
शिवाजी विद्यालय डेहणे येथे मी जेव्हा पाचवीला प्रवेश घेतला तेव्हा कै.आर.जे.पाटील सर मुख्याध्यापक होते. पाटील सर अतिशय कडक शिस्तीचे होते.कर्वे सर वर्गशिक्षक होते.तांबोळी सर,वरकुटे सर,फणसे सर,विधाटे सर,कोंढाळकर सर,जोशी मँडम,व्यवहारे सर,सवणे सर,फापाळे सर तर वरच्या वर्गासाठी गाडीलकर सर,महामुनी सर,दातीर सर,नढे सर,असे अनेकजण होते.
मी ७ जुनला पाचवीत गेलो तेव्हा प्राथमिक आरोग्य केंन्द डेहणेच्या जरा अलिकडे दक्षिणेस असलेल्या कै.बाबुराव कौदरे यांच्या इमारतीमध्ये डावीकडून पहिल्या खोलीत भरत असे.
त्याशेजारी सहावीचा वर्ग व त्या शेजारी सातवीचा वर्ग होता.तर प्राथमिक आरोग्य केंद्र डेहणे च्या शेजारी पश्चिमेस डावीकडे नविन दगडी इमारतीमध्ये आठवी,नववी व त्या शेजारी दहावीचा वर्ग होता.ही इमारत मला खुपच आवडायची.खुप मोठे वर्ग,वर्गात लाकडी बेंच ,मोठमोठया खिडक्या त्या मधून येणारा उजेड व बाहेर सुंदर व्हरांडा,समोर मोठे ग्राउंड होते.शाळा सकाळी.११.००वा.भरायची.
पांढरा शर्ट,खाकी चड्डी व डोक्यावर पांढरी गांधी टोपी व इनशर्टअसा गणवेश होता.ठरावीक वरच्या वर्गातील दहावीचे विद्यार्थी फुलपँट घालत.बाकी सर्वजन चड्डीच घालत.मुलींना निळा स्कर्ट किंवा निळा परकर,पांढरा शर्ट (ब्लाउज) दोन वेण्या आणि लाल रिबन असा गणवेश होता.बुधवारी रंगीत कपडे घालायला परवानगी होती.परंतू रंगीत कपडे होतीच कोणाकडे?
दहावी पर्यंत कुणाच्याही पायात चपला किंवा बुट नसायचे. आणवानीच शाळेत यायचे.मी तरआकरावीला काँलेजला पहिल्या दिवशी आनवानीच गेलो.मधल्या सुट्टीत पहातो तर सगळ्यांच्या पायात चपला व बुट..मलाच मग कसेतरी वाटू लागले.आणी मग काँलेजवरून होस्टेलवर जाताना राजगुरूनगरच्या मशीदीजवळील पुलावर नऊ रूपायाची चप्पल घेतली.काँलेजला चप्पल घालून जातात हे माझ्या गावीही नव्हते.
याच शाळेच्या समोर असलेल्या ग्राउंडवर प्रार्थना व्हायची.वर्ग निहाय एका ओळीत एका हाताच्या अंतरावर मुले प्रार्थनेला उभी राहत असत.लाईन थोडी जरी वाकडी असली तर सर मागुन काठीचे फटके मारत.समोर शाळेच्या व्हरांड्यावर सर्व शिक्षक एका ओळीत उभे राहत.
मी शाळेत गेलो तेव्हा "खरा तो एकची धर्म" ही साने गुरूंजींची प्रार्थना होती.त्याही आधी "सुंदर जीवन आता मी जगनार", ही प्रार्थना होती.मी ती ऐकलेली आहे.व ती कानांना खुपच गोड वाटायची.प्रार्थना झाल्यावर राष्ट्रगीत व्हायचे.एक साथ विश्राम झाल्यावर काही महत्त्वाची माहीती सांगीतली जाई.नंतर ओळीत आपापल्या वर्गात जायचे असा रिवाज होता.
पाचवीचा वर्ग हा अतिशय छोटा व खिडक्या नसलेला वर्ग होता.बेंच वगैरे काही मिजास नव्हती.खालीच ओळीने मांडी घालून बसावे लागे.डाव्या बाजूला मुली तर उजव्या बाजूला मुले बसायची.
तेव्हा दप्तर म्हणजे काय तर घरात जी रिकामी पिशवी असेल त्यामध्ये वह्या व पुस्तके ठेवायची व तीच पिशवी घेऊन शाळेत यायचे.त्यामध्चेच दुपारच्या सुट्टीत खाण्यासाठी रूमालात भाकरी व लसणाची,सुकटीची किंवा बोंबील,वाकट इत्यादी चटणी असे.पावसाळ्यात वर्गातच भाकरी खाल्या जात तर उन्हाळ्यात झाडाखाली बसुन भाकरी खात.
कधीतरी रूपाया दोन रूपये असतील तर आब्बासशेठच्या जनसेवा हाँटेलात ४० पैशात मिसळची नुसतीच तर्री विकत घेऊन त्याबरोबर भाकरी खायची परंतू हे लाड कधीतरी दोन तीन महिन्यांनी असत.

जून महिन्यातील पाऊस
पुर्वी अनेक ठिकाणी ओढ्यावर पुल असत.त्याआधी तेही नव्हते.खुप पाऊस असल्यावर शाळेत जाता येत नसे.अनेक विद्यार्थ्यांना छत्री विकत घेणे शक्य नसे,ते प्लँस्टीक कागद डोक्यावर घेऊन येत.परंतू या कागदाच्या एखाद्या शिडातुन वारा आत शिरे.व मोठा फडफड आवाज होई.कधी हा वारा कागद किंवा छत्री त्याच्याबरोबर दुर घेऊन जाई.कागद किंवा छत्री पकडताना विद्यार्थ्यांची केविलवानी धडपड सुरू होई.या पकडापकडीत दप्तर व तो सर्व भिजून चिंब झालेला असे.
सप्टेंबर महिन्यात ४० मार्काची पहीली व दुसरी घटक चाचणी असे.प्रश्नपत्रीका ही हस्तलेखन केलेली झेराँक्स काँपी असे.उत्तर पत्रीका ही फुलस्केप चारपाच कागद एकत्र टाचून तयार केलेली असे.उत्तर पत्रीकेवर वरच्या अर्ध्या कागदावर छापील मजकुर असे.त्यावार "अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे", हा सुविचार त्याखाली आदिवासी शिक्षण संस्था संचलित "शिवाजी विद्यालय डेहणे"ता.खेड,जि.पुणे.त्याखाली विद्यार्थ्यांचे नांव वर्ग परिक्षा नंबर व तुकडी असे व उजव्या बाजुला प्रज्वलीत दिव्याचे चित्र असे....उत्तर पत्रीका लिहिताना पुरली नाही तर जादा पुरवणीचा ताव मिळे.काही हुशार विद्यार्थी दोन,तीन पुरवन्या जोडत...ह्या पुरवन्या मुख्य उत्तरपत्रीकेला दो-याने बांधत,.घटक चाचणी तीन दिवस असायची.
शाळेत असताना..चौथ्या किंवा पाचव्या तासाला पांडू सांगडे शिपाई रजिस्टर घेऊन वर्गात दाखल होई.रजिस्टरमध्ये काय लिहिलं असेल याची उत्सुकता तानली जाई.सर वाचुन दाखवत.... आज ३१ तारीख आसल्यामुळे महिना अखेर आहे.त्यामुळे आज दुपार नंतर शाळेला सुट्टी राहील...किंवा अमुक..तमुक कारणामुळे उद्या शाळेला सुट्टी राहील..हे ऐकुण आम्हा विद्यार्थ्यांना जो आनंद होई..तितका आनंद अजुन तरी झाला नाही...
दिवाळीच्या आधी प्रथम सत्र परिक्षा असे.उत्तर पत्रीका एका छोट्या चोपडी सारखी असे.प्रश्नपत्रीका मात्र छापील असे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात दुसरी घटक चाचणी व एप्रिल महिन्यात वार्षिक परिक्षा असे.
तांबोळी सर,चिखले सर यांच्या काळात खेळ व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली.श्री.बबनराव गोपाळे - कब्बडी श्री.रोहिदास आंबेकर - खोखो. श्री.अरूण कोरडे- कब्बडी श्री.तुकाराम कोरडे - वक्तृत्व या बाबतीत शिवाजी विद्यालय महाराष्ट्र भर पोहचवले.त्यामुळे शाळेचे नाव गाजू लागले.त्यामुळे निश्चितच शाळेकडुन व विद्यार्थ्यांकडून अपेक्षा वाढल्या.शाळेचा दहावीचा रिझल्ट शतपटीने वाढला.आम्ही सहावीत गेलो तेव्हा आम्हांला बसायला बेंच मिळाले.जमीनीवरून बेंचवर बसायला मिळणे हा एक वेगळाच आनंद होता.
शाळेमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम असत.तर कधी व्याख्यानाचे कार्यक्रम असत.दहावीच्या मुलांसाठी नाईटस्टडी असे.त्यामुळे रात्री शाळेतच अभ्यास करून झोपावे.आम्ही नाईटस्टडीला असताना रात्री कुणाचाना कुणाचा हरभरा उपटून हुळा करायचो.
दवाखान्या जवळील मोठ्या शाळेच्या उजवीकडे जो मोठा दगडी स्टेज होता त्यासाठीचे दगड आम्ही नायफडच्या बंधा-याजवळून आणले होते.तर नदीमधून वाळू देखील आणलेली होती.तांबोळी सर,वरकुटे सर,व्यवहारे सर सुट्टीच्या दिवशी सुद्धा जादा तास घेऊन ज्ञानार्जनाचे काम करायचे.
श्री.तुकाराम भोकटे गुरूजीच्या घराजवळ "हसन सायकल मार्ट" दुकान होते.तेथे रूपाया तास या प्रमाणे मुले दुपारच्या सुट्टीत सायकल चालवून आनंद घेत असत.
हिवाळ्यात खुप थंडी असल्यावर शनिवारी शाळा जवळच, उन्हात भरे..व साडेनऊला सुट्टी व्हायची.आठवी ते दहावीचे वर्ग पाच तास झाल्यावर आकरा वाजता सुट्टी व्हायची.
त्याकाळात सर खुपच मारायचे.महामुनी सर पोटाच्या बाजुची कातडी जोरात चिमटीत पकडून वर ओढायचे.व भिंतीवर,फळ्यावर डोके आपटायचे..तर अनेक शिक्षक हातावर छड्या द्यचे.तर काही मुस्काटात लावायचे.तरकाही पाठीवर गुद्दे मारायचे.
असाच एक प्रसंग आम्ही दहावीत होतो.जानोबा मंदिराच्या उजवीकडे आसलेल्या इमारतीमध्ये आमचा वर्ग होता.माझा मित्र श्री.सुभाष भोकटे (आता तो विस्तार अधिकारी आहे.) आम्ही दोघे एकाच बेंचवर बसायचो.
आम्हाला मुलींच्या लाईनला सर्वात पाठीमागे असलेल्या रिकाम्या बेंचवर बसवण्यात आले होते.तेथेच आम्ही दररोज बसत असू. मुलांची लाईन वेगळी होती..बोरकर सर गणित विषय (गुणोत्तर-प्रमाण) शिकवत होते,सर्व जण एकाग्र होऊन ऐकत होता.
त्याचवेळी आम्ही मात्र एक वेगळेच नाट्य पहात होते.आमच्या समोर असलेल्या मुलीच्या डोक्यातून एक "ऊ" खाली तीच्या शर्टवर (ब्लाऊज) येत होती.ती "ऊ " इकडून तिकडे खालीवर जात येत होती.आणि आम्ही मन लाऊन ते पहात होतो.आमचे शिकवण्या कडे लक्षच नव्हते.सरांचे हे लक्षात आले.शिकवुन झाल्यावर त्यांनी आम्हा दोघांना उभे केले.तुम्हाला गणित समजले असेलच हेच गणित फळ्यावर सोडून दाखवा,सर म्हणाले.सरांच्या डोळ्यात प्रचंड संताप दिसत होता,
सर तसे फार शांत पण बिघडल्यावर जो काही मार देत. की दुसऱ्या दिवशी उठणे ठीण..हे आम्ही दोघानीही दुसऱ्यांच्या बाबतीत पाहीले होते, मी बाजूला असल्यामुळे माझ्या हातात त्यांनी खडू दिला मी फळ्याजवळ गेलो.फळा स्वच्छ केला तेच गणित मी सोडवायला घेतले.
गणित विषय तसा माझ्या आवडीचा आसल्यामुळे मी एका झटक्यात गणित सोडवले...सर अवाक्क होऊन पाहू लागले.आता याला मारायचे तरी कसे.हा त्यांना प्रश्न पडला.ते म्हणाले तु गणित सोडवले हे खरे आहे परंतू तुमचे दोघांचे मुळीच लक्षनव्हते हेही खरे आहे. ठिक आहे.
आता तु सोडव बरं, गणित असे म्हणून सुभाषला बोलावून घेतले,सुभाषचा गणित विषय सोडला तर सर्व विषयात A+मार्क असत,पण गणित त्याचा शत्रू ..आता काही खरे नाही.मार निश्चितच मिळणार असे म्हणुन खडू हातात घ्यायला व शाळा सुटण्याची बेल व्हायाला एकच वेळ झाली.अशा रितीने मार वाचला..
तर अशा अनेक आठवणी या शाळेविषयी सांगता येतील अशीही शाळा..
रामदास तळपे