मैत्री,अशीही (एक सत्यकथा)

मैत्री,अशीही (एक सत्यकथा) 

20 मे 2025 रोजी मला वर पक्ष असलेल्या मित्राकडून Whats app वर लग्नाची प्रत्रिका आली. लागोपाठ आठ दिवस पोस्ट पाठवत होते. शेवटच्या एक दिवसाअगोदर मला त्यांचा फोन आला. आपण आमच्या विवाह सोहळा उपस्थित राहुन,वधु वरांना शुभेच्छारुपी आशिर्वाद द्यावा.मी त्यांना होय,नक्कीच मी लग्न कार्यास उपस्थित राहीन असे सांगितले. 

प्रत्रिका पाहिल्यावर बघितले तर वधु माझ्या खास मित्राची मुलगी होती. हे पाहिल्यावर मला खूप आनंद झाला.

 वधूचे वडील व मी  शाळा आणि काँलेज मध्ये एकाच बेंच बसायचो. कधीतरी हॉटेल नाश्ता करायचो. एकत्र चहा घ्यायचो. आमची खूपच दृढ मैत्री होती. एकमेकाशिवाय कधी राहिलो नाही. तो माझ्या पेक्षा थोडा जास्त हुशार होता. मी मध्यम होतो.

पदवी शिक्षण झाल्यावर दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या..तो उच्च पदवावर गेला.नंतर एकमेकांची लग्न झाली मी माझ्या मित्राला आग्रहाने प्रत्रिका घरी जाऊन दिली. त्याने लग्नाला येण्याच वचन दिलं, पण तो काही माझ्या लग्नाला आला नाही.विशेष म्हणजे त्यांने त्याच्या लग्नाची मला प्रत्रिका सुद्धा दिली नाही.आमचे एकमेकांकडे मोबाईल नंबर होते.ते एकमेकांच्या मोबाईल मध्ये सेव्ह होते. असे असताना सुद्धा त्याने लग्नाचा साधा मेसेज सुद्धा केला नाही.

ज्यांच्या मुलांचे लग्न होते, ते सुद्धा माझे मित्रच होते. खूप छान आमची मैत्री होती. तर  त्यांच्या मुलाचा माझ्या ह्या मित्रांच्या  मुली सोबत 20/05/2025 विवाह सोहळा होता.

मी माझ्या या बालमित्राचे रोज Whats, up स्टेट्स दररोज पाहायचो.त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा दिनाचे खूप फोटो असायचे.

मला वर पक्षाकडून प्रत्रिका आली आहे.मी विचार करतोय, आपला बालमित्र नक्कीच आपल्याला प्रत्रिका पाठवीन.पण लग्न दिवसांपर्यंत मला वधु पक्षाची म्हणजे माझ्या बालपणीच्या मित्रांची प्रत्रिका आली नाही.

मी पुरता गोंधळून गेलो होतो.लग्नाला जावे की न जावे? पण वर पक्षाकडे माझी इज्जत खूप होती.आणि मला मानणारा वर्ग खुप मोठा होता.माझं वागणं,माझं बोलणंआणि माझी राहणीमान. समाजातील माझी इमेज अतीशय चांगली आहे. प्रत्येकजन माझ्या सोबत आपुलकीने वागायचा.

विवाह सोहळा दिवस उजाडला.मला सकाळी वर पक्षाकडून फोन आला.आपण आमच्या विवाह सोहळा दिनाचे पाहुणे आहात.आपणास नक्कीच विवाह सोहळाला यावेच लागणार आहे.

मी निश्चय केला. चला आपल्या मित्रांने आपणास प्रत्रिका दिली नाही,त्यांचा मेसेज अथवा फोन नाही.वर पक्षाकडून आपणास आग्रह करतात तर आपण विवाह सोहळाला उपस्थित राहुन वधुवरांना शुभेच्छा देऊ या.

मंगल कार्यालयात मी आणि माझे काही मित्र पोहचलो. प्रवेश द्वारा समोर स्वागताला उभी असलेली दोन्ही बाजुची मंडळी होती.एका बाजुला वधु कडील मंडळी आणि एका बाजुला वरपक्षाकडील मंडळी.

मी प्रवेशद्वारा जवळ पोचताच वर पक्षाकडील मंडळीने माझे अतिशय सुंदर स्वागत केले.शाल श्रीफळ आणि फेटा बांधून स्वागत केले.माझं स्वागत होत असताना नकळत माझ्या मित्रांचे माझ्याकडे लक्ष गेले. त्याला माझा सत्कार झालेला आश्चर्यकारक वाटलं. तरीही तो जवळ आला नाही की, साधी ओळख दाखवली नाही.

लग्नमंडपात गाद्या होत्या. तिथं पर्यत वर पक्षाकडील मित्र आम्हाला घेऊन माझा बसण्यापर्यत मान दिला.नंतर स्पिकर वरही पुकारण्यात आले. ज्यामध्ये माझ्या विशेष कामाचा गौरव होता, समाजात असलेल्या कार्याची दखल घेऊन निवेदकाने त्याच्या विशिष्ट पद्धतीने माझा नामोल्लेख केला होता. हे सर्व माझ्या मित्रांने ऐकलं, आणि त्यांच्या चेहरावरचा नुर एकदम पालटला.त्याला काय करावे हेच समजेना.तो माझ्या दोन वेळा जवळुन गेला पण त्यांची बोलण्याची हिम्मत झाली नाही.

मंगलाष्टका झाल्या.सर्व आलेल्या पाहुण्यांना शब्द सुमनांने आभार झाले.वरपक्षाकडील मंडळी जेवणाचा आग्रह करीत होती.मनापासून जेवण्याची इच्छा नव्हती पण आग्रह खुप झाला.त्याच वेळी एक चमत्कार घडला.माझा हा बालपणीचा मित्र माझ्या जवळ आला.धायमोकलुन माझ्या गळ्यात पडुन रडु लागला.मला ही काय करावे हे समजेना आणि माझ्या जवळ वरपक्षाकडील मंडळींना काही समजले नाही..मी स्थितप्रज्ञ झालो होतो.

तो म्हणत होता मित्रा, मी खूप चुकलो आहे मला माफ कर.मी तुला समजु शकलो नाही.तुझ्यातील चारित्र्य मनाचा मोठेपणा व तुझा समाजाप्रती असलेला भाव मला दिसला नाही. माझा अहंकार मला तुझ्या पासून दुर घेउन गेला.

एका मध्यम व्यक्ती सोबत आपण उच्च पदावर गेल्यावर का मैत्री करावी.मी तुझ्या सोबतच नाही तर आपल्या वर्गातील सर्वसाधारण नोकरी करत असलेल्या मित्रा सोबतची मैत्री मी उच्च अधिकारी झाल्यावर संपुष्टात आणली.आज माझ्या मुलीच्या लग्नात तुझा सत्कार होतोय, वरपक्षाकडील मंडळी तुझ्या मागे पुढे करतात.तुला प्रत्रिका बघुन समजलं होतं माझी मुलगी दिलीय तरीही तु स्थितप्रज्ञ होतास. ना चेहरावर कसलाही भाव. ना चेहरावर अपमानाची छटा. मित्रा मला माफ कर.

त्याने मग त्याच्या पत्नीला कोणाला तरी बोलावण्यास पाठवुन माझी ओळख करून दिली.दोघांनीहि हात जोडून. विनंती केली आपण जेवन करुन जावे..मी ही मागचं सगळं विसरून वरवधुच्या शब्दाला मान देऊन जेवण केले. माझा तो मित्र.मला आग्रहाने जेवु घालीत होता.माझ्या हदयात एक आनंदाची लहर येऊन गेली.

तुम्ही चांगलं वागा. तुम्ही चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व ठेवा.तुमचा समाजाला हेवा होईल असच चालत राहा.नक्कीच एक दिवस तुम्हाला झिडकारलेली व्यक्ती तुमच्या प्रेमात अथवा तुम्हाला मिस केल्या शिवाय राहणार नाही.

त्या दिवशी मित्राने घरी येऊन आम्हा सहपरीवाराला घरी येण्याचे आमंत्रण देण्यास येतो असं वचन दिलं.

मी ही दिलसे माफ केलं.कारण तो माझाच बालमित्र होता.

हरे कृष्ण राधे कृष्ण 🙏🙏

लेखक:- बालाजी शितोळे

तीन लघु कथा

 
तीन लघु कथा 

१. "गहन"

मी लिफ्ट मध्ये एका लहान मुलाला आईस्क्रीम खात असलेलं बघितलं. त्याची काळजी वाटून मी त्याला सहज बोललो, "आज खूप थंडी आहे हे आईस्क्रीम खाऊन तू आजारी पडशील!"

तो मुलगा उत्तरला, "माझी आजी १०३ वर्षांपर्यंत जिवंत राहिली."

मी विचारलं, "आइसक्रीम खाल्यामुळे?"

तो म्हणाला, "नाही, कारण तिने कधीच दुसऱ्याच्या कामामध्ये नाक खूपसले नाही!"

किती खोल अर्थ दडला होता त्या उत्तरात! आता मला समजलं की मी इतक्या वेगाने का म्हातारा होत चाललोय - कारण नसताना मी दुसऱ्याच्या कामात केलेली ढवळाढवळ. दुसरं काय?

२. "थकलेला"

आज-काल जिथे तिथे घोटाळेबाज दिसून येतात. मी नुकताच बातम्यांमध्ये लोकांच्या बँक अकाउंट बद्दल बातम्या पाहात होतो - लोकांच्या खात्यांतून लाखो रुपये बघता बघता नाहीसे झाले होते आणि ते कुठे गेले याचा मागमुसही लागत नव्हता.

ती बातमी पाहून जाम घाबरलेलो मी माझ्या बाईकनं बँकेत गेलो. एटीएम मध्ये माझं कार्ड स्वाईप केलं, माझा पासवर्ड टाकला आणि माझ्या खात्यातली शिल्लक तपासली. माझ्या खात्यात शिल्लक असलेले साडेसातशे रुपये अजूनही माझ्या खात्यातच पडून होते मी सुटकेचा निश्वास टाकला.

बापरे, माझ्या मनावरचा ताण आता हलका झाला होता. आता यापुढे पुन्हा कधी बातम्या ऐकणार नाही असं मी मनोमन ठरवून टाकलं. नको पुन्हा तो भयंकर तणाव!

मात्र मी एटीएम मधून बाहेर पडलो तेव्हा हे बघून मी मनानं आणखीनच हबकून गेलो हे माझे साडेसातशे रुपये अजूनही तसेच माझ्या खात्यात शिल्लक असले तरी माझी मी नुकतीच पार्क केलेली बाईक मात्र आता जागेवर नव्हती.

३. "थांबा"

एक तरुणी ट्रेनमध्ये चढली आणि आपल्या सीटवर दुसराच कोणी माणूस बसल्याचं तीनं पाहिलं. विनम्रतेने आपलं तिकीट तपासून बघितलं आणि ती म्हणाली, "सर, मला वाटतंय आपण चुकून माझ्या सीटवर बसला आहात."

त्या माणसानं आपलं तिकीट काढलं आणि तिला ते दाखवत तो तिला रागान ओरडून म्हणाला, "हे तिकीट जरा नीट बघ. ही माझीच सीट आहे. तू आंधळी आहेस का गं ?"

त्या तरुणीने बारकाईने ते तिकीट तपासलं आणि तिने त्या माणसाशी वाद करणं थांबवलं. ती काही न बोलता त्या सीट पाशी उभी राहिली.

ट्रेन सुरू झाल्यावर काही वेळानं ती तरुणी खाली वाकून त्या माणसाला म्हणाली, "सर, तुम्ही चुकीच्या सीटवर नाही बसलात परंतु तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आहात. ही ट्रेन मुंबईला जातेय आणि तुमचं तिकीट आहे अहमदाबादचं"

तात्पर्य, मनावर संयम असावा. आपण बोलण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी विचार केला पाहिजे अन्यथा आपल्याला पश्चात्ताप करावा लागू शकतो. ओरडण्याने जर सगळेच प्रश्न सुटले असते तर कदाचित या जगावर गाढवांनीच राज्य केलं असतं.

या तीन कथा गंमतदार छोट्या वाटत असल्या तरी त्यात गुढ गम्य आहे…

😂😂😂

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण शोध आणि बोध

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण शोध आणि बोध 

परवाच वैष्णवी हगवणे या नवविवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. सध्या मीडियावाले ही एकच बातमी फिरवून फिरवून काथ्याकुट करत आहेत.

खरंतर मीडियावाल्यांनी यावर समाज प्रबोधन करण्याची गरज आहे. परंतु ते न करता ते केवळ त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

वैष्णवी कस्पटे यांची श्री. सुशील हगवणे यांच्याबरोबर कुठेतरी भेट झाली. एकमेकांना इंस्टाग्राम वर चॅटिंग करू लागले. त्यानंतर ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले.

त्यानंतर हगवणे यांनी वैष्णवी हिला लग्नाची मागणी घातली परंतु वैष्णवीच्या घरच्यांनी या लग्नाला नकार दिला. परंतु कसपटे यांनी एक दिवस वैष्णवीच्या घरी येऊन वैष्णवीला घेऊन जाण्यासाठी तयार केले. व वैष्णवी जाण्यास तयार झाली. हे पाहून तिच्या वडिलांनी निर्णय घेतला की आपण हे लग्न लावू, असे पळून जाऊ नका.

त्यानंतर कसपटे यांनी रीतसर वैष्णवी चे लग्न सुशील हगवणे या तरुणाबरोबर लावून दिले. लग्नाला तिला हुंडा म्हणून अत्यंत महागडी अशी फॉर्च्यूनर गाडी आणि 51 तोळे सोने भेट दिली.

लग्नानंतर चांदीची भांडी वेळोवेळी रोख रक्कम सुद्धा दिलेली आहे.असे कस्पटे यांच्या मुलाखती मधून ऐकायला मिळाले.

वेळोवेळी हगवणे यांनी वैष्णवीला वेठीस धरून कस्पटे यांच्याकडून एक प्रकारे खंडणीच वसूल केली. वैष्णवी त्यांच्या लेखी एक सोन्याचे अंडे देणारे कोंबडीच होती.

त्यानंतर हगवणे यांनी वैष्णवीच्या वडिलांकडे व्यवसायासाठी एक कोटी रुपये रकमेची मागणी केली.त्यासाठी वैष्णवीला वेळोवेळी मानसिक, शारीरिक त्रास दिला,मारहाण केली. त्यानंतर वैष्णवीने आत्महत्या केली.असेही कस्पटे यांनी मुलाखतीत सांगितले.

वैष्णवी हगवणे या मुलीचा स्वभाव शांत होता. त्यामुळे तिच्या स्वभावाचा फायदा घेऊन हागवणे कुटुंब आणि तिच्यावर अनेक प्रकारचे अत्याचार केले.

मुलाचे वडील राजेंद्र हगवणे यांची जवळजवळ शंभर कोटी रुपयांची प्रॉपर्टी असतानाही त्यांना पैशाची किती हाव होती हे या प्रकरणांमधून स्पष्ट होते. हे एक विकृत मानसिकताच म्हणावी लागेल.

प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांची चांगली व्हावे अशी प्रामाणिक इच्छा असते.त्या पोटी त्यांना मनाला मुरड घालून त्यांच्या भल्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात.

या प्रकरणाला न्याय तर मिळेलच परंतु काही शक्ती मीडियाचा गैरवापर करून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी नाहक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट करत आहेत. 

कुणीही नेते मंडळींनी किंवा प्रतिष्ठित व्यक्तींनी एखाद्याच्या लग्नाला जाणे हा थोडाच गुन्हा आहे? म्हणे काय तर अजितदादांनी फॉर्च्युनर गाडीची चावी मुलाच्या हातात दिली. अजित दादांनी हुंड्या साठी समर्थन दिले. म्हणून त्यांचा राजीनामा मागत आहेत. हुंडाबळी कायदा असताना अजित दादां सारखा खासदार, आमदार, विविध मंत्री पदे भूषवणारा नेता हुंड्याला समर्थन देणे शक्य तरी आहे का? 

वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी तमाम महाराष्ट्राची मागणी आहे.

एखाद्याला न्याय मिळणे ऐवजी हे प्रकरणाचे राजकीय भांडवल कसे करता येईल व त्याचा फायदा कसा घेता येईल. हे राजकीय लोक एखाद्याच्या काठीने साप मारून बरोबर आपली पोळी भाजून घेत आहेत. व नहाक एखाद्याला बदनाम करत आहेत. 

मीडियाला याबाबत काहीही देणे घेणे नाही. आठ दिवस ही बातमी फिरवून फिरवून नको त्यांच्या मुलाखती घेऊन लोकांच्या पचनी पाडायची व आपला टीआरपी वाढवायचा एवढेच त्यांचे काम आहे. समाज प्रबोधन करण्याचे त्यांना काही गरज राहिलेली नाही. अशावेळी मीडियाने तज्ञ लोकांच्या मुलाखती घेऊन समाजाचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.

असेच एक दुसरे उदाहरण माझे एक मित्र मिलिटरी मध्ये होते. ते मिलिटरी मधून रिटायर झाल्यानंतर घरी शेती करू लागले. वीस एकर शेतीमध्ये ते बटाट्याचे उत्पादन घेत होते. अतिशय प्रगतशील असे शेतकरी शिवाय मिलिटरी मॅन. भागात त्यांचा एक दरारा होता. 

त्यांची मुलगी लॉ कॉलेजला शिकायला होती. कॉलेजला शिकत असताना तिचे एका टुकार व कोणतेही काम करत नसलेल्या मुलावर प्रेम जडले. व करील तर या मुलाशीच लग्न करेल अशी तिने मनाशी खूनगाठ बांधली.वडील आपल्या लग्नाला मान्यता देणार नाहीत हे जाणून एक दिवशी घरी चिठ्ठी ठेवून मुलगी घरातील एक लाख रुपये व काही सोन्याचे दागिने घेऊन या टोकर मुलाबरोबर पसार झाली.

दुसऱ्या दिवशी चिठ्ठी वाचून मिलिट्री मॅन असलेल्या मित्राला जबरदस्त धक्का बसला. त्यांच्या मते आता माझी सर्व प्रतिष्ठा धुळीला मिळाली. यावर चर्चा चर्वण झाले.अनेकांनी त्यांना सल्ला दिला. मुलगी कुठे असेल तिथून घेऊन या आणि मुलीचे रीतसर त्या मुलाबरोबर लग्न लावून द्या.

शेवटी हाच निर्णय घेऊन मुलाच्या घरी जाऊन आम्ही लग्न लावून देतो मुलगा कुठे आहे त्याला घेऊन या. असे मुलीच्या कडच्यानी सांगितले. मुलाला आणि मुलीला मदत करणारे मित्रांनी मुलास आणि मुलीस घरी बोलावून घेतले.

रीतसर लग्नाची बोलणी झाली. मुलीला घरी आणण्यात आले. सर्व नातेवाईकांनी आणि वडिलांनी मुलीला खूप समजावले परंतु मुलीचे एकच म्हणणे. करील तर त्याच्याशी लग्न करेल नाहीतर नाही. सर्व उपाय खुंटले.

आणि मुलीचे जमिनीवरील हक्क सोड पत्र घेऊन तिचा मोठ्या समारंभात लग्नविधी लावून दिला.

मुलगी नांदायला सासरी आली. नव्याचे नऊ दिवस संपले. जवळ असलेले सर्व पैसे संपले.शेवटी दागिने ही गहाण ठेवले व मौज मजा केली. मुलगा काहीच काम करीत नसल्यामुळे पैशाचा स्त्रोत हा तसा नव्हताच. शिवाय सासर कडे ज्यांची परिस्थिती ही बेताचीच असल्यामुळे चैन करणे यांना काही परवडेना.मुलीच्या वडिलांनी लग्न झाल्या झाल्या मुलीबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकल्यामुळे मुलीला वडिलांकडे सुद्धा मदत मागता येईना.

मुलगा कोणतेही काम करत नव्हता, त्यामुळे पैसा नाही. मुलाला दारूचे व्यसन लागले. संध्याकाळी घरात भांडणे होऊ लागली. मुलीला अक्षरशः मजुरी करण्याची वेळ आली. नवरा मुलीकडे मजुरी केलेल्या पैशांची सुद्धा मागणी करायचा.अशी बिकट अवस्था मुलीची झाली.

समाजात अशा या घटना सतत घडत असतात. तर मुख्य मुद्दा हे सर्व कशामुळे झाले.आज आपण मुला-मुलींना संपूर्ण स्वातंत्र्य देतो.प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे. रात्री दोन दोन वाजेपर्यंत चॅटिंग करणे, रील पाहणे, इंस्टाग्राम,फेसबुकचा सर्रास वापर करताना तरुणाई दिसत आहे. आणि ती बघून त्यावर आपले मत ठरवत आहेत. 

कोणताही अनुभव नसताना निर्णय घेण्याची स्वातंत्र्य ते आई-वडिलांकडे मागत आहेत.आई-वडिलांच्या अनुभवाला केराची टोपली दाखवत आहेत. आणि आपणच कसे हुशार आणि अनुभवी आहेत हे सिद्ध करताना दिसत आहेत.

काही काही मुले / मुली तर आई-वडिलांना, तुम्हाला काय कळतंय यातलं. तुम्ही गप्प बसा. अशी वाक्य त्यांच्या तोंडावर फेकतांना दिसत आहेत.

समाजाची दुसरी बाजू तर अतिशय विदारक आहे. स्वतःला सुशिक्षित आणि हाय प्रोफाईल म्हणून घेणारे काही काही आई-वडील मुलींच्या लग्नाचे वय संपून देखील प्रतिष्ठेच्या बडेजवा पाई चांगली चांगली स्थळे हातची घालवत आहेत. या पायी मुलीचे वय केव्हाच उलटून गेलेले असते. याची ते पर्व देखील करत नाहीत. 

पूर्वी लोक म्हणायचे, मुलीचे लग्न योग्य वेळी होणे हे केव्हाही चांगले. त्या काळात फार फार तर 24 च्या आत मुलीचे लग्न केले जाई.

परंतु आता शिक्षणाचे कारण सांगून किंवा सेटल होण्याची कारण सांगून 32- 35 पर्यंत लग्न केले जात नाही. यातून हे लोक निसर्ग नियम तोडत आहेत हे स्पष्ट आहे.

आज समाजाला संस्काराची गरज आहे, परंतु आजच्या या आधुनिक सोयी सुविधा ब्रह्मराक्षस बनून आपल्याच छाताडावर बसले आहेत. श्रीराम श्रीकृष्ण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हिंदुस्थानात आज आपल्याकडील असgलेल्या संस्कारांचा ऱ्हास होऊन एक विदारक चित्र समाजात निर्माण झाले आहे.


संजय सोळशे यांचे हॉटेल सह्याद्री



 श्री संजय सोळशे (वांजळे ता.खेड ) यांचे हॉटेल सह्याद्री 

अप्रतिम चव, प्रशस्त जागा, गाड्या पार्किंगची सोय असलेले पश्चिम भागातील एकमेव हॉटेल. ( हॉटेल सह्याद्री )

परवा गावी जाण्याचा योग आला.जाताना वांजळे तालुका खेड, जिल्हा पुणे येथे एक नवीनच हॉटेल दिसले. गाड्या पार्क करण्यासाठी प्रशस्त जागा असल्यामुळे सहजच मनात विचार आला चला चहा  घेऊया.

हॉटेलमध्ये गेल्यावर कळले की हे हॉटेल श्री संजय सोळशे यांचे आहे. तिथे गेल्यावर संजय किचनमध्ये आचारी काम करीत होता. नुकताच कढईमध्ये भज्यांचा घाणा टाकला होता.आणि त्याचा दरवळ नाकातोंडात घमघमात होता. कांदा भजी खाण्याची तीव्र इच्छा होत होती.परंतु आम्ही आधीच डेहणे येथे श्री राजू शेठ उबाळे यांचे हॉटेलात नाश्ता केला असल्यामुळे केवळ चहाच मागवला.

अरे! संजय हे तुझे हॉटेल आहे ? हो.. संजय म्हणाला.

तेथे भीमाशंकरला जाण्यासाठी आलेले अनेक भाविक आणि पर्यटक नाश्ता करण्यासाठी बसले होते. मोठ्या आवडीने लोक नाश्ता करत होते.

थोड्याच वेळात चहा आला. चहा घेतल्यावर चहाची अप्रतिम चव जाणवली. अतिशय फक्कड असा चहा होता. चहा पिताना खूपच समाधान वाटले. आणि त्याहीपेक्षा संजयचे हॉटेल पाहून  अतिशय आनंद वाटला.

संजय हा माझा वर्गबंधू.अभ्यासात तसा जेमतेमच होता. नववी पर्यंत शाळा शिकला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे आणि शिक्षण जेमतेम असल्यामुळे  राजगुरुनगर येथे हॉटेल लक्ष्मी येथे  वेटरचे काम करू लागला.

वेटरचे काम करीत असताना प्रचंड कष्ट घेऊन आचारी काम सुद्धा त्याने शिकून घेतले. त्याच्यामध्ये हॉटेल टाकायची खूप जिद्द होती. परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे काहीच पर्याय शिल्लक नव्हता.

पावसाळ्यात भीमाशंकर ला जाणाऱ्या पर्यटकांची खूपच वर्दळ असते. हे पाहून नेकलेस धबधब्याजवळ संजयने एक छोटे तात्पुरते हॉटेल सुरू केले. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. लोक तेथे चहा नाश्ता करू लागले. परंतु एक महिन्यानंतर पुन्हा काय करायचे हा प्रश्न होताच. कारण धबधब्याचे पाणी कमी झाल्यावर लोक तेथे थांबत नसत.

खूप कष्ट आणि मेहनत करून संजयने त्याच्यात शेतात अगदी  राजगुरुनगर भीमाशंकर या रस्त्याच्या कडेला वांजळे गावच्या हद्दीत अतिशय टुमदार व सुंदर असे हॉटेल टाकले आहे. प्रशस्त जागा, गाड्या पार्किंग करण्याची सोय शिवाय अविट गोडीचे चविष्ट असे पदार्थ संजयच्या हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत. फक्त एकदा तिथे जाऊन खात्री करण्याची आवश्यकता आहे.

भीमाशंकरला जाताना अवश्य श्री संजय सोळशे यांच्या  वांजळे येथील..... हॉटेल ला भेट द्या.

आपल्या भागातील नव उद्योजक श्री संजय सोळशे यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अतिशय गरीब परिस्थिती असलेला युवक कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अगदी वेटर पासून स्वतःचे हॉटेल सुरू करतो. हेच खरे भूषणावह आहे. आपल्या भागात असे उद्योजक तयार होणे अतिशय आवश्यक आहे आहे.. सलाम  माझ्या वर्ग बंधू  संजयला.






बुकिंग साठी,संजय सोळशे यांचा संपर्क:- 8788416205



 

विठ्ठल भगत देवाचा पुजारी


गावात सगळ्यात जास्त भोळा भाबडा स्वभाव कुणाचा होता किंवा असेल तर तो म्हणजे विठ्ठल भगत...

विठ्ठल भगत म्हणजे आमच्या काळभैरव तथा वनदेवाचा पुजारी. सर्व गाव त्याला इठल्या आज्या या नावाने हाक मारायचे..विठ्ठल भगत म्हणजे आख्या गावाचा आजा....

विठ्ठल भगताला ओळखत नाही असा एकही माणुस सापडायचा नाही.

गावात सगळ्यांचा आवडता देवाचा पुजारी कोण असेल तर तो म्हणजे विठ्ठल भगत..नव्हे तो देवाचाही सर्वात आवडता पुजारी होता.

विठ्ठल भगत म्हणजे एक ठेंगणा ठुसका बांधा..काळा सावळा वर्ण,धोतर व पैरण व टोपी असा पेहराव. ही कपडे एखाद्या कार्यक्रमालाच हं...नाहीतर सदानकदा कमरेला टाँवेल व अंगात बंडी असे.

श्री.काळभैरव देव तसे अतिशय कडक देवस्थान.देवाच्या भोवती व सबंध पांढरीत (गावच्या हद्दीत) नाना प्रकारचे देव.. कोणत्या देवाला शेंदूर लावायचा आणि कोणत्या देवाला नुसतीच तेल लावायचे हे विठ्ठल भगत लिलया करायचा.

आघुटीची साथ व दिवाळीच्या साथीला पांढरील सर्व देवांना ( पाच पंचवीस देव ) शेंदूर व काही देवांना तेल लावायचे.नैवद्य दाखवायचा हे अतिशय अवघड काम विठ्ठल भगताला करावे लागे.देवाच्या बाहेर आंब्याच्या बनात पंधरा वीस देव प्रत्येकाला कोणता नैवेद्य  व कोठे ठेवायचा हे विठ्ठल भगतच जाणो.

देवाला सकाळ संध्याकाळी दिवा लावायचा. तेही त्याच  ठराविक वेळेला. त्यात कधीही बदल झाला नाही.टायमिंग म्हणजे टायमिंग.दर गुरूवारी व रविवारी देवाकडे खुप गर्दी असे. सकाळी भल्या पहाटे नदीवर जाऊन पाणी आणने. देवावर जलाभिषेक करून तिळाच्या तेलाचे देवाला माजणे करणे,भक्तांनी अणलेले तेल,आगरबत्ती,धुप लगामी लावुन ठेवणे.त्यांचे नारळ फोडुन अर्धा नारळ परत भक्ताकडे देणे.आंगारा देणे इत्यादी कामे विठ्ठल भक्ताला करावे लागत.

शिवाय सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे देवाला प्रसाद लावणे.

चाफ्याच्या कळ्या देवाच्या अंगाखांद्यावर ठेवून व पाण्याचा  देवावर हलकासा सपकारा मारून विठ्ठल भगत प्रसाद मागायला देवाच्य गाभाऱ्या बाहेर बसे.अनेकांची अनेक प्रकारची गा-हाणी असत.उजवी डावी चाले.कधीकधी देव पटकन उजवी किंवा डावी कळी सोडे..कधीकधी देव लहान मुलासारखा हट्टी होई तेव्हा..विठ्ठल भगत लहान मुलाला समजावतात तसे देवाला अर्जव करे...सोड...बाबा..सोड कोणतीही एक कळी सोड.

गरीब माणुसय, लय लांबुन आलाय तो.असे नको करू?

 दे त्याला कळी...नको टाईम लावू..सोड...सोड...सोड बरं..बाबा सोड ..

असे म्हणून परत परत देवावर पाण्याचा सबकारा मारला जाई..विठ्ठल भगत घामाघुम होई .आर्धातास होऊनही कधीकधी देव काय कळी सोडायचाच नाही.मग विठ्ठल भगत आलेल्या भक्ताला सांगायचा पिपरीला (गावाचे नाव) प्रसाद चालू असतील. तु बाबा पुढच्या रविवारी ये.असे मोठ्या निराशेने सांगे.तर कधीकधी देव पटापट कळ्या सोडायचा..

मला तेव्हा विठ्ठल भगताचे खुप अप्रूप वाटे.देव विठ्ठल भगताचे ऐकतो.आणि ते खरेही होते.वास्तव सत्य ..देवाचा सर्वात प्रिय भक्त कोण असे तर तो म्हणजे विठ्ठल भगत.त्यांच्या नंतर गावाने दुसरा पुजारी नेमला तरीही विठ्ठल भगत दररोज न चुकता देव दर्शनाला जात असे.

विठ्ठल भगताचे दुसरे आवडते काम म्हणजे गुरे संभाळणे..हे करत असतांना त्याला अनेक लोक भेटत.लोक विठ्ठल भगताची आस्थेने विचारपुस करत.विठ्ठल भगतही लोकांशी अत्यंत आदबीने बोले..आहो.जाहो करत असे.

 मला विठ्ठल भगत मास्तर म्हणत असे...कधी आले..कस काय बरं आहे का? माझ्या जवळ सुख दुःखाच्या गोष्टी मोठ्या विश्वासाने सांगत असे.मीही गाडी थांबवुन आस्थेने विचारपुस करत असे.

यात्रेला...साथीला,देव बसताना,देव पारधी जाताना विठ्ठल भगताची मोठी कसरत असे...अनेकांच्या अंगात वारे येई.विठ्ठल भगताचा लटकाप होई..सर्वांना ओवाळले जाई.तेव्हा कोठे वारे शांत होई.देवाची पुजा करताना डाव्या हातात घंटी व उजव्या हातात धुपात्र घेऊन जेव्हा तो पुजा करत असे तेव्हा त्याचे संपुर्ण शरीर लटलट हाले.

गावाने जवळजवळ 42 लाख रुपये खर्चून श्री काळभैरवनाथाची नवीन मंदिर बांधले.मंदिराच्या जिर्णोद्धार होता त्या दिवशी मंदिराच्या कळसावरून चिल्लर रूपया,दोन पाच दहा रूपयाची नाणी सोडायची होती. मी जमलेल्या भक्त भाविकांकडुन नाणी गोळा केली.त्यावेळी शेजारीच उभे असलेल्या विठ्ठल भगताकडे नाण्यांचे तबक दिले.व माझ्या शिवाय कोणाकडेही देऊ नको असे बजावले.आणि एकजणाला मंदिरावर चढवायला आम्ही दोघा तिघांनी मदत केली. त्या दरम्यान माझा भाऊ अनिल तळपे याने ते तबक विठ्ठल भगताकडुन अजुन नाणी गोळा करण्यासाठी घेतले...माणुस वर मंदिरावर चढल्यावर त्याच्या कडे तबक द्यायचे होते म्हणुन मी विठ्ठल भगताकडे तबकाची मागणी केली.आधीच उशिर झाला होता..विठ्ठल भगत अतिशय घाबरला.त्याच्या तोंडुन शब्द फुटैना..अंग थरथरू लागले.तेवढयात भावाने तबक माझ्याकडे दिले.मी ते वर दिले.

मी विठ्ठल भगताला विचारले येवढा का घाबरलाय? त्याचे उत्तर मास्तर तुम्ही माझ्याकडे मोठ्या विश्वासाने तबक दिले.अन मी दुसरीकडे दिले.पैशाचे काम..कुणी लांबवले असते तर? केवढे महागात पडले असते.शिवाय देवाच्या कामात खोळंबा झाला असता.तर? असा हा विठ्ठल भगत.

मी लहान असताना माझी आजी नेहमी म्हणायची. बाळ मोठा झाला की तीन थराचे घडीव  दगडी जोत्याचे पाच खण कौलारु घर बांध. मी सन 2014 साली माझ्या आजीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. घर बांधत असताना आमच्याच गावातील विलास बांगरने अतिशय सुंदर दगडाचे जोते बनवले. हे काम जवळजवळ सहा महिने चालू होते. विठ्ठल भगताने जेव्हा ते जोते पाहीले तेव्हा त्याला खुप आनंद झालेला मी पाहिला.

मास्तर या जोत्याला तुम्ही लोखंडी कड्या बसवा.लय भारी दिसेल.जोत्याला कड्या बसवतात हे माझ्या गावीही नव्हते.पडत्या फळाची आज्ञा समजुन मी दोन हजार रूपयांच्या पितळी कड्या आणल्या. विलासने जेव्हा त्या कड्या बसवल्या तेव्हा ते जोते खुपच आकर्षक दिसू लागले.तात्काळ विठ्ठल भगताला बोलावून आणले.त्याने जेव्हा त्या जोत्याला लावलेल्या कड्या पाहिल्या तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसले ते अद्यापही माझ्या मनात कायम आहे.मी जेव्हा गावी जातो.आणि जेव्हा माझे लक्ष त्या कड्यांकडे जाते तेव्हा मला प्राकर्षाने विठ्ठल भगताची आठवण येते.व मी मनोमन त्या थोर माणसाला वंदन करतो.

विठ्ठल भगताकडे खुप गायी असायच्या..वासरे असायची.गो-हे असायचे.कायम बैल,गो-ह्यांची खरेदी विक्री व्हायची.अनेक लोक बैल पाहण्यासाठी विठ्ठल भगताकडे येत असत.

विठ्ठल भगताच्या काळात तीन वेळा मंदिर बांधले.त्याने तीनही वेळचा जिर्णोद्धार होताना पाहिला.

मंदिराचे काम लांबले.गावाजवळचे पैसे संपले.तसतसे विठ्ठल भगताला काळजी वाटू लगाली.मला भेटल्यावर मास्तर देवाचे तेवढे काम होयला पाहिजे होते.लय लांबले.इठल्या आज्या अजुन पंधरा वीस लाख रूपये लागतील.तेव्हा होईल.त्याला सध्या हजार दोन हजार रुपये सुद्धा कळत नव्हते त्याला पंधरा-वीस  लाख म्हणजे काय हे कसे समजणार ? मग मी समजावून सांगे.त्यावर त्याच्या चेहऱ्यावर मोठी विष्षणता पसरे.अगदी.चिंतातुर होई.

मग मीच म्हणे ! होईल देवाचे काम.देवालाच काळजी.आपण प्रयत्न करायचा तो बुद्धी देईलच ना..होणार काम.

मग मी त्याला देणग्या गोळा करण्यासाठीचे नियोजन सांगे..मग हळुहळु त्याच्या चेह-यावर समाधानाची लकाकी दिसे.

श्रावण /भाद्रपद महिन्यात अनेक गाया /म्हशी व्यायच्या.लोक गाया म्हशींचे कोवळे दुध देवाला नैवेद्यासाठी  घेऊन देवळात येत.मंदिरामध्ये कोवळे दुध व गुळ तांदळाची खीर शिजवली जाई.ही गरम वाफाळलेली खीर चाफ्याच्या पानावर खाताना  स्वर्गीय पक्वान्न खाल्याचा आनंद होत असे.विठ्ठल भगत आग्रहाने खीर वाढे.अशी खीर  दुसरीकडे मिळणार नाही..अप्रातिम चव.

एकदा मी सुमारे महिना दिड महिना आजारी होतो.माझा तपास करण्यासाठी विठ्ठल भगत दररोज सकाळ किंवा संध्याकाळ देवाचा अंगारा घेऊन  न चुकता येऊन विचारपुस करून जात असे.

मंदिराचे येवढे मोठे व सुंदर काम होऊनही विठ्ठल भगताचे मन थोडे खट्टूच होते.मी त्याला सहजच विचारले..इठल्या आज्या.मग कसे काय झालय मंदिराचे काम?

मास्तर मंदिराचे काम भागात चांगलं झालय.मंदिराचे कळशी काम अन या भिंतीला व खाली जमीनीला लावलेल्या लाद्या बघुन मी पार दिपुन गोलो..माझ्या सपनातबी असं मंदिर होईल असा विचार नव्हता केला...



पण मास्तर आपल्या बाबाला (देवाला) सागवानी गाभारा पाहिजे होता..तेच एक राहिलय.

विठ्ठल भगताच्या तिव्र इच्छा शक्तीमुळे देवाने त्याचे गा-हाने ऐकले. कारण आम्ही देवाचा लोखंडी व स्टीलचा गाभारा करण्याचे काम एका कॉन्ट्रॅक्टरला दिले होते. त्यासाठी त्याला 50 हजार रुपये दिले होते. परंतु वर्ष होऊनही काम काही होत नव्हते. शेवटी तो कॉन्ट्रॅक्टर बोलला. मला काही तुमचे काम करता येणार नाही. तुम्ही दुसरीकडून करून घ्या.

एकदा असेच बसलो असता श्री.नामदेव हुरसाळे म्हणाले..वाळदचे श्री.जालिंदर पोखरकर सागाची लाकडं देतोय.पाहिजे तेवढी..पण त्यांच्या रानातुन आपल्याला ती तोडावी लागतील.

काय अश्चर्य पहा..हेच गाभाऱ्याचे काम स्टील (लोखंडी) करायचे होते...हे काम आम्ही काँन्ट्रेक्टरला ठरवून पण दिले होते..परंतु हे काम देवालाच मान्य  नव्हते ...कारण तेथे काहीतरी व्यत्यय आला..व हे काम बारगळले.


सागवानाचा विषय झाल्यावर क्षणाचाही विलंब न करता ग्रामस्थांनी घेतला.व लगेच सागवानी लाकडे तोडायला ग्रामस्थ गेले.ही सर्व लाकडे श्री.दत्तू सुतार यांच्या दारात टाकली.हे काम ७५०००/- हजाराला ठरवून दिले. हे काम देखील वर्षभर चालले.नक्षीकाम करण्यासाठीच्या लाकडाना तोटा आला.परत काम बंद पडले..पुन्हा लोकांनी उचल खाल्ली.परत लाकडे तोडली.व ही सर्व लाकडे मंचर येथे कापायला नेली. परत ४२०००/-रूपये खर्च आला..हेही काम सुमारे वर्षे भर चालले.अतिशय सुंदर असा सागवानी गाभारा तयार झाला. मंदिरात नेऊन बसवला.रूबाबदार गाभारा पाहून मन प्रसन्न झाले..रूखरूख एकाच गोष्टीची वाटते ती म्हणजे हा देव्हारा पहायला आता विठ्ठल भगत हयात नाही.

विठ्ठल भगताने गावात कधीच कोणाशी भांडण केले नाही..की कोणाला शिव्या दिल्या नाहीत.कधीच कुणाबद्दल वाईट बोललेलं मी त्याला पाहिले नाही..किंवा कुणाबद्दल अढी बाळगली नाही.किंवा कधीच कोणाचे पैसे बुडवले नाहीत.अथवा मागीतलेही नाहीत.

विठ्ठल भगत हे अतिशय साधेभोळे व्यक्तिमत्त्व होते.लोकही विठ्ठल भगताच्या वाटेला गेले नाहीत.गावात कुणाचे भांडण झाले अथवा कुणी एखाद्याला  मोठमोठयाने बोलले तर विठ्ठल भगताचे अंग लटलट कापायचे.असे हे व्यक्तिमत्त्व.

विठ्ठल भगताने जी देवाची/गावाची सेवा केली आहे ते गाव कधी विसरू शकणार नाही.येवढे मात्र खरे...

🙏🙏💐💐


 

 

गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस