पाऊलवाटा

पाऊलवाटा / पायवाट

आजच्या आधुनिक काळात पाऊलवाटांचे असणारे अनन्य साधारण महत्व लयाला गेले आहे. साधे उदाहरण पहा.
आपण विचारतो अमुक अमुक माणूस कुठे राहतो?
समोरचा माणूस म्हणतो. अमुक अमुक रस्त्याने जा. पुढे गेल्यावर प्रमुख तमुक रस्ता लागेल. पाऊलवाटांची जागा रस्त्याने घेतले आहे.

तेच पूर्वी विचारले जायचे.ओ पाव्हणं..दत्ता तिटकारे यांच्या घराकडे जाण्यासाठी वाट कुठून आहे ओ ? तमुक तमुक वाट कुठे जाते हो ?

याबाबत आशा भोसले यांचे ही वाट दूर जाते. स्वप्नातल्या गावा  हे गीत आठवत असेलच..किंवा रान जागे झाले सारे, पाय वाटा जाग्या झाल्या हे भावगीत आपणा सर्वांच्या स्मरणात आहेच.

त्याप्रमाणेच ही पायवाट दूर जाते, स्वप्नातल्या गावा 

यावरून पूर्वी पायवाटना किती महत्त्व होते हे लक्षात येते.

पूर्वी सर्व सर्व ग्रामीण भागाचे दैनंदिन जीवन हे पायवाटांशी निगडित होते. पायवाट ह्या त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता.

मला लहानपणापासून माझ्या गावाकडील असलेल्या पाऊलवाटां विषयी खुप प्रेम आहे. मी जरी आता त्या पाऊलवाटाने जात नसलो तरी मनाने मात्र सतत त्या पाऊलवाटाने जात असतो.

पुर्वी लोक पाऊलवाटांनेच प्रवास करत असत. प्रत्येक पाऊलवाटांचे रहस्य अगदी वेगळे असे. रानात जाणाऱ्या पाऊलवाटा, शाळेत जाणारी पायवाट, शेताकडे जाणा-या पायवाटा,बाजारला जाणाऱ्या पायवाटा,गुरांना चरावयास घेऊन जाणाऱ्या पायवाटा,शेजारच्या गावांना जोडलेल्या पायवाटा, गावातील वाड्यावस्त्यांकडे जाणाऱ्या पायवाटा, रानात  व जंगलात जाणाऱ्या पाऊलवाटा,ओढ्याच्या कडेने जाणारी पाऊलवाट असे गावाकडे कितीतरी पाऊलवाटांचे प्रकार पहायला मिळतील.

प्रत्येक पाऊलवाटेचे वैशिष्ट्य हे ठरलेले असे. सरपण आणण्यासाठी स्रिया जेव्हा सकाळी घराबाहेर पडत तेव्हा याच पाऊलवाटेने अगदी चालता चालता चटणी भाकरी खात खात जात असत. 

काही कामानिमित्त बाहेर गावी पाऊलवाटेने बाजाराला अथवा इतर कामासाठी एस.टी ने प्रवास करायचा असेल तेव्हा लोक बाजरीची भाकरी, लसणाची चटणी किंवा तव्यावरची वाटोळी भजी रूमालात बांधून घेऊन जात असत.

तेच शेतातील पाऊलवाटेने घरधन्याला पितळीत भात, त्यामध्ये तांब्या त्यात मसुराची आमटी किंवा दुसरे एखादे कोरड्यास (कालवण) कांदा त्यावर भाकरी फडक्यात बांधून डोक्यावर घेऊन व दुसऱ्या हातात पाण्याने भरलेली कळशी घरधनीण घेऊन जात असे.

रानात गुरे चारण्यासाठी जात असलेल्या गुराख्याच्या कमरेला चटणी भाकरीचे गाठोडे बांधलेले असे. प्रत्येक पाऊलवाटेने जातांना मनात एक वेगळेच नाते तयार झालेले असे.रानात जाताना, शाळेत जाताना, शेताकडे जातांना,बाजाराला जाताना, गुरांकडे जातांना,माहेरी अथवा सासरी जातांना, लग्नकार्यासाठी जाताना,मयतीला जाताना जेव्हा जेव्हा या पाऊलवाटांनी जाऊ तेव्हा अगदी वेगळीच हुरहुर वाटत असे.

शाळेत जातांना आम्हाला त्यावेळी दररोज पाच किलोमीटर दुर असलेल्या गावी शाळेत जावे लागायचे.हमरस्त्याने जातांना जशी वेगवेगळी स्टेशने लागतात. अगदी तशीच स्टेशने पाऊलवाटेने पण असायचीच बरं का ? परंतु ही काही वांची नावे नाहीत हं. शाळेत जाताना  गोठणी, शिंबारटाक, खिंड, सटवाय, कनीर, किंवा बहिरी ठकीचे घर, वाजदरी, खोब-या आंबा, खोल वहाळ असे थांबे असत.

शाळेत जातांना खिंडीतुन पुढे शिरगावला न जाता डाव्या बाजुला आंब्याच्या शेजारून दोन दगडांमधुन जाणाऱ्या पाऊलवाटेनेच जायचो व यायचो. ही वाट अगदी डोंगरांच्या पोटाखालुन जात असे. ही वाट अगदीच नागमोडी व वळणावळणाची व दगडधोंड्यातुन जाणारी होती. तेथे असणाऱ्या उंबराच्या झाडाखाली दगडात कोरलेल्या चौकोनी टाकात हमखास पाणी असायचे व त्याशेजारीच पाण्याचा झरा होता. हे पाणी साधारण एप्रिल पर्यंत असायचे. आम्ही हे पाणी अगदी उपडे पडून प्यायचो. या पाण्याची चव अद्यापही विसरलो नाही.

मला तेव्हा खूप आवडायची ती म्हणजे ओढ्याकडेने जाणारी पायवाट.ही काळी असते.ओढ्याच्या कडेला छोटी लव्हाळी व रानफुले वाऱ्याच्या झुळके बरोबर डोलत असतात.बेडकाचे डराव डराव ओरडणे चालू असते. हे ऐकत असतानाच पाण्यातील रान कोंबडी पक पक पक ओरडत असते.ओढ्याचे खळखळणारे पाणी,पान कोंबडीचा व बेडकांचा आवाज,आणि रान फुलांचा सुगंध यांनी मनमोहून जायचे. मी अगदी रमतगमत शेताकडे चाललेला असायचो.

ओढ्याच्या कडेला असलेल्या झाडावर खंड्या म्हणजेच धीवर  पक्षी पाण्यात सळसळणाऱ्या माशांकडे अगदी शिकार पडण्याच्या नादात एकाग्र नजर रोखून बसलेला असतो. त्यावेळी अपसुकच लहानपणी असलेल्या कवितेच्या ओळी गुणगुणाव्याशा वाटायच्या.

तळ्याकाठी गाती लाटा, लाटांमध्ये उभे झाड !

झाडावर धीवराची, हाले चोच लाल जाड !!

पावसाळ्यात सगळ्यात अवघड वाट म्हणजे गव्हाळीची वाट. ही वाट पाऊस पडल्यावर अतिशय चिकट असायची. चालताना अगदी बेताने चालावे लागे. चालताना थोडी जरी चूक झाली तरी दोन्ही पाय सटकून बुडावर पडलोच म्हणून समजा.मुंबईवरून गावाला येणारी मुले या पायवाटेने चालताना हमखास पडायची.

शेताच्या बांधावरून चालताना बांधाच्या दोन्ही बाजूला गुडघ्या इतके उंच हिरवेगार गवत डोलत असते. आणि मधून काळी कसदार वाट अगदी चित्रासारखी दिसत असायची. दोन्ही बाजूला भाताची शेती फुलोऱ्यात असते. फुलोऱ्याचा मंद सुवास नाकात तोंडात दरवळत राहतो. या दरवळीचा आनंद लुटत असताना.गवतावर असलेले दवबिंदू उन्हाचे किरण पडल्यावर अगदीच चमकत राहतात. हे दवबिंदू अगदीच मोत्यासारखे दिसतात. त्यामधून इंद्रधनु सारखे रंग तरळत असतात. हे सर्व निसर्गाचे वैभव पहात आम्ही मार्गस्थ व्हायचो.

आम्ही लहान असताना बांधावरच्या या वाटेवर दोन्ही बाजूचे गवत एकत्र करून त्याची गाठ बांधायचो.आणि दूर उभे राहून गंमत पहायचो. एखादा बेसावध माणूस तिथून जाताना बरोबर पाय अडकून पडायचा.

काही वाटा या कोणताच पर्याय शिल्लक नसल्यामुळे ओढ्यातून जायच्या.ओढ्यातून जात असताना चप्पल हातात घेऊन पाण्यातून चालावे लागे. पाण्यातून चालताना डुबुक डुबुक आवाज व लाटांच्या लहरी दिसत राहायच्या.

जून महिन्यात पेरणी केल्यावर हुशार शेतकरी शेताच्या बाजूला काटेरी कुंपण घालायचा. परंतु शेतातून जाणारी ही वाट अतिशय बेरकी. कितीही कुंपण असले तरी एखाद्या मांजराला ज्याप्रमाणे घरातून अनेक वेळा बाहेर काढल्यावरही ते पुन्हा घरात येत राहते त्याप्रमाणे ही पाऊलवाट कितीही कुंपण घातले तरी त्यामधून जाणार म्हणजे जाणारच. शेवटी शेतकरी ही हार समजून एके दिवशी तोही त्या वाटेने जात राहतो. अशी ही पाऊलवाट.

या पाऊलवाटा जेवढ्या हव्याहव्याशा आणि सुंदर वाटतात तेवढ्याच त्या कधीकधी नकोश्या वाटायच्या. डोक्यावर एखादे गाठोडे घेऊन जात असताना ही वाट संपता संपत नसायची.

गावाला अनेक वाड्यावस्त्या असल्यामुळे गावाला अनेक पाऊलवाटांचे जाळे निर्माण झालेले असते. वडाच्या वाडीकडे जाताना खतारी,आराशीचा खडक,टाक्याची गोटी,नावठिका असे थांबे असत.(शेतांची नावे) तसेच पुढे जाताना गव्हाळी, चोहंड ,व डोंगराच्या अंगा खाद्यावरून वरच्या वाटेने जाताना वनस्पत्या, आघाडी, मोरटाकं, बेडंखिंड हे थांबे असत.

गावातुन रस्त्याने व नंतर शेताच्या शेजारून, बांधावरून, ओढ्यातुन कळाम मेहर व नर्ह्याकडुन पुढे जावळेवाडीकडे जाणारी वाट चालताना निसर्गाचा आस्वाद घेत फारच छान वाटायचे.

तळेघरला बाजारला डोक्यावर हिरड्याचे गाठोडे घेऊन जाताना खरी कसोटी लागायची.साधारण चारेक किलोमिटर उभा डोंगर चढायचा. त्यात डोक्यावर ओझे. सोमाण्याचा घाट, दिवस्या उंबर, बोरीचा धस चढुन गेल्यावर पुढे माचीत ओझी उतरायची. घटकाभर विश्रांती घेऊन परत डोंगर चढायचा.

भुमीर, धायटावणा, ना-याचा माळ चढुन मुख्य माळात आल्यावर थंडगार वा-याची झुळुक लागायची. घामाने भिजलेले अंग सुकुन जायचे. तेथे जवळच फडावर हिरडे घालायचे.त्याचे पाच दहा रूपये यायचे. हे पैसे पाहून कोन आनंद व्हायचा. बाजारात जाऊन केव्हा एकदा बर्फाची गारेगार खाऊ असे व्हायचे.

