Translate

"शंकरराव राघुजी हुरसाळे : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील दूरदृष्टीचे लोकनेते

जीवनपट 

शंकरराव राघुजी हुरसाळे हे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील एक अभ्यासू, दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. 

उंच शिडशिडीत बांधा, आकर्षक चेहरा आणि पांढऱ्या शुभ्र बारीक कट असलेल्या मिशा असे त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्व होते.

पांढरे शुभ्र निळ दिलेले धोतर व पैरण आणि टोपी हा त्यांचा पोशाख होता. स्वभाव अतिशय मितभाषी परंतु प्रसंगानुसार कडक होता. 

पांढरे शुभ्र निळ दिलेले धोतर व पैरण आणि टोपी हा त्यांचा पोशाख होता. स्वभाव अतिशय मितभाषी परंतु प्रसंगानुसार कडक होता.

त्यांचे वडील राघुजी हुरसाळे हे मुंबईला कायमस्वरूपी नोकरीनिमित्त होते. घाटकोपर येथे त्यांचे स्वतःचे घर होते.

मुंबईला शंकरराव यांचे मन रमले नाही. त्यांचे शिक्षण (Vernacular Final) म्हणजेच जुन्या सातवीपर्यंत झाले. त्या काळात नोकरीच्या संधी असूनही किंवा मुंबई येथे नोकरीनिमित्त जाण्याची व्यवस्था असतानाही त्यांनी गावाकडील शेतीला प्राधान्य दिले. 

मुंबईला शंकरराव यांचे मन रमले नाही. त्यांचे शिक्षण (Vernacular Final) म्हणजेच जुन्या सातवीपर्यंत झाले. त्या काळात नोकरीच्या संधी असूनही किंवा मुंबई येथे नोकरीनिमित्त जाण्याची व्यवस्था असतानाही त्यांनी गावाकडील शेतीला प्राधान्य दिले.

वडिलोपार्जित जमीन कमी असल्यामुळे काही जमीन त्यांनी विकत घेतली. ती लागवडीखाली आणली आणि उत्तम प्रकारे शेती करू लागले. त्यांनी त्यांच्या शेतात पिकवलेला जीर, रायभोग आणि खडक्या या जातींचा तांदूळ वाडा गावच्या जुन्या बाजारपेठेत खूपच प्रसिद्ध होता. त्यांचा तांदूळ खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांची धांदल उडायची.

शेती करत असतानाच त्यांनी जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाला प्राधान्य दिले. साधारण २४ ते २५ सदस्य असलेले त्यांचे एकत्र कुटुंब होते. मोठे कुटुंब असल्यामुळे शेती आणि पशुपालन यावर त्यांनी भर दिला. त्यांच्याकडे म्हशी, गाई आणि बैल होते.

हेही वाचा 👉🏻 खेड तालुका पश्चिम भागाचे नेते : दिगंबर मुऱ्हे

समाजकारण आणि राजकारण

शेती व्यवसाय करत असताना त्यांना समाजकारणाचीही आवड होती. गावात त्यांच्या शब्दाला किंमत होती, वजन होते. त्यांचे चुलते विष्णू हुरसाळे, तसेच किसन देहू तळपे (गुरुजी), सिताराम मोहन, बाळासाहेब तळपे, शंकर दुलाजी तळपे, भीमाजी गोडे, ज्ञानदेव तळपे आणि दुलाजी गोडे हे त्यांचे गावातील सहकारी होते.

टोकवडे गावचे सरपंच व पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ कात्रजचे संचालक दिगंबर तथा दिनकर मु-हे यांचे ते घनिष्ठ मित्र होते. भागातील धोंडूबाबा कोरडे (मा.पंचायत समिती सदस्य) नानाभाऊ कशाळे,(जिल्हा परिषद सदस्य, बाळासाहेब शेटे (पंचायत समिती सभापती),भागुजी भाईक चेअरमन, चिंतामण (दादा) जठार, दादाभाऊ कोरडे (सरपंच डेहणे) तुळाजी लांघी, श्रीपत ठोकळ, असे अनेक सहकारी त्यांच्या समकालीन होते. तत्कालीन आमदार नारायणराव पवार, सहकार महर्षी साहेबराव सातकर, तत्कालीन आमदार अशोकराव मोहोळ यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.  

टोकवडे ग्रुप ग्रामपंचायत

भिवेगाव, टोकवडे, कारकुडी, शिरगाव व मंदोशी ही पाच गावे असलेल्या टोकवडे ग्रुप ग्रामपंचायतीचे ते सन १९७२ ते १९८२ या कालावधीत सदस्य होते. त्यानंतर सन १९८७ ते १९९२ या काळात ते टोकवडे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते.

त्यांच्या काळात झालेली विकासकामे

मंदोशी या गावात पाचवीचा वर्ग सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सन १९९१ मध्ये मंदोशी गावामध्ये पाचवीचा वर्ग सुरू झाला. सुरुवातीला मुलांना बसण्यासाठी जागा नव्हती. त्यावेळी पाचवीचा वर्ग चावडीत भरत असे.

त्यासाठी त्यांनी पंचायत समिती पातळीवर प्रयत्न करून दोन वर्गखोल्या मंजूर करून आणल्या. या दोन वर्गखोल्या बांधायच्या कोठे, हा प्रश्न निर्माण झाला. शेवटी या वर्गखोल्या गावठाण हद्दीत बांधण्याचे ठरले.

ग्रामस्थांचा सहभाग

त्यावेळी तेथे वर्गखोल्या बांधण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. त्यावेळी समस्त गावकऱ्यांनी आपापल्या बैलजोड्या घेऊन नांगर आणि पेटारीच्या साहाय्याने जमीन सपाट केली. त्यानंतर थोड्याच दिवसांत येथे एक सुंदर इमारत उभी राहिली. गावाच्या उंचवट्यावर असलेली सुंदर शाळा आणि मोठे पटांगण यामुळे शाळेला अधिकच सुंदर रूप प्राप्त झाले.

त्यानंतर सहावी व सातवी असे वर्ग वाढत गेले. पुढे गावठाण आणि वाड्यावस्त्यांमध्ये वर्गखोल्या मंजूर झाल्या. अंगणवाडीची इमारत झाली. पूर्वी गावात एकच शिक्षक असायचा. हुरसाळे साहेबांच्या काळात सात शिक्षकांची नियुक्ती झाली. पुढे चार विद्यार्थी असलेल्या शाळेचा पट १७५ पर्यंत वाढला. शालेय साहित्य, क्रीडा साहित्य, भजनाचे साहित्य, दूरदर्शन संच, लाऊडस्पीकर, टेबल, खुर्च्या, कपाटे असे भरपूर साहित्य शाळेला मिळाले. यासाठी शंकरराव हुरसाळे यांचे असलेले प्रयत्न नाकारता येत नाहीत. गावचा एक उपसरपंच एवढे मोठे कार्य करू शकतो, हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले.

दूध संस्थेमध्ये प्रवेश

सन १९८५ ते १९८९ या काळात ते डेहणे आदिवासी दूध उत्पादक व विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाइस चेअरमन होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. दूध संस्थेची नवीन डेअरी, टोकवडे, शिरगाव व डेहणे येथील रेशनिंग दुकाने, टोकवडे व शिरगाव येथे डेअरीसाठी जागा खरेदी, संस्थेचा ट्रक, नवीन सुसज्ज कार्यालय अशी अनेक विकासात्मक कामे त्यांच्या कारकिर्दीत झाली.

शिरगाव येथील दूध संकलन केंद्रावरील प्रसंग

त्यांचा वक्तशीरपणा फारच प्रसिद्ध होता. शिरगाव येथे दररोज मंदोशी, शिरगाव, मोरोशी येथून काही गवळी दूध घालण्यासाठी सकाळी लवकर येत असत. परंतु दूध घेणारा कर्मचारी मात्र उशिराने येत असे. ही बाब त्यांच्या लक्षात आली. एक दिवस ते स्वतः दूध संकलन केंद्रावर हजर राहिले आणि गवळ्यांचे दूध घेऊ लागले.

उशिरा आलेल्या कर्मचाऱ्याच्या हे लक्षात येताच त्याने, "उद्यापासून मी लवकर येईन; आता मात्र मी दूध घेतो," अशी विनंती केली.

परंतु व्हाइस चेअरमन असलेल्या शंकरराव हुरसाळे यांनी त्या दिवशी शेवटपर्यंत संपूर्ण दूध संकलन केले. हे सर्व पाहून खजील झालेल्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवसापासून दूध संकलन केंद्रावर वेळेत येणे सुरू केले.

कोटेश्वर दूध डेअरीची स्थापना

सन १९८८-८९ मध्ये त्यांनी शिरगाव येथे नवीन कोटेश्वर दूध डेअरीची स्थापना केली. या डेअरीचे ते संस्थापक आणि चेअरमन होते. मात्र या डेअरीला अपेक्षित असे यश मिळाले नाही.

शंकरराव हुरसाळे यांचे राजकीय संबंध

शंकररावांचे खेड तालुक्याच्या पश्चिम भागाबरोबरच तालुक्याचे आमदार नारायणराव पवार तसेच सहकार महर्षी साहेबराव (आप्पासाहेब) सातकर यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. त्या काळात तालुक्यात दोन गट कार्यरत होते.

नारायणराव पवार गट आणि साहेबराव सातकर गट. तालुक्यातील अनेक कार्यकर्ते या दोन गटांमध्ये विभागले गेले होते. परंतु शंकरराव यांचे दोन्ही गटांतील प्रमुखांबरोबर सलोख्याचे संबंध होते. असे असूनही ते काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.

तालुक्यात कोणतीही निवडणूक असो, निवडणूक प्रचाराच्या वेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार स्वतः शंकरराव हुरसाळे यांच्या घरी भेटायला येत असत आणि त्यांच्याशी संवाद साधत असत. गावात त्यावेळी त्यांचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शब्द अंतिम मानला जात असे.

तत्कालीन आमदार व नंतर खासदार झालेले अशोकराव मोहोळ यांच्याशी त्यांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते. ते एक-दोन वेळा शंकरराव हुरसाळे यांच्या घरीही आले होते.

अनेक वर्षे विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव राहिलेले आणि कनेरसर गावचे सरपंचपद भूषवलेले दशरथ सरडे साहेब सांगतात,

"एकदा सहकार महर्षी साहेबराव सातकर यांच्यासह आम्ही लग्नानिमित्त तळेघर या गावी गेलो होतो. परत येताना आम्ही शंकरराव हुरसाळे यांच्याकडे चहा घेऊन पुढे जाण्याचे ठरवले. तिथे गेल्यावर चहा तर झालाच; परंतु जेवण केल्याशिवाय त्यांनी आम्हाला जाऊ दिले नाही."

शंकरराव हुरसाळे यांचे खेड, आंबेगाव, जुन्नर आणि मावळ या चारही तालुक्यांतील राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध होते.

काळभैरवनाथ मंदिर बांधकाम

सन १९८२ साली समस्त ग्रामस्थांनी मंदोशी येथील काळभैरवनाथ मंदिर घडीव दगड आणि संपूर्ण सागवानाच्या लाकडात बांधण्याचे ठरवले. त्यासाठी लागणारी सागवानाची लाकडे शंकरराव हुरसाळे आणि त्यांचे चुलते विष्णू हुरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातून आणण्यात आली. मंदिरासाठी लागणारी कौले आणि लोखंडी जाळ्या हे साहित्य त्यांचे वडील राघुजी हुरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईहून आणण्यात आले.

मंदिरातील पालखीच्या वेळी लागणाऱ्या छत्र्या, छत्रचामरे, अब्दागिरी आणि झेंडे हे सर्व साहित्य शंकरराव हुरसाळे यांच्या घरी ठेवण्याची परंपरा आजही कायम आहे. यात्रेच्या दिवशी शिरगाव येथून गावचे हारतुरे आल्यानंतर त्यांच्या घरातून हे सर्व साहित्य घेऊनच पुढे मिरवणूक निघते.

शंकरराव हुरसाळे यांचे वडील राघुजी हुरसाळे यांची काळभैरवनाथ देवस्थानावर अपार श्रद्धा होती. ते जेव्हा मुंबईहून गावाला येत असत, तेव्हा प्रथम घरी न जाता मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेत आणि त्यानंतरच घरी जात.

आळंदी येथील धर्मशाळेच्या जागेसाठी सहभाग 

खेड तालुका पश्चिम भागातील वारकरी संप्रदायातील लोकांनी एकत्र येऊन श्रीक्षेत्र आळंदी येथे आपल्या भागाची धर्मशाळा असावी हा विचार पुढे येऊन आळंदी येथील केळगाव परिसरात जागा घेण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे दिगंबर मुऱ्हे, शंकरराव हुरसाळे, भागुजी हरिबा भाईक, श्रीपत ठोकळ, किसन देहू तळपे गुरुजी, चिंतामण (दादा) जठार, धोंडूबाबा कोरडे, तुकाराम भोकटे गुरुजी, धोंडिभाऊ दरेकर, पांडुरंग वनघरे, अशा अनेक मान्यवरांनी प्रयत्न केले. डेहणे आदिवासी दूध संस्थेने आणि दूध घालणाऱ्या गवळ्यांनी वर्गणी जमा केल्या. आणि त्या पैशातून ६०,००० रुपये किमतीची आळंदी येथे तीन गुंठे जागा खरेदी केली.

आज त्या ठिकाणी उत्तुंग इमारत उभी राहिली आहे. हे भागातील सर्वच सामाजिक काम केलेल्या वर्गणीदरांचे प्रचंड योगदानच म्हणावे लागेल.    

सामाजिक बांधिलकी

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी हुरसाळेवाडी येथे विष्णू कामाजी हुरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हुरसाळे वस्तीतील ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून पिण्याच्या पाण्यासाठी विहीर आणि ग्रामस्थांना बसण्यासाठी चावडी बांधली.

शंकररावांची गृहलक्ष्मी एक दृष्टिक्षेप 

शंकरराव हे गरजू लोकांना नेहमी मदत करत असत. ज्योतिषशास्त्राची त्यांना उत्तम जाण होती. अनेक लोक लग्न, घर, विहीर बांधण्यासाठी शुभ तिथी जाणून घेण्यासाठी तसेच जन्मपत्रिका पाहण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. 

त्यांच्या घरी सतत लोकांचा, पाहुण्यारावळ्यांचा राबता असे. त्यांच्या पत्नीचे व्यक्तिमत्व खानदानी आणि अतिशय प्रेमळ असे होते. त्या सुद्धा गरजवंतांना त्यांच्या परीने मदत करत असत. त्यांनी त्यांच्या घरी आलेल्या लोकांना चहा किंवा जेवणा शिवाय  कोणालाही परत पाठवले नाही. अजूनही लोक त्यांचे नाव काढतात. मी सुद्धा अनेक वेळा त्यांच्या घरी दिवाळीचा फराळ केला आहे.

सामाजिक सहभाग 

त्या काळात गावात अनेकदा लोकांचे वादविवाद होत असत. वाद-विवाद झाल्यानंतर ते मिटवण्यासाठी शंकरराव हुरसाळे आणि त्यांच्या गावातील इतर सहकाऱ्यांना बोलावले जाई. त्या काळात सामोपचाराने चार समजुतीच्या गोष्टी सांगून वाद मिटवले जात.

गावातील आणि पश्चिम भागातील लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा व दुःखद प्रसंग यामध्ये नेहमी ते भाग घेत असत.

माझ्या वडिलांचे ते अतिशय जिवलग मित्र होते. माझ्या वडिलांवर अनेक प्रकारची संकटे आली, त्या प्रत्येक वेळी ते वाडीसह कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी त्यांना प्रचंड आधार दिला.

माझ्या वडिलांचे दुःखद निधन झाल्यानंतर आमच्या घरच्या सदस्यांनी त्यांच्या अस्थी नाशिक येथील गोदावरी तीरावर विसर्जित करण्याचे ठरवले. त्यावेळी माझ्या चुलत्यांसह शंकरराव हुरसाळे हेही अस्थी विसर्जनासाठी गेले होते. यातून माझ्या वडिलांवरील त्यांचे प्रेम आणि मैत्री दिसून येते. 

शंकरराव राघुजी हुरसाळे हे केवळ उपसरपंच किंवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी नव्हते; तर ते दूरदृष्टी, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा आणि समाजसेवेची जाणीव असलेले लोकनेते होते. शेती, दुग्धव्यवसाय, शिक्षण, सहकार, धार्मिक कार्य आणि सामाजिक बांधिलकी या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. खेड तालुक्यातील राजकारणात त्यांच्या शब्दाला वलय होते.

मंदोशी गावात प्राथमिक शिक्षणाचा विस्तार, शाळेसाठी वर्गखोल्या मंजूर करून आणणे, दूध संस्थेच्या विकासात दिलेले योगदान, कोटेश्वर दूध डेअरीची स्थापना, काळभैरवनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीतील सहभाग आणि गरजू लोकांसाठी केलेली निःस्वार्थ मदत यामुळे त्यांचे कार्य आजही स्मरणात आहे.

त्यांचे राजकारण हे पदासाठी नव्हते, तर विकासासाठी होते. सर्व पक्षांतील नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवत त्यांनी आपल्या गावाच्या आणि परिसराच्या विकासालाच प्राधान्य दिले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, पाहुणचार, मैत्री जपण्याची वृत्ती आणि लोकांप्रती असलेली आत्मीयता यामुळे त्यांनी समाजात वेगळे स्थान निर्माण केले.

आजही मंदोशी आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक शंकरराव हुरसाळे यांचे नाव आदराने घेतात. त्यांच्या कार्यातून पुढील पिढीने समाजहित, प्रामाणिक नेतृत्व आणि निःस्वार्थ सेवाभावाचा आदर्श घ्यावा, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खेड तालुका पश्चिम भागाचे लोकनेते : दिगंबर मुऱ्हे

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकारणात ज्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिगंबर (दिनकर) धोंडीबा मुऱ्हे.  साडेस...