Translate

गावाकडचे दिवाळीचे दिवस

वरसूबाईचा वार (यात्रा)

ग्रामीण भागात ऐन दिवाळीच्या दिवसांत सुगीला सुरुवात व्हायची. सुगी म्हणजे भाताची काढणी. आमच्या भागात भात काढणीच्या कामाला 'येटाळणी' असे म्हणतात. शेतात भात कापण्याची, बांधून त्याच्या पेंढ्या करण्याची आणि खळ्यावर आणण्याची धांदल सुरू असायची. घरातील लहान-मोठी माणसे या कामात गुंतलेली असायची. तरीही दिवाळीची मजा काही औरच असायची. दिवाळी म्हटले की सर्वांचे लक्ष फराळापेक्षा फटाक्यांकडेच अधिक असायचे.

आश्विन महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी तळेघर गावची वरसूबाईची यात्रा म्हणजेच 'वार' असायचा. आजही हा वार भरतो. परंतु त्या काळात या वाराची मजा काही वेगळीच होती. वरसूबाईच्या वाराची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत असायचो. या दिवशी विविध प्रकारच्या फटाक्यांची आणि खेळण्यांची दुकाने सजलेली असायची. घरातून दिवाळीच्या फटाक्यांसाठी वेगळे पैसे मिळत नसल्यामुळे आमचे एकच ब्रीदवाक्य असायचे, 'स्वावलंबन हेच आमचे ब्रीदवाक्य!' त्यासाठी आम्ही महिनाभर आधीपासूनच तयारीला लागायचो.

अनायसे दिवाळीची सुट्टी लागलेली असायची. सकाळी क्रिकेट खेळायचे, त्यानंतर ओढ्यावर किंवा विहिरीवर मनसोक्त पोहायचे आणि दुपारी जंगलात जाऊन हिरडे गोळा करायचे, हा आमचा दिनक्रम असायचा. हिरडा हे झाडाला येणारे एक फळ आहे. त्याचा उपयोग प्रामुख्याने रंग तयार करण्यासाठी तसेच कातडी कमावण्याच्या कामात केला जातो. दररोज जंगलात जाऊन हिरडे गोळा करायचे, घरी आणून वाळवायचे आणि वाळवून तयार झाल्यावर  वरसूबाईच्या तळेघरच्या वाराला विक्रीसाठी घेऊन जायचे, असा आमचा बेत असायचा.

प्रत्येकाकडे हिरड्याचे पंचवीस ते तीस किलोचे ओझे जमा झालेले असायचे. एवढे ओझे डोक्यावर घेऊन घाट चढायचा, याची आम्हाला कल्पना असायची. तरीही फटाके खरेदी करण्याच्या उत्साहापुढे त्या कष्टांची जाणीव फारशी व्हायची नाही. गावातील मुले-मुली एकमेकांच्या सोबतीने घोळक्याने हिरडे विकायला निघायची.

वाराच्या दिवशी सकाळी लवकरच उठून आम्ही एकमेकांबरोबर ओढ्यावर आंघोळीला जायचो. यथेच्छ पोहून झाल्यावर घरी यायचे. घरात जे काही उपलब्ध असेल ते जेवायचे आणि डोक्यावर हिरड्याचे ओझे घेऊन तळेघरच्या दिशेने मार्गस्थ व्हायचे. मनात एकच विचार असायचा, आज हिरडे विकायचे आणि मिळालेल्या पैशांतून मनसोक्त फटाके खरेदी करायचे!

गावातून बाहेर पडताच घाटाला सुरुवात व्हायची. मंदोशी ते सोमाना आणि सोमाना ते बोरीचा धस असे दोन नीटस, चढणीचे घाट पार करावे लागायचे. हे घाट चढताना अक्षरशः कसरत व्हायची. बोरीचा धस चढून गेल्यानंतर माचीमध्ये साधारण अर्धा किलोमीटरचा धोपट कच्चा रस्ता असायचा. माची म्हणजे दोन डोंगरांच्या मधली विस्तीर्ण सपाट जागा. तिथे पोहोचल्यानंतर आम्ही हिरड्यांची ओझी खाली उतरवायचो. थोडा वेळ विसावा घ्यायचा, घाम पुसायचा आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची.

पाच-सहा किलोमीटरचा हा घाट चढताना अपार कष्ट व्हायचे. हिवाळ्याचे दिवस असले तरी अंगातून घामाच्या धारा वाहू लागायच्या. घामाने अंग आणि कपडे पूर्ण भिजून जायचे. डोक्यावरचे ओझे सांभाळत, पायाखालची दगडधोंड्यांची वाट पाहत आम्ही हळूहळू पुढे सरकत राहायचो. कधी एखाद्या मित्राला दम लागला तर सगळे थांबायचे. थोडा वेळ विश्रांती घ्यायची आणि पुन्हा एकमेकांच्या सोबतीने चालायला सुरुवात करायची.

घाट चढून वर माळरानावर पोहोचलो की थंडगार वारा अंगाला झोंबू लागायचा. काही वेळापूर्वी अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा क्षणात कुठल्या कुठे गायब व्हायच्या! डोंगरमाथ्यावरचा तो गार वारा आणि समोर दिसणारे विस्तीर्ण माळरान मनाला एक वेगळाच आनंद देऊन जायचे. जवळच्याच एखाद्या झाडाखाली हिरड्यांची ओझी उतरवायची आणि घटकाभर विसावा घ्यायचा. पण मन मात्र वरसूबाईच्या वाराकडेच लागलेले असायचे.

पाच-दहा मिनिटे विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा हिरड्यांची ओझी डोक्यावर घ्यायची आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. माचीतून पुढे गेल्यावर भूमीर, धायटावनं, नाऱ्याचामाळ अशी ठिकाणे पार करत आम्ही मुख्य माळरानावर दाखल व्हायचो.

दूरवरूनच शंकर उगले यांचा हिरड्यांचा मोठा फड दिसू लागायचा. तो दिसला की मन अगदी हरखून जायचे. आता आपला प्रवास संपणार आणि हिरडे विकून पैसे हातात पडणार, याचा आनंद व्हायचा. आम्ही ओझी डोक्यावर घेऊन शंकर उगले यांच्या फडावर दाखल व्हायचो.

सबंध माळरानावर नजर टाकली की जिकडे पाहावे तिकडे हिरडे वाळत घातलेले दिसायचे. कुठे हिरड्यांचे ढीग, कुठे त्यांची प्रतवारी सुरू असलेली, तर कुठे व्यापाऱ्यांकडून खरेदी-विक्रीची लगबग सुरू असायची. आमच्याच गावातील दाजी गवारी हे हिरडे खरेदी करण्यासाठी तिथे असायचे.

हिरड्यांचे वेगवेगळ्या प्रकारांनुसार वर्गीकरण केले जायचे. पिवळा जर्द रंगाचा हिरडा म्हणजे 'कळी'. या हिरड्याला सर्वाधिक भाव मिळायचा. त्यानंतर सब्रास नंबर एक, सब्रास नंबर दोन आणि सब्रास नंबर तीन अशा वेगवेगळ्या प्रती असायच्या. प्रत्येक प्रतीनुसार हिरड्याचा भाव ठरायचा.

आमच्या हिरड्यांची प्रतवारी करून त्यांचे वजन केले जायचे. त्यानुसार कुणाला पन्नास, कुणाला तीस, तर कुणाला चाळीस रुपये मिळायचे. आजच्या काळात या रकमेला फारसे महत्त्व वाटणार नाही; पण त्या वेळी आमच्यासाठी ते पैसे म्हणजे मोठी कमाई असायची. विशेष म्हणजे ही कमाई आम्ही स्वतःच्या कष्टातून मिळवलेली असायची.

एक, दोन, पाच आणि दहा रुपयांच्या नोटा हातात पडल्या की मन आनंदाने मोरासारखे थुई थुई नाचू लागायचे. त्या नोटा पुन्हा पुन्हा मोजायच्या, खिशात जपून ठेवायच्या आणि आता कोणते फटाके घ्यायचे, याचे मनातल्या मनात नियोजन सुरू व्हायचे. आमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असायचा. हिरडे विकून मिळालेल्या पैशांमुळे आम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास मिळायचा. स्वतःच्या कष्टातून मिळवलेल्या पैशांची किंमत काय असते, हे कदाचित त्याच वयात आम्ही शिकलो.

आता मात्र ओढ लागलेली असायची ती वरसूबाईच्या दर्शनाची आणि फटाक्यांच्या खरेदीची!

तळेघरच्या अलीकडे वरसूबाईचा डोंगर चढून वर गेल्यावर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा फटाक्यांची दुकाने सजलेली असायची. विविध रंगांचे फटाके, खेळणी, मुलींसाठी सौंदर्यप्रसाधने आणि लहान-मोठ्या वस्तूंनी दुकाने गजबजलेली असायची. मात्र खरेदी करण्याआधी आम्ही सर्वप्रथम वरसूबाई मातेच्या दर्शनासाठी मंदिरात जायचो.

मंदिराच्या प्रवेशद्वारात भाविकांची प्रचंड गर्दी असायची. मांडव आंब्याच्या आणि जांभळाच्या डहाळ्यांनी सजवलेला असायचा. मांडवात भजनांचा कार्यक्रम सुरू असायचा. कुणी टाळ-मृदंगाच्या तालावर भजन म्हणत असायचे, तर कुणी भक्तिभावाने देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे असायचे. सगळीकडे भक्तिमय वातावरण असायचे.

काही गावांतील लोक त्यांच्या गावातून भगव्या कापडात गुंडाळलेली साठ ते सत्तर फूट उंचीची काठी घेऊन यायचे. ती काठी हातात धरून नाचवत वरसूबाईच्या मंदिराच्या दिशेने आणली जायची. ही काठी पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमायची. काठी नाचवण्याचा तो देखणा प्रकार पाहताना आम्हाला मोठी गंमत वाटायची. एवढी उंच काठी लोक कशी काय सांभाळतात, याचेही कुतूहल वाटायचे.

त्या गर्दीतून वाट काढत आम्ही मंदिरात प्रवेश करायचो आणि वरसूबाई मातेचे दर्शन घ्यायचो. मंदिरात भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर नारळ फोडले जायचे. नारळ फोडल्यानंतर मिळणारी शेरणी म्हणजे ओल्या खोबऱ्याचे तुकडे आणि गुळाचा प्रसाद घेऊन आम्ही मंदिराबाहेर पडायचो. तो प्रसाद खाण्यातही एक वेगळीच मजा असायची.

आता खरी वेळ असायची ती खरेदीची!

मंदिराच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फटाक्यांच्या दुकानांमध्ये आम्ही मनसोक्त खरेदी करायचो. लक्ष्मी, सुतळी, चिंगळ्या, लवंगी, फुलबाजे, भुईचक्रे, भुईनळे म्हणजेच पाऊस, अग्निबाण, सापाच्या गोळ्या, आगीनगाडी, टिकल्यांच्या डब्या, टिकल्या वाजवायची पिस्तुले, असे कितीतरी प्रकारचे फटाके आणि साहित्य उपलब्ध असायचे.

फटाक्यांचे डबे, पुड्या आणि रंगीबेरंगी वेष्टनांनी दुकाने अगदी भरून गेलेली असायची. कोणत्या फटाक्याची किती किंमत आहे, कोणता फटाका जास्त आवाज करतो आणि कोणता जास्त वेळ चालतो, याची आम्ही दुकानदाराकडे चौकशी करायचो. प्रत्येकाला आपल्याला जास्तीत जास्त फटाके मिळावेत, असे वाटायचे. खिशात असलेल्या पैशांचा हिशेब करून पुन्हा पुन्हा खरेदी करायची.

विशेष म्हणजे पाच-दहा-पन्नास रुपयांतही भरपूर प्रकारचे फटाके खरेदी करता येत असत. आजच्या काळात एवढ्या पैशांत काय मिळेल, याची कल्पनाही करता येणार नाही. त्या वेळी मात्र या छोट्याशा रकमेत आमची दिवाळीची संपूर्ण तयारी व्हायची. आम्ही खरेदी केलेले फटाके दिवाळी संपल्यानंतरही अनेक दिवस पुरायचे.

आमच्याबरोबर गावातील काही मुलीही या वाराला आलेल्या असायच्या. त्यांच्यासाठीही ही यात्रा म्हणजे खरेदीची मोठी संधी असायची. त्या पावडर, स्नो, नेलपॉलिश, रिबिनी, टिकल्या, बांगड्या, गळ्यातील माळा अशा विविध वस्तूंची खरेदी करायच्या. प्रत्येक जण आपापल्या आवडीच्या वस्तू निवडण्यात मग्न असायचा. मुलांच्या हातात फटाक्यांच्या पिशव्या, तर मुलींच्या हातात त्यांच्या आवडीच्या वस्तूंच्या पिशव्या असायच्या. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओसंडून वाहत असायचा.

सर्व प्रकारची खरेदी झाल्यावर आमचा मोर्चा वळायचा तो लिंबाशेठ यांच्या हॉटेलकडे. दिवसभराच्या प्रवासाने भूकही चांगलीच लागलेली असायची. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर मिसळवर आम्ही मनसोक्त ताव मारायचो. त्या वेळची गरमागरम मिसळ आणि त्याची चव आजही जिभेवर रेंगाळते. पोटभर खाऊन झाल्यावर पुन्हा घरच्या दिशेने आमचा प्रवास सुरू व्हायचा.

मात्र परतीचा प्रवासही तितकाच आनंददायी असायचा. कारण आता आमच्या हातात फटाक्यांच्या पिशव्या असायच्या आणि मनात दिवाळीच्या आतुरतेचे असंख्य विचार!

घरी परतताना सोमाना येथील कनाळावर, म्हणजे डोंगराच्या उंच टोकाच्या भागावर, आम्ही थोडा वेळ थांबायचो. तिथून सभोवतालचा निसर्ग अतिशय सुंदर दिसायचा. सूर्य मावळतीकडे झुकलेला असायचा. आकाशात सूर्याची तांबूस किरणे एका विशिष्ट रेषेत पसरलेली असायची. त्या मावळत्या सूर्यप्रकाशात डोंगररांगा आणि माळरान वेगळ्याच रंगात न्हाऊन निघालेले असायचे.

अशा वेळी आमच्याकडील अग्निबाण पेटवून आकाशात सोडण्याचा मोह आम्हाला आवरायचा नाही. आकाशात झेपावणाऱ्या त्या अग्निबाणावर मावळत्या सूर्याची तांबूस किरणे पडली की एक वेगळेच दृश्य निर्माण व्हायचे. निसर्गाने रंगवलेल्या त्या आकाशात आमच्या अग्निबाणांची भर पडायची. त्या क्षणाचा आनंद शब्दांत सांगणे कठीण आहे.

काही जण तर तिथेच खडकावर टिकल्यांची अखंड डबी ठेवून तिच्यावर दगड आपटायचे. त्यातून प्रचंड मोठा आवाज व्हायचा. जवळपासच्या झाडांवर बसलेली पाखरे घाबरून भुर्रकन उडून जायची. आम्हाला मात्र त्या आवाजात आणि फटाक्यांच्या धमाक्यात एक वेगळाच आनंद मिळायचा. अशा छोट्या छोट्या गोष्टींतून आमचा आनंद ओसंडून वाहत असायचा.

हे सगळे उद्योग आटोपेपर्यंत संध्याकाळ सरून अंधार पडायला सुरुवात झालेली असायची. मग हातात फटाक्यांच्या पिशव्या घेऊन आम्ही घरच्या दिशेने निघायचो. दिवसभराच्या प्रवासाने पाय थकलेले असायचे, डोक्यावरचे ओझे उतरलेले असायचे; पण मन मात्र आनंदाने भरलेले असायचे.

घरी पोहोचेपर्यंत अंधार पडलेला असायचा. घरातील लहान भावंडे मात्र आमची डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत बसलेली असायची. आम्ही घरी पोहोचताच त्यांची पहिली नजर आमच्या हातातील पिशव्यांकडे जायची. आता त्यात कोणते फटाके आहेत, काय काय आणले आहे, याची त्यांना उत्सुकता असायची. मग आम्ही आणलेल्या फटाक्यांची पिशवी उघडून सगळ्यांना दाखवायचो. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद पाहून आमचाही आनंद द्विगुणित व्हायचा.

आज मागे वळून पाहताना जाणवते की त्या काळात आमच्याकडे पैसा कमी होता, साधनसुविधा कमी होत्या; पण आनंद मात्र भरपूर होता. आजच्या मुलांना सहज उपलब्ध होणाऱ्या अनेक गोष्टी मिळवण्यासाठी आम्हाला कष्ट करावे लागायचे. जंगलात जाऊन हिरडे गोळा करणे, ते वाळवणे, डोक्यावर ओझे घेऊन पाच-सहा किलोमीटरचा घाट चढणे आणि त्यातून मिळालेल्या पैशांतून स्वतःच्या आवडीच्या वस्तू खरेदी करणे, हा आमच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता.

त्या प्रवासात आम्ही केवळ फटाके खरेदी करत नव्हतो, तर नकळत कष्टाची किंमत, पैशाचे महत्त्व, स्वावलंबन, मित्रांची साथ आणि आनंद मिळवण्याची कला शिकत होतो.

आज दिवाळी आली की बाजारपेठा आकर्षक विद्युत रोषणाईने उजळतात. ऑनलाइन खरेदी होते, महागड्या वस्तू घरपोच मिळतात. मनोरंजनाची साधनेही वाढली आहेत. परंतु त्या काळातील वरसूबाईच्या वाराची ओढ, हिरड्यांची ओझी घेऊन केलेला डोंगरदऱ्यांचा प्रवास, माळरानावरचा गार वारा, हातात पडलेल्या नोटांचा आनंद, फटाक्यांच्या दुकानांतील लगबग आणि लिंबाशेठ यांच्या हॉटेलातील मिसळ, या आठवणींची सर कशालाच येणार नाही.

आता ती जंगलातील हिरडे गोळा करणारी बालपणीची टोळी कुठे असेल, कोण कुठे असेल, याचीही कल्पना नाही. काळ बदलला, माणसे बदलली, गावातील जीवनशैली बदलली; पण मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेल्या त्या आठवणी मात्र आजही ताज्याच आहेत.

खरंच, त्या काळात दिवाळी केवळ सण नव्हता, तर ती आमच्यासाठी कष्टातून मिळवलेल्या आनंदाची एक सुंदर पर्वणी होती!

क्रमश:

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खेड तालुका पश्चिम भागाचे लोकनेते : दिगंबर मुऱ्हे

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकारणात ज्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिगंबर (दिनकर) धोंडीबा मुऱ्हे.  साडेस...