दिवस मावळतीकडे आल्यावर रानात शिकारीला जात असू. अंगावर घोंगडी व हातात काठी, शिकारीचे जाळे (वाघुर) घेऊन आम्ही पायवाटांनी रानात जाऊन जाळे लावून शिकार येण्याची वाट पहात असू.साधारण साडे आठ ते नऊ वाजे पर्यंत आम्ही रानात थांबून नंतर घरी येई. अंधारात चालताना या पाऊलवाटांनी कधीही दगा दिला नाही.

एखाद्याचे जनावर जर घरी आले नाही तर आम्ही पाच सात जण रात्री रानात जात असू. सर्व वाटा पिंजून जनावर सापडुन घरी घेऊनच येत असू. एवढ्या त्या वाटा आमच्या मनात अगदी घर करून होत्या.

गावी असताना रानातील,शेतातील,गावाजवळील असंख्य पाऊलवाटा अनवाणी नेहमी तुडवायचो.सतत त्यावर वावर असायचा.त्यांचे व आपले एक मैत्रीचे जणू नातेच तयार झाले होते.या पाऊलावाटा आयुष्याचा दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक होत्या.

काही वाटा अगदीच भेसुर वाटायच्या.तेथे भुते असतात.असा एक मतप्रवाह असायचा.त्यांच्या गोष्टी लोक तिखटमीठ लावून सांगायचे. तेथून जाताना रात्रीचे सोडा दिवसा भिती वाटायची. खिंडीतली वाट,खालच्या माचीतली वाट, ढगाखालची वाट, धायटावण्याची वाट, आडाकडची वाट, ही काही उदाहरणे.

रानात गेल्यावर तहान लागली की या वाटाच पाण्यापर्यंत घेऊन यायच्या. देवकड्यामधले पाणी, कोटमाचे पाणी, पळसावण्याचे पाणी, धोधानीच्या चोहंडीतील पाणी, मोरटाक्याचे पाणी अतिशय मधुर चव. देवकड्यामधील पाणी आणि धोदाणी तील चोंडीतील पाणी अगदी मे महिन्यातही अतिशय थंड बर्फासारखे असायचे. पाणी पिताना दातांना ठणक लागायचा.

शालेय जीवनात या पाऊलवाटा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होऊन गेल्या होत्या. शाळेत जाताना, रानात हिरडे गोळा करताना, सरपण आणताना, आंबे, जांभळे, करवंदे खाताना, शिकारीस जाताना, शेतावार जाताना,बाजाराला जाताना रोज या पाऊलवाटांचा सहयोग असायचा.पण याच पाऊलवाटा आता दुर्मिळ झाल्या आहेत. ज्या पाऊलवाटांनी आपल्यावर प्रेम केले, आपल्या जीवनाचा घटक झाल्या त्याच पाऊलवाटांना आज आपण या दुनियेच्या बाजारात गेल्यावर विसरलो. हे मात्र नक्की.आता केव्हातरी या पाऊलवाटांनी चालावेसे वाटते. 

सगळ्या पाऊलवाटा पुन्हा एकदा तुडवाव्या वाटतात. परंतु नोकरीच्या निमित्ताने पोटापाण्यासाठी आपले गाव सोडून दूर शहरात राहत असल्यामुळे योग मात्र केव्हा येईल हे सांगता येत नाही.

रामदास तळपे








प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे

प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे 

महादेव गोपाळे हे कळमोडी गावचे सुपुत्र. अवघ्या जगप्रसिद्ध  रांगोळीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना आजपर्यंत विविध पुरस्काराने गौरवले आहे.

प्रारंभिक जीवन 

महादेव गोपाळे हे कळमोडी गावचे रहिवासी. लहानपणापासून त्यांना उपजतच कलेची आवड होती. तिसरी चौथीला असताना ते मातीचे गणपती, मातीचे बैल,मातीची भांडीकुंडी बनवायचे आणि यातूनच कलेचा जन्म झाला.

महादेव यांच्या घरची परिस्थिती जेमतेमच म्हणावी लागेल. शेतकरी कुटुंब असल्या मुळे अपसुकच जनावरे आली.छोट्या महादेव यांना शाळेबरोबर दुपारनंतर गुरे राखण्याचे काम करावे लागायचे.शेतीची कामे करावी लागत. हे करत असताना महादेव यांची उपजत असलेले कला बाहेर डोकावत असे. शेणाच्या गोवऱ्या करताना सुद्धा त्या सुंदरच झाल्या पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष असे.

कळमोडी गाव हे अतिशय ग्रामीण व दुर्गम भागातील गाव. त्यावेळी चालायला नीट रस्ते नव्हते. गाड्या तर दूरची गोष्ट. राजगुरुनगर पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले गाव. त्यावेळेस एसटीचे सोय सुद्धा नव्हती.पायीच प्रवास करावा लागत असे. 

त्यांना तिसरी चौथीला असताना एक शिक्षक होते त्यांना चित्र काढण्याचा छंद होता.उपजतच कलेची आवड असलेल्या महादेव गोपाळे यांना हे शिक्षक म्हणजे दुधात साखर. त्यांच्याकडून थोडेफार शिकायला मिळाले.

कलेची जोपासना 

छोटा महादेव कागदावर चित्र काढू लागला. या चित्राला रंग दिले तर हे चित्र खूपच उठावदार होईल व सुंदर सुद्धा. परंतु त्यावेळी रंग कुठे होते? परंतु छोटा महादेव खूपच उत्साही मुलगा होता. त्याने कोळसा पाण्यात घासून  काळा रंग तयार केला. 

रानभेंडीतील फुलातील मागच्या बोंडातील पिवळा द्रव काढून तो पिवळा रंग म्हणून वापर केला.घेवड्याच्या पानाच्या रसापासून हिरवा रंग तयार केला.

गेरूपासून तांबडा रंग तयार केला. पूर्वी गावाला लोक निळ पावडर वापरत असत. त्यापासून निळा रंग तयार केला.आणि त्याने काढलेल्या चित्राला रंग भरले.आणि हे चित्र इतके उठावदार झाले की महादेव स्वतःवर खुश झाला. गावातील सर्व लोकांना हे चित्र खूप आवडले. अशाप्रकारे महादेव यांच्या कलेचा जन्म झाला.

पुढील शिक्षण

त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण कळमोडी या गावी झाले.पुढील शिक्षणासाठी त्यांना वाडा या गावात जावे लागले. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर विद्यालय वाडा या शाळेतील इयत्ता नववीला दाखल झाले.वाडा ही खेड तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठी बाजारपेठ होती.

वाडा या गावात शिक्षणासाठी प्रवेश घेतला परंतु राहण्याची सोय नव्हती.त्यामुळे गोपाळे यांना वाडा ते कळमोडी असा 14 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागे. दररोज शाळेत व शाळा सुटल्यानंतर घरी यावे लागे. उन्हाळ्यामध्ये पायाला चटके बसत. परंतु चप्पल नसल्यामुळे झाडाची पाने तळपायाला बांधून प्रवास करावा लागे. त्या काळात सर्व लोकांची अशीच सर्वसाधारण परिस्थिती असायची.

पावसाळ्यात तर त्यांचे खूप हाल होत असत. दिवसभर त्यांचे कपडे ओले असायचे.ते सांगतात या आजन वयात एकदा त्यांनी पैसे नसतानाही मिसळ व पाव खाल्ले. त्याबद्दल त्यांना हॉटेल मालकाकडून मार मिळाला.

कशासाठी? पोटासाठी

वाडा गावात त्यांनी आठवी आणि नववी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परंतु घरची परिस्थिती सर्वसाधारण असल्यामुळे  कुटुंबाला हातभार लावला पाहिजे या जाणिवेतून त्यांनी मुंबई गाठली. मुंबईला गेल्यावर दूध केंद्रात पहाटे उठून दूध पोचवण्याचे काम केले. आणि रात्रपाळी दहावी केली.

दहावी झाल्यानंतर रोजी रोटी साठी काहीतरी केले पाहिजे, गावाकडील असलेल्या आई-वडिलांना मदत केली पाहिजे त्यामुळे काहीतरी पर्यायी नोकरी करणे अतिशय आवश्यक होते. त्याचवेळी प्रसिद्ध चित्रकार श्रीकांत घोंगडे यांच्याशी त्यांची ओळख झाली.आणि महादेव यांची लहानपणी असलेल्या कलेला चालना मिळाली. घोंगडे यांनी त्यांना कलेबद्दल खूप काही शिकवले.

अपमानाचे शल्य 

मुंबईमध्ये चाळीत राहत असताना एकदा ते एका चाळीतील खोलीमध्ये खिडकीतून टीव्ही पाहत असताना मालकाने ते पाहिले आणि त्यांच्या कानशिलात लगावली. त्यावेळी दूरदर्शन हे एकच वाहिनी होती. झालेला अपमान गिळून टाकण्याशिवाय गोपाळ यांच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. गरिबीचे ते एक विदारक चित्रच होते.

कलेला वाव मिळाला.

त्यावेळी सिनेमांची पोस्टर ही हाताने बनवली जात व रंगवली जात. 1980 साली ते सिनेमांची पोस्टरचे पेंटिंग व कलर काम करू लागले. त्यावेळी त्यांना तुटपुंजा मोबदला मिळायचा.

बाळकृष्ण आर्ट दादर व श्रीकांत धोंगडे यांचे चित्रपट पोस्टर बनविन्या साठी असिस्टंट म्हणुन काम केलं.रांगोळी व पोस्टर पेंटींग करण्यासाठी स्वित्सर्झलॅंन्ड येथे प्रात्याक्षिक केलं

चित्रपट पोस्टर,माफीचा साक्षीदार,अरे संसार संसार,देवता,सुन माझी लक्ष्मी,चटक चांदणी,शापीत,भालु,राघु मैना,लक्ष्मीची पाऊले अशा अनेक चित्रपटांचे पोस्टर बनविन्याची कामे केली..हिरो, हमजोली, तोहफा, हिम्मतवाला, अशा अनेक हिंदी चित्रपटांचे पोस्टर बनवले.

हे पोस्टर बनवत असताना त्यांच्या हिताचिंतकाने त्यांना रेल्वेमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याचे सांगितले. रेल्वे मध्ये तांत्रिक विभागात भरती निघाली होती.गोपाळे यांनी अर्ज दाखल केला.आणि काही कालावधीतच त्यांना नोकरीवर हजर होण्याचा आदेश आला.आणि अशा तऱ्हेने पोटापाण्याचा विषय संपला.

रांगोळीतील कलेतील चंचू प्रवेश 

तो काळ मुंबईतील अनेक शहरांत रंगावली प्रदर्शन भरण्याचा होता. घाटकोपरमधील भाजी गल्लीत दर वर्षी "प्रवीण वैद्य" हे रांगोळी प्रदर्शन भरवीत असत. त्याने महादेव इतके प्रभावित झाले की, दररोज कामावरून घरी आल्यावर ते रांगोळी काढू लागले व नंतर त्यात निष्णांत बनले.

रेखाटलेल्या रांगोळी चित्रांचे नमुने त्यांनी वैद्य यांना दाखविले.त्यांनीही महादेव यांच्या रांगोळी चित्रांची प्रशंसा केली आणि त्यांना प्रदर्शनामध्ये संधी दिली.रांगोळीच्या विविध कला त्यांनी आत्मसात केल्या. 

त्यांना रांगोळी काढण्यासाठी आमंत्रित करण्यात येऊ लागले. मुंबईमध्ये हळूहळू त्यांचे नाव नावारुपाला आले. त्यांनी प्रसिद्ध रमाधाम खोपोली येथे बाळासाहेब,व मीनाताई ठाकरे यांची रांगोळी काढली आहे.


या संधीचे सोने करत महादेव यांनी आपल्या आयुष्यात यशाचे रंग भरले. रांगोळीचा सराव आणि गुरुस्थानी असलेल्या वैद्य यांचे मार्गदर्शन घेऊन स्वत:ची अशी वेगळी शैली महादेव यांनी निर्माण केली. 

महाराष्ट्रभर रांगोळी प्रदर्शनात सहभाग घेऊन अनेक बक्षिसे पटकावली.रांगोळीतून साकारणारे पोर्ट्रेट इतके हुबेहुब वाटे की, ती व्यक्तीच आपल्यासमोर प्रत्यक्ष आहे इतके सजीव.गोपाळे हे रांगोळी चित्रात अक्षरश: जीव ओततात,

याबद्दल त्यांची रांगोळी चित्रे पाहणार्‍या कुणाचेही दुमत होऊ शकत नाही.पोर्ट्रेट ही त्यांची खासियत असली, तरी त्यांच्या सामाजिक जाणिवा इतक्या प्रगल्भ आहेत की, त्या त्यांच्या रांगोळी चित्रांतूनही उमटतात. कला हे माध्यम समाजप्रबोधनासाठी प्रभावी ठरू शकते, म्हणून गोपाळे यांनी पोर्ट्रेटबरोबरच समाजदर्शन व सामाजिक संदेश देणार्‍या रांगोळ्या रेखाटल्या. 

हुंडाबंदी, दारूबंदी, गुटखाबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, बालमजुरी, 26/11 दहशतवादी हल्ला, एस.टी. डेपो, रेल्वे स्थानक यांची, तसेच अनेक सामाजिक, राजकीय व कलाक्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची रांगोळी चित्रे त्यांनी रेखाटली

नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथील दिनांक 24 ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित समूह चित्र प्रदर्शनात चित्रकार महादेव गोपाळे यांनी काढलेली व्यक्तिचित्रे खूप गाजली. 

त्यांनी राजकीय पुढारी,गायक, चित्रपट सृष्टीतील कलावंत यांची व्यक्तिचित्रे आता पर्यंत अनेक काढली आहेत. पण या प्रदर्शनात प्रदर्शित संत गाडगेबाबा, भीमसेन जोशी, राष्ट्रपती अब्दुल कलाम, भाऊराव पाटील,रतन टाटा यांची व्यक्तिचित्रे त्यांनी  कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक  रंगविली. 

ही चित्रे पाहण्यासाठी चित्र रसिकांनी खूप गर्दी केली आणि त्यांचे कौतुक केले. त्यांत कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक माध्यमाचा वापर करून या चित्रांतून व्यक्ती, स्थान यांसोबतच अलंकरण, पेहराव यांचाही त्यांचा विशेष अभ्यास त्यांनी दाखविला.

वारकरी व्यक्तिचित्र ,तसेच चुलीवर घावणे बनविण्यात व्यस्त  असणार्‍या स्त्री चित्रात याचा प्रत्यय येतो. त्यांनी बिंदू आणि तिरप्या रेषांच्यासाहाय्याने वेगवान फटकाऱ्यांनी काढलेली ही चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. 

त्यांची रंगावली चित्रे पुस्तकात प्रसिद्ध आहेत.अशी विविध प्रकारची व्यक्तिचित्रे त्यांच्यातील समर्थ कलावंताची साक्ष देतात असे वाटते .असे त्यांच्या विषयी उद्गार प्रसिद्ध चित्रकार आणि क्युरेटर ज्यांनी चाळीसहून अधिक विविध बाल आणि तरुण  चित्रकारांची चित्र प्रदर्शने आयोजित केले आहेत.

चुलीवर घावणे बनविण्यात व्यस्त असणार्‍या स्त्री चित्रास त्यांना एस.पी. मेमोरियल ट्रस्ट, मुंबई पुरस्कृत थोर चित्रकार डॉ. एस.एम. पंडित यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेला पुरस्कार देण्यात आला. 

त्यांच्या कार्याची दखल जगाने सुद्धा घेतले आहे. रांगोळी कलेत सतत ४० कार्य केल्यामुळे भारत वल्ड रेकॉड केलं आहे. गिनीज वल्ड सहभाग प्रमाण प्रत्र व मेडल मिळाले. हा बहुमान त्यांचा नसून सर्व महाराष्ट्राचा आहे.

श्री गोपाळे यांची गाव असलेल्या कळमोडी येथे दरवर्षी श्रीरामनवमीच्या दिवशी यात्रा भरते.श्री रामाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर खूप मोठी श्रीरामाची रांगोळी काढली जाते.

यासाठी दोन दिवस आधीच तयारी करावी लागते. अगदी परिसर स्वच्छ करण्यापासूनची ते रांगोळी काढेपर्यंत ची सर्व तयारी महादेव गोपाळे यांनी करावी लागते. ते आनंदाने हे सर्व प्रत्येक वर्षी करत असतात. त्यांच्या गावावर त्यांचे निस्सीम प्रेम आहे. श्री रामावर भक्ती आहे.

अपमानाची परतफेड 

त्यांना ज्या हॉटेल आत मिसळ साठी पैसे दिले नाही म्हणून मार खावा लागला त्याच हॉटेल मालकाने प्रसिद्ध रांगोळी कार म्हणून त्यांचा त्याच हॉटेलमध्ये सत्कार केला.

तसेच ज्या खोली मालकाने त्यांना दूरदर्शन पाहण्यापासून रोखले व कानशिलात मारली त्याच महादेव गोपाळे यांची मुलाखत पुढे दूरदर्शनवर समाजाला पाहायला मिळाली. हा नियतीचा न्यायच म्हणावा लागेल.

श्री गोपाळे यांनी त्यांच्या आईच्या स्मृतिप्रतीर्थ शिवाजीनगर पुणे येथे बालगंधर्व रंग मंदिरात त्यांच्या पेंटिंग प्रदर्शन भरवले होते. यामध्ये गोपाळे साहेबांच्या संपूर्ण कला प्रवासाचा पेंटिंगच्या सहाय्यानेआढावा घेण्यात आला होता.यातून त्यांच्या आई विषयीची श्रद्धा दिसून येते.

परमेश्वराचा वरदहस्त

महाराष्ट्राच्या अतिशय दुर्गम अशा खेडेगावात कलेची कोणतेही पार्श्वभूमी नसताना श्री महादेव गोपाळे यांना परमेश्वराने कलेची उपजत देणगी दिली आहे. परमेश्वराचा वरद हस्त असल्यामुळेच ते हे सर्व काही करू शकले. हे नाकारता येत नाही.

भारताच्या राष्ट्रपतींनी घेतली होती दखल.

देहू येथे भरलेल्या रांगोळी प्रदर्शनामध्ये महादेव गोपाळे यांनी साकारलेल्या रांगोळीचे तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी उत्स्फूर्त दात देऊन गोपाळे यांचे कौतुक केले होते.

महादेव गोपाळे रेल्वे सेवेमधून सेवानिवृत्त झाले आहेत. भावी पिढीतील होतकरू तरुणांना ती मार्गदर्शन करत असतात. राजगुरुनगर मध्ये ते थोड्याच दिवसात प्रत्येक महिन्याला नियमित कार्यशाळा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळा घेतल्यावर होतकरू तरुण-तरुणींना यामुळे वाव मिळणार आहे. त्यांच्या कलेला प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे यांच्या निमित्ताने परिसस्पर्श लाभेल यातील मात्र शंका नाही.

श्री गोपाळे म्हणतात मी जरी सेवानिवृत्त झालो असलो. तरी माझ्यातील कला अद्यापही निवृत्त झालेली नाही.कलेचा गोडवा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे कलेच्या माध्यमातून आनंद द्विगुणीत होत आहे ही परमेश्वराचीच कृपा म्हणावी लागेल.

पत्नी सौ. मंगल यांचा यशात सिंहाचा वाटा 

या सर्व जीवन प्रवासामध्ये त्यांच्या पत्नी सौ. मंगल यांनी त्यांना उत्तम प्रकारे साथ दिली. व सतत प्रोत्साहन दिले, त्यामुळेच हा प्रवास करू शकलो म्हणूनच त्यांच्या या यशात त्यांच्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे असेही ते कृतज्ञते पूर्वक म्हणतात.

लेखक :- रामदास तळपे 
























































सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस