Translate

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात.

डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारातील व्यक्तिमत्त्व आहेत. वैद्यकीय सेवेसोबतच समाजसेवेची अखंड तळमळ, आदिवासी बांधवांविषयी असलेली आत्मीयता आणि निसर्गाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.

डॉ. राहुल जोशी हे खेड तालुक्यातील नायफड गावचे सुपुत्र. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. त्यांच्याशी माझी फारशी ओळख नव्हती. मात्र त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल मी अनेकदा ऐकले होते. योगायोगाने घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यालयीन कामानिमित्त गेलो असताना आमची प्रथम भेट झाली.

पहिल्याच भेटीत त्यांनी माझे अभिनंदन केले. "तुमचे ग्रामीण संस्कृतीवरील लेख मी नेहमी वाचतो," असे त्यांनी सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत व्यस्त असलेला एक डॉक्टर माझे लेख वाचतो, हे ऐकून मला अतिशय आनंद झाला. त्या दिवशी रुग्णांची मोठी गर्दी असल्याने संवादासाठी फारसा वेळ मिळाला नाही. मात्र त्यांनी दुपारी त्यांच्या सरकारी निवासस्थानी जेवणासाठी आग्रहाने बोलावले.

त्यानंतर अनेक वेळा आमच्या भेटीगाठी झाल्या. त्यांच्या सहवासातून आणि गप्पांमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडत गेले. मुळात डॉक्टरांच्या मनात आदिवासी समाजाविषयी अपार प्रेम, जिव्हाळा आणि अभिमान आहे. आदिवासी समाजाचे जीवन, त्यांची संस्कृती, लोकपरंपरा, श्रद्धा, देव-देवता, विवाहसंस्कार, चालीरीती आणि इतिहास यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे.

आदिवासी भागातील आरोग्यविषयक समस्या, सरकारी योजनांचा अपुरा लाभ, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि आदिवासींसाठी असलेल्या अनेक सवलतींचा इतरांकडून होणारा गैरवापर याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच त्यांनी वैद्यकीय सेवेला केवळ व्यवसाय म्हणून न पाहता समाजपरिवर्तनाचे साधन म्हणून स्वीकारले आहे.

दरवर्षी आदिवासी भागात विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करून ते हजारो गरजू लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवत असतात. मोफत नेत्रतपासणी, मोफत चष्मे वाटप, आदिवासी महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, मोफत औषधवाटप आणि आरोग्यविषयक जनजागृती असे अनेक उपक्रम ते सातत्याने राबवितात. 

विशेष म्हणजे या कार्याचा त्यांनी कधीच गाजावाजा केलेला नाही. वर्तमानपत्रांमधील प्रसिद्धी, सामाजिक माध्यमांवरील प्रचार किंवा स्वतःच्या नावाचा उदोउदो करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर त्यांचा अधिक भर असतो.

ग्रामीण रुग्णालयात त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांशी त्यांचे नाते हे केवळ डॉक्टर आणि पेशंट इतकेच मर्यादित नाही. अनेक आदिवासी आणि ग्रामीण बांधव त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानतात. 

अनेक वृद्ध रुग्ण डॉक्टरांशी बोलताना औपचारिकतेचा विसर पडून त्यांना प्रेमाने "अरे-तुरे" म्हणतात. एखाद्या स्वतःच्या मुलाशी जसे बोलावे तसे ते डॉक्टरांशी बोलतात. या मागे असतो तो डॉक्टरांनी जपलेला विश्वास आणि माणुसकीचा जिव्हाळा. डॉक्टरसुद्धा या प्रेमाचा राग न मानता त्यातच आपले यश शोधतात. एखाद्या डॉक्टरला रुग्णांकडून मिळणारा हा सन्मान कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा असतो.

शासकीय सेवेसोबतच राजगुरुनगर येथे पंचायत समितीसमोर "लीलावती नेत्रालय" या नावाने त्यांचे नेत्ररुग्णालय आहे. डोळ्यांच्या विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी अनेक रुग्ण तेथे येत असतात. त्यांनी आतापर्यंत हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले असून अनेक नेत्रशस्त्रक्रियाही पार पाडल्या आहेत.

त्यांच्या अनुभवाची प्रचिती रुग्णांशी संवाद साधताना वारंवार येते. अनेकदा एखादा रुग्ण तपासणीसाठी समोर बसला की त्याच्या बोलण्यावरून, हालचालींवरून किंवा लक्षणांवरून त्याला नेमका कोणता त्रास आहे याचा अंदाज डॉक्टरांना येतो. 

रुग्णाला कोणत्या कारणामुळे त्रास झाला आहे आणि त्यावर कोणता उपचार आवश्यक आहे, हे ते अचूकपणे सांगतात. त्यांच्या या अनुभवामुळे आणि अभ्यासामुळे रुग्णांचा त्यांच्यावर असलेला विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत गेला आहे.

डॉ. जोशी यांच्या सेवाभावी वृत्तीचा प्रत्यय मला एका प्रसंगातून आला. एकदा मी त्यांच्या दवाखान्यात बसून त्यांच्याशी गप्पा मारत होतो. त्यावेळी त्यांना एका व्यक्तीचा दूरध्वनी आला. 

राजगुरुनगरपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणगाव येथील एक रुग्ण गंभीर आजारी होता. त्याला तातडीने दवाखान्यात आणणे आवश्यक होते. मात्र त्या कुटुंबाकडे कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते. त्यात पावसाळ्याचे दिवस असल्याने परिस्थिती अधिकच कठीण झाली होती.

फोनवरून परिस्थिती समजताच डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णाला आणण्यासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली. त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, दुर्गम भागातील अडचणी किंवा इतर औपचारिक बाबींचा विचार न करता त्यांनी प्रथम रुग्णाला उपचार मिळणे महत्त्वाचे मानले. त्या क्षणी मला जाणवले की, डॉक्टरांसाठी रुग्ण हा केवळ उपचार घेणारा माणूस नसून त्याची जबाबदारी असतो. अशा असंख्य छोट्या-मोठ्या घटनांमधून त्यांच्या मनातील माणुसकी आणि सेवाभाव सतत प्रकट होत असतो.

डॉ. जोशी यांचे व्यक्तिमत्त्व केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरते मर्यादित नाही. त्यांना पायी प्रवास करणे, रानावनातून भटकंती करणे, उंच डोंगर-दऱ्या, गड-किल्ल्यांवर ट्रेकिंग करणे विशेष आवडते. 

आंबा, जांभूळ, करवंद यांसारख्या रानमेव्याचा आस्वाद घेत निसर्गाच्या सान्निध्यात रमणे हा त्यांचा आवडता विरंगुळा आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात संवेदनशीलता, निरीक्षणशक्ती आणि जीवनाविषयीची सकारात्मक दृष्टी दिसून येते.

अलीकडेच महाराष्ट्र शासनाने डॉ. राहुल जोशी यांची ग्रामीण रुग्णालय, तळेघर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे वैद्यकीय अधिष्ठाता या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. 

त्यांच्या या नियुक्तीमुळे आदिवासी आणि ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला नवी दिशा मिळेल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. आदिवासी समाजाच्या समस्या, त्यांची गरज आणि दुर्गम भागातील आरोग्यव्यवस्थेची वास्तव परिस्थिती यांची त्यांना असलेली सखोल जाण या पदावर निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. 

त्यामुळे आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचा लाभ मिळेल, असा विश्वास वाटतो.

आजच्या काळात समाजसेवेच्या मोठमोठ्या घोषणा करणारी माणसे अनेक दिसतात; परंतु शांतपणे, कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजासाठी काम करणारी माणसे फारच कमी आढळतात. 

डॉ. राहुल जोशी यांच्याशी संवाद साधताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ते केवळ आजारांवर उपचार करणारे डॉक्टर नाहीत, तर माणसांच्या वेदना समजून घेणारे संवेदनशील समाजभान असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. 

आदिवासी गावात किंवा वाडी वस्तीवर  राहणाऱ्या एखाद्या कुटुंबाची अडचण असो, एखाद्या गरीब रुग्णाच्या उपचाराचा प्रश्न असो किंवा आरोग्यसेवेपासून वंचित राहिलेल्या लोकांची समस्या असो, त्या प्रत्येक प्रश्नाकडे ते केवळ प्रशासकीय किंवा वैद्यकीय दृष्टीने पाहत नाहीत; तर माणुसकीच्या नजरेतून पाहतात. म्हणूनच त्यांच्या कार्यात सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम दिसून येतो.

डॉ. राहुल जोशी हे अशाच मोजक्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. वैद्यकीय सेवा, सामाजिक बांधिलकी, आदिवासी समाजाविषयीची आत्मीयता, निसर्गप्रेम आणि माणुसकीचा जिव्हाळा यांचा सुंदर संगम त्यांच्या जीवनात दिसून येतो.

आजच्या प्रसिद्धीच्या युगात कामापेक्षा जाहिरात मोठी मानली जाते. अशा काळात कोणताही गाजावाजा न करता "आदिवासी, गरीब आणि गरजू लोकांच्या जीवनात आरोग्याचा आणि आशेचा प्रकाश निर्माण करणारे डॉ. राहुल जोशी हे समाजातील खऱ्या अर्थाने दीपस्तंभ आहेत."

अशा सेवाभावी, अभ्यासू आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला मनापासून सलाम. समाजासाठी त्यांचे कार्य असेच अविरत सुरू राहो आणि त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळो, हीच सदिच्छा.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

काळाच्या ओघात हरवलेली बडबडगीते आणि समृद्ध ग्रामीण बालपण

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृतीचे अभ्यासक)

ग्रामीण महाराष्ट्रातील बालपण म्हणजे निरागसता, माया, खेळ आणि लोकपरंपरांचा एक सुंदर संगम होय.

आजच्या मुलांचे बालपण मोबाईल, टेलिव्हिजन आणि इंटरनेटच्या आभासी सहवासात घडत असले, तरी काही दशकांपूर्वीचे बालपण पूर्णपणे वेगळे आणि समृद्ध होते. 

त्या काळी मुलांचे मनोरंजन करण्यासाठी महागडी खेळणी नव्हती, हातात स्क्रीन नव्हती की कार्टून चॅनेल्स नव्हते; पण घरात आजी-आजोबा, आई-वडील आणि त्यांच्या ओठांवर रेंगाळणारी असंख्य बालगीते होती.

लहान मूल रडू लागले, पडले, हट्ट करू लागले किंवा झोप येत नसली की त्याला शांत करण्यासाठी विविध प्रकारची बडबडगीते, गुदगुल्यांची गाणी, प्रश्नोत्तरांची गाणी आणि खेळगीते म्हटली जात. 

या गीतांना कोणताही ठोस, शास्त्रीय अर्थ असणे आवश्यक नव्हते. त्यांचा मुख्य उद्देश मुलांचे मनोरंजन करणे, त्यांना हसवणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करणे हाच होता. ही गाणी पुस्तकी नव्हती, तर ती पिढ्यान्पिढ्या तोंडी परंपरेने पुढे आली. म्हणूनच त्यांच्यात स्थानिक बोली, ग्रामीण जीवन आणि लोकसंस्कृतीचे अस्सल दर्शन घडते.

१. गुदगुल्यांची गाणी : स्पर्शातून मिळणारी मायेची ऊब

पूर्वी लहान मूल ठेच लागून किंवा अन्य कारणाने पडले आणि रडू लागले, की आजी किंवा आजोबा त्याला जवळ घेऊन गुदगुल्या करत गाणी म्हणत असत. अशा गीतांमध्ये शब्दांपेक्षा स्पर्शातील माया आणि जिव्हाळा अधिक महत्त्वाचा असे.

अत्तर मत्तर कोल्हा कतर...

अत्तर मत्तर कोल्हा कतर,

कोल्ह्याची आय, कवटं खाय।

तिथं रामजी, टोकवायला जाय।

टोकता टोकता, पडली कुडी,

तशी रामजीनं, मारली उडी॥

हे गीत म्हणताना मुलाच्या पायाला हळूच गुदगुल्या केल्या जात. शेवटी "रामजीनं मारली उडी" म्हणताच अचानक जोरात गुदगुल्या करून मुलाला खळखळून हसवले जाई, ज्यामुळे मूल आपले दुःख आणि रडणे विसरून जाई.

रामा गडी ममईला जाय हो...

रामा गडी ममईला जाय हो,

त्याचा खडकावरून घसरला पाय हो।

त्याचा बाप त्याला उठवायला जाय हो,

त्याच्या बापाला उठत न्हाय हो।

त्याची आई त्याला उठवायला जाय हो,

त्याच्या आईला उठत न्हाय हो।

बबन्या बैलाची वेसण तुटली रं,

रामा गड्याची लंगोटी सुटली रं॥ 

या गीतातील विनोद, अतिशयोक्ती आणि शेवटचा गंमतीदार प्रसंग ग्रामीण जीवनाशी जोडलेला असून, तो मुलांना आनंदाचे उधाण आणत असे.

२. प्रश्नोत्तरांची गाणी : संवादातून घडणारा बालमनाचा विकास

मुलांची स्मरणशक्ती, निरीक्षणशक्ती आणि भाषिक विकास घडवण्यासाठी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपातील गाणी अत्यंत उपयुक्त ठरत असत. यातून मुले संवाद साधायला शिकायची.

भटा, भटा कुठे गेला होतास?

भटा, भटा कुठे गेला होतास? — कोकणात।

कोकणातून काय आणलं? — फणस।

फणसात काय? — गरे।

गऱ्यात काय? — आठळ्या।

तुम्ही खा गरे, आम्ही खातो गरे।

म्हशीला काय? — चारखंड॥

या साध्या संवादातून मुलांना फणस, गरे, आठळ्या यांसारख्या ग्रामीण आणि भौगोलिक गोष्टींची सहज ओळख होत असे.

हात कुणी नेलं? (साखळी गीत)

हात कुणी नेलं? उंदरांनी नेलं।

उंदरांनी काय दिलं? डाळ दिली।

डाळ काय केली? घोड्याला घातली।

घोड्याने काय दिलं? लीद दिली।

लीद काय केली? कुंभाराला दिली।

कुंभारानं काय दिलं? गडू दिला।

गडू काय केला? विहिरीच्या काठावर ठेवला।

चिमणी आली, खडा मारला, फुटून गेला।

त्याच्या खापऱ्या-खुपऱ्या काय केल्या? भीमेला वाहिल्या।

भीमेनं काय दिलं? गार पाणी दिलं।

गार पाणी काय केलं? देवावर शिंपडलं।

देवानं काय दिलं? आंगारा दिला।

आंगारा काय केला? गाई-म्हशींवर फुंकला।

गाई-म्हशींनी काय दिलं? दूध दिलं।

दूध काय केलं? मामाची मांजर आली, पिऊन घेतलं॥

हे एक अप्रतिम 'साखळी गीत' (Chain Song) आहे. यात एका घटनेतून दुसरी घटना उलगडत जाते. यामुळे मुलांची उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते आणि त्यांची तर्कशक्ती व साखळी विचार प्रक्रिया विकसित होते.

३. बडबडगीते : नादमाधुर्य आणि कल्पनेचे उड्डाण

बडबडगीतांमध्ये अर्थापेक्षा शब्दांची गंमत, यमक (Rhyme) आणि लय महत्त्वाची असते. ही गाणी मुलांना भाषेची आणि तालाची गोडी लावतात.

अटक मटक चवळी चटक...

अटक मटक चवळी चटक, चवळी झाली गोड गोड।

जिभेला आला फोड फोड, फोड काही फुटेना।

घरचा पाहुणा उठेना, घरचा पाहुणा उठला।

जिभेचा फोड फुटला॥

किंवा पर्यायी रूप

अटक मटक चांदणी चटक, चांदणी झाली गोल गोल।

तिकडून आला रामजीबुवा, रामजीबुवाच्या गळ्यात काय?

तुळशी माळ फुलली जाय॥

चार आण्याचं तेल आणलं...

चार आण्याचं तेल आणलं, सासुबाईचं न्हाणं झालं।

बाबाजींची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली।

उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला।

वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला॥

"चार आण्याचं तेल आणि त्यात उंट पोहून गेला" ही अतिशयोक्ती मुलांच्या कल्पनाशक्तीला (Imagination) कमालीचे उड्डाण मिळवून देते.

पाच पैशाचे आणले साबू...

पाच पैशाचे आणले साबू, त्यात निघाले सुभाषबाबू।

सुभाषबाबूंच्या हातात दप्तर, त्यात निघाले वामन डॉक्टर।

वामन डॉक्टरांच्या हातात सुई, त्यात निघाली उषाताई।

उषाताईच्या वेणीला गोंडा, त्यात निघाला तिरंगी झेंडा।

तिरंगी झेंड्याला लावली किल्ली, त्यात निघाली मुंबई-दिल्ली॥

मुंबई दिल्ली पाहता पाहता, तेथे भेटला मोती कुत्रा 

मोती कुत्र्याच्या गळ्यात पट्टा,  त्यात निघाला चांदीचा तट्टा 

चांदीच्या तट्ट्यावर बसला राजावाजवू लागला मोठा बाजा ॥

बाज्याच्या तालावर नाचली राणीसंपली आमची गोष्ट जुनी ॥

या एकाच गीतात देशभक्ती (तिरंगी झेंडा), राष्ट्रीय नेते (सुभाषबाबू), शिक्षण (दप्तर), वैद्यकीय व्यवसाय (डॉक्टर) आणि भूगोल (मुंबई-दिल्ली) यांची गुंफण किती सहजतेने केली आहे, हे विशेष!

एवढा मोठ्ठा भोपळा...

एवढा मोठ्ठा भोपळा, आकाराने वाटोळा।

त्यात बसली म्हातारी, म्हातारी गेली लेकीकडे।

लेकीने केले लाडू, लाडू झाले घट्ट।

म्हातारी झाली लठ्ठ, भोपळा फुटला फट्ट॥

४. खेळगीते आणि अंकगीते : हसत-खेळत शिक्षण आणि संस्कार

खेळताना गटाने एकत्र येऊन म्हणायची गाणी मुलांच्या सामूहिक जीवनाचा आणि सामाजिकीकरणाचा भाग होती.

बदका बदका नाच रे...

बदका बदका नाच रे, तुझी पिले पाच रे।

एक पिलू मेलं, गाडीत घालून नेलं।

गाडी गेली डोंगरी, आम्ही जाऊ बाजारी।

बाजारातून आणल्या पाट्या, सर्व मुलांना वाटल्या।

एक मूल चुकलं, छडी खाली ठोकलं।

छडी वाजे छमछम, विद्या येई घमघम॥

खेळाच्या ओघातून "विद्या येई घमघम" म्हणत शिक्षणाचे महत्त्व मुलांच्या मनावर बिंबवले जात असे.

त्याचप्रमाणे, लहान मुलांना १ ते १० अंक सहज लक्षात राहावेत म्हणून रचलेले हे जुने ग्रामीण अंकगीत (मोजणीगीत) पाहा:

एक घंटा शाळेला, दोन चाकी गाडीला,

तीन तोंडे दत्ताला, चार कोपरे पाटीला,

पाच बोटे हाताला, सहा कोण षटकोनाला,

सात घरे समईला, आठ काड्या छत्रीला,

नऊ सुट्टे मोजायला, दहा मणी माळेला।

प्रत्येक अंकासोबत दैनंदिन जीवनातील एखादी परिचित वस्तू (उदा. शाळेची घंटा, पाटीचे कोपरे, छत्रीच्या काड्या) जोडल्यामुळे मुलांना खेळता-खेळता गणिताची पहिली तोंडओळख अत्यंत रंजक पद्धतीने होत असे.

५. या गीतांचे सांस्कृतिक महत्त्व

ही गाणी केवळ मनोरंजनाची साधने नव्हती, तर तो ग्रामीण जीवनाचा आरसा होती. त्यातून मुलांना भाषा, कौटुंबिक नाती, प्राणी-पक्षी, शेती, बाजार, देवधर्म आणि सामाजिक जीवन यांची नकळत ओळख होत असे. 

या गीतांमध्ये आजी-आजोबांचे निस्सीम प्रेम, आईची माया आणि संयुक्त कुटुंबातील आत्मीयता दडलेली होती. या गीतांनी मुलांना बोलते केले, हसवले, विचार करायला शिकवले आणि त्यांच्यावर सुसंस्कारांचे सिंचन केले. म्हणूनच हा लोकसाहित्याचा अमूल्य ठेवा आहे.

६. काळाची गरज : हरवत चाललेल्या वारशाचे संवर्धन

आजच्या आधुनिक आणि गतिमान युगात हा सुंदर वारसा हळूहळू विस्मृतीत जात आहे. संयुक्त कुटुंब पद्धती नष्ट होऊन विभक्त कुटुंब व्यवस्था आल्यामुळे आजच्या मुलांना आजी-आजोबांचा सहवास मिळेनासा झाला आहे. परिणामी, हा मौखिक परंपरांचा ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचत नाहीये.

जर आज आपण या गीतांचे संकलन आणि जतन केले नाही, तर भविष्यात हा सांस्कृतिक ठेवा कायमचा नष्ट होईल.

काय करता येईल?

पालकांची भूमिका: 

आजच्या पालकांनी घरात मोबाईल बाजूला ठेवून रोज रात्री झोपताना मुलांना ही पारंपरिक गाणी म्हणून दाखवली पाहिजेत.

शाळा व अंगणवाड्या: 

प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये या अंकगीतांचा व बडबडगीतांचा अधिकृत वापर केला पाहिजे.

डिजिटल माध्यमांचा वापर:

आधुनिक तंत्रज्ञानाचा (उदा. पॉडकास्ट, यूट्यूब, ऑडिओ बुक्स) वापर करून या लोकगीतांचे ध्वनीमुद्रण (Audio-Video Recording) करून ते जतन केले पाहिजे.

बालपणाला आकार देणाऱ्या या बडबडगीतांमध्ये आणि खेळगीतांमध्ये ग्रामीण महाराष्ट्राचा आत्मा दडलेला आहे. ही गाणी केवळ शब्दांचा खेळ नाहीत, तर ती प्रेम, जिव्हाळा आणि लोकसंस्कृतीची जिवंत स्मृती आहेत. ही गाणी जिवंत राहिली, तरच आपल्या ग्रामीण बालपणाच्या आठवणी आणि लोकसंस्कृतीचा सुवास पुढील पिढ्यांपर्यंत अखंडपणे पोहोचत राहील.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)


शिवाजी विद्यालय डेहणे : सुवर्ण आठवणींचा प्रवास

शिवाजी विद्यालय, डेहणे ही खेड तालुक्याच्या पश्चिम भागात असलेली शाळा. स्वर्गीय आमदार कृष्णराव मुंडे साहेब हे या शाळेचे संस्थापक. त्या काळी डेहणे व परिसरातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी दूरच्या गावात जावे लागायचे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत. ही गरज ओळखून गावकऱ्यांनी आणि संस्थापकांनी शिवाजी विद्यालयाची स्थापना केली.

शिवाजी विद्यालय, डेहणे या शाळेचे नाव त्याकाळी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले ते खऱ्या अर्थाने आर. जे. पाटील सर (मुख्याध्यापक), गाडीलकर सर, महामुनी सर, तांबोळी सर, दातीर सर यांनी.

आर. जे. पाटील सर (मुख्याध्यापक)

शाळेची स्थापना झाली तेव्हा आर. जे. पाटील सर मुख्याध्यापक होते. मध्यम बांधा, पाच फूट उंची, करारी चेहरा, पांढरी शुभ्र सफारी व पांढरी पॅन्ट असा त्यांचा वेश होता. शिस्त, स्वच्छता आणि टापटीप त्यांना आवडायची. मुलांनी केस वाढवलेले त्यांना अजिबात खपायचे नाहीत. ते मुख्याध्यापक पदाला शोभून दिसायचे. मुले त्यांना खूप घाबरायची.

सन १९७९ मध्ये या शाळेची स्थापना झाली. सुरुवातीला आठवीचा वर्ग सुरू झाला. त्यानंतर नववी (१९८०-८१) व दहावी (१९८१-८२) सुरू झाली.

तेव्हा विद्यार्थ्यांना बसायला वर्ग नव्हते. तेव्हा शालेय वर्ग जानोबा मंदिरात, तर काही वर्ग धोंडूबाबा कोरडे (मा. पंचायत समिती सदस्य) यांच्या गुरांच्या गोठ्यात भरत असत.

त्यावेळी समस्त गावकऱ्यांनी नवीन शालेय वर्ग बांधण्याचा चंग बांधला. शाळेच्या बांधकामासाठी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या तमाशाचे आयोजन केले आणि तिकिटांच्या विक्रीतून झालेल्या नफ्यामधून शाळेच्या वर्गबांधकामासाठी हातभार लावला.

दरवर्षी होणारी यात्रा रद्द करून ग्रामस्थांनी घरपट वर्गणी काढली. भागातील अनेक दानशूर लोकांनी सढळ हाताने मदत केली आणि तीन वर्गखोल्यांची सुंदर इमारत उभी राहिली. इमारत अतिशय सुंदर होती.

नंतरच्या काळात बाबुराव कौदरे यांनीसुद्धा काही खोल्या शाळेला दिल्या होत्या. एका बाजूला बांधकाम होत असताना दुसऱ्या बाजूला शालेय अध्यापनाचे काम चालू होते.

सन १९८१-८२ मध्ये पहिल्याच वर्षी दहावीचा शाळेचा शंभर टक्के निकाल लागला. त्यामध्ये एकनाथ गणपत लांघी, वनराज विठ्ठल कहाणे, नामदेव श्रीपती वाजे, जगदीश भागुजी कशाळे, दगडू मारुती लांघी, राजू महादेव हुरसाळे व मनोहर श्रीपत रोकडे असे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामुळे शाळेच्या, भागाच्या आणि मुख्याध्यापक पाटील सरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असेच म्हणावे लागेल. 

शालेय गणवेश

पांढरा शर्ट, खाकी चड्डी व डोक्यावर पांढरी गांधी टोपी व इनशर्टअसा गणवेश होता. ठरावीक वरच्या वर्गातील दहावीचे विद्यार्थी फुलपँट घालत. बाकी सर्वजन चड्डीच घालत.

मुलींना निळा स्कर्ट किंवा निळा परकर, पांढरा शर्ट (ब्लाउज) दोन वेण्या आणि लाल रिबन असा गणवेश होता. बुधवारी रंगीत कपडे घालायला परवानगी होती. परंतू रंगीत कपडे होतीच कोणाकडे?

तत्कालीन शालेय दिवस 

सात जूनला शाळा सुरू व्हायची. पावसाळ्यात मुलांची अत्यंत वाईट परीस्थीती असे. अनेक मुले डोंगर, द-यांतुन पावसापाण्यातुन विद्यार्जनासाठी शाळेत येत. येताना प्रचंड पाऊस, दुथडी भरून वाहणारे ओढे नाले, खडीचा रस्ता या दिव्यातुन जा - ये करावी लागे. सर्वांचे कपडे पावसाच्या सटका-याने भिजून जात असत.
शाळेत जमिनीला ओल आलेली असे. त्यावरच पोते टाकून बसावे लागे. शाळा सुटल्यावर घरी जाताना प्रचंड हवा व पाऊसाचा सटकारा असे. छत्री उघडली की वारा छत्री मागे लोटायचा. त्यामुळे पुढे जाताना पाचवी, सहावीच्या छोट्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास व्हायचा. त्यामुळे नाईलाजाने छत्री बंद करून पावसातच झपझप चालावे लागे.

जून/जुलै महिन्यातील पाऊस

त्यावेळी अनेक ठिकाणी ओढ्यावर पुल असत. त्याआधी तेही नव्हते. खुप पाऊस असल्यावर शाळेत जाता येत नसे. अनेक विद्यार्थ्यांना छत्री विकत घेणे शक्य नसे, ते प्लँस्टीक कागद डोक्यावर घेऊन येत.  कागदाच्या शिडातुन वारा आत शिरे, मोठा फडफड आवाज होई. कधी हा वारा कागद किंवा छत्री त्याच्याबरोबर दुर घेऊन जाई. कागद किंवा छत्री पकडताना विद्यार्थ्यांची केविलवानी धडपड सुरू होई. या धंदलीत दप्तर व स्वतः सर्व भिजून चिंब झालेला असे.

दहावी पर्यंत कुणाच्याही पायात चपला किंवा बुट नसायचे. आणवानीच शाळेत यायचे. आणि गरीब विद्यार्थ्यांना फी भरायला पैसे नसायचे.

तेव्हा दप्तर म्हणजे काय तर घरात जी रिकामी पिशवी असेल त्यामध्ये वह्या व पुस्तके ठेवायची. तीच पिशवी घेऊन शाळेत यायचे. त्यामध्चेच दुपारच्या सुट्टीत खाण्यासाठी रूमालात भाकरी व लसणाची, सुकटीची किंवा बोंबील, वाकट इत्यादीची चटणी असे.

पावसाळ्यात विद्यार्थी वर्गातच भाकरी  खात असत. उन्हाळ्यात झाडाखाली बसुन भाकरी खात.

कधीतरी रूपाया दोन रूपये असतील तर आब्बासशेठच्या जनसेवा हाँटेलात ४० पैशात मिसळची नुसतीच तर्री विकत घेऊन त्याबरोबर भाकरी खायची परंतू हे लाड कधीतरी दोन, तीन महिन्यांनी असत.

शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक शिक्षक लाभले त्यांनी आपले ज्ञानार्जनाचे काम निष्ठेने केले त्यामुळेच अनेक विद्यार्थी घडले. 

गाडीलकर सर

कडक इस्त्री केलेली (पूर्वीची बच्चन स्टाईल) पांढरी पॅन्ट, पांढरा शर्ट, उंच शिडशिडीत बांधा, तरुण वयातच डोक्याला पडलेले टक्कल असे गाडीलकर सरांचे व्यक्तिमत्त्व होते. इन शर्ट करून अप टू डेट असलेल्या  गाडीलकर सरांचा प्रभाव सर्वावर पडायचा. 

गाडीलकर सर हे उत्तम इंग्रजी शिकवायचे. त्यांना अनेक विद्यार्थी खूप घाबरत असत. विद्यार्थ्यांना ते खूप मारायचे. त्यामुळे अनेक मुलांनी अर्धवट शाळा सोडून दिल्या. जी मुले शिकली, ती चांगल्या स्थितीत नोकरीला लागली.

गाडीलकर सर जसे उत्तम इंग्रजी शिकवायचे, तसेच उत्तम व्हॉलीबॉल खेळायचे. त्यांचा प्रत्येक शॉट हा अफलातून असायचा. ते उत्कृष्ट व्हॉलीबॉल पटू होते. त्यांचे स्थानिक पुढाऱ्यांशी, विद्यार्थ्यांच्या पालकांशी चांगले संबंध असायचे.

महामुनी सर

महामुनी सर हे सुद्धा उंच, शिडशिडीत बांध्याचे होते. राखाडी रंगाची पॅन्ट आणि पांढरा शर्ट, जाड भिंगाचा जाड चष्मा मला अजूनही आठवतो.

महामुनी सर वरच्या वर्गांना मराठी विषय शिकवायचे. ते जेव्हा भुतांच्या थरारक गोष्टी सांगत, तेव्हा जवळपास भूतं असल्याचा भास व्हायचा. गोष्टीच्या ठराविक पॉइंटला काही मुली जोरात किंचाळायच्या. अजूनही त्यांच्या भुतांच्या गोष्टी आठवल्या की अंगावर काटा उभा राहतो.

त्यांची शिक्षा करण्याची पद्धत मात्र वेगळी होती. इतरांसारखे ते छड्या मारत नसत, तर ते विद्यार्थ्यांच्या पोटाला चिमटा घेऊन वर उचलायचे किंवा फळ्यावर डोकं आपटायचे.

पहिली स्कूटर महामुनी सरांनी विकत घेतलेली. त्यांच्या स्कूटरकडे आम्ही कौतुकाने पाहायचो.

कर्वे सर

उंच व भरदार शरीरयष्टी असलेले कर्वे सर आम्हाला पाचवीला वर्गशिक्षक होते. आम्हाला ते गणित आणि मराठी शिकवत असत.

सवणे सर / कासार सर

सवणे सर / कासार सर ते सुद्धा त्यांच्याकडील विषय चांगल्या पद्धतीने शिकवत असत. परंतु मी शाळेत प्रवेश घेतल्यावर चार-पाच महिन्यातच त्यांची बदली झाली. त्यामुळे त्यांच्या फारशा आठवणी नाहीत.

नढे सर

नढे सर हे सुद्धा तरुण वयात टक्कल पडलेले हुशार शिक्षक होते. ते वरच्या वर्गांसाठी विज्ञान विषय शिकवायचे. त्यांचा फारसा संबंध आला नाही. लवकरच त्यांची बदली झाली. परंतु आमची सहल गोव्याला गेली होती, तेव्हा त्यांनी धमाल केली होती.

सत्तीकर सर (मुख्याध्यापक)

सत्तीकर सर हे शाळेचे मुख्याध्यापक होते. अतिशय शांत स्वभाव आणि सज्जन गृहस्थ असलेले शिक्षक होते. त्यांच्या काळात शाळेच्या अनेक पायाभूत सुविधा तयार झाल्या. आम्हाला ते पंडित नेहरूंसारखे भासायचे. गरीब विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके कशी मिळतील, यावर त्यांचा कटाक्ष असायचा. प्रत्येक शालेय कार्यक्रम ते साजरा करायचे. अनेक व्याख्याने त्यांनी आयोजित केली.

सत्तीकर सर हे कवितांना उत्तम चाली लावायचे. “गे माय भू तुझे मी”, “फेडीन पांग सारे”, “माझी मुक्ताई मुक्ताई” अशा अनेक कविता त्यांच्या चालीमुळे स्मरणात आहेत. त्यांचे दुर्दैवाने अपघाती निधन होणे हे खरोखरच मनाला चटका लावणारे होते.

पाटील सर (मुख्याध्यापक)

पाटील सर हे मुख्याध्यापक होते. त्यांच्या पत्नीदेखील याच शाळेत सहशिक्षिका होत्या. त्यांच्याबद्दल फारशा आठवणी नाहीत.

बोरकर सर

उंच व धिप्पाड शरीरयष्टी असलेले, पायजमा व नेहरू शर्ट घातलेले बोरकर सर आठवतात. आम्हाला ते गणित व भूमिती विषय शिकवायचे.

दहावीला गणित आणि भूमिती शिकवताना परीक्षेला कोणती गणिते येणार, याचा अचूक अंदाज त्यांना असायचा. त्यावरच त्यांचा फोकस असायचा. त्यामुळे आम्हाला ते उत्तम मार्गदर्शक वाटायचे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी बा. भ. बोरकर ते हेच, असे आम्हाला वाटायचे. परंतु नंतर कळले की हे दुसरे बोरकर आहेत.

ते ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाचे प्रचारकदेखील होते. दरवर्षी महाशिवरात्रीला ते भोरगिरी येथील कोटेश्वर मंदिराजवळ स्थानिक लोकांना माहिती द्यायचे.

सुरगुडे सर

सुरगुडे सर हे आम्हाला दहावीला वर्गशिक्षक होते. ते उत्तम इंग्रजी शिकवायचे. रोज सकाळी नऊ ते अकरा आमचा क्लास घ्यायचे. “Royal Challenger” या २१ अपेक्षित प्रश्नसंच असलेल्या पुस्तकासारखा, परंतु वेगळा संच असलेल्या पुस्तकातून ते आम्हाला ग्रामर शिकवायचे. ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांनी आमचे शालेय वेळेव्यतिरिक्त जादा तास घेऊन आमचा इंग्रजी विषय पक्का केला.

दातीर सर

दातीर सर हे सुद्धा उत्तम गणित व विज्ञान हे विषय शिकवायचे. दहावीला असताना त्यांनी आम्हाला शालेय वेळेव्यतिरिक्त अतिरिक्त जादा तास घेऊन शिकवले.

जे विद्यार्थी गणित विषयात कच्चे होते, त्यांच्याकडून भूमितीमधील हमखास परीक्षेला येणारी चार प्रमेये घोटून तयार करून घेतली होती. त्यासाठी सतत टेस्ट घेतल्या जात. तेव्हा दहावीला ४१ पैकी २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्याचे श्रेय दातीर सरांना द्यावे लागेल.

दातीर सर यांच्या पत्नीदेखील याच शाळेत सहशिक्षिका होत्या. दातीर सरांकडे एक जीपसुद्धा असल्याचे आठवते. शिवाय त्यांची काळी पॅन्ट, निळा शर्ट आणि केसांची स्टाईल अजूनही आठवते. त्यांचे ऋणानुबंध अजूनही डेहणे गावाशी टिकून आहेत. परवाच त्यांची आणि माझी एका लग्नसमारंभात भेट झाली होती.

क्षीरसागर सर

आम्ही आठवीला गेलो, तेव्हा क्षीरसागर सर बदली होऊन या शाळेत दाखल झाले होते. ते इंग्रजी शिकवतात, परंतु विद्यार्थ्यांना खूप मारतात, असे ऐकून होतो. त्यांची शिकवण्याची पद्धत खरोखरच उत्कृष्ट होती. त्यांचे सोलापुरी पद्धतीचे बोलणे वेगळ्या धाटणीचे वाटायचे.

क्षीरसागर सरांचे अक्षर खूपच छान होते. त्यांनी डेहणे गावातील मारुतीच्या मंदिराच्या भिंतीवर सुंदर हस्ताक्षरात काढलेल्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या इतक्या सुंदर होत्या की पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटायच्या. त्यांनी खूप वेळा मास्टर ट्रेनर म्हणून शासनाच्या शिक्षक परिसंवादामधून काम केले आहे.

पोखरकर सर

वरुडे गावचे पोखरकर सरसुद्धा इतिहास आणि भूगोल खूप छान शिकवायचे. मारायचेही खूप. समोरच्या बेंचवर बसलेल्या मुलांना त्यांची खूपच भीती असायची. त्यांनी प्रश्न विचारला की त्यांना तात्काळ उत्तर हवे असायचे. उत्तर न दिल्यास मिळेल तेथे रट्टे द्यायचे. त्यांची प्रश्न विचारायची पद्धतसुद्धा खूपच वेगळी होती.

“ये, तू सांग बरं रे, माणूस चंद्रावर सरळ न चालता टुनटुन उड्या का मारतो?”

तात्काळ उत्तर न दिल्यास रट्टे ठरलेले असायचे.

तांबोळी सर

मी सहावीला असताना तांबोळी सर नवीनच हजर झाले, ते क्रीडा शिक्षक म्हणून. अतिशय कडक व तितकाच प्रेमळ स्वभाव. उत्तम इंग्रजी शिकवायचे. विद्यार्थ्यांचे लवकरच ते प्रिय शिक्षक झाले.

तांबोळी सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे. प्रत्येक आठवड्याला छोटी परीक्षा घ्यायचे. तिला “टेस्ट” म्हटले जायचे. टेस्ट ही पद्धत तांबोळी सरांनी रुजवली.

त्यांना खेळाची विशेष आवड होती. नव्हे, ते हाडाचे क्रीडाशिक्षक होते. मल्लखांब कसा खेळायचा, हे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिकवले. डबलबार, सिंगलबार, मल्लखांबवरील त्यावेळच्या विद्यार्थ्यांच्या कसरती आठवल्यावर अंगावर काटा येतो. विशेषतः रोहिदास आंबेकर काय कसरती करायचा!

बापरे! तो उत्तम खो-खोपटूसुद्धा होता. तो कधीच कोणाला बाद होत नसे, हे विशेष होते.

कबड्डीमध्ये अरुण पोपट कोरडे कबड्डी चॅम्पियन होता. कबड्डी, खो-खो, उंचउडी, लांबउडी, गोळाफेक व कुस्ती या स्पर्धांमध्ये शिवाजी विद्यालयाचे नाव जिल्हा पातळीवर खणखणीतपणे निनादू लागले, ते तांबोळी सरांच्या अथक परिश्रमामुळे.

यावर कळस चढवला तो बबनराव गोपाळे यांनी. बीट, तालुका, जिल्हा व राज्यपातळीवरील कुस्ती स्पर्धेत बबनराव गोपाळे यांचा प्रथम क्रमांक आला. शिवाजी विद्यालयाचा डंका संपूर्ण महाराष्ट्रात पिटला गेला. याचे सर्व श्रेय तांबोळी व चिखले सरांकडे जाते, यात वादच नाही.

त्यावेळी राष्ट्रीय नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त नेहमी भाषण स्पर्धेचे आयोजन केले जायचे. आठ दिवस आधी तयारी चालायची.

मुलांसमोर भाषण करणे म्हणजे सोपे काम नव्हे. भाषण करताना हातपाय लटपटायचे, तोंडातून शब्द फुटायचे नाहीत. असे असताना अनेक मुले भाषण करायची, हे कौतुकास्पद होते.

तुकाराम कृष्णा (बनाजीबुवा) कोरडे हे आमच्या पुढच्या वर्गात होते. सुरुवातीपासूनच अतिशय शांत व हुशार विद्यार्थी म्हणून तुकाराम गणला जायचा. भाषण कसे करावे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुकाराम. भाषण करताना श्रोत्यांसमोर उभे कसे राहावे, श्रोत्यांकडे कटाक्ष कसा टाकावा आणि संवादफेक कशी करावी, हे त्यांच्याकडून समजले.

आजही मी जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा विचार करतो, हे सर्व आदिवासी दुर्गम भागात कोणत्याही सोयी-सुविधा नसताना देखील या कला या ठराविक विद्यार्थ्यांनी कशा आत्मसात केल्या असतील? उपजत ज्ञान दुसरे काय?

तेव्हा बीट, तालुका आणि जिल्हा पातळीवर भाषण स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. भाषण स्पर्धेत हमखास सकाळ वर्तमानपत्रात नाव झळकायचे, ते तुकारामचे. तुकाराम यांनी विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.

भाषण केले, दुसरे एक नाव गाजले, ते किसन नारायणराव जठार यांचे. किसन हे आमच्या मागच्या वर्गात होते. परंतु भाषण कसे करावे, आवाजातील चढ-उतार कमी-जास्त कसे करावे, आपले मुद्दे व श्रोत्यांना कसे पटवून द्यावे, हे किसन यांच्याकडून शिकलो. त्यांनीसुद्धा अनेक स्पर्धा गाजवल्या. त्यांचे वडील नारायणराव जठार डेहणे गावचे काही काळ उपसरपंच होते.

तांबोळी सर विद्यालयाच्या सार्वजनिक गणपतीचे संपूर्ण डेकोरेशन अतिशय उत्तम करायचे. नैसर्गिक डेकोरेशनची पद्धत त्यांनीच रूढ केली.

प्रत्येक रविवारी ते विद्यार्थ्यांचे विशेष मोफत क्लास घ्यायचे. आपल्याकडे जे ज्ञान आहे, ते विद्यार्थ्यांना सढळपणे वाटायचे, अगदी मोफत.

एकदा त्यांनी २६ जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या दिवशी अनपेक्षितपणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पडक्या कंपाउंडमधून विद्यार्थ्यांचे लेझीम पथक थेट स्टेजवर आणून प्रेक्षकांना धक्का दिला. लेझीमच्या कसरती पाहून प्रेक्षक जागेवरच तोंडात बोट घालून खिळून राहिले.

तांबोळी सरांनी अनेक गुणी, परंतु गरीब विद्यार्थ्यांची फी सुद्धा कित्येक वेळा भरली असल्याचे मला आठवते. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना अडचणीच्या काळात स्वखर्चाने जेवणाची सोय केली होती.

कोंढाळकर सर

कोंढाळकर सर हे चित्रकला विषय शिकवायचे. त्यांची बोलण्याची ढब अत्यंत वेगळी होती. ते कायम स्वेटर घालायचे. ऋषी कपूरसारखे.

त्यांनी पारंपरिक रंगपेटीतील रंग बंद करून प्रत्येकाने कॅमलचे रंग वापरण्यावर भर दिला. चित्र कसे काढायचे? ते कसे रंगवायचे? चित्राला आऊटलाईन कशी द्यायची? हे त्यांनी आम्हाला उत्तम पद्धतीने शिकवले. उष्ण रंग आणि शीत रंग हे त्यांनी शिकवले. कोणत्या रंगात कोणता रंग मिसळला म्हणजे कोणता रंग तयार होतो, हेही त्यांनी आम्हाला शिकवले. ते उत्कृष्ट चित्रकार होते.

फापाळे सर

मध्यम बांधा असलेले, थोडे उंचीने कमी असलेले फापाळे सर हे आम्हाला इंग्रजी विषय शिकवत असत. ते एक उत्तम व्याख्याते होते. विनोदी शैलीचे व्याख्यान ते लीलया करत असत. त्यांना विनोदी कथालेखक शंकर पाटील असे त्यावेळी म्हणत असत.

वरकुटे सर

उंच व शिडशिडीत बांध्याचे वरकुटे सर आम्हाला हिंदी विषय शिकवत. ते सर्व विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक होते. त्यांनी हिंदीतील अनेक कविता आमच्याकडून पाठ करून घेतल्या होत्या. ते आमचे रविवारी क्लास घेत असत. त्यांचा चेहरा कायम हसतमुख असे.

घुले सर

घुले सर हे मराठी विषय शिकवायचे.

वामन सर

मध्यम बांधा व डोक्यावर टक्कल असलेले वामन सर हे विज्ञान विषय शिकवायचे. त्यांचा वहीत लिहून देण्यावर जास्त भर असायचा. ते उत्तम विज्ञान विषय शिकवायचे. दहावीला आम्हाला ते विज्ञान विषय शिकवत असत.

लाळगे सर 

बारीक अंगचनीचे व मध्यम उंचीचे लाळगे सर आम्हाला इतिहास हा विषय शिकवायचे. ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीने इतिहास विशेष शिकवायचे.

व्यवहारे सर 

व्यवहारे सर हे सहावीला आमचे वर्गशिक्षक होते.ते विज्ञान विषय शिकवायचे. सुट्टी मध्ये क्लास घ्यायचे. त्यांचे फुलांचे परागीभवन पुंकेसर हे शब्द अजूनही आठवतात. त्यांनी आम्हाला सकाळी वर्गात प्रवेश केल्यावर पसायदान म्हणायला शिकवले होते.

आम्ही २५ पैसे याप्रमाणे वर्गणी काढून दत्ताची तसबीर वर्गातील भिंतीवर लावली होती. दर गुरुवारी दत्तांच्या तसबीरीला हार घालून, अगरबत्ती लावली जायची. नारळ आणि खडीसाखर यांचा प्रसाद वर्गात वाटप केलं जायचा. हे सर्व व्यवहारे सरांचे संस्कार होते.

आम्हाला सहावीला बेंच नव्हते तेव्हा आम्ही सत्याग्रह केला होता. जोपर्यंत बेंच मिळत नाही तोपर्यंत वर्गात बसणार नाही. मुख्याध्यापक सत्तीकर सरांना ही माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी येऊन आम्हाला आश्वासन दिले होते. आणि १५  दिवसात बेंच उपलब्ध सुद्धा करून दिले होते. सत्याग्रहाचे पडद्याआडचे सूत्रधार अर्थात व्यवहारे सर हेच होते.

शेख सर, फणसे सर, कदम सर, कुमकर सर, साळवे सर, गुंजाळ सर, विधाटे सर, दातीर मॅडम, पाटील मॅडम, घोलप सर (मुख्याध्यापक), शिंदे सर (पर्यवेक्षक) हे देखील अध्यापनाचे काम करत असत.

ताजने सर (मुख्य लिपिक) 

ताजने सर हे कार्यालयीन कामकाज करत असत. नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, शाळा सोडल्याचे दाखले देणे, शालेय पुस्तके वाटप, शालेय विद्यार्थ्यांना विद्यावेतन वाटप, विद्यार्थ्यांना सूचना नोंदवही अशी अनेक कामे ते करत असत. त्यांचा विद्यार्थ्यांशी शक्यतो संपर्क येत नसे. परंतु कार्यालयात जेव्हा आम्ही जात असे तेव्हा ते कामात व्यस्त असत. त्यांच्याबद्दल सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यांना आदर वाटायचा. 

पांडु सांगडे (शिपाई)

शाळेतील आवडता शिपाई कोण असेल, तर पांडू सांगडे. दुपारनंतर किंवा जेवणाच्या सुट्टीच्या आधी पांडू शिपाई रजिस्टर घेऊन वर्गात प्रवेश करायचे. रजिस्टरमध्ये काय सूचना आहेत, हे ऐकण्यासाठी सर्वांचे कान टवकारायचे.

ज्या दिवशी महिना अखेर असायची, तेव्हा पाच तासांनंतर, म्हणजेच जेवणाच्या सुट्टीनंतर शाळेला सुट्टी असायची. कधी कधी अचानक दुसऱ्या दिवशी सुट्टीची सूचना असायची. कधी व्याख्यान आयोजित केलेले असायचे, कधी पुस्तके मिळणार असल्याची सूचना असायची. अनेक सूचना असायच्या. त्या वाचल्यावर आनंद व्हायचा.

पांडू सांगडे हे रोज सकाळी नदीवर जाऊन थंड पाण्याने अंघोळ करायचे. आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर कधी कधी नदीवर अंघोळ करण्यासाठी जायचो. ते स्वयंपाक स्वतः हाताने करायचे.

शाळेची घंटा (Bell)

आठवीच्या वर्गाच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यावर शाळेची घंटा (Bell) होती. बरोबर ११ वाजता शिपाई बेल वाजवायचे आणि शाळा भरायची. प्रत्येक तासात 45 मिनिटांचा असायचा. प्रत्येक तासाला घंटीचे दोन ठोके पाडायचे. त्याबरोबर आपले शिकवण्याची काम अर्धवट ठेवून शिक्षक निघून जायची व नवीन विषयाचे शिक्षक वर्गात दाखल व्हायचे.

तीन तासानंतर पुन्हा घंटा घणघणायची. आणि पंधरा मिनिटांसाठी छोटी सुट्टी व्हायची. त्यानंतर पुन्हा दोन तास व्हायचे. आणि पुन्हा जेवणाच्या सुट्टीसाठी घंटा घणघणायची. यालाच मोठी सुट्टी मानायची.

त्यानंतर पुन्हा तीन तास व्हायचे. आणि बरोबर ४:४५ वाजता शाळेची घंटा घणघणायची आणि शाळेची सुट्टी व्हायची. त्याबरोबर विद्यार्थी घरच्या दिशेने पळत सुटायचे.

महिना अखेर असेल त्या दिवशी मात्र पाच तासानंतर दुपारी शाळा सुटण्याची. त्यावेळी विद्यार्थ्यांना मात्र खूप आनंद व्हायचा.

सार्वजनिक गणेशोत्सव

शाळेमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जायचा. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला ठराविक वर्गणी भरावी लागायची. गणेशोत्सवामध्ये नैसर्गिक पद्धतीचे डेकोरेशन केले जायचे. सकाळी आणि सायंकाळी आरती असायची. पाचव्या दिवशी गणपती विसर्जन असायचे.

गणेश विसर्जनाच्या वेळी मोठी मिरवणूक निघायची. मिरवणुकीमध्ये सर्व विद्यार्थी सहभागी व्हायचे. एकूणच गणेशोत्सवाच्या काळात खूपच धमाल असायची.

शालेय परीक्षा

पहिली व दुसरी घटक चाचणी साधारण सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होत असे. बेंचवर नंबर लिहायचे असल्यामुळे दुपारीच शाळा सुटत असे. परीक्षा तीन दिवस चालायची. प्रत्येक दिवशी दोन पेपर असायचे.

दुसऱ्या दिवशी विद्यार्थी पॅड, पेन, पेन्सिल व आवश्यक परीक्षेचे साहित्य घेऊन आपला परीक्षा क्रमांक कोणत्या वर्गात आला आहे हे शोधण्यासाठी शाळेच्या वेळेआधीच पोहोचत असत. उत्तरपत्रिका फुलस्केप आखीव कागदावर लिहिली जात असे. उत्तरपत्रिकेचे कागद संपल्यावर पुरवणी जोडण्यासाठी फुलस्केप कागद मिळत. त्यावेळी स्टेपलर हा प्रकार नव्हता. पुरवणी बांधण्यासाठी छोटा दोरा असायचा. पेपर ४० गुणांचा असे. १४ गुण मिळाले की पास समजले जाई.

घटक चाचणीचे पेपर संपल्यावर खरी उत्सुकता असायची ती गुणांची. काही उत्साही शिक्षक घटक चाचणी झाल्यानंतर दोनच दिवसांत पेपर तपासून उत्तरपत्रिकांचे भेंडोळे घेऊन वर्गात दाखल होत. प्रत्येकाला उत्तरपत्रिकेचे वाटप करत. सर्वाधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत. उत्तरपत्रिका पाहून झाल्यावर त्या पुन्हा गोळा केल्या जात. काही शिक्षकांच्या उत्तरपत्रिका मात्र खूप विलंबाने तपासल्या जात आणि नंतर गुण कळायचे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पहिली सत्रांत परीक्षा असे. प्रत्येक पेपर तीन तासांचा असायचा. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी अर्ध्या आकाराचे कागद असत. उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर छापील अक्षरांत “अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे” हे स्लोगन असे. त्याखाली “आदिवासी शिक्षण संस्था, जुन्नर संचलित शिवाजी विद्यालय, डेहणे” असे छापलेले असे. त्याखाली प्रश्न क्रमांक व गुणांची चौकट असायची.

अशाच प्रकारे तिसरी व चौथी घटक चाचणी आणि वार्षिक परीक्षा होत असे.

सकाळची शालेय प्रार्थना

सकाळी ११.०० वाजता शाळा भरत असे. शाळेच्या समोरील पटांगणात प्रार्थनेसाठी मुले-मुली रांगेत उभी राहत. सुरुवातीला “सुंदर जीवन आता मी जगणार” ही अतिशय सुंदर प्रार्थना होती. त्यानंतर बदल करून पुढे साने गुरुजींची “खरा तो एकचि धर्म” ही प्रार्थना कायम करण्यात आली.

प्रार्थना संपल्यावर काही महत्त्वाच्या सूचना सांगितल्या जात. उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना आणि टोपी न घातलेल्या मुलांना छडीचा प्रसाद मिळे.

कवायत व शनिवारची शाळा

शनिवारी सकाळी आठ वाजता शाळा भरायची. पाचवी ते सातवीची शाळा ९.४५ वाजता सुटायची, तर आठवी ते दहावीची शाळा अकरा वाजता सुटायची.

ऑक्टोबरपासून पुढे जानोबा मंदिराच्या पटांगणात कवायत असायची. एक विद्यार्थी ढोलावर ठोके मारत असे. पुढे तुकाराम कोरडे ज्या प्रकारे कवायत करत, त्याप्रमाणे बाकीचे विद्यार्थी पाहून करत. कवायतीचे १६ प्रकार असत. पी.टी.चे सर (तांबोळी सर) कवायती घेत.

कवायत संपल्यावर वर्गात जाऊन बसायचे आणि मुंबई–भोरगिरी एस.टी.ची वाट पाहायची. डेहणेच्या स्टॉपवर गाडी दिसली की उड्या मारत, शाळा सुटली नसली तरी गाडीत जाऊन बसायचे.

हिवाळ्याच्या दिवसांत शाळा वर्गात न भरता पटांगणात ओळीने बसायची. अभ्यासाऐवजी विद्यार्थी दुसरेच काहीतरी करत असत.

त्यावेळी डेहणे येथे सकाळी ९:३० वा, दुपारी १, ३, व ५ वाजता एसटी यायची. त्यामुळे बऱ्यापैकी जाण्या येण्याच्या सुविधा उपलब्ध होत्या. अनेक शिक्षक एसटीने यायचे तर काही शिक्षक खोल्या भाड्याने घेऊन डेहणे येथे मुक्कामी राहायचे. सुरगुडे सर, महामुनी सर, घुले सर, कर्वे सर, तांबोळी सर कुटुंबासह डेहणे येथे राहायचे. 

स्कॉलरशिप व पुस्तके वाटप

दरवर्षी आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळायचे. पाचशे ते सहाशे रुपये इतके विद्यावेतन असायचे. विद्यावेतन वाटप तीन दिवस चालायचे. विद्यार्थी व पालकांची खूप गर्दी व्हायची. हे विद्यावेतन साधारण जुलै महिन्यात मिळायचे. त्यावेळी गावातील हॉटेल आणि दुकाने फुल चालायची.

विद्यावेतनाचे नवीन फॉर्म जुलै महिन्यात विद्यार्थ्यांकडून भरून घेतले जात. फॉर्म भरण्यासाठी नववी व दहावीच्या चांगले हस्ताक्षर असलेल्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जात असे.

शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना जुनी पुस्तके वाटप करण्याचा कार्यक्रमही असायचा. त्याचे वाटप साधारण आठवडाभर चालायचे. कार्यालयात रांगेत जाऊन पुस्तके घ्यायची. जुनी पुस्तके मिळाल्यावरसुद्धा खूप आनंद व्हायचा.

E.B.C.फॉर्म वाटप

दरवर्षी जुलै महिन्यात E.B.C. फॉर्म वाटप केले जात असे. तो फॉर्म भरून गावच्या सरपंचांची सही व शिक्का घ्यायचा आणि शाळेत जमा करायचा. पावसाळ्याच्या दिवसांत कधी ने-आण करताना फॉर्म भिजूनही जायचे.

२६ जानेवारी राष्ट्रीय कार्यक्रम

२६ जानेवारीची तयारी एक महिना आधीपासून चालायची. अनेक मुले-मुली गाण्यांमध्ये भाग घ्यायचे. गायक, गायिका, तबला आणि हार्मोनियम वादक असा संगीत संयोजनाचा थाट असायचा. नृत्य करणारी मुले आणि मुली वेगळी असायची.

मीना बाळासाहेब डोंगरे यांना तेव्हा शिवाजी विद्यालयाची गानकोकिळा म्हटले जायचे. त्या अतिशय सुंदर गाणी गात असत. मराठी चित्रपटगीते, कोळीगीते ही त्यांच्या आवाजात गायली जात आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यावर नृत्य करत असत. भागातील तमाम रसिकवर्ग २६ जानेवारीच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहत असे.

त्यावेळी रेडिओवरील बातम्या फार प्रसिद्ध होत्या. विनोदी पद्धतीने बातम्या देण्याचे काम तुकाराम कोरडे करत असत. त्यावेळी सर्व प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट होई.

२६ जानेवारीच्या कार्यक्रमांमध्ये लेझीम पथकाची अत्यंत सुंदर पेशकश व्हायची. त्यांचे विविध खेळ पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध व्हायचे.

रात्री नाटकाचा कार्यक्रम असायचा. शाळेतील विद्यार्थी भाग घ्यायचे. त्यांना गावातील तरुण साथ द्यायचे. शालेय शिक्षकसुद्धा नाटकात भाग घ्यायचे.

डॉ. गणेश हिर्लेकर लिखित भाग्याचं कुंकू नाटक तांबोळी सरांनी बसवलं होतं. त्यात नढे सरांची खलनायकाची भूमिका अप्रतिम झाली होती. अनुपम खेरची झलक त्यामध्ये जाणवायची. शेख सरांची विनोदी भूमिका आणि तांबोळी सरांची मुख्य नायकाची भूमिका अप्रतिम झाले होत्या. विशेष म्हणजे भीमराब जाधव यांची बेवड्याची आणि रामदास माटे यांची वेड्याची भूमिका आज 30/32 वर्षानंतरही डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते.

शैक्षणिक सहल 

दरवर्षी शाळेची सहल वेगवेगळ्या ठिकाणी जात असे. सहलीची तयारी महिनाभर आधीपासून सुरू व्हायची. सहलीला कायम लक्झरी आरामदायक बस असायच्या. त्यामधून मुले सहलीला जायची. 

सहलीला जाणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी भरपूर खोबरेल तेल लावलेल्या चपात्या, शेंगदाण्याची, लसणाची (तळलेली) चटणी, करंज्या, रव्याचे लाडू, कानवले असे अनेक पदार्थ घेऊन जात असत.

सन १९८७ मध्ये सहल अजिंठा वेरूळला गेली होती. (सहलीची वर्गणी १२५ रुपये) सन १९८८ (सहलीची वर्गणी १५० रुपये) मी सहलीबरोबर गोव्याला गेलो होतो. त्यानंतर १९८९ पंढरपूर, तुळजापूर अक्कलकोट, गाणगापूर, विजापूर, येथे सहलीला गेलो होतो. सहलीच्या वर्गणी मध्ये एकवेळचे जेवण समाविष्ट असायचे. सहलीला जाताना गाडीमध्ये गाण्यांच्या भेंड्या, विनोदी चुटकुले, पोवाडा असे अनेक कार्यक्रम व्हायचे. प्रत्येक प्रेक्षणीय ठिकाणी जाऊन त्याचे निरीक्षण करून वहीत नोंदवायचो.

व्याख्यानमाला

शाळेमध्ये अनेक वेळा व्याख्यानांचे आयोजन केले जायचे. अनेक व्याख्यात्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले जायचे. त्यामध्ये विनोदी व्याख्यान, कथाकथन, विज्ञानाचे प्रयोग, जादूचे प्रयोग असे अनेक प्रकारचे व्याख्याते व्याख्यान द्यायचे. त्यामुळे विद्यार्थी दशेत जीवन जगत असताना अन्य प्रकारचे ज्ञान मिळायचे. सुरगुडे सर, फापाळे सर खूपच विनोदी पद्धतीने कथाकथन व व्याख्यान द्यायचे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या शाळेतील तज्ज्ञ शिक्षक व्याख्यान देण्यासाठी शाळेत निमंत्रित केले जायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नवी उमेद मिळायची.

सर डे

दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला असायचा. परीक्षेच्या आधी दहावीच्या मुलांना एक दिवस शिक्षक होऊन खालच्या वर्गाच्या मुलांना शिकवण्याची दिव्य पार पाडावी लागे. अनेक विद्यार्थी यामध्ये मोठ्या हिरीरीने भाग घेत असत.

रंगीत पॅन्ट-शर्ट, डोळ्यावर गॉगल, पायात सँडल किंवा बूट घालून ते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तयार असत. काही विद्यार्थी शिपाई होत.

आपणही शिक्षक होऊन मुलांना शिकवावे, असे मला कधीच वाटले नाही. नुसता विचार जरी मनात आला, तरी हात-पाय लटपटायला होत. अजूनही मी भाषण करू शकत नाही. लेखन मात्र  करू शकतो. 😂

नाईट स्टडी

सायंकाळी शाळा सुटल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना घरी जाऊन जेवण करून पुन्हा शाळेत यावे लागायचे. रात्री शाळेत येऊन निवांतपणे अभ्यास करावा, एकमेकांनी एकमेकांचे प्रश्न सोडवावेत, सामुदायिक अभ्यास करावा हा उद्देश.

परंतु काही विद्यार्थी अभ्यास सोडून अनेक उद्योग करायचे. कुणी हरभरा उपटून त्याचा हुळा करत असत, तर काहीजण वाटाणा उपटून त्याच्या शेंगा खात असत. काहीजण रात्री ग्राउंडवर सायकल चालवत असत, तर काहीजण अभ्यास करत असत.

१ मे परीक्षेचा निकाल

१ मे रोजी परीक्षेचा निकाल असे. त्यादिवशी ग्राउंडवर तमाम विद्यार्थी जमत असत. प्रत्येक वर्गातील मुले रांगेत बसून असत.

प्रत्येक वर्गाचे वर्गशिक्षक आपल्या वर्गातील पहिल्या तीनमध्ये आलेल्या मुला-मुलींची नावे वाचून दाखवत. त्यानंतर कौतुकपर भाषणे होत. उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल वर्गात जाऊन देत असत.

हिरवट किंवा निळ्या रंगाच्या गुणपत्रकावर निळ्या पेनने लिहिलेले गुण असत. त्यामध्ये "उत्तीर्ण", "पास", "वरच्या वर्गात घातला" असे शेरे असत. वरच्या वर्गात घातलेल्या मुलांना लाल पेनने ज्या विषयात कमी गुण आहेत, त्यामध्ये प्लस मार्क दिले जात असत.

त्यावेळी पेढे हा प्रकार प्रचलित नव्हता. पास झाल्यावर मुले गूळ किंवा उबाळे यांच्या हॉटेलमधील कुंदा वाटून आनंद साजरा करत.

इतर उपक्रम

शाळेत असताना आम्ही शाळेचा व्हरांडा बांधण्यासाठी नायफड येथील बंधाऱ्याजवळून दगड आणले होते. तर नदीवरून वाळू आणली होती.

मराठी शाळेच्या पाठीमागे आणि शाळेच्या आवारात अनेक झाडे आम्ही लावली होती. आणि दर पंधरा दिवसांनी, जेव्हा आमची पाळी असेल, तेव्हा झाडांना पाणी घालायचो.

सोळसेवाडीच्या आमराईतील ओढ्यातून पाणी आणून ते झाडांना घालायचो. अजूनही ती झाडे जिवंत आहेत. रस्त्याने जाताना ज्यावेळी आम्ही त्या झाडांना पाहतो, त्यावेळी सर्व आठवणी तरळून जातात.

आज अनेक दशके उलटून गेली, अनेक शिक्षक काळाच्या पडद्याआड गेले, अनेक विद्यार्थी आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावले. मात्र शिवाजी विद्यालय, डेहणेच्या त्या आठवणी आजही मनाच्या कोपऱ्यात ताज्याच आहेत. शाळेची इमारत, मैदान, वर्गखोल्या आणि शिक्षकांचे संस्कार हे आमच्या आयुष्याचे अमूल्य वैभव आहे. या विद्यालयाने आम्हाला केवळ शिक्षणच दिले नाही, तर जीवन जगण्याची दिशा दिली."

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)




भांडण त्यांचे भुर्दंड मला

पूर्वी गावाकडे शेताच्या बांधावरून, वाटेवरून, पाण्यावरून आणि कधी कधी फक्त एकमेकांकडे वाकडे पाहिल्यामुळेही तंटे व्हायचे. 

सुरुवातीला दोन शब्दांनी सुरुवात व्हायची, मग शिव्यांचा पाऊस पडायचा आणि शेवटी एखाद-दुसरी थप्पड उडाली की प्रकरण "गावच्या प्रतिष्ठेचे" बनायचे.

भांडण झाले की दोन्ही पक्ष पोलीस स्टेशन गाठायचे. त्या काळी पोलीसही फार तत्त्वज्ञान मांडत बसत नसत. दोन्ही पक्षांकडून थोडेफार "चहापाणी" झाले की प्रकरण मिटायचे. गावकरी खुश आणि पोलीसही खुश!

पण एकदा आमच्या गावात असे भांडण झाले की प्रकरण हाताबाहेर गेले. मारामारीत एका माणसाला बराच मार बसला. पोलीसांनी परिस्थितीची गंभीरता ओळखून समोरच्या पक्षातील चार जणांना थेट राजगुरुनगरच्या पोलीस कोठडीत पाठवले.

प्रकरण तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर जाणार होते. वकिलांनी सांगितले, "दोन जामीनदार घेऊन या."

दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होतो. तेवढ्यात माझा मित्र धापा टाकत आला.

"आज ऑफिसला जाऊ नकोस. माझ्याबरोबर खेडला चल. प्रतिष्ठेचा प्रश्न आहे." आपले कस्टडीमध्येअसलेले आरोपी सोडवून आणायला पाहिजेत.

गावात "प्रतिष्ठेचा प्रश्न" हा असा शब्द आहे की त्यापुढे माणसाची बुद्धी लगेच सुट्टीवर जाते.

मी विचारले,

"अरे, जामीनदार किती लागतात?"

तो म्हणाला,

"दोन."

"मग?"

"मी चार पाठवले आहेत!"

मी म्हणालो,

"दोन लागतात तर चार कशाला?"

तो म्हणाला,

"राहू दे हाताखाली. काय फरक पडतो?"

मलाही त्या वेळी फरक पडला नाही. पण दिवस संपेपर्यंत किती फरक पडणार आहे याची मला कल्पना नव्हती!

सकाळी आम्ही मोटरसायकल काढली. पण ती काही चालू होईना. आम्ही किक मारून दमलो. मोटरसायकल मात्र आमच्याकडे पाहून हसत असल्यासारखी शांत उभी होती.

शेवटी आम्ही मोटर सायकल शिरगावला एका ठिकाणी ठेवून एसटीने राजगुरुनगर गाठले.

तेथे गेल्यावर समजले की आमच्या केसचे अजून काहीच झालेले नाही. वकिलाचा पत्ता नव्हता. दरम्यान मित्राने आणलेले चारही जामीनदार भुकेने व्याकुळ झाले होते.

आम्ही एका छोट्या हॉटेल मध्ये गेलो.

सर्वजणांनी अशी मिसळ खाल्ली की जणू  नसून आम्ही दुष्काळग्रस्त भागातून आलेले निर्वासित होते! मिसळ संपली, पाव संपले, आणखी पाव आले, तेही संपले.

हॉटेलवाल्याने आमच्याकडे आणि रिकाम्या ताटांकडे पाहून तोंडात बोट घातले.

मिसळ खाऊन झाल्यावर बिल आले. बिल पाहताच सगळ्यांनी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहायला सुरुवात केली.जणू काही बिल कुणी भरायचे यासाठी मौनस्पर्धा सुरू झाली होती.

मुख्य असलेल्या आरोपीचा मुलगा शहरातून येणार होता. जामीनदारांकडेही पैसे नव्हते. काशिनाथकडे पैसे नव्हते. आरोपी तुरुंगात असल्यामुळे त्यांच्याकडे तर असण्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी माझ्याकडे सर्वांची नजर वळली. आणि गावच्या प्रतिष्ठेप्रमाणेच बिलाची प्रतिष्ठाही माझ्याच खिशावर आली! मी पैसे भरले.

दिवसभर वकील, कागदपत्रे, स्वाक्षऱ्या आणि सरकारी कार्यालयातील कासवगती यामध्ये वेळ गेला. शेवटी सायंकाळी सहा वाजता जामीन मंजूर झाला.

चारही आरोपी सुटले. आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. पण खरी परीक्षा आता सुरू होणार होती. साडेसहा वाजताची भोरगिरीची शेवटची एसटी पकडायची होती. तेवढ्यात मुख्य आरोपी असलेला माणूस म्हणाला,

"दोन मिनिटांत येतो." तुम्ही येथेच थांबा. असे म्हणून तो थोड्याच वेळात गायब झाला.

दोन मिनिटे गेली. दहा मिनिटे गेली.वीस मिनिटे गेली. भोरगिरी एसटी मात्र आमची वाट न पाहता निघून गेली.

शेवटी साहेब परत आले तेव्हा त्यांच्या तोंडाला दारूचा सुगंध नव्हता; तर संपूर्ण दारूचा कारखानाच चालत असल्यासारखे वाटत होते. सर्व गाड्या निघून गेल्या होत्या. डिसेंबरची रात्र, कडक थंडी,भूकआणि खिशात पैसे नाहीत. सगळे जण त्याला शिव्या घालत होते. तो मात्र निवांत होता. जणू काही आम्ही पिकनिकला आलो होतो! शेवटी एका जीपवाल्याने वाड्यापर्यंत सोडायला होकार दिला.

भाडे तीनशे रुपये.

दारू पिलेला मुख्य आरोपी म्हणाला,

"बसा गाडीत."

हे वाक्य त्या दिवसातील सर्वात मोठा विनोद ठरला.वाड्याला पोहोचलो. 

जीपवाला पैसे मागू लागला. मुख्य आरोपीने खिसे चाचपले. पुन्हा चाचपले. आणखी चाचपले. आणि शेवटी म्हणाला, "माझ्याकडे पैसे नाहीत."

आमच्याबरोबर असलेले जामीनदार बाजीराव रोकडे आणि कै.धोंडू गवारी (चेअरमन) मला म्हणाले आता तुम्हीच काहीतरी करा. आणि दुसऱ्यांदा माझा खिसा रिकामा झाला.

आता वाडा ते मंदोशी जायचे होते.

आम्ही आमचा मित्र असलेल्या डॉक्टर लांडे यांच्याकडे गेलो. त्यांनी एक जीप मालकाला बोलावून घेतले आणि आम्हाला मंदोशी पर्यंत सोडवण्याची विनंती केली.

जीप मालक बोलला 250/- भाडे द्यावे लागेल. आमचा मुख्य आरोपी बोलला . मंदोशी मध्ये गेल्यावर गाडीमधून उतरताच तुला लगेच पैसे देतो. पैशाची अजिबात काळजी करू नको. यावरून मग आम्ही सर्वजण निर्धास्त झालो.

मंदोशीला पोहोचल्यावर पुन्हा तोच प्रकार. जीपवाला पैसे मागू लागला. मुख्य आरोपीने मोठ्या प्रेमाने मला सांगितले,

"आता तू दे पैसे. माझा मुलगा शहरातून आला की लगेच तुला देतो."

हे "लगेच" आजतागायत आलेले नाही!

त्याचा मुलगा अनेक वेळा गावात आला.

मी अनेक वेळा दिसलो.

पण पैसे मात्र मला कधीच दिसले नाहीत.

दुसऱ्या दिवशी सुट्टी होती त्यामुळे दुसऱ्या दिवशी निवांत मी काल नादुरुस्त झालेली मोटरसायकल आणण्यासाठी शिरगावला गेलो. मी मोटरसायकलवर बसलो. एक किक मारली. आणि काय आश्चर्य! मोटरसायकल पहिल्याच किकमध्ये चालू झाली! मला त्या वेळी असे वाटले की कालपासून माझी फिरकी घेणाऱ्या सर्व लोकांमध्ये मोटरसायकलही सामील होती. 

त्या दिवसानंतर मी एक धडा शिकलो  गावातील भांडणात जामीनदार मिळतात, आरोपी सुटतात, दारूड्याला दारू मिळते; पण शेवटी बिल भरण्यासाठी एक भोळा माणूस हमखास सापडतो. आणि त्या दिवशी तो भोळा माणूस मी होतो!

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती) 

धरणात बुडालेल्या आंबेगावचा समग्र इतिहास

धरणात बुडालेले आंबेगाव.

img src="..." alt=" जैन मंदिर">
डिंभे धरणात बुडालेले आंबेगाव ही एक अतिशय जुनी अशी खूप मोठी बाजारपेठ होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खेड तालुक्यातील वाडा आणि आंबेगाव तालुक्यातील आंबेगाव या अतिशय मोठ्या अशा बाजारपेठा अस्तित्वात आल्या व विकसित झाल्या.

आंबेगाव तालुक्यातील पाटण खोऱ्यातील गावे आणि माळीण,असाणे खोऱ्यातील गावे अशा चाळीसगावांची ही प्रचंड मोठी बाजारपेठ होती.

"डिंभे धरणाच्या अथांग जलाशयाखाली आज शांतपणे विसावलेले आंबेगाव हे एकेकाळी पश्चिम आंबेगाव तालुक्याचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र होते. हिरडा, तांदूळ आणि ग्रामीण व्यापारामुळे प्रसिद्ध असलेली ही बाजारपेठ हजारो लोकांच्या जीवनाशी जोडलेली होती. धरणाच्या निर्मितीनंतर गाव पाण्याखाली गेले, परंतु त्याच्या आठवणी आजही विस्थापितांच्या मनात जिवंत आहेत."

आंबेगावचा इतिहास किमान काही शतकांपूर्वीपर्यंत मागे जातो. घोड नदीच्या खोऱ्यात वसलेले हे गाव व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण बनले होते. पश्चिम घाटातील आदिवासी भाग आणि घाटमाथ्यावरील बाजारपेठांना जोडणारा हा महत्त्वाचा व्यापारी दुवा होता."

"पावसाळ्यात धुक्याची चादर गावाला वेढून टाकत असे. जांभूळ, हिरडा, आवळा, करवंद आणि सागाच्या झाडांनी परिसर हिरवागार दिसत असे. पक्ष्यांचा किलबिलाट आणि घोड नदीच्या प्रवाहाचा मंद आवाज गावाच्या वातावरणाला एक वेगळीच शांतता देत असे."

प्रमुख उत्पन्न तांदूळ आणि हिरडा :

आदिवासी भागाचे प्रमुख उत्पन्न म्हणजे भात शेती आणि जोडीला जंगलातील हिरडा गोळा करणे. हिरडा औषधी वनस्पती असल्यामुळे हिरड्याला खूप मागणी होती. हा हिरडा आंबेगाव मधील व्यापारी विकत घ्यायचे. म्हणून आंबेगावला हिरड्याचं आंबेगाव असेही म्हटले जात असे.

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात उत्तम प्रतीची भात शेती असल्यामुळे तेथे जीर, तांबडा रायभोग, खडक्या, कोलम अशा उच्च प्रातीचा तांदूळ पिकत असे. त्याचप्रमाणे नाचणी आणि सावा हे पीक सुद्धा महत्त्वाचे होते.

पश्चिम भागातील लोक खटारगाडी मधून भाताची पोती आणून आंबेगावातील भात गिरणीमध्ये भात भरडून घेत. आवश्यक तांदूळ स्वतःसाठी घेऊन उर्वरित तांदूळ व कोंडा ते आंबेगाव मधल्या व्यापाऱ्यांना विकत असत. 

आंबेगाव ही हिरड्यांची, तांदळाची आणि कोंड्याची बाजारपेठ म्हणून सबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध होती. आदिवासी भागातील तांदूळ खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र, पंजाब आणि मध्य प्रदेशातून व्यापारी लोक आंबेगावच्या बाजारपेठेत येत असत.

आंबेगाव तालुक्यात पाटण आणि आसाणे खोऱ्यात मोठ्या प्रमाणात हिरड्यांचे उत्पन्न होते.उन्हाळ्यामधील बाळ हिरडा, व दिवाळी मधील ढोर हिरडा याला महाराष्ट्रात आणि परदेशात खूप मागणी असल्यामुळे हिरडा उत्पादन हे आदिवासी समाजाचे प्रमुख उत्पन्न आहे.

आंबेगावात हिरड्यांचे अनेक व्यापारी प्रसिद्ध होते. त्यांचे मोठमोठे ट्रक होते. या ट्रकमध्ये रस्ते असलेल्या गावी जाऊन ते हिरडा खरेदी करीत असत.

हिरड्यांच्या वखारी :

आंबेगावात व्यापाऱ्यांच्या हिरड्यांच्या अनेक वखारी होत्या. या वखारीत हिरडा साठवून ते मुंबईला एक्सपोर्ट करीत असत.

आंबेगाव मध्ये अठरापगड जातीचे लोक गुण्या गोविंदाने राहत असत.आंबेगाव हे साधारण दीड ते दोन हजार लोक वस्तीचे पश्चिम भागातील सर्वात मोठे आणि सधन असे गाव होते. या गावात 80 टक्के लोक हे नोकरी न करणारे होते. तरीही ते अत्यंत सुखी आणि समृद्ध जीवन जगणारे होते.

अखेर डिंभे धरणाने घात केला:

सन 1976 मध्ये मा.शंकरराव चव्हाण पाटबंधारे मंत्री असताना डिंभे खुर्द गावाजवळ घोड नदीवर धरण बांधण्याचा निर्णय झाला आणि थोड्याच दिवसात  भूमिपूजन झाले. धरणाचे काम सन 1978 मध्ये सुरू झाले. हे धरण सन 19 92 मध्ये पूर्ण झाले. प्रत्यक्ष पाणी आडवायला सन 1993 साली सुरुवात झाली.

तत्पूर्वी आंबेगावातील स्थानिक लोकांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन केले.आपले राहते घर आणि गाव सोडून जाताना आंबेगाव मधील ग्रामस्थांना प्रचंड यतना झाल्या. ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालो. शाळा शिकलो,आपल्या शेतीत आणि शिवारात कष्ट केले, खेळलो, बागडलो, वाढलो अशा प्रिय बाजारपेठ असलेल्या गावाला सोडून जावे लागणार या कल्पनेने त्यांचे काळीज गलबलून गेले. अतिव वेदना झाल्या.

सन 1993 मध्ये प्रत्यक्ष धरणात पाणी आडवायला सुरुवात केली. बघता बघता आदिवासी समाजाची अतिशय भव्य असलेली बाजारपेठ धरणाच्या पाण्यात सा मावरून गेली. प्रत्यक्ष बघणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकले. 

एकच हलकल्लोळ झाला. जीव गलबलून गेला. आणि थोड्याच वेळात छत्रपतीच्या काळातली ही बाजारपेठ डिंभे धरणाच्या पाण्यात लुप्त झाली. फक्त आठवणी तेवढ्या शिल्लक राहिल्या. आजही या आठवणीवर लोक जगत आहेत.

तत्कालीन घरांची रचना :

तत्कालीन घरे ही बाहेरून दगड व आतून भाजीव विटा मध्ये बांधलेली होती. ही घरे कौलारू दोन पाखी होती. काही घरे चौमोळी होती. घरांच्या भिंतीमध्ये चुना भरत असत. त्यामुळे ती खूपच टिकाऊ अशी असत.अनेक गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्यांची घरे दुमजली होती. आंबेगाव मध्ये चुना कमावण्याच्या घाणी होत्या. कुंभारांच्या वीट भट्ट्या होत्या.

अठरा पगड लोकवस्तीचे गाव : 

गावात ब्राह्मण, गुजराती, मारवाडी, वाणी, तेली व मुसलमान असा व्यापारी वर्ग राहत असे. त्याचप्रमाणे मराठा, कुणबी, कोळी, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, तेली, तांबोळी, बुरुड, बौद्ध,भोई, तांबटकर, सोनार, राउळ, गोसावी, कातकरी इत्यादी स्थानिक आणि बलुतेदार, जमीनदार, वतनदार असे अनेक लोक राहत असत. हे सर्व लोक ज्यांच्या त्यांच्या धार्मिक प्रथा सांभाळून गुण्या गोविंदाने एकत्र राहत होते.

तत्कालीन वाहतूक व्यवस्था:

आंबेगाव येथे जाण्यासाठी आता डिंभे खुर्द या गावच्या पुढे जी धरणाची भिंत आहे. त्या भिंतीच्या डाव्या कोपऱ्यावरून आंबेगावला रस्ता जात असे. त्यावेळी सकाळ, दुपार आणि संध्याकाळी मुक्कामी एसटी होती. त्यावेळी मुक्कामी एसटी पाटण पर्यंत जात असे. परंतु पावसाळा सुरु झाला की चार महिने एसटी सेवा फक्त आंबेगाव पर्यंतच असे.

आहुपे व तिरपाड येथे एसटी जात नव्हती. सर्व प्रवास पायी असायचा.

आंबेगावातील व्यापाऱ्यांकडे मोठे मोठे ट्रक होते. या ट्रक मधून हिरड्याच्या मालाची वाहतूक केली जायची. आंबेगावच्या बुधवारच्या बाजारात येणाऱ्या बाजारकरूना ने - आण करण्यासाठी ट्रकचा उपयोग केला जायचा. सर्व रस्ते हे खडीचे आणि मातीचे होते. डांबरी रस्ता त्यावेळी अस्तित्वात नव्हता.

आंबेगावची भव्य मोठी बाजारपेठ :

आंबेगाव ही साधारण दीड किलोमीटर इतकी लांब अशी भली मोठी बाजारपेठ होती. या बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा अनेक किराणा मालाची दुकाने, खेळण्याची दुकाने, राईस मिल, पिठाच्या चक्क्या, हिरड्याच्या वखारी, पोलीस चौकी, तेलाचे घाणे, सुतार काम, लोहार कामाची दुकाने, हॉटेल, कपड्याचे दुकाने, शालेय स्टेशनरीची दुकाने, मंदिरे, चौक, पिंपळाची झाडे अशा अनेक प्रकाराने समृद्ध अशी प्रशस्त बाजारपेठ होती. 

या बाजारपेठेमध्ये शेवंतीलाल, चूनिलाल वाणी, बाबू वाणी, मंगू वाणी, पोपटलाल, कांतीलाल शहा, चंपा शेठ, मगन शेठ, छगन शेठ, सुमती लाल, नटवरलाल, जयंतीलाल व बच्चूशेठ शुक्ल, रतिलाल, लक्ष्मीपूत्र नरोत्तम मामा, असे मुख्य किराणा भुसाराचे, धान्य खरेदी विक्रीचे आणि हिरडा, बेहडा, तुप, मध यासारखी स्थानिक खरेदीचे आंबेगावातील मोठे व्यापारी होते.

 व्यापाऱ्यांची घरे ही मुख्यत: रस्त्याच्या दुतर्फा असून दुमजली होती. बाजारपेठेत अनेकांच्या घरावर 'हिरड्यांचे व्यापारी' अशा पाट्या लावलेल्या असत. अनेक व्यापाऱ्यांच्या दारात पाण्याचे आड होते. या अडातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होत असे. शिवाय अनेक व्यापाऱ्यांच्या हिरड्याच्या व भाताच्या कोंड्याच्या वखारी देखील होत्या. वखारी म्हणजेच गोडाऊन.

शंकराचे दगडी मंदिर: 

img src="..." alt=" शंकराचे मंदिर">
गावाच्या खाली पश्चिमेला घोड नदी होती. नदीला पावसाळ्यात मोठा पुर यायचा. नदीला सुंदर असा अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला दगडी घाट होता. तेथेच शंकराचे पुरातन असे दगडी रेखीव मंदिर होते. या मंदिराचा गाभारा पाच फूट खाली खोल होता. मंदिरात गेल्यावर पायऱ्या उतरून शिवलिंगाचे दर्शन घ्यावे लागायचे.

आंबेगाव मधील लोकांची या मंदिरावर खूप श्रद्धा होती. दररोज व प्रत्येक सोमवारी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी व्हायची. 

एखाद्या वर्षी जर पाऊस पडला नाही तर गावातील जेष्ठ लोक एकत्र यायचे.आणि महादेव मंदिर पाण्यामध्ये कोंडायचा निर्णय व्हायचा.

गावातील समस्त स्त्रीया आपापले हांडे पाण्याने भरून भजनी मंडळी सोबत भजन म्हणत मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगावर आपापले पाण्याने भरलेले हंडे रिकामे करून शिवाला जलाभिषेक करत असत. गाभारा पाण्याने भरून जाई. हर हर महादेवचा गजर होई पाऊस पडू दे ! साय माय पिकू दे ' आबादाणी होऊ दे

म्हणून महादेवाला साकडे घातले जात असे. देवाला अभिषेक व्हायचा. पाऊस पडून आबादीआबाद होईल या आंतरिक श्रद्धेने पाणी मंदिराच्या उत्तरेला असलेल्या दगडी गाय मुखातून सोडून द्यायचं. मंदिराच्या उत्तरेला पाठीमागे दगडी गायमुख होते. त्यामधून सगळं पाणी नदीच्या प्रवाहात वाहत जाई. महादेवाच्या कृपेने पाऊस पडला की गावकरी मनाने तृप्त होत. असं गाव आणि अशी श्रद्धा.

चला, आंबेगावात प्रवेश करू या.

पूर्व दिशेकडून आंबेगावात प्रवेश केला की पहिला पिराचा माळ लागायचा. तेथे पिर बाबाचे हिंदू-मुस्लीम सगळेच दर्शन घ्यायचे. थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला कमलजादेवीचे मंदिर होते. दुपारच्या वेळी काही वृद्ध लोक तेथे विसाव्याला पहुडलेले असत. मंदिराच्या जवळ गर्द झाडी होती.

सुतार काम: 

img src="..." alt=" सुतार काम ">
तिथेच सुतारांची घरे होती. तेथे नवीन बैलगाड्या तयार करण्याचे काम चालत असे. खटारगाडीच्या लाकडी चाकाच्या आऱ्या, साठ्या, लोखंडी धावा, आणि इतर साहित्य तयार करण्याचे काम चालत असे. शिवाय खटारगाडी दुरुस्तीची कामे सुद्धा केली जायची. त्यावेळी प्रसिद्ध असलेले बाबुराव भालेराव (सुतार) हे कलाकुसरीच्या लाकडी वस्तू बनवत असत.

शेजारीच नांगर, कुळव, पाभार, जुकाड, लाकडी हळशी, अशी शेतीची अनेक अवजारे नवीन आणि दुरुस्ती अशी कामे या ठिकाणी चालत असत. अनेक शेतकरी त्या ठिकाणी बसून असत. सुतार आपले काम करत राही. लोक कट्ट्यावर बसून गप्पा चघळत बसलेले असत. दुपार झाल्यावर सोबत आणलेली चटणी भाकरी तेथेच सोडून खात असत.

लोहार काम : 

img src="..." alt=" लोहार काम ">
त्या शेजारीच  लोहाराचे दुकान होते. तिथे विळे, कोयते, पहारी यांना धार लावून दिली जात असे. तसेच पहारी, खोरे, टिकाव, फाळ इत्यादी वस्तू शेवटण्याचे काम सुरू असे.

तेथे मोठा लाकडी भात्या होता. भात्याची दांडी सतत खालीवर करणारी लोहाराची म्हातारी तेथे बसलेली असे. त्यामुळे भात्याला वारा मिळायचा. आणि आग धगधगत राहायची. ऐरणीवर लोखंडाचे घाव मारून शस्त्र आणि अवजारांना धार लावायचे आणि शेवटण्याचे काम सतत चालू असे.

तेथेही मोठ्या प्रमाणात लोकांचा राबता असे. विशेषता सुगीच्या दिवसात म्हणजेच भात काढणीच्या आधी लोकांची खूपच गर्दी असे.

ग्रामदैवत मुक्ताबाई व यात्रा: 

img src="..." alt=" ग्रामदैवत मुक्ताबाई मंदिर">
अजून थोडं पुढे गेल्यावर ग्रामदैवत मुक्ताबाईचं मंदिर होते. मुक्ताबाई देवी हे आंबेगावचे ग्रामदैवत होते. 

चैत्र महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी मुक्ताबाईची मोठी यात्रा भरायची. यात्रेत पालखीचा मान पिढ्यानुपिढ्या विरणकांकडे होता. यात्रेला भागातून सर्व लोक मोठ्या उत्साहाने येत असत. गावामध्ये लोकांची प्रचंड गर्दी होत असे. सकाळी मांडव डाहाळे व हरतुरे, नारळ फोडणे, प्रसाद वाटप होत असे. तर दुपारी लोक दंडवत घेण्यासाठी मंदिरात गर्दी करत. संध्याकाळी पुरणपोळीचे जेवण असे.

संध्याकाळी देवीची पालखी निघायची. विविध गावांच्या भजनाचा कार्यक्रम असायचा. करमणुकीसाठी दत्ता महाडिक, चंद्रकांत ढवळपुरीकर, रघुवीर खेडकर, गणपत व्ही. माने, विठाबाई नारायणगावकर असे मोठे मोठे तमाशा असत. लोक तमाशा पाहण्यासाठी पायी प्रवास करत असत. त्यावेळी वाहतुकीची साधने नव्हती.

दुसऱ्या दिवशी तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम होत असे. दूर वरून पहिलवान मंडळी कुस्त्या खेळण्यासाठी आंबेगावात दाखल होत असत. सर्व पहिलवान मंडळी आणि आलेल्या पाहुणे मंडळींना आणि गावकऱ्यांना आमटी आणि भात असे जेवण असे. त्यानंतर कुस्त्यांच्या भव्य दंगली होत असत. 

शितळादेवीचे मंदिर :

मुक्ताबाईच्या मंदिराच्या मागे शितळा देवीची दोन छोटी मंदिरे होती. एका मंदिराच्या भिंतीवरील दगडावर नाग कोरलेला होता.

तसेच पुढे चालत गेल्यावर कुंभारवाड्या तील वीर मंदिर होते. ते कुंभारवाड्याचे श्रद्धास्थान होते. दरवर्षी तेथे सुद्धा जेवणाचा कार्यक्रम असायचा.

मारुती तालीम:

चौकातून खाली दगडी वाट उतरून गेलं की खालच्या मारुतीचे मंदिर. मंदिराबाहेर चाफ्याचे झाड होते. या झाडाला वर्षभर फुले येत असत. चाफयाच्या फुलांचा सुगंध दूरपर्यंत दरवळत राही. तेथेच  पहिलवानांच्या कुस्त्यांच्या तालमी चालायच्या.

हनुमान जन्मोत्सव :

img src="..." alt=" हनुमान मंदिर">
तेथून पुढे उजव्या बाजूने वर आले की रहाडीसमोर दुसरे एक मारुती मंदिर होते. तिथे श्रावण महिन्यात प्रवचने आणि अनेक धार्मिक ग्रंथांची पारायणे चालत असत. तिथे सांप्रदायिक भजने देखील होत असत. अनेक लोक श्रावण महिन्यात तेथे पारायण करत बसलेली असत.

हनुमान जयंतीला मोठ्या भक्ती भावाने हनुमान जन्मोत्सव साजरा केला जात असे. गूळ खोबऱ्याचा प्रसादाचे वाटप होई. मारुतीरायावर चाफ्याच्या पांढऱ्या फुलांचा वर्षाव व्हायचा. संध्याकाळी गॅस बत्तीच्या उजेडात भजने व्हायची.

प्रसिद्ध असे जैन मंदिर: 

img src="..." alt=" जैन मंदिर">
सरळ पुढे बाजारपेठेतून गेलं की जैन मंदिर लागायचे. दगड विटा मध्ये बांधकाम असलेल्या या जैन मंदिरात जैन धर्मातील कल्याण पार्श्वनाथ, विमलनाथ व वासुपुज्य स्वामी यांनी या मंदिरासाठीच्या जिर्णोद्धारासाठी दिलेल्या देणग्यांचा उल्लेख आहे. त्यांची नावे मंदिराच्या पुर्व भिंतीच्या संगमरवरी दगडावर कोरलेली आहेत. अजूनही उन्हाळ्यामध्ये धरणातील पाणी कमी झाल्यावर या मंदिराचे अवशेष बघायला मिळतात.

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गज लक्ष्मीचे कोरलेले शिल्प आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर सरस्वतीची मूर्ती आहे. खांबावरील कोरीव नक्षी, छतावर असलेली गोलाकार अतिशय सुंदर अशी वर्तुळे, कोरीवकाम आणि नक्षीकाम पाहण्यासारखे आहे.

आतील गाभा-याच्या प्रवेशद्वारावर  सरस्वती व दोन मोर कोरलेले आहेत. अतिशय सुंदर असे हे कोरिव काम आहे.

मंदिरात श्री पार्श्वनाथाची ध्यानस्थ बसलेली अतिशय रेखीव आणि सुरेख मूर्ती होती. हे मंदिर साधारण 1867 मध्ये बांधले होते.

आजही हे मंदिर धरणाचे पाणी कमी झाल्यावर पाहायला मिळते. इतकी वर्ष पाण्यात राहूनही मंदिर सुस्थितीत आहे.

जैन मंदिराच्या मागे मोठा भाजक्या विटांनी बांधून आणलेला मोठा आड होता. या आडाचे पाणी मंदिरासाठी उपयोगात आणत असत. जैन मंदिराच्या पुढच्या चौकात सुंदर असे श्रीराम मंदिर होते. त्या शेजारी गणपतीचे मंदिर होते.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर :

img src="..." alt=" विठ्ठल रुक्मिणी मंदिर">
पुढे गेल्यावर विठ्ठल रुक्मिणी मंदिर होते. हे मंदिर बाहेरून दगड व आतून विटा अशा पद्धतीचे बांधकाम होते. मंदिरात भजन, काकड आरत्या दररोज होत असत. तेथे प्रत्येक वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जायचा. हा सप्ताह सात दिवस चालायचा. प्रवचन, हरिपाठ कीर्तन व हरी जागर तिथे चालत असे. अनेक हरिभक्त पारायण असलेले लोक प्रवचन कीर्तन करून आपली भागवत धर्माची पताका फडकवत असत.

आषाढ महिन्यात इथूनच दिंडी निघायची. दिंडीला जाणाऱ्या लोकांमध्ये राम कृष्ण हरी चा गजर करत सारा गाव दिंडीमध्ये सामील व्हायचा. वारकऱ्यांना निरोप द्यायला भाविक लोक पिराच्या माळापर्यंत जायचे.

संक्रातीला सुगड घेऊन सगळ्या सवाक्ष्ण स्रिया विठ्ठल रखमाईच्या दर्शनाला येत असत. तिथे सुगडीचा वाण एकमेकींना देत असत. आजही या मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे भग्न मूर्ती देखील. ह्या मूर्ती साधारण सोळाव्या शतकातील असाव्यात असे जाणकारांचे  मत आहे. यावरून आंबेगाव ही बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली होती हे सिद्ध होते.

विठ्ठल मंदिरा शेजारी बाबा संत व नंदू संत यांचा वाडा होता. त्यांच्या वाड्यामध्ये मोठा आड होता. सय्यद सेठ यांच्या घरामागे मोठी विहीर होती. महादेव जोशी यांच्या वाड्यामध्ये सुद्धा मोठा आड होता.

कवडधारा मंदिर :

गावाच्या बाहेरच्या माळावर कवडधरा मातेचं छोटे मंदिर होते. तिथेच खाली खोल असा कडा होता. या कड्यामध्ये दत्त मंदिर होते. 

म्हसोबा मंदिर : 

नदीपात्राच्या कडेला म्हसोबाचे मंदिर होते. म्हसोबा मंदिराजवळच स्मशानभूमी होती. गावातील दशक्रिया विधी तेथेच होत असत.

तेलाचे दगडी घाणे:

img src="..." alt=" तेलाचा दगडी घाणा ">
गावात पूर्वी अनेक तेलाचे घाणे होते. हे तेल घाणे दगडी गोल आकाराचे असत. साधारण आठ दगडाचे घाणे होते.

नाथा केदारी, बाबुराव तेली, बबनराव मोहळे, भिकू पन्हाळे, रत्नाकर डाके यांचे  तेलाचे घाणे होते.

आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात खुरसण्याचे आणि भुईमुगाचे पीक  घेतले जात असे. हे सर्व शेतकरी लोक शेंगदाणे  व खुरासनी घेऊन बाजाराच्या दिवशी तेल गाळण्यासाठी तेथे खूपच गर्दी करत असत. वर्षभर पुरेल इतके तेल घेऊन उर्वरित तेलाची ते विक्री करत असत. खुरासण्याचा व शेंगदाण्याचा चोथा जनावरांना पेंड म्हणून त्याचा उपयोग होत असे. 

रुपाजी दगडे सावकार:

रुपाजी दगडे हे गावात मोठे सावकार होते. त्यांचा भलामोठा म्हशींचा गोठा होता. गोठ्यामध्ये चाळीस ते पन्नास म्हशी होत्या. हॉटेलला,आणि डेअरीला ते दूध घालत असत. तसेच किरकोळीने ही विक्री होत असे. ते गावातील मोठे सावकार देखील होते.

शंकरराव घोलप यांची विहीर व मोट: 

घोलप आळीला गेल्यावर शंकराव घोलप यांची तेथे खूप मोठी विहीर होती. या विहिरीवर मोट होती. या पाण्यावरच शेती बहरायची. त्यांच्या या शेताला बाग शिवार म्हणत. या विहिरीवर मोट चालायची. बैल मोट ओढायचे. थारोळ्यातून पाणी थेट शेतीला जायचे. बैलांसाठी सावली मिळावी म्हणून ओळीनं आठ-दहा निलगिरीची झाडे लावलेली होती. त्या झाडांच्या सावलीत मोट चालायची. 

चल माझ्या राजा, चल रं सर्जा 

बिगी बिगी डौलान रं, डौलान

गाऊ मोटं वरचं गाणं, रं गाणं

बुधवार आंबेगावचा बाजार :

img src="..." alt=" आंबेगावचा तत्कालीन बाजार ">
बुधवारी आंबेगावचा बाजार भरत असे. या बाजारात आहुपे खोरे आणि पाटण खोऱ्यातून अशा चाळीस गावचे लोक बाजाराला येत असत. 

शिमग्याचा बाजार व पावसाळ्याच्या पूर्वीचा आघुटीचा बाजार हे बाजार दोन ते तीन दिवस चालायचे.

शिमग्याच्या बाजाराच्या आदल्या दिवशी मोठमोठे नामांकित तमाशे आंबेगावला येत असत. व तिकटीवर तमाशा दाखवत असत. हे तमाशे पाहायला प्रचंड गर्दी व्हायची. तमाशाची कणात प्रेक्षकांच्या गर्दीने फुलून जायची.

हिरडा खरेदी :

आंबेगावच्या पुढच्या वचपे गावच्या  बाजूला पिंपळाच्या झाडाजवळ हिरड्यांचे व्यापारी, हिरडा घेण्यासाठी बसत असत. तिथे मोठ्या प्रमाणावर हिरड्यांची खरेदी होत असे. तिथे सुद्धा लोकांची खूप मोठी गर्दी पाहायला मिळत असे.

बाहेरगावचा व्यापारी वर्ग :

आंबेगावच्या बाजाराला बाहेरगावचे व्यापारी दर बुधवारी येत असत. मंचर, घोडेगाव व शिनोली येथून व्यापारी येत असत. त्यामध्ये तांदळाचे व्यापारी, घोंगड्यांचे व्यापारी, असे अनेक व्यापारी होते. शिनोलीचे गफूर भाई तांबोळी आणि मुलाणी हे खाण्याच्या विड्याची पाने विकायचे.

घोडेगावच्या आर्वीकर आणि मेहेर या व्यापाऱ्यांची आंबेगावच्या बाजारात  तंबाखू प्रसिद्ध होती. त्यावेळी खाण्यासाठी पिवळी तंबाखू व मशेरी भाजण्यासाठी असलेली बारीक पानांची तंबाखू यांना प्रचंड मागणी होती. तंबाखू घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत असे.

बच्चू शेठ शिनोलीकर हे बाजरीची 100 ते 200 पोती आणायचे. त्यावेळी बाजरी दोन रुपये किलो अशी होती. हिरडा घालून आलेल्या पैशात लोक बाजरीचे कट्टे खरेदी करायचे.

वशटाचा बाजार :

img src="..." alt=" बोंबील, सुकट बाजार">
हाडकी हाडवळ्याच्या हद्दीत वशटाचा मोठा बाजार भरत असे. लोक मोठ्या प्रमाणात वाळलेले बोंबिल, सुकट, वाकट, खारा मासा व ढोमेली मोठ्या प्रमाणात विकत घेत असत. पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी जो बाजार भरत असे त्या बाजाराला लोक आघुटीचा बाजार असे म्हणत असत. हा बाजार प्रचंड मोठ्या प्रमाणात भरत असे.

पश्चिम भागात पुढील चार महिन्यात प्रचंड पाऊस पडत असे. खूप पावसामुळे लोकांचे आंबेगावला येणे जाणे होत नसे. त्यामुळे पुढील चार महिने पुरेल असा बाजार ते एकदम भरत असत.

रेडीमेड कपडे : 

मंचरचे क्षीरसागर रेडीमेड शिवलेले कपडे  आणायचे. तेथे गंडेपट्ट्याच्या चड्ड्या, बनियन, अंडरवियर, टॉवेल, टोप्या, मुलांचे गणवेश, खाक्या चड्डया व पांढरे शर्ट, छत्र्या, लहान मुलांची कपडे, लुंग्या अशा अनेक प्रकारचे कपडे आठवडे बाजारात विक्रीस असत. 

पेठेत अनेक मोठमोठी कापड दुकाने होती. दैनंदिन कपडे त्याचप्रमाणे लग्नाचे कपड्यांचे बस्ते, मानापनाची लुगडी, टॉवेल टोप्या इत्यादी साहित्य मोठ्या प्रमाणात शहा यांच्या कपड्याच्या दुकानातून खरेदी केले जात असे. शिवाय अजूनही दोन-चार कपड्यांचे दुकान होती.

बस्ता बांधल्यानंतर दुकानदार बस्ता बांधण्यासाठी कपडे घेण्यास आलेल्या आलेल्या लोकांना दोन-तीन किलो लाडू घेऊन देत असे. बस्त्याला आलेल्या लोकांना  लाडूचे वाटप होत असे. काही लहान मुले केवळ लाडू खायला मिळतो म्हणून लग्नाच्या बस्त्याला हट्ट करून जात असत. 

भांड्यांची दुकाने :

शेजारीच भांड्यांची दुकाने होती. लग्नसराईच्या वेळी ही दुकाने तुफान चालायची. अहेराची भांडी, घरगुती भांडी, तांब्या पितळेची भांडी या ठिकाणी मिळत असत. पश्चिम भागातून आलेले अनेक लोक या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भांड्यांची खरेदी करत असत.

घड्याळाची दुकाने आणि दुरुस्ती :

त्यावेळी पेठेमध्ये एक-दोन घड्याळाची दुकाने होती. तेथे नवीन घड्याळ घेण्यासाठी आणि घड्याळ दुरुस्तीसाठी लोकांची गर्दी होत असे. विशेष म्हणजे तेव्हा चावीची घडाळे होती. दररोज सकाळी घड्याळाला चावी द्यावी लागत असे. चावी दिली तरच घड्याळ चालायचे.

सायकल रिपेअरिंग:

थोडे पुढे गेल्यावर सायकल दुरुस्तीचे दुकान होते. या ठिकाणी सतत सायकलींची दुरुस्ती केली जात असे. अनेक लोक आपल्या सायकली दुरुस्त करण्यासाठी या ठिकाणी घेऊन येत  असत.

शालेय स्टेशनरी :

सायकल रिपेरिंग दुकाना शेजारी शालेय स्टेशनरीचे दुकान होते.अजून थोडे पुढे गेल्यावर अजून दोन दुकाने होते.

या दुकानांमध्ये शालेय साहित्य, वह्या पुस्तके, नवनीत गाईड, दहावीचे अपेक्षित प्रश्नसंच, वह्या पुस्तकांचे कव्हर, कंपास पेटी, रंगपेटी, पेन आणि पेन्सिल असे अनेक साहित्य मिळत असे. शाळा सुरू होण्यापूर्वी या दुकानांमध्ये शालेय साहित्य घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची अगदीच झुंबड उडालेले असे.

कासार बांगड्यांचे दुकान :

स्टेशनरीच्या शेजारी शेजारी कासारांची दुकाने बांगड्या भरण्यासाठी मांडलेली असत. त्यावेळी हातभर बांगड्या घालण्याची पद्धत होती. अनेक रंगीबेरंगी बांगड्यांची बंडले लक्ष वेधून घेत असत, सणावाराला, यात्रेला, लग्नकार्याला हौसेने बांगड्या हातभर भरण्याची पद्धत होती. 

प्रसिद्ध धोंडिबा न्हावी:

धोंडीबा कृष्णा शिंदे यांचे आंबेगाव मध्ये अतिशय प्रसिद्ध असे केश कर्तनालय दुकान होते. ते मोठे बलुतेदार देखील होते. बलुतेदार म्हणजे वर्षभर एखाद्या कुटुंबाच्या पुरुष व्यक्तींचे केस कापायचे. व त्या बदल्यात भात काढणीच्या वेळी त्यांना त्यांना ठरलेले भात आणि कठाण द्यायचे. 

आता तुम्ही म्हणाल कठाण म्हणजे काय? तर सुगी संपल्यानंतर ज्या जमिनीना ओल आहे तेथे लोक हरभरा, वाटाणा, मसूर असे धान्य पेरायचे. या धान्याचे मोठे पीक घ्यायचे. यालाच कठाण कठाण असे म्हणतात.

आंबेगावात अजूनही दोन-तीन नाव्ह्यांची दुकाने होती.

पडकई :

त्यावेळी पश्चिम आदिवासी भागात भात आणि नाचणीची शेती केली जायची. त्यासाठी माघ महिन्यात प्रत्येक गावात पडकई असायची. 

पडकई म्हणजे गावातील सर्व शेतकरी लोक एकत्र येऊन प्रत्येकाच्या शेतात एक दिवस काम करायचे. त्यालाच पडकई असे म्हणतात. त्यावेळी नाचणीची आणि भाताची रोपे भाजायची पद्धत होती. 

त्यासाठी झाडाच्या फांद्या तोडून त्यांची ओझी एका ठिकाणी ओळीने रचून ठेवायची. यालाच राब काढणे असे म्हणतात. किंवा राबणी असेही म्हटले जाते. 

झाडाच्या फांद्या वाळल्यावर त्या शेत नांगरून केलेल्या भुसभुशीत जमिनीवर अंथरूण त्यावर गवत टाकून पेटवून देतात यालाच दाढ भाजणे असे म्हणतात. तर प्रत्येक गावात अशा पडकई असायच्या. प्रत्येकाच्या शेतात राब काढायला जायचा. किंवा इतर बांधबंधिस्तीची कामे केली जायची. 

काही लोक पडकई मध्ये भाग घेत नसत. किंवा इतर कारणामुळे त्यांना ते शक्य नसे. त्यावेळी ते ठराविक पैसे देऊन आपल्या शेतात ही पडकई राबवून घेत असत. त्यावेळी गावात अनेक लोकांकडे अशा पडकई राबवून घेतल्या जायच्या. त्यामुळे त्यांच्याकडे बरेच पैसे जमा होत असत. 

हे सर्व पैसे एकत्र करून हे गावातील लोक होळीच्या बाजाराला आंबेगावला जात असत. प्रत्येक पडकाईवाले 25 ते 30 गुळाच्या ढेपी खरेदी करीत असत. 

त्याचप्रमाणे 50 ते 60 किलो हरभऱ्याची डाळ खरेदी करत असत. 30 ते 40 किलो खोबरे खरेदी केले जाई. व घरी गेल्यानंतर त्यांचे समान वाटप करत असत.

ही सर्व खरेदी एका पडकईची होती. तर अशा गावे आणि वाड्यावत्यांसह त्यावेळी पश्चिम भागात साधारण शंभर ते सव्वाशे पडकई होत्या. त्यामुळे किती माल संपत असेल याचा विचार करा. शिवाय फुटकळ गिऱ्हाईक वेगळेच.

👉🏻 हेही वाचा  धरणात बुडालेले खेड तालुक्यातील वाडा गाव

व्यापाऱ्यांची वर्षाची कमाई दोनच बाजारांत:

यावरून आंबेगावच्या बाजारपेठेचा व्याप लक्षात घेता ही किती मोठी बाजारपेठ होती याचा अंदाज येतो. शिमगा आणि आघुटी या दोनच बाजारात व्यापाऱ्यांची संपूर्ण वर्षाची कमाई होत असे.

आंबेगाव ही गुळाची बाजारपेठ :

img src="..." alt=" गुळाच्या ढेपी ">
त्यावेळी आंबेगावच्या बाजारात प्रचंड गुळाच्या ढेपी खपायच्या. प्रत्येक ढेप ही साधारण 20 किलोची असायची. डाळीची पोतीच्या, पोती रीती व्हायची. त्यामुळे आंबेगाव ही गुळाची बाजारपेठ म्हणूनही प्रसिद्धीस आली होती.

शिमग्याच्या बाजाराला यात्रा, जत्रा, सण उत्सव व लग्न खरेदी साठी मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी व्हायची. त्यावेळी मांडवकर लुगडी खूपच प्रसिद्ध होती. शिमगा आणि अघुटी हे बाजार दोन ते तीन दिवस चालत असत.

कासाराच्या बांगडीच्या दुकाना शेजारी असलेल्या चणे फुटाण्याच्या दुकानापासून किराणा व भुसार मालाची ओळीने दुकाने मांडलेली असत. 

बाजारात खाण्याच्या वस्तुपासून, साठवून ठेवायच्या वस्तू पर्यत सारं काही विक्रीस उपलब्ध असे. पेठेमध्ये सुद्धा अनेक किराणा मालाची दुकाने होती.

बाजाराच्या दिवशी नेहरू चौका पासून मुक्ताबाईच्या मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बाजाराची पालं मांडून विक्रीसाठी वस्तू ठेवलेल्या असत. मोठे दुकानदार मंगळवारीच आंबेगावला मुक्कामाला येत.

खाऊ गल्ली आणि हॉटेल:

त्यावेळी बाजारात भोकरे शेठ यांची ओली भेळ फारच प्रसिद्ध होती. बाजार करून झाल्यावर लोक भेळ खाण्यासाठी तिथे जमायचे. मटकी भेळवाला मटकी भेळ घेऊन बाजारातून फिरायचा. व आपला माल हातोहात संपवायचा. 

गावात इनामदारांचे आणि बबनराव घोलप यांचे हॉटेल प्रसिद्ध होते. बबनराव घोलप यांची साबुदाणा खिचडी खूपच प्रसिद्ध होती. त्यांचे कळीचे लाडू खूपच लोकप्रिय होते. हे लाडू कोकणातील धसई, कर्जत आणि मुरबाड पर्यंत निर्यात होत असत. इतकी अप्रतिम चव त्यांच्या लाडू मध्ये होती.

सय्यद शेठ यांची मिसळ, वडा आणि खाज्या प्रसिद्ध होता. मिसळ खाण्यासाठी सय्यदशेठ यांच्या हॉटेलात खूपच गर्दी होत असे. शिवाय नानाचा गुळाचा पेढा आणि दळवी आचाऱ्याचा पेढा सुद्धा खूपच लोकप्रिय होता. अजूनही त्याची चव अनेकांच्या जिभेवर रेंगळत असेल.

नाथाभाऊ च्या चिवड्याची सुद्धा अनेकांना आठवण येत असेल.तसेच त्यांची भजी आणि बर्फी सुद्धा तितकीच प्रसिद्ध होती. 

बुवा राऊळ यांची कांदा भजी खूपच फेमस होती. बुवा राऊळ हे कढईमध्ये भज्यांचा घाणा सोडत असत तेव्हा त्याचा दरवळ असमंतात दरवळत असे. आणि त्या दरवळीने खवय्यांचे पाऊल बुवा राऊळ यांची भजी खाण्यासाठी आपोआप वळत असत. 

ममत्या नाना घोलप यांचेही हॉटेल प्रसिद्ध होते.

घोंगड्यांचा व्यापार :

आंबेगावच्या बाजारात जून महिन्यात घोंगड्यांना खूप मागणी असायची. खूप मोठा घोंगड्यांचा बाजार भरत असे. सोलापूर वरून व्यापारी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच घोंगड्यांचे मोठमोठे बंडल आंबेगावमध्ये दाखल होत असत. 

गावातील मनाजी कुंभार यांच्याकडे ह्या घोंगड्या बांधलेले बंडल उतरवायचे. त्या बदल्यात त्यांना भाड्यापोटी आठ दहा घोंगड्या देण्यात येत असत.

आंबेगावच्या बाजाराच्या दिवशी  ग्रामपंचायत शेजारी मोकळ्या जागेत ते निरनिराळ्या घोंगड्या विक्रीसाठी ठेवत असत.पांढऱ्या,करड्या आणि काळ्या रंगाच्या घोंगडया विक्रीसाठी उपलब्ध असत.या घोंगड्या आठ फूट, दहा फूट आणि बारा फूट लांबीच्या असत. ग्राहकांची त्या ठिकाणी घोंगड्या घेण्यासाठी एकच झुंबड उडालेली असे.

आयुर्वेदिक औषधांची दुकाने:

लमाण समाजही कवडधरा देवीच्या माळावर उतरत. ते लोक आयुर्वेदिक  औषधे, हातातील अंगठ्या, खडे, शंख विकत असत. त्यांच्या महिलांचा पोषाख रंगीबेरंगी आणि कपड्यांवर बिलोरी आरसे असा असे.आजारी असलेल्या माणसाच्या हाताला ते कुठलातरी मलम चोळत. मलम चोळल्यावर हाताच्या त्वचेवरून मोठ्या प्रमाणात धूर निघत असे. तिथे सुद्धा अनेक रुग्ण त्यांच्याकडून उपचार घेत असायचे.

वैदू समाज:

सुगीच्या दिवसात वैदू समाज दरवर्षी आंबेगावात येत असे. हे लोक पिराच्या माळावर उतरत असत.आणि आपले पाल म्हणजेच तंबू पिराच्या माळावर ठोकत. त्यामध्येे आपला संसार थाटत असत.

वैदु लोक हे आदिवासी भागातील गावागावांमधून अगदी सकाळी सकाळी डबे sss करा, डब्याला झाकण sss बनवा, अशी हाळी देत फिरून रिकामे तेलाचे डबे घेऊन त्याच्या वस्तू बनवून ते आदिवासी भागात विकत असत. 

तुटलेल्या जुन्या लोखंडी वस्तूंना जोड देत असत. त्या बदल्यात भात घेत असत. काही वैदू जडीबुटीचे औषध लोकांना देत असत. तर काहीजण तुंबड्या सुद्धा लावत असत.शरीराच्या दुखऱ्या भागात ते मोठमोठ्या सुया टोचून शरीरातील काळे रक्त काढत असत. यालाच तुंबडी लावणे असे म्हणत. तुंबडी लावल्यावर अनेक लोक बरे झाल्याची सुद्धा उदाहरणे आहेत.काही घरगुती उपाय करत. संध्याकाळी ते आपल्या पिराच्या माळावरील पालावर येत असत.

सुया घे, दाभण घे, बायो:

वैदू स्रिया म्हणजेच वैदिनी गोधड्या शिवायच्या सुया, दाभण, दोऱ्याचे बंडल, पोत, नाकातील फुल्या, केसातील चाप, आरसे, कंगवे, लहान मुलींच्या बांगड्या, व लहान मुलांसाठी केसावर फुगे विकत असत. त्यांच्याकडून स्रिया हातावर व कपाळावर गोंदून घेत असत. व त्यांच्या कडील साहित्याची खरेदी करत.

त्यांच्या डोक्यावर गोधडी सारखी एक मोठी खोळ असे. त्यामध्ये ते विक्री केलेल्या वस्तूच्या बदल्यात भात घेत असत. त्यांच्या या खोळीमध्ये मनभर भात सहज मावत असे.

साधारण दीड-दोन महिने त्यांचा मुक्काम आंबेगावातील पिराच्या माळावर असे.

त्यांनी गोळा केलेले भात गुंजाळाच्या गिरणीतून भरडून त्याचे तांदूळ करून घेत. गरजेपुरता तांदूळ ठेवून उर्वरित तांदूळ  शेवंती शेठ यांना विकत असत.  

म्हाताऱ्या झालेल्या वैदिनी त्यांच्या पालात बसून गोधड्या शिवायचे काम करत. व त्या गोधड्या विकत असत. किंवा व्यापारी लोकांना गोधड्या शिवून देत असत. त्यासाठी त्यांची मजुरी घेत असत.

पावसाळा सुरू झाला की आंबेगावला वळसा मारून घोडनदी पुढे धावत असे. त्याचप्रमाणे बोरघर कडून आलेला ओढा, कड्यात उतरून नदीला मिळायचा. त्यामुळे बाराही महिने ओढ्याला आणि नदीला पाणी असायचे.

गावात प्रवेश केल्यावर धोंडीबा कातकऱ्यांच्या घरामागे मोठी विहीर होती. तसेच नेहरू चौकाजवळ मोठी विहीर होती. या विहिरीला बाजार विहिर असे म्हणत असत. बाजाराला आलेले बाजारकरू या विहिरीवर पाणी पीत असत.

गाव विहीर :

उजव्या बाजूला ओढ्याकडे जाताना एक विहीर होती. या विहिरीला गाव विहीर असे म्हणत. या विहिरीच्या पाण्याची चव  अमृतासारखी होती. सर्व गाव विहिरीचे पाणी शेंदून पिण्यासाठी वापर करायचे.

कुंभार वाडा :

कुंभार वाड्याच्या मागे श्री गोवर्धन शेठ यांच्या घरापुढे मोठा आड होता. कुंभार वाड्यामध्ये अनेक कुंभारांकडे गाढवे होती. ही गाढवे हिरड्याची ओझी, माती, वाळू अशा जड मालाची वाहतूक करत असत. त्यामुळे कुंभारांचा हा व्यवसाय मोठा भरभराटीला आला होता.

नदीच्या बाजूला अनेक कुंभारांच्या वीटभट्टी होत्या. वीटभट्टी साठी लागणारी माती गाढवावर वाहून आणली जात असे.

त्याशिवाय चुली बनवणे, गाडगी, मडकी, मोठमोठे रांजण, बैलपोळ्याला बैल आणि गणपती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. आणि पश्चिम आदिवासी भागातून या सर्व साहित्याला खूप मोठी मागणी होती. विशेषता त्यांच्या माठाला उन्हाळ्यात खूप मोठी मागणी असायची. थंड पाण्यासाठी आंबेगावातील कुंभाराचे माठ फारच प्रसिद्ध होते. त्यांच्या चुलीसुद्धा खूपच लोकप्रिय होत्या.

गडगी

खाली उत्तरेला गेल्यावर गाडगीचा जिवंत पाण्याचा झरा. गाडगीत चोवीस तास बारा महिने आणि तीनही ऋतूत जिवंत पाण्याचा झरा वहायचा. तेथे पाणी भरपूर असायचे पण हे पाणी आळणी आणि मचूळ होते. त्यामुळे हे पाणी कुणीच पीत नसत. 

डाव्याबाजुला मोरोपंत संत व बाबा संत यांच्या वाड्यात मोठा आड होता. बंडोपंत यांच्या घरीही पाण्याचा मोठा आड होता. 

शाळा व विद्यालय:

आंबेगाव येथे चौथीपर्यंत मराठी शाळा होती व इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत मा. कृष्णराव मुंडे साहेबांच्या आदिवासी शिक्षण संस्थेचे हायस्कूल होते. त्या ठिकाणी 400 ते 500 विद्यार्थी शिक्षण घेत असत. शिवाय तिथे मुलांना राहण्यासाठी वस्तीगृहाची सुद्धा सोय केलेली होती.

पोस्ट ऑफिस :

आंबेगावमध्ये पोस्टाचे ऑफिस देखील होते. या पोस्टमधून पश्चिम भागात पोस्टाचे काम चालत असे. साधी पोस्ट कार्ड, आंतरदेशीय पत्र, तार आणि मनीऑर्डर अशी सर्व प्रकारची व्यवस्था या पोस्टमध्ये होती.

पोलीस चौकी:

आंबेगाव गावात पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या इमारतीमध्ये पोलीस चौकी होती. बाजाराच्या पोलीस हवालदार आणि शिपाई हे बसून असत. अनेक प्रकारची भांडणे, वादविवाद पोलीस स्टेशनला येत असत. 

सरकारी कार्यालय:

आंबेगावात ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, फॉरेस्ट डिपार्टमेंट, पोलीस चौकी, पोस्ट ऑफिस, जिल्हा परिषदची शाळा, हायस्कूल, मुलांचे वसतिगृह, मंडल अधिकारी यांचे कार्यालय, विविध कार्यकारी सोसायटी व जनावरांचा दवाखाना अशी अनेक कार्यालये होती. सर्व शासकीय कर्मचारी आंबेगावात वास्तव्य करून राहायचे.

गावाजवळ, पिंपळ, आंबा, जांभूळ, साग, सादडा, हिरडा, सायर, काकड, पांगारा, मोगीर, आईन, तोरणे, आंभेळी, काटी साबर, चिल्हार, आवळा, करवंद अशी अनेक झाडे आणि झुडपे होती.

तत्कालीन पेहराव :

त्यावेळेसच्या लोकांचा पेहराव हा धोतर पैरण व डोक्यावर पागोटे तर काही लोक लेंगा पैरन आणि टोपी घालायचे. तर स्रिया लुगडे आणि चोळी किंवा झंपर हा वेश परिधान केलेला असायचा. वयोवृद्ध स्त्रिया मांडवकर लुगडी नेसायच्या तर तरुण आणि मध्यमवर्गीय महिला छापील पातळ लुगडे नेसायच्या. लहान मुले चड्डी आणि सदरा घालत तर मुली रंगीबेरंगी झगा आणि झंपर घालत असत.

शालेय गणवेश मुलांसाठी खाकी चड्डी, पॅन्ट, पांढरा शर्ट आणि टोपी असा असे. तर मुलींसाठी निळी फ्रॉक, निळा झगा, आणि पांढरा शर्ट (झम्पर) लाल रिबनी असा असे.

मोडी लिपी अनेकांना येत होती. त्यावेळेस सर्व हिशोब तोंडी चालत असे. पावकी, निमकी, दिडकी, अडीचकी यावर त्यांचा विशेष भर असायचा.

तत्कालीन शेती:

भात हे मुख्य पीक होते. तसेच नाचणी व सावा ही पावसाळी पिके होती. तर रब्बी हंगामात वरई, उडीद, मूग, भुईमूग, घेवडा, वाल, हरभरा, वाटाणा, मसूर, हुळगा व चवळी हया पिकांचे उत्पादन होत असे. शिवाय काही लोक बागायत पिके देखील घेत असत.

डिंभे धरण झाल्यामुळे या पाणलोट क्षेत्रात आंबेगाव, कोकणेवाडी, कानसकरवाडी, कोलतावडे, फुलवडे, वचपे, कळंबई, दिगद आणि मेघोली ही गावे पूर्णतः धरणाच्या पाण्यात लुप्त झाली. काही उर्वरित गावांची शेती पाण्याखाली गेली. त्यामुळे ती गावे सुद्धा विस्थापित झाली.

कोकणेवाडी आणि बोरघर :

कोकणेवाडी आणि कानसकरवाडी या आंबेगावच्या  वाडी होत्या. या वाडीत कोकणे आणि कानसकरांची घरी होती.

तर बोरघर हे आंबेगावच्या उत्तरेला अगदीच समोरासमोर होते. बोरघर हे स्वतंत्र्य गाव आहे.

सर्वात मोठी निर्यातदार बाजारपेठ :

आंबेगाव ही सर्वात मोठी तांदूळ, हिरडा आणि भाताच्या कोंड्याची प्रचंड मोठी निर्यातदार बाजारपेठ होती. आंबेगाव मधून हिरडा, तांदूळ आणि भाताचा कोंडा सबंध महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर पोहोचवला जात होता. तेथील व्यापाऱ्यांकडे मोठमोठे ट्रक होते. या ट्रक मधून माल एक्सपोर्ट केला जात असे.

वचपे गाव : 

वचपे गावाच्या जवळ दोन नद्यांचा संगम होत असे. या संगमाजवळ नवव्या शतकात शिलाहार राजानी बांधलेले अतिशय सुंदर असे दगडी शिवमंदिर होते. हे मंदिर अतिशय जागृत असे होते.

img src="..." alt=" शिव लिंग">
त्या ठिकाणी महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरत असे. या यात्रेला शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी पश्चिम भागातून मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे.

महाशिवरात्रीच्या दिवशी त्या ठिकाणी अनेक खाऊची आणि खेळण्याची दुकाने येत असत.

वचपे गावच्या नदीच्या कडेला गावात जर मोठा कार्यक्रम असेल तर नदी मधून आपोआप भांडी बाहेर येत असत. ही भांडी वापरून झाल्यावर पुन्हा घासून पुसून नदीच्या काठावर ठेवली जात. आणि त्यानंतर ही भांडी गायब होत असत. अशी एक आख्यायिका देखील होती.

वचपे आणि कळंबईच्या मध्ये नदीमध्ये तास होते. या तासामध्ये पाणी शांत असल्यावर पाण्यात बघितल्यावर सुंदर अशा मंदिराची प्रतिकृती पाण्यामध्ये दिसायची. परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मंदिर नव्हते.असे असतानाही या पाण्यात मंदिराची प्रतिकृती दिसणे म्हणजे एक आश्चर्यच होते.

आंबेगाव हे केवळ व्यापाराचे केंद्र नव्हते, तर लोककला आणि लोकसंस्कृतीचेही केंद्र होते. भजने, कीर्तने, हरिपाठ, तमाशे, कुस्त्या, भारुडे आणि यात्रांमधील लोकनृत्ये यांमुळे गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध झाले होते."

गाव सोडताना अनेकांनी आपल्या घरातील उंबरठ्याला, देवघराला आणि अंगणातील झाडांना नमस्कार केला. काहींनी घरातील माती सोबत नेली. अनेक वृद्धांच्या डोळ्यात अश्रू होते. पुनर्वसन झाले, परंतु जन्मभूमीची ओढ मात्र कधीच संपली नाही."

आज डिंभे धरणाच्या शांत पाण्याकडे पाहताना त्या पाण्याखाली दडलेले रस्ते, मंदिरे, बाजारपेठ, शाळा आणि असंख्य आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. 

आंबेगाव जरी भौतिक स्वरूपात अस्तित्वात नसले, तरी तेथील संस्कृती, इतिहास आणि लोकांच्या स्मृती आजही जिवंत आहेत. या स्मृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्या गावाला खरी आदरांजली ठरेल."

लेखक:- रामदास तळपे.(ग्रामीण संस्कृती)

सदर लेखासाठी श्री.आत्माराम जगदाळे सर यांच्या संदर्भ लेखाचा उपयोग झाला. त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🏻

एखाद्या लेखाची नक्कल करणे हे भारतीय कॉपीराइट कायदा, 1957 नुसार कॉपीराइट उल्लंघनाचा गुन्हा आहे.

या कायद्याच्या कलम 63 नुसार, कॉपीराइट उल्लंघनासाठी 6 महिने ते 3 वर्षांपर्यंत कारावास आणि ₹ दोन लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तरी कृपया हया लेखाची कोणीही नक्कल करू नये


  व्हिडिओ सौजन्य:- श्री. शांताराम बाम्हणे 

 













आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...