गावाकडचे सांस्कृतिक जीवन
प्रत्येक गावात एखादा उत्कृष्ट गायक, ढोलकीवादक, ताशावादक, भारूडकार, कीर्तनकार, प्रवचनकार किंवा तमाशातील कलाकार असायचाच.
कला ही काही मोजक्या लोकांची मक्तेदारी नव्हती; ती गावागावांत रुजलेली होती. कलेला जाती-पातीचे बंधन नव्हते. शेतकरी, बलुतेदार, कारागीर, व्यापारी सर्वच समाजघटक या सांस्कृतिक परंपरेचा भाग होते. त्यामुळे गावातील सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत असे.
आजही डोळे मिटले की त्या काळातील रात्री आठवतात. गावातील मंदिरासमोरचा मोकळे पटांगण, मंद वाऱ्याची झुळूक, कंदिलाचा किंवा पेट्रोमॅक्सचा प्रकाश, आणि त्यात सुरू झालेले भारूड,भजन… टाळ, चिपळ्या, ढोलकी आणि वीणेच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय होत असे. त्या सुरांत केवळ संगीत नव्हते, तर गावाच्या आत्म्याचा स्पंदनशील आवाज दडलेला होता.
एकतारी भजन – भक्ती आणि साधेपणाचा सुरेल आविष्कार
ग्रामीण महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनाचा पाया म्हणजे एकतारी भजन. आज ज्या पद्धतीचे भव्य ध्वनिव्यवस्थेतील कार्यक्रम पाहायला मिळतात, त्यापेक्षा त्या काळातील एकतारी भजन अगदी साधे, पण मनाला भिडणारे असायचे.
एका हातात वीणा, दुसऱ्या हातात चिपळ्या आणि समोर विठ्ठलाची प्रतिमा... एवढीच तयारी पुरेशी असे. त्याला साथ द्यायला ढोलकी, टाळ आणि एखादा जाणकार गायक असायचा. कोणताही कृत्रिम गाजावाजा नव्हता. आवाजात भक्ती आणि मनात श्रद्धा असेल, तर तेच भजन यशस्वी मानले जात असे.
संध्याकाळी सर्वांची जेवणे झाली की मंदिरात किंवा एखाद्या घरात भजनाला सुरुवात होत असे. सुरुवातीला मोजकीच मंडळी बसलेली असत; पण जसजसा टाळ-चिपळ्यांचा नाद परिसरात घुमू लागे, तसतशी दूरवरच्या वाड्यांतील लोकही अंधार तुडवत भजनाला येत. काहींच्या हातात कंदील, तर काहीजण चंद्रप्रकाशाच्या उजेडात वाट काढत मंदिरात पोहोचत.
भजन सुरू झाले की वेळेचे भान राहत नसे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या अभंगांनी वातावरण भारून जात असे. प्रत्येक अभंगामागे भक्ती, तत्त्वज्ञान आणि जीवन जगण्याचा संदेश दडलेला असे. त्यामुळे भजन हे केवळ गायन नव्हते, तर ते लोकशिक्षणाचे एक प्रभावी माध्यम होते.
चिपळ्यांचा मंजुळ नाद, टाळांचा ठेका, ढोलकीची लय आणि वीणेची साथ... या सगळ्यांचा संगम झाला की मन नकळत भक्तिरसात रंगून जाई. अनेकांना त्या सुरांत मानसिक समाधान मिळत असे. दिवसभर शेतीत कष्ट केलेल्या शेतकऱ्याला हे भजन म्हणजे जणू थकलेल्या मनाला मिळणारा विश्रांतीचा श्वास होता.
त्या काळी पैशासाठी कोणी भजन करत नव्हते. प्रसिद्धीची अपेक्षाही नव्हती. समाजासाठी, देवासाठी आणि स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी ही सेवा केली जात असे. म्हणूनच त्या काळातील भजनात कृत्रिमता नव्हती; तेथील प्रत्येक सूर हा मनातून उमटलेला असे.
आज काळ बदलला आहे. आधुनिक ध्वनियंत्रणा, की-बोर्ड आणि डिजिटल संगीतामुळे भजनाची शैली बदलली असली, तरी त्या जुन्या एकतारी भजनातील साधेपणा, आत्मीयता आणि भक्तिभाव आजही अनेकांच्या स्मरणात तितकाच जिवंत आहे.
संगीत भजनाचा सुवर्णकाळ आणि गवळणींची मोहिनी.
काळ बदलत गेला तसे ग्रामीण भागातील भजनाच्या परंपरेतही बदल होऊ लागला. एकतारी भजनाचा साधेपणा कायम असला तरी लोकांच्या संगीताची आवड वाढू लागली. त्यातूनच संगीत भजन ही नवीन शैली उदयाला आली. ही शैली पारंपरिक भक्ती आणि सुरेल संगीत यांचा सुंदर संगम होती. त्यामुळे भजन ऐकण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक लोक जमा होऊ लागले.
एकतारी भजनात वीणा आणि चिपळ्यांचे प्राबल्य होते; परंतु संगीत भजनात पायपेटी (हार्मोनियम), ढोलकी, टाळ, चिपळ्या आणि नंतर तबल्याचीही साथ मिळू लागली. गायकांच्या आवाजाला सुरेल साथ मिळाल्यामुळे अभंग अधिक प्रभावी वाटू लागले. प्रत्येक भजन मंडळाची स्वतःची वेगळी गायकी, वेगळी चाल आणि वेगळा बाज असायचा. त्यामुळे एका गावातील भजन दुसऱ्या गावापेक्षा वेगळे वाटत असे.
भजनाची सुरुवात अनेकदा अलंका पुरी किंवा गणपतीच्या स्तवनाने होत असे. त्यानंतर सर्वजण आतुरतेने वाट पाहत असत ती पहिल्या अभंगाची. बहुतेक भजनांची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या प्रसिद्ध अभंगाने होत असे.
"रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी..."
या अभंगाची प्रत्येक भजन मंडळाने स्वतःची चाल तयार केलेली असे. एखाद्या मंडळाने गंभीर रागात गायलेला हा अभंग तर दुसऱ्या मंडळाने अधिक मधुर आणि आल्हाददायक चालीत सादर केलेला असे. पहिल्याच अभंगावरून त्या रात्रीच्या भजनाचा रंग आणि गायकांचा दर्जा लक्षात येत असे.
त्यानंतर एकामागून एक अभंगांची मैफल रंगत जाई.
"येई हो विठ्ठले, माझे माऊली ये..."
"येई श्यामसुंदरा..."
"पिंपळाच्या पारी नामा भजन करी..."
"जय जय शंभो तू महादेवा..."
"पांडुरंग उभा वाळवंटी..."
अशा असंख्य अभंगांच्या सुरांनी वातावरण भक्तिमय होत असे. प्रत्येक अभंगामध्ये गायकाचा आवाज, ढोलकीचा ठेका, पायपेटीचे सूर आणि टाळांचा नाद यांचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळत असे.
काही गायकांच्या आवाजात इतकी ताकद आणि माधुर्य असे की, त्यांनी "आळंकापुरी... पुण्यभूमी पवित्र..." या ओळीला दिलेली लांब तान ऐकताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहत. भजनाच्या त्या स्वरांनी मंदिराचा परिसर भारून जाई. लहान मुले, तरुण, वृद्ध, महिला सर्वजण मंत्रमुग्ध होऊन त्या सुरांत हरवून जात.
गवळणींचा रंग
अभंगांचा कार्यक्रम संपत आला की सर्वांना उत्सुकता लागून राहायची ती गवळणींची.
गवळण हा केवळ काव्यप्रकार नव्हता; तो भक्ती, संगीत आणि मनोरंजन यांचा संगम होता. श्रीकृष्णाच्या बाललीला, गवळणींचे संवाद, गोपींची कृष्णभक्ती आणि त्यातील खट्याळ प्रसंग यांचे सुंदर चित्रण या गवळणींमध्ये असायचे.
गवळणींच्या चाली अभंगांपेक्षा अधिक उडत्या आणि लयबद्ध असत. त्यामुळे रात्री उशिरा आलेली झोप क्षणात नाहीशी होत असे. काही गवळणी तर त्या काळातील लोकप्रिय मराठी किंवा हिंदी चित्रपटांच्या चालींवरही रचल्या जात. पण त्यात अश्लीलता नसायची; भक्ती आणि विनोद यांचा सुरेख मिलाफ असायचा.
गवळणी सुरू झाल्या की वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारत असे. ढोलकीचा वेग वाढे, टाळांचा ठेका अधिक जोमाने पडू लागे आणि गायकांच्या आवाजातही एक वेगळीच चैतन्यपूर्ण ऊर्जा निर्माण होत असे. श्रोत्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलून येत असे.
भैरवीने होणारी सांगता
रात्र कधी सरत असे, हे कुणालाच कळत नसे. मध्यरात्र उलटून गेल्यावर अखेरच्या टप्प्यात भैरवी गायली जाई. भैरवी म्हणजे जणू संपूर्ण भजनाचा आत्मा. तिच्या सुरांनी मन शांत होत असे आणि संपूर्ण रात्रीच्या भक्तिमय प्रवासाची सांगता व्हायची.
भजन संपले की आयोजकांकडून पितळी किंवा तांब्याच्या भांड्यातून गरमागरम चहा दिला जाई. त्या चहाची चव आजच्या कोणत्याही हॉटेलमधील चहात मिळणार नाही. कारण त्या चहात साखरेपेक्षा जास्त गोडवा असायचा तो प्रेमाचा, आपुलकीचा आणि सामूहिक भावनेचा.
पहाटेच्या थंड वाऱ्यात चहा पित-पित लोक आपापल्या घरी परतत. कुणाच्या ओठावर अभंग असायचा, कुणाच्या मनात गवळणीचे सूर घुमत असत, तर कुणी अजूनही त्या भक्तिरसात हरवलेला असे.
भजन म्हणजे ग्रामीण समाजाचे सांस्कृतिक विद्यापीठ
त्या काळात भजन हे केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हते. ते समाजाला एकत्र आणणारे, संस्कार घडवणारे आणि मानसिक समाधान देणारे माध्यम होते. गावातील गायक, वादक आणि भजनकार यांना मोठा मान दिला जात असे. त्यांची कला ही पैशासाठी नव्हे, तर समाजसेवा आणि भक्ती म्हणून जोपासली जात असे.
धर्मा तळपे, चिंधू खाडे, बुधा खाडे, चंद्रकांत मोहन, नाथाबुवा तळपे यांसारख्या अनेक गुणी भजनकारांनी आपल्या सुरांनी गावोगावी भक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवली. सत्यनारायण महापूजा, गणपती उत्सव,सप्ताह, यात्रा किंवा धार्मिक सोहळा असो रात्री भजनाचा कार्यक्रम असणारच, ही जणू अलिखित परंपराच होती.
आजही त्या सुरांची आठवण झाली की मन नकळत त्या काळात जाऊन पोहोचते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे संगीत अधिक प्रगत झाले असेल, पण त्या काळातील भजनातील आत्मीयता, भक्ती आणि मानवी स्पर्श आजही अतुलनीय वाटतो.
लेझीम, ढोल पथके, भारूड आणि ग्रामीण लोककलांचा सुवर्णकाळ
भजनाइतकीच ग्रामीण भागातील आणखी एक मोठी सांस्कृतिक ओळख म्हणजे लेझीम, ढोल, भारूड, संगीत कलानाट्य आणि तमाशा. या लोककलांनी अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले, समाजप्रबोधन केले आणि गावोगावी सांस्कृतिक चैतन्य जिवंत ठेवले. त्या काळी मनोरंजनाची साधने मर्यादित होती. दूरदर्शन प्रत्येक घरात नव्हते आणि मोबाईलचा तर प्रश्नच नव्हता. त्यामुळे गावातील लोकविलक्षण कलावंत हेच लोकांच्या आनंदाचे खरे शिल्पकार होते.
लेझीम आणि ढोल पथकांचा थरार
गावातील यात्रा, गणेशोत्सव, शिवजयंती, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन किंवा एखादा मोठा धार्मिक सोहळा म्हणजे लेझीम आणि ढोल पथकांचा जल्लोष ठरलेलाच असे. ढोलाच्या घणाघाती ठेक्यावर लेझीमच्या तालबद्ध हालचाली पाहताना अंगात आपोआप स्फूर्ती संचारत असे.
लेझीम ही केवळ कसरत नव्हती, तर ती शिस्त, ताल, एकजूट आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा संगम होती. पथकातील प्रत्येक खेळाडू एकाच लयीत पाऊल टाकत असे. ढोलाचा एकच ठेका पडला की संपूर्ण पथक एकाच तालात फिरत असे. या सादरीकरणात इतका जोश असे की, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट थांबत नसे.
त्या काळात सोळसेवाडीचे ढोल आणि लेझीम पथक संपूर्ण परिसरात प्रसिद्ध होते. या पथकाचे प्रमुख बबन खाडे हे उत्कृष्ट प्रशिक्षक आणि कुशल कलाकार म्हणून ओळखले जात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अनेक यात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम गाजवले. ढोलाचे विविध ठेके, लेझीमचे आकर्षक डाव आणि तालबद्ध हालचाली यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा मिळाली होती.
याचप्रमाणे मंदोशी गावातील ढोल आणि लेझीम पथकही परिसरात नावाजलेले होते. या पथकाचे नेतृत्व विष्णू पांडू तळपे करत असत. त्यांच्या नेतृत्वाखालील तरुणांनी गावातील अनेक कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
भारूड – लोकप्रबोधनाचे प्रभावी माध्यम
भजनानंतर ग्रामीण समाजावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी कला म्हणजे भारूड. संत एकनाथ महाराजांनी लोकप्रिय केलेला हा लोककाव्य प्रकार ग्रामीण भागात अत्यंत प्रिय होता. भारूड म्हणजे केवळ गाणे नव्हते; त्यात विनोद, व्यंग, समाजप्रबोधन, अध्यात्म आणि जीवनतत्त्वज्ञान यांचा अप्रतिम संगम असायचा.
भारूडातील कलाकार विविध वेशभूषा करून समाजातील विविध व्यक्तिरेखा साकारत.राजा, प्रधान, राक्षस, द्वारपाळ, कधी शेतकरी, कधी सावकार, कधी भिकारी, कधी वाघ्या-मुरळी, तर कधी एखादा भोळाभाबडा गावकरी. त्यांच्या अभिनयातून समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, लोभ, अहंकार आणि सामाजिक विसंगती यांवर मार्मिक भाष्य केले जाई.
विनोदाच्या माध्यमातून दिलेला हा संदेश थेट लोकांच्या मनात पोहोचत असे. त्यामुळे भारूड हे ग्रामीण समाजाचे एक प्रभावी लोकशिक्षण माध्यम होते.
त्या काळात नायफडची नाव्हाचीवाडी, सरेवाडी, टोकावडे, भोमाळे, धामणगाव, पोखरी, कानसे माळवाडी, खरवली, देवतोरणे आणि पवळेवाडी येथील भारूड मंडळे संपूर्ण परिसरात प्रसिद्ध होती. यात्रांच्या हंगामात या मंडळांना मोठी मागणी असे. अनेक गावांमध्ये त्यांच्या कार्यक्रमाची तारीख मिळवण्यासाठी आधीच बुकिंग केले जात असे.
संगीत कलानाट्य आणि तमाशा – ग्रामीण मनोरंजनाची शान
त्या काळातील ग्रामीण मनोरंजनाचा आणखी एक अविभाज्य भाग म्हणजे संगीत कलानाट्य आणि तमाशा. गावातील यात्रा म्हणजे रात्री तमाशाचा फड भरायचाच. दिवसभर धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर रात्री गावाच्या मैदानात रंगणारा तमाशा हा लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असे.
लावणी, वगनाट्य, विनोदी फार्स, संवाद, नृत्य आणि गायन यांचा सुंदर मिलाफ असलेला तमाशा लोकांना पहाटेपर्यंत खिळवून ठेवत असे. त्या काळातील कलाकारांची स्मरणशक्ती, संवादफेक, नृत्यकौशल्य आणि गाण्यावरील प्रभुत्व पाहून प्रेक्षक थक्क होत.
टोकावडे,उगलेवाडी (कारकुडी), मंदोशी, जावळेवाडी, भिवेगाव आणि साकुर्डी येथील तमाशा मंडळे परिसरात विशेष प्रसिद्ध होती. या कलापरंपरेला जिवंत ठेवण्यासाठी चिंधू वनघरे, बापू साबळे, शंकर अहिलू तळपे, विष्णू हुरसाळे, भीमाजी गोडे, दुलाजी गोडे, नारायण तळपे, शंकर गवारी, बबन गोडे, मारुती भोकटे आणि विठ्ठल उगले यांसारख्या अनेक कलाप्रेमींनी मोठे योगदान दिले. मास्टर शंकरराव कोकाटे यांचा तमाशा महाराष्ट्रात लोकप्रिय होता.
कलेचा वारसा जपणारे गावकरी
आजच्या काळात कलाकार होण्यासाठी मोठी व्यासपीठे उपलब्ध आहेत. पण त्या काळी कलाकारांकडे ना मोठी साधने होती, ना आर्थिक पाठबळ. तरीही त्यांनी आपल्या कलेवर निस्सीम प्रेम केले. दिवसभर शेती, व्यवसाय किंवा मजुरी करून रात्री गावाच्या सेवेसाठी कला सादर करणे, ही त्यांची जीवनशैली होती.
यातून एक गोष्ट स्पष्ट होते.त्या काळातील लोकांसाठी कला हा व्यवसाय नव्हता; ती समाजसेवा, भक्ती आणि सांस्कृतिक जबाबदारी होती.
हीच भावना ग्रामीण संस्कृतीची खरी ताकद होती.
अविस्मरणीय लोककलावंत – कासम तांबोळी, दगडू भराडी, विठू नांगरे, बापू गायकवाड आणि इतर अनेक कलाकारांच्या आठवणी.
एखाद्या प्रदेशाची ओळख केवळ त्याच्या डोंगर-दऱ्या, नद्या किंवा शेतीमुळे होत नाही; तर त्या भूमीत जन्मलेल्या कलावंतांमुळेही होते. प्रत्येक गावात काही अशी माणसे असतात की, त्यांच्या कलेने संपूर्ण परिसराला एक वेगळी ओळख मिळते. त्यांनी कधी प्रसिद्धीची अपेक्षा ठेवली नाही, पुरस्कारांची वाट पाहिली नाही किंवा संपत्ती जमवण्याचा विचार केला नाही. कलेवर निस्सीम प्रेम आणि समाजाचे मनोरंजन, एवढेच त्यांचे ध्येय होते.
आज त्या कलाकारांपैकी अनेक जण आपल्यात नाहीत; काही वयोमानामुळे कलेपासून दूर झाले आहेत. मात्र त्यांच्या कलेच्या आठवणी आजही असंख्य रसिकांच्या मनात जिवंत आहेत.
कासम तांबोळी – ताशाच्या ठेक्याचा जादूगार
कासम तांबोळी यांची उंची जरी लहान असली, तरी त्यांच्या कलेची उंची मात्र आकाशाएवढी होती. परिसरात त्यांना प्रेमाने "कासमभाई" म्हणून ओळखले जात असे.
ताशा हातात घेतला की त्यांच्या हातातील काड्या जणू बोलू लागत. प्रत्येक ठेका अचूक, दमदार आणि कानाला सुखावणारा असे. त्यांच्या ताशाच्या आवाजाने यात्रेचे वातावरण क्षणात भारावून जात असे. अनेक जण केवळ कासमभाईंचा ताशा ऐकण्यासाठी मैलोनमैल चालत येत असत.
त्यांच्या वादनात केवळ ताकद नव्हती, तर लय, सौंदर्य आणि कलात्मकता होती. म्हणूनच कासमभाई हे त्या काळातील ताशावादनाचे मानबिंदू ठरले.
दगडू भराडी – डमरूच्या नादातून भक्ती जागवणारा कलावंत
शिरगावचे दगडू भराडी हे त्या काळातील एक वेगळेच व्यक्तिमत्त्व होते. ग्रामीण भागात लग्न झाल्यावर भराड घालण्याची परंपरा होती. दगडू भराडी हे भराड घालण्याची परंपरा सादर करत असत. भोरगिरीच्या ताथवडी देवी पासुन ते खेडच्या सिद्धेश्वरा पर्यंतच्या सर्व गावांच्या ग्रामदेवतांना भराडाला येण्याचे आमंत्रित करीत.
सोमवार, मंगळवार आणि गुरुवारी पहाटेच ते डमरू हातात घेऊन गावोगावी फिरत असत. प्रत्येक घरासमोर उभे राहून ते खंडोबा, देवी आणि इतर देवतांची पारंपरिक गीते म्हणत. त्यांच्या आवाजात एक विलक्षण ओढ होती.
'मोठ मोठे डोळे घाली मिशावर ताव' हे खंडोबा देवाचे गाणे ते खुप चांगल्या प्रकारे सादर करत. मला हे गाणे खूप आवडायचे.
पहाटेच्या शांत वातावरणात घुमणारा डमरूचा नाद आणि त्यावर म्हणली जाणारी भक्तिगीते ऐकून गावात प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होत असे.
गृहिणी प्रेमाने त्यांना वाटीभर तांदूळ किंवा धान्य देत. ती केवळ भिक्षा नव्हती; ती कलेचा आणि भक्तीचा सन्मान होता.
आजही अनेक ज्येष्ठांच्या कानात दगडू भराडींचा आवाज घुमतो. आधुनिक ध्वनिक्षेपकांच्या युगात तो नैसर्गिक स्वर आता केवळ आठवणीत उरला आहे.
बापू गायकवाड – डफाच्या ठेक्याचा बादशहा
डेहणे गावचे बापू गायकवाड म्हणजे डफवादनातील एक दिग्गज नाव.
त्यांच्या हातात डफ आला की तो केवळ वाद्य राहत नसे; तो जणू बोलू लागे. त्यांच्या हातातील प्रत्येक थाप अंगात चैतन्य निर्माण करणारी असे.
अनेक कलाकार डफ वाजवत; पण बापू गायकवाड यांच्या थापेतील ताकद, लय आणि आत्मविश्वास वेगळाच होता.
आजही ज्यांनी त्यांचे वादन ऐकले आहे, ते अभिमानाने म्हणतात.
"डफ वाजवावा तर बापूंनीच!"
विठू नांगरे – अभिनय आणि नृत्याचा सम्राट
मोरोशीचे विठू नांगरे हे त्या काळातील सर्वगुणसंपन्न लोककलावंत होते.
कोणतेही पात्र साकारायचे असेल, तर विठू नांगरे ते इतक्या सहजतेने साकारत की प्रेक्षक त्या भूमिकेत पूर्णपणे रमून जात.
त्यांचे समई नृत्य विशेष लोकप्रिय होते. डोक्यावर पेटती समई ठेवून तालावर नृत्य करणे हे अत्यंत कौशल्याचे काम होते.
याशिवाय नृत्य करताना डोक्यावर भात शिजवण्याचा अनोखा प्रयोग आणि देखणे मयूरनृत्य पाहण्यासाठी यात्रांमध्ये प्रचंड गर्दी होत असे.
विठू नांगरे हे केवळ कलाकार नव्हते; ते लोककलेचे चालते-बोलते विद्यापीठ होते.
सुदाम बारवेकर – मधुर वाचनाची परंपरा
श्रावण महिना सुरू झाला की अनेक ठिकाणी रामविजय, नवनाथ ग्रंथ आणि इतर धार्मिक ग्रंथांचे पारायण होत असे.
हे ग्रंथ वाचताना सुदाम बारवेकर यांच्या आवाजातील माधुर्य मनाला स्पर्श करून जात असे.
त्यांच्या स्पष्ट उच्चारांमुळे आणि भावपूर्ण वाचनामुळे श्रोते तासन्तास एकाग्रतेने ऐकत असत.
लग्नसमारंभात त्यांनी म्हटलेली मंगलाष्टकेही तितकीच प्रसिद्ध होती.
जगदाळे महाराज – सहज भाषेतील जीवनदर्शन
प्रवचन म्हणजे अवघड तत्त्वज्ञान अशी अनेकांची समजूत असते.
पण जगदाळे महाराज यांनी अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत अध्यात्म लोकांपर्यंत पोहोचवले.
ते दैनंदिन जीवनातील उदाहरणे, दृष्टांत आणि छोट्या कथा सांगून जीवनमूल्ये समजावून सांगतात.
त्यांचे प्रवचन ऐकल्यानंतर श्रोत्यांच्या मनात विचारांची नवी पालवी फुटते.
परंपरेचा खरा वारसा
या कलाकारांनी कधी प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही. त्यांच्याकडे आधुनिक साधने नव्हती, मोठी व्यासपीठे नव्हती किंवा सामाजिक माध्यमे नव्हती.
त्यांच्याकडे होते ते फक्त कलेवरचे प्रेम, समाजाविषयीची आपुलकी आणि संस्कृती जपण्याची निष्ठा.
आज आपण लोककलेचा इतिहास लिहितो आहोत, त्यामागे अशाच शेकडो ज्ञात-अज्ञात कलाकारांचे आयुष्यभराचे योगदान आहे. त्यांचे स्मरण करणे म्हणजे केवळ व्यक्तींचा गौरव करणे नव्हे, तर आपल्या ग्रामीण संस्कृतीचा सन्मान करणे होय.
परंपरेपासून आधुनिकतेकडे – बदलत्या ग्रामीण कलेचा प्रवास
कीर्तन, प्रवचन आणि अध्यात्माची अखंड परंपरा
ग्रामीण भागातील कला ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नव्हती. ती माणसाला संस्कार देणारी, विचार जागवणारी आणि समाजाला एकत्र ठेवणारी होती. म्हणूनच भजनाबरोबर कीर्तन आणि प्रवचनालाही तितकेच महत्त्व होते.
वामन महाराज जढर यांनी आपल्या कन्या अमृता आणि नमृता यांना लहानपणापासूनच अध्यात्माचे संस्कार दिले. अल्पवयातच त्यांनी कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून अनेकांच्या मनात भक्तीची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्या ओघवत्या वाणीतील विचार ऐकताना केवळ धार्मिक ज्ञानच नव्हे, तर जीवन कसे जगावे याचाही मार्ग सापडत असे.
कीर्तनामध्ये हरिपाठ, अभंग, दृष्टांत, विनोद आणि तत्त्वज्ञान यांचा सुंदर मेळ असे. त्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण रसपूर्वक ऐकत असे.
कीर्तनाला उत्तम साथ देणाऱ्या अंकुश शिंदे आणि दत्तू मोरमारे या जोडीने अनेक कीर्तनांना वेगळी उंची दिली. त्यांच्या ताल-सुरांच्या साथीमुळे कीर्तन अधिक परिणामकारक होत असे.
नायफडचे भारमळ महाराज यांच्या प्रवचनात साधेपणा आणि विचारांची खोली होती. तर सागर महाराज शिर्के यांनी आपल्या रसाळ वाणीमुळे आधुनिक माध्यमांतूनही या भागाचे नाव दूरवर पोहोचवले. परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो.
दिंडी – भक्ती, समता आणि सामूहिकतेचा प्रवास
या भागातील वारकरी परंपरा अत्यंत समृद्ध आहे. कै. दुलाजीबाबा तिटकारे यांनी सुरू केलेली भीमाशंकर ते आळंदी पायी दिंडी आजही अखंड सुरू आहे.
दिंडी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नव्हे; ती श्रद्धा, समता, सेवा आणि शिस्त यांची चालती-बोलती शाळा आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात, "ज्ञानोबा-तुकोबा"च्या जयघोषात चालणारी दिंडी प्रत्येक वारकऱ्याला जीवनातील साधेपणाचे महत्त्व शिकवते.
या परंपरेच्या जतनासाठी विठ्ठल ढवळा वनघरे, दत्ता खाडे, गोपाळ हुरसाळे, सुनील भालेराव यांच्यासह अनेक वारकऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. आळंदी येथे उभारलेली धर्मशाळा ही या सामूहिक भावनेचे सुंदर प्रतीक आहे.
सनई-चौघड्यांचा दिमाख
एकेकाळी लग्नसमारंभ, यात्रा आणि मंगलकार्यांची सुरुवात सनई-चौघड्याच्या मंगल स्वरांनी होत असे.
ताफ्यात दोन सनईवादक, चौघडा, ताशा, ढोलकी आणि धोटा अशी वाद्ये असत. प्रत्येक वाद्याचा ठेका आणि सूर यांचा संगम ऐकताना वातावरण मंगलमय होऊन जात असे.
मंदोशीचा ताफा खेड, आंबेगाव आणि मावळ तालुक्यात विशेष प्रसिद्ध होता. नामदेव रोकडे यांच्या सनईचे सूर आणि कचर रोकडे व बबन आहिरे यांच्या ताशाची जुगलबंदी ऐकण्यासाठी यात्रांमध्ये मोठी गर्दी होत असे.
नायफडच्या मुक्ताबाई मंदिराजवळ बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या ताफ्यांच्या स्पर्धा हा त्या काळातील सांस्कृतिक सोहळाच असे. बैलांची मिरवणूक संपली की ताफे आपापले कौशल्य सादर करत. संध्याकाळपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक मोठ्या उत्साहाने जमत असत.
बेंजो पार्टीचा नवा जमाना
काळ पुढे सरकला आणि नव्या संगीताचा प्रवेश झाला.
सन १९९१ च्या सुमारास वांजळे व पाभे गावात प्रथमच बेंजो पार्टी आली. त्या काळात बुलबुल या वाद्याचे लोकांना प्रचंड आकर्षण होते. एका हातात ब्लेडसारख्या पट्टीने तारा छेडायच्या आणि दुसऱ्या हाताने बटणे दाबून सुरेल धून वाजवायची. ध्वनिवर्धकांमधून उमटणारा त्याचा स्वच्छ आवाज लोकांना मंत्रमुग्ध करून टाकत असे.
ताशा, ढोल, कच्ची आणि बुलबुल यांच्या साथीने मराठी आणि हिंदी चित्रपटांतील गाणी वाजू लागली. बेंजो पार्टीशिवाय लग्न अपूर्ण वाटू लागले. गावागावांत बेंजोच्या सुरांनी नवीन उत्साह निर्माण झाला.
डी.जे.चे युग आणि बदलते वास्तव
पुढे बेंजोचाही काळ मागे पडला आणि डी.जे. संस्कृती आली.
प्रचंड आवाज, रंगीबेरंगी प्रकाशयोजना आणि आधुनिक गाण्यांच्या तालावर नाचणारी वरात हे आजचे वास्तव बनले. या बदलामुळे पारंपरिक ताफे, सनई-चौघडे, बेंजो आणि अनेक लोककलांना मागे पडावे लागले.
समाजही बदलला. लग्नसमारंभ अधिक खर्चिक झाले. पारंपरिक गाणी कमी झाली आणि आधुनिक गाण्यांनी त्यांची जागा घेतली. काही ठिकाणी या बदलांसोबत अतिरेकही दिसू लागला.
तरीही हेही वास्तव आहे की प्रत्येक काळ आपली नवी संस्कृती घडवत असतो. म्हणून बदल स्वीकारताना परंपरेचे जतन करणेही तितकेच आवश्यक आहे.
ग्रामीण भागातील कला ही केवळ मनोरंजनाची साधने नव्हती. त्या आपल्या संस्कृतीच्या श्वासात मिसळलेल्या होत्या. भजनातून भक्ती, भारुडातून समाजप्रबोधन, लेझीममधून शिस्त, तमाशातून अभिनय, सनईतून मंगलता आणि दिंडीतून समतेचा संदेश पिढ्यान्पिढ्या दिला गेला.
आज या परंपरांपैकी अनेक कला लोप पावत आहेत. अनेक गुणी कलाकार काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या कलेची आठवण आता फक्त ज्येष्ठांच्या स्मरणात उरली आहे. जर आपण आज त्यांचे कार्य शब्दबद्ध केले नाही, तर उद्याच्या पिढीला या सांस्कृतिक वैभवाची ओळखही होणार नाही.
लोककला जपणे म्हणजे केवळ भूतकाळ जपणे नव्हे; तर आपल्या मातीची ओळख, आपल्या पूर्वजांचे श्रम, त्यांची सर्जनशीलता आणि आपल्या संस्कृतीचा आत्मा जपणे होय.
आज आधुनिक तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे; परंतु माणूस माणसापासून दूर जात आहे. पूर्वी भजनाच्या एका रात्रीत जितका संवाद व्हायचा, तितका कदाचित आज अनेक दिवसांतही होत नाही. म्हणूनच आधुनिकतेचा स्वीकार करत असतानाच आपल्या लोककलेची परंपरा जिवंत ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
कारण ज्या समाजाला आपल्या कलेचा इतिहास आठवतो, तो समाजच आपल्या भविष्याची समृद्ध वाट घडवू शकतो.
आज गाव बदलले आहे. घरांची रचना बदलली, जीवनाची गती बदलली, मनोरंजनाची साधने बदलली. कंदिलाची जागा विजेने घेतली, रेडिओची जागा मोबाईलने घेतली आणि भजनाच्या रात्रींची जागा अनेकदा डिजिटल मनोरंजनाने घेतली. पण प्रश्न एवढाच आहे या बदलांच्या प्रवाहात आपण आपल्या सांस्कृतिक स्मृतीही गमावणार आहोत का?
कारण एखादी कला संपते तेव्हा केवळ एक कार्यक्रम संपत नाही; त्या कलेसोबत एक पिढी, तिच्या आठवणी, तिची भाषा, तिची अभिव्यक्ती आणि तिचे जगण्याचे तत्त्वज्ञानही हळूहळू अदृश्य होते.
म्हणूनच कासमभाईंच्या ताशाचा ठेका, दगडू भराडींच्या डमरूचा नाद, बापू गायकवाडांच्या डफाची थाप, विठू नांगरे यांच्या नृत्याची आठवण, भजनातील टाळ-चिपळ्यांचा आवाज, सनई-चौघड्याचे मंगल सूर आणि पहाटेच्या चहातील आपुलकी हे सर्व जतन करणे गरजेचे आहे.
ही केवळ जुन्या काळाची आठवण नाही. हा आपल्या मातीचा सांस्कृतिक इतिहास आहे. इतिहास केवळ राजे-महाराजे, युद्धे आणि राजवटींचा नसतो. तो सामान्य माणसाच्या जगण्यातही दडलेला असतो. गावातील कलाकारांनी आपल्या कलेतून जो आनंद दिला, समाजाला जोडले आणि संस्कृतीची ज्योत तेवत ठेवली, तोही आपल्या इतिहासाचा तितकाच महत्त्वाचा भाग आहे.
लोककला जपणे म्हणजे भूतकाळात अडकून राहणे नव्हे; तर आपल्या मुळांची जाणीव ठेवून भविष्याकडे पाहणे होय.
आणि म्हणूनच गाव बदलले तरी गावाची संस्कृती विसरता कामा नये. काळ बदलला तरी कलेचा आत्मा हरवता कामा नये. आणि आधुनिकता आली म्हणून आपल्या मातीचा आवाज शांत होता कामा नये. कारण ज्या समाजाला आपल्या कलेची आठवण असते, तो समाज आपल्या मुळांशी जोडलेला राहतो; आणि ज्याला आपल्या मुळांची जाणीव असते, तोच समाज भविष्य अधिक समृद्धपणे घडवू शकतो.
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)
.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा