत होती. तिथे काँग्रेसला चंचू प्रवेश करण्यासाठी म्हणून भिन्द्रणवाले यांना काँग्रेसने हाताशी धरून अकाली दलाला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. व त्यांना आर्थिक रसद पुरवली. हेच भिंद्राणवाले भारत सरकारकडे पंजाब राज्याची वेगळ्या खालीस्थानाची मागणी करू लागले. त्यासाठी भिंद्राणवाले यांनी पंजाब मधील जनता त्यांच्या बाजूने वळवली.आणि याच बिंद्रनावाले यांना पकडण्यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात इंदिरा गांधी यांनी मंत्रिमंडळाची मान्यता नसतानाही मिलिटरी घुसवली. भिद्रानवाले यांना पकडण्याच्या नादात भारतीय आर्मीने अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये सुमारे पाच हजार शीख जनता, स्त्रिया, लहान मुले यांची हत्या झाली. भिद्रनवाले यांना मारले गेले. परंतु पंजाब प्रश्न तसाच पेटता राहिला. तो प्रश्न पुढे 1991 साली आलेल्या पी. व्ही. नरसिंहराव यांनी सोडवला..

1993 मध्ये मुंबई मध्ये बॉम्बस्फोट झाले त्यामध्ये अनेक लोक मारले गेले त्यावेळी पी व्ही नरसिंहराव यांना का जबाबदार धरले नाही.?

दहा दहशतवादी गुजरात मार्गे मुंबईत येऊन अंधाधुंद गोळीबार केला, अनेक लोक मारले गेले. सतर्क असलेल्या पोलिसांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले व एक अफजल कसाब याला नंतर फाशी देण्यात आले. मग उर्वरित दहशतवादी का पकडण्यात आले नाहीत? हे केवळ मुंबई पोलिसांना जबाबदार धरण्यात काही अर्थ नव्हता. त्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडली परंतु गुजरात बॉर्डरवर भारतीय सैन्य तैनात करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होती. का त्यांनी सुरक्षा ठेवली नाही? दहशतवादी भारतीय हद्दीत घुसलेच कसे? हा प्रश्न आता नेते म्हणावणाऱ्यांना का आठवत नाही. तेव्हा डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते. का त्यांना जाब विचारला नाही?

भारतीय सैन्याचे अधिकारी जीव तोडून व पुरावे देऊन सांगत आहेत. की आम्ही पाकिस्तान बरोबर युद्ध केलेले नाही केवळ दहशतवादी तळ असलेल्या जागेवर एअर स्ट्राइक केले आहे. त्यामध्ये शंभर दहशतवादी मारले गेले आहेत.आणि पाकिस्तानची जवळजवळ 50 सैनिक मारले गेले आहेत.

आणि हे नालायक भारतीय पुढारी म्हणतात की मोदींनी युद्धबंदी करायला नको होती. अरे मूर्खांनो! हे युद्ध नव्हतेच मुळी. केवळ दहशतवादी तळावर एअर स्ट्राइक होते.आपली मोहीम फत्ते झाली आहे. उगाच युद्ध करून भारतीय सैन्याची हानी आणि भारतीय आर्थिक नुकसान कशाला करून घ्यायचे. ही साधी अक्कल यांना नाही. तुम्हाला स्वार्थासाठी केवळ या पक्षातून त्या पक्षात जायचे. व खुर्ची मिळवायची आणि देश सेवा केल्याचा आव आणायचा एवढेच माहित आहे.

आणि राहिला विषय ट्रोल करणाऱ्या लोकांचा.अरे मूर्खांनो! तुम्हाला नीट खायला मिळत नाही,आपण कोणाला ट्रोल करतो. याबाबत आपली लायकी काय आहे.आपली किती समाजात वट आहे याचा पहिला विचार केला पाहिजे. त्यापेक्षा काहीतरी काम धंदा केला तर निश्चितच तुम्हाला, नाही देशासाठी परंतु तुमच्यासाठी तरी काहीतरी करता येईल. कुणालाही ट्रोल करून पोट भरत नसतं. मग तो कोणीही असो राजकारणी असो, कलाकार किंवा क्रीडा क्षेत्रातला असो किंवा कोणीही सामान्य माणूस असो त्यांची तळतळ नक्कीच तुम्हाला भोगावी लागनार हेही तितकेच खरे.

बारकू बेलदार

बारकू बेलदार 
पूर्वी गावात खूपच गरिबी होती. 90 % लोक बारकू बेलदार झोपडीमध्ये राहत असत.परंतु सन 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला खेड्या पाड्यांमध्ये अमुलाग्र बदल होत होते.सन 
१९७२ च्या दुष्काळात खेडोपाडी कच्चे रस्ते झाले होते. 

नंतर बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या.गावागावांमध्ये दूध डेअ-यांचे आगमन झाले होते. लोक गाई म्हशी व शेळ्या यासारखे दुधाळ जनावरे सांभाळू लागले होते.शिवाय जोडीला कोंबड्या चितड्या होत्याच.त्यावेळी नुकतीच शासनाची रोजगार हमी योजना सुरू झाली होती. प्रत्येकाच्या हाताला काम मिळत होते.रस्त्यांची, विहिरींची, शाळा व इतर सरकारी इमारतींची व तळ्यांची कामे चालू होती. त्यामुळे लोकांकडे बऱ्यापैकी पैसे येत होते.एव्हाना गरिबीचे चटके कमी झाले होते.

लोकांनी राहण्यासाठी पक्या दगड मातीची घरे बांधायला सुरुवात केली होती.एसटी गावागावांमध्ये पोहोचायला सुरुवात झाली होती. त्याचप्रमाणे गावागावांमध्ये विजेचे जाळे पसरू लागले होते.घराघरांमध्ये रॉकेलची चिमणी किंवा गोडे तेलाची पणती जाऊन विजेचे दिवे लागायला सुरूवात झाली होती.

त्याच सुमारास नुकतेच रोजगार हमी योजनेतून आमच्या गावाच्या नवीन चिखाळीच्या विहिरीचे बांधकाम करण्यासाठी मोठा पत्थर असलेल्या दगडाला सुरुंग लावण्याचे काम चालू होते. विहिरीच्या बांधकामासाठी छोट्या डबरांची आवश्यकता होती. त्यासाठी पहारीच्या सहाय्याने दिवसभर दगडाला सुरंग घेण्यासाठी फुट दिडफुट च्छिद्र पाडुन त्यामध्ये सुरगांची दारू भरून वात पेटवायची.थोड्याच वेळात धडाड धुम आवाज होऊन मोठमोठे दगड हवेत उडायचे.हे काम कै.शंकर अहीलू तळपे, कै.नामदेव रामा तळपे, कै.विष्णू पांडू तळपे करत होते.

आणि या विहिरीच्या बांधकामासाठी मोठ्या दगडांचे रुपांतर छोट्या छोट्या डबरात करण्यासाठी बारकू बेलदार यांचे सन १९७९ साली आमच्या गावात आगमन झाले.अत्यंत स्वच्छ पांढरे शुभ्र धोतर, पैरण,टोपी,मनगटी घड्याळ व हातात मर्फी कंपनीचा रेडिओ असा बारकू बेलदार यांचा वेष होता.त्यांचा स्वभाव गरीब परंतु विनोदी आणि मितभाषी असा होता.

बारकू बेलदार हे अविवाहित असल्यामुळे त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी नव्हती.बारकू बेलदार हा वन मँन शो.होता. बारकू बेलदार यांनी कामाला सुरुवात केल्यावर त्यांच्याजवळ असलेल्या दगड फोडायचा सुतकीच्या (घण) सहाय्याने मोठ्या मोठ्या दगडाचे छोट्या छोट्या डबरामध्ये रूपांतर करायचे.डबर पाडायचे तर बारकू बेलदार यांनीच अशी त्यांची ख्याती होती.

विहिरीचे काम पूर्ण झाले तरी बारकू बेलदार हा गावातच राहिला.त्याला गावातील नवीन घर बांधणाऱ्या लोकांची कामे मिळू लागली होती. शिवाय भागात त्याची ख्याती पसरल्यामुळे परगावचे लोकसुद्धा बारकू बेलदार यांचेकडे येत होते.

बारकू बेलदार यांना रेडिओची प्रचंड आवड होती. सतत त्यांचे जवळ रेडिओ असायचा. रेडिओ हातात नसलेले बारकू बेलदार हे कधीच कोणी पाहिले नाहीत.इतकी त्यांना रेडिओची आवड होती.

त्याच्या समवयस्क लोक त्यांना बारकू तर इतर लोक बारकू दादा असे म्हणत.गावातील गरीब लोकांना ते सतत मदत करत असत.अनेक लोकांनी त्यांचे कामाचे पैसे सुद्धा दिलेले नाहीत.तरीही त्यांनी कधीच कोणाला पैशाबद्दल त्रास दिला नाही.काही लोकांनी कधी ना कधी जसे मिळतील तसे पैसे बारकू बेलदार यांना दिलेही.

बारकू बेलदार यांचा स्वभाव अतिशय विनोदी होता. लहान मुलांना ते जास्त प्रिय होते.नवीनच मंदोशी - तळेघर रस्ता झाला होता.एक धिप्पाड पंजाबी शिख माणूस अगदी सकाळी सकाळीच त्याच्या फटफटीवर (मोटरसायकल) भीमाशंकरला अभयारण्याला भेट देण्यासाठी चालला होता.मोहनवाडी पार केल्यानंतर गोठणीच्या पुढे त्याची फटफटी अचानक बंद पडली. आम्ही शेजारी खेळत होतो.त्याने खूप प्रयत्न करूनही मोटरसायकल दुरुस्त काही होईना, शेवटी त्याने खिशातून सिगारेट काढली व ती पेटवून ओढू लागला. गावातील बरेच लोक त्याच्या जवळ जमा झाले.परंतु कुणालाच यातले काही कळत नव्हते.एवढ्यात बारकू बेलदार तेथे हजर झाला. त्याने मोटर सायकल निरखून पाहिली. पाहून झाल्यावर बारकू दादा त्या सरदाराला म्हणाला, सरदारजी "चल एक चारमिनार लाव." चारमिनार म्हणजे त्यावेळचा एक सिगरेटचा ब्रँड होता.तो सरदार बारकू दादाला तुच्छतेने बोलला अय,जाव झाडे को ! तुम्हारा काम नाही है!.

हे ऐकून न ऐकल्या सारखे करून बारकू दादा गाडीला भिडला..

बोल पाना किधर है !

नाईलाजाने त्या सरदाराने बारकूदादाला गाडीतले पान्हे दिले.

थोड्याच वेळात बारकुदाने चैनचे ब्रॅकेट उघडून गाडीची तुटलेली चेन बाहेर काढली. व बोलला सरदारजी ये चैन टुट गयी है!

सरदारजी बारकुदाकडे पहातच राहीला.बारकुदादा बोलला.क्या देखते है? "लाव सिगारेट"

लगेच सरदारने मुकाट्याने बारकुदाला सिगारेट पेटवून दिली.

सिगरेटओढत,ओढत बारकू दादा बोलला.आव मेरे साथ! असे म्हणून बारकू दादा चिमण लोहाराच्या घराकडे चालू लागला.त्याच्या मागुन सरदार व आम्ही चालू लागलो.चिमण लोहार यांचा भाता चालू होता. त्यांची सासू अंजाबाई भाता हालवत होती.चिमण लोहार सकाळी सकाळी दोन तांबे हातभट्टी दारू पिऊन भात्या शेजारी निखाऱ्यात कोयते व विळे तापून लाल व्हायची वाट बघत बसला होता.शेजारी चार-पाच लोक बसले होते.आणि अचानक बारकू दादा त्या सरदाराला घेऊन चिमण लोहाराच्या दारात हजर झाला.l चिमण लोहार यांना वाटले की हा माणूस म्हणजे पोलिसच असला पाहिजे. त्याने तात्काळ उठून घरात घुसून मागच्या दाराने लांब जंगलात धूम ठोकली.बारकूदाने त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला परंतु चिमण लोहार न ऐकताच रानात पसार झाला. बारकू दादाने लगेच भात्याचा ताबा घेतला. लोखंडी चैन भात्यात निखा-यामध्ये ठेवली आणि अंजाव म्हातारीला भाता हलवायचे फर्मान सोडले.चेन चांगली लाल झाल्यावर त्याने चेन ऐरणी वर ठेवली आणि सरदारला बोलला उठाव घण!

त्याने बारकूदादाची आज्ञा शिरसावंद्य मानून घण हातात घेतला आणि तो ऐरणीवर घाव मारू लागला. परंतु त्याला घण हाणायला काही जमेना.बारकू दादा बोलला निव्वळ फोफशी जात हाय ही.

सरदार बोलला मुझे क्या बोला क्या?

यावर बारकू दादा त्याला बोलला तुम कितना सुर है! यावर सरदार सरदार खुश झाला.

बारकूदाने तुटलेली चैन सांधून एकत्र करून त्यामध्ये दुसरे लोखंड बेमालूम बसवून चेंज जोडली.चैन पुन्हा एकदा भात्यातील निखाऱ्यात घातली.लाल झाल्यावर पुन्हा चैन बाहेर काढली.आणि एक दोन घाव मारल्यावर चैन पक्की जोडली गेली आहे याची खात्री केली व शेजारच्या पाणी भरून ठेवलेल्या दगडाच्या डबक्यात टाकली. चैन थंड झाल्यावर पुन्हा एकदा खात्री केली. हे सर्व झाल्यावर पुन्हा आमची जत्रा सरदाराच्या गाडी कडे चालू लागली.

बारकूदाने चैन अगदी व्यवस्थित बसवली आणि सरदारला गाडी चालवण्याचे फर्मान सोडले.परंतु सरदार एकटा काही गाडीवर बसेना.तो बारकू दादाला मागे बसायची विनंती करू लागला.शेवटी बारकू दादा बसायला तयार झाल्यावर सरदारने गाडी चालु केली. आणि दोघे भरधाव वेगाने दूर निघून गेले.

बरोबर आठ दिवसांनी बारकू दादा गावात हजर झाला.आम्ही त्याला विचारले बारकूदादा एवढे दिवस कुठे होतास? बारकू दादा बोलला सरदार बरोबर जंगलात खूप फिरलो.खाण्यापिण्याची खूप चंगळ होती.खूप मजा केली.असा हा बाकुदादा.

बारकू दादा ने लग्न न केल्यामुळे तो एकटाच राहिला. त्याचे कुणीही नातेवाईक कधीही त्याला भेटायला आल्याचे आमच्या किंवा नाही. त्यामुळे बारकू दादाच्या विषयी कोणतीही माहिती गावाला नव्हती. व बारकू दादा ने कधीही त्याच्या खाजगी आयुष्य विषयी आम्हाला सांगितले नाही.

परंतु एकूणच बारकू बेलदार यांचा स्वभाव अतिशय चांगला असल्यामुळे गावाने त्याच्यावर खूप माया केली. आपल्याच कुटुंबातील एक त्याला मानला. बारकू दादाला काम असो वा नसो बारकू दादा कधीही कुणाच्याही घरी जेवण करत असे. सनावाराला लोक हक्काने बारकू दादाला जेवायला बोलवत. जेवणाच्या वेळी जर बारकू दादा आला तर त्याला बळजबरीने लोक जेवायला बसवत.काम केलेच पाहिजे असे काही नव्हते.

सन १९८९ ला बारकू दादाने गाव सोडले.तो कुठे गेला? व कोठे असेल? याबाबत खूप तर्क-वितर्क केले गेले.परंतु बारकू दादाची काहीच खबर गावाला मिळाली नाही.खूप दिवसांनी म्हणजे साधारण १९९७ साली बारकू दादा मला शिनोली या गावाजवळ म्हशी सांभाळताना दिसला.मला बारकू दादाला भेटल्याचा खूप आनंद झाला. बारकू दादा आता म्हातारा झाला होता.त्याला नीट दिसत नव्हतं.बारकू दादा येथे कोणाच्या तरी म्हशी सांभाळण्याचे काम करत होता, मी त्याला पुन्हा गावाकडे येण्याबद्दल विनंती केली, परंतु बारकू दादा बोलला पहिल्यासारखं आता काम होत नाही, शिवाय तिकडे आता कामेही राहिली नाहीत. मी बोललो काही काळजी करू नकोस, तुला गाव सांभाळेल, परंतु बारकू दादा केवळ हसला अगदी खिन्नपणे,...

आता बारकू दादा पहिल्यासारखा टापटीप दिसत नाही. हातात घड्याळ व रेडिओ दिसत नाही, पांढरेशुभ्र धोतरा ऐवजी हाफ पॅन्ट व बनियन असा वेश पाहून त्या काळातला शुभ्र धोतर व पैरण व टोपी असलेला बारकुदादा.. अंगाला व कपड्यांना एकही डाग पडू न देणारा बारकुदादा,सतत हातात घड्याळ व हातात रेडिओ असलेला बारकुदादा... त्यावेळचा विनोदी बारकू दादा... इत्यादी सर्व आठवले.आणि आताचा त्याचा रापलेला चेहरा...हाडाची काडे झालेला..डोळे खोल गेलेला. गबाळा बारकुदादा पाहून मन सुन्न झाले.नियती माणसावर कधी कोणती वेळ आणेल हे सांगणे कठीण..


गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस