लहानपणी तो शिकायला आमच्याकडे होता.एकदा अचानक तो गायब झाला.त्याला सगळीकडे शोधून पाहिले परंतु तो काही सापडला नाही.तेव्हा सहज आडात पडला की काय बघायला लोकांनी जेव्हा आडात शोध घेतला तेव्हा तो आडात अगदी तळाशी बसून होता.आडात अगदी कमी पाणी होते म्हणून नशीब.त्याला लोकांनी आडातून बाहेर काढले.आणि उगाच नसती आफत नको म्हणून माझ्या वडिलांनी त्याची रवानगी त्याच्या गावी केली.
एकदा त्याने सातवीच्या वार्षिक परीक्षेच्या वेळी मराठीचे पेपर मध्ये प्रश्नाचे उत्तर म्हणून त्यावेळी फेमस झालेली गाणे जवा नवीन पोपट हा हे लिहिले होते आणि नापास झालो होता.त्याने त्याच्या सातवी नापासच्या दाखल्यावर नापासच्या पुढील ना ब्लेडने खोडून पास असे भासवले होते.
आठवीत सतत तीनदा नापास झाल्यावर त्याला आमच्या वडिलांनी म्हशी घेऊन दिल्या होत्या.रोज नदीकाठी म्हशी चारायला न्यायाच्या.म्हशीबरोबर नदीत डुंबायचे.दुध पिऊन व्यायाम करायचा.असा शंकर दादाचा नित्यक्रम झाला होता.
शंकर दादा रोज रात्री लोकांच्या शेतातील कोवळी मक्याचे ताटवे उपटून आपल्या म्हशीना आणायचा.त्यासाठी रोज तो वेगवेगळ्या शेतात जायचा.मला त्याला रात्री अपरात्री सोबत जावे लागायचे.
आमच्या मामाने म्हणजेच त्याच्या वडिलांनी पूर्वी पैलवानकी केली असल्यामुळे शंकरदादा भागातील एक नामांकित पैलवान व्हावा असे त्यांना वाटत होते.आणि लवकरच त्यांचे स्वप्न शंकरदादाने पूर्ण केले.शंकरदादा भागातील एक नामांकित पैलवान झाला.भागातील यात्रा मधून तो अनेक कुस्त्या निकाली करायचा.दोन मिनिटात समोरचा पैलवान चितपट व्हायचा.असे अनेक डाव शंकर दादाकडे होते.
शंकर दादा पहाटे व्यायाम करायचा.त्यामुळे नाईलाजाने मला देखील पहाटे उठावे लागे व इच्छा नसताना देखील त्याच्याबरोबर जोर बैठका काढाव्या लागत.
मी लहान असताना एकदा त्याच्याबरोबर म्हशीकडे कडे गेलो होतो. नदीच्या कडेला असलेल्या निवडुंगाला लालसर फळे आले होती. ती लालसर फळे शंकर दादांनी तोडली व त्यातील मला एक दिले.आम्ही दोघांनीही ती फळे खाल्ली. परंतु त्या फळाचे काटे माझ्या संपूर्ण जिभेला टोचले. व मी रडू लागलो. शंकर दादांनी मग माझ्या जिभेवरचे सर्व काटे हळूहळू काढून टाकले. परंतु त्या फळाची उग्र दर्प असलेली गोडसर चव अजूनही माझ्या मनात आहे.
शंकरदादाला पत्ते खेळण्याचा मोठा नाद होता.त्यासाठी तो कधीकधी माझ्याकडे पैसे मागायचा.मी काय बधत नाही असे त्याच्या लक्षात आल्यावर तो दहा रुपये दे संध्याकाळी वीस रुपये देतो असे आमिष दाखवायचा.शेवटी मला पैसे द्यावे लागायचे.पत्यात पैसे जिंकले की मला तो वीस रुपये द्यायचा. परंतु कधीकधी माझ्याकडले आहेत तेही पैसे जायचे.मग मात्र मी सावध व्हायचो. व शक्यतो त्याला पैसे द्यायला टाळायचो.
सन 1992-93 ला मी दहावीला असताना इतिहास व भूगोलचे सर आम्हाला खूपच गृहपाठ देत असत. गृहपाठ लिहून न आणल्यास अगदी वीस वीस छढ्या देत असत.माझ्या दृष्टीने इतिहास व भूगोल हे अतिशय सोपे विषय असल्याने मी दुसरे विषयांना अभ्यासासाठी प्राधान्य देत असे. माझी इतिहास व भूगोलचे गृहपाठ लिहून देण्यासाठी शंकर दादा धावून येत असे. त्याचे अक्षर सुंदर होते. परंतु त्याला डोके कमी होते. मी त्याला गाईडवर खुणा केलेली प्रश्न व त्याचे उत्तरे वहीवर लिहायला सांगायचो. तो मन लावून सगळे गृहपाठ पूर्ण करायचा. त्या बदल्यात मी त्याला पत्ते खेळण्यासाठी दहा रुपये द्यायचो.
एकदा तो बटाटयांच्या काढणीसाठी सातगाव पठारला गेला होता.सकाळी नऊ ते संध्याकाळी सात पर्यंत तो बटाटे काढायचा.त्यावेळी त्याला चाळीस रुपये रोज मिळायचा.वीस पंचवीस दिवस काम करून शंकर दादा घरी आला.
त्यानंतर दोन दिवसांनी आम्ही आंघोळीसाठी नदीवर चाललो असता वाटेत एक कातकरी भेटला. त्याच्याबरोबर अजून एक कातकरी होता.तो शंकर दादाला बोलला.दादा हा कातकरी आमच्याकडे पाहुणा आला आहे. त्याला कोकणात जायचं आहे.त्याच्या घरी मॅटर झाला आहे.त्याला पैशाची अत्यंत गरज आहे.त्यामुळे तो त्याच्याकडली चैन विकणार आहे. दोन तोळ्याची चैन आहे.पाच हजार रुपये म्हणतोय तो. बघ घ्यायची आहे का तुला? कातकऱ्यांनी त्याच्या हातात चैन दिली.शंकर दादाजी चल बी चल सुरू झाली. शंकर दादा बोलला घेतले असते रे चैन, पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत कातकरी बोलला किती आहे तुझ्याकडे?
नऊशे रुपये आहेत शंकर दादा बोलला.
पाहूणा कातकरी बोलला. दोन हजार रुपये दे आणि चेन घेऊन टाक.त्याचवेळी माझ्या मनात शंका आली. ही चैन एक तर चोरीची असली पाहिजे. नाहीतर डुप्लिकेट.
मी शंकर दादाला बोललो. दादा नको आपल्याला चैन.चल उशीर झालाय.
शंकर दादा बोलला 900 रुपयाला द्यायचे असेल तर बघ. लगेच नऊशे रुपये रोख आणून देतो. माझ्याकडे तेवढेच आहेत.
पाहुणा कातकरी बोलला.दोन हजार रुपयाला घे.आता 900 दे व बाकीचे 1100 मी नंतर आल्यावर घेईन. मी शंकर दादाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्याने माझे ऐकले नाही. लगेच घरी जाऊन त्याने 900 रुपये आणले. आणि कातकऱ्याला दिले व चेन घेतली.चैन गळ्यात घालून तो चालू लागला. तो एकदम खुशीत होता. त्याचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही.
आठच दिवसात चैनीचा रंग बदलला. पिवळी धमक असलेली चेन आता काळपट दिसू लागली. म्हणून आम्ही तज्ञ लोकांकडे जाऊन चैन तपासून घ्यायला गेलो त्यावेळी त्यांनी सांगितले अरे ही चैन बाजारी आहे.वीस पंचवीस रुपयाची आहे.त्यावेळी शंकर दादाच्या पायाखालची वाळू सरकली.तो एकच बोलू लागला. पैसे गेल्याचे दुःख नाही रे.परंतु वीस पंचवीस दिवस मी रोज सकाळी नऊ ते संध्याकाळी सात पर्यंत बटाटे काढायचो. ते कष्ट माझ्या डोळ्यापुढे येते.असे म्हणून तो दुःखी झाला.मी त्याला बोललो.आता दुःख होऊन काय उपयोग ? मी तुला पहिलेच सांगितले होते. परंतु तुला हाव नडली त्याला मी काय करणार.
शंकर दादाला लोकांची टिंगल करायची खूपच सवय होती. तो कोणत्याही माणसाची टिंगल करायचा. एकदा त्याने आम्हाला उघड आव्हान दिले. मी कुणाची ही टिंगल करू शकतो. एकदा तेथील जिल्हा परिषद सदस्य यांची तू टिंगल करू शकतो का ? असे आम्ही त्याला विचारले. तर तो लगेच तयार झाला. परंतु त्या बदल्यात तुम्ही काय देणार? असा आम्हाला त्याने प्रश्न केला.
तुला अब्बास सेठच्या हॉटेलात मिसळ खायला घालीन.आणि टिंगल नाही केली तर तू आम्हाला मिसळ खायला घालायची अशी आम्ही पैज लावली.दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच जिल्हा परिषद सदस्य असलेले कै.नानासाहेब कशाळे अब्बास शेठच्या हॉटेलला चहा पिण्यासाठी आले.त्यांच्याबरोबर अनेक स्थानिक लोक होते.शंकर दादा आणि आम्ही तिथे गेलो.लगेच शंकर दादाने नानासाहेब कशाळे यांची टिंगल सुरू केली. त्यांनी पण खिलाडू वृत्तीने हसून दाद दिली.तेव्हा मात्र आम्हाला शंकर दादाला मिसळ खायला घालावी लागली. असा हा शंकर दादा.
शंकर दादा आणि मी त्यांच्या अंगणात असलेल्या खटार गाडीत झोपायचो.एकदा आम्ही खटार गाडीत आकाशाकडे तोंड करून झोपलो असता आकाशातून एक पेटलेला उल्का आमच्या दिशेने अत्यंत वेगाने खाली कोसळू लागला.आम्ही दोघेही घाबरून गेलो. शक्यतो उल्का आकाशातच पेटतो व नष्ट होतो.परंतु हा पेटलेला उल्का आमच्या बाजूलाच येऊन पडला. लागलीच आम्ही दोघे उल्का पडला होता त्या ठिकाणी गेलो. तो लालबुंद दगड हळूहळू थंड झाला.अजूनही तो उल्का शंकर दादाकडे आहे.असाच एकदा गावाला असाताना माझा मित्र आजारी पडला होता.भगताने त्याला खुप मोठे भुत लागले असुन हे भुत उतरावे लागेल व रोगी बरा झाल्यावर उतारा म्हणुन एक बोकडाचा बळी द्यावा लागेल असे सांगीतले.परंतू एवढा खर्च आवाक्याबाहेर असल्याने मित्राचे वडिल चालढकल करू लागले.भगत सारखाच येऊन त्यांना सांगू लागला.ते भुत माझ्याकडे येऊन सतत मला तु सांगीतलेल्या प्रमाणे रोगी बरा झाला आहे.आता बोकडाचा बळी लवकर द्या.नाहीतर तुझ्याकडेच पहातो.असे म्हणत आहे.तुम्ही ताबडतोब तयारी करा नाहीतर पुढे मी जबाबदार राहणार नाही.मित्राचे वडिल सुशिक्षित असुनही हादरले.लगेच एका शुक्रवारी गावच्या हद्दीच्या बाहेर मध्यरात्री बोकडचा बळी देण्याचा कार्यक्रम ठरला.त्या प्रमाणे तयारी करण्यात आली.या कार्यक्रमाला माझ्यासारखेच अनेक उत्साही लोक जेवणासाठी आले होते.बाहेर गावचे अनेक नातेवाईक व त्यांचे मित्र जेवणासाठी आले होते.बोकडाच्या मानाने जेवायला आलेली गर्दी पाहुन आपल्याला आता अर्धपोटी रहावे लागते की काय अशी मला शंका आली.मी शंकरदादाला बोलुन दाखवली.तो म्हणाला अजिबात काळजी करू नको मी आहे.कारण तो खुप वेळा असल्या कार्यक्रमांना जाऊन आला होता.ठरल्या प्रमाणे सर्व तयारी झाली.भगताच्या अंगात देव संचारला. तो सांगेल तो विधी करण्यात आला.पळसाच्या मोठया पानावर नुसत्याच भरपुर मटणाचा नैवेद्य भुतासाठी थोडया अंतरावर भगताने सांगीतलेल्या ठिकाणी ठेवण्यात आला. नैवेद्य ठेवायला अर्थात श्री शंकर वनघरे गेला होता. विशेष म्हणजे हा नैवेद्य थोडयावेळाने परत आणुन भगताने खायचा असतो. इकडे विधी चालुच होता.भगताला नविन धोतर,नेहरूशर्ट,टोपी व उपरने व रोख एक हजार रूपये देण्यात आले.हा कार्यक्रम चालू असताना शंकर रावने भुताला दाखवलेला नैवेद्य उचलुन आणला.व थोडया अंतरावर आम्ही दोघांनी जाऊन त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला.व परत गर्दीत येऊन मिसळलो.रात्र बरीच झाली होती.विधी संपला सर्वजण जेवायला बसलो.भगतासाठी भुताला दाखवलेला नैवद्य आनायला सांगीतला.तेथे अर्थातच नैवेद्य नव्हता.खरोखरच भुताने प्रत्यक्ष येऊन नैवद्य खाल्ला अशी भगताने सगळ्या जमलेल्या लोकांना सांगीतले.भुत फार जालीम होते.ते सतत माझ्याकडे जेवण मागत होते.पाहिलत ना तुम्ही?प्रत्यक्ष .झाली ना तुमची खात्री? असे म्हणुन भविष्यात अशीच सावज मिळविण्यासाठी स्वत:ची जाहीरात करून घेतली.आणि पुढे हाच भगत पश्चिम भागात नावारूपाला आला. डाँक्टर पेक्षा पेशन्टची गर्दी याच्याकडे होऊ लागली.(त्या काळात एवढी प्रचंड अंधश्रद्धा होतो की भुताचा नैवेद्य खाणे दुरच पण ठराविक ठिकाणी असलेल्या भुताचे नाव जरी काढले तरी अंगावर काटा यायचा.तेव्हा एवढी हिम्मत आम्ही दोघे सोडुन कुणाच्यातच नव्हती.विशेष म्हणजे तेव्हा मी दहावीला होतो.
शंकर दादा वयाने एवढा मोठा झाला आहे. तरीसुद्धा त्याचा पोरकटपणा अजून कायम आहे. एकदा त्याच्या गावातील एका दुकानदाराचे घर जळून खाक झाले होते.माणुसकीच्या दृष्टिकोनातून मी शंकर दादा बरोबर त्यांच्या जळालेल्या घरी गेलो. घर पूर्ण जळून खाक झाले होते.घरातील बरेच साहित्य जळले होते.दगडाच्या भिंती सुद्धा धुराने काळ्या कुट्ट झाल्या होत्या. जळालेल्या घराचा मालक आणि मी घराची पाहणी करत होतो. आणि अशावेळी शंकर दादा खाली अर्धवट जळालेले शेंगदाणे गोळा करीत होता. त्याने बरेच शेंगदाणे गोळा करून एकेक खायला सुरुवात केली. आम्हाला म्हणाला देखील शेंगदाणे खूप खरपूस आहेत बर का. अशावेळी आम्ही दोघांनीही कपाळावर हात मारून घेतला. दुकानदार बोलला अरे शंकर माझे एवढे नुकसान झाले आहे आणि तु खुशाल शेंगदाणे खातो. तुला काही लाज लज्जा आहे की नाही. यावर शंकर दादा बोलला.आप्पा झाले ते झाले.
तुला नुकसान भरपाई भेटेल की. यासाठी आम्ही प्रयत्न करू काळजी करू नको.आणि इतकेच नव्हे तर शंकर दादाने त्यांना नुकसान भरपाई देखील मिळवून दिली होती.
शंकर दादाने आयुष्यात कधीच काम केले नाही. केवळ म्हशी सांभाळणे, नदीवर पोहणे, मासे पकडणे, शेळ्या मेंढ्या विकत घेऊन त्या चाकणच्या बाजारात जाऊन विकणे. म्हशींची खरेदी विक्री करणे एवढेच तो आयुष्यात काम करू शकला. त्याने कधीही कुठल्याही गोष्टीचे टेन्शन घेतले नाही. कोणत्याही दुःखद प्रसंगामुळे आणि संकटामुळे तो हातबल झाला नाही.
एकदा मी त्याच्याकडे खूप रात्र झाल्यामुळे मुक्कामाला राहिलो होतो. रात्री जेवण करून आम्ही ओटीवर झोपलो. परंतु त्याच्या दारात चार-पाच कुत्री येऊन भुंकू लागत. आम्हाला काही झोप येत नसे. मग आम्ही दरवाजा उघडून त्या कुत्र्यांना दूरवर हाकलत असु. आम्ही अंथरुणावर येऊन झोपलो ना झोपलो तो परत ती कुत्री दारात येऊन ओरडत असत.त्यामुळे आम्हा दोघांनाही झोप काही येत नव्हती. तो म्हणाला अरे आजच असं झालय. तू आला म्हणून की काय ? त्यानंतर आम्हाला केव्हातरी डोळा लागला तोच दरवाजाचा खडखडाट ऐकू आला. शंकरदादा ने दरवाजा उघडला तर बाहेर बाळू कोरडे उभा होता. तो म्हणालाशंकर अरे आजी वारली..तू एक काम कर. मंदोशीला नातेवाईकांकडे जा व त्यांना निरोप दे. तोपर्यंत आम्ही तयारी करतो. बाकीची माणसे नातेवाईकांना बोलवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतो. आम्ही दोघेही उजाडल्यावर मंदोशीला गेलो.
शंकर दादाचे एका मुलीचे लग्न झाले असून एक मुलगी परदेशात नोकरी निमित्त आहे.. व एक मुलगा चाकण एमआयडीसी मध्ये कामाला आहे. आजही शंकरदादा जेव्हा भेट होईल तेव्हा कडकडून मिठी मारून भेटतो. व जुन्या आठवणीत रमून जातो .