Translate

पिचलेला, वाकलेला आदिवासी आजही उपाशीच!

आमची दैवतं कोण? वीर खंडोबा, भैरोबा, आई सटवाई, कळमजाई, वरसुबाई, भीमाशंकर, वाघ्या. महादेव कोळी समाजाचं दैवत तर प्रत्यक्ष शंकर. इतिहास सांगतो, प्रभू श्रीराम वनवासात असताना याच आदिवासी बांधवांनी त्यांना मदत केली. मग आज आमचे देव कुठे आहेत? असा प्रश्न आम्हाला पडतो.

आम्ही काय दिलं आणि आम्हाला काय मिळालं?

आम्ही डोंगर वाचवले, जंगल वाचवलं, जमीन, विहिरी, नाले, तळे वाचवले. याच डोंगरातून शहराला प्यायला पाणी गेलं, स्वच्छ हवा गेली, वीज तयार होऊन शहर उजळलं. आणि आम्ही मात्र आजही उपाशी-तापाशीच राहिलो. आमच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. आमचा फक्त निवडणुकीसाठी वापर केला जातो. प्रचार आम्ही करायचा आणि हातात मात्र काहीच पडायचं नाही.

विकासाच्या नावावर बोंब

आजही अनेक आदिवासी पाड्यांवर जायला रस्ता नाही, वीज तर सोडाच. नाशिक, पालघर गडचिरोली डोंगरपट्टीत आजही बाळंतीण बाईला आजारी पडल्यावर झोळीत घालून 10-15 किलोमीटर दवाखान्यापर्यंत न्यावं लागतं. दवाखान्यात पोहोचेपर्यंत तिचा जीव जातो. ही आमची रोजची वेदना आहे. देवानं हाच प्रवास आमच्या नशिबी लिहिलाय का?

शिक्षणाची अवस्था तर अधिक भयानक आहे. गडचिरोलीच्या एका आश्रमशाळेत साप चावून 3-4 मुलं दगावली. किती आश्रमशाळा, वस्तीगृहे आहेत पण तिथे व्यवस्था नाही. ठेकेदारी पद्धत आली आहे. पूर्वी आमच्या आया स्वयंपाक करायच्या, मुलांना गरम भाजी-चपाती मिळायची. आता 50-100-150 किलोमीटरवरून ठेकेदाराचं शिळं जेवण येतं. सकाळचा नाश्ता दुपारी आणि दुपारचं जेवण संध्याकाळी मिळतं. यात ठेकेदार आणि राज्यकर्ते पैसे खातात आणि आमच्या मुलांच्या ताटातलं अन्नही हिरावून घेतलं जातं.

आरोग्याचं वेगळंच. दवाखाने नाहीत. लोक जंगली औषध खाऊन मरतात, हिंस्र प्राण्यांचे हल्ले, साप-विंचू दंशाने जीव जातो. हे जीवन म्हणजे नरक आहे.

आमच्या हक्कावरच घाला

राजीव गांधी एकदा म्हणाले होते - आम्ही वरून एक रुपया पाठवतो, पण खाली फक्त 10 पैसे पोहोचतात. आजही तेच सत्य आहे. आता तर परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

काही शहरी लोक म्हणू लागले आहेत - आदिवासींना खूप दिलं, त्यांची पोरं शिकली, आता सवलती बंद करा. आमच्या आर्थिक योजनांची तरतूद काढून घेतली जात आहे. वस्तीगृहांवर वयाची अट घालून आमची मुलं शिक्षणापासून वंचित केली जात आहेत. तुम्ही तेवढंच शिका, आम्ही सांगू तेवढंच काम करा, आम्ही देऊ तेच खा आणि गप पडा - अशी हुकूमशाही राज्यकर्त्यांमध्ये आली आहे. ही पिळवणूक इंग्रजांपेक्षाही भयंकर आहे.

शासकीय कार्यालयात आमच्या नोकऱ्या बोगस जातीचे दाखले देऊन बळकावल्या आहेत. ज्या नोकऱ्या आमच्या शिकलेल्या गरीब मुलांना मिळायला हव्या होत्या, त्या मिळत नाहीत. PESA कायद्यानुसार भरतीसाठी किती आंदोलने झाली, पण सरकारच्या नाकर्तेपणामुळे आदिवासी मुलांना हक्काच्या नोकऱ्या मिळत नाहीत. वर आम्हालाच सांगितलं जातं - योजना बंद करा, पदोन्नती देऊ नका. असा घाट घातला जात आहे

आमच्या जमिनी विषकावून घेतल्या जात आहेत आम्हाला त्यापासून अधिक दूर लोटल जात आहे आमच्या सह्याद्री पट्ट्यातील जागेवर डोळा ठेवून हे सरकार मोठ मोठ्या धनवत माणसाला आमच्या जमिनी आम्हाला न विचारता परस्पर देत आहेत मूळ जागेतून डोंगर कपाऱ्यामध्ये गेलोय आणि पुन्हा आहे त्या सुद्धा जमिनीत तुम्ही वेगवेगळ्या योजनांसाठी श्रीमंत लोकांच्या माग धावून तुम्ही आम्हाला उघडे करत आहात राष्ट्रपती आमच्या आहेत पण आता त्या गप्प आहेत 

चांगलं नाही सरकार? 

आता आव्हान - जागे व्हा!

म्हणून माझ्या सर्व आदिवासी बांधवांनो, आता एक होण्याची वेळ आली आहे. या आदिवासी विकास मंत्री, आदिवासी आयुक्त आणि शासनाला आपण घेराव घातला पाहिजे. एक जोरदार उठाव केला पाहिजे.

आपल्या वीरांना आठवा - भगवान बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भिल्ल यांना आठवा. आपली कुदळ, फावडे, दांडके, तीर-कामठी हीच आपली ताकद आहे. आपली गुरं-ढोरं, म्हशी, कोंबड्या-बकऱ्या घेऊन नव्हे, तर आपल्या हक्काच्या एकजुटीने आदिवासी आयुक्त कार्यालयावर किंवा मंत्रालयावर एक महामोर्चा आपल्याला काढावाच लागेल.

आपण जागे झालो तरच आपली पुढची पिढी जगेल.

जय आदिवासी! !

श्री सुदाम मदगे (प्रसिद्ध साहित्यिक आणि कवी) 

तेव्हाचा श्रावण आणि गावचे लोकजीवन

घरामागचे वाडगे, पातवड आणि पावसाळ्यातील आठवणी

जून महिना सुरू झाला की बऱ्यापैकी पाऊस झालेला असायचा. भाताची पेरणी केली जायची. अधूनमधून पावसाच्या सरी सुरू असायच्या आणि सगळीकडे मातीचा ओलसर गंध दरवळत असायचा. शेतकरी भातपेरणी आणि इतर शेतीकामांत गुंतलेले असतानाच ग्रामीण भागातील स्त्रियांचीही एक वेगळीच लगबग सुरू व्हायची. ती म्हणजे घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत भाजीपाल्यासाठी जागा तयार करून तिच्याभोवती कुंपण करण्याची.

या कामासाठी घरातील लहान-मोठ्यांची मदत घेतली जायची. जंगलात जाऊन टनटनी, निरगुडी, रामेठा अशा झाडांची अंगठ्याएवढी जाडी असलेली, पण उंच लाकडे आणली जायची. त्यांना आमच्या भागात ‘खाकर’ असे म्हणत. ही खाकर जंगलातून आणणे, ती योग्य आकारात तयार करणे आणि घरामागील जागेभोवती रोवून कुंपण तयार करणे, हेही पावसाळ्याच्या सुरुवातीचे एक महत्त्वाचे काम असायचे.

घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेची आधी व्यवस्थित मशागत केली जायची. जमीन सपाट करून तिच्यावर शेणखत टाकले जाई. ते शेणखत मातीत चांगले मिसळून संपूर्ण जागा भाजीपाला लावण्यासाठी तयार केली जायची. मधील काही जागा मात्र थोडी उंच ठेवली जायची आणि त्यावर पावसाळी आळूचे कंद लावले जायचे. उर्वरित जागेची रचना अशा विशिष्ट पद्धतीने केली जायची की पावसाचे अतिरिक्त पाणी साचून न राहता सहज बाहेर निघून जाईल. आज आपण ज्याला पाण्याचे नियोजन म्हणतो, त्याचे साधे पण अनुभवसिद्ध ज्ञान त्या काळातील ग्रामीण स्त्रियांना होते.

घरामागे अशा पद्धतीने कुंपण करून तयार केलेल्या या जागेला आमच्या पश्चिम भागात ‘वाडगे’ असेही म्हटले जायचे. या वाडग्यात पावसाळी आळू म्हणजेच आळवड, भोपळ्याचे म्हणजेच डांगराचे बी, दोडक्याचे बी, घेवडा, घोसाळे, कारले आणि काकडीचे बी पेरले जायचे. गवती चहाही लावला जायचा. हे सर्व लावून झाल्यानंतर वाडग्याभोवती छानपैकी कुंपण केले जायचे. काही दिवसांतच या छोट्याशा जागेचे रूप पालटायला सुरुवात व्हायची.

थोड्याच दिवसांत वाडग्यात लावलेल्या आळूच्या कंदांना छान कोंब फुटायचे. मातीत पेरलेले भोपळा, दोडका, घेवडा, घोसाळे, कारले आणि काकडीचे बीही उतरून यायचे. आम्हा लहान मुलांना याची प्रचंड उत्सुकता असायची. जमिनीतून नुकताच वर आलेला कोंब कोणत्या भाजीचा आहे, हे ओळखणे हा आमच्यासाठी जणू एक खेळच असायचा. कोण म्हणायचे, “हा काकडीचा कोंब आहे,” तर कोण म्हणायचे, “नाही, हा भोपळ्याचा आहे.” कोणाला तो दोडक्याचा वाटायचा, तर कोणाला कारल्याचा. त्यावरून आमच्या पैजा लागत आणि वादविवादही व्हायचे.

कधी कधी हा वाद एवढा वाढायचा की आमचा गोंगाट ऐकून घरातील बायामाणसे जवळ यायची आणि आम्हाला चांगलेच दटावायची. “अजिबात वाडग्यात जाऊ नका. रोपांना हात लावू नका. ती तुडवू नका,” अशी तंबी दिली जायची. आम्ही मग बाहेरूनच त्या कोंबांकडे पाहत बसायचो. काही दिवसांनी वेल मोठा झाला की आपली पैज खरी ठरली की खोटी, हे समजायचे. आज विचार केला तर मातीमधून वर आलेला एखादा छोटासा हिरवा कोंबही आमच्या बालपणी किती मोठ्या आनंदाचा आणि कुतूहलाचा विषय होता, याचे आश्चर्य वाटते.

शाळा आणि दोन झाडांची गंमत

पूर्वी पावसाळा सुरू झाला की शासनाकडून प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांनी झाडे लावण्याबाबत परिपत्रक आलेले असायचे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने पावसाळ्यात दोन झाडे लावावीत, अशा सूचना गुरुजी आम्हाला द्यायचे. मग आम्हीही अभ्यासापेक्षा झाडे लावण्यावर जास्त भर द्यायचो. प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपापल्या शेतात किंवा घरामागील वाडग्यात झाडे लावायचे. त्यामध्ये आंबा आणि जांभूळ ही दोन झाडे सर्रास लावली जायची.

दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर गुरुजी प्रत्येकाला विचारायचे, “किती झाडे लावली?” त्यानुसार विद्यार्थ्यांची आणि त्यांनी लावलेल्या झाडांची यादी तयार केली जायची. ती यादी पुढे तालुक्याला पाठवून दिली जायची. आम्हाला मात्र त्या प्रशासकीय यादीपेक्षा आपण लावलेल्या झाडाचे जास्त अप्रूप असायचे. आम्ही दररोज त्या झाडाची किती वाढ झाली आहे हे पाहायचो. नवीन पान आले का, रोप थोडे उंच झाले का, हे पाहण्यातच आम्हाला मोठा आनंद वाटायचा. हा उत्साह साधारण पंधरा ते वीस दिवस चालायचा. त्यानंतर मात्र हळूहळू उत्साह मावळून जायचा आणि आम्ही पुन्हा आमच्या खेळात रमून जायचो.

खाकी चड्डी, मांजरपाटचा शर्ट आणि शाळेचे दिवस

त्या काळातील शाळेची आणखी एक आठवण म्हणजे शाळेत मिळणारे कपडे. पूर्वी प्रत्येक मुलाला शाळेतून एक खाकी चड्डी आणि मांजरपाटचा पांढरा शर्ट मिळायचा, तर मुलींना निळी-पांढरी फ्रॉक मिळायची. शाळेत कपड्यांचे वाटप होणार आहे, ही बातमी समजली की एरवी शाळेत न येणारे काही विद्यार्थीही त्या दिवशी आवर्जून शाळेत हजेरी लावायचे. कपडे मिळाले की मात्र त्यातील काही जण पुन्हा गैरहजर राहायचे! त्या वेळी आम्हाला त्याचीही गंमत वाटायची.

नवीन कपडे मिळाले की प्रत्येक मुलाला त्यांचे खूप अप्रूप वाटायचे. पण कपडे नवीन आणि दिवस मात्र पावसाळ्याचे! घराच्या माळ्यावर पेंढा म्हणजे वैरण, सरपण आणि गोवऱ्या साठवलेल्या असायच्या. चुलीवर स्वयंपाक होत असल्यामुळे घरात खूप धूर व्हायचा. बाहेर पाऊस, चिखल आणि गाळ असायचा. अशा परिस्थितीत शाळेतून मिळालेले नवीन कपडे आठ-दहा दिवसांतच असे काही दिसू लागायचे की ते नवीन आहेत, यावर कोणाचाच विश्वास बसत नसे. त्यात या कपड्यांची गुणवत्ता अत्यंत खराब असल्यामुळे त्यांचा नवीनपणा फार काळ टिकत नसे. काही दिवसांतच त्या कपड्यांविषयी असलेली नवलाई निघून जायची. तरीदेखील नवीन खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट हातात मिळाल्यावर झालेला आनंद आजही आठवतो.

पावसाळा आणि खेकड्याचे कालवण

पावसाळ्यातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे खेकडे म्हणजे किरवे. पाऊस सुरू झाला की खूप जण माळावरून खेकडे आणायचे. त्यामुळे अनेकांच्या घरी रात्री खेकड्याचे कालवण असायचे. कधी कधी लोक भरलेल्या खेकड्यांचे कालवण करायचे. खेकड्यांच्या कवटात हुलग्याचे, बाजरीचे किंवा हरभऱ्याचे पीठ घातले जायचे. त्यात मीठ, मिरची आणि मसाला घालून ते भरले जायचे आणि नंतर त्याचे कालवण बनवले जायचे. त्या भरलेल्या खेकड्यांच्या कालवणाची चव मात्र न्यारीच असायची. पावसाळ्याचे थंडगार वातावरण, चुलीवर शिजणारे कालवण आणि घरभर पसरणारा त्याचा वास यांची आठवण आजही ताजी आहे.

श्रावण आला की...

जून-जुलैचा पाऊस, भाताची शेती, वाडग्यातील भाज्या आणि खेकड्यांचे दिवस सुरू असतानाच श्रावण महिना यायचा. श्रावण महिन्यात प्रत्येक घरातील मोठ्या माणसांचे उपवास असायचे. उपवासाचा दिवस असला की दुपारपासूनच घरात त्याची तयारी सुरू व्हायची. त्या तयारीमध्ये घरामागचा वाडगा पुन्हा उपयोगी पडायचा.

वाडग्यातून आळूची मोठी पाने आणली जायची. ती स्वच्छ धुऊन घेतली जायची. त्यावर बाजरीचे किंवा बेसनचे पीठ, मीठ आणि मसाला लावून पातवड केली जायची. त्या काळात एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे घरात माणसे खूप असायची. त्यामुळे पातवडही थोडीथोडकी करून भागत नसे; सर्वांना पुरेल एवढी भरपूर करावी लागायची. घरातील स्त्रिया मिळून हे काम करायच्या आणि घरात एक वेगळीच लगबग असायची.

पातवड तयार झाल्यानंतर ती शिजवण्याची पद्धतही खास होती. आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या पातेल्यात थोडा पेंढा ठेवला जायचा. त्यात पाणी घातले जायचे. त्यावर चाळण ठेवून भांड्यात पातवड ठेवली जायची. हे मोठे पातेले चुलीवर ठेवले जायचे आणि खाली भरपूर जाळ केला जायचा. वर परात ठेवली जायची. अशा पद्धतीने पातवड वाफेवर छान शिजायची. काही घरांमध्ये या पातवडाच्या वड्या केल्या जायच्या, तर काही ठिकाणी ती तशीच खाल्ली जायची. या भाजीचा गिरंगीटासुद्धा केला जायचा. घरच्या वाडग्यातील आळूच्या पानांपासून चुलीवर तयार झालेल्या त्या पातवडीची चव आजही आठवणीत तशीच आहे.

रिमझिम श्रावण आणि गावातील भजने

श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस पडायचा. ओढ्या-नाल्यांना स्वच्छ, पांढरे शुभ्र पाणी असायचे. डोंगर आणि राने हिरवीगार झालेली असायची. गावात ठिकठिकाणी रात्री भजने असायची आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठे धार्मिक वातावरण निर्माण व्हायचे. बाहेर रिमझिम पाऊस सुरू असताना रात्रीच्या शांततेत दूरवरून ऐकू येणारा भजनांचा आवाज मनाला वेगळाच आनंद द्यायचा.

दर सोमवारी भाविक मोरगिरी मार्गे कोटेश्वराचे दर्शन घेऊन भीमाशंकरला जात. श्रावणातील सोमवार आणि भीमाशंकरची यात्रा यांना त्या काळी विशेष महत्त्व होते. पावसाळ्यातील हिरव्यागार डोंगररांगांमधून पायी चालत देवदर्शनाला जाणे ही केवळ धार्मिक गोष्ट नव्हती; त्यातून निसर्गाशी असलेले माणसाचे नातेही अधिक घट्ट होत असे.

कोटेश्वर मार्गे भोरगिरीवरून भीमाशंकर

आम्हीही लहानपणी कोटेश्वर मार्गे भोरगिरीवरून भीमाशंकरला गेलेलो आहोत. तेव्हा पायी चालण्यात खूप मजा वाटायची. डोंगर-दऱ्या, रानवाटा आणि पावसाळ्यातील हिरवाई पाहत चालत जाण्यात वेगळाच आनंद असायचा. भीमाशंकरला पोहोचल्यानंतर तिथल्या कुंडातील पाण्यात आम्हाला खूप मजा वाटायची. भीमाशंकरला भाविकांचीही खूप गर्दी असायची.

दर्शन झाल्यानंतर लाह्या आणि खडीसाखर घेऊन आम्ही पुन्हा कोटेश्वर मार्गे भोरगिरीवरून घरी परतायचो. तेव्हा प्रत्येक जण स्वच्छंदी असायचा. कोणालाही कामाचा किंवा इतर गोष्टींचा आजच्यासारखा ताण जाणवत नसे. डोंगरातून कितीही चाललो, पावसात भिजलो तरी त्याचा आनंदच वाटायचा. शरीराला श्रम होत होते; पण मनावर ओझे नव्हते.

आज त्या दिवसांची आठवण झाली की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आमच्या बालपणीच्या अनुभवात त्या काळी रक्तदाब, डायबेटीस, हृदयविकार, मुळव्याध किंवा पोटाचे आजार यांसारख्या तक्रारी आजच्या तुलनेत फारशा ऐकू येत नसत. याचा अर्थ त्या काळात हे आजार अस्तित्वातच नव्हते असे नाही; परंतु आमच्या आसपासच्या ग्रामीण जीवनात त्यांची चर्चा आजच्यासारखी वारंवार ऐकायला मिळत नसे. त्या काळातील जीवनशैलीही वेगळी होती. माणूस दिवसभर शारीरिक श्रम करायचा, मैलोनमैल पायी चालायचा, शेतात राबायचा, डोंगर-दऱ्यांतून फिरायचा आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहायचा.

आता मात्र आपण कामाच्या व्यापामुळे हळूहळू निसर्गापासून दूर गेलो आहोत. चालणे कमी झाले, शारीरिक श्रम कमी झाले, बसून काम करण्याचे प्रमाण वाढले आणि जीवनातील ताणतणावही वाढले. त्याबरोबर रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांविषयी आपण अधिक ऐकतो. काही वेळा चाळिशीत असलेला माणूसही जणू साठ-पासष्ट वर्षांचा म्हातारा वाटतो. अर्थात याला केवळ निसर्गापासून दूर जाणे हेच एकमेव कारण म्हणता येणार नाही; आहार, व्यायाम, आनुवंशिकता, वैद्यकीय निदान आणि इतर अनेक घटकही त्यामागे असतात. तरीदेखील निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, शारीरिक हालचाल करणे आणि मनावरील ताण कमी ठेवणे यांचे महत्त्व नाकारता येणार नाही.

गड्या, आपुला गाव बरा!

म्हणूनच “गड्या, आपुला गाव बरा!” हे सूत्र प्रत्येकाने कुठेतरी मनात जपले पाहिजे. याचा अर्थ शहर सोडून प्रत्येकाने कायमचे गावातच जाऊन राहावे असा नाही; तर आपल्या गावाशी आणि आपल्या मातीशी असलेले नाते तुटू देऊ नये. अधूनमधून गावाला गेले पाहिजे. आपण लहानपणी ज्या ठिकाणी खेळलो, ज्या माळावर फिरलो, ज्या रानात अनेकदा गेलो, त्या ठिकाणी पुन्हा एकदा जाऊन पाहिले पाहिजे.

आपण लहानपणी ज्या ओढ्यात खेळलो, ज्या डोंगरवाटेने चाललो, ज्या झाडाखाली बसलो आणि ज्या माळावरून खेकडे आणले, त्या जागा पुन्हा पाहिल्या पाहिजेत. घराच्या पाठीमागे ज्या जागेत वाडगा असायचा, त्या जागेकडेही एकदा पाहिले पाहिजे. कदाचित आज तिथे पूर्वीसारखी खाकरांची कुंपणे नसतील. आळवड, भोपळा, दोडका, घेवडा, घोसाळे, कारले आणि काकडीचे वेलही नसतील. कदाचित त्या जागेचे स्वरूप पूर्णपणे बदलले असेल. पण त्या जागी गेल्यावर आपल्या मनात दडलेल्या आठवणी मात्र नक्की जाग्या होतील.

एखादा हिरवा कोंब पाहिला की वाडग्यातील कोंब कोणत्या भाजीचा आहे यावरून लावलेल्या पैजा आठवतील. एखादे आंब्याचे किंवा जांभळाचे रोप दिसले की गुरुजींनी दिलेली दोन झाडे लावण्याची सूचना आठवेल. एखाद्या जुन्या शाळेसमोरून गेलो की खाकी चड्डी आणि मांजरपाटचा पांढरा शर्ट आठवेल. पावसाळ्यात एखादा खेकडा दिसला की भरलेल्या खेकड्याच्या कालवणाची चव आठवेल. आळूचे मोठे पान पाहिले की चुलीवर वाफवलेली पातवड आणि गिरंगीटा आठवेल. श्रावणातील रिमझिम पावसात एखाद्या मंदिरातून भजनाचा आवाज आला की त्या काळातील गावचे धार्मिक वातावरण आठवेल. आणि एखाद्या हिरव्यागार डोंगरवाटेवरून चालताना कोटेश्वर मार्गे भोरगिरीवरून भीमाशंकरला गेलेला बालपणीचा प्रवास पुन्हा डोळ्यांसमोर उभा राहील.

आज आपल्याकडे अनेक सुखसोयी आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन सोपे केले आहे. या सुविधा नाकारण्याचा प्रश्नच नाही. पण या सगळ्या प्रगतीसोबत आपण आपल्या मातीपासून, गावापासून आणि निसर्गापासून पूर्णपणे तुटून जाऊ नये. कधी तरी कामातून वेळ काढून गावाला गेले पाहिजे. बालपणी ज्या माळावर, ज्या रानात आणि ज्या वाटेवर आपण असंख्य वेळा फिरलो, तिथे पुन्हा एकदा जाऊन पाहिले पाहिजे. पहा, मनाला एक वेगळाच आनंद मिळेल. काही क्षणांसाठी का होईना, बालपणीच्या आठवणी दाटून येतील आणि मन पुन्हा त्या जुन्या दिवसांत रमून जाईल.

माणूस कितीही मोठा झाला, कितीही आधुनिक झाला आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेला, तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात त्याचे गाव, त्याची माती आणि त्याचे बालपण कायम जिवंत असते. म्हणूनच कधी तरी त्या मातीला पुन्हा स्पर्श करा, जुन्या वाटेवरून पुन्हा चालून या आणि आपल्या हरवलेल्या बालपणाला पुन्हा एकदा भेटून या.

तेव्हा मनातून आपोआप एकच शब्द बाहेर पडेल  “गड्या, आपुला गाव बरा!”

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

आदिवासी क्रांतिकारक होनाजी भागोजी केंगले यांचा शौर्यपूर्ण इतिहास

होनाजी भागोजी केंगले परिचय 

महाराष्ट्राच्या इतिहासात सह्याद्रीच्या डोंगररांगांना एक वेगळे स्थान आहे. या डोंगररांगांनी अनेक राजे, सरदार, समाजसुधारक आणि क्रांतिकारक पाहिले. परंतु या मातीत जन्मलेले सर्वच शूरवीर इतिहासाच्या मुख्य प्रवाहात आले नाहीत. अनेकांनी आपल्या परिसरातील लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला, अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आणि प्रसंगी आपल्या प्राणांचीही आहुती दिली; मात्र त्यांची नावे स्थानिक लोकस्मृतीतच अधिक काळ जिवंत राहिली.

आंबेगाव तालुक्यातील जांभोरी या गावाशी जोडलेले होनाजी भागोजी केंगले हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक मानले जातात. सावकारशाहीमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांविरुद्ध त्यांनी संघर्ष उभारला, तसेच पुढे ब्रिटिश सत्तेविरुद्धही बंड केले, अशी स्थानिक परंपरा आहे.

होनाजी केंगले यांच्या जीवनाकडे केवळ एका बंडखोराच्या जीवनकथेच्या रूपात पाहणे अपुरे ठरेल. त्यांच्या कथेमागे त्या काळातील ग्रामीण समाजव्यवस्था, जमीन आणि कर्जाचे संबंध, आदिवासींचे जीवन, सावकारशाही, ब्रिटिश महसूलव्यवस्था आणि स्थानिक समाजातील असंतोष यांचा मोठा इतिहास दडलेला आहे.

त्यामुळे होनाजी केंगले यांची कथा म्हणजे एका व्यक्तीची कथा असली तरी तिच्या मागे एका संपूर्ण समाजाच्या वेदनेचा इतिहास उभा राहतो.

जन्म आणि कुटुंब

उपलब्ध स्थानिक माहितीनुसार होनाजी भागोजी केंगले यांचा जन्म इ.स. १८३५ च्या सुमारास जांभोरी, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे झाला. त्यांचे कुटुंब शेतीप्रधान आणि तुलनेने सधन होते. घरात शेती होती, गुरेढोरे होती आणि दुधदुभत्याचीही कमतरता नव्हती.

एकोणिसाव्या शतकातील ग्रामीण महाराष्ट्रात कुटुंबाची श्रीमंती आजच्या अर्थाने केवळ रोख पैशावर मोजली जात नसे. शेतजमीन, बैलजोडी, गायी-म्हशी, धान्याचा साठा, घरातील सदस्यांची काम करण्याची क्षमता आणि गावातील सामाजिक प्रतिष्ठा या सर्वांचा एकत्रित विचार करून कुटुंबाची आर्थिक ताकद ठरत असे.

होनाजी अशाच ग्रामीण वातावरणात वाढले. त्यांच्या बालपणावर शेती, पशुपालन, डोंगर-दऱ्या, जंगल आणि गावातील सामूहिक जीवन यांचा प्रभाव पडला. त्यामुळे त्यांना ग्रामीण जीवनाची आणि कष्टकरी समाजाची जवळून ओळख झाली.

लहानपणापासूनच शरीराने मजबूत असलेल्या होनाजींचा स्वभावही धाडसी असल्याचे स्थानिक कथनात सांगितले जाते. पुढे त्यांच्या आयुष्यातील संघर्षात या शारीरिक सामर्थ्याचा आणि धैर्याचा मोठा उपयोग झाला.

तरुणपण आणि कुस्ती

त्या काळातील ग्रामीण महाराष्ट्रात कुस्ती हा केवळ खेळ नव्हता. आखाडा म्हणजे तरुणांच्या शरीरसामर्थ्याची परीक्षा घेण्याचे आणि त्याचबरोबर प्रतिष्ठा मिळवण्याचे ठिकाण होते. कुस्तीपटूला गावात मान मिळत असे. त्याची शारीरिक ताकद, संयम, शिस्त आणि धैर्य यांची चर्चा दूरवर होत असे.

दुधदुभत्याच्या सधन घरात वाढलेल्या होनाजी केंगले यांचे शरीर मजबूत आणि पिळदार झाले होते. स्थानिक माहितीनुसार त्यांनी खेड, आंबेगाव, जुन्नर आणि अकोले या भागांत अनेक नामांकित कुस्त्या केल्या होत्या.

होनाजींच्या कुस्तीच्या पराक्रमामुळे त्यांचे नाव आसपासच्या भागात प्रसिद्ध झाले. एका गावातील तरुण दुसऱ्या गावात कुस्ती खेळण्यासाठी गेला की त्याच्या पराक्रमाची चर्चा अनेक दिवस होत असे. अशाच प्रकारे होनाजींचे नाव परिसरात पोहोचले.

परंतु वाढत्या प्रसिद्धीबरोबर त्यांच्या आयुष्यात मत्सरही आला. काही नातेवाईकांना त्यांचा वाढता लौकिक सहन होत नव्हता, पुढे याच कौटुंबिक वैरातून होनाजींना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले जाते.

हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील पुढील संघर्षासाठी महत्त्वाचा ठरला.

तत्कालीन आंबेगाव-जुन्नर परिसराची सामाजिक परिस्थिती

होनाजी केंगले ज्या काळात वाढत होते, तो महाराष्ट्राच्या ग्रामीण इतिहासातील मोठ्या बदलांचा काळ होता. ब्रिटिश सत्तेने प्रशासन आणि महसूलव्यवस्थेत अनेक बदल केले होते. जमीन, महसूल, कर्ज आणि बाजारव्यवस्था यांचे संबंध अधिक गुंतागुंतीचे होत होते.

आंबेगाव, जुन्नर, खेड, अकोले, नाशिक आणि सह्याद्रीलगतचा परिसर डोंगराळ आणि मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असलेला होता. अनेक गावांमध्ये शेती हीच लोकांच्या उदरनिर्वाहाची मुख्य साधन होती. काही समाजांचे जीवन शेतीबरोबर जंगलातील साधनसंपत्ती, पशुपालन आणि स्थानिक व्यापारावरही अवलंबून होते.

महादेव कोळी, ठाकर आणि इतर आदिवासी समाजाचे जीवन डोंगर, जंगल आणि शेतीशी घट्ट जोडलेले होते. त्यांच्या उपजीविकेचे स्वरूप ऋतू, पाऊस आणि नैसर्गिक साधनांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून होते.

पाऊस चांगला झाला तर घरात धान्य येत असे. पाऊस कमी झाला तर अडचण सुरू होत असे. आणि सलग पीक बुडाले तर कुटुंबाला कर्ज घ्यावे लागे.

याच आर्थिक असुरक्षिततेचा फायदा सावकारी व्यवस्थेला मिळत असे.

१८५६ चा दुष्काळ

 इ.स. १८५६ च्या सुमारास या भागात आलेल्या दुष्काळाचे अत्यंत भीषण चित्रण आढळते. पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे जीवन होता. त्यामुळे आकाशात ढग दिसले की लोकांच्या मनात आशा निर्माण होत असे.

काळे ढग जमले की गावकरी आकाशाकडे पाहत. आता पाऊस पडेल, अशी अपेक्षा निर्माण होत असे. परंतु काही वेळाने वारा सुटे आणि ढग विरून जात. पाऊस मात्र पडत नसे.

जून गेला. जुलै महिना संपत आला. तरीही पावसाचा भरवसा राहिला नाही.

शेतकऱ्यांनी पेरलेले बी मातीत पडून राहिले. घरातील धान्यसाठा कमी होत गेला. सुरुवातीला लोकांनी काटकसरीने धान्य वापरले. नंतर भाकरीत कोंडा वाढला. काही कुटुंबांनी उपलब्ध असलेल्या वनउत्पादनांचा आधार घेतला.

जनावरांसाठी चारा उरला नाही. पाणी कमी झाले. गुरे अशक्त होऊ लागली.

दुष्काळाची खरी भीषणता तेव्हा जाणवते, जेव्हा शेतकऱ्याच्या हातात काम असते पण त्या कामातून उत्पन्न मिळत नाही; घरात माणसे असतात पण त्यांना खायला अन्न नसते; आणि जनावरे असतात पण त्यांच्यासाठी चारा नसतो.

अशा परिस्थितीत अनेक कुटुंबांसमोर जगण्यासाठी जमीन गहाण ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.

आदिवासी समाज आणि सावकारशाही

दुष्काळाचा सर्वाधिक फटका गरीब आणि आर्थिकदृष्ट्या असुरक्षित समाजाला बसतो. डोंगर-दऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी समाजाची परिस्थिती यामुळे आणखी बिकट झाली. महादेव कोळी, ठाकर आणि इतर समाजांच्या जीवनात जंगलाचे महत्त्व मोठे होते. कंदमुळे, फळे, हिरडा, डिंक, लाकूड, गवत आणि इतर वनउत्पादने ही त्यांच्या अर्थव्यवस्थेचा भाग होती. परंतु दुष्काळामुळे शेतीचे उत्पन्न कमी झाले आणि जंगलातील साधनांवरही मोठा ताण आला.

कुटुंब जगवण्यासाठी लोकांना सावकारांकडून पैसे किंवा धान्य घ्यावे लागले. व्यवहाराच्या वेळी मिळालेली मदत त्या क्षणी वरदान वाटत असे. परंतु कर्जाची परतफेड करताना त्याचे ओझे वाढत जाई. कर्जाची रक्कम, त्यावरील व्याज, गहाण जमीन आणि पुन्हा घेतलेले कर्ज यामुळे शेतकरी हळूहळू सावकाराच्या आर्थिक जाळ्यात अडकत गेला. ही परिस्थिती केवळ आर्थिक नव्हती. तिचे सामाजिक परिणामही झाले.

ज्याच्या हातात पैसा आणि कागदपत्रे होती, त्याची ताकद वाढली. ज्याच्याकडे जमीन आणि श्रम होते पण रोख पैसा नव्हता, तो कर्जाच्या पाशात अडकला.

होनाजी केंगले यांनी याच परिस्थितीचा जवळून अनुभव घेतला, 

जमीन गमावण्याचे संकट

शेतकऱ्याची जमीन म्हणजे त्याचे सर्वस्व.

जमीन म्हणजे घराचा आधार.

जमीन म्हणजे मुलांचे भविष्य.

जमीन म्हणजे पूर्वजांची आठवण.

जमीन म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद.

म्हणून दुष्काळाच्या काळात जमीन गहाण ठेवण्याची वेळ येणे ही शेतकऱ्यासाठी अत्यंत वेदनादायक बाब होती. कर्ज फेडता आले नाही तर जमीन सावकाराच्या ताब्यात जाण्याची परिस्थिती निर्माण होत असे, हळूहळू काही शेतकरी स्वतःच्या शेतातच दुसऱ्याच्या मालकीखाली काम करू लागले.

ज्याने आयुष्यभर नांगर चालवला, तोच आपल्या शेतात मजूर झाला.

ज्याने बी पेरले, त्यालाच पीक आपल्या घरात नेता येईना.

या परिस्थितीने शेतकरी आणि आदिवासी समाजाच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण केला.

कष्ट करणारा एक आणि त्या कष्टाचे फळ घेणारा दुसरा, अशी विषमता अधिक तीव्र होत गेली.

हीच परिस्थिती होनाजी केंगले यांच्या मनातील अस्वस्थतेचे एक मोठे कारण ठरली.

होनाजींच्या मनात बंडाची ठिणगी

होनाजी स्वतः महादेव कोळी या आदिवासी समाजातून आले होते. त्यांनी शेतकऱ्यांचे दुःख केवळ ऐकले नव्हते, तर ते प्रत्यक्ष पाहिले होते.

दुष्काळात उपाशी राहणारी मुले त्यांनी पाहिली. जनावरांची झालेली दयनीय अवस्था त्यांनी पाहिली. कर्जामुळे जमीन गमावलेली कुटुंबे त्यांनी पाहिली. सावकाराच्या हिशेबामुळे वर्षानुवर्षे कर्जात अडकलेला शेतकरी त्यांनी पाहिला. आणि याच काळात त्यांच्या स्वतःच्या जीवनातही अन्यायाचा अनुभव आला होता. त्यामुळे त्यांच्या मनातील असंतोष हळूहळू वैयक्तिक पातळीवरून सामाजिक पातळीवर गेला.

ते लोकांशी बोलू लागले. अन्याय सहन करत बसण्यापेक्षा त्याविरुद्ध उभे राहिले पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

त्यांच्याभोवती काही धाडसी तरुण जमा होऊ लागले. आणि अशा प्रकारे त्यांच्या मनातील ठिणगीने बंडाचे रूप धारण करण्यास सुरुवात केली

सुरुवातीच्या कारवाया

होनाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरुवातीला सावकारांच्या वाड्यांवर रात्रीच्या वेळी छापे टाकले. या कारवायांमध्ये कर्जाची कागदपत्रे, गहाणखते आणि जमीन व्यवहाराशी संबंधित दस्तऐवज ताब्यात घेतले जात. त्या काळात अशा कागदपत्रांना फार मोठे महत्त्व होते. गरीब शेतकऱ्याने जमीन गहाण ठेवली आहे, कर्ज घेतले आहे किंवा एखादा व्यवहार केला आहे, याचा पुरावा कागदावर असायचा. त्यामुळे हा कागद शेतकऱ्याच्या भवितव्यावर प्रभाव टाकू शकत असे. 

होनाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अशी कागदपत्रे जाळून टाकली. काही ठिकाणी सावकारांची संपत्ती लुटल्याचेही सांगितले जाते. या लुटीतून शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी करण्यात आला आणि उर्वरित पैसा गरिबांना वाटल्याची लोककथा आहे.

भीमाशंकर ते नाशिक बंडाचा विस्तार

होनाजींच्या बंडाची चर्चा हळूहळू जांभोरीच्या पलीकडे जाऊ लागली.

सह्याद्रीचा डोंगराळ प्रदेश त्यांच्या हालचालींसाठी अनुकूल होता. भीमाशंकरच्या डोंगररांगांपासून खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, अकोले, राजूर, घोटी, इगतपुरी आणि नाशिकच्या काही भागांपर्यंत त्यांच्या हालचाली झाल्या.

पुढे कोकणातील कर्जत, खांडस, सरळगाव, टोकावडे आणि मुरबाड या भागांपर्यंतही त्यांच्या बंडाचा प्रभाव पोहोचल्याचे सांगितले जाते. या भागातील डोंगर, जंगल, घाटवाटा आणि दुर्गम वस्ती यामुळे स्थानिक बंडकऱ्यांना भौगोलिक फायदा मिळत होता.

ब्रिटिश प्रशासनासाठी बाहेरून आलेल्या पोलिसांना या प्रदेशातील प्रत्येक वाट माहीत असणे शक्य नव्हते. स्थानिक लोकांच्या सहकार्याशिवाय अशा भागात एखाद्या बंडकऱ्याला पकडणे कठीण होते.

होनाजींचे नाव त्यामुळे हळूहळू ब्रिटिश प्रशासनाच्या नजरेत गंभीर बंडखोर म्हणून येऊ लागले.

अटक आणि शिक्षा

होनाजी केंगले यांच्या बंडामुळे ब्रिटिश प्रशासन त्यांच्यावर लक्ष ठेवून होते, शेवटी त्यांना अटक करण्यात आली आणि कठोर शिक्षा झाली, त्यांना इ.स. १८५८ मध्ये अटक करून अंदमानात दहा वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली. अंदमानातील शिक्षा ही ब्रिटिश राजवटीतील कठोर शिक्षांपैकी एक होती. आपल्या गावापासून, कुटुंबापासून आणि परिचित भूमीपासून दूर समुद्रापलीकडे शिक्षा भोगणे म्हणजे कैद्याच्या जीवनातील अत्यंत कठीण अवस्था होती.

पुन्हा गावात परतल्यानंतरचा संघर्ष

दहा वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर होनाजी एप्रिल १८६८ च्या सुमारास पुन्हा जांभोरीला परतले.

दीर्घ काळानंतर आपल्या गावात परतलेला माणूस जेव्हा आपल्या लोकांना भेटतो, तेव्हा त्याच्या मनात अनेक भावना असतात. परंतु होनाजींसाठी गावात परतणे म्हणजे संघर्षातून विश्रांती घेणे नव्हते.

त्यांच्या अनुपस्थितीतही ग्रामीण भागात सावकारशाहीविरुद्धचा असंतोष कायम होता.

जमिनीचे प्रश्न कायम होते.

कर्जबाजारीपणा कायम होता.

गरीब शेतकऱ्यांचे दुःख कायम होते.

म्हणून होनाजीनी पुन्हा या संघर्षाची सूत्रे हाती घेतल्याचे स्थानिक कथन सांगते. त्यांच्या परतण्याने बंडाला पुन्हा चालना मिळाली.

ब्रिटिश सरकारची कारवाई

होनाजींच्या हालचाली पुन्हा वाढू लागल्याने ब्रिटिश प्रशासन अधिक सावध झाले.

अहमदनगर, नाशिक, जुन्नर, आंबेगाव, घोडेगाव आणि ओतूर परिसरात त्यांच्या सहकाऱ्यांच्या हालचाली झाल्याचे सांगितले जाते. सावकारांवर हल्ले, मालमत्तेची लूट आणि हिंसक कारवायांच्या बातम्या ब्रिटिश प्रशासनापर्यंत पोहोचत होत्या.

होनाजींना पकडणे हे प्रशासनासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनत गेले. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवण्यात आली. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. त्यांच्या सहकाऱ्यांची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले.

स्थानिक भूगोलाचा फायदा घेत होनाजी मात्र वारंवार पोलिसांच्या हातातून निसटत राहिले.

₹१०,००० चे बक्षीस

होनाजी केंगले यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने ₹१०,००० चे बक्षीस जाहीर केले, असा उल्लेख त्यांच्या जीवनाविषयीच्या उपलब्ध माहितीत आढळतो.

त्या काळच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर ही रक्कम अत्यंत मोठी होती.

एखाद्या व्यक्तीला पकडण्यासाठी एवढे मोठे बक्षीस जाहीर करणे म्हणजे प्रशासनाच्या दृष्टीने तो व्यक्ती किती महत्त्वाचा किंवा धोकादायक मानला जात होता, याचे संकेत देणारी बाब आहे. तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना पकडण्यासाठीही वेगवेगळ्या रकमेची बक्षिसे जाहीर केल्याचे सांगितले जाते.

नांदगावातील फितुरी आणि अटक

होनाजी केंगले यांना पकडणे ब्रिटिश प्रशासनासाठी सोपे नव्हते. शस्त्रबळ, पोलिस मोहीम आणि शोध घेऊनही ते वारंवार निसटत होते. अशा परिस्थितीत त्यांना पकडण्यासाठी फितुरीचा मार्ग स्वीकारण्यात आला, अशी स्थानिक कथा आहे.

होनाजी कोकणातील नांदगाव येथे येणार असल्याची माहिती ब्रिटिश अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील हेर पाठवण्यात आले. होनाजी ज्या घरात येत-जात असत, त्या घरातील जनाबाई मेंगाळ नावाच्या स्त्रीला पैशाचे आमिष दाखवून माहिती मिळवण्यात आली,

होनाजी जवळपास तीन आठवड्यांनी नांदगाव येथे आले. त्यांच्या आगमनाची माहिती लगेच ब्रिटिशांच्या हेरांना देण्यात आली. काही वेळातच घराभोवती पोलिसांचा वेढा पडला. आणि १५ ऑगस्ट १८७६ रोजी होनाजी केंगले यांना नांदगाव येथे अटक करण्यात आली. ही बातमी दुसऱ्या दिवशी परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

ज्यांच्या दृष्टीने होनाजी आपल्या समाजाचा कैवारी होते, त्यांना ही बातमी अत्यंत दुःखद वाटली.

न्यायालयीन खटला

अटकेनंतर होनाजींना पुण्यात आणण्यात आले. त्यांच्यावर सावकारांची लूट करणे, गहाणखते जाळणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, दरोडे घालणे आणि इतर गुन्ह्यांचे आरोप ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. खटला अनेक महिने चालल्याची माहिती उपलब्ध आहे.

ब्रिटिश प्रशासनाच्या दृष्टीने या कारवाया कायद्याविरुद्ध होत्या. त्यामुळे न्यायालयात त्यांच्यावर आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. परंतु लोकांच्या दृष्टीने प्रश्न वेगळा होता. गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी का गेल्या? सावकारांच्या कर्जामुळे शेतकरी का अडकला? आदिवासी समाजाच्या दुःखाकडे कोण पाहणार? या प्रश्नांची उत्तरे सामान्य लोकांना प्रशासनाकडून मिळत नसतील, तर त्यांच्या दृष्टीने होन्या अन्यायाविरुद्ध उभे राहणारा माणूस बनला होता. म्हणून न्यायालयीन नोंद आणि लोकस्मृती यांच्यातील फरक येथे स्पष्टपणे दिसतो.

फाशी

स्थानिक इतिहासानुसार इ.स. १८७६ मध्ये होनाजी भागोजी केंगले यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ठाणे येथील तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली. त्यांच्या जीवनाचा शेवट अशा प्रकारे झाला. परंतु एका बंडकऱ्याचा मृत्यू म्हणजे त्याच्या विचारांचा अंत नसतो.

होनाजींच्या मृत्यूनंतरही त्यांचे नाव लोकांच्या स्मरणातून नाहीसे झाले नाही.

ज्या डोंगर-दऱ्यांतून त्यांनी हालचाली केल्या, ज्या गावांमध्ये त्यांच्या कथा सांगितल्या गेल्या आणि ज्या समाजासाठी त्यांनी संघर्ष केला, त्या समाजाने त्यांची आठवण जपली. त्यांच्या मृत्यूने शरीर संपले; पण लोकस्मृतीतील त्यांचे स्थान कायम राहिले.

लोकस्मृतीतील होनाजी

इतिहासाच्या अधिकृत नोंदी आणि लोकस्मृती यांचे स्वरूप वेगळे असते.

सरकारी कागदपत्रात एखादी व्यक्ती आरोपी, बंडखोर किंवा दरोडेखोर म्हणून नोंदवली जाऊ शकते. परंतु त्या व्यक्तीला जवळून पाहणाऱ्या समाजाच्या स्मरणात तोच माणूस नायक असू शकतो. होनाजी केंगले यांच्या बाबतीत हीच गोष्ट महत्त्वाची आहे. स्थानिक लोकस्मृतीत ते गरीबांचे कैवारी, सावकारशाहीविरुद्ध उभे राहिलेले बंडकरी आणि अन्यायाविरुद्ध लढणारे व्यक्तिमत्त्व म्हणून जपले गेले.

पिढ्यान्‌पिढ्या त्यांच्या कथा सांगितल्या गेल्या. या कथा सांगताना त्यात अनेक तपशील वाढले असतील, काही घटना बदलल्या असतील किंवा काही घटना लोकपरंपरेतून अधिक नाट्यमय झाल्या असतील. परंतु लोकस्मृतीमध्ये एखाद्या व्यक्तीची आठवण इतक्या दीर्घकाळ टिकून राहणे ही स्वतःमध्ये अभ्यासाची बाब आहे.

होनाजी केंगले यांची लोकस्मृती म्हणजे त्या काळातील समाजाच्या मनातील अन्यायाविरुद्धच्या भावनेचे प्रतिबिंब म्हणूनही पाहता येते.

जांभोरी ता.आंबेगाव येथील स्मारक

होनाजी केंगले यांचे जन्मगाव जांभोरी आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृतीचे सर्वांत जवळचे आणि नैसर्गिक केंद्र म्हणजे जांभोरी. उपलब्ध माहितीनुसार हेमंत काळू केंगले, मारुती धोंडू केंगले आणि माजी उपआयुक्त लक्ष्मण डामसे यांच्या पुढाकाराने इ.स. २००२ मध्ये जांभोरी येथे स्मारक उभारण्यात आले. हे स्मारक उभारण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्यात आले. आज अशा स्मारकांकडे केवळ एखाद्या व्यक्तीच्या पुतळ्याच्या किंवा वास्तूच्या रूपात पाहणे योग्य ठरणार नाही. ते स्थानिक इतिहासाच्या जतनाचे केंद्र बनू शकतात.

होनाजी केंगले यांच्या जीवनाशी संबंधित कागदपत्रे, लोककथा, छायाचित्रे, वंशावळ, तत्कालीन नोंदी, स्थानिक साक्षी आणि संशोधन येथे जतन केले गेले तर भविष्यातील संशोधकांसाठी मोठी साधनसंपत्ती तयार होऊ शकते.

होनाजी केंगले यांचे स्मारक अधिक विकसित करून ते आदिवासी आणि ग्रामीण इतिहासाच्या अभ्यासाचे केंद्र बनवावे, अशी मागणी केली जाते.

भीमाशंकर येथील बसस्थानकाला होनाजी केंगले यांचे नाव देण्याची मागणीही करण्यात आल्याचे सांगितले जाते.

होनाजी केंगले यांचे ऐतिहासिक मूल्यमापन

होनाजी केंगले यांचे ऐतिहासिक मूल्यमापन करताना भावनिक गौरव आणि चिकित्सक इतिहासलेखन या दोन्हींचा समतोल साधणे आवश्यक आहे.

म्हणून होनाजी केंगले यांना समजून घेण्याचा योग्य मार्ग म्हणजे त्यांच्या काळातील सामाजिक परिस्थिती समजून घेणे.

एकोणिसाव्या शतकातील ग्रामीण समाजात जमीन ही जीवनाचा केंद्रबिंदू होती. दुष्काळ, कर्ज आणि सावकारी यामुळे जमीन गमावण्याची वेळ आली तर संपूर्ण कुटुंबाची आर्थिक रचना कोसळत असे.

या परिस्थितीत होनाजीसारख्या व्यक्तीचा उदय होणे हे सामाजिक असंतोषाचे लक्षण मानता येते.

त्यांनी संघर्षासाठी निवडलेला मार्ग हिंसक होता. त्यामुळे त्यांच्या कारवायांना त्या काळच्या सत्तेने गुन्हा मानले, हेही इतिहासाचा भाग आहे. पण त्याच वेळी त्यांच्या संघर्षामागील सामाजिक वेदना दुर्लक्षित करून चालणार नाही.

होनाजी केंगले यांचे महत्त्व याच ठिकाणी आहे.

ते एका मोठ्या सामाजिक प्रश्नाचे प्रतीक बनले.

जमीन कोणाची?

कष्टाचे फळ कोणाचे?

कर्जाच्या पाशातून शेतकरी कसा मुक्त होणार?

आणि अन्यायाविरुद्ध सामान्य माणूस कुठे उभा राहणार?

या प्रश्नांमुळे त्यांची कथा आजही अर्थपूर्ण वाटते.

उपसंहार

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अनेक कथा जन्माला आल्या आणि अनेक काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या. काही कथा राजांच्या आहेत, काही युद्धांच्या आहेत, काही स्वातंत्र्यसैनिकांच्या आहेत; तर काही कथा सामान्य माणसाच्या जगण्यासाठीच्या संघर्षाच्या आहेत.

होनाजी भागोजी केंगले यांची कथा ही याच शेवटच्या प्रकारातील एक महत्त्वाची कथा आहे.

जांभोरीच्या मातीत जन्मलेला एक तरुण, कुस्तीच्या आखाड्यात नाव कमावतो. आपल्या परिसरातील लोकांच्या जीवनात वाढत जाणारा अन्याय पाहतो. स्वतःही अन्यायाचा अनुभव घेतो. दुष्काळात होरपळणाऱ्या समाजाचे दुःख पाहतो. सावकारांच्या कर्जाच्या पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहतो. आणि शेवटी अन्यायाविरुद्ध बंडाचा मार्ग स्वीकारतो.

त्यांच्या संघर्षाचा मार्ग योग्य होता की अयोग्य, यावर इतिहासात चर्चा होऊ शकते. त्यांच्या कारवायांचे स्वरूप काय होते, यावरही संशोधन होऊ शकते. परंतु त्यांच्या नावाभोवती निर्माण झालेली लोकस्मृती हे एक ऐतिहासिक सत्य आहे.

कारण एखादा माणूस शंभर वर्षांहून अधिक काळ जनतेच्या स्मरणात जिवंत राहतो, यामागे काहीतरी खोल सामाजिक कारण असते.

होनाजी केंगले यांच्या बाबतीत ते कारण म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची भावना. त्यांची कथा म्हणूनच केवळ भूतकाळातील एका बंडकऱ्याची कथा नाही.

ती आजही आपल्याला विचारते

अन्याय होत असताना गप्प बसणे योग्य की त्याविरुद्ध आवाज उठवणे?

कष्ट करणाऱ्याला त्याच्या कष्टाचे योग्य फळ मिळणे हा त्याचा अधिकार नाही का?

जमीन, श्रम आणि जगण्याच्या साधनांवर दुर्बलांचा हक्क कसा जपला जाईल?

आणि सर्वांत महत्त्वाचे

इतिहास लिहिताना आपण सत्तेच्या नोंदींबरोबर सामान्य माणसाच्या स्मृतीकडेही पाहणार आहोत का?

या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेताना जांभोरीच्या मातीतून उभे राहिलेले होनाजी भागोजी केंगले हे व्यक्तिमत्त्व पुन्हा एकदा आपल्या समोर उभे राहते.

त्यांच्या संघर्षाची मशाल त्यांच्या हातातून निघून गेली; पण तिचा प्रकाश लोकस्मृतीत आजही दिसतो.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)


ग्रामीण भागातील कला आणि लोकपरंपरेचा सुवर्णकाळ

गावाकडचे सांस्कृतिक जीवन 

ग्रामीण महाराष्ट्र हा केवळ शेतीप्रधान प्रदेश नव्हता; तो लोककला, अध्यात्म, संस्कार आणि सामूहिक जीवनाचा एक समृद्ध सांस्कृतिक पट होता. गावातील प्रत्येक सण, उत्सव, यात्रा, सप्ताह, विवाह किंवा धार्मिक सोहळा हा केवळ एक कार्यक्रम नसायचा, तर तो गावाच्या सांस्कृतिक जीवनाचा उत्सव असायचा. त्या काळी मनोरंजनाची साधने नव्हती, दूरदर्शन नव्हते, मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते; पण गावातील प्रत्येक माणूस कलेच्या सहवासात जगत होता.

प्रत्येक गावात एखादा उत्कृष्ट गायक, ढोलकीवादक, ताशावादक, भारूडकार, कीर्तनकार, प्रवचनकार किंवा तमाशातील कलाकार असायचाच. 

कला ही काही मोजक्या लोकांची मक्तेदारी नव्हती; ती गावागावांत रुजलेली होती. कलेला जाती-पातीचे बंधन नव्हते. शेतकरी, बलुतेदार, कारागीर, व्यापारी सर्वच समाजघटक या सांस्कृतिक परंपरेचा भाग होते. त्यामुळे गावातील सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत असे.

आजही डोळे मिटले की त्या काळातील रात्री आठवतात. गावातील मंदिरासमोरचा मोकळे पटांगण, मंद वाऱ्याची झुळूक, कंदिलाचा किंवा पेट्रोमॅक्सचा प्रकाश, आणि त्यात सुरू झालेले भारूड,भजन… टाळ, चिपळ्या, ढोलकी आणि वीणेच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय होत असे. त्या सुरांत केवळ संगीत नव्हते, तर गावाच्या आत्म्याचा स्पंदनशील आवाज दडलेला होता.

एकतारी भजन – भक्ती आणि साधेपणाचा सुरेल आविष्कार

ग्रामीण महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनाचा पाया म्हणजे एकतारी भजन. आज ज्या पद्धतीचे भव्य ध्वनिव्यवस्थेतील कार्यक्रम पाहायला मिळतात, त्यापेक्षा त्या काळातील एकतारी भजन अगदी साधे, पण मनाला भिडणारे असायचे.

एका हातात वीणा, दुसऱ्या हातात चिपळ्या आणि समोर विठ्ठलाची प्रतिमा... एवढीच तयारी पुरेशी असे. त्याला साथ द्यायला ढोलकी, टाळ आणि एखादा जाणकार गायक असायचा. कोणताही कृत्रिम गाजावाजा नव्हता. आवाजात भक्ती आणि मनात श्रद्धा असेल, तर तेच भजन यशस्वी मानले जात असे.

संध्याकाळी सर्वांची जेवणे झाली की मंदिरात किंवा एखाद्या घरात भजनाला सुरुवात होत असे. सुरुवातीला मोजकीच मंडळी बसलेली असत; पण जसजसा टाळ-चिपळ्यांचा नाद परिसरात घुमू लागे, तसतशी दूरवरच्या वाड्यांतील लोकही अंधार तुडवत भजनाला येत. काहींच्या हातात कंदील, तर काहीजण चंद्रप्रकाशाच्या उजेडात वाट काढत मंदिरात पोहोचत.

भजन सुरू झाले की वेळेचे भान राहत नसे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या अभंगांनी वातावरण भारून जात असे. प्रत्येक अभंगामागे भक्ती, तत्त्वज्ञान आणि जीवन जगण्याचा संदेश दडलेला असे. त्यामुळे भजन हे केवळ गायन नव्हते, तर ते लोकशिक्षणाचे एक प्रभावी माध्यम होते.

चिपळ्यांचा मंजुळ नाद, टाळांचा ठेका, ढोलकीची लय आणि वीणेची साथ... या सगळ्यांचा संगम झाला की मन नकळत भक्तिरसात रंगून जाई. अनेकांना त्या सुरांत मानसिक समाधान मिळत असे. दिवसभर शेतीत कष्ट केलेल्या शेतकऱ्याला हे भजन म्हणजे जणू थकलेल्या मनाला मिळणारा विश्रांतीचा श्वास होता.

त्या काळी पैशासाठी कोणी भजन करत नव्हते. प्रसिद्धीची अपेक्षाही नव्हती. समाजासाठी, देवासाठी आणि स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी ही सेवा केली जात असे. म्हणूनच त्या काळातील भजनात कृत्रिमता नव्हती; तेथील प्रत्येक सूर हा मनातून उमटलेला असे.

आज काळ बदलला आहे. आधुनिक ध्वनियंत्रणा, की-बोर्ड आणि डिजिटल संगीतामुळे भजनाची शैली बदलली असली, तरी त्या जुन्या एकतारी भजनातील साधेपणा, आत्मीयता आणि भक्तिभाव आजही अनेकांच्या स्मरणात तितकाच जिवंत आहे.

संगीत भजनाचा सुवर्णकाळ आणि गवळणींची मोहिनी.

काळ बदलत गेला तसे ग्रामीण भागातील भजनाच्या परंपरेतही बदल होऊ लागला. एकतारी भजनाचा साधेपणा कायम असला तरी लोकांच्या संगीताची आवड वाढू लागली. त्यातूनच संगीत भजन ही नवीन शैली उदयाला आली. ही शैली पारंपरिक भक्ती आणि सुरेल संगीत यांचा सुंदर संगम होती. त्यामुळे भजन ऐकण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक लोक जमा होऊ लागले.

एकतारी भजनात वीणा आणि चिपळ्यांचे प्राबल्य होते; परंतु संगीत भजनात पायपेटी (हार्मोनियम), ढोलकी, टाळ, चिपळ्या आणि नंतर तबल्याचीही साथ मिळू लागली. गायकांच्या आवाजाला सुरेल साथ मिळाल्यामुळे अभंग अधिक प्रभावी वाटू लागले. प्रत्येक भजन मंडळाची स्वतःची वेगळी गायकी, वेगळी चाल आणि वेगळा बाज असायचा. त्यामुळे एका गावातील भजन दुसऱ्या गावापेक्षा वेगळे वाटत असे.

भजनाची सुरुवात अनेकदा अलंका पुरी किंवा गणपतीच्या स्तवनाने होत असे. त्यानंतर सर्वजण आतुरतेने वाट पाहत असत ती पहिल्या अभंगाची. बहुतेक भजनांची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या प्रसिद्ध अभंगाने होत असे.

"रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी..."

या अभंगाची प्रत्येक भजन मंडळाने स्वतःची चाल तयार केलेली असे. एखाद्या मंडळाने गंभीर रागात गायलेला हा अभंग तर दुसऱ्या मंडळाने अधिक मधुर आणि आल्हाददायक चालीत सादर केलेला असे. पहिल्याच अभंगावरून त्या रात्रीच्या भजनाचा रंग आणि गायकांचा दर्जा लक्षात येत असे.

त्यानंतर एकामागून एक अभंगांची मैफल रंगत जाई.

"येई हो विठ्ठले, माझे माऊली ये..."

"येई श्यामसुंदरा..."

"पिंपळाच्या पारी नामा भजन करी..."

"जय जय शंभो तू महादेवा..."

"पांडुरंग उभा वाळवंटी..."

अशा असंख्य अभंगांच्या सुरांनी वातावरण भक्तिमय होत असे. प्रत्येक अभंगामध्ये गायकाचा आवाज, ढोलकीचा ठेका, पायपेटीचे सूर आणि टाळांचा नाद यांचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळत असे.

काही गायकांच्या आवाजात इतकी ताकद आणि माधुर्य असे की, त्यांनी "आळंकापुरी... पुण्यभूमी पवित्र..." या ओळीला दिलेली लांब तान ऐकताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहत. भजनाच्या त्या स्वरांनी मंदिराचा परिसर भारून जाई. लहान मुले, तरुण, वृद्ध, महिला सर्वजण मंत्रमुग्ध होऊन त्या सुरांत हरवून जात.

गवळणींचा रंग

अभंगांचा कार्यक्रम संपत आला की सर्वांना उत्सुकता लागून राहायची ती गवळणींची.

गवळण हा केवळ काव्यप्रकार नव्हता; तो भक्ती, संगीत आणि मनोरंजन यांचा संगम होता. श्रीकृष्णाच्या बाललीला, गवळणींचे संवाद, गोपींची कृष्णभक्ती आणि त्यातील खट्याळ प्रसंग यांचे सुंदर चित्रण या गवळणींमध्ये असायचे.

गवळणींच्या चाली अभंगांपेक्षा अधिक उडत्या आणि लयबद्ध असत. त्यामुळे रात्री उशिरा आलेली झोप क्षणात नाहीशी होत असे. काही गवळणी तर त्या काळातील लोकप्रिय मराठी किंवा हिंदी चित्रपटांच्या चालींवरही रचल्या जात. पण त्यात अश्लीलता नसायची; भक्ती आणि विनोद यांचा सुरेख मिलाफ असायचा.

गवळणी सुरू झाल्या की वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारत असे. ढोलकीचा वेग वाढे, टाळांचा ठेका अधिक जोमाने पडू लागे आणि गायकांच्या आवाजातही एक वेगळीच चैतन्यपूर्ण ऊर्जा निर्माण होत असे. श्रोत्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलून येत असे.

भैरवीने होणारी सांगता

रात्र कधी सरत असे, हे कुणालाच कळत नसे. मध्यरात्र उलटून गेल्यावर अखेरच्या टप्प्यात भैरवी गायली जाई. भैरवी म्हणजे जणू संपूर्ण भजनाचा आत्मा. तिच्या सुरांनी मन शांत होत असे आणि संपूर्ण रात्रीच्या भक्तिमय प्रवासाची सांगता व्हायची.

भजन संपले की आयोजकांकडून पितळी किंवा तांब्याच्या भांड्यातून गरमागरम चहा दिला जाई. त्या चहाची चव आजच्या कोणत्याही हॉटेलमधील चहात मिळणार नाही. कारण त्या चहात साखरेपेक्षा जास्त गोडवा असायचा तो प्रेमाचा, आपुलकीचा आणि सामूहिक भावनेचा.

पहाटेच्या थंड वाऱ्यात चहा पित-पित लोक आपापल्या घरी परतत. कुणाच्या ओठावर अभंग असायचा, कुणाच्या मनात गवळणीचे सूर घुमत असत, तर कुणी अजूनही त्या भक्तिरसात हरवलेला असे.

भजन म्हणजे ग्रामीण समाजाचे सांस्कृतिक विद्यापीठ

त्या काळात भजन हे केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हते. ते समाजाला एकत्र आणणारे, संस्कार घडवणारे आणि मानसिक समाधान देणारे माध्यम होते. गावातील गायक, वादक आणि भजनकार यांना मोठा मान दिला जात असे. त्यांची कला ही पैशासाठी नव्हे, तर समाजसेवा आणि भक्ती म्हणून जोपासली जात असे.

धर्मा तळपे, चिंधू खाडे, बुधा खाडे, चंद्रकांत मोहन, नाथाबुवा तळपे यांसारख्या अनेक गुणी भजनकारांनी आपल्या सुरांनी गावोगावी भक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवली. सत्यनारायण महापूजा, गणपती उत्सव,सप्ताह, यात्रा किंवा धार्मिक सोहळा असो रात्री भजनाचा कार्यक्रम असणारच, ही जणू अलिखित परंपराच होती.

आजही त्या सुरांची आठवण झाली की मन नकळत त्या काळात जाऊन पोहोचते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे संगीत अधिक प्रगत झाले असेल, पण त्या काळातील भजनातील आत्मीयता, भक्ती आणि मानवी स्पर्श आजही अतुलनीय वाटतो.

लेझीम, ढोल पथके, भारूड आणि ग्रामीण लोककलांचा सुवर्णकाळ

भजनाइतकीच ग्रामीण भागातील आणखी एक मोठी सांस्कृतिक ओळख म्हणजे लेझीम, ढोल, भारूड, संगीत कलानाट्य आणि तमाशा. या लोककलांनी अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले, समाजप्रबोधन केले आणि गावोगावी सांस्कृतिक चैतन्य जिवंत ठेवले. त्या काळी मनोरंजनाची साधने मर्यादित होती. दूरदर्शन प्रत्येक घरात नव्हते आणि मोबाईलचा तर प्रश्नच नव्हता. त्यामुळे गावातील लोकविलक्षण कलावंत हेच लोकांच्या आनंदाचे खरे शिल्पकार होते.

लेझीम आणि ढोल पथकांचा थरार

गावातील यात्रा, गणेशोत्सव, शिवजयंती, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन किंवा एखादा मोठा धार्मिक सोहळा म्हणजे लेझीम आणि ढोल पथकांचा जल्लोष ठरलेलाच असे. ढोलाच्या घणाघाती ठेक्यावर लेझीमच्या तालबद्ध हालचाली पाहताना अंगात आपोआप स्फूर्ती संचारत असे.

लेझीम ही केवळ कसरत नव्हती, तर ती शिस्त, ताल, एकजूट आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा संगम होती. पथकातील प्रत्येक खेळाडू एकाच लयीत पाऊल टाकत असे. ढोलाचा एकच ठेका पडला की संपूर्ण पथक एकाच तालात फिरत असे. या सादरीकरणात इतका जोश असे की, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट थांबत नसे.

त्या काळात सोळसेवाडीचे ढोल आणि लेझीम पथक संपूर्ण परिसरात प्रसिद्ध होते. या पथकाचे प्रमुख बबन खाडे हे उत्कृष्ट प्रशिक्षक आणि कुशल कलाकार म्हणून ओळखले जात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अनेक यात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम गाजवले. ढोलाचे विविध ठेके, लेझीमचे आकर्षक डाव आणि तालबद्ध हालचाली यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा मिळाली होती.

याचप्रमाणे मंदोशी गावातील ढोल आणि लेझीम पथकही परिसरात नावाजलेले होते. या पथकाचे नेतृत्व विष्णू पांडू तळपे करत असत. त्यांच्या नेतृत्वाखालील तरुणांनी गावातील अनेक कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

भारूड – लोकप्रबोधनाचे प्रभावी माध्यम

भजनानंतर ग्रामीण समाजावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी कला म्हणजे भारूड. संत एकनाथ महाराजांनी लोकप्रिय केलेला हा लोककाव्य प्रकार ग्रामीण भागात अत्यंत प्रिय होता. भारूड म्हणजे केवळ गाणे नव्हते; त्यात विनोद, व्यंग, समाजप्रबोधन, अध्यात्म आणि जीवनतत्त्वज्ञान यांचा अप्रतिम संगम असायचा.

भारूडातील कलाकार विविध वेशभूषा करून समाजातील विविध व्यक्तिरेखा साकारत.राजा, प्रधान, राक्षस, द्वारपाळ, कधी शेतकरी, कधी सावकार, कधी भिकारी, कधी वाघ्या-मुरळी, तर कधी एखादा भोळाभाबडा गावकरी. त्यांच्या अभिनयातून समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, लोभ, अहंकार आणि सामाजिक विसंगती यांवर मार्मिक भाष्य केले जाई.

विनोदाच्या माध्यमातून दिलेला हा संदेश थेट लोकांच्या मनात पोहोचत असे. त्यामुळे भारूड हे ग्रामीण समाजाचे एक प्रभावी लोकशिक्षण माध्यम होते.

त्या काळात नायफडची नाव्हाचीवाडी, सरेवाडी, टोकावडे, भोमाळे, धामणगाव, पोखरी, कानसे माळवाडी, खरवली, देवतोरणे आणि पवळेवाडी येथील भारूड मंडळे संपूर्ण परिसरात प्रसिद्ध होती. यात्रांच्या हंगामात या मंडळांना मोठी मागणी असे. अनेक गावांमध्ये त्यांच्या कार्यक्रमाची तारीख मिळवण्यासाठी आधीच बुकिंग केले जात असे.

संगीत कलानाट्य आणि तमाशा – ग्रामीण मनोरंजनाची शान

त्या काळातील ग्रामीण मनोरंजनाचा आणखी एक अविभाज्य भाग म्हणजे संगीत कलानाट्य आणि तमाशा. गावातील यात्रा म्हणजे रात्री तमाशाचा फड भरायचाच. दिवसभर धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर रात्री गावाच्या मैदानात रंगणारा तमाशा हा लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असे.

लावणी, वगनाट्य, विनोदी फार्स, संवाद, नृत्य आणि गायन यांचा सुंदर मिलाफ असलेला तमाशा लोकांना पहाटेपर्यंत खिळवून ठेवत असे. त्या काळातील कलाकारांची स्मरणशक्ती, संवादफेक, नृत्यकौशल्य आणि गाण्यावरील प्रभुत्व पाहून प्रेक्षक थक्क होत.

टोकावडे,उगलेवाडी (कारकुडी), मंदोशी, जावळेवाडी, भिवेगाव आणि साकुर्डी येथील तमाशा मंडळे परिसरात विशेष प्रसिद्ध होती. या कलापरंपरेला जिवंत ठेवण्यासाठी चिंधू वनघरे, बापू साबळे, शंकर अहिलू तळपे, विष्णू हुरसाळे, भीमाजी गोडे, दुलाजी गोडे, नारायण तळपे, शंकर गवारी, बबन गोडे, मारुती भोकटे आणि विठ्ठल उगले यांसारख्या अनेक कलाप्रेमींनी मोठे योगदान दिले. मास्टर शंकरराव कोकाटे यांचा तमाशा महाराष्ट्रात लोकप्रिय होता.

कलेचा वारसा जपणारे गावकरी

आजच्या काळात कलाकार होण्यासाठी मोठी व्यासपीठे उपलब्ध आहेत. पण त्या काळी कलाकारांकडे ना मोठी साधने होती, ना आर्थिक पाठबळ. तरीही त्यांनी आपल्या कलेवर निस्सीम प्रेम केले. दिवसभर शेती, व्यवसाय किंवा मजुरी करून रात्री गावाच्या सेवेसाठी कला सादर करणे, ही त्यांची जीवनशैली होती.

यातून एक गोष्ट स्पष्ट होते.त्या काळातील लोकांसाठी कला हा व्यवसाय नव्हता; ती समाजसेवा, भक्ती आणि सांस्कृतिक जबाबदारी होती.

हीच भावना ग्रामीण संस्कृतीची खरी ताकद होती.

अविस्मरणीय लोककलावंत – कासम तांबोळी, दगडू भराडी, विठू नांगरे, बापू गायकवाड आणि इतर अनेक कलाकारांच्या आठवणी.

एखाद्या प्रदेशाची ओळख केवळ त्याच्या डोंगर-दऱ्या, नद्या किंवा शेतीमुळे होत नाही; तर त्या भूमीत जन्मलेल्या कलावंतांमुळेही होते. प्रत्येक गावात काही अशी माणसे असतात की, त्यांच्या कलेने संपूर्ण परिसराला एक वेगळी ओळख मिळते. त्यांनी कधी प्रसिद्धीची अपेक्षा ठेवली नाही, पुरस्कारांची वाट पाहिली नाही किंवा संपत्ती जमवण्याचा विचार केला नाही. कलेवर निस्सीम प्रेम आणि समाजाचे मनोरंजन, एवढेच त्यांचे ध्येय होते.

आज त्या कलाकारांपैकी अनेक जण आपल्यात नाहीत; काही वयोमानामुळे कलेपासून दूर झाले आहेत. मात्र त्यांच्या कलेच्या आठवणी आजही असंख्य रसिकांच्या मनात जिवंत आहेत.

कासम तांबोळी – ताशाच्या ठेक्याचा जादूगार

कासम तांबोळी यांची उंची जरी लहान असली, तरी त्यांच्या कलेची उंची मात्र आकाशाएवढी होती. परिसरात त्यांना प्रेमाने "कासमभाई" म्हणून ओळखले जात असे.

ताशा हातात घेतला की त्यांच्या हातातील काड्या जणू बोलू लागत. प्रत्येक ठेका अचूक, दमदार आणि कानाला सुखावणारा असे. त्यांच्या ताशाच्या आवाजाने यात्रेचे वातावरण क्षणात भारावून जात असे. अनेक जण केवळ कासमभाईंचा ताशा ऐकण्यासाठी मैलोनमैल चालत येत असत.

त्यांच्या वादनात केवळ ताकद नव्हती, तर लय, सौंदर्य आणि कलात्मकता होती. म्हणूनच कासमभाई हे त्या काळातील ताशावादनाचे मानबिंदू ठरले.

दगडू भराडी – डमरूच्या नादातून भक्ती जागवणारा कलावंत

शिरगावचे दगडू भराडी हे त्या काळातील एक वेगळेच व्यक्तिमत्त्व होते. ग्रामीण भागात लग्न झाल्यावर भराड घालण्याची परंपरा होती. दगडू भराडी हे भराड घालण्याची परंपरा सादर करत असत. भोरगिरीच्या ताथवडी देवी पासुन ते खेडच्या सिद्धेश्वरा पर्यंतच्या सर्व गावांच्या ग्रामदेवतांना भराडाला येण्याचे आमंत्रित करीत.

सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी पहाटेच ते डमरू हातात घेऊन गावोगावी फिरत असत. प्रत्येक घरासमोर उभे राहून ते खंडोबा, देवी आणि इतर देवतांची पारंपरिक गीते म्हणत. त्यांच्या आवाजात एक विलक्षण ओढ होती.

'मोठ मोठे डोळे घाली मिशावर ताव' हे खंडोबा देवाचे गाणे ते खुप चांगल्या प्रकारे सादर करत. मला हे गाणे खूप आवडायचे.

पहाटेच्या शांत वातावरणात घुमणारा डमरूचा नाद आणि त्यावर म्हणली जाणारी भक्तिगीते ऐकून गावात प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होत असे.

गृहिणी प्रेमाने त्यांना वाटीभर तांदूळ किंवा धान्य देत. ती केवळ भिक्षा नव्हती; ती कलेचा आणि भक्तीचा सन्मान होता.

आजही अनेक ज्येष्ठांच्या कानात दगडू भराडींचा आवाज घुमतो. आधुनिक ध्वनिक्षेपकांच्या युगात तो नैसर्गिक स्वर आता केवळ आठवणीत उरला आहे.

बापू गायकवाड – डफाच्या ठेक्याचा बादशहा

डेहणे गावचे बापू गायकवाड म्हणजे डफवादनातील एक दिग्गज नाव.

त्यांच्या हातात डफ आला की तो केवळ वाद्य राहत नसे; तो जणू बोलू लागे. त्यांच्या हातातील प्रत्येक थाप अंगात चैतन्य निर्माण करणारी असे.

अनेक कलाकार डफ वाजवत; पण बापू गायकवाड यांच्या थापेतील ताकद, लय आणि आत्मविश्वास वेगळाच होता.

आजही ज्यांनी त्यांचे वादन ऐकले आहे, ते अभिमानाने म्हणतात.

"डफ वाजवावा तर बापूंनीच!"

विठू नांगरे – अभिनय आणि नृत्याचा सम्राट

मोरोशीचे विठू नांगरे हे त्या काळातील सर्वगुणसंपन्न लोककलावंत होते.

कोणतेही पात्र साकारायचे असेल, तर विठू नांगरे ते इतक्या सहजतेने साकारत की प्रेक्षक त्या भूमिकेत पूर्णपणे रमून जात.

त्यांचे समई नृत्य विशेष लोकप्रिय होते. डोक्यावर पेटती समई ठेवून तालावर नृत्य करणे हे अत्यंत कौशल्याचे काम होते.

याशिवाय नृत्य करताना डोक्यावर भात शिजवण्याचा अनोखा प्रयोग आणि देखणे मयूरनृत्य पाहण्यासाठी यात्रांमध्ये प्रचंड गर्दी होत असे.

विठू नांगरे हे केवळ कलाकार नव्हते; ते लोककलेचे चालते-बोलते विद्यापीठ होते.

सुदाम बारवेकर – मधुर वाचनाची परंपरा

श्रावण महिना सुरू झाला की अनेक ठिकाणी रामविजय, नवनाथ ग्रंथ आणि इतर धार्मिक ग्रंथांचे पारायण होत असे.

हे ग्रंथ वाचताना सुदाम बारवेकर यांच्या आवाजातील माधुर्य मनाला स्पर्श करून जात असे.

त्यांच्या स्पष्ट उच्चारांमुळे आणि भावपूर्ण वाचनामुळे श्रोते तासन्तास एकाग्रतेने ऐकत असत.

लग्नसमारंभात त्यांनी म्हटलेली मंगलाष्टकेही तितकीच प्रसिद्ध होती.

जगदाळे महाराज – सहज भाषेतील जीवनदर्शन

प्रवचन म्हणजे अवघड तत्त्वज्ञान अशी अनेकांची समजूत असते.

पण जगदाळे महाराज यांनी अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत अध्यात्म लोकांपर्यंत पोहोचवले.

ते दैनंदिन जीवनातील उदाहरणे, दृष्टांत आणि छोट्या कथा सांगून जीवनमूल्ये समजावून सांगतात.

त्यांचे प्रवचन ऐकल्यानंतर श्रोत्यांच्या मनात विचारांची नवी पालवी फुटते.

परंपरेचा खरा वारसा

या कलाकारांनी कधी प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही. त्यांच्याकडे आधुनिक साधने नव्हती, मोठी व्यासपीठे नव्हती किंवा सामाजिक माध्यमे नव्हती.

त्यांच्याकडे होते ते फक्त कलेवरचे प्रेम, समाजाविषयीची आपुलकी आणि संस्कृती जपण्याची निष्ठा.

आज आपण लोककलेचा इतिहास लिहितो आहोत, त्यामागे अशाच शेकडो ज्ञात-अज्ञात कलाकारांचे आयुष्यभराचे योगदान आहे. त्यांचे स्मरण करणे म्हणजे केवळ व्यक्तींचा गौरव करणे नव्हे, तर आपल्या ग्रामीण संस्कृतीचा सन्मान करणे होय.

परंपरेपासून आधुनिकतेकडे – बदलत्या ग्रामीण कलेचा प्रवास

कीर्तन, प्रवचन आणि अध्यात्माची अखंड परंपरा

ग्रामीण भागातील कला ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती. ती माणसाला संस्कार देणारी, विचार जागवणारी आणि समाजाला एकत्र ठेवणारी होती. म्हणूनच भजनाबरोबर कीर्तन आणि प्रवचनालाही तितकेच महत्त्व होते.

वामन महाराज जढर यांनी आपल्या कन्या अमृता आणि नमृता यांना लहानपणापासूनच अध्यात्माचे संस्कार दिले. अल्पवयातच त्यांनी कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून अनेकांच्या मनात भक्तीची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्या ओघवत्या वाणीतील विचार ऐकताना केवळ धार्मिक ज्ञानच नव्हे, तर जीवन कसे जगावे याचाही मार्ग सापडत असे.

कीर्तनामध्ये हरिपाठ, अभंग, दृष्टांत, विनोद आणि तत्त्वज्ञान यांचा सुंदर मेळ असे. त्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण रसपूर्वक ऐकत असे.

कीर्तनाला उत्तम साथ देणाऱ्या अंकुश शिंदे आणि दत्तू मोरमारे या जोडीने अनेक कीर्तनांना वेगळी उंची दिली. त्यांच्या ताल-सुरांच्या साथीमुळे कीर्तन अधिक परिणामकारक होत असे.

नायफडचे भारमळ महाराज यांच्या प्रवचनात साधेपणा आणि विचारांची खोली होती. तर सागर महाराज शिर्के यांनी आपल्या रसाळ वाणीमुळे आधुनिक माध्यमांतूनही या भागाचे नाव दूरवर पोहोचवले. परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो.

दिंडी – भक्ती, समता आणि सामूहिकतेचा प्रवास

या भागातील वारकरी परंपरा अत्यंत समृद्ध आहे. कै. दुलाजीबाबा तिटकारे यांनी सुरू केलेली भीमाशंकर ते आळंदी पायी दिंडी आजही अखंड सुरू आहे.

दिंडी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नव्हे; ती श्रद्धा, समता, सेवा आणि शिस्त यांची चालती-बोलती शाळा आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात, "ज्ञानोबा-तुकोबा"च्या जयघोषात चालणारी दिंडी प्रत्येक वारकऱ्याला जीवनातील साधेपणाचे महत्त्व शिकवते.

या परंपरेच्या जतनासाठी विठ्ठल ढवळा वनघरे, दत्ता खाडे, गोपाळ हुरसाळे, सुनील भालेराव यांच्यासह अनेक वारकऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. आळंदी येथे उभारलेली धर्मशाळा ही या सामूहिक भावनेचे सुंदर प्रतीक आहे.

सनई-चौघड्यांचा दिमाख

एकेकाळी लग्नसमारंभ, यात्रा आणि मंगलकार्यांची सुरुवात सनई-चौघड्याच्या मंगल स्वरांनी होत असे.

ताफ्यात दोन सनईवादक, चौघडा, ताशा, ढोलकी आणि धोटा अशी वाद्ये असत. प्रत्येक वाद्याचा ठेका आणि सूर यांचा संगम ऐकताना वातावरण मंगलमय होऊन जात असे.

मंदोशीचा ताफा खेड, आंबेगाव आणि मावळ तालुक्यात विशेष प्रसिद्ध होता. नामदेव रोकडे यांच्या सनईचे सूर आणि कचर रोकडे व बबन आहिरे यांच्या ताशाची जुगलबंदी ऐकण्यासाठी यात्रांमध्ये मोठी गर्दी होत असे.

नायफडच्या मुक्ताबाई मंदिराजवळ बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या ताफ्यांच्या स्पर्धा हा त्या काळातील सांस्कृतिक सोहळाच असे. बैलांची मिरवणूक संपली की ताफे आपापले कौशल्य सादर करत. संध्याकाळपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक मोठ्या उत्साहाने जमत असत.

बेंजो पार्टीचा नवा जमाना

काळ पुढे सरकला आणि नव्या संगीताचा प्रवेश झाला.

सन १९९१ च्या सुमारास वांजळे व पाभे गावात प्रथमच बेंजो पार्टी आली. त्या काळात बुलबुल या वाद्याचे लोकांना प्रचंड आकर्षण होते. एका हातात ब्लेडसारख्या पट्टीने तारा छेडायच्या आणि दुसऱ्या हाताने बटणे दाबून सुरेल धून वाजवायची. ध्वनिवर्धकांमधून उमटणारा त्याचा स्वच्छ आवाज लोकांना मंत्रमुग्ध करून टाकत असे.

ताशा, ढोल, कच्ची आणि बुलबुल यांच्या साथीने मराठी आणि हिंदी चित्रपटांतील गाणी वाजू लागली. बेंजो पार्टीशिवाय लग्न अपूर्ण वाटू लागले. गावागावांत बेंजोच्या सुरांनी नवीन उत्साह निर्माण झाला.

डी.जे.चे युग आणि बदलते वास्तव

पुढे बेंजोचाही काळ मागे पडला आणि डी.जे. संस्कृती आली.

प्रचंड आवाज, रंगीबेरंगी प्रकाशयोजना आणि आधुनिक गाण्यांच्या तालावर नाचणारी वरात हे आजचे वास्तव बनले. या बदलामुळे पारंपरिक ताफे, सनई-चौघडे, बेंजो आणि अनेक लोककलांना मागे पडावे लागले.

समाजही बदलला. लग्नसमारंभ अधिक खर्चिक झाले. पारंपरिक गाणी कमी झाली आणि आधुनिक गाण्यांनी त्यांची जागा घेतली. काही ठिकाणी या बदलांसोबत अतिरेकही दिसू लागला.

तरीही हेही वास्तव आहे की प्रत्येक काळ आपली नवी संस्कृती घडवत असतो. म्हणून बदल स्वीकारताना परंपरेचे जतन करणेही तितकेच आवश्यक आहे.

ग्रामीण भागातील कला ही केवळ मनोरंजनाची साधने नव्हती. त्या आपल्या संस्कृतीच्या श्वासात मिसळलेल्या होत्या. भजनातून भक्ती, भारुडातून समाजप्रबोधन, लेझीममधून शिस्त, तमाशातून अभिनय, सनईतून मंगलता आणि दिंडीतून समतेचा संदेश पिढ्यान्पिढ्या दिला गेला.

आज या परंपरांपैकी अनेक कला लोप पावत आहेत. अनेक गुणी कलाकार काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या कलेची आठवण आता फक्त ज्येष्ठांच्या स्मरणात उरली आहे. जर आपण आज त्यांचे कार्य शब्दबद्ध केले नाही, तर उद्याच्या पिढीला या सांस्कृतिक वैभवाची ओळखही होणार नाही.

लोककला जपणे म्हणजे केवळ भूतकाळ जपणे नव्हे; तर आपल्या मातीची ओळख, आपल्या पूर्वजांचे श्रम, त्यांची सर्जनशीलता आणि आपल्या संस्कृतीचा आत्मा जपणे होय.

आज आधुनिक तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे; परंतु माणूस माणसापासून दूर जात आहे. पूर्वी भजनाच्या एका रात्रीत जितका संवाद व्हायचा, तितका कदाचित आज अनेक दिवसांतही होत नाही. म्हणूनच आधुनिकतेचा स्वीकार करत असतानाच आपल्या लोककलेची परंपरा जिवंत ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

कारण ज्या समाजाला आपल्या कलेचा इतिहास आठवतो, तो समाजच आपल्या भविष्याची समृद्ध वाट घडवू शकतो.

आज गाव बदलले आहे. घरांची रचना बदलली, जीवनाची गती बदलली, मनोरंजनाची साधने बदलली. कंदिलाची जागा विजेने घेतली, रेडिओची जागा मोबाईलने घेतली आणि भजनाच्या रात्रींची जागा अनेकदा डिजिटल मनोरंजनाने घेतली. पण प्रश्न एवढाच आहे या बदलांच्या प्रवाहात आपण आपल्या सांस्कृतिक स्मृतीही गमावणार आहोत का?

कारण एखादी कला संपते तेव्हा केवळ एक कार्यक्रम संपत नाही; त्या कलेसोबत एक पिढी, तिच्या आठवणी, तिची भाषा, तिची अभिव्यक्ती आणि तिचे जगण्याचे तत्त्वज्ञानही हळूहळू अदृश्य होते.

म्हणूनच कासमभाईंच्या ताशाचा ठेका, दगडू भराडींच्या डमरूचा नाद, बापू गायकवाडांच्या डफाची थाप, विठू नांगरे यांच्या नृत्याची आठवण, भजनातील टाळ-चिपळ्यांचा आवाज, सनई-चौघड्याचे मंगल सूर आणि पहाटेच्या चहातील आपुलकी हे सर्व जतन करणे गरजेचे आहे.

ही केवळ जुन्या काळाची आठवण नाही. हा आपल्या मातीचा सांस्कृतिक इतिहास आहे. इतिहास केवळ राजे-महाराजे, युद्धे आणि राजवटींचा नसतो. तो सामान्य माणसाच्या जगण्यातही दडलेला असतो. गावातील कलाकारांनी आपल्या कलेतून जो आनंद दिला, समाजाला जोडले आणि संस्कृतीची ज्योत तेवत ठेवली, तोही आपल्या इतिहासाचा तितकाच महत्त्वाचा भाग आहे.

लोककला जपणे म्हणजे भूतकाळात अडकून राहणे नव्हे; तर आपल्या मुळांची जाणीव ठेवून भविष्याकडे पाहणे होय.

आणि म्हणूनच गाव बदलले तरी गावाची संस्कृती विसरता कामा नये. काळ बदलला तरी कलेचा आत्मा हरवता कामा नये. आणि आधुनिकता आली म्हणून आपल्या मातीचा आवाज शांत होता कामा नये. कारण ज्या समाजाला आपल्या कलेची आठवण असते, तो समाज आपल्या मुळांशी जोडलेला राहतो; आणि ज्याला आपल्या मुळांची जाणीव असते, तोच समाज भविष्य अधिक समृद्धपणे घडवू शकतो.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)



.




गावाकडचे पूर्वीचे रस्ते आणि लालपरी एस.टी. : ग्रामीण महाराष्ट्राच्या अविस्मरणीय आठवणी

आज प्रत्येकाच्या दारात मोटारसायकल, चारचाकी किंवा अन्य प्रवासाची साधने सहज उपलब्ध आहेत. 

मोबाईलवर एका क्लिकमध्ये वाहन बोलावता येते. डांबरी रस्त्यांचे जाळे गावोगावी पोहोचले आहे. प्रवास वेगवान झाला, अंतर कमी झाले आणि वेळेची बचतही होऊ लागली.

परंतु अवघ्या तीन-चार दशकांपूर्वीचे ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र यापेक्षा पूर्णपणे वेगळे होते. त्या काळात गावाकडे ना पक्के रस्ते होते, ना खाजगी वाहनांची रेलचेल. कच्चे रस्ते, नागमोडी पायवाटा, डोंगर-दऱ्यांतून जाणाऱ्या वाटा आणि दिवसातून एक-दोन वेळा येणारी लाल रंगाची एस.टी. बस याच ग्रामीण जीवनाच्या खऱ्या जीवनवाहिन्या होत्या.

त्या काळातील एस.टी. ही फक्त प्रवाशांना एका गावातून दुसऱ्या गावात नेणारी बस नव्हती; ती ग्रामीण समाजाचे जगाशी असलेले एकमेव नाते होती. विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांची बाजारपेठ, सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी, आजारी माणसांचे उपचार, पोस्टाची पत्रे, वर्तमानपत्रे, किराणा सामान, पावाच्या लाद्या, औषधे आणि गावातील प्रत्येकाची आशा या सर्वांचे ओझे ती लाल बस आपल्या खांद्यावर वाहत असे.

आजही डोळे मिटले की धुरळा उडवत येणारी ती लाल एस.टी., तिचा कर्कश हॉर्न, स्टॉपवर वाट पाहणारी माणसे आणि धुळीने भरून जाणारा परिसर डोळ्यांसमोर उभा राहतो. त्या आठवणी केवळ भूतकाळ नाहीत; त्या ग्रामीण महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक जिवंत भाग आहेत.

कच्च्या रस्त्यांचे दिवस

पूर्वी ग्रामीण भागात डांबरी रस्ते ही चैनीची गोष्ट मानली जात असे. बहुतेक सर्व रस्ते कच्चे, दगड-खडीचे किंवा मातीचे असत. उन्हाळ्यात या रस्त्यांवर धुळीचे लोट उठत, तर पावसाळ्यात चिखलामुळे प्रवास अत्यंत कठीण होत असे.

आमच्या परिसरात सन १९९० पर्यंत कडधे गावापर्यंतच डांबरी रस्ता होता. त्यानंतर भोरगिरीपर्यंतचा संपूर्ण रस्ता खडीचा आणि कच्चाच होता. पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्ते वाहून जात, तर उन्हाळ्यात वाहन गेल्यावर धुळीचे ढग आकाशात पसरत.

आजच्या पिढीला कदाचित यावर विश्वास बसणार नाही, पण त्या काळी अनेक गावांपर्यंत चारचाकी वाहन पोहोचूही शकत नव्हते. गावोगावी जाण्यासाठी पायवाटाच हा एकमेव पर्याय होता. डोंगर, ओढे, शेतांचे बांध, जंगलातील वाटा आणि खडकाळ चढ-उतार ओलांडत लोक मैलोनमैल चालत असत. ही चालणे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता.

लाल धुरळा उधळीत येणारी एस.टी.

त्या काळी एस.टी. बसांची संख्या फारच कमी होती. दिवसातून एक-दोन गाड्या आल्या तरी गावकऱ्यांना समाधान वाटत असे. त्यामुळे प्रत्येक गाडीचे वेळापत्रक गावातील प्रत्येकाला पाठ असे.

दूरवरून लाल रंगाची एस.टी. दिसू लागली की आधी तिचा धुरळा दिसायचा. बस जवळ येईपर्यंत मागे धुळीचा प्रचंड ढग तयार झालेला असे. त्या धुरळ्यात मागे काय आहे हेच दिसत नसे.

आम्ही लहानपणी एस.टी. येताना तिच्या धुरळ्यापासून वाचण्यासाठी वाऱ्याची दिशा पाहत असू. वारा आपल्या दिशेने असेल तर बाजूला पळत जाऊन उभे राहत असू. तरीही अंगभर धूळ बसायचीच. पण त्याचे दुःख नव्हते; उलट लाल एस.टी. पाहण्याचा आनंद त्यापेक्षा मोठा होता.

एस.टी.चा हॉर्न ऐकताच गावातील मुले धावत स्टॉपकडे जात. कोण आले, कोण गेले, कोणाचे पार्सल आले, कोण मुंबईहून आले याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असे

एस.टी. म्हणजे गावाचा श्वास

त्या काळात गावातील अनेक लोकांच्या हातात घड्याळही नसे. त्यामुळे एस.टी.च वेळ दाखवायची.

राजगुरूनगर–डेहणे ही एस.टी. सकाळी साधारण दहा वाजता डेहण्याला पोहोचत असे. गावातील लोक म्हणत, "गाडी आली म्हणजे दहा वाजले." त्यानुसार शेतातील कामे, बाजाराला जाणे किंवा इतर कामांचे नियोजन केले जाई.

त्या गाडीत शाळेचे शिक्षक, सरकारी कर्मचारी, व्यापारी आणि काही नियमित प्रवासी असत. त्याचबरोबर सकाळची वर्तमानपत्रे, पावाच्या लाद्या, बटर आणि इतर आवश्यक वस्तूही याच बसने गावात पोहोचत असत.

म्हणूनच एस.टी. ही फक्त बस नव्हती; ती गावाचा श्वास होती.

एस.टी. पकडण्यासाठी मैलोनमैल पायी प्रवास

आज बसस्टॉप अनेकांच्या घराजवळ आहे. वाहनांची रेलचेल असल्याने काही मिनिटांत बसस्टॉपवर पोहोचता येते. पण त्या काळात एस.टी.पर्यंत पोहोचणे हा देखील एक मोठा प्रवास असे.

अनेक खेड्यांमध्ये एस.टी. थेट जात नसे. त्यामुळे लोकांना घरातून एक ते दोन तास आधीच निघावे लागे. डोक्यावर सामान, एका हाताला लहान मूल, दुसऱ्या हातात कापडी पिशवी किंवा गाठोडे घेऊन स्त्री-पुरुष पायवाटेने चालत निघत. रानातून, डोंगर उतारातून, ओढे ओलांडत ते एस.टी. स्टॉपपर्यंत पोहोचत असत.

कधी वाटेत पाऊस लागे, कधी उन्हाचा चटका बसे, तर कधी जंगलातील वाटेवर वन्य प्राण्यांचीही भीती वाटे. पण गावकऱ्यांनी त्या अडचणी कधीच मनावर घेतल्या नाहीत.

कधी एखादा प्रवासी थोडासा उशिरा पोहोचला, तर एस.टी. निघून गेलेली असे. मग पर्याय एकच पुन्हा मैलोनमैल पायी चालत पुढचा प्रवास करणे. मलाही अनेक वेळा अशा परिस्थितीत पायी प्रवास करावा लागला आहे. त्या पायपीटीत कष्ट होते, पण त्यातूनच जीवनाचे धडे मिळाले.

परेल – भोरगिरी : मुंबईकरांची लाडकी एस.टी.

त्या काळात पश्चिम पट्ट्यातील गावांसाठी सर्वाधिक महत्त्वाची गाडी म्हणजे परेल–भोरगिरी एस.टी. हीच होती.

सकाळी साधारण ९.४० वाजता ही गाडी डेहणे येथे येत असे. तिची वाट गावातील अनेकजण आतुरतेने पाहत असत. विशेषतः मुंबईत नोकरी करणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही गाडी म्हणजे जीवनरेषाच होती.

या गाडीत इतकी गर्दी असे की बसमध्ये उभे राहायलाही जागा मिळणे कठीण जाई. लोक लवकर स्टॉपवर येऊन रांगा लावत. काही जण गाडी येण्याच्या अर्धा-पाऊण तास आधीच स्टॉपवर बसलेले असत.

शाळकरी मुलांचा प्रवास

शनिवारी आमची शाळा सकाळी ९.३० वाजता सुटत असे. शाळा सुटताच आम्ही सर्व मित्रमंडळी धावत एस.टी. स्टॉपकडे जात असू.

त्या वेळी डेहणे ते शिरगाव या प्रवासाचे पूर्ण तिकीट ७५ पैसे, तर अर्धे तिकीट ४० पैसे होते.

आज ही रक्कम ऐकून हसू येईल; पण त्या काळी अनेक गरीब विद्यार्थ्यांकडे हे पैसेसुद्धा नसत. त्यामुळे अनेक मुले रोज पायीच शाळेत ये-जा करत असत. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा त्यांचा प्रवास मात्र कधी थांबत नसे.गरीबी होती, पण शिक्षणाची जिद्द मोठी होती.

मुंबईकरांचा रुबाब

दिवाळी, उन्हाळ्याची सुट्टी, यात्रा किंवा लग्नकार्य असेल की मुंबईतील चाकरमानी कुटुंबासह गावी येत.

स्टॉपवर एस.टी. थांबताच सर्वांचे लक्ष त्यांच्या पोशाखाकडे जाई. इस्त्री केलेले रंगीत कपडे, चकचकीत बूट, हातात आकर्षक बॅगा आणि शहरातील बोलण्याची ढब हे सर्व गावातील लोकांना वेगळे वाटत असे.

मुंबईतील मुलांचे कपडे, घड्याळे, चष्मे, खेळणी पाहून लहान मुलांना कुतूहल वाटे.

पण गावातील मुलांचे जग मात्र वेगळेच होते. खाकी चड्डी, पांढरा शर्ट, अनवाणी पाय आणि चेहऱ्यावर कायम हास्य. ओढ्यात पोहणे, विटीदांडू, गोट्या, क्रिकेट, झाडांवर चढून करवंदे, जांभळे, आंबे खाणे यातच त्यांचा आनंद सामावलेला होता.

खरे तर शहरातील मुलांनाच या मुक्त जीवनाचा हेवा वाटत असे. त्यांच्याकडे आधुनिक खेळणी होती; पण गावातील मुलांकडे निसर्गाची विशाल खेळपट्टी होती.

यात्रेचा दिवस म्हणजे आनंदाचा सोहळा

गावची यात्रा जवळ आली की वातावरणच बदलून जाई.

परेल–भोरगिरी गाडीची वाट पाहण्यासाठी संपूर्ण गाव एस.टी. स्टॉपवर जमा होत असे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसत असे"आज कोण-कोण मुंबईहून येणार?"

गाडी दूरवर दिसताच सनई, चौघडा, ढोल-ताशे यांचे सूर घुमू लागत. गाडी थांबताच नातेवाईक एकमेकांना मिठ्या मारत. अनेक महिन्यांनी भेट झाल्यामुळे अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत.

मुंबईहून आलेले लोक देवासाठी सुंदर मखमली छत्र्या, हार, फुले, चामरे आणि यात्रेसाठी लागणारे साहित्य घेऊन येत. गाडीतून ते सामान उतरवताना गावातील तरुण मदतीला धावत.

यात्रेच्या काही दिवसांत गाव पुन्हा एकदा जिवंत होत असे. प्रत्येक घरात पाहुण्यांची लगबग, अंगणात मुलांचा गोंधळ आणि मंदिरात भक्तांची गर्दी दिसत असे.

पण सुट्टी संपली की पुन्हा तोच विरह. मुंबईला परत जाणाऱ्या नातेवाईकांना निरोप देण्यासाठी अर्धा गाव एस.टी. स्टॉपपर्यंत जात असे. गाडी सुटेपर्यंत सर्वजण हात हलवत उभे राहत आणि गाडी नजरेआड होईपर्यंत अनेकांच्या डोळ्यांत पाणी दाटलेले असे.

त्या काळात एस.टी. केवळ प्रवाशांना वाहून नेत नव्हती; ती माणसांमधील नाती, प्रेम, आपुलकी आणि भावनाही एका गावातून दुसऱ्या गावात पोहोचवत होती.

तळेगाव–टोकावडे : ग्रामीण भागाची पहिली जीवनवाहिनी

राजगुरूनगर–भोरगिरी किंवा परेल–भोरगिरी या गाड्या सुरू होण्यापूर्वी आमच्या परिसरातील अनेक गावांसाठी तळेगाव–टोकावडे एस.टी. हीच सर्वात महत्त्वाची बस होती. गावातील ज्येष्ठ मंडळी आजही त्या गाडीचा उल्लेख मोठ्या आपुलकीने करतात.

ही गाडी सकाळी साडेसात वाजता तळेगावहून सुटत असे. खेडहून साधारण सव्वानऊ वाजता पुढे निघून ती अकराच्या सुमारास डेहणे येथे पोहोचत असे. आजच्या दृष्टीने हा प्रवास संथ वाटेल; परंतु त्या काळी तोच वेग ग्रामीण जीवनासाठी मोठा दिलासा होता.

या गाडीसोबत केवळ प्रवासीच येत नसत. पोस्टाची पत्रे, मनीऑर्डर, लहान-मोठी पार्सले, औषधे आणि बाजारातील काही आवश्यक वस्तूही याच गाडीने गावात पोहोचत असत. म्हणूनच एस.टी. म्हणजे ग्रामीण भागाची चालती-बोलती सेवा होती.

नववीच्या परीक्षेचा तो विसरणार नाही असा दिवस

जीवनात काही प्रसंग असे असतात की अनेक वर्षे उलटली तरी ते डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहतात. माझ्या नववीच्या वार्षिक परीक्षेचा दिवस हा तसाच एक प्रसंग आहे.

सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी पेपर सुरू होणार होता. आम्ही अनेक विद्यार्थी नेहमीप्रमाणे एस.टी.ची वाट पाहत स्टॉपवर उभे होतो. घड्याळ नसले तरी वेळेची जाणीव प्रत्येकाला होती. अकरा वाजून वीस मिनिटे झाली, तरी गाडीचा पत्ता नव्हता.

सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. "आता काय करायचं?" हा एकच प्रश्न.

परीक्षेला पोहोचलो नाही तर वर्षभराचे श्रम वाया जाणार, नापास होण्याची भीती होती.

क्षणाचाही विलंब न करता आम्ही सर्वांनी एकच निर्णय घेतला धावायचे!

दप्तर खांद्यावर टाकले आणि आम्ही रस्त्याने धावत सुटलो. उन्हाची तमा नव्हती, दम लागला याचे भान नव्हते. मनात एकच ध्यास कसेही करून वेळेत शाळेत पोहोचायचे.

शाळेत पोहोचेपर्यंत आम्हाला जवळपास अर्धा तास उशीर झाला होता. दम लागला होता, अंग घामाने भिजले होते. पण शिक्षकांनी परिस्थिती समजून घेतली आणि आम्हाला पेपर लिहिण्याची संधी दिली.

आज मागे वळून पाहताना जाणवते त्या दिवशी केवळ परीक्षा नव्हती, तर संकटातही हार न मानण्याचा जीवनधडा आम्ही शिकलो.

राजगुरुनगर–भोरगिरी एस.टी.

दुपारी साधारण दोनच्या सुमारास राजगुरुनगर–भोरगिरी एस.टी. शिरगाव येथे पोहोचत असे. ही गाडी थोडा वेळ थांबून पुन्हा राजगुरुनगरच्या दिशेने परत निघत असे.

या गाडीत गर्दी तुलनेने कमी असे. त्यामुळे वृद्ध, महिला आणि शाळकरी मुलांना थोडा आरामात प्रवास करता येत असे. अनेकदा गाडीतील सर्व प्रवासी एकमेकांच्या ओळखीचे असत. प्रवासात गप्पा, शेतीची चर्चा, पावसाचा अंदाज आणि गावातील बातम्या रंगत असत.

मुक्कामची गाडी – दिवसाचा शेवट आणि आशेची सुरुवात

गावकऱ्यांच्या मनात विशेष स्थान मिळवलेली गाडी म्हणजे मुक्कामची एस.टी. रात्री साधारण आठच्या सुमारास ही गाडी शिरगावच्या स्टॉपवर येत असे. दिवसभर बाहेरगावी गेलेले लोक याच गाडीने घरी परतत. त्यामुळे या गाडीची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असे.

गाडी स्टॉपवर येताच अनेक कुटुंबांचे चेहरे उजळून निघत. मुलं आपल्या वडिलांकडे धावत जात. आई-वडील, भाऊ-बहीण, नातेवाईक यांच्या भेटीत दिवसाचा सर्व थकवा क्षणात नाहीसा होत असे.

रात्रीचा काळोख आणि एस.टी.चा उजेड

त्या काळी गावात रस्त्यांवर दिवे नव्हते. सर्वत्र काळोख पसरलेला असे. रात्री मुक्कामची गाडी निघाली की तिच्या हेडलाईटचा प्रकाशच जणू अंधार चिरत पुढे जात असे. खिडकीबाहेर पाहिले की दूरवर फक्त काळी रात्र आणि डोंगरांची अस्पष्ट रूपरेषा दिसे.

आजच्या एलईडी दिव्यांच्या आणि चार-लेन महामार्गांच्या युगात त्या काळोख्या रात्रीची कल्पना करणेही कठीण आहे.

गाडीमधील वादविवाद 

मुक्कामच्या गाडीत अनेकदा बाहेरगावाहून परतणारे मद्यधुंद प्रवासीही असत. कधी तिकीटावरून, तर कधी जागेवरून त्यांचा कंडक्टरशी वाद होई.

वाद वाढला की ड्रायव्हर शांतपणे गाडी रस्त्याच्या कडेला थांबवत असे आणि ठाम आवाजात म्हणत असे.

"आता गाडी पुढे जाणार नाही. सर्वांनी शांत बसा."

हे ऐकताच इतर प्रवासी पुढे सरसावत. काही क्षणांत समजूत काढली जाई आणि पुन्हा प्रवास सुरू होत असे.

त्या काळी प्रवासी, कंडक्टर आणि ड्रायव्हर यांच्यातील नाते हे केवळ सेवा देणारा आणि सेवा घेणारा असे नव्हते; ते परस्पर विश्वासाचे आणि माणुसकीचे नाते होते.

पहाटेची नवी सुरुवात

रात्री मुक्काम करून हीच एस.टी. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पुन्हा राजगुरुनगरच्या दिशेने रवाना होत असे.

प्रत्येक स्टॉपवर नवे प्रवासी चढत. काहीजण बाजारासाठी, काही शाळा-कॉलेजसाठी, काही सरकारी कामासाठी, तर काही दवाखान्यासाठी निघालेले असत.

अशी ही लाल एस.टी. रोज हजारो स्वप्ने आपल्या पोटात घेऊन ग्रामीण महाराष्ट्राच्या रस्त्यांवर धावत असे.

ड्रायव्हर-कंडक्टर म्हणजे गावचेच माणूस

पूर्वी एस.टी.चे ड्रायव्हर आणि कंडक्टर हे गावासाठी केवळ कर्मचारी नव्हते, तर घरातीलच माणसे वाटत. रोज त्याच मार्गावर ये-जा होत असल्याने प्रत्येक गावाशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते.

कोणाच्या घरी लग्न आहे, कोणाच्या घरी आजारी माणूस आहे, कोणाच्या मुलाची परीक्षा आहे, कोणत्या शेतकऱ्याला बाजारात जायचे आहे याची माहिती त्यांना सहज असायची.

एखादा वृद्ध प्रवासी स्टॉपपर्यंत धावत येताना दिसला, तर अनेक वेळा ड्रायव्हर दोन-तीन मिनिटे गाडी थांबवत असे. कंडक्टर दारातून आवाज देई, "या आजोबा... आरामात या... गाडी थांबली आहे."

आजच्या धावपळीच्या युगात अशी माणुसकी क्वचितच अनुभवायला मिळते.

दूध संकलन केंद्र आणि मोफत दूध

त्या काळात अनेक गावांमध्ये दूध संकलन केंद्रे सकाळी लवकर सुरू होत असत. गवळी डोक्यावर किंवा सायकलवर दुधाचे कॅन घेऊन जमा होत.

एस.टी. आली की काही दूध संस्थांचे कर्मचारी ड्रायव्हर आणि कंडक्टरला आग्रहाने ताजे दूध पिण्यास देत. काही जण त्यांच्या लहान किटलीत दूध भरूनही देत.

हा व्यवहार नियमापेक्षा प्रेमाचा होता. "आपली एस.टी. सुरक्षित चालवणाऱ्या माणसांना आपणही काहीतरी द्यावे," अशी गावकऱ्यांची भावना होती.

त्या काळातील ग्रामीण समाजात व्यवहारापेक्षा नात्यांना अधिक महत्त्व होते.

ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बसण्याची हौस

त्या काळी अनेक मुलांना ड्रायव्हरच्या शेजारी बसण्याची प्रचंड हौस असायची.

ओळखीचा ड्रायव्हर असेल तर तो हसत म्हणायचा, "चल, पण शांत बस."

समोर पसरलेला रस्ता, मोठे स्टिअरिंग, गिअर बदलणारा ड्रायव्हर, हॉर्नचा आवाज हे सगळे आम्हाला खूप रोमांचक वाटायचे.

त्या काही मिनिटांच्या प्रवासात स्वतःला आपणच ड्रायव्हर झालो आहोत, अशी भावना मनात दाटून येत असे.

एस.टी.चा मागचा दरवाजा आणि एक गंमत

पूर्वीच्या एस.टी. बसमध्ये चढण्याचा दरवाजा मागच्या बाजूला असे. त्यामुळे प्रवासी गाडी दिसताच सरळ मागच्या बाजूला धावत.

नंतर नवीन मॉडेलच्या एस.टी. आल्या आणि दरवाजा पुढच्या बाजूला आला.

पण सवय तशीच राहिली!

गाडी आली की लोक आधी मागे धावत, मग दरवाजा पुढे आहे हे लक्षात येताच पुन्हा पुढे पळत. स्टॉपवर एकच गोंधळ आणि त्यातून निर्माण होणारी गंमत आजही डोळ्यांसमोर उभी राहते.

जागा मिळवण्यासाठीची धडपड

एस.टी. स्टॉपवर गर्दी असेल तर जागा मिळवण्यासाठी लोकांची अक्षरशः धावपळ सुरू होत असे.

काही जण खिडकीतून रुमाल, टोपी किंवा पिशवी आत फेकून जागा राखून ठेवण्याचा प्रयत्न करत. पण आतमध्ये दुसरेच कोणी बसलेले असे. मग सुरू होत असत वाद, हुज्जत आणि कधी कधी जोरदार भांडण.

काहीजण मोडक्या खिडकीतून आत शिरण्याचा प्रयत्न करत, तर काहीजण ड्रायव्हरच्या दारातून गाडीत घुसत. हे सगळे पाहताना लहान मुलांना मात्र फार मजा वाटत असे.

गाठोडी, कोंबड्या आणि गावचा बाजार

आजच्या प्रवाशांकडे प्रामुख्याने बॅग किंवा पाठीवर सॅक दिसते. पण त्या काळातील एस.टी.मध्ये गावचे संपूर्ण जीवनच प्रवास करत असे.

कोणाकडे धान्याचे पोते, कोणाकडे भाजीपाला, कोणाकडे शेतीची अवजारे, कोणाकडे मोठी गाठोडी, तर कोणाच्या हातात कोंबड्या असत.

बाजारातून परतताना भांडी, कपडे, किराणा, तेल, मीठ, औषधे सगळे सामान त्याच एस.टी.ने घरी येत असे. एकाच बसमध्ये माणसे, त्यांचे संसार आणि त्यांच्या आशा-अपेक्षा प्रवास करत असत.

एस.टी.मधील गर्दी आणि एक अविस्मरणीय विनोदी प्रसंग

त्या काळी एस.टी.मध्ये एवढी गर्दी असायची की, अनेक वेळा पाय ठेवायलाही जागा नसायची. बसच्या प्रत्येक सीटवर प्रवासी बसलेले असत आणि मधल्या मार्गात खांद्याला खांदा लावून लोक उभे असत. काहीजण तर एका हाताने वरचा दांडा धरून आणि दुसऱ्या हातात पिशवी सांभाळत कसाबसा प्रवास करत.

अशाच एका प्रवासातील एक गंमत आजही आठवली की हसू आवरत नाही.

एका प्रवाशाने बसमध्ये चढण्यापूर्वी पान खाल्ले होते. गाडीत इतकी गर्दी होती की त्याला खिडकीजवळ जाणे तर दूरच, तोंडातील पानाची गुळणी थुंकायलाही जागा मिळत नव्हती. त्यामुळे तो बिचारा बराच वेळ गुळणी तोंडात धरूनच उभा होता. चेहऱ्यावरचा त्रास स्पष्ट दिसत होता.

तेवढ्यात गाडीत उभ्या असलेल्या एका मिश्कील प्रवाशाने असा काही भन्नाट विनोद केला की बसमधील प्रवासी मोठमोठ्याने हसू लागले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण पोट धरून हसू लागला.

गर्दीत उभ्या असलेल्या त्या पान खाल्लेल्या प्रवाशालाही हसू आवरले नाही. तो मोठ्याने हसू लागला आणि क्षणार्धात तोंडात साठवून ठेवलेली लाल गुळणी बाहेर सांडली. क्षणात त्याचा पांढरा शर्ट आणि लेंगा लालभडक झाले.

हे पाहताच संपूर्ण बसमध्ये पुन्हा एकच हास्यकल्लोळ उडाला. काहीजण हसता हसता डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसत होते, तर तो प्रवासी स्वतःची अवस्था पाहून लाजत-हसत उभा राहिला. काही वेळाने त्याने स्वतःही हसतच ती गोष्ट स्वीकारली आणि वातावरण पुन्हा निवळले.

अशा निरागस, निष्पाप आणि मनमोकळ्या घटना त्या काळच्या एस.टी. प्रवासात नेहमी घडत असत. प्रवासात अडचणी होत्या, गर्दी होती, धक्काबुक्की होती; पण माणसांच्या चेहऱ्यावर हसूही तितकेच होते. म्हणूनच त्या काळच्या एस.टी.च्या आठवणी आजही ओठांवर नकळत हसू फुलवतात.

विद्यार्थ्यांची खरी जीवनवाहिनी

ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचे शिक्षण एस.टी.मुळेच शक्य झाले.

सकाळची गाडी पकडून अनेक मुले तालुक्याच्या ठिकाणी शाळा-कॉलेजला जात. संध्याकाळी थकून-भागून त्याच एस.टी.ने परत गावात येत.

अनेक आई-वडील आपल्या मुलांसाठी घरचा गरम डबा कंडक्टरकडे देत. तो डबा योग्य ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी कंडक्टर प्रेमाने पार पाडत असे. ही सेवा कोणत्याही नियमपुस्तकात लिहिलेली नव्हती; ती ग्रामीण माणुसकीची ओळख होती.

आजचा बदललेला काळ

आज बहुतेक घरांसमोर दुचाकी आहे. अनेकांकडे चारचाकी वाहने आहेत. रस्ते रुंद झाले आहेत. मोबाईलवर वाहन बोलावण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.या बदलांमुळे एस.टी.वरील अवलंबित्व कमी झाले. पण तिचे महत्त्व कमी झाले म्हणून तिचे ऋण कमी होत नाही.

ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षण, रोजगार, आरोग्य, व्यापार आणि शहराशी जोडण्याचे महान कार्य अनेक दशकांपर्यंत लालपरीनेच केले.

आजही एखाद्या ग्रामीण रस्त्यावर लाल रंगाची एस.टी. दिसली की नकळत पावले थांबतात. तिचा हॉर्न कानावर पडला की बालपण जागे होते.

गेले ते दिवस 

धुरळा उडवत कच्च्या रस्त्यावरून धावणारी ती बस, स्टॉपवर वाट पाहणारी माणसे, मुंबईहून येणाऱ्या नातेवाईकांची ओढ, परीक्षेला धावत जाणारी मुले, ड्रायव्हर-कंडक्टरशी असलेला जिव्हाळाहे सर्व क्षण आजही मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेले आहेत.

रस्ते बदलले, वाहने बदलली, काळ बदलला; पण त्या लालपरीने दिलेल्या आठवणी कधीच बदलणार नाहीत. त्या आठवणी म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहेत.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)










 

खेड तालुका पश्चिम भागाचे लोकनेते : दिगंबर मुऱ्हे

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकारणात ज्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिगंबर (दिनकर) धोंडीबा मुऱ्हे.  साडेस...