Translate

खेड तालुका पश्चिम भागाचे लोकनेते : दिगंबर मुऱ्हे

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकारणात ज्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिगंबर (दिनकर) धोंडीबा मुऱ्हे. 

साडेसहा फूट उंची, गोरापान वर्ण, मजबूत बांधा, परीटघडीचे धोतर, कडक इस्त्रीची पैरण आणि डोक्यावर शुभ्र गांधी टोपी असा त्यांचा रुबाबदार व साधेपणाचा संगम असलेला वेष प्रत्येकाच्या स्मरणात राहणारा होता. त्यांचे मूळ नाव दिगंबर असले तरी ते दिनकर मुऱ्हे आणि नंतर मुऱ्हे साहेब या नावाने ते जनमानसात सुपरिचित होते.

दिगंबर (दिनकर) मुऱ्हे हे केवळ आदिवासी समाजाचे नेते नव्हते, तर संपूर्ण खेड तालुका पश्चिम भागाचे लोकनेते होते. त्यांच्या लोकप्रियतेची उंची आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या तोडीची जनमान्यता या भागात फार थोड्या नेत्यांना लाभली. 

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विलक्षण साम्य जाणवत असे. प्रभावी वक्तृत्व, लोकांशी सहज संवाद साधण्याची कला आणि त्यांचे गडगडाटी, मनमोकळे हास्य ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती.

पार्श्वभूमी:

दिगंबर मुऱ्हे हे सधन कुटुंबात जन्माला आले. त्यांचे वडील धोंडीबा मुऱ्हे हे त्या काळात कोळशाचे व्यापारी होते. त्यांच्या कोळशाच्या वखारी होत्या. त्यांचा कोळसा कोल्हापूरपर्यंत जात असे.

त्यांची टोकवडे गावात सखल भागामध्ये भात शेती होती. आंबेमोहोर, रायभोग, इत्यादी तांदळाचे ते उत्पादन घेत असत. त्यांच्या शेतात काम करायला पंचक्रोशीतील अनेक लोक जात असत. दिगंबर मुऱ्हे यांचे शिक्षण Vernacular final म्हणजेच मराठी जुनी सातवीपर्यंत झाले होते. घरची आर्थिक परिस्थिती सधन असल्यामुळे त्यांना त्या काळात नोकरीची गरज भासली नाही. त्यांनी त्यांचा बहुतांशी वेळ हा राजकीय आणि सामाजिक कार्यासाठी दिला.

सरपंच म्हणून उल्लेखनीय कारकीर्द

सन १९७२ ते १९८२ या सलग दहा वर्षांच्या कालावधीत त्यांनी टोकवडे गावचे सरपंच म्हणून कार्य केले. त्या काळात भिवेगाव, कारकुडी, टोकवडे, मंदोशी आणि शिरगाव ही गावे मिळून एकच टोकवडे ग्रुप ग्रामपंचायत अस्तित्वात होती. या काळात त्यांनी ग्रामीण विकासाबरोबरच शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक उन्नतीला विशेष प्राधान्य दिले.

कोटेश्वर वसतिगृहाची स्थापना

सन १९७२ ते १९७७ या त्यांच्या पहिल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात आदिवासी भागातील गरीब, होतकरू आणि शिक्षणाची ओढ असलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने त्यांनी आपल्या राहत्या घराच्या माडीवर कोटेश्वर वसतिगृह सुरू केले. हे वसतिगृह जिल्हा परिषद, पुणेच्या समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येत असे. विशेष म्हणजे, अनेक दशकांनंतरही हे वसतिगृह आजही कार्यरत असून असंख्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधार बनले आहे.

निवासी आश्रम शाळेसाठी मोलाचे योगदान

सन १९७९ मध्ये दुसऱ्यांदा सरपंच असताना टोकवडे येथे महाराष्ट्र शासनाची निवासी आश्रमशाळा मंजूर झाली. विद्यार्थीसंख्या वाढत गेल्याने जागेची समस्या निर्माण झाली. ही अडचण दूर करण्यासाठी मुक्ताबाई मंदिराशेजारील माळावर भिसे, गोपाळे आणि मुऱ्हे कुटुंबीयांच्या जमिनीचे बक्षीसपत्र मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग, शिक्षकांसाठी निवासव्यवस्था आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणे शक्य झाले.

आरोग्य सुविधांचा पाया

टोकवडे येथे पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यामध्येही दिगंबर मुऱ्हे यांचा सिंहाचा वाटा होता. उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणे, बांधकामाची प्रक्रिया पूर्ण करणे आणि आवश्यक सुविधा उभारण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्यसेवा गावातच उपलब्ध होऊ लागली.

जलसंधारणाचे कार्य

कारकुडीकडून टोकवडे येथे येणाऱ्या ओढ्यावर उभारण्यात आलेला पाझरतलाव देखील त्यांच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात पूर्ण झाला. या पाझर तलावामुळे परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध होण्यास मदत झाली आणि ग्रामीण विकासाला चालना मिळाली.

दिगंबर धोंडीबा मुऱ्हे यांनी शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत केलेले कार्य आजही पश्चिम भागातील नागरिक कृतज्ञतेने स्मरतात. लोकसेवा हीच खरी राजकारणाची दिशा असावी, याचे ते जिवंत उदाहरण होते. त्यांच्या कार्याचा ठसा आजही टोकवडे आणि परिसरातील सामाजिक जीवनावर स्पष्टपणे उमटलेला दिसून येतो.

डेहणे आदिवासी दूध उत्पादक व विविध कार्यकारी संस्थेचा विकास : 

डेहणे आदिवासी दूध उत्पादक व विविध कार्यकारी संस्था ही पश्चिम आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन झालेली एक महत्त्वपूर्ण सहकारी संस्था होती. सन १९६७ मध्ये संस्थेची स्थापना झाली असली, तरी सुरुवातीच्या सुमारे पंधरा वर्षांच्या काळात तिची प्रगती मर्यादित होती. त्या वेळी संस्था प्रामुख्याने दूध संकलनाचे काम करत असे. संकलित केलेले दूध खाजगी वाहनांद्वारे पुण्यातील कात्रज डेअरीपर्यंत पोहोचवले जात असे.

सन १९७९ ते १९८४ या पाच वर्षाच्या कालावधीत ते डेहणे आदिवासी दूध उत्पादक व विविध कार्यकारी संस्थेचे चेअरमन होते. संस्थेच्या स्थापनेनंतर ते दुसऱ्या पंचवार्षिकचे चेअरमन होते. त्यावेळी संस्था नवीनच होती.  सुरुवातीच्या काळात संस्थेला पायाभूत सुविधा निर्माण करण्यात बराचसा वेळ निघून गेला.  

सन १९८५ मध्ये नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले आणि संस्थेच्या इतिहासात परिवर्तनाचे नवे पर्व सुरू झाले. दूरदृष्टी, धाडसी निर्णय आणि शेतकरी हिताची भूमिका यांमुळे पुढील काही वर्षांत संस्थेचा सर्वांगीण कायापालट झाला.

हेही वाचा :-नानाभाऊ कशाळे खेड तालुका पश्चिम भागातील विकासाभिमुख नेतृत्व

सन १९८२ ते १९८७ या कालावधीतील संचालक मंडळ 

भागुजी हरिबा भाईक (नायफड) : चेअरमन

शंकरराव राघूजी हुरसाळे (मंदोशी) : व्हा.चेअरमन

पांडुरंग वनघरे (भिवेगाव) : संचालक

दिगंबर धोंडीबा मुऱ्हे (टोकावडे)  : संचालक, जिल्हा प्रतिनिधी

किसन देहू तळपे गुरुजी (मंदोशी)  : संचालक

मैफती भिमाजी जठार (धुओली)  : संचालक

दादाभाऊ कोरडे (डेहणे)  : संचालक

मारुती लांघी (डेहणे) : संचालक

श्रीपत तावजी ठोकळ (नायफड)  : संचालक

श्रीपत लांघी (खरोशी)  : संचालक

ठकूजी बापूजी जठार (धुओली) :- सचिव (मॅनेजर)

या संचालक मंडळातून कै. दिगंबर धोंडीबा (दिनकर) मुऱ्हे यांची पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज) च्या संचालकपदी एकमताने निवड झाली. त्यांनी सलग दहा वर्षे जिल्हा दूध संघाचे संचालक म्हणून कार्य करत पश्चिम भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रभावी प्रतिनिधित्व केले.

संस्थेचा स्वतःचा ट्रक खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय

सन १९८२ मध्ये संस्थेने घेतलेला सर्वांत महत्त्वाचा निर्णय म्हणजे दूध वाहतुकीसाठी स्वतःचा ट्रक खरेदी करण्याचा. त्यासाठी परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थांनी लोकवर्गणीद्वारे आर्थिक मदत केली. लोकसहभाग आणि संस्थेच्या निधीतून नवीन ट्रक खरेदी करण्यात आला. MWP–2206 हा त्या ट्रकचा नोंदणी क्रमांक होता.

ड्रायव्हरची नियुक्ती करून संस्थेचे दूध स्वतःच्या वाहनातून थेट पुण्यातील कात्रज डेअरीला पाठविण्यास सुरुवात झाली. त्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी झाला, वेळेची बचत झाली आणि दूध संकलन अधिक नियमित व विश्वासार्ह झाले.

शेतकऱ्यांना कर्ज व दुग्धव्यवसायाला चालना

पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हैस खरेदी, गोठे उभारणी तसेच इतर दुग्धव्यवसायासाठी आवश्यक कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी म्हशी खरेदी करून दूध व्यवसाय सुरू केला. परिणामी दूध उत्पादन आणि संकलनात लक्षणीय वाढ झाली.

दूध संकलन केंद्रांचा विस्तार

संस्थेने आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करून खरोशी, नायफड, डेहणे, धुओली, शिरगाव आणि टोकावडे या गावांमध्ये दूध संकलन केंद्रे सुरू केली. प्रत्येक केंद्रावर दूध स्वीकारण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले.

या काळात नावजी वनघरे, चाहू वायळ, विठ्ठल सावंत, नमाजी डामसे, श्रावण बांबळे यांसारख्या कर्मचाऱ्यांनी दूध संकलनाचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडले.

 पावसाळ्यात रस्त्यांची दुरावस्था असल्यामुळे आणि त्यावेळी पूर्ण नसल्यामुळे डेहणे येथील ओढा, वांजळे येथील ओढा यांना पावसाळ्यात पूर आल्यामुळे पश्चिम भागातील वाहतूक ठप्प होत असे. त्यामुळे अनेक दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांचे दूधगाडी न आल्यामुळे नुकसान होई. त्यामुळे घेतलेल्या म्हैस कर्जाचे हप्ते फेडण्यास विलंब होत असे. ही समस्या ओळखून मुऱ्हे साहेब व संचालक मंडळानी भोरगिरी, भिवेगाव, शिरगाव, धुओली येथील दूध संकलन केंद्रांचे दुध पंधरा लिटरच्या पत्र्याच्या डब्यातून वाहतुकीद्वारे थेट डेहणे येथे पोहोचवण्याची व्यवस्था केली. डब्यातून दूध पोहोचवण्यासाठी अनेक गरिबांना पावसाळ्यात रोजगार मिळाला.

रेशनिंग दुकानांचा अभिनव उपक्रम

संस्थेने केवळ दूध व्यवसायापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन डेहणे आणि शिरगाव येथे रेशनिंग दुकाने सुरू केली.

या दुकानांमधून साखर, रवा, गहू, पामतेल, रॉकेल आदी जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येत होत्या. तसेच ग्रामीण महिलांसाठी नऊवारी लुगडीही अत्यंत माफक दरात विक्रीस ठेवण्यात आली. या लुगड्यांना लोक त्याकाळी सोसायटीची लुगडी असे म्हणायचे.त्या काळात हा अत्यंत लोकहिताचा उपक्रम ठरला.

पावसाळ्यातील वाहतुकीवर मात करणारा अभिनव निर्णय

पश्चिम भागात अतिवृष्टी होत असल्यामुळे अनेक ओढ्यांना पूल नव्हते. पावसाळ्यात डेहणे गावापुढील वाहतूक पूर्णपणे बंद होत असे. त्यामुळे अनेक दिवस दूध संकलन ठप्प होण्याची वेळ येत होती.

या गंभीर समस्येवर संस्थेने अत्यंत अभिनव उपाय शोधला. दूधाचे डबे मजुरांकडून कावडीच्या साहाय्याने खांद्यावर वाहून डेहण्यापर्यंत आणण्याची व्यवस्था करण्यात आली. तेथून पुढे ट्रकद्वारे दूध कात्रज डेअरीला पाठवले जाई.

या निर्णयामुळे पावसाळ्यातही दूध संकलन अखंड सुरू राहिले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळले आणि डबे वाहून नेणाऱ्या स्थानिक मजुरांनाही रोजगार उपलब्ध झाला.

स्थानिक तरुणांना रोजगार

कै. दिगंबर उर्फ दिनकर मुऱ्हे यांनी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक म्हणून कार्य करताना पश्चिम भागातील अनेक सुशिक्षित तरुणांना कात्रज डेअरीमध्ये नोकऱ्या मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आणि ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल घडून आला.

सन १९८२ ते १९९२ : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी)च्या विकासाचा सुवर्णकाळ

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज डेअरी) हा महाराष्ट्रातील सहकार चळवळीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. ग्रामीण भागातील दूध उत्पादकांना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आणि ग्राहकांना दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देणे ही संघाची प्रमुख उद्दिष्टे होती.

या संस्थेच्या इतिहासात सन १९८२ ते १९९२ हा कालावधी विकास, आधुनिकीकरण आणि व्यवस्थापनातील दूरदृष्टीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो.

दूरदृष्टीचे नेतृत्व

या काळात दिगंबर मुऱ्हे,वामनराव घारे, गोपाळराव म्हस्के, रामचंद्र ठोंबरे यांसारख्या अनुभवी सहकार नेत्यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने ग्रामीण दूध उत्पादक संस्थांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवत शेतकरीहिताचे अनेक निर्णय घेतले.

दुग्धजन्य उत्पादनांचा विस्तार

केवळ दूध विक्रीवर अवलंबून न राहता तूप, श्रीखंड, आम्रखंड, लोणी, पेढे आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनाला मोठी चालना देण्यात आली. आधुनिक पॅकेजिंगमुळे कात्रज डेअरीची उत्पादने ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय झाली.

दूध शीतकरण केंद्रांचा विस्तार

ग्रामीण भागातील दूधाची गुणवत्ता टिकवण्यासाठी जिल्ह्यात अनेक दूध शीतकरण केंद्रे उभारण्यात आली किंवा त्यांची क्षमता वाढविण्यात आली. त्यामुळे दूध खराब होण्याचे प्रमाण कमी झाले आणि वाहतूक अधिक परिणामकारक झाली.

राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या (NDDB) सहकार्याने 'ऑपरेशन फ्लड'च्या तिसऱ्या टप्प्यात प्राथमिक दूध उत्पादक संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्यात आले. दूध संकलन, वाहतूक, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य यामध्ये मोठी सुधारणा झाली.

आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार

दूध प्रक्रिया आणि वितरणासाठी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढविण्यात आला. पारंपरिक बाटल्या आणि कॅन पद्धतीऐवजी प्लास्टिक पाऊच पॅकेजिंग सुरू करण्यात आले. त्यामुळे दूध अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि ग्राहकाभिमुख स्वरूपात उपलब्ध होऊ लागले.

शेतकरी कल्याणाच्या योजना

फिरते पशुवैद्यकीय दवाखाने, कृत्रिम रेतन, लसीकरण, संतुलित पशुखाद्याचा पुरवठा आणि पशुपालनविषयक मार्गदर्शन या योजनांमुळे जनावरांचे आरोग्य सुधारले. परिणामी दूध उत्पादनात लक्षणीय वाढ झाली.

डॉ. वर्गीस कुरियन यांची ऐतिहासिक भेट

सन १९९२ मध्ये भारताच्या श्वेतक्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांनी कात्रज डेअरीला भेट देऊन संस्थेच्या विकासाचा आढावा घेतला. त्यांनी संचालक मंडळाशी चर्चा करून राष्ट्रीय डेअरी विकास मंडळामार्फत आवश्यक सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका व्यक्त केली. ही भेट कात्रज डेअरीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते.

डेहणे आदिवासी दूध उत्पादक व विविध कार्यकारी संस्थेने सन १९८२ नंतर घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे पश्चिम आदिवासी भागातील सहकार चळवळीला नवी दिशा मिळाली. दूध संकलन, वाहतूक, रोजगारनिर्मिती, शेतकरी कल्याण आणि लोकसहभाग यांच्या बळावर संस्थेने ग्रामीण विकासाचा आदर्श निर्माण केला.

त्याचबरोबर सन १९८७ ते १९९२ या कालावधीत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) ने आधुनिकीकरण, उत्पादनवाढ, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शेतकरीहिताच्या योजनांद्वारे दुग्ध व्यवसायात मोठी झेप घेतली. या दोन्ही संस्थांच्या कार्यामुळे पश्चिम भागातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य, रोजगार आणि विकासाची नवी पहाट उगवली.

मुऱ्हे साहेबांचा शेवटचा काळ

कै. दिगंबर उर्फ दिनकर धोंडीबा मुऱ्हे यांनी सन १९९२ पर्यंत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी)चे संचालक म्हणून उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

त्यांच्या प्रयत्नांमुळे खेड तालुक्यातील वाडा आणि पाईट येथे दूध शीतकरण केंद्रे सुरू करण्यात आली. त्यामुळे पश्चिम भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. दूधाची गुणवत्ता टिकून राहिली आणि वाहतुकीतील अडचणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या.

डेहणे आदिवासी दूध उत्पादक व विविध कार्यकारी संस्थेचे मुख्य दूध संकलन केंद्र अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले. तसेच भविष्यातील विस्तार लक्षात घेऊन शिरगाव आणि टोकावडे येथे संस्थेच्या इमारतींसाठी जमिनी खरेदी करण्यात आल्या.

मुऱ्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली दूध संकलनात अनेक पटींनी वाढ झाली. दूध संकलनासाठी प्रभावी व्यवस्था उभारण्यात आल्यामुळे खराब व आंबूस दूधाचे प्रमाण अत्यल्प झाले. परिणामी शेतकऱ्यांना दर्जेदार दूधासाठी चांगला दर मिळू लागला आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली.

दुग्ध व्यवसायाचा विस्तार व्हावा यासाठी जिल्हा दूध संघामार्फत गरजू शेतकऱ्यांना संकरित गाई आणि म्हशी खरेदी करण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले.

मुऱ्हे साहेबांनी सामाजिक बांधिलकी जपत भागातील अनेक सुशिक्षित तरुणांना पुणे जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या कार्यामुळे अनेक कुटुंबांचा आर्थिक पाया भक्कम झाला.

सन १९९२ पर्यंत ते डेहणे आदिवासी दूध उत्पादक व विविध कार्यकारी संस्था तसेच पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ या दोन्ही संस्थांवर संचालक म्हणून कार्यरत होते.

सन १९९४ मध्ये त्यांना मूत्रपिंडाच्या (किडनी) आजाराने ग्रासले. प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली आणि अखेर १७ ऑगस्ट १९९६ रोजी या सहकार नेत्याची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पश्चिम भागातील सहकार चळवळीने दूरदृष्टीचा नेता गमावला.

संस्थेचा उतरता काळ

मुऱ्हे साहेबांच्या निधनानंतर सहकार क्षेत्रात मोठे बदल घडू लागले. शासनाने "गाव तिथे दूध डेअरी" ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. त्यानुसार अनेक गावांमध्ये स्वतंत्र दूध डेअऱ्या आणि स्वतंत्र संचालक मंडळे स्थापन झाली.

या बदलामुळे डेहणे आदिवासी दूध उत्पादक व विविध कार्यकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रावर मोठा परिणाम झाला. पूर्वी अनेक गावांमधून एकत्रित होणारे दूध आता त्या-त्या गावातील स्वतंत्र डेअऱ्यांमध्ये संकलित होऊ लागले. परिणामी डेहणे संस्थेकडे येणाऱ्या दूधाचे प्रमाण झपाट्याने घटले आणि संस्थेच्या उत्पन्नात मोठी घट झाली.

सन १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात संस्था हळूहळू आर्थिक अडचणीत सापडू लागली. बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय वेळेत घेण्यात संस्थेला यश आले नाही. त्यामुळे संस्थेची आर्थिक घडी विस्कटत गेली.

रेशनिंग दुकानांवरील परिणाम

संस्थेच्या ताब्यातील रेशनिंग दुकाने कालांतराने विविध प्रशासकीय अडचणींमध्ये सापडली. अनियमिततेच्या कारणावरून संबंधित प्रशासनाने रेशनिंग दुकानांचे परवाने रद्द केले आणि संस्थेचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे संस्थेच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत बंद झाला.

कर्जबाजारीपणा आणि मालमत्तेचा लिलाव

दूध व्यवसायाबरोबरच संस्था भात, हिरडा, भुईमुगाच्या शेंगा आदी कृषीमालाची हमीभावाने खरेदी करत होती. या खरेदीसाठी संस्थेने आदिवासी विकास महामंडळाकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या हमीसाठी डेहणे येथील संस्थेचे गोदाम तारण ठेवण्यात आले होते.

मात्र आर्थिक अडचणींमुळे हे कर्ज पूर्णपणे फेडता आले नाही. परिणामी संस्थेच्या काही मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. त्यामध्ये डेहणे येथील संस्थेची इमारत, ज्या इमारतीत पीडीसीसी बँकेची शाखा कार्यरत आहे, तसेच संस्थेचे गोदाम यांचा समावेश होता. दूध वाहतुकीसाठी खरेदी केलेला संस्थेचा ट्रकही विकावा लागला.

संस्थेच्या मालकीची डेहणे येथील दूध डेअरी तसेच टोकावडे आणि शिरगाव येथील जमिनींच्या पुढील स्थितीबाबत आजही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे अनेक ज्येष्ठ सभासद सांगतात.

खाजगी डेअऱ्यांचा उदय

सन १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात गावागावांमध्ये खाजगी दूध डेअऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. अधिक सोयी, त्वरित व्यवहार आणि स्पर्धात्मक धोरणांमुळे अनेक शेतकरी खाजगी डेअऱ्यांकडे वळले.

या बदलत्या परिस्थितीत सहकारी संस्थांना दूध उत्पादकांना पुन्हा आपल्या व्यवस्थेकडे आकर्षित करण्यात अपेक्षित यश मिळाले नाही. परिणामी सहकारी दूध संकलन व्यवस्थेचा पाया कमकुवत होत गेला.

काही भागांमध्ये दूध संकलनाच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या. खराब किंवा आंबूस दूधाचे प्रमाण वाढल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. हळूहळू खाजगी डेअऱ्यांचे वर्चस्व वाढले; परंतु कालांतराने त्यांपैकीही अनेक डेअऱ्या बंद पडल्या.

एकेकाळी पश्चिम भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेले सहकारी दूध संकलनाचे जाळे कालांतराने मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. डेहणे आदिवासी दूध उत्पादक व विविध कार्यकारी संस्थेची ही कहाणी सहकार चळवळीच्या उत्कर्ष आणि अवनतीची साक्ष देणारी ऐतिहासिक नोंद म्हणून कायम स्मरणात राहील.

प्रत्येक गावात स्वतंत्र दूध संस्था आणि संचालक मंडळे स्थापन झाल्यानंतर सहकारी दूध संकलनाची पूर्वीची एकसंध व्यवस्था मोठ्या प्रमाणात बदलली. काही भागांत दूध संकलनाच्या व्यवस्थापनात अडचणी निर्माण झाल्या. दर्जा नियंत्रणातील त्रुटी, स्पर्धात्मक वातावरण आणि खाजगी डेअऱ्यांच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक सहकारी संस्थांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. कालांतराने सहकारी डेअऱ्याही बंद पडल्या. परिणामी, पश्चिम भागात एकेकाळी मजबूत असलेले सहकाराचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले.

डेहणे आदिवासी दूध उत्पादक व विविध कार्यकारी संस्थेचा इतिहास हा केवळ एका संस्थेचा इतिहास नाही; तर पश्चिम आदिवासी भागातील सहकार, लोकसहभाग, शेतकरी चळवळ आणि ग्रामीण विकासाचा प्रवास आहे. दिगंबर (दिनकर) धोंडीबा मुऱ्हे, भागुजी हरिबा भाईक (चेअरमन) व तत्कालीन संचालक मंडळ यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे या संस्थेने विकासाचे शिखर गाठले; तर बदलत्या आर्थिक आणि प्रशासकीय परिस्थितीत सहकारासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचीही ही कहाणी आहे. हा इतिहास भविष्यातील सहकार चळवळीसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल.

फोटो सौजन्य :- श्री नंदकुमार गोपाळे (टोकावडे)

लेखक :- रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

 



२ टिप्पण्या:

खेड तालुका पश्चिम भागाचे लोकनेते : दिगंबर मुऱ्हे

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकारणात ज्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिगंबर (दिनकर) धोंडीबा मुऱ्हे.  साडेस...