Translate

श्री.अरुण चांभारे ( राजकारणातला समाजसेवक)

आज जे काही मी आयुष्यात उभा आहे. त्यामध्ये श्री.अरुण चांभारे यांचा मोठा वाटा आहे. अरुण चांभारे यांची माझी ओळख सन 2004 या सालातली. ते एकदा कोणाचे तरी काम घेऊन माझ्याकडे आले होते.  त्यावेळी ते कोणत्याच पदावर नव्हते. अगदी सामान्यातील सामान्य माणूस होते.

img src="..." alt=" अरुणशेठ चांभारे ">
यानंतर पुन्हा कामानिमित्त त्यांची माझी वारंवार भेट होत राहिली. ते सतत तहसीलदार कचेरी, पंचायत समिती कार्यालय, कृषी विभाग अशा अनेक कार्यालयामध्ये सर्वसामान्य लोकांची कामे घेऊन जात असत. 

मी जेव्हा जेव्हा तहसीलदार कचेरी, कृषी विभाग, महावितरण केंद्र येथे काही कामानिमित्त जात असे तेव्हा त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या घोळक्यात अरुण शेठ चांभारे दिसत असत. 

अगदी झेरॉक्सच्या दुकानात सुद्धा अरुण चांभारे झेरॉक्स चे कागद घेत असताना दिसत.

त्यांच्या या समाजशील स्वभावामुळे त्यांच्याविषयी आदर अधिकच वाढला होता.त्यामुळे त्यांच्या जास्त जवळ जाता आले. 

कार्यालयीन कामाच्या निमित्ताने मला सतत आमदार दिलीप मोहिते यांच्याकडे जावे लागे. त्यावेळी तेथे अरुण चांभारे, श्री.नंदकुमार मांदळे, श्री. शांताराम भोसले,असे त्यांचे अनेक कार्यकर्ते तेथे बसलेले असत. त्यावेळी श्री नंदकुमार मांदळे आणि अरुण चांभारे आमदार दिलीप मोहिते यांना माझे विषयी सांगत असत. त्यामुळे आमदारांनी कधीही मला शब्दाने दुखवले नाही किंवा बोलले नाहीत.

पुढे अरुण चांभारे जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक लोकांची कामाच्या निमित्ताने वर्दळ वाढू लागली. जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर देखील अरुण शेठ ज्या कोणाचे काम जेथे कुठे असेल तिथे स्वतः जात असत.

एकच वेळी त्यांना कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे सभापतीपद आणि पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक पद मिळाले. हे सर्व त्यांच्या सामाजिक कामाची, निष्ठेची पावतीच होती असेच म्हणावे लागेल. 

जबाबदारीची पदे मिळाल्यामुळे त्यांच्या ऐवजी एखाद दुसरा माणूस असता तर तो पुणे येथील राहायला गेला असता. परंतु असे असून सुद्धा अरुण शेठ राजगुरुनगर मध्येच राहिले.

रोज सकाळी सकाळी त्यांच्या घरी काम घेऊन येणाऱ्या लोकांची वर्दळ असे. मीही अनेक वेळा त्यांच्याकडे कार्यालयीन कामाच्या निमित्ताने जात असे. सगळ्या लोकांची कामे मार्गी लावून साडेनऊ ते दहाच्या दरम्यान अरुण शेठ जिल्हा परिषद पुणे येथे त्यांच्या ऑफिसला जात असत.     

सामान्य लोकांचे, कार्यकर्त्यांचे लग्न समारंभ, वास्तुशांती, धार्मिक कार्यक्रम, यात्रा उत्सव, दशक्रिया इत्यादी समारंभांना ते उपस्थित असत. व आता सुद्धा ते उपस्थित असतात. ही एक प्रकारची तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. एवढं सगळं अरुण शेटच करू जाणे.

सन 2009 साली आमच्या गावच्या ग्रामपंचायतची निवडणूक लागली होती. ही निवडणूक प्रस्थापितांच्या विरोधात होती. सर्व गाव प्रस्थापितांचे विरोधात होते. आम्ही सगळे प्रस्थापितांच्या विरोधात होतो. परंतु प्रस्थापितांचे वजन दांडगे होते. त्यांच्या बाजूने आमदार श्री.दिलीप शेठ मोहिते आणि पंचायत समिती सभापती श्री रामदासजी माटे आणि पश्चिम भागातील सर्व नेते मंडळी होती. आणि या सर्वांचे म्हणणे की निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. आणि सरपंच पद प्रस्थापितनच द्यावे लागेल अशी सर्वांची भावना होती. श्री अरुण शेठ सुद्धा अर्थातच त्यांच्याच बाजूने होते.

आणि अशा परिस्थितीत ही कोंडी फोडायची कशी हा आम्हा सर्व गावापुढे मोठा प्रश्न होता. मला एकदम आठवले श्री अरुण शेठ चांभारे. तेच आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतील अशी मनोमन खात्री होती. मी एकटाच अरुण शेठ चांभारे यांच्या घरी गेलो. त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. 

ते बोलले रामदास... सर्वजण त्यांच्या पाठीशी आहेत.आता मी एकटा तरी काय करणार. माझे कोण ऐकणार. तुला तर माहित आहे. तुमच्या गावचे ते प्रस्थापित आमदारांच्या किती जवळचे आहेत ते ? शिवाय रामदास माटे सभापती हे तर त्यांचे मित्रच आहेत. मी जर तुम्हाला मदत केली. तर तो पक्षाच्या दृष्टीने चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे मला तरी असं काही करता येणार नाही.असा सल्ला दिला.

माझी नाराजी त्यांना स्पष्ट दिसत होती. आम्हाला तर केवळ तुमचाच आधार होता. असे म्हणून मी तिथून निघून गेलो.       

अरुण शेठ यांनी खूप विचार केला. आणि रात्री दहा वाजता फोन केला. आणि भेटायला बोलावले. मी आणि माझे मित्र श्री. बबन गोपाळे त्यांच्याकडे गेलो. तिथे गेल्यावर त्यांनी तुम्ही बिनधास्त तयारीला लागा. पुढे काय होईल ते मी पाहतो. परंतु मी तुमच्या पाठीशी आहे. हे सध्या तरी कुणाला कळू देऊ नका. नंतर सविस्तर त्यांना सांगू असे सांगितले. 

आम्ही तयारीला लागलो. आणि आम्ही ती निवडणूक जिंकली. आमच्या विचारांचा सरपंच झाला. तोपर्यंत आमदार दिलीप मोहिते साहेब यांना कोणतीच कल्पना नव्हती. आम्ही सर्वजण आमदार दिलीप मोहिते साहेबांना भेटायला गेलो. तिथे गेल्यावर प्रथम आमदार दिलीप मोहिते साहेब आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटले विरोधी गट आपल्याला भेटायला कसा आला. ज्यावेळी त्यांना अरुण शेठ यांनी सर्व समजावून सांगितले. तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. 

हे सर्व अरुण शेठ यांनी केवळ माझ्यासाठी केले होते. आणि नंतर त्यांनी ते बोलूनही दाखवले. 

आमच्या या ग्रामपंचायत निवडणुकीत आमचे उमेदवार जिंकून येण्यासाठीची संपूर्ण रणनीती मी आणि श्री.बबन गोपाळे साहेब (टोकवडे) यांनी आखली होती. आणि शेवटपर्यंत श्री बबन गोपाळे साहेब यांनी बहुमोल मदत केली होती.

अरुण शेठ लोकांसाठी नेहमी काही ना काही काम करत असतात. त्यांच्या समस्या सोडवत असतात. काही लोकांची तर अक्षरशः झेरॉक्स सुद्धा काढतात.

सन 2007 साली जिल्हा परिषद निवडणुकीची आचार संहिता लागली होती. तेव्हाच्या साकुर्डी - नायफड जिल्हा परिषद गटात अरुण शेठ विरुद्ध सुरेश कौदरे अशी लढत होती. अरुण शेठ इतकेच माझे सुरेश कौदरे यांचेशी घानिष्ठ संबंध होते.प्रचाराची राळ उडाली होती. प्रचाराचा जोर वाढला होता. आणि आशाताच संगम कलेक्शन दुकाना जवळून मी मोटारसायकल वरून जात होतो. तेथे अरुणशेठ पायी चालले होते.मी त्यांना चूकवून पुढे जाऊ लागलो मात्र..

रामदास अरे मला.आमदारांच्या ऑफिसला सोड ना..?

अहो आचारसंहिता चालू आहे. मी तुम्हाला गाडीवर घेतले आणि कुणी पाहिले तर? मी म्हणालो. तो पर्यंत ते गाडीवर बसले सुद्धा. आणि काय आश्चर्य... पुढच्या चौकात ऍड.सुरेश कौदरे दत्त म्हणून उभे.

मी त्यांच्या जवळ जाऊन गाडी उभी केली.

तुम्ही अरुण शेठचा प्रचार करता काय?

कौदरे साहेबांनी माझा हातात हात घेत हसून विचारले.

हा गाडी थांबवत नव्हता.. पण मीच बळच गाडीवर वसलो. असे बोलून ते दोघे चौकातच दहा, पंधरा मिनिटे गप्पा मारू लागले. येणारे जाणारे लोक दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या चाललेल्या गप्पा ऐकून चकित होत.

पंचायत समितीमध्ये असताना माझ्यावर एक मोठा प्रसंग गुदरला होता. माझ्यावर 120 सेवानोंद पुस्तके गहाळ केल्याचा आरोप ठेऊन पोलीस स्टेशन मध्ये माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ते प्रकरण न्यायालयात गेले असते तर त्याचा निकाल कधी लागला असता हे सांगावयास न लगे.

आता काय करायचे याबाबत माझ्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला होता. मी विचार करत असता मला यातून फक्त अरुण चांभारेच बाहेर काढू शकतात. असे माझे मन सांगू लागले. मी तात्काळ अरुण शेठ यांना फोन केला. बरेच वेळ त्यांचा फोन बिझी लागत होता. खूप वेळानी त्यांचा फोन लागला. मी त्यांना माझी अडचण सांगितली. त्यांनी मला भेटायला बोलावले. मी त्यांच्या घरी गेलो आणि प्रत्यक्ष भेटून त्यांना अडचण सांगितली.

त्यावेळेस ते कोणत्याच पदावर नव्हते. यावर ते बोलले.

अरे! आता तर मी कोणत्याच पदावर नाही. माझं कोण ऐकणार? शिवाय याबाबत पेपरला बातम्या पण प्रसिद्ध झालेल्या आहेत. 

पण.. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. बोल मी काय करू ? 

मी त्यांना एवढंच सांगितलं. साहेब तुम्ही वरिष्ठांना फोन करा. आणि सांगा. प्रथम चौकशी करा. त्यामध्ये काही निष्पन्न झालं तर मग गुन्हा दाखल करा. परंतु आधी गुन्हा दाखल करू नका. एवढेच त्यांना सांगा. 

ठीक आहे! असे म्हणून त्यांनी वरिष्ठांना फोन लावला. आणि माझी बाजू त्यांना समजावून सांगितली. आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी माझे म्हणणे तात्काळ मान्य केले.

मला अरुण शेठ यांनी कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ येऊ दिली नाही. शिवाय कोर्टाचा निर्णय लागल्यानंतरच पुन्हा नोकरी मिळाली असती. त्यात सहज पंधरा-वीस वर्षे गेली असती. तोपर्यंत मी रिटायर देखील झालो असतो. परंतु ही सर्व किमया अरुण शेठ यांनी केली.आणि मला मोठ्या संकटातून वाचवले होते.

माझ्या अडचणीच्या काळात भेटल्यावर ते मला नेहमी म्हणायचे. रामदास काही काम असेल तर सांग बर का मला. मी हो म्हणायचो. आणि पुढे निघून जायचो.

श्री.अरुण शेठ चांभरे हे राजकीय पक्षाशी जोडले असल्यामुळे आणि मी सामान्य माणूस असल्यामुळे त्यांच्या अन्य पक्षीय विरोधकांशी सुद्धा माझा संबंध यायचा. त्यांच्याच पक्षाचे परंतु त्यांच्यापासून दूर गेलेले आमच्या गावचे एक मनुष्य जे पूर्वी माझेही विरोधक होते. ते माझ्याबरोबर फिरताना त्यांनी बऱ्याच वेळा पाहिले. आणि एकदा मला बोलले. रामदास! तू आता त्यांचा माणूस झाला आहे. यावर मी काहीही बोललो नाही.

त्यांनी पक्षाच्या कामाबाबत कधीही माझ्यावर दबाव आणला नाही. किंवा पक्षाच्या कामाला जुंपले नाही. आणि मीही कधी अमुक तमुकला मतदान करा असे गावात सांगितले नाही. 

आमच्या गावात त्यांच्या पक्षाला अत्यंत कमी मते पडायची. त्यांच्याकडे गेल्यावर ते मला नाराजीने म्हणायचे. बघ रामदास.! तुझ्या गावात आमच्या पक्षाला सर्वात कमी मतदान झालं आहे. परंतु कमी मतदान झालं आहे म्हणून मला कधीच त्यांनी दूरचा रस्ता दाखवला नाही. अनेक हितशत्रूंनी माझ्याबद्दल त्यांना बरेच काही बाही सांगितले. परंतु त्यांनी ते कधीच मनावर घेतले नाही.

मला पंचायत समिती आंबेगाव या ठिकाणी बदली पाहिजे होती. परंतु मला त्याऐवजी पंचायत समिती जुन्नर येथे नियुक्ती दिली होती. जुन्नर पंचायत समिती येथे हजर होणे नाईलाजाने गरजेचे होते. आणि अशातच मला अरुण शेठ चांभारे यांची आठवण झाली. मी त्यांना याबाबत सविस्तर सांगितले. त्यांनी सांगितले थांब! लगेच हजर होऊ नको. मी पाहतो. चार-पाच दिवसांनी आपण जिल्हा परिषदेत जाऊ.बघूया प्रयत्न करून.

ठीक आहे! मी म्हणालो.

परंतु दुसऱ्याच दिवशी मला अरुण शेठ यांचा फोन आला. अरे! मी पुण्याला आलो आहे. तू कुठे आहे? मी बोललो मी खेडला आहे. अरे! माझं पुण्यात एक काम होतं. परंतु ते काही झालं नाही. तर मी आत्ता जिल्हा परिषदेला जाऊन तुझ्या कामाचं पाहतो.असे म्हणून ते जिल्हा परिषद पुणे येथे गेले. आणि माझा जुन्नर येथील नेमणूक आदेश बदलून पंचायत समिती आंबेगाव असा बदल करून तो आदेशच घरी घेऊन आले. 

घरी आल्यावर त्यांनी मला फोन केला. तुझा आंबेगाव चा बदली आदेश आणला आहे. ये घरी. मी त्यांच्या घरी गेलो. तर ते जेवण करत होते. तिथूनच त्यांनी मला सांगितले. त्या टेबलावर आदेश आहे बघ. बरोबर आहे का पाहून घे. मी टेबलावरील आदेश घेऊन वाचू लागलो. तर काय आश्चर्य ! खरोखरच त्यांनी माझा आदेश बदलून आणला होता. त्यावेळी ते कोणत्याच पदावर नव्हते. तेव्हा त्यांचा सुद्धा Badpach चालू होता.

परंतु ते पदावर असताना अधिकाऱ्यांशी त्यांचे आलेले संबंध हे अत्यंत जिव्हाळ्याचे असल्यामुळेच हे शक्य झाले होते. माझ्या या कामाबद्दल साधे त्यांना पेढे सुद्धा दिले नाहीत.

आजही अरुण शेठ चांभारे यांचे सामाजिक राजकीय कामकाज चालू आहे. कधीतरी त्यांची माझी भेट होती. आणि एक परमेश्वर भेटल्याचा मला भास होतो. त्यांच्याबरोबर राजकीय लोकांची वर्दळ असते. खूप बोलायचे असतं पण  वेळेच्या अभावामुळे जास्त काही बोलणे होत नाही. 

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

1 टिप्पणी:

  1. साहेबांनी बऱ्याच गावांचे वाटोळे सुद्धा केले आहे, लोकांवर खोट्या नाट्या केसेस टाकून

    उत्तर द्याहटवा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...