Translate

विष्णू गोमा


img src="..." alt=" विष्णू गोमा  ">
विष्णू गोमा गावातील अतिशय प्रामाणिक माणुस, दिलेला शब्द पाळणारा सत्यवचनी माणुस जर कोण असेल तर तो म्हणजे विष्णू गोमा..मी त्याला विष्णू नाना या नावानेच हाक मारतो.आता त्याचे वय जवळजवळ ८५ असेल.

विष्णू गोमा तळपे यांचे आणि माझे सबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते व अजुनही आहेत. त्यांच्या घरी काही विशेष पक्वान्न असले की तो सकाळीच मला सांगुन ठेवत असे. संध्याकाळी जेवायला ये बरं का!संध्याकाळी मी घरी यायची तो वाट बघत असे. त्याशिवाय तो जेवतही नसे. 

विष्णू तळपे हा पुर्वी गाजलेला पहिलवान होता. त्यामुळे त्याला आखाड्यातील कुस्त्या पाहण्याची आवड होती. गावातील पहिलवान मंडळींना तो सतत प्रोत्साहन देत असे. मी त्याला विष्णू नाना म्हणतो.

भागातील यात्रेचा आखाडा बघून आल्यावर रात्री जेवण झाल्यावर त्यांच्या दारात गावातील पहिलवान मंडळी व माझ्या सारखे कुस्ती न खेळणारी पोरं जमत असत. दुपारी झालेल्या आखाड्यातील कुस्त्यांचे अगदी बारीक सारीक बारकाव्यासह विष्णू नाना चितपट झालेल्या कुस्तीचे रस भरीत वर्णन करीत असे. हे ऐकतांना प्रत्यक्ष कुस्ती चालू आहे असा भास होई. 

विजयी झालेल्या नामांकित पहिलवानाचे विष्णू नाना तोंडभरून कौतुक करत असे. कुस्त्यांच्या गप्पा ऐकायला मोठी मजा वाटे. क्षणभर आपणही पहिलवानकी करावी की काय? असे वाटे. 

एखाद्या पहिलवानाने आखाड्यात जर मुजोरी केली असेल तर विष्णू नाना त्याच्या खास शैलीत त्याच्यावर टीका करीत असे.

माझे आणि त्याचे विशेष घरोब्याचे सबंध असल्यामुळे विष्णू नाना मला कुस्ती खेळण्याचा सल्ला देई. परंतू मला हा छंद नसल्यामुळे मी कुस्तीकडे कायमच दुर्लक्ष करायचो. या मुळे त्याचे मला कायम बोलने ऐकुन घ्यावे लागत असे.

मी महाविद्यालयीन शिक्षणासाठी राजगुरूनगर येथे होतो. तेव्हा तालुक्यातील भामनेहर, भिमनेहरातील बयाच मुलांबरोबर माझ्याओळखी झाल्या होत्या. अनेकांच्या गावी माझे यात्रेच्या निमित्ताने जाणे येणे होते. त्यामुळे तेथेही अनेकांच्या ओळखी झाल्या होत्या.  

यात्रेच्या हंगामात आंबोली, भलवडी विहाम, कुडे, घोटवडी अशा अनेक गावचे पहिलवान मंडळी कुस्त्या खेळण्यासाठी आमच्या भागात येत असत. यातील बरीचसी नामांकित पहिलवान मंडळी यात्रांच्या हंगामात माझ्याकडे मुक्कामी येत असत. 

दुसऱ्या दिवशी ही पहिलवान मंडळी आमच्या गावातील बोर्डाच्या विहिरीवर अंघोळ करण्यासाठी जात असत. तत्पुर्वी तेथील दुला तळपे यांच्या खाचरात त्यांची कुस्त्यांची कसरत चाले. 

गावातील पहिलवान मंडळी देखील  त्यांच्यात सामील होत असत. विष्णू नानाच्या जेव्हा हे निदर्शनास येई तेव्हा तो सर्व कामधाम सोडून कुस्त्यांची कसरत पहायला बांधावर बसून बारीक निरिक्षण करत असे.

ही पहिलवान मंडळी आपल्या गावात कोणाकडे आली आहेत याचा तो खुलासा करी. ही पहिलवान मंडळी माझ्याकडे आली आहेत हे समजल्यावर तो अश्चर्यचकीत होत असे. तो अनेकांना विचारायचा अगदी मलाही. तु कधीच कुस्ती खेळत नाही. मग हे लांबलांबचे पहिलवान तुझ्याकडे कसे काय येतात? परंतू याचे उत्तर त्याला अद्यापही कुणीच दिले नाही.

माझे वडील लवकरच गेल्यामुळे आम्ही लहान भावंडे अगदीच आनाथ झालो होतो. त्यावेळी विष्णू नाना नेहमीच दुंःखातुन सावरण्यासाठी मला प्रेरणादायक अनुभव सांगत असे. कारण त्याचे सुद्धा वडील त्याच्या लहानपणीच निर्वातले होते. त्यामुळे दुःखातुन सावरण्यासाठी त्याची मोलाची मदत झाली व पुढील आयुष्य जगायला नवी उमेद मिळाली.

सन १९९८ साल असेल. विष्णू नानाने घर बांधायला काढले होते. त्यासाठी मी त्याला अर्थिक मदत केली होती. 

दररोज मी त्याच्या दारावरूनच जात - येत असे. त्यामुळे घराचे काम कसे चालले आहे हे जवळून पहाता येई. दोन पाखी, पुढे खुप मोठ्ठी गच्ची व पुढे अंगण असलेले कौलारू, पाच खण असे ते घर होते.

घराचे काम चालू होते. आम्ही जाता येता पहात होतो. सर्व काम पुर्ण झाले होते. वासे ठोकून झाले होते. परंतु बँटम व कौलांचे काम बाकी होते. त्या अभावी काम बंद होते. मी दररोज विचारायचो विष्णू नाना अरे ! हे काम करून घे. पाऊसाला आता सुरूवात होईल. यावर तो म्हणायचा.करायचय,चालू. होईल. शेवटी एक दिवस मी त्याचा मुलगा धोंडुला विचारले.

धोंडू अरे काय प्राँब्लेम आहे? घराचे काम बंद का ठेवलयं?

यावर त्याने सांगीतले अरे ! पैसेच नाहीत..काय करणार?

अरे मग मला विचारायचे ? आपण काहीतरी मार्ग काढला असता.? 

यावर तो म्हणाला. तुझ्या कडून आधीच पैसे घेतले आहेत. परत कसे मागणार?

अरे! करूया आपण काहीतरी.

माझ्याकडे एक नवीन आँईल इंजीन होते. हे आँईल इंजीन माझे मित्र श्री.संजय नाईकरे यांचेकडे होते. ते इंजीन आम्ही सायगावला एका गरजू माणसाला विकले. व आलेल्या पैशातुन मी आणि धोंडूने खेडवरून बँटम व कौले विकत घेतली आणि तातडीने काम पुर्ण झाले.

परंतु थोड्याच दिवसात विष्णू नानाने माझे सर्व पैसे दिले. परंतू अजुनही कधी भेटल्यावर बाबा! तु होता म्हणुन घर झालं. नाहीतर पाण्या पावसात आमची परवड झाली असती. वाद्यावै-यांचा हसू झाला असता. असे तो बोलत राही.

आमच्या रानात बरीच हिरड्यांची झाडे आहेत. हे सर्व हिरड्यांचे राखण करणे, हिरडे झाडावरून पाडणे, ते घरी घेऊन येणे,  रोजच्या रोज वाळत घालणे हे काम विष्णू नानाचा थोरला मुलगा दगडूदादा करायचा.

दगडुदादा सुद्धा गावातील साधा सरळ व स्वभावाने गरीब असा माणुस होता. त्याला बैलांची व शेतीची खुप आवड होती. काही काम नसलेतरी रानात किंवा शेतात चक्कर मारायचाच.

बैलांना कासरा,दावे वळने, म्होरक्या विणने, उन्हाळ्यात घराच्या मागे बैल बांधण्यासाठी वाडा तयार करणे. मोठे होत असलेल्या गो-ह्यांना औताला तयार करणे असे त्याला छंद होते. बैलपोळ्याच्या सणासाठी बैलांना चौरे बनवणे, नवीन कासरा दावी, म्होरक्या बनवणे, नदीवर बैलाला आंघोळ घालून आणणे, बैलांची सजावट करणे इत्यादी कामे तो अत्यंत आवडीने करायचा.

विष्णू नानाला  बैलांची प्रचंड आवड होती. त्यांच्या गोठ्यात सतत दोन-तीन बैल असायचे. अगदी उन्हाळ्यात सुद्धा तो हिरवेगार गवत कडेकपारीतून आणून आपल्या बैलांना खाऊ घालायचा.

आमच्या वडिलांनी त्यांच्याकडून आमचा पहिला राजा नावाचा बैल त्यांच्याकडून सन 1979 साली 575 रुपयांना विकत घेतला होता. 

विष्णू गोमा तळपे हा आमचा भाऊबंद होताच पण आमचा मेंड भाऊ सुद्धा होता. 

आमच्या शेताच्या मेंडा लगत एक मोठी हिरड आणि एक आंब्याचे झाड होते. आमचे वडील आणि चुलते यांना हिरड आणि आंब्याचे झाड हे विष्णू गोमा तळपे यांचे आहे असेच वाटायचे. 

परंतु एकदा विष्णू गोमा तळपे यांनीच याचा खुलासा करत आमच्या वडिलांना आणि चुलत्याला सांगितले की हिरड आणि हे आंब्याचे झाड तुमच्याच वाटणी मध्ये आहे. तुमच्या हिश्याची जमीन, हिरड व आंब्याचे झाड घेऊन मी काय करू. त्यानंतर आम्ही ती जमीन वहिवाटू लागलो. असा होता श्रीविष्णू गोमा सत्य वचनी आणि प्रामाणिक माणूस.

दगडूदादा आजारी असताना आम्ही त्याला राजगुरुनगर येथील डॉक्टर शेवाळे या डाँक्टरांकडे घेऊन गेलो. डाँक्टरांनी तपासल्यावर अँडमीट करायचा सल्ला दिला. यावर दगडूदादा रडायलाच लागला. नका डाक्टर. मला अँडमीट करू नका. माझ्या बैलांना चारापाणी कोण घालनार?माझे शेत कोण करणार? 

नंतर दगडूदादा खुप आजारी पडला. आजाराने उग्र रुप धारण केले. त्याला यशवंतराव चव्हाण हाँस्पिटल पिंपरी येथे अँडमीट केले. नंतर तेथे डॉक्टरांनी त्याच्या दोन्ही किडण्या फेल झाल्याचे निदान झाले. आणि त्याला घरी घेऊन जाण्यास सांगीतले.

घरी आल्यावार सर्व पर्याय बंद झाले. अशाही परिस्थितीत दगडू दादाला जेव्हा बरे वाटू लागे तेव्हा हळूहळू तो रानात जाऊन येत असे. शेतात जाऊन कामाची पहाणी करत असे.

एकदा सकाळीच विष्णू नाना माझ्याकडे आला. तु दगडुला घेऊन वरच्या भोमाळ्याला सावंत भगताकडे गेला तर बरं होईल. तो चांगला भगतय. असं दगडू म्हणतोय ?

त्याच्या किडण्या निकामी झाल्या आहेत हे ना विष्णू नानाला माहीत ना दगडूदादाला.

तरीही त्या दोघांच्याही समाधानासाठी मी आँफिसला जायच्या ऐवजी दगडूदादाला मोटार सायकलवर घेऊन वरच्या भोमाळ्याला भगताकडे घेऊन गेलो. तिकडुन परत येताना रस्त्याच्या बाजुला एक आंब्याचे झाड होते. त्यावर खुपच पिवळेधम्मक पाड दिसत होते. हे पाहिल्यावर दगडुदादाने मला गाडी थांबवायला सांगीतली.

आम्ही दोघेही खाली उतरलो. मी गाडी स्टँडवर लावेपर्यांत दागडुदादाने झाडावर चढायला सुरूवात केली.

अरे हे काय करतो? तु आजारी आहेस. झाडावार कशाला चढतो? मी म्हणालो.

परंतू त्याने माझे कसलेही न ऐकता झाडावर चढून झाडावरच्या सर्व फांद्या हेलकावून सर्व आंब्याचे पाड खाली पाडले. व खाली उतरला.

मी खालचे सर्व पाड गोळा केले. त्याने त्यातला एकही आंबा खाल्ला नाही.

मी त्याला म्हणालो अरे ! कशाला मग झाडावर चढला? तु आजारी आहेस. यावर तो म्हणाला. तु लांब खेडला (राजगुरुनगर ) राहतो. तुला गावचे रानातले आंबे कसे खायला मिळणार? आंब्याचा सिझन चालू आहे. तेव्हा म्हणलं. तुला मिळतील दहा - पाच आंबे खायला. त्याचे माझ्यावरचे प्रेम बघून मला गहिवरून आले.

पुढे दोनच दिवसांनी दगडूदादा गेल्याचा निरोप आला आणि मी सुन्नच झालो. क्षणभर काहीच सुचेना एकदम भोवळ यावी तसे झाले. मनपटलावरून दगडूदादाचे एक एक चित्र तरळून गेले

आता मी कधीतरी गावाला जातो. विष्णू नाना मला भेटतो. आता तो ठार बहिरा झालाय. त्याला काहीच ऐकायला येत नाही. मी त्याच्याशी खुणेनेच संवाद साधतो. खुप गप्पा मारायची इच्छा असते. परंतू त्याला ऐकायला येत नसल्यामुळे काहीच उपयोग होत नाही.

काहीही म्हणा जुनं ते सोनच. आताची पिढी त्यातल्या त्यात बरी आहे. परंतु पुढची पीढी ही स्वतःपुरतीच मर्यादित असणारी असेल व माणुसकी हरवुन बसलेली असणार हे नक्की.

ता.क.

परवाच 2 सप्टेंबर 2025 रोजी विष्णू नानाचे दुःखद निधन झाले आणि एक प्रामाणिक माणूस हे जग सोडून गेला.

विठ्ठल तळपे भगत वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

✍️ माझा हा लेख मूळतः StoryMirror, Marathishrushti आणि Pratilipi वर देखील प्रकाशित झाला आहे. लेखक: रामदास तळपे


रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती) 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...