Translate

आठवणीतील पावसाळा

जून महिना सुरू होताच आकाशात ढग जमायला सुरुवात व्हायची. त्याच दरम्यान जूनच्या पहिल्याच आठवड्यात शाळाही सुरू व्हायच्या. 

 छत्री दुरुस्ती 

img src="..." alt=" छत्री दुरुस्ती करणारा कारागीर ">
नवीन वर्ग, नवीन गणवेश, नवीन दप्तर, नवीन वह्या-पुस्तके यांचा आनंद प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असे.

हळूहळू पावसाला सुरुवात व्हायची आणि मग आठवण यायची ती छत्रीची. नवीन छत्री घेण्यासाठी घरात एकच हट्ट धरला जायचा. छत्री घेतली नाही की रुसवे-फुगवे व्हायचे. काही लोक पावसाळा संपल्यानंतर छत्री व्यवस्थित बांधून ठेवायचे. पुढच्या वर्षी पावसाळा सुरू झाला की ती झटकून पुन्हा वापरायला सुरुवात करायचे.

तर काहींच्या गलथानपणामुळे किंवा छत्री नीट न ठेवल्यामुळे ती तुटलेली, मोडलेली किंवा फाटलेली असायची. कोणाच्या छत्रीचा दांडा मोडलेला असायचा, तर कोणाच्या तारा तुटलेल्या असायच्या. काही छत्र्यांचे उघडण्याचे बटण (घोडा) आत गेलेले असायचे, तर काहींचे कापड तळाशी फाटलेले असायचे.

पंचक्रोशीतील मोठ्या गावात बाजाराच्या दिवशी एखाद्या झाडाखाली छत्री दुरुस्ती करणाऱ्या कारागिराचे छोटेसे दुकान थाटलेले असायचे. मोठ्या पोत्यावर जुन्या छत्र्या, नवीन दांडे, नवीन व जुन्या तारा, क्लिपा, घोडे (छत्री उघडण्याचे बटण), चकत्या, छोटे खिळे, बारीक तारेची गुंडाळी, तसेच छोट्या बॅटऱ्या, बल्ब आणि इतर अनेक नव्या-जुन्या वस्तू नीट मांडलेल्या असत.

पावसाळ्याच्या सुरुवातीला छत्री दुरुस्त करून घेण्यासाठी लोकांची एकच गर्दी व्हायची. अनेकजण आपली छत्री हातात घेऊन ताटकळत उभे राहायचे. प्रत्येकाला आपली छत्री लवकर दुरुस्त व्हावी, अशी घाई असायची.

कोणाच्या छत्रीचा दांडा मोडलेला असे, तर कोणाच्या तारा तुटलेल्या असत. कोणाच्या छत्रीचा घोडा दांड्यात अडकलेला असे, तर कोणाच्या छत्रीचे कापड तळाशी फाटलेले असे. तो कारागीर मात्र अत्यंत एकाग्रतेने आणि सफाईदारपणे प्रत्येक छत्री दुरुस्त करत असे.

एखाद्या छत्रीच्या एक-दोन तारा मोडलेल्या असल्या की तो अलगद त्या काढून त्यांच्या जागी नवीन तारा बसवत असे. काही छत्र्यांचा घोडा दांड्याच्या आत अडकलेला असे. मग आपल्या छोट्या-छोट्या हत्यारांच्या मदतीने तो तो घोडा बाहेर काढून नवीन घोडा बसवत असे.

कधी कधी छत्रीचे कापड तळाच्या भागात फाटलेले असायचे. अशावेळी छत्रीचे कापड सांगाड्यापासून वेगळे करून बाहेर काढले जाई. कात्रीने फाटलेला भाग कापून त्या जागी नवीन कापड बसवले जाई आणि काळ्या धाग्याने अतिशय नीट शिवले जाई. मात्र नवीन कापडाचा रंग आणि जुन्या कापडाचा रंग यांत जमीन-अस्मानाचा फरक असायचा. त्यामुळे अशी ठिगळ लावलेली छत्री वापरायला अनेक मुलांना संकोच वाटायचा.

काही लोक आपल्या ऐपतीप्रमाणे जुन्या छत्रीला नवीन दांडा बसवून घ्यायचे, तर काही फक्त आवश्यक तेवढीच दुरुस्ती करून पुन्हा वापरायचे.

छत्री दुरुस्त झाल्यावर कारागीर ती दोन-तीन वेळा उघडून-बंद करून व्यवस्थित तपासून पाहायचा. सर्व काही सुरळीत असल्याची खात्री करून मगच ती गिर्‍हाईकाच्या हातात द्यायचा. मिळालेला चार-दोन रुपयांचा मोबदला तो पत्र्याच्या छोट्या पेटीत टाकायचा. त्या चिल्लर नाण्यांचा खळखळ असा आवाज आजही कानात घुमत राहतो.

त्या ठिकाणी अनेक भावस्पर्शी संवादही घडायचे. त्यापैकी एक संवाद आजही मनात घर करून आहे.

मुलगा : बाबा, मला नवीन छत्री पाहिजे. सगळ्या मुलांकडे नवीन छत्र्या आहेत. मीच ही जुनी रिपेअर केलेली छत्री का वापरायची?

बाबा : बाळा, आत्ता नवीन छत्री घेण्याइतकी आपली ऐपत नाही. हीच वापर. पुढच्या वर्षी नक्की नवीन घेऊ.

मुलगा : मी मग शाळेतच जाणार नाही. मला ही ठिगळ लावलेली जुनी छत्री नको.

तेथील एक गृहस्थ : अरे बाळा, बाबांचं ऐक जरा. परिस्थिती कठीण आहे. ते पुढच्या वर्षी नवीन घेऊन देऊ म्हणत आहेत ना! तोपर्यंत हीच वापर.

img src="..." alt=" पावसात छत्री डोक्यावर घेऊन चाललेली स्त्री ">
त्या काळी बहुतेक घरांत काळ्या रंगाच्या जाड कापडाच्या, सिंगल तारांच्या छत्र्या असायच्या. पावसात भिजल्यानंतर त्या खूप जड व्हायच्या. त्या वाळायलाही बराच वेळ लागायचा. तरीही त्या मजबूत असल्यामुळे अनेक वर्षे टिकायच्या.

नंतरच्या काळात डबल तारांच्या टेरीकॉटच्या छत्र्या बाजारात आल्या. या छत्र्यांना खटक्याची छत्री असेही म्हणत असत. खटका दाबताच छत्री क्षणार्धात उघडायची. वजनाने हलकी, वापरायला सोपी आणि पावसात भिजल्यानंतरही लगेच वाळणारी असल्यामुळे या छत्र्या लोकांच्या पसंतीस उतरल्या. मात्र त्यांची किंमत सिंगल तारांच्या छत्रीपेक्षा जास्त असल्याने सर्वांनाच त्या परवडत नसत.

काळ बदलत गेला आणि जुन्या काळ्या कापडाच्या छत्र्या हळूहळू वापरातून बाद होऊ लागल्या. बाजारात विविध रंगांच्या, आकर्षक डिझाइनच्या आणि हलक्या छत्र्यांनी त्यांची जागा घेतली.

त्या काळी नवीन छत्री घेतली की ती हरवू नये, याची प्रत्येकजण विशेष काळजी घ्यायचा. म्हणून छत्रीवर स्वतःचे नाव आणि पत्ता रंगीत अक्षरांत लिहून घेण्याची पद्धत होती. गावातील पेंटर विविध रंगांच्या ऑइल पेंटने छत्रीवर सुंदर अक्षरांत नाव व पत्ता लिहून द्यायचा. त्यासाठी तो साधारण पाच रुपये घ्यायचा. त्या वेळी मोबाईल क्रमांक नव्हते; नाहीतर तोही छत्रीवर लिहिला गेला असता.

img src="..." alt=" पावसाचा आनंद घेणारा मुलगा ">
पावसाळ्यात छत्री घेऊन एखाद्या नातेवाईकांच्या किंवा पाहुण्यांच्या घरी गेल्यावर ती दरवाजाजवळ किंवा ओट्यावर टांगून ठेवली जायची. गप्पा रंगायच्या, चहा-पाणी व्हायचे आणि निघताना पाऊस उघडलेला असेल तर छत्री घ्यायची आठवणच राहत नसे.

अर्धा-पाऊण किलोमीटर अंतर चालून गेल्यावर अचानक पावसाची सर यायची आणि तेव्हाच छत्री विसरल्याचे लक्षात यायचे. मग पुन्हा मागे फिरून त्या घराकडे जावे लागायचे. अनेकदा घरातील लोक हसत म्हणायचे, "अहो, आम्हाला वाटलंच होतं तुम्ही छत्री विसरणार!"

कधी कधी छत्री एस.टी. बसमध्ये, आगगाडीत किंवा हॉटेलमध्येही विसरली जायची. घरी पोहोचल्यावर आठवण झाली की स्वतःचाच राग यायचा. मनात खूप हळहळ वाटायची; पण त्यावर काहीच इलाज नसायचा.

मुंबईहून गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांकडे मात्र एक वेगळीच छत्री असायची. ती म्हणजे घडी करून पिशवीत ठेवता येणारी छोटी फोल्डिंग छत्री. आम्ही तिला "बंदूक छत्री" म्हणायचो. खटका दाबताच ती झटकन उघडायची. तिचे आम्हा मुलांना प्रचंड आकर्षण वाटायचे.

मात्र गावाकडे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा असल्यामुळे अशी नाजूक छत्री फार काळ टिकणार नाही, हे मोठ्यांना माहीत होते. त्यामुळे गावातील बाजारात अशा छत्र्या फारशा दिसत नसत. तेथे अजूनही लांब दांड्याच्या मजबूत छत्र्यांनाच जास्त मागणी असायची.

त्या फोल्डिंग छत्रीचे आणखी एक वैशिष्ट्य आम्हा मुलांना खूप गंमतीशीर वाटायचे. खटका दाबताच ती अचानक उघडायची. कधी कधी आम्ही गंमत म्हणून ती मांजरासमोर उघडायचो आणि ती दचकून पळताना पाहून मोठ्याने हसायचो. बालपणातील त्या निरागस खोड्या आजही आठवल्या की चेहऱ्यावर नकळत हसू उमटते.

इरले 

img src="..." alt=" डोक्यावर इरले घेऊन भात लावणी करणारी स्त्री  ">
त्या काळी पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतातील कामांसाठी इरल्यांची मोठी गरज भासायची. प्रत्येक गावात इरले तयार करणारे कुशल कारागीर असायचे. पावसाळा जवळ आला की सकाळपासून त्यांच्या अंगणात इरले तयार करण्याचे काम सुरू असायचे.

त्या वेळी पैशांपेक्षा धान्याची देवाणघेवाण अधिक प्रचलित होती. पायली-दोन पायली धान्याच्या मोबदल्यात कारागीर लोकांना इरले करून देत असत.

सुरुवातीला बांबूच्या बारीक काड्यांचा मजबूत सांगाडा तयार केला जायचा. त्यानंतर त्यावर वाळलेल्या पळसाच्या पानांची एकामागोमाग एक सुंदर रचना करून ती दोरीने घट्ट बांधली जायची. नव्याने तयार झालेले इरले पाहायला अतिशय आकर्षक दिसायचे. पावसात ते चांगले संरक्षण देत आणि अंगात उबही टिकवून ठेवत; मात्र वजनाने ते खूप जड असायचे.

दरवर्षी कोकणातून व्यापारी पळसाच्या पानांची पुडकी विकण्यासाठी गावोगावी फिरायचे. इरले तयार करण्यासाठी त्या पानांना मोठी मागणी असायची.

नंतर काळ बदलला. पळसाच्या पानांऐवजी इरल्याच्या सांगाड्यावर जाड कागद किंवा इतर साहित्य वापरले जाऊ लागले. त्यामुळे इरले वजनाने हलके झाले आणि वापरण्यास सोपे वाटू लागले. मात्र पळसाच्या पानांच्या इरल्यात जी नैसर्गिक उब आणि टिकाऊपणा होता, तो नव्या इरल्यांत जाणवत नसे.

घोंगडी

img src="..." alt=" पावसाळ्यात घोंगडी डोक्यावर घेतलेला शेतकरी  ">
त्या काळी पावसाळ्यात शेतीची कामे करताना घोंगडीचा सर्रास वापर केला जायचा. आजही काही ठिकाणी घोंगडी वापरली जाते; मात्र तिचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.

बहुतेक प्रत्येक शेतकरी आणि विशेषतः गुरे राखणाऱ्या गुराख्याकडे घोंगडी असायचीच. पाऊस, थंडी आणि वारा यांपासून संरक्षण करण्यासाठी ती अत्यंत उपयोगी पडायची.

घोंगडीचा उपयोग केवळ अंगावर घेण्यासाठीच नव्हे, तर पाहुण्यांना बसायला अंथरण्यासाठीही केला जायचा. घोंगडीवर बसल्यावर एक वेगळीच ऊब जाणवायची. अनेक जण झोपताना खाली घोंगडी अंथरून त्यावर झोपायचे.

लोकमान्य समजुतीनुसार घोंगडीवर झोपणे आरोग्यासाठी हितावह मानले जायचे. त्यामुळे अनेक घरांत तिचे विशेष महत्त्व होते.

रेनकोट

img src="..." alt=" पावसाळ्यात रेनकोट घातलेला माणूस  ">
त्या काळी रेनकोट फारच थोड्या लोकांकडे असायचे. ते जाड, साधे आणि दिसायला फारसे आकर्षक नसत.

काळ बदलत गेला तसे रेनकोटचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध झाले. विविध रंगांचे, हलके, आकर्षक आणि वापरण्यास सोयीचे रेनकोट बाजारपेठेत दिसू लागले. त्याचबरोबर विविध रंगांच्या आणि आधुनिक डिझाइनच्या छत्र्यांनीही बाजार गजबजू लागला.

नवीन छत्री किंवा रेनकोट घेतला की तो वापरण्याची घाई व्हायची. पाऊस नसतानाही विनाकारण बाहेर फेरफटका मारण्याचा मोह आवरता येत नसे. कारण एकच—मित्रांना आपली नवीन छत्री किंवा रेनकोट दाखवायचा!

घरात बसलो असताना अचानक बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला की रेनकोट घालून बाहेर पडायची तयारी व्हायची. पण रेनकोट घालून दारात येईपर्यंत पाऊस थांबलेला असायचा.

आणि कधी रेनकोट न घालता बाहेर पडलो, तर वाटेतच जोरदार सर यायची. पूर्ण भिजून गेल्यावरच रेनकोटची आठवण व्हायची. मग स्वतःवरच हसूही यायचे आणि थोडे वाईटही वाटायचे.

चप्पल

पावसाळ्यात चप्पलांचीसुद्धा मोठी अडचण व्हायची. चामड्याच्या चप्पला भिजल्या की त्या लवकर वाळत नसत. म्हणून अनेकजण पावसाळ्यापूर्वीच प्लास्टिकच्या किंवा बाटाच्या चप्पला विकत घ्यायचे.

काही लोक मात्र पावसाळा सुरू झाल्यावरच चप्पलांची आठवण काढायचे. गाळातून भराभर चालताना त्यांच्या चप्पलांतून 'फटफट' असा आवाज यायचा. पाण्याचा आणि चिखलाचा अंदाज न आल्यामुळे मागे उडालेला चिखल कपड्यांवर, कधी कधी डोक्यापर्यंतही पोहोचायचा.

घरी गेल्यावर कपडे बदलताना किंवा मागून येणारा एखादा माणूस सांगितल्यावरच हे लक्षात यायचे. मग स्वतःचीच गंमत वाटायची.

गमबूट

काही शेतकरी पावसाळ्यात पोटरीपर्यंत येणारे काळ्या रंगाचे गमबूट वापरत असत. काहीजण बाटाचे बूट वापरायचे. बूट काळे, तपकिरी, पिवळे किंवा लाल रंगांचे असायचे; मात्र गमबूट बहुतेक काळ्याच रंगाचे असत.

रानात, गवतामध्ये किंवा गुरांकडे जाताना गमबूट खूप उपयोगी पडायचे. तरीही ते वापरणे काहीसे कटकटीचे वाटायचे. गमबूट घातल्यावर भराभर चालणे सोपे नसायचे.

गमबुटांबाबत एक प्रसंग आजही आठवतो. एका शेतकऱ्याने संध्याकाळी गमबूट काढून तसेच ठेवले. रात्री त्यात एक साप शिरून वेटोळे घालून बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे त्याने गमबूट घालण्यासाठी पाय आत टाकला, तर पायाला काहीतरी गुळगुळीत लागले. घाबरून त्याने लगेच गमबूट काढून उलटा केला. दोन-तीन वेळा आपटताच त्यातून साप बाहेर पडला. त्या दिवसानंतर गावातील अनेक जण गमबूट घालण्यापूर्वी त्यात नीट डोकावून पाहू लागले.

असे होते त्या काळातील पावसाळ्यातील जीवन! साधनसामग्री कमी होती, पण माणसांच्या मनात समाधान, जिव्हाळा आणि जगण्याचा आनंद मात्र भरपूर होता. आज आधुनिक सुविधा आहेत; तरी त्या जुन्या पावसाळ्याच्या आठवणी मनात कायम हिरव्यागार राहतात.

आज बाजारात आधुनिक छत्र्या, रंगीबेरंगी रेनकोट, जलरोधक बूट आणि असंख्य सुविधा उपलब्ध आहेत. पण छत्रीला ठिगळ लावणाऱ्या कारागिराच्या हातातील कौशल्य, इरले विणणाऱ्या कारागिराचा घाम, घोंगडीची ऊब, पावसात भिजतही चेहऱ्यावरचे समाधान आणि गावातील माणुसकीची ओल… हे सारे काळाच्या ओघात विरळ होत गेले. 

पाऊस आजही तितक्याच प्रेमाने बरसतो; बदलली आहेत ती आपली जीवनशैली आणि त्या पावसाशी असलेली भावनिक नाळ. म्हणूनच त्या पावसाळ्याच्या आठवणी आजही मनात हिरव्यागार आहेत; आणि त्या प्रत्येक सरीबरोबर पुन्हा नव्याने फुलत राहतात.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

1 टिप्पणी:

खेड तालुका पश्चिम भागाचे लोकनेते : दिगंबर मुऱ्हे

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकारणात ज्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिगंबर (दिनकर) धोंडीबा मुऱ्हे.  साडेस...