गावाकडच्या रेसिपी व पदार्थ..


गावाकडच्या रेसिपी व पदार्थ 

आजकाल प्रत्येक गृहिनीला संध्याकाळी कोणती भाजी करावी. किंवा कोणता स्वयंपाक करावा हा मोठा प्रश्न असतो.शहरात तर सुट्टी असेल तर सर्रास लोक ढाब्यावर जेवायला जातात. त्यात मीही एक.

ढाब्यावर जायला नकोच वाटते.त्याच त्या पनीरच्या भाज्या?? कोल्हापुरी व्हेज,व्हेज तिरंगा,स्टार्टरला पनीर चिल्ली,सोयाबीन चिल्ली,मसाला पापड. ... . नुसता विचार जरी आला तरी असलेली भुक निघुन जाते.परंतु घराच्या किंवा मित्रांच्या आग्रहामूळे जावेच लागते.

पूर्वी लोकांना खायला नीट मिळत नव्हते.आणि आता सुग्रास ? भोजन असूनही भुक लागत नाही.

एकदा असाच निवांत बसलो असता लहानपनाच्या अनेक आठवणी डोळ्या समोरून तरळून गेल्या.

मला आठवतंय ग्रामीण भाग तेव्हा स्वयंपूर्ण होता.आमच्या कडे भाताची व नाचणीची लावणी झाल्यावर लोक बऱ्या पैकी निवांत असायचे. गणपती मध्ये पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला असायचा.माझा नाना व इतर गावातील लोक मुरमाड असलेली किंवा डोंगर उतारावरील जमीन नांगरून त्यामध्ये हूलगे पेरत असत.कुणी उडीद,खुरासनी (काळे तीळ),भुईमुग पेरत असत. तर भात निघाल्यावर हरभरा,वाटाणा,मसूर,गहू पेरत असत.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे भाता बरोबरच भरपूर कडधान्ये होत असे

 गावाकडची शेंगुळी 


गावाकडे हूलग्याच्या पिठापासून शेंगोळी सर्रास बनवली जात असत.माझी आई परातीच्या बूडावर खुप छान शेंगोळीचे वेढे बनवत असे.शेंगोळीच्या वेढ्याचे झणझणीत कालवण,भाकरी व कांदा ही एक वेगळीच फर्माईश असे.शेंगोळयाचा रस्सा भाताबरोबरही तितकाच चविष्ट लागत असे.दोन घास सरस अन्न पोटात जात असे.

हूलग्याचे कढाण (वरण) नुसते मीठ टाकून देखील छान चव लागायची.

वाफवड्याचे कालवण 

अजून एक चविष्ट पदार्थ गावाकडे हमखास असायचा.तो म्हणजे हरबरा डाळ भिजत घालायची.नंतर पाट्यावर सरभरीत वाटायची.तव्यावर त्याचे छोटे छोटे सांडगे थोड्या तेलात परतायचे. नंतर त्याचे कालवण (रस्सा) बनवायचे.खूपच अप्रतिम चव असायची.

शेतातील कामासाठी जर माणसे असतील तर दुपारच्या जेवणाची मोठी लगबग असायची.मसूराची झणझणीत घट्ट आमटी,नाचणी किंवा तांदळाच्या भाकरी,गावाकडील बनवलेले पापड,कांदा आणि खडक्या किंवा रायभोग तांदळाचा भात हे जेवण मोठ्या पाटीतून शेतातील झाडाखाली आणले जाई.

लोक काम थांबवून ओढ्यात हातपाय धुऊन झाडाच्या थंडगार सवलीत पंगती करुन बसत असत.पितळीमध्ये भरपूर आमटी वाढली जाई.सोबतीला कांदा,लसणाची चटणी,पापड असे.लोक आमटीत भाकरी चुरुन खात असत.शेतात झाडाच्या सावलीला पंगतीत जेवण्याची मजा काही औरच असायची.

त्या काळी गरिबी असल्यामूळे अनेक महिला घरात अगदीच काही नसल्यास नुसत्या कांद्याचे (कांदवणी) कालवण करत असत. काही लोक मुद्दाम घरधनीनला आठवण करुन देत असत.आज कांदवणी कर बरका !.कांदा चिरायचा. तो तेलात तळायचा. त्यात मीठ मसाला घालायचा. पाणी घालायचे दोन उकळ्या आल्यावर कालवण तयार.तर मला हे कांदवणी खूपच आवडायचे.

 तव्यावरची वाटोळी भजी 

हरबरे भिजत घालून ते भिजले की तव्यावर केलेली डाळीच्या पिठाची वाटोळी भाजी तांदळाच्या भाकरी बरोबर खाताना वेगळीच मजा यायची.

 तिळाची कोंड 

उखळ।त काळे तीळ,लाल मिरची व मीठ कुटून बनवलेली कोंड तोंडी लावण्यासाठी छानच असायची.




तव्यावरचे सुक्क बेसन 

तव्यावर केलेले मोकळं (सुक्क) बेसन हा एक अप्रतिम चवीचा पदार्थ असायचा.त्याचप्रमाणे तव्यावरची बेसनाची पोळी सुद्धा 
अप्रतिम चव द्यायची.

तव्यावरची बेसनाची पोळी (धीरडे)

उकडलेल्या अंड्यांचे कालवण सुध्दा beshच असायचे.




उकडलेल्या अंड्याची कालवण 
पूर्वी दुपार नंतर कातकरी नदीचे मासे गावात विकायला घेऊन यायचे.छोट्या पानावर वाटा असायचा. त्यावर नदीचे छोटे छोटे (चिंगळया) मासे असायचे. हे मासे तव्यावर बनवले जात असत. या माशांची चटणी भाकरी बरोबर छानच लागत असे.

कैरीच्या कचऱ्या

हळद मीठ लाऊन मडक्यात मुरत ठेवलेल्या कैऱ्या भाकरी बरोबर खाण्यात वेगळीच खुमारी होती.

गावाला अनेक भाज्या केल्या जात असत.कौदरीच्या सोंडग्याची भाजी,भोकरीच्या कोवळ्या पानांची मुटकी,कुर्डूची भाजी,वाळवलेल्या भोकराची भाजी,चिलुची भाजी,सायरीच्या फुलांची भाजी,ते-याची भाजी,चैताची भाजी अशा अनेक रानभाज्याची चव छानच असायची.

 केळ फुलाची भाजी 



केळ फुलांची भाजी तर अप्रतिमच असते. केळीला जे मोठ्या नारळ एवढे फळ येते.ते तोडून आणायचे. कोबी सारखे असते. त्याची पाने काढून टाकायची.आत कंगव्यासारख्या दात्रे असलेल्या भाग असतो.तो सर्व भाग काढून घ्यायचा. तू भाग उभा चिरून रात्रभर पाण्यात ठेवायचा.दुसऱ्या दिवशी पातेल्यात टाकून उकडून घ्यायचा. अनावश्यक पाणी पिळून बाहेर टाकायचे. नंतर पातेल्यात तेल,कांदा, जिरे मोहरी, लसणाच्या पाकळ्या परतून घ्यायच्या. त्यामध्ये केळ फुलाचा हा भाग टाकायचा. मीठ व गोडा मसाला घालून मंद आचेवर शिजवून द्यायचे. ही भाजी अप्रतिम असते.

या भाजी बाबत सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार नाना पाटेकर सांगतात. तिरंगा चित्रपटाचे शूटिंग चालू होते. ते चित्रपटात प्रसिद्ध कलाकार राजकुमार हे काम करत होते. नाना पाटेकर अजूनही शेतातल्या आणि गावरान भाज्या खातात. शूटिंगला जाताना नाना पाटेकर यांना त्यांच्या आईने केळीच्या फुलांची भाजी डब्यात दिली. नाना पाटेकर तो डबा घेऊन शूटिंगला गेले.

दुपारी जेवणाचा लंच ब्रेक झाला. नाना पाटेकर व राजकुमार जेवायला बसले. राजकुमार नानाला म्हणाले. हा माझा डबा तुम्ही खा. व तुमचा डबा आज मी खाणार.

ठीक आहे नाना बोलले आणि त्यांनी त्यांचा डबा राजकुमार यांना दिला.

डबा खाऊन झाल्यावर राजकुमार नानांना बोलले.

नाना ! मा को कहना, खिमा बहुत अच्छा बनाया था.

यावर नाना राजकुमार यांना म्हणाले. राजकुमार जी तो खिमा नव्हता.केळीच्या फुलांची भाजी होती.

यावर राजकुमार नानांना बोलले. नही जानी,ये तो खिमा ही था !

तर अशा या गावाकडच्या भाज्या जो खरा खावय्या आहे त्यालाच ही चव कळणार.

केळीच्या फुलासारखीच कोवळ्या फणसाची भाजी पण अशाच पद्धतीने बनवले जाते. या भाजीची चव सुद्धा अप्रतिमच असते बर का !

 भिजवलेल्या गहू हरभऱ्याच्या घुगऱ्या 

गावात लहान मुलाचे नाव ठेवायच्या वेळी किंवा वीर (देव) नाचवायच्या वेळी मीठ घालून उकडलेले गहू व हरभऱ्याच्या घुगऱ्या सुध्दा छानच चवदार लागायच्या.

पूर्वी लोक घराच्या पाठीमागे भाज्या लावत.अळू,डांगर भोपळा,दोडका,कारली,घोषाळी,काकडी यांचे बी पेरत.यापैकी कोवळया काकडीचे कळे खायची मजा औरच असायची.शिवाय भोपाळघारी,भोकाचे वडे,काकडीचा गर तांदळाच्या पिठात गुळ कालऊन हाळदीच्या पानात बनवलेले पातोळे खुपच छान असायचे.

फास्ट फूडच्या जमान्यात मात्र हे सर्व पदार्थ नामशेष झाले किंवा होत आहेत.त्यामुळे मात्र हार्ड,रक्तदाब,बद्धकोष्ठ,शुगर अपचन वेगवेगळे पोटाचे आजार मात्र ओढऊन घेत आहोत. कळतंय पण वळत नाही.असेच म्हणावे लागेल.


 

भारताने दहशतवादी तळावर केलेला हल्ला आणि ट्रोलर

भारताने दहशतवादी तळावर केलेला हल्ला आणि  ट्रोलर
  
नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाच्या स्थगितीमुळे ट्रॉलर्सनी आणि वाचाळ वीर नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. यासाठी ते वेळोवेळी इंदिराजींची तुलना करून 1971 मध्ये झालेल्या भारत पाक युद्धाचे दाखले देत आहेत.

पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 26 निष्पाप लोक मारले गेले. यावर काहीतरी कारवाई करणे आवश्यक होते. त्यासाठी भारत सरकारने पाकिस्तान बरोबर युद्ध न करता त्यांच्या दहशतवादी तळावर हल्ले करण्याचा निर्णय घेतला. व त्याप्रमाणे पाकिस्तानी दहशतवादांच्या नऊ तळावर हल्ला केला. त्यामध्ये शंभर अतिरेकी व 50 सैनिक मारले गेले. याचे पुरावे ही भारतीय सैन्याने व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहेत.

परंतु तथाकथित वाचाळ वीर नेत्यांनी व ट्रॉलर्सनी भारताने केलेल्या स्ट्राइक हल्ल्यांना युद्धाची उपमा दिली.आणि हे युद्ध संपूच नये. यासाठी मीडियावर मोठ्या प्रमाणात गवगवा केला. परंतु त्यांना हे कळले नाही की मुळात हे युद्धच नव्हते. हा पाकिस्तानी दहशतवाद्यावर स्ट्राइक हल्ला होता. परंतु दहशतवाद्यावरील स्ट्राइक हल्ला आणि प्रत्यक्ष युद्ध यातील फरक या महाभागांना कळलाच नाही.

 देशाचे नेतृत्व करत असताना देशाच्या प्रमुखाला अनेक निर्णय घ्यावे लागतात.भारत हा अनेक राज्यांनी बनवलेला खंडप्राय देश आहे, भारत देशात विविध जाती-धर्माचे लोक भारतात राहतात.येथे अनेक संस्कृती एकत्रितपणे नांदत आहेत याचे भान देशाच्या प्रमुखाला ठेवावे लागते. मग तो कोणत्याही पक्षाचा नेता असो.

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना सतत भारतीय तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्याबरोबर केली जाते. व सन 1971 मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे केल्याबद्दल त्यांचा उदो उदो केला जातो.

परंतु सन 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्तानचे 90 हजार सैनिक भारतीय सैन्याने पकडले होते. व भारतीय सैन्याने लाहोरपर्यंत पाकिस्तानचा प्रदेश जिंकलेला होता.असे असतानाही भारत पाकिस्तान मध्ये जो द्विपक्षीय करार सिमला येथे झाला. त्या करारामध्ये एकमेकांनी एकमेकांच्या देशावर हल्ले करायचे नाहीत.भविष्यात युद्ध करायचे नाही. तसेच भारतीय सैन्याने पकडलेले पाकिस्तानचे 90 हजार सैनिक त्यांना परत करायचे. त्याचप्रमाणे भारताने लाहोर पर्यंत पाकिस्तानचा जो प्रदेश जिंकला आहे तो प्रदेश पाकिस्तानला परत द्यायचा. असा द्वीपक्षीय करार करण्यात आला.

परंतु यापुढे पाकिस्तानने सिमला कराराला केराची टोपली दाखवली व सतत भारताविरुद्ध कुरापती सुरू केल्या. त्यामुळे 1971 चे युद्ध जिंकूनही भारताच्या पदरी काहीच पडले नाही. त्यावेळी संधी असतानाही पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा 720 चौरस किलोमीटरचा भू भाग परत मिळवता आला असता. कारण भारताने युद्ध जिंकले होते. पाकिस्तानचे 90 हजार सैनिक पकडले होते. शिवाय पाकिस्तानचा लाहोरपर्यंतचा प्रदेशही जिंकला होता. असे असतानाही पाकव्याप्त काश्मीर परत मिळवता आला नाही. इंदिराजींनी तेव्हा वाटाघाटीच्या वेळी युनोच्या शिष्ट मंडळांला जर सहभागी करून घेतले असते. तर नक्कीच काहीतरी तोडगा निघाला असता. परंतु त्याची आजही किंमत भारतीयांना चुकवावी लागते.

पण ट्रोलर आणि नेते म्हणतात की, इंदिराजी ह्या भारतातील सर्वश्रेष्ठ पंतप्रधान पैकी एक आहेत. परंतु त्यांचे लोकसभा सदस्यत्व अलाहाबाद सत्र न्यायालयाने रद्द केले तेव्हा इंदिरा गांधी यांनी भारतावर आणीबाणी लादली.आणि राष्ट्रपती राजवट लागू केली.भारतीय पत्रकारितेवर निर्बंध आणले गेले, विरोधी पक्षातील लोकांना व इंदिरा गांधी यांना विरोध करणाऱ्या लोकांना तुरुंगात पाठवले.अनेकांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागला,अनेकांना नजर कैदेत ठेवले. लोकशाहीची ढळढळीत हत्या केली.
असे असतानाही आता हेच मीडियावाले, तथाकथित पुढारी बोलतात,की मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत. मोदी हुकूम शहा आहेत.केवळ मन की बात सांगतात.परंतु मोदींनी कधीही पत्रकारांवर निर्बंध लादले नाहीत, आज आपण फेसबुक इंस्टाग्राम वर यूट्यूब चैनल वर एखाद्या पोस्टवर लोक मोदी विषयी किती वाईट कमेंट करतात हे एकदा पहा.अशा कमेंट जर इंदिराजींच्या काळात झाल्या असत्या तर नक्कीच त्यांनी यांना फासावर लटकवले असते.

काही लोक म्हणतात की भाजपमध्ये मोदी आणि शहा यांच्या बाबतीत बोलायला कोणाचीही हिंमत नाही.परंतु त्या काळात इंदिराजीवर बोलण्याची त्यांच्या पक्षातील तर सोडाच परंतु भारतातील एकही नागरिकांमध्ये हिम्मत नव्हती.

अनेक तथाकथित पुढारी म्हणतात की मोदी हुकूमशहा आहेत. मग ते इंदिरा गांधी यांच्यासारखी आणीबाणी का लागू करू शकत नाहीत?



इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळाने त्यावेळी जो नसबंदीचा निर्णय घेतला तो जरी चांगला निर्णय असला तरी त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केली गेली नाही.त्या काळात सापडेल त्याची नसबंदी करायचे आदेश देण्यात आले. हे आदेश संजय गांधी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिले होते. व दररोज किती नसबंदी झाली याचे अहवाल दररोज पाठवण्यात यावेत असेही आदेश होते. त्यावेळी अनेक हिंदू गरिबांवर अत्याचार झाला. ज्यांची लग्नच झाली नाहीत त्यांच्याही नसबंदी करून टाकल्या. परंतु हाच निर्णय मुस्लिमांना बाकी लागू नव्हता. त्यांना बारा बारा मुले झाली तरी त्यांना नसबंदीचा निर्णय लागू नव्हता. मग हा हिंदू मुस्लिम भेदभाव त्यांनी का केला? केवळ मुस्लिमांची संख्या वाढवण्यासाठी तर नव्हे?


पंजाब मध्ये नेहमीच अकाली दलाची सत्ता येत होती. तिथे काँग्रेसला चंचू प्रवेश करण्यासाठी म्हणून भिन्द्रणवाले यांना काँग्रेसने हाताशी धरून अकाली दलाला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. व त्यांना आर्थिक रसद पुरवली. हेच भिंद्राणवाले भारत सरकारकडे पंजाब राज्याची वेगळ्या खालीस्थानाची मागणी करू लागले. त्यासाठी भिंद्राणवाले यांनी पंजाब मधील जनता त्यांच्या बाजूने वळवली.आणि याच बिंद्रनावाले यांना पकडण्यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात इंदिरा गांधी यांनी मंत्रिमंडळाची मान्यता नसतानाही मिलिटरी घुसवली. भिद्रानवाले यांना पकडण्याच्या नादात भारतीय आर्मीने अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये सुमारे पाच हजार शीख जनता, स्त्रिया, लहान मुले यांची हत्या झाली. भिद्रनवाले यांना मारले गेले. परंतु पंजाब प्रश्न तसाच पेटता राहिला. तो प्रश्न पुढे 1991 साली आलेल्या पी. व्ही. नरसिंहराव यांनी सोडवला..

1993 मध्ये मुंबई मध्ये बॉम्बस्फोट झाले त्यामध्ये अनेक लोक मारले गेले त्यावेळी पी व्ही नरसिंहराव यांना का जबाबदार धरले नाही.?

दहा दहशतवादी गुजरात मार्गे मुंबईत येऊन अंधाधुंद गोळीबार केला, अनेक लोक मारले गेले. सतर्क असलेल्या पोलिसांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले व एक अफजल कसाब याला नंतर फाशी देण्यात आले. मग उर्वरित दहशतवादी का पकडण्यात आले नाहीत? हे केवळ मुंबई पोलिसांना जबाबदार धरण्यात काही अर्थ नव्हता. त्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडली परंतु गुजरात बॉर्डरवर भारतीय सैन्य तैनात करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होती. का त्यांनी सुरक्षा ठेवली नाही? दहशतवादी भारतीय हद्दीत घुसलेच कसे? हा प्रश्न आता नेते म्हणावणाऱ्यांना का आठवत नाही. तेव्हा डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते. का त्यांना जाब विचारला नाही?

भारतीय सैन्याचे अधिकारी जीव तोडून व पुरावे देऊन सांगत आहेत. की आम्ही पाकिस्तान बरोबर युद्ध केलेले नाही केवळ दहशतवादी तळ असलेल्या जागेवर एअर स्ट्राइक केले आहे. त्यामध्ये शंभर दहशतवादी मारले गेले आहेत.आणि पाकिस्तानची जवळजवळ 50 सैनिक मारले गेले आहेत.

आणि हे नालायक भारतीय पुढारी म्हणतात की मोदींनी युद्धबंदी करायला नको होती. अरे मूर्खांनो! हे युद्ध नव्हतेच मुळी. केवळ दहशतवादी तळावर एअर स्ट्राइक होते.आपली मोहीम फत्ते झाली आहे. उगाच युद्ध करून भारतीय सैन्याची हानी आणि भारतीय आर्थिक नुकसान कशाला करून घ्यायचे. ही साधी अक्कल यांना नाही. तुम्हाला स्वार्थासाठी केवळ या पक्षातून त्या पक्षात जायचे. व खुर्ची मिळवायची आणि देश सेवा केल्याचा आव आणायचा एवढेच माहित आहे.

आणि राहिला विषय ट्रोल करणाऱ्या लोकांचा.अरे मूर्खांनो! तुम्हाला नीट खायला मिळत नाही,आपण कोणाला ट्रोल करतो. याबाबत आपली लायकी काय आहे.आपली किती समाजात वट आहे याचा पहिला विचार केला पाहिजे. त्यापेक्षा काहीतरी काम धंदा केला तर निश्चितच तुम्हाला, नाही देशासाठी परंतु तुमच्यासाठी तरी काहीतरी करता येईल. कुणालाही ट्रोल करून पोट भरत नसतं. मग तो कोणीही असो राजकारणी असो, कलाकार किंवा क्रीडा क्षेत्रातला असो किंवा कोणीही सामान्य माणूस असो त्यांची तळतळ नक्कीच तुम्हाला भोगावी लागनार हेही तितकेच खरे.

बारकू बेलदार

बारकू बेलदार 
पूर्वी गावात खूपच गरिबी होती. 90 % लोक बारकू बेलदार झोपडीमध्ये राहत असत.परंतु सन 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला खेड्या पाड्यांमध्ये अमुलाग्र बदल होत होते.सन 
१९७२ च्या दुष्काळात खेडोपाडी कच्चे रस्ते झाले होते. 

नंतर बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या.गावागावांमध्ये दूध डेअ-यांचे आगमन झाले होते. लोक गाई म्हशी व शेळ्या यासारखे दुधाळ जनावरे सांभाळू लागले होते.शिवाय जोडीला कोंबड्या चितड्या होत्याच.त्यावेळी नुकतीच शासनाची रोजगार हमी योजना सुरू झाली होती. प्रत्येकाच्या हाताला काम मिळत होते.रस्त्यांची, विहिरींची, शाळा व इतर सरकारी इमारतींची व तळ्यांची कामे चालू होती. त्यामुळे लोकांकडे बऱ्यापैकी पैसे येत होते.एव्हाना गरिबीचे चटके कमी झाले होते.

लोकांनी राहण्यासाठी पक्या दगड मातीची घरे बांधायला सुरुवात केली होती.एसटी गावागावांमध्ये पोहोचायला सुरुवात झाली होती. त्याचप्रमाणे गावागावांमध्ये विजेचे जाळे पसरू लागले होते.घराघरांमध्ये रॉकेलची चिमणी किंवा गोडे तेलाची पणती जाऊन विजेचे दिवे लागायला सुरूवात झाली होती.

त्याच सुमारास नुकतेच रोजगार हमी योजनेतून आमच्या गावाच्या नवीन चिखाळीच्या विहिरीचे बांधकाम करण्यासाठी मोठा पत्थर असलेल्या दगडाला सुरुंग लावण्याचे काम चालू होते. विहिरीच्या बांधकामासाठी छोट्या डबरांची आवश्यकता होती. त्यासाठी पहारीच्या सहाय्याने दिवसभर दगडाला सुरंग घेण्यासाठी फुट दिडफुट च्छिद्र पाडुन त्यामध्ये सुरगांची दारू भरून वात पेटवायची.थोड्याच वेळात धडाड धुम आवाज होऊन मोठमोठे दगड हवेत उडायचे.हे काम कै.शंकर अहीलू तळपे, कै.नामदेव रामा तळपे, कै.विष्णू पांडू तळपे करत होते.

आणि या विहिरीच्या बांधकामासाठी मोठ्या दगडांचे रुपांतर छोट्या छोट्या डबरात करण्यासाठी बारकू बेलदार यांचे सन १९७९ साली आमच्या गावात आगमन झाले.अत्यंत स्वच्छ पांढरे शुभ्र धोतर, पैरण,टोपी,मनगटी घड्याळ व हातात मर्फी कंपनीचा रेडिओ असा बारकू बेलदार यांचा वेष होता.त्यांचा स्वभाव गरीब परंतु विनोदी आणि मितभाषी असा होता.

बारकू बेलदार हे अविवाहित असल्यामुळे त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी नव्हती.बारकू बेलदार हा वन मँन शो.होता. बारकू बेलदार यांनी कामाला सुरुवात केल्यावर त्यांच्याजवळ असलेल्या दगड फोडायचा सुतकीच्या (घण) सहाय्याने मोठ्या मोठ्या दगडाचे छोट्या छोट्या डबरामध्ये रूपांतर करायचे.डबर पाडायचे तर बारकू बेलदार यांनीच अशी त्यांची ख्याती होती.

विहिरीचे काम पूर्ण झाले तरी बारकू बेलदार हा गावातच राहिला.त्याला गावातील नवीन घर बांधणाऱ्या लोकांची कामे मिळू लागली होती. शिवाय भागात त्याची ख्याती पसरल्यामुळे परगावचे लोकसुद्धा बारकू बेलदार यांचेकडे येत होते.

बारकू बेलदार यांना रेडिओची प्रचंड आवड होती. सतत त्यांचे जवळ रेडिओ असायचा. रेडिओ हातात नसलेले बारकू बेलदार हे कधीच कोणी पाहिले नाहीत.इतकी त्यांना रेडिओची आवड होती.

त्याच्या समवयस्क लोक त्यांना बारकू तर इतर लोक बारकू दादा असे म्हणत.गावातील गरीब लोकांना ते सतत मदत करत असत.अनेक लोकांनी त्यांचे कामाचे पैसे सुद्धा दिलेले नाहीत.तरीही त्यांनी कधीच कोणाला पैशाबद्दल त्रास दिला नाही.काही लोकांनी कधी ना कधी जसे मिळतील तसे पैसे बारकू बेलदार यांना दिलेही.

बारकू बेलदार यांचा स्वभाव अतिशय विनोदी होता. लहान मुलांना ते जास्त प्रिय होते.नवीनच मंदोशी - तळेघर रस्ता झाला होता.एक धिप्पाड पंजाबी शिख माणूस अगदी सकाळी सकाळीच त्याच्या फटफटीवर (मोटरसायकल) भीमाशंकरला अभयारण्याला भेट देण्यासाठी चालला होता.मोहनवाडी पार केल्यानंतर गोठणीच्या पुढे त्याची फटफटी अचानक बंद पडली. आम्ही शेजारी खेळत होतो.त्याने खूप प्रयत्न करूनही मोटरसायकल दुरुस्त काही होईना, शेवटी त्याने खिशातून सिगारेट काढली व ती पेटवून ओढू लागला. गावातील बरेच लोक त्याच्या जवळ जमा झाले.परंतु कुणालाच यातले काही कळत नव्हते.एवढ्यात बारकू बेलदार तेथे हजर झाला. त्याने मोटर सायकल निरखून पाहिली. पाहून झाल्यावर बारकू दादा त्या सरदाराला म्हणाला, सरदारजी "चल एक चारमिनार लाव." चारमिनार म्हणजे त्यावेळचा एक सिगरेटचा ब्रँड होता.तो सरदार बारकू दादाला तुच्छतेने बोलला अय,जाव झाडे को ! तुम्हारा काम नाही है!.

हे ऐकून न ऐकल्या सारखे करून बारकू दादा गाडीला भिडला..

बोल पाना किधर है !

नाईलाजाने त्या सरदाराने बारकूदादाला गाडीतले पान्हे दिले.

थोड्याच वेळात बारकुदाने चैनचे ब्रॅकेट उघडून गाडीची तुटलेली चेन बाहेर काढली. व बोलला सरदारजी ये चैन टुट गयी है!

सरदारजी बारकुदाकडे पहातच राहीला.बारकुदादा बोलला.क्या देखते है? "लाव सिगारेट"

लगेच सरदारने मुकाट्याने बारकुदाला सिगारेट पेटवून दिली.

सिगरेटओढत,ओढत बारकू दादा बोलला.आव मेरे साथ! असे म्हणून बारकू दादा चिमण लोहाराच्या घराकडे चालू लागला.त्याच्या मागुन सरदार व आम्ही चालू लागलो.चिमण लोहार यांचा भाता चालू होता. त्यांची सासू अंजाबाई भाता हालवत होती.चिमण लोहार सकाळी सकाळी दोन तांबे हातभट्टी दारू पिऊन भात्या शेजारी निखाऱ्यात कोयते व विळे तापून लाल व्हायची वाट बघत बसला होता.शेजारी चार-पाच लोक बसले होते.आणि अचानक बारकू दादा त्या सरदाराला घेऊन चिमण लोहाराच्या दारात हजर झाला.l चिमण लोहार यांना वाटले की हा माणूस म्हणजे पोलिसच असला पाहिजे. त्याने तात्काळ उठून घरात घुसून मागच्या दाराने लांब जंगलात धूम ठोकली.बारकूदाने त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला परंतु चिमण लोहार न ऐकताच रानात पसार झाला. बारकू दादाने लगेच भात्याचा ताबा घेतला. लोखंडी चैन भात्यात निखा-यामध्ये ठेवली आणि अंजाव म्हातारीला भाता हलवायचे फर्मान सोडले.चेन चांगली लाल झाल्यावर त्याने चेन ऐरणी वर ठेवली आणि सरदारला बोलला उठाव घण!

त्याने बारकूदादाची आज्ञा शिरसावंद्य मानून घण हातात घेतला आणि तो ऐरणीवर घाव मारू लागला. परंतु त्याला घण हाणायला काही जमेना.बारकू दादा बोलला निव्वळ फोफशी जात हाय ही.

सरदार बोलला मुझे क्या बोला क्या?

यावर बारकू दादा त्याला बोलला तुम कितना सुर है! यावर सरदार सरदार खुश झाला.

बारकूदाने तुटलेली चैन सांधून एकत्र करून त्यामध्ये दुसरे लोखंड बेमालूम बसवून चेंज जोडली.चैन पुन्हा एकदा भात्यातील निखाऱ्यात घातली.लाल झाल्यावर पुन्हा चैन बाहेर काढली.आणि एक दोन घाव मारल्यावर चैन पक्की जोडली गेली आहे याची खात्री केली व शेजारच्या पाणी भरून ठेवलेल्या दगडाच्या डबक्यात टाकली. चैन थंड झाल्यावर पुन्हा एकदा खात्री केली. हे सर्व झाल्यावर पुन्हा आमची जत्रा सरदाराच्या गाडी कडे चालू लागली.

बारकूदाने चैन अगदी व्यवस्थित बसवली आणि सरदारला गाडी चालवण्याचे फर्मान सोडले.परंतु सरदार एकटा काही गाडीवर बसेना.तो बारकू दादाला मागे बसायची विनंती करू लागला.शेवटी बारकू दादा बसायला तयार झाल्यावर सरदारने गाडी चालु केली. आणि दोघे भरधाव वेगाने दूर निघून गेले.

बरोबर आठ दिवसांनी बारकू दादा गावात हजर झाला.आम्ही त्याला विचारले बारकूदादा एवढे दिवस कुठे होतास? बारकू दादा बोलला सरदार बरोबर जंगलात खूप फिरलो.खाण्यापिण्याची खूप चंगळ होती.खूप मजा केली.असा हा बाकुदादा.

बारकू दादा ने लग्न न केल्यामुळे तो एकटाच राहिला. त्याचे कुणीही नातेवाईक कधीही त्याला भेटायला आल्याचे आमच्या किंवा नाही. त्यामुळे बारकू दादाच्या विषयी कोणतीही माहिती गावाला नव्हती. व बारकू दादा ने कधीही त्याच्या खाजगी आयुष्य विषयी आम्हाला सांगितले नाही.

परंतु एकूणच बारकू बेलदार यांचा स्वभाव अतिशय चांगला असल्यामुळे गावाने त्याच्यावर खूप माया केली. आपल्याच कुटुंबातील एक त्याला मानला. बारकू दादाला काम असो वा नसो बारकू दादा कधीही कुणाच्याही घरी जेवण करत असे. सनावाराला लोक हक्काने बारकू दादाला जेवायला बोलवत. जेवणाच्या वेळी जर बारकू दादा आला तर त्याला बळजबरीने लोक जेवायला बसवत.काम केलेच पाहिजे असे काही नव्हते.

सन १९८९ ला बारकू दादाने गाव सोडले.तो कुठे गेला? व कोठे असेल? याबाबत खूप तर्क-वितर्क केले गेले.परंतु बारकू दादाची काहीच खबर गावाला मिळाली नाही.खूप दिवसांनी म्हणजे साधारण १९९७ साली बारकू दादा मला शिनोली या गावाजवळ म्हशी सांभाळताना दिसला.मला बारकू दादाला भेटल्याचा खूप आनंद झाला. बारकू दादा आता म्हातारा झाला होता.त्याला नीट दिसत नव्हतं.बारकू दादा येथे कोणाच्या तरी म्हशी सांभाळण्याचे काम करत होता, मी त्याला पुन्हा गावाकडे येण्याबद्दल विनंती केली, परंतु बारकू दादा बोलला पहिल्यासारखं आता काम होत नाही, शिवाय तिकडे आता कामेही राहिली नाहीत. मी बोललो काही काळजी करू नकोस, तुला गाव सांभाळेल, परंतु बारकू दादा केवळ हसला अगदी खिन्नपणे,...

आता बारकू दादा पहिल्यासारखा टापटीप दिसत नाही. हातात घड्याळ व रेडिओ दिसत नाही, पांढरेशुभ्र धोतरा ऐवजी हाफ पॅन्ट व बनियन असा वेश पाहून त्या काळातला शुभ्र धोतर व पैरण व टोपी असलेला बारकुदादा.. अंगाला व कपड्यांना एकही डाग पडू न देणारा बारकुदादा,सतत हातात घड्याळ व हातात रेडिओ असलेला बारकुदादा... त्यावेळचा विनोदी बारकू दादा... इत्यादी सर्व आठवले.आणि आताचा त्याचा रापलेला चेहरा...हाडाची काडे झालेला..डोळे खोल गेलेला. गबाळा बारकुदादा पाहून मन सुन्न झाले.नियती माणसावर कधी कोणती वेळ आणेल हे सांगणे कठीण..


विष्णू गोमा


 विष्णू गोमा 

विष्णू गोमा गावातील अतिशय प्रामाणिक माणुस ,दिलेला शब्द पाळणारा सत्यवचनी माणुस जर कोण असेल तर तो म्हणजे विष्णू गोमा..मी त्याला विष्णू नाना या नावानेच हाक मारतो.आता त्याचे वय जवळजवळ ८५  असेल.

विष्णू गोमा तळपे यांचे आणि माझे सबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते व अजुनही आहेत.त्यांच्या घरी काही विशेष पक्वान्न असले की तो सकाळीच मला सांगुन ठेवत असे. संध्याकाळी जेवायला ये बरं का!संध्याकाळी मी घरी यायची तो वाट बघत असे. त्याशिवाय तो जेवतही नसे. 

विष्णू तळपे हा पुर्वी गाजलेला पहिलवान होता.त्यामुळे त्याला  आखाड्यातील कुस्त्या पाहण्याची  आवड होती.गावातील पहिलवान मंडळींना तो सतत प्रोत्साहन देत असे.मी त्याला विष्णू नाना म्हणतो.

भागातील यात्रेचा आखाडा बघून आल्यावर  रात्री जेवण झाल्यावर त्यांच्या दारात गावातील पहिलवान मंडळी व माझ्या सारखे कुस्ती न खेळणारी पोरं जमत असत.दुपारी झालेल्या आखाड्यातील कुस्यांचे अगदी बारीक सारीक बारकाव्यासह विष्णू नाना चितपट झालेल्या कुस्तीचे रस भरीत  वर्णन करीत असे.हे ऐकतांना प्रत्यक्ष कुस्ती चालू आहे असा भास होई.विजयी झालेल्या नामांकित पहिलवानाचे विष्णू नाना तोंडभरून कौतुक करत असे.कुस्त्यांच्या गप्पा ऐकायला मोठी मजा वाटे.क्षणभर आपणही पहिलवानकी करावी की काय?असे वाटे...एखाद्या पहिलवानाने आखाड्यात जर मुजोरी केली असेल तर विष्णू नाना त्याच्या खास शैलीत टीका करीत असे.

माझे आणि त्याचे विशेष घरोब्याचे सबंध असल्यामुळे विष्णू नाना मला कुस्ती खेळण्याचा सल्ला देई.परंतू मला हा छंद नसल्यामुळे मी कुस्तीकडे कायमच दुर्लक्ष करायचो.या मुळे त्याचे मला कायम बोलने ऐकुन घ्यावे लागत असे.

मी महाविद्यालयीन शिक्षणा साठी राजगुरूनगर येथे होतो.तेव्हा तालुक्यातील भाम नेहर,भिमनेहरातील ब-याच मुलांबरोबर माझ्याओळखी झाल्या होत्या.अनेकांच्या गावी माझे यात्रेच्या निमित्ताने जाणे येणे होते.त्यामुळे तेथेही अनेकांच्या ओळखी झाल्या होत्या.  

यात्रेच्या हंगामात आंबोली भलवडी वि-हाम,कुडे,घोटवडी अशा अनेक गावचे पहिलवान मंडळी कुस्त्या खेळण्यासाठी आमच्या भागात येत असत.यातील बरेचसी नामांकित  पहिलवान मंडळी माझ्याकडे मुक्कामी येत असे.दुसऱ्या दिवशी ही मंडळी आमच्या गावातील बोर्डाच्या विहिरीवर अंघोळ करण्यासाठी जात असे.तत्पुर्वी तेथील दुला तळपे यांच्या खाचरात त्यांची कुस्त्यांची कसरत चाले.गावातील पहिलवान मंडळी त्यांच्यात सामील होत असे.विष्णू नानाच्या जेव्हा हे निदर्शनास येई तेव्हा तो सर्व कामधाम सोडून कुस्त्यांची कसरत पहायला बांधावर बसून बारीक निरिक्षण करत असे.

ही मंडळी आपल्या गावात कोणाकडे आली आहेत याचा तो खुलासा करी.ही पहिलवान मंडळी माझ्याकडे आली आहेत हे समजल्यावर तो अश्चर्यचकीत होत असे.तो अनेकांना विचारायचा अगदी मलाही...तु कधीच कुस्ती खेळत नाही..मग हे लांबलांबचे पहिलवान तुझ्याकडे कसे काय येतात? परंतू याचे उत्तर त्याला अद्यापही कुणीच दिले नाही.

माझे वडील लवकरच गेल्यामुळे आम्ही लहान भावंडे अगदीच आनाथ झालो होतो.त्यावेळी विष्णू नाना नेहमीच दुंःखातुन सावरण्यासाठी मला प्रेरणादायक अनुभव सांगत असे.त्यामुळे दुःखातुन सावरण्यासाठी त्याची मोलाची मदत झाली.व पुढील आयुष्य जगायला नवी उमेद मिळाली.

सन १९९८ साल असेल.विष्णू नाना ने घर बांधायला काढले होते.त्यासाठी मी त्याला अर्थिक मदत केली होती.दररोज मी त्याच्या दारावरूनच जात - येत असे.त्यामुळे घराचे काम कसे चालले आहे हे जवळून पहाता येई.दोन पाखी,पुढे खुप मोठ्ठी गच्ची व पुढे अंगण असलेले कौलारू,पाच खण ...असे ते घर होते.

घराचे काम चालू होते.आम्ही जाता येता पहात होतो..सर्व काम पुर्ण झाले होते.वासे ठोकून झाले होते.परंतु बँटम व कौलांचे काम बाकी होते.त्या अभावी काम बंद होते.मी दररोज विचारायचो विष्णू नाना अरे हे काम करून घे.पाऊसाला आता सुरूवात होईल.यावर तो म्हणायचा.करायचय.चालू..होईल. शेवटी एक दिवस मी त्याचा मुलगा धोंडुला विचारले.

अरे काय प्राँब्लेम आहे..घराचे काम बंद का ठेवलयं?

यावर त्याने सांगीतले अरे पैसेच नाहीत..काय करणार?

अरे मग मला विचारायचे ? आपण काहीतरी मार्ग काढला असता.? यावर तो म्हणाला.तुझ्या कडून आधीच पैसे घेतले आहेत.परत कसे मागणार?

अरे करूया आपण काहीतरी..

माझ्याकडे एक नवीन आँईल इंजीन होते.हे आँईल इंजीन माझे मित्र श्री.संजय नाईकरे यांचेकडे होते. हे इंजीन आम्ही सायगावला एका गरजू माणसाला विकले.व आलेल्या पैशातुन  मी आणि धोंडूने खेडवरून बँटम व कवले विकत घेतली आणि तातडीने काम पुर्ण झाले.

परंतु थोड्याच दिवसात विष्णू नानाने माझे सर्व पैसे दिले..परंतू अजुनही कधी भेटल्यावर बाबा तु होता म्हणुन घर झालं. नाहीतर पाण्या पावसात आमची परवड झाली असती वाद्यावै-यांचा हसू झाला असता.

आमच्या रानात बरीच हिरड्यांची झाडे आहेत.हे सर्व हिरड्यांचे राखण करणे,हिरडे झाडावरून पाडणे,ते घरी घेऊन येणे,  रोजच्या रोज वाळत घालणे हे काम विष्णू नानाचा थोरला मुलगा दगडूदादा करायचा.

दगडुदादा सुद्धा गावातील साधा.सरळ व स्वभावाने गरीब असा माणुस होता.त्याला बैलांची व शेतीची खुप आवड होती.काही काम नसलेतरी रानात किंवा शेतात चक्कर मारायचाच.

बैलांना कासरा,दावे वळने,म्होरक्या विणने,उन्हाळ्यात घराच्या मागे बैल बांधण्यासाठी वाडा तयार करणे.. मोठे होत असलेल्या गो-ह्यांना औताला तयार करणे असे त्याला छंद होते.

दगडूदादा आजारी असताना आम्ही त्याला राजगुरुनगर येथील डॉक्टर शेवाळे या डाँक्टरांकडे घेऊन गेलो.डाँक्टरांनी तपासल्यावर अँडमीट करायचा सल्ला दिला.यावर दगडूदादा रडायलाच लागला..नका डाक्टर.. मला अँडमीट करू नका.माझ्या बैलांना चारापाणी कोण घालनार?माझे शेत कोण करणार? 

नंतर दगडूदादा खुप आजारी पडला.आजाराने उग्र रुप धारण केले.त्याला यशवंतराव चव्हाण हाँस्पिटल पिंपरी येथे अँडमीट केले.नंतर तेथे डॉक्टरांनी त्याच्या दोन्ही किडण्या फेल झाल्याचे निदान झाले.आणि त्याला घरी घेऊन जाण्यास सांगीतले.

घरी आल्यावार सर्व पर्याय बंद झाले.अशाही परिस्थितीत दगडू दादाला जेव्हा बरे वाटू लागे तेव्हा हळूहळू तो रानात जाऊन येत असे.शेतात जाऊन कामाची पहाणी करत असे.

एकदा सकाळीच विष्णू नाना माझ्याकडे आला.तु दगडुला घेऊन वरच्या भोमाळ्याला सावंत भगताकडे गेला तर बरं होईल..तो चांगला भगतय...अस दगडू म्हणतोय ?

त्याच्या किडण्या निकामी झाल्या आहेत हे ना विष्णू नानाला माहीत ना दगडूदादाला.

तरीही त्या दोघांच्याही समाधानासाठी मी आँफिसला जायच्या ऐवजी दगडूदादाला मोटार सायकलवर घेऊन वरच्या भोमाळ्याला भगताकडे घेऊन गेलो.तिकडुन परत येताना रस्त्याच्या बाजुला एक आंबा होता.त्यावर खुपच पिवळेधम्मक पाड दिसत होते.हे पाहिल्यावर दगडुदादाने मला गाडी थांबवायला सांगीतली.

आम्ही दोघेही खाली उतरलो.मी गाडी स्टँडवर लावेपर्यांत दागडुदादाने झाडावर चढायला सुरूवात केली..

अरे हे काय करतो? तु आजारी आहेस..झाडावार कशाला चढतो? मी म्हणालो.

परंतू त्याने माझे कसलेही न ऐकता झाडावरच्या सर्व फांद्या हेलकावून सर्व आंब्याचे पाड खाली पाडले. व खाली उतरला.

मी खालचे सर्व पाड गोळा केले.त्याने त्यातला एकही आंबा खाल्ला नाही.

मी त्याला म्हणालो अरे कशाला मग झाडावर चढला? तु आजारी आहेस..यावर तो म्हणाला...तु लांब खेडला ( राजगुरुनगर ) राहतो.तुला गावचे रानातले आंबे कसे खायला मिळणार?आंब्याचा सिझन चालू आहे..तेव्हा म्हणलं..तुला मिळतील दहा - पाच आंबे खायला. त्याचे माझ्यावरचे प्रेम बघून मला गहिवरून आले.

पुढे दोनच दिवसांनी दगडूदादा गेल्याचा निरोप आला आणि मी सुन्नच झालो.क्षणभर काहीच सुचेना एकदम भोवळ यावी तसे झाले.मनपटलावरून दगडूदादाचे एक एक चित्र तरळून गेले

आता मी कधीतरी गावाला जातो.विष्णू नाना मला भेटतो.आता तो ठार बहिरा झालाय.त्याला काहीच ऐकायला  येत नाही.मी त्याच्याशी खुणेनेच संवाद साधतो.खुप गप्पा मारायची इच्छा असते..परंतू त्याला ऐकायला येत नसल्यामुळे काहीच उपयोग होत नाही.

काहीही म्हणा जुनं ते सोनच..आताची पीढी त्यातल्या त्यात बरी आहे.परंतु पुढची पीढी ही स्वतःपुरतीच मर्यादित असणारी असेल व माणुसकी हरवुन बसलेली असणार हे नक्की.


शंकर दादा



शंकर वनघरे  हा माझ्या आत्याचा मुलगा. माझ्यापेक्षा जवळजवळ दहा वर्षांनी मोठा.परंतु लहानपणापासून मोठा वात्रट होता.आई-वडिलांचा एकुलता एक असल्यामुळे अति लाडामुळे तो शाळा शिकला नाही.

लहानपणी तो शिकायला आमच्याकडे होता.एकदा अचानक तो गायब झाला.त्याला सगळीकडे शोधून पाहिले परंतु तो काही सापडला नाही.तेव्हा सहज आडात पडला की काय बघायला लोकांनी जेव्हा आडात शोध घेतला तेव्हा तो आडात अगदी तळाशी बसून होता.आडात अगदी कमी पाणी होते म्हणून नशीब.त्याला लोकांनी आडातून बाहेर काढले.आणि उगाच नसती आफत नको म्हणून माझ्या वडिलांनी त्याची रवानगी त्याच्या गावी केली.

एकदा त्याने सातवीच्या वार्षिक परीक्षेच्या वेळी मराठीचे पेपर मध्ये प्रश्नाचे उत्तर म्हणून त्यावेळी फेमस झालेली गाणे जवा नवीन पोपट हा हे लिहिले होते आणि नापास झालो होता.त्याने त्याच्या सातवी नापासच्या दाखल्यावर नापासच्या पुढील ना ब्लेडने खोडून पास असे भासवले होते.

आठवीत सतत तीनदा नापास झाल्यावर त्याला आमच्या वडिलांनी म्हशी घेऊन दिल्या होत्या.रोज नदीकाठी म्हशी चारायला न्यायाच्या.म्हशीबरोबर नदीत डुंबायचे.दुध पिऊन व्यायाम करायचा.असा शंकर दादाचा नित्यक्रम झाला होता.

शंकर दादा रोज रात्री लोकांच्या शेतातील कोवळी मक्याचे ताटवे उपटून आपल्या म्हशीना आणायचा.त्यासाठी रोज तो वेगवेगळ्या शेतात जायचा.मला त्याला रात्री अपरात्री सोबत जावे लागायचे.

आमच्या मामाने म्हणजेच त्याच्या वडिलांनी पूर्वी पैलवानकी  केली असल्यामुळे शंकरदादा भागातील एक नामांकित पैलवान व्हावा असे त्यांना वाटत होते.आणि लवकरच त्यांचे स्वप्न शंकरदादाने पूर्ण केले.शंकरदादा भागातील एक नामांकित पैलवान झाला.भागातील यात्रा मधून तो अनेक कुस्त्या निकाली करायचा.दोन मिनिटात समोरचा पैलवान चितपट व्हायचा.असे अनेक डाव शंकर दादाकडे होते.

शंकर दादा पहाटे व्यायाम करायचा.त्यामुळे नाईलाजाने मला देखील पहाटे उठावे लागे व इच्छा नसताना देखील  त्याच्याबरोबर जोर बैठका काढाव्या लागत.

मी लहान असताना एकदा त्याच्याबरोबर म्हशीकडे कडे गेलो होतो. नदीच्या कडेला असलेल्या निवडुंगाला लालसर फळे आले होती. ती लालसर फळे शंकर दादांनी तोडली व त्यातील मला एक दिले.आम्ही दोघांनीही ती फळे खाल्ली. परंतु त्या फळाचे काटे माझ्या संपूर्ण जिभेला टोचले. व मी रडू लागलो. शंकर दादांनी मग माझ्या जिभेवरचे सर्व काटे हळूहळू काढून टाकले. परंतु त्या फळाची उग्र दर्प असलेली गोडसर चव अजूनही माझ्या मनात आहे.

शंकरदादाला पत्ते खेळण्याचा मोठा नाद होता.त्यासाठी तो कधीकधी माझ्याकडे पैसे मागायचा.मी काय बधत नाही असे त्याच्या लक्षात आल्यावर तो दहा रुपये दे संध्याकाळी वीस रुपये देतो असे आमिष दाखवायचा.शेवटी मला पैसे द्यावे लागायचे.पत्यात पैसे जिंकले की मला तो वीस रुपये द्यायचा. परंतु कधीकधी माझ्याकडले आहेत तेही पैसे जायचे.मग मात्र मी सावध व्हायचो. व शक्यतो त्याला पैसे द्यायला टाळायचो.

सन 1992-93 ला मी दहावीला असताना इतिहास व भूगोलचे सर आम्हाला खूपच गृहपाठ देत असत. गृहपाठ लिहून न आणल्यास अगदी वीस वीस छढ्या देत असत.माझ्या दृष्टीने इतिहास व भूगोल हे अतिशय सोपे विषय असल्याने मी दुसरे विषयांना अभ्यासासाठी प्राधान्य देत असे. माझी इतिहास व भूगोलचे गृहपाठ लिहून देण्यासाठी शंकर दादा धावून येत असे. त्याचे अक्षर सुंदर होते. परंतु त्याला डोके कमी होते. मी त्याला गाईडवर  खुणा केलेली प्रश्न व त्याचे उत्तरे वहीवर लिहायला सांगायचो. तो मन लावून सगळे गृहपाठ पूर्ण करायचा. त्या बदल्यात मी त्याला पत्ते खेळण्यासाठी दहा रुपये द्यायचो.

एकदा तो बटाटयांच्या काढणीसाठी सातगाव पठारला गेला होता.सकाळी नऊ ते संध्याकाळी सात पर्यंत तो बटाटे काढायचा.त्यावेळी त्याला चाळीस रुपये रोज मिळायचा.वीस पंचवीस दिवस काम करून शंकर दादा घरी आला.

त्यानंतर दोन दिवसांनी आम्ही आंघोळीसाठी नदीवर चाललो असता वाटेत एक कातकरी भेटला. त्याच्याबरोबर अजून एक कातकरी होता.तो शंकर दादाला बोलला.दादा हा कातकरी आमच्याकडे पाहुणा आला आहे. त्याला कोकणात जायचं आहे.त्याच्या घरी मॅटर झाला आहे.त्याला पैशाची अत्यंत गरज आहे.त्यामुळे तो त्याच्याकडली चैन विकणार आहे. दोन तोळ्याची चैन आहे.पाच हजार रुपये म्हणतोय तो. बघ घ्यायची आहे का तुला? कातकऱ्यांनी त्याच्या हातात चैन दिली.शंकर दादाजी चल बी चल सुरू झाली. शंकर दादा बोलला घेतले असते रे चैन, पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत कातकरी बोलला किती आहे तुझ्याकडे?

नऊशे रुपये आहेत शंकर दादा बोलला.

पाहूणा कातकरी बोलला. दोन हजार रुपये दे आणि चेन घेऊन टाक.त्याचवेळी माझ्या मनात शंका आली. ही चैन एक तर चोरीची असली पाहिजे. नाहीतर डुप्लिकेट.

मी शंकर दादाला बोललो. दादा नको आपल्याला चैन.चल उशीर झालाय.

शंकर दादा बोलला 900 रुपयाला द्यायचे असेल तर बघ. लगेच नऊशे रुपये रोख आणून देतो. माझ्याकडे तेवढेच आहेत.

पाहुणा कातकरी बोलला.दोन हजार रुपयाला घे.आता 900 दे व बाकीचे 1100 मी नंतर आल्यावर घेईन. मी शंकर दादाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्याने माझे ऐकले नाही. लगेच घरी जाऊन त्याने 900 रुपये आणले. आणि कातकऱ्याला दिले व चेन घेतली.चैन गळ्यात घालून तो चालू लागला. तो एकदम खुशीत होता. त्याचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही.

आठच दिवसात चैनीचा रंग बदलला. पिवळी धमक असलेली चेन आता काळपट दिसू लागली. म्हणून आम्ही तज्ञ लोकांकडे जाऊन चैन तपासून घ्यायला गेलो त्यावेळी त्यांनी सांगितले अरे ही चैन बाजारी आहे.वीस पंचवीस रुपयाची आहे.त्यावेळी शंकर दादाच्या पायाखालची वाळू सरकली.तो एकच बोलू लागला. पैसे गेल्याचे दुःख नाही रे.परंतु वीस पंचवीस दिवस मी रोज सकाळी नऊ ते संध्याकाळी सात पर्यंत बटाटे काढायचो. ते कष्ट माझ्या डोळ्यापुढे येते.असे म्हणून तो दुःखी झाला.मी त्याला बोललो.आता दुःख होऊन काय उपयोग ? मी तुला पहिलेच सांगितले होते. परंतु तुला हाव नडली त्याला मी काय करणार.

शंकर दादाला लोकांची टिंगल करायची खूपच सवय होती. तो कोणत्याही माणसाची टिंगल करायचा. एकदा त्याने आम्हाला उघड आव्हान दिले. मी कुणाची ही टिंगल करू शकतो. एकदा तेथील जिल्हा परिषद सदस्य यांची तू टिंगल करू शकतो का ? असे आम्ही त्याला विचारले. तर तो लगेच तयार झाला. परंतु त्या बदल्यात तुम्ही काय देणार? असा आम्हाला त्याने प्रश्न केला.

तुला अब्बास सेठच्या हॉटेलात मिसळ खायला घालीन.आणि टिंगल नाही केली तर तू आम्हाला मिसळ खायला घालायची अशी आम्ही पैज लावली.दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच जिल्हा परिषद सदस्य असलेले कै.नानासाहेब कशाळे अब्बास शेठच्या हॉटेलला चहा पिण्यासाठी आले.त्यांच्याबरोबर अनेक स्थानिक लोक होते.शंकर दादा आणि आम्ही तिथे गेलो.लगेच शंकर दादाने नानासाहेब कशाळे यांची टिंगल सुरू केली. त्यांनी पण खिलाडू वृत्तीने हसून दाद दिली.तेव्हा मात्र आम्हाला शंकर दादाला मिसळ खायला घालावी लागली. असा हा शंकर दादा.

शंकर दादा आणि मी त्यांच्या अंगणात असलेल्या खटार गाडीत झोपायचो.एकदा आम्ही खटार गाडीत आकाशाकडे तोंड करून झोपलो असता आकाशातून एक पेटलेला उल्का आमच्या दिशेने अत्यंत वेगाने खाली कोसळू लागला.आम्ही दोघेही घाबरून गेलो. शक्यतो उल्का आकाशातच पेटतो व नष्ट होतो.परंतु हा पेटलेला उल्का आमच्या बाजूलाच येऊन पडला. लागलीच आम्ही दोघे उल्का पडला होता त्या ठिकाणी गेलो. तो लालबुंद दगड हळूहळू  थंड झाला.अजूनही तो उल्का शंकर दादाकडे आहे.

असाच एकदा गावाला असाताना माझा मित्र आजारी पडला होता.भगताने त्याला खुप मोठे भुत लागले असुन हे भुत उतरावे लागेल व रोगी बरा झाल्यावर  उतारा म्हणुन एक बोकडाचा बळी द्यावा लागेल असे सांगीतले.परंतू एवढा खर्च आवाक्याबाहेर असल्याने मित्राचे वडिल चालढकल करू लागले.भगत सारखाच येऊन त्यांना सांगू लागला.ते भुत माझ्याकडे येऊन सतत मला तु सांगीतलेल्या प्रमाणे रोगी बरा झाला आहे.आता बोकडाचा बळी लवकर द्या.नाहीतर  तुझ्याकडेच पहातो.असे म्हणत आहे.तुम्ही ताबडतोब तयारी करा नाहीतर पुढे मी जबाबदार राहणार नाही.

मित्राचे वडिल सुशिक्षित असुनही हादरले.लगेच एका शुक्रवारी गावच्या हद्दीच्या बाहेर मध्यरात्री बोकडचा बळी देण्याचा कार्यक्रम ठरला.त्या प्रमाणे तयारी करण्यात आली.या कार्यक्रमाला माझ्यासारखेच अनेक उत्साही लोक जेवणासाठी आले होते.बाहेर गावचे अनेक नातेवाईक व त्यांचे मित्र जेवणासाठी आले होते.बोकडाच्या मानाने जेवायला आलेली गर्दी पाहुन आपल्याला आता अर्धपोटी रहावे लागते की काय अशी मला शंका आली.मी शंकरदादाला बोलुन दाखवली.तो म्हणाला अजिबात काळजी करू नको मी आहे.कारण तो खुप वेळा असल्या कार्यक्रमांना जाऊन आला होता.

ठरल्या प्रमाणे सर्व तयारी झाली.भगताच्या अंगात देव संचारला. तो सांगेल तो विधी करण्यात आला.पळसाच्या मोठया पानावर नुसत्याच भरपुर मटणाचा नैवेद्य भुतासाठी थोडया अंतरावर भगताने सांगीतलेल्या ठिकाणी ठेवण्यात आला. नैवेद्य ठेवायला अर्थात श्री शंकर वनघरे गेला होता. विशेष म्हणजे हा नैवेद्य थोडयावेळाने परत आणुन भगताने खायचा असतो. इकडे विधी चालुच होता.भगताला नविन धोतर,नेहरूशर्ट,टोपी व उपरने व रोख एक हजार रूपये देण्यात आले.हा कार्यक्रम चालू असताना शंकर रावने भुताला दाखवलेला नैवेद्य उचलुन आणला.व थोडया अंतरावर आम्ही दोघांनी जाऊन त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला.व परत गर्दीत येऊन मिसळलो.रात्र बरीच झाली होती.विधी संपला सर्वजण जेवायला बसलो.भगतासाठी भुताला दाखवलेला नैवद्य आनायला सांगीतला.तेथे अर्थातच नैवेद्य नव्हता.खरोखरच भुताने प्रत्यक्ष येऊन नैवद्य खाल्ला अशी भगताने सगळ्या जमलेल्या लोकांना सांगीतले.भुत फार जालीम होते.ते सतत माझ्याकडे जेवण मागत होते.पाहिलत ना तुम्ही?प्रत्यक्ष .झाली ना तुमची खात्री? असे म्हणुन भविष्यात अशीच सावज मिळविण्यासाठी स्वत:ची जाहीरात करून घेतली.आणि पुढे हाच भगत पश्चिम भागात नावारूपाला आला. डाँक्टर पेक्षा पेशन्टची गर्दी याच्याकडे होऊ लागली.(त्या काळात एवढी प्रचंड अंधश्रद्धा होतो की भुताचा नैवेद्य खाणे  दुरच पण ठराविक ठिकाणी असलेल्या भुताचे नाव जरी काढले तरी अंगावर काटा यायचा.तेव्हा एवढी हिम्मत आम्ही दोघे सोडुन कुणाच्यातच नव्हती.विशेष म्हणजे तेव्हा मी दहावीला होतो.

शंकर दादा वयाने एवढा मोठा झाला आहे. तरीसुद्धा त्याचा पोरकटपणा अजून कायम आहे. एकदा त्याच्या गावातील एका दुकानदाराचे घर जळून खाक झाले होते.माणुसकीच्या दृष्टिकोनातून मी शंकर दादा बरोबर त्यांच्या जळालेल्या घरी गेलो. घर पूर्ण जळून खाक झाले होते.घरातील बरेच साहित्य जळले होते.दगडाच्या भिंती सुद्धा धुराने काळ्या कुट्ट झाल्या होत्या. जळालेल्या घराचा मालक आणि मी घराची पाहणी करत होतो. आणि अशावेळी शंकर दादा खाली अर्धवट जळालेले शेंगदाणे गोळा करीत होता. त्याने बरेच शेंगदाणे गोळा करून एकेक खायला सुरुवात केली. आम्हाला म्हणाला देखील शेंगदाणे खूप खरपूस आहेत बर का. अशावेळी आम्ही दोघांनीही कपाळावर हात मारून घेतला. दुकानदार बोलला अरे शंकर माझे एवढे नुकसान झाले आहे आणि तु खुशाल शेंगदाणे खातो. तुला काही लाज लज्जा आहे की नाही. यावर शंकर दादा बोलला.आप्पा झाले ते झाले.

तुला नुकसान भरपाई भेटेल की. यासाठी आम्ही प्रयत्न करू काळजी करू नको.आणि इतकेच नव्हे तर शंकर दादाने त्यांना नुकसान भरपाई देखील मिळवून दिली होती.

शंकर दादाने आयुष्यात कधीच काम केले नाही. केवळ म्हशी सांभाळणे, नदीवर पोहणे, मासे पकडणे, शेळ्या मेंढ्या विकत घेऊन त्या चाकणच्या बाजारात जाऊन विकणे. म्हशींची खरेदी विक्री करणे एवढेच तो आयुष्यात काम करू शकला. त्याने कधीही कुठल्याही गोष्टीचे टेन्शन घेतले नाही. कोणत्याही दुःखद प्रसंगामुळे आणि संकटामुळे तो हातबल झाला नाही.

एकदा मी त्याच्याकडे खूप रात्र झाल्यामुळे  मुक्कामाला राहिलो होतो. रात्री जेवण करून आम्ही ओटीवर झोपलो. परंतु त्याच्या दारात चार-पाच कुत्री येऊन भुंकू लागत. आम्हाला काही झोप येत नसे. मग आम्ही दरवाजा उघडून त्या कुत्र्यांना दूरवर हाकलत असु. आम्ही अंथरुणावर येऊन झोपलो ना झोपलो तो परत ती कुत्री दारात येऊन ओरडत असत.त्यामुळे आम्हा दोघांनाही झोप काही येत नव्हती. तो म्हणाला अरे आजच असं झालय. तू आला म्हणून की काय ? त्यानंतर आम्हाला केव्हातरी डोळा लागला तोच दरवाजाचा खडखडाट ऐकू आला. शंकरदादा ने दरवाजा उघडला तर बाहेर बाळू कोरडे उभा होता. तो म्हणाला 

शंकर अरे आजी वारली..तू एक काम कर. मंदोशीला नातेवाईकांकडे जा व त्यांना निरोप दे. तोपर्यंत आम्ही तयारी करतो. बाकीची माणसे नातेवाईकांना बोलवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतो. आम्ही दोघेही उजाडल्यावर मंदोशीला गेलो.

शंकर दादाचे एका मुलीचे लग्न झाले असून एक मुलगी परदेशात नोकरी निमित्त आहे.. व एक मुलगा चाकण एमआयडीसी मध्ये कामाला आहे. आजही शंकरदादा जेव्हा भेट होईल तेव्हा कडकडून मिठी मारून भेटतो. व जुन्या आठवणीत रमून जातो .



सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस