तत्कालीन पार्श्वभूमी
आता लोक ट्रॅक्टर द्वारे शेती करू लागले आहेत. अनेक जणांनी तर बैल सांभाळणे सोडून दिले आहे. परंतु पूर्वी बैल जोडी ही शेतकऱ्यांचे वैभवाचे प्रतिक होती. प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल जोडी ही असायचीच. ज्याच्याकडे बैल जोडी नाही तो शेतकरीच नाही. असेच तेव्हा वाटायचे.
आजच्या काळात टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाडी विषयी प्रत्येक तरुणाच्या मनात जशी एक क्रेझ आहे. तशीच पूर्वी आपल्याकडे अमुक तमुकच बैल असावेत अशी पूर्वीच्या तरुणांमध्ये बैला विषयी एक क्रेझ होती.
तेव्हा आणि आता थोड्या मात्र प्रमाणात गावठी बैल, खिल्लार जातीचे बैल, आणि भडूशे जातीचे बैल असे बैल प्रसिद्ध होते.
परंतु त्या काळात 90 टक्के लोकांकडे गावठी बैल असायचे. उर्वरित दहा टक्के लोकांकडे खिल्लार जातीचे बैल असायचे.
गावठी बैलांपेक्षा पांढरे शुभ्र व डवलदार शिंगे यांनी युक्त असे खिल्लारी बैल हे त्या काळात असणे हे श्रीमंत शेतकऱ्याचे लक्षण मानले जायचे.
आपल्याकडेही खिल्लारी बैल असावेत असे त्यावेळेस प्रत्येकाचे स्वप्न असायचे.
काही लोकांकडे तर शेतीसाठी औताचे बैल वेगळे व गाड्यांचे बैल वेगळे असायचे.
काही लोकांची शेती मोठी असल्या कारणाने त्यांचे कडे बैलांच्या दोन दोन तीन तीन जोड्या असायच्या.
शेतीची औजारे
प्रत्येकाकडे नांगराचे खालील प्रमाणे साहित्य हे असायचेच. त्याला सरंजाम असे म्हटले जायचे.
हाळस:
हळद ही शक्यतो सागाच्या लाकडाची असायची. सागाची लाकडी तोडण्यासाठी लोक खूप लांब लांब जंगलामध्ये जाऊन योग्य लागवड तोडून आणून सुताराकडून बनवून घेत असत.
नांगर:
नांगर हा सुद्धा लाकडाचाच असायचा. जंगलात लाकूड तोडून आणून सुताराकडून बनवून घेतला जायचा. लाकडी नांगराचे सुद्धा अनेक प्रकार असायचे. चिखलणीचा नांगर वेगळा, उखळणीचा नांगर वेगळा, रब्बी हंगामातील वेगळं नांगर.
रूमणे:
रुमणे हे सुद्धा लाकडाचेच असायचे. हळस ही नांगरला जोडलेली असायची. व नांगराच्या मागे रूमणे जोडायचे. नांगर रुमन्याला लोखंडी साखळीच्या सहाय्याने जोडून दुसरा पदर जुकाडाला जोडलेल्या लाकडी वेल्याला जोडलेली असायची. रुमण्याला एक छोटी मूठ असायची. एक हात मुठीला धरून व एका हातात कासरा धरून शेतकरी नांगर हाकायचा.
जु किंवा जुकाड:
हळशीच्या पुढे मधोमध जोडण्यासाठी जुकाड असायचे. नांगर रुमणे व हाळस हे साखळी आणि लाकडी वेल्याच्या सहाय्याने जुकाडाला बांधलेले असायचे. काही लोकांचे जुकाड अतिशय नक्षीदार आणि रंगकाम केलेले असायचे. हे जुकाड शक्यतो बैलगाडीला जोडलेले असे.
यालं:
यालं हे सुद्धा लाकडाचेच असायचे. व त्याला मोठा सुम्भा सारखा दोर असायचा त्यामध्ये लाकडी मणी ओवलेला असायचा. त्यामध्ये साखळीच्या साह्याने औत जुम्पायचे. याला काही भागात कोडकं असं सुद्धा म्हणत असत.
शिवळं:
जुकडाच्या दोन्ही बाजूला दोन्ही याप्रमाणे बैलांच्या मानेच्या दोन्ही बाजूला शिवळं असायची. ही शिवळं सुद्धा लाकडाचीच असायची.
नांगराचा फाळ व वसू आणि साखळी, या वस्तू लोखंडाच्या असायच्या.
कासरा हा घायपाताच्या तंतू पासून घरच्या घरी बनवलेला असायचा. पुढील काळात कासरे हे दुकानात विकत मिळायचे.
जुपण्या:
हया चामड्याच्या असायच्या. चांभाराकडून हव्या तसेच जुपण्या त्यावेळी मिळत असत. त्यानंतर आधुनिक जुपण्या बाजारात विक्रीस उपलब्ध होऊ लागल्या.
चाबूक:
चाबूक हा सुद्धा चामड्याचाच असायचा. त्याला लाल, किंवा हिरवा गोंडा असायचा. लाकडाच्या छोट्या दांडीला चामड्याची दोरी बांधलेली असायची. त्यालाच चाबूक असे म्हटले जायचे. चाबूक हा सुद्धा चांभारच बनवत असे.
वेसन:
प्रत्येक बैलाच्या नाकात दोरी घालून ती मानेला बांधलेली असे. त्यालाच वेसन असे म्हटले जायचे. मारक्या बैलाला धरायचे म्हटले तर पहिली वेसन पकडत असत.
पेटारी:
पूर्वी सर्रास शेतकऱ्यांकडे लाकडी पेटार्या असायच्या. या पेटारीला दोन्ही बाजूला छोटे आख (छोट्या दांड्या) असायच्या. त्यामध्ये दोन्ही बाजूला दोन लाकडे घालून जुकाडाला लोखंडी साखळीच्या सहाय्याने जोडत असत.
शेतातील कमी जास्त उंचवटे नांगराच्या साह्याने नांगरल्यावर शेत एकसारखे सपाट करण्यासाठी पेटारीतून माती वाहून शेताची एकसारखी लेव्हल करण्यासाठी पेटारीचा वापर केला जात असे.
सन 1990 च्या लाकडी पेटारींच्या ऐवजी लोखंडी पेटार्या विक्रीस उपलब्ध होऊ लागल्या.
आधुनिकीकरणामुळे अनेक पारंपरिक लाकडी अवजारांप्रमाणेच पेटारीचा वापरही कमी झाला आहे,
लोड:
लोड सुद्धा एक लाकडाचे खांबासारखे अवजार होते. लोडाच्या मध्यभागी लाकडाची लांब दांडी घालून पुढे जुकडाला जोडलेली असे.
लोडाच्यावर रूमण्यासारखी एक लाकडी मुठ लावलेले दांडके असे. हे लोड बैलांच्या साह्याने शेतातून इकडून तिकडे फिरवले जाई. नवीन शेतकरी तयार करताना प्रथम लोड घालण्यास शिकवले जाई.
लोडाचा उपयोग हा शेतातील मोठमोठी ढेकळे फोडण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी होत असे. लहान मुले लोढा वर बसून शेतातून फिरवत असत. लोडावर बसायची मज्जा त्यावेळी वेगळीच होती.
पाभार:
पाभारीचा उपयोग पेरणीच्या वेळी मोठ्या प्रमाणात होत असे. पापर ही कोळवा सारखीच असते. मडक्या सारख्या लाकडी भागाला चार पोकळ काठ्या जोडून फळांच्या तेथे जोडलेल्या असतात.कुळव:
यामध्ये बाभळीच्या किंवा शिसवी लाकडाच्या १३x१० सेंमी. ते १८x१३ सेंमी. जाडीच्या आणि ५० ते १०० सेंमी. लांबीच्या दिंडावर दोन्ही टोकांवर दोन जानवळी बसवितात. ही जाणवळी सुद्धा लाकडाचीच असतात.जानवळ्याच्या खालच्या टोकांना लोखंडी कडी (वसू) बसविलेली असतात.
यांत एका बाजूला धार केलेली लोखंडी फास बसवतात. दिंडावर बसविलेल्या रूमण्याच्या साहाय्याने कुळवाची खोली नियंत्रित केली जाते.
कुळव हाकणारा दिंडावर उभा राहून जमिनीची खोली ठेवायची हे ठरवतो. कुळव सरासरी ५ ते १० सेंमी. खोलीपर्यंत जमीन कुळवण्याचे काम करतो.
कुळवाला जुंपलेले बैल मागे–पुढे करूनसुद्धा खोली कमी-जास्त करता येते. एका दिवसाकाठी साधारणपणे एक हेक्टर जमिनीची कुळवणी करता येते.
फराट:
लाकडाच्या दोन फळ्या एका बाजूला छोटे लाकूड व दुसऱ्या बाजूला लांब लाकूड बसवून फराट केलेले असायचे. याच्या साहाय्याने वाफे पाडले जात असत.
म्होरक्या:
या घायपाथाच्या तंतू पासून बनवलेल्या दोरा पासून तयार केलेले असतात. बैलाचे अथवा जनावराचे तोंड त्यामध्ये घालून मानेला बांधतात.
मुसके:
हे सुद्धा घायपाथाच्या तंतू पासून बनवलेले असे. त्यामध्ये बैलाचे तोंड घातले जाते. शेतामध्ये औत हाकताना किंवा मळणी करताना शेतातले किंवा खळ्यातील पीक बैल खायचे. व त्यामुळे वेळ सुद्धा जायचा. म्हणून बैलाच्या तोंडात मुसके घातल्यामुळे बैलाला खाता येत नाही.
शेतीच्या अवजारांचा उपयोग करण्यासाठी लोखंडी वस्तूंचा सुद्धा मोठा सहभाग असायचा.
फाळ:
नांगराच्या दाताला खालच्या बाजूला फाळ लावला जात असे. या फाळाला आणि लाकडी दाताला जोडण्यासाठी एक लाकडाची छोटी खिट्टी असायची. आणि त्यावर लोखंडाचेच छोटे आयताकृती वसू असायचे. वसु लावल्यामुळे फाळ नांगरी दातातून पडत नसे.
साखळी:
पूर्वी लोक औत जुंपण्या साठी तंतू पासून बनलेल्या सुंभाचा उपयोग करत असत. परंतु हा सुंभ जास्त वेळ टिकत नसे.
1970 च्या दशकात औत जुंपण्यासाठी लोखंडी साखळ्या बाजारात आल्या. व त्या अल्पावधीत लोकप्रिय झाल्या. औत जिंकण्यासाठी लोखंडी साखळ्या खूपच सोयीस्कर होत्या. त्या तुटतही नव्हत्या.
फास:
कुळवासाठी लोखंडी आयताकृती खास असायची. त्यामुळे शेत भुसभुशीत करण्यासाठी चांगला उपयोग व्हायचा.
धावा:
बैलगाडीची चाके ही पूर्वी लाकडाची असायची. बैलगाडी चालवताना लाकूड आणि जमिनीचे घर्षण झाल्यामुळे लाकूड लवकर झिजायचे. त्यासाठी जनावरांच्या चामड्याचा उपयोग केला जायचा.
परंतु पुढील काळात चामड्या ऐवजी लोखंडी पट्टीचा म्हणजे दहावीचा उपयोग केला जाऊ लागला. त्यामुळे बैलगाडी चालणे अतिशय सोयीचे झाले. व लाकडाच्या चाकांना टिकाऊ पणा आला.
कुण्या:
बैलगाडीच्या आकातून दोन्ही चाके निषटून बाहेर जाऊ नये म्हणून चाक बसवल्यावर लोखंडी चाक आकातून निसटून बाहेर जात नाही. आक सुद्धा लोखंडी असायचा. आकाच्या आणि चाकाच्या मध्ये ग्रीस लावली जायचे. त्याला लोक वंदन म्हणायचे.
शिपाई:
बैलगाडी ज्यावेळी काम नसेल तेव्हा दोन बाजूला जुकाडाच्या मधी शिपाई लावून उभी केली जात असे. हे दोन शिपाई म्हणजे दोन लाकडाच्या भक्कम काठ्या असत. त्या दोन काट्यांना छोटी साखळी जोडलेली असे.
बैलगाडीचा उपयोग धान्य वाहून आणण्यासाठी, शेतात शेणखत नेण्यासाठी, माल वाहतुकीसाठी बैलगाडीचा सर्रास उपयोग केला जात असे. बैलगाडी हे शेतकऱ्याचा अविभाज्य घटक होती.
कढवान:
नवीन बैल शेतीची मशागत करण्यापूर्वी त्यांना शिकवण्यासाठी कढवानाचा उपयोग केला जात असे. शिवाय मोठमोठे दगड इकडून तिकडे वाहण्यासाठी उपयोग केला जात असे.
त्याशिवाय शेतकऱ्यांकडे अनेक शेतीच्या उपयोगी वस्तू असत. अनेकांकडे डबल वस्तू असायच्या.
लाकडाच्या,चामड्याच्या, लोखंडाच्या वस्तू असत. शिवाय घायपताच्या वाखा पासून बनवलेले चऱ्हाट, कासरा, दावं, रस्सी, मुसकी, म्होरकी, वेसन, अशा अनेक वस्तू असायच्या.
त्याशिवाय शेतकऱ्याकडे विळे, कोयते, फावडे, टिकाव, पहार, कुऱ्हाड, खुरपी अशा अनेक वस्तू सुद्धा असायच्या. यांची दसऱ्याला पूजा केली जायची.
बैल व शेतकरी अतूट नाते
बैलांचे व शेतकऱ्याचे तेव्हा एक अतूट नाते होते. काही लोक शेतीचे काम झाल्यावर संध्याकाळी बैलांना गरम पाण्याने अंघोळ घालत असत.
बैलांना पेंड सुग्रास गव्हाच्या पिठाचे गोळे खायला घालत असत. बैलांची उत्तम काळजी घेत. काही बैलांच्या दशक्रिया सुद्धा घातल्याच्या माझ्या स्मरणात आहेत.
परंतु आता ट्रॅक्टरच्या युगात अनेकांकडे बैलच राहिले नाहीत तर वस्तू कुठून. काहींना तर आता वस्तूंची नावे ही आठवत नाहीत.
लेखक:- रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)



दादा खुप छान माहिती
उत्तर द्याहटवा