ऊसतोडीपासून लंडनपर्यंत : कातकरी समाजाच्या सपना वाघमारे यांची प्रेरणादायी झेप
"मी शिकले नसते, तर मलाही ऊसतोडीसाठी जावं लागलं असतं..."
हे शब्द आहेत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील चिंचवली येथील कातकरी समाजातील तरुणी सपना राजेश वाघमारे हिचे. या एका वाक्यात केवळ तिचा वैयक्तिक संघर्ष नाही, तर संपूर्ण कातकरी समाजाचे वास्तव सामावलेले आहे.सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा आदिवासी वाडीपासून सुरू झालेला तिचा प्रवास आज थेट इंग्लंडमधील लंडनपर्यंत पोहोचला आहे. आदिवासी विकास विभागाच्या ग्लोबल स्कॉलरशिप कार्यक्रमांतर्गत तिला उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स आणि क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन या प्रतिष्ठित संस्थांकडून तिला एलएलएम अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची संधी प्राप्त झाली आहे.
संघर्षातून उभी राहिलेली जिद्द
सपना वाघमारे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील चिंचवली या आदिवासी वाडीत झाला. तिचे आई-वडील उदरनिर्वाहासाठी ऊसतोडीच्या कामासाठी स्थलांतरित होत असत. अशा परिस्थितीत अनेक मुलांचे शिक्षण अर्धवट राहते. मात्र, सपनाच्या आयुष्यात तिचे आजी-आजोबा आणि मामा भिवा पवार यांनी आधारस्तंभाची भूमिका बजावली.
आई-वडील मजुरीसाठी बाहेर असताना त्यांनी सपनाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. रोहा येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने माणगाव तालुक्यातील वनवासी कल्याण आश्रमशाळेत माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे पुण्यात जाऊन तिने नोकरी करत-करत गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून एलएलबीची पदवी संपादन केली.
समाजातील वास्तवाने घडवली वकील
सपना सांगते की, तिने कायद्याचे शिक्षण केवळ करिअरसाठी निवडले नाही. तिच्या निर्णयामागे कातकरी समाजातील महिलांवरील अत्याचार, अन्याय आणि असुरक्षितता हे वास्तव होते.
तिच्या मते, समाजातील अनेक महिला आजही आपले प्रश्न उघडपणे मांडू शकत नाहीत. त्यांना कायद्याची माहिती नाही, त्यांच्यासाठी लढणारे प्रतिनिधित्व कमी आहे. त्यामुळे तिला वकील बनून आपल्या समाजातील महिलांना न्याय मिळवून देण्याची प्रेरणा मिळाली.
शिक्षण म्हणजे परिवर्तनाचे साधन
सपना वाघमारे यांची सर्वात महत्त्वाची जाणीव म्हणजे शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्याचे माध्यम नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे.
ती स्पष्टपणे सांगते "मी शिकले नसते, तर मलाही ऊसतोडीसाठी जावं लागलं असतं."»
हे विधान कातकरी समाजातील हजारो मुलांच्या वास्तवावर प्रकाश टाकते. स्थलांतर, दारिद्र्य, बालविवाह आणि शिक्षणातील गळती या समस्यांमुळे अनेक मुलांचे भविष्य अंधारात जाते. मात्र, योग्य मार्गदर्शन आणि शिक्षणाच्या संधी मिळाल्यास परिवर्तन शक्य आहे, हे सपनाने सिद्ध करून दाखवले.
नव्या पिढीची आशा
रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजातून वकील होणारी आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणारी ती पहिल्या महिलांपैकी एक मानली जाते. तिचे यश केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून संपूर्ण कातकरी समाजासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे.
तिच्या यशामुळे कातकरी समाजातील मुलींसमोर शिक्षणाची नवी दारे खुली झाली आहेत. समाजातील अनेक तरुण-तरुणींना आता उच्च शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळत आहे.
समाजासाठी काम करण्याची बांधिलकी
लंडनमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या समाजासाठी काम करण्याचा तिचा दृढ निश्चय आहे. स्थलांतरित मजूर कुटुंबांची मुले, बालविवाह, महिलांवरील अत्याचार, साक्षरतेचा अभाव आणि कायदेशीर हक्कांविषयी जागृती या क्षेत्रांत काम करण्याची तिची इच्छा आहे.
कातकरी समाजाचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे. परंतु या संघर्षमय इतिहासातूनच सपना वाघमारे यांसारखी व्यक्तिमत्त्वे घडतात. चिंचवलीच्या आदिवासी वाडीतून सुरू झालेला तिचा प्रवास लंडनपर्यंत पोहोचला असला, तरी तिचे पाय अजूनही आपल्या समाजाच्या मातीत घट्ट रोवलेले आहेत.
सपना वाघमारे यांची यशोगाथा ही केवळ एका विद्यार्थिनीची कथा नसून शिक्षण, जिद्द आणि सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर अशक्य वाटणारी स्वप्नेही कशी साकार होऊ शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण आहे.
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा