Translate

हळव्या मनाचा माणूस – हनुमंत कदम

सन 2003 मध्ये मी राजगुरुनगरला घर बांधण्यासाठी जागा खरेदी केली होती. सन 2005 मध्ये घर बांधण्याचे ठरवले. घरासाठी पाण्याची व्यवस्था ही मोठी समस्या होती. परंतु आमचे ठेकेदार श्री. हेंद्रे सर यांनी ही समस्या चुटकीसरशी सोडवली.

रविवारी अगदी सकाळी श्री. हेंद्रे सर एका हसऱ्या चेहऱ्याच्या माणसाला घेऊन आमच्या घरी आले आणि त्यांनी त्यांची माझ्याशी ओळख करून दिली.

“हे हनुमंत कदम साहेब… चासकमान प्रकल्प कार्यालयात काम करतात.,” - इति हेंद्रे सर.

नमस्कार व ओळखपाळख, चहापाणी झाल्यावर आमचे ठेकेदार हेंद्रे सरांनी मूळ मुद्द्याला हात घातला.

“तळपे सर, तुमच्या शेजारीच यांनी जागा घेतली असून त्यांचे घराचे बांधकाम तेथे चालू आहे. शिवाय त्यांनी त्यांच्या जागेत स्वतः बोअर घेतली आहे. ते तुम्हाला पाणी देण्यासाठी तयार आहेत. व्यवहाराचे बोलून घ्या.”

आमचे तोंडी बोलणे होऊन त्यांनी आम्हाला बोअरचे पाणी घर बांधण्यासाठी आणि पिण्यासाठी देऊन टाकले. शिवाय घर बांधत असताना खूप मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे ते आम्हाला आमच्या परिवारातीलच एक सदस्य असल्याचे वाटू लागले.

हनुमान कदम हे. साधारण पाच फूट उंची, मध्यम बांधा आणि कायम हसरा चेहरा…”अत्यंत नम्र स्वभाव. कायम सहकार्याची भावना, साधे-सरळ व्यक्तिमत्त्व आणि चटकन विश्वास ठेवणे, त्यामुळे त्यांचा मित्रपरिवारही मोठा. त्यांचा मित्रपरिवार पाहून मी आचंबित होत असे.

अत्यंत लहान वयात  त्यांच्या अंगावर प्रपंच पडला. वयाच्या सोळाव्या वर्षीच ते चासकमान धरणावर मजुरीने कामाला जाऊ लागले. चासकमान धरणावर त्यांनी प्रचंड कष्ट केले, घाम गाळला. पुढे त्यांच्या परिश्रमांना फळ आले व तेथेच त्यांना कायम करण्यात आले.

धरणावर काम करताना त्यांना अनेक वयोवृद्ध व त्यांच्यापेक्षा मोठ्या माणसांशी संबंध आला. त्यांचे आचार-विचार, वागणे-बोलणे यांचा त्यांच्यावर परिणाम झाला. त्यामुळे लहान वयातच त्यांचे विचार पोक्त झाले.

अनेक वेळा त्यांच्या बरोबर मी त्यांच्या कार्यालयात गेलो. कार्यालयातील सर्व लोकांचे कदम साहेबांशी आपुलकीचे व जिव्हाळ्याचे संबंध मला पाहायला मिळाले. त्यांच्या कार्यालयातील सर्व लोकांची माझ्याशी ओळख झाली व मैत्रीचे संबंध झाले.

हनुमान कदम यांचा ज्यांच्याशी जवळचा संपर्क आला, त्यांच्याशी त्यांनी शेवटपर्यंत संबंध चांगले ठेवले आणि नाते निभावले. आजही त्यांचे चांगले संबंध पाहावयास मिळतात.

हनुमान कदम यांच्याबरोबर माझी चांगली मैत्री झाली. ते माझे अत्यंत जवळचे स्नेही झाले. त्यांच्या परिवारातील प्रत्येक सुखदुःखात आमच्या कुटुंबाचा सहभाग राहिला. त्यांच्या बरोबर खूप फिरलो.

कदम साहेबांचा टॉमी कुत्रा

कदम साहेबांनी तेव्हा एक अल्सेशियन कुत्र्याचे पिल्लू आणले होते. परंतु लहानपणातच त्याच्यात वाघाचे गुण होते. कुत्रा आणल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, त्यावेळी लहान असलेल्या माझा मुलगा वेदांत याने त्याची शेपटी ओढताच त्याच्यावर असा काही हल्ला केला की त्याची जिन्स पँट अक्षरशः फाटली होती. जिन्स पँट असल्यामुळे त्याचे दात शरीरात घुसले नाहीत. तरीही त्यानंतरसुद्धा वेदांत त्याच्याशी खेळत असे.

दररोज टॉमीला सकाळी चार आणि संध्याकाळी तीन बाजरीच्या ताज्या भाकऱ्या कदम काकू बनवत असत. दुधात कुस्करून त्याला खायला देत. संपूर्ण परिसर त्या कुत्र्याला घाबरत असे. कुत्र्याचे नाक इतके तीक्ष्ण होते की माणसाच्या नुसत्या वासावरून तो भुंकत असे. त्याच्या भुंकण्याने घर दणाणून जात असे.

एकदा तर गंमतच झाली. माझा मुलगा वेदांत 5 - 6 वर्षाचा होता.एकदा दुपारी त्याने आमच्या जीपच्या मागच्या चकाची हवा सोडून दिली. आणि मी घरी आल्यावर

पप्पा आपल्या गाडीच्या चकातुन सुssss असं झालं.असं सांगितलं.

मी गाडी जवळ जाऊन पाहिलं तर गाडीच्या चाकातून संपूर्ण हवा निघून गेली होती. मी ताबडतोब गावात जाऊन मेकॅनिक आणला. त्याने गाडीचे चाक काढण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रयत्न करूनही चाक निघेना.

मेकॅनिक हिंदी भाषिक होता. त्याने आम्हाला विचारले.

तुम्हारे पास टॉमी है क्या?

माझ्या जवळच आमच्या शेजारचा पप्पू उभा होता. तो बोलला 

हो. 

असे म्हणून तो टॉमी आणायला गेला.

आणि लगेचच तो कदम साहेबांचा कुत्रा टॉमीला घेऊन आमच्या जवळ आला.

मेकॅनिक बोलला ये कुत्ता जबरदस्त है! लेकिन मेरे पास किस लिए भेजा है! असे म्हणून तो बोलला.

टॉमी किधर है? 

यावर आमचा पप्पू बोलला.

हा काय हाच टॉमी.

मेकॅनिकने कपाळावर हात मारून घेतला. ये वाला टॉमी नही. लोखंड का छोटी पहार होती है ना वो टॉमी.

यावर हसून आमची पुरेवाट झाली 

काही दिवसांनी टॉमीला गॅस्ट्रो हा आजार झाला.आम्ही टॉमीला चार-पाच जणांनी तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. परंतु आम्ही चार जणांनी धरूनही टॉमीने डॉक्टरांना इंजेक्शन टोचू दिले नाही. त्याला जेवणातून औषध दिले असता त्याने जेवणच बंद करून टाकले.

एकदा पहाटे अचानक दार ठोठावल्याचा आवाज आला. दार उघडले तर कदम साहेब अगदी लहान मुलासारखे रडत होते. मी अक्षरशः घाबरलो.

“काय झाले कदम साहेब?” मी विचारले.

“आपला टॉमी गेला…” असे म्हणून ते पुन्हा रडू लागले.

“अहो, आपण सर्व प्रयत्न केले. पण टॉमी इंजेक्शनच मारू देईना आणि जेवणातील औषधही खाईना. आपण काय करू शकतो? जे आपल्या हातात नाही, त्याचा शोक करून काय फायदा? त्यापेक्षा पुढची तयारी करूया.”

परंतु कदम साहेबांनी आम्हाला त्रास होऊ नये म्हणून आधीच टॉमीला पुरण्यासाठी त्यांनी खड्डा खोदून ठेवला होता. टॉमीचे अगदी माणसासारखे क्रियाकर्म त्यांनी केले.

कदम साहेबांना जास्त माणुसकी असल्यामुळे कधीकधी ते अडचणीतही येत, अजूनही येतात.

एकदा रात्री दोन-अडीचच्या सुमारास आमच्या घराचा दरवाजा ठोठावल्याचा आवाज आला. मी दार उघडले तर बाहेर कदम काकू उभ्या होत्या.

“अहो, यांच्या छातीत दुखतंय आणि घामही खूप आलाय. त्यांना दवाखान्यात घेऊन जाणे आवश्यक आहे.”

हे ऐकून मी लगेच त्यांच्या घरी गेलो. तर खरोखरच त्यांना खूप घाम आला होता.

मी विचारलं, “कदम साहेब, काय होतंय? पित्त वगैरे झालं का?”

“नाही,” कदम साहेब म्हणाले.

“अहो, तुम्ही घाबरलेले दिसताय. काय झालंय?”

मी खोदून विचारले.

यावर त्यांनी सांगितले, “आपण अमुक एका मुलीचे लग्न जमवून दिले ना, ती मुलगी रात्री सासरहून घरातून निघून गेली आहे. तिच्या सासरच्यांनी ही माहिती तिच्या वडिलांना दिली. त्यावर तिच्या वडिलांनी मला फोन करून दम भरला आहे की माझ्या मुलीचे काही बरेवाईट झाल्यास मी तुम्हाला जबाबदार धरेन.”

मला सर्व प्रकार लक्षात आल्यावर मी त्यांना धीर दिला.

“कदम साहेब, अजिबात घाबरू नका. तुम्ही लग्न जमवून दिले आहे. पुढे काय होणार याची जबाबदारी तुम्ही घेतलेली नाही. भविष्यात काय घडेल हे कुणी सांगू शकत नाही. तुमच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत. अजिबात घाबरू नका.”

धीर दिल्यावर त्यांचा ब्लडप्रेशर कमी झाला.

आता दवाखान्यात जायची काही गरज नाही. परत त्रास झाला तर तुम्हाला सांगतो, असे त्यांनी सांगितल्यावर आम्ही घरी झोपायला गेलो.

विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजताच मुलगी माहेरी आली होती. हे तिच्या वडिलांनी कदम साहेबांना फोन करून सांगितले.

तर असे हे हळव्या मनाचे कदम.

मी  त्यांच्या शेजारी राहत असताना त्यांच्या अनेक नातेवाईकांकडे, मित्रांकडे त्यांच्यासोबत जाण्याचा योग आला. त्यांचे असलेले संबंध पाहून भारावून गेलो. विशेष म्हणजे त्यांचे मित्र लतीफभाई यांच्याकडे त्यांच्या प्रत्येक सणाला मी, कदम साहेबांबरोबर जात असे. लतीफभाईंच्या मुलाच्या लग्नालादेखील मी गेल्याचे मला स्मरते.

कदम साहेबांची आई म्हणजे अतिशय धार्मिक वृत्तीची आणि सनातनी स्त्री होती. त्यांनी तेव्हा वयाची 80 पार केलेली होती. गळ्यात पांडुरंगाची माळ व हातात तुकारामाची गाथा किंवा दुसरे एखादे धार्मिक पुस्तक घेऊन सतत वाचन करत असत. त्यांचे स्पष्ट उच्चार असलेले वाचन पाहून मी आवाक होत असे. मी त्यांच्याकडे गेल्यावर मला पाहताच त्या खांद्यावर असलेल्या पदरी डोक्यावर घेऊन सावरून बसायच्या.

मनात विचार यायचा की त्या काळात, म्हणजे साधारण सन 1930-31 साली, त्यांनी शिक्षण कसे घेतले असेल? मला वाटते, त्या काळात असे शिक्षण घेणारी ती एकमेव स्त्री असावी.

त्यांच्या शेवटच्या काळात कदम दांपत्याने त्यांची खूप सेवा केली. नव्हे कदम साहेबांना त्यांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. त्या गेल्या तेव्हा त्यांचे वय 95 च्या पुढे होते.

कदम साहेबांचे त्यांचा लहान भाऊ सुनीलवर खूप प्रेम होते. त्यांना ते त्यावेळी सतत मदत करत असत. मीसुद्धा त्यांना घराच्या फर्निचरचे काम दिले होते. इतके आखीव-रेखीव फर्निचरचे काम करावे तर सुनील मिस्त्री यांनीच. 

कदम साहेब सुद्धा पूर्वी फर्निचरचे काम  काम करत. त्यांची लाकडंची वखार देखील होती. कदम साहेब फर्निचर बाबत खूप तज्ञ होते. अगदी बारीक सारे बारकावे सुद्धा त्यांना कळत असत. सुनील मिस्तरींना ते सतत मार्गदर्शन करत असायचे. त्यांना जमले नाही तर हे करायचे. 

ते कामाच्या बाबतीत कोणतीच तडजोड करत नसत. एखादे काम फसले तर ते पुन्हा नव्याने करत. त्यांना मी सांगूनदेखील ते ऐकत नसत.

कदम साहेबांच्या पत्नीला आम्ही सर्वजण कदम काकू म्हणायचो. माझा मुलगा वेदांत लहान असताना दिवसभर त्यांच्या घरी त्यांच्याकडेच असे.

त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला, यात्रेला, लग्नाला, नातेवाईकांकडे त्या वेदांतला घेऊन जात असत. त्याला नवीन कपडे, खेळणी घेत असत. माझ्या तान्ह्या मुलीला कदम काकू दररोज अंघोळ घालत असत. असे आमचे ऋणानुबंधाचे संबंध तयार झाले होते.

मी जर केव्हा गावाला गेलो तर आमचे चुलते, चुलती, गावातील काही माणसे कदम साहेबांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल चौकशी करीत. तुमच्या शेजारचे कदम कुटुंब खूप चांगले हे असे म्हणत असत.अजूनही गावी गेलो तर चौकशी करतात.

त्यांची मुलगी भाग्यश्री हिला सर्वजण आम्ही ताई म्हणत असू. अतिशय शांत स्वभाव असलेले ताई नेहमी आम्हाला काही ना काही मदत करत असायची.

एकदा माझ्या पत्नीला रात्री १२ च्या नंतर  दवाखान्यात ऍडमिट करावे लागले. त्यावेळी कदम साहेब गावाला गेले होते. कदम काकू आणि आम्ही रिक्षाने दवाखान्यात गेलो.

पत्नीला ऍडमिट केल्यावर कदम काकू रात्रभर पत्नीच्या जवळ बसून होत्या. आणि इकडे आमच्या घरी ताई वेदांत जवळ बसून होती. कारण रात्रभर लहान असलेला मुलगा वेदांत झोपला नाही. हे दोघे रात्रभर टीव्ही पाहत होते.

कदम साहेबांचा मुलगा विजय म्हणजेच आमचा बंटी.. अतिशय हळव्या मनाचा प्रेमळ असा हा बंटी.

लहान मुलांना सांभाळावे तर बंटीनेच. आमच्या मुलांना त्यांनी खूप जीव लावला. बाळा शिवाय कधीच तो हाक मारायचा नाही.  

सन 2917 मध्ये मला कदम यांच्या शेजारी असलेले माझे घर आर्थिक अडचणीमुळे विकून दुसरीकडे राहावे लागले. ज्यावेळी मी घर सोडले व शेवटचे त्यांना भेटायला गेलो, तेव्हा ते गळ्यात पडून लहान मुलासारखे रडले.

कदम साहेब 2022 च्या जून महिन्यात सेवेतून निवृत्त झाले. तेव्हा आम्ही सर्व कुटुंब त्यांच्या निरोप समारंभासाठी गेलो होतो. अतिशय नेटका असा कार्यक्रम आयोजित केला होता. 

कदम साहेबांना निरोप देण्यासाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, जवळचे मित्र, परिवार, नातेवाईक व विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळातील त्यांचे अधिकारीदेखील आवर्जून वेळ काढून कार्यक्रमाला आले होते. अनेकांनी भेटवस्तू आणल्या होत्या. कार्यक्रम संपल्यावर उत्तम असे जेवण ठेवले होते.

कदम साहेबांचे सर्व जाती-धर्मामध्ये उत्तम असे जिवाला जीव देणारे मित्र आहेत. त्यांच्या मुळे माझ्याही त्यांच्याशी ओळखीपाळखी झाल्या आहेत.

विशेष म्हणजे त्यांचे मित्र लतीफभाई यांच्याकडून माणसाने स्थितप्रज्ञ कसे असावे व कोणतेही संकट आल्यावर त्यातून कसे पार व्हावे, हे शिकायला मिळाले. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी त्या वेळी कदम साहेबांबरोबर उपस्थित असे.

त्यांचे मित्र जोशीकाका यांच्याकडून पंचांग कसे पाहावे किंवा ज्योतिषशास्त्राबद्दल खूप काही शिकायला मिळाले. अनेक धार्मिक कार्यक्रम आम्ही जोशीकाकांकडून करून घेतले, परंतु त्यांनी कधीही “इतकीच दक्षिणा द्या” असे सांगितले नाही.

त्यांचे दुसरे मित्र हांडे साहेब. अगदी देवमाणूस. कदम साहेबांचे आदरणीय व्यक्तिमत्व..मला अनेक वेळा कदम साहेबांबरोबर त्यांच्याकडे जाण्याचा योग आला. तेही नेहमी कदम साहेबांकडे येत असत. हांडे रावसाहेब म्हणून ते मित्रमंडळी मध्ये प्रसिद्ध होते. आता ते कुठे आहेत माहित नाही.

हांडे साहेबांकडे पाहिल्यावर महाभारतातल्या पितामह भीष्मचर्यांची आठवण व्हायची. अतिशय शांत आणि मितभाषी स्वभाव असलेला माणूस. मला त्यांच्याविषयी खूप आदर वाटायचा.

त्यांचे मित्र व कार्यालयीन कर्मचारी श्री. बाबाजी कडलग व श्री. दाते साहेब यांनी संपूर्ण चासकमान धरणाचे बांधकाम आम्हाला फिरवून दाखवले.

कदम साहेबांनी सेवेतून निवृत्त झाल्यावर गुंडाळवाडी येथे शेती घेतली. त्यांनी मला त्यांची शेती पाहण्यासाठी येण्याचा खूप आग्रह केला. त्यामुळे त्यांच्या बरोबर मी त्यांची शेती पाहायला गेलो. शेतीमध्ये खूप मोठे पोल्ट्रीफार्म उभारले आहे. पाहून खूप आनंद झाला.



कदम साहेबांना सामाजिक कार्याची सुद्धा खूप आवड आहे. वर्षाकाठी ते गरीब मुलांना वह्या, पुस्तके किंवा दप्तर यासाठी पंधरा-वीस हजार रुपये खर्च करतात. त्यासाठी कोणत्याही प्रकारची पेपरबाजी, जाहिरात ते करत नाहीत.

अशा या हळव्या, माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या हनुमंत कदम यांच्यासारखी माणसं आजच्या काळात क्वचितच पाहायला मिळतात. नात्यांना जपणं, मित्रांसाठी उभं राहणं, आणि कुठलाही गाजावाजा न करता समाजासाठी काम करणं ही त्यांची खरी ओळख आहे.

आयुष्यात संपत्तीपेक्षा माणसं कमावणं अधिक महत्त्वाचं असतं, हे त्यांनी त्यांच्या वागण्यातून दाखवून दिलं.

आजही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांची भेट झाली की मन नकळत भारावून जातं… आणि एकच विचार मनात येतो 

“माणूस असा असावा… साधा, सरळ आणि मनाने श्रीमंत.”

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...