समाजसेवा हेच जीवनव्रत
पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागात समाजसेवा, शिक्षण आणि जनकल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये कै. भागुजी काशिनाथ कशाळे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.
"बी. के." या नावाने सर्वदूर परिचित असलेल्या या समाजसेवकाने कोणतेही मोठे राजकीय पद भूषविले नाही, तरीही हजारो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणले. शिक्षणाची गोडी निर्माण करणे, तरुणांना रोजगारासाठी मार्गदर्शन करणे, शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि गरजूंच्या अडचणी सोडविणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.त्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि लोकांबद्दलची आत्मीयता यामुळे ते केवळ खेड तालुक्याच्या पश्चिम भागातच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात परिचित झाले. पांढरे शुभ्र धोतर, पैरण, डोक्यावर गांधी टोपी, रुबाबदार व्यक्तिमत्त्व, गौरवर्ण, सुमारे सहा फूट उंची आणि ओघवती, शुद्ध मराठी भाषा—ही त्यांची ओळख होती. त्यांच्या बोलण्यात नम्रता होती, पण विचारांमध्ये ठामपणा होता. त्यांचे मोत्यासारखे सुंदर हस्ताक्षरही अनेकांच्या स्मरणात आजही जिवंत आहे.
बालपण आणि शिक्षण
भागुजी काशिनाथ कशाळे यांचे प्राथमिक शिक्षण डेहणे येथे झाले. पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण त्यांनी गावातच पूर्ण केले. त्यानंतर पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घोडेगाव येथे घेतले. त्या काळी सातवीची 'व्हर्नाक्युलर फायनल' परीक्षा हीच मोठी शैक्षणिक पायरी मानली जात असे.
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही. शिक्षणाची आवड असूनही परिस्थितीपुढे त्यांना माघार घ्यावी लागली. मात्र, स्वतःचे शिक्षण अर्धवट राहिल्याची खंत त्यांनी आयुष्यभर इतरांच्या शिक्षणासाठी कार्य करून भरून काढली.
नोकरी आणि गावाकडे पुनरागमन
सन १९६० मध्ये त्यांची भिवंडी येथील टपाल खात्यात नोकरी लागली. अनेकांसाठी ही आयुष्यभर टिकवण्यासारखी सरकारी नोकरी होती; परंतु बी. के. यांचे मन त्या नोकरीत रमले नाही. शहरातील नोकरीपेक्षा गावातील माणसे, शेती आणि समाजकार्य त्यांना अधिक जवळचे वाटत होते.
काही काळानंतर त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आर्थिकदृष्ट्या कठीण असला तरी समाजहितासाठी तोच योग्य असल्याचा त्यांचा ठाम विश्वास होता.
गावी परतल्यानंतर त्यांनी शेतीची जबाबदारी स्वीकारली; पण शेतीबरोबरच समाजसेवा हेच त्यांचे खरे कार्यक्षेत्र बनले.
शिक्षणाची ज्योत पेटविण्याचा निर्धार
१९७० च्या दशकात खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी समाज अत्यंत मागासलेला होता. माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या. अनेक मुलांचे शिक्षण सातवीपर्यंतच थांबत असे. उच्च शिक्षणासाठी दूरवर जावे लागे आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत.
बी. के. यांना शिक्षणाचे महत्त्व चांगलेच ठाऊक होते. समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच त्यांनी या भागात माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी स्वतःला झोकून दिले.
शिवाजी विद्यालयासाठी दिलेले मोलाचे योगदान
सन १९७७ मध्ये जुन्नरचे तत्कालीन आमदार स्वर्गीय कृष्णराव मुंडे हे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात माध्यमिक शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याचे बी. के. यांना समजले. मात्र शाळा नेमकी कोणत्या गावात सुरू होणार, हे निश्चित झाले नव्हते.
बी. के. कशाळे यांची एकच भूमिका होती. शाळा डेहणे येथेच झाली पाहिजे. त्यांनी हा विषय गावातील प्रमुख कार्यकर्त्यांसमोर मांडला. नानाभाऊ कशाळे, श्रीपत वाजे, दादाभाऊ कोरडे, बाबुराव कौदरे, मारुती लांघी, गोविंदराव कशाळे आणि इतर कार्यकर्ते एकत्र आले. सर्वांनी मुंबई गाठून आमदार कृष्णराव मुंडे यांची भेट घेतली.
या भेटीत आमदारांनी स्पष्ट सांगितले की, शाळा मंजूर करण्यास त्यांची हरकत नाही; मात्र आदिवासी नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असल्याने शाळेच्या मंजुरीपासून बांधकामापर्यंतच्या कामात स्थानिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहकार्य करावे लागेल.
कार्यकर्त्यांनीही एकमुखाने ही जबाबदारी स्वीकारली.
गावी परतल्यानंतर कामांची विभागणी करण्यात आली. शाळेच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तयार करणे, त्यांचा पाठपुरावा करणे आणि मंत्रालयातील काम पूर्ण करून घेणे, ही महत्त्वाची जबाबदारी बी. के. कशाळे यांच्यावर सोपविण्यात आली.
त्यांनी ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. शाळेच्या मंजुरीसाठी त्यांना अनेक वेळा मुंबईतील मंत्रालयात जावे लागले. त्या काळी प्रवास, निवास आणि कार्यालयीन प्रक्रिया अत्यंत किचकट होत्या. तरीही त्यांनी चिकाटी सोडली नाही.
या काळात ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेवराव कशाळे यांनी मुंबईत त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. सुमारे सहा महिन्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर अखेर शाळेच्या मंजुरीचे काम पूर्ण झाले. या यशामध्ये बी. के. कशाळे यांच्या परिश्रमांचा मोठा वाटा होता.
आज या भागातील हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत नाव कमावले आहे. त्या यशामागे ज्या मोजक्या व्यक्तींनी पायाभरणी केली, त्यामध्ये बी. के. कशाळे यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
समाजकार्य हेच जीवनाचे ध्येय
शेती हा त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय असला, तरी समाजसेवा हेच त्यांच्या जीवनाचे खरे ध्येय होते. विशेष म्हणजे त्यांनी आयुष्यभर कोणत्याही राजकीय पक्षाचे पद स्वीकारले नाही किंवा राजकारणाचा आधार घेतला नाही. त्यांना सत्तेपेक्षा समाजातील सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यात अधिक समाधान मिळत असे.
त्या काळात ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवकांसाठी नोकरी मिळविणे अत्यंत कठीण होते. रोजगाराच्या संधी मर्यादित होत्या आणि शासकीय कार्यालयांतील प्रक्रिया सर्वसामान्यांना समजणेही अवघड होते. अशा परिस्थितीत बी. के. कशाळे हे अनेक तरुणांचे आधारवड बनले.
घोडेगाव येथील आदिवासी प्रकल्प कार्यालय, पुणे येथील सेवायोजन कार्यालय आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन त्यांनी असंख्य युवकांची रोजगार नोंदणी करून दिली. अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, मुलाखतीसाठी कशी तयारी करायची याचे मार्गदर्शन ते स्वतः करत असत. अनेक वेळा ते युवकांसोबत कार्यालयातही जात असत.
जेव्हा मुलाखतीसाठी बोलावणे येई, तेव्हाही ते त्या युवकांच्या पाठीशी उभे राहत. अनेकांना नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम ज्यांचे आभार मानले, त्या व्यक्तींमध्ये बी. के. कशाळे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असे.
शासनाच्या योजना घराघरांत पोहोचविणारे समाजसेवक
त्या काळात शासनाच्या विविध योजना कागदोपत्रीच राहायच्या. माहितीच्या अभावामुळे अनेक पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहत असत.
बी. के. कशाळे यांनी ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती, आदिवासी प्रकल्प कार्यालय आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये सतत पाठपुरावा करून त्यांनी अनेक गरजू कुटुंबांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला.
जात, उत्पन्न आणि राहिवासी दाखले मिळविणे ही त्या काळात अत्यंत किचकट प्रक्रिया होती. तलाठी महिन्यातून एकदाच गावात येत आणि त्यांच्या भेटीची निश्चित वेळही नसे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असे.
अशा वेळी बी. के. स्वतः तलाठ्यांना भेटत, आवश्यक दाखले मिळवून देत आणि पुढे तहसील कार्यालयातून त्यांचे कायमस्वरूपी प्रमाणपत्र तयार करून देत. कोणताही मोबदला न घेता त्यांनी अनेक कुटुंबांची ही धावपळ कमी केली.
विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहत असे पुढे काय?
राजगुरूनगर किंवा पुणे येथे प्रवेश घेण्यासाठी आर्थिक अडचणी, राहण्याची सोय, प्रवेश प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडत.
अशा विद्यार्थ्यांसाठी बी. के. हे आधारवड ठरले. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. वसतिगृहांची माहिती करून दिली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून दिली आणि गरज पडल्यास स्वतः विद्यार्थ्यांसोबत जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली.
माझ्या आयुष्यातील बी. के.
मी स्वतः त्यांच्या या प्रेमळ आणि कडक स्वभावाचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे.
शिवाजी विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे, हा प्रश्न माझ्यासमोर उभा होता. घरची परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. त्याच वेळी बी. के. कशाळे माझ्या मदतीला धावून आले.
त्यांनी मला राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश मिळवून दिला. एवढेच नव्हे तर राहण्याची सोयही करून दिली.
त्या काळात तिन्हेवाडी येथे महाराष्ट्र शासनाचे नवीन आदिवासी वसतिगृह सुरू झाले होते. प्रवेशासाठी जातीचा आणि उत्पन्नाचा दाखला आवश्यक होता. माझ्याकडे ते दोन्ही दाखले नव्हते.
बी. के. यांनी तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून केवळ आपल्या शब्दावर मला वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला. पुढे दोन महिन्यांच्या आत त्यांनी तहसील कार्यालयातून माझे जातीचे आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्रही काढून दिले.
आज मागे वळून पाहताना जाणवते की, त्या काळात त्यांनी दिलेली मदत नसती, तर कदाचित माझे पुढील शिक्षण इतक्या सहजपणे पूर्ण झाले नसते.
मी सातवी-आठवीत असतानापासून त्यांची माझ्याशी ओळख होती. विशेष म्हणजे मी लहान असतानाही ते मला नेहमी आदराने "अहो-जावो" असे संबोधत असत. त्या लहान वयात ते मला एवढा मान का देत असत, याचे उत्तर आजही मला मिळालेले नाही.
महाविद्यालयीन काळात मला 'पोलीस टाइम्स' हे वृत्तपत्र वाचण्याची विशेष आवड होती. त्यामध्ये खून, बलात्कार, प्रेम प्रकरणं व गुन्हेगारी वृत्ती अशा प्रकारच्या सुरस बातम्या त्यामध्ये असत. एकदा मी ते वाचत असताना त्यांनी पाहिले. त्यांनी शांतपणे मला समजावले की, लहान वयात अशा प्रकारचे वृत्तपत्र वाचण्यापेक्षा चांगले साहित्य वाचण्याची सवय लावावी. मी तात्काळ त्यांचा सल्ला अमलात आणला आणि त्यापुढे कधीच पोलीस टाईम्स हे वृत्तपत्र वाचले नाही. त्यांचा तो सल्ला आजही माझ्या स्मरणात आहे.
आयुष्यभर लक्षात राहिलेला प्रसंग
एकदा मी माझ्या मामाच्या घरी गेलो होतो. त्या दिवशी काही वन विभागाचे पाहुणे आले होते. त्यांना पिण्यासाठी दारू आणायची होती.
माझ्या मामांनी माझ्या हातात प्लास्टिकचा कॅन देऊन दारू आणायला सांगितले.
योगायोगाने बी. के. कशाळे तेथेच होते.
हे दृश्य पाहताच त्यांचा चेहरा गंभीर झाला. त्यांनी माझ्या मामाला कठोर शब्दांत सुनावले.
"नावजी, तुला लाज वाटत नाही का? एवढ्या लहान मुलाला दारू आणायला पाठवतोस? स्वतः जा आणि दारू घेऊन ये. यापुढे मुलांच्या हातून अशी कामे करून घेऊ नकोस."
त्यांच्या या शब्दांनंतर मामांनी लगेच माझ्या हातातून कॅन घेतला आणि स्वतः दारू आणण्यासाठी निघून गेले.
त्या दिवशी मला जाणवले की, मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी कधी कधी कठोर होणेही आवश्यक असते.
बी. के. कशाळे स्वभावाने शिस्तप्रिय होते; पण त्याचबरोबर ते अतिशय प्रेमळ आणि माणुसकी जपणारे होते. त्यांच्या घरी गेलेला माणूस उपाशी परत जाईल, असे कधी घडले नाही. प्रेमाने जेवायला बसविणे ही त्यांची जणू सवयच होती. मी अनेक वेळा त्यांच्या घरी गेलो. आणि जेवण करून आलो.
बी. के. आणि मारुती लांघी यांची मैत्री
बी. के. कशाळे आणि मारुती लांघी यांची मैत्री त्या परिसरात प्रसिद्ध होती. गावात ते अनेकदा एकत्र दिसत असत. कामासाठी बाहेर पडले तरी दोघे सोबत आणि परत आले तरी सोबत.
त्यांची मैत्री पाहिली की, 'शोले' चित्रपटातील जय-वीरूची आठवण व्हायची.
गप्पा मारताना ते एकमेकांची मिश्कील चेष्टा करीत. त्यांचे संवाद आठवल्यावर आजही हसू येते. मात्र, मारुती लांघी यांच्या अकाली निधनाने बी. के. यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यांनी आयुष्यभर त्या मित्राची आठवण जपली.
डेहणे आदिवासी विकास संस्थेचे चेअरमन
सन १९८९ मध्ये डेहणे आदिवासी दूध उत्पादक व विविध कार्यकारी संस्थेची निवडणूक झाली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भागुजी काशिनाथ (बी. के.) कशाळे यांनी निवडणूक लढविली. ते प्रथम संचालक म्हणून निवडून आले आणि त्यानंतर सर्वानुमते संस्थेचे चेअरमन झाले.
सन १९८९ ते १९९४ या काळात त्यांनी संस्थेचे नेतृत्व अत्यंत प्रामाणिकपणे केले. त्यांच्या कार्यकाळात संस्था केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था राहिली नाही, तर ग्रामीण विकासाचे केंद्र बनली.
मात्र, १९९० च्या दशकात शासनाच्या धोरणांनुसार विविध गावांमध्ये स्वतंत्र दूध संस्था स्थापन होऊ लागल्या. भोरगिरी, शिरगाव, नायफड आणि इतर भागांमध्ये स्वतंत्र संस्था अस्तित्वात आल्या. त्यामुळे डेहणे संस्थेच्या दूध संकलनावर परिणाम झाला.
याच काळात अमूलसारख्या खाजगी दूध संस्थानी ग्रामीण भागात प्रवेश केला. स्पर्धा वाढली, दूध संकलन कमी झाले आणि एकेकाळी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली डेहणे आदिवासी संस्था अडचणीत येऊ लागली. ही परिस्थिती बी. के. यांच्या नियंत्रणाबाहेरील होती; तरीही त्यांनी संस्थेला सावरण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले.
समाजकार्याची राज्यस्तरीय दखल
भागुजी काशिनाथ कशाळे यांच्या निःस्वार्थ समाजकार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली.
सन १९९३–९४ या वर्षाचा प्रतिष्ठेचा 'आदिवासी समाजसेवक पुरस्कार' त्यांना जाहीर झाला.
२९ नोव्हेंबर १९९५ रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारामध्ये मानपत्र, रुपये २५,००० चे रोख पारितोषिक आणि आजीवन मोफत एस.टी. प्रवासाची सुविधा देण्यात आली होती.
हा पुरस्कार म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नव्हता; तर खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील समाजसेवेचा सन्मान होता.
नातवासाठी केलेले किडनीदान
बी. के. कशाळे यांच्या आयुष्यातील सर्वात हृदयस्पर्शी घटना म्हणजे त्यांनी आपल्या नातवासाठी केलेले किडनीदान.
सन २००९ मध्ये त्यांचा नातू गिरीश गंभीर आजारी पडला. पुण्यातील बुधराणी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्याच्या एका मूत्रपिंडाचे कार्य बंद पडल्याचे निदान झाले.
डॉक्टरांनी सांगितले की, नात्यातील योग्य दात्याकडून मूत्रपिंड मिळाल्यास प्रत्यारोपण करता येईल.
त्या वेळी सुमारे सत्तर वर्षांचे असलेले बी. के. कशाळे क्षणाचाही विलंब न लावता स्वतःचे मूत्रपिंड देण्यास तयार झाले.
हा निर्णय त्यांनी प्रसिद्धीसाठी घेतला नव्हता. तो एका आजोबांनी आपल्या नातवावर केलेल्या निस्सीम प्रेमाचा सर्वोच्च आविष्कार होता.
यशस्वी शस्त्रक्रियेनंतर गिरीशचे आयुष्य काही वर्षे सुरळीत चालले. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. सन २०२० मध्ये गिरीशचे दुःखद निधन झाले.
या घटनेने बी. के. कशाळे मनोमन खचले. नातवाच्या निधनाचे दुःख त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत मनात जपले.
अखेरचा प्रवास
२० एप्रिल २०२१ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी हा निस्वार्थ समाजसेवक काळाच्या पडद्याआड गेला.
त्यांच्या निधनाने केवळ एका कुटुंबाचा आधार हरपला नाही, तर समाजासाठी निःस्वार्थपणे काम करणारा एक आधारवड कोसळला.
त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी समाजातील विविध स्तरांतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते, कारण त्यांनी स्वतःच्या आयुष्यात बी. के. यांनी केलेली मदत अनुभवली होती.
हेही वाचा 👉🏻आदिवासींचा डॉक्टर,समाजसेवेचा ध्यास: डॉक्टर राहुल जोशी
व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन
भागुजी काशिनाथ कशाळे यांचे व्यक्तिमत्त्व अनेक पैलूंनी समृद्ध होते.
त्यांनी समाजसेवा केली; पण प्रसिद्धीचा कधीही हव्यास धरला नाही. त्यांनी हजारो लोकांना मदत केली. त्यांनी तरुणांना नोकरी मिळवून दिली, विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, शासनाच्या योजना गरजूंंपर्यंत पोहोचवल्या, शाळा उभारण्यासाठी झटले आणि शेवटी आपल्या नातवासाठी स्वतःचे मूत्रपिंडही दान केले.
त्यांच्या जीवनाकडे पाहिले की, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते.माणूस मोठा पदामुळे होत नाही; तर त्याच्या कर्तृत्वामुळे आणि समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेमुळे मोठा होतो.
उपसंहार
आज काळ बदलला आहे. शासनाच्या योजना वाढल्या आहेत, शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, कार्यालयीन प्रक्रिया सुलभ झाल्या आहेत. पण त्या काळात एका सामान्य शेतकऱ्याने कोणतेही राजकीय पद किंवा अधिकार नसताना लोकांच्या अडचणी स्वतःच्या अडचणी समजून त्यांचे निराकरण केले, ही बाब विलक्षण आहे.
बी. के. कशाळे हे केवळ एक समाजसेवक नव्हते; ते अनेक कुटुंबांचे मार्गदर्शक, विद्यार्थ्यांचे आधारवड, तरुणांचे प्रेरणास्थान आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणारे कर्मयोगी होते.
त्यांच्या कार्याचा इतिहास लिहिणे म्हणजे एका व्यक्तीचे चरित्र लिहिणे नव्हे; तर ग्रामीण समाजातील निःस्वार्थ समाजसेवेच्या परंपरेचा दस्तऐवज जतन करणे होय.
अशा या आदर्श समाजसेवकाला विनम्र अभिवादन.
॥ भावपूर्ण श्रद्धांजली ॥
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा