महाराष्ट्रातील लोककला

पूर्वी महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात अनेक वेगवेगळ्या कला अस्तित्वात होत्या. त्यापैकी भजनी मंडळे, लेझीम पथके, प्रसादिक भजनी भारुड मंडळ, तमाशा मंडळे, कलापथके इत्यादी अनेक प्रकार अस्तित्वात होते. 

या सर्वांना लोकाश्रय होता. त्यामुळे अनेक कलावंत उदयाला आले. अनेकांचे नाव झाले. 1995 पर्यंत ही कला अगदी अत्युच्च पातळीवर होती. त्यावेळी प्रत्येक विषयात  क्रमवारीनुसार कार्यक्रम होत असे भजनी भारुडामध्ये विशिष्ट क्रमानुसार भारुड पुढे पुढे सादरीकरण होत असे.

गावाकडच्या लोककला 

भारूडाचा सादरीकरण क्रम 

पंचपदी

रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी 

तो हा विठ्ठल बरवा तू हा माधवा बरवा 

गजर 

गण 

आधी गणाला रणी आणला

नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

धन्य शारदा ब्रम्ह नायका, घेऊन येईल रूद्रविणा

साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा, दाविल यंत्र खुणाखुणा

नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

सद्‌गुरू माझा स्वामी जगद्‌गुरू, मेरूवरचा धुरू आणा 

ब्रम्हांडा भवता तो एक सवता, दिवाच लाविल म्हणा 

नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

माझ्या मनाचा मी तू पणाचा, जाळून केला चुना चुना

पठ्ठेबापूराव कवि कवनाचा, हा एक तुकडा जुना जुना

नाहीतर रंग पुन्हा सुना सुना

पदगायन 

जोहार 

जोहार मायबाप जोहार ।

तुमच्या महाराचा मी महार ॥१॥

बहु भुकेला जाहलों ।

तुमच्या उष्टयासाठीं आलों ॥२॥

बहु केली आस ।

तुमच्या दासाचा मी दास ॥३॥

चोखा म्हणे पाटी ।

आणिली तुमच्या उष्टयासाठीं ॥४॥

पत्र,

माझें पत्र धन्याला । वैकुंठवासी नांदतो त्याला । असा धनी माझा भला । माझ्या पूर्वजांचा उद्धार केला ॥ १ ॥

भक्त संकटीं रक्षिला । मजवर फार उपकार केला । तडीतापडी धांवून आला । पत्राचा मजकूर त्यानें पाहिला ॥ २ ॥

संकट पाहूनि भला बोध केला । चार खाणी नऊ दरवाजे । दश इंद्रियें हाच बोध केला ॥ ३ ॥

भुक्ति मुक्ति शक्ति मजपाशीं ठेविल्या । ऐसे चार वेद वर्णी । एका जनार्दन वाणी ॥ ४ ॥

बागुल,

निज निज बाळा दारी बागुल आला.

भालदार,चोपदार इ.असा होता

अलीकडील काळात सर्व भारूड मंडळांनी आपल सादरीकरण बदललं आहे गण, मुजरा, गवळण रंगबाजी असा तमाशा प्रमाणे बाज केला आहे.हे अतिशय वाईट आहे) परंतु काळाप्रमाणे चालावेच लागते. हेही मात्र तितकेच खरे.

आजही गोहे ता.आंबेगाव येथील वाघेश्वर कलापथक मंडळ, कमलजादेवी कलापथक मंडळ नायफड सरेवाडी तालुका खेड, श्री भैरवनाथ कला नाट्य देवतोरणे अशी नामांकित कला नाट्य मंडळ अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. ही नक्कीच आनंदाची बाब आहे. महाराष्ट्राची लोककला असलेले कला नाट्य जिवंत ठेवणाऱ्या या कलाकारांचा महाराष्ट्र शासनाने गौरव केला पाहिजे. व समाजानेही कला नात्याला प्रोत्साहन दिले पाहिजे हे काळाची गरज आहे. कला व नाट्य पथकाचे सर्वेसर्वा विठ्ठल शिंगाडे मच्छिंद्र बांबळे हे कला नाट्य टिकवून ठेवण्यासाठी करीत असलेले प्रयत्न हे खरोखरच कौतुकास्पद आहे. 

जात्यावरच्या ओव्या.

मायबापानं देल्ल्या लेकी,

वाटच्या गोसायाले
नित पलंग बसायाले

मायबापानं देल्ल्या लेकी,

     नाही पाहिली जागाजुगा
     लेक लोटली चंद्रभागा

३)  मायबापानं देल्ल्या लेकी,
     नाही पाहिले घरदार
     वर पाहिला सुंदर

४) आली दिवाळी दसरा,
     मी माहेरा जाईन
     बंधु-भावाले ओवाळीन

५) माझं जातं पाटा आहे,
    जन्माचा इसरा
    मला भेटला भाग्यवंत सासरापू

पुर्वी स्रिया रोज पहाटे जात्यावर दळण दळायच्या. जात्यावर दळता दळता रोज पहाटे अतिशय सुंदर अशा जात्यावरच्या ओव्या गायल्या जायच्या. या ओव्या ऐकताना फार फार समाधान वाटायचे.ओव्यांच्या या सुंदर निनादाने मनुष्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळायची.

अगदी सकाळी सकाळी भाद्रपद अश्विन महिन्यात लांब कुठेतरी रानात, नदीच्या किंवा ओढ्याच्या खळखळणाऱ्या पाण्याच्या कडेला बसून गुराखी अतिशय सुंदर असा असा पावा वाजवायचा. या पाव्याचा सूर दूरवरून येताना. असा काही कानांना गोड वाटायचा की ऐकून मन तृप्त व्हावे. या सुरांनी ग्रामीण भागातील लोकांची सकाळ अगदी प्रसन्न होऊन जायची. लोक ताजा दमाने काम करायला सिद्ध व्हायचे.

लग्नकार्यात  हळदीची गाणी ,लग्नाची गाणी, जो विधी केला जातो चुच करणे, देवक बांधणे, देवक आणनें, रुखवत, गडंगनेर, नवरदेव बसकावर बसवणे अशा प्रत्येक वेळी त्या त्या विषयाची अर्थपूर्ण गाणी म्हटली जायची. हे सर्व गाणी ऐकायला खूप अशी गोड होती. ही गाणी ज्यावेळेस म्हटले जायची त्यावेळी लग्नाची खुमारी अजूनच वाढायची. व वातावरण लग्नमय होऊन जायचे. त्यावेळी लग्न चार चार दिवस चालत असत.

ग्रामीण भागात विविध सणावारांना विशेषता पावसाळ्यातील सण. श्रिया फुगडी खेळता खेळता फुगडीची गाणी सुद्धा उत्तम प्रकारे म्हणत असत.(दोरा बाई दोरा, एका हाताची फुगडी, राहीबाईचा कोंबडा, फु फु  फुगडी फु इत्यादी) हे सर्व ऐकायला एक वेगळाच आनंद मिळायचा.

फुगडी

फू बाई फू फुगडी चमचम्‌ करतीया बुगडी !

पाट बाई पाट चंदनाचा पाट

पतीदेव बघत्यात माडीवर वाट

 बारा घरच्या बायका एक जागी मिळू या

चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या !

लेक बोलते लाडकी घरी गोकूळ साजणी

वसुदेव देवकीचा कान्हा खेळतो अंगणी

बाळ नवसाचा माझा त्याची दृष्ट काढू या

चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या !


घुमु दे घागर घुमु दे खेळात जीव ह्यो रमु दे

गडनी घागर फुकतीया, मागं नि म्होरं झुकतीया

नाचून बाई माझी दमू दे, खेळात जीव ह्यो रमू दे

घुमु दे घागर घुमु दे !


आंबा पिकतो रस गळतो

कोकणचा राजा झिम्मा खेळतो.

झिम पोरी झिम कपाळाचा भीम

भीम गेला फुटून पोरी आल्या उठून

सरसर गोविंदा येतो. मजवरी गुलाल फेकीतो

या या झिम्मा खेळाया

आमच्या वेण्या घालाया.

एक वेणी मोकळी

सोनाराची साखळी.

घडव घढव रे सोनारा.

माणिकमोत्यांचा लोणारा.

लोणाराशी काढ त्या

आम्ही बहिणी लाडक्या.


एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू

दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू

तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू

चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू

 

पाचा लिंबाचा पानोठा

माळ घालू हनुमंता

हनुमंताची निळी घोडी

येता जाता कमळे तोडी

 

कमळाच्या पाठीमागे लागली राणी

अग अग राणी इथे कुठे पाणी

पाणी नव्हे यमुना जमुना

यमुना जमुनाची बारीक वाळू

तेथे खेळे चिल्लार बाळू

चिल्लार बाळाला भूक लागली

निज रे निजरे चिलार बाळा

मी तर जाते सोनार वाडा

 

सोनार दादा सोनार दादा

गौरीचे मोती झाले का नाही

गौरीच्या घरी तांब्याच्या चुली

भोजन घातले आवळीखाली

उष्ट्या पत्रावळी चिंचेखाली

पान सुपारी उद्या दुपारी


कीस बाई कीस दोडका कीस

दोडक्याची फोड लागते गोड

आणिक तोड बाई आणिक तोड

कीस बाई कीस दोडका कीस

माझ्यान दोडका किसवना

दादाला बायको शोभना

कीस बाई कीस दोडका कीस

 

नाच ग घुमा कशी मी नाचू

या गावचा त्या गावचा कसर नाही आला

बांगड्या नाही मला कशी मी नाचू

नाच ग घुमा कशी मी नाचू

या गावचा त्या गावचा सोनार नाही आला

पातल्या नाही मला कशी मी नाचू

नाच ग घुमा कशी मी नाचू

 

या गावचा त्या गावचा माळी नाही

आला वेणी नाही मला कशी मी नाचू

नाच ग घुमा कशी मी नाचू

या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला

चोळी नाही मला कशी मी नाचू

नाच ग घुमा कशी मी नाचू

 

खुंटत मिरची जाशील कैशी

ई बोलवते ह्याबर करिते

बाबा बोलावतात ह्याबर करितात

सासू ओलाविते ह्याबर करिते

सासरा बोलवितो ह्याबर करितो

बाल बोलविते 

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिलाच सण. या सणाची स्त्रिया आतुरतेने वाट पाहायच्या. नागपंचमीच्या सणाची गाणी, झोक्यावर ची गाणी ही सुद्धा ग्रामीण भागात एक अपूर्व पार्वणीच असायची.

पावसाळ्यात भात लावून झालेले असायचे. वेळोवेळी पडणाऱ्या पावसामुळे भाताचे तुरे वाऱ्याबरोबर डोलायचे. निंदणी सुरू व्हायची. शेतातील अतिरिक्त गबाळ (तण) काढून टाकावे लागे.अशावेळी गावातील अनेक स्त्रिया एकत्र येत. व प्रत्येकाचे शेतातील निंदणी करावयाचे काम चालू होई. यासाठी लोक भलर हा ग्रामीण कार्यक्रमाचे आयोजन करत. शेतीची कामे करता करता. एक माणूस भलरगीत म्हणायचा. त्याच्यामागे काम करता करता स्त्रिया गाणी म्हणायच्या. बांधावर एक माणूस ढोल वाजवायला असायचा. अशावेळी ही भलर गीत गाता गाता कामाचा उरक देखील प्रचंड वेगाने व्हायचा. व मानसिक आनंद व्हायचा. ही भलर गीते ऐकताना शिवारात एक वेगळाच निनाद घुमायचा. आणि भलंर गीते ऐकताना मन प्रसन्न व्हायचे.

भल्लर

आगं चाल चाल साळुबाई गं, साळी निंदायला जाऊ


आगं साळी निन्ता-

निन्ता, तिथं घावला ससा,

अगं सशाचा रसा, अन् लागतो कसा,

चावट/येडगळ बाम्हण गं, मेला/मला पुसतो कसा.

रामा हो, रामा, रामा.

रामाच्या बागामधी, हो बागामधी,

चाहूर मोटा दोही, हो मोटा दोही,

कोण हाकीतो हौशा धनी हो, हौशा धनी,

संत्र्याला जातं पाणी हो, झुळझुळवाणी


नवरा बायकोची जोडी,

काढिती जवारी, हात उचला राया

मी म्हणंते भलरी,

अगं तुझी माझी जोडी, बघतो सारा गाव

तू माझी मस्तानी, मी तुझा बाजीराव.


घे भलरी घे, भलरी घे ,भलरी घे

घे भलरी घे, भलरी घे ,भलरी घे

घे गड्या घे भलरी घे

आर घे गड्या घे भलरी घे

म्हणू का नको म्हण म्हण गड्या

आर म्हणू का नको म्हण म्हण गड्या -

भलरी दादा,भलरी दादा,

म्हाताऱ्या राजाची म्हातारी राणी

काळया आईला मोटचं पाणी

मोटच्या पाण्याव चांदाच रूप

चांदाच्या रूपाव कशाची कळी, कशाची कळी, कशाची कळी

म्हाताऱ्या राणीच्या गालाची खळी -२

म्हणू का नको म्हण म्हण गड्या -२

भलरी दादा, हा ssss

कसं भुललं शिवार रानच्या गारव्याला

कोडं सुटता सुटना डोळ्याच्या ग पापणीला

पीक फुलोरा फुलोरा डोहाळा सुगीचा लागला

पिंगा घालतोया भुंगा नाद मोहराचा लागला

कसं इरलं आभाळ ssss

कसं इरलं आभाळ , डोंगराच्या दरीला

कोडं सुटता सुटना डोळ्याच्या ग पापणीला

हु हु हू हु हू

झुलतोया झुलतोया

झुलतोया वाऱ्यासंग येल गोंदणीचा

कसा पाण्यामंदी गेला बाई तोल पारंबीचा

दिस सरला सरला,भर नवतीला आला

लाज आली गालावर,पदर केसराचा झाला

आला पिरतीचा उबाळा हो sss

आला पिरतीचा उबाळा वारा चाटी धरणीला

कोडं सुटता सुटना डोळ्याच्या ग पापणीला-२

घे गड्या घे भलरी घे -२

म्हणू का नको म्हण म्हण गड्या -२

भलरी दादा, हे भलरी दादा, हा भलरी दादा

पाळणा गीत

गावात एखादे मूल जन्माला आले व त्याचा पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम असेल तर त्या दिवशी बाळाच्या आईला प्रचंड आनंद व्हायचा. त्याची एक वेगळीच तयार केली जायची. पूर्वी पाळणे हे मेस काठी पासून बनवले जायचे. पाळणा तयार करणारा माणूस हा कसबी कारागीर असायचा.

पाळणा विणण्याच्या बदल्यात त्याला रीवाजाप्रमाणे शिधा दिला जायचा. ( विशिष्ट धान्य ) काही श्रीमंत लोकांकडे लोखंडाचा पाळणा असायचा. व त्याला रेशमाची दोरी असायची. दुपारी अकरा साडे अकराच्या वेळी गावातील संपूर्ण स्त्रिया त्या घरात जमा व्हायच्या. पोक्त स्त्री बाळाचा पाळण्यात घालण्याचा सर्व विधी रितीरिवाजानुसार करायची. त्यानंतर विविध गाणी गायली जायची. स्त्रियांच्या या गजबजाटाने घर निनादून जायचे. त्यानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम व्हायचा. मिठात उकडलेले गहू किंवा इतर पदार्थ सर्वांना वाटले जायचे.

या कार्यक्रमाने वातावरण एकदम आनंदी आनंदी व्हायचे.

गोकुळाष्टमीला सुद्धा असाच प्रकार गावातून व्हायचा.

मंगळागौरीची गाणी ही सुद्धा महाराष्ट्राला मिळालेली फार मोठी देणगी आहे. संगीतकार राम कदम यांनी ती संकेत बद्ध केल्यामुळे आजही ऐकायला ती  पूर्वी इतकीच  गोड वाटतात.

मंगळागौरीची गाणी 

पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा !

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, रात जागवली पोरी पिंगा !

फेटा बांधल्याला भाऊ माझा ग जावई तुझा ग पोरी पिंगा

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, झोप चाळिवली पोरी पिंगा !

शालू नेसल्याली भैन माझी ग सून तुझी ग पोरी पिंगा

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मागं घालिवली पोरी पिंगा !

भाऊ माझा ग, तो ब राजा ग, अग जा जा ग पोरी पिंगा

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मला बोलिवली पोरी पिंगा !

माझी ग लेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा !

तुझ्या भैनीचं नाक नकटं ग त्वांड चपटं ग पोरी पिंगा

माझ्या भावाचा भारी दरारा पळती थरारा सारे पिंगा !

भाऊ तुझा ग भितो झुरळाला, काळ्या उंदराला पोरी पिंगा

भैन माझी ग जशी कोकिळा गाते मंजुळा पोरी पिंगा !

तुझ्या भैनीचं काय नरडं ग कावळं वरडं ग पोरी पिंगा

अशा भैनीला कोण आणणार कशी नांदणार पोरी पिंगा !

भैन माझी ग जाई बावरून घेई सावरून पोरी पिंगा

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं, लुगडं नेशिवलं पोरी पिंगा !

सोनार दादा सोनार दादा

गौरीचे मोती झाले का नाही

गौरीच्या घरी तांब्याच्या चुली

भोजन घातले आवळीखाली

उष्ट्या पत्रावळी चिंचेखाली

पान सुपारी उद्या दुपारी

श्रावण महिना ग्रंथ पारायण 

ग्रामीण भागात श्रावण महिन्यात खूप वृत्त वैकल्य चालायची. गावातील दोन-तीन घरी नवनाथ, हरिविजय, भक्ती विजय पारायण चालायचे. रात्री लवकरच जेवणे आटोपून लोक व स्त्रिया पारायण ऐकण्यासाठी जायचे. पारायण समाप्तीच्या दिवशी खूपच गर्दी असायची. पारायण समाप्ती व सत्यनारायणाची पूजा झाल्यावर दारातून लोकांच्या जेवणासाठी पंगती बसायच्या.आमटी भात व शाक भाजी खाताना लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच समाधान दिसायची. या जेवणाला एक वेगळीच लज्जत असायची.

श्रावण महिन्यात लोक उपास तपास करायचे. रोज संध्याकाळी उपास सोडायला  आळुच्या वड्या,कोथींबीरीच्या वड्या, गहूल्यांची खीर, तांदळाची खीर, शिरा, मासवड्या, पुरणपोळ्या, भजी असे नानाविध  ग्रामीण ढंगाचे रुचकर पदार्थ असायचे. 

श्रावण भाद्रपद महिन्यात नदी नाले,ओढे नाले दुथडी भरून वाहायचे. ऊन पावसाचा खेळ चालायचा.कधी कधी इंद्रधनु दूर कुठेतरी दिसायचे.ओढ्या नाल्यातील फेसाळत जाणारे पांढरे शुभ्र चकचकीत  पाणी डोळ्यांना एक सुखवणारे नवचैतन्य देऊन घोड्यासारखे धावत राहायचे. रानातील फुलणारी रानफुले विविध रंग उधळीत निसर्गाची शोभा वाढवायचचे. कळलावी,कोंबडा,गोवराई,तेरडा, रान झेंडू, आणि ती गवतातील पिवळी फुले उधळण करायची. अगदी निसर्गातील रंगपंचमीच साजरी व्हायची.ग्रामीण भागातील हा नजरांना पाहताना मन फुलून जायचे. विशेषतः श्रावण भाद्रपद महिन्यात गावरान काकडीचे बोटा एवढे कळे खाताना एक वेगळाच आनंद व्हायचा. माफ करा थोडे विषयांतर झाले.

पूर्वी प्रत्येक गावात एकतारी भजन असायचे. एखादी पखवाद, विना, टाळ व चिपळ्या यांच्या साथीत एकतारी भजने म्हणली जायची. परंतु त्यावर नंतर आलेला संगीत प्रकार यामध्ये मात्र पायपेटी, हार्मोनियम, टाळ, चकवा, घुंगुर काठी असे अनेक प्रकार अस्तित्वात आले. भजनाची सुरुवात अलंकापुरी ने होते. त्यानंतर अभंग, गवळण, गजर, दिंडी, पद, असे भजनात अनेक प्रकार असतात. भजन ऐकायला अतिशय गोड असते. ग्रामीण भागात जेवण खाणं झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जायचा. रात्री दिड, दोन वाजेपर्यंत भजन म्हटले जायचे. दोन वेळा चहापाणी व्हायचा. भजन ऐकताना एक वेगळाच आनंद व्हायचा.त्यावेळी वेगवेगळ्या भजनी लोकांच्या बद्दल  लोक तासंतास गप्पा मारायचे. लोक गावाचे नाव राखण्यासाठी भागत कसे चांगले होईल याचा विचार करायचे.

पूर्वी काही गावांमध्ये लेझीम पथके सुद्धा असायची. प्रत्येकाच्या हातात लेझीम असायचे. एक जण ढोल वाजवायला असायचा. त्यांचा एक मास्टर असायचा.तो सगळ्यात पुढे असायचा. त्याच्या हातात शिट्टी असायची. तो जसा खेळ करेल त्याप्रमाणे खेळ व्हायचा. लेझीम पथकात अनेक खेळाचे प्रकार व्हायचे. लेझीम पथकाचे खेळ पाहताना डोळ्यांचे पारणे भेटायचे. डेहणे येथील सोळशेवाडीचे लेझीम पथक फार प्रसिद्ध होते.

याच वेळेस अनेक गावांमध्ये हाड मोडल्यानंतर हाड बसवणारे लोक, बैलाच्या खुरातील काटा किंवा दगडाचा खडा काढणारे लोक,अंगात दिवा आणणारे लोक, दातातील कीड काढणारे लोक, दृष्ट काढणार्या स्रिया, रानात प्राण्यांची शिकार करणारे शिकारी, झाडपाल्याचे औषध देणारे लोक पाट्या, टोपली, कणंग, दुरडी, शिंके, बनवणारे लोक, झाडाच्या तागापासून  चऱ्हाट, रस्सी,कासरा बनवणारे लोक, झाडाच्या पानापासून पत्रावळी बनवणारे लोक असे अनेक कला जोपासणारे लोक गावात गावात होते.

त्यावेळेस ग्रामीण भागात कलेला खूपच वाव होता. या सर्व कला महाराष्ट्रीयन व अस्सल ग्रामीण बाजाच्या होत्या.कला जोपसणारी माणसे होती. व कलेची पारख करणारे कलेची कदर करणारे  लोक होते. त्यामुळे या कला भरभराटीला आली. 

परंतु आता या सर्व कला आपल्या सर्वांसमोर लोप पावत चालल्या आहेत. हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. हेच आपले दुर्दैव म्हणावे लागेल. तेव्हा महाराष्ट्रातील तमाम रसिकांनी कला नाट्य ही संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

रामदास तळपे 



.

संजय नाईकरे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशान











 संजय नाईकरे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशान 

माझा एक एक पुत्र जगी लाख जागी उभा

त्यांचं तेज केसरिया रवी न्याहाळितो आभा ! 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारापाटी कमान या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक संजय नाईकरे यांच्या कवितांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आज अरण्यषष्ठीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. या प्रकाशन समारंभासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सांगली जिल्ह्यातील गुरुवर्य प्रा. भगवानराव यादव व मुंबई येथील ज्येष्ठ कवी रावसाहेब ठाणगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.



चासकमान धरणाच्या जलाशयामध्ये बुडालेल्या कर्मवीर विद्यालय, वाडा या शाळेत सुमारे बेचाळीस वर्षांपूर्वी सेवेत असलेले प्रा. भगवान यादव हे संजय नाईकरे यांचे आवडते गुरुवर्य. गुरु शिष्याचे हे नाते काळाच्या प्रदीर्घ ओघातही कसे टिकवून ठेवता येते आहे.याची प्रचिती आभा या काव्यसंग्रहामध्ये अनुभवावयास मिळते. 

अशाच चार गुरुजनांच्याबद्दलच्या कृतज्ञता पर कवितांचा ही या संग्रहात समावेश आहे. योगायोगाने आज या चार गुरुजनांचा वाढदिवस देखील होता. त्यानिमित्ताचे औचित्य साधून संजय नाईकरे यांनी आपल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन केले.

ज्येष्ठ कवीवर्य साहेबराव ठाणगे, सुप्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे व प्रा.भगवान यादव व अन्य बारा मान्यवरांनी मखमली कापडात गुलाब पाकळ्यांनी सुशोभित केलेल्या आभा काव्यसंग्रहाचे पंचायत समिती खेड येथील राजा शिवछत्रपती सभागृहामध्ये शानदार सोहळ्यात प्रकाशन केले. 

यावेळी संजय नाईकरे यांनी चारशे वर्षांपूर्वीची लाकडी समई,शेत पेरणीची शंभर वर्षे जुन्या काळातील पाभारीची ज्वारी बाजरी हरभरा शेंगदाणा पिकांची वेगवेगळी लाकडी चाडी, शंभर वर्षे जुन्या काळातील बैलांच्या गळ्यातील अस्सल चामड्याच्या घुंगूरमाळा, बैलांच्या गळ्यातील कांस्य धातुचे साखळी गोफ आणि बाजरीच्या कणसांनी भरलेल्या हिरव्या ताटांची केलेली प्रतिकात्मक पूजा आणि सजावट हे आजच्या समारंभातील एक आगळं वेगळं आकर्षण वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 



पीक पेरणी व पाऊस शेती यांवर आधारित कविता सादर करण्यासाठी राज्यभरातील सुमारे शंभर हून अधिक कवी व कवयित्री यांनी हजेरी लावली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.एक भाकरी तीन चुली चे प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड यांनी या काव्यसंग्रहाला अभिप्राय दिला असून डॉ राजेश बनकर यांनी शुभसंदेश दिला आहे.

आदर्श शिक्षिका वैशाली मुके यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे.तर मुखपृठ संकल्पना विश्वराज नाईकरे यांनी साकारली आहे.संजय नाईकरे यांच्या 'आभा' आणि 'नवं पीक नवी आशा' या कवितांनी सभागृह जिंकून घेतले. गुरू म्हणून जे भाग्य मला ईश्वराने दिले, लक्ष लक्ष कोंदणाचे आज अर्पितो चांदणे दिव्य प्रभावळ कवितेतील ओळींना ही सभागृहाने भरभरून प्रतिसाद दिला. 

अमेरिकेतील फ्लोरिडा,टेक्सास आणि ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातून या पुस्तकाला शंभराहून अधिक प्रतींची प्रकाशन पूर्व मागणी आलेली आहे या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध कवी हनुमंत चांदगुडे,आमचा दादा लाखात एक व देवमाणूस या लोकप्रिय मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते दत्ता उबाळे अविनाश कोहिणकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी लक्ष्मण वाळुंज (काहूर कार), तुषार वाटेकर (सभापती),नंदकुमार मांदळे(कवी) तुकाराम बोंबले राजेंद्र सांडभोर), भाऊराव आढाव (कवी),सदाशिव अमराळे (पत्रकार) बी के कदम (माजी पंचायत समिती सदस्य),प्रतिभा जोशी (पिंपरी चिंचवड),बाबासाहेब गायकवाड कवी, मधुकर गिलबिले लेखक व ग्रामीण संस्कृती चे सिद्धहस्त लेखक रामदास तळपे आणि मोठ्या संख्येने रसिक राजगुरुनगरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संतोष गाढवे यांनी केले तर स्नेहल भोर यांनी प्रभावी सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची उंची वाढवली.कवी बाबाजी शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.




महादेव कोळी समग्र इतिहास

महादेव कोळी समग्र इतिहास

महादेव कोळी जमात प्राचीन काळी महादेव कोळी  या डोंगराच्या रांगात राहत असावी असे म्हटले जाते.तेथून ते बालेघाटाच्या रांगा ओलांडून गुजरात मध्ये आले.गुजरात मधील डांग भागात बरीच शतके राहिले असावेत. कारण महादेव कोळ्यांची मूळ भाषा ही डांगानी होती.

गुजरात मधील डांग भागाच्या जंगलात आणि कडेकपारीत राहिल्यानंतर तिथून हळूहळू नाशिक,त्र्यंबकेश्वर,अहमदनगरचा पश्चिम भाग,पुणे जिल्ह्याचा पश्चिम भागात ते डोंगरदऱ्यामध्ये राहू लागले.

महादेव कोळ्यांच्या जमातीला स्थलांतर करणे हे पाचवीलाच पुजले होते.

अनेक महादेव कोळी या भागात कायमस्वरूपी राहिल्यामुळे आजही त्रिंबकेश्वर,अकोले, भागात गावाकडे डांगानी भाषा बोलली जाते. व जुन्नर आंबेगावच्या ग्रामीण भागात अजूनही त्या भाषेचे प्राबल्य दिसून येते.

असे असतानाही अनेक महादेव कोळ्यांची भटकंती ही 18 व्या शतकाच्या मध्यापर्यंत अशीच चालू होती. १८५० नंतर ते ठीक ठिकाणी स्थायिक झाले.

जुन्नर तालुक्याचा पश्चिम भाग,आंबेगाव तालुक्याचा पश्चिम भागात अनेक महादेव कोळी हे साधारण 12 व्या शतकात आले असावेत.असा अंदाज आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील व मावळ तालुक्याच्या पश्चिम भागातील महादेव कोळी हे जुन्नर,आंबेगाव तालुक्यांच्या या पश्चिम भागातुन साधारण अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरित झाले आहेत.

आजही आपण पाहतो की कातकरी समाज हा आजही स्थलांतर करतो एखाद्या गावाच्या डोंगरावर, किंवा नदीकाठी फार तर दोन ते तीन वर्षे राहून तो दुसऱ्या गावाकडे स्थलांतर करत असतो.अगदी असेच स्थलांतर पूर्वी महादेव कोळी करत होते.

त्या काळात ठिकठिकाणी एक दोन घरे करून, डोंगरामध्ये पाणी असलेल्या ठिकाणी महादेव कोळी हे वस्ती करून राहत होते. त्यावेळी गावाची निर्मिती झाली नव्हती.अनेक गावांची निर्मिती ही अगदी अठराव्या शतकाच्या पूर्वर्धात झालेली आहे.

जुन्नर ही यादवांची राजधानी असल्यामुळे जुन्नर ही मोठी बाजारपेठ होती.काही महादेव कोळी जुन्नर सारख्या बाजारपेठेत काही जीवनावश्यक वस्तूंची ने आण करण्यासाठी येत असल्यामुळे व तेथील लोकांच्या सानिध्यात आल्यामुळे थोडीफार त्यांच्यात प्रगती झाली.आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्याशिवाय यादवांच्या काळात घाटघर मार्गे कोकणात व्यापार केला जात असल्याने त्याचाही फायदा महादेव कोळ्यांच्या जडणघडणीत झाला असावा.

काही महादेव कोळी हे जुन्नरच्या पश्चिम भागातून सरकत सरकत आंबेगाव तालुक्याच्या व खेड तालुक्याच्या पश्चिम भागात स्थलांतरित झाले. तेथेही आंबेगाव ही जुनी बाजारपेठ असल्यामुळे तेथील महादेव कोळी लोक स्थानिक लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत बदल होऊन  ठिकठिकाणी गावे वसण्यास मदत झाली.

असे असले तरी महादेव कोळ्यांच्या रूढी, परंपरा, देव देवता, सण व वार, यामध्ये कोणताही बदल झाला नाही. त्या रीती, रिवाजाप्रमाणे पुढे चालूच राहिल्या. हे उल्लेखनीय म्हणावे लागेल.

राहणीमान 

महादेव कोळी हे सतत स्थलांतरित करीत असले तरी ते कायमच जंगलाच्या पायथ्याशी, डोंगरदऱ्यात पाणी असलेल्या ठिकाणी अगदी दोन,दोन घरांची वस्ती करून राहत असत. मोठ्या संख्येने वस्ती करून ते कधीही राहिले नाहीत. 

त्यावेळी पुरुष लज्जा रक्षणासाठी लंगोटी वापरत असे. व डोक्याला पटका (फेटा) बांधत असे. हाच कायमस्वरूपी त्याचा वेश होता. तर स्त्रिया लुगड्याचा तीन हात तुकडा व स्वतःच  सुईने शिवलेली चोळी वापरत असे.

घरे 

महादेव कोळ्यांची घरी ही अगदीच छोटी असत. उपलब्ध असलेल्या दगडांचा वापर करून वाटोळे आकाराचे त्यांचे घर असे. त्यावर वासे व फोकाठ्या टाकून कड्याच्या ठिकाणी असलेल्या लांब गवताने त्यांचे घर शाकारत असत. त्यामुळे जोरदार पावसातही घरामध्ये पावसाचा एक थेंबही येत नसे. या घरामध्ये साधारण चार-पाच लोक मावतील एवढीच जागा असे. या घरांना केंबळाची किंवा कुहीटीची घरी असे म्हणत.

घरातील वस्तू 

महादेव कोळ्यांकडे घरामध्ये प्रामुख्याने दगडाची जाते, दगडाचा पाटा व वरवंटा, दगडाचे उखळ व खैराच्या लाकडाचे मुसळ, पीठ मळण्यासाठी लाकडाची काठवट, सूप, व इतर सर्व गाडगी मडकी असत. या गाडगे मडक्यामध्ये भात व कालवण शिजवत असत.भाकरी सुद्धा मातीच्या भांड्यातच भाजली जात असे. काही लोक भाकरी करून पाट्यावर वाटलेल्या मिरची बरोबर पाट्यावरच खात असत. 

याचा अर्थ महादेव कोळी येत्या काळातही चांगल्या प्रकारचे कारागीर होते हे लक्षात घेतले पाहिजे. कारण दगडाची जाती, पाटा वरवंटा, लाकडाची काठवट, उखळ व मुसळ इत्यादी दगडाच्या व लाकडाची वस्तू त्यांना अत्यंत सुबक अशा बनवता येत होत्या हे मान्य करावे लागेल.

स्थलांतर करताना या सर्व वस्तू घेऊन त्यांना पुढील ठिकाणी जावे लागत असे.

 स्थैर्य 

इंग्रजांच्या काळात महादेव कोळ्यांना ते राहत असलेल्या ठिकाणी जमिनी देण्यात आल्या. त्यांच्या नावावर करण्यात आल्या. त्यामुळे महादेव कोळी समाजाला त्या ठिकाणी एक प्रकारे स्थैर्य मिळण्यास मदत झाली.

जमिनी कसत असताना त्यांना बैलांची गरज भासली. त्यामुळे बैलाबरोबरच ते गाई पाळू लागले. सोबतीला कोंबड्या चितड्या आल्याच. शेतजमिनी कसू लागल्यामुळे व दूध दुभते आल्यामुळे बऱ्यापैकी त्यांच्याकडे असलेल्या साहित्याची विक्री होऊ लागली. त्यामुळे अनेक लोकांकडे लोखंडी तवा, तांब्या पितळेची भांडी, सोन्या चांदीचे दागिने घेण्याचे ऐपत निर्माण झाली.

गळ्यांनाच चांगल्या प्रकारचे जमिनी मिळाल्या असे नाही. काहींना अगदी वरकड दगड धोंडे असणाऱ्या जमिनी मिळाल्या. त्यामध्ये शक्यतो काहीच पिकत नसे.परंतु असे असले तरी जवळजवळ 90 टक्के लोक भूमिहीनच होते. त्याचवेळी महादेव कोळ्यामध्ये सुद्धा बळी तो कान पिळी ही पद्धत सुरू झाली.अनेक लोक नदीकडेला सखल असलेल्या किंवा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कसदार जमिनीच्या मालकाकडे मजूर म्हणून काम करू लागले. 

हळूहळू महादेव कोळ्यांची वस्ती वाढू लागली व त्याचे रूपांतर गावांमध्ये झाले. काही गावांचे रूपांतर भागांमध्ये झाले. आणि त्यामधूनच अनेक गावांमध्ये इंग्रजांच्या काळात तालेवर असलेल्या माणसाला पाटीलकी मिळाली.

कायमस्वरूपी शेत जमिनी मिळाल्यामुळे लोक हळूहळू शेती करू लागले. त्यासाठी गाईगुरे, बैल यांचे पालन केले गेले. परंतु ही शेती अतिशय निकृष्ट दर्जाची व डोंगरदऱ्यात असल्यामुळे भात पीक, नाचणी, सावा, खुरासनी, इत्यादी पिके घेऊ लागले

शेती व्यवस्था

महादेव कोळी हे प्रामुख्याने डोंगर उतारावर राहत असल्यामुळे डोंगर उतारावरील खोट्या वनस्पती तोडून त्याची लाकूड व पालापाचोळा त्याच ठिकाणी ठेवून कालांतराने पेटवून दिला जात असे. यालाच दळे करणे असे म्हणतात. डोंगर उतारावर असे अनेक दळी असत. पेटवून दिलेली जमीन व्यवस्थित साफ करून त्या ठिकाणी बैलांच्या सहाय्याने नांगरत असत.

पावसाळ्यात नाचणीचे रोप लावून, भात लावणी झाल्यानंतर श्रावण महिन्यात नाचणीची आणि सावा यांची लावणी केली जात असे.

नदीच्या कडेला व जंगलाच्या पायथ्याशी आणि माळरानावर काही सकल भागात प्रामुख्याने भात शेती केली जात असे. अजूनही करतात. त्यावेळी उत्कृष्ट असे चवदार भाताचे वाण महादेव कोळ्यांनी तयार केले होते. तामकुडा,जीर, खडक्या, रायभोग,अशा अनेक भाताच्या जाती विकसित केल्या होत्या.

रब्बी हंगामात ते हरभरा, मसूर व वाटाणा ही पिके घेत असत. तर घरा पाठीमागील वाडग्यात केव्हा इतर ठिकाणी रताळी, अळवड, डांगर भोपळे, काकडी, घेवडा, कारली व दोडका या भाज्या लावत असत.

रानभाज्या व कंदमुळे 

त्या काळात अनेक रानभाज्यांचा शोध महादेव कोळ्यांनी लावला. त्या आजही तितक्याच चविष्ट व आरोग्यदायक आहेत.

त्यापैकी चाव्याची भाजी, चाव्याचा बार, कुर्डूची भाजी, चिलूची भाजी, कवदरीचे सोंडगे, भोकराची भाजी, फणसाची भाजी, तेऱ्याची भाजी, सायरी च्या फुलांची भाजी, अशा अनेक भाज्या प्रचलित झाल्या.

कंदमूळ पैकी रताळी, चाव्याचा कंद,अनुवाचा कंद, आळवडीचा कंद,हळंदे व पंधे इत्यादी कंदमुळे ऋतुमानानुसार भाजून किंवा शिजवून खात असत. हे कंदमुळे आजही तितकेच प्रसिद्ध आहेत. यांना सध्या खूप मागणी आहे.

शिकार

 महादेव कोळी हे प्रामुख्याने मोठ्या प्राण्यांचे शिकार करत असत. रान डुकरे, भेकर, ससे, साळींद्र, व लांडोर यांची शीकार करत असत. ते कधीही लहान प्राणी व पक्षी यांची शिकार करत नसत. त्यांच्याकडे हाडबे हे हत्यार असे. छोट्या बांबूला दोन्ही बाजूला धार असलेले नांगराच्या फळासारखे लोखंडी शस्त्र बसवलेले असे. कातकरी व भिल्ल हे शक्यतो छोट्या प्राण्यांची आणि पक्षांची शिकार करत असत. म्हणून त्यांच्याकडे गिलवर, आणि तीर कामठा ही छोट्या प्राण्यांना मारण्यासाठी ची हत्यारे असत. जी महादेव कोळ्यांकडे नसत. यावरून महादेव कोळी छोट्या प्राण्यांची किंवा पक्षाची शिकार करत नसावेत हे स्पष्ट होते.

औषधी वनस्पती 

महादेव कोळ्यांना त्या काळात अनेक औषधी वनस्पतींची माहिती होती. त्यापैकी हाडसांधी,कुर्डूचे बी, दगडाचा पाला, कात्री निरगुड, कुळसुन्याच्या मुळ्या, अर्जुन सादड्याची साल अशा अनेक वनस्पती औषधी वनस्पती म्हणून प्रसिद्ध झाल्या.

पंचक्रोशीतील गावांमध्ये, मोडलेले हाड बसवणारा, अंगात देवाचे वारी येणारा, आजारी असलेल्या माणसाला वनस्पतींचे औषध देणारा वैद्य,विंचू अथवा सर्पदंश झालेल्या माणसाला औषध देणारा, गायक,कलाकार,वस्तू बनवणारे कारागीर असे अनेक लोक प्रसिद्धीस आले.

बदलती जीवनशैली 

पूर्वी लंगोटी नेसत असलेले बरेचसे लोक परगावी जाताना धोतर नेसू लागले. एवढाच काय तो बदल. परंतु शेतात पिकत असलेले धान्य त्यांना वर्षभर पुरत असल्यामुळे बऱ्यापैकी स्थिरता आली. परंतु सगळ्याच महादेव कोळ्यांना जमिनी मिळाल्या असे नाही. अनेक लोक भूमिहीनच राहिले त्यामुळे त्यांचे स्थलांतर हे चालूच होते. त्यांच्या जीवनशैलीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही. ज्यांना बऱ्यापैकी सुपीक जमिनी मिळाल्या होत्या. त्यांच्या मध्ये मात्र अमुलाग्र बदल झाला. त्यांची केंबळाची घरे जाऊन ज्योत्याची घरी आली

महादेव कोळ्यांची कारागिरी 

महादेव कोळी स्थायिक झाल्यानंतर व ते चांगल्या प्रकारे शेती करू लागल्यानंतर त्यांची कला व कारागिरी अधिकच विकसित झाल्याचे पाहायला मिळते.मेसाच्या बांबूपासून टोपली, पाट्या, दुरडी, हरे, कनंगी, तट्टया,सुप,लहान मुलांसाठीचे पाळणे, इत्यादी वस्तू ते उत्तमरीत्या करत असत.

ज्याप्रमाणे ते बांबू पासून वस्तू बनवतात त्याचप्रमाणे नदीकिनारी किंवा ओढ्या किनारी राहणारे  महादेव कोळी हे मासे पकडण्यासाठी मेसाच्या बांबू पासून बुडदूड, भोताड, इत्यादी वस्तू उत्तमरीत्या बनवत असत.

त्याचप्रमाणे घरे बांधण्यासाठी लाकडाचे खांब, तुळया व वासे, फळ्या, लाकडाचे बैल, लाकडाच्या बाहुल्या, तूप विकण्यासाठी लाकडी माप नवाटके व चवाटके, लाकडाची आधुली, लाकडाचा आठवा व नीठवा इत्यादी वस्तू सुद्धा अतिशय सुबक व कला कसुरीच्या बनवत असत.

त्याचप्रमाणे दगडी वस्तू म्हणजेच उखळ,जाते इत्यादी वस्तू ते सुरुवातीलाच बनवत होते. परंतु घराच्या ज्योत्याचे दगड, दगडाचा दिवा, इत्यादी सुद्धा ते बनवत असत. उत्तरोत्तर ही कला बहरत जाऊन विशिष्ट कलाकार उदयास आले. व पिढ्यानपिढ्या काही लोक व्यवसाय म्हणून ही कला जोपासू लागले.

महादेव कोळ्यांचे आकाश ज्ञान 

महादेव कोळ्यांना आकाशातील ग्रहताऱ्यांचे ज्ञान उपजतच अवगत असावे कारण ते पिढ्यान पिढ्या निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे त्यांना ते माहीत असावे.

हिंदू धर्मशास्त्रातील 27 नक्षत्र, पौर्णिमा व अमावस्या, महिने व वार हे त्यांना तोंडपाठ होते. सूर्यग्रहण व चंद्रग्रहण हे कधी होणार आहे याची सुद्धा त्यांना माहिती होती. आकाशात असणारी तीकांड, बाज,ध्रुवतारा, शुक्रतारा इत्यादींचे ज्ञान त्यांना होते. याचा पुरावा म्हणून मी एक उदाहरण देतो. 

माझी आजीचे 1990 च्या जून महिन्यात निधन झाले. त्यावेळी तिचे वय साधारण 90 असावे. म्हणजेच तिचा जन्म साधारण 1901 साली झाला असावा. माझ्या आजीला सर्वच्या सर्व 27 नक्षत्र तोंडपाठ होती. शिवाय पावसाळ्यात एका नक्षत्राला पंधरा दिवस दिलेले असतात. त्यावेळी कोणते नक्षत्र कधी सुरू होईल व कधी संपते याचीही माहिती होती. तसेच पौर्णिमा कधी आहे व अमावस्या कधी आहे हेही माहीत होते. विशेष म्हणजे ती पूर्णतः निरक्षर होती. मग याचा अर्थ तिला हे ज्ञान आले कसे?

म्हणजेच याचा अर्थ तिला तिच्या आई कडून हे ज्ञान आले असले पाहिजे. अशीच पिढ्यानपिढ्या हे ज्ञान पुढे पुढे चालू राहिले. म्हणजेच महादेव कोळ्यांना खूप पूर्वीपासून नक्षत्र तारे वार, निसर्गातील चमत्कार, इत्यादींची माहिती होती. हीच माहिती आर्यनी त्यांच्याकडून घेतली असावी. म्हणजेच महादेव कोळी हे आकाश ताऱ्यांचे उत्तम मार्गदर्शक होते हे निर्विवाद मान्य करावेच लागेल. त्याचप्रमाणे या वर्षात किती पाऊस पडेल. याचेही त्यांना ज्ञान होते.

कविता, कथा व लोकगीते 

महादेव कोळी रात्री मुलांना गोष्टी सांगताना प्रामुख्याने राजा, प्रधान व राक्षसांच्या गोष्टी सांगत असत. या गोष्टी या पिढीकडून पुढचे पिढी कडे येत गेल्या. व अगदी 80 च्या दशकापर्यंत त्या लोकमानसात अस्तित्वात होत्या. माझी आजी अनेक गोष्टी सांगायची त्यामध्ये या सर्व गोष्टी राजा व प्रधान, राक्षस, गुप्त होणारी माणसे, जंगलातील गुहा, प्राणी व पक्षी यांच्या असत. या गोष्टीमध्ये प्राणी व पक्षी माणसासारखे बोलत असत. यावरून या सर्व गोष्टी त्या काळातील लोकांनी रचलेल्या होत्या हे स्पष्ट होते. यामधून करमणुकीच्या साधनांचा जन्म झाला. 

त्याचप्रमाणे  त्यावेळी अनेक लोकगीते, व लग्न गीते, भल्लरी, पावसाची गाणी, शेतीची गाणी अस्तित्वात आली. हे सर्व महादेव कोळ्यांनी रचलेले होते हे स्पष्ट आहे. कारण त्यांच्या गाण्यात निसर्ग, शेतीवाडी, झाडांची नावे, तत्कालीन प्राण्यांची नावे व पक्ष्यांची नावे, ही कुठे ना कुठे येत होती. पुढे ही गाणी या पिढीकडून पुढच्या पिढीकडे वाटचाल करू लागली. ही गाणी कोणी लिहिली असावीत या कथा, गोष्टी व गाण्यांचे लेखक कोण असावेत हे मात्र इतिहासाला शोधता आले नाही. ही खेदाचीच बाब म्हणावी लागेल. याचा अर्थ महादेव कोळी हे जरी जंगलात राहत असले तरी आधुनिक आणि शास्त्रीय विचारात ते किती प्रगल्भ होते हे दिसून येते. मुख्य प्रवाहात तिने आल्यामुळे त्यांच्या कला व शास्त्र इतरांनी अवगत करून घेतले व त्यांचे नाव त्यांनी मोठे केले.

धर्मशास्त्र 

साधारण 15 व्या शतकापासून अनेक डोंगरावर महादेवाच्या पिंडी आहेत. या पिंडी त्या काळात महादेव कोळ्यांच्या कलाकारांनीच बनवलेल्या होत्या. व आजही त्या अस्तित्वात आहेत. त्या काळातील महादेवाच्या पिंडी, नंदी, वाघोबा इत्यादीच्या दगडी मूर्ती आजही आदिवासी कलेचा पुरावा देतात. म्हणजेच महादेव कोळी हे किती प्रगल्भ होते हेही दिसून येते.

अनेकांच्या शेतामधील त्यांच्या पूर्वजांची थडगी ही किती आखीव रेखीव व सुबक मूर्तीनी परिपूर्ण बनवलेली असत.

 त्याचप्रमाणे भैरोबा, काळभैरवनाथ, मुक्तार किंवा इतर असलेले देव यांच्या मूर्ती सुद्धा खूपच सुबक असत.आजही त्या मंदिरामध्ये अस्तित्वात आहेत. व आपण आजही त्यांची पूजा करतो.

आज अनेक लोक म्हणतात की आदिवासी निसर्ग पूजक आहेत. परंतु आदिवासी ही मूर्ती पूज्य सुद्धा आहेत. कारण शंकराचे पिंडी,भैरवनाथाच्या मूर्ती, वीर देव, वाघोबा, अशा अनेक मूर्ती महादेव कोळ्यांनीच घडवलेले आहेत. ठाकर आणि भिल्ल हे समाज जरी आदिवासी असले तरी त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. म्हणून महादेव कोळी हे मूर्ती पूजक सुद्धा होते हे मान्य करावे लागेल.

सोळाव्या शतकात रामदास स्वामींनी ठराविक गावामध्येच  रामाची आणि मारुतीची मंदिरे बांधून मूर्ती स्थापन केल्या. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे.परंतु यापूर्वी कोणत्याही गावात या मूर्ती अस्तित्वात नव्हत्या. व अजूनही नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रात आपणास प्रत्येक गावात शंकराचे आणि भैरवनाथाचे मंदिर पहावयास मिळते.

महादेव कोळ्यांची कला 

महादेव कोळी हे सन 19 10 च्या आसपास पासून तमाशा ही कला सादर करीत असत. त्या काळात अनेक गावांचे तमाशा प्रसिद्ध होते. तमाशामध्ये वग सादर करताना त्या काळात ते रामायण महाभारतातील कथांचा उपयोग करत असत. यावरून त्यांना रामायण व महाभारताची इंत्यभूत माहिती होती.

नावे व आडनावे 

आडनावे ही सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात उदयास आली. त्यापूर्वी नावाच्या नंतर कुळाचे किंवा गोत्राचे नाव लावत असत. मुलांची नावे ही शेवटी "जी" लावून ठेवली जात असत. उदा. धोंडजी,देवजी,कमाजी,ठकुजी, चिमाजी,सावजी,बुधाजी, इत्यादी.

जोत्याची घरे 

जोत्याचे घर जमिनीत पाया खोदून बांधलेले असे. जोते हे प्रामुख्याने तीन थरांचे असे. सर्वात खालच्या घडीव दगडाला बेंद्री असे म्हणत. तर मधल्या दगडाच्या थराला गुंड्या असे म्हटले जाईल. शेवट वरच्या थराला पानथरी असे म्हणत असत.

बेंद्री चा दगड सहा इंच रुंद  दोन ते तीन फूट लांब असे. तर गुंड्या हा दगड साधारण एक फुट रुंद व एक फुट लांब असे. वर पाणथरीचा दगड सहा इंच रुंद व तीन फूट लांब असे. हे सर्व दगड मिरची वाटायच्या पाट्यासारखे घडीव असत. याला लोक टीचीव किंवा घडीव जोते असे म्हणत. टीचीव जोती ओबडधोबड असत.

खण

घराचा एक खण म्हणजे पाच फूट अंतर. काही घरे पाच, सात,नऊ खणांची असत. त्यासाठी खांब, तूळया, लग, वासे, बॅटम, कांभेरे, फळ्या हे लाकडाचे घटक असत. बॅटम ही प्रामुख्याने मेसाच्या काठीची असे. त्यावर धाब्याची आणि त्यानंतर नळीची आणि त्याही नंतर कवले वापरायची पद्धत होती. परंतु ही घरे सधन असलेल्या महादेव कोळ्यांकडेच असायची. बाकी सर्वांची घरी ही केंबळाची असत. केंबळाची म्हणजे ओबडधोबड दगड व गवताची. प्रत्येक घराच्या बाहेर अंगण असे व त्यावर मांडव घातलेला असे.

विविध प्रकारचे सण वार 

महादेव कोळ्यांचे प्रामुख्याने गणी चौत, श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार, बैल अमावस्या, नवरात्र, देव पारधी जाणे, होळी व अक्षय तृतीया हे सण ते मोठ्या आस्थेने साजरी करत असत.

गणी चौथ

गणी चौथ म्हणजे गणेश चतुर्थी या दिवशी तांदळाच्या पिठाचे अगदी छोटे छोटे उंडे (गोळे) करून ते गुळाच्या पाण्यात शिजवत असत. व डांगराच्या पानावर आपल्या शेताला नैवेद्य दाखवत असत.

नवरात्र 

नवरात्र मध्ये वरसुबाई, काळभैरवनाथ या देवांच्या देवळामध्ये पळसाच्या पानात माती ठेवून त्यावर धान्य पेरत व नऊ दिवस देवळामध्ये भजन पूजन केले जाई. जे लोक देवळामध्ये नऊ दिवस बसून असत त्यांना देव धरणे असे म्हणत. हे लोक नऊ दिवस उपवास करत. प्रत्येक दिवशी देवाला किंवा देवीला तिळांच्या फुलांची माळ घातली जाई. पाचवी माळ व नववी माळ या दिवसाला अनन्य साधारण महत्व असायचे. नववी माळ घातल्यावर देव उठवणे असे म्हणत. या दिवशी देवाला काही ठिकाणी कोंबड्याचा बळी दिला जातो.

श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार 

या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला जातो. व भगवान शंकराला नैवेद्य दाखवला जातो. ठिकठिकाणी जवळपास असलेल्या शंकराच्या मंदिरात यात्रा भरवतात. तेथे भजन करतात.

बैल अमावस्या किंवा बैलपोळा 

भाद्रपद अमावस्येच्या दिवशी लोक आपल्या पितरांना घरावर फक्त खिरीचा नैवेद्य ठेवत असत. त्यानंतर दुपारी बैलांचा बैल पोळ्याचा सण साजरा केला जात असे. संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक करून बैलांना नैवेद्य ठेवण्याची प्रथा होती. आहे.

गावाची साथ करणे

प्रत्येक गावात भाताची लावणी करायच्या आधी व भाताची कापणी करायचे आधी अशी दोन वेळा सात केली जाते. सात केल्याशिवाय कोणतीही कामे करता येत नाहीत.

साथ रविवार किंवा मंगळवारी केली जाते. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन बोकड आणून गावाच्या ग्रामदैवतेला बळी देतात. पूजा विधी करून त्या ठिकाणी जेवण केले जाते. दुसऱ्या दिवसापासून शेतीच्या कामाला सुरुवात करतात.

मोडा पाळणे 

रविवार हा भैरोबाचा व मंगळवार हा वरसुबाई किंवा कळमजा या देवांचा वार असतो या वारी प्रामुख्याने शेतातले काम करत नाहीत. यालाच मुळा पाळणे असे म्हणतात.

वाघ बारस 

कार्तिक महिन्याच्या द्वादशीला वाघबारस साजरी केली जाते. अनेक ठिकाणी वाघोबाची मंदिरे आहेत. अनेक गावांमध्ये वाघोबाचे ठाण आहे वाघोबाला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक ठिकाणी मोठी यात्रा भरते. वाघबारस हा महादेव कोळी समाजाचा एक मोठा सण असतो. तो उत्सव ते मोठ्या भक्ती भावाने साजरा करतात.

यात्रा व उत्सव 

चैत्र महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी वरसुबाई ची यात्रा भरते. अनेक भाविक भक्त वरसुबाईच्या दर्शनासाठी येत असतात. सुकाळवेढे येथे परसूबाईचे अतिशय सुंदर हेमाडपंथी मंदिराला लाजवेल असे शिल्प तयार केले आहे. 17 व्या शतकानंतर हे भारतात असे पहिलेच मंदिर आहे की जे दगडामध्ये बांधण्यात आले आहे. आतापर्यंत साधारण या मंदिराला दीड कोटी रुपये खर्च झाला आहे. अनेक भाविक भक्त सरळ हाताने या मंदिरासाठी देणगी देत असतात.

अखेदी ( अक्षय तृतीया )

अखेरीच्या दिवशी अगदी सकाळी घराच्या पुढील भिंतींना शेणाच्या करंजी सारखे गोळे चिकटवायचे. पाच गोळ्यांच्या तीन ते चार रांगा असत. प्रत्येक क्षणाच्या गोळ्याला खालच्या बाजूला चाप्याची फुले खोचायची.आणि दोरा चहुबाजूने गुंडाळायचा. हेच गोळे धान्याच्या कणगी वर सुद्धा लावत असत.

ज्याच्या घरात वडील वर गेले असतील तर बाजारातून करा घेऊन येत.व ज्यांच्या घरात आई गेली असेल तर केळी घेऊन येत. (करा आणि केळी हे मडक्यांचे प्रकार आहेत ) ही मडकी पाणी ठेवतो त्या ठिकाणी पाण्याने पूर्ण भरून ठेवत असत. दुपारी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जात असे. व आपापल्या पितरांना नैवेद्य दाखवला जात असे. 

महादेव कोळ्यांच्या देवदेवता 

भैरोबा, मुक्तार, खंडोबा, वाघोबा, वीर, मुंजोबा, कनीरबाबा वरसुबाई, कळमजा, गडदुबाई, जानुबाई, ताथवडी, मुक्ताबाई,कळसुबाई, अशा अनेक देव देवता आहेत. त्यांचे तिथी परंपरेप्रमाणे उत्सव साजरे करतात.

 महादेव कोळ्यांच्या प्रत्येक कुळाचे देव हे वेगवेगळे असतात. काही लोकांचा भैरोबा दिगदचा आहे तर काही लोकांचा देव अबीर खिंडीचा भैरोबा आहे. 

प्रमुख मुख्य ठिकाणे

 भैरोबा  -  दिगद व अबीर खिंड, देवतोरणे, गोरेगाव 

 वरसुबाई  - सुकाळवेढे जुन्नर

 गडदुबाई - आंबे हातवीज  (जुन्नर)

 महालक्ष्मी - सुरकुंडी (ता खेड जि पुणे )

उपवास

मुख्यतः सोमवार, मंगळवार उपवास केला जात असे. सोमवार हा शंकराचा वार तर मंगळवार हा वरसुबाई, कळमजा, इत्यादी देवींचा वार असे. मंगळवारचा उपवास ह्या स्त्रिया करत असत.

लहान मुलांना नायटा, किंवा इतर काही त्वचारोग झाल्यास वरसुबाई च्या नावाने उपवास करून गावात प्रत्येक घरात कोरडा शिधा मागण्याची पद्धत होती. ज्या स्त्रीचे मूल लहान आहे. व त्याला नायटा किंवा इतर त्वचा रोग झाला आहे. ती सकाळी उठून स्नानादी क्रिया कर्म करून घरोघरी जोगवा मागत असे. 

घराच्या दारात गेल्यावर, भीमाशंकरच्या कळमजाचा, सुकळवेढ्याच्या वरसुबाईचा जोगवा असे मोठ्याने म्हणे. हे ऐकून घरातील स्त्री तिच्या ओट्यात ओंजळभर तांदूळ टाकत असे. व विचारपूस करत असे. हेच तांदूळ घरी घेऊन संध्याकाळी त्याचा भात घालून तो नैवेद्य खाल्ला जात असे.पाच घरी मागून आणलेले भात भाकरी हे सुद्धा जोगव्याचाच एक प्रकार होता.

बाळाची पाचवी पुजणे 

बाळाचा जन्म झाल्यावर पाच दिवसांनी पाचवीचा कार्यक्रम केला जात असे. पाचवीला मिरची वाटायच्या पाट्यावर नदीकाठी किंवा ओढ्याच्या काठी असलेला लव्हा, पाण्यातले खेकड व मासा,व खारीक,खोबरे, हळदी, कुंकू दगडाचा दिवा लावून पूजा केली करत असत. आता अलीकडे लोक पाट्यावर मासे खेकडे ठेवणे ऐवजी पाटी पुस्तक ठेवतात. काही लोक तर पाचवी सुद्धा करत नाहीत.

बाराबळी मोडणे 

बाळ बारा दिवसाचे झाल्यावर घराच्या बाहेरील भिंतीवर कोळशाने दोन देवांची आकृती काढली जाते. व शेंद्राचे डोके काढतात.त्याला हळद कुंकू लावतात.ओढ्याच्या काठी असलेला लव्हा, व साबराच्या छोट्या छोट्या फांद्या तिथे ठेवतात.पूजेचे साहित्य ठेवून बाळ बाळंतीणीला दर्शन करायला लावतात. त्यानंतर तिथे नैवेद्य ठेवला जातो. यालाच बाराबळी मोडणे असे म्हणतात.

मुलगा झाला असेल तर दहा दिवसाचे विटाळ पडतात. व मुलगी झाली असेल तर महिना भर विटाळ पाळले जाते. 

सटवायची पूजा 

काही ठराविक गावांच्या हद्दीमध्ये सटवायची मंदिरे असतात. त्या ठिकाणाहून जर गरोदर महिला गेली किंवा बाळ घेऊन गेले तर काही ठराविक महिन्यांनी किंवा वर्षांनी सटवायला कोंबड्याचा बळी दिला जातो. आजही ही प्रथा चालू आहे.

बाराहय देणे 

प्रत्येक गावात मुलगा असेल तर बोकड व मुलगी असेल तर छोटी शेळी (पाठ) गावच्या ग्रामदेवतेच्या हद्दीमध्ये बळी देऊन पूजा केली जाते. अनेक लोकांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते.

जावळ काढणे 

प्रत्येक गावच्या पानावठ्याच्या ठिकाणी किंवा वड्याच्या कडेला किंवा नदीच्या कडेला मुलगा असेल तर बोकड व मुलगी असेल तर कोंबडीचा बळी दिला जातो. व पूजा करतात. मामाला बोलावून मुलाची किंवा मुलीचे थोडेसे केस कापले जातात. यालाच बट काढणे किंवा जावळ काढणे असे म्हणतात. अनेक लोक मुला मुलींना खोबऱ्याची वाटी व गुळ भेट म्हणून देतात.

सुपारी फोडणे ( साखरपुडा)

एखाद्या मुलाचे लग्न जमल्यावर रात्री जेवण झाल्यावर पाच ते सहा लोक मुलीच्या गावाला जात असत. त्या ठिकाणी गेल्यावर सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होत असे. त्यानंतर मुलाकडच्या लोकांनी आणलेला गुळ वाटप होई.आणि नंतर नवरदेवाकडील लोक व नवरीकडील वस्तीतील सर्व लोकांना जेवण असे.

देवक बांधणे 

लग्न असलेल्या घरी हळदीच्या दिवशी अंगणातील मेंढीला शेतीची अवजारे म्हणजेच जुपन्या, सूप,खैराच्या लाकडाचे मुसळ, सागाचा आठवा त्यावर दगडाचा दिवा ठेवतात. आणि हे सर्व कासऱ्याने बांधतात. यालाच देवक बांधणे असे म्हणतात. देवक बांधणे हा प्रकार महादेव कोळी स्थिरस्थावर झाल्यावर व वस्त्या करून राहिल्यावर रूढ झाला असावा.

द्याज देणे ही प्रथा आता बंद झाली आहे त्यामुळे लिहिण्यात काही अर्थ नाही.

गोते भाऊ 

आपले आडनाव सोडून दुसऱ्या आडनावाचे लोक हे गोते भाऊ असतात. प्रत्येकाचे गोटे भाऊ हे वेगवेगळे असतात. गोतेभावामध्ये आपापसात लग्न संबंध करत नाहीत. 

उदा :- बेंढरी यांचे गोते भाऊ तळपे आहेत.

1970 च्या दशकात कै श्री.कृष्ण राव मुंढे साहेब हे आमदार असताना निवड मंडळाचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी अनेक तरुणांना मुख्य प्रवाहात आणून शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी,अशा अनेक नोकऱ्या दिल्या.अनेक तरुणांना पोस्ट, तारा ऑफिस,अमिनेशन फॅक्टरी,फोर्ट, टाकसाळ, मंत्रालय, जिल्हा परिषद अशा अनेक ठिकाणी नोकरी देऊन मुख्य प्रवाहात आणले. 

त्यामुळे खऱ्या अर्थाने महादेव कोळी समाजाचे लोक पुण्या मुंबई च्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थायिक झाले. त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले. व तेही पुढे नोकरी पाण्याला लागले. ही मुंडे साहेबांची कृपा म्हणावी लागेल. तेव्हा जर मुंढे जर नसते तर महादेव कोळी समाज अजून कित्येक वर्ष मागे असता. आज खऱ्या अर्थाने त्यांचे भव्य स्मारक असणे आवश्यक आहे. त्यांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करणे हे सर्व महादेव कोळ्यांचे कर्तव्य आहे.

ज महादेव कोळी मुख्य प्रवाहात आले आहेत. परंतु महादेव कोळ्यांच्या रूढी, परंपरा, रीती रिवाज, भाषेची जपणूक ही फक्त गावाकडेच पाहायला मिळते. आधुनिकतेच्या नावाखाली सुशिक्षित असलेला महादेव कोळी समाज मात्र हे सर्व विसरला आहे.

अनेक उच्चशिक्षित लोक तर वर्षानुवर्ष गावाकडे येतच नाहीत. ते शहरांमध्येच स्थायिक झाले आहेत. त्यांना समाजाविषयी कसलेच ममत्व नाही.

मध्यमवर्गीय महादेव कोळी समाजातील लोकांना आपली ही संस्कृती टिकवली पाहिजे. संस्कृतीचा विस्तार केला पाहिजे. आपली संस्कृतीची नवीन पिढीला माहिती द्यायला पाहिजे. असे वाटत असते. त्यासाठी ते प्रयत्नही करतात. परंतु अनेक संघटना झाल्यामुळे मेळ बसत नाही. हे विदारक चित्र आहे.

महादेव कोळी प्रसिद्ध व्यक्तिमत्व 

तानाजीराव मालुसरे: हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक शूर योद्धा आणि सेनापती होते, जे महादेव कोळी होते. 

जायबा मुकणे:- यांनी जव्हार संस्थानाचे राज्य स्थापित केले, जे पूर्वी महादेव कोळींच्या ताब्यात होते. 

थोर क्रांतिकारक :- विर खेमा नाईक, राघोजी भांगरे, होनाजी केंगले, हे प्रसिद्ध क्रांतिवीर होते. तर सतु मराडे हे बंडकरी म्हणून ओळखले जात. त्यांचा इतिहास प्रसिद्ध आहे. यावर अनेक जणांनी स्वतंत्र लेखन केले आहे. मी सुद्धा या तिघांवर स्वतंत्र लेख लिहिले आहेत.

 मा. आमदार श्री कृष्णराव मुंडे- यांच्या काळात अनेक आदिवासी तरुणांना नोकरी मिळाल्या. त्याने अनेक ठिकाणी विद्यालय व महाविद्यालय उभारली. व शिक्षणाची दारे खुली केली.

मा. श्री. मधुकरराव पिचड साहेब - हे आदिवासी नेते, कॅबिनेट मंत्री,विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद अशी अनेक पदे भूषवली आहेत. त्यांच्यावर सुद्धा अनेकांनी स्वतंत्र लेखन केले आहे.

पहिले भारतीय प्रशासनिक सेवेमधील I. A. S. अधिकारी डॉक्टर गोविंद घारे हे अतिशय उच्च शिक्षित अधिकारी होते. त्यांनी आदिवासी समाजावर अनेक मोठे मोठे पुस्तके आणि ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांनीच खऱ्या अर्थाने महादेव कोळ्यांना त्यांच्या पुस्तकाच्या लेखनामधून पुढे आणले व जगाला ओळख करून दिली.

मास्टर शंकरराव कोकाटे टोकवडे तालुका खेड यांचा प्रसिद्ध असा तमाशा होता. त्यांच्यावर सुद्धा स्वतंत्र लेखन केले आहे.

धोंडू महाराज गाडेकर हे जुन्या काळातील कला नाट्यातील एक लोकप्रिय कलाकार होते.

महादेवकोळी समाजातील कुळे व आडनावे

अ : अंबवणे, अंभिरे.

आ : आंबेकर, आढळ, आसवले, आढारी, आवारी, आस्वले.

इ : इष्टे, इदे, इधे, इरणक.

उ : उतळे, उंबरे, उगले, उंडे, उभे.

क : करवंदे, कारभळ, कांबळे, काठे, कोरडे, किरवे, कराळे,            कोकणे,कडाळी,कडू, कचरे, कोकाटे, कसाळ,                      कोथेरे, केवाळे, कोळप, कोंडुळे, केदारी,केंगले, कुर्हाडे,            कवटे, कौठे, कोकदरे, कोथे, कावळे,कावते,कोल्हे,केकरे,  कुडेकर, कोंडार, केंग, कोकतरे, कोकते, कवदरी, कुंदे, केदारे,करके, करटुले, करोटे, करवदे, कोंडावळे, कुलाळ, कौले.

ख : खामकर, खुटाण, खाडे, खोरगडे, खादे, खेताडे, खामसे,          खतेले,खोडे,खताले, खोकले.

ग : गभाले, गवारी, गारे, गोडे, गोंद्के, गंभीरे, गेंगजे,       

     गडदे, गवते,गमे, गागरे, गोंदे, गबाले, गिरजे, गांजवे,               गातवे, गोणके, गोडसे. गाडेकर

घ : घोटवडे, घुटे, घोडे, घनकुटे, घोईरत, घोटकर, घोटे, घारे,            घाणे.

च : चपटे, चिमटे, चौधरी, चहाले, चौरे.

ज : जोशी, जढर, जाधव, जंगले, जफरे, जागले, जाखेरे.

झ : झांजरे, झाडे, झोले, झडे, झापडे.

ट : टेंगचे

ठ : ठुबळ, ठोकळ, ठवळे, ठोंगिरे.

ड : डामसे, डगले, डावखर, डवणे, डहाळे, डावखोर.

ढ : ढवळे, ढेंगळे, ढोके, ढोंगे.

त : तळपे, तरपाडे, तातळे, तांबडे, ताते, तिटकारे,                तारडे, तुरे,

     तराळ, तळपाडे, तांबेकर.

थ : थिगळे, थवले, थुवळ, थेरे.

द : दांगट, दळवी, दिघे, दाते, दगडे, दिवे, दिवटे,                  दांडेकर,देशमुख,दारणे, दरणे.

ध : धरमुडे, धनगर, धादवड, धराडे, धोंगडे, धोंडे,                 धोंडामरे,धिंदळे,धोत्रे, धिमे.

न : नाडेकर, नंदकर, निसरड, निगळे, नांगरे, निर्मळ,            नवाळी,नवले, नांदे, नडगे.

प : पावसे, पोटे, पारधी, पावडे, पोटकुळे, पेकारी,                पिचड,पोफळे,पादीर, पटमोरे,पाडेकर, पाटेकर,            पाटील,पोटिंदे,पडवळे, पेरे, पोपेरे.

फ : फलके.

ब : बांबळे, बुरुड, बगाड, बांगर, बुळे, बेंढारी, बोऱ्हाडे,          बांडे,

     बोकड, बुरसे, बोटे,बेंडकोळी, बरामते, बोबडे,               बेनकर,  बोंबले, बनबरे, बागडे.

भ : भोजने, भारमळ, भाकीत, भवारी, भांगले, भोईर,          भांगे,

      भोमाळे, भालेकर,भालिंगे, भांडकोळी, भूरकुंडे,             भोपळे,भागीत, भारती, भोते,                                   भोकटे,भांडकुळे,भौरले, भादवड, भाकरे.

म : मते, मुंढे, मोहरे, मुठे, मदगे, मांडवे, मेमाणे, माळी,मेने मुदगून,मुकणे,मोजे, मोडक, मिळखे, मोहंडुळे, मरभळ,मराडे, मोरमारे, म्हसळे,मसळे,मोसे, म्हसाळे, मुंजे, मुळे मोकाशी, मेचकर, माळुंजे, मेठल, मोरे,मुऱ्हे.

य : येडे, येले.

र : रगतवान, रेंगडे, रावते, रढे, रोंगटे, रगडे, राक्षे.

ल : लोहकरे, लांडे, लांघी, लाडके, लेंभे, लोखंडे, लोकरे, लामटे,लहांगे, लाहुरे,लोटे, लोहरे, लिलके, लहामटे, लोटमोरे.

व : वरे, वडेकर, वाळुंज, वाजे, वासाळे, वाळकोळी, विरणक,वायाळ, वाघ,वारघडे, वडे, वाळेकर, वयणे, वायकोळी, वेले, वुंडे, वनघरे.

स : सांगडे, साबळे, सुपे, सरोगदे, सुरकुले, सारकते,            सासरे,सातपुते, सालकर,सरोकते, सावळे, साकभोर, सुकटे.

श : शिंगाडे, शेळके,शेकरे, शेजवळ, शेणे, शेंडे, शेंगले,          शेळकंदे.

ह : हेमाडे, हिले, हामरे, हिरले, हडके

पुणे-१८संदर्भ : सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी. (डॉ. गोविंद गारे.)

मराठी भाषेतून लयाला गेलेले किंवा जात असलेले डांगाणी शब्द 

आगाद - सुरुवातीलाच... आम्ही यावर्षी आगाद लावणी केली.

आठवार - लग्न न झालेला...

आपाप - आपोआप     आईच्यान - आई शपथ

आळाण - बेसन           इवळने   -   ओरडणे

उनून  - गरम               उलीउली - थोडा थोडा

इवाईन - विमान           इळमाळ - दिवसभर

उलिसा - थोडासा         लय वाढखू - खुप वेळ

केंधुळा - खुप वेळ        कुहीट- झोपडी वरचे जुने गवत 

कोडगा - निर्लज्ज         खकाणा - धूळ

गावडी - गाय               गुताडा - गुंता

गोट - गोष्ट                  बिरडं  - शर्टाचे बटण

घासल्याट - रॉकेल        झावळा - सायंकाळ

डाकतर  - डॉक्टर         दाठीमुठीचा- खोटं खोटं 

धवळा - पांढरा             वजवज - हळूहळू 

नवाल - आश्चर्य            मॉकार - पुष्कळ 

नवचंडी - नवरात्र          म्हंगाला - म्हणाला

वायला - वेगळा            हाडहाड्या - खादाड

सत्री  - छत्री                येटाळणी - भाताची कापणी   

शिराई - झाडू              गबाळ्या - अस्वच्छ 

आम्हाली - आम्हाला     तुम्हाली - तुम्हाला

तेली - त्याला               मपला - माझा 

तूपला - तुझा               डंगरी - म्हातारी

गवारी - गुराखी            इरना - इरले 

गैबान्या - येडपट           इस्तु - विस्तव

ईदरं - विक्षिप्त             ढाळवांत्या - जुलाब उलट्या 

पटका - फेटा              बंडी

बयाद्वार - व्यवस्थित     घडूशी - घडवंची 

न्याकाळ - सरळ          पान लागणे - साप चावणे

बेंडगुळ - एक शिवी      आराटबाट्या - एक शिवी

फाटी - सरपण             खासखन्या - एक शिवी

चिरगुट - चिंधी             दूंदया - जुनी घोंगडी 

आखटी - शेकोटी         फलाण्या बिस्तान्या - अमुक अमुक 

लांडी - लांडोर   

 लेखक :- रामदास तळपे           

या लेखाची कृपया कोणत्याही प्रकारे कॉपी करू नये. कॉपी राईट हा कायद्याने गुन्हा आहे. तसे केल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.




           









श्री.एकनाथ गणपत लांघी साहेब

श्री.एकनाथ गणपत लांघी साहेब

समाजात अशी काही माणसे असतात की ज्यांचे समाजासाठी मोठे योगदान असुनही ती माणसे कायमच उपेक्षित किंवा दुर्लक्षित राहतात.याला कारण असतो त्यांचा अबोलपणा.

काही लोक असे असतात...करणार तर काहीच नाही.पण असे काही सांगत सुटणार की, मी खुप काही करतो.असे लोक समाजात खुप असतात.

असेच एक अबोल परंतू समाजशील व्यक्तिमत्व श्री. एकनाथ लांघी साहेब.

एकनाथ लांघी हे डेहणे सोळशेवाडीचे. त्यांचे वडील मुंबई येथे नोकरीसाठी असुनही त्यांच्या नशिबी मुंबईला राहण्याचे योग आले नाहीत. संपूर्ण आयुष्याचा पुर्वार्ध हा गावीच गेला.

मराठी शाळेत सातवी पर्यंत शिक्षण झाले. आणि त्याच वर्षी म्हणजे 1979 साली नवीनच सुरु झालेल्या डेहणे येथील हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत नाव दाखल केले. अतिशय प्रतिकूल परिस्थिती, शाळेला स्वतंत्र इमारत नसल्यामुळे आठवीचा वर्ग हा कधी गोठ्यात तर कधी मंदिरात भरायचा. जुने शिक्षक हे पात्रता धारक नसल्यामुळे त्यांचेच  इंग्रजी कच्चे असल्यामुळे त्यावेळी विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. इयत्ता आठवीत गेल्यावर एबीसीडी पासून सुरुवात करावी लागली.

सन 1981-82 मध्ये शिवाजी विद्यालय डेहणे या शाळेचा निकाल 90 % लागला. श्री एकनाथ लांघी सर चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले.

लांघी सरांनी महात्मा गांधी विद्यालय मंचर येथे इयत्ता अकरावीला प्रवेश घेतला. त्यानंतर ते तिथून बी.ए. झाले. त्या काळात पश्चिम भागात बीए होणारे ते पहिलेच विद्यार्थ्या असावेत.

सन 1985 मध्ये शासनाने खडू फळा योजना, ऑपरेशन ब्लॅक बोर्ड इत्यादी योजना राबवून इयत्ता दहावी पेक्षा जास्त शिक्षण असलेल्या तरुणांना प्राथमिक शिक्षक होण्याची संधी दिली. त्यावेळी दहावी उत्तीर्ण झालेले अनेक तरुण शाळा मास्तर झाले. त्यामध्ये बीए उत्तीर्ण असलेले श्री एकनाथ लांघी गेली होते. त्यावेळी त्यांना दूर शहरात कोणतीही मोठी नोकरी लागली असती. परंतु त्यांनी ग्रामीण भागात नोकरी करून आपल्याच भागातील मुलांना उच्चशिक्षित करायचे.असा निश्चय केला होता. आणि यातूनच ते शाळा मास्तर झाले.

त्यांना पहिली नेमणूक मिळाली मोरोशी ता. खेड येथे.तेथील शाळेचा पट हा जेमतेमच होता.परंतू श्री.लांघी सर उच्च शिक्षण झालेले शिक्षक असल्यामुळे शाळेचा दर्जा निश्चितच वरचढ होता. लांघी सरांची शिकवण्याची पद्धत आणि अनुभव यामुळे सन 1986 साली मुलांचा पट तिपटीने वाढला. तालुक्यात त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीची दखल घेतली गेली. शाळेचे कामकाज करून ते त्यावेळी असलेल्या तालुका मास्तर कार्यालयात काम करायचे.

त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे मोरोशी शाळेचा पट वाढत होता. नवीन पाचवीचा वर्ग सुरु करण्याचा त्यांनी विचार केला. त्यासाठी ग्रामस्थांनी त्यांना सर्वतोपारी सहकार्य केले. या सर्वांच्या मदतीने मोरोशी येथे पाचवीचा वर्ग सुरू झाला. शाळेत अजून दोन शिक्षकांची भर पडली. 

सन 1994 च्या दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी शासनाने केंद्र शाळांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. लांघी सरांच्या मनात मोरोशी येथे केंद्रशाळा व्हावी. असे वाटत होते. परंतु पुढील वर्गासाठी तिथे वर्ग शाळा नव्हत्या. त्यामुळे हे स्वप्नच राहणार होते. मंदोशी तालुका खेड येथे केंद्र शाळा होणार जवळपास निश्चित झाली होते. परंतु गावचे कलुषीत राजकारण व गावकऱ्यांची उदासीनता ही बाब लांघी सरांच्या लक्षात आली. त्यांनी मोरोशी गावच्या ग्रामस्थांची मीटिंग घेऊन  हे सर्व सविस्तर त्यांना सांगितले. व आपल्या गावात कोणत्याही  परिस्थितीत केंद्र शाळा झाली पाहिजे. यासाठी तुम्ही सहकार्य करा  अशी विनंती केली.

ग्रामस्थांनाही हे सर्व मनावर घेतले. समस्त नोकरदार वर्गानी मोठमोठ्या देणग्या दिल्या. ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढली.  कोकणात जाऊन लाकडे आणली. आणि ग्रामस्थांच्या स्वखर्चाने, स्व निधीतून अगदी सुंदर अशी शाळेची इमारत उभी राहिली. मोरोशी येथे केंद्र शाळा होण्यासाठी तत्कालीन पुणे जिल्हा परिषद सदस्य कै.श्री.नाना भिकाजी कषाळे यांनी सहकार्य केले. 

आणि सन 1995 मध्ये मोरोशी या शाळेला केंद्र शाळेचा दर्जा मिळाला. प्रारंभी एक शिक्षक असलेल्या या  शाळेवर केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक,व चार प्राथमिक शिक्षक असा मोठा स्टाफ नेमला गेला. ही सर्व किमया  श्री.एकनाथ लांघी सरांनी करून दाखवले होती. त्यांच्या शाळेचा दर्जा हा हायस्कूल पेक्षा कितीतरी पटीने उजवा होता. हायस्कूलमध्ये  इयत्ता आठवीत गेल्यावर इतर मुलांच्या तुलनेत मोरोशी शाळेची मुले शिक्षणाच्या बाबतीत निवडून पडायची. हे सर्व श्रेय श्री.लांघी सरांना द्यावे लागेल.

मुलांना शैक्षणिक ज्ञानार्जनाचे काम करत असताना त्याने देखील पुढे बीएड व त्यानंतर एम एड केले. हे सर्व झाल्यावर पुढे त्यांना पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख या पदावर बढती मिळाली.या संधीचे श्री लांघी सरांनी सोने केले. त्यांची मुले आज मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहेत.

शैक्षणिक काम करत असताना श्री लांघी सर समाजातही लहान मोठी सामाजिक कार्य करत राहिले. त्यांना धार्मिक कामाची आवड असल्यामुळे तसेच त्यांना भजनाची देखील आवड असल्यामुळे त्यांच्या संकल्पनेतून व सोळशेवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने भजन स्पर्धांचे आयोजन केले गेले. या भजन स्पर्धा प्रत्येक वर्षी याप्रमाणे सलग दहा वर्ष आयोजित करण्यात येत होत्या.त्यामध्ये मोफत चष्मे वाटप, समाज उपयोगी वस्तूंचे वाटप, गावच्या सभा मंडपाचे काम अशी भरपूर कामे लांघी सरांच्या संकल्पनेतून व ग्रामस्थांच्या सहकार्याने केली गेली.

लांघी सर हे सढळ हाताने मदत करणारे सदृहस्थ आहेत. त्यांनी अनेकांना आर्थिक मदत देखील केली आहे. अनेकानी त्यांचे पैसे बुडवले. मदत केलेले लोक  त्यांच्याशी कृतघ्नपणे वागले. एकदा त्यांनी ही सल मला बोलून दाखवली. परंतु त्यांच्याबद्दल त्यांनी एकही वाईट चकार शब्द काढला नाही.

परंतु जवळचे लोक परके झाले याबद्दल त्यांच्या मनात नेहमी एक प्रकारची सल राहिली. लोक असे का करतात? हे एक गुडच म्हणावे लागेल.

लांघी सरांचा स्वभाव अतिशय मितभाषी असल्यामुळे त्यांनी कधीही कुणाला आपण करीत असलेल्या कामाची माहिती दिली नाही. अथवा कधी कुणापाशी बोलले देखील नाहीत.एकदा सहजच त्यांच्याबरोबर गप्पा मारण्याचा योग आला.त्यावेळी त्यांच्याकडून ही माहिती मिळाली. समाजात असे अनेक लोक असतात.करतात थोडे परंतु देखावा मात्र अफलातून करतात. आणि जे प्रत्यक्ष काम करतात ते मात्र कुठेतरी सांदी कोपऱ्यात असतात. परंतु जे चांगले काम करतात परमेश्वर त्यांची नक्कीच दखल घेतो. हे मात्र तितकेच खरे... आज त्यांच्या सुविद्य पत्नी डेहणे गावच्या सरपंच आहेत. ही त्यांच्या कामाची पावतीच म्हणावी लागेल. 



 


रामदास तळपे 

गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस