खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील लोकप्रतिनिधींमध्ये नानाभाऊ भिकाजी कशाळे यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते.
मध्यम बांधा, धोतर, नेहरू आणि टोपी, साधी राहणी, जनसामान्यांशी जिव्हाळ्याचे नाते आणि विकासासाठी सातत्याने केलेले प्रयत्न यांमुळे त्यांनी आपल्या कार्याची वेगळी छाप उमटवली. त्यांनी गावाच्या आणि संपूर्ण परिसराच्या विकासासाठी आयुष्यभर अहोरात्र परिश्रम घेतले.जीवनपट
कै. नानाभाऊ भिकाजी कशाळे
शिक्षण
इयत्ता १ ली ते ४ थी : खडकवाडी, नायफड, ता. खेड, जि. पुणे.
इयत्ता ५ वी ते ७ वी : डेहणे, ता. खेड, जि. पुणे.
नोकरी
तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, लोकप्रतिनिधी म्हणून कार्य
संयुक्त ग्रामपंचायत डेहणे १५ वर्षे सरपंच.
जिल्हा परिषद सदस्य (स्थायी समिती) पुणे.
पुरस्कार व सन्मान
अभिनव शेतकरी व पीक स्पर्धा पुरस्कार, मा. पंतप्रधान श्री. राजीव गांधी यांच्या हस्ते, दिनांक २ ऑक्टोबर १९८६.
कै. आमदार कृष्णराव मुंढे भूषण पुरस्कार, आदिवासी शिक्षण संस्था, जुन्नर यांच्याकडून, दिनांक २६ नोव्हेंबर २००८.तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. शरदराव पवार यांच्या हस्ते आदर्श सरपंच पुरस्कार.
संस्थात्मक कार्य
डेहणे आदिवासी दूध उत्पादक संस्थेचे संस्थापक व चेअरमन.
आदर्श शेतीसाठी वाट्टेल ते
नानाभाऊ भिकाजी कशाळे यांचा जन्म सन १९३३ मध्ये झाला. त्याकाळी ग्रामीण भागात सर्वसामान्यांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही अत्यंत हलाखीची होती. मात्र प्रतिकूल परिस्थितीला न जुमानता त्यांनी शिक्षणाची वाट धरली. त्या काळातील व्हर्नाक्युलर फायनल (Vernacular Final) ही परीक्षा त्यांनी उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली, ही त्या काळात मोठी कामगिरी मानली जात असे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून, तर काही काळ शिक्षक, तलाठी व ग्रामसेवक म्हणून सेवा बजावली. मात्र नोकरीत त्यांचे मन रमले नाही. त्यांनी स्वेच्छेने नोकरीचा राजीनामा देत आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला आणि पूर्णवेळ शेतीकडे वळले. परिश्रम, दूरदृष्टी आणि आधुनिक विचारांच्या बळावर त्यांनी शेतीला नवे स्वरूप दिले.
सन १९७४ मध्ये त्यांनी स्वतःच्या शेतात विहीर बांधली. तसेच ओढ्यालगतच्या खडकाळ व ओबडधोबड जमिनीतुन जाणाऱ्या ओढ्यावर चिरेबंदी दगडी बांध घालून ती जमीन शेतीयोग्य बनवली. त्या काळात हे काम अत्यंत कष्टसाध्य आणि धाडसी मानले जात होते.
भातशेतीत त्यांनी जीर, रायभोग व खडक्या यांसारख्या अस्सल व दर्जेदार भाताच्या जातींची लागवड केली. या भाताला उत्तम बाजारपेठ मिळावी म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ऐतिहासिक बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडा येथील बाजारात स्वतः जाऊन व्यापाऱ्यांना तांदूळ विकत असत.
नव्वदच्या दशकात त्यांनी जिरायती शेतीचे रूपांतर बागायती शेतीत केले. त्यामुळे रब्बी हंगामात गहू आणि कांदा यांसारखी नगदी पिके घेण्यास सुरुवात झाली. यासाठी त्यांचा मुलगा सुरेश कशाळे यांनी त्यांना उत्तम प्रकारे साथ दिली. म्हणूनच त्यांच्या शेतीचे नंदनवन झाले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शेतीचे उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढले.
उत्तम शेती करत असताना त्यांनी जोडव्यावसाय म्हणुन संकरीत म्हशी व जर्सी गायी पाळल्या.आधुनिक गोठ्याची निर्मिती केली. डेहणे आदिवासी दुध संस्थेवर सर्वात जास्त दुध त्यांचे होते.
शेतीबरोबरच त्यांना समाजकारणाचीही मनापासून आवड होती. समाजाच्या विकासासाठी काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सन १९७३ मध्ये ते प्रथम ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर सन १९७८ ते १९९२ या सलग पंधरा वर्षांच्या कालावधीत त्यांनी डेहणे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून प्रभावी नेतृत्व केले. सन १९९२ ते १९९७ या कालावधीत ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यानंतर सन १९९९ मध्ये ते पुन्हा एकदा डेहणे गावचे सरपंच म्हणून निवडून आले.
नानाभाऊंना बैलगाडा शर्यतीची विशेष आवड होती. त्यांच्याकडे स्वतःचा बैलगाडा आणि चार सशक्त खिल्लारी बैल होते. बैलगाडा ही केवळ वाहतुकीची साधने नसून ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आहे, याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने डेहणे गावातील वार्षिक यात्रेत बैलगाडा शर्यतीचे आयोजन सुरू केले. त्यांच्या पुढाकारामुळे ही शर्यत पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली आणि गावच्या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरली.
नानाभाऊ भिकाजी कशाळे हे दूरदृष्टीचे शेतकरी, विकासाभिमुख लोकनेते आणि ग्रामीण संस्कृतीचे जतन करणारे समाजपुरुष होते. शेती, समाजकारण आणि ग्रामविकास या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते.
हेही वाचा :- 👉🏻समाजसेवेचा ध्यास : डॉक्टर राहुल जोशी
सरपंच म्हणून दहा वर्षांची उल्लेखनीय कारकीर्द
नानाभाऊ कशाळे यांनी सन १९७ ७ ते १९९२ या कालावधीत डेहणे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्य केले. या काळात त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवले. लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविणे, शासनाच्या योजना गावापर्यंत पोहोचविणे आणि गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे त्यांचे ध्येय होते.
पश्चिम भागातील माध्यमिक शिक्षणाचा पाया
त्या काळात खेड तालुक्याच्या पश्चिम भागात नायफड, डेहणे आणि टोकवडे या तीनच गावांमध्ये सातवीपर्यंत मराठी शाळा उपलब्ध होत्या. त्यामुळे परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असे.
डेहणे येथे लोहकरे गुरुजी यांच्या सहकार्याने नानाभाऊ भिकाजी कशाळे यांनी सोळसेवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृह सुरू करण्यास पुढाकार घेतला. या वसतिगृहामुळे दूरवरच्या दुर्गम वाड्या-वस्त्यांतील विद्यार्थ्यांना राहण्याची सोय उपलब्ध झाली आणि अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी संधी मिळाली.
सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहत असे. अनेकांची शिक्षणाची वाटचाल तेथेच थांबत असे, तर काहींना अनेक किलोमीटर दूर असलेल्या वाडा गावात जाऊन आठवीत प्रवेश घ्यावा लागत असे. आर्थिक परिस्थिती, प्रवासाची गैरसोय आणि इतर अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागे.
सन १९७७–७८ च्या सुमारास जुन्नर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार कृष्णराव मुंडे हे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात माध्यमिक शाळा सुरू करण्याच्या विचारात असल्याची माहिती नानाभाऊ कशाळे यांना मिळाली. ही संधी साधत नानाभाऊ कशाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार कृष्णराव मुंढे साहेबांची भेट घेऊन डेहणे येथे आठवीचा वर्ग सुरू करण्यासाठी आग्रह धरला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आणि अखेर सन १९७९ मध्ये डेहणे येथे आठवीचा पहिला वर्ग सुरू झाला. हा दिवस पश्चिम भागाच्या शैक्षणिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरला.
सुरुवातीला शाळेची स्वतंत्र इमारत नसल्यामुळे आठवीचा वर्ग जानोबा मंदिरात भरत असे. पुढील वर्षी नववीचा वर्ग सुरू झाला; मात्र जागेअभावी हा वर्ग अक्षरशः एका जनावरांच्या गोठ्यात भरवावा लागत होता. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षणाची ज्योत तेवत ठेवत होते.
ही परिस्थिती पाहून डेहणे आणि परिसरातील ग्रामस्थांनी नवीन शाळेची इमारत उभारण्याचा निर्धार केला. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील गरीबातल्या गरीब कुटुंबांनीही आपल्या कुवतीनुसार वर्गणी देऊन शाळा बांधकामासाठी आर्थिक मदत केली.
पश्चिम भागातील डेअरीला दूध घालणाऱ्या गवळ्यांनी त्यांच्या दुधाचा एक महिन्याचा पगार शाळा बांधकामासाठी दिला.
शाळेसाठी निधी उभारण्यासाठी प्रसिद्ध तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा तमाशाही आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमातून मिळालेला नफा शाळेच्या इमारतीसाठी खर्च करण्यात आला. लोकसहभागातून उभी राहिलेली ही शाळा ग्रामीण एकतेचे आणि शिक्षणावरील प्रेमाचे जिवंत प्रतीक ठरली.
या माध्यमिक शाळेतून पश्चिम भागातील असंख्य मुला-मुलींनी शिक्षण घेतले. पुढे त्यांच्यापैकी अनेक जण अधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक, व्यावसायिक, उद्योजक तसेच विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तिमत्त्वे म्हणून घडले. अनेकांनी देशातील विविध शहरांत नोकरी आणि व्यवसायात यश मिळवले.
आज या परिसरातील शैक्षणिक प्रगतीचा भक्कम पाया घालण्याचे श्रेय नानाभाऊ भिकाजी कशाळे, त्यांच्या सहकाऱ्यांना आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थांना मोठ्या अभिमानाने दिले जाते.
डेहणे यात्रेचे यशस्वी नियोजन
डेहणे हे पंचक्रोशीतील सर्वांत मोठे गाव आणि खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्त्वाचे केंद्र असल्यामुळे येथे दरवर्षी मोठी यात्रा भरत असे. या यात्रेचे संपूर्ण नियोजन, व्यवस्थापन आणि विविध समित्यांचे समन्वयाचे काम नानाभाऊ कशाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने होत असे. त्यामुळे डेहणे यात्रेची ख्याती संपूर्ण परिसरात होती.
बैलगाडा घाटाची दुरुस्ती
ग्रामीण संस्कृतीतील बैलगाडा शर्यतींचे महत्त्व ओळखून नानाभाऊ कशाळे यांनी डेहणे येथील ओबडधोबड आणि धोकादायक झालेला बैलगाडा घाट ग्रामस्थांच्या माध्यमातून दुरुस्त करून घेतला. त्यामुळे शर्यती अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित होऊ लागल्या.
नानाभाऊ कशाळे यांची दूरदर्शनवरील मुलाखत :
सन १९८९ च्या मार्च महिन्यात एक विशेष घटना घडली. नानाभाऊ कशाळे यांची पूर्वीच्या दूरदर्शन व आताच्या सह्याद्री वाहिनीवर मुलाखत घेण्यात येणार असल्याचे पत्र आले. मुलाखतीचा विषय होता '"ग्रामीण भागातील शेती समस्या." ही बातमी समजताच संपूर्ण डेहणे गावाला आश्चर्याचा धक्का बसला.
त्यांची दूरदर्शनवर जी मुलाखत होणार होती ती मुलाखत नेमकी डेहणे गावच्या यात्रेच्या दिवशी होती. ही मुलाखत 1989 एप्रिल महिन्यात प्रसारित झाली त्या काळात शिरगाव आणि डेहणे येथे ग्रामपंचायत T V होते. त्याशिवाय भागातील ठराविक दोन-चार लोकांकडेच T V होते. ही मुलाखत पाहायला भागातील लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
१९९२ ची गाजलेली जिल्हा परिषद निवडणूक
सन १९९२ मध्ये पुणे जिल्हा परिषद सदस्यपदाच्या निवडणुकीत नानाभाऊ कशाळे यांना इंदिरा काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली. त्यांचे निवडणूक चिन्ह हाताचा पंजा होते.
त्यांच्याविरुद्ध तत्कालीन पंचायत समिती खेड (राजगुरूनगर) चे सभापती कै. विठ्ठल धोंडिबा आंबेकर हे उमेदवार होते. त्यांचे निवडणूक चिन्ह उगवता सूर्य होते.
ही निवडणूक संपूर्ण परिसरात अत्यंत गाजली. डेहणे गावातील ग्रामस्थांनी तन, मन आणि धनाने प्रचारात सहभाग घेतला. त्या काळात कार्यकर्ते कोणत्याही मोठ्या अपेक्षेशिवाय केवळ भेळ खाऊन दिवसभर प्रचार करत असत. त्या काळातील निस्वार्थी राजकारणाचे हे जिवंत उदाहरण मानले जाते.
जनतेच्या प्रचंड पाठिंब्यामुळे नानाभाऊ कशाळे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि सन १९९२ ते १९९७ या कालावधीत पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. ते विजयी झाल्यावर त्यांचे डेहणे गावात बैलगाडी मधून काढलेली मिरवणूक अद्यापही स्मरणात आहे.
विकासकामांचा सुवर्णकाळ
जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी पश्चिम भागाच्या विकासाला मोठी गती दिली.
डेहणे येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA) मार्फत बाजारगाळे उभारले.
टोकावडे आणि धामणगाव येथे पशुवैद्यकीय दवाखाने मंजूर करून ते कार्यान्वित केले.
मोरोशी, नायफड, टोकावडे आणि आव्हाट येथे जिल्हा परिषद केंद्रशाळा मंजूर करून शिक्षणाचा विस्तार केला.
मंदोशी येथे जिल्हा परिषदेमार्फत बंधारा बांधण्यात आला.
गावात प्रथमच बंदिस्त गटार योजना
ग्रामीण स्वच्छतेचे महत्त्व ओळखून सन १९९५ मध्ये डेहणे गावात प्रथमच बंदिस्त गटार योजना राबविण्यात आली. त्या काळात हे अत्यंत दूरदृष्टीचे पाऊल मानले गेले. यामुळे गावातील स्वच्छता सुधारली आणि सांडपाण्याच्या व्यवस्थापनाला दिशा मिळाली.
पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय
पूर्वी अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती होती. काही गावांत केवळ एकच हातपंप होता, तर अनेक महिलांना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागत असे.
नानाभाऊ कशाळे यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेतली. त्यांच्या प्रयत्नांतून प्रत्येक गावात आणि वाडी-वस्त्यांमध्ये दोन-दोन, तीन-तीन हातपंप मंजूर करण्यात आले. त्यामुळे हजारो नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर झाली.
याचबरोबर सन १९९४ मध्ये डेहणे गावासाठी पिण्याच्या पाण्याची नळ योजना मंजूर करण्यात आली. त्या वेळी गावातील प्रत्येक आळीत नळकोंडाळे उभारण्याची अभिनव संकल्पना राबविण्यात आली. त्यामुळे गावकऱ्यांना घराजवळच पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ लागले.
वाडी-वस्त्यांपर्यंत वीज पोहोचविण्याचे कार्य
त्या काळात अनेक दुर्गम वाडी-वस्त्यांमध्ये वीज नव्हती. त्यामुळे नागरिकांना अंधारात जीवन जगावे लागत होते. नानाभाऊ कशाळे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रत्येक गावातील वाडी-वस्त्यांपर्यंत वीज पोहोचली. परिणामी हजारो घरांमध्ये प्रथमच विजेचा प्रकाश झळकला आणि ग्रामीण जीवनमानात मोठा बदल घडून आला.
शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना
त्यांच्या प्रयत्नांतून जिल्हा परिषदेमार्फत शेतकऱ्यांना विविध वैयक्तिक लाभाच्या योजना मंजूर करण्यात आल्या. त्यामध्ये विहिरी, बैलजोडी, बैलगाड्या, जमीन सपाटीकरण, फळबाग लागवड, डिझेल इंजिने, मोटार पंप,प्लास्टिक पाईप, बायोगॅस सयंत्र तसेच इतर कृषी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. या योजनांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लागला.
डेहणे आठवडे बाजाराची स्थापना
गावातील व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन सन १९९४ मध्ये डेहणे येथे आठवडे बाजार सुरू करण्यात आला. हा बाजार आजही दर बुधवारी नियमित भरतो. या बाजारामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाची विक्री करण्यासाठी स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाली आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली.
जनतेच्या मनात कायमचे स्थान
नानाभाऊ भिकाजी कशाळे यांचे नेतृत्व हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर ते विकास, लोकसहभाग आणि जनसेवेचे प्रतीक होते. पिण्याचे पाणी, वीज, शिक्षण, बाजारपेठ, स्वच्छता, शेती, पशुसंवर्धन आणि ग्रामीण पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य आजही लोकांच्या स्मरणात आहे.
आजही डेहणे आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या कार्याचा अभिमानाने उल्लेख करतात. त्यांनी जरी ग्रामपंचायत सदस्य, तीन वेळा सरपंच पद, जिल्हा परिषद सदस्य पद भूषवले असले तरी लोक त्यांना नाना मास्तर याच नावाने संबोधत असत. निस्वार्थी जनसेवा, विकासाची दूरदृष्टी आणि सर्वसामान्यांप्रती असलेली आत्मीयता यांमुळे नानाभाऊ भिकाजी कशाळे यांचे नाव खेड तालुक्याच्या पश्चिम भागाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
फोटो सौजन्य:- श्री जगदीश कशाळे साहेब
लेखक:- रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

नानाभाऊ ग्रेट व्यक्तिमत्व होते त्याचा बराचसा इतिहास आज आपल्या मुळे माहीत पडला
उत्तर द्याहटवा