नविन शाळेवर रूजू होताना...


नवीन शाळेवर रुजू होताना... अनिल तळपे सर यांचा लेख 

काळाचौकी :- आटपाडी गाडीने विभुतवाडीत सकाळी ५:१५ ला कंडक्टरने बेल वाजवली चला विभुतवाडी अर्धवट झोपेतून जागे होऊन मी आणि माझा गावाकडचा मित्र वसंत आम्ही एक पिशवी व एक भांड्यांनी आणि आंथरून पांघरूनांनी भरलेलं पोतं घेऊन गाडीतून खाली उतरलो कंडक्टरने पुन्हा बेल वाजवली आणि गाडी आटपाडी च्या दिशेने निघून गेली.

आम्ही तसेच आंधारात रस्त्यावर उभे होतो.आम्ही इकडे तिकडे पाहत होतो,जवळ जवळ ८०% गाव झोपलेले होते.मध्येच कुणाचा तरी खाकरण्याचा आवाज येत होता. कुत्री  भुंकत होती.खूप भीती वाटत होती.कारण भाग नवीनच होता.आम्ही शाळा शोधत होतो.तेव्हढयात तिथे हातात डबडे घेऊन एक म्हातारा आम्हाला दिसला.त्याला विचारले शाळा कुठेय त्याने समोर हाथ केला,आणि रस्त्याच्या पलीकडे आहे हातानेच सांगितले.मग वसंतच्या डोक्यावर पोते माझ्या हातात पिशवी घेऊन आम्ही शाळेजवळ पोहचलो. आणि उजेड यायची वाट पाहू लागलो.

दुसऱ्या दिवशी शनिवार होता शाळा सकाळचीच होती. सात साडेसात वाजता अपर्णा बसागरे मॅडम शाळेत आल्या व त्यांनी आमची विचारपूस केली. त्या स्वभावाने जरा कडकच होत्या. आमच्याकडेच पोते पाहून त्या जरा रागातच म्हणाल्या कोण आहेत तुम्ही? आणि इथे काय घेऊन आलात? ते पहिलं उचला आत्ता इथे शाळा भरणार आहे. मग त्यांना मी सांगितले की मी गुळेवाडीला नवीन शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी आलो आहे. थोड्या वेळाने आम्ही गुळेवाडीला जाणार आहोत.

हे ऐकुन मॅडम ला जरा आपण बोलल्याचा पश्चाताप्त झाला. आणि हासून म्हणाल्या सॉरी हं थांबा तुमच्या पिशव्या आणि पोते एका वर्गात ठेवा.गुळेवाडीचे शिक्षक श्री.ज्योतिराम सोळसे सर आता येतीलच.त्यांना थांबवण्यासाठी एका मुलाला बाईंनी रस्त्यावर पाठवले.

थोड्याच वेळात सोळसे सर त्यांच्या हिरो होंडा CD 100 गाडीवर आले .बसागरे बाईंनी त्यांना आमची ओळख करून दिली.त्यांना देखील खूप आनंद झाला.कारण सहा महिने ते एकटेच शाळेत होते.आणि नवीन जोडीदार आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. 

मग आम्ही त्यांच्या गाडीवर बसून गुळेवाडीला गेलो .शाळेच्या दोन वर्ग खोल्या होत्या. पट संख्या 40 च्या आसपास होती. शाळा मोकळ्या माळावर होती.शाळेत रुजू झालो.सरांनी शाळेची जरा माहिती सांगितली.11:30 ला शाळा सुटली 

मग आम्ही पुन्हा विभुतवाडीत आलो.तिथे आम्हाला शेळके सर (मेजर) ,भाबड सर भेटले दोघेही विभूतवाडीत राहत होते. Solase सरांनी त्यांच्याशी ओळख करून दिली. आणि त्यांना माझ्यासाठी विभुतवाडीत रूम शोधा असे सांगितले व संध्याकाळी जेवायला झऱ्याला या असे सांगून ते निघून गेले.

मग आम्ही दोघे विभुतवाडीच्या शाळेत गेलो जिथे साहित्य ठेवले होते त्या खोलीची चावी घेतली. हॉटेल मध्ये नाष्टा करून रूम शोधायला गावात गेलो पण मनासारखी एकही रूम पसंत पडेना दुपारी शेळके सर आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला एक रूम पाहण्यासाठी घेऊन गेले, ती रुम पाहून मला तर घामच फुटला ती एका गोठ्यासारखी रूम होती,तिथे एक म्हातारी एकटीच राहत होती.तिची तिथे खूप एकावर एक रचून ठेवलेली मडकी होती. अंघोळीला बाथरूम नव्हते.आंघोळीची जागा बाहेर मोकळ्या जागेत होती.हे पाहून मला खूप वैताग आलेला होता.

मनातून आसं वाटत होतं की आहे आसं पुन्हा घर गाठावं नको ती नोकरी कुठं इथं येऊन पडलोय आसं वाटत होत.

शेवटी सायंकाळी ५ वाजता आम्ही चालत चालत झऱ्याकडे निघालो. झऱ्याला पोहचल्या नंतर झरे जरा चांगले गाव वाटले.इकडे तिकडे फिरल्या नंतर आम्ही कारगिल धाब्याजवळ एक आर्धावट कंपाऊंड होत त्यावर जाऊन आडवा पडलो आभाळाकडे पाहिले, आणि क्षणभर गावाकडे आसल्याचा भास झाला.

आणि ठरवलं की आता बास्स नोकरी सोडून गावाला जायचं आणि काहीतरी उद्योग व्यवसाय करायचा.पण इकडे थांबायचे नाही 

तिथून आम्ही झरे स्टँड वर आलो.पिंटू राजमाने यांचे s.t.d. बूथ होतं. तिथून घरी फोन लावला आणि मुद्दाम सांगितले की हा भाग खूपच थर्डक्लास आहे.इथे रूम मिळत नाही दुकाने नाहीत कसलीही सुविधा नाही. मी घरी येऊन काहीतरी उद्योग व्यवसाय करतो,पण इकडे राहणार नाही मी उद्या गावाकडे निघणार आहे.

हे ऐकुन आमचा मोठा भाऊ (दादा) त्याला थोडं टेंशन आले. तो मला म्हणाला आरे तू  शिक्षक झाला आहेस ,तर तू एक काम कर, आत्ता लगेच येऊ नको, तू एक महिनाभर तिकडेच थांब शिक्षकाची नोकरी कशी आसते फक्त अनुभव घे आणि नाही आवडलं तर मला न विचारता घरी निघून ये.फक्त महिनाभर थांब. हे ऐकुन मला आनंद झाला.

 मग मी ठरवलं फक्त महिनाभरच रहायचय महिना आसा निघून जाईल आणि मग थेट गावाला निघून जाईन पण इथे राहण्याची इच्छा नव्हती.

मग आम्ही सोळसे सरांच्या घरी गेलो नुकताच त्यांचा मुलगा धीरु चा जन्म झालेला होता १० ते १५ दिवसांचा आसेल.तिथे आम्ही जेवण केले. सरांच्या सासूबाई तिथे आल्या होत्या.त्या म्हणायच्या की एवढा लहान आणि  मास्तर कसा झाला. त्या वेळी माझे वय २० वर्ष होत आणि तब्ब्येतही किरकोळच होती. जेवण झाल्यानंतर आम्ही चौकात गेलो जरा फिरलो सरांना सांगितले की विभुतवाडीत करामत नाही झऱ्याला रूम बघा त्यांनी हो म्हटलं आणि सरांचा निरोप घेऊन आम्ही झोपायला पुन्हा विभूतवाडीला आलो.

विभूत वाडीत गेल्यानंतर तिथे विभूतवाडीची आमच्या वयाची मुले आमच्याकडे बसायला आली,गप्पा गोष्टी झाल्या मग ती निघून गेली  

दुसऱ्या दिवशी रविवार होता. आम्ही हात पाय धुऊन पुन्हा झऱ्याला गेलो सोळसे सरकडे जेवण करून रूम पाहण्यासाठी गेलो. त्यांनी आम्हाला आमोल कारंडेची रूम (आताच्या प्रथमेश मेडिकलच्या शेजारी) समोर राजू न्हावी यांचे केशकर्टणालय चे दुकान होते. तर ती रूम जरा चांगली वाटली, तिथे पत्त्यांचा डाव चाललेला होता.रूम बद्दल विचारल्यावर अमोल तोंडातील गुटका थुंकून म्हणाला की रूम मिळेल पण एका आटीवर मास्तर शाळेत जरी गेले तरी  रुमची चावी आमच्याकडे राहील कारण दुपारच्या वेळेस तिथे पत्त्यांचा डाव चालायचा. मी देखील तयार झालो कारण आंथारून पांघरूण व पुस्तके सोडून माझ्याकडे काहीच नव्हते.

अशा तऱ्हेने रूमचा प्रश्न सुटला दुपारी आम्ही विभुतवाडीला जाऊन आमचे साहित्य आणले, खोली स्वच्छ करून साहित्य खोलीत ठेवले. मनातील ओझ कमी झाल्यासारखं वाटलं मग आम्ही पुन्हा कारगिल ढाब्याच्या कट्ट्यावर गेलो तिथे जरा बसलो  अंधार पडल्यावर आम्ही रूमवर आलो.वसंत नी स्वयंपाक केला.व कसा करायचा ते शिकवलं  मग आम्ही जेवण केले.चौकातून फिरून आलो आणि झोपून गेलो.

सकाळी वसंत लवकरच उठून अंघोळ करून तयार होता.मी म्हटले आरे एवढ्या लवकर कशाला उठलाय.तो म्हणाला आसेच मग मी उठलो अंघोळ केली,तो म्हणाला चल आपण चौकात चहा घेऊन येऊ.चहा घेतल्यानंतर आम्ही चौकात थांबलो तेवढ्यात ८:१५ ची सांगोला सातारा गाडी आली आणि वसंत पटकन गाडीत जाऊन बसला क्षणभर मला कळलेच नाही, कंडक्टर ने बेल वाजवली गाडी निघून गेली.मी गाडीकडे पाहताच राहिलो .खूप रडायला आले .मनातल्या मनात रडत तसाच रूमवर आलो. मला करामत नव्हते दुपारच्या गाडीने पुन्हा निघून जायचे आसा विचार मनात आला. तेव्हढ्यात सोळसे सर आले आणि म्हणाले सर चला शाळेत जाण्याची वेळ झाली.

मग मी सावध होऊन शाळेत जाण्यासाठी निघालो. त्यांच्या बरोबर शाळेत गेलो.परंतु माझे शाळेत लक्ष च लागत नव्हते.

शाळा सुटल्यावर संध्याकाळी रूमवर आलो आगदी  नर्व्हस होऊन बसलो होतो. तेवढ्यात रूम मालक अामोल कारंडे तिथे आला.थोडा वेळ गप्पा झाल्या त्याने गावाची भागाची माहिती सांगितली.थोडा वेळ थांबून तो निघून गेला.मग मी स्वयंपाकाची तयारी केली जेवण केले. थोड्यावेळाने पत्ते खेळणारी गॅंग आली. मी जरा चौकातून जाऊन आलो, व आल्यानंतर झोपून गेलो. पत्त्यांचा डाव रात्री दोन वाजेपर्यंत चालू होता.

असेच दिवस जात होते, मला फक्त एक महिनाच राहायचे होते त्यामुळे मी हे सर्व सहन करत होतो.

असेच एका रविवारी तेथील माझ्या वयाची मुले माझ्याकडे आली.आणि बसली त्यामध्ये विनोद वाघमारे, सुग्रीव कारंडे सागर कारंडे, मप्या, नागेश तांबोळी, संदीप, बापू हे होते. ते म्हणाले मास्तर मी त्यांच्याच वयाचा आसाल्यामुळे ते मला मास्तरच म्हणायचे एकजण म्हणाला की मास्तर तुम्हाला पोहायला येतं का? मी हो म्हटलं मग बिनु म्हणाला की चला आपण पोहायला जाऊ.मी तयार झालो.

ज.ने. वि च्या मागे एक विहीर होती.तिथे आम्ही जाऊन जवळ जवळ दोन तास पोहायलो. मग घरी आलो पोहून पोहून डोळे लाल झाले होते.

पण ओळखीही तश्याच छान झाल्या होत्या.नवीन मित्र मिळाले होते.आणि करमुन सुद्धा गेले.होते. मला काही कमी पडले की ही गॅंग मदतीला तयारच आसायाची.

मग आम्ही रविवारी दिवसभर महेंद्रच्या दुकानासमोर गोटया खेळायचो, मला पाहिल्यावर कुणाला वाटायचेच नाही की हे मास्तर आसेल म्हणून.

त्या वेळी नुकताच झऱ्यात पिंजरा चित्रपट पडद्यावर दाखवला होता,आणि मी तो चित्रपट पाहिला नव्हता, एक जण मला म्हणाला की तुम्ही पिंजऱ्यातील मास्तर नाहीत ना ? मी म्हणालो नाही.नंतर मी चित्रपट पाहिल्यानंतर मला त्या वाक्याची हसायला आली.😅😅

असं करता करता महिना संपत आला.घराची ओढ वाटायला लागली.मी दोन चार दिवसांनी गावी जाणार होतो.मी मित्रांना सांगितले की मी दोन चार दिवसांनी गावी जाणार आहे,पुन्हा येईल म्हणून सांगता येत नाही.यावर मित्रमंडळी खूप नाराज झाले.

ते म्हणाले की तुम्ही गावी जा पण परत या. बिनु तर मला म्हणाला की मी तुम्हाला आमच्या जागेत घर बांधून देतो.पण तुम्ही नोकरी सोडून जाऊ नका.त्या वेळी बिनु मिस्तरी काम करायचा मी म्हणालो ठीक आहे मी पुन्हा येईल.

मग मी गावी गेलो.घरातील सगळ्यांना वाटले की आता हा परत जाणार नाही.परंतु मी पुन्हा दोन दिवसांत झऱ्याला जायला निघालो घरातील सर्वांना आनंद झाला. 

नंतर अनिल काळेल,(विभूतवाडी),शशिकांत खाडे (झरे), रामदास देशमुख (मानेवाडी),विशाल पाटील (कुरुंदवाडी), प्रभाकर कटकदौंड (गुळेवाडी),सतीश सावळे (विभुतवाडी) हे नवे शिक्षक मित्र माझ्या रूम मध्ये पार्टनर म्हणून मिळाले.

लेखक :- अनिल तळपे अध्यक्ष खेड तालुका शिक्षक समिती 



शाळेचे रम्य दिवस


शाळेचे रम्य दिवस 

शिवाजी विद्यालय डेहणे येथे मी जेव्हा पाचवीला प्रवेश घेतला तेव्हा कै.आर.जे.पाटील सर मुख्याध्यापक होते. पाटील सर अतिशय कडक शिस्तीचे होते.कर्वे सर वर्गशिक्षक होते.तांबोळी सर,वरकुटे सर,फणसे सर,विधाटे सर,कोंढाळकर सर,जोशी मँडम,व्यवहारे सर,सवणे सर,फापाळे सर तर वरच्या वर्गासाठी गाडीलकर सर,महामुनी सर,दातीर सर,नढे सर,असे अनेकजण होते.

मी  ७ जुनला पाचवीत गेलो तेव्हा प्राथमिक आरोग्य केंन्द डेहणेच्या जरा अलिकडे दक्षिणेस असलेल्या कै.बाबुराव कौदरे यांच्या इमारतीमध्ये डावीकडून पहिल्या खोलीत भरत असे.

त्याशेजारी सहावीचा वर्ग व त्या शेजारी सातवीचा वर्ग होता.तर प्राथमिक आरोग्य केंद्र डेहणे च्या शेजारी पश्चिमेस डावीकडे नविन दगडी इमारतीमध्ये आठवी,नववी व त्या शेजारी दहावीचा वर्ग होता.ही इमारत मला खुपच आवडायची.खुप मोठे वर्ग,वर्गात लाकडी बेंच ,मोठमोठया  खिडक्या त्या मधून येणारा उजेड व बाहेर सुंदर व्हरांडा,समोर मोठे ग्राउंड होते.शाळा सकाळी.११.००वा.भरायची.

पांढरा शर्ट,खाकी चड्डी व डोक्यावर पांढरी गांधी टोपी व इनशर्टअसा गणवेश होता.ठरावीक वरच्या वर्गातील दहावीचे विद्यार्थी फुलपँट घालत.बाकी सर्वजन चड्डीच घालत.

मुलींना निळा स्कर्ट किंवा निळा परकर,पांढरा शर्ट (ब्लाउज) दोन वेण्या आणि लाल रिबन असा गणवेश होता.बुधवारी रंगीत कपडे घालायला परवानगी होती.परंतू रंगीत कपडे होतीच कोणाकडे?

दहावी पर्यंत कुणाच्याही पायात चपला किंवा बुट नसायचे. आणवानीच शाळेत यायचे.मी तरआकरावीला काँलेजला पहिल्या दिवशी आनवानीच गेलो.मधल्या सुट्टीत पहातो तर सगळ्यांच्या पायात चपला व बुट..मलाच मग कसेतरी वाटू लागले.आणी मग काँलेजवरून होस्टेलवर जाताना राजगुरूनगरच्या मशीदीजवळील पुलावर नऊ रूपायाची चप्पल घेतली.काँलेजला चप्पल घालून जातात हे माझ्या गावीही नव्हते.

याच शाळेच्या समोर असलेल्या  ग्राउंडवर प्रार्थना व्हायची.वर्ग निहाय एका ओळीत एका हाताच्या अंतरावर मुले प्रार्थनेला उभी राहत असत.लाईन थोडी जरी वाकडी असली तर सर मागुन काठीचे फटके मारत.समोर शाळेच्या व्हरांड्यावर सर्व शिक्षक एका ओळीत उभे राहत.

मी शाळेत गेलो तेव्हा "खरा तो एकची धर्म" ही साने गुरूंजींची प्रार्थना होती.त्याही आधी "सुंदर जीवन आता मी जगनार", ही प्रार्थना होती.मी ती ऐकलेली आहे.व ती कानांना खुपच गोड वाटायची.प्रार्थना झाल्यावर राष्ट्रगीत व्हायचे.एक साथ विश्राम झाल्यावर काही महत्त्वाची माहीती सांगीतली जाई.नंतर ओळीत आपापल्या वर्गात जायचे असा रिवाज होता.

पाचवीचा वर्ग हा अतिशय छोटा व खिडक्या नसलेला वर्ग होता.बेंच वगैरे काही मिजास नव्हती.खालीच ओळीने मांडी घालून बसावे लागे.डाव्या बाजूला मुली तर उजव्या बाजूला मुले बसायची.

तेव्हा दप्तर म्हणजे काय तर घरात जी रिकामी पिशवी असेल त्यामध्ये वह्या व पुस्तके ठेवायची व तीच पिशवी घेऊन शाळेत यायचे.त्यामध्चेच दुपारच्या सुट्टीत खाण्यासाठी रूमालात भाकरी व लसणाची,सुकटीची किंवा बोंबील,वाकट इत्यादी चटणी असे.पावसाळ्यात वर्गातच भाकरी खाल्या जात तर उन्हाळ्यात झाडाखाली बसुन भाकरी खात.

कधीतरी रूपाया दोन रूपये असतील तर आब्बासशेठच्या जनसेवा हाँटेलात ४० पैशात मिसळची नुसतीच तर्री विकत घेऊन त्याबरोबर भाकरी खायची परंतू हे लाड कधीतरी दोन तीन महिन्यांनी असत.

गरिब विद्यार्थ्यांना शाळेतुन जुन्या पुस्तकांचे वाटप केले जाई.एका आठवड्यात एक वर्गा असे वाटपाचे स्वरूप होते.पुस्तकांचे आज आता लगेच वाटप करण्यात येणार आहे.असे पांडू शिपायाने आणलेल्या रजिस्टरमध्ये लिहिलेली सुचना सरांनी वाचून दाखवल्यावर मुले पुस्तके घेण्यासाठी शाळेच्या आँफिसकडे धाव घेत,जुनीच पुस्तके मिळाल्यावर जो आनंद होई तो आता कधीच होणे नाही,वार्षिक परिक्षा संपल्यावर रिझल्ट घेण्याच्या दिवशी ही पुस्तके परत शाळेत जमा करावी लागत..नंतरच रिझल्टचे कार्ड दिले जाई.वह्या मात्र विकत घ्याव्या लागत.आठवी पर्यंत छोट्याच वह्या वापरल्या जात..त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या असत.
कधीतरी कंपास घेतली जाई.
छोटी रंगपेटी असे.ती उघडल्यावर छोट्या छोट्या चौकोनी घरांत अनेक रंग असत.स्केचपेन नंतर आले.खडुंचे रंग होतेच.
पावसाळ्यात मुलांची अत्यंत वाईट परीस्थीती असे.अनेक मुले डोंगर द-यांतुन पावसापाण्यातुन विद्यार्जनासाठी शाळेत येत.परंतु येताना प्रचंड पाऊस,दुथडी भरून वाहणारे ओढे नाले,खडीचा रस्ता या दिव्यातुन जा ये करावी लागे.सर्वांचे कपडे पावसाच्या सटका-याने भिजून जात.शाळेत पण जमिनीला ओल आलेली असे.त्यावरच पोते टाकून बसावे लागे.शाळा सुटल्यावर घरी जाताना प्रचंड हवा व पाऊसाचा सटकारा असे.छत्री उघडून जात असता वारा छत्री मागे लोटायचा.त्यामुळे पुढे जाताना पाचवी,सहावीच्या छोट्या जीवाला प्रचंड कष्ट पडे.नाईलाजाने छत्री बंद करून पावसातच झपझप चालावे लागे.

जून महिन्यातील पाऊस

पुर्वी अनेक ठिकाणी ओढ्यावर पुल असत.त्याआधी तेही नव्हते.खुप पाऊस असल्यावर शाळेत जाता येत नसे.अनेक विद्यार्थ्यांना छत्री विकत घेणे शक्य नसे,ते प्लँस्टीक कागद डोक्यावर घेऊन येत.परंतू या कागदाच्या एखाद्या शिडातुन वारा आत शिरे.व मोठा फडफड आवाज होई.कधी हा वारा कागद किंवा छत्री   त्याच्याबरोबर दुर घेऊन जाई.कागद किंवा छत्री पकडताना विद्यार्थ्यांची केविलवानी धडपड सुरू होई.या पकडापकडीत दप्तर व तो सर्व भिजून  चिंब झालेला असे.

सप्टेंबर महिन्यात ४० मार्काची पहीली व दुसरी घटक चाचणी असे.प्रश्नपत्रीका ही हस्तलेखन केलेली  झेराँक्स काँपी असे.उत्तर पत्रीका ही फुलस्केप  चारपाच कागद एकत्र टाचून तयार केलेली असे.उत्तर पत्रीकेवर वरच्या अर्ध्या कागदावर छापील मजकुर असे.त्यावार "अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे", हा सुविचार त्याखाली आदिवासी शिक्षण संस्था संचलित "शिवाजी विद्यालय डेहणे"ता.खेड,जि.पुणे.त्याखाली विद्यार्थ्यांचे नांव वर्ग परिक्षा  नंबर व तुकडी असे  व उजव्या बाजुला प्रज्वलीत दिव्याचे चित्र असे....उत्तर पत्रीका लिहिताना पुरली नाही तर जादा पुरवणीचा ताव मिळे.काही हुशार विद्यार्थी दोन,तीन पुरवन्या जोडत...ह्या पुरवन्या मुख्य उत्तरपत्रीकेला दो-याने बांधत,.घटक चाचणी तीन दिवस असायची.

शाळेत असताना..चौथ्या किंवा पाचव्या तासाला पांडू सांगडे शिपाई रजिस्टर घेऊन वर्गात दाखल होई.रजिस्टरमध्ये काय लिहिलं असेल याची उत्सुकता तानली जाई.सर वाचुन दाखवत.... आज  ३१ तारीख आसल्यामुळे महिना अखेर आहे.त्यामुळे आज दुपार नंतर शाळेला सुट्टी राहील...किंवा अमुक..तमुक कारणामुळे उद्या शाळेला सुट्टी राहील..हे ऐकुण आम्हा विद्यार्थ्यांना जो आनंद होई..तितका आनंद अजुन तरी झाला नाही...

दिवाळीच्या आधी प्रथम सत्र परिक्षा असे.उत्तर पत्रीका एका छोट्या चोपडी सारखी असे.प्रश्नपत्रीका मात्र छापील असे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात दुसरी घटक चाचणी व एप्रिल महिन्यात वार्षिक परिक्षा असे.

तांबोळी सर,चिखले सर यांच्या काळात खेळ व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली.श्री.बबनराव गोपाळे - कब्बडी श्री.रोहिदास आंबेकर - खोखो. श्री.अरूण कोरडे- कब्बडी श्री.तुकाराम कोरडे - वक्तृत्व या बाबतीत शिवाजी विद्यालय महाराष्ट्र भर पोहचवले.त्यामुळे शाळेचे नाव गाजू लागले.त्यामुळे निश्चितच शाळेकडुन व विद्यार्थ्यांकडून अपेक्षा वाढल्या.शाळेचा दहावीचा रिझल्ट शतपटीने वाढला.

आम्ही सहावीत गेलो तेव्हा आम्हांला बसायला बेंच मिळाले.जमीनीवरून बेंचवर बसायला मिळणे हा एक वेगळाच आनंद होता.

शाळेमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम असत.तर कधी व्याख्यानाचे कार्यक्रम असत.दहावीच्या मुलांसाठी नाईटस्टडी असे.त्यामुळे रात्री शाळेतच अभ्यास करून झोपावे.आम्ही नाईटस्टडीला असताना रात्री कुणाचाना कुणाचा हरभरा उपटून हुळा करायचो.

दवाखान्या जवळील मोठ्या शाळेच्या उजवीकडे जो मोठा दगडी स्टेज होता त्यासाठीचे दगड आम्ही नायफडच्या बंधा-याजवळून आणले होते.तर नदीमधून वाळू देखील आणलेली होती.

तांबोळी सर,वरकुटे सर,व्यवहारे सर सुट्टीच्या दिवशी सुद्धा जादा तास घेऊन ज्ञानार्जनाचे काम करायचे.

श्री.तुकाराम भोकटे गुरूजीच्या घराजवळ "हसन सायकल मार्ट" दुकान होते.तेथे रूपाया तास या प्रमाणे मुले दुपारच्या सुट्टीत सायकल चालवून आनंद घेत असत.

हिवाळ्यात खुप थंडी असल्यावर शनिवारी शाळा जवळच, उन्हात भरे..व साडेनऊला सुट्टी व्हायची.आठवी ते दहावीचे वर्ग पाच तास झाल्यावर आकरा वाजता सुट्टी व्हायची.

त्याकाळात सर खुपच मारायचे.महामुनी सर पोटाच्या बाजुची कातडी जोरात चिमटीत पकडून वर ओढायचे.व भिंतीवर,फळ्यावर डोके आपटायचे..तर अनेक शिक्षक हातावर छड्या द्यचे.तर काही मुस्काटात लावायचे.तरकाही पाठीवर गुद्दे मारायचे.

असाच एक प्रसंग आम्ही दहावीत होतो.जानोबा मंदिराच्या उजवीकडे आसलेल्या इमारतीमध्ये आमचा वर्ग होता.माझा मित्र श्री.सुभाष भोकटे (आता तो विस्तार अधिकारी आहे.) आम्ही दोघे एकाच बेंचवर बसायचो.

आम्हाला मुलींच्या लाईनला सर्वात पाठीमागे असलेल्या रिकाम्या बेंचवर बसवण्यात आले होते.तेथेच आम्ही दररोज बसत असू. मुलांची लाईन वेगळी होती..बोरकर सर गणित विषय (गुणोत्तर-प्रमाण) शिकवत होते,सर्व जण एकाग्र होऊन ऐकत होता.

त्याचवेळी आम्ही मात्र एक वेगळेच नाट्य पहात होते.आमच्या समोर असलेल्या मुलीच्या डोक्यातून एक "ऊ" खाली तीच्या  शर्टवर (ब्लाऊज) येत होती.ती "ऊ " इकडून तिकडे खालीवर जात येत होती.आणि आम्ही मन लाऊन ते पहात होतो.आमचे शिकवण्या कडे लक्षच नव्हते.सरांचे हे लक्षात आले.शिकवुन झाल्यावर त्यांनी आम्हा दोघांना उभे केले.तुम्हाला गणित समजले असेलच हेच गणित फळ्यावर सोडून दाखवा,सर म्हणाले.सरांच्या डोळ्यात प्रचंड संताप दिसत होता,

सर तसे फार शांत पण बिघडल्यावर जो काही मार देत. की दुसऱ्या दिवशी उठणे ठीण..हे आम्ही दोघानीही दुसऱ्यांच्या बाबतीत पाहीले होते, मी बाजूला असल्यामुळे माझ्या हातात त्यांनी खडू दिला मी फळ्याजवळ गेलो.फळा स्वच्छ केला तेच गणित मी सोडवायला घेतले.

गणित विषय तसा माझ्या आवडीचा आसल्यामुळे मी एका झटक्यात गणित सोडवले...सर अवाक्क होऊन पाहू लागले.आता याला मारायचे तरी कसे.हा त्यांना प्रश्न पडला.ते म्हणाले तु गणित सोडवले हे खरे आहे परंतू तुमचे दोघांचे मुळीच लक्षनव्हते हेही खरे आहे. ठिक आहे.

आता तु सोडव बरं, गणित असे म्हणून सुभाषला बोलावून घेतले,सुभाषचा गणित विषय सोडला तर सर्व विषयात A+मार्क असत,पण गणित त्याचा शत्रू ..आता काही खरे नाही.मार निश्चितच मिळणार असे म्हणुन खडू हातात घ्यायला व शाळा सुटण्याची बेल व्हायाला एकच वेळ झाली.अशा रितीने मार वाचला..

तर अशा अनेक आठवणी या शाळेविषयी सांगता येतील अशीही शाळा..

रामदास तळपे



सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस