घरामागचे वाडगे, पातवड आणि पावसाळ्यातील आठवणी
जून महिना सुरू झाला की बऱ्यापैकी पाऊस झालेला असायचा. भाताची पेरणी केली जायची. अधूनमधून पावसाच्या सरी सुरू असायच्या आणि सगळीकडे मातीचा ओलसर गंध दरवळत असायचा. शेतकरी भातपेरणी आणि इतर शेतीकामांत गुंतलेले असतानाच ग्रामीण भागातील स्त्रियांचीही एक वेगळीच लगबग सुरू व्हायची. ती म्हणजे घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत भाजीपाल्यासाठी जागा तयार करून तिच्याभोवती कुंपण करण्याची.या कामासाठी घरातील लहान-मोठ्यांची मदत घेतली जायची. जंगलात जाऊन टनटनी, निरगुडी, रामेठा अशा झाडांची अंगठ्याएवढी जाडी असलेली, पण उंच लाकडे आणली जायची. त्यांना आमच्या भागात ‘खाकर’ असे म्हणत. ही खाकर जंगलातून आणणे, ती योग्य आकारात तयार करणे आणि घरामागील जागेभोवती रोवून कुंपण तयार करणे, हेही पावसाळ्याच्या सुरुवातीचे एक महत्त्वाचे काम असायचे.
घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेची आधी व्यवस्थित मशागत केली जायची. जमीन सपाट करून तिच्यावर शेणखत टाकले जाई. ते शेणखत मातीत चांगले मिसळून संपूर्ण जागा भाजीपाला लावण्यासाठी तयार केली जायची. मधील काही जागा मात्र थोडी उंच ठेवली जायची आणि त्यावर पावसाळी आळूचे कंद लावले जायचे. उर्वरित जागेची रचना अशा विशिष्ट पद्धतीने केली जायची की पावसाचे अतिरिक्त पाणी साचून न राहता सहज बाहेर निघून जाईल. आज आपण ज्याला पाण्याचे नियोजन म्हणतो, त्याचे साधे पण अनुभवसिद्ध ज्ञान त्या काळातील ग्रामीण स्त्रियांना होते.
घरामागे अशा पद्धतीने कुंपण करून तयार केलेल्या या जागेला आमच्या पश्चिम भागात ‘वाडगे’ असेही म्हटले जायचे. या वाडग्यात पावसाळी आळू म्हणजेच आळवड, भोपळ्याचे म्हणजेच डांगराचे बी, दोडक्याचे बी, घेवडा, घोसाळे, कारले आणि काकडीचे बी पेरले जायचे. गवती चहाही लावला जायचा. हे सर्व लावून झाल्यानंतर वाडग्याभोवती छानपैकी कुंपण केले जायचे. काही दिवसांतच या छोट्याशा जागेचे रूप पालटायला सुरुवात व्हायची.
थोड्याच दिवसांत वाडग्यात लावलेल्या आळूच्या कंदांना छान कोंब फुटायचे. मातीत पेरलेले भोपळा, दोडका, घेवडा, घोसाळे, कारले आणि काकडीचे बीही उतरून यायचे. आम्हा लहान मुलांना याची प्रचंड उत्सुकता असायची. जमिनीतून नुकताच वर आलेला कोंब कोणत्या भाजीचा आहे, हे ओळखणे हा आमच्यासाठी जणू एक खेळच असायचा. कोण म्हणायचे, “हा काकडीचा कोंब आहे,” तर कोण म्हणायचे, “नाही, हा भोपळ्याचा आहे.” कोणाला तो दोडक्याचा वाटायचा, तर कोणाला कारल्याचा. त्यावरून आमच्या पैजा लागत आणि वादविवादही व्हायचे.
कधी कधी हा वाद एवढा वाढायचा की आमचा गोंगाट ऐकून घरातील बायामाणसे जवळ यायची आणि आम्हाला चांगलेच दटावायची. “अजिबात वाडग्यात जाऊ नका. रोपांना हात लावू नका. ती तुडवू नका,” अशी तंबी दिली जायची. आम्ही मग बाहेरूनच त्या कोंबांकडे पाहत बसायचो. काही दिवसांनी वेल मोठा झाला की आपली पैज खरी ठरली की खोटी, हे समजायचे. आज विचार केला तर मातीमधून वर आलेला एखादा छोटासा हिरवा कोंबही आमच्या बालपणी किती मोठ्या आनंदाचा आणि कुतूहलाचा विषय होता, याचे आश्चर्य वाटते.
शाळा आणि दोन झाडांची गंमत
पूर्वी पावसाळा सुरू झाला की शासनाकडून प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांनी झाडे लावण्याबाबत परिपत्रक आलेले असायचे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने पावसाळ्यात दोन झाडे लावावीत, अशा सूचना गुरुजी आम्हाला द्यायचे. मग आम्हीही अभ्यासापेक्षा झाडे लावण्यावर जास्त भर द्यायचो. प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपापल्या शेतात किंवा घरामागील वाडग्यात झाडे लावायचे. त्यामध्ये आंबा आणि जांभूळ ही दोन झाडे सर्रास लावली जायची.
दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर गुरुजी प्रत्येकाला विचारायचे, “किती झाडे लावली?” त्यानुसार विद्यार्थ्यांची आणि त्यांनी लावलेल्या झाडांची यादी तयार केली जायची. ती यादी पुढे तालुक्याला पाठवून दिली जायची. आम्हाला मात्र त्या प्रशासकीय यादीपेक्षा आपण लावलेल्या झाडाचे जास्त अप्रूप असायचे. आम्ही दररोज त्या झाडाची किती वाढ झाली आहे हे पाहायचो. नवीन पान आले का, रोप थोडे उंच झाले का, हे पाहण्यातच आम्हाला मोठा आनंद वाटायचा. हा उत्साह साधारण पंधरा ते वीस दिवस चालायचा. त्यानंतर मात्र हळूहळू उत्साह मावळून जायचा आणि आम्ही पुन्हा आमच्या खेळात रमून जायचो.
खाकी चड्डी, मांजरपाटचा शर्ट आणि शाळेचे दिवस
त्या काळातील शाळेची आणखी एक आठवण म्हणजे शाळेत मिळणारे कपडे. पूर्वी प्रत्येक मुलाला शाळेतून एक खाकी चड्डी आणि मांजरपाटचा पांढरा शर्ट मिळायचा, तर मुलींना निळी-पांढरी फ्रॉक मिळायची. शाळेत कपड्यांचे वाटप होणार आहे, ही बातमी समजली की एरवी शाळेत न येणारे काही विद्यार्थीही त्या दिवशी आवर्जून शाळेत हजेरी लावायचे. कपडे मिळाले की मात्र त्यातील काही जण पुन्हा गैरहजर राहायचे! त्या वेळी आम्हाला त्याचीही गंमत वाटायची.
नवीन कपडे मिळाले की प्रत्येक मुलाला त्यांचे खूप अप्रूप वाटायचे. पण कपडे नवीन आणि दिवस मात्र पावसाळ्याचे! घराच्या माळ्यावर पेंढा म्हणजे वैरण, सरपण आणि गोवऱ्या साठवलेल्या असायच्या. चुलीवर स्वयंपाक होत असल्यामुळे घरात खूप धूर व्हायचा. बाहेर पाऊस, चिखल आणि गाळ असायचा. अशा परिस्थितीत शाळेतून मिळालेले नवीन कपडे आठ-दहा दिवसांतच असे काही दिसू लागायचे की ते नवीन आहेत, यावर कोणाचाच विश्वास बसत नसे. त्यात या कपड्यांची गुणवत्ता अत्यंत खराब असल्यामुळे त्यांचा नवीनपणा फार काळ टिकत नसे. काही दिवसांतच त्या कपड्यांविषयी असलेली नवलाई निघून जायची. तरीदेखील नवीन खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट हातात मिळाल्यावर झालेला आनंद आजही आठवतो.
पावसाळा आणि खेकड्याचे कालवण
पावसाळ्यातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे खेकडे म्हणजे किरवे. पाऊस सुरू झाला की खूप जण माळावरून खेकडे आणायचे. त्यामुळे अनेकांच्या घरी रात्री खेकड्याचे कालवण असायचे. कधी कधी लोक भरलेल्या खेकड्यांचे कालवण करायचे. खेकड्यांच्या कवटात हुलग्याचे, बाजरीचे किंवा हरभऱ्याचे पीठ घातले जायचे. त्यात मीठ, मिरची आणि मसाला घालून ते भरले जायचे आणि नंतर त्याचे कालवण बनवले जायचे. त्या भरलेल्या खेकड्यांच्या कालवणाची चव मात्र न्यारीच असायची. पावसाळ्याचे थंडगार वातावरण, चुलीवर शिजणारे कालवण आणि घरभर पसरणारा त्याचा वास यांची आठवण आजही ताजी आहे.
श्रावण आला की...
वाडग्यातून आळूची मोठी पाने आणली जायची. ती स्वच्छ धुऊन घेतली जायची. त्यावर बाजरीचे किंवा बेसनचे पीठ, मीठ आणि मसाला लावून पातवड केली जायची. त्या काळात एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे घरात माणसे खूप असायची. त्यामुळे पातवडही थोडीथोडकी करून भागत नसे; सर्वांना पुरेल एवढी भरपूर करावी लागायची. घरातील स्त्रिया मिळून हे काम करायच्या आणि घरात एक वेगळीच लगबग असायची.
पातवड तयार झाल्यानंतर ती शिजवण्याची पद्धतही खास होती. आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या पातेल्यात थोडा पेंढा ठेवला जायचा. त्यात पाणी घातले जायचे. त्यावर चाळण ठेवून भांड्यात पातवड ठेवली जायची. हे मोठे पातेले चुलीवर ठेवले जायचे आणि खाली भरपूर जाळ केला जायचा. वर परात ठेवली जायची. अशा पद्धतीने पातवड वाफेवर छान शिजायची. काही घरांमध्ये या पातवडाच्या वड्या केल्या जायच्या, तर काही ठिकाणी ती तशीच खाल्ली जायची. या भाजीचा गिरंगीटासुद्धा केला जायचा. घरच्या वाडग्यातील आळूच्या पानांपासून चुलीवर तयार झालेल्या त्या पातवडीची चव आजही आठवणीत तशीच आहे.
रिमझिम श्रावण आणि गावातील भजने
श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस पडायचा. ओढ्या-नाल्यांना स्वच्छ, पांढरे शुभ्र पाणी असायचे. डोंगर आणि राने हिरवीगार झालेली असायची. गावात ठिकठिकाणी रात्री भजने असायची आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठे धार्मिक वातावरण निर्माण व्हायचे. बाहेर रिमझिम पाऊस सुरू असताना रात्रीच्या शांततेत दूरवरून ऐकू येणारा भजनांचा आवाज मनाला वेगळाच आनंद द्यायचा.
दर सोमवारी भाविक मोरगिरी मार्गे कोटेश्वराचे दर्शन घेऊन भीमाशंकरला जात. श्रावणातील सोमवार आणि भीमाशंकरची यात्रा यांना त्या काळी विशेष महत्त्व होते. पावसाळ्यातील हिरव्यागार डोंगररांगांमधून पायी चालत देवदर्शनाला जाणे ही केवळ धार्मिक गोष्ट नव्हती; त्यातून निसर्गाशी असलेले माणसाचे नातेही अधिक घट्ट होत असे.
कोटेश्वर मार्गे भोरगिरीवरून भीमाशंकर
दर्शन झाल्यानंतर लाह्या आणि खडीसाखर घेऊन आम्ही पुन्हा कोटेश्वर मार्गे भोरगिरीवरून घरी परतायचो. तेव्हा प्रत्येक जण स्वच्छंदी असायचा. कोणालाही कामाचा किंवा इतर गोष्टींचा आजच्यासारखा ताण जाणवत नसे. डोंगरातून कितीही चाललो, पावसात भिजलो तरी त्याचा आनंदच वाटायचा. शरीराला श्रम होत होते; पण मनावर ओझे नव्हते.
आज त्या दिवसांची आठवण झाली की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आमच्या बालपणीच्या अनुभवात त्या काळी रक्तदाब, डायबेटीस, हृदयविकार, मुळव्याध किंवा पोटाचे आजार यांसारख्या तक्रारी आजच्या तुलनेत फारशा ऐकू येत नसत. याचा अर्थ त्या काळात हे आजार अस्तित्वातच नव्हते असे नाही; परंतु आमच्या आसपासच्या ग्रामीण जीवनात त्यांची चर्चा आजच्यासारखी वारंवार ऐकायला मिळत नसे. त्या काळातील जीवनशैलीही वेगळी होती. माणूस दिवसभर शारीरिक श्रम करायचा, मैलोनमैल पायी चालायचा, शेतात राबायचा, डोंगर-दऱ्यांतून फिरायचा आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहायचा.
आता मात्र आपण कामाच्या व्यापामुळे हळूहळू निसर्गापासून दूर गेलो आहोत. चालणे कमी झाले, शारीरिक श्रम कमी झाले, बसून काम करण्याचे प्रमाण वाढले आणि जीवनातील ताणतणावही वाढले. त्याबरोबर रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांविषयी आपण अधिक ऐकतो. काही वेळा चाळिशीत असलेला माणूसही जणू साठ-पासष्ट वर्षांचा म्हातारा वाटतो. अर्थात याला केवळ निसर्गापासून दूर जाणे हेच एकमेव कारण म्हणता येणार नाही; आहार, व्यायाम, आनुवंशिकता, वैद्यकीय निदान आणि इतर अनेक घटकही त्यामागे असतात. तरीदेखील निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, शारीरिक हालचाल करणे आणि मनावरील ताण कमी ठेवणे यांचे महत्त्व नाकारता येणार नाही.
गड्या, आपुला गाव बरा!
म्हणूनच “गड्या, आपुला गाव बरा!” हे सूत्र प्रत्येकाने कुठेतरी मनात जपले पाहिजे. याचा अर्थ शहर सोडून प्रत्येकाने कायमचे गावातच जाऊन राहावे असा नाही; तर आपल्या गावाशी आणि आपल्या मातीशी असलेले नाते तुटू देऊ नये. अधूनमधून गावाला गेले पाहिजे. आपण लहानपणी ज्या ठिकाणी खेळलो, ज्या माळावर फिरलो, ज्या रानात अनेकदा गेलो, त्या ठिकाणी पुन्हा एकदा जाऊन पाहिले पाहिजे.
आपण लहानपणी ज्या ओढ्यात खेळलो, ज्या डोंगरवाटेने चाललो, ज्या झाडाखाली बसलो आणि ज्या माळावरून खेकडे आणले, त्या जागा पुन्हा पाहिल्या पाहिजेत. घराच्या पाठीमागे ज्या जागेत वाडगा असायचा, त्या जागेकडेही एकदा पाहिले पाहिजे. कदाचित आज तिथे पूर्वीसारखी खाकरांची कुंपणे नसतील. आळवड, भोपळा, दोडका, घेवडा, घोसाळे, कारले आणि काकडीचे वेलही नसतील. कदाचित त्या जागेचे स्वरूप पूर्णपणे बदलले असेल. पण त्या जागी गेल्यावर आपल्या मनात दडलेल्या आठवणी मात्र नक्की जाग्या होतील.
एखादा हिरवा कोंब पाहिला की वाडग्यातील कोंब कोणत्या भाजीचा आहे यावरून लावलेल्या पैजा आठवतील. एखादे आंब्याचे किंवा जांभळाचे रोप दिसले की गुरुजींनी दिलेली दोन झाडे लावण्याची सूचना आठवेल. एखाद्या जुन्या शाळेसमोरून गेलो की खाकी चड्डी आणि मांजरपाटचा पांढरा शर्ट आठवेल. पावसाळ्यात एखादा खेकडा दिसला की भरलेल्या खेकड्याच्या कालवणाची चव आठवेल. आळूचे मोठे पान पाहिले की चुलीवर वाफवलेली पातवड आणि गिरंगीटा आठवेल. श्रावणातील रिमझिम पावसात एखाद्या मंदिरातून भजनाचा आवाज आला की त्या काळातील गावचे धार्मिक वातावरण आठवेल. आणि एखाद्या हिरव्यागार डोंगरवाटेवरून चालताना कोटेश्वर मार्गे भोरगिरीवरून भीमाशंकरला गेलेला बालपणीचा प्रवास पुन्हा डोळ्यांसमोर उभा राहील.
आज आपल्याकडे अनेक सुखसोयी आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन सोपे केले आहे. या सुविधा नाकारण्याचा प्रश्नच नाही. पण या सगळ्या प्रगतीसोबत आपण आपल्या मातीपासून, गावापासून आणि निसर्गापासून पूर्णपणे तुटून जाऊ नये. कधी तरी कामातून वेळ काढून गावाला गेले पाहिजे. बालपणी ज्या माळावर, ज्या रानात आणि ज्या वाटेवर आपण असंख्य वेळा फिरलो, तिथे पुन्हा एकदा जाऊन पाहिले पाहिजे. पहा, मनाला एक वेगळाच आनंद मिळेल. काही क्षणांसाठी का होईना, बालपणीच्या आठवणी दाटून येतील आणि मन पुन्हा त्या जुन्या दिवसांत रमून जाईल.
माणूस कितीही मोठा झाला, कितीही आधुनिक झाला आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेला, तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात त्याचे गाव, त्याची माती आणि त्याचे बालपण कायम जिवंत असते. म्हणूनच कधी तरी त्या मातीला पुन्हा स्पर्श करा, जुन्या वाटेवरून पुन्हा चालून या आणि आपल्या हरवलेल्या बालपणाला पुन्हा एकदा भेटून या.
तेव्हा मनातून आपोआप एकच शब्द बाहेर पडेल “गड्या, आपुला गाव बरा!”
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा