छत्री, इरले, रेनकोट व गम बुट


जून महिना सुरू होताच आकाशात ढग जमायला सुरुवात व्हायची. त्याच दरम्यान जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा देखील सुरू व्हायच्या. नवीन वर्ग, नवीन कपडे, नवीन वह्या पुस्तके या आनंदात सर्व विद्यार्थी असायचे.

हळूहळू पाऊस सुरू व्हायला सुरुवात व्हायची. आणि मग आठवण यायची ती छत्रीची. नवीन छत्री घेण्यासाठी एकच हट्ट करायचे, छत्री घेतली नाही म्हणून रुसवे फुगवे व्हायचे. काही लोक पावसाळा संपल्यावर व्यवस्थित बांधून ठेवलेल्या छत्र्या झटकून बाहेर काढायचे. व वापरायला सुरुवात करायचे. 

तर काहीजणांच्या गलथान पणामुळे म्हणा किंवा छत्र्या व्यवस्थित न ठेवल्यामुळे तुटून, मोडून, फाटून जायच्या. काहींचा दांडा मोडलेला असायचा, तर काहींच्या तारा तुटलेल्या असायच्या, काहींचा खटका आत गेलेला असायचा, तर काहींचे कापड छत्रीच्या तळाशी फाटलेले असायचे.

पंचक्रोशीतील मोठ्या गावात बाजाराच्या दिवशी गल्लीत एका रस्त्याच्या कडेला झाडाखाली जुन्या छत्र्या दुरुस्तीचे दुकान थाटलेले असायचे. एका मोठ्या पोत्यावर अनेक जुन्या छत्र्या, नवीन दांडे, नवीन व जुन्या छत्रीच्या तारा, क्लिपा, घोडे (छत्री उघडण्याचे बटण ),चकत्या, छोटे खिळे, बारीक तारेचे गुंडाळे, त्याच बरोबर छोटया ब्याटऱ्या, ब्लब,असे विविध जुन्या व नव्या वस्तू हरीने मांडलेल्या असत.

छत्री दुरुस्ती करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडालेली असे. तेथे अनेक लोक ताटकळत आपली छत्री दुरुस्त होण्याची वाट पाहत उभे राहात असत.

कुणाच्या छत्रीचा दांडा मोडलेला असे, तर कुणाच्या छत्रीच्या तारा मोडलेल्या असत. कुणाच्या छत्रीचा घोडा आत गेलेला असायचा तर कुणाच्या छत्रीचे कापड छत्रीच्या मुळाशी फाटलेले असायचे. छत्री दुरुस्त करणारा कारागीर सफाईदारपणे व एकाग्रतेने छत्र्या दुरुस्त करायचा.

कुणाच्या छत्रीच्या एक दोन तारा कांडाळलेल्या असायच्या. कारागीर हळूच त्या मोडलेल्या तारा काढायचा. आणि त्या ठिकाणी नवीन तारा बसवायचा. काही छत्र्या उघडण्याचा घोडा छत्रीच्या दांड्यामध्ये गेलेला असायचा. कारागीर सफाईदारपणे त्याच्याकडील हत्यारांच्या सहाय्याने मोडलेला घोडा बाहेर काढायचा आणि छत्रीला नवीन घोडा बसवायचा.

कधी कधी छत्रीचे कापड तळाच्या भागात फाटलेले असायचे. छत्रीचे कापड छत्री पासून वेगळे करून बाहेर काढले जायचे. कात्रीच्या सहाय्याने फाटलेले कापड कापून त्या ठिकाणी नवीन कापड बसवून काळ्या धाग्याने व्यवस्थितपणे शिवले जायचे. कधी कधी छत्रीचे मूळ कापड, व नवीन दिलेल्या कापडाचा जोड यामध्ये जमीन आसमानाचा फरक असायचा. त्यामुळे ही छत्री वापरायला मुले का कू करायची.

काही लोक आपापल्या ऐपतीप्रमाणे जुन्या छत्र्यांना नवीन दांडे बसवायचे, तर कधी जुनेच दुरुस्त करून घ्यायचे.

छत्री दुरुस्त केल्यावर एक दोनदा उघड झाप करून छत्री बरोबर नीट केली आहे ना... याची कारागीर खात्री करून घ्यायचा. व गिर्‍हाईकाच्या हातात द्यायचा. चार दोन रुपये मिळालेला मोबदला पत्र्याच्या छोट्या पेटी टाकायचा. त्या चिल्लर नाण्यांचा खळखन आवाज यायचा.

त्यावेळी तिथे अनेक संवाद व्हायचे. खालीलपैकी एक संवाद 

मुलगा :- बाबा, मला नवीन छत्री पाहिजे. 

सगळे मुलांकडे नवीन छत्री आहेत. मीच जुनी छत्री रिपेअर करून का वापरायची?

बाबा  :- आता आपली छत्री घेण्या इतकी ऐपत नाही बाळा.आता हीच वापर. पुढच्या वर्षी बघू . 

मुलगा :- मी नाही मग शाळेत जाणार.. मला नको ही छत्री जुनी आहे. शिवाय तिला ठिगळ दिले आहे.

तेथील एक माणूस :- बाळा, बाबांचं ऐकावं जरा.. परिस्थिती कठीण आहे. ते म्हणतात ना पुढल्या वर्षी नवीन घेऊ मग वापर वर्षभर ही.

बाकीचे तिथे असणारे सुद्धा मुलाला समजायचे.

त्यावेळी छत्री म्हणजे एक मांजरपाट काळ्या कापडाची सिंगल तारांची छत्री असे. पावसाने भिजल्यावर ही छत्री खूप जड व्हायची. ती वाळायची सुद्धा लवकर नाही.

त्यानंतरच्या काळात डबल तारांच्या टेरीकोट छत्र्या बाजारात आल्या. या छत्र्यांना खटक्याची छत्री सुद्धा म्हणत असत. ही छत्री वापरायला खूपच सुलभ होती. शिवाय पावसाने भिजूनही जड देखील होत नसे. पाऊस उघडल्यावर झटकन वाळत असे.परंतु ही छत्री सिंगल छत्रीपेक्षा महाग असायची.

हळूहळू साध्या छत्र्या लोक वापरीनासे झाले. आणि मग ह्या छत्र्या बाजारातून हद्दपार झाल्या.

त्यावेळी नवीन छत्री घेतली की ती हरवायची जास्त भीती असे. नवीन छत्री व रंगीत कलरने स्वतःचे नाव व पत्ता टाकायची पद्धत होती. छत्रीवर नाव टाकायचे पेंटर पाच रुपये घ्यायचा. 

पाऊस चालू झाल्यावर छत्री घेऊन दुसरीकडे जायचे. व एखाद्याच्या किंवा पाहुण्यांच्या घरी गेल्यावर त्याच्या दरवाजा जवळ छत्री लटकावयाची. आणि आत जायचे.

घरी जायच्या वेळी पाऊस उघडलेला असायचा. त्यामुळे छत्री घ्यायचे ध्यानातच राहायचे नाही. तसेच पुढे जायचे. अर्धा किलोमीटर चालून गेल्यावर पावसाची सर यायची. आणि मग त्यावेळी छत्रीची आठवण व्हायची. पुन्हा पाहुण्यांच्या घरी जायची वेळ यायची.

कधी कधी छत्री एस टी मध्ये, आगगाडी मध्ये, हॉटेलात विसरली जायची. घरी आल्यावर खूप पश्चाताप व्हायचा. खूप हळूहळू व्हायची. परंतु ईलाज नसायचा. 

मुंबई वाले चाकरमानी पावसाळ्यात गावाला यायचे तेव्हा त्यांच्याकडे छोटी बंदूक छत्री असायची. ही छत्री घडी घालून पिशवीत ठेवता येण्याजोगी होती. परंतु अतिशय नाजूक.. या छत्रीचे आम्हा मुलांना खूप आकर्षण वाटायचे. परंतु गावाकडे खूपच पाऊस असल्यामुळे व वेडेवाकडे जोरदार वारे वाहत असल्यामुळे या छत्रीचा टिकाऊ लागणार नाही हे माहीत असल्यामुळे या छत्र्या बाजारात विक्रीस नसत. असंत फक्त मोठ्या आणि लांब छत्र्या. या छत्रीचा खटका दाबताच छत्री आपोआप उघडायची. याचा उपयोग आम्ही मांजर घाबरवण्यासाठी करायचो.

छत्र्या हरवू नयेत, किंवा त्या हरवल्या की सापडाव्यात किंवा त्या चोरून नेऊ नयेत म्हणून छत्रीवर नाव टाकण्याची पद्धत होती. वेगवेगळ्या रंगांमध्ये छत्रीच्या कापडावर स्वतःचे संपूर्ण नाव व पत्ता लिहिण्याची पद्धत होती. त्यावेळी मोबाईल नंबर नव्हते नाहीतर ते सुद्धा लिहिले असते. छत्रीवर नाव टाकण्याचे पेंटर पाच रुपये घ्यायचा.

इरले:

त्यावेळी पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतातील काम करण्यासाठी इरल्यांची सुद्धा खूपच गरज भासायची. इरली ही बांबूच्या छोट्या छोट्या काड्या पासून पासून तयार करत असत. त्यासाठी प्रत्येक गावात कारागीर असत. अगदी सकाळी सकाळी त्यांचा इरले बनवण्याचा उद्योग चालू आहे. 

त्यावेळी पायली दोन पायली धान्य देऊन कारागीर लोकांना इरली करून देत असे. इरल्याचा बांबू पासून साठा बनवल्यावर त्यावर वाळलेली पळसाची पाने हरीने लावून दोरीने सुबक घराघरांच्या नक्षीदारपणे बांधली जात असे. नवीन इरली दिसायला अतिशय सुंदर असत. ही इरली अतिशय उबदार असत. परंतु खूपच जड असत.

दरवर्षी कोकणातील लोक पळसाच्या पानाचे पुडके इरल्याला लावण्यासाठी विकायला घेऊन यायचे.

पुढे काळ बदलला, लोक इरल्याच्या साठ्याला पळसाच्या पाना ऐवजी कागद बांधू लागली. त्यामुळे इरली ही वापरायला सुलभ व हालकी वाटू लागली. परंतु त्यामध्ये उबदार पण नव्हता. 

घोंगडी 

त्या वेळी लोक शेतीची कामे करण्यासाठी पावसाळ्यात घोंगडीचा सर्रास उपयोग करत असत. व आताही करतात परंतु प्रमाण फार कमी झाले आहे. प्रत्येकाकडे घोंगडी ही असायचीच.शक्यतो घोंगडी ही गुरे राखणाऱ्या गुराख्यांकडे असायची. घोंगडी चा उपयोग पाहुण्यांना बसण्यासाठी सुद्धा व्हायचा.घोंगडीवर बसल्यावर खूपच उबदार वाटायचे. पूर्व लोक झोपण्यासाठी घोंगडी खाली आंतरत्व त्यावर झोपत असत. आरोग्य शास्त्र सांगतं, घोंगडीवर सहा महिने झोपल्यावर डायबिटीस आपोआप कमी होतो.

रेनकोट:

पावसाळ्यात रेनकोट सुद्धा तुरळक लोकांकडेच असायचा. त्या काळात रेनकोट ही ओबडधोबड होते. 

नंतरच्या काळात रेनकोटच्या अनेक व्हरायटी बाजारात उपलब्ध झाल्या. वेगवेगळ्या रंगीत रेनकोटांनी बाजारपेठ 

फुलून जायची. वेगवेगळ्या रंगाच्या छत्र्या देखील बाजारात आलेले असायच्या.

नवीन छत्री घेतली की कारण नसताना घराबाहेर फिरून यायची हुक्की यायची.उद्देश हाच असायचा की आपण घेतलेली नवीन छत्री.. आपल्या मित्रांना दाखवता येईल.

रेनकोटचे तर विचारूच नका. घरामध्ये बसलो असता बाहेर पावसाची एखादी जोरदार सर आली की. रेनकोट घालून बाहेर फिरायला जायची तयारी करायची. रेनकोट घालून बाहेर जाणार तोच पाऊस उघडलेला असायचा. 

कधी कधी रेनकोट न घालताच बाहेर गेलो की पावसाची एकच जोरदार सर यायची. पूर्ण पाऊस अंगावर घेताना रेनकोटची आठवण यायची. परंतु रेनकोट आणायला आपण विसरलो आहोत हे आठवून स्वतःचे स्वतःला वाईट वाटायचे.

चप्पल:

पावसाळ्यात चेपल्यांचे तर विचारूच नका. चेपल्या जर चामड्याच्या असतील. तर वाळता वाळायच्या नाहीत. त्यासाठी लोक पावसाळ्यापूर्वी प्लॅस्टिकच्या किंवा बाटाच्या चेपल्या घेत असत.काही लोक अगदीच अनभिज्ञ असत. पावसाळा आल्यावरच मग त्यांना चेपल्यांची आठवण होई. परंतु काही लोक अगदीच भरभर गाळातून चालत जाताना एक वेगळाच फटफट आवाज येत असे. त्यांना पाण्याचा आणि गाळाचा अंदाज येत नसे आणि पाठीमागून गाळ त्यांच्या अंगावर अगदी डोक्यापर्यंत उडायचा. हे घरी गेल्यावर कपडे काढून  बघितल्यावरच कळत असे. किंवा पाठीमागून चालणारा एखादा माणूस सांगायचा.तेव्हा कळायचे.

गमबूट

काही लोक पावसाळ्यात काळ्या रंगाचे पायाच्या पोटऱ्यापर्यंत असलेले गमबूट किंवा बाटाचे बूट वापरत. बूट हे काळे, पिवळे,तपकिरी,लाल रंगाचे असे. परंतु गमबुट मात्र काळ्या रंगाचे असायचे.गमबुट हे रानात, गवतातून किंवा गुरांकडे जाताना वापरत असत.परंतु गम बूट हे वापरायला जरा कटकटीचे होते.गम बूट घातल्यावर जोरात चालता येत नसे.

एकदा तर एकाच्या गमबुटात साप वेटोळे घालून बसलेला होता. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे हा गमबूट घालायला गेला. तर त्याच्या पायाला काहीतरी गिळगिळीत लागले. बूट उलटे करून आपटले तर त्यातून साप बाहेर पडला..तर असे हे गमबुट.

रामदास तळपे

निसर्गातील डॉक्टर


निसर्गातील डॉक्टर 

जेव्हा कावळा आजारी पडतो.तो मुंग्यांच्या वरुळाला ला भेट देतो. ऐकायला विचित्र वाटतंय का? खरंतर हा निसर्गाच्या सर्वात आकर्षक उपचार विधींपैकी एक आहे. 

जेव्हा कावळ्याला स्वतःला आजारी असल्याचे जाणवते, तेव्हा तो जाणूनबुजून मुंग्यांचे वारूळ शोधतो, त्याचे पंख पसरतो आणि पूर्णपणे स्थिर राहतो - मुंग्यांच्या पिसांमध्ये घुसण्याची वाट पाहत. पण का? 

कारण मुंग्या फॉर्मिक ॲसिड  सोडतात - एक नैसर्गिक अँटीसेप्टिक जो पक्ष्यांच्या पंखांमध्ये लपलेले बॅक्टेरिया, बुरशी आणि परजीवी मारतो. 

या वर्तनाला "मुंग्यांना डॉक्टर" म्हणतात, आणि हे केवळ कावळ्यांमध्येच नाही तर अनेक पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये दिसून आले आहे. औषध नाही. पशुवैद्य नाही. फक्त शुद्ध अंतःप्रेरणा आणि निसर्गाची अंगभूत फार्मसी. 

नैसर्गिक जग बुद्धिमान, स्वयं-उपचार प्रणालींनी भरलेले आहे याची एक उज्ज्वल आठवण... आपल्याला फक्त थांबून लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.


सुभाष जठार यांची कविता...

कोण आहे तु 

तोच पाऊस वादळ, वारा !

तुझ्या पुढे बघ काहीच नाही !!

तीच वीज. नभ काळे भोर !

नजरे पुढे तुझ्या काहीच नाही !!

गुलाब. चाफा. जुई. मोगरा !

तुझ्यापुढे तर काहीच नाही !!

तोच श्वास ओल्या मातीचा !

तुझ्या गंधापुढे तर काहीच नाही !! 

तीच सरिता. तोच सागर!!

तुझ्या अश्रू पुढे बघ काहीच नाही!!

खळ खळणारे झरे बापुडे!

तुझ्या हास्या पुढे पण काहीच नाही!!

लव लवणारी गवत. पालवी!

तुझ्या पुढे तर काहीच नाही!!

भिरभीरणाऱ्या तुझ्या केसुवांची!

यांना कसलीच चाहूल नाही!!

स्वभावातील मिठास तुझ्या त्या!

त्यांना साधी माहित नाही!!

ऊस. शर्करा. आणि मधाला!

तुझा गोडवा ठाऊक नाही!!

आहे अशी तु एक वेगळी!

अजून कुणाल ठाऊक नाही!!

मला सोडूनी. बाकी कुणाला!

तुझी तुलाच तु माहित नाही !!

कवी सुभाष जठार (धुओली तालुका खेड जि पुणे) 




.

भारतीय गुप्तहेर अजित डोवाल....

 

भारतीय गुप्तहेर अजित डोवाल....

अजित डोवाल हे भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायझर  आहेत.भारताच्या रॉ आणि एकूणच गुप्तचर संघटनेच्या गेली 50 वर्षाच्या इतिहासाचे ते साक्षीदार आहेत.त्यांनी सिक्कीम, मिझोराम मध्ये पाकिस्तान मध्ये आणि लंडन मध्ये देशासाठी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत.

या संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे परदेशातील गुप्त माहिती गोळा करणे, दहशतवादविरोधी कार्य करणे, आणि भारतीय धोरणकर्त्यांना सल्ला देणे.

रॉची स्थापना 1968 मध्ये झाली.1962 च्या चीन-भारत युद्ध आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान गुप्तचर अपयशामुळे या संस्थेची आवश्यकता भासली.

रॉ ही भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे.ती गुप्तचर माहिती गोळा करणे, दहशतवाद रोखणे, आणि परदेशी संबंध सुधारणे यांसारख्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये व्यस्त आहे. 

रॉ ही भारतीय गुप्तचर संघटना श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी निर्माण केली. रॉ ही संघटना त्यावेळी पाकिस्तान व बाहेरची उपद्रवी राष्ट्र काय करतात याची इंत्यभूत माहिती घेऊन त्यावर पुढील योग्य ते निर्णय काय घेतले पाहिजेत याचा आराखडा तयार करत असत. त्यासाठी या संघटनेला योग्य ती आर्थिक मदत केली जात असे.

परंतु पुढील काळात इंदिराजींचे सरकार जाऊन मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले. त्यांचा असा समज होता की रॉ ही संघटना इंदिरा गांधी यांनी विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार केली आहे. त्यामुळे त्यांनी रॉ या संघटनेचे पंख छाटून त्यांचा निधी कमी केला.जवळजवळ रॉ ही संघटना बंदच पडली.

त्यामुळे रॉ या संघटनेचे कामकाज ठप्प झाले. त्याचवेळी पाकिस्तानमध्ये चीनच्या मदतीने अण्वस्त्र बनवण्याचा कार्यक्रम सुरू होता. मोरारजी देसाई यांनी जर या संघटनेचे पंख छाटले नसते आणि या संघटनेला आर्थिक बळ दिले असते किंवा हा कार्यक्रम पुढे तसाच राबवला असता तर पाकिस्तानचा अवस्त्र बनवण्याचा कार्यक्रम भारताने हाणून पाडला असता.व आज जे काही पाकिस्तान कडे अवस्त्र आहे ते नसते.

अजित डोवाल यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. ते पाकिस्तान मध्ये गुप्त माहिती मिळवण्यासाठी गेले होते, तेव्हा तेथे अनेक गोष्टी घडायच्या. काही प्रसंग त्यांच्या जीवावर बेतणारेही झाले.

पाकिस्तान मध्ये असताना त्यांना एका माणसाने बरोबर ओळखलं होतं. आणि ते चांगलेच फसले होते. सन 1981 ते 1987 अशी सहा वर्ष अजित डोवाल हे पाकिस्तान मध्ये अधिकृतरित्या होते. भारताच्या रॉ ह्या गुप्तचर संघटनेसाठी काम करीत होते. 

परंतु त्या आधी 1977 साली गुप्तचर संघटनेसाठी गुप्तहेर म्हणून काम करीत असताना पाकिस्तान मधील रावळपिंडी या शहरा जवळील "कहूता" या गावी पाकिस्तान अवस्त्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यासाठी पाकिस्तानने E. R. L. इंजिनीयर रिसर्च लॅब संस्था स्थापन केली होती.आणि याचीच माहिती मिळवण्यासाठी अजित डोवाल सक्रिय होते. त्यासाठी अजित डोवल यांना वेगवेगळे वेश परिधान करावे लागत असत. व सतत वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत असे. व फिरावे लागत असे. त्यासाठी त्यांनी मुस्लिम वेश परिधान केला होता.

एकदा लाहोर मध्ये असताना एका मशिदीमध्ये त्यांच्या कामासाठी ते गेले होते. मशिदी मधून बाहेर येताना त्यांना असे जाणवले की बाहेर एका कट्ट्यावर बसलेला एक मुस्लिम मौलवी एकसारखा माझ्याकडे पाहत आहे व मला सतत निरखत आहे.अजित डोवल यांना थोडंसं अस्वस्थ वाटलं. तेवढ्यात त्या मौलवीने डोवाल यांना जवळ बोलावलं.आणि विचारलं तुम्ही मुस्लिम नाहीत तर तुम्ही हिंदू आहात. यावर अजित डोवाल म्हणाले मी हिंदू नाही मी मुस्लिम आहे.

त्यावर तो मुस्लिम मौलवी म्हणाला..

तुम्ही खोटं सांगता. तुम्ही खरोखर हिंदूच आहात.

तो मुस्लिम मौलवी दोवाल यांना म्हणाला तुम्ही माझ्याबरोबर चला, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय.

अजित डोवाल हे अतिशय हिमती व्यक्तिमत्व होते. म्हणून तर त्यांना भारताने या कामगिरीवर पाठवलं होतं.

अजित डोवाल त्या मुस्लिम मौलवी बरोबर चालू लागले. कारण त्याशिवाय त्यांचे पुढे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता.

लाहोर मधील चार-पाच गल्ल्या चालून झाल्यावर एका छोट्याशा चाळीमध्ये खोली असलेल्या घरात ते दोघे गेले.

ते दोघे जमिनीवर बसले कारण तेथे त्यांच्याकडे खुर्ची नव्हती. मौलवी डोवल यांना म्हणाले. तुम्ही मुस्लिम नसून हिंदू आहात हे मी लगेच ओळखले कारण तुमच्या कानाच्या पाळीला छोटेसे छिद्र आहे.आणि ते केवळ हिंदूंचेच असते.

अजित डोवाल हे अतिशय हुशार होते. ते म्हणाले आमच्याकडे काही भागात कानाला छिद्र असते. पूर्वी मी हिंदूच होतो परंतु नंतर मुस्लिम बनलो आहे.

यावर तो मौलवी म्हणाला नाही... अजूनही तुम्ही हिंदूच आहात..

अजित डोवाल यांना शेवटी मान्य करावेच लागले. ते म्हणाले होय अजूनही मी हिंदू आहे. परंतु तुम्हाला कसं कळलं?

यावर तो मौलवी म्हणाला.. मीही हिंदूच आहे. असे म्हणून ते रडू लागले.

माझं संपूर्ण कुटुंब या पाकिस्तानी लोकांनी मारून टाकलं. मी कसातरी त्यांच्या तावडीतून वाचलो.आणि पर्याय नसल्यामुळे मी मुस्लिम वेश धारण करून मौलवी बनलो.आता वेगवेगळ्या मशीदी पुढे बसून मी माझा उदरनिर्वाह करत आहे.ज्यावेळी तुझ्यासारखे मुस्लिम वेश धारण करणारे लोक भेटतात.तेव्हा मी त्यांना बरोबर ओळखतो.आणि मला खूप आनंद होतो.

त्या मौलवीने त्याची छोटीशी पत्र्याची पेटी उघडली आणि आत मध्ये असलेला भगवान शंकराचा व दुर्गादेवीचा छोटा फोटो मला दाखवला.मी भक्ती भावाने त्या फोटोला वंदन केले.

त्या मौलवीने सांगितले. मी अजूनही गुप्तपणे माझा धर्म बदललेला नाही. मी अजूनही या देवांची रोज पूजा करत आहे. त्याने डोवल यांना सांगितले. तू लवकरात लवकर या कानाची छिद्रे बुजवून टाक. कारण दुसरे कुणी जर ओळखलं तर तू चांगलाच अडचणीत येशील. असे म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

डोवाल यांनी मी कोण आहे हे त्या मौलवीला सांगू शकले नाहीत. कारण त्यांना तशी परवानगी नव्हती.

पुढे अनेक वर्ष पाकिस्तान मध्ये राहिले त्यांना त्या माणसाला खूप काही मदत करावी असे वाटायचे. परंतु त्यांना त्यासाठी काहीही करता आले नाही. याबद्दल त्यांना वाईट वाटते.

डोवाल यांना गुप्तहेराची कामगिरी बजावत असताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले, अनेक हालअपेष्टा भोगाव्या लागल्या. परंतु देशासाठी त्यांनी हे सर्व सहन केले.

रामदास तळपे 

मैत्री,अशीही (एक सत्यकथा)

मैत्री,अशीही (एक सत्यकथा) 

20 मे 2025 रोजी मला वर पक्ष असलेल्या मित्राकडून Whats app वर लग्नाची प्रत्रिका आली. लागोपाठ आठ दिवस पोस्ट पाठवत होते. शेवटच्या एक दिवसाअगोदर मला त्यांचा फोन आला. आपण आमच्या विवाह सोहळा उपस्थित राहुन,वधु वरांना शुभेच्छारुपी आशिर्वाद द्यावा.मी त्यांना होय,नक्कीच मी लग्न कार्यास उपस्थित राहीन असे सांगितले. 

प्रत्रिका पाहिल्यावर बघितले तर वधु माझ्या खास मित्राची मुलगी होती. हे पाहिल्यावर मला खूप आनंद झाला.

 वधूचे वडील व मी  शाळा आणि काँलेज मध्ये एकाच बेंच बसायचो. कधीतरी हॉटेल नाश्ता करायचो. एकत्र चहा घ्यायचो. आमची खूपच दृढ मैत्री होती. एकमेकाशिवाय कधी राहिलो नाही. तो माझ्या पेक्षा थोडा जास्त हुशार होता. मी मध्यम होतो.

पदवी शिक्षण झाल्यावर दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या..तो उच्च पदवावर गेला.नंतर एकमेकांची लग्न झाली मी माझ्या मित्राला आग्रहाने प्रत्रिका घरी जाऊन दिली. त्याने लग्नाला येण्याच वचन दिलं, पण तो काही माझ्या लग्नाला आला नाही.विशेष म्हणजे त्यांने त्याच्या लग्नाची मला प्रत्रिका सुद्धा दिली नाही.आमचे एकमेकांकडे मोबाईल नंबर होते.ते एकमेकांच्या मोबाईल मध्ये सेव्ह होते. असे असताना सुद्धा त्याने लग्नाचा साधा मेसेज सुद्धा केला नाही.

ज्यांच्या मुलांचे लग्न होते, ते सुद्धा माझे मित्रच होते. खूप छान आमची मैत्री होती. तर  त्यांच्या मुलाचा माझ्या ह्या मित्रांच्या  मुली सोबत 20/05/2025 विवाह सोहळा होता.

मी माझ्या या बालमित्राचे रोज Whats, up स्टेट्स दररोज पाहायचो.त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा दिनाचे खूप फोटो असायचे.

मला वर पक्षाकडून प्रत्रिका आली आहे.मी विचार करतोय, आपला बालमित्र नक्कीच आपल्याला प्रत्रिका पाठवीन.पण लग्न दिवसांपर्यंत मला वधु पक्षाची म्हणजे माझ्या बालपणीच्या मित्रांची प्रत्रिका आली नाही.

मी पुरता गोंधळून गेलो होतो.लग्नाला जावे की न जावे? पण वर पक्षाकडे माझी इज्जत खूप होती.आणि मला मानणारा वर्ग खुप मोठा होता.माझं वागणं,माझं बोलणंआणि माझी राहणीमान. समाजातील माझी इमेज अतीशय चांगली आहे. प्रत्येकजन माझ्या सोबत आपुलकीने वागायचा.

विवाह सोहळा दिवस उजाडला.मला सकाळी वर पक्षाकडून फोन आला.आपण आमच्या विवाह सोहळा दिनाचे पाहुणे आहात.आपणास नक्कीच विवाह सोहळाला यावेच लागणार आहे.

मी निश्चय केला. चला आपल्या मित्रांने आपणास प्रत्रिका दिली नाही,त्यांचा मेसेज अथवा फोन नाही.वर पक्षाकडून आपणास आग्रह करतात तर आपण विवाह सोहळाला उपस्थित राहुन वधुवरांना शुभेच्छा देऊ या.

मंगल कार्यालयात मी आणि माझे काही मित्र पोहचलो. प्रवेश द्वारा समोर स्वागताला उभी असलेली दोन्ही बाजुची मंडळी होती.एका बाजुला वधु कडील मंडळी आणि एका बाजुला वरपक्षाकडील मंडळी.

मी प्रवेशद्वारा जवळ पोचताच वर पक्षाकडील मंडळीने माझे अतिशय सुंदर स्वागत केले.शाल श्रीफळ आणि फेटा बांधून स्वागत केले.माझं स्वागत होत असताना नकळत माझ्या मित्रांचे माझ्याकडे लक्ष गेले. त्याला माझा सत्कार झालेला आश्चर्यकारक वाटलं. तरीही तो जवळ आला नाही की, साधी ओळख दाखवली नाही.

लग्नमंडपात गाद्या होत्या. तिथं पर्यत वर पक्षाकडील मित्र आम्हाला घेऊन माझा बसण्यापर्यत मान दिला.नंतर स्पिकर वरही पुकारण्यात आले. ज्यामध्ये माझ्या विशेष कामाचा गौरव होता, समाजात असलेल्या कार्याची दखल घेऊन निवेदकाने त्याच्या विशिष्ट पद्धतीने माझा नामोल्लेख केला होता. हे सर्व माझ्या मित्रांने ऐकलं, आणि त्यांच्या चेहरावरचा नुर एकदम पालटला.त्याला काय करावे हेच समजेना.तो माझ्या दोन वेळा जवळुन गेला पण त्यांची बोलण्याची हिम्मत झाली नाही.

मंगलाष्टका झाल्या.सर्व आलेल्या पाहुण्यांना शब्द सुमनांने आभार झाले.वरपक्षाकडील मंडळी जेवणाचा आग्रह करीत होती.मनापासून जेवण्याची इच्छा नव्हती पण आग्रह खुप झाला.त्याच वेळी एक चमत्कार घडला.माझा हा बालपणीचा मित्र माझ्या जवळ आला.धायमोकलुन माझ्या गळ्यात पडुन रडु लागला.मला ही काय करावे हे समजेना आणि माझ्या जवळ वरपक्षाकडील मंडळींना काही समजले नाही..मी स्थितप्रज्ञ झालो होतो.

तो म्हणत होता मित्रा, मी खूप चुकलो आहे मला माफ कर.मी तुला समजु शकलो नाही.तुझ्यातील चारित्र्य मनाचा मोठेपणा व तुझा समाजाप्रती असलेला भाव मला दिसला नाही. माझा अहंकार मला तुझ्या पासून दुर घेउन गेला.

एका मध्यम व्यक्ती सोबत आपण उच्च पदावर गेल्यावर का मैत्री करावी.मी तुझ्या सोबतच नाही तर आपल्या वर्गातील सर्वसाधारण नोकरी करत असलेल्या मित्रा सोबतची मैत्री मी उच्च अधिकारी झाल्यावर संपुष्टात आणली.आज माझ्या मुलीच्या लग्नात तुझा सत्कार होतोय, वरपक्षाकडील मंडळी तुझ्या मागे पुढे करतात.तुला प्रत्रिका बघुन समजलं होतं माझी मुलगी दिलीय तरीही तु स्थितप्रज्ञ होतास. ना चेहरावर कसलाही भाव. ना चेहरावर अपमानाची छटा. मित्रा मला माफ कर.

त्याने मग त्याच्या पत्नीला कोणाला तरी बोलावण्यास पाठवुन माझी ओळख करून दिली.दोघांनीहि हात जोडून. विनंती केली आपण जेवन करुन जावे..मी ही मागचं सगळं विसरून वरवधुच्या शब्दाला मान देऊन जेवण केले. माझा तो मित्र.मला आग्रहाने जेवु घालीत होता.माझ्या हदयात एक आनंदाची लहर येऊन गेली.

तुम्ही चांगलं वागा. तुम्ही चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व ठेवा.तुमचा समाजाला हेवा होईल असच चालत राहा.नक्कीच एक दिवस तुम्हाला झिडकारलेली व्यक्ती तुमच्या प्रेमात अथवा तुम्हाला मिस केल्या शिवाय राहणार नाही.

त्या दिवशी मित्राने घरी येऊन आम्हा सहपरीवाराला घरी येण्याचे आमंत्रण देण्यास येतो असं वचन दिलं.

मी ही दिलसे माफ केलं.कारण तो माझाच बालमित्र होता.

हरे कृष्ण राधे कृष्ण 🙏🙏

लेखक:- बालाजी शितोळे

तीन लघु कथा

 
तीन लघु कथा 

१. "गहन"

मी लिफ्ट मध्ये एका लहान मुलाला आईस्क्रीम खात असलेलं बघितलं. त्याची काळजी वाटून मी त्याला सहज बोललो, "आज खूप थंडी आहे हे आईस्क्रीम खाऊन तू आजारी पडशील!"

तो मुलगा उत्तरला, "माझी आजी १०३ वर्षांपर्यंत जिवंत राहिली."

मी विचारलं, "आइसक्रीम खाल्यामुळे?"

तो म्हणाला, "नाही, कारण तिने कधीच दुसऱ्याच्या कामामध्ये नाक खूपसले नाही!"

किती खोल अर्थ दडला होता त्या उत्तरात! आता मला समजलं की मी इतक्या वेगाने का म्हातारा होत चाललोय - कारण नसताना मी दुसऱ्याच्या कामात केलेली ढवळाढवळ. दुसरं काय?

२. "थकलेला"

आज-काल जिथे तिथे घोटाळेबाज दिसून येतात. मी नुकताच बातम्यांमध्ये लोकांच्या बँक अकाउंट बद्दल बातम्या पाहात होतो - लोकांच्या खात्यांतून लाखो रुपये बघता बघता नाहीसे झाले होते आणि ते कुठे गेले याचा मागमुसही लागत नव्हता.

ती बातमी पाहून जाम घाबरलेलो मी माझ्या बाईकनं बँकेत गेलो. एटीएम मध्ये माझं कार्ड स्वाईप केलं, माझा पासवर्ड टाकला आणि माझ्या खात्यातली शिल्लक तपासली. माझ्या खात्यात शिल्लक असलेले साडेसातशे रुपये अजूनही माझ्या खात्यातच पडून होते मी सुटकेचा निश्वास टाकला.

बापरे, माझ्या मनावरचा ताण आता हलका झाला होता. आता यापुढे पुन्हा कधी बातम्या ऐकणार नाही असं मी मनोमन ठरवून टाकलं. नको पुन्हा तो भयंकर तणाव!

मात्र मी एटीएम मधून बाहेर पडलो तेव्हा हे बघून मी मनानं आणखीनच हबकून गेलो हे माझे साडेसातशे रुपये अजूनही तसेच माझ्या खात्यात शिल्लक असले तरी माझी मी नुकतीच पार्क केलेली बाईक मात्र आता जागेवर नव्हती.

३. "थांबा"

एक तरुणी ट्रेनमध्ये चढली आणि आपल्या सीटवर दुसराच कोणी माणूस बसल्याचं तीनं पाहिलं. विनम्रतेने आपलं तिकीट तपासून बघितलं आणि ती म्हणाली, "सर, मला वाटतंय आपण चुकून माझ्या सीटवर बसला आहात."

त्या माणसानं आपलं तिकीट काढलं आणि तिला ते दाखवत तो तिला रागान ओरडून म्हणाला, "हे तिकीट जरा नीट बघ. ही माझीच सीट आहे. तू आंधळी आहेस का गं ?"

त्या तरुणीने बारकाईने ते तिकीट तपासलं आणि तिने त्या माणसाशी वाद करणं थांबवलं. ती काही न बोलता त्या सीट पाशी उभी राहिली.

ट्रेन सुरू झाल्यावर काही वेळानं ती तरुणी खाली वाकून त्या माणसाला म्हणाली, "सर, तुम्ही चुकीच्या सीटवर नाही बसलात परंतु तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आहात. ही ट्रेन मुंबईला जातेय आणि तुमचं तिकीट आहे अहमदाबादचं"

तात्पर्य, मनावर संयम असावा. आपण बोलण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी विचार केला पाहिजे अन्यथा आपल्याला पश्चात्ताप करावा लागू शकतो. ओरडण्याने जर सगळेच प्रश्न सुटले असते तर कदाचित या जगावर गाढवांनीच राज्य केलं असतं.

या तीन कथा गंमतदार छोट्या वाटत असल्या तरी त्यात गुढ गम्य आहे…

😂😂😂

गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस