रस्त्याने किंवा पायवाटेने एखादा माणूस समोरून येताना दिसला, तर जरी त्याची ओळख नसली तरी त्याला रामराम घालण्याची पद्धत होती.
"राम राम पाहुणं, कोणत्या गावचं म्हणायचं?"
"राम राम! आम्ही शिरगावचं. चाललोय मंदोशीला. तिथं अमुक अमुक माणसाकडे बैल आहे विकायला. तिथं थांगा लागलाय म्हणून चाललोय."
"हा... तिथं अमुक अमुक माणसाकडे बैल हाय बरं का! औताला एकदम ताटम हाय." चार दोन पैकं गेलं तरी चालतील पण तुम्ही तो बैल घ्याच बर का.. असा प्रेमळ सल्ला सुद्धा दिला जात असे.
अशा प्रकारचे संभाषण सुरू असताना अचानक दोघांपैकी एक जण आपला बटवा काढायचा. बटव्यातून चिमूटभर तंबाखू समोरच्या पाहुण्याला द्यायचा आणि स्वतःही तळहातावर तंबाखू घ्यायचा. चुन्याचे आदानप्रदान व्हायचे. मग तंबाखूचा बार तोंडात टाकून रस्त्यावरच किंवा पायवाटेवर गप्पा सुरू व्हायच्या.
तेव्हा माणसाला ओळखपाळख असण्याची गरज नसायची. अनोळखी माणसासोबतही सहज मैत्री व्हायची. परंतु सुरुवात मात्र राम राम व्हायची.
आता मात्र लोक रस्त्याने पायी चालत नाहीत. सायकल तर केव्हाच मागे पडली. प्रत्येकाकडे मोटारसायकली आल्या. काही जणांकडे चारचाकी गाड्याही आल्या. गावोगावी, वाड्यावस्त्यांमधून डांबरी रस्ते झाले. काही ठिकाणी सिमेंटचे पक्के रस्ते झाले. त्यामुळे पायवाटा केव्हाच लुप्त झाल्या. आजकाल पायवाटेने कोणी जात नाही. रस्त्याने कधीतरी एखादा माणूस पायी जाताना दिसतो, एवढाच काय तो फरक!
पायवाटेने चालतानाची मजा मात्र काही औरच होती. रस्त्याने किंवा पायवाटेने रमत गमत चालताना गप्पा मारत जाण्याचा आनंद वेगळाच असायचा. वाटेत येता-जाता ओळखीचे किंवा अनोळखी असे अनेक लोक भेटायचे. ख्यालीखुशाली विचारायचे. ओळखीपाळखी व्हायच्या. लांबचा प्रवास असेल, तर जवळच असलेल्या शेतावर आंब्याच्या गर्द छायेत, विहिरीजवळ सोबत फडक्यात आणलेली भाकरी आणि लसणाची चटणी बसून खायची. विहिरीचे थंडगार पाणी प्यायचे आणि तिथेच आंब्याच्या झाडाखाली थोडा वेळ विसावा घ्यायचा.
कधीकधी विहिरीजवळ आंब्याच्या झाडाखाली भाकरी खात असताना मोट चालू असायची. विहिरीतील पाणी बैलांच्या साहाय्याने पखालीतून वर उचलून पाटात सोडले जायचे. तिथून ते पाणी शिवारात पोहोचायचे. सगळीकडे हिरवीगार पिके पाहून डोळे सुखावायचे.
कधीकधी मोट हाकणारा शेतकरी आपली मोट थांबवून वाटसरूबरोबर घरच्या कारभारणीने आणलेले भाकरीचे गाठोडे सोडून जेवायला बसायचा. एकमेकांना भाजी-भाकरीचे आदानप्रदान व्हायचे. वाटसरू आणि शेतकरी यांच्यात जेवता जेवता गप्पा रंगायच्या. त्यानंतर वाटसरू आपल्या खिशातील अडकित्ता काढून त्यामध्ये सुपारी कातरून मोट हाकणाऱ्या शेतकऱ्याला द्यायचा. सुपारी खाऊन झाल्यावर तंबाखूचे आदानप्रदान व्हायचे. कधी कधी पानाचा विडाही तयार करून दिला जायचा. आणि तो खाताखाता गप्पांचा फड रंगायचा.
उन्हाची लाही कमी झाल्यावर मात्र वाटसरू आणि शेतकरी आपापल्या कामाला लागायचे. परंतु आता ना मोटा, ना बैल, ना पूर्वीसारखा शेतकरी, ना, मोट, ना,पाऊलवाट, ना वाटसरू... काहीच पाहायला मिळत नाही.
अशीच अवस्था आता खेडेगावांची झाली आहे. प्रत्येकाकडे तेव्हा म्हशी, गायी, बैल, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, चितड्या असायच्या. घरी दहा-बारा गुरेढोरे असायची. सकाळी आणि दुपारी जनावरे चारण्यासाठी घेऊन जायचं. गुरे रानामध्ये चरून झाल्यावर एखाद्या गर्द छायेच्या झाडाखाली रवंथ करत बसलेली असायची. शेजारीच गुरे चारणारी पोरेसुद्धा आपापल्या फडक्यातील भाकरी सोडून एकत्र जेवण करायची आणि गप्पागोष्टी करायची.
गुरे चारता चारता अनेक खेळ खेळले जायचे. त्यामधील लंगडी, लंगोरी, आट्यापाट्या, सूर पारंब्या असे अनेक खेळ खेळले जायचे. त्याशिवाय रानातील रानभाज्या तोडून आणायच्या. कंदमुळे खणून आणायची. झाडांवरील फळे, विशेषतः आंबे आणि जांभळे पाडताना एक वेगळीच मजा असायची. आंब्याच्या झाडाच्या शेंड्यावर असलेला पाड दगडाने पाडण्यासाठी अनेक जण आपापल्या पुढ्यात दगड घेऊन तयारच असायचे.
कधी कधी गुरांना नदीवर किंवा ओढ्यावर पाणी पाजण्यासाठी घेऊन जायचे. त्यांचे पाणी पिऊन झाल्यावर त्यांना स्वच्छ आंघोळ घातली जायची. अगदी घासून-पुसून! म्हशी तर डोहामध्ये ठाण मांडून तासन्तास बसायच्या. त्यांच्या उघड्या अंगावर बसून कावळे आणि बगळे किंवा इतर छोटे पक्षी छोटे कीटक गोचीड खाताना दिसायचे. त्यावेळी म्हशी मात्र शांत स्तितप्रज्ञपणे पडून असायच्या. जनावरांना आंघोळ घालून झाल्यावर पोरांनीही त्याच डोहामध्ये उतरून पोहायचे. अगदी देहभान विसरून!
बराच वेळ झाल्यावर एखादा माणूस दूरूनच ओरडायचा,
"अरे पोरांनो, किती वेळ पोहताय? निघा बाहेर, का येऊ तिकडे?"
त्यानंतर पोरं भानावर यायची आणि डोहाच्या बाहेर निघायची. आपापली गुरे घेऊन घरी जायची.
आता काळ बदलला. गाव सोडून लोक पोटापाण्यासाठी दूर शहरात जाऊन राहिले. गावाकडे म्हातारा-म्हातारी सोडली, तर ना कुणाकडे गोठा, ना जनावरे. नदी आणि ओढ्यांचे डोह तर केव्हाच आटले. नदी आणि ओढ्यांमध्ये आता गुडघाभर पाणीसुद्धा पाहायला मिळत नाही. गवताची राने लोकांनी विकली. आता सारे सुशिक्षित झाले. गुरे चारायला जाणारे कुणी दिसत नाही.
पावसाळा संपल्यावर हिवाळ्याचे दिवस सुरू व्हायचे. प्रत्येकाला आपल्या घरापुढील अंगण नीटनेटके असावे, असे वाटायचे. एखादा सुट्टीचा दिवस पाहून घरातील सर्व लहानथोर माणसे पाट्या घेऊन शेतातील मुरूम आणण्यासाठी जवळच्या ठिकाणी जायची. पाट्यांमधून मुरूम आणून तो अंगणात टाकायचा. चोपण्याने चोपायचा. त्यावर पाणी शिंपडायचे. पुन्हा मुरूम चोपायचा. त्यावर शेण आणि पाणी यांचा शेणकाला करून मुरूम टाकलेल्या ठिकाणी शिंपडायचा. पुन्हा चोपण्याने चोपायचा. यासाठी अंगणात तीन-चार लाकडी चोपण्या तयार असायच्या. दुपारनंतर अंगणात गप्पा मारायला आलेले लोकसुद्धा मुरूम चोपायला मदत करायचे.
त्यानंतर अंगणात मांडव घालण्यासाठी रानात जाऊन मेढी घेऊन यायची. वासे, फोकाट्या, आडवे लाकडी भाल असे साहित्य आणायचे. मांडव तयार करायचा. तो उसाच्या किंवा भोसाच्या पाचटाने शाकारायचा.
घराच्या या मांडवात दुपारनंतर गप्पांचा फड रंगायचा. ज्या कुणाकडे रेडिओ असेल, त्याच्या अंगणात संध्याकाळी रेडिओ ऐकण्यासाठी गर्दी व्हायची. तालेवार लोकांच्या घरी उन्हाळ्याच्या दिवसांत सत्यनारायणाच्या महापूजा होत असत. त्यावेळी जेवणाच्या पंगती अंगणातच बसायच्या. भात, आमटी आणि शाकभाजी असे जेवण असायचे. याच अंगणामधून स्त्रिया गोधड्या शिवताना दिसायच्या. लग्न सुद्धा मांडवतच होत असत. हाळी-lपाटी करणारे लोक मांडवतच आपला माल घेऊन विक्री करत असत. यामध्ये भाजीपाला, फळवाला, भांड्यावाला, सुकट बोंबील वाले, सुई, दाभन, दोरा विकणाऱ्या स्त्रिया, स्त्रियांची आभूषणे विकणारे लोक, गारेगारवाला असे विविध लोक अंगणामध्ये येऊनच सौदा करत असत. लग्नाची गाणी सुद्धा अंगणामध्येच म्हटली जात असत.
गावामध्ये पूर्वी शेताच्या बांधावरून किंवा शेतात जनावर घुसल्यामुळे भांडणे होत असत. कधी इतर किरकोळ कारणांवरूनही वाद व्हायचे. तेव्हा मग संध्याकाळी दोन्ही बाजूंकडून पाटलाच्या अंगणात बैठकीला बोलावण्याचे अवतण यायचे. प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुख पाटलाच्या दारात बैठकीला हजर असायचा.
पाटील दोन्ही बाजूंकडचे म्हणणे ऐकून घेत असत. त्यावर चार-पाच बुजुर्ग मंडळी चर्चा करत. शेताचे नुकसान झाले असेल, तर सुगीच्या दिवसांत काही धान्य नुकसानग्रस्त शेतकऱ्याला देण्याची शिक्षा ठरवली जायची. काही बाबतींत ज्याची चूक असे, त्याच्याकडून दंड घेतला जायचा. तो दंड मात्र भरावा लागे. त्यावेळी गावातली भांडणे गावातच मिटत असत.
आता परिस्थिती बदलली आहे. गावात पूर्वीसारखी माणसे राहिली नाहीत. लोक अंगणात बसत नाहीत. गोधडी हा प्रकारसुद्धा आता शेवटच्या घटका मोजत आहे. पूर्वीसारखे लोक आता अंगणात एकत्र बसत नाहीत. रेडिओ केव्हाच हद्दपार झाला. त्यामुळे रेडिओचा संबंध राहिलेला नाही. फेरीवाले सुद्धा आता येत नाहीत. अंगणात आता पूर्वीसारखे कोणतेही व्यवहार होत नाहीत. गावातली भांडणे अगदी किरकोळ असली, तरी ती गावात मिटवली जात नाहीत. पोलीस स्टेशन, फौजदारी आणि दिवाणी न्यायालयांपर्यंत वाद विकोपाला जातात. वकील आणि पोलीस यांच्यावर पैसे खर्च करूनही अनेकदा प्रश्न सुटत नाहीत.
त्यावेळी आपल्याकडे जे काही पाहुणे येत असत, त्यांना घरात जे काही उपलब्ध असेल ते देण्याची पद्धत होती. त्याला 'वानवळा' असे म्हटले जायचे. तांदूळ, मक्याची कणसे, भाजीपाला, रताळी, काकडी, वालाच्या, घेवड्याच्या, भुईमुगाच्या शेंगा, हरभऱ्याची भाजी, मेथी, पालक अशा प्रकारचा वानवळा दिला जायचा. ती ग्रामीण भागातील एक अतिशय सुंदर अशी पद्धत होती.
पाहुणा घरी आला की त्याला रिकाम्या हाताने पाठवायचे नाही, ही त्या काळातील माणसांची भावना होती. त्यामागे पैशाचा व्यवहार नव्हता, तर प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा होता.पाहुणा दारात आल्यावर त्याच्यासाठी लगेच तांब्याभर थंड पाणी आणि गुळाचा खडा पुढे केला जायचा. "पाण्याशिवाय पाहुणा आणि पानाशिवाय जेवण अपूर्ण" मानले जायचे. तो पाण्याचा तांब्या म्हणजे केवळ तृप्ती नसून आदरातिथ्य होते. आजच्या भाषेत सांगायचे झाले, तर तो ग्रामीण भागातील माणुसकीचा एक सुंदर व्यवहार होता.
आता वानवळ्याची ही पद्धतसुद्धा जवळजवळ अस्तित्वात राहिलेली नाही. सर्व व्यवहार पैशाभोवती फिरू लागले आहेत. लोक एकमेकांची किंमत पैशाने करू लागले आहेत. जग बदलले, जग जवळ आले; परंतु माणसे मात्र एकमेकांपासून दूर चालली आहेत.
पूर्वी माणसांकडे पैसा कमी होता, पण माणुसकी भरपूर होती. आज पैसा वाढला, सुखसोयी वाढल्या, प्रवास वेगवान झाला; पण माणसांमधील संवाद मात्र कमी झाला.
पूर्वी एखाद्या अनोळखी वाटसरूला रामराम घातला की तो आपला वाटायचा. आज शेजारी राहणाऱ्या माणसाचीसुद्धा अनेकदा ओळख नसते. पूर्वी पायवाटेवर थांबून दोन शब्द बोलले जायचे. आज मोबाईलवर शेकडो लोकांशी संपर्क असतो, पण शेजारच्या माणसाशी बोलायला वेळ नसतो.
पूर्वी अंगणात बसून गप्पा रंगायच्या, आज प्रत्येक जण आपल्या घरात आणि आपल्या मोबाईलमध्ये रमलेला असतो. पूर्वी एखाद्याच्या शेतात भाकरी खाल्ली जायची, आज हॉटेलमध्ये पैसे मोजून जेवण केले जाते. पूर्वी गावातील भांडणे गावातील बुजुर्ग मंडळी सोडवायची, आज त्याच भांडणांचे रूपांतर वर्षानुवर्षे चालणाऱ्या न्यायालयीन खटल्यांत होते.
काळ बदलणारच, बदलत्या काळानुसार माणसाने पुढे जाणेही गरजेचे आहे. रस्ते झाले, वाहने आली, आधुनिक तंत्रज्ञान आले, ही निश्चितच प्रगती आहे. पण या प्रगतीच्या प्रवासात आपण आपल्या जगण्यातील साधेपणा, आपुलकी आणि माणुसकी मागे तर सोडली नाही ना, असा प्रश्न मात्र प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.
कारण पायवाटा लुप्त झाल्या, हे काही फार मोठे दुःख नाही. त्या पायवाटांवरून चालताना माणसांना माणसांशी जोडणारे जे नाते होते, ते हरवले, हे मात्र खरे दुःख आहे.
कदाचित काही दिवसांनी पायवाटांचे अस्तित्व केवळ जुन्या आठवणींमध्येच उरेल. पण त्या पायवाटांवर भेटणारी माणसे, त्यांचे रामराम, तंबाखूचा बार, भाकरीचा घास, आंब्याच्या झाडाखालील विसावा आणि अंगणातील गप्पा यांची सर आजच्या आधुनिक सुखसोयींनाही येणार नाही.
शेवटी एवढेच वाटते की, विकासाच्या वाटेवर चालताना जुन्या पायवाटांवरील माणुसकी मात्र हरवू देऊ नये!
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा