Translate

पेटीमास्तर धर्माबुवा तळपे : मंदोशीच्या भजनपरंपरेचे अजरामर स्वर

ग्रामीण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात भजन, कीर्तन, तमाशा आणि लोककला यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

या कलेचा वारसा जपणारे अनेक कलावंत काळाच्या ओघात विस्मृतीत गेले; पण त्यांच्या कलेचे स्वर आजही लोकांच्या मनात घुमत आहेत. अशाच कलावंतांपैकी एक म्हणजे मंदोशी गावचे पेटीमास्तर धर्माबुवा तळपे.

धर्माबुवा तळपे हे केवळ उत्कृष्ट हार्मोनियमवादक नव्हते, तर ते मधुर आवाजाचे भजनगायकही होते. त्यांच्या हार्मोनियमच्या सुरावटी आणि त्यांच्या दैवी आवाजाने आंबेगाव, खेड आणि मावळ तालुक्यातील असंख्य रसिकांना मंत्रमुग्ध केले. जुन्या पिढीतील लोक आजही त्यांना प्रेमाने "पेटीमास्तर" या नावानेच ओळखतात.

धर्माबुवा माझे चुलत चुलते होत. त्यामुळे त्यांचे जीवन जवळून पाहण्याचा योग मला लाभला. त्यांच्या कलेचा प्रवास, संघर्ष आणि यश हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे.

संस्कारांचा मजबूत पाया

धर्माबुवांचे वडील कै. बुधाजी तळपे हे अत्यंत शांत, संयमी, कष्टाळू आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व होते. गावात कोणतेही धार्मिक किंवा सामाजिक कार्य असले की ते सर्वांत पुढे असत. लोकांच्या मदतीसाठी ते नेहमी धावून जात.

श्रावण महिन्यात गावात नवनाथ, रामविजय, हरिविजय यांसारख्या ग्रंथांचे अध्याय लावले जात. हे अध्याय प्राकृत भाषेतील ओवीबद्ध स्वरूपात असल्यामुळे सामान्य माणसाला त्यांचा अर्थ समजणे कठीण जाई. अशा वेळी बुधाजी तळपे अत्यंत सोप्या आणि ओघवत्या मराठीत त्या ओव्यांचे अर्थ सांगत. त्यामुळे त्यांच्याविषयी गावकऱ्यांच्या मनात विशेष आदर होता.

धार्मिक कार्याबरोबरच ते तमाशात भूमिका करत, दगडी जाते-पाटे, वरवंटे तयार करत, घरांच्या दगडी जोत्या घडवत, सुतारकाम करत तसेच वनदेवाची पूजाअर्चा देखील करत. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा वारसा धर्माबुवांना लाभला.

शिरगाव आणि मंदोशी गावाच्या खिंडीतील जानका देवी मंदिराच्या उभारणीत बुधाजी तळपे आणि त्यांचे बंधू ठकू तळपे यांचे मोठे योगदान होते. आजही ते मंदिर त्यांच्या सामाजिक कार्याची साक्ष देत उभे आहे.

गावाच्या एकोप्यातून घडलेला कलाकार

त्या काळी गावात एकी होती. गावातील प्रत्येक निर्णय सामूहिकपणे घेतला जात असे. गावाचा तमाशा ही गावाच्या सांस्कृतिक जीवनाची शान होती.

मात्र त्या तमाशात एक मोठी उणीव होती. पेटी (हार्मोनियम) वाजवणारा कलाकार नव्हता.

गावचे ज्येष्ठ कारभारी विष्णू हुरसळे यांनी बुधाजी तळपे यांच्याशी चर्चा केली.

"बुधा तात्या, तुमचा मुलगा धर्मा हुशार आहे. त्याला पेटी शिकवूया. शिकवण्याचा संपूर्ण खर्च गाव उचलेल."

गावासाठी मुलाला कला शिकण्याची संधी मिळत असल्याने बुधाजी तळपे यांनी क्षणाचाही विलंब न करता संमती दिली. त्या एका निर्णयामुळे धर्माबुवांच्या आयुष्याला नवे वळण मिळाले.

सावळा खांडीहून आले पेटीमास्तर

धर्माबुवांना प्रशिक्षण देण्यासाठी मावळ तालुक्यातील सावळा खांडी येथून विशेष पेटीमास्तर बोलावण्यात आले. जवळपास वर्षभर त्यांनी धर्माबुवांना हार्मोनियमचे बारकावे शिकवले.

त्या काळी गुरूला अत्यंत मानाचे स्थान होते. गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून त्या गुरूची वर्षभराची फी भरली. कला ही एका व्यक्तीची नव्हे तर संपूर्ण गावाची संपत्ती आहे, अशी भावना त्या पिढीत होती.

धर्माबुवांनीही या संधीचे सोने केले. त्यांनी हार्मोनियमच्या सुरांवर इतके प्रभुत्व मिळवले की अल्पावधीतच त्यांची ओळख गावाच्या सीमा ओलांडून दूरवर पोहोचली.

पायपेटीचा सुवर्णकाळ आणि भजनसम्राटाचा उदय

धर्माबुवांनी हार्मोनियमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ सुरू झाला. त्यांनी केवळ पेटी वाजवणे शिकले नव्हते, तर त्या सुरांमध्ये स्वतःचा आत्माच ओतला होता. त्यांच्या बोटांमधून उमटणारे स्वर आणि त्यांच्या कंठातून प्रकटणारा मधुर, पहाडी आवाज यांचा विलक्षण संगम रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकत असे.

सन १९७४ मध्ये गावकऱ्यांनी वर्गणी काढून त्या काळी मोठी समजली जाणारी रुपये ५,००० इतकी रक्कम जमा केली. ही रक्कम तमाशासम्राट कै. शंकरराव कोकाटे यांना देऊन त्यांच्याकडील सेकंड हँड पायपेटी विकत घेण्यात आली. त्या काळात पायपेटी हे केवळ एक वाद्य नव्हते, तर गावाच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानले जात असे.

धर्माबुवांच्या हाती ती पायपेटी आली आणि जणू तिला नवे प्राणच मिळाले. त्यांच्या बोटांचा स्पर्श होताच त्या पेटीतून असे स्वर उमटत की श्रोत्यांच्या मनावर त्यांची जादू व्हायची. त्यांच्या आवाजात एकाच वेळी गोडवा, ताकद आणि भक्तिभाव होता. स्वच्छ पांढरे शुभ्र धोतर, पैरण, डोक्यावर टोपी, गळ्यात मफलर आणि चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य—हा त्यांचा साधा पण रुबाबदार पोशाख त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिकच उठाव देत असे.

मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. काही वर्षांनी गावचा तमाशा बंद पडला आणि त्याबरोबरच पायपेटीचे सूरही जणू थांबले. अधूनमधून धर्माबुवा पेटी बाहेर काढत, तिची साफसफाई करत, काही स्वर छेडत आणि पुन्हा ती काळजीपूर्वक ठेवून देत. हळूहळू पावसाळ्यातील दमट हवेमुळे पेटीचे लाकूड फुगले, भाता निकामी झाला आणि सुरेल आवाज देणारी ती पायपेटी कायमची बंद पडली.

धर्माबुवांनी ती अनेकदा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यासाठी लागणारा खर्च परवडणारा नव्हता. गावानेही त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. आपल्या जिवाभावाच्या साथीदारासारखी असलेली पायपेटी निकामी झाल्याचे दुःख त्यांच्या मनाला कायम बोचत राहिले.

मंदोशी गावात भजनांची परंपरा कायम होती. धर्माबुवा प्रत्येक भजनात हजेरी लावत; पण हार्मोनियम नसल्यामुळे त्यांचे मन पूर्णपणे रमू शकत नव्हते. त्यांच्या मनातील ही सल त्यांच्या जावयांनी श्री. भिकाजी गवारी यांनी ओळखली. त्या वेळी ते बारामती येथे दुग्धविभागात नोकरीला होते. त्यांनी विशेष प्रयत्न करून एक सुंदर, कर्णमधुर हार्मोनियम आणून धर्माबुवांना भेट दिले.

तो दिवस आजही माझ्या डोळ्यांसमोर ताजा आहे.

धर्माबुवांनी नवीन हार्मोनियमसमोर बसून पहिला सूर छेडला. क्षणात संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भरून गेले. त्यांच्या कंठातील मधुर स्वर आणि हार्मोनियमची सुरेल साथ इतकी एकरूप झाली की जणू साखर दुधात विरघळावी तसे संगीत वातावरणात विरघळून गेले. त्या दिवशी मी प्रथमच संगीताची खरी जादू अनुभवली.

याच काळात गावातील जुना तबलाही मी दुरुस्त करून आणला. श्री. दिगंबर उगले यांच्याकडे डग्गा होता. सर्व कलाकार पुन्हा एकत्र आले आणि मंदोशीच्या भजन परंपरेला नवे जीवन मिळाले

भजनसम्राटाचा गौरवशाली वारसा

नवीन हार्मोनियम मिळाल्यानंतर धर्माबुवांच्या आयुष्यात जणू नवचैतन्य संचारले. त्यांच्या सुरेल पेटीला साथ देण्यासाठी गावातील इतर कलाकारही उत्साहाने एकत्र आले आणि मंदोशीच्या सांस्कृतिक इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.

भजन मंडळात धर्मा तळपे हार्मोनियमवर,  दिगंबर उगले आणि बाळू सुतार तबला व डग्ग्यावर, विष्णू पांडू तळपे चकव्यावर, मारुती जढर टाळांवर, तर देवराम कृष्णा तळपे घुंगरू काठीवर साथ देत असत. महिला वर्गातून हौसाबाई, देवईबाई आणि गंगूबाई तळपे यांचा मधुर स्वर भजनाला अधिकच भावपूर्ण बनवत असे.

अल्पावधीतच हे भजन मंडळ परिसरात प्रसिद्ध झाले. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, यात्रा आणि धार्मिक सोहळ्यांमध्ये या भजनाची एवढी मागणी वाढली की एका दिवसात सकाळ, दुपार आणि रात्री अशा तीन वेळा भजने सादर करण्याची वेळ येत असे. धर्माबुवांच्या सुरेल हार्मोनियमने आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या आवाजाने मंदोशी गावाला संपूर्ण आंबेगाव, खेड आणि मावळ परिसरात एक वेगळी ओळख मिळवून दिली.

हेही वाचा:- मंदोशी गावचा पुजारी विठ्ठल भगत

याच काळात मंदोशी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे भजन मंडळही तयार होत होते. धर्माबुवांनी मुलांना अत्यंत संयमाने भजन, स्वर, लय आणि ताल यांचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून शाळेच्या भजन मंडळाने तालुका आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या यशामागे धर्माबुवांचे मार्गदर्शन आणि निस्वार्थ परिश्रम यांचा सिंहाचा वाटा होता.

धर्माबुवांच्या कंठातून उमटणारे अनेक अभंग आजही कानात घुमतात. "रूप पाहता लोचनी," "धरिला पंढरीचा चोर," "येई हो विठ्ठले," "जय जय शंभो तू महादेवा," "हरी जय जय राम," तसेच कृष्णभक्तीने ओथंबलेल्या गवळणी ते इतक्या भावपूर्ण पद्धतीने सादर करत की श्रोते भक्तिरसात पूर्णपणे तल्लीन होत.

विशेषतः "अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र..." हा अभंग धर्माबुवांच्या आवाजात ऐकण्याचा अनुभव शब्दांत मांडणे अशक्य आहे. पहाडी आवाजातील त्यांची ती आरोह-अवरोह आजही स्मरणात रोमांच निर्माण करतात.

मी आणि माझा चुलतभाऊ, धर्माबुवांचे सुपुत्र कै. मारुती तळपे, आम्ही दोघांनी त्यांच्याकडून हार्मोनियम शिकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिस्तीबाबत ते अत्यंत कडक होते. त्यांच्या कठोर प्रशिक्षणपद्धतीमुळे आम्हाला ते शिक्षण पूर्ण करता आले नाही.आज मागे वळून पाहताना वाटते की, त्या वेळी थोडा अधिक चिकाटीने प्रयत्न केला असता तर त्यांच्या कलेचा काही अंश तरी आम्हाला लाभला असता.

आज धर्माबुवांचे वय ऐंशीच्या पुढे गेले आहे. वाढत्या वयामुळे त्यांना ऐकू येत नाही. तरीही गावात यात्रेनिमित्त नामांकित भजनाचा कार्यक्रम असला की ते आवर्जून उपस्थित राहतात. स्वर ऐकू येत नसले तरी संगीताशी असलेली त्यांची नाळ आजही तुटलेली नाही. हे दृश्य पाहिले की त्यांच्या संगीतसाधनेची खरी उंची लक्षात येते.

आंबेगाव, खेड आणि मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक आजही त्यांचा उल्लेख "पेटीमास्तर धर्माबुवा" असाच करतात. त्यांच्या भजनाचा विषय निघाला की लोक आजही भरभरून कौतुक करतात आणि एकच वाक्य उच्चारतात.

"धर्माबुवांसारखा पेटीमास्तर पुन्हा होणे कठीण आहे."

धर्माबुवा तळपे यांनी कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता आयुष्यभर संगीताची सेवा केली. त्यांनी आपल्या सुरांनी गावाच्या सांस्कृतिक परंपरेला नवी ओळख दिली आणि भक्तीचा अमूल्य वारसा पुढील पिढीकडे सोपवला.

आज त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान होणे ही केवळ एका व्यक्तीचा गौरव करण्याची बाब नाही, तर मंदोशी गावाच्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासाला अभिवादन करण्याची संधी आहे. त्यांच्या कलेचे जतन झाले, त्यांच्या कार्याची नोंद इतिहासात झाली आणि पुढील पिढ्यांना त्यांचा प्रेरणादायी वारसा समजला, तर त्यांच्याप्रती तीच खरी कृतज्ञता ठरेल.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)






1 टिप्पणी:

  1. अप्रतिम आठवणी मनात हृदयात आणि स्मरणात कायम राहील असाच सुंदर जीवन प्रवास मांडला आहे.याच गानमहर्षी धर्माजी
    फुलांमुळे माझ्या मंदोशी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या भजनाने तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले होते.

    उत्तर द्याहटवा

खेड तालुका पश्चिम भागाचे लोकनेते : दिगंबर मुऱ्हे

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकारणात ज्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिगंबर (दिनकर) धोंडीबा मुऱ्हे.  साडेस...