कँसेट पुराण
कँसेट्स यायच्या आधी लोखंडी पत्र्याच्या तबकड्या होत्या. लग्न,सत्यनारायण पुजा.यात्रा इत्यादी कार्यक्रम असतील तर सकाळ पासून स्पिकरवर गाणी वाजायची. कौलारू घराच्या आड्यावर दोन दिशांना दोन कर्ण (भोंगी) ठेवली जात.त्यावर अनेक गाणी वाजायची.हे स्पीकर पुर्वी श्री सिताराम मु-हे (टोकावडे )यांचेकडे होता.त्यानंतर श्री.सुदाम बारवेकर, श्री.चीमाजी गोडे,श्री.मारूती तळपे (मंदोशी). श्री.पांडुरंग लांघी (शिरगाव) अशा अनेक लोकांनी लाउडस्पीकरचा व्यवसाय केला.
९० च्या दशकाचा काळ म्हणजे कॅसेटयुगाचा सुवर्णकाळ होता.विश्वात्मा, त्रिदेव, मोहरा, साजन, बाजीगर, दिवाना,दिल,आशिकी,सडक,बेटा,बोलराधा बोल,राजा हिंदुस्तानी,पत्थर के फुल,रंग. अशा अनेक कॅसेट्स केशकर्तनालय,ऑटोरिक्षा, उसाचे गु-हाळ, जीप.लग्नकार्य,पुजा,अशा अनेक ठिकाणी कानाकोपऱ्यातुन वाजत असत. रिक्षावाले तर म्युजिक सिस्टिम आहे ह्या कारणास्तव जास्त भाडे घेई.
गुलशनकुमारने टी सिरीजच्या माध्यमातून आणलेल्या सोनू निगम, अनुराधा पौडवालच्या आवाजातल्या अनेक भक्तीगीतांच्या कॅसेट्स तडाखेबंद विकल्या जाई.
अल्ताफ राजाच्या 'तुम तो ठहरे परदेसी',ले गयी दिल मेरा मनचली.खलीवली खलीवली.अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का अशी अनेक गैरफिल्मी गाणी हिट झाली.
फक्त फिल्मी गाणीच नव्हे तर जॉनी लिव्हर, जॉनी रावत ह्यांच्या मिमिक्री, विनोदांच्या कॅसेट्स पण लोकप्रिय होत्या.
कोळीगीतांच्या गाण्यांची एक वेगळी क्रेझ होती. वेसावची पारू,38 कोळीगीते किंवा टॉप टेन कोळीगीताच्या कॅसेट्स हातोहात विकल्या जाई.
आनंद शिंदे यांच्या कँसेट तर खुपच फेमस होत्या.जवा नवीन पोपट हा.आंटीची घंटी.जावयाने कमाल केली तर दादा कोंडके यांच्या चित्रपटातील गाण्यांनी अक्षरशा ग्रामीण भागाला मोहीनी घातली होती.त्याच प्रमाणे मा.दत्ता महाडिक यांच्या तमाशाच्या कँसेट लोक घोळका करून ऐकायचे.व हास्यकल्लोळात लोक बुडून जायचे.गवळ्याची रंभा,गुरूची विद्या,असे घराणे नष्ट करा.तर काळू बाळू यांचा जहरी प्याला व दादू इंदुरीकर यांचे गाढवाचे लग्न लोक पुन्हा पुन्हा ऐकायचे.दत्ता महाडिक यांचे तरी लंगड कसं उडून मारतय तंगडं,बाप्या का बाई कळना काही.कुनी कुनाला नाही बोलायचं हे असच चालायचं ही गाणी ऐकायला मजा यायची.
छगन चौघुलेंच्या आवाजातल्या चांगुणाची कथा, सती अनुसयाची कथा, चिलया बाळाची कथा.... अशा अनेक आख्यायिकांचा स्वतःचा एक श्रोतावर्ग होता.
स्वातंत्र्यदिन जवळ आला की महेंद्र कपुरच्या देशभक्तीपर गीतांना मागणी येई. गणेशोत्सव जवळ आला की, मंगेशकर भगिनींच्या अष्टविनायक कॅसेट्सची विचारणा सुरू होई.
आषाढी-कार्तिकीला प्रल्हाद शिंदेंच्या आवाजातील 'चल ग सखे पंढरीला' कॅसेट घ्यायला एखादा तरी नक्की येई. शिवजयंतीला "सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला, शाहीर देशमुख गातो पोवाड्याला' हे गल्लीच्या मधोमध असलेल्या कॅसेटप्लेअरवर ऐकताना महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्या घडल्या असतील.
'निसर्गराजा', मेहंदीच्या पानावर मधली मराठी गायकांची गाणी म्हणजे एक अनमोल ठेवा वाटायचा. सुलभा देशपांडे, आश्विनी भावे, उषा नाडकर्णी ह्यांच्या आवाजातल्या 'छान छान गोष्टी' पण धमाल.
सुरेश वाडकरांचं 'ओंकार स्वरूपा', अजित कडकडेंच दत्ताची पालखी, रवींद्र साठेंच्या आवाजातील मनाचे श्लोक, अनुप जलोटांचं 'ऐसी लागी लगन', बाबासाहेब सातारकर यांची किर्तने अशा अनेक कॅसेटसने तो काळ अक्षरशः गाजवला होता.
आपल्या आवडत्या निवडक गाण्यांची कॅसेट तयार करून घेणे हा एक मस्त प्रकार होता.
कॅसेटच्या क्षमतेनुसार त्यात किती गाणी बसतील आणि कोणती गाणी भरायची ह्याचा हिशोब करण्यात एक वेगळी मजा होती. प्रत्येकाची आवडनिवड जपावी लागे.
एखाद्याच आवडत्या गाण्यासाठी 50 रुपये मोजण्यापेक्षा हा स्वस्त पर्याय तेव्हा होता. इंडिपॉपचे कित्येक अल्बम असे एकाच कॅसेटमध्ये भरले होते.
कधी कधी स्वतःच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करण्याची हौस देखिल भागवली जाई. त्यात पार्श्वभूमीला कोणीतरी मध्येच बोलण्याचा आवाज जर आला तर एडिट करायची सोय नव्हती. वॉकमन, सीडी प्लेअर, पेन ड्राइव्ह, स्मार्टफोन असा प्रवास करताना त्यांची उपयुक्तता संपून गेली होती.
आतमधील टेप बाहेर काढून पेनने गोल फिरवत परत जागेवर न्यायचं अस लहान मुलांच खेळण एवढंच त्याच मोल उरल होत.
शेवटची कॅसेट 'साथीया'ची घेतल्याचं आठवत. पण आता कॅसेट नावाचा साथीया कायमचा साथ सोडुन गेलाय एक युगांत करून..!!