प्रास्ताविक
सन १९५६ मध्ये मुंबई राज्य अस्तित्वात असताना खेड तालुक्याच्या पश्चिम भागात डेहणे आणि एकलहरे असे दोन विविध कार्यकारी धान्य डेपो कार्यरत होते. या डेपोना त्या काळी 'ग्रेड डेपो' असेही संबोधले जात असे.
एकलहरे विविध कार्यकारी धान्य डेपोचे चेअरमन सिताराम बांगर होते, तर डेहणे विविध कार्यकारी धान्य डेपोचे चेअरमन दामू तुकाराम कोरडे होते. या दोन्ही डेपोचे सचिव म्हणून सुरुवातीला केशव धोंडीबा सांडभोर आणि त्यानंतर दशरथ सरडे कार्यरत होते.या डेपोचे प्रमुख उद्दिष्ट आदिवासी भागातील गरजू कुटुंबांना धान्याचे वाटप करणे हे होते. दरवर्षी जुलै महिन्यात धान्याचे वितरण केले जात असे. या धान्याची नाममात्र किंमत पुढील वर्षभरात टप्प्याटप्प्याने वसूल केली जात असे.
सन १९६० नंतर खेड तालुक्याच्या पश्चिम भागात विविध कार्यकारी सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. श्रीपत बापूजी वाजे, दिगंबर धोंडीबा मुऱ्हे, नानाभाऊ भिकाजी कशाळे, मारुती आवडाजी मुऱ्हे, पांडुरंग वनघरे, दादाभाऊ कोरडे, भागुजी हरिबा भाईक, श्रीपत ठोकळ यांसारख्या अनेक दूरदृष्टीच्या कार्यकर्त्यांनी या चळवळीला चालना दिली.
शासनाच्या धोरणानुसार एक रुपया प्रवेश फी आणि दहा रुपयांचे शेअर्स जमा करण्याचे काम सन १९६० पासून सुरू झाले. मात्र या प्रयत्नांना यश मिळाले ते सन १९७३ मध्ये. याच वर्षी डेहणे आदिवासी दूध उत्पादक व विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि मोरोशी आदिवासी दूध उत्पादक व विविध कार्यकारी सहकारी संस्था अस्तित्वात आल्या.
डेहणे संस्थेच्या कार्यक्षेत्रात भोरगिरी, भिवेगाव, कारकुडी, टोकावडे, मंदोशी, शिरगाव, धुओली, वांजळे, डेहणे, नायफड, खरोशी आणि आव्हाट अशी बारा गावे समाविष्ट होती.
मोरोशी संस्थेच्या कार्यक्षेत्रात भोमाळे, पाभे, मोरोशी, एकलहरे, धामणगाव खुर्द, धामणगाव बुद्रुक, गोरेगाव आदी गावांचा समावेश होता.
डेहणे आदिवासी दूध उत्पादक व विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या प्रथम चेअरमनपदी श्रीपत बापूजी वाजे यांची एकमताने निवड करण्यात आली.
शासनाने या दोन्ही आदिवासी संस्थांना व्यापक अधिकार बहाल केले. त्यानुसार सन १९७४ मध्ये डेहणे आणि मोरोशी येथे सुसज्ज गोडाऊन उभारण्यात आले. डेहणे येथील गोडाऊन आजही त्या सहकार चळवळीच्या इतिहासाची साक्ष देत उभे आहे.
श्रीपतराव बापूजी वाजे : जीवनपट
साडेसहा फूट उंच, अंगापिंडाने मजबूत, भारदस्त व्यक्तिमत्त्व, धोतर, पैरण आणि टोपी असा पारंपरिक पेहराव, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही श्रीपतराव बापूजी वाजे यांची ओळख होती.
त्यांचे शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झाले होते. औपचारिक शिक्षण मर्यादित असले तरी त्यांची व्यवहारज्ञानाची समज, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण विलक्षण होते.
लहानपणापासूनच त्यांना कुस्तीची विशेष आवड होती. ते खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील नामांकित पहिलवान म्हणून ओळखले जात. तालुका आणि जिल्हा स्तरावरील अनेक कुस्त्या त्यांनी यशस्वीरीत्या जिंकल्या होत्या.
ते एक प्रगतशील आणि मेहनती शेतकरीही होते. नदीकाठी त्यांची सुपीक शेती होती. त्या काळात शेतीसाठी विहीर असणे ही मोठी बाब मानली जात असे. त्यांच्या शेतात पाण्याची उत्तम व्यवस्था होती.
डेहणे गावात त्यांचे 'रामनाम हॉटेल' नावाचे प्रसिद्ध हॉटेल होते. येथील कळीचे लाडू, शेव-पापडी आणि चहा परिसरात विशेष लोकप्रिय होते. त्यामुळे हे हॉटेल गावातील एक सामाजिक भेटीचे केंद्र बनले होते.
श्रीपतराव बापूजी वाजे : चेअरमन म्हणून कार्य
शेतीमाल विक्री केंद्र
श्रीपतराव बापूजी वाजे यांनी डेहणे आदिवासी दूध उत्पादक व विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या प्रथम चेअरमनपदाची धुरा स्वीकारल्यानंतर ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. त्या काळात शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी वाडा येथील बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागे. वाहतुकीची कोणतीही सोय नसल्याने अनेकांना डोक्यावर शेतमाल वाहून नेण्याची वेळ येत असे. व्यापारी सांगतील तोच भाव स्वीकारावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत असे.
ही परिस्थिती बदलण्यासाठी श्रीपतराव वाजे यांनी संस्थेमार्फत शेतमाल खरेदी-विक्रीची प्रभावी व्यवस्था उभी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळू लागला आणि खासगी व्यापाऱ्यांच्या मनमानीला मोठ्या प्रमाणात आळा बसला.
हेही वाचा 👉🏻 खेड तालुक्यातील पश्चिम विभागाचे लोकनेते दिनकर मुऱ्हे साहेब
दूध संकलन केंद्रे
श्रीपतराव वाजे यांनी संस्थेच्या माध्यमातून हिरडा, भात, खुरसणी आणि भुईमूग या शेतीमालाच्या खरेदीवर विशेष भर दिला. या सर्व पिकांसाठी शासनाकडून एकाधिकार खरेदी योजना आणि हमीभाव मंजूर करून आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
एकाधिकार खरेदी व्यवस्थेनुसार संस्थेशिवाय इतर कोणत्याही व्यापाऱ्याला हा माल खरेदी करण्याची परवानगी नव्हती. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जात असे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे प्रभावी संरक्षण झाले.
दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी पूर्वी कार्यरत असलेल्या सर्व दूध डेअऱ्या संस्थेशी जोडण्यात आल्या. त्यानंतर संस्थेमार्फत दूध खरेदी सुरू करण्यात आली. डेहणे, नायफड, धुओली, शिरगाव, टोकावडे, भिवेगाव आणि भोरगिरी येथे नवीन दूध संकलन केंद्रे सुरू करण्यात आली. यापूर्वी केवळ डेहणे येथेच दूध डेअरी असल्यामुळे दूध संकलनाचे प्रमाण अत्यल्प होते. नवीन केंद्रांमुळे दुग्धव्यवसायाला मोठी चालना मिळाली आणि अनेक कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ झाली.
वित्तपुरवठा
दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकरी व गवळी बांधवांना आर्थिक बळ मिळावे, या उद्देशाने संस्थेमार्फत गायी व म्हशी खरेदीसाठी शंभर टक्के कर्ज योजना सुरू करण्यात आली. या कर्जाचे हप्ते दूध विक्रीतून मिळणाऱ्या रकमेतील कपातीद्वारे सहजपणे भरता येतील, अशी सुलभ व्यवस्था करण्यात आली.
या योजनेमुळे अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना पशुधन खरेदी करून स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी मिळाली. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात या योजनेचा मोठा वाटा होता.
खावटी कर्ज योजना
ग्रेड डेपो बंद झाल्यानंतर शासनाने आदिवासी समाजासाठी खावटी कर्ज योजना सुरू केली. या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र आदिवासी कुटुंबप्रमुखाला दरवर्षी ५० किलो धान्य आणि २०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत असे.
ही योजना राबविण्याचे अधिकार डेहणे आदिवासी दूध उत्पादक व विविध कार्यकारी सहकारी संस्थेला देण्यात आले. तत्कालीन चेअरमन श्रीपतराव वाजे यांनी ही योजना अत्यंत पारदर्शक आणि प्रभावीपणे राबविली. त्यामुळे अनेक गरजू आदिवासी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.
हेही वाचा 👉🏻खेड तालुका पश्चिम विभागाचे विकासाभिमुख लोकनेते नानाभाऊ कशाळे
पीक कर्ज योजना
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना ठरली. या योजनेचा लाभ केवळ आदिवासी समाजालाच नव्हे, तर इतर समाजातील पात्र शेतकऱ्यांनाही देण्यात येत होता.
दरवर्षी जून महिन्यात संस्थेमार्फत जमीनधारक शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जाई. या कर्जाची नियमानुसार परतफेड करणे आवश्यक असे. कर्जवाटप आणि वसुलीची संपूर्ण जबाबदारी चेअरमन, संचालक मंडळ आणि सचिव यांच्यावर असे.
श्रीपतराव वाजे, संचालक मंडळ आणि संस्थेचे सचिव चिंतामण (टकुजी) बापूजी जठार यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही योजना राबविली. त्यामुळे पीक कर्ज योजनेची अंमलबजावणी यशस्वी झाली आणि शेतकऱ्यांचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला
स्वस्त धान्य दुकान योजना
ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तू वाजवी दरात उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शासनाने स्वस्त धान्य दुकान योजना सुरू केली. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात ही योजना डेहणे आदिवासी दूध उत्पादक व विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत प्रभावीपणे राबविण्यात आली.
या योजनेअंतर्गत गहू, ज्वारी, साखर आणि रॉकेल यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात येत असे. पुढील काळात स्त्रियांसाठी लुगडी, पुरुषांसाठी धोतर तसेच पेरणीसाठी लागणारे कापडही अत्यल्प दरात संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळाला.
सामाजिक कार्य
श्रीपतराव बापूजी वाजे हे केवळ सहकार क्षेत्रातील यशस्वी नेते नव्हते, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राचेही खरे पुरस्कर्ते होते. ते खेड तालुका पश्चिम विभाग विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. समाजविकासाबरोबरच कला, क्रीडा आणि लोकपरंपरांचे जतन व्हावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
त्यांना कुस्तीची विशेष आवड होती. त्यामुळे अनेक कुस्ती स्पर्धांना त्यांनी प्रोत्साहन दिले. तसेच संगीत, लोककला आणि तमाशा या पारंपरिक कलांवर त्यांचे विशेष प्रेम होते.
विशेषतः तमाशा सम्राट शंकरराव कोकाटे यांना त्यांनी मोलाची मदत केली. तमाशासाठी लागणारे साहित्य, स्टेज, कनात आणि इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांनी स्वतः आर्थिक मदत केली. एवढेच नव्हे, तर परिसरातील लोकांकडून वर्गणी गोळा करूनही त्यांनी कोकाटे यांच्या कलापथकाला सक्षम उभे राहण्यासाठी हातभार लावला. त्यांच्या या योगदानामुळेच शंकरराव कोकाटे यांचा तमाशा महाराष्ट्रभर पोहोचला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
दिल्ली येथील जागतिक कृषि प्रदर्शन पाहण्याची संधी
सन १९७४ मध्ये दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे चेअरमन आणि सचिव यांची निवड करण्यात आली होती. या दौऱ्यासाठी पुणे जिल्ह्यातून रेल्वेचे तब्बल तेरा डबे आरक्षित करण्यात आले होते.
या प्रतिनिधीमंडळात श्रीपतराव बापूजी वाजे यांचीही निवड झाली होती. या दौऱ्यात त्यांनी आधुनिक शेतीविषयक विविध तंत्रज्ञान, कृषी अवजारे आणि विकासाच्या संकल्पना जवळून पाहिल्या.
या कृषी प्रदर्शनाबरोबरच दिल्ली, आग्रा, मथुरा तसेच भारतातील प्रसिद्ध भाक्रा-नांगल धरणालाही भेट देण्याची संधी त्यांना मिळाली. या दौऱ्याचा त्यांच्या कार्यदृष्टीवर निश्चितच सकारात्मक परिणाम झाला.
दुर्दैवी मृत्यू
श्रीपतराव बापूजी वाजे हे भोरगिरी येथील कोटेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले असताना तेथील एका तथाकथित साधूबरोबर त्यांचा वाद झाला. नंतर उघडकीस आले की, तो साधू नसून मुंबईतील एक तडीपार गुंड होता. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्याने साधूचा वेष धारण करून कोटेश्वर मंदिरातील मठात आश्रय घेतला होता. तो गुन्हेगार असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना नव्हती.
मठाच्या जवळच कोटेश्वर मंदिर आहे. या मठात हा तथाकथित साधू दररोज मद्य प्राशन करत असल्याच्या तक्रारी लोकांच्या कानावर येत होत्या. ही माहिती श्रीपतराव वाजे यांना देखील मिळाली.
त्यांनी भोरगिरी येथील मठात जाऊन साधूला याबाबत पाचारण केले. यावर त्यांचा आणि साधूचा वाद झाला. वादाच्या भरात दारूच्या नशेत असलेल्या त्या गुंडाने त्याच्या हातातील त्रिशूळ श्रीपतराव वाजे यांच्या पोटात खुपसला. या भीषण हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
ही घटना वाऱ्यासारखी भोरगिरी येथील ग्रामस्थांना कळली. सर्व लोकांनी मठाला वेढा घातला. त्यामुळे गुंड असलेल्या साधूला पळून जाता आले नाही. लोकांच्या माराच्या भीतीने त्याने आतून दरवाजा बंद करून ठेवला.
ही घटना तात्काळ तत्कालीन पोलीस पाटील भाऊ काठे आणि कोतवाल धर्मा काठे यांनी वाडा येथे जाऊन पोलिसांना कळविण्यात आली. आणि काही तासातच पोलीस भोरगिरी येथे दाखल झाले. संतप्त ग्रामस्थांनी त्या गुंडाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही दुर्दैवी घटना १४ एप्रिल १९८० रोजी भोरगिरी येथे घडली. पुढे न्यायालयाने त्याच्यावर खटला चालवला. अनेक स्थानिक लोकांच्या साक्षी झाल्या. सन 1989 मध्ये या गुंड असलेल्या साधूला फाशीची शिक्षा झाली.
श्रीपतराव बापूजी वाजे यांच्या पुतळ्याचे अनावरण
श्रीपतराव वाजे यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कार्याची कायमस्वरूपी स्मृती जपण्यासाठी डेहणे गावातील तसेच मुंबई येथे स्थायिक असलेल्या ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
गोविंदराव कशाळे आणि छबनराव कशाळे यांच्या नेतृत्वाखाली 'श्रीपतराव वाजे पुतळा अनावरण समिती' स्थापन करण्यात आली.मुंबईस्थित ग्रामस्थांनी अत्यंत उदारपणे देणग्या दिल्या. त्या निधीतून श्रीपतराव वाजे यांचा देखणा आणि सुबक पुतळा तयार करण्यात आला.
या पुतळ्याचे अनावरण २८ एप्रिल १९८५ रोजी डेहणे येथील मारुती मंदिरासमोर मोठ्या उत्साहात आणि जनसमुदायाच्या उपस्थितीत करण्यात आले. आजही हा पुतळा श्रीपतराव बापूजी वाजे यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची, सहकार चळवळीतील योगदानाची आणि समाजसेवेची प्रेरणादायी आठवण म्हणून उभा आहे.
श्रीपतराव बापूजी वाजे यांनी अल्पशिक्षित असूनही आपल्या दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि नेतृत्वाच्या बळावर खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सहकार चळवळीला भक्कम पाया घातला. शेतकरी, आदिवासी, दुग्धव्यवसाय, शेतीमाल खरेदी, स्वस्त धान्य वितरण, पीक कर्ज, खावटी कर्ज अशा अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी ग्रामीण विकासाला नवी दिशा दिली.
त्यांचे कार्य आजही सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी असून डेहणे येथील त्यांचा पुतळा त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची साक्ष देत उभा आहे.
विविध कार्यकारी ग्रेड डेपो डेहणे आणि एकलहरे (सन 1957 ते 1959) या दोन्ही संस्थांचे सचिव श्री. दशरथ सरडे साहेब वय वर्ष 88
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)




पश्चिम भागात सामान्य गोरगरिब जनतेच्या उद्धारासाठी जे कार्य बाबांनी केले ते खरच अविस्मरणीय आहे आजच्या पिढीला त्यांच्या कार्याची महती समजली पाहिजे आणी खरच आपण ही माहिती आम्हा तरुणांपर्यंत पोहोचवल्या बद्दल आपले खुप खुप आभार अजुनही काही समाजसेवक,क्रांतीकारक आहेत जे आपल्या पश्चिम भागातील गोरगरीब जनतेसाठी लढले त्यांचाही इतिहास,त्यांचे कार्य समाजापुढे येने गरजेचे आहे 🙏🙏
उत्तर द्याहटवा