अशोक सुतार

अशोक सुतार', हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेला कलंदर माणुस. अशोक माझ्या पेक्षा चार वर्षांनी मोठा.शिवाय माझ्या शेजारीच लागुन त्याचे घर आहे. त्यामुळे त्याला मी  लहानपणापासून अतिशय जवळून ओळखतो.

अशोक हा लहानपणा पासून कुशाग्र बुद्धी असलेला, अत्यंत  हुशार मुलगा होता.त्याचा चौथी पर्यत कायम पहिला क्रमांक यायचा.त्याचे वडील लोहारकाम व सुतारकाम करायचे.शिवाय मामा टेलरिंग काम करायचे.त्यामुळे अशोक या तीनही कलांमध्ये लहानपणापासून पारंगत होता.

कब्बडी, कुस्ती व क्रिकेट मध्ये अशोकचा हात कुणी धरू शकत नव्हते. 

त्यावेळी भागात सर्व गावांमध्ये चौथी पर्यंतच शाळा असल्यामुळे पश्चिम भागातील मुलांना पुढील शिक्षणासाठी डेहणे येथे जावे लागत असे.तेव्हा गावातील सर्व शाळकरी मुलांना protection (संरक्षण) पुरवण्याचे काम अशोक करायचा. गावातील एखाद्या मुलाशी कुणी बाहेरच्या गावच्या मुलाने मारामारी केली.. व अशोकला नंतर कळले तर अशोक त्या मुलाला चांगलाच चोप देत असे.त्यामुळे आमच्या गावातील मुलांमुलीकडे वाकड्या नजरेने कुणी पहात नसे. एवढा अशोकचा त्यावेळी वचक होता.

अशोकला खालच्या वर्गातील मुले अशोकदादा' म्हणत असत. अशोक वरच्या वर्गात असल्याने परिक्षेच्या वेळी त्याच्या पुढे मागे खालच्या वर्गातील गावातील कुणीतरी मुलगा/मुलगीचा क्रमांक यायचा.तेव्हा अशोक पर्यवेक्षक बाहेर गेल्यावर पटकन त्या मुला /मुलीला तेवढ्या वेळात उत्तरे सांगायचा. 

तो काळ क्रिकेट या खेळाने भारलेला काळ होता.प्रत्येकाच्या मनात क्रिकेट या खेळाने "गारूड" केलं  होतं. सुनिल गावस्कर, रवी शास्री,कपीलदेव,व्यंकटेश प्रसाद, संजय मांजरेकर यांचा सुवर्णकाळ होता.अशोकच्या मामाकडे तेव्हा रेडिओ असायचा. त्याकाळी टि.व्ही.नव्हता. तेव्हा वन डे मँच हा प्रकार नसायचा.टेस्ट मँच खेळली जायची. ही मँच तीन दिवस चालायची.गावातील सर्व तरूण पोरं अशोकच्या दारात  काँमेंट्री ऐकायला जमत असत.यातुनच गावात क्रिकेटचे बीज रोवले गेले.

अशोकचे मामा बाळू सुतार हे लाकडाची छान बँट बनवून द्यायचे.

श्री. नामदेव शंकर तळपे यांच्या नेतृत्वाखाली श्री. काळभैरवनाथ क्रिकेट संघाची स्थापना झाली.अशोक सुतार डावखुरा फलंदाज सेहवाग सारखी स्फोटक फलंदाजी करायचा.त्याला उत्तम साथ (The wall) श्री.चंद्रकांत वाघमारे (बत्या) करायचा.तेव्हा सामने हे आँल आऊट असयचे.ही जोडी लवकर आऊट होत नसे.जोडीला श्री.चिमण जढर उत्कृष्ट बँट्समन व बाँलर,धोनी सारखा हेलीकँप्टर शाँट्स मारायचा..व धावगती वेगाने पुढे न्यायचा परंतू लवकर बाद व्हायचा. श्री.वामन जढर, श्री.मारूती आंबवणे (विकेट किपर) श्री.सोपान तळपे व कैलास सुतार (कुडे गाव) मध्यमगती गोलंदाज श्री.किसन आंभवणे कै.अहिलू (गोट्याभाई) श्री.कांताराम तळपे हे ब-यापैकी खेळाडू होते.तर श्री.नामदेव तळपे,मध्यम गती गोलंदाजी करत असे, श्री.धोंडू विष्णू तळपे हा शोएब अख्तर सारखी सुपरफास्ट गोलंदाजी करायचा.भलेभले फलंदाज त्याला भ्यायचे. तर चीमन जढर फास्टर गोलंदाजी करायचा.सोपान तळपे हा ही मध्यमगती गोलंदाज होता.

परंतू अशोक सुतार हा एकमेव असा फलंदाज होता की संपुर्ण मँच फिरवायचा.आणि मंदोशीचा विजय सुकर करायचा.त्या

 काळात सन १९८४ ते १९८८ मध्ये घोटवडी येथे तृतीय क्रमांक,डेहणे येथे चतुर्थ क्रमांक टोकावडे येथे तृतीय क्रमांक तर  कारकुडी येथे द्वितीय क्रमांक मंदोशी संघाने पटकावला होता.या चारही क्रिकेट स्पर्धा मध्ये अशोक सुतारने कमालीची बँटींग करून संघाला सामने जिंकून दिले होते. त्यामुळे गावातील सर्व ज्यांना क्रिकेट मधले ओ की ठो कळत नाही अशा सर्व अबालवृद्ध व माता भगीनींना संघाबद्दल प्रचंड अभिमान वाटायचा.गावातील लोक कौतुक करायचे.बाहेरगावी सामणे असले की गावचे लोक सामने पहायला पोरांबरोबर जात असत.

सन १९८५ साली मंदोशी गावाने श्री.नामदेव तळपे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नावठिका (मंदोशी) येथे फेब्रुवारी महिन्यात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. तेव्हा जवळजवळ १४ संघ दाखल झाले होते.या स्पर्धा तीन दिवस चालल्या होत्या. तेव्हा तेथे कै.देवराम तळपे यांनी बेसन लाडू व भजीचे दुकान लावलेले मला चांगले आठवते.शिवाय बर्फाच्या गारेगारी विकणारे पाच सहा सायकल स्वार दाखल होतेच.

स्पर्धेमध्ये व्यत्यय निर्माण करणाऱ्या टोकावडे गावच्या एक जणाला श्री.लक्ष्मण बाळू हुरसाळे यांनी चोप दिल्याने प्रचंड दहशत निर्माण झाली होती.त्या धसक्यानेच पुढील स्पर्धा सुरळीतपणे पार पडल्या होत्या. 

टोकावडे व कारकुडी संघाला हरवुन..मंदोशीचा संघ सेमी फायनल मध्ये गेला होता.नंतर सेमी फायनल मध्ये खरोशी संघाला धुळ चारली होती.प्रथम क्रमांक डेहणे दुसरा क्रमांक मंदोशी तीसरा क्रमांक तेरूंगण तर चौथा क्रमांक खरोशीचा आला होता.

खरोशी संघा बरोबर प्रथम गोलंदाजी करताना मंदोशी संघाने टिच्चून गोलंदाजी केली होती.श्री.धोंडू तळपे २ षटकात १५ धावा देऊन तब्बल तीन फलंदाज बाद केले होते.श्री. चीमन जढर यांनी दोन षटकात १६ धावा देऊन  दोन फलंदाज बाद केले होते.श्री,नामदेव तळपे यांनी दोन षटकात १४ धावा देऊन दोन फलंदाज बाद केले होते.तर श्री.सोपान तळपे यांनी दोन षटकात १९ धावा देऊन १ फलंदाज बाद केला होता. अशा प्रकारे आठ षटकांच्या या खेळात आवांतर धावासह ७३ धावा व ८ फलंदाज बाद झाले होते.

तर फलंदाजी करताना अशोक सुतार याने शेवट पर्यंत आउट न होता..३४ धावा केल्या होत्या. श्री.चंद्रकांत वाघमारे याने २१ धावा करून तो सातव्या षटकात बाद झाला होता.त्या नंतर आलेल्या श्री.चीमन जढर यांनी एका षटकात दोन षटकार व एक चौकाराच्या सहाय्याने १९ धावा करून मंदोशी संघाला दुसरा क्रमांक मिळवून दिला होता.या वेळी  मंदोशी ग्रामस्थांनी प्रचंड जल्लोष केला होता.

(या स्पर्धेची स्कोअर वही अजूनही मी जपुन ठेवलेली आहे.)*

विशेष म्हणजे अशोक सुतार हा उत्कृष्ट कुस्तीपटू देखील होता. लांग,बांगडी,पट,ढुंगनी,उपट ह्या डावात तो तरबेज असायचा. सलामीला खेळताना डोळ्याची पात लवते न लवते तोच लांग मारून प्रतिस्पर्धी पैलवान जमीनीवर उताना पडलेला दिसे.

अशोक सुतारची कुस्ती दोन मिनिटाच्या आत चितपट होत असे.प्रतिस्पर्धी पैलवानाला देखील आपण इतक्या लगेच कसे चितपट झालो हा भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असे. आखाड्यात एकच जल्लोष पहायला मिळे.अशोक वर बक्षिसांची खैरात होई.अनेक पदके, सन्मानचिन्ह,वस्तू रोख रक्कम त्याला मिळाली.भागात एक नावाजलेला पैलवान म्हणुन त्याची गणना होऊ लागली,मंदोशी गावचे नाव अधीच श्री.बारकू तळपे, कै.खेमा तळपे कै.हरिभाऊ आंबवणे, श्री,विष्णू पांडू तळपे, श्री.विष्णू गोमा तळपे,श्री.कुशाबा आंबेकर,श्री.होनाजी मोसे, श्री,हरिभाऊ हुरसाळे यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते.त्या ध्वजाला पताका लावण्याचे काम अशोकने केले..गावचे नाव उज्वल केले.अतिशय सन्मानाची व प्रतिष्ठेची शेवटची कुस्ती त्याच्यावर लावली जायची.व तोही या संधीचे सोने करत असे.त्यावेळी त्याला गावातील/ भागातील लोकांचे अलोट प्रेम मिळाले,अमाप प्रसिद्धी मिळाली.

अशोकच्या नशिबाने त्याला लहान वयातच हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळाली..असे असतानाही यात्रेच्या हंगामात त्याची कुस्ती बहरतच होती. क्रिकेटच्या खेळात त्याची बँट तळपतच होती..त्यावेळी तो प्रसिद्धीच्या व लोकप्रियतेच्या शिखरावर होता.त्याच्या पुढे आम्ही तेव्हा पालापाचोळा होतो..    

से असतानाही त्याने कधीच माज केला नाही.गर्व,अभिमान बाळगला नाही..नाहीतर थोड्याशा प्रसिद्धीने अर्ध्या हाळकुंडाने पिवळे होणारे कितीतरी जण समाजात असतात.

एकदा गावात जातीयवादाची केस झाली होती.पुणे ग्रामीण चे एस.पी.साहेब गावात आले होते.त्यांनी दोनही पार्ट्यांना एकत्र बोलावुन घेतले..हे प्रकरण मिटवण्यासाठी अशोकने अत्यंत महत्वपुर्ण भुमीका बजावली होती.तेव्हा स्वतः एस.पी. साहेबांनी त्याचे अभिनंदन  केले होते.

परंतू नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.मुबईला गेल्यावर वाईट मित्रांच्या संगतीमीळे अशोक नशेच्या आहारी गेला...पुढे त्याची कंपनीही गुजरातला गेली..कंपनीने अनेक जणांना थोडेफार पैसे देऊन घरी पाठवले.त्यात अशोकही होता.

घरी आल्यावर अशोक घरे बांधण्याची कामे करू लागला. उत्तम कामामुळे त्याला घराची कामे मिळू लागली.त्याचे तेथेही नाव झाले.परंतू येथेही दारूने त्याचा पिच्छा सोडला नाही.दारू पासुन परावृत्त करण्यासाठी खुप लोकांनी प्रयत्न केले.परंतु तो बधला नाही.पुढे तो पुर्णपणे व्यसनाधीन झाला.लोक त्याला काम देईनात.मदत करीनात. या मुळे घरी सर्वांची उपासमार होऊ लागली.शेवटी त्याच्या पत्नीने ऊदरनिर्वाहासाठी राजगुरूनगर गाठले.अशोकही तिकडे गेला.मी त्याला खुप समजावून सांगीतले.त्याला मी दहा- बारा हजार रूपायाची हत्यारे विकत घेऊन दिली..काही दिवस त्याने चांगले काम केले..परंतू थोड्या दिवसातच तो पुन्हा दारू पिऊ लागला यामुळे त्याचे जवळचे नातेवाईक मित्र त्याला सोडून गेले. त्याला लोक टाळू लागले.ओळखीचा जो भेटेल त्याच्याकडे तो पैसे मागु लागला.लोक त्याला अर्थीक मदत करायला कचरू लागले.त्याची सर्व प्रतिष्ठा धुळीला मिळाली..

आता कधीतरी अशोक दिसतो..हाडाची काडे झालेला अशोक...झोकांड्या खात रस्त्याने चाललेला अशोक...मळकी जीर्ण झालेली कपडे घातलेला अशोक ....तो बोलताना येणारा.प्रचंड उग्र दर्प..

त्याला पाहून मन सुन्न होते..काळीज चिरते.अगदीच गलबलून येते..मदत करायची इच्छा असुनही मदत करता येत नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल...😥😥


सुगीचे दिवस

 नवरात्रामध्ये भातशेती फुलो-यात असते.त्यानंतर शिवारातुन बांधावरून सकाळी किंवा दुपारनंतर फेरफटका मारताना एक वेगळीच मजा असते.वारा भणभणत असतो.त्या वा-याबरोबर भाताचा सुंदर  सुवास दरवळत रहातो.शिवारामध्ये अनेक जातीचे भातपीक लावलेले असते.परंतू प्रत्येक खाचराच्या बांधावरून चालताना वा-याबरोबर सुंदर असा सुगंध येत रहातो.जणू त्या खाचरातील भात पीक आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देत असते.

आता भाताच्या अनेक जाती उपलब्ध आहेत.अनेक संकरित जाती विकसित झाल्या आहेत.या जातीचे पीक भरपुर येते.प्रत्येक तांदळाची एक वेगळीच चव चाखायला मिळते.परंतु अस्सल गावरान तांदूळाचा भात खाण्यात जी मजा आहे ती मात्र कशातच नाही.

पुर्वी भाताचे अनेक देशी वाण होते.खडक्या, कोळंब, तामकुडा, तांबडा रायभोग,कमवत्या,जीर, इंद्रायणी असे ते वाण होते.पीक कमी परंतू चव मात्र अप्रतिम.भात जर शिजत असेल तर त्याचा दरवळ बाहेर अंगणभर येत असे.परंतू आता संकरित वाण आल्याने गावठी वाण कमी झाले आहेत.

भात कापणीचा हंगाम सुरू व्हायच्या आधी लोक आपापल्या  विळ्यांना लोहराकडुन धार लावून घेत.आमच्या शेजारीच चीमण लोहराचा भाता असे.सकाळी सात वाजल्या पासुन पंचक्रोशीतील लोकांची विळ्यांना धार लावण्यासाठी मोठी गर्दी व्हायची.संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम चालू असायचे.

गावातील वयोवृद्ध लोक भाताचे भारे बांधण्यासाठी भाताच्या  पेंढ्यांचेच आळे (दो-या) वळायचे.शिवाय भात साठवण्याच्या कणगी खाली बुडाला आधार म्हणुन पेंढ्याचीच गोल चुंबळ विणायचे.काही लोक नविन कणगी तयार करायचे तर स्रीया जुन्या रिकाम्या कणगी शेणाने सारवुन वाळवुन ठेवायच्या.ही सर्व तयारी आधीच करावी लागे.

भात कापणी

भात कापणीची जय्यत तयारी सुरू व्हायची.अगदी सकाळीच भात खाचरात जाऊन भाताचे पीक कापायला सुरूवात करायची.सुरूवातीला भात कापायला मजा वाटायची.नंतर मात्र डोक्यावरचे ऊन व सारखे वाकल्यामुळे कंटाळा यायचा.परंतू पाथ मागे राहता कामा नये या जाणीवेतुन भात कापायलाच लागले.आमच्याकडे भात कापणीला *येटाळणी* म्हणतात. 

अंधार पडे पर्यत भात कापायचे.नंतर घरी आल्यावर गरम पाण्याने अंघोळ करायची.दिवसमर भात कापल्यामुळे अंग अंबून जायचे.अंघोळ करताना अंगावर गरम पाणी घेतल्यावर स्वर्गीय आनंद व्हायचा.

जेवण झाल्यावर मात्र लगेच अंथरूणावर पडायचे.लगेचच  झोप लागायची.दुसऱ्या दिवशी मात्र उठुशीच वाटायचे नाही.सर्व अंग ठसठस करायचे.या कुशीवरून त्या कुशीवर होता येत नसायचे.परंतू नाईलाजाने उठावेच लागे.

पुन्हा सर्व आवरून पुन्हा शेतात भात कापायला जायचे.भात कापायला खाली वाकता येत नसे.इतके अंग दुखायचे.परंतू बळेच खाली वाकुन भात कापायला लागायचे.

भात कापताना अनेक विषयावर गप्पा मारत भात कापायचे. विळ्याने कुणाची बोटे कापायची.तरोट्याचा किंवा टणटणीचा पाला वाटुन त्याचा रस बोटावर पिळायचा.काथाडीने बोट बांधायचे.मग पुन्हा काम सुरू करायचे.खाचरात पाणी असेल तर मात्र खाचरात आळाशा करता येत नाहीत.सर्व भात खाचराबाहेर काढताना खुप त्रास व्हायचा.

दुसऱ्या दिवशी अंग बसल्यामुळे कालच्या इतके अंग दुखायचे नाही..

भाताची येटाळणी केल्यावर दुपारी मस्तपैकी नदीत किंवा ओढ्याच्या पाण्यात मनसोक्त पोहायचे.मासे पकडायचे.

पुर्वी ठराविक ठिकाणीच खळी असायची.एका खळ्यावर चार- पाच लोकांची भात झोडणी चालायची.एका एका खळ्यावर महिनाभर काम चालायचे.भात झोडणी झाल्यावर नाचणी. नाचणी सावा किंवा वरई,खुरासणी,हुलगा इत्यादी.धान्य असायची.परंतू आता मात्र भात सोडले तर सर्वच जवळजवळ बंद झाले आहे.

खळे

खळे तयार करताना सुद्धा मजा यायची.पहिल्या दिवशी खळ्यावर जाऊन पाच फावडी मारायची.नंतर दुसऱ्या दिवशी खळ्यावरचे सर्व गवत फावड्याने काढायचे.खड्डे भरून घ्यायचे.खळ्याच्या मध्यभागी तिवडा रोवायचा.खळ्यात पाणी मारायचे.नंतर शेण, पाण्यात कालवुन खळ्यात पसरायचे.निरगुडीच्या डहाळ्यांनी सारवायचे.झाले खळे तयार..याला शेणकाला म्हणतात.दुस-या दिवशीही अशाच पद्धतीने शेणकाला करायचा.

कापलेल्या भाताच्या आळाशा जमा करून भारे बांधायचे.हे भारे खळ्यावर घेऊन यायचे.खळ्याच्या एका बाजुला भारे उतरायचे.खळ्यात तिवड्याला लाकडी घडवंची बांधायची.

भात झोडणी

गावातील पाच दहा जण एकत्र येऊन कधी दिवसा तर कधी रात्री भात झोडतात.पुर्वी दिवसाच भात झोडायची कामे व्हायची.परंतू आता खळी राहीलेली नाहीत.खाचरातच ताडपत्री अंथरून त्यावर भात झोडतात.पुर्वी खळ्यात लोक चप्पल घालत नसत.परंतू ताडपत्रीने पाय भाजत असल्यामुळे चप्पल घालूनच भात झोडायला लागते.परंतू खळ्याची मजा ताडपत्रीला नाही.

खळ्यात धान्य असल्यामुळे रात्री खळ्यात मुक्काम करावा लागे.बरोबर दोघे तीघे मित्र किंवा जेष्ठ माणसे असत.संध्याकाळी खळ्यात झोपल्यावर गार वारा व वर आकाशाचे छत,त्यामध्ये चांदण्या,उगवता किंवा अस्ताला गेलेला चंद्र पहायला मजा वाटे.आकाशात ध्रूव तारा,तिकांड,बाज,ती चोरून नेऊ पहाणारे चोर,असे चांदण्यांचे प्रकार पहाताना व त्याबद्दल जेष्ठांकडुन माहीती ऐकायला मोठे कुतुहल वाटे.

सकाळी भात झोडायला पाच- सात गडी असत.प्रत्येकाकडे रस्सी असे.रस्सीच्या सहाय्याने भात झोडायला सुरूवात करत.पहिले दोन ठोके भाताच्या राशीवर मारून उरलेले ठोके लाकडी घडवंचीवर मारत.एकच खणाखणी होई.भाताचे भारे पटापट कमी होत.

खळ्यात भात झोडल्यावर बराच कचरा होई.याला *गळंदा* म्हणतात.हा गळंदा गोळा कराण्याचे काम एखादा वयस्कर माणुस करत असे.

दुपार पर्यंत भात झोडुन झालेले असे.खळ्यात भाताची रास तयार असे.चांगले पीक आल्यावर भाताची भलीमोठी रास तयार होई.शेतक-याच्या चेहऱ्यावर  समाधान झळकत असे.घराकडुन गुळाभाताचा नैवेद्य आणुन धान्याच्या राशीला व शेताला दाखवायचा.भाताच्या राशीत सकाळी ठेवलेला नारळ फोडायचा.नंतर गुळाभाताचा नैवेद्य व नारळाच्या खोब-याचा तुकडा पानावर खायचा..हे खाताना खुप मजा यायची.

दुपार नंतर सुपाच्या पाठीमागे कोरड्या राखेने  गुणाकाराच्या रेघा मारायच्या.व भात उपनायाला सुरूवात करायची.हे काम तज्ञ माणुस करायचा.वारा नसल्यावर वारा यायची वाट पहायला लागायची..त्या दुरदृष्टीनेच जेथे वारा असतो अशा ठिकाणी खळी तयार केलेली असत.

भात उपणुन झाल्यावर पोत्यात भरले जायचे.तो पर्यंत आंधार झालेला असे.या भातांची बाचकी घरी घेऊन आंधारातुन जाताना नाकीनऊ येत.

काही शेतकऱ्यांच्या खळ्यात भाताच्या राशीला कोंबडा कापायची प्रथा आसायची.संध्याकाळी खळ्यावर कोंबड्याचा पातळ रस्सा व भात खायला मोठी मजा यायची.भरपुर भात व तितकाच गरम रस्साअसायचा.काही जण खाऊन झाल्यावर नुसताच गरम रस्सा पीत असत.

 हरभरा 

भाताची झोडणी झाल्यावर ओल असलेले शेत नांगरून हरभरा,मसुर किंवा गहू पेरत.चांगले पीक येई.या पीकाचे रान डुकरांपासुन संरक्षण करण्यासाठी लोक शेतात मांडव करत.त्या मांडवावर रात्री झोपायचे.काहीजण जमीणीवर त्रिकोणी खोपटे करून त्यामध्ये झोपत.मांडवाच्यावार झोपायला मजा येई.आजुबाजुंच्या शेतकऱ्यांच्या आरोळ्यांनी शिवार दुमदुमुन जात असे.मांडवावर मेंढी कोट खेळत.नंतर पत्र्याचा डबा वाजवायचा..किंवा दिवाळीतले शिल्लक रोज एक दोन फटाके वाजवायचे..मोठीच गम्मत असे.

हारभरा भरल्यावर एखादा शेतकरी शेतात हुळा खायला येण्याचे आवातन देई.आम्ही चारपाच जण शेतात जात असू.खळ्यात काटक्या व गवत पेटवून त्यावर मस्त घाट्यांनी भरलेला हरभरा भाजला जात असे.हरभरा भाजुन झाल्यावर आग विझवुन तेथेच बसून गप्पा गोष्टी करत हरभ-याचा हुळा आम्ही फस्त करत.कधीकधी हभभरा समजुन एखादा गरम खडा तोंडात जाई.जीभ भाजे.परंतू चार पाच मित्रांबरोबर हरभ-याचा/वाटाण्याचा किंवा गव्हाचा हुळा खाताना मोठी मौज वाटत असे.हुळा खाऊन झाल्यावर एव्हाना आंधार पडू लागलेला असे.

असे ते भारलेले दिवस होते.हे दिवस मी पाहिले व अनुभवलेही. हे मोठेच भाग्य म्हणावे लागेल.

 सर्व चित्रे google वरून साभार 


भागीत गुरूजी


१९ जुन १९८६ साली श्री.पंढरीनाथ भागीत गुरुजी मंदोशी गावच्या शाळेत हजर झाले. तत्पुर्वी शाळेची अवस्था अतिशय वाईट होती. जवळ जवळ वर्षभर शाळेत शिक्षकच नव्हते.

हुरसाळे वाडीचे कै.विठ्ठल मोरमारे गुरुजी त्यांची शाळा करुन दुपारी दोन तास शाळा उघडायचे.असे सतत वर्षभर चालले होते. त्याकाळात पुर्णवेळ शिक्षक नसल्याने खुप मुलांचे अतोनात  शैक्षणिक नुकसान झाले.

आम्ही चौथीला असतांना जुन महिना असावा. पाऊस पडायला सुरूवात झाली होती. ओढे नाले ओसांडुन वाहत होते. शाळा बंद असल्यामुळे पोरं मासे,खेकडे पकडणे, गुरे संभाळणे ही कामे करत होती.

आणि एक दिवस अचानकच सकाळी १०.१५ वा.शाळेची घंटा घणघणली. सर्व मुलांमाणसांना अश्चर्याचा धक्का बसला. कुणीतरी सांगितले नविन मास्तर आलेत. सर्वच लोकांना व मुलांना कोण नविन गुरूजी आलेत हे पाहण्याच्या उत्सुकते पोटी शाळेकडे आपापल्या मुलांना घेऊन शाळेकडे चालू लागले.

शाळेत गेल्यावर पहातो तर पांढरा शुभ्र कडक इस्त्री असलेला लेंगा,पैरण व टोपी गळ्यात मफलर असलेले गुरूजी आम्हाला दिसले. लोकांना गुरूजीनीच ओळख करून दिली.

मी श्री.पंढरीनाथ भागीत गुरूजी.इथे जवळच असलेल्या भोमाळे गावचा आहे. यापुर्वी कहू येथे होतो. आजच बदलीने या शाळेवर हजर झालो आहे.

तेव्हा उद्या पासुन सर्वांनी आपापल्या मुलांना शाळेत पाठवायचे. कुणीही मुलांना घरी ठेवायचे नाही. अशी लोकांना सक्त ताकीदच देऊन टाकली.तीही कडक शब्दांत.

दुसऱ्या दिवशी नियमित पणे शाळा भरली. साफसफाई झाल्यावर प्रार्थना सुरू झाली. नंतर राष्ट्रगीत झाले.

यापुर्वी आम्ही कधीच प्रार्थना किंवा राष्ट्रगीत म्हटलेले नव्हते. त्यामुळे शाळेत एक नविनच उत्साह जाणवत होता..

गुरूजींची शिकवण्याची पद्धत खासच होती. शिवाय शाळा सुटायच्या आधी अर्धा तास उजळणी, पाढे, कविता गुरूजींच्या मागे मोठ्याने म्हणताना मजा येत असे..नंतर हे सर्व मुलेच स्वतःहुन म्हणू लागली.

शाळेला जोडुनच पाठीमागे व शाळेच्या उजव्या बाजुला लोकांनी गुरे बांधण्यासाठी व पेंढा ठेवण्यासाठी पडव्या बांधलेल्या होत्या..गुरूजींनी सबंधितांना बोलावुन त्या पडव्या काढुन टाकायला सांगीतलंं.

यावर त्यांनी गुरूजी पडव्या काढल्या तर आम्ही गुरे कुठे बांधू? राहुद्या त्यांचा शाळेला काय त्रास आहे का?असे म्हणून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला..परंतू गुरूजींनी कडक भाषेत त्यांना ताकीद दिली.

दोन दिवसात पडव्या काढल्या नाहीत तर मला वर कळवायला लागेल! बघा मग ? ही मात्रा सबंधितांवर लागू झाली आणि त्यांनी लगेचच पडव्या काढायला सुरूवात केली.त्यासाठी विद्यार्थ्यांनी देखील त्यांना मदत केली.

तेव्हा शाळेच्या उजव्या बाजुला व पाठी मागे मोठ मोठे उकिरडे होते. गुरूजींनी व विद्यार्थ्यांनी पाठीमागे रस्त्याच्या खाली मोठा चर खोदुन त्यामध्ये कचरा साठवण्याची व्यवस्था केली. बराचासा कचरा जाळून टाकला. या साठी ग्रामस्थांनी सुद्धा मदत केली.

भागीत गुरुजी आले तेव्हा शाळेची अतिशय वाईट स्थिती झाली होती एका बाजूला शाळेची भिंत ढासळली होती तर पुढील बाजूच्या खिडक्या तुटल्या होत्या शिवाय दरवाजाही तुटलेला होता त्यामुळे शाळेमध्ये कुत्री- मांजरे वास्तव्यास होती. त्यांनी बरीचशी जमीन उकरली होती.

त्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून थोडेफार पैसे जमा केले. श्री.दुंदा बांगर यांनी पडलेली भिंत दुरुस्त करून दिली. श्री.कांताराम तळपे यांनी खिडक्या व दरवाजा दुरुस्त करून दिला. सौ.अनुसयाबाई शकर जढर(पारधी) यांनी शाळेच्या आतुन व बाहेरूनच्या भिंती, शेणा- मातीने लिंपून शेण व राखेने सारवून काढल्या. त्यासाठी त्यांना दहा रुपये मजुरी दिल्याचे मला स्पष्ट आठवते. 

हे सर्व झाल्यावर शाळेला छान पैकी रंग देऊन वर छताला रंगीबेरंगी पताका लावण्यात आल्या. शाळेला कुलूपाची सोय केली.

यापूर्वी शाळेला कुलूप नसायचे, त्यामुळे शाळेत इतर वेळी पत्त्यांचा डाव चालायचा. कुत्री - मांजरे आत जायची. शाळा कुलुप बंद झाल्यावर हे सर्व बंद झाले. अशा प्रकारे भागीत गुरुजीनी शाळेला नवचैतन्य दिले,

काळी परिपाठाला होणाऱ्या प्रार्थना राष्ट्रगीत व प्रतिज्ञा कविता, भक्तीगीते, भावगीते, समुहगीते यामुळे शाळेला नवचैतन्य आले. लोकही कौतुकाने हे सर्व ऐकायला बाहेर थांबत असत.

भागीत गुरूजी ज्यावेळी गावात प्रवेश करत असत किंवा लांबुन दिसत.तेव्हा खेळत असलेल्या मुलांची त्रेधातिरपट उडत असे.तात्काळ मुले हातपाय धुऊन दप्तर घेऊन शाळेचा रस्ता पकडत.स्वच्छ गणवेश,दररोज अंघोळ,बारीक केस,नखे काढलेली असलीच पाहीजे असा गुरूजींचा आदेशच असे. 

भागीत गुरुजींच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे बाहेर गावचे विद्यार्थी देखील मंदोशीच्या शाळेत दाखल होऊ लागले. त्यामुळे शाळेचा पट १२ वरून ३०च्या दरम्यान झाला. पर्यायाने दुसऱ्या शिक्षकांची नियुक्ती झाली.

सन १९९३ मध्ये भागीत गुरुजींनी इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यासाठी तेव्हाचे तत्कालीन उपसरपंच कै.शंकरराव हुरसाळे यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्व प्रयत्नातून पाचवीचा वर्ग मंदोशी गावात सुरू झाला. 

त्याबरोबर अजून एक शिक्षकांची नियुक्ती झाली.आता गावात भागीत गुरुजी, सुनील हांडे गुरुजी, कै. मुक्ताजी मदगे आणि शिवराम सुपे गुरुजी असे तीन शिक्षकआले. नंतर श्री,संजय नाईकरे आले.

पुढच्या वर्षी सहावीचा वर्ग मंजूर झाला. श्री संजय नाईकरे हे अजून एक शिक्षक हजर झाले. त्यानंतर सातवीचा वर्ग अशा प्रकारे इयत्ता सातवी पर्यंत शाळा मंदोशी गावात सुरू झाली. 

शाळेचे वर्ग वाढत असताना शाळेला वर्गखोल्या देखील मंजूर झाल्या.आणि शाळेला एकूण सहा शिक्षक मिळाले. यासाठी भागीत गुरुजींचे परिश्रम व योगदान हे अतिशय महत्त्वाचे होते. 

याच काळात अनेक विद्यार्थी तयार झाले. अनेकांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या लागल्या तर अनेक जण चांगल्या पदावर पोहोचले. 

मंदोशी गावचा शाळेचा पट १५३ वर पोहोचला तेव्हा बीट पातळीवर व केंद्र पातळीवर होणाऱ्या अनेक शालेय स्पर्धा मंदोशी गावात होत असत.

बाहेर गावचे विद्यार्थी व शिक्षक,गावचे विद्यार्थी व शिक्षक यांना जेवणाची व्यवस्था मंदोशी गावाकडुन असायची. त्यामुळे अनेक बाबींसाठी शाळेला गावानेही भरपुर सहकार्य केले.

पुर्वी शाळेत एक दोन तुकडे झालेला व तसाच जोडलेला फळा होता.शाळेचे दप्तर ठेवण्यासाठी एक छोटी लाकडी पेटी होती.पाय तुटलेला एक टेबल व खुर्ची होती.बस्स इतकेच काय ते साहित्य होते परंतू नंतर याच काळात नविन शाळेचे बांधकाम झाले.

नविन वर्गखोल्या,नविन कपाटे,टेबल खुर्च्या, नवीन बेंच, वाचनालया साठी नविन पुस्तके, टिव्ही, टेपरेकॉर्डर, स्पिकर सेट, खेळाचे साहित्य, भजनाचे साहित्य, बँड, ढोल, तुतारी,मुलांना नविन दप्तर, गणवेश, पाठ्यपुस्तके, स्काँलरशिप, विद्यावेतन मोफत दुध वाटप असे कितीतरी साहित्य व योजना आल्या. भागीत गुरूजींच्या काळात या छोट्या शाळेचे वटवृक्षात रूपांतर झाले.

केंद्र पातळी,बीट पातळी,तालुका पातळी वर शाळेचा भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक आला.तसेच जिल्हा पातळीवर देखील शाळेचा तृतीय क्रमांक आला. यासाठी कै,मुक्ता मदगे गुरूजी,प्रसिद्ध हर्मोनियम वादक श्री.धर्मा बुधाजी तळपे यांचे मोलाचे योगदान लाभले.

भागीत गुरूजीं विषयी सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या मनात आदराची भावना होती.भागीत गुरूजी मंदोशी गावात सहकुटुंब तब्बल २२ वर्ष राहीले..ते गावचा एक घटक होते. 

गावातील प्रत्येक सामाजीक कार्यात ते भाग घेत. यात्रेला ते भरघोस देणगी देत. लोकांच्या सुखदुःखात भाग घेत.गावात वादविवाद झाल्यावर दोनही बाजुच्या लोकांना चार समजुतीच्या गोष्टी सांगत. प्रसंगी अर्थीक मदत देखील करत.

त्यांच्या काळात १२विद्यार्थी असलेला पट १५३ वर जाऊन पोहचला.व शिवाय एका शिक्षकाचे सहा शिक्षक झाले.शाळेला कै.मारूती मोरमारे, गुरूजी,श्री.शंकरराव विरणक,गुरूजी ,श्री.माळी गुरूजी असे पात्र मुख्याध्यापक लाभले. परंतू भागीत गुरूजींचे महत्त्व यत्किंचितही कमी झाले नाही.

श्री.पंढरीनाथ भागीत,श्री.सुनिल हांडे, श्री.संजय नाईकरे व कै.मुक्ता मदगे गुरूजी, किसन म्हातारबा तळपे यांनी ख-या अर्थाने विद्यार्थी घडवले. आज ते विद्यार्थी समाजाचा एक घटक बनुन चांगल्या प्रकारचे जीवन जगत आहेत. याचे श्रेय या सर्वांना दिले पाहिजे.

सन 2009 मध्ये त्यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाली. व ते जि प प्राथमीक शाळा साबुर्डी येथे हजर झाले. तेथेही त्यांनी चांगल्या प्रकारे विद्यार्जानाचे काम केले.

एप्रिल 2023 मध्ये त्यांना विस्तार अधिकारी या पदावर अत्यंत अल्प काळासाठी पदोन्नती मिळाली. आणि लगेच जून 2023 रोजी सेवानिवृत्त झाले.

आता भागीत गुरूजी कधीतरी भेटतात. मग आम्ही अवार्जुन वेळ काढुन गावातल्या मागील घटनांना ऊजाळा देतो.ते दिवस आठवतो. 

समाधानाची भावना आमच्या दोघांच्याही मनात तयार होते. "कालाय तस्मैय नमः"अशा या गुणसंपन्न शिक्षकाला भावी आयुष्य सुखसमृद्धीचे व आरोग्य संपन्न जावो ही सदिच्छा...








लेखक - रामदास तळपे ग्रामीण संस्कृती

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस