महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीत अनेक सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
प्रत्येक सणामागे निसर्ग, शेती, पशुपक्षी आणि माणसांमधील नात्याची एक सुंदर परंपरा दडलेली आहे. त्यापैकी बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या जीवनातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि कृतज्ञतेचा सण मानला जातो.वर्षभर शेतीत राबणाऱ्या आपल्या बैलांप्रती प्रेम, आदर आणि ऋण व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. त्यामुळे हा केवळ धार्मिक सण नसून शेतकरी आणि बैल यांच्या अतूट नात्याचा उत्सव आहे.
आज अनेक जण शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांनी आपल्या गावापासून दूर शहरात स्थायिक झाले आहेत. आधुनिक जीवनाच्या धावपळीत अनेक गोष्टी मागे पडल्या; पण बैलपोळ्याचा दिवस जवळ आला की बालपणातील आठवणी नकळत डोळ्यांसमोर उभ्या राहतात. बैलांच्या गळ्यातील घंटांचा मंजुळ नाद, ताशा-ढोलांचा गजर, पुरणपोळीचा सुगंध, गावभर सजून निघालेल्या बैलांच्या मिरवणुका आणि संपूर्ण गावात पसरलेला उत्साह पुन्हा एकदा मनात जागा होतो.
माझ्याही मनात बैलपोळ्याच्या असंख्य आठवणी आजही ताज्या आहेत. त्या आठवणींची उजळणी केली की नकळत मी माझ्या बालपणात जाऊन पोहोचतो.
महिनाभर आधी सुरू होणारी तयारी
आजकाल अनेक सण अगदी एका-दोन दिवसांत उरकले जातात. परंतु पूर्वी तसे नव्हते. बैलपोळ्याची तयारी जवळजवळ महिनाभर आधी सुरू होत असे. गावात सर्वत्र या सणाची चर्चा रंगत असे. कोणत्या बाजारातून सजावटीचे साहित्य आणायचे, बैलांच्या शिंगांना कोणता रंग द्यायचा, नवीन घंटा घ्यायच्या की नाही, यावर शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होत असे.
भाद्रपद महिन्यापर्यंत पावसाने चांगली कृपा केलेली असे. शेतातील भात, बाजरी, नाचणी, मका, भुईमूग, तूर अशी सर्व पिके डौलाने डोलत असत. हिरवागार निसर्ग पाहून मन आनंदून जात असे. पेरणी, नांगरणी आणि खुरपणी यांसारखी मोठी कामे पूर्ण झालेली असल्याने शेतकऱ्यांनाही थोडासा मोकळा श्वास घेण्याची संधी मिळत असे.
त्या काळी जवळजवळ प्रत्येक शेतकरी कुटुंबाकडे बैलजोडी असायची. एखाद्या गरीब कुटुंबाकडे बैल नसतील, तर शेजारी त्यांना आपली बैलजोडी देत. गावात परस्पर सहकार्याची भावना इतकी मजबूत होती की कोणालाही एकटे वाटत नसे.
रानात चरायला जाणारे बैल
श्रावण आणि भाद्रपद महिन्यात दुपारचे जेवण झाले की गावातील शेतकरी आपल्या बैलांना घेऊन माळावर किंवा रानात चरायला जात असत. आम्ही लहान मुलेही त्यांच्या मागे-मागे धावत जायचो. मोकळ्या आकाशाखाली हिरव्यागार गवतावर चरताना बैल पाहणे हीसुद्धा एक वेगळीच मजा होती.
बैल निवांतपणे गवत खात असत. कधी एखादा बैल उड्या मारत असे, तर एखादा शांतपणे झाडाच्या सावलीत उभा राहत असे. त्यांच्या गळ्यातील घंटांचा मंद आवाज वाऱ्यावर तरंगत दूरपर्यंत ऐकू येत असे. तो नाद आजही माझ्या कानात तसाच घुमतो.
त्या वेळी काही कारागीर स्वभावाचे शेतकरी जंगलातून विशिष्ट प्रकारचे लाकूड आणत. त्या लाकडापासून ते अत्यंत सुंदर चौरे तयार करत. चौरे तयार करणे हे काही एका दिवसाचे काम नव्हते. अनेक दिवस मेहनत घेऊन ते कोरले जात. त्यावर लाल, हिरवा, पिवळा, निळा अशा रंगांनी नक्षीकाम केले जाई. बैलांच्या शिंगांमध्ये ते बसवले की बैलांचा रुबाब आणखी खुलून दिसत असे.
गावातील उत्साह
जसा-जसा बैलपोळा जवळ येई, तसतसा गावाचा रंगच बदलत असे. आठवडी बाजारात सजावटीच्या वस्तूंची दुकाने भरत. रंगीबेरंगी गोंडे, बाशिंगे, मण्यांच्या माळा, घंटा, घुंगुरमाळा, वेसण, शिंगांना लावायचे बेगड, सोनेरी रंग, झुली आणि इतर साहित्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असे.
बाजारातून घरी परतताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असे. मुलांना तर नवीन घंटा किंवा गोंडे हातात घेऊन पाहण्याची फार उत्सुकता असे. घरात ते साहित्य उघडून पाहिले की बैलपोळा जवळ आल्याची जाणीव अधिकच होत असे. गावातील काही तालीवर शेतकऱ्यांकडे अतिशय सुंदर अशा झुली असत. बैलांना झुली घातल्यावर बैल जोड खूपच आकर्षक दिसत असे.
अखेर बैलपोळ्याची पहाट
आणि मग तो दिवस उगवे बैलपोळा!
पहाटेपासूनच गावात वेगळे वातावरण असायचे. कोंबड्याच्या आरवण्याबरोबर शेतकरी उठत. बैलांना प्रेमाने चारा घालून त्यांना पुन्हा एकदा रानात चरायला घेऊन जात. कारण दुपारनंतर त्यांना सजवायचे असायचे.
सकाळी साधारण अकरा वाजेपर्यंत बैल घरी आणले जात. घरातील मंडळी जेवण उरकत आणि त्यानंतर सर्वजण नदीकडे किंवा ओढ्याकडे निघत. आम्ही लहान मुलेही आनंदाने त्यांच्या मागे धावत असू. त्या दिवशी नदीवर जणू छोटेखानी जत्राच भरत असे.
नदीवरील आंघोळ, बैलांची देखणी सजावट आणि ताशा-ढोलांच्या गजरातील मिरवणूक
नदीकडे निघालेला तो ताफा आजही माझ्या डोळ्यांसमोर जिवंत उभा राहतो. प्रत्येक शेतकरी आपल्या बैलांच्या कासऱ्या हातात धरून चाललेला असे. काही बैल शांतपणे मालकाच्या मागे चालत, तर काही उड्या मारत, शिंगे हलवत, गळ्यातील घंटा वाजवत पुढे जात. आम्ही लहान मुले त्यांच्या मागे धावत असू. त्या दिवशी कोणाच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नसे. सर्वत्र उत्साह, आनंद आणि समाधान भरून राहिलेले असे.
नदीवर पोहोचल्यानंतर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळे. गावातील जवळजवळ सर्वच बैलजोड्या तेथे जमलेल्या असत. नदीच्या काठावर माणसांची लगबग सुरू असे. कुणी बैलांना पाण्यात उतरवत असे, कुणी त्यांच्या अंगावर पाणी ओतत असे, तर कुणी दगडाने किंवा नारळाच्या शेंड्याने अंग घासून स्वच्छ करत असे.
वर्षभर शेतात राबलेल्या त्या बैलांना त्या दिवशी जणू राजासारखी वागणूक मिळत असे. त्यांच्या अंगावरील माती, धूळ आणि घाम पाण्याबरोबर वाहून जात असे. काळेभोर, पांढरेशुभ्र, तांबूस किंवा करड्या रंगाचे बैल आंघोळीनंतर आणखीच तेजस्वी दिसत. त्यांच्या डोळ्यांतही एक वेगळे समाधान दिसत असे.
बैलाच्या शेपटीला धरून डोह पार करण्याचा थरार
नदीवर जाण्यामागे आमच्यासारख्या लहान मुलांचा एक वेगळाच आनंद लपलेला असे. बैलांना आंघोळ घातल्यानंतर काही बैल नदीच्या खोल डोहातून पोहत दुसऱ्या काठावर जात असत. त्या वेळी आम्ही लहान मुले बैलाच्या शेपटीला घट्ट धरून पाण्यात उतरायचो.
पहिल्यांदा शेपटी धरून पाण्यात उतरताना मनात थोडी भीती वाटायची. डोह खोल असल्यामुळे पायाला तळ लागत नसे. नदीच्या मध्यभागी गेल्यावर क्षणभर हृदयाचे ठोके वाढत. पण मोठी माणसे नेहमी एकच गोष्ट सांगत असत...
"काही झाले तरी बैलाची शेपटी सोडायची नाही."
त्या एका वाक्यावर आमचा पूर्ण विश्वास असे. बैल शांतपणे पोहत पुढे जात असे आणि आम्ही त्याच्या मागे. काही क्षणांत नदीचा दुसरा काठ येई आणि आम्ही आनंदाने उड्या मारत किनाऱ्यावर पोहोचत असू.
तो विजयाचा आनंद शब्दांत सांगता येणार नाही. जणू एखादी मोठी मोहीम यशस्वी झाली आहे असे वाटत असे. नंतर पुन्हा एकदा बैलाच्या शेपटीला धरून आम्ही नदीच्या अलीकडील काठावर परत येत असू. आजच्या मुलांना स्विमिंग पूल मिळतात; पण आम्हाला तर नदीतील हा अनुभवच आयुष्यभरासाठी पुरेसा ठरला.
सजावटीची लगबग
दुपारी घरी परतल्यावर थोडी विश्रांती घेतली जाई. त्यानंतर तीनच्या सुमारास घराघरांत बैल सजवण्याची धावपळ सुरू होत असे.
त्या काळी बैल सजवण्यासाठी बाजारातून आणलेले साहित्य एकेक करून बाहेर काढले जाई. ते पाहतानाच मन आनंदून जात असे.
पूर्वी बैलांच्या शिंगांवर लावण्यासाठी रंगीबेरंगी बेगड वापरले जात. पुढे त्याऐवजी विशेष तेलामध्ये सोनेरी रंग मिसळून शिंगांवर लावण्याची पद्धत सुरू झाली. हा सोनेरी रंग उन्हात चमकत असे आणि अनेक दिवस तसाच टिकून राहत असे.
शिंगांच्या मध्ये रंगीबेरंगी चौरे बसवले जात. लाल, हिरवे, पिवळे, निळे गोंडे वाऱ्यावर हलत असत. कपाळावर आरशांनी सजवलेली सुंदर बाशिंगे बांधली जात. काही शेतकरी बैलांच्या पाठीवर भरजरी झुल घालत. त्यामुळे ते बैल एखाद्या राजदरबारातील हत्तीप्रमाणे रुबाबदार दिसत.
गळ्यात मोठ्या घंटा, घुंगुरमाळा, मण्यांच्या माळा आणि सुंदर वेसण घातली की बैलांचा थाटच काही वेगळा दिसे.
रंगांचे खेळ
बैलांच्या अंगावर रंगविण्याचीही एक खास पद्धत होती. लाल, हिरवा, निळा, पिवळा अशा रंगांमध्ये हात बुडवून मोठी माणसे बैलांच्या अंगावर पंजाचे ठसे उमटवत. काही ठिकाणी फुलांच्या आकृत्या, तर काही ठिकाणी गोलाकार नक्षी काढली जात असे.
आम्हा मुलांना रंग लावण्याची फार हौस असे. रंग उरला की मग घरातील कुत्रा, मांजर, कोंबड्या, अगदी शेळ्यांनाही रंग लावला जाई. त्या दिवशी जणू संपूर्ण घरच रंगीबेरंगी झाल्यासारखे वाटत असे.
घंटांचा मंजुळ नाद
माझ्या आठवणीत आजही सर्वांत जास्त जिवंत राहिलेला आवाज म्हणजे बैलांच्या गळ्यातील घंटांचा.
अनेक सजवलेले बैल एकत्र उभे राहिले की त्यांच्या घंटांचा मंजुळ नाद संपूर्ण गावभर घुमत असे. त्या आवाजात एक विलक्षण गोडवा होता. आजही कुठे घंटांचा तसाच आवाज ऐकू आला की क्षणार्धात मी माझ्या बालपणात पोहोचतो.
ताशा-ढोलांच्या गजरातील मिरवणूक
सूर्य पश्चिमेला झुकू लागला की गावभर बैलांच्या मिरवणुका निघू लागत.
कोठे ताशा, कोठे ढोल, कोठे हलगी, कोठे संबळ, तर काही ठिकाणी सनई आणि चौघड्याच्या सुरांनी संपूर्ण गाव दुमदुमून जात असे. प्रत्येक वाद्याचा स्वतःचा एक वेगळाच ठेका असे.त्या तालावर सजलेले बैल डौलाने चालत असत. गावातील लहान-मोठे, महिला, वृद्ध, सर्वजण मिरवणुकीत सहभागी होत. प्रत्येक घरासमोर लोक उभे राहून सजलेल्या बैलांचे कौतुक करत. कोणाच्या बैलांची सजावट अधिक सुंदर आहे, यावरही मैत्रीपूर्ण चर्चा रंगत असे.
गावातील सर्व रस्ते पार करत ही मिरवणूक शेवटी ग्रामदैवताच्या मंदिराकडे जात असे. त्या वेळी संपूर्ण गाव जणू एका कुटुंबाप्रमाणे एकत्र आलेले दिसत असे.
त्या दिवसाचा तो उत्साह, तो आनंद, ती एकजूट आणि बैलांबद्दलची कृतज्ञता आजही माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे.
ग्रामदैवताची पूजा, पुरणपोळीचा नैवेद्य, नायफड गावातील बैलपोळा आणि बालपणातील गोड आठवणी
ग्रामदैवताच्या मंदिरापर्यंत पोहोचलेली बैलांची मिरवणूक पाहण्यासारखी असे. सजलेल्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा मंजुळ नाद, ताशा-ढोलांचा दणदणाट, सनईचे मंगल स्वर आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आनंदमय होत असे.
गावातील प्रत्येक शेतकरी आपल्या बैलांना ग्रामदैवताच्या मंदिरासमोर उभे करत असे. कारण या सणाचा खरा हेतू केवळ बैलांची सजावट नव्हता, तर वर्षभर शेतीत जीवाचे रान करणाऱ्या या मुक्या सहकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा होता.
मंदिरात नारळ फोडला जाई. देवाला नमस्कार करून सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली जाई. त्यानंतर नारळाचा प्रसाद, साखर, खडीसाखर किंवा शेरणी उपस्थितांना वाटली जाई. त्या प्रसादाची गोडी आजही मनात तशीच आहे.
सुवासिनींकडून बैलांचे औक्षण
मिरवणूक आटोपून घरी परत येईपर्यंत अनेकदा रात्र होत असे. पण घरातील महिलांचा उत्साह अजिबात कमी होत नसे.
घराच्या अंगणात बैल उभे केले जात. घरातील सुवासिनी प्रथम त्यांच्या पायांवर स्वच्छ पाणी घालत. नंतर हळद-कुंकू लावत, आरती ओवाळत, धूप-दीप दाखवत बैलांची पूजा करत. काही ठिकाणी बैलांच्या कपाळावर अक्षता लावल्या जात आणि त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला जाई.
त्या क्षणी बैल हा फक्त जनावर राहत नसे; तो घरातील एक मानाचा सदस्य बनत असे. कारण त्या बैलांच्या श्रमामुळेच घरात धान्य, अन्न आणि समृद्धी येत असे, ही भावना प्रत्येकाच्या मनात दृढ होती.
पुरणपोळीचा नैवेद्य
पूजा झाल्यानंतर बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जाई. गरमागरम पुरणपोळीचे छोटे तुकडे करून बैलांना प्रेमाने खाऊ घातले जात. काही जण त्यांना गूळ, हरभरा किंवा इतर आवडीचा चारा देत.
एक गोष्ट मात्र प्रत्येक घरात पाळली जात असे बैलांनी जेवल्याशिवाय घरातील कोणीही जेवत नसे.
त्या दिवशी बैलांनाच प्रथम मान दिला जाई. यातून शेतकऱ्यांच्या मनातील कृतज्ञता आणि संस्कार स्पष्ट दिसून येत.
पुरणपोळी आणि 'सार'चा सुगंध
बैलपोळा म्हणजे घराघरांत पुरणपोळीचा सुगंध दरवळणारा दिवस. अनेक घरांत पुरणपोळीबरोबर खास 'सार' बनवले जाई. प्रत्येक घराची सार बनवण्याची पद्धत वेगळी असे.
गावात काही अशा आजी, काकू किंवा मावशा होत्या की त्यांच्या हातच्या साराची चव आजही अनेकांच्या जिभेवर रेंगाळत असेल. त्या काळी मसाले तयार नव्हते, रेडिमेड पदार्थ नव्हते; पण हाताला असलेली चव आणि मनातले प्रेम यामुळे प्रत्येक पदार्थ अमृतासारखा लागत असे.
त्या दिवशी एकमेकांना आग्रहाने जेवायला बोलावले जाई. "आज आमच्या घरी पुरणपोळी खायला या", असे निमंत्रण देण्यासाठी वेगळ्या कार्डांची गरज नव्हती. मनातील प्रेमच सर्वांत मोठे निमंत्रण होते.
आमच्या परिसरातील नायफड गावातील बैलपोळा तर विशेष प्रसिद्ध होता.
बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गावच्या ग्रामदैवत मुक्ताबाई देवीच्या मंदिराजवळ संपूर्ण परिसरातील बैलजोड्या एकत्र येत असत. आसपासच्या वाड्या-वस्त्या आणि गावांमधून सजलेले बैल मोठ्या थाटामाटात आणले जात.
प्रत्येक गावाबरोबर स्वतःचा ताफा असे. कुठे ताशा, कुठे सनई, कुठे डफ, कुठे हलगी, तर कुठे संबळ. प्रत्येक ताफा आपल्या वादनाने उपस्थितांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत असे.
त्या दिवशी पश्चिम भागातील अनेक गावांतील लोक नायफडमध्ये जमायचे. मंदिर परिसरात अक्षरशः जत्रेचे स्वरूप येत असे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण त्या सोहळ्याचा आनंद लुटत असे.
वादकांमध्ये जणू मैत्रीपूर्ण स्पर्धाच रंगत असे. कोणाचा ताशा अधिक दमदार? कोणाची सनई अधिक मधुर? कोणाच्या डफाचा ठेका अधिक जोशपूर्ण? अशा चर्चा रंगत.
संध्याकाळी पाच-सहा वाजेपर्यंत हे वादन सुरू राहायचे. नंतर लोक आपापल्या गावाकडे निघत. परतीच्या वाटेवर एकच चर्चा सुरू असे...
"यंदा अमुक गावचा ताफा भारी होता!"
"नाही रे, यावेळी नायफडच्या ताशांनी तर सगळ्यांची मने जिंकली!"
त्या गप्पांमध्येच अनेक किलोमीटरचा पायी प्रवास कधी संपायचा, ते कळतही नसे. त्या वेळी गावात मोटारसायकली नव्हत्या. फारशा सायकलीही नव्हत्या. चारचाकी वाहनांचा तर प्रश्नच नव्हता.
लोक पायी चालत, पण मनाने एकमेकांच्या खूप जवळ होते. रस्त्यात भेटणारा प्रत्येकजण ओळखीचा असे. एकमेकांची विचारपूस, गप्पा, हसणे, विनोद आणि आपुलकी यामुळे प्रवासही आनंदाचा वाटत असे.आज साधने वाढली, वेग वाढला; पण माणसांमधील संवाद मात्र कमी झाला आहे.
बदललेले चित्र
आज शेतीत ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि आधुनिक यंत्रांचा वापर वाढला आहे. गावागावांत बैलजोड्या कमी झाल्या आहेत. गावठी गाईही फारशा दिसत नाहीत.
परिणामी बैलपोळ्याचा उत्साहही कमी होत चालला आहे. अनेक गावांत हा सण औपचारिकपणे साजरा होतो. काही ठिकाणी तर बैलपोळा कधी आला आणि कधी गेला, हेही लोकांना समजत नाही. ज्यांनी त्या काळातील खरा बैलपोळा अनुभवला आहे, त्यांच्या मनातून त्या आठवणी कधीच पुसल्या जाणार नाहीत.
त्या काळी एखाद्या शेतकऱ्याने नवीन बैलजोडी, गाय किंवा म्हैस विकत घेतली, तर तो फक्त त्या घराचा आनंद नसायचा; तो संपूर्ण गावाचा आनंद असायचा.
आज नवीन चारचाकी गाडी घेतली तरी अनेकांना कळत नाही. पण त्या वेळी एका गाईच्या आगमनाने संपूर्ण गाव आनंद साजरा करत असे. त्या काळी पशुधन म्हणजेच शेतकऱ्याची खरी संपत्ती होती.
गाय म्हणजे दूध, बैल म्हणजे शेती, शेती म्हणजे अन्न आणि अन्न म्हणजे जीवन. ही साखळी प्रत्येकाला समजलेली होती.
आज काळ बदलला आहे.बैलांच्या जागी ट्रॅक्टर आले.गाईंच्या जागी मोठमोठ्या डेअऱ्या आल्या. ताशा-ढोलांचा आवाज डीजेच्या गोंगाटात हरवला.गावातील ओसरीवर रंगणाऱ्या गप्पा मोबाईलच्या पडद्यावर बंदिस्त झाल्या.नदीकाठी बैलांना आंघोळ घालणारी मुले आता स्विमिंग पूलमध्ये पोहतात; पण बैलाच्या शेपटीला धरून डोह पार करण्याचा थरार त्यांना कधीच अनुभवता येणार नाही.
पुरणपोळीचा सुगंध अजूनही घराघरांत दरवळतो; पण त्या मागची एकत्र कुटुंबाची ऊब, शेजाऱ्यांना आग्रहाने जेवायला बोलावण्याची परंपरा आणि गावभर पसरलेली आपुलकी हळूहळू विरळ होत चालली आहे.
आज मी कितीही दूर गेलो, कितीही आधुनिक जगात वावरलो, तरी बैलपोळा आला की माझे मन नकळत माझ्या गावाकडे धाव घेते.डोळे मिटले की अजूनही मला दिसतात.
हिरव्यागार शिवारातून चालत जाणारे बैल...नदीच्या डोहात पोहणारी मुले...ताशा-ढोलांच्या तालावर डौलाने चालणाऱ्या बैलांच्या मिरवणुका...आईच्या हातची गरमागरम पुरणपोळी...आणि संपूर्ण गावाला एका कुटुंबात बांधून ठेवणारा तो प्रेमाचा सण...आज त्या आठवणींनाच जणू काळाने सोन्याची किनार दिली आहे.काळ पुढे गेला, जीवनशैली बदलली, साधने बदलली; पण त्या आठवणींची श्रीमंती आजही तशीच आहे.
खरे तर बैलपोळा हा फक्त बैलांचा सण नाही; तो माणुसकीचा, कृतज्ञतेचा, निसर्गप्रेमाचा आणि ग्रामीण संस्कृतीच्या आत्म्याचा उत्सव आहे.म्हणूनच या आठवणी जपणे, पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आणि आपल्या संस्कृतीचे हे अमूल्य वैभव जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. काळ बदलत राहील, साधने बदलत राहतील; पण बैलांच्या गळ्यातील त्या घंटांचा मंजुळ नाद आणि बैलपोळ्याच्या आठवणी माझ्या मनातून कधीच पुसल्या जाणार नाहीत.


बैलपोळा जुन्या दिवसांचे अतिशय मार्मीक विश्लेषन.
उत्तर द्याहटवा